थैमान या शब्दातच रौद्र रसोत्पत्ती आहे. थैमान निसर्गाचे असो, एखाद्या विषाणूचे असो, सामाजिक राजकीय घडामोडींचे असो किंवा व्यक्तीच्या मनात उसळलेल्या विचारांचे असो पण थैमान या शब्दात एक भयानकता आहे, हिंसाचार आहे. कुठलाही सौम्यपणा अथवा सौंदर्य त्यात जाणवत नाही. तांडव आणि थैमान हे तसे एकाच अर्थाचे दोन शब्द. थैमानात तांडव असते आणि तांडवात थैमान असते. एकच तीव्र सुरावट घेऊन ते अंगावर आढळतात. थैमान बाहेरचे असो किंवा आतले असो ते काहीही करून ओसरावे याची आस लागून राहते. थैमान म्हणजे नको असे काहीतरी आणि त्यापासून दूर जाण्यासाठी चाललेली झुंज म्हणजेच नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे जाण्याची धडपड.
सुश्री अरुणा मुल्हेरकर
साधारण अशाच अर्थाची थैमान या शीर्षकांतर्गत, माननीय कवयित्री अरुणा मुल्हेरकर यांची एक गझल वाचण्यात आली आणि त्यातल्या भावभावनांचा मागोवा घ्यावासा वाटला.
अगोदर आपण कविता वाचूया.
☆☆☆☆☆
☆ – थैमान – कवयित्री : सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆
☆☆☆☆☆
काळोख दाटलेला काहूर माजलेले
अस्वस्थ का असे मन माझेच जाहलेले
*
नाही कधी सुखाच्या पाठीस धावले मी
सुख नेमके समोरी होतेच ठाकलेले
*
दिन सारखेच सांगा असतात का कधीही
होणार अस्त नक्की ऋतुचक्र चाललेले
*
अर्ध्यावरीच माझा संसार का तुटावा
कोडे कधी न सुटले मज तूचि घातलेले
*
घन दाटतात गगनी दिसते धरा सुहासी
दावानलात एका सर्वत्र जाळलेले
*
आयुष्य शिकविते मज खोटे नि काय असली
पाऊस शांत होतो विश्रांत भागलेले
*
आता मला कळाले हे सार जीवनाचे
सारे पळून गेले थैमान दाटलेले
*
कवयित्री : सुश्री अरूणा मुल्हेरकर
आनंदकंद वृत्तातील ही संपूर्ण गझल वाचताक्षणीच मनात आले की हे कवयित्रीच्या मनात चाललेलं विचारांचं थैमान आहे. विचारांचं ओझं पेलवेनासे झालं की माणूस हतबल होतो आणि नकळतपणे गतायुष्याच्या आठवणीत खेचला जातो आणि त्या क्षणापासून आठवणींशी मनाचा संवाद सुरू होतो.
अरुणाताई गझलेतल्या मतल्यात म्हणतात,
काळोख दाटलेला काहूर माजलेले अस्वस्थ का असे मन माझेच जाहलेले
ही एक मनाची बेचैन स्थिती आहे. काहीशी उदास, निराश. मनातले
विचारांचे काहूर, विचारांचे वादळ अजिबात स्वस्थता मिळू देत नाहीत. वरवर, दर्शनी जरी एखादी व्यक्ती स्थिर आणि शांत भासत असली तरी अंतर्मनातल्या वादळी लाटा धक्के देत असतात आणि मग सहजपणे मनात येतं की का घायाळ माझे मन? कशासाठी मी अस्वस्थ आहे? बेचैन आहे?
एकदा का मनाशी संवाद सुरू झाला की अनेक भेंडोळी उलगडायला लागतात…
नाही कधी सुखाच्या पाठीस धावले मी सुख नेमके समोरी होतेच ठाकलेले
आयुष्यात जपलेल्या सुखाच्या कल्पना काही अवास्तव नव्हत्या आणि विशेष म्हणजे सुख माझ्या दारातच होते. ते शोधण्यासाठी मला कधी धावाधाव करण्याची गरजच पडली नाही. अरुणाताईंनी लिहिलेल्या या पहिल्या शेरातच आनंदी राहण्याची, आहे त्यात समाधान आणि सुख वेचण्याची त्यांची वृत्ती दिसून येते.
नाही कधी सुखाच्या पाठीस धावले मी हा उला फार अर्थपूर्ण आहे. आयुष्यभर माणूस सुख समजून मृगजळापाठीमागे धावत राहतो कारण खरं सुख कशात आहे हेच त्याला उमगलेल नसतं आणि परिणामी त्याच्या पदरी दुःख आणि निराशाच येते पण कवयित्री आपल्या या शेरात स्वतःबद्दल खात्रीपूर्वक सांगतात की “उंबरठ्यावरच्या सुखाला डावलून त्या पळत्याच्यापाठी कधीही गेल्या नाहीत.”
घरात असता तारे हसरे
मी पाहू कशाला नभाकडे?
*
अशीच त्यांची वृत्ती असावी.
*
दिन सारखेच सांगा असतात का कधीही
होणार अस्त नक्की ऋतुचक्र चाललेले
हा तिसरा शेर अरुणाताईंच्या मनाची अध्यात्मिक बैठक दर्शवणारा आहे. काळ स्थिर नसतो, तो बदलत असतो. जे आज आहे ते उद्या नसणार आहे हा निसर्गाचा नियम आहे. बदलणारे ऋतू म्हणजे निसर्गात घडणारी स्थित्यंतरे. मानवी जीवनातही अशी स्थित्यंतरे होत असतात. सुखदुःखाचा लपंडाव चालू असतो. हा शेर वाचताना असे वाटते की यात जीवनाविषयीची स्वीकृती आहे, स्वतःच्या मनाला बजावणं आहे आणि मनाला समजवण्याच्या प्रक्रियेतूनच हे विचारांचं थैमान उठलेलं आहे.
अर्ध्यावरीच माझा संसार का तुटावा कोडे कधी न सुटले मज तू चि घातलेले
मनात प्रचंड दुःख आहे, तीव्र घालमेल आहे.
भातुकलीच्या खेळामधले राजा आणिक राणी
अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी
या गीताची आठवण करून देणारा आहे. अरुणाताईंचा हा शेर मन कातरून टाकतो.
सुखासमाधानात दिवस चालले होते, खाच— खळगे, काटेकुटे तुडवतही एकमेकांच्या साथीने हसऱ्या सुमनांची ओंजळ भरली होती मग मध्येच हात सोडून माझा जिवलग हे जग सोडून का गेला?
काही प्रश्नांना उत्तरेच नसतात आणि म्हणून ते न सुटणारी कोडी बनून आयुष्य व्यापून टाकतात मग या कोड्याचं उत्तर कोणाला विचारायचं? एका अज्ञात शक्तीला, आकाशातल्या त्या बापाला… “तू मला अनंत सुखं देता देता हे न पेलवणारे दुःख का माझ्या झोळीत टाकलेस? असा मी काय गुन्हा केला होता?”
हा संपूर्ण शेर म्हणजे मनात तुडुंब भरलेल्या वेदनेचीच घागर आहे. कुठल्यातरी अलवार क्षणी ती डचमळते आणि मग मनातलं हे वादळ अधिकच थैमान घालू लागतं.
घन दाटतात गगनी दिसते धरा सुहासी दावानलात एका सर्वत्र जाळलेले
ग्रीष्माने फाटलेली, भेगाळलेली धराही शांत होते जेव्हा आभाळात मेघ दाटतात. एकाच वेळी वादळ आणि सांत्वन, वेदना आणि शमन या भिन्न भावाविष्काराचे सुंदर वर्णन या ओळींमध्ये आहे. हा संपूर्ण शेर रूपकात्मक आहे. सानीमध्ये वापरलेला दावानल हा शब्द मनासाठी रूपक म्हणून वापरला आहे. शांत दिसणाऱ्या अर्णवाच्या उदरात वणवा पेटलेला असतो तसा मनाच्या सागरातही विचारांचा वणवा पेटलेला असतो. भावनांचा उद्रेक झालेला असतो.
घन दाटतात गगनी
दिसते धरा सुहासी
मनात शांत वारे अचानक वाहू लागतात, सकारात्मक विचार येऊ लागतात, हरवलं जरी असलं खूप काही तरी अजूनही बरंच बाकी आहे. आठवणींच्या रूपात, त्याच्या अंशांच्या रूपात.. जे आनंददायी आहे. इथे या विचारांना घन दाटले गगनी ही उत्प्रेक्षा म्हणजेच कवयित्रीची काव्यात्मकता !
मनातला नकोसा कचरा जळत आहे आणि पुन्हा सुखाचा भास होत आहे. नकळत थैमान ओसरत आहे.
आयुष्य शिकविते मज खोटे नि काय असली
पाऊस शांत होतो विश्रांत भागलेले
आयुष्याच्या प्रवासात खूप काही शिकले. खरं काय, खोटं काय, काय अस्सल काय हीणकस याची धक्के खात का होईना ओळख झाली आहे आता.
मनाची अशी एक स्थिती असते की आता साऱ्या लाटा ओसरून गेल्यात, किनाऱ्यावरचा गाळ, कचराही त्या लाटांबरोबर वाहून गेलाय आणि आता किनारा स्वच्छ, सुंदर आणि स्थिर झाला आहे.
सहजच केशवसुतांच्या या ओळी आठवतात.
* शांतच वारे शांतच सारे*
शांतच हृदयी झाले सारे
कवयित्रीचे मनातले वादळ आता असेच शमत आहे. मनातल्या विचारांच्या पावसाचे थैमान आता ओसरत आहे कारण आता गतकाळातल्या सुखी जीवनाच्या आठवणीतच मन रमू लागलं आहे. या शेरात अरुणाताईंनी त्यांच्या हृदयातला एक अव्यक्त सरगम व्यक्त केला आहे.
आता मला कळाले हे सार जीवनाचे
सारे पळून गेले थैमान दाटलेले
या शेवटच्या शेरामध्ये जीवन यांना कळले हो असा एक अध्यात्मिक विचारच जणू मांडला आहे.
जीवन हे एक मंथन आहे. साऱ्या सुखदुःखाची घुसळण होते आणि मग हाती सार लागते. सुखा मागून दुःख आणि दुःखा मागून सुख हा नियतीचा नियमच आहे. दुःखातून सुखाचा मार्ग काढणे म्हणजे जीवन जगणे. विचार करता करता कवयित्री अरुणाताईंना याची जाणीव झाली आहे आणि त्या म्हणतात,
आता मला कळाले हे सार जीवनाचे
“दुःख उगाळत राहण्यापेक्षा सुखाला दार उघडून द्यावे” हे मी जाणते आणि आता हे मनातल्या काळोखातलं थैमान कसं ओसरत आहे याचाही अनुभव घेत आहे.
ही गझल म्हणजे मनाचा एक प्रवास आहे.
अस्वस्थतेकडून स्थैर्याकडे नेणारा.
मिटलेलं दार उघडून देणारा.
अस्तापासून उदयाकडे नेणारा.
अतिशय सुंदर, अर्थपूर्ण, अशी ही गझल. साध्या साध्या पण सुंदर रूपकातून जीवनाविषयीचा एक सखोल संदेश ही गझल वाचत असताना मिळतो. वादळातून शांततेकडे, नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे नेणारा एक विचार प्रवाह या गझलेत अतिशय नेमकेपणाने, सुटसुटीत शब्दात मांडलेला आहे
माजलेले, जाहलेले, ठाकलेले, चाललेले, घातलेले यासारखे लगावली साधणारे काफीया शेरामधली खयालत आणि राबता यांची खोली दर्शवतात.
थोडक्यात अरुणाताई मुल्हेरकर यांची थैमान म्हणजे एक सुंदर गझल, एक सुंदर खयालत, एक सुंदर संदेश.
☆ स्वातंत्र्य दिन 🇮🇳 ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆
(१५.०८.२०२४)
आज भारताचा ७८वा स्वातंत्र्य दिवस. 🇮🇳
मागील ७८ वर्षात भारताने लक्षणीय प्रगती केलेली आहे. त्याबद्दल सर्व भारतीयांचे कौतुक करावे तितके थोडे आहे.
शेकडो वर्षांच्या पारतंत्र्यात राहूनही काही वर्षात अशी नेत्रदीपक प्रगती करणे हा पराक्रम म्हणावा लागेल….!
अनेक क्षेत्रातील प्रगतीची उंच शिखरे गाठत असताना, आपण माणुसकीच्या शिखरावरून खाली तर येत नाही ना याचाही विचार केला पाहिजे.
आर्य सनातन वैदिक हिंदू संस्कृतीने मागील हजारो वर्षात कोणावरही आक्रमण केले नाही, तर याउलट सर्व विचारधारांना आपल्या मध्ये सामावत माणुसकी धर्म वाढवण्याचा प्रयत्न केला.
*भगवंताने गीतेत सांगितलेला उपदेश प्रत्यक्ष आचरणात/कृतीत आणण्याचा कालावधी सुरू झाला आहे असे म्हणता येईल. देशातंर्गत सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलेला आपल्याला आढळून येईल. भागवतांनी सांगितलेली गीता अर्जुनाने नुसती पाठ केली नाही, तर ती समजून घेऊन अधर्मी लोकांचा नाश केला. हा इतिहास आपण आजच्या पावन दिनी आठवूया.
अर्जुनाने शमी वृक्षावर ठेवलेली शस्त्रे काढून युद्ध केले. आज आमच्या घरात उंदीर मारायला काठी असेल असे सांगता येत नाही. आपल्या सर्व देवी देवतांच्या हातात शस्त्र आहे आणि ते चालवण्याची धमक आणि कुशलता देखील आहे. आपण याचे अनुकरण आणि अनुसरण करण्याची गरज आहे.
अधर्माचा नाश आणि धर्माची प्रतिष्ठापणा करणे हे आपले आद्यकर्तव्य आहे. भारत विश्विजेतेपदी विराजमान होण्यासाठी दुर्जन सक्रिय आणि सज्जन निष्क्रिय हे समीकरण उलट करावे लागेल.
यासाठी आरक्षणाची नाही तर स्वतः देशाचे, धर्माचे संरक्षण करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे.
आजच्या पावनदिनी आपण अशी प्रतिज्ञा करू की भारतमातेच्या डोळ्यांत अश्रू येणार नाहीत, यापुढे माझी भारतमाता कधीही खंडीत होणार नाही…!!