मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “खर्च करा वा सहन करा…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? कवितेचा उत्सव ?

☆ “खर्च करा वा सहन करा” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

असतील पैसे खर्च करा 

नसतील पैसे सहन करा 

*

योजना आली त्वरा करा 

फॉर्म भरा लाईन धरा 

असतील पैसे खर्च करा 

नसतील पैसे सहन करा

*

कुठेही जावे कामासाठी 

अर्ज विनंती किती करा 

असतील पैसे खर्च करा 

नसतील पैसे सहन करा 

*

ऊन कडsक हवी हवा ?

कोठे अडला निसर्ग वारा

असतील पैसे खर्च करा 

नसतील पैसे सहन करा 

*

आकाशातुन कोसळधारा 

जरी पाणी पाणी घराघरा 

असतील पैसे खर्च करा 

नसतील पैसे सहन करा 

*

ज्ञानाची तुम्ही कास धरा 

गुरु हवा? मग शोध करा 

असतील पैसे खर्च करा 

नसतील पैसे सहन करा 

*

निसर्ग आठवे गावाकडचा 

पुन्हा जायची कास धरा 

असतील पैसे खर्च करा 

नसतील पैसे सहन करा 

*

सुंदर स्वप्नांचे आश्वासन 

जरी नेत्याची पाठ धरा 

असतील पैसे खर्च करा 

नसतील पैसे सहन करा 

*

गरिबांचा जो वाली दिसतो 

खाजगीत तुम्ही बात करा 

असतील पैसे खर्च करा 

नसतील पैसे सहन करा 

*

नव्या युगाचा मंत्र नवा

जाणून घ्या ध्यानी धरा 

असतील पैसे खर्च करा 

नसतील पैसे सहन करा

© श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640

email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय ११ — विश्वरूपदर्शनयोग — (श्लोक ४१ ते ५५) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय ११ — विश्वरूपदर्शनयोग — (श्लोक ४१ ते ५५) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

संस्कृत श्लोक… 

सखेति मत्वा प्रसभं यदुक्तं हे कृष्ण हे यादव हे सखेति।

अजानता महिमानं तवेदंमया प्रमादात्प्रणयेन वापि ॥४१॥

*

यच्चावहासार्थमसत्कृतोऽसि विहारशय्यासनभोजनेषु ।

एकोऽथवाप्यच्युत तत्समक्षंतत्क्षामये त्वामहमप्रमेयम्‌ ॥४२॥

*

तव महानता नव्हतो जाणुन प्रमाद घसटीचा

यादवा हे कृष्ण सख्या अजाणता संबोधण्याचा

विनोद विहार शय्या मजसंगे केलीत मायेने

अनमान जाहला माझ्याकडुनी उद्धरा क्षमेने ॥४१,४२॥

*

पितासि लोकस्य चराचरस्य त्वमस्य पूज्यश्च गुरुर्गरीयान्‌।

न त्वत्समोऽस्त्यभ्यधिकः कुतोऽन्योलोकत्रयेऽप्यप्रतिमप्रभाव ॥४३॥

*

जगत्पित्या हे महाजगद्गुरो देवा पूजनीय अनुपम 

त्रैलोक्यी श्रेष्ठ वा नाही कोणी प्रभावी तुमच्या सम ॥४३॥

*

तस्मात्प्रणम्य प्रणिधाय कायंप्रसादये त्वामहमीशमीड्यम्‌।

पितेव पुत्रस्य सखेव सख्युः प्रियः प्रियायार्हसि देव सोढुम्‌॥४४॥

*

प्रसन्न व्हावे क्षमा करावी जगदीश तव  चरणी देहार्पण

पिता पुत्राचा सखा सखीचा जैसे करीत अपराध सहन ॥४४॥

*

अदृष्टपूर्वं हृषितोऽस्मि दृष्ट्वा भयेन च प्रव्यथितं मनो मे।

तदेव मे दर्शय देवरूपंप्रसीद देवेश जगन्निवास ॥४५॥

*

कधी न देखीले तुमच्या या विराटस्वरूप दर्शने

हर्षनिर्भर मनोमनी तैसा व्याकुळ झालो भयाने

जगदीशा परमेशा घ्या आवरून विश्वरूपाला 

प्रसन्न व्हा चतुर्भुज विष्णुरूप दर्शन द्या मजला ॥४५॥

*

किरीटिनं गदिनं चक्रहस्तमिच्छामि त्वां द्रष्टुमहं तथैव।

तेनैव रूपेण चतुर्भुजेनसहस्रबाहो भव विश्वमूर्ते॥४६॥

*

शिरावरी किरीट हाती गदा तथा चक्र हेच रूप दावा

विश्वस्वरूपा सहस्रबाहो मजला चतुर्भुज रूप दावा ॥४६॥

श्रीभगवानुवाच

मया प्रसन्नेन तवार्जुनेदंरूपं परं दर्शितमात्मयोगात्‌ ।

तेजोमयं विश्वमनन्तमाद्यंयन्मे त्वदन्येन न दृष्टपूर्वम्‌ ॥४७॥

कथित श्रीभगवान

प्रसन्न होउनी तुजवर पार्था तुज दिधले दर्शन 

अनादिअंत परम तेजोमय योगशक्तीचे प्रमाण

तुझ्या आधी ना कधी पाहिले कोणी या रूपाला

करुनी तुझिया वरी अनुग्रह दाविले विराट रूपाला ॥४७॥ 

*

न वेदयज्ञाध्ययनैर्न दानैर्न च क्रियाभिर्न तपोभिरुग्रैः।

एवं रूपः शक्य अहं नृलोके द्रष्टुं त्वदन्येन कुरुप्रवीर ॥४८॥

*

दानाने ना वेदाध्ययनाने कर्माने ना उग्र तपाने

विश्वरूप हे माझे पार्था कुणा ना गोचर अन्य कशाने ॥४८॥

*

मा ते व्यथा मा च विमूढभावोदृष्ट्वा रूपं घोरमीदृङ्‍ममेदम्‌।

व्यतेपभीः प्रीतमनाः पुनस्त्वंतदेव मे रूपमिदं प्रपश्य ॥४९॥

*

नकोस होऊ व्याकूळ ना होई बुद्धीभ्रष्ट विक्राळ रूपाने

त्यागुनिया भय प्रीतीने तुष्ट होई चतुर्भुज माझ्या रूपाने ॥४९॥

संजय उवाच

इत्यर्जुनं वासुदेवस्तथोक्त्वा स्वकं रूपं दर्शयामास भूयः ।

आश्वासयामास च भीतमेनंभूत्वा पुनः सौम्यवपुर्महात्मा ॥५०॥

कथित संजय

कथूनी ऐसे  वासुदेवे दाविले चतुर्भुज रूप अर्जुनासी

पुनरपि होउनी सौम्यस्वरूपी धैर्य दिधले कौन्तेयासी ॥५०॥

अर्जुन उवाच

दृष्ट्वेदं मानुषं रूपं तव सौम्यं जनार्दन।

इदानीमस्मि संवृत्तः सचेताः प्रकृतिं गतः॥५१॥

कथित अर्जुन 

दर्शनाने तव सौम्यस्वरूपी मानवी हे जनार्दना

चित्ता लाभले स्थैर्य माझिया स्वाभाविकता मन्मना॥५१॥

श्रीभगवानुवाच

सुदुर्दर्शमिदं रूपं दृष्टवानसि यन्मम।

देवा अप्यस्य रूपस्य नित्यं दर्शनकाङ्‍क्षिणः॥५२॥

कथित श्रीभगवान 

दर्शन झाले तुजला पार्था सुदर्शनधारी चतुर्भुज रूपाचे

देवदेवता दर्शनाकांक्षी दुर्लभ सहजी ना कुणा व्हायचे ॥५२॥

*

नाहं वेदैर्न तपसा न दानेन न चेज्यया।

शक्य एवं विधो द्रष्टुं दृष्ट्वानसि मां यथा ॥५३॥

*

तुला जाहले दिव्य दर्शन चतुर्भुज या रूपाचे

वेद तप वा दान यज्ञे दृष्टी गोचर नच व्हायाचे ॥५३॥

*

भक्त्या त्वनन्यया शक्य अहमेवंविधोऽर्जुन ।

ज्ञातुं द्रष्टुं च तत्वेन प्रवेष्टुं च परन्तप ॥५४॥

*

भक्तीनेच केवळ अनन्य परन्तपा साध्य चतुर्भुज दर्शन 

ज्ञान तयाचे प्रवेश तयात  होई तयाने अद्वैताचे दिव्य ज्ञान ॥५४॥

*

मत्कर्मकृन्मत्परमो मद्भक्तः सङ्‍गवर्जितः ।

निर्वैरः सर्वभूतेषु यः स मामेति पाण्डव ॥५५॥

*

कर्म समर्पित माझ्या ठायी माझ्या चरणी लीन

मोहाचा ना सङ्ग जयाला मम भक्तीने परिपूर्ण 

चराचरांप्रति वैरभाव ना सौहार्दाने जो युक्त

अनन्यभक्तीयुक्त अर्जुना तयासि मी होतो प्राप्त ॥५५॥

*

ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायांयोगशास्त्रे 

श्रीकृष्णार्जुनसंवादे विश्वरूपदर्शनयोगो नामैकादशोऽध्यायः ॥११॥

 

ॐ श्रीमद्भगवद्गीताउपनिषद तथा ब्रह्मविद्या योगशास्त्र विषयक श्रीकृष्णार्जुन संवादरूपी विश्वरूपदर्शनयोग नामे निशिकान्त भावानुवादित एकादशोऽध्याय संपूर्ण ॥११॥

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आदरांजली… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆

श्री रवींद्र सोनावणी

? कवितेचा उत्सव ?

☆ आदरांजली… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆

चिखलगावच्या चिखलामध्ये

कमल उगवले नितांत सुंदर 

गंगाधरसुत बाळ टिळक हा 

किर्ती जयाची गेली दिगंतर

*

नरशार्दूल तो गर्जून उठला

शासन इंग्रजी थरथरले

 घणाघाती शब्दांच्या मधुनी 

सत्तेला आव्हान दिले

*

स्वराज्य हा तर  हक्कच माझा 

तो मी अवश्य मिळवीन

 खुशाल द्या मज घोर यातना 

मी त्या हासत सोशीन

*

द्रोही ठरवून त्यास धाडिले 

कारागृही मंडालेला

 गीतारहस्य ग्रंथ पूजनीय

 बंदिवान असूनी लिहला

*

लोकमान्य स्पर्शाने अवघी 

भूमि पावन झाली इथे 

त्या लढवय्या वीरापुढती 

मस्तक हे माझे झुकते

© श्री रवींद्र सोनावणी

निवास :  G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५

मो. क्र.८८५०४६२९९३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “अप्सरा आssली” ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

? कवितेचा उत्सव ?

☆ “अप्सरा आsss ली…” ☆ सुश्री शीला पतकी 

सुंदरा कुठे अवतरली मनामध्ये शिरली

 हृदयात कशी पाझरली  जणु मधात ती विरघळली

*

केश कमान झाकती भव्य कपाळ 

त्या कोरीव भुवया तलवारीचा जाळ 

ते शराब डोळे पापण्यांचा पेलती भार

मन पुसे मनास हि कोण असे हो नार

*

ती सरळ नासिका चाफेकळी जणू

 नथनीचा तो भार

 ते अधर मुलायम गर्द गुलाबी

 पाहता होई मग कहर

*

त्या गौर लालसर कानावर

 ती नाजूक कांचन वेल

 कानाचा पाळीत झोके घेती

 ते रत्नजडित ग फुल

 घालती भूल

 सखे ग मजला

*

ती उंच मान कमनीय जणू

 डोकावून शोधते नजर

 ते गाल गुलाबी  रंग केतकी

  त्या बटा वदन पहारेदार

*

ते उरोज चोळीस करिती तंग 

पाहता झालो मी दंग 

ती कमर कमनीय सुडोल बांधा

आव्हान देई मज उघडा खांदा

*

ते नाजूक करकमल

 मेहंदीचा हात नक्षीदार

 ते कांकण किण किण 

कानास नाद सुमधुर

*

ती पाऊले देखणी 

रंगली लाल अळत्यात 

ते पैंजण नाजूक करती नाद तो खुळा

 जीव हा झाला हो बावळा

*

ती किंचित वळली हृदयाचा चुकला ठोका 

तो काळा केशसंभार आहा मोकळा

 मी गुरफटलो बांधलो केशकलपात  

 हरवलो तिच्या डोळ्यात अडकलो पुरता

*

ती रंभा उर्वशी कोण आप्सरा 

मजसाठी धरेवर आली अन्

सवे तिच्या हो मलाच घेऊन गेली

*

 मी जागा झालो स्वप्न भंगले 

डोळ्यावर झापडं  होती

 कुठे उर्वशी कुठे न रंभा 

ती भार्या उठवीत होती

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ चित्र एक… काव्ये दोन – (1) पाऊस तो आला आला – सौ. गौरी गाडेकर (2) नज़र – श्री प्रमोद वामन वर्तक ☆

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ चित्र एक… काव्ये दोन – (1) पाऊस तो आला आला – सौ. गौरी गाडेकर (2) नज़र – श्री प्रमोद वामन वर्तक

सौ. गौरी गाडेकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ (1) पाऊस तो आला आला – सौ. गौरी गाडेकर
 

पाऊस तो आला आला 

मला भेटण्याला 

*

बालपणी केली मस्ती 

तारुण्यात झाली दोस्ती 

प्रौढपणी पाऊस येता 

मोद येई उधाणाला 

*

आता मात्र मी जर्जर 

खिळलेले बाजेवर

पावसाचे फोटो बघुनी 

शांतवते मी मनाला 

*

आणि आज अक्रीत घडले

 गवाक्षही   सुखावले 

स्वतः बालमित्र आला 

स्नेहभेट घ्यावयाला 

*

पाऊस तो आला आला 

मला भेटण्याला ……… 

©  सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104. फोन नं. 9820206306

☆ ☆ ☆ ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

?️?  चित्रकाव्य  ?️?

 ☆ (2) नज़र – श्री प्रमोद वामन वर्तक  ☆

डोळे रोखून मजवर 

काल पावसाने पहिले 

अंग अंग माझे सारे 

त्या नजरेने शहारले

*

भाव पाहून नयनातले 

थांग तयांचा लागेना 

काय भरला अर्थ त्यात 

मज काही उमगेना

*

दिली नजर नजरेला 

धीर करून एकदाचा 

हळूच उलगडला अर्थ 

डबडबलेल्या डोळ्यांचा

*

“आयुष्य जरी क्षणिक

खंत ना कसली मनी

फुलवून साऱ्या चरचरा

होतो समाधानाचा धनी

होतो समाधानाचा धनी'”

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ प्रचिती… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

? कवितेचा उत्सव  ?

☆ प्रचिती… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के 

जिकडे तिकडे अतिवृष्टी

पावसाची सुरू संततधार

कितीक गावे पाण्याखाली

आणि नुसता हाहाकार

*

जंगलतोड अमाप झाली

सैल आपसूक माती झाली

प्रवाहीत पाणी रेट्याने 

दरडी कोसळ सुरू जहाली

*

जीवन वाचवणारे जिवन

आज मरणाचे कारण झाले

किती जीव,किती आसरे

रौद्ररूपातच वाहून गेले

*

वाहतुक कुठे ठप्प जहाली

पिके बुडाली पाण्याखाली

निसर्गापुढे मानव इवलासा

याची पुन्हा प्रचिती आली

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “☆ धोक्याच्या वळणावरती — ” ☆ श्री नितीन सुभाष चंदनशिवे ☆

श्री नितीन सुभाष चंदनशिवे

? कवितेचा उत्सव  ?

☆ “धोक्याच्या वळणावरती —” ☆ श्री नितीन सुभाष चंदनशिवे 

तुझा सारा गाव झोपला की,

ये भेटायला मागच्या दारानं

पण गाव उठायच्या आत

माघारी जाशीलच याची शास्वती

मी देत नाही

*

अल्लड वाऱ्याला जीव लावणं

बरं नव्ह बाई,

या वयाला विश्वासाची पावती

देता येत नाही

*

मिठीत घेणारा वारा गार असेलही

पण तो झोंबणारच नाही याचा

भरवसा मी देत नाही

*

संसाराच्या गप्पा बऱ्या वाटतात

पण संसारात गप्पाच असतील

याची खात्री मी घेत नाही

*

थांब म्हणावं पावलांना

या वयात पोरी

हा बाजिंदपणा बरा नाही

हा वारा काही खरा नाही

*

आणि तुझा गाव झोपलाच असेल

यावर माझा विश्वास नाही.

कवी : नितीन चंदनशिवे. (दंगलकार)

© श्री नितीन सुभाष चंदनशिवे

संपर्क – मु. पोस्ट. कवठेमहांकाळ, जि. सांगली.

मो 7020909521

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ – दीप अमावस्या…– ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?  कवितेचा उत्सव ?

☆ दीप अमावस्या ☆ श्री आशिष  बिवलकर ☆

दीप अमावस्या | प्रज्वलित वाती |

उजळल्या ज्योती | घरोघरी ||१||

*

आषाढ मासाची | पवित्र सांगता |

दान हे मागता | प्रकाशाचे ||२||

*

घरोघरी चाले | दिव्यांचे पूजन |

करती सुजन | भक्तीभावे ||३||

*

त्यागावा तिमिर | अज्ञानाचा नाश |

सोबत प्रकाश | जीवनात ||४||

*

सकारात्मकता | दिवा हे प्रतिक |

पूजती आस्तिक | कृतज्ञता ||५||

*

पवित्र श्रावण | पूर्वसंध्या तेज |

रुजे धर्मबीज | हृदयात ||६||

*

सनातन धर्म | हिंदूंची संस्कृती |

जीवन पद्धती | पावित्र्याची ||७||

© श्री आशिष  बिवलकर

 05 ऑगस्ट 2024

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “सैरावैरा…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? कवितेचा उत्सव ?

☆ “सैरावैरा” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

धुंवाधार की संततधार 

पाऊस पडतो धारेधार

*

पावसानं धरलं धारेवर

जीवन सारं वाऱ्यावर 

*

लहानपणीच्या धारा 

आता नाही झरा झरा

*

आता येती कोसळधारा

बुडवुन टाकत घराघरा 

*

किंवा गायब होती धारा 

आणिक येती स्वेद धारा 

*

असा कसा गायब होतोस 

पड ना जरा पड ना जरा 

*

आर्जवं केली प्रचंड त्याची 

मग आल्याकी प्रचंड धारा 

*

ओला दुष्काळ सुका दुष्काळ 

सुकाळ नाही पण काळधारा 

*

राजानं मारलं त्यानं झोडलं 

तर  जायचं कुठं सहन करा 

*

राजा गेला सरकार आलं 

झोडणं सारं सहन करा 

*

मारणं चालूच झोडणं चालूच 

आपली धावपळ सैरावैरा

आपली धावपळ सैरावैरा 

© श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640

email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #249 ☆ कात टाकतो मी… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 249 ?

☆ कात टाकतो मी ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

येता समीप थोडा धुंदीत चालतो मी

रानात केतकीच्या गंधात नाहतो मी

*

माझ्या मनात ठसली ती केतकी सुगंधी

पाहून केतकीला जुन कात टाकतो मी

*

असतात डंख काही प्रेमातही विखारी

घायाळ केतकीच्या प्रेमात वाटतो मी

*

आनंद सोबतीला नसतो कधीच कायम

जखमेस सोबतीला घेऊन जागतो मी

*

होतेय फार जळजळ जागेत तेवढ्या ह्या

उगळून चंदनाचा थर फक्त लावतो मी

*

आहेत सर्प काही वस्ती करून येथे

केवळ तुझा निरागस गुण गंध मागतो मी

*

माझ्यात केतकीचा आलाय गंध थोडा

येतात साप जवळी दचकून पाहतो मी

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print