मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कशी घडणार सांगा… ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆

प्रा. सौ. सुमती पवार

? कवितेचा उत्सव ?

कशी घडणार सांगा…☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆

रामापाशी राहूनही जन उपाशी उपाशी

कशी घडणार सांगा, सांगा गंगा आणि काशी…

*

सोडा सोडा हो जन हो काम क्रोध आणि दंभ

मग जातील निघून शुंभ आणि तो निशुंभ

करा घर हो देवाचे मनाचे ते देवालय

मनाभोवती फिरेल रामरायाचे वलय…

*

नका देव देव करू देव माणसात पहा

तुम्ही माणूस बनूनी माणसात नित्य रहा

नको कपटाचे धनी नका बनू हो संशयी

आहे फारच कृपाळू पंढरीत असे आई..

*

नाही बोलवत कुणा सांगे ठेवा हो मनात

मी श्वासात श्वासात तुमच्याच हो प्राणात

का हो शोधता मला त्या तीर्थक्षेत्री देवालयी

किती वेळा सांगितले पाठीराखा मीच आई…

*

आधी मन करा शुद्ध राग लोभ द्वेष सोडा

असूयेचा विषभरा काटा मनातून काढा काढा

घर होताच शुद्ध ते रामरायाच येईल

खांद्यावरती घेऊन पैलतीरासी नेईल …

© प्रा.सौ.सुमती पवार 

 नाशिक

(९७६३६०५६४२)

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ तह… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

श्री शरद कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ तह… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

युद्धाचे परिणाम माहीत नसल्यामुळेच..

तिने लढाया केल्या.

मला कारणं माहीत होती,

म्हणूनच मी तह केले.

 

त्यांनी विजोड जोड्या लावल्या 

म्हणून आम्हीही गाळलेले शब्द भरले.

व्यत्त्यासाने प्रमेये सिद्ध केली-

भूमितीची.

 

हातचे वापरुन गणितं सोडवली.. व्यवहाराची.

दुर्देवाचे सगळे फेरे….

प्रगतीबुकावर लाल शेरे.

तरीही पुढची यत्ता गाठली.

 

इतुके यश होते रगड.

अगदीच नव्हतो आम्ही दगड.

© श्री शरद  कुलकर्णी

मिरज

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ नाते स्वर्ग-धरेचे ☆ सुश्री दीप्ती कोदंड कुलकर्णी ☆

सुश्री दीप्ती कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ नाते स्वर्ग-धरेचे… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆

आपल्या समूहातील लेखिका व कवयित्री सुश्री दीप्ती कुलकर्णी यांना नुकताच “माझी लेखणी साहित्य मंचता. शहापूर, जि. ठाणे आयोजित, रामायण काव्यलेखन मंच या अंतर्गत “रामायणावर आधारित काव्यलेखन “ या विषयावरील महास्पर्धेत “सर्वोत्कृष्ट काव्यलेखन “ म्हणून प्रथम क्रमांक देऊन गौरविण्यात आले आहे. आपल्या सर्वांतर्फे दीप्तीताईंचे मनःपूर्वक अभिनंदन आणि अशाच यशस्वी साहित्यिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.💐

आजच्या अंकात ही पुरस्कारप्राप्त कविता प्रकाशित करत आहोत.

संपादक मंडळ,

ई – अभिव्यक्ती, मराठी विभाग.

☆ नाते स्वर्ग धरेचे ☆

दिव्य स्वयंवर जनक सुतेचे

विष्णु अंश प्रभु राम -सीतेचे

*

भव्य मंडपी, नृप विश्वाचे

हर्षभरे ऋषी, जन मिथिलेचे

उभी जानकी, जनकाजवळी

मन भरले औत्सुक्याचे ||१||

*

शिवधनु ते अवजड सजले

जनकाने मग पण सांगितला

धनु पेले तो सीतेचा वर

ऐकताच नृप भयभीत झाले ||२||

*

उचलता धनु सारे ते थकले

लंकेशही अपमाने थिजले

यत्न वृथा तो क्रोधित झाले 

गुरुआज्ञेस्तव रामही उठले ||३||

*

अलगद हस्ते धनु उचलले

दोर लावता भंगच झाले 

कडाडता ते थक्कच सारे

प्रमुदित तर सर्व जाहले ||४||

*

जानकीने त्या क्षणीच वरले

मायपित्यासह पुढे जाहली

तनामनासह माळ अर्पिली

पुष्पवृष्टी स्वर्गातुनन विलसली ||५||

*

नाते स्वर्ग-धरेचे बनले

मिथिलेचे तर भाग्य उजळले

दिव्य स्वयंवर जनक सुतेचे

विष्णु अंश प्रभु राम सीतेचे ||६||

© सुश्री दीप्ती कोदंड कुलकर्णी

कोल्हापूर 

भ्र.९५५२४४८४६१

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ अमृत शिंपण… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल

?  कवितेचा उत्सव ?

☆ अमृत शिंपण… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

आकाशीचा चंद्र आज 

अमृत शिंपडीत आला 

आरोग्याचे वरदान मिळाले 

प्रत्येकजण चांदण्यात न्हाला ||

*
कोजागिरीचा चंद्रमा 

आटीव दुधाची साथ 

अशावेळी दे रे प्रिया 

तुझा हातामधे हात ||

*
शरदाचे टपोर चांदणे 

कसे अंगभर सांडले 

देवी तव आशिष ठेव शिरी 

पसायदाना हात पसरले ||

*
रात्रीची या कहाणी अशी 

व्हावे त्याचे गुण गुण गान 

चंद्रासह खुलावी रोहिणी 

सकला मिळो समृद्धी दान ||

*

कोजागिरी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा 

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “भारतीय पाहुणचार…” ☆ श्री नितीन सुभाष चंदनशिवे ☆

श्री नितीन सुभाष चंदनशिवे

? कवितेचा उत्सव  ?

☆ “भारतीय पाहुणचार…” ☆ श्री नितीन सुभाष चंदनशिवे 

तुझ्या घरी आलेल्या पाहुण्यांना

तू वायफायचा पासवर्ड देशील

मी तांब्याभर पाणी देईन

बसायला चटई टाकीन.

*
तू विचारशील काय काम काढलं?

मी म्हणेन बरं केलं आलात कालच आठवण काढली होती.

तुझी बायको बघत बसेल

अनोळखी वाटतील सगळे तिला.

*

ती विचारेल दबकत थंड घेणार की गरम?

माझी बायको मात्र

ओळख नसतानाही जवळची वाटेल..

बशीत सांडेपर्यंत चहा भरेल..

*
तुझी मुलं गेम खेळत असतील

आणि माझी मुलं

त्यांच्या मांडीवर जाऊन खेळतील..

*
तुला चिंता रात्रीच्या जेवणाची, झोपण्याची..

मी मात्र देणेकरी शोधीन

पुरणपोळीचा बेत ठरेल

दाटीवाटीने अंथरूण टाकीन

*

गप्पा मारत रात्र जाईल

सुख दुःख वाटता येईल..

पाहुणे जाताना तुला फक्त

थँक्स म्हणतील

*

तुही गॅलरीत उभा राहून

बाय बाय करत राहशील

बायको फार सुंदर हसेल तुझी..

तीही तुला मिठी मारून दाद देईल

*
तुझ्या पाहुणचाराला

माझ्या घरात मात्र

सगळ्यांचे डोळे भरतील

लेकरं बायको आशीर्वाद घेतील

*
पुन्हा यायचंच म्हणून हक्काने वचन घेतलं जाईल..

नजरेच्या टप्प्यापलीकडे गाडी जाईपर्यंत

निरोपाची भाषा हलत्या हाताला असेल

कळ असेल काळजात फार ओली

*
हुंदके गातील प्रेमाची गाणी

फरक एवढा साधा आहे मित्रा

तू कुठे राहतोस माहीत नाही

 

… पण मी भारतात राहतो एवढं नक्की..

कवी : नितीन चंदनशिवे. (दंगलकार)

© श्री नितीन सुभाष चंदनशिवे

संपर्क – मु. पोस्ट. कवठेमहांकाळ, जि. सांगली.

मो 7020909521

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय १५ — पुरुषोत्तम योग — (श्लोक १ ते १0) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय १५ — पुरुषोत्तम योग — (श्लोक १ ते १0) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

श्रीभगवानुवाच 

ऊर्ध्वमूलमधःशाखमश्वत्थं प्राहुरव्ययम्‌ । 

छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्‌ ॥ १ ॥ 

कथिती भगवंत 

विचित्र संसाराचा वृक्ष अव्यय अश्वत्थ 

मुळे वरती शाखा खाली पर्णरूपि छंद

जाणुन घेता या तरुराजा होई सर्वज्ञानी

वेद जाणिले अंतर्यामी तोचि ब्रह्मज्ञानी ॥१॥

*

अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः । 

अधश्च मूलान्यनुसन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके ॥ २ ॥ 

*

विषयभोगी संसारवृक्ष शाखा पसरल्या वरती खाली

तयासि वेढूनिया टाकले त्रिगुणांनी सभोवताली

मुळे मनुष्यलोकाची कर्मबंधांची तीही वरती खाली

सर्वत्र ती पसरली समस्त लोका व्यापून राहिली ॥२॥

*

न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादिर्न च सम्प्रतिष्ठा । 

अश्वत्थमेनं सुविरूढमूलमसङ्गशस्त्रेण दृढेन छित्त्वा ॥ ३ ॥ 

*

न दिसे येथे रूप तयाचे वर्णन केले तसे

आदी न यासी अंतही नाही त्यासी स्थैर्य नसे

वासना रूपी मुळे तयाची घट्ट नि बळकट

संसाराश्वत्थाला या वैराग्य शस्त्राने छाट ॥३॥

*

ततः पदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन्गता न निवर्त्न्ति भूयः । 

तमेव चाद्यम पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्तिः प्रसृता पुराणी ॥ ४ ॥ 

*

शोध घ्यावा त्या परमेशाचा आदी पुरुषाचा

मनन चिंतन करुनिया तयाचे निदिध्यास त्याचा

तया पासुनी विस्तारली ही प्रवृत्ती संसाराची

तेथे जाता नाही भीति पुनश्च परतुनी यायाची ॥४॥

*

 निर्मानमोहा जितसङ्गदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामाः । 

द्वन्द्वैर्विमुक्ताः सुखदुःखसञ्ज्ञैर्गच्छन्त्यमूढाः पदमव्ययं तत्‌ ॥ ५ ॥

*

अहंकार ना मोहही नष्ट आसक्ती दोषा जिंकले

कामना नष्ट सुखदुःखांच्या द्वंद्वांतुनिया मुक्त जाहले

परमेशस्वरूपी स्थिति जयांची निरुद्ध नित्य राहे

ज्ञानीयांसी त्या अविनाशी परमपद खचित प्राप्त आहे ॥५॥

*

न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावकः । 

यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम ॥ ६ ॥ 

*

जननमरणा फेऱ्यातुन मुक्ती प्राप्त करिता परमपदाला

स्वतेजी मम परमधामा सूर्य चंद्र ना अग्नी प्रकाश द्यायाला ॥६॥

*
ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः । 

मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति ॥ ७ ॥ 

*

जीवांश या देहातला माझाच अंश सनातन 

प्रकृतिस्थित मनषष्ठेंद्रिया घेतो आकर्षुन ॥७॥

*

शरीरं यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः । 

गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानिवाशयात्‌ ॥ ८ ॥ 

*
पवन वाहतो गंधितातुनी गंध लहरीसवे

देह त्यागता जीवात्मा नेई मनैंद्रियासी सवे

पुनर्पाप्ती करिता कायेची नेई अपुल्या संगे

सकल गुणांना पूर्वेंद्रियांच्या स्थापी आत्म्या संगे ॥८॥

*

श्रोत्रं चक्षुः स्पर्शनं च रसनं घ्राणमेव च । 

अधिष्ठायं मनश्चायं विषयानुपसेवते ॥ ९ ॥ 

*

जीवात्मा हा विषय भोगतो इंद्रियांकरवी

कर्ण नेत्र रसना घ्राण स्पर्श मनाकरवी ॥९॥

*

उत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितम्‌ ।

विमूढा नानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः ॥ १० ॥ 

*

 देहत्यागा समयी वा देहात वास करता

भोग भोगता विषयांचा वा त्रिगुणे युक्त असता

आत्मस्वरूप आकलन न होई मूढा अज्ञानी

विवेकी परी जाणुन असती ज्ञानदृष्टीचे ज्ञानी ॥१०॥

मराठी भावानुवाद  © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ तुला पाहता… ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर☆

सुश्री अरुणा मुल्हेरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ तुला पाहता ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

मी तुला पाहता बावरले

मम चित्त कसे हे थरथरले॥धृ॥

*
झंझावातासम तो आला

कधी कसा तो नाही कळला

मनी माझिया कायम वसला

मम ह्रदय कसे हे धडधडले॥१॥

मी तुला पाहता….

*
ओढ अशी मज काय लागली

नजर तुझ्यावर भिरभिरली

नजरेचे हे भाव बोलके

ते या मुग्धेला उमजविले॥२॥

मी तुला पाहता…

*
वाटे मजसी करी धरावे

मधुर भाषणे पुलकित व्हावे

नजरेचा तव वेध घेतसे

देहभान माझे ना उरले ॥३॥

मी तुला पाहता…

*
तळमळ जीवा तव भेटीची

आस एक मज सहवासाची

नकोत वाटे अशी बंधने

धावत तुजपाशी रे आले॥४॥

*

मी तुला पाहता बावरले

मम चित्त कसे हे थरथरले॥

© सुश्री अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ बघ बंध तोडून… ☆ सौ. वंदना अशोक हुळबत्ते ☆

सौ. वंदना अशोक हुळबत्ते

? कवितेचा उत्सव ?

☆ बघ बंध तोडून… ☆ सौ. वंदना अशोक हुळबत्ते ☆ 

जीवघेणा हा अबोला

कसा सहन करतेस ?

सारे दुःखाचे कढ 

एकटीच का पचवतेस ?

*
सांगून तर बघ एकदा

मन थोडं होईल हलकं 

नको मानू मला तू परकं 

*
स्वतःच विणलेल्या कोषात

किती दिवस फिरणार ?

कोष तुलाच तोडावा लागणार

*
उदासीनतेच्या प्रेशरला

बघ शिटी देऊन 

उदासीनता जाईल निचरून

*
ऐक माझं 

बघ एकदा जमतं का ?

दडपणाचे झाकण उघडून 

कोंडलेलं मन जाईल आनंदून 

*
स्वतःला दोष देणं दे सोडून 

सुख तुला जोजवेल

हाताचा पाळणा करून

*
आस धर उद्याची

अबोला दे सोडून 

दुःखाशी कर सामना 

टेंशन जाईल घाबरून……

© सौ.वंदना अशोक हुळबत्ते

मो.९६५७४९०८९२

सांगली

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “जागर…“ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर

? कवितेचा उत्सव ?

☆ जागर☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

हरवला मूळ भाव, झाला काय वेडा-खुळा,

पू्जण्याला सरस्वती, गाव करतोय गोळा?

*

कुठे देव्हारा चंदनी, सोन्या-मोत्याचा फुलोरा,

रास-गरब्याच्या नावे, कुणी घालतो धिंगाणा!

*

माय, विद्येची ही देवी, तिला शब्दांची आरास,

पुस्तकांच्या देव्हाऱ्यात, अक्षरांचे अलंकार!

*
कास ज्ञानाची धरुनी, दूर करावे अज्ञान,

धूप-दीप-नैवेद्याचा, नको सोहळा उगाच !

*

काली, दुर्गा, अंबामाता, सारी तुझ्याच घरात,

माणसाने माणसाचा, नित्य ठेवावा सन्मान !

*

शिक्षणाच्या मशालीने, करी आईचा जागर,

हृदयाच्या गाभाऱ्यात, उजळावा ज्ञानदीप !

© सुश्री प्रणिता खंडकर

संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.

ईमेल [email protected] केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ स्वप्न… ☆ सुश्री त्रिशला शहा ☆

सुश्री त्रिशला शहा

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ स्वप्न… ☆ सुश्री त्रिशला शहा

राबराबतो धनी माझा

काळ्या आईची करी चाकरी

*
मृग नक्षत्र बरसून जाई

पीक कसे ते तरारून येई

*
अंगावरची कापडं विरली

तरी त्याची पर्वा नाही

*
एक सपान डोळ्यात राही

गरिबी माझी संपेल आतातरी

*
भाव देईल का सरकार यंदा

कष्टाचे मग सार्थक होण्या .. .. .. 

©  सुश्री त्रिशला शहा

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares