मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ईसीजी आयुष्याचा… ☆ सौ.अश्विनी कुलकर्णी ☆

सौ.अश्विनी कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ ‘ईसीजी ‘ आयुष्याचा ☆ सौ.अश्विनी कुलकर्णी ☆

आयुष्य एकच,

पण…

रोज वेगवेगळे नवे निकाल देत राहतं ,

हे कस काय बर?

असे प्रश्न….

 

या निकालांची,

परीक्षा केव्हा दिली होती ?

 

कधी आठवतं,कधी नाही…

तेव्हा प्रश्नपत्रिका समोर आल्या की,

काही वाटायच्या अगदी सोप्या,

तर काही परत परत प्रश्न वाचत,

त्यावर नजर फिरवत ठेवणाऱ्या …. 

गोंधळात टाकणाऱ्या…

 

आयुष्यातील प्रश्नांची उत्तर,

शोधताना…..ती,

शांत राहून, व्यक्त होऊन ,कृतीतून,संवादातून,

संघर्षातून, आनंदातून, दुःखातून  लिहिली गेली…

आयुष्यावर!

 

डोळे मिटून स्तब्ध पडताच

आपल्या आयुष्यातील हालचालींची मोजमापं

दिसू लागली…

मधूनच थोडस तिरकस नजरेने,

जस ईसिजी मशीनकडे पाहतो

तस भूतकाळात पाहिला जीवनाचा ईसीजी…

अनेक डोंगर दऱ्याच दिसल्या…

त्या पार करण्याच्या प्रयत्नात मी,

कधीतरी काहीकाळ सरळ रेषांनी,

चकवाही दिला होता…

गात्र खचली असली तरी,

मन त्यांना प्रत्येक वेळी उठवायचं…

वेळी अवेळी मिळालेले, हेच ते निकाल…

शेजारच्या त्या मशीनमध्ये

होत असते जीवनाच्या ईसीजी ची नोंद.. 

अजूनही सुरू आहे ते मशीन,

सुरूच राहणार…

पण आता भीती वाटत नाही मशीनची…

मशीनने दऱ्या डोंगर दाखवले तरी,

मन शांत, शाबूत ,भक्कम आहे!

© सौ अश्विनी कुलकर्णी

मानसतज्ञ, सांगली  (महाराष्ट्र)

मो – 9421225491 Email – asharticles831@gmail.com 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आषाढी एकादशीचे मागणे… सुश्री शिल्पा मैंदर्गी ☆ प्रस्तुती – सौ.अंजली दिलीप गोखले ☆

सुश्री शिल्पा मैंदर्गी

☆ मनमंजुषेतून ☆ आषाढी एकादशीचे मागणे… सुश्री शिल्पा मैंदर्गी ☆ प्रस्तुती – सौ.अंजली दिलीप गोखले ☆

सौ.अंजली दिलीप गोखले 

(पूर्ण अंध असूनही अतिशय उत्साही. साहित्य लेखन तिच्या सांगण्यावरून लिखीत स्वरूपात सौ.अंजली गोखले यांनी ई-अभिव्यक्ती साठी सादर केले आहे.)

असा एक क्षण यावा

   की जिथे मुक्तिचाही ध्यास संपावा.

असा एक क्षण यावा

की जिथे विठ्ठल आणि आपण

यात भेद नसावा.

असा एक क्षण यावा

की जिथे आत्मानंदालाही

आनंद व्हावा.

असा एक क्षण यावा की

ज्ञानोबांच्या नेत्रानी विठ्ठल पहावा.

असा एक क्षण यावा की

नामदेवांच्या किर्तनाने विठ्ठलाच्या

अस्तित्वाचा वेध घ्यावा.

असा एक क्षण यावा की

नाथांच्या भक्तिभावाने विठ्ठल

प्रसन्न करून घ्यावा.

असा एक क्षण यावा की

तुकोबांच्या भाबड्या भक्तिने

विठ्ठलास बंधनात बांधावा.

असा एक क्षण यावा की

जनाईसम संसाररूपी जात्यावर

धान्य दळताना परमार्थ रूपी

पिठाचा बोध घ्यावा.

असा एक क्षण यावा की

सावत्या सम भक्तिचा मळा

फुलविताना कसदार मनाचा

कस लागावा.

असा एक क्षण यावा की जळी

स्थळी पाषाणी

विठ्ठल सोहळ्याचा अनुभव घ्यावा.

असा एक क्षण यावा की

अज्ञानाच्या अंधारी

दिवा ज्ञानाचा लागावा.

असा एक क्षण यावा की

भक्तिचा मोगरा फुलावा

  भक्तिचा मोगरा फुलावा.

© सुश्री शिल्पा मैंदर्गी

दूरभाष ०२३३ २२२५२७५

प्रस्तुती : अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ “चल गं सखे…” ☆ सौ. रेणुका धनंजय मार्डीकर ☆

सौ. रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– “चल गं सखे…” – ? ☆ सौ. रेणुका धनंजय मार्डीकर☆

चल गं सखे शिवारात जोडीनं जाऊ

तुझ्या माझ्या पिरतीच गोड गानं गाऊ

*

ढगाच पांघरून शिवाराची माती

तुझी माझी बैलगाडी डौलात जाती

तू माझी सजनी मी गं तुझा राऊ

तुझा माझ्या पिरतीच गोड गानं गाऊ

*

कस सांगू तुला माझ्या मनातलं राया

तुझ्या संग लाभतोया अत्तराचा फाया

काळजाचा ठाव घेत्यात पिळदार बाहू

तुझ्या माझ्या पिरतीच गोड गानं गाऊ 

*

मांडीवर पाय दे गं हातामधी हात

तुझ्या संग माझं सखे फुलतया नात

हुरुदाचं गुपित नजरेनं पाहू

तुझ्या माझ्या पिरतीच गोड गानं गाऊ

*

पायातल्या घुंगरात खुळखुळ दाटली

व्हटात डाळींब सखी मला भेटली

रानी तुझा शिणगार येडं नको लावू

तुझ्या माझ्या पिरतीच गोड गाणं गाऊ

 © सौ.रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ चांदणे सांडूनी गेले ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

डॉ.सोनिया कस्तुरे

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – “चांदणे सांडूनी गेले…” – ? ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

 

मेघ नभीचे उतरले

चांदणे सांडूनी गेले

उजळले तन काटेरी

मन तेजपुंज झाले

*

सरी बरसता अंधारी

तन नक्षत्र पांघरले

रात्र कुशीतील भय 

वाऱ्यासवे पळाले !

*

काळोखाच्या पदरी

दीप तेजाचे पसरले 

नभातल्या चांदण्यांना

ओठी हसू उमटले !

*

निसर्गाचा साक्षात्कार 

फुलाविना हा बहार

किती सुंदर देखावा  

जणू वाटे चमत्कार

© डॉ.सोनिया कस्तुरे

विश्रामबाग, जि. सांगली

भ्रमणध्वनी:- 9326818354

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 239 ☆ मुक्त चिंतन – होते सृजन सर्वत्र… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 239 ?

मुक्त चिंतन होते सृजन सर्वत्र☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

मजबूत दगडी वाडा ,

दुमजली प्रशस्त छान

न्हाणीघरही भले थोरले…

बंब, घंगाळ ,सतेले तांब्याचे,

पितळी बादल्या तीन!!

*

ते माझे घर लहानपणीचे,

गावाकडचे ओढ्याकाठी,

पलिकडे शिवालय होते,

 वडाच्या झाडा मागे !

*

अंगणात होती बाग,

फुलझाडांची गर्दी—-

वृंदावना पलिकडे विहीर ,

चाफा, कडुलिंब अन,

पाच नांदुर्की -पिंपर्णी !!

*

निसर्ग होता प्रसन्न,

पाऊसपाणी ,आबादानी

मुबलक शेती ,गुरे वासरे,

किलबिलती पक्षी रंगीबेरंगी

होते सृजन सर्वत्र ,

*

चौदा वर्षे टिपले मी ते

निर्मियले मग शब्दामधून

 मनोहारी एक चित्र  ते…..

ती पहिली  कविता …

  …सृजन सोहळा

आज आठवला!!

☆  

© प्रभा सोनवणे

१३ जुलै २०२४

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- sonawane.prabha@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सावळे परब्रह्म… ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे☆

सौ.ज्योत्स्ना तानवडे

? कवितेचा उत्सव ?

🙏 सावळे परब्रह्म 🙏 ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

जय जय रामकृष्ण हरी |जय जय रामकृष्ण हरी 

झाली वैकुंठ पंढरी | क्षेत्र चंद्रभागे तीरी ||

सावळा बने श्रीहरी | उभा ठाके विटेवरी ||१||

क्षेत्र पावन भूवरी | विठुरायाची नगरी ||

त्रिखंडात तिच्या परी | नाही दुसरी पंढरी ||२||

अगा वैष्णवांच्या देवा | तुझ्या करूणेचा ठेवा ||

वाटे माहेर या जीवा | काय थाट म्या वर्णावा ||३||

भक्तांसाठी धाव घेशी | भक्तांच्या अधीन होशी ||

अभंग तारुन नेशी | भक्ती श्रेष्ठ अविनाशी ||४||

देई ऐसे वरदान | दूर सारावे अज्ञान ||

मिळविता आत्मज्ञान | शुद्धमती देई भान ||५||

आत्मबुद्धीसी सोडावे | भक्तीधन त्वा जोडावे||

सार्थक जन्माचे व्हावे | मुखी नाम सदा घ्यावे ||६||

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ भेट… ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆

श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

? कवितेचा उत्सव ?

☆ भेट… ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆

तुझी भेट ध्यानी-मनी ना तरीही

              उरी चंदनाचे भरे मंद वारे

धुक्याचाच वेढा जणू भोवतीने

          उधाणात जाती बुडूनी किनारे

 

तुझे बोलणे, संभ्रमाचेच जाळे

          तुझे मौन,आकांत होई मनाचा

कधी कोरडा मेघ होऊन येशी

          निळा मेघ होशी कधी श्रावणाचा

 

कधी लख्ख सारे उजेडा प्रमाणे

          कधी वाटतो मी तमीचा प्रवासी

कधी हातचेही दुरापास्त वाटे

          कधी चांदणे येतसे अंगणाशी

 

कसे आवरावे ऋतूंना मनाच्या

          कशी भूल टाळू जिवा जी पडावी

जणू जीवनाला अश्या सैरभैरी

          हवी ती दिशा नेमकी सापडावी

 

तुझी भेट ध्यानी-मनी ना तरीही

          तुझा चंद्र का गे ढगाआड होई?

पुन्हा वेढती प्राक्तनीचे उन्हाळे

          जणू अर्धस्वप्नातुनी जाग येई

© श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

संपर्क : ओंकार अपार्टमेंट, डी बिल्डिंग, शनिवार पेठ, आशा  टाकिज जवळ, मिरज

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आळंदीचा छंद… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ आळंदीचा छंद... ☆ श्रीशैल चौगुले ☆

अजब पालखी / ज्ञानेशाची दिंडी

वारकरी झुंडी  /  विठ्ठल पेले //

*

भक्ताची काळजी /आळंदीचा राजा/

सांभाळतो प्रजा /ग्रंथमाऊली//

*

जन्माचा सोहळा /भेटीसाठी आस/

अभंगाचे दास/लहानथोर //

*

ऐटीत पंढरी /पांडुरंगी वास /

चंद्रभागा खास/स्वर्गभुवरी //

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पंढरीची विठ्ठल… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

? कवितेचा उत्सव  ?

पंढरीचा विठ्ठल… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के 

पंढरीच्या विठ्ठलाने

मज लावलाय लळा

तेच माहेर गा माझे

तोच आनंद सोहळा

*

व्याप संसाराचा मोठा

त्यात गुंतलेला पाय          

इथे भेटालागी   येते

माझी सावळी ग माय

*

सडा शिंपताना दारी

हात रेखता रांगोळी

रंगातून  सुखे हासे

तिची मुरत वेगळी

*

केर काढता घरात

मल मनाचा ती काढे

संसाराची ओढ मनी

आपसूक मग वाढे

*

चुलीपाशी रांधताना

मुखी पांडुरंग नाम

घास कुटुबांच्या ओठी

तृप्त भक्तीमय धाम

*

सारे आवरता काम

पाठ टेकता धरणी

मिटलेल्या डोळ्यातुन

चंद्रभागा इंद्रायणी

*

त्या पवित्र जलातुन

वाहतसे श्रमताप

मुखी पांडुरंग हरी

उमटते आपोआप

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #246 ☆ अळवावरचे पाणी… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 246 ?

 

☆ अळवावरचे पाणी ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

गर्दीमधल्या गोंगाटाने मी भेदरले होते

एकांताच्या कुशीत शिरले अन सावरले होते

*

शृंगाराची आवड नव्हती निरस आरसा होता

रसरसलेला मुखडा पाहुन मी गांगरले होते

*

सौंदर्याची खाण पाहुनी डोळे दिपले त्यांचे

खाणीवरती मी पदराला मग पांघरले होते

*

एक वाळवी मतभेदाची पोखरण्याला कारण

वरून सुंदर आतुन सारे घर पोखरले होते

*

वाचे इतके धरतीवरती घातक नाही काही

तुझे बोलणे इतके स्फोटक मी हादरले होते

*

भिती वाटते पक्व फळाला हलल्यावरती फांदी

फूल सहजतर फांदीवरती ते वावरले होते

*

अल्पजीवनी तरिही सुंदर या जगताला वाटे

अळवावरचे पाणी क्षणभर मोती ठरले होते

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

ashokbhambure123@gmail.com

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares