कविराज विजय यशवंत सातपुते
कवितेचा उत्सव # 228 – विजय साहित्य
🌼 निघाली पालखी 🌼 कविराज विजय यशवंत सातपुते ☆
☆ संत तुकाराम महाराज पालखी सोहळा ☆
(सहाक्षरी रचना)
☆
इनाम दाराचा
सोडूनी या वाडा
निघाली पालखी
सवे गावगाडा ..! १
*
आकुर्डी गावच्या
विठू मंदीरात
तुकोबा पालखी
थांबे गजरात ..! २
*
पुण्य नगरीत
दिव्य मानपान
जागोजागी चाले
अन्न वस्त्र दान ..! ३
*
पालखी विठोबा
पुण्यनगरीत
निवडुंग्या विठू
रमे पालखीत..! ४
*
लोणी काळभोर
वेष्णवांचा मेळा
सोलापूर मार्गी
हरीनाम वेळा..! ५
*
तुकोबा पालखी
यवत मुक्काम
दिंड्या पताकांत
निनादते धाम ..! ६
*
वरवंड गावी
पालखी निवास
आषाढी वारीचा
सुखद प्रवास ..! ७
*
आनंदाचा कंद
गवळ्याचे नाव
रंगले वारीत
उंटवडी गाव…! ८
*
मंगल पवित्र
क्षेत्र बारामती
कैवल्याची वारी
सुखाच्या संगती …! ९
*
सणसर गावी
विठ्ठल जपात
रंगली पालखी
हरी कीर्तनात…! १०
*
आंधुर्णे गावात
घेताच विसावा
माय माऊलीत
विठ्ठल दिसावा…! ११
*
गोल रिंगणाचा
बेळवंडी थाट
निमगावी क्षेत्री
केतकीची वाट..!
*
इंदापुर येता
रिंगणाचे वेध
गण गवळण
अभंगात मन…! १२
*
सुमनांची वृष्टी
सराटी गावात
अमृताची गोडी
विठ्ठल नामात..! १३
*
गोल रिंगणाचे
अकलूज गांव
मनामधे जागा
विठू भक्तीभाव…! १४
*
येता बोरगाव
दिंडी नाचतसे
काया वाचा मनी
विठू राहतसे…! १५
*
पिराची कुरोली
शिगेला गजर
पंढरपुरात
पोचली नजर..! १६
*
वाखरी गावात
मिलनाची वेळा
रमला वारीत
वैष्णवांचा मेळा..! १७
*
कळस दर्शंनी
पाऊले अधीर
धावतसे मन
सोडूनीया धीर..! १८
*
ज्ञानोबा तुकोबा
वाखरीत मेळ
विठू दर्शनाची
यथोचित वेळ…! १९
*
वैष्णवांची वारी
हरीनाम घोष
वारीचा सोहळा
परम संतोष…! २०
*
पोचली पालख्या
पंढर पुरात
आनंदला विठू
भक्तीच्या सुरात..! २१
*
युगानु युगाची
कैवल्य भरारी
अखंड प्रवाही
आषाढीची वारी…! २२
☆
© कविराज विजय यशवंत सातपुते
सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे. 411 009.
मोबाईल 8530234892/ 9371319798.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈