मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पराधीन… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ पराधीन... ☆ श्रीशैल चौगुले ☆

मी नव्हतो कधी कुणाचा

मी नसतो कधी कुणाचा

आपुल्याच अंतरंगात

शोधतो ‘मी’ पुन्हा-पुन्हाचा.

 

पांघरुन देह लक्तर

अवयव कला-गुणांचा

चिंतनात दृढ जिज्ञासा

ठाव घेई मना-मनांचा.

 

हे एकांतच मज प्रीय

भाव भक्ती प्रेम प्राणाचा

मी नितांत जगतो मला

वेध वृत्ती बीज तृणांचा.

 

अवघे समुद्र पिऊन

अतृप्त किनारा कुणाचा

विशाल अंबर केवळ

सृष्टित पराधीन पेचा.

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ ठराव / आखाडा – चित्र एक काव्ये दोन ☆ सुश्री नीलांबरी शिर्के आणि श्री आशिष बिवलकर ☆

?️?  चित्रकाव्य  ?️?

? ठराव / आखाडा – चित्र एक काव्ये दोन ☆ सुश्री नीलांबरी शिर्के आणि श्री आशिष बिवलकर 

सुश्री नीलांबरी शिर्के

(१) ठराव 

कधी भुंकायचं  !

किती भुंकायचं  !

आताच ठरवून

 लक्षात ठेवायचं  

 नंतर आपापला

 एरिया सांभाळायचं 

 भुंकून भागलं नाही

तर चावे घेत सुटायचं 

 किती सज्जन असो    

समोर लक्ष ठेवायचं

विरोधी आपला नसतो

आपण फक्त भुंकायचं 

 पोटाला तर मिळतंच

 काळजी का करायची

 संधी मिळाली की मात्र

 तुंबडी आपली भरायची

 आपल्या अस्तित्वाची

  भुंकणं ही खूण आहे

  पांगलो तरी जागे राहू

  चौकस नजर हवी आहे

   खाऊ त्याची चाकरी करू

    म्हण जुनी झाली आहे

   रंगानं, अंगानं वेगवेगळे

   तरी काम आपलं एकच आहे

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

श्री आशिष बिवलकर

(२) आखाडा

गल्लीबोळातले जमलेत श्वान,

म्हणे एकत्र येऊन सर्व भुंकू |

आज नाही उद्या,

सिंहाशी आपण नक्कीच जिंकू |

*

सिंह फोडेल डरकाळी,

जराही विचलित नाही व्हायचे |

भुंकण्यापलीकडे आपण,

काहीच नाही करायचे |

*

आपले भुंकणे ऐकून,

इतर प्राणीही देतील साथ |

जंगलाच्या राजाला,

मारतील जोरात लाथ |

*

आपण एकत्र भुंकतो आहोत ,

येईल सहानुभूतीची लाट |

शेपटीवाले करतील मतदान,

लावतील सिंहाची वाट |

*

संख्याबळाच्या जीवावर,

आपल्यास मिळेल राजाचे पद |

सहा सहा महिने एकेकाने,

वापरून घ्यायचा सत्तेचा कद |

*

श्वानसभेचे जाणावे तात्पर्य एक,

अंगी कर्तृत्व जरी असले गल्लीचे |

एकत्र येऊन आज सगळे,

मनी बांधत आहेत आखाडे दिल्लीचे |

© श्री आशिष बिवलकर

बदलापूर 

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ दिसतेच स्वच्छ आहे… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

दिसतेच स्वच्छ आहे☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

घोटीव बांधणीची काया रसाळ आहे

लावण्यसुंदरीची भाषा मधाळ आहे

*

आले कळून सारे निरखून पाहताना

नकली स्वभाव फेकू करणी ढिसाळ आहे

*

पाहून अंगणाला  अंदाज  येत गेला

आतून बंगला हा पुरता गचाळ आहे

*

अलवार वाट शोधा पाऊल टाकताना

हा कारभार सारा इथला रटाळ आहे

*

आधार शोधुनीया थांबा जरा कडेला

इथली हवा जराशी झाली ढगाळ आहे

*

छोटी असून बाकी आहे नदी प्रवाही

पाण्यात खोल दडला मोठा खळाळ आहे

*

उतरू नका गड्यांनो पात्रात पोहण्याला

पाण्यावरी नदीच्या तरते प्रवाळ आहे

*

मौलीक शोधण्याची तसदी नकाच घेऊ

शोधू नक उगी ते उरले गबाळ आहे

*

भुजवू नकाच त्याला छेडू नका कुणीही

पाळीव या घराचा दिसतो मराळ आहे

*

रोखावया फितुरी व्हा सावधान सारे

या छावणीत लपला सूर्या पिसाळ आहे

*

रात्रीतही तुम्हाला दिसतेच स्वच्छ आहे

आभाळ चांदण्यांनी केले दुधाळ आहे

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 177 ☆ अभंग… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 177 ? 

☆ अभंग… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

स्नेहबंध भाव, अंतरी असावा

बोचरा नसावा, भाव कधी.!!

*

माणूस पणाचा, दाखला देयावा

निर्भेळ करावा, कारभार.!!

*

गर्व सोडूनिया, धर्म आचरावा

अधर्म टाळावा, कटाक्षाणे.!!

*

दुसऱ्यांचे दोष, नचं वर्णवावे

नचं दाखवावे, बोट कधी.!!

*

स्वतःला तयार, करावे तत्पर

अनेक आभार, जोडोनिया.!!

*

उगवता सूर्य, बुडतो विझतो

क्षितिज गिळतो, तप्त गोळा.!!

*

कलीचे वर्तन, समजून घ्यावे

आहे तेच द्यावे, नम्रभावे.!!

*

कवी राज म्हणे, शब्दांचे मनोरे

अभंगाच्या द्वारे, रचियतो.!!

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆सहा जून : शांताबाई शेळके स्मृतीदिनानिमित्त – “आठवणीतील कविता…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर  ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? विविधा ?

☆ सहा जून : शांताबाई शेळके स्मृतीदिनानिमित्त – “आठवणीतील कविता…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

आज शांताबाई शेळके यांची वर्षा काव्यसंंग्रहातील हिरवळ ही कविता पाहणार आहोत… सात जूनला मृगाचं नक्षत्र लागलं … खऱ्या अर्थाने पाउस सुरू होतो असा पारंपारिक प्रघात आहे… कधी तो वेळेत उगवतो तर कधी उशीराने…

दडी मारुन जरी बसला तरी त्याच्या आगमनाची आतुरताही तितकीच असते… माणसाला,धरीत्रीला,साऱ्या सृष्टीला… आणि तो जेव्हा कधी पहिल्यांदा बरसून जातो… तेव्हा सगळं चराचर पुलकित होतं… तना मनाची तलखी शांत होते… जमीनीवर वरचा धारोळा धुतला जातो… जणू काही वसुंधरा पावसात सुस्नात न्हाऊन निघते… आनंदाच्या लहरी पसरवत जाते… हळूहळू ते पावसाचं पाणी जमिनीत मुरू लागतं … तृप्त जमीनीवर हिरवे हिरवे गवताचे कोंब उगवतात… वसुंधराचा आनंद ती गवताची पाती दवबिंदूत भिजून प्रगट करतात… आनंदाने न्हाऊन निघतात…हि कविता हेच सांगतेय…

हिरवळ

वर्षांची पहिली पर्जन्याची धारा

न्हाणुनिया गेली भूमिभाग सारा

लागली खुलाया अन् आताचं तिजवरती

या तृणांकुरांची हिरवी,कवळी नवती

*

किती उल्लासानें डोलतात हीन पाती

इवलाली सुन्दर फुलें मधूनी खुलती

चिमुकली फूलपांखरें डुलती मौजेनें

पाहुनी चित्त मम भरून ये हर्षानें

*

जणुं गालिचेच हे अंथरले भूवरतीं

जडविले जयांवर दंवबिंदूंचे मोती

या शाब्दलांगणी वाटे लोळण घ्यावी

अन्  सस्यशामल भूमी ही चुंबावी.

*

चैतन्य किती या उसळे तृणपर्णात!

किति जीवनरस राहिला भरोनी यांत!

जो झटे येवढा तृणासही सुखवाया

किती अगाध त्याच्या असेल हृदयीं माया!

 – शांता शेळके…

ती पहिली पावसाची सर भूमीला आलिंगन देते तेव्हा पहिला पाऊस शोषून घेते… कोवळी कोवळी गवताची तृणांकुरे जमीनीवर गालीच्या सारखी पसरतात… त्यातच काही गवती फुलं नाजूकपणे  उमलतात… त्याच्या वर छोटी छोटी फुलपाखरं बागडतात… किती मनमोहक नजारा दिसतो तो…हि उगवलेली छोटी छोटी कोवळी गवताची तृणांकुरे किती रसरसलेली आणि टवटवीत दिसतात … साऱ्या सृष्टीला उल्हसित करतात….

…. सृष्टीचे चक्र माणसाला कळावे… दुखाचा उन्हाळा संपला की सुखाच्या पावसाची सर येतच येते… किती आनंदाने न्हाऊन निघाल, तो तुम्हाला जीवनामध्ये उल्हास वाढवेल… आता तृणांकुराचा आकार तो किती नगण्य पण त्याला दिलेला तो आनंद कितीतरी मोठा असतो… हि पाउसाची एक सर देउन जाते तेव्हा तिचं विशाल मायेचं हृदय दिसतं….. श्रीमंताने गरीबांना आणि  उच्चवर्णीयांनी कनिष्ठ वर्णी यांना  असे मायेने ममतेने पाहिले ..सांभाळले तर ते ते देखिल महतपदाला निश्चितच पोहचतील…

… हिरवळ हे आनंदाचं रूपक आहे… पाऊस हे साधन आहे… तृणांकुर  छोटी गरीब दयनीय माणसं.. त्यांचा आनंद तो छोट्या छोट्या गोष्टीत असतो… तो जर त्यांना मिळाला  तर जगणंच आनंदाचं होईल असं या कवितेचं सार आहे असं मला वाटतं…अशी हिरवळ प्रत्येकाला हवी असते आणि ती मिळण्याची धडपड चाललेली असते…

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ शिदोरी… – कवयित्री : डाॅ. सौ. संजीवनी तोफखाने ☆ रसग्रहण… सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

सुश्री अरुणा मुल्हेरकर

? काव्यानंद ?

☆ शिदोरी… – कवयित्री : डाॅ. सौ. संजीवनी तोफखाने ☆ रसग्रहण… सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

गझलकारा डॉ. सौ. संजीवनी तोफखाने यांच्या शिदोरी या गझलेचे रसग्रहण.

गझल हा एक वृत्तात्मक काव्याचा आणि गायनाचा प्रकार आहे. गझलेची रचना ही सर्वसाधारण कविता म्हणून वेगळी असते. त्यात दोन दोन चरणाचे शेर असतात आणि संपूर्ण गझल जरी एकाच विषयावर असली तरी प्रत्येक शेर स्वतंत्र असतो.  एकच विषय न घेता वेगवेगळ्या विषयांवरील स्वतंत्र शेरही गझलरचनेत स्वीकारार्ह्य आहेत.

आता ही गझल पहा.

☆ शिदोरी ☆ डॉ. सौ. संजीवनी तोफखाने ☆

 गर्दीत माणसांच्या माणूस शोधते मी

 शोधात याच सारे आयुष्य लांघते मी

*

पाहून वागण्याच्या एकेक या तर्‍हा हो

होते अवाक बाई श्वासास रोखते मी

*

मी मंदिरात जाते ठावे चराचरी तो

श्रद्धा अशी असोनी पाषाण पूजते मी

*

मिळणार ना फळे मज माझी हयात सरली

खातील लोक कोणी कोयीस लावते मी

*

गुलमोहरास जमते ग्रीष्मात रंगणे जर

पाहून त्याकडे मग दुःखात हासते मी

*

का ओढ लावसी रे धारेपल्याड तीरा

मज यायचेच आहे पक्केच जाणते  मी

*

घेते करून काही सत्कर्म सोबतीला

संगे हवी शिदोरी यात्रेत मानते मी

ही गझल वाचल्यानंतर पटकन  लक्षात येणारी गोष्ट म्हणजे या गझलेतील मी एका दीर्घ आयुष्याचा अनुभव घेतलेली स्त्री आहे. तिने पाहिलेला समाज यात आहे.

मतल्यात ती म्हणते,

“गर्दीत माणसांच्या माणूस शोधते मी

 शोधात याच सारे आयुष्य लांघते मी”

माझ्या चहुबाजूला माणसांची इतकी गर्दी आहे, आयुष्य सरत आले तरी मला माणसातला माणूस अजून काही सापडला नाही.

आपण नेहमी म्हणत असतो आजकाल माणसातली माणुसकी हरवत चालली आहे. जग स्वार्थाने भरले आहे. स्वतःची पोळी भाजली की झाले. आपल्या मुलांनाही जन्मदात्यांकडे लक्ष देण्यास, त्यांच्यासोबत चार सुखाच्या गोष्टी करण्यास वेळ नाही.  हीच खंत या मीने  वाचकांजवळ व्यक्त केली आहे.

“पाहून वागण्याच्या एकेक या तर्‍हा हो

 होते अवाक बाई श्वासास रोखते मी”

हा दुसरा शेर!

व्यक्ती तितक्या प्रकृती असे आपण म्हणतो. गझलेतील या स्त्रीने तिच्या आज पर्यंतच्या आयुष्यात नाना तर्‍हेची माणसे पाहिली आणि त्यांच्या वागण्या बोलण्याच्या एक तर्‍हा पाहून ती म्हणते मी अवाक झाले. त्यांच्याविषयी काय कसे बोलावे हेच तिला समजत नाही. कोणीतरी चांगला देव माणूस उर्वरित आयुष्यात भेटेल या आशेने ती तिचा श्वास रोखून अजून उभी आहे. यात तिचा कुठेतरी सकारात्मक भाव आपल्याला दिसून येतो.

या तिसऱ्या शेरात ती तिच्या मनातील आणखी वेगळे भाव व्यक्त करते. ती म्हणते,

“मी मंदिरात जाते ठावे चराचरी तो

श्रद्धा अशी असोनी पाषाण पूजते मी”

आयुष्याच्या या प्रवासात या स्त्रीला समजले आहे की चराचर विश्वात ईश्वराचे वास्तव्य भरून आहे. जेथे जातो तेथे, तू माझा सांगाती अशी तिची श्रद्धा आहे. तरीही ती मंदिरात जाते, गाभाऱ्यातल्या दगडाला देव मानून त्या पाषाणाची मनोभावे पूजा करते.

या ठिकाणी ही ‘मी’ मला दुनियेतली सर्वसामान्य माणसांचे प्रतिनिधित्व करणारी वाटते. ईश्वर निर्गुण निराकार आहे हे ठाऊक असूनही आपण सगुणाचीच पूजा करतो.  आपणच त्या देवाला रंग रूप आकार देतो.

“मिळणार ना फळे मज माझी हयात सरली

 खातील लोक कोणी कोयीस लावते मी”

हा शेर खूप काही सांगून जाणारा आहे. निसर्गाचा असा नियमच आहे की आज पेरल्यावर लगेच उद्या उगवत नाही. बिजास अंकुर फुटून, रोप वाढवून त्याला फळे लागेपर्यंत त्या माणसाची हयात सरेल, परंतु त्याचा आनंद घरातील आपल्या मुलाबाळांना, नातवंडांना मिळेल, आणि मी लावलेल्या   कोयीचा मोठा आम्रवृक्ष होऊन माझे प्रियजन जेव्हा त्याला लागलेले आंबे खातील तेव्हा मला खरा आनंद मिळेल.

“गुलमोहरास जमते ग्रीष्मात रंगणे जर

 पाहून त्याकडे मग दुःखात हासते मी”

या शेरात जीवनाचे फार मोठे तत्त्वज्ञान गझलकारा संजीवनीताई सांगून जातात.

जीवनाच्या वाटेवर आनंदाची फुले असतात आणि त्याच सोबत दुःखाचे काटेही पसरलेले असतात. रोजचा दिवस कधीच सारखा नसतो. या शे रातील  गुलमोहरचा दिलेला हा दृष्टांत

अगदी रास्त आहे.ग्रीष्म ऋतूत रणरणत्या उन्हात,

उष्णतेचा दाह होत असताना गुलमोहर कसा लाल केशरी फुलांनी बहरून जातो. त्याला उष्णतेची पर्वा नसते.  हे पाहून या गझलेतील ही ‘मी’ म्हणते की मी सुद्धा

अशीच हसत असते.मला संकटांची पर्वा नाही. संकटांवर मात करून पुढे जावे आणि आनंदी रहावे हा सकारात्मक बोध या शेरातून संजीवनी ताईंनी वाचकांना दिला आहे.

 

” का ओढ लावशी रे धारेपल्याड तीरा

 मज यायचेच आहे पक्केच जाणते मी”

 

 एक ठराविक आयुष्य जगल्यानंतर

 प्रत्येकालाच भवसागराच्या या तीरावरून पलीकडे दुसऱ्या तीरावर जाण्याची सुप्त ओढ लागलेली असते आणि आज ना उद्या त्या तीरावर जायचेच आहे हेही पक्के ठाऊक असते.  तरीसुद्धा माणसाच्या मनात कुठेतरी मृत्यू विषयी भय असतेच हाच विचार या शेरात ताईंनी मांडला असावा का?

 

आता हा शेवटचा शेर पहा.

 

” घेते करून काही सत्कर्म सोबतीला

 संगे हवी शिदोरी यात्रेत मानते मी”

 

 माणूस महायात्रेला निघतो,त्याचे निर्वाण होते तेव्हा तो सोबत काय नेतो? पैसा- अडका धन- दौलत, नाती-गोती सर्व काही त्याला इथेच ठेवून जायचे असते. मात्र त्याच्या कर्मांची नोंद वरती चित्रगुप्ताकडे झालेली असते.  सत्कर्म आणि कुकर्म ज्या प्रमाणात असेल त्याप्रमाणे दुसऱ्या जन्मात त्याला ते भोगावेच लागते. यालाच आपण पूर्वसंचित म्हणतो. हेच तत्व लक्षात घेऊन या शेवटच्या शेरात ही ‘मी’ म्हणते, “या प्रवासात मी माझ्यासोबत सत्कर्मांची शिदोरीबांधून नेते.”

 

 आनंदकंद वृत्तात बांधलेली अशी ही तत्व चिंतन पर गझल आहे. साधारणपणे गझल म्हटली की ती

 शृंगार रस प्रधान असते. त्यात प्रियकर प्रेयसीचे मिलन, विरह, लटकी भांडणे वगैरे विषय प्रामुख्याने हाताळलेले असतात. अध्यात्माकडे वळणाऱ्याही काही गझला असतात. ही गझल अध्यात्मिक आहे असे म्हणता येणार नाही, परंतु अध्यात्माकडे झुकणारी नक्कीच आहे. माणुसकी हे या गझलेचे अंतरंग आहे असे मी म्हणेन.

 

 प्रत्येक शेरातील खयाल,उला आणि सानी यातील राबता अगदी स्पष्ट आहे. शोधते, लांघते, रोखते, पूजते, लावते, हासते, जाणते, आणि मानते हे सर्व कवाफी अगदी सहजतेने वापरल्यासारखे वाटतात. लगावलीचे तंत्र सांभाळताना कुठेही ओढाताण वाटत नाही,  तसेच यातील गेयता आणि लयही अगदी सहज सुंदर आहे. अशी ही सर्वगुणसंपन्न गझलरचना मला फार आवडली,  तुम्हालाही ती नक्कीच आवडेल याची खात्री आहे.

© सुश्री अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ चंद्रफुल… ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆

प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

? कवितेचा उत्सव ?

☆ चंद्रफुल… ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

प्रेमाचा मंचक सजला

दरबारी रात खास

देशील का चंद्रफुल ते

दरवळतो  सुवास

*

नभातील लोम्बणारे

झुंबरातील लोलक

तेजाची किरणे त्याची

चांदण्याचा मालक

कसे सांगू तुला आता

रात नभीची खास

देशील का चंद्रफुल ते

अजुनी त्याचा वास

*

 मखमली ती नाजूक काया

 फुलली उमलली ती राणी

 मधूकोशी भ्रमर गुंजतो

 अधीर झाली का वाणी

*

 स्पर्श तुझा मऊ रेशमी

 नको तुला हा त्रास

 सोड कंचुकी उरोजाची

 मिलनाची ती आस

*

 नक्षत्रांच्या माळेत ओवला

 नभी शुक्र तारा

 क्षितिजा वर पहा आला

 थंडगार तो वारा

*

 तळ्याकाठी जमले आता

 तृषार्त मग पक्षी

 अलगद त्यांच्या चोचीतून

 काढू लागे नक्षी

 नक्षी काढता रंग सांडला

 वाढली चकोर आस

 देशील का चंद्रफुल ते

 मिळू दे सहवास

© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी

ज्येष्ठ कवी लेखक

मुपो नसलापुर ता रायबाग, अंकली, जिल्हा बेळगाव कर्नाटक, भ्रमण ध्वनी – 9164557779 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सुखाचे माहेर… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

श्री शरद कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

सुखाचे माहेर… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

घर स्वप्नाचे डोळ्यात,

जेंव्हा तुझ्या मी पाहतो.

घर डोळ्यात स्वप्नाचे,

मी स्वप्नात बांधतो.

*

घर बांधावे वाळूत,

भव्यदिव्य दिमाखात .

सारे अद्भुत अगम्य ,

जग,थोडा शैशवात.

*

ठरे चिमणी शहाणी,

तिचे मेणाचेच घर.

गेले वाहून काऊचे,

शेणामातीचे ते घर.

*

वर मायेचे छप्पर ,

आत सुखाचे माहेर .

नाही धाकाचा उंबरा,

असे बांधीन मी घर.

© श्री शरद  कुलकर्णी

मिरज

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ मित्र होऊया निसर्गाचे … ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ मित्र होऊया निसर्गाचे … ☆ सुश्री नीलांबरी शिर्के 

पर्यावरणाचा समतोल हवा

तर रोजचा दिन त्याचा हवा

समतोल हवा माती पाण्याचा

जागृत सर्वानीच रहाण्याचा

*

पाणी वापर जल साठवण

वृक्ष कत्तलीवरती नियंत्रण

जे जे करती  वृक्षारोपण

त्यांनीच करावे की संगोपन

*

 आज कितीतरी रोपं लावती

 सुकती किती पण नसते गणती

 मीडियावरती फोटो झळकती

 मागे केवळ खड्डेच उरती

*

 म्हणून घेऊया रोज काळजी

 पाणी ,माती अन झाडे जपू

 मित्र होऊया निसर्गाचे आता

 दूर ठेवुया प्ल्यास्टिकासम रिपू

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सोड ना अबोला… ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆

सुश्री अरूणा मुल्हेरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ ‘सोड ना अबोला…’ ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆

(वृत्त-चंद्रकांत(८+८+८+२))

नकोच सखये रुसवा असला वद ना तू राणी

साहत नाही तुझा अबोला मम नयनी पाणी

*

आम्रतरूवर कोकिळकूजन ऐक ना प्रिये तू

कुठे हरवला पंचम स्वर तव सांग ना सखे तू

*

चुकले माझे काय तरी गे स्मरत नसे मजला

गाल फुगवुनी बैसलीस तू शोभे ना तुजला

*

पहा प्रियतमे तुजसाठी मी चाफा आणियला

अबोल त्याची प्रीत जाणुनी गजरा माळियला

*

पुरे जाहला लटका रुसवा थकलो मी आता

समजुन घे मज माझे राणी तुझाच मी भर्ता

*

तुझ्यावाचुनी नसे कोण मज कोमल तव वाणी

तिलोत्तमा तू अप्सराच जणु ह्रदयाची राणी

*

किती प्रतीक्षा करू सांग ना अधीर तव बोला

पुरे जाहली थट्टा आता सोड ना अबोला

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares