☆ जागतिक आनंद दिवस आणि बालकवींची पुण्यतिथी… – लेखक : श्री श्रीकांत उमरीकर ☆ सौ. मंजिरी येडूरकर ☆
५ मे १९१८ ची गोष्ट आहे. अठ्ठावीस वर्षे वयाचा एक तरूण आपल्या धुंदीत चालला होता. जवळची वाट पकडायची म्हणून तो रेल्वेचे रूळ ओलांडून जाणार्या छोट्या पायवाटेने निघाला. दोन रूळ एकत्र येवून पुढे जाणार्या ठिकाणी तो उभा होता. तेवढ्यात त्याला मालगाडीची शिट्टी एैकू आली. ही गाडी दुसर्या रूळावरून जाईन असा अंदाज होता पण ती नेमकी तो चालला होता त्याच रूळावर आली. घाईघाईत रूळ ओलांडताना त्याची चप्पल तारेत अडकली. ती सोडवण्यासाठी तो खाली झुकला. तोपर्यंत मालगाडी त्याच्या देहाचे तुकडे तुकडे करून निघून गेली.
एरव्ही ही घटना पोलीसांच्या नोंदीत अपघात म्हणून जमा झाली असती. पण हा तरूण म्हणजे कोणी सामान्य इसम नव्हता. मराठी कवितेत ‘बालकवी’ म्हणून अजरामर ठरलेल्या त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांची ही गोष्ट आहे. जळगांव जिल्ह्यातील भादली या रेल्वेस्टेशनवर हा अपघात घडला. किती जणांना आठवण आहे या कवीची?
जागतिक हास्य दिवस मे महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो. या वर्षी हा दिवस आजच म्हणजे ५ मे रोजी आहे.
आनंदी आनंद गडे
इकडे तिकडे चोहिकडे
वरती खाली मोद भरे
वायूसंगे मोद फिरे
नभांत भरला
दिशांत फिरला
जगांत उरला
मोद विहरतो चोहिकडे
आनंदी आनंद गडे !
अशी सुंदर आनंदावरची कविता लिहीली त्यांची आठवण हा जागतिक हास्य दिवस साजरा करणार्यांना होणार नाही. आनंदाचे तत्त्वज्ञान अतिशय साध्या सोप्या भाषेत लिहीणारा हा कवी ज्यानं आनंदाची केलेली व्याख्या किती साधी सोपी आणि मार्मिक आहे
स्वार्थाच्या बाजारात
किती पामरे रडतात
त्यांना मोद कसा मिळतो
सोडुनी तो स्वार्था जातो
द्वेष संपला
मत्सर गेला
आता उरला
इकडे तिकडे चोहिकडे
आनंदी आनंद गडे
बालकवींचा जन्म १३ ऑगस्ट १८९० रोजी धरणगाव (जि. जळगांव) इथे झाला. केवळ २८ वर्षांचे आयुष्य लाभलेल्या या कवीने अतिशय मोजक्या पण नितांत सुंदर आणि नितळ भावना व्यक्त करणार्या कविता लिहून मराठी वाचकांवर मोठे गारूड करून ठेवले आहे.
श्रावणमासी हर्ष मानसी
हिरवळ दाटे चोहीकडे,
क्षणात येती सरसर शिरवे
क्षणात फिरूनी उन पडे
किंवा
हिरवे हिरवे गार गालीचे
हरित तृणाच्या मखमालीचे
त्या सुंदर मखमालीवरती
फुलराणीही खेळत होती
या सारखी गोड रचना असो. आपल्या साध्या सुंदर शब्दकळेने बालकवी वाचकाच्या मनात घर करून राहतात. अशा सुंदर साध्या गोड कविता लिहीणार्याला आपण विसरून जातो. त्यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या आमच्या लक्षातही राहत नाहीत. गावोगावच्या साहित्य संस्था कित्येक उपक्रम सतत करत असतात. तेंव्हा ज्यांची जन्मशताब्दि होवून गेली आहे अशा मराठी कविंवर काहीतरी कार्यक्रम करावे असे का बरे कोणाच्या डोक्यात येत नाही? एक साहित्य संमेलन केवळ शताब्दि साहित्य संमेलन म्हणून नाही का साजरे करता येणार? केशवसुत, बालकवी पासून ते कुसूमाग्रज, मर्ढेकर, अनिल, इंदिरा संत, ना.घ.देशपांडे, बा.भ.बोरकर, वा.रा.कांत, ग.ल.ठोकळ, ग.ह.पाटील अशी कितीतरी नावे आहेत. शंभरी पार केल्यावरही टिकून राहणार्यांची आठवण न काढणे हा आपलाच करंटेपणा आहे.
या जून्या कविंची आठवण का काढायची? कोणाला वाटेल कशाला हे सगळे उकरून काढायचे. पण जर जूनी कविता आपण विसरलो तर पुढच्या कवितेची वाटचाल सोपी रहात नाही. बा.भ.बोरकर लिहून जातात
तू नसताना या जागेवर
चिमणी देखील नच फिरके
कसे अचानक झाले मजला
जग सगळे परके परके
आणि पन्नास साठ वर्षे उलटल्यावर संदिप खरे सारखा आजचा कवी लिहीतो
नसतेच घरी तू जेंव्हा
जीव तुटका तुटका होतो
जगण्याचे तुटती धागे
संसार फाटका होतो
आजचा कवी काळाच्या किती मागे किंवा पुढे आहे हे समजण्यासाठी जूने कवी वाचावे लागतात. त्यांची कविता समजून घ्यावी लागते. जी कविता काळावर टिकली आहे निदान तेवढी तरी कविता आपण वाचणार की नाही? आणि ती नाही वाचली तर मराठी कवितेचेच नुकसान होते.
आजकाला सर्वच गोष्टींना जातीचा रंग चढवला जातो. मग बालकवी म्हणजे त्यांची जात कोणती? त्याचा काय फायदा आहे? त्याप्रमाणे त्यांची जयंती पुण्यतिथी साजरी करायची की नाही ते ठरते. कुठलाही खरा प्रतिभावंत नेहमीच जातीपाती, देश, काळ याच्या सीमा ओलांडून आपली निर्मिती करत असतो.
बालकवींच्याच आयुष्यातील एक काळीज हेलावून टाकणारा प्रसंग आहे. त्यांच्या शरिराचे तुकडे तुकडे त्यांचे स्नेही आप्पा सोनाळकर पोत्यात भरत होते. त्यांच्या डोळ्यातून अश्रू खळाखळा वहात होते. बालकवींच्या सदर्याकडे हात जाताच आप्पांच्या लक्षात आले की आत घड्याळ आहे आणि ते अजूनही चालूच आहे. बालकवींची एक अप्रकाशित कविता आहे
घड्याळांतला चिमणा काटा
टिक_ टिक् बोलत गोल फिरे
हे धडपडते काळिज उडते
विचित्र चंचल चक्र खरे!
घड्याळातला चिमणा काटा
त्याच घरावर पुन्हा पुन्हा
किति हौसेने उडत चालला
स्वल्प खिन्नता नसे मना!
काळावर इतकी सुंदर कविता लिहीणारा हा कवी आपण कशासाठी जातीपातीच्या चौकटीत, नफा नुकसानीच्या हिशोबात मोजायचा?
शंभर वर्षांपूर्वी होवून गेलेला हा कवि आनंदाचे उत्साहाचे कारंजे आपल्यापुढे कवितेत ठेवून गेला आहे. त्याच्या डोळ्यापुढचे त्याच्या स्वप्नातले जग कसे होते?
सूर्यकिरण सोनेरी हे
कौमुदि ही हंसते आहे
खुलली संध्या प्रेमाने
आनंदे गाते गाणे
मेघ रंगले
चित्त दंगले
गान स्फुरले
इकडे तिकडे चोहिंकडे
आनंदी आनंद गडे !
बालकवींना १०६ व्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन !
☆
लेखक : श्रीकांत उमरीकर
जनशक्ती वाचक चळवळ, छत्रपती संभाजीनगर
प्रस्तुती – सौ.मंजिरी येडूरकर
लेखिका व कवयित्री, मो – 9421096611
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈