मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 229 ☆ मृदगंध ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 229 ?

☆ मृदगंध ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

 पुढच्याच महिन्यात पाऊस येईल,

मृगाचा!

जून मधला पाऊस मला खरा वाटतो,

तुझ्यासारखा!

दरवर्षी नवा !

— कोऱ्या पाठ्यपुस्तकांसारखा!!

त्या कोऱ्या पुस्तकांचा वास

आणि मृदगंध!

कुठल्याही सुवासिक फुलाला किंवा

महागड्या अत्तरालाही,

नाहीच त्याची सर !

 

नेमेचि येतो…..म्हणण्या सारखा,

नाही राहिला पाऊस!

तो ही आता बेभरवशाचा!

 

पण आठवणी नेहमीच

असतात भरोश्याच्या…शाश्वत!

मला जून मधला पाऊस,

जुन्या आठवणींच्या गावात घेऊन जातो !

ती शाळा..भिजलेली वाट…

वर्ग…खिडकी ..पाऊसधारा!

 

आपलं गाव दुष्काळी,

पण पाऊस नेहमीच असतो,

सुजलाम सुफलाम!

  वैशाख वणव्यात तापलेल्या

धरणीला तृप्त करताना,

दरवळणारा मृदगंध—

थेट प्राणात जाऊन पोहचलेला,

 

आणि सखे तू ही तशीच !

 

 म्हणायचीस,

“जिवंतपणी तर मी तुला विसरूच शकत नाही पण,

मेल्यानंतरही तुझी आठवण,

माझ्या आत्म्याबरोबर असेल”

आणि

तू  अकालीच निघून गेलीस….

पण थेट प्राणात रुतून बसली

आहेस—-

 

पाऊस कसाही मोसमी- बेमोसमी,

 

तू मात्र शाळेत असल्यापासून,

श्वासात भरून घेतलेल्या,

मृदगंधासारखी !!!

© प्रभा सोनवणे

४  मे २०२४

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ शिस्त… ☆ सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? कवितेचा उत्सव ?

☆ शिस्त… ☆ सौ. गौरी गाडेकर

अब्जावधी प्रकाशवर्षं व्यापून राहिलेल्या

अफाट विश्वाती ल

अनंत अवकाशातील

अगणित आकाशगंगा

त्यातले असंख्य ग्रहतारे

अनादी कालापासून

भ्रमण चाललंय त्यांचं

आपापल्या कक्षेत

आपापल्या गतीने

एका शिस्तीत

विज्ञानाधिष्ठित नियमांत.

म्हणूनच तर शक्य झाला ना

श्रीरामाच्या भाळावरचा सूर्यतिलक अचूक वेळेला.

ग्रहणं, वेध…. सर्व काही

नियमांत बांधलेलं

गणिताने अचूकरीत्या

वर्तवता येणारं

 

निसर्गचक्रही फिरत असतं शिस्तवार

सागर, नद्या, डोंगर

सगळेच निसर्गाच्या नियमानुसार

 

प्राणी, पक्षी, झाडं, वनस्पती

जलचर, भूचर, उभयचर

सगळ्यांचीच जीवनचक्रं,

विणीचे, पुनरुत्पादनाचे मोसम विज्ञानाधिष्ठित

गणिती धारणांनी आखीवरेखीव

म्हणून तर

करोडो कोसांचे अंतर

पार करून

स्थलांतर करणारे पक्षी

पोचतात योग्य वेळी

योग्य ठिकाणी

 

सर्व शिस्तबद्ध

निसर्ग नियमांनुसार

 

याला अपवाद एकच

निसर्गाचा लाडका पुत्र: मानव

नव्हे,

लाडावलेलं, बिघडलेलं कार्टं :माणूस

सगळे नियम, सगळी शिस्त

धाब्यावर बसवून

निवळ आपल्या स्वार्थासाठी

वागतोय मनःपूत, बेशिस्त

 

आणि त्यामुळेच

शिस्तशीर वागणाऱ्या

निसर्गाचाही

ढळलाय तोल.

© सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ 05… जागतिक हास्य-दिन !!! ☆  श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

??

05… जागतिक हास्य-दिन !!! ☆  श्री संदीप रामचंद्र सुंकले 

या जगात दुसऱ्याला सहज देता येणारी एकच गोष्ट असेल, ती म्हणजे हास्य!! 

बाळाचे निरागस हास्य सर्वात आनंददायी असते.

‘हास्या’ला तसे ‘मूल्य’ नाही कारण ते ‘अमूल्य’ आहे.

या जगात प्रवेश करताना ‘रडणारा’ मनुष्य जर ‘हसतमुखाने’ मेला तर तो ‘खरा’ जगला असे म्हणता येईल.

रडायला कोणीतरी मायेचे लागते, पण हसायला मात्र अनोळखी मनुष्यही चालतो

रडण्यासाठी मनुष्याला ‘कारण’ लागते पण हसण्यासाठी कारण लागतेच असे नाही.

 रडण्याच्या बदल्यात काय मिळेल ते सांगता येईलच असे नाही, परंतु हास्याच्या बदल्यात हास्य मिळण्याची शक्यता जास्त असते.

चेहऱ्यावरील ‘स्मितहास्य’ तुमच्या चेहऱ्याचे ‘मूल्य’ वाढविते.

म्हणून हसा आणि लठ्ठ व्हा !!

ती हसली, मनापासून हसली आणि भोवताली दाटत असलेल्या छाया क्षणार्धात अदृश्य झाल्या.

पूर्वी लिहिलेली एक कविता इथे देत आहे…

*

हास्यातूनी पाझरे तुझ्या टिपुराचे चांदणे

मनास मुग्ध करी तुझे रूप हे लोभसवाणे

*

हास्यातुनी तुझ्या प्रगटती आरस्पानी दवबिंदू

श्रावणात जशा बरसती जलधार, जलसिंधू

*

हास्यातुनी तुझ्या गवसे मातृहृदयी निर्मळ मन

तव हास्यधारांच्या संगे सांत होई व्याकुळ मन

*

सदैव मुखी स्मितहास्य विलसावे कान्ह्यासारखे

विहरत राहावे गगनी परी तटस्थ कृष्णासारखे

*

दिवसभरात किमान एक तरी व्यक्तीच्या चेहऱ्यावर ‘हास्य’ आणायचा संकल्प आजच्या शुभदिनी करावा.

जागतिक हास्य दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा !!!

© श्री संदीप रामचंद्र सुंकले

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #236 ☆ फूलपाखरू… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

 

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 236 ?

फूलपाखरू ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

कळते मजला परि ना वळते

दुःख स्वतःचे स्वतःच गिळते

जेव्हा करते हरिचा धावा

जिवाशिवाशी नाते जुळते

*

शेण मातिने घर सारवले

पोतेऱ्याने ते आवरले

घरात नाही कचरा काडी

तरी कशाने मन हे मळते

*

चरण शृंखला नव्हते तोडे

जगता जगता झिजले जोडे

गोल भिंगरी या पायांना

मृत्यु पासून दूरच पळते

*

हळूच गेली दूर सावली

वाटत होती माय माऊली

मधुर सुखाचा काळ संपता

शीतल छाया कोठे मिळते

*

कायम कष्टी असतो मानव

जीवन वाटे त्याला बेचव

फुलाफुलांवर फूलपाखरू

मजेत उडताना आढळते

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ग्रीष्म कदर… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ ग्रीष्म कदर ☆ श्रीशैल चौगुले ☆

निवडुंगाचे काटे फळ

उन्हातही चालण्या बळ

लालबुंद वाण सकळ

गोडझार दिसाचा तळ.

*

जांभुळ आंबा चिंच बोर

भर झळातही बोकर

रामफळाचे रुचकर

ग्रीष्माचे उन्ह मृगजळ.

*

आभाळ शुभ्र निळेशार

ओढीत हरित पदर

धरती हाकते ढगाला

पाखरे क्वचित कदर.

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मत माझे हक्काचे! ☆ डाॅ. विष्णू वासमकर ☆

डाॅ. विष्णू वासमकर

? कवितेचा उत्सव ? 

☆ मत माझे हक्काचे! ☆ डाॅ. विष्णू वासमकर☆ 

आपणा सर्वांच्या कल्याणास्तव

मतोत्सव लोकशाहीचा,

मतदानाचा दिवस नव्हे

सुट्टीचा अन् मौजेचा !            १

 

राजकारण आमचे नव्हे

ते आहे गुंडांचे,

गरीब काय करील सांगा

धनदांडग्या पुंडांचे !       ‌‌         २

 

असे म्हणत राहिलो तर

वाईट माणसेच नेते होतील,

मत न देता बसलो तर

स्वार्थी कोल्हे सोकावतील !     ३

 

कुणीही येवो निवडून

मला काय करायचे,

मत माझे वाया जाईल

असे नाही बोलायचे !               ४

 

उडदामाजी काळी गोरे

सर्वत्रच भेटायचे,

त्यातील योग्य-अयोग्य

आपणच असते ठरवायचे !       ५

 

मत माझे हक्काचे

त्याचा वापर करणार,

योग्य नेत्यास निवडून देऊन

कर्तव्य माझे पार पाडणार !     ६

 

देशाचा जे विचार करतील

त्यांनाच निवडून देऊया,

देशापेक्षा जे मोठे असतील

त्यांना बाजूस बसवुया !         ‌   ७

 

मत माझे मोलाचे

वाया नाही जाणार,

देशाचा विचार करणारा

नेताच नायक बनणार !!            ८

© डाॅ. विष्णू वासमकर

स्थळ : हिमालय

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ चालचलाऊ भगवद्गीता आणि – कवी – ज. के. उपाध्ये ☆ माहिती संग्राहक व लेखक – श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? इंद्रधनुष्य ?

☆ चालचलाऊ भगवद्गीता आणि – कवी – ज. के. उपाध्ये ☆ माहिती संग्राहक व लेखक – श्री सुहास सोहोनी ☆

विसरशील खास मला दृष्टिआड होता …

कुणी काही म्हणा .. कुणी काही म्हणा …

रामचंद्र मनमोहन .. नेत्र भरून पाहीन काय …

त्यांच्याच पावलांचा .. हा नाद ओळखीचा …

अशी एकापेक्षा एक सरस भावगीते लिहिणाऱ्या कवीचं नांव तुम्हाला माहित असेलच … ज.के.उपाध्ये !

कवी – ज. के. उपाध्ये

(जन्म १८८३ आणि मृत्यु १९३७.)

काहीसं बेफिकिर, भरकटलेलं, मस्त कलंदर आयुष्य जगलेल्या या कवीच्या एका भावगीताला यशवंत देव यांच्या अतिशय आकर्षक चालीचं लेणं मिळून ते सुधा मल्होत्राच्या आवाजांत आकाशवाणीवरून प्रसारित झालं ते १९६०-६१ साली.  पण खऱ्या अर्थानं ते आमरसिकांपर्यंत पोहोचलं १९७६ मध्ये आशाबाईंची ध्वनिमुद्रिका आली तेव्हा. म्हणजेच कवीच्या मृत्यूनंतर ४० वर्षांनी. या भावगीतानं साऱ्या रसिक मनाला हेलावून टाकलं. हे गाणं होतं – “विसरशील खास मला दृष्टिआड होता !!”

नंतर त्यांच्या इतर गाण्यांच्या ध्वनिमुद्रिका येतच राहिल्या. पण स्वतः कवीला मात्र आपल्या हयातीत आपले शब्द रसिकांपर्यंत पोचल्याचं भाग्य कधीच बघायला मिळालं नाही.

आईचं छत्र लहानपणीच हरवलेलं आणि वडील अतिशय तापट-संतापी! त्यामुळे लहानपणापासूनच फारशी माया, जिव्हाळा उपाध्ये यांच्या वाट्याला आला नाही. कदाचित त्यामुळेच उपाध्ये काहीसे एककल्ली, तऱ्हेवाईकही झाले होते.

१९०५ मध्ये विरक्ती आल्यामुळे, कुणालाही न सांगता, उपाध्ये अचानकपणे हनुमान गडावर गेले. तेथे त्यांनी दासबोधासह अनेक धार्मिक ग्रंथांची पारायणं केली.

१९०८ साली ते हनुमान गडावरून परत आले. विवाह झाला. कन्यारत्न घरी आले. पण दहा वर्षांतच पत्नीच्या आणि कन्येच्या मृत्यूमुळे, त्यांचे कौटुंबिक आयुष्य संपुष्टात आले. याच काळात त्यांच्या काव्यरचना आणि अन्य गद्य साहित्य यांच्या निर्मितीला सुरुवात झाली होती. १९२४ मध्ये “लोकमान्य चरितामृत खंड १” हा त्यांचा लो. टिळकांवरचा ओवीबद्ध ग्रंथ प्रकाशित झाला. पुढे “पोपटपंची” हा कवितासंग्रह. १९३२ साली उमर खय्यामच्या रुबायांचा मराठी अनुवाद प्रकाशित झाला. “वागीश्वरी” आणि “सावधान” या त्या काळच्या नियतकालिकांची जबाबदारी सुद्धा त्यांनी यशस्वीपणे सांभाळली.

चालचलाऊ भगवद्गीता ” हे विडंबनात्मक काव्य लिहायला त्यांनी सुरुवात केली होती. पण ते खंडकाव्य काही ओव्या लिहिल्यानंतर अपूर्णच राहिलं असावं. याच काव्यावरूनच ज्येष्ठ विद्वान राम शेवाळकर यांनी उपाध्यांचा गौरव मराठी विडंबन काव्याचे आद्य उद्गाते अशा शब्दांत केला आहे.

“सावधान” हे त्यांचं नियतकालिक ऐन बहरांत असतांनाच, विषमज्वराच्या व्याधीनं १ सप्टेंबर १९३७ रोजी ज.के.उपाध्यांना मृत्यूच्या हवाली केलं.

मृत्यूपूर्वी त्यांनी लिहिलेली अखेरची कविता म्हणजे :

एकटाची आलो आता

एकटाची जाणार

एकटेच जीवन गेले

मला मीच आधार ||

आपलं भाग्य असं की आपल्याला हा कवी त्याच्या कर्णमधुर भावगीतांमधून अनुभवायला मिळाला !

☆ चालचलाऊ भगवद्गीता : ज.के.उपाध्ये ☆

पार्थ म्हणे गा हृषीकेशी

या युद्धाची ऐशीतैशी

बेहत्तर आहे मेलो उपाशी

पण लढणार नाही  -१-

धोंड्यात जावो ही लढाई

आपल्या बाच्याने होणार नाही

समोर सारेच बेटे जावई

बाप, दादे, मामे, काके  -२-

काखे झोळी, हाती भोपळा

भीक मागूनि खाईन आपला

पण हा वाह्यातपणा कुठला

आपसात लठ्ठालठ्ठी  -३-

या बेट्यांना नाही उद्योग

जमले सारे सोळभोग

लेकांनो होऊनिया रोग

मरा ना कां  -४-

लढाई कां असते सोपी

मारे चालते कापाकापी

कित्येक लेकाचे संतापी

मुंडकीहि छाटती  -५-

कृष्ण म्हणे रे अर्जुना

हा कोठला बा बायलेपणा

पहिल्याने तर टणाटणा

उडत होतास  -६-

लढण्यासी रथावरी बैसला

शंखध्वनि काय केला

मग आताच कोठे गेला

जोर तुझा मघाचा?  -७-

तू बेट्या मूळचाच ढिला

पूर्वीपासून जाणतो तुला

परि आता तुझ्या बापाला

सोडणार नाही बच्चमजी  -८-

अहाहारे भागूबाई

आता म्हणे मी लढणार नाही

बांगड्या भरा की रडूबाई

बसा दळण दळत  -९-

कशास जमविले अपुले बाप

नसता बिचा-यांसी दिला ताप

घरी डाराडूर झोप

घेत पडले असते  -१०-

नव्हते पाहिले मैदान

तोवरी उगाच केली टुणटुण

म्हणे यँव करीन त्यँव करीन

आताच जिरली कशाने  -११-

अरे तू क्षत्रिय की धेड

आहे कां विकली कुळाची चाड?

लेका भीक मागावयाचे वेड

टाळक्यांत शिरले कोठुनी  -१२-

अर्जुन म्हणे गा हरी

आता कटकट पुरे करी

दहादा सांगितले तरी

हेका कां तुझा असला  -१३-

आपण काही लढणार नाही

पाप कोण शिरी घेई

ढिला म्हण की भागूबाई

दे नांव वाटेल ते  -१४-

ऐसे बोलोनि अर्जुन

दूर फेकूनि धनुष्य-बाण

खेटरावाणी तोंड करून

मटकन खाली बैसला  -१५-

इति श्री चालचलाऊ गीतायाम प्रथमोध्यायः

कवी – ज. के. उपाध्ये 

माहिती संग्राहक व लेखक : सुहास सोहोनी

मो ९४०३०९८११०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “वकिलाचं मन…” – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ “वकिलाचं मन…” – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

पूर्वेचा सूर्य पश्चिमेला, 

कधी उगवणार नाही

वकिलांचे मन कुणास,

कधी कळणार नाही !!

*

सुरुवातीची पाच वर्षे

असे प्रतिक्षेचा काळ

मग हळू -हळू जुळते

या व्यवसायाशी नाळ

जीवनातील हा संघर्ष

कधी संपणार नाही !!

वकिलाचे मन कुणास,

कधी कळणार नाही !!

*

ढीगभर कागदपत्रांचे

करावे लागते वाचन

सर्वोच्च न्यायनिर्णयांचे

करीतसे अवलोकन

लौकीकांन्वये मानधन

कधी मिळणार नाही !!

वकिलांचे मन कुणास,

कधी कळणार नाही !!

*

ऑफीस-कोर्ट-ऑफीस

करुन कुणा नसे जाण

पक्षकारांच्या केसेसचा

वकिलांवरच असे ताण

वेळ स्वत:चे आयुष्यास,

कधी गावणार नाही !!

वकिलांचे मन कुणास,

कधी कळणार नाही !!

*

पगार नसे, पेन्शन नसे

मानधनावरच समाधान

केवळ आशेवर रंगवतो,

भविष्याचे सुस्वप्न छान

दु:ख स्वमनाचे कुणा,

कधी दावणार नाही !!

वकिलांचे मन कुणास,

कधी कळणार नाही !!

*

लोकांच्या न्यायासाठी

नेहमी लढत असतो

मुखावर हास्य ठेवून

मनातच कुढत असतो

स्वत:च्या हक्कांसाठी

कधी लढणार नाही !!

वकिलांचे मन कुणास,

कधी कळणार नाही !

*

कोर्टातील महत्वाचा

वकील सहकारी असे

न्यायाधिशांप्रमाणे तो

न्यायिक अधिकारी असे

दर्जा सुविधांचा त्यांना,

कधी लाभणार नाही !!

वकिलांचे मन कुणास,

कधी कळणार नाही !!

वकील मित्रमैत्रीण यांना समर्पित,

लेखक : अज्ञात 

संग्राहिका: सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ महाराष्ट्र देशा… ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– महाराष्ट्र देशा – ? ☆श्री आशिष  बिवलकर ☆

दगडांच्या देशा,

राकट देशा,

कणखर देशा,

महाराष्ट्र देशा |

*

धैर्याच्या देशा,

शौर्याच्या देशा,

विरांच्या देशा,

महाराष्ट्र देशा |

*

कीर्तीच्या देशा,

स्फूर्तीच्या देशा,

त्यागमूर्तींच्या देशा,

महाराष्ट्र देशा |

*

साधूंच्या देशा,

संतांच्या देशा,

महंताच्या देशा,

महाराष्ट्र देशा |

*

साहित्याच्या देशा,

कलेच्या देशा,

खेळाच्या देशा 

महाराष्ट्र देशा |

*

उद्योगाच्या देशा,

सामर्थ्याच्या  देशा,

प्रगतीच्या देशा,

महाराष्ट्र देशा |

*

सह्याद्रीच्या देशा,

सागराच्या देशा,

दऱ्याखोऱ्यांचा देशा,

महाराष्ट्र देशा |

*

पांडुरंगाच्या देशा,

खंडोबाच्या देशा,

नरसोबाच्या देशा,

महाराष्ट्र देशा |

*

ज्ञानियाच्या देशा,

तुकोबांच्या देशा,

समर्थांच्या देशा,

महाराष्ट्र देशा |

*

भक्तीच्या देशा,

शक्तीच्या देशा,

युक्तीचा देशा,

महाराष्ट्र देशा |

*

विचारवंतांच्या देशा,

सुधारकांच्या देशा,

क्रांतीकारकांच्या देशा,

महाराष्ट्र देशा |

*

वैभवाच्या देशा,

सुबत्तेच्या देशा,

भारताची भाग्य रेषा,

महाराष्ट्र देशा |

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ माणुसकीचा ठाव नसे ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? कवितेचा उत्सव ? 

माणुसकीचा ठाव नसे ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

जिव्हा चटावली बाजारा कोपऱ्यात चूल रुसे

पंगती आग्रह भरपेटी भुकेल्या तोंडी घास नसे

सुधारलेल्या या देशी संस्कृतीस ना कोणी पुसे

माणूस हरवला माणुसकीचा ठाव नसे

*

पेले फेसाळले मदीरा स्तन आटले ओठ सुके

दूध रस्त्यावरी ओतता बालकांची क्षुधा सुके

आंसू आटलेले शुष्क मातृत्वाची मान झुके

माणूस हरवला माणुसकीचा ठाव नसे

*

माय आपुली  बहिण  गर्भातच लेक खुडे

समाजा ना घोर कुठे  कुणाचे काय अडे

मी माझे हे खरे समाजाचे तर भान नसे

माणूस हरवला माणुसकीचा ठाव नसे

*

उत्तुंग इमले धनिका दीनदुबळ्यांना वास नसे

दारी गाड्यांची रांग कोणा नेसाया साडी नसे

निर्दयी कठोर धरती गगनालाही कणव नसे

माणूस हरवला माणुसकीचा ठाव नसे

*

मंचकी लावणी रंगली सुवासिनीचा अश्रू सुके

बैठकी खणखणा पडती विद्येसाठी मोल थके

विभ्रमे मन भरे दूरदृष्टीचा अभाव दिसे

माणूस हरवला माणुसकीचा ठाव नसे

*

आता कसली आशा नाही स्वप्न ही ना पहायची

मनात आतल्या आतच जळूनी ती गुदमरायची

हाची का समाज हेचि असेच का जगायचे

माणूस हरवला माणुसकीचा ठाव नसे

© डॉ. निशिकान्त श्रोत्री

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares