मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आताशा असे का होते? ☆ श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ आताशा असे का होते? ☆ श्री अनिल वामोरकर ☆

पशूपक्षीही मजसी बोलताहेत, असे वाटते

आताशा असे का होते?….

 

वेलीवरचे फूलही

मी जवळ जाताचब डोलते

वाटते आपुल्या सुगंधाने

ते मजसी बोलताहेत…

 

रविकिरणेही त्वरे

धावती मज स्पर्षण्या

वाटते मजसवे खेळताहेत…

 

घू घू करीत स्वैर समीर

बोलतो माझ्याशी

वाटे शाश्वत आनंदाची

सनई वाजवताहेत…

 

झाडांच्या पानांची

सळसळ

जणू गीत गात आहे

आपसुकच मीही सवे

गुणगुणत आहे…

 

रात्रीच्या समयी

तारकाही संवाद साधे

कर साधन, हो अढळ,

धृवापरी,

सांगताहेत..

 

आताशा असेच होते

ही सदगुरुंची कृपा होय

बोध दिला व्यापकतेचा

सद्गुरू दिसती मज

कणाकणात, चराचरात..

© श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #263 ☆ तोल जाणारच… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 263 ?

तोल जाणारच ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

सखीची भेट झाल्यावर तसा तर तोल जाणारच

नशा डोक्यात शिरल्यावर तसा तर तोल जाणारच

*

सखी आहे धुके आहे गुलाबी छान ही थंडी

सुन्या बागेत फिरल्यावर तसा तर तोल जाणारच

*

नशा आहे तुझ्या आतच असे तू फूल मोहाचे

फुले मोहाचि फुलल्यावर तसा तर तोल जाणारच

*

निघाली रात्र पुनवेची झळाळी ही पुन्हा गाली

मिठीतच चंद्र असल्यावर तसा तर तोल जाणारच

*

तुझी तर सवय झालेली अताशा एवढी आहे

घरी नाहीस म्हटल्यावर तसा तर तोल जाणारच

*

तसा तंटा बखेडाही कधीतर होत असतो ना

सखे तो तूच केल्यावर तसा तर तोल जाणारच

*

गुलाबाचेच मी काटे तसे तर पाहिले कायम

कळी धरलीय म्हटल्यावर तसा तर तोल जाणारच

 

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ समय समई… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ समय समई… ☆ श्रीशैल चौगुले ☆

विश्वाच्या मदिरी धरेची ओंजळ

समई प्रांजळ  जळाच्या वातीत.

*

तेवते  सतत   गगन गाभारी

तिमीर संहारी   चक्र प्रभा-संध्या.

*

किरण चैतन्य  सृष्टीच्या प्रासादी

संजीव प्रसादी   सर्व भूतमात्रा.

*

मायेचा ऊदय   क्षितीजी हृदय

नितची अभय   सेवा चराचरी.

*

प्रथम नमन    सुखाचे गमन

स्वागता भुधन   कृपा अविनाशी.

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “व्यथापाचोळा…” ☆ प्रा. भरत खैरकर☆

प्रा. भरत खैरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ “व्यथापाचोळा” ☆ प्रा. भरत खैरकर 

क्षणभर  आयुष्याची

द्यावी कोणी ग्वाही

पसाभर चांदण्या साठी

 हंबरती दिशा दाही

*

मातीच्या गर्भात रुजावे

डोळ्यातील पिक

सुगंधित फुले व्हावी

जख्मा प्राणांतिक

*

स्वातीचा थेंब पडावा

अवचित शिंपल्या माजी

आयुष्य सफल जेधवा

मोती थेंबाचा साजी

*

मुग्ध उडावे स्वप्न पाखरू

क्षितीजाच्या पलीकडे

कलत्याक्षणी आयुष्याच्या

व्यथेचे व्हावे पाचोळे

© प्रा. भरत खैरकर

संपर्क – बी १/७, काकडे पार्क, तानाजी नगर, चिंचवड, पुणे ३३. मो.  ९८८१६१५३२९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – – मतदान त झाले – आता – ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

 

? – मतदान तर झाले – आता – ? ☆ श्री आशिष  बिवलकर ☆

झाले मतदान | निकालाची धास्ती |

खुर्चीसाठी कुस्ती | रणनीती ||१||

*

दोन्ही मांडवात | लग्नाची तयारी |

ढोलबाजा दारी | वाजण्यासी ||२||

*

छोटेछोटे पक्ष | विजयी अपक्ष |

त्यांच्यावर लक्ष | दोघांचेही ||३||

*

हॉटेल बुकिंग | चार्टर्ड विमान |

विजयी सन्मान | दिमतीला ||४||

*

घोडेबाजाराला | घाली खतपाणी |

पाच वर्षं लोणी | चाखायाला ||५||

*

गुडघ्यासी बांधे | उलटे बाशिंग |

आपलाच किंग | सिंहासनी ||६||

*

बिब्बा म्हणे आली | घटीका समीप |

निकालांचे दीप | उजळाया ||७||

(चित्र – साभार श्री आशिष  बिवलकर)

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ वसा… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

वसा ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

देव आहे तसा भेटला पाहिजे

छंद त्याचा मला लागला पाहिजे

*

भाव आहे तिथे देव आहे म्हणे

देव देहातला जागला पाहिजे

*

व्यर्थ दवडू कसा जन्म वाया इथे

अर्थ जगण्यासही लाभला पाहिजे

*

ध्येय गाठायला नित्य राबायचे

हात कामामध्ये गुंतला पाहिजे

*

माणसे जोडण्या माणसांना जपा

अंतरी भावही चांगला पाहिजे

*

प्रेम आहे  तिथे  हात देणे बरे

आसरा जीवनी शोधला पाहिजे

*

कर्मकांडांतली अंधश्रद्धा नको

घेतलेला वसा पाळला पाहिजे

*

वासनांची भुते दूर टाळायला

संत तुकया पुरा वाचला पाहिजे

*

आज आहे तसे जगत जावे कसे

विषय लोकांपुढे मांडला पाहिजे

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ बरसणार मी आहे– – – ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल

?  कवितेचा उत्सव ?

☆ बरसणार मी आहे– – – ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

फोडूनी काळे तम उजळणार मी आहे

शिशिराची ना पर्वा बहरणार मी आहे

*

देती जे दु:खा मज न चुकता अहोरात्री

माफी त्यांना देउन विसरणार मी आहे

*

गोळा केले तेजा ठिबकलेच ज्योतीतुन

होऊनी दिवटी बघ चमकणार मी आहे

*

नाही आता नारी सहनशील मी उरले

फोडूनी डरकाळी गरजणार मी आहे

*

माझ्या कर्तृत्वाच्या उमलवीन कमळाला

गंधाने किर्तीच्या पसरणार मी आहे

*

साध्या सोप्या गोष्टी सहज सुलभ हो असती

अंगीकारूनी त्या विहरणार मी आहे

*

कोणी नाही अपुले का उगाच ही चिंता

प्रेमाच्या वर्षाने बरसणार मी आहे

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 195 ☆ अभंग… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 193 ? 

अभंग…☆ महंत कवी राज शास्त्री ☆

जरासे वेगळे, लिखाण करावे

प्रवृत्त करावे, स्वतःलाचि.!!

म्हणोनि लेखणी, प्रसवली हाती

शब्दाकृती मोती, सोडण्याला.!!

*

भोगिले जीवन, तृप्ती नाही आली

तृष्णा न शमली, या जीवाची.!!

हावरट वृत्ति, भोगण्याची हाती

निवृत्त प्रवृत्ति, नचं याची.!!

*

कलंकित भोग, काय हो कामाचा

देवळा देवाचा, नचं दिसे.!!

मलिन हे मन, पडलिया भ्रांती

शांततेच्या वाती, अंधारात.!!

*

मनः शांतीसाठी, चिंता नको आता

चित्ताची स्थिरता, फक्त हवी.!!

कवी राज म्हणे, याची देही स्पुरो

मागे काही नुरो, अलिंबन.!!

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ कर्णभूल – कवी : ग्रेस ☆ रसग्रहण.. सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? काव्यानंद ?

☆ कर्णभूल – कवी : ग्रेस ☆ रसग्रहण.. सौ राधिका भांडारकर ☆

माणिक सिताराम गोडघाटे म्हणजेच कवी ग्रेस (१० मे, १९३७ – २६ मार्च, २०१२).  साहित्य विश्वात  कवी ग्रेस हीच त्यांची खरी ओळख.  बा.सी. मर्ढेकरांनंतर नवकवींच्या दुसऱ्या पिढीतील प्रमुख कवींमध्ये त्यांची गणना होते.  ग्रेस यांच्या कवितेत एकप्रकारची दुर्बोधता जाणवते.  यावर त्यांचे उत्तर असायचे की,” मी जे काव्य करतो ते माझे स्वगत असते आणि स्वगतात भान नसते, बेभान व्हायचे असते. स्वगताला श्रोता नसतो.  मीच माझा फक्त असतो,”

असा हा एक मुक्त काहीसा कलंदर कवी.  ज्ञानाचे सोंग न करणारा, दुर्बोधतेत संदेश देणारा आणि त्याच वेळी सामाजिक भान ठेवणारा, शब्दकोषांना नवीन शब्द देणारा असा नामांकित कवी.

  संदिग्ध  घरांच्या ओळी

 आकाश ढवळतो वारा

 माझ्याच किनाऱ्यावरती

 *लाटांचा आज पहारा…*किंवा

 

 भय इथले संपत नाही

 मज तुझी आठवण येते अथवा

 

 मी महाकवी दुःखाचा, प्राचीन नदीपरी खोल

दगडाचे माझ्या हाती, वेगाने होते फुल

अशा कितीतरी ग्रेस यांच्या काव्यपंक्ती मनाला चिपकलेल्या आहेत.

नुकतीच मी त्यांची कर्णभूल ही कविता पुन्हा वाचली.  खूप वेळा वाचली. अर्थ शोधत शोधत वाचली आणि या कवितेत मला काहीतरी सापडलं आणि जे मला सापडलं ते तुमच्यापाशी बोलावं असं वाटलं म्हणून या कवितेचं रसग्रहण करण्याचा मी प्रयत्न करत आहे.

 सुरुवातीला आपण त्यांची कर्णभूल ही कविता संपूर्ण वाचूया.

☆ कर्णभूल – कवी : ग्रेस ☆

*

 त्याने दान मांडताना

तिची झोळी तपासली

चंद्र चांदण्याच्या खाली

होत्या वाळवीच्या साली

उभा राजवाडा लख्ख

शोधे जादूची बासरी

पट्टी डोळ्याची बांधून

कुठे पाहे ना गांधारी

*

चंद्र सूर्याची सावली

त्याचे सत्य हले डूले

स्वप्नसंगात सोडतो

कर्ण कवचकुंडले

ग्रेस

ही कविता वाचल्यावर पटकन जाणवते ते या कवितेत महाभारतातील घटनेचा आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या पात्रांचा उल्लेख आहे.  शिवाय कवितेच्या शीर्षकावरूनही प्रारंभी हाच बोध होतो.  कर्ण ही महाभारतातील उपेक्षित व्यक्ती पण तरीही बहुआयामी आणि आदरणीय. उपेक्षित असली तरी दुर्लक्षित नक्कीच नाही. कर्णाच्या मनातल्या भावभावनांचा प्रवाह कवीने या काव्यात एका विशिष्ट वैचारिकतेतून मांडला आहे असे वाटते.

 त्याने दान मांडताना

तिची झोळी तपासली

 चंद्र चांदण्यांच्या खाली

 होत्या वाळवीच्या साली…१

कुरुक्षेत्री  कौरव पांडव यांच्यात घनघोर युद्ध होणार आहे.  या युद्धातले खरे नायक म्हणजे धनुर्विद्यानिपुण अर्जुन आणि राजनीतिज्ञ  युगंधर कृष्ण.  युद्ध अटळ आहे.  कृष्णाची शिष्टाई असफल ठरली आहे.  फक्त एकच हुकुमाचे पान तेवढं बाकी आहे.  कर्णाच्या जन्माचे रहस्य  जे कुंतीने आजपर्यंत लपवून ठेवलंय. कुंती जाणून आहे की कर्ण हा अर्जुना इतकाच तोलामोलाचा योद्धा आहे.  पण तो शत्रुपक्षात असल्यामुळे तिला पांडवांच्या विजयाबद्दल कुठेतरी भय आहे आणि याच क्षणी कर्णाच्या दानशूर वृत्तीची जणू काही परीक्षा घेण्यासाठीच ती स्वतः कर्णाला युद्धापूर्वी भेटते आणि कर्णाच्या जन्माचे रहस्य त्याला सांगते आणि त्याचवेळी अर्जुनाच्या प्राणांचे दान मागते. थोडक्यात ती कर्णाला भावनिक आवाहन देते. (इमोशनल ब्लॅकमेलच करते म्हणाना!)

त्यावेळी कर्णाच्या अंतरात भावनांचं वादळ उठलं असणार.  मागितलेलं दान तर द्यायलाच हवं पण ते देण्याआधी त्याच्या मनात कुंतीविषयी नक्कीच करुणा उत्पन्न झाली असावी.

तिची झोळी तपासली या शब्दरचनेतून कवी ग्रेस जणू काही कर्णाचं मन मांडत आहेत.  कुंतीच्या अस्तित्वाचा विचार कर्णाच्या मनात येतो आणि त्याला जाणवतं की “या माऊलीच्या वाटेवर फक्त वरवरच चंद्र चांदण्यांची पखरण असल्यासारखी भासते पण प्रत्यक्षात मात्र तिच्या जीवनाला जणू काही व्यथांच्या  वाळवीनेच पोखरलेलं आहे. ती एक असहाय, दुःखात्मा आहे याच दृष्टीकोनातून कर्ण या भेटीच्या वेळी तिच्याकडे पहात असावा.  कुठली सुखे होती तिच्या जीवनात?  शापितच आयुष्य तिचे… पती-वियोग,  वनवास सारे सारे भोगले हिने.

या चरणात झोळी, वाळवी, हे कुंतीच्या दुःखासाठी योजलेले  प्रतिकात्मक शब्द आहेत आणि त्यातूनच तिचे करुणामय जीवन उलगडते.

 उभा राजवाडा लख्ख

 शोधे जादूची बासरी

 पट्टी डोळ्यांची बांधून

 कुठे पाहे ना गांधारी॥ २ ॥

या चरणामध्ये वाचकांपुढे येथे ती डोळ्याला पट्टी बांधून वावरणारी गांधारी. जशी कुंती तशीच गांधारी. दोघीही राजवाड्यात राहूनही  दुःखीच.  वास्तविक गांधारी म्हणजे हस्तीनापुरची महाराणी!  उभा राजवाडा लखलखतोय पण गांधारीच्या आयुष्यात साचलाय तो अंधार.. दाट काळोख! पातिव्रत्य सांभाळत अंध पतीसाठी तिनेही जीवनभर डोळ्यावर पट्टी बांधली आणि एका गुढ अंधारातच ती जगली.  आश्वासक असं तिच्याजवळ काय होतं?

शोधे जादूची बासरी  या शब्दरचनेतून कृष्ण दर्शन होते पण गांधारीला कुठे मिळाला कृष्णचरणी विसावा?  कृष्ण प्रेम हेही पांडवांसाठीच नित्य होते.  खरोखरच गांधारीच्या आयुष्याचे सारेच सूर हरवलेले होते.

 चंद्र सूर्याची सावली

 त्याचे सत्य हाले डुले

 स्वप्न संगात सोडतो

 कर्ण कवच कुंडले..॥३॥

हा शेवटचा चरणही  प्रतिकात्मक आहे. चंद्र, सूर्य, सावली ही यश अपयशाच्या अर्थाने वापरलेली रूपके असावीत आणि जेव्हा हा विचार मनात येतो तेव्हा अर्थातच कर्णाचा जीवनपट उभा राहतो.  आयुष्यभर सुतपुत्र म्हणूनच त्याची उपेक्षा झाली.  क्षत्रिय असूनही त्याच्या क्षात्रतेजाला योग्य ती मान्यता मिळाली नाही.  त्याच्या जन्माचे रहस्यही कुणी जाणण्याचा प्रयत्न केला नाही.  त्या वेळेच्या समाजासाठी तो एक परित्यक्त, सुतपुत्र, राधेय होता.  मात्र दुर्योधनाने चाणाक्षपणे त्याला मैत्रीचा हात दिला.  अंगद देशाचे राज्यपद ही दिले. आणि एक प्रकारे त्याच्या जीवनात शीतल सावली आणली.

त्याचे सत्य हाले डुले  यातला हाले  डुले  हा कवीने वापरलेला जोडशब्द फारच चपखल आहे.  सत्य कुणालाच कळले नाही आणि जो काही मानसन्मान मित्र दुर्योधनाकडून कर्णाला मिळाला होता त्यातलाही आनंद परिपूर्ण नव्हता. जीवनात अनेक चढ —उतार, खड्डे, यश अपयश, अवहेलना याचा सामना कर्णाला करावा लागला होता.

दाता, दानशूर  म्हणून त्याचा लौकिक होता.   जगाला दान देण्याचं एक समाधानयुक्त स्वप्न तो पूर्ण करत असतानाच,  कुरुक्षेत्री युद्ध सुरू होण्यापूर्वी साक्षात इंद्र  कर्णापुढे उभा राहतो आणि कर्णाला मिळालेली जन्मजात कवच कुंडले दान म्हणून मागतो.  कर्णाच्या जीवनातला अत्यंत कसोटीचा क्षण पण इंद्राला कवच कुंडले अर्पण करून तिथेही कर्ण दात्याचा धर्म अक्षरशः पाळतो. नियती ही नेहमीच कर्णाच्या विरोधात राहिली. अर्थात यामध्ये स्वप्न, धर्म आणि समाधान यांच्या बदल्यात कर्ण एक प्रकारे युद्धाच्या प्रारंभीच स्वतःचे बलिदान जणू काही मान्य करतो.

हे  तीनही चरण वाचल्यानंतर मनात अनंत प्रश्न उभे राहतात.  कवी ग्रेसच्या काव्याचं वैशिष्ट्य हेच आहे की काव्यातलं अव्यक्त जे आहे ते वाचकाने स्वजाणिवेतून जाणावे.  प्रथम वाचकांचं मन घुटमळतं ते शीर्षकाभवती. 

कर्णभूल

कर्णाची चूक असा अर्थ घेतला तर मनात येते..  काय चूक होती कर्णाची किंवा कोणती चूक कर्णाने केली? दुर्योधनासारख्या अधर्मी पक्षासाठी त्याने का आपले जीवन व्यर्थ घालवले? त्याचवेळी कर्णभूल या शब्दरचनेतले इतर अनेक रंग, अनेक अर्थ आणि अनेक दृष्टिकोन उलगडण्यातच वाचकांचे मन गुंतून राहतं.

कर्णभूल याचा दुसरा अर्थ असाही असू शकतो की कर्णाला समजून घेण्यामध्ये इतरांची झालेली चूक.   कर्णाला कुणीच समजून घेतले नाही का?

कुंती, गांधारी आणि कर्ण हे मग समदु:खी जाणवायला लागतात.  तसेच कवीच्या मनातल्या,  या पात्रांनी केलेल्या चुका वाचकांपुढे सुस्पष्ट होऊ लागतात.

का कुंतीने  कर्णाच्या जन्माचे रहस्य दडवून ठेवले?

का गांधारीने केवळ संकेताच्या मागे जाऊन डोळ्यावर पट्टी बांधली?  कदाचित गांधारी दृष्टी घेऊन वावरली असती तर महाभारत वेगळे झाले असते का?

का कर्णाने मैत्रीच्या वचनाखातर दुर्योधनाची अनिती दुर्लक्षित केली?

या विचारांती  हे संपूर्ण तीनच कडव्यांचं लहानसं वाटणारं काव्य डोंगराएवढा अर्थ घेऊन आपल्यासमोर खळाळतं. या काव्याच्या आणि त्यातल्या ओळखीच्या पात्रांच्या माध्यमातून कवी ग्रेसना वेगळंच काहीतरी सांगायचं आहे का?

कुंती, गांधारी, कर्ण यांची जीवनेही मग प्रतिकात्मक वाटू लागतात.  मानवी जीवनाशी यांचा संदर्भ जुळवताना वाटते, अखेर सत्य एकच… चुकीचा कुठलाही मार्ग यशाच्या दिशेने जात नाही.  चूक छोटी किंवा मोठी नसतेच.  चूक ही चूकच असते आणि त्यांचे अंतिम परिणाम हे नकारात्मक असतात आणि हेच सत्य कदाचित ग्रेस ना महाभारतातील या पात्रांद्वारे जगापुढे मांडायचे असतील…

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पहा एका रांगोळीने… ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆

प्रा. सौ. सुमती पवार

? कवितेचा उत्सव ?

☆ पहा एका रांगोळीने… ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆

अंगणात रेखियली एक रांगोळी सुंदर

माझे अंगण वाटले मग मलाच चंदन

घर झाले सुशोभित पहा एका रांगोळीने

मनोमन केले मग रांगोळीलाच वंदन…

*

येते अंगणाला शोभा फक्त एका रांगोळीने

जशी माणसाला शोभा येते पहा आंघोळीने

शुचिर्भूत होते घर दारी रांगोळी हासतां

जसे शोभतात देव लावताच चंदनाने…

*

लक्षुमीची पाऊले ती दारी शोभती गोपद्मे

लखलख निरांजने बागा शोभती उद्याने

सारी नक्षत्रे नि तारे उतरती अंगणात

मनी अस्फूट अस्फूट जणू सृष्टी गाते गाणे…

*

लखलख लखलख जणू आकाश अंगणी

असे प्रकाशाचे पर्व सारे साधती पर्वणी

आनंदाचे अंगअंग आनंदाचे रंगरंग

मनी झुलतात झोके घरोघर ते चंदनी..

*

गलगलं गलगलं असा सण दिवाळीचा

मंगल उटणे सुगंधी पवित्र त्या अभ्यंगाचा

भाऊबहिणीचा सण तसा सण पाडव्याचा

लाडू करंजी कडबोळी अनरसे चिवड्याचा…

*

घमघमाट नि तृप्ती ओसांडते मुखावर

रोषणाई नि चांदण्या उतरती घरावर

देवदेवतांची कृपा बरसती आशीर्वाद

मग दिवाळीचा वाढे पहा आणखीन स्वाद…

© प्रा.सौ.सुमती पवार 

 नाशिक

(९७६३६०५६४२)

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print