मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ निः स्वार्थी मरण… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ निः स्वार्थी मरण ☆ श्रीशैल चौगुले ☆

मी संपताना नव्हते जवळ कुणी

जे होते कुणी पाहिले प्राण जाणूनी.

*

हेवा कधीच नव्हता केला कुणाचा

सेवा केली जितुकी आपुले मानूनी.

*

कौतुके फुलांची श्रध्दांजली तयांची

स्वीकार आत्मऋणे आशेत सगुणी.

*

मी संपताना जिव्हाळे बाकी जपले

आक्रोश खरा कि खोटा दुःख आणूनी.

*

डोळ्यात पाणी कुणाच्या, कुणा कोरडे

जन्मास या अर्पीले कर्म मृत्यू मानूनी.

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ मी तो भ्रमर… ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

 

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– मी तो भ्रमर – ? ☆श्री आशिष  बिवलकर ☆

कमनीय बांधा तुझा,

अप्सरेपरी तुझे लावण्य |

मादकपणा नजरेत,

वेड लावी तुझे तारुण्य |

*

मादक नजरेत तुझ्या,

वर्षावती जुलमी बाण |

घायाळ करती मज,

ओवाळावे तुझ्यावर प्राण |

*

चांदण्यात शोभावी

जशी  शुक्राची  चांदणी |

लाखात एक उमटून दिसावी,

अशी सौंदर्यवती तू देखणी |

*

मंजूळ आवाज तुझा,

मधापरी त्यात माधुर्य |

घुमती कानी शब्द तुझे,

शब्दांना तुझेच सौंदर्य |

*

न्याहाळताना तुझे सौंदर्य,

माझा मी रहात नाही |

मंत्रमुग्ध होऊन जातो,

आठवेना तुझ्यापुढे काही |

*

कमल नयन तुझे,

मोहित मी तो भ्रमर |

मिटावे कमलदल तू,

गुंतून जावे जीवनभर |

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ झाड… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

झाड☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

बीज नामी  होउनीया  अंकुरावे

माणसाने वाटते मज झाड व्हावे

*

ऊन वारा पावसाने ओल द्यावी

झाड मातीने सुखाने वाढवावे

*

ऐतखावू सावजाना सांग देवा

स्वावलंबी जीवनाला मोल यावे

*

घेतला आहे वसा तो चालवाया

आपले जगणे जगाला सोपवावे

*

मानवी स्पर्धाच सा-या संपवाव्या

वास्तवाने जीवनाला सावरावे

*

झाड आहे केवढा  आदर्श येथे

नेमके औदार्य त्यांचे  आठवावे

*

शेवटी संन्यस्त वृत्ती घेतली की

गरजवंतालाच जगणे दान द्यावे

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 167 ☆ पिकलेली दाढी… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 167 ? 

☆ पिकलेली दाढी… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

पिकलेली दाढी माझी

मला काही सांगू लागली

सांगता सांगता तीच दाढी

माझ्यावरती हसू लागली.

*

पिकलेली दाढी माझी

संदेश मला देऊ लागली

मध्यंतर झाले तुझे

तुला नं याची चाहूल लागली.?

*

पिकलेली दाढी माझी

सत्यार्थ प्रगट करू लागली

येथे नं काही स्थिर मानवा

याची तुज रे, भूल पडली.

*

पिकलेली दाढी माझी

सत्य गूढ तिने उकलले

विचारशास्त्रात मी गढलो

माझे पाढे मीच वाचले.

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ मुक्त… – सौ राधिका भांडारकर ☆ रसग्रहण… सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

सुश्री अरुणा मुल्हेरकर

? काव्यानंद ?

☆ मुक्त… – सौ राधिका भांडारकर ☆ रसग्रहण… सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

मुक्त (गझल~सौ. राधिका भांडारकर)

रसग्रहण

आयुष्यात सर्वच गोष्टी मनाप्रमाणे होत नसतात. जे आपल्याला हवं असतं ते मिळतच असंही नाही. पण हवं असलेलं न मिळाल्यामुळे आयुष्य थांबत नाही. ते पुढे जात असतं, त्यासाठी अनेक वाटा असतात आणि त्यातलीच एखादी वाट भविष्यासाठी निवडायची असते. आपलं वर्तमान आपण जगायचं असतं अर्थात जगताना भूतकाळाचा कप्पा मधून मधून किलकिला होतो आणि त्यातून पुन्हा झिरपणाऱ्या कवडशाने कधी कधी मन व्याथितही होतं. अशाच आशयाची सौ. राधिका भांडारकर यांची मुक्त ही गझल नुकतीच वाचनात आली आणि त्याचा रसास्वादही घ्यावासा वाटला.

सौ राधिका भांडारकर

☆ मुक्त ☆

अपराध काय माझा भांबावले कशाला

वाटेतल्या रिपुंना  ओवाळले कशाला

*

नव्हते कधीच माझे ते दूर ठेविले मी

कळले जरी मला हे मी त्रासले कशाला

*

वेडातल्या स्मृतींना केव्हांच दूर केले

आता उगा उजाळी पाणावले कशाला

*

डोळ्यातल्या छबीला पुसलेच मी जरीही

आता फिरोनि दुःखा कुरवाळले कशाला

*

अंधार जात आहे वाटेतल्या उजेडी

मुक्तीतल्या मनाला मी बांधले कशाला

 – राधिका भांडारकर

ही गझल वाचल्यावर प्रथम असेच वाटले की ही एका असफल प्रेमाची वेदना असावी. अर्थात हे प्रेम एखाद्या मित्रावरचे असेल, अथवा मैत्रिणीवरही  असू शकते. शिवाय प्रेमाचे रंगही वेगळे असतात. प्रेम म्हणजे प्रीत. प्रेम म्हणजे एखाद्या व्यक्तीविषयी वाटणारा लोभ, ओढही असू शकते .शिवाय प्रेमात देवाणघेवाण अपेक्षित असते ती जर नसेल तर असे प्रेम एकतर्फी असू शकते आणि ते मनाला वेदना देणारे ठरू शकते असा काहीसा सूर या गझलेत नक्कीच जाणवतो. हा स्वतः कवयित्रीचा अनुभव असेल किंवा तिच्या सहवासातल्या  एखाद्या व्यक्तीविषयीचं कवीने टिपलेलं मनही असू शकतं.

मतल्यातच कवयित्री म्हणते

अपराध काय माझा भांबावले कशाला वाटेतल्या रिपुंना ओवाळले कशाला…

मी प्रेम केलं हा काय माझा अपराध आहे का? जरी ते सफल झालं नाही तरी मला सैरभैर होण्याची काय गरज आहे? या माझ्या असफल प्रेमाबाबत मला सल्ला देणारे अनेक भेटले. वरवर मला ते चांगले वाटायचे, खरे वाटायचे म्हणून मी त्यांना त्यावेळी मानही दिला. पण त्याही बाबतीत माझी निराशाच झाली ते केवळ हितशत्रूच होते आणि त्यांना मी विनाकारणच महत्त्व दिले असे आता वाटते.

इथे भांबावले हे क्रियापद मनाच्या सैरभैरतेची जाणीव देते आणि ओवाळले म्हणजे महत्त्व दिले याअर्थी असावे.

नव्हते कधीच माझे ते दूर ठेवले मी कळले जरी मला हे मी त्रासले कशाला

मला पक्कं माहित होतं की ज्याची मी मनी ओढ धरली होती ती व्यक्ती माझ्यासाठी कधीच असणार नव्हती आणि म्हणूनच मी त्याही वेळेला जाणून बुजून त्या व्यक्तीला दूरच ठेवले होते. माझ्या मनाची तशी पूर्ण तयारी होती मग आता त्या नकारात्मकतेचा मी कशाला त्रास करून घेऊ?

नाहीच घेणार

हे त्यामागचं अव्यक्त उत्तरही या पंक्तीत जाणकार वाचकाला सहज मिळून जातं.

वेडातल्या स्मृतींना केव्हाच दूर केले आता उगा उजाळी पाणावले कशाला..

काळ कोणासाठी थांबत नाही तो पुढे वाहतो शिवाय काळाबरोबर भावनाही स्वाभाविकपणे बोथट होतात पण असा एखादा क्षण निवांतपणे सहज मनावर रेंगाळतो तो असतो आठवणींचा. पण मनावर ताबा मिळवण्यासाठी कवयित्री पुन्हा पुन्हा म्हणते !”छे! आता कशाला त्या आठवणी? वेड्या, अनघड, अजाण वयातलं ते सारं काही केव्हाच पुसून टाकलय्  मग आता पुन्हा कशापायी त्यात गुंतून उदास व्हायचं?

डोळ्यातल्या छबिला पुसलेच मी जरीही आता फिरोनी  दुःखा कुरवाळले कशाला

आता त्या व्यक्तीचा चेहराही मला आठवत नाही इतका काळ व्यथित झाला आहे मग आता गेल्या गोष्टीची खंत कशासाठी बाळगायची?

या शेरातल्या दोन पंक्ती कवयित्रीच्या मनाचा एक ठाम कल व्यक्त करतात.

आता फिरोनी दुःखा कुरवाळले कशाला या त्यांनी स्वतःच्या मनाला विचारलेल्या प्रश्नातच एक उत्तर दडलेलं आहे …आता सगळंच पुसलंय आणि भूतकाळाविषयी मला जराही खेद वाटत नाही.

अंधार जात आहे वाटेतल्या उजेडी मुक्तीतल्या मनाला मी बांधले कशाला

आता आयुष्यातला तो अंधकार जाऊन वाटा  प्रकाशमय झाल्या आहेत. यातला दडलेला अर्थ असा आहे की स्वतःची चूक समजल्यामुळे आता आयुष्याचा पट लख्ख झाला आहे आता त्या सर्वांतूनच मी मुक्त आहे मग का मी माझं मन अजूनही त्या गतस्मृतींत गुंतवून ठेवू? पुन्हा यातलं अलिखित उत्तर… मी आता गुंतून राहणारच नाही, कारण आता मी या साऱ्यातून कधीच मुक्त झाले आहे.

याच गझलेला आणखी एका वेगळ्या अर्थातही  पाहता येईल.

सहजीवनात, आपल्या जोडीदाराविषयी आपल्या काही अपेक्षा किंवा कल्पना असतात आणि आता मागे वळून पाहताना कवयित्रीला वाटत आहे की अशा कल्पना, अपेक्षा बाळगणे काही चुकीचे होते का? कदाचित या कल्पनांच्या निर्मितीमागे आपल्या सभोवतालची माणसेच असतील ज्यांच्या सांगण्यामुळे आपण प्रवृत्त होत गेलो. आता मात्र वाटत आहे की त्यांचं आपण कां  ऐकलं?

खरं म्हणजे जे कधीही घडू शकणार नव्हतं, बदलू शकणार नव्हतं त्या  सहजीवनाविषयीच्या कल्पना बाळगून आपण कां त्रास करून घेतला? आता आपण मनातून काढून टाकलेत ते विचार मग तरी कधी कधी डोळे का पाणावतात?

जे जीवनाचं चित्र रेखाटलं होतं ते प्रत्यक्षातून आता पुसूनच टाकले आहे मग त्याच त्याच विचाराने पुन्हा पुन्हा का खेद करायचा?

आता आयुष्याच्या अशा टप्प्यावर आहोत की मन स्थिर आहे, स्वीकृत आहे. कदाचित तो अविचार असेल, अविवेकी बुद्धीतून ते उपजलं असेल पण आता या साऱ्या कल्पना, अपेक्षांच्या पलीकडे मन गेले आहे, आता ते मुक्त आहे. आणि या मुक्ततेतच मला राहायचं आहे

राधिका भांडारकर यांची ही गझल वरवर जरी व्यथित मनाची कहाणी वाटत असली तरी वास्तवात ती तशी नाही हे विचारांती जाणवते. कवयित्रीचं एक कणखर आणि ठाम मन त्यामागे असल्याचं जाणवतं आणि ते अत्यंत सकारात्मक आहे. “झालं गेलं विसरून जावे आणि पुढे जावे” असा एक सुरेख संदेश त्यांनी यातून दिला आहे. जीवन हे वर्तमानात जगावे. भूतकाळाच्या वेदनेची सावली त्यावर कशाला पडू द्यायची असा एक स्थिर मनाचा विचार त्यांच्या या गझलेत दडलेला आहे आणि म्हणूनच ही गझल मनाला भावते. पटकन “वा!” अशी दाद दिली जाते.

राधिका भांडारकर यांची ही गझल आनंदकंद वृत्तात बांधलेली आहे मतला आणि चार शेर अशी या गझलेची बांधणी आहे. कशाला हा रदीफ आहे आणि भांबावले, ओवाळले, त्रासले, पाणावले, कुरवाळले,बांधले या कवाफी  गझलेची खयालयात उत्तमपणे राखतात. खरोखरच एक छान अर्थ देणारी मनावर रेंगाळणारी अशी ही सुरेख गझल… मुक्त

© सुश्री अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मम्मी म्हणा, मदर म्हणा,— ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर ☆

?  वाचताना वेचलेले ? 

☆ मम्मी म्हणा, मदर म्हणा,— ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

मम्मी म्हणा, मदर म्हणा,

आई शब्दात जीव आहे.

*

पिता म्हणा, पप्पा म्हणा,

बाबा शब्दात जाणीव आहे.

*

सिस्टर म्हणा, दीदी म्हणा, 

ताई शब्दात मान आहे.

*

ब्रो म्हणा, भाई म्हणा,

दादा शब्दात वचक आहे.

*

फ्रेंड म्हणा, दोस्त म्हणा,

मित्रा शब्दात शान आहे.

*

रिलेशन म्हणा, रिश्ता म्हणा,

नातं शब्दात गोडवा आहे.

*

हाय म्हणा, हॅलो म्हणा,

हात जोडणे संस्कार आहे.

*

सर म्हणा, मॅडम म्हणा,

गुरु शब्दात अर्थ आहे.

*

ग्रँड पा,  ग्रँड मा  

या शब्दात काहीच मजा नाही,

आजोबा आणि आजी 

यासारखे सुंदर नाते जगात नाही.

*

गोष्टी सर्व सारख्याच आहेत, 

पण फरक फार अनमोल आहे.

*

‘अ’  ते  ‘ज्ञ’  शब्दात ज्ञानाचे भांडार आहे…

म्हणून मराठीत आदर जास्त आहे.

संग्राहिका : सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ तुझ्या रंगात… ☆ सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆

सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर

? कवितेचा उत्सव ?

तुझ्या रंगात ☆ सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆

पाहिले मी तुला अन मनात रंग सांडले

काळजात माझ्या कधीच मी तुला रे मांडले

*

भाव तुझ्या डोळ्यातून बरसले चिंब असे

होऊनी मी गेले तुझी कळले ना मला कसे ?

*

जवळून तू जाताना , हळुवार मत्त गंध

गंधाळून मन हे माझे, तुझ्यासाठी धुंद-फुंद

*

रंगात तुझ्या रंगूनी जाहले मी वेडीपिशी

ऐकताच मुरलीरव मन रमले तुजपाशी

*

आतुरल्या या मनास तव संगतीची आस

क्षणोक्षणी इथे तिथे रात्रंदिन तुझेच भास

© वृंदा (चित्रा) करमरकर

सांगली

मो. 9405555728

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ – विसावा… – ☆ सौ. रेखा दयानंद हिरेमठ ☆

सौ. रेखा दयानंद हिरेमठ

? कवितेचा उत्सव ?

☆ – विसावा… – ☆ सौ. रेखा दयानंद हिरेमठ

थांबला तो संपला असं जरी असलं

तरी त्या थांब्यावर थोडं विसावून

स्वतःला वेगळ्या चश्म्यातून पहावे

 

आयुष्याच्या प्रश्नपत्रिकेची

अद्ययावत करून उत्तरपत्रिका

व्हावे खुश स्वतः वरच बेफाम

सैल सोडावा कधीतरी स्वतःचा लगाम

 

आयुष्याच्या गणिताची

  नसतात साचेबद्ध उत्तरे

इथे लयलूट करती

 आशेची विविध सुगंधी अत्तरे

 

काय कमावले काय गमवले

ह्या काथ्याकूटात न रमावे

 

अगदी किरकोळ सुखालाही

बंदीस्त करून मनाच्या कुपीत

आपल्या जिवन गाण्याला द्यावे

आपल्याच मनाचे संगीत🎤🎶

🥰दEurek(h)a 😍

🥰दयुरेखा😍

© सौ. रेखा दयानंद हिरेमठ

सांगली

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆– “नवा हुंकार…” – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – “नवा हुंकार– ? ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

दगडातील मार्दवता

कलाकृतीत जन्मा येते

तेंव्हा ती सुयोग्य  रचना

आपणाशी संवाद  साधते …. 

*

संवाद  असा जो मानवाचा

मनाचाच आरसा असतो

दगडामधील कणाकणातुन 

 नवाच मग हुंकार जन्मतो …. 

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ऋतूचक्र… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆ ऋतूचक्र☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

उन्हाळा, पावसाळा अन् हिवाळा,

ऋतूंच्या पायात घातला वाळा !

*

रुम झुम करीत पदरव येई,

जेव्हा येतो मनी उन्हाळा!

झळा लागती मना उन्हाच्या,

शांत करीत असे ओला वाळा!…१

*

पावसाची सर जेव्हा येई,

वळीव गारवा आणतसे !

तप्त मातीवर पाणी शिंपित,

थंडावा तो देत असे !….२

*

चाहूल लागे वर्षेची,

मोर मनीचा करतो नाच!

त्याची केका रानी गर्जे,

मोर पिसारा फुलवी हाच!….३

*

श्रावणधारा येती सरसर,

मनास मिळे तेव्हा उभारी!

तालावर नाचे मन मयूर,

ओली होई सृष्टी सारी !…४

*

वर्षे मागून हळूच वाही,

थंडीची ती गार हवा !

शेकोटीची घेऊन ऊब ,

मिळत असे आनंद नवा!…५

*

तीन ऋतूंचे गाणे मनात,

सातत्याने गुंजन घाली !

त्याच्या तालावर सृष्टीचे,

कालबद्ध नर्तन चालू राही!….६

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares