मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #229 ☆ प्रेम दिगंतर… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 229 ?

प्रेम दिगंतर ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

लोहमार्गाचे रूळ समांतर

बोलत नाहीत कधी अवांतर

*

जरी उभी तू पल्याड नदीच्या

दोन मनातील प्रेम दिगंतर

*

नजरेतून तू जरी बोलली

करतील डोळे हे भाषांतर

*

नदी मिळाली आज खाडीला

वाढत गेले भरपूर अंतर

*

चंद्र आभाळी कुठे थांबला

वाट पहाते वेळ ही कातर

*

टाकू का मी गादी म्हणालो

मला म्हणाली काळीज अंथर

*

तिच्यात नाहीच कुठे कस्तुरी

तिच्या भोवती तरीही अत्तर

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ गझल ☆ श्री विनायक कुलकर्णी ☆

श्री विनायक कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ? 

☆ गझल ☆ श्री विनायक कुलकर्णी ☆ 

द्या मला आनंद देतो मी सुपारी

मागतो माझ्यात थोडीशी उभारी

*

या नभाचा केवढा विस्तार सारा

वाटते मीही भरावी ना भरारी

*

टाकले होते सुखासाठीच जाळे

दुःख फसले जाहलो कच्चा शिकारी

*

बासरी प्रेमातली झाली मुकी अन

स्वागताची वाजली नाही तुतारी

*

गोड होते बोलले सारे तरीही

झाकल्या होत्या कटांच्या रे कट्यारी

© श्री विनायक कुलकर्णी

मो – 8600081092

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ माहेरपण… – कवी :सौ. वैष्णवी कुलकर्णी ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ माहेरपण… – कवी :सौ. वैष्णवी कुलकर्णी ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित

स्वर्गाची तुमच्या महती

आम्हाला नका सांगू देवा,

भोगून पहा माहेरपण

नक्कीच कराल आमचा हेवा.

 

मनसोक्त काढलेली झोप आणि

तिच्या हातचा गरम चहा,

सुख म्हणजे काय असतं हो ?

देवा एकदा अनुभवून पहा.

 

नेलेल्या एका बॅगेच्या

परतताना चार होतात,

तिच्या हातचे अनेक जिन्नस

अलगद त्यात स्वार होतात.

 

नेऊन पहा तिच्या हातच्या

पापड-लोणचे, मुरांबे-चटण्या,

सगळे मिळून स्वर्गात

कराल त्यांच्या वाटण्या.

 

शाल तिच्या मायेची

एकदा पहा पांघरून,

अप्रूप आपल्याच निर्मितीचं

पाहून जाल गांगरून.

 

लाख सांगा देवा हा

तुमच्या मायेचा खेळ,

तिच्या मायेच्या ओलाव्याचा

बघा लागतो का मेळ ?

 

फिरू द्या, तिचा कापरा हात

एकदा तुमच्या पाठीवरून,

मायापती देवा तुम्ही !

तुम्हीही जाल गहिवरून.

 

आई नावाचं हे रसायन

कसं काय तयार केलंत ?

लेकरासाठीच जणू जगते

सगळे आघात झेलत.

 

भोगून पहा देवा एकदा

माहेरपणाचा थाटमाट,

पैज लावून सांगते

विसराल वैकुंठाची वाट.

 

माहेरपण हा केवळ

शब्द नाही पोकळ,

अनुभूतीच्या प्रांतातलं

ते कल्पतरूचं फळ.

 

डोळ्यात प्राण आणून

वाट बघणारी आई,

लेकीसाठी ह्या शिवाय

दुसरा कोणताच स्वर्ग नाही.

 

कवयित्री :सौ. वैष्णवी कुलकर्णी

प्रस्तुती : सौ. सुचिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ महादेव शिवशंकर ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– महादेव शिवशंकर – ? ☆ श्री आशिष  बिवलकर ☆

सर्व देवांच्यात सर्वश्रेष्ठ,

असती हर हर महादेव!

सृष्टीचा तारणहार,

शिवस्तुती करावी सदैव! …..१

 

पत्नी पार्वती, 

पुत्र कार्तिकेय -गणपती ! 

पुत्री अशोक सुंदरी, 

भक्तांच्या हाकेला धावती!….२

 

शिरी चंद्रकोर धारण, 

हातात त्रिशूल डमरू! 

नंदीवर होई स्वार,

भोलेनाथ बाबा अवतरू! …..3

 

जटातून वाहे गंगा ,

म्हणती कुणी गंगाधर!

कंठात हलाहल प्राशन करून

नीळकंठ परमेश्वर ! …..४

 

चिताभस्म नित्य लावे,

कंठाभोवती वासुकी नाग!

व्याघ्र चर्मावर बैसे,

त्रिकाळाची असे जाग!   …..५

   

त्रिनेत्र सामर्थ्य शिवाचे ,

पाही भूत ,भविष्य, वर्तमान!

तांडव नृत्य करून, 

नृत्यात नटराज सामर्थ्यवान! …..६

 

त्रिदल बेल वाहता, 

होई भोलेनाथ प्रसन्न!

मनोप्सित वर देऊन,

भक्तांना करी धन्य! …..७

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ माझी माय मराठी… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆

सुश्री दीप्ती कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

माझी माय मराठी… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆

काव्यप्रकार (भावगीत)

(शब्दसेतू साहित्य मंच, पुणे महाराष्ट्र राज्य आयोजित राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धा पुरस्कार प्राप्त कविता)

माझी माय मराठी

अभिमाने येते ओठी ||धृ||

*

शारदेस मी आळविते

अन वीणा झंकारिते

आगमने‌ हर्षित होते

नतमस्तक मी बनते ||१||

*

कवितेसह हर्षे‌ मेते

भारुड,गवळण गाते

पोवाड्यातुनी ही रमते

ओव्यामधूनी ती सजते ||२||.    

*

विश्वात कथेच्या फुलते

शब्दालंकारे खुलते

वास्तवास न्याय ही देतै

आविष्कारातुनी नटते ||३||

*

कधी कादंबरी ही बनते

अन‌ शब्दांसह डोलते

भेदक,वेधक ती‌ठरते

सकलांना‌काबिज करते ||४||

*

लालित्ये ही मांडिते

संवादानी उलगडते

तेजोन्मेषे नि पांडित्ये

मोहिनी जणू घालिते‌ ||५||

*

सारस्वतासी जी स्फुरते

नाट्यातुनी ही प्रगटते

नवरसातुनी दर्शविते

विश्वाला स्पर्शही करते ||६||

© सुश्री दीप्ती कोदंड कुलकर्णी

हैदराबाद.

भ्र.९५५२४४८४६१

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 164 ☆ अभंग… कृष्णप्रभू.!! ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 164 ? 

☆ अभंग… कृष्णप्रभू.!! ☆ महंत कवी राज शास्त्री ☆/

जगाचा चालक, जगाचा मालक

जगाचा पालक, कृष्णप्रभू.!!

*

कर्म करण्याचा, सल्ला दिला ज्याने

विधी प्रामुख्याने, एकभक्ती.!!

*

त्याचे मी होवावे, त्यातची रमावे

तयाचे ऐकावे, लीलास्तोत्र.!!

*

कवी राज म्हणे, अंधार निघावा

मजला दिसावा, माझा कृष्ण.!!

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ चर्पट पंजरिका स्तोत्र : मराठी भावानुवाद – रचना : आदि शंकराचार्य – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

चर्पट पंजरिका स्तोत्र : मराठी भावानुवाद – रचना : आदि शंकराचार्य – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

दिनमपि रजनी सायं प्रात: शिशिरवसन्तौ पुनरायात: ।

काल: क्रीडति गच्छत्यायुस्तदपि न मुच्चत्याशावायु: ।। १ ।।

भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते ।

प्राप्ते संनिहिते मरणे नहि नहि रक्षति डुकृञ् करणे ।। (ध्रुवपदम्)

*

रात्रीनंतर दिवस येतसे दिवसानंतर रात्र

ऋतूमागुती ऋतू धावती कालचक्र अविरत

काळ धावतो सवे घेउनी पळे घटिका जीवन

हाव वासना संपे ना जरीआयुष्य जाई निघुन ॥१॥

भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते ।

काळ येता समीप घोकंपट्टी रक्षण ना करते ॥ध्रु॥

*

अग्रे वह्नि: पृष्ठे भानू रात्रौ चिबुकसमर्पितजानु: ।

करतलभिक्षा तरुतलवासस्तदपि न मुच्चत्याशापाश: ।। २ ।।

भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते ।।

*

पुढूनी अग्नी  दिवसा मागे भास्कर देहा भाजुन घेशी

हनुवटी घालुन गुढघ्यामध्ये थंडीने  कुडकुडशी

भिक्षा मागुन हातामध्ये तरुच्या खाली तू पडशी

मूढा तरी आशेचे जाळे गुरफटुनीया धरिशी ॥२॥

भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते ।

*

यावद्वित्तोपार्जनसक्तस्तावन्निजपरिवारो रक्त: ।

पश्चाद्धावति जर्जरदेहे वार्तां पृच्छति कोऽपि न गेहे ।। ३ ।।

भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते ।।

*

सगेसोयरे साथ देउनी मागुती पुढती घुटमळती

हाती तुझिया जोवर लक्ष्मी सुवर्णनाणी खणखणती

धनसंपत्ती जाता सोडुन वृद्ध पावले डळमळती

चार शब्द बोलाया तुजशी संगे सगे कोणी नसती ॥३॥

भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते ।

*

जटिलो मुण्डी लुंचितकेश: काषायाम्बरबहुकृतवेष: ।

पश्यन्नपि च न पश्यति लोको ह्युदरनिमित्तं बहुकृतशोक: ।। ४ ।।

भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते ।।

*

जटाजूटधारी मुंडित कुंतल करुनीया कर्तन

कषायवर्णी अथवा नानाविध धारण करिशी वसन

नखरे कितीक तरी ना कोणी पर्वा करिती  तयाची

जो तो शोक चिंता करितो अपुल्याच उदरभरणाची ॥४॥

भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते ।

*

भगवद्गीता किंचिदधीता गंगाजल लवकणिकापीता ।

सकृदपि यस्य मुरारिसमर्चा तस्य यम: किं कुरते चर्चाम् ।। ५ ।।

भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते ।।

*

मद्भगवद्गीता करता मनापासुनीया पठण

किंचित असेल केले जरी  गंगाजलासिया प्राशन

एकवार जरी श्रीकृष्णाशी अर्पण केले असेल अर्चन

यमधर्मा ना होई  धाडस करण्यासी त्याचे चिंतन ॥५॥

*

भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते ।

अंगं गलितं पलितं मुण्डं दशनविहीनं जातं तुण्डम् ।

वृद्धो याति गृहीत्वा दण्डं तदपि न मुच्चत्याशा पिण्डम् ।। ६ ।।

भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते ।।

*

उरले नाही देहा त्राण केशसंभार गेला पिकुन

मुखात एकही दंत न शेष गेले बोळके त्याचे बनुन

जराजर्जर देहावस्था फिरण्या दण्डाचे त्राण

लोचट आशा तरी ना सोडी मनासिया ठेवी धरुन ॥६॥

भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते ।

*

बालास्तावत्क्रीडासक्तस्तरुणस्तावत्तरुणीरक्त: ।

वृद्धस्तावच्चिन्तामग्न: पारे ब्रह्मणि कोऽपि न लग्न: ।। ७ ।।

भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते ।।

*

लहानपण मोहवी सदैव खेळण्यात बागडण्यात

यौवन सारे व्यतीत होते युवती स्त्री आसक्तीत

जराजर्जर होता मग्न विविध कितीक चिंतेत

परमात्म्याचे परि ना कोणी करिते कधीही मनचिंतन ॥७॥

भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते ।

*

पुनरपि जननं पुनरपि मरणं पुनरपि जननीजठरे शयनम् ।

इह संसारे खलु दुस्तारे कृपयापारे पाहि मुरारे ।। ८ ।।

भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते ।।

*

पुनः पुनश्च  जन्म घेण्या मातेचा गर्भावास

पुनः पुनश्च मृत्यू येई जीवनास संपविण्यास

दुष्कर अपार भवसागर हा पार तरुनिया जाण्यास

कृपादृष्टीचा टाक मुरारे कटाक्ष मजला उद्धरण्यास ॥८॥

भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते ।।

*

पुनरपि रजनी पुनरपि दिवस: पुनरपि पक्ष: पुनरपि मास: ।

पुनरप्ययनं पुनरपि वर्षं तदपि न मुच्चत्याशामर्षम् ।। ९ ।।

भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते ।।

*

दिवस मावळे उदय निशेचा पुनरपि मग येई दिवस

पुनरपि येती जाती पुनरपि पक्षापश्चात मास

अयना मागुन अयने येती वर्षामागून येती वर्षे

कवटाळुन तरी बसशी  मनात आशा जोपासुनीया ईर्षे ॥९॥

भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते ।।

*

वयसि गते क: कामविकार: शुष्के नीरे क: कासार: ।

नष्टे द्रव्ये क: परिवारो ज्ञाते तत्त्वे क: संसार: ।। १० ।।

भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते ।।

*

येता वयास ते वृद्धत्व कसला कामविकार

शुष्क होता सारे तोय कसले ते सरोवर

धनलक्ष्मी नाश पावता राही ना मग परिवार

जाणुनी घे या तत्वाला असार होइल संसार ॥१०॥

भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते ।।

*

नारीस्तनभरनाभिनिवेशं मिथ्यामायामोहावेशम् ।

एतन्मांसवसादिविकारं मनसि विचारय बारम्बारम् ।। ११ ।।

भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते ।।

*

पुष्ट उरोज खोल नाभी नारीचे ही माया

मोहविण्यासी नर जातीला आवेश दाविती त्या स्त्रिया

असती ते तर मांस उतींचे विकार फुकाचे भुलवाया

सुज्ञ होउनी पुनःपुन्हा रे विचार कर ज्ञानी व्हाया ॥११॥

भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते ।।

*

कस्त्वं कोऽहं कुत आयात: का मे जननी को मे तात: ।

इति परिभावय सर्वमसारं विश्वं त्यक्त्वा स्वप्नविचारम् ।। १२ ।।

भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते ।।

*

कोण मी असे तूही कोण अनुत्तरीत अजुनी हे प्रश्न

जननी कोण  ठाउक नाही असे पिता वा तो कोण

विचार विकार जीवनातले असती भासमय स्वप्न

जीवन आहे असार सारे जाणुनी होई सज्ञान ॥१२॥

भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते ।।

*

गेयं गीतानामसहस्त्रं ध्येयं श्रीपतिरूपमजस्त्रम् ।

नेयं सज्जनसंगे चित्तं देयं दीनजनाय च वित्तम् ।। १३ ।।

भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते ।।

*

नित्य पठण करी भगवद्गीता तथा विष्णुसहस्रनाम

श्रीपाद रूपाचे मनी निरंतर करित रहावे रे ध्यान 

साधूसंतांच्या सहवासी करी रे चित्तासी मग्न

दीनदुबळ्यांप्रती धनास अपुल्या करित रहावे दान ॥१३॥

भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते ।।

*

यावज्जीवो निवसति देहे कुशलं तावत्पृच्छति गेहे ।

गतवति वायौ देहापाये भार्या बिभ्यति तस्मिन्काये ।। १४ ।।

भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते ।।

*

काया जोवर धरून आहे अपुल्या ठायी प्राण

सगे सोयरे कुशल पुसती आपुलकीचे ध्यान

जीव  सोडता देहासि तो पतन होउनि निष्प्राण

भये ग्रासुनी भार्या ही मग जाई तयासिया त्यागून ॥१४॥

भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते ।।

*

सुखत: क्रियते रामाभोग: पश्चाद्धन्त शरीरे रोग: ।

यद्यपि लोके मरणं शरणं तदपि न मुच्चति पापाचरणम् ।। १५ ।।

भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते ।।

*

काल भोगतो सुखात असता कामात उपभोगात

तदनंतर किती व्याधी ग्रासत पीडायासी देहात

शरण जायचे मरणालागी अखेर देहत्यागात

तरी न सोडुनी मोहा जगती सारे पापाचरणात ॥१५॥

भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते ।।

*

रथ्याचर्पटविरचितकन्थ: पुण्यापुण्यविवर्जितपन्थ: ।

नाहं न त्वं नायं लोकस्तदपि किमर्थं क्रियते शोक: ।। १६ ।।

भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते ।।

*

चार दिसांचे चंचल जीवन नशिबी चादर चिखलाची

पंथा भिन्न अनुसरले चाड मनी पापपुण्याची

नसेन मी नसशील ही तू नाही शाश्वत काहीही

शोक कशासी फुकाच करिशी जाणुनी घ्यावे ज्ञानाही ॥१६॥

भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते ।।

*

कुरुते गंगासागरगमनं व्रतपरिपालनमथवा दानम् ।

ज्ञानविहीन: सर्वमतेन मुक्तिं न भजति जन्मशतेन ।। १७।।

भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते ।।

*

गंगास्नान करूनिया  वा व्रतवैकल्यांचे पालन

दीनदुबळ्या केलेसी धन जरी अमाप तू दान

कर्मबंधा मुक्ती नाही जाहले जरी शतजन्म

मोक्षास्तव रे एकचि दावी मार्ग तुला ब्रह्मज्ञान ॥१७॥

भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते ।।

*

॥ श्रीशंकराचार्यविरचितं चर्पट पंजरिका स्तोत्रं सम्पूर्णम् ॥

*

॥ इति श्रीशंकराचार्यविरचित निशिकान्त भावानुवादित चर्पट पंजरिका स्तोत्र सम्पूर्ण ॥

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “की जरा बरं वाटतं…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

श्री कमलाकर नाईक

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ “की जरा बरं वाटतं…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

जाताना बरोबर काही नेणार नाही!

हे जरी सत्य असलं तरी…

खात्यावर बऱ्यापैकी शिल्लक असली की जरा बरं वाटतं!

 

वाटेत कुणी दीनदुबळा, असहाय दिसला की… चार नाणी खिशात असली की ती त्याच्या हातावर टेकवताना जरा बरं वाटतं!

 

हॉटेलिंगची हौस फिटली असली तरी….

मित्र भेटला तर त्याच्याबरोबर गप्पा मारायला हॉटेलात बसण्याइतपत चार पैसे केव्हाही जवळ असले की जरा बरं वाटतं!

 

कपडालत्ता, दागदागिने नकोसे वाटू लागले तरी… मुलाबाळांसाठी, नातवंडांसाठी मनाजोगा खर्च करण्याइतकी ऐपत असली की जरा बरं वाटतं!

 

बरोबर काही न्यायचं नसलं तरी….

शेवटपर्यंत हातात चार पैसे खुळखुळत असले की, जरा बरं वाटतं!

 

“साठी पार केलीत? अजिबात वाटत नाही!” असं कुणी म्हटलं की जरा बरं वाटतं!

 

मित्रांसोबत रात्रभर पार्टी केली तरी…

घरी कुणी तरी आपली वाट पाहतंय हे जाणवलं की, जरा बरं वाटतं!

 

जाताना बरोबर काहीच जाणार नाही, हे माहीत असलं तरी…

आहे तोपर्यंत जे जे शक्य, ते उपभोगून घेतलं की, जरा बरं वाटतं!

 

पुढे दवा, डॉक्टर काय वाढून ठेवलंय माहीत नाही, तरी…

दोन चार एफडी, एखादी पॉलिसी असली की, जरा बरं वाटतं!

 

साठीनंतरही आपण मुलाबाळांना भार नाही, माझं मला पुरेसं आहे, असं म्हणण्याइतपत पुंजी गाठीशी असली की, जरा बरं वाटतं!

 

मी मेल्यावर मला काय करायचंय असं म्हटलं तरी…

जाताना दुसऱ्यासाठी काही शिल्लक ठेवून गेलं की, जाताना जरा बरं वाटतं!

 

गरजेपुरता संचय कर हे तत्त्वज्ञान ऐकायला बरं वाटलं तरी…

भविष्यात कशाकशाची गरज पडेल, हे सांगता येत नाही!

म्हणून…..

सगळं काही इथंच रहाणार,

जाताना काही आपल्याबरोबर नेता येणार नाही, हे जरी खरं असलं तरी…

अंगात ऊब आहे तोपर्यंत खिशालाही ऊब असली की,

जरा बरं वाटतं! जरा बरं वाटतं!

 

लेखक:अज्ञात

संग्राहक – श्री कमलाकर  नाईक

फोन नं  9702923636

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ अमृतवाणी… ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर

सुश्री अरुणा मुल्हेरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ अमृतवाणी… ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

(दिंडी वृत्त. मात्रा ९ + १०)

(मायमराठी काव्य स्पर्धेतील उत्कृष्ट वृत्तबद्ध  काव्य पुरस्कार  प्राप्त  कविता)

मधुर भाषा ही मराठीच महान

किती सांगू का धरावा अभिमान

*

उगम भाषेचा संस्कृतात दिसतो

शब्द अपभ्रंशी प्राकृतात असतो

*

ज्ञानदेवांनी कथियले गीतेस

ज्ञान दिधले ते सामान्य जनतेस

*

नामदेवांची वाणी अभंगात

वीण भक्तीची भजन कीर्तनात

*

संत काव्यासह पंत काव्य थोर

बाज रचनेचा करी भावविभोर

*

शाहिरांचे हो ऐकुनी पवाडे

स्फूर्ति संचरली उघडली कवाडे

*

लावणीचे ते रूप मनोहारी

साज शब्दांचा घाव मना भारी

*

श्लेश अनुप्रासे यमक अलंकारे

रूप खुलते हो तिचे बहू न्यारे

*

पिढी आता का बदलली विचारे

स्वैर झाले रे शब्द शब्द सारे

*

मुक्त वावरती नको छंद मात्रा

नको नियमांचा जाच कसा गात्रा

*

पानिपत स्वामी अन् ययाती अमर

ना गणती मुळी सारस्वता अक्षर

*

नाट्यसंपद ही रंगभुमी अमुची

गाजलेली ती गंधर्व कुळीची

*

मराठी बोली वळणे तिला फार

कधी मोरांबा मिरचीचा अचार

*

जपा जनहो हा मराठीच बाणा

नको परभाषा मराठीच जाणा

*

गौरवाचा दिन आज मराठीचा

वाढदिन करुया शिरवाडकरांचा

(टीप~चौथ्या कडव्यात,दुसर्‍या ओळीत एका मात्रेची सूट घेतली आहे)

© सुश्री अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆– “निसर्गाचे लेणे…” – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – “निसर्गाचे लेणे– ? ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

देखण्या  फुलांनी

किती हे फुलावे ?

झाडाचे सौंदर्य 

किती वर्धीत व्हावे !

*

जणू अंथरे सृष्टी

मखमाली पाती 

विखुरले तयावर

शुभ्र धवल मोती

*

जवळ जाऊ पहाता

दरवळे सुगंध

केवळ पहाताच

दृष्टी सुखात धुंद

*

निरपेक्ष देत जाणे

निसर्गाचेच  लेणे

अवलंबून  आहे

शिकणे न शिकणे

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares