सुश्री प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # 221
☆ फुलवात ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆
☆
जेव्हा केव्हा आठवते मी
माझ्या कवितेचा उगम
तेव्हा मला आठवतो,
काॅलेज मधला प्रवेश –
कुणीतरी दिलेली
गावठी गुलाबाची फुलं,
सुगंधी असूनही
मी फेकून दिलेली!
रोझ डे वगैरे
तेव्हा नव्हता साजरा होत !
पण नव्हतं आवडलं,
कुणीही असं व्यक्त होणं!
मग त्यानं एक दिवस,
ग्रंथालयात गाठलं,
कुसुमानिल नावाचं
पुस्तक हाती दिलं!
“हे वाचलं की कळेल,
प्लॅटोनिक लव,
घेता येईल पत्रांमधून वाङमयाची चव!”
असं काहीसं म्हणाला.
फुलासारखं पुस्तक तेव्हा
नाकारता नाही आलं,
कवितेशी तेव्हाच तिथं
मग नातं जुळलं!
‘अनिल’ वाचले ,वाचले ‘बी’
वाचले भा.रा.तांबे
बालकवी,बोरकर आणि पद्या गोळे!
चाफ्याच्या झाडाशीही
तेव्हाच झाली मैत्री,
कवितेनंच जागवल्या मग
कितीतरी रात्री!
दरवळू लागल्या,
माझ्याही मनात काही ओळी,
चारदोन बाळबोध कविता
लिहिल्या त्या काळी!
ज्यानं देऊ केली फुलं,
अथवा भेटवली कविता,
तो नव्हता माझा मित्र
किंवा नव्हता शत्रू !
कवितेच्या प्रवासातला
तो एक वाटसरू !
हळव्या हायकू सारखे होते
काॅलेजचे दिवस,
त्याच हळव्या दिवसातला
हा कवितेचा ध्यास!
जेव्हा केव्हा आठवते मला
माझ्या कवितेची सुरुवात ,
मंदपणे जळत असते
मनात एक फुलवात!
☆
© प्रभा सोनवणे
संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈