मराठी साहित्य – पुस्तकावर बोलू काही ☆ “मंतरलेले दिवस” – लेखक – ग. दि. माडगूळकर ☆ परिचय – सौ. अलका ओमप्रकाश माळी ☆

सौ. अलका ओमप्रकाश माळी

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “मंतरलेले दिवस” – लेखक – ग. दि. माडगूळकर ☆ परिचय – सौ. अलका ओमप्रकाश माळी ☆ 

मंतरलेले दिवस हे खरं तर गदिमा च संक्षिप्त आत्मचरित्र म्हणू शकतो.. अर्थात संक्षिप्त च.. कारण गदिमा हे येवढ्या छोट्या पुस्तकात सामावू शकत नाहीत.. गदिमा.. गदिमा.. म्हटल की आठवतात गीत रामायणाचे मनाला भिडणारे शब्द..पण गीत रामायण ही एक कलाकृती झाली. अशा शेकडो कलाकृतींमध्ये गदिमा स्वतःच नाव अजरामर करून गेलेले आहेत हे जाणवत ते हे मंतरलेले दिवस वाचताना.. गदिमा हे मराठी साहित्य सृष्टीला फक्त साहित्यच नाही तर चित्रपटसृष्टीलाही पडलेलं एक अभिजात स्वप्न.. ह्या स्वप्नाने मराठी माणसाला एक नवी ओळख दिली.. नवा संस्कार दिला.. येवढंच नाही तर मराठीचा झेंडा पार अटकेपार पोहचवला.. खरचं गदिमा.. सुधीर फडके ह्यासारखी माणसं म्हणजे दैवी अंशच म्हणावी लागतील ज्यांच्या वर सरस्वती मातेचा आशीर्वाद होता,.. लक्ष्मी काही काळ न्हवती पण त्याची कधी ह्या लोकांना पर्वा न्हवती, ते वेगळ्याच धुंदीत जगले आणि अजरामर झाले..असीम दारिद्र्य व अपार कष्ट अशा खडतर वाटेवर चालून सुद्धा गदिमांनी अनेक अजरामर असे मराठी चित्रपट दिले..त्यांच्या रूपाने मराठी साहित्य, तसेच चित्रपट सुष्टीला एक वैभवशाली पर्व दिले हे मात्र निश्चित..मंतरलेले दिवस ह्या पुस्तकात एकूण अकरा प्रकरणं आहेत आणि ह्यातल्या प्रत्येक प्रकरणातून गदिमांनी त्यांच्या जीवनाचा प्रवास उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केलाय..मंतरलेले दिवस हे पहिलंच प्रकरण.. आपल्याला अगदी खिळवून ठेवत..ह्यात वयाच्या सोळा सतरा वर्षातील गदिमा आपल्याला भेटतात..दक्षिण साताऱ्यातील कुंडल सारख्या छोट्याशा गावातील अनेक घटना वाचून आपण एकदम खिळून जातो..स्वातंत्र्यापूर्वी चा तो काळ आणि स्वातंत्र चळवळ अगदी शिगेला पोहचलेली.. अशातच आपण ही देशासाठी काही तरी केलं पाहिजे ह्या विचाराने गदिमा झपाटले आणि घर सोडलं आणि एका गांधी सेवसंघाच्या आश्रमात दाखल झाले पण तिथून लवकरच पळू काढला आणि भटकू लागले.. त्यात मॅट्रिक नापास झाले आणि अजूनच वाईट दिवस आले काही दिवस उदबत्या विकल्या.. अशा अपार कष्टातून जात असताना सुद्धा देशासाठी काहीतरी करायची उर्मी शांत बसू देत न्हवती..अशातच त्यांनी समवयस्क आणि समविचारी मंडळी सोबत घेऊन गावाबाहेरच्या एका पडक्या अंधाऱ्या मंदिरात त्यांनी एक अड्डा सुरू केला.. जवाहिराश्रम.. इथेच बसून ते अनेक देशभक्तीपर कविता, भाषण देऊ लागले लवकरच ते गुरुजी नावाने ओळखले जाऊ लागले.. देशार्थ जगेन | देशार्थ मरेन |  देशार्थ करीन.. सर्व दान अशा रचना बनू लागल्या.. आणि आपल्यात लेखनशक्ती आहे ह्याचा साक्षात्कार ही इथेच झाला..व्यायाम शाळा, प्रौढ शिक्षण असे अनेक उद्योग ह्या ग्रुप तर्फे केले जाऊ लागले.. घरी फक्त खायला जाण्या इतपत संबंध उरला..इथेच त्यांनी अनेक पोवाडे लिहिले.. शंकर निकम त्या पोवड्याना चाली देऊ लागला.. पण घरचे दारिद्य्र आणि गरिबी ह्यामुळे नोकरी शोधण्यासाठी हे सगळं सोडून.. कुंडल सोडून जाणं भाग होत.. पण कुंडल मधले हे दिवस वाचताना अंगावर शहारा येतो..त्यानंतर कोल्हापूर मधील हंस पिक्चर मधील चार वर्षांची नोकरी..HMV मधील व्यवहार हे सगळ ह्या लेखात वाचायला मिळत..ह्याचं काळात गदिमांच लग्न होत.. ते म्हणतात मुसलमान व्हायला आणि रोजाचा महिना यायला एकच गाठ पडली..लग्न झालं आणि कोल्हापूर चित्रपट धंदा बसला.. दोन वेळच्या जेवणाची ही भ्रांत..बायकोच्या माहेरी हून येणाऱ्या डब्यावर दिवस काढले.. अशातच गदिमाचे अनेक पोवाडे प्रसिद्ध झाले..इथेच सुधीर फडके साठे आणि मंडळी भेटली.. अनेक क्रांतिकारी प्रत्यक्ष संपर्कात आले.. काही तर ह्यांच्या छोट्याशा रूमवर राहिले.. हे अनेक असे रोमांचित करणारे किस्से पहिल्या भागात आहेत.. दुसऱ्या भागात गदिमा आणि त्यांना मिळालेला केंद्र सरकार साहित्य अकादमी पुरस्कार आणि तो घेण्यासाठी झालेली दिल्लीची वारी, बायकोचं आजारपण, बायको सोबत दिल्ली दर्शन तिथे भेटलेले मुस्लिम कुटुंब, त्या घरातील मुस्लिम स्त्रीशी झालेला परिचय.. तिचं आशीर्वाद देणं आणि अचानक तिची आत्महत्या.. अशा अनेक घटनांचा लेखाजोखा आपल्याला एक अज्ञात अंगुली लिहिते मध्ये वाचायला मिळते..त्यानंतर.. मोहरलेला कडुनिंब मध्ये गदिमांच्या कवी मनाचं दर्शन होत.. त्या काळी त्यांनी लिहिलेल्या अनेक कविता आणि त्यांच्या आठवणी म्हणजे मोहोरलेला कडुनिंब..त्यानंतर माझा यवन मित्र मध्ये एका मुस्लिम मित्राची ओळख आणि त्याने केलेला विश्वासघात वाचून आपण व्यथित होतो.. बामणाचा पत्रा.. मध्ये चित्रपट कथा लिहिण्यासाठी जेंव्हा निर्माते हात धुवून मागे लागतं तेंव्हा गदिमा पूण्या मुंबैतून पळ काढून माडगूळ ला येत.. येताना दोन चार मित्र सोबत असतच..माडगूळ मध्ये घरात त्यांचा पाय राहतच नसे.. शेतात केलेली खरतर गुरांसाठी केलेली एक झोपडी तिथे जाऊन राहिल्याशिवाय गदिमां ना काही सुचत नसे.. आणि ह्या झोपडीवर असलेल्या पत्र्या मुळेच अख्खा गाव ह्याला बामनाचा पत्रा म्हणून ओळखत असे.. गदिमा च वास्तव्य जो पर्यंत तिथे असे तोपर्यंत त्या जागेचे अगदी रूपच पालटून जाई.. ह्याचे अगदी मनोहारी वर्णन आपल्याला ह्या लेखात पाहायला मिळते..त्यानंतर.. पंतांची किन्हई..ह्यात किन्हई गाव.. तिथे लेखकाने घालवलेले दिवस.. त्या गावाचे सौंदर्य, पंचवटी तिथले अनुभव वाचलेच पाहिजेत असे आहेत…त्यानंतर वेडा पारिजात.. हा लेख मला खूप भावला का ते मात्र सांगत नाही कारण तुम्ही वाचणार आहातच.. पुढचा लेख.. औंधचा राजा.. ह्यात औंध संस्थान आणि तिथले कारभार ह्याची थोडक्यात पण सुंदर अशी माहिती आहे.. लुळा रस्ता हा पुढचा लेख.. ह्यात भेटते ती एक सामान्य भाजी विकणारी सखू.. आता तिने अख्खं एक प्रकरण व्यापल आहे म्हणजे काहीतरी खास नक्कीच असणारं आणि जे आहे ते स्तंभित करणारं आहे हे मात्र नक्की..तेंव्हा जरूर वाचा… पुढचा लेख.. नेम्या.. नेम्या हे लाडाच नावं.. पण ह्या मित्राने गदिमांवर केलेले निस्सीम प्रेम आणि मैत्री ह्याचं एक सुंदर उदाहरण म्हणजे नेम्या.. मैत्री, विश्वास ह्याच्या पलीकडची परिभाषा म्हणजे नेम्म्या.. आणि शेवट दिवा लावा कोणीतरी.. दिवा लावा कोणीतरी ही अंथरुणावर पडलेल्या गदिमांच्या वडिलांचे क्षीण आवाजात शब्द.. पण ते का म्हटलेत हे मात्र तुम्हाला पुस्तकातच वाचावे लागतील.. ह्या नंतरची काही पानं गदिमांचे चित्रपट, त्यांच्या कथा, कादंबरी आणि अजून लेखन साहित्यांची एक संक्षिप्त सूची आहे.. अगदी कोणत्या वर्षात कोणती कथा लिहिली हे ही इथे स्पष्टपणे कळते..

हे पुस्तकं वाचत असताना मला सतत जाणवलेल्या काही गोष्टी सांगते.. गरिबी, दारिद्र्य, अनेक संकट, कठीण परिस्थिती, उपाशी रहायला लागलं म्हणून वाटणारी खंत.. हे गदिमांच्या तोंडून आपल्याला कधीही ऐकायला मिळत नाही किंवा त्यांनी कुठे ही ह्याचं प्रदर्शन मांडलेले नाही.. कुठेही परिस्थिती ची तक्रार नाही.. जे दिवस आले ते आनंदाने जगले बास ही एकच गोष्ट सतत जाणवत राहते.. इतकी महान व्यक्ती जेंव्हा हातात झाडू घेऊन महारवाडा साफ केल्याचं अगदी अभिमानाने लिहून ठेवते तेंव्हा  जातीव्यवस्था वगैरे शब्द किरकोळ वाटू लागतात.. एक मुस्लिम मित्र चार पाच वर्षां च कठोर परिश्रम करून बनवलेले काम घेऊन पसार होतो तेंव्हा ही गदिमांची शांती ढळत नाही किंवा तोंडातून एकही उणा शब्द निघत नाही उलट त्यांना तो कधीतरी परत येईल ह्याचा विश्वास वाटतो.. तेंव्हा आपण स्तिमित होऊन जातो.. असे अनेक प्रसंग हे पुस्तकं वाचताना आपल्याला वारंवार येतात.. अर्थात शेवटी एवढच म्हणेन हा अभिप्राय म्हणजे एक चमचाभर पाणी आहे त्या महान महासागराचे ज्याने अख्या मराठी सृष्टीला अभिजात मराठीचे सौंदर्य दाखवले.. स्वप्न बघायला  शिकवले, देशभक्ती, देवभक्ती, प्रेम, तिरस्कार ह्या सगळ्या पलीकडे जाऊन एक माणूस बनून जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन दिला अशा ह्या गदिमांना माझा त्रिवार प्रणाम..

© सौ. अलका ओमप्रकाश माळी

मोब. 8149121976

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ वेदनेचा आनंद घेणं थांबवा… लेखिका : सुश्री दीप्ती काबाडे ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

वेदनेचा आनंद घेणं थांबवा… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

शीर्षक वाचून आश्चर्य वाटत असेल ना? पण याआधी एक विचार करा. कधी अशा व्यक्ती पाहिल्या आहेत का की ज्यांच्या आयुष्यात एकामागोमाग एक फक्त अडचणी येत राहतात? शारीरिक दुखणीसुद्धा एकामागोमाग एक सुरू राहतात? म्हणजे एकातून बाहेर पडलं की दुसरं काहीतरी… आपल्याला पाहताना वाईट वाटतं. असा प्रश्न पडतो की या व्यक्तीला सतत इतक्या अडचणी का येतात? दुखणी पाठ का सोडत नाहीत?

मला खात्री आहे प्रत्येकाने अशी एक तरी व्यक्ती नक्कीच पाहिली असेल. अशा व्यक्तींचा स्वभावसुद्धा आठवून पाहा. यांना कधीही विचारा, “कसे आहात?” उत्तर येतं, “काय सांगू! काही न काही सुरूच असतं. मागच्या आठवड्यात पाय घसरून पडले. आता दोन दिवस झाले, खोकल्याने हैराण केले आहे.”

कधीच यांच्या तोंडून ऐकू येणार नाही की मी मजेत आहे.

आता तुम्ही म्हणाल, “यात त्यांचं काय चुकतं? ते तर खरं बोलत असतात. बिचाऱ्यांना खरोखरच काही न काही प्रॉब्लेम्स सुरू असतात. मग मजेत आहे कसं म्हणतील?”

तुम्ही जर मला नवीनच ओळखत असाल तर तुमच्यासाठी माझी ओळख फक्त एक Nutritionist म्हणून मर्यादित आहे. पण जर तुम्ही मला अनेक वर्षे ओळखत असाल, तर माझी सायंटिस्ट ही ओळख तुमच्या मनातून पुसली गेलेली नसणार, हे मला माहीत आहे. त्याच जुन्या ओळखीतून आज काही तरी वेगळं समजावण्याचा प्रयत्न करते आहे. आपला मेंदू आणि शरीर भावनांना कसे हाताळते, ते सांगण्याचा प्रयत्न करते आहे.

अचानक आलेलं शारीरिक दुखणं असो किंवा एखादा दुःखद प्रसंग असो, कोणत्याही संकटाच्या काळात शरीरात cortisol नावाचे स्ट्रेस हार्मोन तयार होते. परंतु शरीराला हे हार्मोन दीर्घकाळ शरीरात राहू देणे अजिबात परवडणारे नसते. त्यामुळे शरीर स्वतः त्याचा नाश करण्यासाठी प्रयत्न करू लागते. हळूहळू मनाची स्थिती पूर्ववत होऊ लागते. कारण दीर्घकाळ हे हार्मोन जर शरीरात राहिले तर ते शरीरातील सर्व अवयवांवर परिणाम करू लागते आणि प्रत्येक अवयवाला इजा पोहोचवू लागते. म्हणूनच शरीर स्वतः या हार्मोनला विरोध करते.

एखाद्याची आई वारली की तो मुलगा हळवेपणाने दोन चार दिवस टाहो फोडून रडतो. पुढचे पंधरा दिवस त्याचे खाण्यावरून लक्ष उडते, तो उदास राहतो. एका महिन्याने तो सावरतो. पुन्हा कामाला लागतो. आईची आठवण झाली की क्षणभर डोळ्यात पाणी येतं, पण तितकंच. पाचव्या महिन्यात तो बायको- मुलांसह एखाद्या मूव्ही थिएटर मध्ये हसताना दिसतो. आपण याला जगरहाटी म्हणतो. पण ही खरंतर शरीराची स्वतःची डिफेन्स mechanism आहे, ज्याद्वारे शरीर स्वतः स्वतः ला recover करते.

परंतु काही माणसे या defence mechanism मध्ये स्वतः अडथळा आणत राहतात. Past मनात सतत उगाळत राहतात. जो भेटेल त्याच्याशी त्याच विषयावर बोलत राहतात. घटना कितीही जुनी झाली तरी त्यातून मनाने बाहेर पडतच नाहीत. शरीर खूप प्रयत्न करते. पण त्यांना त्यात guilt वाटते. आपण इतक्या लवकर या दुःखातून बाहेर पडूच शकत नाही, अशा सूचनाच जणू काही त्यांनी आपल्या मनाला दिलेल्या असतात.  शरीर झुंज करून थकते आणि एका टप्प्यावर हार मानून परिस्थिती स्वीकारते. हाच टप्पा असतो, दुःखाची मालिका सुरू होण्याचा.

ज्या cortisol ला शरीर नष्ट करू पाहत असते, त्या cortisol ला जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या विचारांमधून, भावनांमधून सतत शरीरात तयार करत राहते, त्या दुःखी भावनांमध्ये सतत राहते तेव्हा शरीर cortisol ला विरोध करणे बंद करते. अन् दुःखी राहणं त्या व्यक्तीचा स्थायीभाव बनतो. शरीरासाठी त्या भावना “comfort zone” बनतात. माणूस आनंदात अस्वस्थ होतो आणि सवयीचं दुःख पुन्हा मिळालं की तो रिलॅक्स होतो.  ब्रेकअप झाल्यावर काही लोक काही महिन्यात सावरतात. तर काही असे असतात जे वर्ष उलटूनसुद्धा त्यावर मात करू शकत नाहीत. रोज रात्री झोपताना ते दुःख आठवून झोपणं हे त्यांचं रूटीन बनतं. जर कधी थोडं आनंदी वाटू लागलं तर मुद्दाम sad song ऐकून पुन्हा त्या दुःखात जातात आणि रिलॅक्स होतात. कारण ते  दुःख हा त्यांचा comfort zone बनतो…

Psychology नुसार या परिस्थितीला आपण depression म्हणतो. परंतु physiology नुसार याला आपण cortisol चा long term प्रभाव म्हणू शकतो.

कोणत्याही depression ची सुरुवात दुःख comfort zone बनल्याने सुरू होते. इतकेच नव्हे तर शारीरिक दुखण्याची मालिकासुद्धा दुखणे comfort zone बनल्याने होते. कारण तुम्हाला subconscious level वर ते दुखणं हवंहवंसं वाटत असतं. याची कारणं? लोकांकडून मिळणारी सहानुभूती, कुटुंबात घेतली जाणारी काळजी, एखाद्याकडून मिळणारे प्रेम, attention, काहीही असू शकते. पण भावनिक कारण काहीही असले तरीही cortisol चा शरीरात मुक्काम वाढला की ते सर्व अवयवांना इजा पोहोचवू लागते.

दुःख comfort zone बनण्याच्या आधी जेव्हा शरीर naturally त्याला विरोध करत असते, तेव्हा त्याच पायरीवर शरीराची साथ देऊन त्याला हद्दपार केलं नाही, तर ते शरीराचा ताबा घेऊन कायम त्रास देत राहते. म्हणूनच natural healing ला मनाने कधीही अडवायचे नाही. आनंदी वाटत असताना मुद्दाम दुःखाच्या आठवणी काढून दुःखी व्हायचे नाही. एखाद्याला आपल्या शारीरिक दुखण्याबद्दल सांगताना आपण neutral राहून सांगतो आहोत की एक्साईट होतो आहोत हे observe करा. सतत दुखणी आणि प्रॉब्लेम याबद्दल बोलत रहायला आपल्याला आवडते आहे का, हे नोटीस करा. आणि तसं जाणवलं तर त्यातून बाहेर पडा. Movie पहा, गाणी ऐका, हसा… पण cortisol ला तुमचा स्थायीभाव बनू देऊ नका.

आईच्या मृत्यूनंतर पाच महिन्यांनी थिएटरमध्ये दिसणारा मुलगा नालायक नसतो. तर त्याने फक्त स्वतः च्या शरीराच्या defence mechanism ला support केलेला असतो. So don’t judge happy people based on your nature to remain sad.

लेखिका : सुश्री दीप्ती काबाडे

संग्राहिका: सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – बोलकी मुखपृष्ठे ☆ “वर्षानंद” ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल

? बोलकी मुखपृष्ठे ?

☆ “वर्षांनंद” ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

प्रथम दर्शनी पुस्तकाचे नाव वर्षानंद आहे यावरून पाऊस पडून गेला आहे. त्याचे थेंब अजूनही झाडावर रेंगाळत आहेत आणि मुलांनी घेतलेला पावसाचा आनंद पाण्यातील कागदाच्या बोटी पाहून कळतो. बहुतेकांना पाऊस पावसाळा पावसाची मजा हे आवडत असल्याने एखाद्या आपल्या आवडीच्या विषयाचे चित्र म्हणून हे चित्र चटकन डोळ्यात भरते आणि मनास भावते.

काहीतरी पावसाबद्दल असेल असा मनाचा ग्रह होऊन पुस्तकात डोकावले जाते.

परंतु नीट पाहिले तर पुस्तकाच्या लेखकांची नावे लगेच खाली दिसतात आणि नंदकुमार मुरडे व वर्षा बालगोपाल यांच्या नावातील दोन दोन अक्षरे घेऊन वर्षानंद नाव आणि त्यावरून हे चित्र झाल्याचे चाणाक्षांच्या लक्षात येते.

परंतु अजूनही बारकाईने हे चित्र पाहिले तर त्यातील गहनता लक्षात येते. संथ पणे वाहणारी नदी किंवा रस्त्यावरील पाणी, त्यात सोडलेल्या दोन कागदी नावा, वरच्या बाजूने येणारी झाडाची फांदी आणि त्यावर अडकलेले पावसाचे थेंब पावसाचे पूर्ण दर्शन देऊन जाते.

पण झाडाची फांदी ही रुक्ष आहे त्यावर पाने नाहीत. त्याच्या जागी हे पावसाचे थेंब आहेत म्हणजे आता या झाडाला ओलावा मिळून पुन्हा पालवी फुटणार आहे याचे द्योतक असण्याबरोबरच, ही फांदी मानवी मनाचे प्रतिक मानले तर माणसाच्या रुक्ष मनाला नक्कीच या पुस्तकातील लेख- कवितांमधले काही शब्द मोती चिकटतील आणि त्यांच्या रुक्षमनालाही पालवी फुटेल हा लेखकांचा आशावादही त्यातून प्रतित होतो.

हे थेंब काही वेळाने नक्कीच पडून जाणार आहेत पण जेवढा वेळ ते झाडावर चिकटून असतील तेवढावेळ ते झाड मोत्यांचे झाड होऊन राहील आणि दिमाखाने मिरवेल. त्या सारखे आमचे शब्द जरी काही दिवसांनी मनातून निघून गेले तरी जेवढा काळ वाचक मनात राहतील तेवढा वेळ तरी तुमची मने सौख्य मोत्यांनी झुलतील असेही सुचवायचे आहे.

जीवनाचा प्रवास एकट्याने करायचा कंटाळा येतो म्हणून बरोबर कोणी मित्र मैत्रिण असेल तर तो मोठ्या दिमाखाने हेलकावे घेत का होईना चालू रहातो. तसेच या पुस्तकातील लेखन पाण्यात दोन मित्रत्वाने एकत्र आलेल्या जीवांच्या विचारांच्या दोन नावा आहेत. या एकमेकांसवे डौलत असताना त्याचा आनंद इतरही घेणार आहेत.

तसेच अंतरंगात पाहिल्यावर कळते यामधे ललीत लेख आणि कवितांचा समावेश आहे म्हणून लेखनाच्या पाण्यात या दोन प्रकारच्या नौका प्रवास करताना दिसत आहेत.

खर्‍या पावसाशी संबंध आहे का नाही असा विचार जरी आला तरी लेखकांच्या विचारांचा पाऊस येथे पडणार आहे. त्यातील काही विचारांचे मोती होऊन ते मनाला चिकटणार आहेत. आनंदाची पालवी देणार आहेत या लेखनाच्या नदीत दोन भिन्न प्रकारच्या व्यक्ती विचारांच्या, दोन वेगळ्या प्रकाराच्या नौकानयन करणार आहेत या विचाराने भारावून जाऊन अंतरंगात डोकावायचा मोह झाल्याशिवाय रहात नाही.

नौकांचा रंगही हिरवा आणि केशरी असून त्याचे शिड पांढरे आहे जे आपल्या तिरंग्याचे द्योतक आहे. अर्थातच यातील काही लिखाण देशभक्ती, देशातील समाज यांच्याशीही निगडीत आहे असे सुचवते.

इतक्या मोठ्या आशयाचे दही घुसळून त्यात मतितार्थाचे  लोणी तरंगत आहे असे बोलके मुखपृष्ठ मुक्तांगण प्रकाशनच्या समृद्धी क्रियेशनने तयार केले म्हणून मुक्तांगण प्रकाशनच्या राजू भानारकर आणि लेखक नंदकुमार मुरडे यांनीही या चित्राची पसंती केली म्हणून आभार.

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ कथापौर्णिमा – लेखिका : सुश्री पूनम छत्रे ☆ परिचय – सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ कथापौर्णिमा – लेखिका : सुश्री पूनम छत्रे ☆ परिचय – सुश्री वर्षा बालगोपाल ☆ 

(एका वेगळ्या पद्धतीने पुस्तक परिचय) 

लेखिका : पूनम छत्रे 

प्रकाशक :  रसिक आंतरभारती

पृष्ठ संख्या – १७६

मूल्य : रु.२७०

कुठून कसा कोण जाणे पण कोरोना सगळीकडे पसरला. या राक्षसाने भिषण रूप घेतले आणि सगळ्यांना घरातच बसायची वेळ आली. लॉकडाऊन डिक्लेअर झाला आणि कामानिमित्ताने बाहेर जाणारी, घरचे बाहेरचे मुलाचे सगळे सांभाळून आपला छंद जोपासणारी पूनम घरातच बंद झाली.

किती अवघड असते ना असे राहणे? मग काय लोकांचे अंतर्भूत गुण बाहेर आले आणि सोशल मिडियावर बरेच ऍक्टिव्ह राहू लागले.

पूनमही काय करता येईल याचा विचार करू लागली आणि शेजारच्याच बिल्डिंगमधे होम क्वारंटाईन असलेल्या निनाद आणि त्याच्या बाबांविषयी समजले. त्यांच्याच सोसायटीत दंगापार्टी चालू असल्याचा संतापही आला आणि लोकांना चांगली बुद्धी देण्यासाठी अनुदिनी अनुतापे प्रार्थना तिने केली.

आपल्याच विचारात कधी टिव्ही लावला हे तिच्याही लक्षात आले नाही. पैठणीचा होम मिनिस्टरचा रिपीट टेलिकास्ट चालू होता. त्यात पैठणी जिंकलेली सीमा तिच्या ओळखीचीच होती. पैठणी जिंकून सुद्धा ती नेसून तिची निगा राखणे तिला किती अवघड होते हे सगळे तिला माहित असल्यानेच सीमाच्या मनाची घालमेल जाणून पूनमच सुन्न झाली. आधी हाताला चटके च्या ऐवजी आधी मनाला चटके बसले होते.

या चटके बसलेल्या मनाचा ती पराभव होऊ देणार नसली तरी तिच्या ओळखीच्या सुधीरच्या आईची अवस्था पूनमला आठवली. आपल्या म्हातारपणी कोणाला आपले काही करायला लागू नये म्हणून मिस्टरांच्या माघारी टोकाचे उचललेल पाऊल बूमरँग होऊन तिला कायमचे विकलांग करते या घटनेने अतिशय व्यथित झाली.

तरी तिच्या मनाचा वटवृक्ष घट्ट मुळे रोऊन सकारात्मकतेच्या पाराने डौलाने उभा होता. आपल्या मुलांना आकाशात भरारी मारायला मोकळीक दिलेल्या बाबांना आपल्या गावाकडील मंदिराच्या जिर्णोद्धाराचा प्रसंग  आठवून पूनमला पण छान शिकवण मिळाली.

मग उगाचच मैत्रिण रमा आणि तिचा मित्र सत्यजीत यांची आठवण होऊन त्यांच्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर होताना अर्थात त्यांच्या हृदयी वसंत फुलताना झालेल्या स्थित्यंतराने ओठावर स्मित आले.

दुसरी मैत्रिण हेमांगी आणि गौरव यांचे प्रेम सफल नाही झाले तरी त्यांचे एकमेकांवर किती निस्सिम प्रेम होते याची आठवण झाली.

मग उगाचंच  ओळखीतल्या एका अंजलीने केलेला  पुनर्विवाह आठवला आणि बिजवर नवर्‍याची मुलगी सोनालिकाने तिचा आई म्हणून स्विकार करण्यासाठी केलेला प्रयत्न डोळ्यांपुढे तरळला.

कंटाळून पूनमने जरा स्वत:ला आडवे केले आणि आईचा फोन आला. सहजच मनात आले या कोरोनाने मोठ्या माणसांना पण टेक्नॉलॉजी शिकवली आहे ना? किती सहजतेने वरच्या पिढ्या सुद्धा नवे तंत्रज्ञान वापरत आहेत नव्या गोष्टी शिकत आहेत मग कौतूकाने अशाच एका व्हॉट्सअप आई चे उदाहरण आठवले.

वाटले या नव्या जमान्याने मुलांना परदेशाचे वेड लावले असले तरी तेथे स्वत:चे हाल होऊ नयेत म्हणून स्वावलंबी होऊ घातलेली मुले आपल्या आईच्या नाळेशी अधिक दृढ होतात .त्यांची या देशाशी आईशी संस्काराशी असलेली नाळ कधीच तुटत नाही.  याचेच उर्वी आणि सुजाताचे उदाहरण तिने बोलता बोलता आईला सांगितले पण•••

तिने पुन्हा टिव्ही लावला रिपीट टेलिकास्टच दाखवले जात होते.  त्यावर कॅमेरामन जग्गुचे नाव पाहून घरदार सोडून कॅमेरामन झालेला जग्गू दिवाळीच्या निमित्ताने तरी घरी गेला. अशा परत आपल्या फॅमिलीत जाऊन फॅमिलीवाला जग्गू  मनात येऊन गेला.

अस्वस्थ पूनम या कुशीवरून त्या कुशीवर होत होती रिकाम्या मनाचिये गुंती उतारवयात एकमेकांचे आधार होऊ पहाणार्‍या सुलू आणि मुकुंदाची कथा आठवली.

कूस बदलली त्या सरशी खरे मित्र मैत्रिणी असलेल्या शुभंकर अमृताची आठवण जणू एकमेकांना तुझ्या नसानसात मी असल्याची जाणिव देत आहेत अशी अनुभूती दिली.

छताकडे पहात असताना दूरचे कोणीतरी अभंग अबिर आठवले आणि मुले अनुभवातून कशी शहाणी होतात, शिकतात हे अभंग वाणी च्या स्वरूपात मनात नाचून गेले.

पुन्हा कोरोनाची आठवण येऊन रोज कोणी ना कोणीतरी गेल्याच्या बातम्या कानावर येतच होत्या. तसाच कोणाचा तरी फोन आला आणि कामवाली बाई शारदा जी नाईलाजाने हॉस्पिटलमधे कोरोनाच्या पेशंटची सेवा करत होती ती गेल्याचे समजले. वाईट जरी वाटले तरी मरणाने केली सुटका  असा विचार देखील आला.

उलट सुलट विचारांची माला पूनमच्या डोक्यात फिरतच होती. बस्स तिने ठरवले आपण आता या काळात कथा लिहायच्या. त्या निमित्ताने असे अनेक प्रसंग अनेक व्यक्ती आठवयाच्या आणि ते अनुभव आपल्या शब्दात मांडायचे.

तिने ठरवले आणि तिचा कोरोनाचा काळ खरच लिखाणात ते लिखाण  फेसबुकसारख्या सोशल मिडियावर  प्रकाशित करण्यात  सुसह्यतेने पार पडला.

मग वेध लागले ते कथासंग्रह काढण्याचे. पण आपले लिखाण सगळ्यांना आवडेल का? कोण काढेल आपला संग्रह असे विचार कस्तुरीमृगासारखे स्वत:लाच पडत गेले. आणि या लेखकांमधे होते कुरूप वेडे  अशा राजहंसाचे लिखाण असल्याचे मित्र मैत्रिणिंकडून सांगितले गेले. 

अनेक कथांपैकी १५ कथा निवडून कथापौर्णिमा नामकरणही झाले.

शैलेश नांदुरकर यांनी पुढाकार घेऊन पुस्तकाची निर्मिती केली, रसिक आंतरभारतीच्या सुनिता नांदुरकरांनी २८ आक्टोबर २०२३ला संग्रह प्रकाशितही केला. पुस्तकाचे मूल्य केवळ रु.२७० एवढे आहे.

असे वेगवेगळे नातेपैलू असलेल्या कथा वेगवेगळ्या भावना मनात जागृत करतात. त्याला वास्तवतेचे एक अधिष्ठानही लाभलेले आहे त्यामुळे कथा मनाला भावतात.

निसर्गरम्य परिसरात धुंद रात्रीच्या वेळी छान चंद्रप्रकाशात जणू आपले मन मोकळे करत आकाशाच्या छत्रीखाली लेखीका पूनम छत्रे आपल्या कथा सांगायला आली आहे. त्या तेवढ्याच उत्कटतेने आपण सर्व ऐकाल म्हणजे वाचाल हा विश्वास वाटतो .

परिचय : वर्षा बालगोपाल

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – बोलकी मुखपृष्ठे ☆ “उजेडाचे मळे” ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल

? बोलकी मुखपृष्ठे ?

☆ “उजेडाचे मळे” ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

परदेशात मोठमोठ्या चित्रांचे लिलाव होतात आणि त्याला करोडो रुपये मिळतात. मला फार आश्चर्य वाटायचे, काय असतं एवढं या चित्रात? का त्याला एवढी किंमत मिळते? कशी ठरते ही किंमत.

कुतुहल म्हणून मी काही चित्रे त्या दृष्टीने पाहिली आणि नंतर त्याची कथाही वाचली तर समजले की वरवर दिसते तसे ते चित्र नसतेच मुळी. त्यामधे खूप गूढार्थ सामावला आहे. ही चित्रे मॉडर्न आर्ट म्हणून विक्रीस ठेवलेली होती. 

अचानक पुरुषोत्तम सदाफुले सरांच उजेडाचे मळे पुस्तक हाती पडले आणि त्या मुखपृष्ठाकडे पहातच राहिले. खरोखर मॉडर्न आर्ट असलेले चित्र वाटले.

सहज बघितले तर असंख्य उडणारे पक्षी••• थोडं नीट पाहिलं तरं माणसाच्या डोक्यातून आलेले विचार पक्षी••• 

परंतु जरा वेगळ्या दृष्टीने पाहिले आणि त्यातील गहनता जाणवत गेली•••

मध्यभागी असणारी माणसाची आकृती ही फक्त माणसाची नसून कारखान्यात जाम करणार्‍या एका कामगाराची आहे. कामगारांच्या समस्या कारखान्यातील प्रश्नांमुळे निर्माण झाल्या आहेत हे दाखवण्यासाठी कामगाराचे हृदय कारखान्याच्या आकाराचे जणू काळीज चिरले जात आहे हे दर्शवते. त्या समस्यांचे विचार पक्षी रुपाने उडू पहात आहेत.

कामगाराचे मन जरी हिरवे असले तरी आजूबाजूचा परिसर प्रदुषणामुळे पिवळा पडत चालला आहे आणि याच प्रदुषणात जगणे अवघड होऊन हे पक्षी हा परिसर सोडून उडून जात आहे आणि बिचारा कामगार जरी अवघड झाले तरी असहाय्य होऊन या प्रदुषणात, कारखान्यात होरपळत आहे.

कामगारांचे प्रश्न कोण सोडवेल? मी सोडवू शकेन का? कसे सोडवता येतील हे प्रश्न या कामगार विषयीच्या प्रश्नांची पाखरे डोक्यात घिरट्या घालत आहेत.

विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली। नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले। वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले  क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची विचारधारणा सगळ्यांनी विशेषतः कामगारांनी तरी विसरली नाहीच पाहिजे म्हणून हा क्रांतीसूर्य सतत कामगाराच्या विचारात तळपत आहे. कामगारांबद्दलचे विचार त्याला मूर्त रूप येत नसल्याने हा अर्धाच सूर्य तळपत आहे हे सांगणंयासाठी लाल रंगाचा सूर्य आणि त्याची पांढरी आभा दाखवली आहे. 

कारखान्याच्या भोवती वाढणारा कचरा, त्यातून निघालेले धुरांचे पक्षी,बाहेर पडणारी रसायने यातून कामगारांचे जीवन धोक्यात येऊन कामगार हिरवा- निळा पडत आहे. 

अगदी लहान मुलाच्या नजरेतून बघितले तर ती लहानमुलाची आकृती आत लाल मधे पांढरे आणि खाली हिरवे असलेले कलिंगड खाण्याचा विचार करत आहे. पण हे कलिंगडही म्हणावे तितके शुद्ध राहिले नाही हे दुर्दैव.(माहित आहे की कलिंगड आणि लेखन यांचा दुरान्वयेही काही संबंध नाही पण लहानमुल सहज असे म्हणेल म्हणून तोही अर्थ निघू शकतो असे सुचवायचे आहे)

असे अनेक सांकेतिक विचार प्रश्न घेऊन येणारे हे चित्र आणि त्याला तितक्याच सच्चतेने उत्तर देणारे सच्चेपणा आणि निरागसता यांचे प्रतिक असलेले निळंया रंगातील आकाशाचेही निळेपण घेऊन येणारे वाचकांच्या मनात फुलवणारे उजेडाचे मळे.

खरेच असे मॉडर्न आर्टने खुलणारे  सरदार जाधव यांचे हे वेगळेच चित्र मुखपृष्ठ म्हणून निवडणार्‍या प्रतिमा पब्लीकेशनच्या डॉ.दीपक चांदणे ,अस्मिता चांदणे आणि लेखक पुरुषोत्तम सदाफुले यांचे आभार.

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ निसर्गाची निळाई (कविता संग्रह) – कवी : अजित महाडकर ☆ परिचय – सौ. राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ निसर्गाची निळाई (कविता संग्रह) – कवी : अजित महाडकर ☆ परिचय – सौ. राधिका भांडारकर  

पुस्तक: निसर्गाची निळाई

कवी: अजित महाडकर 

प्रकाशक: शॉपीजन

पृष्ठे ७५, किंमत  २५०/—

कवी अजित महाडकर यांचा निसर्गाची निळाई हा काव्यसंग्रह अलीकडेच शॉपिजन प्रकाशन तर्फे प्रकाशित झाला. या संग्रहात एकूण ५१  कविता आहेत. या सर्वच कविता निसर्ग आणि नैसर्गिक भावभावनांशी निगडित आहेत. या काव्यसंग्रहाचे वैशिष्ट्य असे की यात वृत्तबद्ध, कृष्णाक्षरी, संगीताक्षरी, अष्टाक्षरी, शिरोमणी, जपानी हायकू, तांका असे विविध काव्यप्रकार लीलया हाताळले आहेत.  त्यामुळे हा काव्यसंग्रह वाचताना एकात अनेक असा सुखद अनुभव येतो.

अजित महाडकर हे एक सिद्धहस्त  प्रतिभावंत कवी आहेत.  त्यांच्या कविता वाचताना विशेष करून जाणवते ती त्यांची अतिशय सरल अशी काव्य भाषा.  एक एक फुल धाग्यात सहजपणे ओवावे इतकी साधी त्यांच्या काव्याची गुंफण असते. काव्याचे शास्त्र आणि नियम सांभाळूनही भाषेच्या काठीण्यापासून, क्लीष्टते पासून  त्यांची कविता दूर असते आणि म्हणूनच ती वाचकाला कवींच्या विचारांपाशी सहजपणे घेऊन जाते.

कवी महाडकरांच्या सर्वच कवितांचा हा स्थायीभाव असल्यामुळे त्यांच्या कविता मनात घर कराव्यात इतक्या बोलक्या आहेत आणि आपल्या वाटणाऱ्या आहेत.

या कवितासंग्रहातील भक्तीरसातील आरत्या व अभंग वाचताना जाणवते की कवीची वृत्ती धार्मिक, परोपकारी आणि श्रद्धाळू असली तरी कुठेही अंधश्रद्धेचा भाव त्यात नाही.

भगवंत या अभंगात ते लिहितात

भेटा भगवंत ।मानवी रूपात ।

नका देवळात। जाऊ रोज ।।

भगवंत हा मनुष्य रूपातच आपल्या सभोवती असतो. आई-वडिलांच्या रूपात, रुग्णांचे प्राण वाचवणाऱ्या वैद्याच्या रूपात, असंख्य दात्यांच्या दातृत्वाच्या रूपात तो भेटत असतो.

मर्म संसाराचे या कवितेत ते लिहितात

करिता काम धाम 

जपावे रामनाम

मनोमनी

या संगीताक्षरी  काव्यरचनेत गृहस्थधर्म आणि भक्तीमार्ग यांची अगदी सोप्पी सांगड त्यांनी घातलेली आहे.

निसर्गाची अत्यंत ओढ असलेल्या या कवीच्या लेखणीतून शब्द उतरतात ,

देणे निसर्गाचे जपून ठेवावे 

*त्याला का उगा नष्ट करावे ।*।

किंवा ,

झरा निर्मळ असेल का तिथे?

खरा आनंद डुंबण्याचा घेऊया 

या कृष्णाक्षरी काव्यातून सुंदर जीवन कसे जगावे, निसर्ग कसा जपावा याचे प्रबोधनच जणू होते.

लेखणी, कविता, प्रतिभा याच कवीच्या खऱ्या सख्या आहेत.

हाती येईल त्या लेखणीने 

काढते नक्षी कागदावर 

स्वतःच हसते पाहून नक्षी 

आनंद होतो अनावर …

कवीचे हे मनस्वी आणि हृदयस्थ बोल किती मधुर आहेत! जीवन म्हटले म्हणजे सुख दुःख, निराशा, प्रेम आणि वियोगाचाही अनुभव येतोच. अशा या भावभावनांचे प्रतिबिंबही महाडकरांच्या कवितेमध्ये उमटलेले आहे.

कातरवेळ या कवितेत ते लिहितात

सागरकिनारी कातर वेळी 

असता प्रिया जवळी 

संसाराची सुख स्वप्ने 

पाहतो आम्ही आगळी …

निसर्गाच्या सहवासात माणसांची छोटी छोटी स्वप्ने कशी खुलत जातात हेच या ओळीतून व्यक्त होते.

मन संवेदनशील असले की एखाद्या साध्या दृश्यानेही ते उमलते त्याचीच प्रचिती देणाऱ्या या ओळी,

 डेरेदार झाड बागेतले 

रंगीत फुलांनी बहरले 

पाहुनी तो रम्य नजारा 

*मन माझे आनंदाने फुलले.*.

वाह क्या बात है!  निसर्गातच आनंद भरलेला आहे हो! फक्त तुमची पंचेद्रिये जागी असली पाहिजेत. मग जीवन हे सुंदरच होते. किती सुरेख संदेश कवीने या साध्या ओळींतून दिला आहे!

या संपूर्ण काव्यसंग्रहात कवीने ईश्वर, बारा ज्योतिर्लिंगासारखी स्थळे, कृष्ण, अर्जुन, झाडे—पाने, पक्षी, प्रिय सखी, गुरु, घर, कन्या, अगदी घरात वावरणारा मोती कुत्रा यावर इतकी सुरेख काव्य टिपणे केली आहेत  की वाचक त्यात सहजपणे रमून जातो.

दुसऱ्यांना सुखी ठेवण्याची 

कला आहे ज्यांच्यात 

एक आशेचा किरण 

दिसतो मला त्यांच्यात ..

किंवा ,

संस्कार या कवितेत ते लिहितात

डोक्यावरी पिडीतांच्या 

हात फिरवी मायेचा 

दिसे मला त्यांच्यामध्ये

 एक किरण आशेचा…

मनात सहज येते, सभोवताली माजलेल्या स्वार्थी, मतलबी, अनाचारी जगातही सुखाचा किरण शोधणाऱ्या या कवीची सकारात्मकता किती योग्य आहे, महान आहे!

 चंद्र प्रकाश 

तुझा चेहऱ्यावर

 दिसे सुंदर ..

असे हायकू आणि 

 

ऋतू बदल 

निसर्गात घडतो 

तरी फुलतो 

संघर्ष करूनिया

 नव्याने बहरतो ..

अशा तांका काव्यातून झिरपणारे हे काव्यबिंदू मनाला खूप सुखवतात.

निसर्गाची  निळाई ही शीर्षक कविता सृष्टीच्या निळाईचा सुंदर अविष्कारच घडवते.

स्वच्छ निर्मळ चमके

निळे पाणी सागराचे

घेई  उंच उंच लाटा

फेडी पारणे नेत्रांचे ..

किती सुरेख आहे ही स्वभावोक्ती!

खरं म्हणजे यातली प्रत्येक कविता वाचकाला विविध भावभावनांचा अनुभव तर देतेच पण जीवनातले मधुकण टिपण्यासाठी एक चोचही देते .

सुरेख आणि सहज साधलेली यमके, ठिकठिकाणी विखुरलेली स्वभावोक्ती, चेतनागुणोक्ती, उपमा, उत्प्रेक्षांसह उलगडत चाललेला हा काव्यप्रवास अपार सुखद, समाधानाचा आहे.

या काव्यसंग्रहाच्या प्रस्तावनेत लेखिका व कवयित्री सौ. संपदा देशपांडे लिहितात,

शब्द बनती कविता 

तोच असे सिद्ध कवी..

त्यांचं लिहिणं किती सार्थ आहे हे या कविता वाचल्यावर  लक्षात येते.

अजित महाडकर यांच्या या चौथ्या काव्यसंग्रहाला शुभेच्छा देताना कवयित्री सानिका पत्की यांनीही महाडकरांच्या कविता म्हणजे सहज, सुंदर, साधे, सोपे व भावनेच्या जाणिवांना स्पर्श करणारर्‍या असे भाष्य महाडकरांच्या काव्यरचनांबद्दल केले आहे.

काव्यसंग्रहाचे मुखपृष्ठ अतिशय बोलकं आणि सुंदर आहे.

संपूर्ण निळ्या पार्श्वभूमीवर पसरलेला अथांग निळा सागर, क्षितिजाच्या रेषेवर टेकलेलं निळं आभाळ आणि मुक्त विहरणारे निळसर जलद. केवळ अप्रतिम!

कवी श्री. महाडकर त्यांच्या मनोगतात नम्रपणे लिहितात, “या कविता तुम्हाला आवडतील अशी आशा आहे”

सर! या कविता आमच्या अंतरीच्या कप्प्यात बंदिस्तच होतील एवढेच मी म्हणेन.

कवी अजित महाडकरांचे मनापासून अभिनंदन आणि त्यांच्या  पुढील  साहित्य प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा!

परिचय : राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘चांदणे शब्दफुलांचे’ – श्री विश्वास देशपांडे ☆ परिचय – डॉ मीना श्रीवास्तव ☆

डॉ मीना श्रीवास्तव

? पुस्तकावर बोलू काही ?

 ☆ ‘चांदणे शब्दफुलांचे’ – श्री विश्वास देशपांडे ☆ परिचय – डॉ मीना श्रीवास्तव ☆

पुस्तक – चांदणे शब्दफुलांचे

लेखक- श्री विश्वास देशपांडे

प्रकाशक-सोहम क्रिएशन अँड पब्लिकेशन, पुणे  

पृष्ठसंख्या- १६८ पाने

मूल्य-२०० रुपये

परिचय : डॉ. मीना श्रीवास्तव 

कोजागिरीच्या मनोरम चांदण्या रात्री अर्थात २८ ऑक्टोबर २०२३ ला चाळीसगावचे जेष्ठ आणि प्रथितयश साहित्यिक श्री विश्वास देशपांडे यांचे ‘चांदणे शब्दफुलांचे’ हे नवे पुस्तक प्रकाशित झाले. पुस्तक वाचल्यावर लक्षात आले की यातील काही लेख समाजमाध्यमांवर आलेले होते. मात्र एक सलग पुस्तक वाचतांना तेच लेख नवे रूप लेऊन आल्याचे जाणवले. जणू चांदण्या रात्रीच्या गोड स्वप्नाची अनुपम अशी अनुभूती जागृतावस्थेत परत अनुभवली. पुस्तकाचे शीर्षक उत्कंठावर्धक आणि देखणे आहेच आणि त्याला साजेशी गर्द निळाईच्या पार्श्वभूमीवर फुललेली कुमुदिनी मुखपृष्ठावर अतिशय आकर्षक दिसते. विश्वास सरांच्या ललित लेखांचा सुरेख कोलाज या आधीच्या पुस्तकांत अनुभवलेला आहे. मात्र या पुस्तकात कोलाज आहे तो विभिन्न व्यक्तिरेखांचा! याला कोलाज म्हणणेच योग्य, कारण प्रत्येक व्यक्तिरेखेची रूपरेषा, मांडणी आणि सजावट वेगवेगळी आहे! मग या सर्वांना जोडणारा एक धागा कोणता तर यातील सर्व मानवी व्यक्तिचित्रे काही सांगतात, बोलतात आणि आपल्याला विचार करायला प्रवृत्त करतात. कांहींचे व्यवसाय उच्चभ्रू तर कांही रोजच्या जीवनातले आपले भागीदार, कांही प्रसिद्धीच्या उंचच उंच शिखरावर विराजित तर कांहींच्या रोजच्या जीवनात अन्न, वस्त्र अन निवारा शोधण्याची धडपड सुरु! असे या पुस्तकातील विविधरंगी अन विविधगंधी व्यक्तिरेषांच्या आडव्या उभ्या धाग्यांनी विणलेले कोलाज वेगळेच सौंदर्य दर्शवते.

श्री विश्वास विष्णु देशपांडे

शीर्षकाच्या नावाच्याच ‘चांदणे शब्दफुलांचे’ या पहिल्या लेखातच वाचकांचे मन एका सुवर्णयुगात पोचते. बालगंधर्व आणि पु ल यांच्यावरचा हा लेख म्हणजे अखिल महाराष्ट्राच्या हृदयसिंहासनावर ज्यांच्या गौरवान्वित अन वलयांकित प्रतिमा कायम कोरल्या गेल्या आहेत, त्या दैदिप्यमान सूर्य चंद्र यांची जणू ‘ज्योतीने तेजाची केलेली आरती’! नारायणराव आणि पुरुषोत्तम या दोन नावातील साम्य साधत लिहिलेला हा अप्रतिम लेख म्हणजे गरम जलेबी अन थंडगार रबडीचे पौष्टिक अन रुचकर कॉम्बो! आता रंगमंचाचा पडदा उघडल्यावर जसे एकाहून एक सरस नटसम्राट रंगमंचावर अवतरतात, तद्वतच हे लेख कागदावर अवतरल्यावर जणू त्या रंगमंचाच्या लखलखीत प्रकाशाला चार चांद लागत आहेत असे वाटते. लावण्याचा गाभा असलेले देखणे महान संतूरवादक दिवंगत पंडित शिवकुमार शर्मा यांच्यावरील लेख विश्वास सरांच्या संगीताविषयी असलेल्या गहन जाणीवा आणि ज्ञानाची साक्ष देतात. तसेच ते दिवंगत झाल्यावर हा लेख लिहिलेला असल्याने पुरुषी सौंदर्याची मूर्तिमंत प्रतिभा अन प्रतिमा आणि संतूरला आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त करून देणाऱ्या या दिग्गज वादकाचे मूर्तिमंत चित्र डोळ्यासमोर उभे राहिले! याच संगीतदालनात ज्यांच्या स्वरात आणि संगीतात ईश्वरी साक्षात्कार होतो, असे संगीतकार गायक हेमंतकुमार यांच्यावरील लेख खूपच वाचनीय असा आहे.

हा झाला एक रंग! मात्र सरांचा आवडीचा अन अभ्यासपूर्ण वाचन, लेखन, भाषण आणि चिंतनातून साकार झालेला भक्तिरंग त्यांना अन त्यांच्यासंगे आपल्यालाही सावळ्या रंगाची बाधा प्रदान करतो. विठू माउली, भगवान परशुराम, ज्ञानेश्वर माउली, गोंदवलेकर महाराज, गणेश उत्सव इत्यादी विविध लेखांतून झिरपत गेलेली दिव्य प्रकाशशलाका थेट आपल्या हृदयाच्या गाभाऱ्यात चैतन्याचे तेजस्वी दीप उजळून टाकते. यासोबतच भेट झालेली नसतांना देखील भेटीची आस धरून बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली समर्पित करीत लिहिलेला लेख असाच हृदयंगम आहे. बाबासाहेबांचे विस्तीर्ण जीवन पटल आपल्यासमोर उलगडण्यात लेखकाची कल्पनाशक्ती, शब्दवैभव अन भावनांचे कल्लोळ यांचा सुरेख मिलाप दिसून येतो. विविध क्षेत्रातील व्यक्तिमत्वे वेचताना लेखकाच्या सामाजिक जाणीवा अत्यंत प्रखर आणि दूरदर्शी आहेत हेच दिसून येते. वनस्पती शास्त्रज्ञ ल्युथर बरबँक, पोलिओची लस शोधून मानवाला निरामय अक्षत जीवन प्रदान करणारा डॉक्टर जोनास साक, कीटकनाशकांचे दुष्परिणाम शोधत नामधारी अन माजलेल्या मल्टिनॅशनल कंपन्यांशी दोन हात करणारा डॉक्टर टायरॉन हेज, सिंगापूरला नाव, रूप अन वैभव प्रदान करणारा ली क्कान यु, क्रांतिसूर्य हेमंत सोमण, सेरेब्रल पाल्सीग्रस्त, पण जिच्या आकांक्षांचा वेलू गगनाला भिडला आहे अशी स्फूर्तीदायिनी आणि चैतन्यमयी वल्लरी करमरकर आणि इतरही व्यक्ती या ललित लेखांच्या मांदियाळीत आपल्याला भेटतील.

सामाजिक व्यक्तिरेखांसह या पुस्तकात सुखनैव नांदणाऱ्या विश्वास सरांच्या नात्यातील अन आसपास वावरणाऱ्या व्यक्तींना देखील आपण जणू प्रत्यक्ष भेटतोय असा भास होतो. शीर्षस्थानी अर्थातच लेखकाच्या तीर्थरूप ‘आई’ आहेत. आई अन मुलाचे भावनिक प्रेममय नाते उलगडणारा हा लेख देवघरातील शांतपणे तेवणाऱ्या पावन नंदादीपाची स्मृती जागवून भावविभोर करून जातो. या पुस्तकात लेखकाने चित्रविचित्र व्यवसायातील मंडळी एकाच पंगतीत आरामात ऐसपैस बसवली आहेत. मिस्त्री, गवंडी, नाभिक अन कल्हईवाला यांच्या सोबत ज्ञानवंत गुरुमूर्ती सर, उच्च विद्याविभूषित डॉक्टर गोपाळ देशपांडे अन त्यांच्या स्वयंप्रकाशित सौ. विभा हे देखील या पंगतीत आहेत. लेखांची नावे अनवट आणि उत्सुकता ताणणारी पण मॅटरमध्ये अन मीटर मध्ये चपखल बसणारी (दोन उदाहरणे देते-वल्लरीवरच्या लेखाचे नाव ‘फिटे अंधाराचे जाळे’ तर नाभिकांवरील लेखाचे शीर्षक-‘सर जो तेरा चकराये’). लेखकाचे गीत-संगीताचे उपजत अन अद्ययावत ज्ञान असे संपूर्ण पुस्तकातून प्रतिबिंबित होत राहते.  

मंडळी, या पुस्तकाच्या व्यक्तिविशेषांकात एकंदरीत ३६ लेख आहेत. अशा रचनेची एक खासियत असते. मैफिलीत जसे प्रत्येक गायक एक स्वतंत्र गाणे म्हणतो, आपण ते गाणे संपल्यावर नवीन गायकाची वाट बघत नव्या कोऱ्या गाण्याची प्रतीक्षा करतो तसेच हे लेख स्वतंत्र, स्वयंसिद्ध आणि स्वयंपूर्ण आहेत. म्हटले तर एका बैठकीत वाचून संपवा, किंवा चवी-चवीने एक-एक लेख निवांतपणे वाचा. दोहोत तितकाच आनंद अनुभवास येतो. लेख प्रमाणबद्ध शरीर सौष्ठव लाभलेल्या सौंदर्यवती नवयौवनेसारखेच आहेत. कुठेही फाफटपसारा नाही, मात्र मॅटर बघावे तर पूर्णत्वास पोचलेले!

विश्वास सरांच्या लेखनशैलीविषयी त्यांच्या आधीच्या सात पुस्तकातून ओळख झाली, ती या पुस्तकांतून वर्धिष्णू झाली. साधी सोपी सरळ भाषा! गुंत्यात गुंता नाही, मात्र अनुभव ‘गुंतता हृदय हे’ असाच! भ्रमर एकदा का मधुर मधुकणांची आस बाळगून कमलदलात गुंतला की बाहेर येण्याचं विसरून जातो, तद्वतच हे पुस्तक वाचायला सुरुवात केलीत की शेवटचे पान येईस्तोवर आपण थांबत नाही. (आले तरी दोन पर्याय आहेत, एक तर यातील आपल्या आवडत्या प्रांतातील लेखांचा फिरफिरुनि आस्वाद घ्यावा अथवा याच कोजागिरीला लेखकाची प्रकाशित झालेली आणिक दोन पुस्तके आहेतच! मंडळी, त्यांच्याविषयी नंतर!)    

वाचकहो, प्रत्येक लेखाचा उहापोह करण्याचा मोह मी जाणीवपूर्वक टाळलाय. आपणही उत्सुक व्हावे आणि आणखी काय काय असेल बरं यात, हा प्रश्न स्वतःला विचारत हे पुस्तक वाचावे, हा माझा एकमेव उद्देश आहे! आता माझा सवाल ऐका मंडळी! सूर्याची धगधगीत उग्र किरणे नाहीत, उन्हाचा रखरखाट नाही, तर मुग्ध, मनोहर, शांत, शीतल, सौम्य, पवित्र आणि धवल चंद्रप्रकाशाची जाळी विखुरलेली आहे. निशिगंधाच्या धुंद सुगंधाने आसमंत अन आपलं मन भारून टाकलंय. या नीरव शांततेत काळ्याभोर रंगाच्या अन चांदण्यांच्या टिकल्यांचे नक्षीकाम असलेल्या चंद्रकळेच्या महावस्त्राने नटलेल्या निशेचे निश्चल मनमोहक सौंदर्य अनुभवायचे आहे कां? मग या पुस्तकातील शब्दफुले कधीही वेचा, चांदण्या रात्रीच्या निखळ सौंदर्याची आपल्याला नक्कीच भुरळ पडेल, हा झाला माझा अनुभव! अन तुमचा?

पुस्तक परीक्षण – डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे, फोन नंबर – ९९२०१६७२११

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – बोलकी मुखपृष्ठे ☆ “कथापौर्णिमा” ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल

? बोलकी मुखपृष्ठे ?

☆ “कथापौर्णिमा” ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

छान दाट निळे ••• काळे भासणारे आकाश ••• त्यात असंख्य लुकलुकणार्‍या चांदण्या, तारे तारका••• या सगळ्या गोपिकांत शोभून दिसणारा कृष्ण जणू हा पूर्णचंद्र••• पृथ्वीवर डोंगरांवर झाडांवर पाण्यात सगळीकडे सांडणारा हा लक्ख प्रकाश ••• हे सगळे पाहताना भान हरपलेले एक प्रेमी युगूल तळ्याकाठी झाडाखाली बसलेलं ••• हितगूज करण्यात मश्गूल असलेलं••• 

सुंदर लोभस असे हे चित्र. कोणत्याही रसिक मनाला भुरळ घालणारं•••

पण काय सांगते हे चित्र? फक्त पौर्णिमेची रात्र आहे एवढच? मला नाही तसे वाटतं••• 

हे संपूर्ण चित्र कितीतरी कथा सांगतेय असे वाटतं

०१) धरती आणि आकाश यांना जोडणारी ही डोंगराची रांग दु्रून चांगली दिसत असली तरी त्यांच्या आयुष्यात आलेले चढ उतार, खाचाखळगे यांचे दर्शन त्या युगुलाला देते. त्याचेच स्पष्ट प्रतिबिंब पाहून ते विचार करू लागले••••

०२) आयुष्यात कितीही अंधार असला तरी ब्लू मूनची रात्र कधीतरी येतेच जीवनात. याचा अनुभव ते दोघे घेत होते•••

०३) दोघेही व्याकूळ••• समदु:खी••• आपापली कथा, व्यथा सांगताना तो पूर्णचंद्र त्यांच्या कथा ऐकायला केव्हा झाडावर विसावला हे त्यांना कळलेच नाही•••

०४) नर्गिस राजकपूरचा प्रभाव असलेले दोघे झाडाची छत्री करून एकत्र त्यामधे गुजगोष्टी करत असताना चांदण्याची बरसात होत आहे•••

०५) आपल्या जीवनाचा निर्णय घेताना साशंक असणारे ते दोघे••• विचारमंथनातून त्यांच्या अंतरंगावर ऊमटलेल्या लहरी••• यातून त्यांच्या जीवनात एक शरदचंद्रीय निर्णयाची आलेली जीवन उजळणारी कोजागिरी पौर्णिमा •••

अशा अनेक कथांचे कथन करणारे केशरयुक्त रंगाचे कथापौर्णिमा हे शब्द•••

लेखिकेच्या नावाप्रमाणेच पुनवेची छत्री घेऊन आपल्या शब्द चांदण्यांना लकाकते रूप देऊन प्रत्येक कथेतून साराचा पूर्णचंद्र घेऊन येणार याची ग्वाही••• 

तरीही एक कहाणी मला या चित्रातून समजली ती  कवितेतून सांगावी वाटते .

☆ सुरेल मैफिल ☆

रात सांगते एक कहाणी

चमचमणा-या ता-याची

गज-याला स्पर्श करून 

गंधाळणा-या वा-याची

 

वारा गाई एक गाणे 

लकेर घेऊन हास्याची

मंजूरवाने पुलकीत होऊन 

मोहरणा-या प्रितीची

 

प्रीत छेडी एक तराणा

साथ तया आरोहाची

अवरोह ये मागूती

सुरूवात मल्हाराची

 

मल्हार हा भारी जीवन

साथ तया असे तुझी 

भूपाळी ते भैरवी

सुरेल मैफिल दोघांची 

हे सगळे म्हणजे कथापौर्णिमा या कथासंग्रहाचे मुखपृष्ठ. या कथा संग्रहात १५ कथा असल्याने दिलेले कथापौर्णिमा हे नाव संयुक्तिक असले तरी कितीतरी कथाबिजे मनात देणारे हे मुखपृष्ठ आहे एवढे नक्की. 

इतके बोलके मुखपृष्ठ करणार्‍या गंगाधर हवालदार यांना धन्यवाद आणि या मुखपृष्ठाची निवड केली म्हणून रसिक आंतरभारतीचे प्रकाशक नांदुरकर आणि लेखिका पूनम छत्रे यांचे आभार.

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ३६ आकडा आणि ६३ आकडा ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ ३६ आकडा आणि ६३ आकडा ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

” ३६ आकडा आणि ६३ आकडा ”  हे दोन अंक शिकवतात जीवनातील सत्य स्वरूप . 

३६ आकड्याचा विचार केला तर, तीन आणि सहा दोन्ही आकडे एकमेकांकडे पहात नाहीत. दोघेही टाईट पणाने पाठीला पाठ लावून उभी आहेत. एकमेकांचं तोंडही पहात नाहीत.

त्याप्रमाणे माणसांचं असतं. छत्तीसचा आकडा हा चाळिशीच्या आतला आहे. म्हणून चाळीशीच्या आत माणूस सुद्धा अहंकाराने, ताकदीने, पैशाने, परिपक्व असल्यामुळे तो नेहमीच अहंकारी असतो. कमीपणा घेत नाही. मला गरज नाही, मी त्याचं तोंड पाहणार नाही, असे शब्द त्याच्या तोंडात असतात. सख्ये भाऊ पक्के वैरी होतात. आणि हातात हात न घेता पाठीला पाठ लावतात. 

आता ६३ आकडा पहा.

या आकड्याने साठी ओलांडल्यामुळे आता हे दोघेही नम्र झालेत. दोन्ही आकडे एकमेकांकडे पाहतात. हातात हात घेतात. एकमेकाला आलिंगन देतात. माणसाचं असंच असतं, एकदा साठी ओलांडली की, नम्र होतो. कारण ना ताकद, ना तारुण्य, ना पैसा, ना सत्ता, काहीच राहत नाही. म्हणून हा नम्र होतो. तुम्ही पहा, माणूस तरुणपणी बालपण विसरतो, लग्न झाल्यावर आई वडिलांना विसरतो, मुलं झाल्यावर भावांना विसरतो, पैसा आला की आपले नातेवाईक विसरतो, आणि म्हातारपणी, जेवढ्यांना विसरला होता त्यांची आठवण काढत बसतो. 

६३ च्या या आकड्याप्रमाणेच संयम राखणे हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे. कारण एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना नाहीसा करतो.    

वयाने कोणी कितीही लहान मोठा असू देत. वास्तवात तोच मोठा असतो, ज्याच्या मनात सर्वासाठी प्रेम, स्नेह व आदर असतो. आयुष्यात तुमच्या सगळ्या अडचणी सोडवू शकेल अशी व्यक्ती शोधू नका. तर,, तुम्हाला कोणत्याही अडचणीत एकटे सोडणार नाही अशी व्यक्ती शोधा…!!

लेखक : अज्ञात 

संग्रहिका : स्मिता पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ पुस्तक “बापू माझी आई” – मनुबहेन गांधी ☆ परिचय – श्री ओंकार कुंभार ☆

☆ पुस्तकांवरबोलू काही ☆ पुस्तक “बापू माझी आई” – मनुबहेन गांधी ☆ परिचय – श्री ओंकार कुंभार ☆ 

लेखिका : मनुबहेन गांधी 

प्रकाशक : नवजीवन प्रकाशन 

लांबी रुंदीला छोटेसे व पानेही 56 इतकेच व फक्त 15₹ किंमत असणारे नवजीवन प्रकाशनाचे हे पुस्तक तसे महत्वाचेच व आशयघन ही.

गांधींची नातेवाईक मनुबहेन गांधी यांचं ‘भावनगर समाचार’ मध्ये प्रकाशित झालेल्या डझनभर लेखांचे हे पुस्तक होय.                 

मनुबहेन यांचा हा लेख लिहिण्याचा पहिलाच प्रयत्न. बापूजींच्यासोबत एका कठीण काळात नोआखली मध्ये राहण्याचा भाग्ययोग त्यांना लाभला. तत्संबंधीचा हा महत्वपूर्ण असा ऐतिहासिक दस्तऐवजच मानला पाहिजे.          

बापूजींच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पदर यात उलगडताना आपणाला पहायला मिळतात. काही प्रसंगांमधील बापूजींचे वागणे कसे होते. व त्यांची वैचारिक पातळी किती उच्च दर्जाची होती ते या लेख संग्रहातून जाणवते. जसे मनुबहेन यांना नोआखलीतील शांततेच्या कामासाठी रात्री २ वा. उठवताना सांगितलेला महत्वाचा संदेश. 

बापूजींचे सहकारी सतीशबाबू यांनी एक झोपडी तयार केली होती जीचे एक-एक भाग लहान मुलांनाही वाहून नेता येतील व कुठेही ती झोपडी वसवता येईल. जेणेकरून बापूजींना त्यानिमित्ताने या हिंदू-मुस्लिम ऐक्याच्या कामात थोडी उसंतही मिळावी. परंतु, एकदा एका गावात ती झोपडी वापरल्यानंतर त्या गावातील भयंकर परिस्थिती पाहून आपणाला अशा झोपडीत ही राहण्याचा अधिकार नाही असे जाणून त्या झोपडी चे रुपांतर एका लहान इस्पितळात करण्यास सांगितले. असे अनेक प्रसंग आपणास वाचण्यासाठी मुळातूनच हे पुस्तक वाचायला हवे.  धन्यवाद !

परिचय –  श्री ओंकार कुंभार

श्रीशैल्य पार्क, हरिपूर सांगली.

मो.नं. 9921108879

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares