गोष्टी गावां शहरांकडील हे पुस्तकाचे नाव आणि मुखपृष्ठावर दोन चित्रे एक गावाचे एक शहराचे यावरून सहजच सगळ्यांना समजते गाव आणि शहर यामधील गोष्टी लेखक सांगणार आहेत
पण नीट विचार करता लक्षात येते की गाव आणि शहर दाखवले असले तरी यावर विचार करण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत
१) अगदी पहिल्यांदा एक खेळ आठवला ज्यामध्ये दोन चित्रातील फरक ओळखा असे लिहिलेले असते आणि प्रामुख्याने फरक लक्षात येतो तो म्हणजे एक गाव आहे एक शहर आहे
२) मग रेखाटनावरून लक्षात येते ते गावाची बैठक आणि शहराची ठेवण
३) अजून विचार करता गावातील नैसर्गिकता आणि शहरातील कृत्रिमता प्रामुख्याने जाणवते
४) गावाकडचे वातावरण आणि शहराचे वातावरण हे देखील चटकन लक्षात येते
५) थोडा अजून विचार करता लक्षात येते की गावाकडची संस्कृती आणि शहराची संस्कृती या दोन संस्कृतीमध्ये असलेला फरक दाखवायचा आहे
६) अजून खोल विचार करता असे लक्षात येते की गावाची जागा आता शहराने घेतलेली आहे आणि ही खूप चिंताजनक गोष्ट आहे
७) गावाचे प्रतिबिंब मनात शहराचे रूप घेऊन येते आणि हा एक प्रगतीचा आरसा वाटतो
८) जमिनीची ओढ संपून आकाशाला हात लावण्याची वृत्ती निर्माण झालेली असल्याने छोटी बैठी घर जाऊन गगनचुंबी इमारती आलेल्या आहेत हे जरी समाधानकारक असले तरी तितकेच घातकही आहे
९) गाव आणि शहर या दोन्ही राहणीमानामध्ये पडलेला फरकही उद्धृत होतो
१०) नाईलाजाने शहराकडे आलेला आजोबा आपल्या नातवाला आमच्या वेळी की नाही असे म्हणून जेव्हा गोष्टी सांगतो तेव्हा त्याच्या नजरेसमोर येणार गाव आणि आत्ताच शहर हे हे त्याच्या दोन डोळ्यात दिसणारे चित्र स्पष्ट केलेले आहे
११) बारकाईने पाहता असे लक्षात येते की गावाकडच्या झाडांचा रंग आणि शहरातील झाडांचा रंग यामध्ये फरक दाखवलेला आहे तो म्हणजे नैसर्गिक रित्या वाढलेली झाडे किती छान दिसतात आणि कृत्रिम रित्या वाढवलेली झाडे जरी वाढली तरी ती कशी खुरटी खुरटलेलीच दिसतात
१२) गावाकडील मोकळी जागा मोकळे वातावरण हिरवी जमीन शहरातील कोंडतं वातावरण गजबजीत जागा आणि सिमेंट जंगल
१३) मोकळ्या हवेमुळे निर्माण झालेली प्रसन्नता कोंदट हवेने प्रदूषण वाढल्याने निर्माण झालेला तणाव
१४) लेखकाच्या दृष्टीचा पडलेला गाव आणि शहरावरचा प्रकाशझोत
अशा अनेक कल्पनांना वाव देणारे साधेसे चित्र पण अतिशय चिंतनीय. विचारशील असे हे चित्र. रमेश नावडकर यांनी चितारलेले विषय पूरक असे असून साध्या गोष्टीतूनही सामाजिक भान जागे करणारे असे आहे त्याची निवड प्रकाशक उषा अनिल प्रकाशनच्या उषा अनिल शिंदे यांनी केली आणि लेखक नारायण कुंभार यांनी त्याला मान्यता दिली म्हणून त्यांचे मन:पूर्वक आभार
अळवावरचं पाणी हे पुस्तक हातात आले. मुखपृष्ठच इतके छान.. .हिरव्या पानावर मोत्यासारखे चमकणारे जलबिंदू… काय म्हणायचे असेल लेखिकेला?— आयुष्य म्हणजे अळवावरचे पाणी, ते घरंगळून जाते.
आयुष्यातल्या कटू आठवणी, कुणाबद्दलही कटुता मनात न ठेवता केलेला हा उषाताईंचा जीवनप्रवास.
त्यांनी जशा आठवतील तशा आठवणी राधिकाताईंना सांगितल्या. त्यांनी त्या टिपून घेतल्या आणि शब्दांकित करून या पुस्तकरूपाने आपल्यासमोर ठेवल्या.
एका कर्तृत्वावान स्त्रीची ही जीवनगाथा खूप प्रेरणादायी आहे.
सौ.राधिका भांडारकर
राधिकाताईने या पुस्तकात उषाताईंच्या जीवनयात्रेचे विविध पैलू दाखविण्यासाठी ३१ भाग केले आहेत.
कुठलेही पान उघडून कुठलेही पान वाचले तरी त्यातून एक मनस्विनी, कार्यरत, संवेदनाशील झुंजार व्यक्त्तिमत्वाचे दर्शन होते. प्रत्येक प्रसंग डोळ्यासमोर जसाचा तसा उभा राहतो.अंगावर सरसरून काटा येतो.
उषाताईंचे लहानपण अमळनेर येथे गेले. त्यांना सानेगुरुजींचा सहवास मिळाला.त्यांचे संस्कार बालवयातच घडले. राष्ट्रीय भावना ,सामाजिक बांधिलकी, धर्मसहिष्णुतेची रेघ मनावर कोरली गेली. घरी हरिजनांची वेगळी पंगत गुरूजींनी बंद केली. खेडेगावातील वसतिगृहातील मुलांना उषाताईंची आई घरी जेवण द्यायची. त्यामुळे माणुसकीचा धर्म मनावर लहानपणापासून बिंबला.
हा काळ होता १९४० ते १९७५ पर्यंतचा. त्याकाळी मुला मुलींत आईवडील खूप भेदभाव करत.
मुलांना दूध तर मुलींना ताक… का तर सासरी दूध मिळाले नाही तर मुलीला सवय असावी.
मुलीला नहाण आले की तिच्या लग्नाची बोलणी सुरू. मुलींना सारखा नन्नाचा पाढा.हे करू नको,ते करू नको. पाचवारी साडी नेण्यासाठी सुद्धा संघर्ष करावा लागे.
— हा संघर्ष करताना उषाताईंना जाणवले की त्या प्रतिकार करू शकतात. त्यांच्या संवेदना प्रखर आहेत. त्या इतरांहून वेगळ्या आहेत….. राधिकाताईंनी हे मनाचे हेलकावे सुंदर टिपले आहेत.
उषाताईंमधली कार्यकर्ती त्यांना स्वस्थ बसू देत नसे. पुण्यातील कामगार महिलांना संघटित करुन त्यांना शिवणकाम शिकविले. महिलांना मोठ्या ऑर्डर मिळवून दिल्या. कांग्रेस भवन उद्योगाने भरले. महिलांना रोजगार मिळाला. मालाची ने आण उषाताई स्वतः करीत. पण आबासाहेब खेडकरांनी वैयक्तिक अधिकारात परवानगी देऊन सुद्धा विरोधकांच्या पोटदुखीमुळे काँग्रेस भवन खाली करावे लागले.
असे खच्चीकरणाचे प्रसंग वेळोवेळी आले. विरोधक त्यांना नामशेष करण्याचा प्रयत्न करत होते. त्यांची खिल्ली उडवीत होते. समाजातील हा कडवट अंतःप्रवाह त्यांची उमेद जाळत होते… परंतु त्यांची जिद्द त्यामुळे वाढली.
सामाजिक कार्यासाठी त्यांनी त्यांचे कौटुंबिक जीवनही कसे पणाला लावले याचे वर्णन राधिकाताईंनी केले आहे. मात्र त्यांचे कुटुंबीय भक्कमपणे त्यांच्या पाठीशी सदैव होते.
उषाताईंचे यजमान श्री.चौधरी त्यांना सांगत, “समाजकार्य करायचे असेल तर भविष्यात पदरात दगड धोंडे पडतील.ते झेलण्याची तयारी ठेव. तू पक्की रहा. नंतर खचू नकोस. मी खंबीर आहे.”
‘उषाताई वाईट चालीची बाई आहे, तिचे पदस्थांशी अनैतिक संबंध आहेत ‘… इतक्या खालच्या पातळीवरची चिखलफेक विरोधकांनी केली. .परंतु तरीही त्यांचा संसार अबाधित राहिला.कारण श्री.चौधरी यांचे भक्कम कवच त्यांच्या पाठीशी होते. सालस मुलगी अलका, हुषार मुलगा अजय, देवमाणसासारखा जावई सतीश, समंजस सून, सूनेचे आई वडील, सर्वांचा त्यांना सदैव पाठिंबा मिळाला.
राजकारणात त्यांना जसे पाय मागे खेचणारे भेटले तसेच त्यांच्या कार्याची जाणीव ठेवून मदतीचा हात पुढे करणारेही भेटले. मुख्यमंत्री वसंतराव नाईक, इंदिरा गांधी, यांना कदर होती. त्यांच्या कार्याला स्वतःहून देणगी देणारे ही भेटले. तरीही राजकारणातून त्यांचे मन उबगले.
करायची इच्छा असेल तर करता येण्यासारखे खूप असते.. उषाताई म्हणतात, “ मी दैववादी नव्हते. श्रमवादी होते. काहीतरी सृजनशील करावे ही मनाची भूक. समाजकार्याची तळमळ असेल तर त्यासाठी राजकीय पदाची आवश्यकता नाही. दुसरे माध्यम असू शकते. राजकारणात कधी कधी तत्त्वांची गळचेपी होते. जनतेचा फायदा व्हावा म्हणून मी झटले. परंतु त्यामुळे मी वैरभाव ओढवून घेतला. पक्षाच्या गणितात माझी वजाबाकी झाली. परंतु शेवटी महत्वाचे काय? कामगारांचे कल्याण की माझे राजकीय स्थैर्य?
एखादे कार्य हाती घ्यावे .. उदा. महिला उद्योजक संघाची स्थापना. बी पेरावे,अंकुर फुटावा, त्याने जोम धरावा, आणि विरोधकांचे वादळ उठावे.हा अनुभव प्रत्येकवेळी आला. त्यामुळे सतत अडथळे ओलांडावे लागले. त्यामुळे मी जीवन जगायला शिकले.”
राधिकाताईंनी उषाताईंच्या आयुष्यातील प्रत्येक प्रसंग चित्तथरारक रितीने शब्दांकन केला आहे. असं वाटतं की आपल्यावर असा प्रसंग ओढवला असता तर ! प्रत्येक प्रसंग जीवनाला कसे सकारात्मक सामोरे जायचे हे दर्शवितो.
उषाताईंचे आयुष्य म्हणजे अर्धा पेला सुखाचा, अर्धा पेला दुःखाचा. एक घोट गोड तर एक घोट कडू.
आज उषाताई हयात नाहीत. परंतु त्यांची कार्यप्रणाली चालू राहील.
आयुष्याच्या संध्याकाळी त्यांच्या मनात कुणाबद्दलही कडवटपणा नाही.आकस नाही.
अळवावरच्या पाण्यासारखा तो ही त्यांनी घरंगळून दिला. निराधार, परित्यक्ता, असहाय्य,अगतिक स्त्रियांसाठी त्या शेवटपर्यंत झटल्या. त्यासाठी कुठले पद नको, हुद्दा नको,.. त्यांच्याकडे होते समाजशील मन.
या पुस्तकाबद्दल लिहावे तेवढे थोडेच. भाषा अतिशय साधी, सरळ, सोपी पण काळजाचा ठाव घेणारी. अंतःकरण हेलावून टाकणारे हे चरित्र आहे. शिवाय या पुस्तकासोबत उषाताईंच्या कुटुंबियांनीही त्यांच्याविषयीच्या आठवणी आत्मीयतेने आणि कृतज्ञ भावनेने लिहिल्या आहेत. सर्वार्थाने हे पुस्तक सुरेख आहे. सर्वांनी जरूर वाचावे व संग्रही ठेवावे असे हे पुस्तक आहे.
राधिकाताई उत्कृष्ट कथालेखिका आहेत,.कवयित्री आहेत. हा चरित्रात्मक प्रकारही त्यांनी अप्रतिमपणे मांडला आहे. मी त्यांना या पुस्तकासाठी व त्यांच्या पुढील लिखाणासाठी खूप खूप शुभेच्छा देते.
परिचय : सौ.अंजोर चाफेकर, मुंबई.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
एक वरून पांढरा आणि खालून काळा असलेला ढग. त्यातून ठिबकणारे पाणी. असा ढग पेलणारा एक हात.
असे चित्र पहिले आणि मन विचारात गुंतले. या ठिबकणाऱ्या थेंबाप्रमाणे अर्थाचे एक एक सिंचन होऊ लागले.
१) पहिल्यांदा गाणे आठवले जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे… निराधार आभाळाचा तोच भार साहे. खरंच निराधार आभाळाला पेलणारा अदृश्य हात दृश्य झाला तर कदाचित असाच दिसेल.
२) एक ढग जो पांढरा आहे तोच भरून आला तर काळा होतो आणि आपुलकीचा स्पर्श झाला की आपोआप ठिबकू लागतो.
३) कितीही मोठ होऊन आभाळाला हात लावले तरी आभाळाचं मन पाणी रूपाने येऊन जमिनीची ओढ घेते
४) आभाळ कवेत घेऊ पाहणाऱ्या हाताचा स्पर्श झाला की आभाळ ही बोलके होऊन थेंब रूपाने बोलू लागते
५) आभाळाला हात टेकवणारी व्यक्ती नक्कीच सामर्थ्यशाली असते
६) आभाळाचा अर्थ जीवनाशी संलग्न घेतला तर जीवनातील दुःखाने रडू येते किंवा सुखाने ही डोळ्यात आसू येतात त्याचप्रमाणे वेगवेगळ्या वेळच्या आभाळातून डोकावणारे पाणी हे वेगवेगळे भाव दाखवून जाते
७) पावसाळी महिन्यातील वेगवेगळया महिन्यामध्ये आभाळाचे वेगवेगळे रूप दिसते आणि त्यातून पडणारा जो पाऊस असतो त्याचाही वेगळा वेगळा अर्थ जीवनाशी संदर्भात लागू शकतो
अशा विचारांमध्ये मग्न होत असतानाच लक्ष पुस्तकाच्या शीर्षकाकडे जाते मन आभाळ आभाळ मग त्याच्या संलग्न असे वेगवेगळे अर्थही यातून उध्रुत होतात.
८) मनाचे आभाळ ही वरून पांढरे दिसले तरी त्याच्या तळाशी खोल गाळ साचून ते काळे झालेले असते दुःखाच्या या काळेपणा आलेले अश्रू आपल्यातच सहन केले जातात.
९) मनातले विचार हे भावनांच्या रूपाने बरसत असतात. त्या बरसण्याचे रूप वेगवेगळे असते.
१०) आनंद ओसंडतो मेघ आभाळी पाहुनी
पण मनातला पाऊस पाहिला ना कोणी
११) सृजन काळ जवळ आलेला आहे त्यामुळे आकाशातील पाऊस जमिनीवर पडल्यावर काहीतरी अंकुरणार आहे तसेच मनातले आभाळ दाटून आले की विचार पावसाने काहीतरी लेखन निश्चित घडणार आहे
१२) मनातल्या पावसाला हात घातला की विचारांचे ओघ बाहेर पडून भावनांना अंकुर फुटतात
१३) कवयित्री स्त्री जाणिवा जाणत असल्यामुळे हे स्त्रीचे मन आहे असे धरले तर स्त्री आपले दुःख कोणाला दाखवत नाही ती वरच्या ढगाप्रमाणे असते आणि दुःख हे हृदयात ठेवलेले असते खालच्या काळ्या ढगाप्रमाणे आणि हा आपल्या आतच बरसत असतो.
१४) मन म्हणजे काय हे समजणे अवघड असले तरी मन हे आभाळासारखे असे मानले तर या मनाला पकडण्याचे मोठी ते घेण्याचे धैर्य सामर्थ्य घेऊन त्याला ओंजळीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.
अशा कितीतरी अन्वयार्थाने भावार्थानी सजलेले हे साधे से चित्र अरविंद शेलार यांनी काढलेले असून परिस पब्लिकेशन नी त्याची मुखपृष्ठ म्हणून निवड केली आणि कवयित्री वंदना इन्नाणी यांनी त्यास मान्यता दिली म्हणून त्यांचे मनःपूर्वक आभार
☆ “बोल बच्चन” – लेखक : श्री रूपेश दुबे – अनुवादिका – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
पुस्तक : बोल बच्चन
लेखक : रुपेश दुबे
अनुवाद : सौ. मंजुषा मुळे
प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे
पृष्ठे : १८८
मूल्य : रु. २५०/_
यशाची शिखरं गाठत जावं आणि तिथे कायम टिकून रहाव असं कुणाला वाटत नाही ? पण यश मिळवणं सोपं असतं का ? त्याचा पाठलाग करताना, ध्येय गाठताना अपयश आलं तर ? यशाचा मार्ग सोडून द्यायचा की खंबीरपणे पुढे जायचं ?
सौ. मंजुषा सुनीत मुळे
या सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यायचा पारंपारिक मार्ग म्हणजे उपदेश करणे. पण उपदेश ऐकून घेणार कोण ? त्यामुळे तेच कडू औषध आवडत्या गोड पदार्थांबरोबर दिल तर ? औषध सहज पचनी पडेल ना? नेमका हाच विचार श्री. रूपेश दुबे यांनी केला आहे.
श्री रुपेश दुबे यांनी सुमारे वीस वर्षे टेलिकॉम कंपनीत व्यवस्थापन क्षेत्रात उच्च पद भूषवून आता ते स्वतःचा व्यवसाय करत आहेत. ‘बोल बच्चन ‘ हे हिंदी भाषेतील पुस्तक त्यांनी लिहीले आहे. या पुस्तकाचा अनुवाद मराठीत सौ. मंजुषा मुळे यांनी केला आहे. हे अनुवादित पुस्तक अलिकडेच वाचून झाले. त्या पुस्तकाविषयी थोडसं.
काय आहे या पुस्तकात ?
अनुभवातून आलेले शहाणपण, सकारात्मकता आणि मनोरंजन यांचा सुरेख संगम म्हणजे हे पुस्तक. यशाचा मार्ग दाखवणारा आणि अपयश पचवायला शिकवणारा मार्गदर्शक म्हणून या पुस्तकाकडे पाहता येईल. मग इथे बच्चन म्हणजे अभिताभ बच्चन यांची काय संबंध असे वाटणे स्वाभाविक आहे. पण सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे कटू औषध पचवण्यासाठी, त्यावर गोड आवरण लावण्यासाठी बच्चनजींना आमंत्रित केलं गेलं आहे. अमिताभ बच्चन माहित नाहीत असा माणूस सापडणे विरळाच. त्यांचे चित्रपट व त्यातील भूमिका या तर प्रचंड गाजल्याच पण त्यांचे अनेक संवाद रसिकांना तोंडपाठ आहेत. त्यांच्यासाठी गायली गेलेली गीतेही लोकप्रिय झाली आहेत. याच लोकप्रियतेचा फायदा उठवून आपण जर काही सांगितले तर लोक सुरूवातीला उत्सुकतेपोटी आणि मग अधिक रस घेऊन वाचू लागतील असा विश्वास वाटल्यामुळेच लेखकाने हे तंत्र अवलंबले आहे. अमिताभजी यांनी प्रत्यक्ष जीवनात अनेक वेळेला अपयश पचवून यशाचे शिखर गाठले आहे. चित्रतटातील त्यांच्या बहुसंख्य भूमिका या संघर्षमय आहेत. त्यामुळे त्यांच्या तोंडून आलेले उद्गार, त्यांचे संवाद वाचकाला अधिक जवळचे वाटतात व मनाला जाऊन भिडतात.
लेखकाने या पुस्तकात यशाची १८ सूत्रे सांगितली आहेत. प्रत्येक सूत्र सांगण्यासाठी एक एक प्रकरण लिहिले आहे. या प्रकरणाला त्यांनी बच्चनजींचे प्रसिद्ध गीत किंवा संवाद शिर्षक म्हणून वापरले आहे. तेच शिर्षक का ठेवले आहे याचा उहापोह केला आहे. आपल्या प्रत्यक्ष जीवनात ते कसे लागू पडते हे उदाहरणे देऊन रंजकतेने पटवून दिले आहे. बोधकथेला तात्पर्य सांगावे त्याप्रमाणे लेखाच्या शेवटी लेखकाने चौकटीमध्ये एक अर्थपूर्ण असे वाक्यही दिले आहे. या वाक्याव्यतिरिक्त लेखातील अनेक वाक्ये सुभाषिताप्रमाणे वापरावीत अशी आहेत. त्यामुळे प्रत्येक लेख ज्ञान आणि मनोरंजन यांनी परिपूर्ण असा आहे.
फक्त एक उदाहरण पाहू. एका लेखाचं नाव आहे ‘ देखा एक ख्वाब ‘. अमिताभ बच्चन यांच्या सिलसिला या चित्रपटातील एका गीताचे सुरुवातीचे बोल. या गीताचा आधार घेऊन लेखकाने स्वप्न आणि सत्य यात असणारी तफावत कशामुळे असते त्याची कारणे शोधली आहेत. वास्तविकता काय असते त्याची जाणीव करून दिली आहे. मेहनतीशिवाय स्वप्ने पुरी होत नसतात. असामान्य यश मिळवणारी माणसं स्वप्नही असामान्य बघतात. उच्च बुद्धिमत्ता आणि कठोर परिश्रम
यामुळे ते स्वप्न पूर्ण करू शकतात. शेवटी वर उल्लेख केल्याप्रमाणे एका चौकटीत लिहीतात ” स्वप्न बघा, मोठी मोठी स्वप्नं बघा आणि ती पूर्ण करण्यासाठी स्वतःचा विचार, सामर्थ्य आणि सकारात्मकता या सगळ्या गोष्टींना एकाच दिशेने म्हणजे अर्थातच तुमच्या ध्येयाच्या दिशेने कार्यान्वित करा. “
अशाप्रकारे लेखाची मांडणी करून अठरा लेखांमधून यशाची अठरा सूत्रे सांगितली आहेत.
हे पुस्तक आपण मराठीतून वाचतो. पण सौ. मंजुषा मुळे यांनी अनुवाद करताना वापरलेली भाषा इतकी नैसर्गिक वापरली आहे की हा अनुवाद आहे असे वाटतच नाही. मराठीत वेगळ्या विषयावरचे पुस्तक आणल्याबद्दल त्यांना मनःपूर्वक धन्यवाद.
सर्वांनीच, विशेषतः युवकांनी हे पुस्तक आवर्जून वाचावे असे वाटते. आयुष्याची जडण घडण करण्यासाठी ते नक्कीच उपयुक्त ठरेल.
पुन्हा एकदा अनुवादकर्त्या सौ. मंजुषा मुळे यांना धन्यवाद !
पुस्तक परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
एका व्यक्तीची गडद सावली सारखी आकृती. तिच्या हातात मुळापासून उखडलेले झाड आणि झाडावर जाणवणारी फडफड.
किती गूढ चित्र आहे हे••• मग शिर्षकावर नजर गेली, प्रश्न टांगले आभाळाला. आणि त्यातून त्या व्यक्तीच्या मनात येणारे पुष्कळ प्रश्न विचारांच्या झाडाला टांगून ठेवलेले असावेत आणि हे विचारांचे झाड मुळापासून कोणीतरी उपटावे आणि क्षणार्धात ते प्रश्न आभाळाला जाऊन भिडावे असे त्या व्यक्तीच्या मनात आहे का असे वाटले.
खरोखर कुतुहल जागे झाले आणि त्या चित्राभोवती मन पिंगा घालू लागले. अशा गूढ चित्राचे वेगवेगळे अर्थ लावू लागले.
०१) नीट पाहिले तर ती व्यक्ती धरती मातेचे रूप वाटली . या जमीनीच्या आत अर्थात भूगर्भात कितीतरी हालचालींच्या जाणिवा होत असताना त्याच्याशी निगडीत असलेले झाडच जर मुळासकट तोडले नव्हे तर उखडले••• तर या काळ्या आईला किती वेदना होतील? ते झाड उखडले तरी वेदनांनी वाकलेली आई आपल्या या लेकराला आपल्या हातात झेलते. पण त्याचा जीव वाचवणे आता आपल्या हातात नाही म्हणून त्या झाडाची फडफड, तडफड तिच्या काळजाला पुन्हा पुन्हा जाणवते आणि मग हे असे का असा येणारा प्रश्न, हे माझ्याच बाबतीत का? असा प्रश्न, कधी थांबणार अन्यायाचा कल्लोळ हे सगळे प्रश्न आकाशा एवढे मोठे होऊन आभाळाला भिडतात.
०२) ती आकृती स्त्रीची मानली तर स्त्रीभृणहत्येचे झालेले आकाशा एवढे विराट रूप इतर अनेक समस्यांचे झाड होऊन त्या झाडाला तरी कसे नष्ट करणार असे प्रश्न जणू आभाळाला भिडले आहेत.
०३) ही आकृती एका मानवाची मानले तर त्याच्या मनातले समस्यांचे झाड मुळापासून उपटले तरी ते त्याच्याही नकळत त्याने आपल्याच हातात झेलले आहे. आता या समस्यांच्या झाडाला असलेले अनेक प्रश्न मग मोठे होऊन त्या भाराने त्या प्रश्नांच्या दबावाने हा मानव वाकला आहे.
०४) थोडे बारकाईने बघितले तर वृक्षतोडीने सिमेंट जंगल वाढताना या वृक्षतोडीमुळे निर्माण झालेले पक्ष्यांच्या घरट्यांचे प्रश्न, जमीनीच्या धूपेचा प्रश्न, स्थलांतर न होऊ शकणार्या गोष्टींचा प्रश्न अशा अनेक जाणिवांचे प्रश्न फार मोठे आहेत हे सुचवायचे आहे.
०५) थोडी दृष्टी विचार केली तर पृथ्वीचा अर्धा गोल वाटतो . म्हणजेच मानवाच्या मनातील प्रश्न हे वैयक्तिक , सामाजिक न रहाता वैश्विक प्रश्न आहेत हे सुचवून त्यातील महानता आभाळ शब्दात व्यक्त होते.
०६) उखडून फेकून द्याव्याशा वाटणार्या असंख्य प्रश्नांची लक्तरे होऊन ती आभाळाला भेडसावू लागली आहेत.
०७) अंतरंगात डोकावले तर कळते नितीन देशमुख यांचा हा गझलसंग्रह आहे. त्यातून अनेक समस्यांकडे पाहून निर्माण झालेले शेर आहेत. अनेक जाणिवांतून उठलेले वादळ आहे, अनेक तरणोपाय नसलेल्या प्रश्नांवरचे मंथन आहे.म्हणून त्या अनुषंगाने आलेले नाव आणि त्याला साजेसे असे हे चित्र आहे.
०८) अन्वयार्थाने विचारांची जमीन असलेला उला आणि उच्च खयालांची उकल असलेला सानी या दोन्ही मिसर्यामधे होणारी मनाची खळबळ या चित्रात सांगायचा प्रयत्न केला आहे.
असे अनेक मतितार्थ , अन्वयार्थ ,भावार्थ असलेले मुखपृष्ठ प्रतिमा पब्लिकेशन्सच्या दीपक आणि अस्मिता चांदणे यांनी निवडले आणि श्री नितीन देशमुख यांनी स्विकारले त्याबद्दल त्यांना मन:पूर्वक धन्यवाद !!
शिक्षा – M. A., B. Ed., M. S. W., Y. C. B. Yoga level 2. (सेवानिवृत्त)
मला वाचनाची व लेखनाची आवड सुरवाती पासूनच आहे. मी पुस्तक वाचले की त्या माझा अभिप्राय विषयी लिहतेच. मी गेली 15 वर्षे योग व प्राणायामचे क्लास घेते आहे. मला सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे अनेक सामाजिक संस्थांना भेटी देऊन त्यांच्या कार्याची पद्धत समजून घेतली आहे.त्या पद्धतीने मी स्वतः सामाजिक काम करते आहे.
बिकट वाट… – सहा महिलांचा जीवनसंघर्ष – सुश्री नीती बडवे
नीती बडवे या पुणे विद्यापीठात जर्मन भाषेचे अध्ययन-अध्यापन करत असताना, त्यांनी जर्मन भाषिकांना आपल्या नजरेतून भारतातील सर्वसामान्य बायकांच्या मानसिक बळाच्या आणि अंतरिक शक्तीच्या गोष्टी जर्मन भाषेतूनच सांगण्याच्या निमित्ताने एक प्रकल्प हाती घेतला. त्यांनी ठाणे – रायगड जिल्ह्यातील आदिवासी महिलांच्या मुलाखती घेतल्या.त्या अगोदर जर्मन भाषेत प्रसिद्ध केल्या. नंतर या मुलाखती मराठीतून बिकट वाट…….सहा महिलांचा जीवन संघर्ष या पुस्तकातून वाचकांसमोर ठेवल्या आहेत. यामध्ये एकूण सहा महिलांच्या मुलाखती दिल्या आहेत. प्रत्येकीची कहाणी वेगळी. पण जगण्याची आणि जगवण्याची जिद्द, कोणत्याही संकंटा समोर हतबल न होता लढा देण्याची हिंमत मात्र सारखीच. अशा या माझ्या मैत्रिणी जीवनात यशस्वी झाल्या आहेत.
सुभद्राबाई चार बहिणी व भाऊ. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची. त्यामुळे शाळे ऐवजी वडिलांसोबत अगदी लहानपणापासूनच हातात कोयता घेऊन कामावर जावे लागे.लहान वयातच ज्या व्यक्तीला पहिली पाच मुलं आहेत पत्नी देवाघरी जाऊन महिनाच झाला आहे. अशा व्यक्तीशी सुभद्राबाईचा नाईलाजाने विवाह झाला. सासरीही परिस्थिती अशीच नवरा रोज कामाला जायचा आणि सुभद्राबाई घरातल्या पाच मुलांचा सांभाळ करायची. थोड्या दिवसांनी तिलाही दिवस गेले. ती गरोदर असतानाच सासूने त्यांना घराबाहेर काढले. रहायला जागा नाही, खायला कांही नाही. वडील चार दिवस पुरेल इतके सामान देऊन गेले. चार दिवसांनी ही नऊ महिन्याची गरोदर असूनही रोजगाराला जाऊ लागली. घरातून बाहेर काढल्यानंतर आठव्याच दिवशी बाळंतपण झालं मुलगा झाला. घर म्हणजे अडोसा फक्त. तिने पाचव्या दिवशी कुटुंबनियोजन ऑपरेशन करून घेतले.तिच्या सावत्र मुलीने की जी फक्त नऊ वर्षाची होती तिने आईचे पाच आठवडे बाळंतपण केले. घरात खाण्यापिण्याची वानवाच असल्यामुळे ती घरी बसून गोधडी शिवू लागली. एक गोधडी शिवली की १००₹ मिळायचे. त्यातून ती पैसे साठवू लागली.असंच सुभद्राबाईला एका मैत्रिणी कडून महिला गट व हॅलो या सामाजिक संस्थेची माहिती मिळाली. त्यातून ती बचत गटाशी जोडली गेली व बचत करू लागली. तेही नवऱ्याला न समजता. एक दिवस नवऱ्याला आर्थिक अडचण आल्यामुळे त्याने बायकोकडे मला कुठूनही पैसे आणून दे अशी मागणी केली. यावेळी तिने आपल्या नवऱ्याला या बचत गटाविषयी माहिती दिली. नवऱ्याला पैशाची गरज असल्यामुळे त्याने तिला बचत गटाच्या सभेंना हजर राहण्याची परवानगी दिली. प्रथम या बचत गटातून पाचशे रुपये कर्ज घेऊन गाय विकत घेतली व तिथून त्या दोघांच्या लघु उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली गेली. कांही दिवस गाई घेणं विकणे, नंतर गोबर गॅस त्यावर चालणारे शेवया मशीन, तेल घाणा असे उद्योग सुरु केले. आपल्या सोबतच इतरांनाही यासाठी प्रोत्साहन दिले. कर्ज काढणं, वेळेत फेडणे, नवनवीन छोटे व्यवसाय, उत्पादित मालाची विक्री हे सर्व त्या करू लागल्या.. हे करत असताना अडचणी तर नेहमीच येत राहिल्या. अडचणी धीराने, संयमाने सोडविल्या . लहान वयात लग्न झाले. निरक्षर तरीही, सगळ्यांना आपलं मानून नेटाने आपला संसार केला आणि इतर मैत्रिणींचेही संसार उभी करणारी सुभद्राबाई.
अक्कलकोट तालुक्यातील दहीठण या गावची नागिणी सुरवातीला 11 वी पर्यत शिक्षण झाले. पुढे शिक्षणाची इच्छा असूनही न शिकता आलेली नागिणी. 11 वी नंतर मात्र तिच्या वडिलांनी तिच्या इच्छेविरुद्ध मामाशी लग्न लावून दिले.सुरवातीला शेतमजूर नंतर पुण्यात हमालीचे काम मिळाल्याने तो नगिणीला घेऊन पुण्याला गेला. हमाली करत असल्यामुळे एखाद्या गाडी सोबत तो चार -आठ दिवस बाहेरच असे. नागिणीला आपण रिकामं बसून वेळ घालवतो आहे. या विचाराने ती सतत नाराज असे. दोन वर्षांनी ती गरोदर असल्यामुळे बाळंतपणासाठी माहेरी आली. मुलगी झाली ती आपल्या बाळाला घेऊन पुन्हा पुण्याला न जाता सासू जवळच राहिली. आता सासरी ती, तिचं बाळ, सासू, व अपंग दिर की त्याच सर्व करावे लागे. तरीही ती सासरीच राहिली. थोडया दिवसांनी नवराही गावीच येऊन काम करू लागला. तेवढ्यात दुसरे मुलही झाले.पण इकडे नवऱ्याची तब्बेत सतत बिघडू लागली.त्यामुळे तो अधिक अधिक खंगत गेल्याने तो घरीच बसून असे. एक दिवस हॅलो फाउंडेशन च्या कार्यकर्त्यांना शिकलेली महिला हवी होती, की जी घरोघरी जाऊन आरोग्या संबधी माहिती देऊ शकेल. म्हणून गावकरी तिला घरी बोलवायला आले.कारण पुर्ण गावात ती एकटी शिक्षित महिला होती. ती त्या सभेला गेली पाठोपाठ नवराही गेला आणि जेंव्हा तिला कार्यकर्त्यांनी या कामासंबंधी विचारले तेंव्हा ती गोंधळून गेली. पण नवऱ्याने ती हे काम करेल म्हणून सांगितले.तेंव्हा तिलाही आश्चर्य वाटले.कारण घरी मुलं लहान, दिर अपंग, नवरा कामावर जात नाही आणि तिला प्रशिक्षणासाठी तीन आठवड्यांसाठी शहरात जावे लागणार होते. नवऱ्याच्या सहकार्यामुळे तीने तो कोर्स पूर्ण केला. त्या कोर्स मध्ये तिला शरीर रचना, व्याधी, औषधं याची माहिती मिळत होती. त्यामुळे ती नवऱ्याच्या आजराविषयी सजग झाली. कोर्स पुर्ण करून आल्याबरोबर नवऱ्याला घेऊन दवाखान्यात गेली. तिने डॉक्टरांना मी भारत वैद्य हा कोर्स केला असल्याचे सांगितले. डॉक्टरनी नवऱ्याची रिपोर्ट पाहून कांही न बोलता तिच्या हातात एड्स माहिती पुस्तिका दिली. तिची शंका खरी ठरली. तिच्या वयाच्या २१ व्या वर्षी तिला वैध्यव्य आले. ती दुःखी, निराश झाली.त्याचवेळी फाउंडेशनचे लोक तिच्या मदतीला आले. तिला सोबत घेऊन ते वस्तीवर जाऊन सर्वे करू लागले. हे काम नागिणी मनापासून करू लागली. फाउंडेशनच्या लोकांसोबतच आनंदवनला गेली. तिथल्या लोकांच्या कामाच्या पद्धतीने ती भारावून गेली. तिथून परतल्यावर कामाला लागली. पण नवरा एड्सने गेल्यामुळे लोक तिला टाळू लागले, तिच्याकडून औषधं घेत नसत. शिवाय ऐन तारुण्यात आलेलं वैध्यव्य यामुळेही तिला त्रास सहन करावा लागला. या सर्व अडचणीवर मात करून ती भारत वैद्य कामात यशस्वी ठरली. त्यानंतर महिला बचत गट तयार केले.गावाला २००१ चे स्वच्छता अभियानचे बक्षीस मिळवून दिले. दारूबंदी वरतीही काम करते.. नर्सिंग कोर्स केला. या सगळ्यातून मिळणार मानधन अत्यंत तुटपुंज तरीही आपल्या बांधवांसाठी काम करतो याचे समाधान नागिणीला आहे.अशी समाजबांधवांसाठी धडपडणारी नागिणी.
नीरा ही दहावी नापास. वरसई गावची ठाकर जमातीतील. वडील एका शिक्षकाच्या घरी काम करत होते. त्या शिक्षकांच्या सांगण्यावरून त्यांनी नीराला शाळेत घातले. तिच्या सोबत तीन मुलीही शाळेत जाऊ लागल्या. ती आश्रम शाळा असल्याने तिथेच राहण्याची सोय देखील होती. पण मुलींना घर सोडून रहायची सवय नसल्याने त्या सतत घरी पळून येत. निराच्या आजोबांनी मात्र नीराला एकटं वाटू नये म्हणून एकांच्या घरीच ठेवले. त्यामुळे नीरा नियमित शाळेत जाऊ लागली. आठवी ते दहावी पर्यंत तिला दररोज आठ कि.मी. चालत जावे लागे. नीराला दहावी पास होता आलं नाही याची खंत आहे.पण कांही तरी काम करण्याची इच्छा असल्याने ती अंकुर या सेवाभावी संस्थेची जोडली गेली. तीने समजसेविका प्रशिक्षणाचा कोर्स केला. या कोर्समुळे तिला बरेच काही शिकता आलं. सुरुवातीला संस्थेने तिच्यावरती तीस झोपड्यांच्या ठाकरवाडीची जबाबदारी दिली. कांही दिवसांनी आणखी पाच वड्यांची जबाबदारी दिली. तेथील वाड्यावस्त्यावरील मुलांना शाळेत जाण्याची प्राथमिक तयारी करून घेण्यासाठी अंगणवाडी निर्माण करणे. हे अवघड काम सहज तिने केले. यानंतर तिने वाड्यावस्तीवरील लोक भारताचे नागरिक आहेत हे सिद्ध केले. वाडीचं अस्तित्व कायद्याने मान्य करून घेतले. वाडया जवळच्या पंचायत क्षेत्राला जोडून घेतल्या. आदिवासी बांधवांना जमिनीवर त्यांचा हक्क मिळवून दिला . वस्तीवरील सर्व लोक अशिक्षित असल्यामुळे सर्व तिलाच करावे लागत होते.त्यासाठी सर्वे करणं, फॉर्म भरणं, तालुक्याच्या, जिल्ह्याच्या ठिकाणी जाणं. प्रसंगी मंत्रलयात जाऊन तिने आपल्या बांधवाना न्याय मिळवून दिला. अशी ही दहावी नापास नीरा. सुरवातली बोलण्यात आत्मविश्वास नव्हता. अनुभवाने आत्मविश्वास मिळवून कलेक्टर, आमदार, मंत्री यांच्या समोर समाजाच्या समस्या मांडून त्या सोडविल्या.
तर अशा या सहा महिलांची कहाणी वेगवेगळी. प्रत्येकीचे संसार गाणे निराळे पण तरीही स्वतःसाठी व समाज बांधवांसाठी झटण्याची धडपड मात्र सारखीच. कमी शिक्षण, शहरी समाजाचा संपर्क कमी, भाषेतील फरक तरीही यांनी निडरपणे परिस्थितीशी संघर्ष केला आणि त्या यशस्वी ठरल्या. अशा या जिद्दी महिलांविषयीचे हे पुस्तक नक्कीच आपल्याला प्रेरणा देणारे असल्याने सर्वांना वाचनीय असेच आहे.
लेखिका – सुश्री नीती बडवे
परिचय – सुश्री सुलभा सुभाषचंद्र तांबडे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “वेध सामाजिक जाणिवांचा” ☆ सुश्री वर्षा बालगोपाल☆
काळी जमिन••• त्यात नवीन अंकुरलेले एक रोपटे••• या रोपट्याला पाणी देणारा एक हात••• एवढेच चित्र.
पण पाहताक्षणी विचाराच्या रोपट्याला तरतरी आली एवढे खरे.त्याकडे पाहून अनेक विचार मनात तरळून गेले.
०१) सध्या सगळीकडे प्रदुषण वाढले आहे. पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. मग अशावेळी पर्यावरण पूरक काही कार्य करायला हवे आणि झाडे लावली पाहिजेत हे तर सुचवायचे नसेल?
०२) नुसते झाडे लावली पाहिजेत असे नव्हे तर तसा संकल्प केला पाहिजे. मग हा संकल्प हातावर पाणी सोडून केला तर त्याला अर्थ प्राप्त होतो. तसा संकल्प केला आहे हे सूचित करायला म्हणून हातावर पाणी सोडले आहे असे देखील हे सूचित करते.
०३) बरं ! संकल्प करताना पाण्याचे महत्व किती आहे हे जाणून पाण्याचा एक एक थेंब अनमोल आहे याची सामाजिक जाणिव आहे म्हणून हातावर सोडलेले संकल्पाचे पाणी देखील वाया न घालवता ते छोट्याशा रोपट्यावरच सोडून सामाजिक जाणिव आणि रोपट्याचे जीवन दोन्ही जपले आहे.
०४) कोणतेही रोपटे ••• ते जर वाढवायचे असेल तर त्याची उचित काळजी घेतलीच पाहिजे. मग रोपटे लहान असल्याची जाणिव ठेऊन त्याला जगवण्यासाठी हा हात तयार आहे हे सांगायला हात आहेच. पण हातावर पाणी सोडून हळूहळू ते पाणी रोपट्याला दिले तरच ते छान तग धरू शकते हा निसर्ग नियम आहे .त्याची आठवण ठेऊन आत्मियतेने प्रेमाने रोपटे वाढवले पाहिजे हे कृतीतून दर्शवले आहे.
०५) रोपटे हे नव्या पिढीचे आणि हात हे जुन्या पिढीचे प्रतिक मानले तर त्याला संस्काराचे पाणी दिले तर रोपटे व्यवस्थित वाढते ही कौटुंबिक भावना देखील यातून व्यक्त होते.
०६) आज उंगली थामके तेरी तुझे चलना मैं सिखलाउँ। कल हाथ पकडना मेरा जब मैं बूढा हो जाउँ। हीच भावना ते रोपटे वाढवणार्याच्या मनात आहे. कदाचित आज तू मोठा व्हावेस म्हणून मी तुला पाणी देत आहे. पण मी जेव्हा म्हातारा होईन तेव्हा तुझ्या पारावर बसेन तुझ्या शितल छायेखाली बसून मी आनंदी होईन. तुझ्या अंगावरचे पक्षी पाने फ़ळे फुले माझे दु:ख कमी करतील. एवढेच नव्हे तर किमान भूक भागवण्याची सोय माझी होईलच पण इतरांनाही त्याचा उपयोग होईल. एवढा उदात्त विचार, आशावादही त्यात दिसतो.
०७) हे रोपटे पाण्यामुळे तरतरीत तर झालेले दिसत आहेच पण या उपकाराची फेड मोठे होऊन मी छत्र होऊन नक्कीच तुमच्या उपयोगी पडेन हे दिलेले मूक अभिवचन यातून स्पष्ट होते.
०८) सगळीकडे सिमेंट जंगल होत असताना काळी आई विकण्याचा कल असताना काळी आई जपली पाहिजे या जाणिवेतून या काळ्या आईला पर्यायाने सगळ्यांना धन धान्य देणार्या या सोन्याच्या तुकड्याला जपण्यासाठी आलेला हा मदतीचा हात आहे.
०९) जमिन म्हटले की शेतकरी आलाच. मग त्याच्याही काही समस्या असतील तर त्या समस्या सोडवण्यासाठी पुढे आलेला हा हात आणि वाचा फोडण्यासाठी आलेले हे झाड आहे असे सुचवायचे असेल.
१०) माणसाचे आयुष्य हे झाडासारखे असते. कितीही खाचखळगे अडचणी असलेल्या जमिनीवर जन्म झाला तरी वडिलधार्यांच्या मदतीच्या हाताचा मान राखत आपण स्वत: स्वत:च्या पायावर भक्कमपणे उभे राहिले पाहिजे आणि इतरांच्या उपयोगी पडले पाहिजे. झाडाचा एकही भाग कधीच वाया जात नाही हा गुणही चाणाक्ष लोकांनी अंगिकारायला हवा. असे पण हे चित्र सांगते.
११) अजून अवलोकन करत असताना वेध सामाजिक जाणिवांचा हे नाव बघताना वेध शब्दच मनाचा प्रथम वेध घेतो. आणि हा वेध सामाजिक जाणिवांचा आहे याची जाणिव करून देतो.
१२) मग एक कल्पक विचारही आला, हे झाड सैनिक, पोलीस, डॉक्टर, वकिल अशा अनेक पेशातील व्यक्तींचे प्रतिक मानले तर त्यांची कामाप्रती असलेली आस्था प्रेम हे जाणून त्याच्या उदात्त कार्याची भावना याचे भान सगळ्यांनी ठेऊन त्यांच्यासारखे कार्य करताना आपल्या स्वार्थावर पाणी सोडले पाहिजे.
१३) किंवा स्वार्थावर पाणी सोडले तर परमार्थाच्या रोपट्याचे झाड होऊन जीवन कृतार्थ करू शकतो हा अध्यात्मिक अर्थ पण निघू शकतो.
जेवढे जास्त अवलोकन करू तेवढे जास्त अन्वयार्थ या चित्रातून निघतात. या पुस्तकाचे लेखक श्री अरूणजी बोर्हाडे यांच्या कार्याशी निगडीत आणि स्वत:च्याही असलेल्या समाजाप्रतीची कळकळ आणि कृती स्पष्टपणे उलगडणारे हे चित्र निर्मिती पब्लिक रिलेशन्स यांनी तयार केले आणि दुर्गभान प्रकाशनने ते मुखपृष्ठ म्हणून स्विकारले आणि लेखक अरुणजी बोर्हाडे यांनी पण त्याची निवड केली म्हणून सगळ्यांचे मन:पूर्वक आभार.
☆ “माई” – लेखक – श्री संजय अनंत कुलकर्णी ☆ परिचय – सौ. उज्ज्वला केळकर ☆
पुस्तक – माई
लेखक – संजय अनंत कुलकर्णी
प्रकाशक – रावा प्रकाशन
पृष्ठे – १६४ मूल्य- 310 रु.
नुकतंच एक पुस्तक वाचलं, ’माई’. हे छोटंसं चरित्र आहे. पुस्तक छोटं आहे, पण पुस्तकाची नायिका मोठी आहे. तिचं व्यक्तिमत्व महान आहे. ‘सामान्यातली असामान्य’ असं तिचं वर्णन लेखकाने केले आहे. आणि पुस्तक वाचलं की आपल्यालाही हे विधान पटतं. माई म्हणजे कृष्णा त्र्यंबक कुलकर्णी. पुस्तकाचे लेखक संजय कुलकर्णी हे माईंचे नातू. संजयजींनी या पुस्तकात साक्षात माई वाचाकांच्या डोळ्यापुढे उभी केली आहे. लेखकाची भाषा साधी, सोपी आहे, त्यामुळे पुस्तकाला गतिमानता प्राप्त झाली आहे. पुस्तक वाचायला घेतले, की कधी वाचून पूर्ण होते, ते कळतही नाही. लेखन खुसखुशितही झाले आहे.
या पुस्तकामागची प्रेरणा करोनाची साथ आहे, असं सांगितलं, तर आश्चर्य वाटेल. या वेळच्या लॉक डाऊनच्या काळात अख्खा देश घरात बंदिस्त झाला होता. आता घरात बसून करायचं काय? संजयजींनी विचार केला, आपल्या आजी-आजोबांच्या आठवणींचं संकलन करू या. मग त्या आठवतील तशा त्यांनी लिहिल्या व व्हाटस अपवरून नातेवाईकांना पाठवल्या. त्यांना लेखन आवडले. मग माईंचा जीवनप्रवासाचा सिलसिला व्हाटस अपवरून सुरू झाला. मग नातेवाईकांनी ते लेख परिचितांना आणि परिचितांनी ते आपल्या नातेवाईकांना पाठवले. यातून हे लेख जगभर पसरले. नंतर लोकाग्रहास्तव त्याचे पुस्तक निघाले. ते पुस्तक म्हणजे ‘माई.’ रावा प्रकाशनने अतिशय देखणे असे हे पुस्तक छापले आहे. माई रहात असलेल्या केसरी वाड्याच्या पार्श्वभूमीवर ठळक असे माईंचे छायाचित्र, असे अर्थपूर्ण मुखपृष्ठ आहे. कागद चांगला, प्रिंटिंग स्वच्छ आणि निर्दोष आहे.
माई म्हणजे पूर्वाश्रमीच्या कृष्णा सिधये. त्यांना दोन बहिणी आणि दोन भाऊ. त्यांचे वडील भटजी होते. त्यांचा जन्म १९०६ साली झाला. त्या काळात मुलींनी शिक्षण घेण्याची पद्धत नव्हती. १०व्या वर्षी त्यांचे लग्न झाले आणि ११व्या वर्षी त्यांना वैधव्य आले. त्या काळाच्या प्रथेप्रमाणे त्यांच्या केशवपनाची तयारी सुरू झाली. तेव्हा माई सासरहून, आपली मैत्रीण तारा नाबरकडे पळून आल्या. तिचे वडील पुढारलेल्या विचारांचे होते. त्यांनी तिला आसरा दिला. तिने पुनर्विवाहाचा विचार बोलून दाखवला ही त्या काळातील बंडखोरीच होती. केशवपनाला नकार दिल्याने वडलांनी तिला घरी ठेवून घेतले नाही. कारण गावाने त्यांना वाळीत टाकले असते आणि त्यांचा जो भिक्षुकीचा व्यवसाय होता, तोच बंद पडला असता. पुढे त्या मालवणला प्राथमिक चौथी इयत्तेपर्यंत शिकल्या.
त्याकाळी राष्ट्रीय कीर्तनकार असलेले विनायकबुवा पटवर्धन यांना ताराच्या वडलांनी कृष्णेसाठी स्थळ बघायला सांगितले. ते कीर्तन-प्रवचन करत धुळ्याला गेले असता, त्यांना वकील त्र्यंबक कुलकर्णी यांच्याविषयी माहिती कळली. त्यांची पत्नी आजारपणामुळे दिवंगत झाली होती. त्यांना एक तीन वर्षाचा मुलगा मुकुंदा व लग्नाची मुलगी होती. विनायकबुवा त्यांच्या घरी गेले. वडीलधा-यांशी कृष्णेविषयी बोलले. त्यांना पसंत पडल्यावर मुलीकडून होकारही कळवला. मग कृष्णा एकटीच त्यांच्याबरोबर मालवणहून धुळ्याला गेली. त्या काळात हा धीटपणाच म्हणायला हवा. त्यानंतर ‘सरदारगृहात’ सुधारणावादी कार्यकर्त्यांपुढे त्र्यंबक आणि कृष्णा यांचा पुनर्विववाह झाला. पुढे, समाजात ही जोडी, माई व भाऊ म्हणून सुप्रसिद्ध झाली.
माईंचा पुनर्विववाह कायदामान्य असला, तरी तो समाजमान्य नव्हता. पुनर्विववाहाकडे सगळे हेटाळणीनेच बघत. माईंनी विचार केला, की लोकांना घाबरून मी घरात बसले, तर रांधा, वाढा, उष्टी काढा , एवढंच माझं आयुष्य होऊन राहील. मग त्यांनी बाहेर पडायला सुरुवात केली. बाहेरची कामे स्वत: करायची, असे त्यांनी ठरवले. त्या घरच्या बग्गीतून बाजारात जात, तेव्हा, रस्त्यात लोक दुतर्फा उभे आहून त्यांच्याकडे टकमका बघत. घरातल्या खिडक्यात बायका, पुरुष उभे राहून तांच्याकडे बघत. बाईने बग्गीतून जाणे, ही त्या काळात क्रांतीच होती. सोवळ्या बायका तर त्या गेलेल्या वाटेवर पाणी शिंपडून पुढे जात. गावात त्यांच्याबद्दल अनेक अफवा उठल्या होत्या. मात्र भाऊंच्या सामाजिक प्रतिष्ठेमुळे त्यांना टाळताही येत नसे. गावातल्या बायकांचा विरोध कमी करायला त्यांनी एक वेगळाच विचार केला. गावातल्या मेहता या दुकानदाराकडून त्यांनी लुगडी आणली व ती विकायला सुरुवात केली. हळू हळू बायकांच्या विरोधाची धार बोथट झाली. घरात बसून व्यवसाय करायची माईंची ही सुरुवात होती. पुढे त्या चांदीवर सोन्याचे पाणी दिलेले मोत्याचे दागिनेही विकू लागल्या. त्यांना मोत्याची चांगली पारख होती.
१९३१ साली माईंना दिवस गेले. माईंनी, त्यावेळी माहेरी जाण्याचा विचार केला. बाकीचे नको म्हणत असताना, माई आठव्या महिन्यात धुळ्याहून सावंतवाडीला एकट्या आल्या, पण गाव वाळीत टाकेल, या भयाने माईंच्या वडलांनी माईंना घरात घेतले नाही. माई डगमगल्या नाहीत. त्या दुसर्या इवशी राजवाड्यावर गेल्या, राणीसाहेबांना आपली सगळी हकीकत सांगितली आणि त्यांचं पहिलं बाळंतपण राजवाड्यात झालं. केशवपनाला विरोध, सासरहून पळून येणं, पुनर्विवाह, बाळंतपणाच्या वेळी, वडील घरात घेत नाहीत, म्हंटल्यावर राणीसाहेबांशी बोलून आपली अडचण सांगणे अशा अनेक प्रसंगात त्यांचा धीटपणा, बंडखोरपणाही दिसून येतो.
भाऊंची वकिली चांगली चालत होती. सगळं कसं छान चालू होतं. १९४८ साली गांधीजींची हत्या झाली. त्यानंतर झालेल्या जाळपोळीत भाऊंचा वाडा आणि भाऊंची सारी मालमत्ता जळून नष्ट झाली. भाऊ संघाचे असल्याने त्यांना तुरुंगात टाकले गेले. माई मुलांना घेऊन चाळीसगाव, पाचोरे, जळगाव करत पुण्यात पोचल्या. भाऊही तूरुंगातून सुटून पुण्याला आले. जयंतरावांनी भाऊंना केसरीवाड्यात राहायला जागा दिली. टिळकांच्या घरात राहायला मिळालं, म्हणून भाऊंना धन्यता वाटत होती. टिळकांच्या कार्यालयातच भाऊंचे कार्यालय होते. हळू हळू वकिलीत त्यांचा चांगला जम बसला आणि माईंची पुण्यातील सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक जीवनाला सुरुवात झाली. लेखक म्हणतात्त,, १९४८, ते १९८८, ही तिची चाळीस वर्षांची वाटचाल खूप प्रेरणादायक होती.
माई विवाह मंडळ चालवत. तो त्यांचा शौकच होता म्हणा ना! विवाह मंडळ नि:शुल्क होतं. पदरमोड करून ते त्या चालवत. पत्रव्यवहार माईंच्या खर्चाने होई. दाखवण्याचा कार्यक्रम अर्थात चहा-पोहे वगैरे केसरी वाड्यातच होई. अशी असंख्य लग्ने त्यांनी जमवली. त्यांची मुलगी शशीकला व मुलगा अरविंद यांची लग्ने या मंडळामार्फतच जमली.
मंगलाचे अरविंदचा मित्र श्रीकांतवर प्रेम होते, पण त्याच्या वडलांचे म्हणणे, मुलींची लग्ने झाल्यावर याचे लग्न करायचे. त्यासाठी मंगल आणि हो, माईसुद्धा सात वर्षे थांबल्या. मुकुंदाचा प्रेमविवाह. त्याची प्रेयसी हेमा कर्णिक सी.के.पी. मांस – मच्छी करणारी आणि खाणारी. पण कडक सोवळं असलेल्या माईंनी या लग्नाला मान्यता दिली. इतकंच नाही, तर इंदूताई टिळकांची वेगवेगळे खाद्यपदार्थ बनवणारी ‘अन्नपूर्णा म्हणून संस्था होती. या संस्थेतर्फे वेगवेगळे खाद्यपदार्थ बनवायलाही शिकवत. माई या वर्गांना आवर्जून जात. एकदा एक शेफ तिथे चिकन बनवायला शिकवणार होता. माई याही वर्गाला उपस्थित होत्या. मुलाने त्याबद्दल विचारले असता त्या म्हणाल्या, ‘अरे, हे नवीन काय आहे, ते शिकायला नको? उद्या तुम्हीच म्हणालात, ‘मला नॉनव्हेज खायचय’, तर मला मेलीला करता यायला नको?’ त्या चिकन करायला शिकल्या, इतकंच नव्हे, तर पुण्यात एकदा चिकन बनवण्याची स्पर्धा होती, तेव्हा माईंनी त्यात भाग घेऊन चक्क पाहिला नंबर मिळवला होता.
माईंचे घर म्हणजे गोकुळ होते. त्यांना तीन मुले, पाच मुली व बावीस नातवंडे होती. थोरली विमल. त्यांचे चिरंजीव संजय कुलकर्णी हे या पुस्तकाचे लेखक. लेखक म्हणतात, ‘नातेवाईकांचे परिचित आणि परिचितांचे नातेवाईक असे सगळे माईंच्याकडे आश्रयाला असत.’ नात्या-गोत्याचे लोक त्यांच्याकडे असत, असे म्हणताना, त्यांच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊन त्यांना गोत्यात आणणारेही लोक असत. त्यांच्याकडे कुणी शिक्षणासाठी, कुणी नोकरी मिळवण्यासाठी, कुणी नोकरी मिळाल्यावर जागा मिळेपर्यंत असे आलटून पालटून अनेक लोक रहात.
माईंच्या घरात चहाचे आधण कपाने नाही, पातेल्याने ठेवले जाई. एक मुलगी दिवसभर चहाची भांडी विसळायला असे. या चहात, कामवाली, केरवाली, भाजीवाली, बंबफोड आणणारा हमाल, पोस्टमन, भाऊंचे अशील असे अनेकानेक असत.
वधूवर सूचक मंडळाचे आणि माईंच्या मोत्याच्या व्यापाराचे व्यवस्थापन कसे होते, हा भाग प्रत्यक्षच वाचायला हवा. अतिशय खुसखुशीतपणे आणि दिलखुलासपणे लेखकांनी ही माहिती लिहिली आहे. ती काही चार-सहा ओळीत वर्णन करण्यासारखी नाही. १९७८ साली संधिवातामुळे माईंचे हात-पाय चालेनासे झाले. त्यांचे उभे रहाणे बंद झाले. तरीही माईंचा मोत्याचा व्यापार चालू होता. त्या खुरडत खुरडत चालत. तसाच जिना उतरत वाड्याच्या अगदी दाराशी रिक्षा लावली जाई. त्या मोती चौकात जात. दुकानाच्या मालकाला रिक्षाशी बोलावत आणि व्यवहार करत. जवळ जवळ शेवटपर्यंत त्यांचा हा व्यवसाय चालू होता. हाही भाग प्रत्यक्षच वाचायला हवा. माईंच्या शारीरिक गुढग्यांनी त्यांच्या मानसिक गुढग्यांपुढे गुढगे टेकले. माई विमा एजंटही होत्या. त्यांची दोन बॅंकांमधून खाती होती. देण्या-घेण्याचे व्यवहार चेकने त्या करत. त्याबाबतच्या अनेक डायर्यांतून त्यांच्या नोंदी असत.
माईंबद्दल लिहावं, तेवढं थोडंच. सगळं लिहायचं झालं, तर पुस्तकावरचं पुस्तक होईल. माईंच्या बोलण्यात ‘मेले’ किंवा ‘मेल्या’ हे खास शब्द असत. वाक्याची सुरुवात किंवा शेवट या शब्दांनी होत असे. ‘बस रे मेल्या’ किंवा ‘तेवढी डायरी काढ ग मेले’, ’एवढं पत्र टाक रे मेल्या’, वगैरे… वगैरे… या मेले’ किंवा ‘मेल्या’मध्ये माईंचा लडिवाळ मायाळूपणा होता. लेखक म्हणतात, ‘माई सामान्यातली असामान्य होती.’ त्यांच्या व्यक्तिमत्वाचा ठसा जसा पुढच्या पिढ्यांवर उमटला, तसाच त्यांच्या संस्काराचा वारसाही त्यांना मिळाला, तो कसा हेही लेखकाने स्पष्ट केलय.
माईंबद्दल इथे थोडंसं लिहिलं. खूप काही लिहायचं राहीलंही आहे. वाचकांनी ते पुस्तकातच वाचावं आणि माईंना पूर्णपणे जाणून घ्यावं.
परिचय –सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170 e-id – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
२६ नोव्हेंबर २०२३ ची सकाळ ! पिंपरी येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात लगबग सुरू होती. निमित्त होते गझल पुष्प या गझलप्रेमींच्या संस्थेच्या ५व्या वर्धापन सोहळ्याचे! याच दिवशी या सोहळ्याच्या शिरपेचात, सावळ्या निळाईचं मोरपंखी पीस खोवलं गेलं! अभिजीत काळे, सगळ्यांचा अभिदा… यांच्या १०१ गझला समाविष्ट असलेल्या गझलसंग्रहाचे प्रकाशन मोठ्या थाटात पार पडले. आणि उघडला तो बहुप्रतिक्षित मनाचा गूढ गाभारा…. मी ही मग त्या गाभार्यात प्रवेश करायचं ठरवलं आणि पहिल्यांदा नजर पडली ती संग्रहाच्या मुखपृष्ठावर आणि पुस्तकाच्या शीर्षकावर..
मुखपृष्ठ हे चेहरा असते पुस्तकाचा ! ते पुस्तकाचे व्यक्तीमत्व आणि वेगळेपण घेऊन येते. पुस्तकांतील विचार आणि जाणिवांचा आशय एकवटलेला असतो तिथे! या संग्रहाच्या मुखपृष्ठावरील दिवटीतली तेवणारी ज्योत, तिची आसपास पसरलेली द्युती, तेजोवलय, त्याची आभा, आणि विविध रंगछटा दर्शवणारी त्या ज्योतीभोवतीची प्रभावळ.. सगळंच मन आणि नयन दोन्ही शांतविणारे!! काहीतरी गूढ, अगम्य किंवा अज्ञात, नेणीवेकडून जाणीवेकडे जाणारी वाट दाखविणारे! ते वलय आणि त्यांतल्या विविध रंगछटा, म्हणजे जणू काही… मनातील विचार तरंग, लहरी, ज्या विविध व्यक्ती, प्रसंग, घटना, परिस्थिती यानुरूप आलेले.. प्रवृत्ती, प्रकृती, विकृती आणि संस्कृती चे अनुभव.. यांचेच प्रतिबिंब असावे. कधी दाहक, कधी शीतल, कधी तेजाळलेले, कधी अगम्यत्वाने गूढ!! ही सगळी वाटचाल सुरू झाली ती दिवटीच्या प्रकाशाच्या साक्षीने आणि मनाचा गाभारा आत्मतेजाने उजळून निघावा या पूर्ततेसाठी!!
एकेक गझल, तिच्यातले शेर वाचत जावे तसतसे.. डॉ. शिवाजी काळेंनी मलपृष्ठावरील पाठराखणीमध्ये आपल्या शुभेच्छा व्यक्त करतांना लिहिलंयं तसंच.. आपल्याला त्याच्या खयाला मागचा खयाल उमजत जातो, उमगत जातो. आणि कितीतरी वेळा तर तो खयाल आपल्याच मनातल्या खयालांशी जुळणारा वाटतो. आपल्याच अनुभवांचं प्रतिबिंब त्यात परावर्तित झालेलं वाटतं. आणि मग ती गझल त्याच्या मनातून आपल्या मनात उतरून कधी आपलीच होत, आपलेच मन विचार, अनुभव, जाणीवा लेऊन उभी ठाकते ना… हे कळंतंच नाही!!
अभिजीतचा एक शेर आहे…
‘मन ‘कोणाच्या कधी समजले काय मनाचे व्याप जगाला?
मनात उतरायचे दादर ज्ञात कुठे अद्याप जगाला!!! —
पण तरीही मनाच्या गाभाऱ्यात उतरून गूढ, मन की बात, मनीचं खास गुज जाणून घेण्याचा हा प्रयत्न!
अभिजीत ने आपल्या गझलांमध्ये..
कधी न जन्म घेतला कधीच मी न संपलो
मना तुझ्या मुळेच मी अनेक रंग रंगलो!
असं म्हणत.. जीवनानुभवांचे अनेक रंग, छटा,शब्दकुंचल्याने रेखाटल्या आहेत.
मानवी नातेसंबंध, दुरावत चाललेली नाती, वाढत चाललेली दरी, त्यांतून झालेल्या यातना, विरहवेदना, तो बोचणारा सल, आणि त्यातून ही मनाने खचून न जाता, सुचवलेले मार्ग, आणि तटस्थ, स्थिरावलेलं मन.. अतिशय सुंदर शब्द बद्ध केलयं..
एकेक जात असता दु:खांत साथ सोडून,
शोधू कुणा कुणाला राखेत आठवांच्या?
आणि
डोह माझा असे खोल ‘मन’ राखुनी
तळ स्वतः शोधता आवडू लागलो!
असं म्हणत गझलकार अभिदा, नात्यांचं गणित अगदी लीलया सोडवंत सांगतोयं..
प्रेम ज्या नात्यांत नाही, ती खुजी नाती नकोतच
स्निग्धता मैत्रीत ओतू, स्नेह भरली साय निवडू!!
आणि मग हे नातं, हा स्नेह, हे प्रेम वृद्धिंगत व्हावं, तुटलेली नाती जुळावीत म्हणून दाखवलेला मनाचा मोठेपणा, समावेशक वृत्ती ची खोली जाणवेल अशी ही गझल, त्याच्यातील मानवतेच्या संवेदनांची उंची दाखवून देते.., असेच वाटते..
ये माझ्या फांदीवरती, तू घरटे बांध म्हणालो
तुटलेले नाजूक धागे प्रेमाने सांध म्हणालो!!
ती चं सौंदर्य वर्णन करणारी गझल बघा..
कसे शब्दांत बांधावे तुझे सौंदर्य मोहकसे?
रूपाच्या पैल ते असणे तुझे मी पाहतो आहे!
यातलं रूपाच्याही पलीकडे असलेलं अंतरंगातील सौंदर्य ज्याला दिसलं तोच खरा द्रष्टा!! शेरातून रूप-अरूप, सगुण-निर्गुण याला स्पर्श केला गेलायं असही दिसतंय!
पुस्तक वाचन, अक्षरब्रह्माची ओढ, आवड कमी होत चालली आहे, ही खंत अशी व्यक्त झालीये बघा….
लिहिणा-यांनो थांबा थोडे पहा सभोती
माणसातला वाचक बहुधा मरून गेला!!
अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणार्या आणि स्तुती पाठकांनी केलेल्या स्तुतीने हुरळून जाणार्यांना खडा सवाल करीत विचार करायला लावणारा शेर बघा..
कुणी जराशी स्तुती करावी
आभाळावर चढतो आपण
तसेच,’ मलाच सारे कळते ‘ म्हणतो .. कुठे स्वतः ला कळतो आपण?
मागे पडत चाललेला गाव आणि गावाकडची माणसं, त्या आठवणी..याची ही आठवण मनाच्या गाभाऱ्यात खोल साठवून ठेवलीये. तिची स्पंदने जाणवणारे.. वानगीदाखल शेर बघा..
वाहून भूक नेते शहराकडे जथा
गावास आठवंत मग माणूस संपतो
आणखी एक शेर..
नभाला बाप माय भुई म्हणतो
घरी जाऊन खूप दिवस झाले!
फक्त दोन ओळीत.. येवढा अर्थ सामावण्याची जादूच केलीयं की प्रत्येक गझलेच्या एकेका शेरात!
आखर थोरे, अर्थ अमित! असा गागर में सागर भरलायं! या पुस्तकाच्या गझलसागरात, आपण जितक्या वेळा अवग्रहण करू, तळ आणि खोली गाठायचा प्रयत्न, कसोशी करत राहू ना.. तेवढ्या अर्थ भरल्या पाणीदार मोत्यांनी भरलेली ओंजळ घेऊन आपण बाहेर येऊ.
अभिजीतच्या या मनाच्या गाभाऱ्यातलं गूढ उकलणं सहज सोपं नाही. त्याच्या काही गझलांना अध्यात्माची किनार आहे. त्या अंगानेही त्यांची उंची गाठायचा प्रयत्न करावा लागतो. त्याच्या संग्रहाच्या शीर्षक स्थानी विराजमान झालेले सार्थक शब्द त्याच्या आध्यात्मिक टच चा बाज राखणारेच सिद्ध होतात, तो लिहितो..
मनाचा गूढ गाभारा भरावा शून्य शब्दांनी
उगा कां सोंग भक्तीचे धरावे मूढ गात्रांनी!
इंद्रिय सुखाच्या मागे धावून त्याच्या पूर्ततेसाठी केलेली भक्ती त्याला मान्य नाही. त्याला एकांतातली, शब्द विरहित, विचार विरहित, तादात्म्य पावलेली समाधी अवस्था अपेक्षित असावी असे दिसते.
म्हणूनच त्यानेच एका गझलमध्ये हे गूढ उकललंयं असं वाटत!
शांततेला शब्द हृदयाचा कळावा एकदा
स्पंदनांचा नाद कानी साठवावा एकदा!
याच गझलेत तो लिहितो,
शब्द स्पर्शाने कुणी ओळख कशी घ्यावी तुझी?
नेणिवेला निर्गुणाचा लाभ व्हावा एकदा
मनाच्या गूढ गाभाऱ्यातला हेच ते.. शांततेच्या मौनातलं अनादी तत्व आणि हाच तो अनाहत नाद अपेक्षित असावा गझलकाराला असे वाटते.
म्हणूनच तो म्हणतोयं..
सावलीच्या आंतला काळोख जाळू या
चल उजेडाचा जरा पाऊस पाडू या!
अशा विविधांगी, अनेकविध विषयानुरूप रूप, रस, रंग आणि अर्थ गंध भरलेल्या विचार रंगछटा आणि त्यांतलं सौंदर्य जाणून घ्यायचे असेल तर मनात उतरायचे दादर उतरून च या गाभार्यात प्रवेश करायलाच हवा एकदा, हीच मनिषा! यातल्या प्रत्येक गझलेतला एकेक शेर म्हणजे.. देता किती घेशील दो कराने? असे व्यक्ती परत्वे विविध अर्थ देणारा! शोधा म्हणजे सापडेल!!
सांगता करतांना.. अभिजीतला पुढील वाटचालीसाठी अनंत शुभेच्छा आणि आशिर्वाद देते आणि त्याच्याच एका शेरात, मला माऊलींच्या पसायदानाचा स्पर्श भासला, तीच लोकमंगलकारी प्रार्थना जाणवली.. त्या ओळी उद्घृत करते..
पोचली जर प्रार्थना ही ईश्वरा कानी तुझ्या,
ज्यांस जे काही हवे ते सर्व तू मिळवून दे !! ….
परिचय – प्रा. भारती जोगी
पुणे
मो ९४२३९४१०२४
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
नुकतेच म्हणजे २६ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रकाशित झालेले मनाचा गूढ गाभारा पुस्तक हातात पडले आणि मुखपृष्ठ पहातच राहिले.
गर्द हिरवट रंगावर एक दिवटी, त्याचा प्रकाश आणि वर असलेले मनाचा गूढ गाभारा हे शब्द. बस्सऽऽऽ एवढेच चित्र! पण किती बोलके आहे•••
०१) गाभारा या शब्दातून देवालय प्रेरित होते आणि मग त्या दृष्टीकोनातून बघितले तर गाभार्यातील अंधार हा कधीच काळा नसतो तर तो कधी निळा कधी हिरवा असा मोरपंखी असतो. तोच भाव या रंगातून प्रेरित होतो आणि अशा गाभार्यात पेटणारी नव्हे तर तेवणारी ही दिवटी गाभारा उजळून टाकत आहे. हा प्रकाश सूर्य वलयासारखा शाश्वत आहे आणि त्याची आभा ही एक सकारात्मकता एक चैतन्य देणारी आहे.
०२) नंतर विचार करता मनाचा शब्द गाभार्यातून घुमतो आणि मग हा गाभारा हा अंतरात्म्याचा आहे त्यातील भाव कधीच लवकर स्पष्ट होत नसतात आणि या गूढतेवर दिवटीची तेजोवलये पडली तर मनातील गर्तता सकारात्मकतेने चैतन्याने उजळून स्पष्ट होऊ लागते.
०३) ही दिवटी नीट पाहिली तर ही साधी पणती नसून संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर यांच्या ज्ञानेश्वरीवर असलेल्या दिवटीसारखी आहे. त्याच ज्ञानशक्तीचे रूप घेऊन आलेली आहे आणि हा ज्ञानप्रकाश गूढ असला तरी गीतेतील जीवनाचे सार सांगून अर्जूनाला नैराश्येच्या तमातून बाहेर काढणार्या कृष्णवर्णिय आभा सारख्या सदोदित उर्जा देणारा आहे.
०४) मनाचा गूढ गाभारा या अक्षरांकडे नीट पाहिले तर गाभारा हा शब्द केशरी आणि पिवळ्या रंगात आहे. त्या रंगातच गाभारा हा अंधारी नसून तेजाने भरलेला आहे असे सांगितले आहे. गूढ शब्द पिवळ्या रंगात आहे. म्हणजे ही गूढता आता प्रकाशमय होईल हा संकेत दाखवते. हा रंग सोन्याचा असल्याने शुद्ध सोन्यासारखे मौलिक काही या गाभार्यातून येणार आहे असे सुचवते. किंवा रस्त्यावरिल सिग्नलमधे असणारा पिवळा सिग्नल जसे लाल रंगाचा धोका जाऊन पुढचे लवकरच सुकर होईल त्यासाठी तयार रहा अशी सूचना देत असतो आणि आता पुढच्या प्रवासाला सुरुवात करा सांगतो तसेच गूढ आता बोलून सगळे स्पष्ट होईल सुचवते. नंतर मनाचा शब्द बघितला तर सगळे मळभ जाऊन सारे काही हिर्यासारखे चमचमणारे सफेद रंगातील विचार असणार आहेत. ते अगदी स्पष्ट असणार आहेत. हे सुचवते.
०५) सहज लेखकाच्या नावाकडे लक्ष गेले आणि यापुस्तकाच्या लेखकाचे नावही किती समर्पक आहे असे वाटले. अभिजीत काळे•••
अभिजीत म्हणजे कृष्ण ; जो अंतर्मनातील गूढार्थ वाचक अर्जूनाच्या मनापर्यंत घेऊन जाणार आहे आणि ये हृदयीचे ते हृदयी घातले याची अनुभूती देणार आहे.
किंवा काळ्या गर्ततेवर सदा विजय मिळवून अजेय राहणारे असे अभिजीत काळे मनातील गाभार्याचे रहस्य उलगडणार आहेत.
०६) पुस्तकातील अंतरंगाशीही तादात्म्य साधणारे हे चित्र आहे. हे पुस्तक १०१ गझलांचा संग्रह आहे. गझल म्हणजे उला आणि सानी मिसर्यांनी दोन ओळीतून मोठा अर्थ सांगणारी शेर रचना. तर हे चित्र म्हणजे मनाचा गूढ गाभारा या शब्दांचा उला मिसरा आणि चित्राचा सानी मिसरा या शेरात लपलेला तेजोमय गर्भितार्थ सांगू इच्छितो.
०७) लेखक अभिजीत काळे यांना मी ओळखत असल्याने त्यांचा संस्कृत सुभाषिते अध्यात्म यांचाही मोठा अभ्यास असल्याने ती केशरी सात्विकता, ती सत्यता प्रखर असूनही मंद आणि शीतल प्रकाशाप्रमाणे मनापर्यंत घेऊन जाणारी गूढ असले तरी सहज सोप्या शब्दांनी तेजोवलयाप्रमाणे परावर्तित होणारी शब्दरचना घेऊन येणारी गझलरचना सकारात्मकतेच्या आभेला स्पर्श करणार असल्याची ग्वाही देते.
०८) अंतरंगात डोकावल्यावर समजते की गझलकार अभिजीत यांनी ‘मन’ हे तखल्लुस ( टोपणनाव) घेऊन गझल लेखन केले आहे म्हणून त्या नावाचा लिलया उपयोग करून घेत गझलसंग्रहाला नाव दिले आहे. या अर्थाने देखील मग अर्थाला नवे आयाम लाभतात आणि ‘मनाच्या’ गूढ गाभार्यातील रहस्य जाणून घ्यायला आपले मन सज्ज होऊन अंतरंगात डोकावलेच पाहिजे असे वाटून केव्हा गझलेच्या प्रवाहात न्हाऊ लागतो हे कळत नाही.
असे छोटा पॅकेज मोठा धमाका असणारे मुखपृष्ठ अभिजीत काळे यांच्याच संकल्पनेतून श्री सुरेश नावडकर, श्री शिवदादा डोईजोडे, श्री साईनाथ फुसे यांनी चितारले आणि प्रकाशक गझलपुष्प पिंपरी- चिंचवड यांनी स्विकारले याबद्दल सगळ्यांचे मन:पूर्वक आभार