मराठी साहित्य – पुस्तकावर बोलू काही ☆ “कालिंदी” – लेखिका : श्रीमती अनुराधा फाटक ☆ परिचय – सौ. मंजिरी येडूरकर ☆

सुश्री मंजिरी येडूरकर

स्व-परिचय

मी सौ. मंजिरी येडूरकर, MSc, BEd  असून मिरज येथे माध्यमिक शिक्षिका म्हणून कार्यरत होते. त्या काळात रोजच्या सांगली – मिरज बस प्रवासात मिळणाऱ्या वेळेत काव्य निर्मिती सुरू झाली. पण त्या प्रसंगानुरूप! कुणाचा वाढदिवस, सहस्त्र चंद्र दर्शन, निरोप समारंभ, लग्न मुंज अशा समयोचित कविता करायला सुरुवात झाली. मी निवृत्ती जरा लवकरच घेतली. त्यामुळं वेळ मिळत होता. सुचलेलं लगेच लिहायला बसू शकत होते. मग कथा ललित लेख लिहायला सुरवात झाली. ‘जाहल्या तिन्हीसांजा’ हा कवितासंग्रह व ‘मर्म बंधातली ठेव ही’ हा कथा, ललित लेख यांचा संग्रह मुलाने प्रकाशित केला. अर्थात फक्त घरगुती वितरणासाठी. स्वरचित कवितांना चाली लावून, त्या  विविध कार्यक्रमात सादर करत होते. पण खरी सुरवात झाली ती कोविड मध्ये आम्ही भावंडांनी सुरू केलेल्या साहित्य कट्ट्या पासून. त्याच्या थोडं आधी महावीर वाचनालयाच्या साहित्य कट्ट्या मध्ये सहभाग घेत होते. त्यामुळेच साहित्यिक मैत्रिणी मिळाल्या. कांहीतरी लिहिण्याची उर्मी निर्माण झालीच होती, त्यात भावंडांनी भर घातली.आता थांबायचं नाही असं ठरवलंय. बघू!

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “कालिंदी” – लेखिका : श्रीमती अनुराधा फाटक ☆ परिचय – सौ. मंजिरी येडूरकर ☆ 

पुस्तक – कालिंदी (लघु कादंबरी)

लेखिका – सुश्री अनुराधा फाटक 

प्रकाशक – नवदुर्गा प्रकाशन 

पृष्ठ संख्या – 136

किंमत – 250 रु

परिचय – मंजिरी येडूरकर. 

मुखपृष्ठ खूपच बोलकं आहे. कालिंदी मातोश्री या वृद्धाश्रमाचा आधार घेण्याचा विचारात आहे.असं दृश्य चित्रित केलं आहे.

श्रीमती अनुराधा फाटक

या लघुकादंबरीत एका स्त्रीची विविध रूपं फुलवली आहेत. आपला मुलगा लहान असतांना रणांगणावर निघालेल्या पतीच्या मनातील चलबिचल पाहून, कठोर होऊन त्याला स्वतःचं कर्तव्य बजावण्याचा आग्रह धरणारी वीरांगना, पती निधनानंतर मुलाचं संगोपन करणारी, त्याच्या विकासासाठी, उन्नतीसाठी झटणारी आई, मुलानं न सांगता लग्न केल्यानंतर ही त्याला समजून घेणारी शांत आई, एका रात्रीत पूर्णपणे बदललेला मुलगा बघून कांही न बोलता त्याच्या आयुष्यातून बाजूला होऊन वृद्धाश्रमाचा आधार घेणारी संयमी आई, अर्थात तीच नंतर त्या वृद्धाश्रमाचा आधार बनते. आपला मुलगा अडचणीत आहे व त्याला अडचणीत आणणारी त्याची पत्नीच आहे हे माहीत असूनही त्याला त्याच्या नकळत मदत करणारी हळवी आई, मुलाला कफल्लक करून त्याची बायको सोडून गेली व तो पूर्णपणे दारूच्या आहारी गेला हे समजल्यावर आपली सर्व मिळकत त्याच्या नावावर करणारी वत्सल आई, मुलानं दिलेली हीन वागणूक  विसरू न शकलेली व त्यामुळे पुन्हा त्याच्या समोरही जायचं नाही असं ठरवणारी स्वाभिमानी आई, मुलाची वाताहात सहन न झाल्यामुळे प्राणत्याग करणारी आई! ही कालिंदीची सारी रूपं आपल्या काळजाला स्पर्श करून जातात.कालींदीचं भावविश्व, समाजासाठी झटण्याची वृत्ती, दुःखीताच्या हृदयात प्रवेश करून त्याचे डोळे पुसण्याची ताकद या गुणांनी या व्यक्तिरेखेला आणखीनच झळाळी आली आहे.  असं हे बहुआयामी व्यक्तिमत्व उलगडत नेण्याचं शिवधनुष्य लेखिकेने लीलया पेलले आहे.निराधार झालेला मुलगा आईला शोधत येतो.तोपर्यंत आईनं वैकुंठाचा रस्ता धरलेला होता. तो विचारतो,” आई कुठे गेली?” याचं उत्तर डॉ सुनील देतात,” मुलाचं बालपण शोधायला गोकुळात गेली.” अशा सुरेख कल्पना तुम्हाला या लघुकादंबरीत वाचायला मिळतील. आवश्य वाचा.

© सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री

मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकावर बोलू काही ☆ “ज्ञात अज्ञात अहिल्याबाई होळकर” — लेखिका : सुश्री विनया खडपेकर ☆ श्री कचरू सूर्यभान चांभारे ☆

श्री कचरू सूर्यभान चांभारे

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “ज्ञात अज्ञात अहिल्याबाई होळकर” — लेखिका : सुश्री विनया खडपेकर ☆ श्री कचरू सूर्यभान चांभारे ☆

पुस्तक .. ज्ञात अज्ञात अहिल्याबाई होळकर

लेखिका .. विनया खडपेकर

प्रकाशक .. राजहंस प्रकाशन पुणे

प्रथमावृत्ती  2007

सातवी आवृत्ती: एप्रिल २२

पृष्ठे …288

अहमदनगर आता अहिल्यानगर नगर म्हणून ओळखलं जाईल….ज्या कर्तुत्वान मातेचे नाव या जिल्ह्याला देण्यात आले आहे …त्या  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावरील हा ग्रंथ !

ग्रंथाचा आरंभ करताना लेखिका विनया लिहितात की ….

अहिल्याबाई होळकर…

ती सत्ताधारी होती .पण ती सिंहासनावर नव्हती.ती राजकारणी होती पण ती सत्तेच्या चढाओढीत नव्हती.

ती पेशव्यांची निष्ठावंत होती पण ती त्यांच्यापुढे नतमस्तक नव्हती.

ती व्रतस्थ होती पण ती संन्यासिनी नव्हती.

जेव्हा लढाई हे जीवन होते आणि लूट हा जेत्याचा धर्म होता, हुकूमत हा सत्तेचा स्वभाव होता ,तेव्हा..

तिच्या कल्याणी प्रतिभेचे किरण नदीवरच्या घाटांमधून उमटले. तिच्या जीवनदायिनी प्रेरणेने तळी, अन्नछत्रे, धर्मशाळा असे रूप घेतले. तिच्या अनाक्रमक धर्मशीलतेचे मंगल प्रतिध्वनी भरतखंडाच्या मंदिरामंदिरातून घुमले…. मात्र ती सर्वगुणसंपन्न देवता नव्हती, तर तिला माणुसपणाच्या सगळ्या मर्यादा होत्या.

… लेखिकेने अहिल्याबाई चरित्र ग्रंथ मांडताना हा जो पहिलाच परिच्छेद लिहिला आहे ,त्यात ग्रंथाचे सार आहे, तसेच लोकमातेचेही जीवनसार आहे.

युगपुरूष ,लोककल्याणकारी राजांची आई राजमाता जिजाऊसाहेब, मुत्सद्दी येसूबाई राणीसाहेब, भद्रकाली ताराराणी मातोश्री  ,लोकमाता अहिल्याई ,झाशीची राणी लक्ष्मीबाई, अशा अनेक नारी नररत्नांनी इतिहासाच्या पानावर अतुलनीय छाप सोडलेली आहे. दुर्दैवाने त्या काळात स्त्रियांविषयी लिहून ठेवण्याची रीत नव्हती किंवा लिहिलं तरी भरभरून लिहावं अशी वहिवाट नव्हती. त्यामुळे नारी वंशात जन्माला येऊन  आणि नरश्रेष्ठाहून काकणभर अधिकची कामगिरी करूनही या अग्निरेखा थोड्या दुर्लक्षितच राहिल्या. अलीकडील काळात बरेचसे लेखन झाले आहे ,हा भाग वेगळा.

कुंभेरीच्या लढाईपासून लेखिकेने या चरित्र कादंबरीची सुरूवात केली आहे. सुरजमल जाटासोबत चाललेली ही लढाई अंतापर्यंत पोहचत नव्हती. निकराची झुंज चालू होती पण अंतिम परिणाम येत नव्हता. दुर्दैवाने १७ मार्च १७५४ रोजी  भर दुपारी अत्यंतिक दुर्दैवी घटना घडली. फिरत्या तोफेतून आलेला एक गोळा खंडेराव होळकरांच्या वर्मी बसला ,अन् होळकरशाहीच्या एकुलत्या एक खांबास उद्धवस्त करून गेला. खंडेरावांच्या जाण्याने मल्हारबाबा कोसळून पडले. उणंपुरं तिशीचं वय ,पदरात दोन लेकरं असताना अहिल्यामाईस वैधव्य आलं. धार्मिक आचरणाचा पगडा असलेल्या अहिल्यामाई सती जाण्याचा निर्णय घेतात पण मल्हारबाबा त्यांना परावृत्त करतात. संसार हे मिथ्या मायाजाळ असल्याचे एक मन सांगत असले तरी लहानग्या मालेरावातून व लाडक्या मुक्ताईतून लोकमातेचा जीव निघत नव्हता. मल्हारबाबा हे अहिल्यामाईस गुरू होते, पिता होते. त्यांच्या आज्ञावजा विनंतीचा मान ठेऊन अहिल्याई मागे थांबतात.

धर्मपरायण राज्यकारभार करताना अहिल्यामाईंनी प्रजेवर पुत्रवत प्रेम केले.त्यांच्या आयुष्यातील सर्व प्रसंग, घटना लेखिकेने सविस्तर मांडल्या आहेत. अहिल्यामाईंचे चरित्र मांडताना थोरले बाजीराव पेशवे ते दुसरा बाजीराव पेशवा असा अठराव्या शतकाचा राजकीय पट लेखिकेने वकुबाने मांडला आहे. शिंदे व होळकर हे पेशवाईचे दोन नेत्र होते. शिंदे-होळकरातील संघर्ष ,दुरावा व जवळिकताही लेखिकेने मांडली आहे. कर्तबगार राज्यकर्ती व धर्मपरायण पुण्यश्लोक म्हणून अहिल्यामातेस दोन बाजू आहेत. या दोघांचाही सार ग्रंथात आला आहे.

मल्हारबाबा व मालेरावांच्या मृत्यूनंतर राघोबादादा इंदूर संस्थानावर वरवंटा फिरविण्याच्या विचारात असतात. अर्थात याला माधवराव पेशव्यांची संमती नसते. पण तरीही पेशवेपद न मिळाल्यामुळे अस्वस्थ राघोबा काहीतरी अचाटच उद्योग करत असतात. त्यांच्या या निकृष्ट चालीला अहिल्यामाईंनी मुत्सद्दीपणे प्रतिशह दिला, या घटनेला तोड नाही. पण पुढे राघोबादादा दुर्दैवाच्या फे-यात अडकतात. नारायणराव पेशव्यांच्या खुनानंतरही बारभाई कर्ते राघोबास पेशवाईची वस्त्रे मिळू देत नाहीत. गोरे अस्वल (इंग्रज ) राघोबाला गुदगुल्या करत ,स्वतःच्या जाळ्यात ओढतात. राघोबा भरारी फरारी जीवन जगत असताना   राघोबाच्या पत्नीस म्हणजे आनंदीबाईस आसरा देतात. राघोबाच्या पापाच्या छायेची आठवण न करता मायेची छाया देतात…. हे सगळेही या पुस्तकातून समजते. 

धार्मिक कार्य करताना अहिल्यामाईंनी राज्याची सीमा लक्षात घेतली नाही. पश्चिम टोकाच्या गुजरातच्या सोरटी सोमनाथपासून ते अति पूर्वेच्या जगन्नाथ पुरीपर्यंत ,समुद्र काठच्या रामेश्वर दक्षिण तीरापासून ते उत्तरेत अयोध्या ,बद्रीनाथ, गया ,मथुरा अशी सर्वत्र मंदिराची बांधकामे, नदीवरील घाट, धर्मशाळा, अन्नछत्रे लोकमातेने घडवून आणली. त्यांचा न्यायनिवाडाही चोख होता. चोर ,पेंढारींचा बंदोबस्त करताना शिक्षा करण्याऐवजी त्यांच्या हाताला काम उपलब्ध करून देऊन ,विघातक हात ,विधायक हात बनविले.

प्रजाहितरक्षक लोकमातेचे कार्य देवगणातले असले तरी मनुष्य गणातले दुःख त्यांना चुकलेले नव्हते. सत्तर वर्षाच्या दीर्घ आयुत त्यांनी दोन डझनाहून अधिक जवळच्या लोकांच्या मृत्यूचे कडवट घास गटगट गिळले. पती खंडेरावांचा आभाळदुःख देणारा मृत्यू, पतीसोबत सती गेलेल्या स्त्रियांचे मृत्यू, पितृछत्र देणारे सासरे मल्हारबाबा, पुत्र मालेराव, सासू गौतमाबाई, सती गेलेल्या सुना, जावई यशवंत फणसे, नातू नथोबा ,लेक मुक्ताईचं सती जाणं ,सुभेदार तुकोजी होळकरांच्या पत्नी रखुमाईचा मृत्यू …..असे किती प्रसंग सांगावेत…  मृत्यूचे कडवट प्याले रिचवत रिचवत मातोश्रींचे जीवन पुढे पुढे सरकत होते. मुक्ताईच्या मृत्यूनंतर मात्र लोकमाता खरोखरीच खंगल्या होत्या. त्यानंतर अल्पावधीतच लोकमातेचा देह निष्प्राण झाला.

अखेरचे पर्व व उपसंहार या शेवटच्या दोन प्रकरणात लोकमातेच्या कर्तृत्वाचा अर्क मांडला आहे. वाचकाने शेवटचं  लेखनतीर्थ जरूर प्राशन करावं.

ऐतिहासिक शब्दांचे अर्थ देण्यासाठीही लेखिकेने आठ पाने खर्ची घातली आहेत.अनेक ऐतिहासिक संज्ञा स्पष्ट होण्यासाठी हा दस्तऐवज उत्कृष्ट आहे. ‘ अहिल्यामाईंचे जनकल्याण कार्य ‘ ही यादी वाचताना त्यांच्या आसेतुहिमाचल नवनिर्माणाची आपल्याला कल्पना येते. त्यानंतरच्या पानावर लोकमातेच्या जीवनातील ठळक घटनांचा तपशील तारीखवार मांडला आहे. संदर्भ सूची वाचताना लेखिकेच्या परिश्रमाची कल्पना येते. व शेवटच्या पानावर आपल्याला लेखिकेचा परिचय वाचायला मिळतो.

बीड-अहमदनगरच्या सीमेवर छोट्या गावात जन्मलेली एक ग्रामकन्या, पेशवाईच्या मातब्बर सुभेदाराची सून होऊन परराज्यात जाते, दुःखाचे अगणित कढ झेलत होळकरशाहीचा ध्वज लहरता ठेवते, आदर्शाचे नवनिर्माण पीठ तयार करत पुण्यश्लोक बनते…. हा अहिल्यामाईंचा जीवनप्रवास रोमांचकारी व प्रेरणादायी आहे. ‘ ज्ञात-अज्ञात अहिल्याबाई ‘ वाचत असताना अज्ञात असलेल्या अनेक गोष्टी ज्ञात होतात.एवढे मात्र खरे. “ ज्ञात-अज्ञात “  एकदा तरी वाचावेच ,अशी विनंती करतो.

पुण्यश्लोक लोकमातेस स्मृतिदिनी विनम्र अभिवादन.

परिचयकर्ता – श्री कचरू सूर्यभान चांभारे

संपर्क – मुख्याध्यापक, जि. प. प्रा. शाळा, मन्यारवाडी, ता. जि. बीड

मो – 9421384434 ईमेल –  [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘बिटवीन द लाईन्स’ (एकांकिका संग्रह)  – डाॅ. मिलिंद विनोद ☆ परिचय – श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ ‘बिटवीन द लाईन्स’ (एकांकिका संग्रह)  – डाॅ. मिलिंद विनोद ☆ परिचय – श्री अरविंद लिमये ☆

जगण्याचा नाट्यपूर्ण वेध ! – बिटवीन द लाईन्स (एकांकिका संग्रह)

लेखक : डॉ. मिलिंद विनोद. 

प्रकाशक : नवचैतन्य प्रकाशन, मुंबई.               

डॉ. मिलिंद विनोद यांचा ‘बिटवीन द लाईन्स’ हा दहा एकांकिकांचा संग्रह. या सर्वच एकांकिका,नोकरी व्यवसायानिमित्त लेखकाचे विविध परदेशांमधील प्रदीर्घकाळचे वास्तव्य त्याच्या अनुभवांचा पैस विस्तारित करणारे ठरल्याचा प्रत्यय देणाऱ्या आहेत.

या एकांकिका विषय-वैविध्य आणि आशय  यादृष्टीने लक्षवेधी आहेत. तसेच त्यातून डाॅ.मिलिंद विनोद यांची सूक्ष्म निरीक्षण शक्ती, जगण्यातली विसंगती न् कालातीत तसेच कालपरत्त्वे बदलणाऱ्या प्रश्नांचे बोचरेपण अधिकच तीव्र करीत असल्याचेही जाणवते.

‘मा सलामा जव्वासात’ व ‘वेसोवेगल सिनकाॅप’ अशी वरवर अनाकलनीय तरीही अर्थपूर्ण शीर्षकांसारखीच ‘बिटवीन द लाईन्स’ , ‘विजिगिषा’ यासारखी सुबोध वाटणारी बाकी एकांकिकांची शीर्षकेही रसिकांची उत्सुकता वाढवणारी आणि या एकांकिकांचे वेगळेपण अधोरेखित करणारीही आहेत.

‘मा सलामा जव्वासात’ आणि ‘विजिगिषा’ या एकांकिकांमधील नाट्य अनुक्रमे दुबई व अमेरिकेच्या पार्श्वभूमीवर आकाराला येते. ‘मा सलामा जव्वासात’ मधील जीवनसंघर्ष अस्वस्थ करणारा आहे. आपलं कुटुंब, आपला देश यापासून दूर परदेशी कामधंद्यासाठी जाऊन तिथे वर्षानुवर्षे असह्य कष्टप्रद आयुष्य व्यतीत करावं लागलेल्या मजूर- कामगारांचं उध्वस्त भावविश्व आणि त्यांच्या आयुष्याच्या वाटचालीतला भ्रमनिरासांती व्यथित करणारा अखेरचा प्रवास वाचकांच्या मनाला चटका देऊन जातो !

‘विजिगिषा’ ही एका सत्यघटनेवर आधारलेली, ‘अॅराॅन’ नावाच्या इंजिनिअरच्या, एका अनपेक्षित वळणावर सुरु झालेल्या घुसमटीमधील उलघालीचा नाट्यपूर्ण वेध घेणारी एकांकिका आहे.

या दोन एकांकिकांचा हा ओझरता परिचयसुध्दा इतर एकांकिकांचा कस आणि जातकुळी यांचा अंदाज येण्यास पुरेसा ठरावा असे वाटते.

इतर सर्व एकांकिकांची पार्श्वभूमी भारतीय असून त्यांच्या आशय-विषयांचं वेगळेपणही गुंतवून ठेवणारे आहे. अर्थशून्य अशा निरस मराठी मालिकांचं उपरोधिक चित्रण (‘टी आर पी’ अर्थात ‘थर्ड रेटेड पब्लिक’), गीतरचना,संगीत आणि गायन यापैकी कोणती कला श्रेष्ठ असा पेच पडलेला नायक आणि  गीतकार,संगीत-दिग्दर्शक आणि गायिका या रुपात त्याच्या सहवासात आलेल्या तीन स्रियांपैकी  कुणा एकीची निवड करावी हा त्याला पडलेला प्रश्न (‘त्रिधा’ द म्युझिकल), सरोगेट मदरची मानसिक ओढाताण, अस्वस्थता, दुःख आणि परिस्थितीशरणता (ओव्हरी मशीन), दयामरणाचा प्रश्न (वेसोवेगल सिनकॉम), संगीतप्रेमींची कालानुरुप बदललेली अभिरुची आणि त्यामुळे जुन्या संगीताचा वारसा प्राणपणाने जपू पहाणाऱ्या एका बुजूर्ग कलाप्रेमीची होणारी मानसिक कुतरओढ (रुखसत विरासत), विडी-कामगार स्त्रियांचं शोषण (पॅसिव स्मोकर), ‘वेड (अन)लाॅक’ मधे विभक्त जोडप्याला अनपेक्षित अल्पसहवासात झालेला हरवलेल्या प्रेमाचा साक्षात्कार, ‘बिटवीन द लाईन्स’ मधलं समाजापासून तुटलेलं किन्नरांचं वेदना आणि वैफल्यग्रस्त जगणं…..! ही या संग्रहातील एकांकिकांची ओझरती झलक !!

या सर्व एकांकिकांचं सादरीकरण अर्थातच दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ या सर्वांचाच कस पहाणारं ठरणार असलं, तरी लेखक-दिग्दर्शकाच्या योग्य समन्वयातून तयार होणाऱ्या या एकांकिकांच्या रंगावृत्ती प्रेक्षकांना उत्कट नाट्यानुभव देण्यास पूरक ठरतील असा विश्वास वाटतो.

पुस्तक परिचय – श्री अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ रणांगण… श्री विश्राम बेडेकर ☆ परिचय – श्री समीर सरदेसाई ☆

श्री समीर सरदेसाई

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ रणांगण… श्री विश्राम बेडेकर ☆ परिचय – श्री समीर सरदेसाई ☆

पुस्तक नाव: रणांगण

लेखक : विश्राम बेडेकर

प्रकाशक: रा. ज.देशमुख अँड कंपनी अँड पब्लीशर्स प्रा. लि.

पृष्ठे: ११४

किंमत: रू १८०/-

परिचयकर्ता:- समीर सरदेसाई(रत्नागिरी)

१९३० च्या दशकात साहित्य वर्तुळात प्रसिद्धीस येत असलेली ती तरुण आणि बंडखोर लेखिका, आणि तो मराठी चित्रपट सृष्टीत लेखक  पटकथाकार म्हणून स्थिरावू पहाणारा एक धडपड्या तरुण. अशी तरुण साहित्यिक जोडी जेवायला बसलेली असते.अर्थात गप्पा साहित्या विषयी च सुरू असतात.पत्नी च्या अनेक कादंबऱ्याचा मोठाच बोलबाला सुरू झालेला असतो.त्यामुळे पत्नी खुश असते.ती त्याला उत्सुकतेने विचारते अरे तू माझी ही कादंबरी वाचलीस का? तिने लिहलेली पुस्तके हा तिचा अभिमानाचा विषय असतो.खरे तर याला ही तिची दोन पुस्तके आवडलेली असतात पण उघड स्तुती करणे याच्या जिभेला जड जाते.तरीही तो चार बरी वाक्य टाकतो.पण तिचे काय समाधान होत नाही.ती अजून एका तिसऱ्या पुस्तकां बद्दल त्याला विचारते.आधीच त्याला स्तुतीपर बोलण्याचे कुपथ्य झाले होते. याने म्हटले त्यांच्याबद्दल जितकं कमी बोलावं तितकं बरं, म्हणून नाही बोललो, ती विचारते.. म्हणजे? ते पुस्तक भिकार आहे! तुझा मेहुणा प्रकाशक, त्याला तुला आधी मिळालेल्या नावाचा बाजार करायचा होता. म्हणून त्यांना तुला ते लिहायला लावलं आणि तू बळी पडलीस. एवढ सगळं एकल्यवर ती भयंकर संतापली…. यांन लिहिलं तरी काय आहे?….. जन्मल्यापासून सहा महिन्यात मेलेल एक नाटक. आणि आपल्याला इंग्लंडहुन लिहिलेली प्रेम पत्र पण त्यात सुद्धा कितीतरी चुका…. ती थोडे घुश्याने म्हणाली…. बोलणं सोपं असतं आधी करून दाखवावं मग बोलावं…. ते शब्द याला डिवचून गेले आणि मग याने ठरवलेच आता लिहून दाखवायचं. दुसऱ्याच दिवशी याने कागद पेन्सिली गोळा केल्या आणि खोलीचे दार लावून आत बसला. हा नुकताच  इंग्लंडहून बोटीने आला होता.बोटीवरच्या अनुभवांनी याचे मन खदखदत होते.याने ते मन कागदावर उपडे केले.त्या वेदनेच्या रसायनाला  लेखणीने पाट काढून दिले .हा लिहीत राहिला,लिहीत गेला…भान विसरून.आणि असं रोज एक महिना हा लिहीत होता. रोज लिहिलेले कागद तिच्यापासून लपवून ठेवत होता. आणि एक दिवस सगळं लिहून झाल्यावर हे हस्तलिखित आपल्या हरी नावाच्या जिवलग प्रकाशक मित्राकडे त्याने सोपवले, आणि म्हणाला तू छाप हे. पण यावर लेखक म्हणून माझे नाव कुठेही असता कामा नये.मित्राने पुस्तक एक महिन्यात  छापून दिले… पुस्तकावर लेखकाचं नाव “एक प्रवासी”; काही दिवसातच पुस्तकाचा साहित्य वर्तुळात बोलबाला सुरू झाला.त्यात केव्हातरी हे पुस्तक तिच्या हाती पडलं तिने ते लगेचच वाचून काढलं आणि ह्याला दाखवून म्हटलं खूप छान आहे हे पुस्तक… तू वाचलायस ?…. हा म्हणाला नाही…..मी लिहिलं आहे.

ती म्हणाली…”तू? खरच तू लिहलं आहेस हे?”

हा म्हणाला…..”म्हणाली होतीस ना आधी करून दाखवाव मग बोलावं? मी नंतर करून दाखवलं एवढच”.

 *मित्रांनो ही गोष्ट आहे 1939 सालातली आणि यातील तो आहे “तो” म्हणजे या पुस्तकाचे लेखक श्री “विश्राम बेडेकर ” आणि यातील “ती” म्हणजे तीन नावांनी प्रसिद्ध असलेल्या ख्यातनाम लेखिका….विभावरी शिरुरकर …. बळूताई खरे आणि याची पत्नी म्हणून ओळख असणाऱ्या मालतीबाई बेडेकर होय……ही झाली या कादंबरीची जन्म कथा.

 तब्बल 84 वर्षे झाली तरीही रणांगण आजही ताजेतवाने आहे महाराष्ट्रातील एकही विद्यापीठ नसेल की जिथे या कादंबरीचा पदवी किंवा पदव्युत्तर  अभ्यासक्रमासाठी समावेश झालेला नसेल.  मराठीतील गाजलेल्या  कादंबरी ची यादी ही रणांगणाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. अनेक वर्तमानपत्रे खाजगी संस्था यांनी वेळोवेळी घेतलेल्या वाचक कौलांमध्ये रणांगण या कादंबरीचे खूप वरचे स्थान आहे.प्रसिद्ध लेखक आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते भालचंद्र नेमाडे कोसलाच्या प्रस्तावनेत म्हणतात …” बेडेकरांच्या रणांगण नंतर एकही चांगली कादंबरी मराठीत झाली नाही” .तब्बल 84 वर्षे होऊन आजही या कादंबरी मधील आशय ताजा आहे. साहित्य क्षेत्रातील मैला चा दगड ठरलेली ही कादंबरी वाचताना अगदी गुंगून जायला होतं. कादंबरीचा काळ आहे 1930 च्या दशकाचा आणि  दुसऱ्या महायुद्धाची नुकतीच सुरुवात होत असलेल्या 1939 मधला आहे इंग्लंड कडून परत मुंबईकडे येताना जहाजावर या कादंबरीचा कथानायक चक्रधर हॅर्टा नावाच्या जर्मन ज्यू तरुणीला भेटतो आणि तिच्या प्रेमात पडतो. सर्वच कथानक हे या बोटीवरच उलगडत जाते. बोटीवरचा हा अकरा दिवसाचा प्रवास आहे. बोटीवर विविध देशांचे धर्माचे वंशाचे तसेच भारतातील ही विविध जाती धर्माचे लोक असतात. या अकरा दिवसाच्या प्रवासात घडलेले हे कथानक आहे.

व्यक्ती  व्यक्ती मधील प्रेम भावना, राष्ट्रप्रेम, धार्मिक आणि वांशिक अस्मिता, या सर्व भावनांना बेडेकरांनी अगदी बेमालूम पणें एकत्र गुंफलेले आहे.. प्रेम हा या कादंबरीचा मूळ गाभा असला तरी दुसऱ्या महायुद्धाची पार्श्वभूमी,धार्मिक आणि वांशिक विद्वेष त्यातून बदलत गेलेले जागतिक राजकारणांचे संदर्भ आणि  त्यातून निर्माण होणाऱ्या व्यापाऱ्याचा   हव्यास, आणि मानवी जीवन व्यवहाराचे यश अपयश हे सगळं या कादंबरीत अतिशय चपखलपणे मांडण्यात आलेले आहे. बऱ्याच वाचकांना ही कादंबरी म्हणजे निव्वळ प्रवास वर्णन व त्यातील प्रेम कथा असे वाटते परंतु जशी ती प्रेमकथा आहे तशीच ती युद्ध कथाही आहे दोन संहारक युद्धांच्या दरम्यान घडलेली मानवी मनाची युद्धकथा आहे.हे युद्ध काही साधेसुधे नव्हते ते महायुद्ध होते. दुसऱ्या महायुद्धाची सुरुवातीलाच जर्मनीत वांशिक विद्वेषाचे वारे खूप मोठ्या प्रमाणावर वाहायला लागले होते.आणि याची झळ पूर्ण युरोपभर पसरायला लागली होती. आणि याच वातावरणाचा अनुभव घेऊन, चक्रधर नावाचा या कादंबरी चा मराठी नायक भारतात परतण्यासाठी निघाला होता. ज्या इटालियन बोटीतून हा प्रवास करत असतो, त्याच बोटीवर कथेची नायिका हॅर्टा सुद्धा असते. हिटलरशाहीमुळे ज्यांची त्यांच्या देशातून हकालपट्टी होते त्यातीलच एक अभागी हॅर्टा एक होती.पुढे काय होणार आहे याचा काही आगा पिछा नसलेल्या या हॅर्टा ला चक्रधर भेटतो.आणि बघता बघता या बोटीवर च दोघांचेही प्रेम फुलते.दोघांचेही आधी प्रेमाचे जोडीदार वेगळे होते. चक्रधरची प्रेयसी उमा दुसऱ्याशी लग्न करून जाते. आणि हॅर्टाचा प्रियकर जर्मन सैन्याकडून मारला जातो.तिच्या पूर्ण कुटुंबाला एकंदरच जर्मनीतील द्वेष  आणि क्रौर्य पाहता आपण जगू की मरू याची खात्री नसते.त्यामुळे हे कुटुंब जर्मनी सोडून चीन ला चाललेलं असत.आणि त्याचवेळी तिला बोटीवर चक्रधरच्या रूपाने पुन्हा प्रेमाचा ओलावा मिळतो.बोटीवरच्या अवघ्या दहा दिवसाच्या त्याच्या सानिध्यात ती स्वर्ग सुख अनुभवते. तिला मिळालेले हे थोडेसे सुखही सोडवत नसते.आणि म्हणूनच चक्रधरच्या प्रेमात नी:संकोचपणे बुडून जाते. यावेळी ती आजूबाजूच्या परिस्थितीची कसलीच पर्वा  न करता चक्रधर पुढे समर्पित होण्याची तयारी दर्शवते. आपण ज्यू असल्याने आपल्याशी चक्रधरला  कधीही लग्न करता येणार नाही याची तिला पुरेपूर जाणीव असते. परंतु तरीही चक्रधर तिच्यापासून कायमचा दुरावण्यासाठी अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक असताना त्याचे दुःख करत वेळ न घालविता ती त्या परमोच्य सुखाच्या क्षणासाठी धडपडते. अखेर ती बोट मुंबईच्या किनाऱ्याला लागल्यानंतर हॅर्टा ला चक्रधरला पासून कायमचे दूर जावे लागते. कधीही न परतण्यासाठी. हॅर्टाला आपली चक्रधर शी पुन्हा कधीही भेट होणार नाही याची जेव्हा जाणीव होते तेव्हा मात्र ती उन्मळून पडते. बोटीवरून चक्रधरला पत्र पाठवूनही तिला आपल्या मनाचा कोंडमारा सहन करता येत नाही आणि ती बोटीवरून उडी घेऊन आत्महत्या करते आणि चक्रधर…! तो मुंबईतल्या एका हॉटेलमध्ये तिची आठवण काढत कुढत बसलेला असतो.  कारुण्य व मानवी जीवनाची हतबलता याचे सुरेख मिश्रण या कादंबरीत पाहायला मिळते.धर्म, वांशिकता व त्यातून निर्माण होणारा सत्तासंघर्ष  व व्यापारच्या लालसे पोटी होणारे महायुद्ध, आणि यात होरपळून निघणारी व सर्वस्व गमावून बसलेली सर्वसामान्य जनता.आपलीं जन्मभूमी आणि कर्मभूमी सोडून मर्जी विरुद्ध अन्य देशात करावे लागलेले स्थालंतर त्यातून  जगण्यासाठी  करावी लागणारी अगदी केविलवाणी धडपड. याचे अचूक व मर्मभेदी वर्णन बेडेकरांनी यात चित्रित केले आहे.एखाद्या खऱ्याखुऱ्या रणा सारखेच हे प्रत्येकाच्या आयुष्यातील वैयक्तिक रणांगण जिंकणं देखील तितकेच कठीण असा एकूण निष्कर्ष निघतो. मग आपला देश, आपले रीतिरिवाज, आपले लोक, आपलं माणूस म्हणजे नक्की काय? एका माणसाशी नाते जोडणे म्हणजे नक्की काय? कितपत सामाजिक, आणि कितपत वैयक्तिक? हे सगळे प्रश्न बेडेकर उपस्थित करतात.*

अवघ्या ११४ पानी पुस्तकात बेडेकरांनी जे चितारले आहे, ते सगळ परिचयात देणं खूप अवघड नव्हे दुरापस्त आहे.तसेच या पुस्तकातील खरी दाहकता अनुभवायला प्रत्येकाने  स्वतः हे पुस्तक वाचून संदर्भ लावणे शहाणपणाचे ठरेल असे मला वाटते.

पुस्तक परिचय – श्री समीर सरदेसाई

रत्नागिरी

९६६५०५९९१४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ बिंदूसरोवर …  श्री राजेंद्र खेर ☆ परिचय – सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

सुश्री तृप्ती कुलकर्णी

?पुस्तकावर बोलू काही ?

☆ बिंदूसरोवर …  श्री राजेंद्र खेर ☆ परिचय – सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

पुस्तक : बिंदूसरोवर 

लेखक : राजेंद्र खेर.

प्रकाशक : विहंग प्रकाशन, पुणे. 

पृष्ठसंख्या : २०७.  

काही योग हे विलक्षण आश्चर्यकारक असतात. ध्यानीमनी नसताना एखाद्या पुस्तकाची आपण निवड करणं आणि त्या पुस्तकाने आपल्याला झपाटून टाकणं इतकं की जणू आता तेच आवश्यक होतं असं वाटण्याएवढं… मला वाटतं अशावेळी ते पुस्तक वाचन घडणं ही गोष्ट सहज घडलेली नसून ती नियतीचा एखादा भाग असते‌. 

‘बिंदूसरोवर’ हे राजेंद्र खेर यांच्या पुस्तकाचं वाचन हा असाच एक योग…  वाचनालयात जाताना डोक्यात गंभीर, विचारप्रवर्तक असं पुस्तक न घेता, आता एखादं विनोदी हलकंफुलकं असं पुस्तक घ्यावं असा होता. पण तोंडून अचानक राजेंद्र खेर यांचं नाव बाहेर पडलं. तेव्हा हे पुस्तक समोर आलं. वाचून तर बघूया या भावनेतून हे पुस्तक घेऊन मी घरी आले आणि त्या पुस्तकानं मला वाचता वाचता झपाटून टाकलं. आपल्याला आत्ता हे नाव का सुचलं आणि आपण आत्ता अशा स्वरूपाचं पुस्तक का वाचत आहोत हा प्रश्न मला मी ते पुस्तक वाचेस्तोवर पडलेला होता. पण जसं जसं मी ते पुस्तक वाचत गेले तसं मला जाणवलं की आत्ता माझ्या मनाला, विचारांना ज्या प्रकारचं वाचन किंवा बौद्धिक खाद्य हवं होतं, ते हेच पुस्तक देऊ शकतं. आणि उलट आश्चर्य वाटलं की २००८ साली प्रकाशित झालेली ही कादंबरी आजपर्यंत आपण का वाचली नाही? 

संपूर्णतः काल्पनिक म्हणावी अशी (अर्थात प्रत्येक कल्पनेची नाळ ही कुठेतरी, कधी ना कधीतरी वास्तवाशी जोडलेली असतेच) ‘बिंदूसरोवर’ ही कादंबरी भारतीय अध्यात्माचं विलोभनीय रूप दाखवते. आणि गंमत म्हणजे कादंबरीचा कालखंड हा २०२५ सालचा घेतलेला आहे. २००८ साली कादंबरी लिहिताना सतरा वर्षानंतर काय परिस्थिती असेल असा विचार करून यात लेखन केलेलं आहे, याचं मला नवल वाटलं. अर्थात सतरा वर्ष हा काळ संख्येच्या दृष्टीने पाहता फार मोठा नाही. पण वैज्ञानिक आणि वैचारिक दृष्टिकोनातून आजच्या वेगवान गतीच्या सापेक्ष नक्कीच महत्त्वाचा आहे. तरीही या ‘सतरा’ च संख्येमागे अजून काही कारण असेल का हा विचार मात्र मनात सतत डोकावतो आहे. माझ्यामते याचं उत्तर लेखकच देऊ शकेल. 

सबंध जगाला अध्यात्माच्या मार्गाने उन्नत मानवी जीवन जगण्यासाठी प्रेरित करणाऱ्या भारतीय संस्कृतीचा कालसुसंगत उत्तम परिचय करून देणारी ही कादंबरी… या कादंबरीत बिंदूसरोवर हे एक अध्यात्मातील उच्च अनुभूती देणारं महत्त्वाचं, पवित्र, अजेय असं ठिकाण असून, त्याचा मुक्ती या संकल्पनेशी घनिष्ठ संबंध आहे. आजकाल मुक्ती वगैरे थोतांड असून मुळात अध्यात्मातल्या अनेक गोष्टी या चुकीच्या आहेत, त्या माणसांमध्ये तेढ, श्रेष्ठ-कनिष्ठ भेद निर्माण करतात असं जोरदारपणे सांगितलं जातं. त्यावर सकस भाष्य करणारं हे कथानक आहे. 

यात अत्यंत भिन्न परिस्थितीत असलेल्या चार व्यक्ती या बिंदूसरोवराचा शोध घेण्यासाठी प्रवृत्त होतात. त्यापैकी केवळ एकाच व्यक्तीला या सरोवरापाशी पोहोचण्याची आणि आपलं नियोजित कर्तव्य पूर्ण करण्याची ओढ लागलेली असते. फक्त तिलाच या बिंदूसरोवराची महती माहीत असते. पण योगायोगाने काही व्यक्ती तिच्या आयुष्यात येतात आणि झपाटल्यासारख्या तिच्याबरोबर या प्रवासात सहभागी होतात. अनेक प्रसंग जीवावर बेतणारे असूनसुद्धा आणि यातून आपल्याला नक्की काय लाभ होणार आहे? हे माहीत नसूनसुद्धा त्या व्यक्ती कसल्या तरी अनामिक ओढीने या सबंध प्रवासात एकत्र राहतात. 

विश्वातल्या मुक्तीच्या प्राप्तीसाठीची तीन महत्त्वाची द्वारं …  वस्तुनिष्ठ, मनोनिष्ठ आणि आत्मनिष्ठ ..  याबाबत फार सुंदर उहापोह यात केला आहे. थेट उल्लेख नसला तरी स्वर्ग, नरक या कल्पना, तसंच पृथ्वीप्रमाणे इतरही विश्व असण्याची कल्पना यात सांगितलेली आहे. काही ठिकाणी पुराणातील घटनांचा आधार घेत या गोष्टी उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. 

या सगळ्यांच्या मुळाशी मानवाची पूर्ण सृष्टीवर ताबा मिळवण्याची वर्चस्ववृत्ती ही किती संहारक असू शकते आणि ती दिवसेंदिवस किती बळावत चालली आहे हे आपल्याला अनुभवायला मिळतं. 

सर्वसामान्य आयुष्य जगणाऱ्या आपल्यासारख्या या चार व्यक्तींचा बिंदूसरोवरापर्यंतचा उत्कंठावर्धक, रहस्यमय आणि थरारक प्रवास हा अत्यंत वाचनीय तर आहेच. पण त्याहीपेक्षा तो जास्त विचार प्रवर्तक आहे. आणि म्हणूनच सत्य आणि असत्याच्या सीमारेषेवर उभे असलेले हे कथानक वास्तव असावे असा मोह पडणारे आहे.

अज्ञानातून… ज्ञानाकडे 

ज्ञानातून… आत्मज्ञानाकडे

विकारातून… विचाराकडे 

आणि 

अस्विकृतीतून… स्वीकृतीकडे नेणारा हा विचारप्रवाह खरोखरच पुन्हा पुन्हा वाचावा असाच आहे. 

***

एक उत्तम विचार, काल्पनिक आणि एकदम वेगळ्या रंजक पद्धतीने मांडल्याबद्दल लेखक राजेंद्र खेर यांचे मनापासून आभार ! 

परिचय – सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “प्रेम रंगे, ऋतूसंगे” – कवी – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ परिचय – सौ. उज्ज्वला केळकर☆

सौ. उज्ज्वला केळकर

?पुस्तकावर बोलू काही?

☆ “प्रेम रंगे, ऋतूसंगे” – कवी – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ परिचय – सौ. उज्ज्वला केळकर ☆

पुस्तक – प्रेम रंगे,ऋतूसंगे

कवी –  सुहास  रघुनाथ  पंडित

सुहास पंडित यांचा हा दुसरा कविता संग्रह.  सध्याच्या विद्रोही आणि आक्रोशी कवितांच्या कोलाहलात यांची कविता वेगळ्या वाटेने चालताना दिसते. झुळझुळणार्‍या झर्‍याप्रमाणे, ती संथ, शांतपणे प्रवाहीत होते.. ती जीवनावर प्रेम करते. माणसांवर प्रेम करते. प्रेमभावनेवर प्रेम करते आणि निसर्गावरही प्रेम करते. काही कविता ‘गर्जायच्या’ आणि ‘गाजवायच्या’ असतात. त्या समूहमानाला आवाहन करतात आणि समूहाकडून टाळ्या मिळवतात. काही कविता स्वत:शीच वाचत, गुणगुणत समजून घ्यायच्या असतात. आणि वा: म्हणत त्यांना स्वत:शीच दाद द्यायची असते. सुहास पंडितांच्या कवितांची जातकुळी ही दुसर्‍या प्रकारच्या कवितांची. त्या वाचता वाचता आपोआप समजत जातात. त्यांची कविता अगदी साधी, सोपी, सुबोध आहे. प्रचारकी थाटाची, उपदेशपर, काही प्रबोधन करणारी अशी नाही. आपला अनुभव इतरांपर्यंत पोचावा, म्हणून त्यांनी कविता लिहिली. निसर्गाचा अखंड सहवास आणि माणसामाणसातील प्रेम, आपुलकी, नात्यांची जपणूक याशिवाय आपलं जगणं समृद्ध होऊ शकत नाही, असं त्यांना वाटतं, आणि ते खरेच आहे. आपण काही वेगळं, नवीन असं कवितेतून मांडलं, असं ते म्हणतही नाहीत. सार्वजनिक अनुभव ते सांकेतिक पद्धतीनेच मांडतात. मात्र त्यांचे शब्द, कल्पना येतात, ते विशिष्ट लय घेऊन येतात. वृत्तात बद्ध होऊन येतात. छंद-वृत्त यावर त्यांची चांगली पकड आहे. आपला आशय मांडण्यासाठी त्यांना शब्दांची कसरत करावी लागत नाही. ‘शब्द त्यांच्या सोबतीला’ नेहमीच राहिले आहेत.  त्यांच्या कविता, त्यांच्या मनाचे भाव प्रकट करणारी भावगीतेच आहेत. त्यांची कविता भावगीतकार भा. रा. तांबे यांच्याशी त्यांची कविता नाळ जोडते.

श्री सुहास रघुनाथ पंडित 

‘अचानक भेट’ या कवितेत ते सांगतात, तिची अचानक भेट झाली, की जीवनात सुखाची बरसात होते, पण निरोप घेताना मात्र  एकांतात तिच्याशिवाय रात्र घालवायाची  कशी?’ या विचाराने ते अस्वस्थ होतात ‘अपुरी आपुली  भेट’ कविता वाचताना ‘अभि ना जाओ छोडकर, ये दिल अभी भरा नाही.’ या सुप्रसिद्ध गीताची आठवण येते. पण त्यापुढे जाऊन ते विचारतात,  ही अपुरी भेट पुरी कधी होईल? ते म्हणतात, ‘शब्दच होतील पक्षी आणिक गातील गाणी तव दारी.’ तू मात्र तो अर्थ समजून घे, म्हणजे माझ्या मनाला पुन्हा उभारी येईल.’ प्रेमाचे नाते हे स्पर्शाच्या आणि शब्दाच्या पलीकडले असल्याचे ते सांगतात आणि तिनेही ते समजून घेतले आहे. म्हणूनच मग प्रीतीचे गीत ती मनातच गाते. म्हणते, ‘मी कधीच ‘नाही’ म्हटले नव्हते तुला … उमलायाचे? उमलू दे तुझ्या मनातील प्रीतफुला. ‘ होकार देण्याची ही तर्‍हाच न्यारी नं?  ‘ध्यास’ कवितेत तिला भेटायचा ध्यास त्याला लागलाय. की त्याला भेटायचा ध्यास तिला लागलाय. कवितेची गंमत अशी की हा ध्यास त्याला लागलाय की तिला? स्पष्ट होत नाही, पण ते म्हणतात,

   स्वप्न होते, सत्य होते, काय होता भास तो

   गुंतले हे ह्रदय माझे एकच आता ध्यास तो

एकदा हृदये परस्परात गुंतली आहेत. परस्परांची ओळख पक्की झाल्याने आता प्रेमाची अमृतवेल बहरेल आणि जीवनात सुखाची बरसात होईल. मग तसेच होते. दुराव्याचा काळ संपतो. ती येते. लक्ष फुलांच्या गंध कुपीतील सुगंध उधळत येते. देवघरातील लक्ष ज्योतींचा प्रकाश होऊन येते. लक्ष कल्पना कवि प्रतिभेसह मनात फुलवत येते. धुंद जीवनी कसे जगावे, समजावत ती येते. ती म्हणजे श्वासातून फुलणारी साक्षात कविता त्याला वाटते. आता दुरावा संपतो. दोघे एकमेकांची होतात. सुखाचे घरटे बांधले जाते. या नव्या नव्हाळीत असतेस घरी तू तेव्हा मन फुलापाकरू होतं आणि जगण्याचं अत्तर होतं. ‘तुझा असा सहवास लाभता, चिंता, व्याधी सारे मिटते. ते तिच्याबद्दल कृतज्ञतापूर्वक लिहितात, व्रत कसले हे जन्मभराचे घेशी?  … ना मागशी पण अनंतरूपे देशी ‘ यामुळे आश्वस्त होत तिच्यावर  सगळं घर सोपवून आपण निर्धास्त झाल्याचे ते सांगतात. त्यांना जगण्याचं उत्तर सापडतं. कोणतं? ते काही लिहिलेलं नाही. त्यांनी  ते सुचवलय. ते उत्तर म्हणजे तिचं अस्तित्व. तिचं असणं.

अनेक दिवसांच्या सहवासानंतर तिच्या मनातली दु:खे, खंत, आनंद त्याला अचूक कळतात. मुलांच्या आठवणीने ती दु:खी, सैरभैर झाली आहे, हे लक्षात येताच, ते तिला समजावतात,’ सहज जाणतो’मध्ये ते म्हणतात, पंख फुटले की घरट्यातून पाखरे उडून जाणारच. ‘असती सुखरूप कशास चिंता गगन तयांना खुले

     ‘पंख लाभता नाते त्यांचे नव्या युगाशी जुळे

     विश्वासाचा बांधुनी सेतू हासू येवो तव वदनी तुझ्या माया-ममतेचा आणि सदिच्छांचा आशीर्वाद तेवढा त्यांना लाभू दे म्हणजे झालं.

दिवस सरतात. वय वाढतं. मन प्रगल्भ होतं. तशीच कविताही प्रगल्भ होते. सूर्यास्ताच्या वेळी ते म्हणतात, लोकांतातील गप्पा नकोत. एकांतातील जवळीक साधू . आता हिशेब कसला मागायचा, जे आहे, ते आपली शिल्लक आहे. आपलेही काही चुकले असेल, सगळी काही तिची चूक नसेल, याचीही त्यांना जाणीव होते. इतकं जगणं झाल्यावर आताच कुठेशी ओळख झाली., असेही त्यांना वाटते आणि ते म्हणतात,

     ‘असेच राहू चालत आणिक अशीच ठेवू साथ सदा.

     आता जराशी ओळख झाली, परस्परांवर होऊ फिदा ‘ 

तर ‘विश्रांतीचा पार जुना’ मध्ये ते सांगतात,

     ‘खूप जाहले खपणे आता जपणे आता परस्परांना

     खूप जाहला प्रवास आता गाठू विश्रांतीचा पार जुना  पुढच्याच कवितेत ते म्हणतात,

     विसरायाचे अन् सोसायाचे आता सारे झाले गेले’ 

त्यांच्या बहुतेक सगळ्या कवितांचा केंद्रबिंदू ती आहे. अर्थात काही कविता हटके, वेगळे सूर आळवणार्‍याही आहेत. ‘एक झाड गुलमोहराचं’ ही कविता आईविषयीच्या भावना व्यक्त करणारी. ‘वाढतो आपण तिच्याच सावलीत गोळा करतो पाकळ्या

ती नेहमीच जपत असते फुलं आणि कळ्या. म्हणजे मुलं- नातवंड. ती दिसताक्षणीच मन तिच्याकडे ओढ घेते. आपण कसेही वागलो तरी तिच्या मनात मात्र नसते पाप, म्हणजे त्यांच्याविषयीचे वाईट विचार. ’वधूपित्यास’ ही कविता यातली एक सुरेख कविता. वधुपित्याची मन:स्थिती जाणणारा कुणी आत्मीय म्हणतोय,  आल्या क्षणाला सामोरा जाणारा तू आज का केविलवाणा झालाहेस? मन घट्ट कर आणि  तिची पाठवणी कर. दु:ख होतय? खुशाल रडून घे घळघळा . आजच्या दु:खाच्या धारातून बरसणार आहेत उद्याच्या अमृतधारा. ‘सोड हात फिरव पाठ जाऊ दे तिला गाणं गात. तिचा सूर तिला सापडेल डोळ्यांमधलं स्वप्न फुलवेल. तू फक्त वाचत रहा तृप्ती तिच्या चेहर्‍यावरची अन् बरसात करत रहा आशीर्वाद आणि शुभेच्छांची

आणि एक कविता ‘शहाणपण’. या कवितेच्या पुढची. ‘बाबा, तुम्ही काळजी करू नका. सांभाळीन मी सगळं’ असं मुलगी म्हणते, तेव्हा बाबाला प्रतीत होतं, ‘मुलीची झाली बाई आणि बाईची झाली आई. आणि घेतलं तिने ‘शहाणपण’ अंगभर लपेटून गच्च पदरासारखं.

‘ऋणानुबंध ‘ हीही एक अशीच वेगळी कविता. ते म्हणतात, मी कधी ऋण काढले नाही. पण ऋणी मात्र झालोय. ‘इथली व्याख्या , नियम सगळंच निराळं. ज्याचे ऋण अधीक, त्याचाच मी प्रेमाभाराने गौरव केला. ‘ या ऋणाच्या बंधनाने मज असे बंदिस्त केले.

ज्यांनी मला बंदिस्त केले, मी त्यांना हृदयस्थ केले.’ हे ऋण त्यांच्या कवीवरील प्रेमभावनेचे आहे.   

पुस्तकात निसर्गचित्रांचे एक सुंदर सजलेले  दालन आहे. शब्दातून सुरेख अशी निसर्ग दृश्ये कवीने डोळ्यापुढे उभी केली आहेत. चैत्रापासून श्रवणापर्यंतच्या ऋतूंची लावण्य रुपे, त्यांच्या नाना कळा इथे शब्दातून अवतीर्ण होतात. प्रत्येक कविता, त्यातील प्रत्येक ओळ उद्धृत करण्याचा मोह होतो. भिंतीवर चढणार्‍या वेलीबद्दल त्यांनी लिहिलय,

     किती मुरडावे, किती लचकावे, वळणे घ्यावी किती

     सहजपणाने चढून जाते वेल ही भिंतीवरती.

     किंचित लवते, कधी थरथरते, शहारते कधी वार्‍यानी

     सांजसकाळी, कातरवेळी, बहरून येते  कलिकांनी

सुहासजींना बागकामाची अतिशय आवड आहे. त्यामुळे त्यांची रोजची सकाळ निसर्गाच्या, त्यातील झाडा-पेडांच्या सहवासात जाते. ते करताना वेलीचं जे सहज दृश्य नजरेस पडलं, त्याचं किती सहज दर्शन त्यांनी या ओळीत घडवलय.

      चैतन्याच्या लाख खुणा मध्ये ते म्हणतात,-  

     डोंगरमाथ्यावरती कुरळे कुरळे मेघ दाटतील.

     इंद्रपुरीचा दरबारी मग सौदामिनीचे पाय थिरकतील.

     वनावनातून होईल आता जलधारांचा धिंगाणा

     हिरव्या कोंबामधून फुटती चैतन्याच्या लाख खुणा   

प्रत्येक ओळीतून आलेल्या हिरव्या शब्दाची पूजरुक्ती असलेली ‘हिरवाई’ ही कविता, चित्त न लागे कुठेही ही मोरावरची कविता, रात्र काळी संपली, रानवाटा , किरणोत्सव, सूर्याचे मनोगत अशा आणखी किती तरी चांगल्या कविता यात आहेत. खरं तर   सगळ्याच कविता चांगल्या आहेत, असं म्हणायला हवं. इंद्रधंनुष्य. मोहक. नाना रंग ल्यालेलं. त्याला धारणीमाता म्हणते,

     काळ्या माझ्या रंगावरती जाऊ नको तू असा

     रंगांची मी उधळण करते विचार तू पावसा

     फळे, फुले अन् पानोपानी  खुलून येती रंग

     रूप पाहुनी माझे गगनी होशील तूही दंग 

दोन कविता यात अशाही आहेत, की ज्यात निसर्गाचे लावण्यरूप नाही. पाऊस कोपतो तेव्हामध्ये अतिवृष्टी आणि अनावृष्टी दोन्हीबद्दल लिहिले आहे. क्रुद्ध जाहली कृष्णामाई ( संथ वाहते कृष्णामाईच्या चालीवर) मध्ये त्यांनी लिहिले, मानवनिर्मित सर्व चुकांची ती जाणीव करून देते. ते लिहितात, निसर्ग छोटा, आपण मोठे मस्ती मगही अशीच जिरते.

शक्ती, बुद्धी व्यर्थची सारे विवेक नसता काही.     

ती मग  आपल्या हजार जिव्हा पसरून अपुल्या सारे कवेत घेते.

नाही म्हणायला या दोन कविता तेवढ्या प्रबोधनपर आहेत.

तर असे हे सुहासजींच्या कवितांचे नाना रंग. नाना आविष्कार. नजरबंदी, नव्हे मनबंदी करणारे.

निसर्गाच्या सहवासात त्यांचे प्रेम फुलते. पंडितांची प्रेमभावना व्यापक आहे. ती व्यक्तिपुरती मर्यादित नाही. ती निसर्ग, समाज, देश या सार्‍यांना स्पर्शून जाते.

पुस्तक परिचय – सौ. उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकावर बोलू काही ☆ “शितू” — लेखक : श्री गो. नी.दांडेकर ☆ श्री कचरू सूर्यभान चांभारे ☆

श्री कचरू सूर्यभान चांभारे

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “शितू” — लेखक : श्री गो. नी.दांडेकर ☆ श्री कचरू सूर्यभान चांभारे ☆

पुस्तक  : शितू

लेखक : श्री गो. नी. दांडेकर

प्रथमावृत्ती 1953 

तेरावी आवृत्ती 2016 

पाने 168 

या सुप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक श्री. गो.नी.दांडेकर यांच्याकडे अनेक कसदार साहित्य निर्मितीचं पितृत्व जात असलं तरी “ शितू ‘ चा मानदंड वेगळाच आहे. गोनीदांची ही एक अप्रतिम साहित्यकृती आहे. ‘ गोनीदांच्या मनाच्या गर्भात जन्माला आलेली मानसकन्या म्हणजे शितू ‘ असं उचितपणे म्हणता येईल. 

आता कन्याच मनात जन्माला आली आहे म्हटल्यावर तिचे माहेरही मनातच जन्माला येणार ना. शितूचं माहेर आहे कोकण. नारळासुपारीच्या बागांनी बहरलेलं, दर्यासंगे खडा पहारा देणारं कोकण.

कादंबरीच्या सुरूवातीलाच लेखक मनात शितू कशी आली ते सांगतात. एकदा हा प्रस्तावनेतला परिचय संपला की माणूस शेवटच्या पानापर्यंत शितूसोबतच  प्रवास करतो. 

शितूच्या कथेत पात्रांची फारशी रेलचेल नाही. शितू ,विसू व देवपुरूष आप्पा या तिघांभोवतीच कादंबरी फिरते. बाकी सदू ,भिकू,तान्या,भीमा ,अच्यूतकाका, भाग्या ही सारी पात्रं म्हणजे जेवणाचा स्वाद वाढविण्यासाठी ताटात मांडलेले पापड लोणचं.

 शितू पुस्तकाचा परिचय करून देताना मला एकाच वाक्यात परिचय संपविणं आवडेल ,अन् ते म्हणजे साखर ,गुळ,बत्तासा,पेढा ,ऊस हे सगळेच पदार्थ गोड आहेत. पण गोड असूनही भिन्न आहेत. मग गोड या शब्दाचा नेमका अर्थ काय ?त्याचा अर्थ एवढाच की स्वतः चव चाखा व गोडी ठरवा. शितू ही कादंबरी अशी देवाघरचा गोडवा प्यालेली.. संजीवनी प्यालेली. शितू ही परिक्षणातून वाचायची गोष्ट नाहीच आहे .. तर शितू मुळातून प्राशन करायचं प्रेमतीर्थ आहे. खरंतर इथंच माझं परिक्षण संपवता आलं असतं. पण वाचकांना अर्ध्या वाटेवर सोडणं माझ्या स्वभावात बसत नाही. म्हणून शितूचा अजून थोडासा परिचय करून देत आहे.

एखाद्या चित्रपटात थोडासा उद्धस्त , पांढरीशूभ्र दाढीवाला म्हातारा आपबीती सांगतो. संपूर्ण कथानक फ्लॕशबॕकमध्ये असतं. फ्लॕशबॕकच्या शेवटी पुन्हा तोच म्हातारा भेटतो. पण यावेळी प्रेक्षकांच्या डोळ्यांच्या कडा गंगा-यमुना झालेल्या असतात. हीच अनुभूती शितू वाचताना येते.

जांभ्या दगडाच्या खडकावर ,खळाळणा-या दर्याजवळच्या खाडीजवळ वसलेलं वेळशी हे एक टुमदार गाव. अर्थात शितूचं गाव. वेळशीकरांना दैवत म्हणून वेळेश्वर प्रिय व माणसांचा विचार करता वेळेश्वराइतकेच  गावातले आप्पा खोत प्रिय. आप्पा म्हणजे वेळशीकरांचा जीव की प्राण. आप्पा देवाचेही लाडके होते बहुतेक. देवानं आप्पांना दो हातानं भरभरून दिलं होतं, आणि आप्पा तेच सारं गावकीला चार चार हाताने वाटत होते. आगीच्या लोळातून एका म्हातारीला वाचविताना आप्पा जीवाची पर्वा करत नाहीत. पण या धाडसामुळे आप्पा दहापंधरा दिवस अंथरूणाला खिळून पडतात. पहिले तीन दिवस तर आप्पांना शुद्धच नसते. या पंधरा दिवसात सगळं गाव ,पंचक्रोशी आप्पांना भेटायला येत होती. चहाची आधणावर आधणं चढत होती. कामाच्या अतिरेकानं व अविश्रांत परिश्रमाने आप्पांची बायको अंथरूण धरते. शिवाय त्या दुस-यांदा आई होणार असतात. श्रम न सोसल्यामुळे काकू आप्पांना, वेळशीला कायमचं सोडून जातात. पण जाताना काकू आप्पांच्या पदरी एक बाळ देऊन जातात.हे बाळ म्हणजेच आप्पांचा लाडका विसू. 

शितू ही सुद्धा वेळशीचीच माहेरवाशिण .नक्षत्रावाणी गोड शितू कादंबरीत भेटते ती एका भयंकर दुःखद प्रसंगात. शितू ही आप्पाचा घरगडी भीमाची लेक. गोरीपान ,नितळ शितू सात वर्षाची असतानाच,   त्यावेळच्या रिवाजाप्रमाणे भीमा लेकीचे दोन हात करून देतो. शितूचा दुर्दैवाचा फेरा इथूनच सुरू होतो. लग्नानंतर दोनच महिन्यात तिला वैधव्य येतं. दुःखाचा डोंगर कोसळला असं सगळेजण म्हणतात. पण सात वर्षाच्या शितूला यातलं काहीच कळत नसतं. पण तरीही शितू रडत होती. नवरा मेला म्हणून ? नाही .नवरा तर तिनं नीट पाहिलेलाही नसतो. वैधव्यासाठी रडावं तर तिला त्याचा अर्थही कळत नव्हता.  पण तरीही धायधाय रडत होती. कारण सगळे तिला पांढ-या पायाची म्हणत होते. ती एकांतात आपल्या पायांना न्याहाळत होती. गो-यापान पायावर पांढरटपणा कुठं बिंदुलाही नव्हता. मग पांढ-या पायाची का म्हणत असतील ? पुन्हा ती रडू लागे. आईच्या माघारी वाढविलेल्या शितूचं रांडपण भीमासाठी कड्यावरून कोसळल्यासारखं होतं. गरीबाचं दैव नेहमीच झोपलेलं असतं असं त्याला वाटायचं. फार फार तर ते कूस बदलतं पण पुन्हा फेर धरून नाचायला वापस येतंच. शितू आणि भीमाचं दैव तर चक्रीवादळाप्रमाणे दिशा बदलत होतं. बालवैधव्याच्या अवघ्या सहा महिन्यातच शितूचे दुसरे लग्न तीस वर्षाच्या कालू आजगोलकरशी होतं. हा कालूही एके दिवशी खाडीत बुडून मरतो. आता तर शितूसाठी धरणी खायला उठली होती अन् आभाळ गिळायला उठलं होतं. आधीच पांढ-या पायाची पोर म्हणून हिणवली गेलेली शितू आता सर्वांच्याच नजरेत कुलक्षयी ठरते. लोकांच्या टोमण्यांना कंटाळून भीमा बाप्यालाही वाटतं तिला द्यावं विहिरीत ढकलून अन् व्हावं मोकळं. पण आप्पा शितूला जवळ घेतात.तिचा सांभाळ करतात. डोक्यावर आभाळ ,पायाखाली धरणी अन् पाठीवर आप्पाचा हात एवढंच तिचं जग होतं. 

दहा वर्षाच्या आतबाहेरचा आप्पांचा लाडका विसू व सात वर्षाची शितू  दोघांचं दैवत एकच—आप्पा. दोघांची छान मैत्री जुळते. घरातली सगळी कामं ती दोघं मिळूनच करतात. चौथीत गेल्यावर विसू मामाच्या गावी महाडला शिक्षणासाठी जातो. त्यावेळची शितूच्या बालमनाची घालमेल मूळ कादंबरीतच वाचणं इष्ट आहे. दहावीपर्यंत विसू महाडलाच राहतो. मधल्या काळात दोघांची भेट झालेली नसते. या काळात विसू म्हणजे मिशीवर जवानीची कोवळीक कोरलेला एक नव्या कातणीचा तरूण झालेला असतो. केतकीचं सौंदर्य घेऊन जन्मलेली शितूही तारूण्याच्या खुणा घेऊन उभी राहिलेली असते. खूप वर्षानंतर आलेला विसू तिचा जीव की प्राण असतो. विसूच्या दर्शनाला ती आतुरलेली असते. तिचा तो लाडका तरणाबांड विसू येतो. स्व बदलाच्या जाणिवेने शितू मनातल्या मनात चरकते. दोघांचंही एकमेकांवर जीवापाड प्रेम असतं पण शितू विचार करते.. “ मी माझे दोन नवरे गिळलेले आहेत. उद्या विसूच्या जीवाचे काही बरे वाईट झाले तर ? लोक काय म्हणतील ? आश्रयदात्या आप्पांना काय वाटेल ?”..  सळसळतं तारुण्य  आता लहानपणीच्या सहज भेटीतला अडसर बनलं होतं. विसूला शितू हवीच होती. शितूलाही विसू हवाच होता. पण प्रेमाचं सूत कधीच सरळ नसतं. त्याला अनेक गाठी असतात. आता त्या गाठीची परीक्षा घेणं शितूला नको वाटत होतं.

एके रात्री भयानक दुःखद घटना वेळशीत घडली. आप्पांना लालबुंद सापानं डंख मारला होता. सापाच्या जहरानं वेळशीचा जीत्ताजागता वेळेश्वर त्यांच्यातून हिरावून नेला होता. विसू व शितूसाठी आभाळच फाटलं होतं. विसूसाठी सारं गाव होतं ,आप्पांची पुण्याई होती. पण दुर्दैवी शितूसाठी आप्पांच्या जाण्यानं मागं काहीच उरलं नव्हतं. विसूही अक्षरशः वेडापिसा होतो. विसूला शितूच्या आधाराची गरज होती.आप्पानं केलेल्या उपकाराची परतफेड विसूला आधार देऊनच होणार होती. .  . विसूला शितू खरोखरीच सावरते पण त्यामुळे विसू शितूच्या अधिक जवळ जातो. पण शितू सावध असते. तिचंही विसूवर खूप प्रेम असतं पण जगाच्या भीतीपुढं तिचं प्रेम  म्हणजे तिला खुरटं झुडूप वाटते. ती विसूला टाळूही शकत नव्हती व जवळही घेऊ शकत नव्हती.

….  लाघवी भाषेच्या, कोकणी सौंदर्याने नटलेल्या, शितू-विसू प्रेमकथेचा शेवट काय झाला असेल ? 

तो गोडवा ,तो थरार अनुभवण्यासाठी शितू ही कादंबरी स्वतः वाचायला हवी.

पन्नाशीच्या दशकात गोनीदांनी रेखाटलेली शितू काल्पनिक कादंबरी आहे. म्हणायला ती गद्यात्मक कादंबरी आहे पण गद्य वाचताना, तिच्यातला भाव वाचताना असं वाटतं की ही कादंबरी नसून प्रेमकाव्य आहे. दर्याच्या संगतीने शांत खाडीत ती उगम पावते. फेसाळत्या सागराप्रमाणे ती उधाणते. पण मर्यादा ध्यानात येताच स्वतःचं आकुंचन करून घेते. त्या दोन संवेदनाक्षम जीवांचा गोफ गोनीदांनी इतका छान गुंफलाय की वाचक त्यात कसा अडकत जातो ते समजतच नाही. लेखकाच्या दृष्टीने शितू काल्पनिक असेल, पण वाचकाच्या दृष्टीने ती कुठेच घडली नसेल असं मात्र नाही. प्रेम हे सहज असतं ,निरामय असतं– पण त्याची प्रस्तुती खूप भयावह आहे. 

आज अनेक प्रेमकथांचा जन्म मनातच होतो अन् त्या मनातच विरतात. पण विरताना मनाला भावणा-या खुणा सोडून जातात. आणि या खुणा जगण्यासाठी साता जन्माचं बळ देतात. .

ही “ शितू “ नावाची सुंदर हळुवार प्रेमकथा अगदी तशीच —- इतकंच म्हणेन…… 

परिचयकर्ता – श्री कचरू सूर्यभान चांभारे

संपर्क – मुख्याध्यापक, जि. प. प्रा. शाळा, मन्यारवाडी, ता. जि. बीड

मो – 9421384434 ईमेल –  [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ दुसरी बाजू… श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆ परिचय – सौ. वंदना अशोक हुळबत्ते ☆

सौ. वंदना अशोक हुळबत्ते

? पुस्तकावर बोलू काही?

दुसरी बाजू… श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆ परिचय – सौ. वंदना अशोक हुळबत्ते

पुस्तक – “दुसरी बाजू”

लेखिका – मीनाक्षी सरदेसाई

प्रकाशक – श्री नवदुर्गा प्रकाशन. कोल्हापूर

पृष्ठ संख्या – २१६

किंमत – ३९०

समाज मनाचा आरसा म्हणजे कथासंग्रह” दुसरी  बाजू”

ज्येष्ठ साहित्यिका मीनाक्षी सरदेसाई् यांनी ललितलेखन, बालसाहित्य, कादंबरी, कविता संग्रह, कथासंग्रह,अनुवाद लेखन असे लेखनाचे विविध प्रकार हाताळले आहेत. चाळीस पुस्तके प्रकाशित आहेत.त्यांतील काही पुस्तकांना मानाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

त्यांचा “दुसरी बाजू”हा कथासंग्रह फेब्रुवारी २०२३ मध्ये प्रसिद्ध झाला.हा कथासंग्रह नुकताच वाचण्यात आला.या कथासंग्रहात एकूण अठरा कथा आहेत.या सर्व कथा यापूर्वी विविध दिवाळी अंकातून प्रसिद्ध झालेल्या आहेत.प्रत्येक कथा वाचनीय आहे.समाजातील लग्नव्यवस्थे विषयी  झालेले बदल,त्या बद्दलचा तरूणांचा बदलता दृष्टिकोन, वयोवृद्ध व्यक्तीच्या समस्या.वयोवृध्दांची अगतिकता, हतबलता.लेखिकेने आपल्या कथेतून मांडली आहे.लेखिकेची भाषा शैली सोपी आहे.विषयाची थेट मांडणी करतात.कथेच्या मांडणीत,विषयात कुठे ही अतिशयोक्ती आढळत नाही.सगळ्या कथा समाजातील वास्तव स्थितीवर प्रकाशझोत टाकतात.कथेतील घटना आपल्या अवतीभवती घडणाऱ्या आहेत.कथेची भाषाशैली संवादात्मक आहे.प्रत्येक कथा सहज उलगडत जाते.कुठे ही ओढूनताणून कथा पूर्ण केली आहे असं वाचणाऱ्याला अजिबात वाटत नाही.कथेतील नायक,नायिका सामान्य घरातील आहेत.त्यांचे प्रश्न रोजच्या जीवनातील आहेत.

“दुसरी बाजू” हा कथासंग्रह वाचताना वाचक आपले अनुभव कथेला जोडू पाहतो.वाचकाला ही कथा आपलीच आहे असे वाटते.वाचकाच्या मनात कथेचे एक  स्थान निर्माण करण्याचे सामर्थ्य लेखिकेच्या लेखनीत आहे.काही कथा विनोदी शैलीत आहेत तर काही कथा वाचकाला अंतर्मुख करतात .तर काही कथा नवा संदेश देतात.तरी कोणत्याही कथेतून लेखिका तत्वज्ञान सांगत नाही.काही कथा हलक्याफुलक्या आहेत.बऱ्याच कथेचे विषय सामान्य माणसाच्या जीवनातील असल्याने वाचकाला कथा आपल्या जीवनात घडत आहे असे वाटते. कथा वाचताना वाचक कथेशी एकरूप होतो.

‘दुसरी बाजू’ या कथासंग्रहात एकूण अठरा कथा आहेत.’दुसरी बाजू’ हीच कथासंग्रहातील पहिली कथा आहे.समाजात लग्न व्यवस्थेत वेगाने बदल होत आहेत.जुन्या चालीरीती बदलत आहेत.तरूणांची जीवनशैली फास्ट झाली आहे.थांबत बसायला वेळ नाही.पूर्वी सारखे पोहे खाऊन मुलगी बघायचा प्रोग्राम आज होत नाही.मुलेमुली आपल्या सवडीने हाॅटेल मध्ये भेटतात.मोकळेपणाने भेटतात.विचार जुळले तर लग्न ठरवतात.हे चांगले आहे.पण मुलींच्या अपेक्षा बदलेल्या आहेत.सगळं कसं रेडिमेड हवं असतं त्यांना.एक वेळ मुलीची बाजू लंगडी असली तरी चालेल.पण मुलांची बाजू शंभर टक्के परफेक्ट हवी.तसे नसेल तर काही कारण देऊन मुली मुलांना रिजेक्ट करू शकतात.या कथेत घरात जास्त माणसे आहेत, मला स्पेस कशी मिळणार? म्हणून,घराला लिफ्ट नाही म्हणून मुली मुलांना नकार देतात.घरातील म्हातारी माणसं मुलींना डस्टबीन वाटतात.आजच्या तरूणीचा लग्नाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलेला आहे.आपले लग्न स्वतः ठरवण्यास त्या समर्थ झालेल्या आहेत.पण मुला मुलींच्या लग्न विषयीच्या अपेक्षा ही बदलेल्या आहेत.भौतिक सुखाचा अधिक विचार केला जात आहे. लग्न ठरवताना येणाऱ्या अडचणीचे  अनेक पैलू लेखिकेने या कथेत मांडले आहेत.तसे प्रसंग लेखिकेने या कथेत मांडली आहेत.एकीकडे शुल्क कारणांमुळे नाती सांभाळणे दिवसेंदिवस कठीण झाले आहे तर दुसरी कडे मुलांना मुलींशी कसे वागावे हे समजेनासे झाले आहे.मुलांच्या मनाचा विचार करणे महत्त्वाचे आहे.या कथेत मुले मुलींना कसा धडा शिकवतात हे वाचनं रंजक आहे.ही कथा वाचकाला लग्न व्यवस्थेवर विचार करायला भाग पाडते.

आज काल प्रत्येक व्यक्तीला कामानिमित्त घराबाहेर पडावे लागते.चारपैसे कमवून घरी आणने ही काळाची गरज झाली आहे.घर आणि नोकरी सांभाळताना महिलेची मोठी कसरत होत आहे. अशा वेळी घरात वडिलधारी माणसं असतील तर थोडे सोपे होते.वडीलधारी मंडळी म्हणजे खरं तर संस्काराचे विद्यापीठ. मुलांना,नातवंडांना संस्कारक्षम बनवण्यासाठी वडीलधारी मंडळी जीवाच रान करतात. त्यांच्या सानिध्यात मुले आली की ती संस्कार बनतात. संवेदनशील होतात.पण आजकाल हे दिसते कुठे ? वडिलधारी माणसं घरात नकोच आहेत. संकुचित वृत्ती मूळे, स्वार्थ बोकाळल्याने , आपमतलबीपणा वाढल्यामुळे, घरातील वृध्द माणसे ओझे वाटू लागली आहेत.त्याचा तिरस्कार केला जात आहे.हाच विषय अधोरेखित करणारी  आज्जू ही कथा आहे. आजोबा आणि नातू यांच्या नात्यावर प्रकाश टाकणारी एक सुंदर कथा.सुनेला म्हाताऱ्या सासऱ्याची अडचण वाटते. नातवाचे मात्र आजोबांन वर नितांत प्रेम असते.आईचे आजोबांशी असणारे तुटक वागणे त्याला कळते.पण तो आईला काही बोलू शकत  नाही.आपल्या परीने आजोबांची काळजी घेत असतो.त्यांना जपतो. त्याच्या सानिध्यात राहतो.

ही कथा वाचताना वाचकाला आपले आजोबा नक्की आठवतील.

होम मिनिस्टर कार्यक्रमाने अवघ्या महाराष्ट्रातील महिलांना वेड लावले.आपली कामे भराभर  आवरून महिला हा कार्यक्रम न चूकता बघतात. एखाद्या एपिसोड चुकला तर रिपिट डेलीकास्ट बघतात.’ पैठणी ‘ ही कथा लेखिकेने याच विषयावर बेतली आहे.महागडी पैठणी भेट म्हणून मिळणार,आपण टिव्ही दिसणार, पैठणी मिळाली की नवरा आपल्या उचलणार आणि आदेश भावजी आपल्या भेटणार या साऱ्या गोष्टींची महिलांच्यात क्रेझ आहे.आदेश भावजीना फोन लागला  म्हटल्यावर महिला कशा पद्धतीने या खेळाची तयारी करतात,आपल्या नवऱ्यांना कसे मर्जीत आणतात, त्यांना खेळ कसे शिकवतात हे सारं लेखिकेने विनोदी शैलीत रंगतदार मांडले आहे.ही हलकीफुलकी आहे. ही कथा मन ताजे करून जाते.

जगात मातृत्व हा सर्वात मोठा सन्मान आहे.आई शिवाय आईच्या मायेने सांभाळ करणारा जगात विरळाच असतो.त्यातल्या त्यात बाईला लेकराची माया येवू शकते.पण पुरूषाला आईची माया करायला येण  अवघडच.संतांन मध्ये हा गुण दिसला की आपण त्यांना माऊली ही उपाधी जोडतो.आई थोरवी सांगणारी ” आई म्हणोनी कोणी” ही कथा आहे.ही कथा आहे सानियाची.आपल्या मुलांचे पालनपोषण कोण ही करेल. पण आपल्या सवतीच्या मुलांचा,सवतीच्या  पहिल्या नवऱ्यापासून झालेल्या मुलांचा सांभाळ सानियाची आई करत असते.घडल्या प्रसंगात बिचाऱ्या मुलांचा काय दोष ? म्हणून ती आई पण स्विकारते.पण या दुसऱ्याच्या चार मुलांच्या लादलेल्या मातृत्वामुळे आईची झालेली कुंचबना सानियाने लहानपणापासून बघितलेली असते.या अशा  विचित्र भेळमिसळ असलेल्या मुलांना एकत्र वाढत असताना समाजातून,शाळेतून झालेली कुचेष्टा सानियाने सोसलेली असते.आपल्या आईने सोसलेली यातना बघितलेली असते.अशी वेळ कुणाच्या ही वाट्याला येवू नये असे तिला वाटे.आपल्या आईला  स्वतःचे व्यक्तीमत्व, अस्तित्वच कधीच मिळाले नाही तिचे असे हे आईपण काय कामाचे? हा विचार लहानपणापासून सानियाच्या मनात घट्ट रूतून बसलेला असतो.म्हणूनच ती मनिषला मुलांची आवड असताना सुद्धा स्वतःआई होण्यासाठी नकार देते.मुलांचा सांभाळ करण्याचा ठेका काही  बायकांनी घेतला नाही.पुरुष ही वेळप्रसंगी आपले ममत्व सिध्द करू शकतो.हेच ” आई म्हणून कोणी”  या कथेत दिसते. मनिषचे ममत्व या कथेत दिसते.ही कथा उत्कंठता वाढवणारी आहे.लेखिकेने पात्राच्या संवादातून कथा पुढे नेहली आहे.

“आली लग्नघटी” ही कथा म्हणजे लग्नाच्या आदल्या दिवशी नवरदेव सोहम याच्या मनात येणाऱ्या विचाऱ्यांचे काहूर आहे.लग्न झाले की आपले व्यक्ती स्वातंत्र्य संपले.लग्नाच्या आदल्या दिवशी आपण आपले स्वातंत्र्य उपभोगावे असे सोहमला वाटत असते.उशिरा उठावे, मनाप्रमाणे वागावे अशी साधी अपेक्षा असते.पण घरातील बायका काही त्याची ही अपेक्षा पूर्ण करू देत नाहीत.तस ही

आपल्याला वाटते की लग्न म्हटलं की फक्त मुलीना खुप धडधडते,मनावर दडपण येते,आपण आपले घर सोडून परक्या ठिकाणी जाणार म्हणून मुली अस्वस्थ होतात.पण या कथेत मुलाच्या मनाची अस्वस्थता छान रंगवली आहे.हे ही होवू शकते.हे लेखिकेने दाखवून दिले आहे.

जेव्हा नवरा बायको दोघे करियर करत असतात तेव्हा एक पुढे एक मागे असेल तर स्विकारले जाते.समजून घेतले जाते.पण जेव्हा एकाच वेळी दोघाचे भाग्य उजळण्याची संधी येते तेव्हा माघार कुणी घ्यायची हा खरा प्रश्न असतो.दोघे समंजस असले तरी बऱ्याच वेळा  इगो आडवा येतो.”काही हरकत नाही” ही कथा म्हणजे अशाच समंजस पति पत्नीच्या नात्याची सुंदर गुंफण आहे.घर दोघांचे असते दोघांनी त्यासाठी समजूतदार दाखवावा लागतो. वेळप्रसंगी इगो आडवा न आणता आपल्या स्वप्नांना बाजूला करता आलं पाहिजे तर संसार टिकतो.कोण पुढे ,कोण मागे असे न मानता  दोघांचा समजूतदार पणा महत्वाचा असतो हेच सांगणारी ही कथा.ही कथा लेखिकेने खुप सुंदर हाताळली आहे

सूर जुळताना,बहिणा,सेम टू सेम ,आज काय स्पेशल?गुन्हा,खारीचा वाटा अशा एका पेक्षा एक सरस कथा या कथा संग्रहात आहेत.प्रत्येक कथेचा आपला एक नूर आहे.या कथा ही समाजातील विविध विषयावर भाष्य करणाऱ्या आहेत त्या वाचताना नक्की आनंद होईल.हा कथासंग्रह एकदा तरी वाचला पाहिजे असा आहे.” दुसरी बाजू” हा कथासंग्रह वाचल्यावर माझ्या मनात जे विचार आले ते मी इथं मांडले आहेत.मिनाक्षीताईना पुढील लिखाणासाठी अनेक शुभेच्छा.

© सौ.वंदना अशोक हुळबत्ते

संपर्क – इंदिरा अपार्टमेंट बी-१३, हिराबाग काॅनर्र, रिसाला रोड, खणभाग, जि.सांगली, पिन-४१६  ४१६

मो.९६५७४९०८९२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकावर बोलू काही ☆ “रमाई…” — लेखक : बंधु माधव (माधव दादाजी मोडक) ☆ श्री कचरू सूर्यभान चांभारे ☆

श्री कचरू सूर्यभान चांभारे

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “रमाई…” — लेखक : बंधु माधव (माधव दादाजी मोडक) ☆ श्री कचरू सूर्यभान चांभारे ☆

पुस्तक  : रमाई 

लेखक :  बंधु माधव (माधव दादाजी मोडक)

प्रकाशन :  विनिमय पब्लिकेशन मुंबई  

पाने : २९५ . 

२७ मे, रमाईमातेचा स्मृतिदिन.रमाईंच्या स्मृतिदिनी त्यांच्या कर्तृत्वाचा जागर मांडताना त्यांच्याविषयीच्या एखाद्या ग्रंथाचा परिचय मांडावा ,असा मानस होता.माझ्या जवळ उपलब्ध असलेल्या रमाई नावाच्याच चार पुस्तकांपैकी बंधु माधव यांचे रमाई पुस्तक परिचयासाठी निवडले.पुस्तकाचे लेखक आज हयात नाहीत पण हे भूलोक सोडण्यापूर्वी त्यांनी रमाईबाबत विपुल लेखन केलेले आहे ,शिवाय याच कादंबरीचे आकाशवाणीवरून नभोना#e-abhivyaktiट्य सादर केलेले आहे.सदर पुस्तकाची भाषा रसाळ आहे.डॉ.बाबासाहेबांसाठी चंदनासारख्या झिजलेल्या रमाईची कथा वाचताना डोळ्याच्या कडा ओलावतात.रमाई हे पुस्तक सुरस ,सुगंधी ,सुंदर आहे की नाही ते वाचकाने ठरवायचे आहे पण लेखक व माझ्या मते रमाई म्हणजे सोशिकता,सात्विकतेचा महामेरू आहे.फूल फुलावं म्हणून झाड रात्रंदिवस धडपडत असतं.लोकांना ते फुललेलं फूल तेवढं दिसतं .वर्षानुवर्षे झाडानं त्यासाठी केलेली धडपड मात्र लोकांना दिसत नाही.विश्ववंद्य डॉ.बाबासाहेब हे कोट्यावधी दलितांच्या हृदयातलं फूल असतील ,तर ते फूल फुलण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतलेलं झाड म्हणजे रमाई होय.

रमाई कादंबरीची सुरूवात रमाईच्या जन्म प्रसंगापासूनच सुरू होते.तिच्या रडण्याचा ट्याँ ट्याँ हा कादंबरीचा पहिला शब्द व रमाईने सोडलेला शेवटचा श्वास म्हणजे कादंबरीचा शेवटचा शब्द.तिच्या रडण्याचा  पहिल्या पानावरचा पहिला शब्द ते 295 पानांवर जगणं थांबल्याचा तिचा शेवटचा शब्द …. असा रमाई कादंबरीचा प्रवास.प्रत्येक पानावर रमाई भेटते ,अगदी पुस्तकाच्या शेवटच्या पानापर्यंत ;पुस्तक संपल्यावर ती पुस्तकातून बाहेर येते व वाचकाशी बोलत राहते.रमाई वाचून संपत नाही ,तर ती वाचून सुरू होते.

दापोली जवळचं वणंद,एक छोटं गाव हे रमाईचं जन्मगाव.गावकुसाबाहेरील पाचपंचवीस महारांच्या झोपडीपैकी एक झोपडी भिकू – रुक्मिणी या सालस कष्टाळू जोडप्याची.अंग मेहनतीचं काम करायचं अन् पोटाला पोटभर खायचं हा त्यांचा नित्यक्रम.शेजारी असलेला समुद्र यांना कधी उपाशी मरू देणार नव्हता.भजनी मंडळात दंग असलेला भिकू धोत्रे मासेमारी व्यवसायाकडे माशाचे टोपले उचलण्याचे काम करत असे.पोटाला काहीतरी देणारा ,संसाराला हातभार लावणारा रुक्मिणीचा बिन भांडवली उद्योग होता. तो उद्योग म्हणजे रस्त्यावरचं शेण गोळा करून शेणी (गवरी) लावणं व त्या शेण्या विकणं.सारं काही खूप मजेत नसलं तरी चंद्रमौळी झोपडीत पसाभर सुख नांदावं ,असा त्यांचा संसार होता.रमाईच्या जन्माआगोदर रूक्मिनीची कुस प्रसव झालेली होती.आक्काच्या रूपानं एक कन्या चंद्रमौळी झोपडीच्या अंगणात खेळत होतीच.आता रूक्मिन दुस-यांदा बाळंत होणार होती.परंपरेचा पगडा म्हणून मुलगाच व्हावा ,हा मानस कळा देताना रूक्मिनीचा व अंगणात बसलेल्या भिकूचाही ,पण पदरात पडली रमाई.मुलगी झाली म्हणून भिकू-रूक्मिनीची थोडी नाराजीच व्हायला हवी होती पण पदरात पडलेली मुलगी नक्षत्रावाणी गोड होती.गावातल्या अनुभवी नाणु सुईनीचं म्हणणं होतं की असलं राजबिंड गोड रूप म्या कंदी कंदी पायिलं नाही.महार गल्लीत आनंदीआनंद झाला.गावभटानं पचांग पाहून मुलीचं भविष्य सांगितलं  पोरगी मायबापाचं नाव काढणार.राजाची राणी होणार. रमा वाढत होती ,अन् भिकू-रूक्मिनीला गावभटाची सुखावह भविष्यवाणी आठवत होती.चंद्राची कोरीप्रमाणे ही चंद्रकोर वाढत होती.रमानंतर भिकू-रूक्मिनीला गौरी व शंकर ही दोन अपत्य झाली.कायमचं शारीरिक कष्ट  व एकापाठोपाठची एक अशी चार बाळंतपणं   ………….  रखमा खंगत चालली होती.तिच्या अशक्त देहाला आता मरण दिसू लागलं होतं.नव-याची व लेकरांची काळजी तिच्या डोळ्यात दिसत होती पण प्राणानं तिचा देह सोडण्याचा निर्णय घेतला होता.मरताना तिला एकाच गोष्टीचं समाधान होतं ते म्हणजे लेक रमा … पाच सात वर्षाचंच पोर खूप समजंस होतं … ते पोर तान्हया लेकरांची व बाप भिकूचीही आई व्हायला समर्थ होतं.बस्स एवढाच विश्वास शेवटच्या नजरेत ठेऊन ,एके रात्री तिन्ही लेकरांची जेवणं झाली की रख्माईनं प्राण सोडला.सात वर्षाची पोर रमा आईला पोरकी झाली.नियतीनं पायाखालची धरती अलगद काढून घेतली होती.काही दिवस जातात, न जातात तोच खंगलेला भिकूही धरणीमाईवर आडवा होतो ,तो कायमचाच.रमाईची धरणीमाय आधीच गेली होती अन् आता आभाळही हललं होतं.आभाळाखाली उघडी पडलेली ही तीन्ही लेकरं मामानं मुंबईला आणली.रमाईचे सख्खे मामा-मामी व चुलत मामा-मामीसहित चाळीतले सगळेच शेजारी पाजारी भिकू-रुक्मिणीच्या अनाथ अंशाला काही कमी पडू देत नव्हते.

सुभेदार रामजी आंबेडकर म्हणजे महारांसाठी भूषण नाव. भजन ,कीर्तन ,देवपुजेतलं एक सात्विक संस्कारी  नाव .विद्येची आराधना ,कबीराची प्रार्थना करणारा कडक शिस्तीचा भोक्ता पण कमालीचा कुटुंब वत्सल माणुस म्हणजे सुभेदार.सुभेदाराचा भिवा/ भीमा मॕट्रिकीत शिकत होता.तो काळ बालविवाहाचा असल्यामुळे शिक्षण चालू असलं तरी लग्न टाळण्याचा नव्हता.भीमासाठी रमा सुभेदारांच्या मनात निश्चित झाली.महारातला उच्च शिक्षित – बुद्धीमानतेचं शिखर भीमा व अडाणी निरक्षर रमा  यांचा विवाह फक्त शिक्षणात अजोड होता पण संस्कार ,कष्ट ,नम्रता याबाबत रमाच्या तोडीचं कोणी नव्हतं.हे सुभेदार जाणून होते.भीमाचा विश्ववंद्य बाबासाहेब  झाला ,याला कारण माता रमाई आहे.

मातापित्याचे छत्र हरवलेल्या दुर्दैवी रमाईच्या नशिबी नातलगांचे मृत्यू पाहणं जणू विधिलिखितच होतं. सासरे रामजीबाबांच्या रूपाने तिला पून्हा पितृछत्र मिळालं होत. पण हे सुख फार काळ टिकलं नाही. वृद्धापकाळानं सुभेदारांची सुभेदारी खारिज केली. एका जावेचा मृत्यू ,सासुबाईंचा मृत्यू ,आनंदरावांचा मृत्यू  हे दुःख रमाईसाठी आभाळ ओझ्याचं होतं पण नियतीला ते कमी वाटलं असावं, म्हणून लेक गंगाधर ,रमेश व मुलगी इंदू या पोटच्या लेकरांचा मृत्यू  रमाईच्या मांडीवरच नियतीने घडवून आणला. लाडक्या राजरत्नचा घासही नियतीने एके दिवशी गिळलाच. पदराच्या कपडात गुंडाळून ,लेकराच्या कलेवरावर माती ढकलताना आईच्या हृदयाच्या किती चिंधड्या चिंधड्या होत असतील ? नाही का ? 

बाबासाहेबांनी स्वतःला अस्पृश्य उद्धाराच्या कार्यात झोकून दिलेलं होतं. सुरूवातीच्या काळात बाबासाहेबांची आर्थिक अवस्था दैन्याची होती. त्यातच त्यांचे उच्च शिक्षण चालू होते. खूप खूप मोठ्या माणसाची बायको आहे ;हे समाधान रमाईसाठी आभाळभर ओझ्याचं कष्ट पेलण्याची ताकद देणारं होतं. बाबासाहेबांच्या संसारासाठी भावी बॕरिस्टरच्या बायकोने खूप कष्ट सोसले. दादर – वरळीपर्यंत पायी हिंडून गोव-या गोळा केल्या. त्या विकून अर्धपोटी संसार चालविला पण परदेशात शिकत असलेल्या नव-याचं लक्ष विचलित होऊ नये म्हणून त्या पत्रात सतत इकडची खुशालीच कळवत राहिल्या. वराळे मामांच्या वसतिगृहात धारवाड मुक्कामी असताना ,अनुदानाच्या विलंबामुळे मुलांची उपासमार  होत असल्याचे लक्षात येताच ,क्षणाचाही विलंब न लावता ,स्वतःजवळचं तुटपुंज सोनं गहाण ठेऊन ,आलेल्या पैशातून त्या मुलांना जेऊ घालतात. आईपण हे काही फक्त लेकरास जन्म देऊन साधता येतं असं नाही तर ते घास भरवूनही साधता येतं. म्हणूनच बाबासाहेब हे दलितांसाठी पिढी उद्धारक पितृतुल्य बाबा होते तर रमाई या आईसाहेब होत्या. बाबांचा व रमाईंचा पत्रव्यवहार वाचताना ,वाचकाचा जीव तीळतीळ तुटतो. पेपरातला बाबांचा फोटो पाहून रमाईचं काळीज मोठं व्हायचं पण त्याच पेपरात बाबाच्या जीवाला धोका असल्याची बातमी वाचून रमाईचं काळीज तुटायचं.  गोलमेज परिषदेला अस्पृश्यांचे पुढारी म्हणून डॉ.बाबासाहेब लंडनला जायला निघतात ,तेव्हा निरोपासाठी जमलेला जनसागर पाहून रमा मनाशी म्हणते ….. गावभटानं सांगितलेली भविष्यवाणी खरी ठरलीय. एवढ्या मोठ्या प्रजेच्या राजाची मी राणी हाय बरं.होय… मी राजाची राणी हाय.

पुरूषांना गगनभरारी कीर्ती मिळविण्याचं वेड असतं हे खरे आहे, पण गगनभरारीच्या पंखातलं बळ त्याची स्त्री असते.हे इतिहासानं वारंवार सिद्ध केलेलं आहे. बाबांसाठी रमा म्हणजे पंखातलं बळ होतं ,घरटं जतन करणारं प्रेमकाव्य होतं. रमाईच्या खडतर ,सोशिक आयुष्याचा प्रवास वाचनीय आहे. रमाईच्या लहानपणी आई रुक्मिणीनं रमाईला बिनामरणाचा नवरा नावाची गोष्ट सांगितलेली असते. या गोष्टीतल्या पार्वतीला मरण नसलेला नवरा असतो. त्यासाठी ती खडतर तपश्चर्या करते व महादेवाला मिळविते. बाळबोध रमा ,तेव्हा आईला म्हणते  “आई,मलाही मिळेल का गं बिनमरणाचा नवरा ?” तेव्हा रख्मा रमाईला पोटाशी कवटाळते व म्हणते नव-यासाठी कष्ट उपसशील तर माझ्या राणीला मिळेल ना बिनमरणाचा नवरा.  रमाईच्या आईची वाणी खरी ठरली. डॉ.बाबासाहेब या नावाला कधीही मरण येणार नाही. भयावह कष्ट सोसून ,शील – करूणेचा साज अलंकारून रमाई मातेने बाबांचा संसार  राखला ,फुलविला. आयुष्यभर झालेल्या अविश्रांत दगदगीने वयाच्या अवघ्या सदतिसाव्या वर्षी रमाईला नियतीने स्वतःच्या कुशीत चिरनिद्रा दिली. पण बिनमरणाच्या नव-याची बायको होऊन ,शुद्र म्हणून हिणवलेल्या जातीत जन्माला येऊनही राजा बाबासाहेबांची ती राणी झाली होती. करोडो दलितांची आई म्हणून रमाईच जिंकलेली होती. लोकदिलातला राजा राजर्षी शाहू महाराज ,बडोदा नरेश सयाजीराव महाराज ,विदेशातल्या विद्वान बुद्धिवंतांनी गौरविलेल्या बुद्धीच्या शिखराची ,रमाई मजबुत पायाभरणी होती. शेवटच्या क्षणी डोळे झाकताना ती कृतकृत्य  होती कारण आता तिचे भीमराव — बाबासाहेब झालेले होते.

स्त्री जीवनाची अनोखी ही कहाणी —  रमाई 

परिचयकर्ता – श्री कचरू सूर्यभान चांभारे

संपर्क – मुख्याध्यापक, जि. प. प्रा. शाळा, मन्यारवाडी, ता. जि. बीड

मो – 9421384434 ईमेल –  [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकावर बोलू काही ☆ “वयात येताना” – लेखिका – सौ. अर्चना मुळे ☆ परिचय – सौ. अलका ओमप्रकाश माळी ☆

सौ. अलका ओमप्रकाश माळी

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “वयात येताना” – लेखिका – सौ. अर्चना मुळे ☆ परिचय – सौ. अलका ओमप्रकाश माळी ☆ 

पुस्तकाचे नाव.. वयात येताना

लेखिका.. सौ. अर्चना मुळे

पहिल्या उकळीचा कडक चहा, मोगऱ्या ची कळी नुकतीच उमलताना त्याचा येणारा सुगंध.. तप्त धरेवर पडणाऱ्या पहिल्या पावसाच्या सरी नंतर येणारा मृद्गंध.. ह्या सगळ्या पहिल्या गोष्टींची मजा, चव काही निराळीच असते.. तसचं ह्या वयात येताना ह्या पुस्तकाबद्दल मला वाटतं.. कालच ह्या पुस्तकाविषयी माहिती होणं, त्यानंतर माझं पुस्तकं ऑर्डर करणं आणि त्याची वाट बघत असतानाच दस्तुरखुद्द लेखिकेकडून ते ताज ताज नवं कोर पुस्तकं आपल्याला मिळणं हे म्हणजे भाग्यच म्हणावं लागेल..आणि मग अशावेळी ते पुस्तक एका बैठकीत नाही वाचून काढलं तर आपल्यासारखे करंटे आपणच म्हणावं लागेल..असो.. वयात येताना हे पुस्तक म्हणजे प्रत्येक आई ने आईनेच कशाला बाबाने ही वाचलंच पाहिजे असं पुस्तकं आहे..

छोटंसं अगदी फक्त 80 पानांचं हे पुस्तकं म्हणजे.. आदर्श पालक होण्याची गुरुकिल्ली आहे.. मासिक पाळी हा तसा दबक्या आवाजात बोलला जाणारा विषय पण लेखिकेने एका मध्यम वर्गीय कुटुंबात घडलेला प्रसंग इथे मांडून अनेक कठीण प्रश्नांची उत्तर सोप्पी करून सांगितली आहेत.. अवनी शाळेत जाणारी एक मुलगी आई, बाबा आणि आजी यांच्या सोबत राहणारी.. अचानक आई बाबा ऑफिस मध्ये असताना तिची पाळी येते आणि आजी तिला ज्या प्रकारे समजावून सांगून आईला बोलवून घेते.. आई आजी मिळून तिला पडलेल्या प्रश्नांना योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करतात पण देवपूजा धार्मिक विधी इथे मात्र थोडीफार अंधश्रद्धा येतेच.. पण मग तिच्या शाळेच्या टीचर आणि शुभाताई मिळून एक कार्यशाळा घेतात आणि मुलींच्या मनातील भिती, लाज, अंधश्रद्धा ह्या सगळ्या प्रश्नांना अगदी खेळाच्या रूपातून उत्तर देतात आणि अवनी ला तिच्या प्रश्नांची उत्तर मिळतात..ह्याचं बरोबर आहार, व्यायाम या गोष्टींबद्दल असलेले समज गैर समज अतिशय सोप्पे करून मांडलेले आहेत.. पुढे येणारा विषय म्हणजे मैत्री, प्रेम आणि आकर्षण ह्यातील फरक.. ह्या टॉपिक मधे दोन तीन प्रसंगातून हा कठीण वाटणारा प्रश्न अगदी साधी साधी उदाहरण देऊन समजावून सांगितला आहे.. कॉलेज वयीन मुलींमध्ये तारुण्यसुलभ असणारे भाव आणि त्यांना मुलांबद्दल वाटणारे आकर्षण हे सगळं खरतर नैसर्गिक आहे त्यात गैर काहीच नाही पण ह्या आकर्षणालाच प्रेम समजण्याची केलेली घाई मुलींना कशी अडचणीत आणू शकते हे दोन  मैत्रिणी सरिता आणि गायत्री ह्यांच्या संवादातून अतिशय छान शब्दात इथे मांडलेली आहे..  दुसऱ्या एका भागात सुरेखा आणि एक मुलगा फक्त बोलताना दिसतात त्यातून घरी होणारे गैर समज.. समाजाने दिलेली वागणूक ह्यातून सुरेखा आणि आई मध्ये आलेला दुरावा.. मग त्यांना समजावून देणाऱ्या डॉक्टर मॅडम क्षणभर आपल्या ताई सारख्याच भासतात.. प्रेम आणि आकर्षण हा  विषय हाताळताना लेखिकेने मांडलेले विचार प्रत्येकाने वाचलेच पाहिजेत असे आहेत..

खर तर मुलगी मोठी होते वयात येते ह्याच्या चर्चा होतातच पण मुलगा वयात येताना त्याच्या शरीरात होणारे बदल ह्यांचा फारसा कोणी विचार करताना दिसत नाही.. खर तर अशा वयात मुलांना ही समजावून सांगण्याची समुपदेशनाची गरज असते अन्यथा कुठून तरी काहीतरी पाहून ऐकून ह्या वयातील मुलांवर फार गंभीर परिणाम होतात.. मुलं एकाकी एकटी बनातात स्वभाव विचित्र बनत जातो.. मुलींना फार आधी पासूनच आई आजी ह्यांच्याकडून थोडीफार कल्पना असते आईला, ताईला बोलताना ऐकलेल असत पण मुलांच्या बाबतीत सगळचं नवीन कुठल्याच घरात मुलगा वयात येताना त्याच्याशी चर्चा गरजेची आहे ह्याचा विचार केलेला मी तरी पाहिला नाहीय.. पण ह्या पुस्तकात ह्याचा विचार करून मुलगा वयात येताना ह्या शेवटच्या  टॉपिक मधे तो  अतिशय वेगळ्या प्रसंगातून  पण समर्पक शब्दात मुलांच्या वडिलांसोबत  दोघांना एकत्र समजावून सांगताना खूप छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करून लेखिकेने आपले मुद्दे समजावून दिलेले आहेत.. मी प्रत्येक टॉपिक मधले अगदी सगळे डिटेल्स इथे देत नाही कारण अगदी 10 वर्षा पुढील सगळ्यांनी हे पुस्तक किमान एकदा तरी वाचावच असं मला वाटतं.. आणि ज्यांच्या घरात चौथी पाचवी मध्ये शिकणारी मुलगा मुलगी आहेत त्यांनी तर हे पुस्तकं संग्रही ठेवावे असे पुस्तकं आहे.. सो चला तर मग वयात येताना काय काय घडलं, घडू शकतं हे आपल्या मुलाबाळांना लेखिकेच्या शब्दात समजावून सांगू जेणे करून आपल्यातील आई ला आपल्या मुलांशी बोलणं संवाद साधणं सोप्प होईल..

© सौ. अलका ओमप्रकाश माळी

मोब. 8149121976

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares