मराठी साहित्य – पुस्तकावर बोलू काही ☆ सागरात हिमशिखरे… सुश्री मेधा आलकरी ☆ परिचय – सौ. माधुरी समाधान पोरे ☆

सौ. माधुरी समाधान पोरे

(सौ. माधुरी समाधान पोरे आपलं ई-अभिव्यक्तीवर हार्दिक स्वागत)

अल्प परिचय

शिक्षण- बी. ए. आवड- वाचन, लेखन छंद- वारली पेंटिंग,  शिवणकाम.

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ सागरात हिमशिखरे… सुश्री मेधा आलकरी ☆ परिचय – सौ. माधुरी समाधान पोरे ☆

पुस्तक परिचय

पुस्तकाचे नाव – सागरात हिमशिखरे (अकरा देशांचा सफरनामा)

लेखिका – मेधा आलकरी

जगण्याची ओढ अशी उडण्याचे वेड असे

घरट्याच्या लोभातही गगनाचे भव्य पिसे

अशी मनःस्थिती झाली नाही अशी व्यक्ती सापडणं अशक्यच. घर हवं नि भटकणंही, हेच जीवन जगण्याचं मर्म असतं. मेधा अलकरींच्या कुंडलीत भटकण्याचे ग्रह उच्चस्थानी, आणि जोडीदारही साजेसा मग कायं सोने पे सुहागा….

उपजत आवड आणि फोटोंची योग्य निवड यामुळे पुस्तकाला जिवंतपणा आला.पुस्तकातील फोटोंचं पूर्ण श्रेय त्यांच्या पतींचे.

मेधाताईंनी देशविदेशात, सप्तखंडांत मनापासून भटकंती केली. किती वैविध्यपूर्ण प्रदेशातून त्या वाचकांना हिंडवून आणतात ते नुसतं लेखांची शीर्षक वाचलं तरी ध्यानात येतं.अनेक खंडात फिरण्याचे अनुभव, समुद्राचे नाना रंग, ज्वालामुखीचे ढंग, पुरातन संस्कृतीचे अवशेष आणि वैभव, तर दुसरीकडे जंगलजीवनाचा थरार, यामधे फुलांचे सोहळे असे चितारले आहेत की जणू वाचक शब्दातून त्यांच सौंदर्य जाणवू शकतो. हे सामर्थ्य आहे लेखनाचं.

सागरात हिमशिखरे हा लेख समुद्राचे बहुविध मूड दाखवतो. अंटार्क्टिका हे पृथ्वीचं दक्षिण टोक. तिथे निसर्गाचे अनेक चमत्कार पाहायला,अनुभवायला मिळतात. या प्रवासाची आखणी खूप आधीपासून करावी लागते.  इथला अंदाज वर्तवणं अशक्य. इथले रहिवासी पेंग्विन. आर्क्टिकचा राजा हा मान आहे पेंग्विनचा, मानवसदृश हावभाव न्याहाळणं हा अद्वितीय अनुभव आहे. त्यांची परेड म्हणजे  पर्यटकांच्या नयनांना मेजवानीच. सील माशाचं जगणं, अल्ब्राट्रास ह्या मोठया पक्ष्याचं विहरणं हे वाचताना देहभान हरपतं. हिमनगाच्या जन्माची कहाणी त्याचा जन्म रोमांचकारी अनुभव आहे. निसर्गमातेची ही किमयाचं! चिंचोळया समुद्रमार्गातून जाताना बसणारे हेलकावे, हिमनदी, उंच बर्फाचे कडे, शांत समुद्र, त्यात पडलेले पर्वताचे प्रतिबिंब, कयाकमधून हिमनदयांच्या पोकळयातून वल्हवणं यामुळे सर्वांच जवळून दर्शन होतं. इथे अनेक पथक संशोधनासाठी येतात. आपल्या भारताचंही पथक इथं आहे ही अभिमानाची बाब आहे. खरंच शुभ्र शिल्पांनी नटलेल्या या महासागराची, द्वीपकल्प ची सफर एकमेवाद्वितीय!

यातील पेरूची फोड तर फारच गोड पेरू  हा प्राचीन संस्कृतीचा, भव्यतेचा आणि अनोख्या सौंदर्याचा देश. शाकाहारी मंडळींना विदेशात फिरताना येणारा शाकाहाराचा अर्थ किती वेगळा भेटतो हे जाणवतं. बर्‍याचदा ब्रेड-बटरवरच गुजराण करावी लागते. तेथील सण, समारंभ, यात्रा, जत्रा, रंगबेरंगी पोषाखातील स्री-पुरूष, असे अनेक सोहळे पाहायला मिळतात.  अनेक भूमितीय आकृत्या, प्राणी, पक्ष्यांच्या आकृत्या, नाझका लाइन्सची चित्रं पाहून कोकणातील कातळशिल्प आठवतात.  ही कुणी व का काढली असतील हे वैज्ञानिकांनाही गूढच आहे. माचूपिचू हे प्रगत संस्कृतीची देखणी स्थानं. म्युझियम, सूर्योपासकांचं सूर्यमंदिर, दगडी बांधकामाच्या जुन्या भक्कम वास्तू असा सारा समृद्ध इतिहास कवेत घेऊन हे शहर वसलं आहे. खरंच हा दीर्घ लेख वाचावा- आनंद घ्यावा असाच आहे.

समुद्रज्वाला हा बिग आयलंडमधील जागृत ज्वालामुखी या लाव्हांचे वर्णन या लेखात आहे. 1983 पासून किलुआ ज्वालामुखी जागृत आहे. 2013 मधे त्याचा उद्रेक होऊन पाचशेएकर जमीन निर्माण झाली. आजही तो खदखदतोय. हे रौद्र रूप, गडद केसरी लाव्हा हे दृश्य खूपच विलोभनीय.  हा नेत्रदीपक, अनुपम निसर्गसोहळा डोळयांनी पाहताना खूप छान वाटते. या लव्हांचा कधी चर्र, कधी सापाच्या फुत्कारासारखा, तर कधी लाह्या फुटल्यासारखा आवाज असतो.

लेखिकेला मोहात टाकणारा फुलांचा बहर त्यांनी मनभरून वर्णन केलाय फूल खिले है गुलशन गुलशन!  या लेखात. बत्तीस हेक्टरचा प्रचंड मोठा परिसर, वेगवेगळया आकाराची रंग आणि गंध यांची उधळण करणारी असंख्य फुलं! खरंखुरं नंदनवन! एप्रिल आणि मे महिन्यात आठ लाख पर्यटक हजेरी लावून जातात. हाॅलंडची आन-बान-शान असलेला ट्युलिप हे हाॅलंडचं राष्ट्रीय पुष्प! या  बागेत फिरताना मनात मात्र एक गाणे सतत  रूंजी घालत होते…..’दूर तक निगाहमे हैं गुल खिले हुए’.

लाजवाब लिस्बन या लेखात लिस्बन या शहराचे वर्णन केले आहे. हे सात टेकड्यांवर वसलेले शहर आहे. सेंट जॉर्ज किल्ला उभा आहे. या किल्ल्यांचे अठरा बुरूज प्राचीन ऐश्वर्याची साक्ष देतात. तटबंदीवरून शहराचा मनोरम देखावा दिसतो.  गौरवशाली इतिहास, निसर्गसौंदर्य, स्वप्ननगरीतल्या राजवाड्यांचा तसेच भरभक्कम गडकिल्ल्यांचा आणि खवय्यांचा हा लिस्बन खरोखरच लाजवाब!

हाऊस ऑफ बांबूज या लेखात गोरिलाभेटीचा छान अनुभव मांडला आहे. हा मर्कटजातीतील अनोखा प्राणी,  याचे अस्तित्व पूर्व अफ्रिकेतील उत्तर रंवाडा, युगांडा व कांगो या तीन सीमा प्रदेशात आहे.   हा कुटुंबवत्सल प्राणी आहे. पण त्याच्या परिवाराच्या सुरक्षिततेला धोका आहे अशी शंका आली तर तो काहीही करू शकतो. त्याच्यासमोर शिंकायचे नाही, मनुष्याच्या शिंकेतू न त्याला जंतूसंसर्ग होण्याची शक्यता असते. घनदाट जंगल,  नयनमनोहर सरोवर आणि वन्यजीवांना मुक्त संचार करता यावा अशी अभयारण्यं, एक निसर्ग श्रीमंत देश! रवांडाच्या हस्तकलेचा एक वेगळाच बाज आहे.

आलो सिंहाच्या घरी या मसाई माराच्या जंगलसफारीवर लिहलेला लेख वाचताना लक्षात येत की, प्राणी दिसण्याची अनिश्चितता नेहमीच असते. प्राणी दिसले तरी शिकारीचा थरार दिसेल याचा नेम नाही. पण विविधतेनं नटलेलं जंगल पाहण्याचा, तेथील सुर्योदय-सूर्यास्त अनुभवण्याचा, तंबूत राहण्याचा आणि मसाई या अदिवासी जमातीची संस्कृती जवळून पाहण्याचा अनुभव आपल्या कक्षा रुंदावतो.

भव्य मंदिराच्या रंजक आख्यायिका या लेखात जपानमधील पर्यटनात मंदिराचा वाटा  मोठा आहे. तिथला परिसर, स्वच्छता, शांतता सारचं अलौकिक.  परंपरा जपणारे भाविक नवीन वर्षाच स्वागत सकाळी लवकर उठून मंदिरात जातात. खरंच  ‘उगवत्या सूर्याचा देश’  हे जपानचं नाव अगदी सार्थक आहे असे वाटते.

चीन देशाच्या रापुन्झेल ह्या लेखात लांब केसांच्या एका तरुणीच्या जर्मन परीकथेचा  उल्लेख येतो. पायापर्यंत लांब केसांच्या  असलेल्या ‘रेड याओ’ जमातीतील स्त्रीयांच्या  लांब केसाच्या मजेदार कथा आहेत.  केस हा स्त्रीयांचा आवडता श्रृंगार. तिथल्या केसांबद्दल काय रूढी आहेत याच्या गमतीदार कहाण्या वाचायला मिळतात.

प्रवास माणसाला,  आयुष्याला अनुभवसमृद्ध करतो. आपण गेलो नसलो तरी त्यांच वर्णन वाचून आपलं निसर्गाबद्दलचं आणि संस्कृतीच ज्ञान वाढतं. मेधाताईंच हे पुस्तक वाचकाला निखळ आनंद देईल अशा ऐवजाने भरलेले आहे.

सागरात हिमशिखरे हा अकरा देशांचा सफरनामा वाचत असताना खरोखरं सफर करून आल्यासारखं वाटंल!!

संवादिनी – सौ. माधुरी समाधान पोरे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकावर बोलू काही ☆ विज्ञान बिंदू… प्रा. मोहन  पुजारी  ☆ परिचय – सौ. दीपा नारायण पुजारी ☆

सौ. दीपा नारायण पुजारी

 

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ विज्ञान बिंदू… प्रा. मोहन  पुजारी  ☆ परिचय – सौ. दीपा नारायण पुजारी ☆

पुस्तक परिचय

पुस्तकाचे नांव – विज्ञानबिंदू

लेखक – प्रा. मोहन पुजारी, इचलकरंजी

श्री. मोहन पुजारी यांचा हा पहिलाच लेख संग्रह. वैज्ञानिक व शैक्षणिक लेखांचा संग्रह असलेल्या या पुस्तकाचं नाव मोठं आकर्षक आहे. तसंच ते विषयाला साजेसं आहे. इचलकरंजी शहरात एक उत्कृष्ट शिक्षक म्हणून सरांचा लौकिक आहे. विज्ञान – जीवशास्त्र या विषयाचं अध्यापन, विद्यार्थी व पालकांचा संपर्क आणि त्यांचं सामाजिक भान यातून त्यांच्यातला लेखक घडला आहे. त्यामुळे या पुस्तकात तीनही दृष्टीने लिहिलेले लेख वाचायला मिळतात. हेच या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे.

पुस्तकातील पहिल्याच ” मुलांमधील संवेदनशीलता”या लेखात सध्या पालकांच्या समोर असलेल्या ज्वलंत प्रश्नावर चर्चा केली आहे. संवेदनशीलता म्हणजे काय हे सांगून,ती बोथट का झाली आहे याचे विवेचन केले आहे. एवढेच नाही तर त्यावरील उपाय देखील सांगितले आहेत. त्यामुळे विषयाला न्याय मिळाला आहे.

बहुपयोगी बांबू या लेखात बांबू या वनस्पतीची शास्त्रीय माहिती त्यांनी दिली आहे. बांबू सारख्या वनस्पतीचे विविध उपयोग वाचून मन थक्क होते.सामान्य माणसांना या माहितीचा नक्कीच फायदा होईल. शिक्षणातून संस्कार या लेखात विज्ञान विषयाची सांगड संस्कांराशी कशी घालावी याची मोठी रंजक माहिती मिळते. उदा.  न्यूटनच्या सप्तरंगी तबकडीत त्यांना भारतीयांची एकात्मता आढळते.जीवशास्र आपल्याला निसर्गाचं मानवी आयुष्यातलं महत्त्व सांगतो. रंग बदलणाऱ्या सरड्याप्रमाणं बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्याचं महत्त्व विषद करतात. अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी रसायनशास्त्रातील पदार्थांच्या गुणधर्माचा उपयोग करून पटवून देण्याचा प्रयत्न ते करतात. एक संवेदनशील विचारी शिक्षक या लेखकाच्या मनात दडलेला दिसतो.निसर्गाशी नाते जोडूया या लेखात वनस्पतींवर झालेल्या प्रयोगाचे उदाहरण दिले आहे. वनस्पतींना भावना असतात. निसर्ग व माणूस यातला जिव्हाळा त्यांच्या वाढीसाठी महत्त्वाचा ठरतो या एका वेगळ्या मुद्द्याचा उल्लेख या लेखात केलेला दिसतो. निसर्गातून घेण्याच्या गोष्टीही त्यांनी सांगितल्या आहेत. जसं की; सिंहाचा रुबाबदारपणा,हरणाचा चपळपणा, फुलपाखराचे सौंदर्य,मधमाशीकडून समाजसेवा, मुंगीची शिस्त इ. यांत्रिकीकरणामुळे मिळालेला वेळ आणि रिकामे हात निसर्ग संवर्धनासाठी वापरा हा संदेश या लेखात दिला आहे.

जलसंवर्धन – काळाची गरज – या लेखात त्यांचा या विषयाचा अभ्यास लक्षात येतो. या लेखात आणि एकूणच पुस्तकातील माहितीपर लेखात क्रमांक घालून मुद्दे,उपमुद्दे गुंतागुंत व क्लिष्टता टाळली गेली आहे.वाचकाला विषय समजणं सोपं झालं आहे. लिखाणाच्या याच वैशिष्टपूर्ण पद्धतीमुळं टेस्ट ट्यूब वनस्पती हा लेख वाचनीय झाला आहे.

नयनरम्य प्रवाळे हा लेख या पुस्तकाचा आकर्षण बिंदू आहे. प्रवाळ म्हणजे काय, प्रवाळांची वैशिष्ट्ये,त्यांचे प्रकार, उपयोग, अनुकूलन अशा सर्व गोष्टींचा उहापोह त्यांनी केला आहे.त्यांचे रक्षण करणे किती गरजेचे आहे हे वाचकांच्या सहज लक्षात येते. समुद्रातील अतिशय सुंदर पर्यावरणसंस्थेची माहिती वैज्ञानिक भाषेची क्लिष्टता टाळून लिहिण्यात ते यशस्वी झाले आहेत. प्रवाळांच्या फोटोमुळे लेख वाचताना कुतूहल निर्माण होते आणि लेख आकर्षक ठरतो.

घर,शाळा आणि आरोग्य, सार्वजनिक उत्सवांचे बदलते स्वरूप, व्यसनाधीनता,सुखावह वृद्धत्व अशा लेखांमधून लेखकाचे सामाजिक भान लक्षात येते. थकलेली शारीरिक अवस्था व कमकुवत ज्ञानेंद्रिये,परावलंबन आणि परिणामी आलेली मानसिक अस्वस्थता यांचा तोल साधत वृद्धत्व सुखावह कसे करावे हे छानशा भाषेत सांगितले आहे. लेखक स्वतः जबाबदार ज्येष्ठ नागरिक असल्यानं या विषयाची हाताळणी संवेदनशील मनानं झाली आहे.

व्यसनाधिनता- एक सामाजिक समस्या या लेखात व्यसनाधिनतेची कारणे, त्यावरील उपाय वाचायला मिळतात.या लेखाच्या शेवटी पालकांना सल्ला देताना ते एक जीवनमंत्र देतात.मुलांना मुठीत न ठेवता मिठीत ठेवा हाच तो मंत्र! मुलांना वाचनाचे आणि अभ्यासाचे व्यसन लागू दे अशा शुभेच्छा देखील ते देतात.

वनस्पतींचा आरोग्याशी असलेला संबंध, महाराष्ट्रातील सण -उत्सव आणि वनस्पती, वनौषधी आणि स्री सौंदर्य, तसेच उतू नका,मातू नका, फळांच्या साली टाकू नका अशा सारख्या लेखांमधून वनस्पतींचं महत्त्व साध्या,सोप्या भाषेत सांगितले आहे. संपूर्ण पुस्तकात असलेली साधी, सोपी सहज भाषा; पुस्तक वाचनाची ओढ निर्माण करते. ‘ ज्याप्रमाणे थर्मामीटर मधील पारा वर- खाली होतो, पण बाहेर पडू शकत नाही ‘ किंवा आपले घड्याळ आपल्या मानगुटीवर बसले आहे.’

वरवर बघता साधी वाटणारी अशी वाक्ये लेखकाचे मराठी भाषेवरील प्रभुत्व आणि विचारशक्ती दाखवतात.

वैज्ञानिक लेखांच्या या लहानशा पुस्तकाला कुतुहल निर्माण करणारे आकर्षक मुखपृष्ठ लाभले आहे. विषयाची सोप्या पद्धतीने हाताळणी, मुद्देसूद मांडणी, वैज्ञानिक संज्ञा न वापरता सामान्य माणसाला समजेल अशी भाषा, प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास ही या पुस्तकाची उल्लेखनीय वैशिष्ट्ये आहेत.

© सौ. दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

फोन नं : 9665669148 ईमेल : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ न्यायनिष्ठ रामशास्त्री प्रभुणे… श्री रमाकांत देशपांडे ☆ परिचय – सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ न्यायनिष्ठ रामशास्त्री प्रभुणे… श्री रमाकांत देशपांडे ☆ परिचय – सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

पुस्तक परिचय

पुस्तकाचे नाव- न्यायनिष्ठ रामशास्त्री प्रभुणे

लेखकाचे नाव- रमाकांत देशपांडे

प्रकाशक- अनिरुद्ध कुलकर्णी, कॉन्टिनेन्टल प्रकाशन

प्रथम आवृत्ती- १ एप्रिल 20 19

किंमत- 450 रुपये.

“स्वामी” या रणजीत देसाई यांच्या कादंबरीतून ‘राम शास्त्री’ यांचे नाव वाचले, ऐकले होते परंतु त्यांच्याविषयी परिपूर्ण माहिती नव्हती. ती या पुस्तकातून चांगली मिळाली.

राम शास्त्री प्रभुणे यांचे गाव सातारा जवळ माहुली हे होते. विश्वनाथ शास्त्री प्रभुणे यांचे ते चिरंजीव होते. लहान असताना त्यांचे वडील गेले. बालपणी अतिशय हूड स्वभावाचे होते. त्यामुळे त्यांची आई- पार्वती बाई यांना रामची खूप काळजी वाटत असे. लहानपणी शिक्षण घेण्यात त्यांनी खूप टाळाटाळ केली. त्यामुळे सर्वांच्याकडून बोलणी खावी लागत होती. शेवटी गाव सोडून बाहेर पडले. सातारला आले व तिथून पुढे पुण्यापर्यंत आले. त्यानंतर त्यांनी शिक्षणासाठी काशीला जाण्याचा निर्धार केला. काशीला जाऊन विद्वान पंडित होऊन राम शास्त्री बारा वर्षांनी घरी आले. श्रीमंत नानासाहेब पेशव्यांनी त्यांना पुणे येथे वेदशास्त्र संपन्न पंडित म्हणून बोलावून घेतले. तेथपर्यंत त्यांचा जीवन प्रवास वाचताना त्यांचा स्वाभिमान, बाणेदारपणा , निर्भीडपणा हे सर्व गुण दिसून येतात. त्यांची बुद्धी कुशाग्र होती. न्यायी वृत्ती आणि चांगल्या गोष्टीसाठी कोणत्याही प्रकारची तडजोड न करण्याचा स्वभाव हे सर्व कादंबरीकारांनी चांगले रंगवले आहे.

पुणे येथे पेशव्यांच्या दरबारात त्यांचा योग्य तो सन्मान झाला. राम शास्त्रींनी धर्मशास्त्र आणि राजकारण यांची सांगड घालून पेशव्यांच्या दरबारात स्वतःचे स्थान प्रस्थापित केले. नानासाहेबांनंतर श्रीमंत माधवराव पेशवे यांच्या दरबारात त्यांनी अतिशय चांगले कार्य करून न्यायासनाची प्रतिष्ठा राखली. त्यांना न्यायदानाचे सखोल ज्ञान होते.  राघोबा दादांनी नारायण रावांचा खून कसा करवला याविषयीचा सर्व तपशील या कादंबरीत वाचावयास मिळतो. स्वतःला न पटणाऱ्या गोष्टींशी त्यांनी कधीच तडजोड केली नाही. त्यांचा बाणेदार पणा अनेक प्रसंगातून लेखकाने दाखवून दिला आहे. नारायणराव पेशव्यांच्या खुना संदर्भात सर्व पुरावे त्यांनी गोळा केले.आणि त्यानंतर  राघोबा दादांना देहांत प्रायश्चिताची शिक्षा सुनावली. त्यातून त्यांचा निर्भीडपणा दिसून येतो. कादंबरी वाचताना डोळ्यासमोर ते प्रसंग उभे राहतात. ऐतिहासिक कादंबरी लिहिताना सत्य तर हवेच पण रंजक पणा ही  हवा या दोन्ही गोष्टी कादंबरीत दिसून येतात. पुणे, शनिवार वाडा, पेशवाई याविषयीच्या सर्वच गोष्टी मराठी वाचकांना मनाला भावणाऱ्या असतात. त्यामुळे कादंबरी वाचताना आपण कथानकाशी  तद्रुप होऊन जातो.

राम शास्त्री प्रभुणे यांची व्यक्तिरेखा उलगडून दाखवण्यात लेखक अगदी यशस्वी झाले आहे असे या कादंबरी बद्दल मला वाटले!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

वारजे, पुणे.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकावर बोलू काही ☆ सांगावा… श्री सचिन वसंत पाटील ☆ परिचय – सुश्री सुनिता गद्रे ☆

सुश्री सुनिता गद्रे

? पुस्तकावर बोलू काही ?

 ☆ सांगावा… श्री सचिन वसंत पाटील ☆ परिचय – सुश्री सुनिता गद्रे ☆ 

पुस्तकाचे नाव- सांगावा

लेखक -श्री सचिन वसंत पाटील

पृष्ठ संख्या -135

 मूल्य- दोनशे रुपये.

अलीकडेच सांगावा हा खूप चांगला कथासंग्रह वाचनात आला.कर्नाळ या सांगली जवळच्या एका छोट्या गावात राहणारे लेखक सचिन पाटील यांचा!… त्यांना नुकताच भेटण्याचा योग आला. अक्षरशः विकलांग अवस्थेत जगणारा, सगळ्या विपरीत परिस्थितीशी लढणारा हा योध्दा!…त्याच्याबरोबरच्या नुसत्या बोलण्याने सुद्धा आपल्यात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो.’ सांगावा ‘या कथासंग्रहाची मी वाचली ती चौथी आवृत्ती ! दहा वर्षात चौथी आवृत्ती निघणे ही कुठल्याही नवोदित लेखकाला अभिमान वाटावा अशीच गोष्ट आहे.

श्री सचिन वसंत पाटील

संग्रहातील सर्व कथा ग्रामीण जीवनाचा चेहरा मोहरा दाखवितात. यात एकूण बारा कथांचा समावेश आहे .कथा बीजाची दोन रूपे येथे आढळतात. पहिले रूप म्हणजे आजच्या खेड्यातील मूल्य संस्कृतीचा होऊ घातलेला -हास  आणि दुसरे म्हणजे बदलत्या परिवर्तन प्रक्रियेत माणूस, माणुसकी,नाती, निती,आणि माती पण टिकली पाहिजे हा लेखकाचा दृष्टिकोन. या दोन कथा बीजांभोवती ‘सांगावा’ कथासंग्रहातील कथांचे वर्तुळ तयार झाले आहे.

संग्रहातील भूल ही पहिली कथा! स्वतःच्या हाताने जीवनाची शोकांतिका करणाऱ्या शेतकऱ्याची अंधश्रद्धा, अडाणी समजूत यातून ती साकारली गेलेली आहे. हणमा शेतकरी ऐकीव गोष्टीला बळी पडून ,आपल्या संसाराला रान भूल लागू नये म्हणून भ्रमिष्टासारखा जेव्हा आपल्या शेतातील वांग्याचे बहारातील पीक उध्वस्त करून टाकतो, तेव्हा वाचकाला खूप हळहळ वाटत राहते.

दुसरी कथा ‘काळीज’! ग्रामीण परिसरात ‘सेझ’चे आगमन आणि कृषी जीवनाची फरपट लेखकाने येथे चित्रित केली आहे. शामू अण्णा ,काळी आईचे जिवापाड सेवा करणारा शेतकरी! पण त्याचाच मुलगा जेव्हा त्यांना न विचारता जमीन विक्रीची परवानगी देतो, तेव्हा तो खचून जातो  आणि वेडा बागडा  बिन काळजाच्या, निर्जीव बुजगावण्यागत जगत राहतो.  कथा वाचकाच्या काळजाला एकदम भिडते.

‘पावना ‘कथेत खेडेगावातल्या जीवन मूल्यांचा -हास चित्रित होतो. कितीही कष्ट, त्रास झाला तरी आलेल्या पाहुण्यांचे आदरातिथ्य करणे, त्याला आधार देणे ,विचारपूस करणे हा ग्रामीण माणसाच्या मनाचा मोठेपणा कालौघात ग्रामीण माणसाकडून हिरावला गेलेलाआपल्याला या कथेत दिसतो.

‘मांडवझळ ‘ही एका लाली नावाच्या पाळीव कुत्रीची कथा! ती कुत्रीच येथे सगळं विषद करतेय. भरल्या घरात, लग्न समारंभा दिवशी त्या बिचारीला किती अग्नी दिव्यातून जावे लागले, किती यातना सोसाव्या लागल्या हे वाचून मन विषण्ण  होते.त्या पाळलेल्या बिचारीला खायला द्यायची पण कोणाला सवड आणि आठवण नाहीय. तिचे झालेले हाल आणि अगतिकता बघून मुक्या प्राण्यांना भूक असते, भावना असतात त्यांचे मन समजून घ्या असा मोलाचा संदेश ही कथा देते.

‘वाट ‘कथेत मोठ्या बाहुबली शेतकऱ्याने जाण्या-येण्याच्या वाटेसाठी  एका गरीब शेतकऱ्याची लावलेली  वाट….आजही शेतकऱ्यांच्या नशिबीचा वनवास कसा असतो हे दाखवते.

‘धग’ ही संभा या कष्टाळू प्रामाणिक इस्त्री वाल्याची कथा आहे. त्याच्या जीवन प्रवास बघता, साध्या सरळ स्वभावाच्या माणसांची ही शोकांतिकाच असते काय?.. की त्याला उन्हाळ्याची धग, पोटातील भुकेची धग, न मिळालेल्या मायेची धग यात पिळपटून टाकलं जातं… असा प्रश्न मनात उभा राहतो.

मरणकळा ही नव्या जुन्या पिढीतील खाईची कथा. कथा नायकाला कितीही वाटलं तरी पत्नी विरुद्ध जाऊ न शकल्याने वडिलांचे होणारे हाल.. आणि त्यामुळे वडिलांच्या बरोबरच हळव्या मनाचा तो मरण कळा सोसतोय हे वास्तवाचं विदारक चित्रण येथे आहे.

‘सय’ एक स्वप्न कथा आहे. आपल्या आजोळी गेलेल्या सहा, सात वर्षाच्या मुलाची सय कथा नायकाला किती विचित्र स्वप्न पाडते हे लेखकाने छान रंगवले आहे.

‘चकवा’ ही खेड्यातील प्रेमाचा चकवा देणारी कथा! बाजारातून घरी जाणाऱ्या बज्याला लग्नाचा चकवा, स्त्री भेटल्याचा चकवा, अंधाराचा चकवा इत्यादी प्रतिमांमधून समाजातील अंधश्रद्धा, भूत, पिशाच्यावर विश्वास यावर प्रकाश टाकला आहे.

‘ओझ’एक सुंदर कथा आहे. गावातून शहरात जाऊन खूप मोठा आणि धनाढ्य झालेला मुलगा .गावात पंचवीस वर्षानंतर येऊन गावाचं… बारा बलुतेदारांचं आपल्यावर असलेलं ओझं उतरवतो खूप खुमासदार पद्धतीनं गावाचं चित्र रंगवलं गेलंय.

सांगावा ही संग्रहातील शीर्षककथा! मातृ हृदयानं आपल्या प्रिय पुत्रासाठी, किंबहुना हा एका पिढीने दुसऱ्या पिढीला दिलेला सांगावा आहे. आपल्या निर्वसनी मुलाला नाईलाजानं आईनं शहरात पाठवलंय. चार पैसे कमावले तर कर्ज फिटेल, गावात शेती करून मानानं राहता येईल हा त्यातला विचार. पण शहरातील छंदी-फंदीपणा,व्यसनं या सगळ्यामुळे पैसा हातात आला की नको ते करणं, संगतीचा परिणाम,  सखू म्हातारीच्या मनात असंख्य चित्रे तयार होतात. नको तो पैसा नको ते शहरात रहाणं !पोराला बहकू द्यायचं नसतं. शेवटी मुलाला सांगावा देते”जसा असचील तसा घराकडे निघून ये.”ही कथाही काळजाला जाऊन  भिडते.

आशय, अभिव्यक्ती भाषा मूल्य याने सांगावा कथा संग्रह वाचकांचे लक्ष खिळवून ठेवतो. लेखक सचिन पाटील यांनी ग्रामीण संस्कृती, लोकसंकेत, व्यक्ति, प्रवृतीचं दर्शन मोठ्या सूचकतेने केलं आहे. बोलीभाषा, निवेदनातील सजगता ,सहजता, घडलेला प्रसंग साक्षात् डोळ्यासमोर उभा करण्याची धाटणी खूपच वाखाणण्याजोगी आहे .एक उत्कृष्ट कथासंग्रह वाचल्याचा आनंद ‘सांगावा’ निश्चितच देतो.

** समाप्त**

परिचय – सुश्री सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘अष्टदीप’ – श्री विश्वास देशपांडे ☆ परिचय – डॉ मीना श्रीवास्तव ☆

डॉ मीना श्रीवास्तव

? पुस्तकावर बोलू काही ?

 ☆ ‘अष्टदीप’ – श्री विश्वास देशपांडे ☆ परिचय – डॉ मीना श्रीवास्तव ☆ 

पुस्तक – ‘अष्टदीप’

लेखक- श्री विश्वास देशपांडे, चाळीसगाव

प्रकाशक – विश्वकर्मा पब्लिकेशन्स

पृष्ठसंख्या – ३०० पाने

पुस्तकाचे मूल्य – ४२५ रुपये

पुस्तक परीक्षण- डॉ. मीना श्रीवास्तव, ठाणे

देशपांडे सरांनी लिहिलेले “अष्टदीप” हे अत्यंत प्रेरणादायी आणि मनोवेधक पुस्तक वाचले. एका विशिष्ट वयोगटाची अर्थात विद्यार्थ्यांची मानसिकता बदलण्याच्या उदात्त हेतूने कांही निवडक भारतरत्न पुरस्कार विजेत्यांचे चरित्र असलेले हे पुस्तक असावे असा माझा समज होता. किंबहुना पुस्तकाचे मुखपृष्ठ बघून मला तसे वाटले, मात्र पुस्तकाचे अंतरंग कळल्याबरोबर हा समज निव्वळ गैरसमज होता असे कळले! हे पुस्तक सर्व वयोगटाच्या भारतीयच नव्हे तर अशा प्रत्येक व्यक्तीसाठी आहे, ज्यांना भारताचे अंतरंग जाणून घ्यायचे आहे! या देशाच्या परमपवित्र मातीतून अस्सल मोती कसे जन्माला येतात हे या पुस्तकाच्या वाचनातून कळते. यातील व्यक्ती कुणा एका प्रांताचे, भाषेचे, व्यवसायाचे किंवा आर्थिक दर्जाचे नाहीत. विविधतेत एकता हा भारताचा एकमेकाद्वितीय सद्गुण या पुस्तकात प्रकर्षाने जाणवतो. किंबहुना प्रत्येकाचे वैशिष्टय नजरेत ठळकपणाने भरावे, हाच लेखकाचा हेतू दिसतो. भारतमातेच्या चरणी विविध रंगांची व विविध गंधांची सुमने अर्पण करावीत, हा अनवट विचार या पुस्तकाच्या देशभक्तीने भारलेल्या लेखकाच्या विचारात असावा.

श्री विश्वास विष्णु देशपांडे

चारित्र्यवान व्यक्तींचे चरित्र लेखन लिहिणे कांही नवीन नाही पण सर्वोच्य नागरी पुरस्कार मिळालेल्या भारतातील आठ गौरवान्वित व्यक्तींविषयी लेखन करणे विश्वास सरांसारख्या सिद्धहस्त लेखकाला शक्य आहे. तारीखवार जन्म, मृत्यू, इतर सन्मान आणि असाच कागदी गोषवारा म्हणजे चरित्र नव्हेच, किंबहुना त्यापलीकडे जाऊन अतिसामान्य कौटुंबिक परिस्थिती, आर्थिक विपन्नता, पारंपारिक बंधने, सामाजिक विरोध इत्यादी प्रतिरोधांवर मात करीत या लोकोत्तर व्यक्तींनी मळलेल्या वाटा सोडून आपल्या लक्ष्याकडे जाणारा काटेरी मार्ग कसा पादाक्रांत केला हे महत्वाचे आहे. या सर्व मुद्द्यांचे त्या त्या व्यक्तीच्या चरित्र लेखनात प्रतिबिंब असायला हवे. बहुतेक वेळी आपल्यास त्या व्यक्तींचा खडतर प्रवास माहित नसतो, दिसते ते फक्त त्यांच्या प्रसिद्धी आणि सन्मानाने लखलखणारे तेजःपुंज प्रकाशाचे वलय! परंतु या प्रकाशाच्या वाटा त्यांना सहज गावल्या नाहीत, तिथवर पोचायला खाचाखळग्यांनी आणि काटेरी निवडुंगांनी भरलेली वाट चालतांना त्यांचे पाय रक्तबंबाळ नक्कीच झाले असणार. या आठ सन्मानित व्यक्तींच्या खडतर प्रवासाचे विस्तारित चित्रण या पुस्तकाचे मुख्य वैशिष्ट्य आहे.

लेखन स्वातंत्र्याचे निकष लावून ही या जगप्रसिद्ध व्यक्तींच्या प्रतिमेला कुठेही तडा जाऊ नये, मात्र त्या व्यक्तीच्या जीवनातील वादग्रस्त बाबी, गैरसमज, जनमानसात रुजलेल्या कल्पना यांचाही परामर्श लेखकाने घेतलेला आहे, तेही सप्रमाण लेखन करून! माणूस जितका प्रसिद्ध, तितकी त्याच्या विरोधात सामग्री उपलब्ध असणारच. यात लेखकाचा खरा कस लागतो. या आठ व्यक्तींचा कालखंड बघता, हे काम लेखकाने अत्यंत निगुतीने केले आहे असे वाटते. प्रत्येक लेखाच्या शेवटी दिलेली संदर्भांची यादी लेखनाची पारदर्शकता दर्शवते. मात्र लेखकाने या संदर्भापलीकडे जाऊन त्या व्यक्तींच्या मनातले गूज ओळखले कसे आणि पुस्तकात चितारले कसे हा प्रश्न मला पडला! कांही ठिकाणी तर आपण त्या व्यक्तीची प्रकट मुलाखतच बघतोय असे जाणवत होते. ही लेखकाची कल्पनेची भरारी नसून, हे अत्यंत मेहनतीने, विचारपूर्वक आणि मुद्देसूद लिहिलेले रसाळ वाङ्मय आहे.

आजवर भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित ४८ व्यक्तींमधून नेमक्या त्याच आठ व्यक्ती कां निवडल्या याचे उत्तर लेखकाने देणे मला तरी अपेक्षित नाही, मात्र ज्या व्यक्ती त्यांनी निवडल्या, त्यांच्या चरित्रलेखनात त्यांनी यत्किंचितही कुसूर केला नाही, उलट याच व्यक्ती कां, याचे उत्तर त्यांचे चरित्र वाचूनच सापडते. लेखकाच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा मुद्दा आहेच, पण माझे मत आहे की भविष्यात सरांनी टप्याटप्याने या सर्वांचेच व्यक्तिचित्रण लिहावे आणि अष्टदीप या पुस्तकाच्या पुढील मालिका लिहाव्यात.

या पुस्तकात जी अष्टरत्ने आहेत त्यांची नांवेच किती आदरणीय आहेत बघा. मंडळी, त्यांच्या नांवाच्या आधी लागलेली बिरुदावली आणि अर्थवाही शब्द (अनुक्रमणिकेत आहेत तसेच) म्हणजे त्यांची अविभाज्य मानाची पदवी आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाची अति संक्षिप्त रूपरेखा समजावी. निश्चयाचा महामेरू महर्षी धोंडो केशव कर्वे, द्रष्टा अभियंता सर विश्वेश्वरैया, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल, द्रष्टा उद्योगपती जे. आर. डी. टाटा, निर्मळ चारित्र्याचे धनी (साधी राहणी, उच्च विचारसरणी असलेला नेता) लालबहादूर शास्त्री, अजातशत्रू नेता अटलबिहारी बाजपेयी, आनंदघन लता मंगेशकर आणि उज्ज्वल भारताचे स्वप्न पाहणारा द्रष्टा वैज्ञानिक डॉ. अब्दुल कलाम.

या आठही व्यक्तींमधील मला जाणवलेला समसमान गुण म्हणजे देशभक्ती, आपल्या भारतभूमीला सर्वस्व वाहून टाकायची जबरदस्त उर्मी! त्यासाठी कितीही कष्ट, वेदना, मेहनत आणि जिवापाड प्रयत्न करण्याची दुर्दम्य आकांक्षा. ‘भारत माझा देश आहे, त्यासाठी मी हे करणार आणि ते करणार’ या वल्गना करणाऱ्या आजच्या वाचाळवीरांच्या पार्श्वभूमीवर, या व्यक्तींचे बावनकशी सोन्याहून पिवळे असे व्यक्तिमत्व उजळून दिसते. त्या लखलखीत प्रकाशात न्हाऊन निघण्याचा आणि नवचैतन्याने बहरून येण्याचा अनन्यसाधारण अनुभव घ्यायचा असेल तर हे पुस्तक आधी वाचावे, नंतर त्याचे मनन आणि चिंतन करून या व्यक्तींचे विचार प्रत्यक्षात जगणे, या पायऱ्या जमेल तशा आणि जमेल तितक्या चढाव्या! असे केल्यास लेखकाच्या या चरित्रलेखनाला न्याय मिळेल असे मला वाटते.

प्रत्येक व्यक्तीची शिकवण न्यारी अन निराळी, महर्षी कर्व्यांनी विधवांचे केलेले सामाजिक पुनरुत्थान व स्त्रीशिक्षणाचा रोवलेला पाया हे महाराष्ट्राच्या सीमा भेदून अखिल देशात फैलावले.सर विश्वेश्वरैयांनी निर्माण केलेली बांधकामाची आधुनिक तीर्थक्षेत्रे आजही दिमाखात उभी आहेत आणि आजच्या तकलादू बांधकामांना आव्हान देताहेत. लोहाला प्रतिष्ठा मिळवून देणारे लोहपुरुष म्हणजे भारताच्या अखंड साम्राज्याचे निर्मातेच! सत्तेचा माज आणि स्वायत्ततेचे विखारी स्वप्न बाळगणारे आणि भारताचा लचका तोडायच्या हेतूने आटोकाट स्वार्थी प्रयत्न करणारे तब्बल ५६५ संस्थानिक एका छत्राखाली आणणारे सरदारांचेही एकमेव सरदार वल्लभभाई पटेल! ऐश्वर्यसंपन्न असूनही निरलस आणि निरभिमानी, समाजकार्यात नंबर एक असे जे. आर. डी. टाटा, ‘बस नाम ही काफी है’, असा ब्रँड! साधी राहणी आणि उच्च विचारांचे धनी, आजच्या जगातल्या राजकारण्यांच्या संदर्भात आणि चौकटीत न बसणारे असे एकमेव पंतप्रधान लालबहादूर शास्त्री, सर्वपक्षीयांची निष्ठा अन आदर ज्यांना प्राप्त होता असे कविमनाचे हळवे पण तितकेच खंबीर पंतप्रधान अटलजी आणि वेगळ्या जडणघडणीतले सर्वप्रिय वैज्ञानिक अब्दुल कलाम यांसारख्या रत्नांचे चरित्रलेखन या पुस्तकात केलेले आहे.

शेवटी अति आदराने उल्लेख करते तिचा, जी आहे आपल्या सर्वांची लाडकी स्वरमाऊली लता मंगेशकर! तिचे चरित्र वाचावे, तिची स्वर्गीय गाणी ऐकावी हे ठीकच, पण ती ‘लता’ म्हणून घडली कशी याचे सांगोपांग वर्णन म्हणजे माळेत जसे मोती ओवतात आणि शेवटी मध्यभागी मेरुमणी जोडतात, तद्वतच लेखकाने या पुस्तकात लता दीदींची प्रदीर्घ कारकीर्द वर्णन केली आहे. यात जणू भारतीय सिनेसंगीताचाच सांगीतिक प्रवास आपण करतोय असे वाटते. लेखकाची संगीताची उत्तम जाण आणि लतादीदींवरील अपार भक्ती या भागात अधोरेखित झाली आहे. माझ्यासारख्या लताभक्तांसाठी ही खास पर्वणीच आहे. मित्रांनो, लेखकाने या आठ व्यक्तिरेखांचा शोध घेता घेता आदर्श विचारांचे लक्ष लक्ष दीप उजळून टाकलेत, असा अनुपमेय अनुभव मला हे पुस्तक वाचतांना आला.

श्री विश्वास देशपांडे, चाळीसगाव. आ. बं. हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहेत. आजवर त्यांची सात पुस्तके प्रकाशित झाली आहेत. समाजमाध्यमांवर उगवतीचे रंग, प्रभात पुष्प, थोडं मनातलं, ही त्यांची सदरे वाचकप्रिय आहेत. रेडिओ विश्वासवर ‘आनंदघन लता’, ‘या सुखांनो या’ आणि ‘राम कथेवर बोलू कांही’ या कार्यक्रमांच्या मालिका अतिशय लोकप्रिय आहेत. त्यांचे स्वतंत्र यू ट्यूब चॅनल देखील आहे.

‘पुस्तक विश्व, पुणे’ मध्ये हे पुस्तक ‘बेस्ट सेलर’ च्या यादीत आले आहे. जुलै २०२२ मध्ये प्रकाशित झालेले हे पुस्तक संग्रही ठेवावे आणि इतरांना देखील वाचायला प्रेरित करावे असे वाटते.

पुस्तक परीक्षण – डॉ. मीना श्रीवास्तव

दिनांक- २८ मार्च २०२३

ठाणे, फोन नंबर – ९९२०१६७२११

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ महर्षी वाल्मिकी… श्री विश्वास देशपांडे ☆ परिचय – सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ महर्षी वाल्मिकी… श्री विश्वास देशपांडे ☆ परिचय – सुश्री विभावरी कुलकर्णी ☆ 

निखळ वाचनाचा आनंद घ्या…

महर्षी वाल्मिकी….

लेखक : विश्वास देशपांडे. 

प्रकाशक : सोहम क्रिएशन अँड पब्लिकेशन, पुणे. 

अचानक “महर्षी वाल्मिकी“ हे विश्वास देशपांडे लिखित पुस्तक हातात पडले. एखादे पुस्तक पाहताक्षणीच आवडून जाते आणि मनाची पकड घेते. तसंच या पुस्तकाच्या बाबतीत झाले.

आकर्षक मुखपृष्ठ, छोटेखानी पण वेगळेपण नावापासूनच जपणारे, व आत्तापर्यंत माहिती नसलेले आगळे वेगळे पुस्तक. पुस्तकाची रचना अतिशय उत्कृष्ट व उत्सुकता वाढवणारी आहे. सुरुवातीच्या पानावर लेखक परिचय व त्यांची साहित्य संपदा या विषयी माहिती आहे. त्या नंतर पुस्तकाविषयी लेखकांचे मनोगत पुस्तकाची थोडक्यात माहिती देणारे व उत्सुकता वाढवणारे आहे. त्यात भर घालणारी श्री.प्रमोद कुलकर्णी यांची सुंदर प्रस्तावना! मनोगत व प्रस्तावना वाचून कधी ते पुस्तक वाचते आहे असे होऊन गेले.

श्री विश्वास विष्णु देशपांडे

विशेष म्हणजे दहा लेख असून अनुक्रमणिका नाही. त्यामुळे एकच गोष्ट वाचत आहोत असे वाटते आणि सलग वाचन केल्याशिवाय राहवत नाही. पुस्तक वाचताना त्या घटना डोळ्यासमोर उभ्या राहतात. निसर्ग, ऋषींचा आश्रम, शिष्यगण, नदी, पक्षी, या सर्वांचा आपण एक भाग आहोत असे वाटते.

क्रौंच पक्ष्याच्या हत्येमुळे पूर्वाश्रमीच्या आठवणींच्या रूपात त्यांचा जीवनपट उलगडत जातो. जी गोष्ट शालेय जीवनात ७/८ ओळीत संपत होती तीच गोष्ट पुढच्या तीन लेखात अतिशय बारकाव्यासहित वाचायला मिळते.

वाटमारी करणाऱ्या रत्नाकरचा पश्चाताप, व रामनामाच्या तपश्चर्येमुळे झालेला अनाकलनीय बदल –  म्हणजे वाल्मिकी ऋषींमध्ये झालेले रूपांतर फारच रंजक व वेगळ्याच उंचीवर घेऊन जाते. रामनाम, मनापासून झालेला पश्चाताप व स्वतः मध्ये बदल घडवण्याची प्रामाणिक इच्छा काय करू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे वाल्मिकी ऋषी.

मला असे माहिती होते की नारद मुनींच्या सांगण्यानुसार वाल्मिकींनी तप सुरु केले. पण तेही सत्य समजले व नारदांकडून पुढील कार्याची प्रेरणा मिळाली हेही समजले. देवर्षी व ब्रह्मदेव यांच्या भेटीचा वृत्तांत अतिशय रोचक व अध्यात्मिक उंचीवर घेऊन जातो. विशेषतः मनुष्य आपल्या कर्माने भाग्यरेषा बदलू शकतो– हे मनुष्याच्या हातात आहे–  हे विशेष महत्वाचे वाटले.

त्यांनी रामकथा कशी लिहिली? याचे उत्तर मिळाले. खरोखरच दिव्य शक्तींच्या आशीर्वादाशिवाय हे शक्य नाही. रामकथा त्यांच्या डोळ्यासमोर कशी साकारली हेही समजले.—- वाल्मिकी ऋषींनी रामायण काव्यात समाजाला उपयोगी व चिरंतन तत्वे रंजक रीतीने मांडली आहेत. हजारो वर्षांपूर्वी लिहिलेले आदर्श आजही उपयुक्त आहेत. मानवी भावभावना अतिशय उत्तम रीतीने साकारल्या आहेत. त्यातून आदर्श राजा, समाज याची चिरकाल टिकणारी शिकवण मिळते.

हे पुस्तक खूप अभ्यासपूर्वक आपल्या समोर आले ( माझ्या माहिती प्रमाणे हे एकमेव असावे ), आणि बरीच माहिती मिळाली. गैरसमज दूर झाले. वाल्मिकी खरंच महान होते. इतके चिरकालीन टिकणारे महाकाव्य लिहून ठेवले, मात्र स्वतःची माहिती कुठेच ठेवली नाही. 

आपल्यापर्यंत महर्षी वाल्मिकी यांचा जीवनपट आपल्या लिखाणातून पोहोचवणाऱ्या देशपांडे सरांचे मनापासून आभार ! कितीही आभार मानले तरी कमीच आहेत.

परिचय – विभावरी कुलकर्णी

सांगवी, पुणे

मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “जिजी” – लेखिका सौ राधिका भांडारकर ☆ परिचय – सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆

सुश्री अरूणा मुल्हेरकर

?पुस्तकावर बोलू काही?

☆ “जिजी” – लेखिका सौ राधिका भांडारकर ☆ परिचय – सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ 

पुस्तक परिचय

पुस्तकाचे नाव ~ जिजी 

लेखिका ~ सौ.राधिका भांडारकर,वाकड,पुणे.

प्रकाशिका ~ डाॅ.सौ.स्नेहसुधा कुलकर्णी.

नीहारा प्रकाशन, सदाशीव पेठ, पुणे.

मुद्रक ~ पालवी मुद्रणालय, सदाशीव पेठ, पुणे.

मूल्य ~ ₹१००/—

सौ राधिका भांडारकर

“जीजी” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच दि.२६ मार्च २०२३ रोजी गुणवंतांच्या उपस्थितीत सुरेख पद्धतीने संपन्न झाला.

अवघ्या ८८ पृष्ठांचे हे पुस्तक जसजशी वाचत गेले तसतशी त्यांत मनाने पार डुंबून गेले,शेवटचे पान वाचेपर्यंत एका जागेवर या पुस्तकाने खिळवून ठेवले.एका  आजीची ही कहाणी अत्यंत ह्रदयद्रावक आणि कुठेतरी भेदून जाणारी…!जीजीचे संपूर्ण चरित्र यात रेखाटले असले तरी ते आत्मचरित्र नाही,किंवा चरित्र या साहित्यप्रकारातही मोडणारे नाही असे मला वाटते.

हे पुस्तक म्हणजे जीजीने स्वतः लिहीलेली तिची कहाणी वाचताना लेखिकेच्या भावनांचा

झालेला हा कल्लोळ आहे.त्यामुळे पुस्तकातील एकेक शब्द,एकेक ओळ वाचकाच्या ह्रदयाला जाऊन भिडते.

अत्यंत सुस्थितीत वाढलेली,सधन कुटुंबात विवाह होऊन आलेल्या जीजीला तिच्या पुढील आयुष्यात नशीबाने अल्पवयात वैधव्य आल्याने,तिने समाजाशी धीराने आणि आत्मविश्वासाने कसा लढा दिला,तिच्या एकमेव पुत्राला उत्तम प्रकारे कसे घडविले हे वाचताना डोळ्यातील आसवे थांबत नाहीत.

अतिशय प्रभावी शब्दांकन…..!अगदी तिर्‍हाईत,अपरिचित वाचकाच्या

नजरेसमोरही ही जीजी उभी रहाते.

सुरवातीलाच राधिकाताई लिहितात,”एक व्यक्ती म्हणून तिला वाचायचं होतं,तिचा शोध घ्यायचा होता.तिच्यातलं स्त्रीत्व जाणायचं होतं.तिच्यातली शक्ती जाणायची होती.आमच्या व्यतिरिक्त तिच्या शब्दातून बघायचं होतं.”

“खरंच बोराच्या झाडासारखंच होतं ना तिचं आयुष्य! काटेरी रक्तबंबाळ करणारं!पण तिने मात्र रुतलेल्या काट्याचा विचार न करता गोड बोरांचाच आनंद उपभोगला.”

ह्या अशाप्रकारच्या लेखनाने जीजी वाचायची वाचकांची उत्सुकता ताणते.त्यामुळे पुस्तक खाली ठेवावेसे वाटत नाही.

जीजीची कहाणी सांगत असताना राधिकाताईंचा जीजीसोबतचा वास आणि घेतलेले अनुभव ह्यामुळे वर्तमान काळात वावरल्यासारखे वाटते.आजही जीजी सोबत आहे असा विचार मनात येऊन काहीतरी आत्मीक बळ आल्यासारखे वाटते.

जीजीचे तिच्या पाचही नातींवरचे नितांत प्रेम हे लेखिकेने स्वानुभवावरून फार समर्थ  शब्दात प्रदर्शीत केले आहे.प्रत्येकच वाचकाला जीजी वाचत असताना स्वतःची आजी कोणत्या ना कोणत्या रूपात दिसल्याशिवाय रहाणार नाही हे निश्चित!त्यामुळे ह्या पुस्तकाविषयी कुठेतरी आत्मीयता वाटते.

१०० वर्षापूर्वीच्या काळातील जीजी आणि तिने दिलेले आधुनिक संस्कार या विषयी राधिकाताई सांगतात,”मुलीच्या जातीला हे शोभत नाही बरे?असा पळपुटा,मळकट,कडू संस्कार मात्र तिने आमच्यावर कधीही केला नाही.आयुष्यात अनेक चढउतार आले,रस्ते काही नेहमीच गुळगुळीत नव्हते,दगड,खडे,काटे सारे टोचले.अपरंपार अश्रू गाळले पण कणा नाही मोडला,”जीजीने तिच्या कुटुंबाला(मुलगा/सून आणि पाच नाती) समर्थ बनविले.

राधिकाताईंच्या प्रभावी लेखनशैलीमुळे जीजी प्रत्येकाला आपली वाटते हेच या व्यक्तीचित्रणाचे यश आहे.

सर्वांनी वाचावे आणि जीवनात सकारात्मकतेचा बोध घ्यावा असे हे पुस्तक जीजी.

पुस्तकाच्या मुखपृष्ठासंबंधी थोडेसे~ मुखपृष्ठावर ज्या काही ओळी छापलेल्या दिसतात ते जीजीचे हस्ताक्षर आहे आणि तिच्या फोटोचे स्केच तिची सगळ्यात

धाकटी नात,जिचे तीन महिन्यापूर्वीच निधन झाले ती उषा ढगे हिने केले आहे.

जीजीच्या बाकीच्या चार नातींनीही त्यांच्या व जीजीच्या एकत्रीत सहवासाचे विविध अनुभव लिहीले आहेत.

राधिकाताईंची ही वाटचाल अशीच सतत चालत राहो आणि त्यांची विविध विषयावरील पुस्तके झपाट्याने प्रकाशित होवोत ह्या माझ्या त्यांना शुभेच्छा!

पुस्तक परिचय – सुश्री अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकावर बोलू काही  ☆ अग्निशिखा, कादंबरी ☆ मनोगत – सौ. नीला देवल ☆

सौ. नीला देवल

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ अग्निशिखा, कादंबरी  ☆ मनोगत – सौ. नीला देवल ☆ 

पुस्तक – अग्निशिखा, कादंबरी.

लेखिका – नीला देवल.

प्रकाशक – मिलिंद राजाज्ञा, नवदुर्गा प्रकाशन, कोल्हापूर.

पृष्ठे – २८०

किंमत – ५१० रु .

☆ मनोगत – सौ. नीला देवल ☆

माझी अग्निशिखा ही ऐतिहासिक कादंबरी प्रकाशित झाली आहे त्यात तिचे हे मनोगत.

गुजरात मधील राजकुमारी आणि देवगिरीच्या शंकर देवांची राणी देवल देवी हिचे काळजाला भिडणारे चरित्र यामध्ये आहे.

इतिहासातील अज्ञात अनेक वीरांगणा पैकी ही एक देवल देवी जी अनंत आपदा संकटे अंगावर झेलते. प्रचंड स्व धर्माभिमानी, राष्ट्राभिमानी, मुच्छद्दी, धोरणी अशी स्त्री अल्पकाळ का होईना भारताची सम्राज्ञी म्हणून दिल्ली सिंहासनाधिष्ठित होते. अखंड भारताचे स्वप्न साकारते. अल्लाउद्दीन खिलजीच्या स्वप्नांचा चक्काचूर करून.

अशा शूरवीर, धुरंदर स्त्रिया ज्या अज्ञात इतिहासातील पानापानात दडलेल्या. आहेत. पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा देणारी नारी शक्तींची ही चरित्रे जी भारतीय ना अज्ञात आहेत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी देवल देवीची ही कथा नक्कीच प्रेरणादायी होऊन अनेक लेखिका अशा ऐतिहासिक स्त्रियांना न्याय मिळवून देण्यासाठी उद्युक्त होतील. तेच या कादंबरीचे यश होईल.

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सहा सोनेरी पाने या पुस्तकातील देवल देवी व खुशरूकान या वरच्या स्वतंत्र प्रकरणावरून प्रेरणा मिळवून केवळ त्या प्रकरणाचा विस्तारित भाग म्हणजे ही कादंबरी आहे. स्वदेशासाठी जोहार करणाऱ्या रजपूत स्त्रिया इतकी प्राणपणाने स्वधर्म व स्वदेश राष्ट्र रक्षणारी राजकारणी, मुच्छद्दी आदर्श आशा स्त्रीचे चरित्र म्हणजे ही कादंबरी आहे.1857

सारखेच खुशरूकान व देवलदेवीने केलेले हे स्वातंत्र्य समरच आहे.

© सौ. नीला देवल

९६७३०१२०९०

Email:- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ एका रानवेड्याची शोधयात्रा… श्री कृष्णमेघ कुंटे ☆ परिचय – सौ. उज्वला केळकर ☆

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ एका रानवेड्याची शोधयात्रा… श्री कृष्णमेघ कुंटे ☆ परिचय – सौ. उज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ एका रानवेड्याची शोधयात्रा… श्री कृष्णमेघ कुंटे ☆ परिचय – सौ. उज्वला केळकर ☆ 

एका रानवेड्याची शोधयात्रा

लेखक – कृष्णमेघ कुंटे

राजहंस प्रकाशन

पृष्ठे – १६९ मूल्य – १२५ रु.

परिचय उज्वला केळकर

कृष्णमेघ कुंटे हे मदुमलाईच्या जंगलात पूर्णपणे एक वर्ष राहिले. ऑगस्ट ९४ ते जुलै ९५ या काळात ते तिथे राहिले. त्यांनी तिथे जगलेलं जीवन, घेतलेले अनुभव म्हणजे एका रानवेड्याची शोधयात्रा’. तिथे ते घामानं थबथबेपर्यंत, पोटर्‍या लटपटेपर्यंत, बूट फाटेपर्यंत, मांड्या दुखेपर्यंत, पाठीचा कणा मोडेपर्यंत हिंडले. नादावल्यासारखे परत परत झाडीमाध्ये फिरत गेले. जंगलातील सर्व ऋतूंमधीलरूप, रंग, नाद, स्पर्श अनुभवले. त्यामधला रस घेतला आणि तितक्याच रसिलेपणाने, शब्दांमधून तो अनुभव वाचकांपर्यंत पोचवला.   

पहिल्या प्रकरणात लेखकाने आपण मदुमलाईच्या जंगलात का व कधी गेलो, ते सांगितलय. कॉलेजच्या पहिल्या वर्षाला ते रसायनशास्त्रात नापास झाले. दुसर्‍या वर्षाचे सर्व विषय सुटले होते, पण रसायनशास्त्रात पास झाल्याशिवाय पुढे जाता येणार नव्हते. मग वर्षभर काय करायचं? याबद्दल विचार चालू असतानाच, त्यांचे सर मिलिंद वाटवे यांनी विचारणा केली की मदुमलाईच्या जंगलात अभ्यासाठी जातोस का? त्यांना रानकुत्र्यांचा काही अभ्यास करायचा होता. त्यांच्या अभ्यासाचा पाठपुरावा कृष्णमेघांनी करावा, असा प्रस्ताव त्यांनी मांडला. तिथला त्यांचा सगळा खर्च ते करणार होते. जंगल भ्रमंतीचं वेड असणार्‍या आणि वन्य प्राण्यांबद्दल कुतूहल असणार्‍या कृष्णमेघांनी या प्रस्तावाला मान्यता दिली. ते ६ वीत असताना ‘फ्रेंडस ऑफ अॅनिमल्स’ या संस्थेने अंदमान येथे घेतलेल्या शिबिराला हजर राहिल्यापासून त्यांना वन्य जीवनाबद्दल कुतूहल निर्माण झाले होते. मदुमलाईच्या जंगलात राहून ते मिलिंद वाटवे यांच्यासाठी त्यांच्या पद्धतीने अभ्यास करणार होते.

त्यानंतर लेखकाने मदुमलाईचे जंगल आणि त्यांच्या पंचक्रोशीची माहिती दिली आहे. त्यांनी लिहिलय, ‘अन्य जंगलांप्रमाणे हे एकांडं जंगल नाही. तामीळनाडू, कर्नाटक आणि केरळ या तीन राज्यात पसरलेल्या भल्या मोठ्या अरण्याचा, मदुमलाईचे जंगल हा एक भाग आहे. नीलगिरी पर्वतरांगेत हे जंगल येते.’ पुस्तकाच्या शेवटी मदुमलाईच्या जंगलाचा नकाशाही दिलेला आहे. ते म्हणतात, मदुमलाईचा गाभा बघायचा असेल, तर म्हैसूर-उटीचा डांबरी रस्ता सोडून उजवीकडे आत शिरलं पाहिजे. तिथून पुढे फक्त झाडा-झुडपांचं, दाट गवताचं, हत्ती –अस्वलांचं, केताचं ( कृष्णमेघ यांचा आदिवासी वाटाड्या) आणि त्याच्यासारख्या जंगलात रमणार्‍यांचं साम्राज्य. आपण त्यात प्रामाणिकपणे घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आणि तो थोडा-फार यशस्वी झाला, असं ते म्हणतात. त्यांनी लिहिलय, ‘मी मदुमलाईला आलो आणि कक्कनल्लापासून थोरापळ्ळीपर्यन्त आणि मासिनागुडीपासून गेम हटपर्यन्त, साधारण देडशे- दोनशे चौ. की. मीटरचं जंगल मला उंडारायला मिळालं.’

मदुमलाईला  आल्यावर प्रथम ते मासिनागुडीत राहिले. इथे त्यांचे स्वतंत्र घर होते. इथे ५-६ घरातून रहाणार्‍या शेजारी संशोधकांची थोडी माहिती ते देतात. चार-दोन लेखणीच्या फटकार्‍याने बोम्मा या त्यांच्या स्वयंपाक्याचे आणि कोता या त्यांच्या आदिवासी वाटाड्याचे दर्शन ते घडवतात. इथून आपल्या आनंदी प्रवासाची सुरुवात झाल्याचे ते सांगतात.

ते ज्या प्रदेशात फिरले, तिथली झाडे-झुडुपे, पक्षी-प्राणी, नद्या-ओढे, उंचवटे-टेकड्या या सार्‍यांचं वर्णन अगदी चित्रमय शैलीत झाले आहे. आनईकट्टी येथील वर्णन उदाहरण म्हणून बघता येईल. ‘या भागाचं रूपही वेगळं आहे. इथे उंच डोंगर नाही की सपाट जंगल नाही. आहेत त्या अगदी दाटीवाटीने उभ्या असलेल्या, एकमेकांच्या पोटात शिरणार्‍या छोट्या छोट्या टेकड्या आणि त्यांच्यामधून वाहणारे उन्हाळ्यात रोडावणारे सडपातळ ओढे. पाऊस कमी, त्यामुळे आभाळाला हात लावणार्‍या पण एकमेकांपासून अलिप्त रहाणार्‍या उंच झाडांऐवजी इथे एकमेकांच्या हातात हात आणि गळ्यात गळे घतलेल्या , नसती गर्दी करून राहणार्‍या बुटक्या झाडांची आणि झुडुपांची रेलचेल आहे. आनईकट्टीत बाभळी, ईखळ, धावडा, खैर, पांगारा, चंदन, निवडुंगाचं साम्राज्य.. इथल्या धसमुसळ्या, बाकदार काटेरी जाळ्यांच्या प्रेमळपणापासून, काट्यात कपडे धरून ठेवण्याच्या हट्टापासून थोडं जपूनच राहिलेलं बरं. इथलं रहाणीमान पाठीचा कणा मोडणारं आणि हिंडणं पायाचे तुकडे पाडणारं, पण इतकं रोमांचकारी की इथून पाय लवकर हलत नाही.’

आपल्या भटकंतीतील प्रदेशाप्रमाणे इथले प्राणी, पक्षी, कीटक इ. चे वर्णनही त्यांनी सविस्तर केले आहे. त्यांच्या दिसण्याप्रमाणेच, त्यांचे स्वभाव, सवयी याबद्दल लिहिले आहे. काही निरीक्षणे, अभ्यास नोंदवला आहे. हत्तींमध्ये नराला दात असतात. माद्यांना  नसतात. . त्यांना आपल्या कळपाजवळ कुणी इतर प्राणी आलेला चालत नाही. ते लगेच त्याला हुसकावून लावतात. पाणी जसं ते आपल्या अंगावर घालून घेतात, तसंच पाण्याकाठची मातीही सोंडेने आपल्या अंगावर घालून घेतात. उन्हापासून आणि एक प्रकारच्या रक्तपिपासू माशांपासून आपला बचाव करण्यासाठी ते आपल्याला मातीने माखून घेतात. आपल्या विष्ठेचा वास सहन न झाल्यामुळे किंवा आसपासचे गवत जून निबर झाल्याने, कोवळ्या लुसलुशीत गवताच्या शोधात हत्ती स्थलांतर करतात. डिसेंबरमध्ये मोठ्या प्रमाणावर हत्ती आईनकट्टीला येतात. हा भाग हत्तींच्या शिकारीसाठी कुप्रसिद्ध आहे. इथे शिकार करणार्‍या वीरप्पनसह आणखी तीन टोळ्या आहेत. हस्तीदंतासाठी शिकार होते. एकदा या भागात गेलेले नर पुन्हा दिसत नाहीत. शिकार्‍याच्या गोळीला बळी पडतत, असं आदिवासी सांगतात. 

रानकुत्री ही बुटकी असतात. ती भुंकत नाहीत. इतर प्राण्यात नर, तर या कुत्र्यांमध्ये मादी ही टोळीची राणी असते. तीच तेवढी नवी पिले जन्माला घालू शकते इतर माद्या नवी पिल्ले जन्माला घालत नाहीत. त्या नवीन जन्मलेल्या पिल्लांना वाढवायला मदत करतात. राणी म्हातारी झाली किंवा मेली की दुसरी मादी राणी होते. रानकुत्री भुंकत नाहीत. एकमेकांशी संपर्क करण्यासाठी शीळ घालात.  अशी अनेक प्राण्यांबद्दलची निरीक्षणे त्यांनी इथे नोंदवली आहेत. रानकुत्र्यांच्या पोटातील परजीवी आणि चितळांच्या पोटातील परजीवी यांचा परस्परांशी काही संबंध आहे का, याचा अभ्यास करण्यासाठी लेखक तिथे गेला होता. हा संबंध असायचं कारण म्हणजे चितळ हे रानकुत्र्यांचं भक्ष. तसाच हातींचाही अभ्यास त्यांना करायचा होता.

जंगल भ्रमंतीत अनेक थरारक प्रसंगांचे अनुभव त्यांनी घेतले. अगदी जीवघेणे प्रसंगही आले. ते वाचताना त्याचा थरार वाचकांनाही जाणवतो. मग प्रत्यक्ष अनुभवलेल्यांची त्यावेळी कशी स्थिती झाली असेल? हे सारं वर्णन इतक्या चांगल्या शब्दात झालय की आपण वाचत नसून व्हिडिओ बघतोय असं वाटतं. खरं तर या पुस्तकावर उत्तम माहितीपट होऊ शकेल.

एकदा आईनकट्टीला असताना ते व केता, त्यांचा मागकाढया , दुपारी एका ओढ्याकाठी जेवायला बसले होते. पाठीमागे गच्च जाळी. ओढ्याच्या पलीकडे झुडुपांमध्ये जोरात खसखस सुरू झाली. चित्कार, आरोळ्या यांनी जमीन हादरू लागली. हत्तींचा एक कळप जवळ जवळ पळतच त्यांच्या दिशेने येत होता. ओढा उथळ असल्याने हत्तींना सहज ओलांडता येणार होता. पाठीमागच्या जाळीमुळे त्यांना पळून जाणंही शक्य नव्हतं. पण सुदैवाने हत्ती ओढा ओलांडून, त्याला समांतर चालत राहिले. ते त्यांच्या दिशेने आले असते तर…  

एकदा रानकुत्र्यांच्या गुहेच्या शोधात ते मोयार गॉर्जपाशी आले. खाली खोल दरी. तिथे उतरायला वाट नव्हती. शेवटी त्यांच्यापासून ४-५ फुटांवर असलेल्या झाडावरून त्यांनी खाली उतरायचं ठरवलं. झाडावर त्यांनी उडी मारली. तो अंदाज बरोबर ठरला. नाही तर त्यांचा कपाळमोक्षच झाला असता. इथे रानकुत्र्यांची गुहा शोधताना त्यांना अजगर दिसला. मगरी दिसल्या. अस्वल, वाघ, पाणमांजरे यांच्या गुहा दिसल्या. हे सगळं वाचता वाचताही आपल्याला धडकी भरते.

कारगुडीला एकदा कुत्र्याच्या टोळीचं निरीक्षण करत कृष्णमेघ आणि अरुण बसले होते. थोड्या वेळाने कुत्री अस्वस्थ झाल्यासारखी वाटू लागली. त्यांनी आवाज केला. त्या आवाजात धोक्याची सूचना होती. जीवाचा आकांत होता. ती कुत्री बघत होती, त्यामागे एक उंचवट्याचा उतार होता. त्यापलीकडे ओढा. ओढ्याभोवती दाट झाडी होती. तिथून गोलसर चेहर्‍याचा पिवळ्या रंगाचा, अंगावर काले पट्टे असलेला वाघ बाहेर आला आणि चालत त्यांच्याच दिशेने पुढे आला. उंचवट्यावर आल्यावर तो क्षणभर थांबला. वाटेतल्या कुत्र्याच्या अंगावर तो धावला. पण कृष्णमेघ लिहितात, ‘आम्हाला बघून तो बुजला असावा. कुत्र्याचा पाठलाग सोडून तो वळला आणि एक मोठी डरकाळी फोडून तो उंचवट्यामागे गायब झाला. एकदा हत्तींणीने त्यांचा पाठलाग केला आणि त्यांना पळता भुई थोडी झाली. असे अनेक थरारक प्रसंग यात लेखकाने दिले आहेत.

विरप्पन प्रकरणात त्यांनी, आदिवासींच्या काही समस्यांबद्दल, त्यांच्या स्थिती-गतीबद्दल लिहिले आहे.

पुस्तकात जागोजागी, जंगल, हत्ती, गवे, वाघ, कुत्री, पक्षी इ.ची छायाचित्रे वर्णनाला अधीक मूर्त स्वरूप देतात. ऋतुचक्र हे यातलं शेवटचं प्रकरण. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या तीनही ऋतूतील जंगलाच्या बदलत्या रंगरूपाचं वर्णन यात केलं आहे. यात पक्षी, कीटक, कीडे-मकोडे यांच्या जीवनाबद्दल आणि त्यांच्या जीवनसंघर्षाबद्दल लिहिलय. जंगल त्यांच्या देहाच्या कणाकणात मुरलय. सरत्या वर्षाबरोबर, म्हणजे, जुलै ९५ मधे त्यांची शोधायात्रा तात्पुरती थांबली. पण संधी मिळताच ती पुन्हा सुरू होईल, यात संदेह नाही.  

ज्यांना रानं-वनं- जंगल, प्राणी-पक्षी, झाडं – झुडुपं, नद्या-टेकड्या याविषयी कुतुहल असेल, त्यांनी ‘एका रानवेड्याच्या शोधायात्रे’त जरूर सामील व्हावं आणि आनंद मिळवावा.

©  उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170 ईमेल  – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘रामायण! महत्व आणि व्यक्तिविशेष’ – श्री विश्वास देशपांडे ☆ परिचय – डॉ मीना श्रीवास्तव ☆

डॉ मीना श्रीवास्तव

अल्प परिचय

जन्मापासून, २१ ऑक्टोबर १९५१ ते ३० सप्टेंबर २००९ होईपर्यंत नागपूर येथे वास्तव्य

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे १९६९ ला ऍडमिशन घेतली. येथून MBBS (१९७४) आणि फार्माकॉलॉजी (औषध शास्त्र) या विषयात MD (१९७९) केले. १९९९ पर्यंत तिथे नोकरी केली, मग इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे (१९९९ते ३० सप्टेंबर २००९) नोकरी केली. फार्माकॉलॉजी विभागात प्राध्यापक  म्हणून निवृत्त झाले. नंतर ४ प्रायव्हेट मेडिकल कॉलेज (चेन्नई, कोईम्बतूर, मथुरा आणि इस्लामपूर) मध्ये जॉब केला. (शेवटचा इस्लामपूर इथे) ऑक्टोबर २१ ला ७० वर्षाचे होऊन रिटायर झाले.

मॅनेजमेंटचे तीन डिप्लोमा आणि समाजशास्त्र या विषयात एम ए केले आहे.

नोकरीच्या काळात लिहीत होते, रेडिओ टॉक (वैद्यकीय विषयांवर) देत होते.

लहानपणापासून पेंटिंगची आवड होती अन आहे, बरेच शिकले.

मराठी, हिंदी, इंग्रजी लिहायची अन वाचायची नितांत आवड होती अन आहे. व्यस्त नोकरी आणि घरच्या जबाबदारीतून मुक्त झाल्यावर पूर्ण वेळ लेखन करावे असे वाटले. समाजमाध्यमांवर आणि फेसबुकवर लिहिते. मी ब्लॉगर आहे. माझे स्वतःचे ब्लॉगर.कॉम अन वर्डप्रेस या दोन साईटवर ब्लॉग असतात. मार्च २०२२ पासून मराठी आणि हिंदी भाषांत नियमितपणे ब्लॉग लिहीत असते. महिन्यातून २ ते ४ ब्लॉग असतात.

मला नाट्यसंगीत आणि जुने चित्रपटसंगीत अतिशय प्रिय आहे. तसेच निसर्गरम्य जागी प्रवास करायला अतिशय आवडते.            

सध्या ठाण्यात वास्तव्य आहे. अधूनमधून पुणे येथे जाते. 

? पुस्तकावर बोलू काही ?

 ☆ ‘रामायण! महत्व आणि व्यक्तिविशेष’ – श्री विश्वास देशपांडे ☆ परिचय – डॉ मीना श्रीवास्तव ☆ 

पुस्तक – रामायण! महत्व आणि व्यक्तिविशेष

लेखक- श्री विश्वास देशपांडे, चाळीसगाव

पुस्तकाचे प्रकाशक-सोहम क्रिएशन अँड पब्लिकेशन

पृष्ठसंख्या-१३० पाने

पुस्तकाचे मूल्य- १५० रुपये

पुस्तक परीक्षण- डॉ. मीना श्रीवास्तव, ठाणे

देशपांडे सरांनी लिहिलेले “रामायण! महत्व आणि व्यक्तिविशेष” हे आगळे वेगळे वैशिष्ट्यपूर्ण पुस्तक वाचले. रामायणाच्या असंख्य आवृत्त्या आहेत, वाल्मिकी रामायण, तुलसीरामायण, प्रादेशिक वाङ्मय, इतर देशातील रामायणाच्या आवृत्त्या, यांत आणखी भर कशाला हा विचार लेखकाने केला नाही, याचा मला फार आनंद होतोय. त्यांनी या पुस्तकाची रचना विशिष्ट हेतूने केलीत असे मला वाटते. आजकालच्या पिढीला आधुनिकतेचे आवरण असलेली अभिजात कथानकाची पुस्तके फार भावतात, त्यांत मूळ रामायण न वाचता ह्या नवीन संकल्पना वाचून रामायणाविषयी त्यांचे मत फार वेगळे होऊ शकते. उदाहरण द्यायचे तर रावणासारख्या खलनायकाचे उदात्तीकरण करणारी आधुनिक लेखकांची पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत. पुरोगामी वाचकांना त्यांची नव्या ढंगाने लिहिण्याची पद्धत भुरळ पाडते, ही नक्कीच चिंतेची बाब आहे. त्याचप्रमाणे श्रीरामाच्या चरित्रातील कांही प्रसंगांच्या निमित्त्याने वादग्रस्त मजकुराचे समर्थन आणि प्रसारण करीत, श्रीरामाच्या उज्ज्वल चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचे कार्य देखील कांही मंडळी करीत असतात, यामुळे नवीन पिढीचे भ्रमित होणे देखील साहजिक आहे. या पार्श्वभूमीवर हे पुस्तक अत्यंत महत्वपूर्ण भूमिका बजावू शकते असे मला वाटते. ‘वाल्मिकी रामायण’ हे सदाहरित असा साहित्यप्रकार आहे! मात्र लेखकाने रामायणाच्या कैक आवृत्त्यांचा गाढ अभ्यास केला आहे, हे जाणवते. ही रामभक्ती अन प्रीती डोळस आहे, म्हणूनच पारंपरिक रामायणाची कथा यात नाही, ती येते स्वाभाविकपणे खळाळत्या निर्झराच्या प्रवाहासारखी!

श्री विश्वास विष्णु देशपांडे

हे पुस्तक सर्वधर्मियांसाठी आहे, कारण यातील सर्वात महत्वाचे घटक म्हणजे यातील प्रत्येक पात्र. वाल्मिकींनी जणू काही त्या व्यक्तिविशेष आदर्शाच्या परिसीमा म्हणूनच निर्माण केल्यात. लेखकाने पुरुषोत्तम रामाचे गुणविशेष तीन भागात अत्यंत विचारपूर्वक अन सुंदररित्या मांडले आहेत. राम हा अलौकिक पुरुषोत्तम आहे, त्याचे गुण गातांना वैखरी मुग्ध होते, शब्दभांडार रिते होते, उरते केवळ मनात त्याचे उत्तुंग व्यक्तिमत्व, इतके की सूर्य आपले तेज, हिमालय आपली उंची, सागर आपली खोली अन चंद्र आपल्या सोळा कला रामाच्या तुलनेत आपण  बसतो तरी का, हे तपासून बघतील! ही तीन प्रकरणे मूळ पुस्तकातच वाचावी! उत्तुंग व्यक्तिमत्व  असलेला राम हा आदर्शाचा मेरुमणी, पुत्र, पती, बंधू, सखा, राजा, शिष्य, योद्धा आणि कळस म्हणजे शत्रू देखील! लेखकाने रामाचे चरित्र कायमच एक सर्वगुणसंपन्न मानव म्हणूनच रंगवले आहे, त्याला देव्हाऱ्यात बसवले नाही!  मात्र एक सामान्य मानव किती अशक्यप्राय गोष्टी करू शकतो अन त्या मुळेच देवत्व चरणांपाशी नमते, हे माझ्या मते या तीन भागांचे सार आहे!

रामाच्या सोबत त्याची संगिनी, अर्धांगिनी अन अनुगामिनी सीता आलीच! खरे पाहिले तर ही जोडी अभिन्नच, “जेथे राघव तेथे सीता”! आदर्श कन्या, सून, भगिनी, माता, पत्नी, पण याहून अधिक आपले स्वतंत्र व्यक्तित्व जपणारी आदर्श स्त्री. चंद्राला जशी रोहिणी, तशी रामचंद्राला शोभेल अशी पावित्र्याची अन पातिव्रत्याची परिसीमा, अर्थात सर्वगुणसंपन्न अशी ही सीता! सर्वप्रथम एका मनोहर उपवनात रामाला बघूनच त्याला आपले हृदय अर्पण करणारी, स्वयंवरात “वरमाला घेऊन अधीर होऊनि सौख्याचे मंदिर गाठणारी” अन त्याच सुकुमार चरणांनी रान तुडवणारी, रामाजवळ सुवर्णमृगासाठी हट्ट करणारी, रावणाला “कोल्हा” म्हणून रामाची तुलना सिंहाशी अन स्वतःची तुलना एका सिंहीणीशी करणारी अनुपमेय मैथिली!      विश्वास सरांनी आपल्या लेखणीतून सीतेचे व्यक्तिमत्व इतक्या अलौकिक रित्या साकार झाले आहे की, क्या कहने! शिवाय तिच्यावर रामाने केलेल्या “कथित अन्यायाचा” संवेदनशील भाग फार संयमाने आणि निष्पक्ष रित्या हाताळला गेल्या आहे. अशी अनुपमेय जोडी आजच्या “आज ब्याह कल शायद तलाक” अश्या काळात स्वप्नवत वाटते ना!

या पुस्तकात रामायणातील इतर व्यक्तिरेखा अतिशय चोखंदळपणे निवडलेल्या दिसतात. आजच्या काळात आपल्यासमोर आदर्श, अनुकरणीय व वंदनीय असावीत, अशीच ही पात्रे! लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, उर्मिला, मंदोदरी, बिभीषण, यांचे गुणविशेष त्या त्या प्रकरणात नेमकेपणाने सादर झाले आहेत. विशेष म्हणजे परमभक्त हनुमान याच्यावरील दोन प्रकरणे फारच वाचनीय आहेत.

वणासारख्या खलनायकाचे व्यक्तित्व लेखकाने निष्पक्षपणे हाताळलेले आहे. यातून रावण आजही अस्तित्वात आहे, हे जाणवले. तो आपल्यात किती आहे, हे अनुभवण्यासाठी हे प्रकरण वाचावे!  याच अनुषंगाने आपण “राम आणि रावण” यांच्या प्रवृत्तीतील भिन्नता(अनुक्रमे विश्वात्मक विचार अन व्यक्तिवाद), व नैसर्गिक अशी “रावण वृत्ती” अन संस्कारातून साकार झालेली “रामवृत्ती” याचे केलेले विवेचन फार विचारणीय आहे. यामुळे आजच्या घडीला युवा तसेच बालकांमध्ये रामवृत्ती निर्माण होण्यासाठी पालक, शिक्षक अन समाजाला काय करता येईल याचे भान यावे ही अपॆक्षा आहे! आजच्या घडीला रामायणावरील या पुस्तकाच्या दीपस्तंभाची समाजाला गरज आहे. आणखी एका नकारात्मक व्यक्ती म्हणजे कैकेयी! काळे कपडे घातलेली, कोपभवनातील खलनायिका हे तिचे चित्र जनमानसात फिट्ट बसले आहे लेखकाने त्याला पूर्णपणे छेद देत तिचे मनोविश्लेषणात्मक चित्रण केलय! वाईटातून चांगले (रावणाचा नाश) होण्यास कैकेयी कारणीभूत ठरली, हे महत्वाचे आहे! तिच्यविषयी असलेले गैरसमज दूर करण्याचा फार महत्वाचा प्रयत्न या तपशीलात दिसतो.

रामायणकालीन शिक्षणात राजसत्ता आणि गुरुसत्ता यांचा सुंदर समन्वय दाखवलाय! विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती साधून त्यांचे संपूर्ण व्यक्तिमत्व घडवणारे ते शिक्षण कुठे अन आजचे भष्टाचारयुक्त शिक्षण कुठे! हे प्रकरण लेखकाने शिक्षक या अनुभवातून अतिशय मुद्देसूदपणे लिहिले आहे! हीच गोष्ट रामायणकालीन समाजाची! रामराज्याचे हे वर्णन अप्रतिम, अयोध्येच्या आनंदवनभुवनाची आपण आता फक्त कल्पनाच करायची! प्रत्येकाच्या डोळ्यात अंजन घालणारे आणखी एक प्रकरण म्हणजे रामायणकालीन शासन व्यवस्था. तीन स्तरांवर कार्यान्वित, अष्टप्रधान, ऋषिमंडळ आणि खुद्द राजा! आपल्या कल्पनाशक्तीची हद्द तिथवर पोचणे अशक्य! तशीच कुटुंबसंस्था, कुठे आजचे न्यायालयीन खटले अन कुठे या रामायणातील आदर्श भावकी! आजच्या काळाला अनुरूप अशी “रामकथेचे महत्व” ही दोन सर्वांगसुंदर प्रकरणे मुळातूनच वाचनीय! रामायणातील काही ज्ञात/अज्ञात गोष्टींमध्ये लक्ष्मणरेषेचे आज अभिप्रेत असलेले महत्व, वालीवध, रामाने सीतेचा केलेला त्याग, इत्यादी संवेदनशील आणि वादग्रस्त बाबी लेखकाने फार संयमाने लिहिल्या आहेत. संपूर्ण पुस्तकाचा समारोप करणारा भाग अद्वितीय! भावनांचा कल्लोळ हाच याचा गाभा!

रुचकर जेवणाच्या शेवटी “गोडाचा घास” असलेले शेवटचे प्रकरण, या पुस्तकाचे वेगळेपण जपणारे! रामाची “रामगाणी” अन तीही गीतरामायण विरहित, रामाच्या बालपणापासून ते राज्याभिषेकापर्यंतचे प्रसंग साकारणारी! (अपवाद “पराधीन आहे जगती”)! यात लेखकाची संगीताची गहिरी जाण आलेखित झाली आहे! या अनोख्या, अवीट अन आकर्षक अंतिम भागासाठी देशपांडे सरांचे खास अभिनंदन!

या पुस्तकाची मला भावलेली सर्वंकष गुणवत्ता म्हणजे याची “नवनवोन्मेषशालिनी” संकल्पना! लेखकाचे भिडस्त आणि नम्र व्यक्तिमत्व या पुस्तकात पदोपदी  जाणवते! त्यांनी राजहंसासारखे नेमके मोती वेचून हे अमूल्य साहित्य निर्मित केले आहे! आजच्या काळाला अन पिढीला अनुरूप असे हे रामायणाचे लेखन आहे! भाषा अत्यंत साधी, सोपी अन सरळ! या पुस्तकाचा स्थायी भाव आहे लेखकाची रामावरील प्रगाढ श्रद्धा, भक्ती अन प्रीती!

श्री विश्वास देशपांडे, चाळीसगाव. आ. बं. हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहेत. आजवर त्यांची सात पुस्तके प्रकाशित झाली आहेत. समाजमाध्यमांवर उगवतीचे रंग, प्रभात पुष्प, थोडं मनातलं, ही त्यांची सदरे वाचकप्रिय आहेत. रेडिओ विश्वासवर ‘आनंदघन लता’, ‘या सुखांनो या’ आणि ‘राम कथेवर बोलू कांही’ या कार्यक्रमांच्या मालिका अतिशय लोकप्रिय आहेत. त्यांचे स्वतंत्र यू ट्यूब चॅनल देखील आहे.

सोहम क्रिएशन अँड पब्लिकेशन द्वारा प्रकाशित या पुस्तकाचे वाचन, मनन, चिंतन आणि त्यानुसार आचरण करण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करावा असे मला प्रकर्षाने वाटते! भक्ती अन ज्ञानाने समृद्ध असे हे पुस्तक प्रत्येकाने वारंवार वाचावे आणि संग्रही ठेवावे इतके सर्वांगसुंदर आहे!

 

पुस्तक परीक्षण – डॉ. मीना श्रीवास्तव

दिनांक- २७-३-२३

ठाणे, फोन नंबर – ९९२०१६७२११

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares