मराठी साहित्य – ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ “तर्कटपंजरी” – संपादन : सुश्री प्राजक्ता अतुल ☆ परिचय – श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “तर्कटपंजरी” – संपादन : सुश्री प्राजक्ता अतुल ☆ परिचय – श्री जगदीश काबरे

पुस्तक : तर्कटपंजरी

संपादन : सुश्री प्राजक्ता अतुल 

प्रकाशक : मधुश्री प्रकाशन, पुणे.

☆ ‘तर्कटपंजरी’:: तर्काच्या आधारावर विवेकवादी समाज घडवण्याची क्षमता असलेले पुस्तक श्री जगदीश काबरे

हे जग पुरुषांचे आहे या चालीवर म्हणता येईल की हे जग अस्तिकांचे आहे. ज्याप्रमाणे पुरुषसत्ताक व्यवस्थेत स्त्रियांना दुय्यम स्थान दिले जाते त्याचप्रमाणे या अस्तिकांच्या जगातसुद्धा नास्तिकांना दुय्यम स्थान दिले जाते. स्त्री म्हणजे पापयोनी समजणारे नास्तिक म्हणजे दुर्जन समजत असतात. पण मानवाच्या उत्क्रांतीच्या टप्प्यात स्त्रियांनी शेतीचा शोध लावून माणसाच्या सामाजिक प्रगतीचा मार्ग खुला केला त्याचप्रमाणे चार्वकांनी देव आणि पारलौकिता नाकारून वैदिक धर्माला आव्हान दिले आणि वैज्ञानिक प्रगतीचा पाया घातला. पण माणसाला अज्ञाताची भीती असल्यामुळे कुठल्यातरी फसव्या का होईना पण आधाराची गरज लागते. ती गरज सहजपणे देवाची संकल्पना पूर्ण करते. म्हणून त्याला माहीत नसलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर ‘देवाची करणी आणि नारळात पाणी’ या पद्धतीचे स्वीकारणे सोयीचे जाते. माणसाला विचार करण्याचा आळस असतो. तसेच तो विचार कलहाला घाबरतो. मग त्यापासून पळवाट करण्यासाठी त्याला देवाची संकल्पना सोयीची वाटते. कारण प्रत्येक अनाकलनीय घटनेचे उत्तर मिळत नसले की ‘देवाची करणी’ हे उत्तर देऊन विचार करण्याचा डोक्याला होणारा ताप वाचवता येतो.

पण माणूस जन्माला येतो तेव्हा तो नास्तिकच असतो. त्याच्या डोक्यात देवाधर्माच्या कल्पना नसतात, जसे इतर प्राण्यांच्या. मग तो ज्या घरात जन्मतो त्या घराचा देव आणि धर्म त्याच्यावर थोपवला जातो. त्याप्रमाणे त्याच्या डोक्यात अंधश्रद्धा वाढवणारे संस्कार केले जातात. थोडक्यात काय तर, न कळत्या वयात न मागता आणि कसलेही विशेष प्राविण्य नसताना सहज मिळालेली गोष्ट म्हणजे देवाचे आणि धर्माचे संस्कार! पण माणूस जसजसा स्वतंत्र विचार करू लागतो, त्याला प्रश्न पडतात. त्याची उत्तरे शोधताना जसजशी त्याच्यात वैचारिक परिपक्वता येत जाते तेव्हा त्याला देवाधर्मातील फोलपणा लक्षात येतो आणि त्याचा नास्तिकतेकडे प्रवास सुरू होतो. म्हणजे नास्तिकता ही वैचारिक प्रक्रियेतून निर्माण होत असते तर आस्तिकता ही पारंपारिक संस्कारातून लादली जाते.

पण प्रश्न विचारण्याचे धाडस ज्या लोकांमध्ये होते आणि आहे त्यांच्यामुळेच मोठ्या प्रमाणात वैज्ञानिक प्रगती आणि सामाजिक उन्नती झालेली दिसते. अशा माणसांनी जगभर वेगवेगळ्या संघटना उभारल्या आणि आस्तिकांशी दोन हात करायला सुरुवात केली. तसेच एकएकट्या नास्तिकांना ‘तुम्ही एकटे नाही आहात, तुमच्याबरोबर नास्तिकांचे संघटन आहे’, हा आशावाद एकांडया नास्तिकात निर्माण केला. असेच एक संघटन नास्तिक विचाराच्या विखुरलेल्या लोकांना बळ मिळावे म्हणून महाराष्ट्रात 2013 साली ‘ब्राईट्स सोसायटी’ नावाने नास्तिकतेचा जाहीर पुरस्कार करत जन्मास आले. या संघटनेने अकरा वर्षात बरीच मोठी मजल मारलेली आहे आणि महाराष्ट्रातील समस्त नास्तिकांना वैचारिक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. या संघटनेत मोठ्या प्रमाणात तरुणांची संख्या आहे हे विशेष. या तरुणांमध्ये नवीन विचार स्वीकारण्याची आणि ते अमलात आणण्याची ताकद कशी वाढत गेली तसेच त्यांचा नास्तिकतेकडे कसा प्रवास झाला, ते मनोगत व्यक्त करणारे ब्राईट्स सोसायटीने ‘तर्कटपंजरी’ हे पुस्तक प्राजक्ता अतुल यांच्या संपादनाखाली तयार केले आहे. या पुस्तकातील मनोगते वाचताना ही तरुण मंडळी समाजाच्या प्रवाहाच्या विरोधात पोहण्याचे धाडस अंगी कशी आणि का आणू शकली याचे त्यांनी मनोज्ञ विवेचन केले आहे. यातील बरीचशी मंडळी ही कर्मठ आणि धार्मिक कुळाचार पाळणाऱ्या घरात जन्माला आली होती. अर्थातच लहान वयात ते सगळेच देवधर्म पाळणारे देवभोळे होते. पण शिक्षण घेत असताना त्यांच्यात विचार करायची सवय लागली आणि वाचनाची आवड निर्माण झाली. त्यांच्या प्रश्नांना उत्तरे अशा वाचनातूनच त्यांना मिळू लागली. कारण घरातील मोठी माणसे ती उत्तरे देण्यास असमर्थ होती. त्यातून देवाधर्मातील फोलपणा त्यांच्या लक्षात येऊ लागला तसतसे ते धार्मिक कर्मकांडापासून दूर जाऊ लागले. पण तरीही जगात मोठ्या प्रमाणात देवाधर्माचे कर्मकांड करणारे लोक आजूबाजूला असताना त्यांना आपले वेगळे विचार लोकांसमोर जाहीरपणे मांडणे अवघड झाले. कारण त्यांच्या विचारांची आस्तिकांकडून ‘आलाय फार मोठा शहाणा! आपले वाडवडील काय मूर्ख होते?’ असा प्रति प्रश्न विचारून खिल्ली उडवली जायची. अशा सगळ्या तरुणांना ब्राईट्समुळे ‘नास्तिक विचाराचे आपण एकटे नाही आहोत, आपल्याबरोबर अनेक लोक आहेत’, याचे बळ मिळाले आणि ते हळूहळू ठामपणे समाजात आपले नास्तिक विचार उघडपणे व्यक्त करू लागले. त्यांना ब्राईट्स संस्था ही नास्तिकांसाठी एका परीने सुरक्षित आश्रयस्थान वाटते.

आता आपण ‘तर्कटपंजरी’ या पुस्तकातील लेखकांनी लिहिलेल्या मनोगतातील काही महत्त्वाची उद्घृते पाहूया…

1) सीमा नायक म्हणतात, सगळ्यात महत्त्वाची होती माझे स्वतःची विवेकबुद्धी. हिने मला कोणत्याही बऱ्यावाईट प्रसंगात कमजोर पडू दिले नाही. एक आठवण सांगते, मुलाच्या जन्मानंतर त्याला लगेच व्हेंटिलेटरवर ठेवावे लागले. त्या बारा दिवसात कधीही देवासमोर हात जोडावेसे वाटले नाहीत. सासरच्यांनी ‘ब्राह्मणांकडून मंत्रपठण करून घेऊ’, असे सांगितल्यावर मी “दोन दिवसाच्या बाळाला आपण व्हेंटिलेटर वरून काढून घेऊ आणि मगच मंत्रपठण करूया”, असे छातीठोकपणे सांगू शकले ते माझ्या विवेकी शक्तीमुळेच. (पृष्ठ क्र. 143)

2) डॉ सचिन लांडगे म्हणतात, कोणतीही गोष्ट आपल्याला त्रास तेव्हाच देऊ शकते जेव्हा आपण त्याचा त्रास करून घेतो, असे मनोवैज्ञानिक अल्बर्ट एलीस म्हणतो. थोडक्यात कोणतीही गोष्ट ही समस्या नसते, तर त्या गोष्टीकडे पाहायचा आपला दृष्टिकोन हीच खरी समस्या असते. म्हणून अज्ञान स्वीकारणे हे ‘जाणून घेण्याच्या’ दिशेने टाकलेले पहिले पाऊल असते. त्यामुळे आपल्याकडे एखाद्या गोष्टीचे प्रामाणिक उत्तर नसेल तर कोणत्याही अप्रमाणित व्याख्या किंवा कथांवर विश्वास ठेवण्याच्या ऐवजी उत्तर नसल्याचा प्रामाणिक स्वीकार करणे चांगले. (पृष्ठ क्र. 136, 138)

3) शिवप्रसाद महाजन म्हणतात, प्रत्येक स्त्रोत्र परमेश्वर स्तुतीच असते. प्रत्येक स्तोत्राच्या उत्तरार्धात फलश्रुती असते, जी परमेश्वराच्या स्तुतीच्या बदल्यात संरक्षणाची, संपत्तीची, पुत्रप्राप्तीची इच्छा मांडते आणि त्याची हमीसुद्धा देत असते. स्तुती न केल्यास हानी होण्याची भीती दाखवली जाते. प्रत्येक स्तोत्रात स्तुती व फलश्रुती एका ठराविक साच्यात असतात. याची कल्पना आली आणि पाठांतर करण्याची सवय लागणे हा मुद्दा वगळता हे सर्व फोल आहे याची जाणीव हळूहळू होत गेली. (पृष्ठ क्र. 120)

4) वैशाली जोग यांनी एकाच वाक्यात पण अत्यंत महत्त्वाचे मार्मिक निरीक्षण नोंदवले आहे. त्या पृष्ठ क्र. 117 वर म्हणतात, ‘तुमच्या चारित्र्यापेक्षासुद्धा तुमचे आस्तिक्य महत्त्वाचे ठरते. ‘ (म्हणूनच आपल्या अवतीभवती अनेक चारित्रहीन माणसे आस्तिक असली तरी त्यांच्याविषयी काही वाटेनासे होते. – इति अस्मादिक)

5) राहुल खरे म्हणतात, जेव्हा लोक म्हणतात की, ‘ही माझी श्रद्धा आहे. ‘ तर ती खरी श्रद्धा नसून फक्त भीती असते. देवाचा प्रकोप होईल, आपल्यासोबत काहीतरी वाईट घडेल या भीतीने बहुतांश लोक कर्मकांड करीत असतात. ईश्वर हा वर आकाशात कोणीतरी बसला आहे, तो खूप दयाळू, न्यायी आहे. पूजापाठ, होमहवन, मंत्रोपचार केल्याने, पोथ्या वाचल्याने तो प्रसन्न होतो आणि भक्तांच्या अडचणीचे निवारण करतो, निपुत्रिकाना संतान देतो, भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतो. थोडक्यात देवाला सौदेबाजी मान्य आहे. म्हणून नास्तिक विचारांमधून मी अधिकाधिक परिपक्व होतो आहे. ही परिपक्वता स्वतंत्रपणे विचार करण्यातून येते. त्यामुळे देव या संकल्पनेच्या कुबड्याची मला आत्तापर्यंत गरज वाटलेली नाही… अगदी संकटाच्या प्रसंगात सुद्धा नाहीच. (पृष्ठ क्र. 110, 111)

6) डॉ प्रियंका लांडगे आणि डॉ सचिन लांडगे यांच्या लेखात ते म्हणतात, विवेकबुद्धी म्हणजे सारासार विचार करण्याची पद्धत. तर्काच्या आधारावर समजणाऱ्या गोष्टी पारखून घेण्याची पद्धत. ही एक विचार प्रक्रिया असते. पण उपजत नसते. जसे शरीराच्या रक्षणासाठी प्रतिकारशक्ती असते तसे मनाच्या रक्षणासाठी विवेकबुद्धी असते. (पृष्ठ क्र. 91, 93)

7) पद्माकर इंगळे म्हणतात, जनतेत वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा आणि विज्ञाननिष्ठ नागरिक घडावा असे नागरिकांचे एक कर्तव्य आपल्या संविधानात सांगितलेले आहे. परंतु धर्माचे नेतृत्व असलेला समाज वैज्ञानिकदृष्ट्या विचार करायला विरोधच करत असतो. अशा प्रकारच्या लोकांना त्यांच्या हितसंबंधांची जोपासना करण्यासाठी, हेतू साध्य करण्यासाठी समाजाला अंधारात चाचपडत ठेवणे सोयीचे वाटते. पण नास्तिकता ही मुळातच वास्तविकता आहे. ही एक वास्तविक जीवन पद्धती असून जी जीवनात येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी आपली आपणच निर्माण करायची असते आणि काळानुरूप त्यात बदल घडवायचे असतात. (पृष्ठ क्र. 78, 79)

8) किरण देसाई म्हणतात, पूर्वी गावाकडील घरामध्ये संडास बांधत नसत. आमच्या जुन्या घरी सरकारी अनुदानातून एक संडास आम्ही बांधून घेतला. त्यावेळेस मी आजीला मुद्दाम सांगितले की, ‘कोणत्याही शुभ कार्याला जसे गृहप्रवेश, वास्तुशांती इत्यादीसाठी भटजीला बोलावून त्याच्या हस्ते उद्घाटन करून घेतो त्याचप्रमाणे ह्या नवीन संडासाचेसुद्धा उद्घाटन भटजीच्या प्रथम वापराने व्हायला हवे. ‘ अर्थातच आजीची प्रतिक्रिया अतिशय तिखट होती, हे वेगळे सांगायला नकोच. (पृष्ठ क्र. 61)

9) आशिष कोरी म्हणतात, अधिकाधिक लोकांना विवेकी विचारांकडे वळवायचे असेल तर त्यांना विचार करण्यासाठी प्रवृत्त करावे लागेल. डॉ दाभोळकर म्हणायचे, ‘लोकहो तुम्ही विचार करायला का घाबरता?’ अंधश्रद्धा निर्मूलन, नास्तिकता हे तर लांबचे टप्पे आहेत. आधी निदान विचार करायला लागा. चिकित्सा करायला लागा. डोके वापरायला सुरुवात तर होऊ द्या. इतके जरी झाले तरी जास्तीत त्याच्या दिशेने आपला प्रवास सुरू झाला आहे असे म्हणायला हरकत नाही. (पृष्ठ क्र. 54)

10) सलीम मोमीन यांनी त्यांच्या लेखाचा शेवट एका विचार परिलुप्त कवितेने केला आहे. ते एकंदरीत विवेकी माणसाच्या प्रवासाचे सार आहे, असे म्हणायला हवे. पृष्ठ क्र. 140 वर ते लिहितात…

धर्म म्हणजे काय? एक अंधार-प्रवास 

कितीतरी अंधारांशी लढायचं आहे 

अंधार धर्माचा, जातीपातीचा,

सगळाच नष्ट करायचा आहे.

जितका विवेक रुजवत जावा,

तितका माणूस माणसाशी मिळत जातो.

मी मलाच शोधत व खोदत राहावं 

अविरतपणे माणूसपण पेरण्यासाठी 

आणि माणूसपण जगवण्यासाठीही.

साथींनो, यातील एकही व्यक्ती लेखक म्हणून प्रस्थापित नाही. पण त्यांच्या लिहिण्याच्या शैलीवरून हे लक्षात येते की, विचार जर स्पष्ट असतील तर आपण योग्य शब्दात चपखलपणे ते मांडू शकतो. कसे ते या उद्घृतांवरून स्पष्ट होतेय. एकंदरीत संपूर्ण पुस्तक वाचल्यावर नास्तिकतेकडे प्रवास करणाऱ्या तरुणांना वैचारिक बळ तर मिळेलच, पण परिघावरील तळ्यात-मळ्यात विचार असलेल्या तरुणांचाही हे पुस्तक वाचून नास्तिकतेकडे प्रवास सुरू होईल, हे नक्की. भविष्यातील नास्तिक आणि विवेकी समाज घडवण्यासाठी या पुस्तकाचा मोठाच हातभार लागणार आहे. ‘तर्कटपंजरी’ हे पुस्तक तर्कटी नसून तर्काच्या आधार विवेकवादी कसे व्हावे हे समजावून सांगणारे महत्वाचे पुस्तक आहे. ब्राइट्स संस्थेचे सचिव कुमार नागे यांची पुस्तकाबाबतची संकल्पना कमालीची यशस्वी झालेली आहे. त्याला प्राजक्ता अतुल यांच्या कौशल्यपूर्ण संपादनाने अधिक उठावदार केलेले आहे. भविष्यातील विवेकी समाजाचा भाग होऊ इच्छिणाऱ्या तरुणाईने ‘तर्कटपंजरी’ हे पुस्तक जरूर वाचावे आणि आपले विचार प्रगल्भ करावेत, अशी मी शिफारस करत आहे.

परिचय : श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ “बलिदान” – लेखिका : सुश्री स्वप्निल पांडे – अनुवाद – सुश्री उल्का राऊत ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “बलिदान” – लेखिका : सुश्री स्वप्निल पांडे – अनुवाद – सुश्री उल्का राऊत ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : “बलिदान

लेखिका: स्वप्निल पांडे 

अनुवाद: उल्का राऊत

पृष्ठ:२३२

पॅराशूट रेजिमेंट हा भारतीय सेनेचा हवाई विभाग आहे. पॅराशूट मोहिम पार पाडण आणि वेगाने शत्रू प्रदेशाची सीमा पार करणं ही या रेजिमेंटची वैशिष्ट्ये आहेत. पॅराशूट रेजिमेंट पायदळाची शाखा आहे. दुसऱ्या महायुद्धामध्ये आरंभीव्या लढायांमध्ये जर्मन पॅराटुपरनी नेत्रदीपक यश मिळवलं. सर्व सैनिकी विचारवंतांचं लक्ष त्यांनी वेधून घेतलं. भारतीय सशस्त्र सेनेचे कमांडर-इन-चीफ जनरल सर रॉबर्ट कॅसेल्स यांनी ऑक्टोबर १९४० मध्ये हवाई पथक निर्माण करायचा आदेश दिला. १९४१ साली दिल्ली कॅन्टोन्मेंटमध्ये सुरू झालेल्या पहिल्या बटालियनमध्ये ५० वी पॅराशूट ब्रिगेड होती. तिचे पहिले कमांडर होते ब्रिगेडियर डब्ल्यू. एच. जी. गॉफ. पॅराशूट ब्रिगेडमध्ये दाखल होणारे पहिले भारतीय अधिकारी लेफ्टनंट रंगराज हे ५० व्या पॅराशूट ब्रिगेडच्या पंधराव्या बटालियनचे वैद्यकीय अधिकारी होते. भारतीय पॅराशूट रेजिमेंट १ मार्च १९४५ रोजी अस्तित्वात आली. लेफ्टनंट जनरल फ्रेड्रिक (बॉय) ब्राउनिंग हे कर्नलपदी होते. रेजिमेंटचं चिन्ह समकक्ष ब्रिटिश आर्मीसारखंच होतं. हे मरून बेरेटवर घातलं जायचं. दुसरं महायुद्ध संपल्यानंतर १९४५ साली भारतीय पॅराशूट रेजिमेंट बरखास्त करण्यात येऊन सेकंड हवाई विभागामध्ये समाविष्ट केली गेली. या विभागामध्ये तीन पॅराशूट ब्रिगेड होती: ५०, ७७ आणि १४ वी एअरलैंडिंग ब्रिगेड. हा भारतीय सेनेच्या विसर्जनाचा एक भाग होता. फाळणीनंतर ५० वी आणि ७७ वी पॅराशूट ब्रिगेड भारतामध्ये राहिल्या. १५ एप्रिल १९५२ रोजी इंडियन पॅराशूट रेजिमेंट (पॅरा) ची स्थापना झाली तेव्हा या दोन्ही ब्रिगेडना फर्स्ट, सेकंड आणि थर्ड अशी नवी ओळख मिळाली.

पॅराशूट रेजिमेंटचं घोषवाक्य आहे ‘शत्रुजीत. ‘ या विशिष्ट बेंजची निर्मिती सेकंड पॅराच्या कॅप्टन एम. एल. तुली यांनी केली आहे. हिंदू पुराणातील सम्म्राट शत्रुजीतची प्रेरणा त्यामागे आहे. पॅरा ब्रिगेडच्या निर्मिती चिन्हामध्ये कडाडती वीज आणि सद्गुणांचा दुर्गुणांवर विजय दाखवला आहे. ‘बलिदान’ हा सर्वोच्च त्यागाचा बॅज, स्पेशल फोर्सेसच्या अभूतपूर्व मोहिमांचा निदर्शक असून पॅराशूट रेजिमेंटच्या स्पेशल फोर्सचे, म्हणजेच पॅरा (SF) सैनिक परिधान करतात. स्पेशल फोर्सचा उगम मेघदूत या स्पेशल टास्क ग्रूपमधून झाला. १ सप्टेंबर १९६५ मध्ये मेजर मेघ सिंग यांनी हा ग्रूप निर्माण केला. ‘स्पेशल फोर्सेस’ हा शब्दप्रयोग तुलनेने लहान मिलिटरी युनिटसाठी वापरला जातो. या युनिटमधल्या सैनिकांना हेरगिरी, टेहळणी, अपारंपरिक युद्धं आणि खास मोहिमांसाठी कठोर प्रशिक्षण देऊन तयार केलं जातं. ही अनन्यसाधारण पथकं गुप्तता, वेग, आत्मनिर्भरता आणि उत्कृष्ट टीमवर्क, तसंच अत्याधुनिक विशेष साधनसामग्रीवर अवलंबून असतात. स्पेशल फोर्सेसच्या मोहिमा पाच क्षेत्रांमध्ये कार्यरत असतात आतंकवाद, अपारंपरिक युद्धकौशल्यं, परकीय देशांच्या अंतर्गत संरक्षणाची जबाबदारी, विशिष्ट हेरगिरी आणि विशिष्ट लक्ष्यांवर थेट हल्ला.

इंडियन पॅरा स्पेशल फोर्सेसच्या जवानांएवढे धैर्यवान आणि साहसी लोक क्वचितच पाहायला मिळतील आणि तरीही त्यांची नावं कधीही प्रकाशात येत नाहीत. ‘बलिदान’ बॅजच्या अत्यंत पात्र हक्कदारांवर अत्युच्च पर्वतराशीवरील सीमारेषाचं संरक्षण आणि भयानक दहशतवादाचं उच्चाटन या पराकोटीच्या महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सोपवलेल्या आहेत.

या शूर योद्ध्यांभोवती एक गूढ वलय आहे. त्यांच्याविषयी असंख्य आख्यायिका आहेत. त्यांच्या मोहिमांविषयी एवढी गुप्तता पाळली जाते की डॅगर, घोस्ट, व्हायपर आणि डेझर्ट स्कॉर्पियो अशासारख्या सांकेतिक नावांव्यतिरिक्त अन्य कोणतीही माहिती उपलब्ध नाही.

अफाट आणि असीम साहस कथांच्या या लक्षणीय संग्रहामध्ये स्वप्निल पांडेंनी काही महान स्पेशल फोर्सेस अधिकाऱ्यांवर प्रकाशझोत टाकला आहे. कर्नल संतोष महाडिक, कॅप्टन तुषार महाजन, ब्रिगेडियर सौरभ सिंग शेखावत, सुभेदार मेजर महेंद्र सिंग आणि इतर काही साहसवीरांचा वाचकांशी परिचय करून दिला आहे.

एक वर्षाच्या कालावधीत या सैनिकांच्या मित्र आणि कुटुंबीयांच्या दोनशेपेक्षाही अधिक मुलाखती, LOC आणि LAC जवळच्या विविध स्पेशल फोर्सेस युनिटला दिलेल्या अनेक भेटींवर हे पुस्तक आधारित आहे.

या अनाम, अप्रसिद्ध सैनिकांना गूढ वलयातून बाहेर काढून लोकांसमोर आणायचं हे ‘बलिदान’ लिहिण्यामागील उद्दिष्ट आहे.

लेखिकेविषयी

द फोर्स बिहाइंड द फोर्सेस, लव्ह स्टोरी ऑफ अ कमांडो आणि सोल्जर्स गर्ल ही स्वप्निल पांडे यांनी विस्तृत संशोधन करून लिहिलेली पुस्तकं भारतीय सैनिक आणि त्यांच्या परिवारांचं कार्य आणि जीवनपद्धतीची जाणीव लोकांना व्हावी, या उद्देशाने लिहिलेली आहेत. त्या बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलाजी, मेस्राच्या माजी विद्यार्थिनी आहेत. विप्रो आणि ‘एचडीएफसी’सारख्या संस्थांमध्ये त्यांनी काम केलं असून लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी आणि आर्मी पब्लिक स्कूलमध्ये त्या शिक्षिका होत्या. नियतकालिके आणि वृत्तपत्रांमधील त्यांचे ब्लॉग्ज लोकप्रिय आहेत. राष्ट्रीय टेलिव्हिजनवर चर्चासत्रांमध्ये पॅनेलिस्ट म्हणूनही त्या झळकतात. त्या लष्कराच्या बाजूने बोलणारा महत्त्वाचा आवाज आहेत. ‘इस्रो’ सारख्या संस्थांतर्फे त्यांचा सत्कार झाला आहे.

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ घामाचे अश्रू… लेखक- श्री. दि. बा. पाटील ☆ परिचय – सौ. सुचित्रा पवार ☆

सौ. सुचित्रा पवार

?पुस्तकावर बोलू काही?

☆ घामाचे अश्रू… लेखक- श्री. दि. बा. पाटील ☆ परिचय – सौ. सुचित्रा पवार ☆

पुस्तक –  घामाचे अश्रू .. एका बलिदानाची कथा.

लेखक- श्री. दि. बा. पाटील

एकूण पृष्ठे -२६२

प्रकाशक- य. ग. गिरी. करवीर प्रगती प्रकाशन, निंगुडगे आजरा कोल्हापूर

मूल्य- २५०₹

मा. दि. बा. पाटील सरांची वाचकाला खिळवून ठेवणारी अतिशय हृदयस्पर्शी कादंबरी म्हणजे ‘घामाचे अश्रू.’ सौ. सुचित्रा पवार

ही कहाणी आहे पाचवीला पूजलेल्या सततच्या दुष्काळाने कर्जबाजारी झालेल्या एका ऊसतोड कामगाराच्या दुर्दैवाची. कधी जगण्यासाठी तर कधी सणासुदीला तर कधी आजारपण, लग्नसमारंभ तर कधी व्यसनाधीनता यासाठी सावकाराकडून घेतलेली कर्जे फेडण्यासाठी ऊसपट्ट्यात येऊन जितके पैसे मिळवता येतील तितके मिळवून कर्ज फेडावे या अगतिकतेत अशी कुटुंबे ढोर कष्ट करतात पण खरेच ते सावकारी कर्ज पाशातून मुक्त होतात?खरेच त्यांच्या वाट्याला सुखाचे दिवस येतात?कर्जावर कर्ज, व्याज, पुन्हा कष्ट न पुन्हा कर्ज या दुष्ट चक्रात बरेच ऊसतोड कामगार संपून जातात. माण, जत, कर्नाटक या भागातून हे मजूर ऊसपट्ट्यात आपल्या कुटुंब कबिल्यासह येतात आणि मजुरी करून उदरनिर्वाह करत, अनंत अडचणींचा सामना करत भविष्याची सुंदर स्वप्नं पाहत जगतात. कधी ही स्वप्नं सत्यात उतरतात तर कधी ही स्वप्नं डोळ्यात ठेवून डोळे कायमचे मिटतात. त्यांच्या जीवनातील प्रश्नांना, दुःखाना अंत नाही आणि वालीही. बापाचे कर्ज मुलगा फेडत राहतो, त्यातच तो पुन्हा कर्जबाजारी होतो, आयुष्यात पूर्ण कर्जमुक्त होणे कदाचित त्यांच्या भाळी नसावे, उर्वरित कर्ज मुलाच्या डोक्यावर ठेवून त्याचे जीवन सम्पते, हे दुष्टचक्र पिढ्यानपिढ्या चालतच राहते.

ही कथा आहे अशाच एका कर्जात बुडलेल्या श्रीपती आणि त्याच्या चौकोनी कुटुंबाची. माणदेशातील पांढरवाडी गावातून आलेल्या उसतोडयांच्या बैलगाड्या गावाच्या वेशीतून ऊस मालकाच्या फडात येतात. त्या ताफ्यातील एक गाडी श्रीपतीची. श्रीपती, त्याची पत्नी यशोदा, मुलगा नाम्या व मुलगी सगुणा गावात प्रवेश करतात. पेंगुळलेल्या अवस्थेत छोटी निष्पाप मुलं आई-वडील नेतील तिकडं जात आहेत. ना भविष्याची चिंता न वर्तमानातील सुख अशा विचित्र अवस्थेत करपत चाललेलं बाल्य आपल्या आई वडिलांसोबतच फडात उतरते. नवी विटी नवे राज्य. विचित्र नजरा झेलत यशोदा कोयत्याला भिडते.

थोड्याच दिवसात सामाजिक कार्यकर्ते एकनाथअण्णा व शेवाळे गुरुजी उसाच्या फडात येऊन श्रीपतीस विनंती करून नाम्यास साखर शाळेत दाखल करतात. नाम्या, सगुणा त्यांच्या कुवतीनुसार आईवडिलांच्या प्रत्येक कामात हातभार लावतात. नाम्या हुशार आहे. सुट्टीत गावी जाऊन आई वडिलांच्या कामास हातभार लावणे आणि सुट्टी संपताच पुन्हा शाळेत हजर राहणे. अशा जीवनचक्रात रडत खडत आर्थिक अडचणींवर मात करत नाम्या दहावी पर्यंत शिक्षण घेतो. नामाला आई वडिलांच्या कष्टांची जाण आहे. आपण शिक्षण घेऊन नोकरी केल्याशिवाय आपला व कुटुंबाचा उद्धार होणार नाही, सावकारी कर्ज फीटणार नाही, याची पुरेपूर जाणीव नामाला आहे. त्यासाठी तो शेवाळे गुरुजींच्या मदतीने कर्मवीर अण्णाभाऊंच्या संस्थेत ‘कमवा व शिका’या योजनेखाली महाविद्यालयीन शिक्षणासाठी प्रवेश घेतो. इकडं सगुणाच्या लग्नासाठी, बाळंतपण आणि बारशासाठी शेवाळे गुरुजींच्या मध्यस्थीने श्रीपतीचे राहते घर गहाण पडते. शेतीचा एक तुकडा तर आधीच विकलेला असतो. विकताना काळीज तुटत असते, कर्ज घेताना काळजाचे पाणी झालेले असते पण नामा नावाचा अंधुकसा दिलासा श्रीपतीच्या काळोख्या आयुष्यात असतो. नामाला नोकरी लागली की सगळं कसं नीट होणार होतं.

नामाचे शिक्षण संपवून नामा पांढरवाडीला परततो. नोकरीसाठी पुन्हा पैसे भरावे लागणार असतात. नामापुढं पेच असतो. गावातली जमीन कवडीमोलाने घ्यायला सावकार टपलेलेच असतात. तरीही वाड वडिलांची सगळीच जमीन कशी विकायची?असा पेच आहेच. अशातच एकनाथ अण्णा पाणीप्रश्न घेऊन दुष्काळी भागात आंदोलन करत असतात. अण्णांचे व नामाचे जिव्हाळ्याचे ऋणानुबंध आहेत, अण्णांबद्दल त्याला कमालीचा आदर आहे. नामा नकळत सावकारी पाश, पाणीप्रश्न याविरुद्धच्या लढ्यात ओढला जातो.

कर्ता सवरता मुलगा असा पोटापाण्याच्या प्रश्नामागे न लागता फुकटचं राजकारण करत हिंडत आहे, याचा श्रीपतीला राग येतो. डोक्यावरील कर्जाच्या ओझ्याचा ताण आहेच. त्यामुळं श्रीपती व नामा यांच्यात शाब्दिक चकमकी होऊ लागतात. नामा तरुण आहे, अंगात रग आहे त्यामुळं आपले वडील चुकतात असे त्याला वाटू लागते. त्यातच नामाची बालमैत्रिण अनुशी नामाचा विवाह होतो, म्हणजेच खाणाऱ्या एका तोंडाची अजून भर पडते. नामाच्या विवाह संबंधाने सगुणाचे माहेर तुटते. भरीस भर, यशोदा आजारी पडते आणि तिच्या इलाजासाठी दावणीची खिलारी खोंडांची जोडी विकली जाते.

आतून तुटलेला श्रीपती नामाच्या वागण्याने पुरता खचून जातो अन नैराशेच्या गर्तेत अडकतो. नामाकडून अपेक्षाभंग झालेला श्रीपती मग एका भयंकर निर्णायक वळणावर येतो.

गावात दूध घालायला गेल्यावर सहजच त्याच्या कानावर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मदतीची बातमी कानावर पडते आणि त्याचे डोळे लकाकतात.

संसाराच्या खाचखळग्यांना न डगमगलेला श्रीपती मुलाच्या नसत्या उद्योगाने मात्र डगमगतो. त्याची एकमेव जगण्याची उर्मी म्हणजे नामाची नोकरी असते. पण नामा आपल्या वडीलांचे स्वप्न पूर्ण करू शकला नाही त्यामुळं श्रीपतीची जीवनेच्छा मरून जाते. ‘असं मरत मरत, कुढत जगण्यापेक्षा आत्महत्या केली तर आपण आणि कुटुंबीय कर्जाच्या दुष्टचक्रातून सुटू. आपल्या मृत्यू पश्चात मिळालेल्या पैशात नामा नोकरी साठी पैसे भरून नोकरी करेल आणि कुटुंब सुखात राहील. ‘हा विचार श्रीपतीच्या डोक्यात फिट्ट बसतो न श्रीपती मागचा पुढचा विचार न करता मृत्यूला कवटाळतो. श्रीपतीच्या जीवनाचा अध्याय असा दुःखद वळणावर संपतो. भविष्याच्या सुखी स्वप्नांना डोळ्यात ठेवून श्रीपती भरल्या संसारातून निघून जातो.

इथून पुढं नामाच्या जीवनाला मात्र अचानक कलाटणी मिळते. नामाला सरकारी मदत मिळते. नामा कळत नकळत राजकारणात ओढला जातो. महाविद्यालयीन मित्र अमर देशपांडे आपल्या पक्षात त्याला महत्त्वाचे पद देतो आणि त्याच्या जोरावर नामाचा नामदेवराव होतो. पद आल्यावर आपोआपच पैसा आणि प्रतिष्ठा येते, कर्ज फिटतात, घर परत मिळते, आधुनिक शेतीसाठी आधुनिक औजारे आणि फिरायला चार चाकी दारात येते. घराचा न गावाचा कायापालट होतो. अशा तऱ्हेने नाम्याचा नामदेवराव पर्यंतचा प्रवास सुरु होतो.

ही सगळी सुबत्ता श्रीपतीच्या बलीदानातूनच आलेली आहे, याची खंत मात्र नामदेवला वारंवार होत असते. त्यातूनच त्याला वाटते की राजकारण सरळ, साध्या माणसाचे क्षेत्र नाही. आपण यात खोल खोल बुडत जाण्यापेक्षा कुठंतरी थांबायला हवे, आणि तो राजकारणातून बाजूला होऊन घरच्या शेतीत लक्ष घालतो. आईच्या इच्छेसाठी पुन्हा खिलारी बैल दावणीला येतात. सुख, समृद्धी दारात येते, नामाच्या संसारवेलीवर एक कळी उमलू पाहते आणि श्रीपतीच्या कुटुंबाला सोन्याचे दिवस दिसून कादंबरीचा शेवट होतो. अशा प्रकारे श्रीपतीच्या बलिदान यशस्वी झाले याची रुखरुख मात्र वाचकाच्या काळजात खोलवर राहते.

खरेच श्रीपतीचे बलिदान आवश्यक होते?श्रीपतीने आपल्या मुलावर थोडासा विश्वास ठेवून संयम राखला असता तर?श्रीपतीने आत्महत्या केली नसती तर?तर खरेच नाम्याचा नामदेवराव झाला असता?त्याच्या कुटुंबाला सुखाचे दिवस दिसले असते?नामा स्वार्थी आहे का?या प्रश्नांची उत्तरे संदिग्ध आहेत. नामाला चांगले दिवस आले म्हणून हायसे वाटून घ्यावे की श्रीपतीच्या असाह्य मृत्यूवर चरफडावे?श्रीपतीचे दुर्भाग्य म्हणावे की नामाचा भाग्योदय?

सदरची कादंबरी वाचताना डॉ. सदानंद देशमुख सरांची ‘बारोमास’कादंबरी आठवते. शेतकऱ्यांच्या व्यथाना कुणी वाली नाहीच. काळ बदलतो, सरकारे बदलतात पण काही सामाजिक प्रश्न वर्षोनवर्षी तिथंच राहतात हेच खरं.

वाचकाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवण्यात सदरची कादंबरी यशस्वी ठरते. अतिशय सुटसुटीत कथा आणि सुटसुटीत पात्रा भोवती कादंबरी फिरत राहते. श्रीपती, शेवाळे गुरुजी, एकनाथ अण्णा, आबा मास्तर, संभा नाना, अमर देशपांडे आणि नामा इतकीच महत्वाची पात्रे कादंबरी सहज सोपी न वाचनीय करण्यात मोलाची भूमिका बजावतात. कुठेही अवास्तव पाल्हाळ नाही की शृंगारिक वर्णनाचा बटबटीतपणा नाही हे कादंबरीचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणावे लागेल.

कादंबरीत दोन नायक दिसतात, पूर्वार्धात श्रीपती अन उत्तरार्धात नामदेव. दोन्हीही नायक आपल्या भूमिका यशस्वी पणे पार पाडण्यात यशस्वी झालेत असे म्हणले तर वावगे नाही. कुटुंबप्रमुख कुणीही असो, सामान्य कुटुंबप्रमुखाला आपल्या कुटुंबासाठी छोटा मोठा त्याग करावाच लागतो. श्रीपतीचे बलिदान सुद्धा कुटुंबाच्या सुखासाठी आहे. आणि नामदेवची राजकारणातील यशस्वी माघार हीही कुटुंबाच्या भल्यासाठीच आहे. मला वाटते कादंबरीचे यश इथंच आहे. कादंबरीतील दोन्ही नायिका सुद्धा आपापल्या जागी अगदी रास्त आहेत. दोघीही निरक्षर आहेत मात्र ‘माणूस’ म्हणून श्रेष्ठ आहेत. पूर्वार्धातील नायिका यशोदा आपल्या संसारासाठी काबाड कष्ट करते, आपल्या नवऱ्याच्या कठीण पेचप्रसंगात ढाल होते. नवऱ्यावर जीवापाड प्रेम करते तसेच आपल्या मुलाबाळांवर देखील. अनु भोळीभाबडी जरूर आहे मात्र व्यवहारी आणि कर्तव्यदक्ष सुद्धा आहे. बरेचदा नवऱ्याकडे पैसे आल्यावर बायका बिथरतात. सासरच्यांना तांदळातील खड्याप्रमाणे बाजूला टाकून माहेरचे भले करतात. नवऱ्याचे कान भरून कुटुंबापासून तोडतात, पण अनु तशी नाही. अनु सासर-माहेर मध्ये समन्वय राखते आणि आपले कुटुंब एकसंध ठेवते म्हणूनच या कादंबरीत काही आदर्श देखील आहेत. समाजातील विशीष्ट लोकांचे ती प्रतिनिधित्व देखील करते.

एकनाथ अण्णा सारखे कितीतरी सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पुढारी नामदेवसारख्या तरुणांची डोकी भडकवून त्यांचा वापर सोयीच्या राजकारणासाठी करतात. जेव्हा नामदेव नोकरी मागायला अण्णाकडे जातो तेव्हा ते हात झटकतात मात्र तेच अण्णा नामदेवच्या पाणी प्रश्नातील लढ्यात मात्र प्रोत्साहन देतात;नामाची वास्तव गरज काय आहे हे माहिती असूनही!

शेवाळे मास्तर सुद्धा एक हाडाचे शिक्षक आणि तळमळीचे कार्यकर्ते आहेत म्हणूनच प्रत्येकवेळी नामाच्या अडीअडचणीच्या वेळी मदतीसाठी धावून जातात आणि नामदेवच्या भल्यासाठी तत्पर राहतात. आपल्या आसपास शेवाळे मास्तरांसारखी माणसे आपण क्वचितच अनुभवतो. अमर देशपांडे सारखा एखादा भला मित्र मैत्रीत कोणत्याच स्तराचा आडपडदा न ठेवता सच्च्या दिलाने मित्राचे भले करतो, आपल्या मैत्रीला जागतो म्हणूनच नामाला सुखाचे दिवस दिसतात. नाहीतर कोण कुठला महाविद्यालयीन रूम पार्टनर मोठा झाल्यावर, प्रतिष्ठा मिळाल्यावर गरीब मित्राला ओळख दाखवतो?अमर आणि नामा यांचे मित्रप्रेम दुर्मिळच म्हणावे लागेल.

सावकार आबा मास्तर, संभा नाना, पोलीस पाटील आणि सरपंच गावखेड्यातील गुंड प्रवृत्तीचे प्रतिनिधित्व करतात. यांच्या अंगातली रग उतरवयातच जिरते. तोवर अनेक कुटुंबांचे, गावाचे वाटोळं झालेलं असतं.

एकंदरीतच वाचकाला खिळवून ठेवणारी, अंतर्मुख करणारी ओघवत्या शैलीतील ही कादंबरी वाचकाने आवर्जून वाचावी अशीच वाचनीय, मनाचा वेध घेणारी आहे यात शंका नाही.

लेखकाच्या पुढील साहित्य कृतीस खूप खूप शुभेच्छा 💐

समीक्षक – सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “मनगाभाऱ्यातील शिल्पे” – (अनुवादित) – मूळ हिन्दी लेखिका : डॉ. हंसा दीप मराठी अनुवाद : सौ. उज्ज्वला केळकर ☆ परिचय – सुश्री गौरी गाडेकर ☆

सुश्री गौरी गाडेकर

? पुस्तकांवर बोलू काही ?

☆ “मनगाभाऱ्यातील शिल्पे” – (अनुवादित) – मूळ हिन्दी लेखिका : डॉ. हंसा दीप – मराठी अनुवाद : सौ. उज्ज्वला केळकर ☆ परिचय – सुश्री गौरी गाडेकर

पुस्तक : मनगाभाऱ्यातील शिल्पे (अनुवादित) 

मूळ हिंदी लेखिका : डॉ. हंसा दीप

मराठी अनुवाद : सौ. उज्ज्वला केळकर.

प्रकाशक : अमित प्रकाशन, पुणे.

परिचय: सौ. गौरी गाडेकर 

डॉ. हंसा दीप

हा कथासंग्रह म्हणजे डॉ. हंसा दीप यांच्या निवडक कथांचा सौ. उज्ज्वला केळकर यांनी केलेला अनुवाद आहे. डॉ. हंसा दीप यांना मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं श्रेय उज्ज्वलाताईंनाच जातं.

डॉ. हंसा दीप यांचा जन्म मेघनगर, झाबुआ, मध्य प्रदेश येथे झाला. त्यांनी आदिवासी लोकसाहित्य व लोकसंस्कृती या विषयात पीएच्. डी. मिळवली आहे. त्या विषयावरील त्यांचे ‘ सौंधवाडी लोक धरोहर ‘ हे पुस्तक प्रसिद्ध आहे. डॉ. हंसा दीप यांनी नंतर अमेरिकेतील सुप्रसिद्ध संस्थांमध्ये हिंदीचे अध्यापन, हिंदी पाठ्यपुस्तकांचे संस्करण तसेच अनेक पुस्तकांचे, नियतकालिकांचे संपादन केले. सद्या त्या कॅनडामधील टोरॅंटो युनिव्हर्सिटीत हिंदीच्या प्राध्यापक, कोर्स डायरेक्टर आहेत. त्यांच्या साहित्याचा अनेक भारतीय भाषांत अनुवाद झाला आहे. त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. विदेशात हिंदी भाषेचा विकास, विस्तार व संवाद यासाठी त्यांनी केलेल्या निरंतर प्रयत्नांबद्दल, प्रवासी भारतीयांसाठी असलेला राष्ट्रीय निर्मल वर्मा सन्मान हा पुरस्कार त्यांना नुकताच भोपाळ, मध्य प्रदेश येथे प्रदान करण्यात आला.

सौ. उज्ज्वला केळकर

वेगवेगळ्या देशातील वास्तव्य, अनेक उपक्रमांमधून विविध लोकांशी संवाद यामुळे त्यांच्या अनुभवविश्वाची व्याप्ती खूपच मोठी आहे. या जीवनप्रवासात मानवी स्वभावाचे विविध नमुने पाहण्याची संधी त्यांना मिळाली. त्यापैकी काही व्यक्तिविशेषांची अभिव्यक्ती या संग्रहात आढळते.

यातील अनेक कथांची पार्श्वभूमी टोरॅंटो असली तरी या घटना भारतातही घडू शकतात. त्या अर्थाने त्या स्थलातीत आहेत.

उदा. ‘ कडब्याची आग’ मधील आयुष्याच्या उताराला लागलेल्या जोडप्यातले मतभेद. ‘शब्दही टोचत होते आणि मौनही. ‘ ‘ मग त्या रागाचं रूपांतर कडब्याच्या आगीत व्हायचं. पेटायचीही लगेच आणि विझायचीही पटकन. ‘

‘ शून्याच्या आत’ मधली निःस्वार्थ, समर्पित कुमुडी मायदेशातील भावंडांच्या जबाबदाऱ्या पेलतापेलता थकते, म्हातारी होते आणि तिला जाणवतं की तिचं जग म्हणजे भलंमोठं शून्य आहे. पण तिचा हा एकटेपणा घालवतात पशुपक्षी.

‘ समर्पण ‘ ही कथा आहे कोविडच्या महामारीत एकच व्हेंटिलेटर असताना आपल्यापेक्षा, २५-२६ वर्षांच्या डिरांगला व्हेंटिलेटरची जास्त गरज आहे, म्हणून स्वतःहून मृत्यूचं आमंत्रण स्वीकारणाऱ्या ८६ वर्षांच्या रोझाची.

‘ सुहास्य तिचे मनास मोही ‘ मधली खूप शिकून उत्तम करिअर करूनही असमाधानी राहिलेली कथानायिका आणि जगण्याच्या परीक्षेत अव्वल आलेली तिची अडाणी, गरीब असूनही सुखी, प्रांजळ हसणारी मैत्रीण.

‘ दोन आणि दोन बावीस ‘ ही कथा मात्र तद्दन टोरॅंटोमधलीच. भारतातून येणारं पुस्तकाचं पार्सल २२ऐवजी चुकून २ नंबरच्या घरात डिलिव्हर केलं गेलं. ते मिळवायला लेखिकेने खूप फेऱ्या घातल्या. तर त्या घरमालकाने तिला चोर समजून चक्क पोलिसांना बोलावलं.

‘ पोपटी पान पिवळं पान ‘ हीही सहसा भारतात न घडणारी कथा. बिछान्याला खिळलेल्या आणि त्यामुळे जीवनातील रस निघून गेलेल्या एका वृद्ध डॉक्टरांना त्यांच्या शेजारची तरुणी आपल्या बाळाचं रोज तासभर बेबीसिटिंग करायची विनंती करते. त्या शैशवाच्या सान्निध्यामुळे हळूहळू ते डॉक्टर जीवनाभिमुख होतात.

‘ परिवर्तन ‘ आणि ‘ सोव्हिनियर ‘ या कथांत बालपणी विकृत पालकत्वाची शिकार झाल्यामुळे रूक्ष, कठोर जीवन जगत असणाऱ्या साशा आणि ऍना यांच्या आयुष्यात एक क्षण असा येतो की जो त्यांना त्या ‘ काल ‘ मधून बाहेर पडून नवीन उत्साही जीवन जगायला प्रवृत्त करतो.

‘ मार्थाचे घर ‘, ‘ समांतर रेषा’, ‘ सूर्य आता चमकू लागलाय ‘ या सर्वच कथा मुळातून वाचण्यातच खरी मजा आहे. त्यामुळे शेवटची कलाटणी धक्का देते.

याशिवायही अनेक कथा या संग्रहात आहेत.

डॉ. हंसाजींनी अतिशय कौशल्याने ही शिल्पं कोरली आहेत. आणि उज्ज्वलाताईंनी त्यांना अतिशय सुंदर फिनिशिंग दिलं आहे. हे पुस्तक वाचताना तो अनुवाद आहे, असं कुठेही जाणवत नाही. तर मराठीतच लिहिलेलं पुस्तक वाचत असल्यासारखं वाटतं.

सगळ्यांनी हे पुस्तक मिळवून मुळातूनच वाचावं, ही सर्वांना आग्रहाची विनंती.

मूळ हिन्दी लेखिका : डॉ. हंसा दीप 

संपर्क – Dr. Hansa Deep, 22 Farrell Avenue, North York, Toronto, ON – M2R1C8 – Canada

दूरभाष – 001 + 647 213 1817

[email protected]

मराठी अनुवाद – सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – [email protected] 

परिचय –  सुश्री गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “भारताच्या लस-निर्मितीतील प्रगतीची गोष्ट” – लेखक : श्री सज्जन सिंग यादव – अनुवादिका : सौ. मंजुषा मुळे ☆ परिचय – सौ.अंजोर चाफेकर ☆

सौ.अंजोर चाफेकर

? पुस्तकांवर बोलू काही ?

☆ “भारताच्या लस-निर्मितीतील प्रगतीची गोष्ट” – लेखक : श्री सज्जन सिंग यादव – अनुवादिका : सौ. मंजुषा मुळे ☆ परिचय – सौ.अंजोर चाफेकर

पुस्तक : “भारताच्या लस-निर्मितीतील प्रगतीची गोष्ट“

“India’s vaccine growth story.”

लेखक : श्री सज्जन सिंग यादव 

अनुवादिका : सुश्री मंजुषा मुळे 

प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाउस प्रा. लि. , पुणे ३०.

प्रथम आवृति : जानेवारी २०२४.

पृष्ठे ३२४

मूल्य ₹५२०

परिचयकर्त्या : सौ. अंजोर चाफेकर

सर्वजण सुखी व निरोगी राहोत या संकल्पनेतून लसीचा शोध लागला.

अनुवादिका : सुश्री मंजुषा मुळे 

संसर्ग हे मानवजातीचे प्राचीन काळापासून शत्रू आहेत. आणि लस हे संरक्षक कवच आहे हे आपण जाणतो….’ पण लस म्हणजे नेमके काय असते?‘… याबद्दलची मूलभूत माहितीच कित्येकांना नसावी. आणि याबद्दल या पुस्तकात तपशीलवार माहिती दिलेली आहे. जिवंत रोगजंतूंना प्रयोगशाळेत अतिक्षीण बनविले जाते, किंवा विषाणू वा रोगजंतु यांना उष्णता व रसायने वापरून निष्क्रीय केले जाते आणि त्यापासून लस बनवून ती शरीरात सोडतात. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते….. आणि हे सगळे कसे केले जाते ती पूर्ण प्रक्रिया या पुस्तकातून समजून घेता येते. लसीच्या शोधामुळे देवी रोगाचे निर्मूलन झाले. पोलिओचे निर्मूलन झाले. तसेच आणखी कितीतरी आजारांवर प्रतिबंधक उपाय म्हणून लसी अत्यंत प्रभावी ठरल्या … आणि ठरत आहेत. आणि अशाच एका प्रभावी लसीमुळे कोविड १९ या महामारीचे आव्हान जगाने पेलले हे तर सर्वज्ञातच आहे.

या पुस्तकात लसीचा रंजक प्रवास वर्णिला आहे. पुस्तकात एकूण ९ प्रकरणे आहेत.

लसीत झालेली उत्क्रांती, त्याचे सामाजिक व राजकीय फायदे, लस विकासात स्वतःला झोकून देणारे शास्त्रज्ञ, कर्मचारी, उद्योजक, नेते या सर्वांचे वर्णन आहे.

भारताने ‘ लस महासत्ता ‘ हा नावलौकिक व प्रतिष्ठा कशी मिळवली, आणि अत्यंत कमी खर्चात व विक्रमी वेळात भारताने कोविड १९ च्या लसीचे ३ प्रकार जगाला भेट दिले, याचे सविस्तर वृत्त या पुस्तकात आहे.

इजिप्तमधे १३ व्या शतकात गुलामांना देवीची लस देण्यास सुरुवात झाली. पुढे या लसीचा प्रवास इजिप्त मधून तुर्कस्तानपर्यंत पोहोचला. तिथून आटोमन साम्राज्यात पोहोचला. लस टोचण्याची आटोमन साम्राज्यातील पद्धत व भारतातील पद्धत एकसारखीच होती. यावरून त्याचे मूळ एकच असावे असे वाटते.

१७९६ साली पाश्चिमात्य जगात लसीचा शोध लागला. परंतु त्याच्याही आधी काही शतके भारतीयांना लस टोचणे माहीत होते ही महत्वपूर्ण माहिती आपल्याला या पुस्तकातून समजते.

… १८०३ मधे मात्र एडवर्ड जेन्नर या शास्त्रज्ञाने देवीच्या लसीचा प्रसार जगभर केला. त्यांनी सर्व आयुष्य त्यासाठीच वेचले…… गायीच्या आंचळावरील पू- मिश्रित फोडांमधील द्राव काढून त्यांनी त्याची लस बनवली.

… लुई पाश्चर यांनी रेबीज ची लस शोधली.

… डॉ. वाल्दोमर हाफकिन यांनी जिवाणूजन्य आजाराला प्रतिबंध करणारी पहिली लस निर्माण केली.

काॅलरा, प्लेग यासारख्या आजारांवरती लसी शोधल्या.

… अशा अनेक शोधकथांचा रंजक इतिहास या पुस्तकात आहे.

कोविड १९ ची साथ आली आणि सर्व जगात लस संशोधनाला वेग आला.

‘विषाणूचे उत्परिवर्तन म्हणजे त्याचे रुप बदलत जाणे ‘ हे लस संशोधन व निर्मितीतले मोठे आव्हान आहे.

उदा. सार्स कोविड २ या विषाणुचे अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा, ओमिक्राॅन असे बदल झाले. लस निर्मितीसाठी संगणक शास्त्र व रोगप्रतिकारक शास्त्र याचा संयुक्त उपयोग करावा लागतो.

तसेच bio informatics म्हणजे जैवतंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञानआणि कृत्रिम बुद्धिमत्ता याचा कसा उपयोग होतो हे या पुस्तकात सोप्या पद्धतीने सांगितले आहे. मशीन लर्निंग हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे तंत्रज्ञान विषाणुंची रचना समजून घेण्यासाठी, तसेच विषाणूच्या उत्क्रांतीचा अभ्यास करण्यासाठी होतो. प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी प्रतिसाद देणारे घटक ओळखण्यासाठी होतो….. हा महत्वाचा तपशील या पुस्तकात नेमकेपणाने वाचायला मिळतो.

लसनिर्मिती नेहमी अशा देशात होते की ज्यांच्याकडे आर्थिक व तांत्रिक बाजू सांभाळण्याचे कसब आहे.

परंतु भारतासारख्या विकसनशील देशाने कोविड-१९ चे आव्हान पेलले. नरेंद्र मोदींनी लस विकासाला पाठिंबा दिला. ’ वसुधैव कुटुम्बकम ‘ ही भावना मनात बाळगणारा भारत देश, कोविड १९ या लसीची जगाची मागणी पूर्ण करण्यासाठी सक्रीय झाला. लस मैत्रीमुळे भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिमा दणकट झाली. इतर देशांत जवळीक साधली. नवीन बाजारपेठेत भारताला प्रवेश मिळाला.

अदर पूनावाला म्हणतात, २०३० साली लस उत्पादनात नवनवे शोध लावण्यात भारत जगात अग्रेसर असेल.

कारण भारतात कुशल माणसे आहेत, कठोर परिश्रम ही भारताची संस्कृती आहे. नाविन्याचा ध्यास असलेले उद्योजक आहेत. मदतीसाठी तयार असणारे आश्वासक सरकार आहे. भारतीय लस उद्योगाला भविष्यात प्रचंड वाव आहे.

 हे पुस्तक जरूर सर्वांनी वाचावे. कारण या पुस्तकात नुसता लस संशोधनाचा इतिहास नाही तर त्यातील सामाजिक, राजकीय, आर्थिक आव्हाने, लस घेण्यासाठी होणारा काही समाज घटकांचा विरोध, धार्मिक गैरसमजुती, इत्यादी सर्व गोष्टींचे विचार परखडपणे मांडले आहेत.

हे पुस्तक महत्वपूर्ण अशी माहिती देणारे आहेच, यातून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. आणि तरीही ते रंजक आहे. मूळ इंग्रजी पुस्तक आपण कदाचित वाचणार नाही, कारण ते क्लिष्ट वाटेल. परंतु इतके माहितीपूर्ण वाचनीय पुस्तक मराठी वाचकांसमोर आलेच पाहिजे या हेतुने मंजुषा मुळे यांनी त्याचा सुंदर मराठी अनुवाद केला आहे. तंत्रज्ञानातील मूळ इंग्रजी शब्दांना त्यांनी चपखल मराठी शब्द वापरले आहेत. त्यांची अनुवाद करण्याची स्वतःची एक विशिष्ट शैली आहे. त्यामुळे मूळच्या इंग्रजी लेखनाच्या गाभ्याला जराही धक्का न लागता ओघवत्या दर्जेदार मराठी भाषेतले हे पुस्तक वाचताना खूप मजा येते.

प्रत्येक मराठी माणसाच्या संग्रही हे पुस्तक जरुर असावे असे मला वाटते.

परिचय : सौ. अंजोर चाफेकर, मुंबई.

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “आवडलं ते निवडलं” – (काव्य-संग्रह) – कवी : श्री. अभिजीत पाटील ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

?पुस्तकावर बोलू काही?

☆ “आवडलं ते निवडलं” – (काव्य-संग्रह) – कवी : श्री. अभिजीत पाटील ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

पुस्तक : आवडलं ते निवडलं 

लेखक :श्री. अभिजीत पाटील, 9970188661

मूल्य : रु. १२०/-

प्रकाशक : शब्द शिवार प्रकाशन, 9423060112

आवडलं ते निवडलं…. चोखंदळ निवडीचा प्रत्यय !

कोरोनाचा काळ हा सर्वांसाठीच भयाण काळ होता. संपूर्ण जगच जणू नजरकैदेत होतं. ‘सातच्या आत घरात ‘ नव्हे तर दिवसभर घरात अशी अवस्था झाली होती. पण या बंदीवासाचाही अनेकांनी उपयोग करुन घेतला. आपल्या सुप्त गुणांना वाव देऊन किंवा बरेच दिवस मनात असलेली योजना पूर्ण करुन मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करणारे जे होते त्यापैकी एक म्हणजे श्री. अभिजीत पाटील. चिंतेऐवजी चिंतनाला आपलेसे करुन त्यांनी या काळात एक कलाकृती निर्माण केली.

श्री. अभिजीत पाटील हे स्वतः एक कवी असल्याने त्यांना कवितेविषयी प्रेम, आकर्षण असणे स्वाभाविक आहे. कविता-रती या काव्याला वाहिलेल्या नियतकालिकाचे संपादक डाॅ. आशुतोष पाटील यांनी काही वर्षांपूर्वी ‘ काव्यमुद्रा ‘ हे पुस्तक संपादित केले. हे पुस्तक म्हणजे कविता-रती या त्यांच्या नियतकालिकातील निवडक कवितांचा संग्रह आहे. या ‘काव्यमुद्रा ‘ मधील विशेष आवडलेल्या कवितांचा संग्रह म्हणजे श्री. अभिजीत पाटील यांचे ‘ आवडल ते निवडलं ‘ हे कोरोना काळानंतर प्रकाशित झालेले पुस्तक.

प्रथम ‘कविता-रती’, नंतर ‘काव्यमुद्रा’ अशा दोन वेळेला निवडलेल्या कवितांतून श्री. अभिजीत पाटील यांनी पुन्हा आपल्या आवडीनुसार निवड केली आहे. त्यामुळे साहजिकच या संग्रहात दर्जेदार, निवडक कविता वाचायला मिळतात. पण केवळ कविता न निवडता त्यांनी प्रत्येक कवितेवर भाष्यही केले आहे. त्यामुळे प्रत्येक कवितेचा त्यांना अभिप्रेत असलेला अर्थ, त्यातील सौंदर्य त्यांनी उलगडून दाखवले आहे. त्यामुळे कविता समजून घेणे, त्या कवितेबद्दल त्यांचे मत काय आहे ते जाणून घेणे शक्य होते.

या संग्रहासाठी त्यांनी चाळीस कविता निवडल्या आहेत. यामध्ये वा. रा. कान्त, शंकर रामाणी, शंकर वैद्य, कुसुमाग्रज, शांता शेळके यांसारख्या मागील पिढीतील कविंच्या कविता निवडल्या आहेत. त्याबरोबरच कल्पना दुधाळ, नागराज मंजुळे, प्रशांत असनारे, केशव सखाराम देशमुख, दासू वैद्य, महेश केळुसकर अशा आजच्या पिढीतील नामवंत कवी कवयित्रींच्या कविताही निवडल्या आहेत. त्यामुळे विचारांची आणि विषयांची विविधता अनुभवायला मिळते.

कविता, हायकू, रुबाया, गझल अशा विविध प्रकारातील कविता आपण यात वाचू शकतो. त्यावरील श्री. अभिजीत यांनी केलेले भाष्य वाचताना त्यांचे कविता या साहित्य प्रकाराविषयी काय चिंतन झाले आहे व ते कवितेविषयी किती गंभीरपणे विचार करत आहेत याची कल्पना येते. ‘ कवितेकडे आपल्याला डोळसपणे बघायला हवे. एखादी कविता जीवनाकडे वेगळ्या नजरेतून बघायला शिकवते ‘ असे त्यांचे मत आहे. दुस-या एका ठिकाणी ते म्हणतात ‘ काव्य निर्मिती वेदनेची बाजू मांडणारी असू शकते किंवा कवितेच्या निर्मितीमागे जळजळणारी वेदना हे कारण असू शकते. ‘ अशा पद्धतीने प्रत्येक कवितेचा विषय आणि आशय लक्षात घेऊन त्यांनी त्या कवितेविषयीचे स्वतःचे मत व्यक्त केले आहे. हे करत असताना नकळतपणे कविता या साहित्य प्रकाराविषयीच प्रकट चिंतन झाले आहे. त्यांनी म्हटले आहे, ‘ कविता या विषयावर अनेक कविता, कवितेच्या व्याख्या व व्याख्याने आपण ऐकतो, त्या संबंधातील लेखन वाचतो, कविता म्हणजे नेमकी काय याचा शोध घ्यावाच वाटतो. ‘ हे पुस्तक म्हणजे हा शोध घेण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे.

अन्य कविंच्या कविता वाचून त्या लोकांसमोर ठेवणे, त्यावर आपण भाष्य करणे हा वेगळा प्रयोग या पुस्तकाद्वारे श्री. पाटील यांनी केला आहे. त्यांनी हाती घेतलेल्या साहित्य चळवळीतील तो एक महत्वाचा टप्पा ठरेल. अन्य कविंच्या कविता वाचून त्यावर चिंतन करावे अशी प्रेरणा सर्वांना या पुस्तकामुळे मिळेल अशी आशा आहे…. त्यातच या पुस्तकाचे यश सामावले आहे.

पुस्तक परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “अडीच अक्षरांची गोष्ट’  – श्री प्रदीप आवटे ☆ परिचय – डाॅ. सोनिया कस्तुरे ☆

डॉ.सोनिया कस्तुरे

? पुस्तकावर बोलू काही ?

 ☆ “अडीच अक्षरांची गोष्ट’  – श्री प्रदीप आवटे ☆ परिचय – डाॅ. सोनिया कस्तुरे ☆ 

पुस्तक : अडीच अक्षरांची गोष्ट  

लेखक : प्रदीप आवटे.

प्रकाशक : वॉटरमार्क पब्लिकेशन्स 

परिचय : डॉ. सोनिया कस्तुरे 

प्रेमाला जातधर्माची लेबलं नसावीत. निळ्याशार आभाळात शांती, प्रेम, आणि करुणा याची कबुतरे विहरत रहावीत. आपल्या सर्वांच्या अंगणात प्रेमाचे इंद्रधनु फुलावे. या सार्थ मानवतेच्या हेतूने मा. डाॅ. प्रदीप आवटे सरांचे अडीच अक्षरांची गोष्ट हे पुस्तक लाखमोलाचे ठरते.

आपण अफाट माहिती, ज्ञान मिळवले पण अडीच अक्षरं समजून घेवून जोपासता आली नाहीत तर काहीच उपयोग नाही हे बाकी खरं आहे.

प्रेम भावना व्यक्त करायला आपल्याकडे खूप अडचणी आहेत. आपण खूप कडकडून भांडतो, द्वेष, तिरस्कार, राग सहज व्यक्त करतो. पण मनातला स्नेहभाव, प्रेमभाव सहज व्यक्त करणं आपल्याला जमत नाही हे मान्य केलं तरच आपल्या मनात अलौकिक प्रेमभावाची फुलझाडांना खतपाणी घालतात येईल.

‘मुळांचा पासवर्ड सांगणारा दिवस’ या लेखात लेखक लिहितात प्रेम हा अडीच अक्षरी मंत्रच मानवी जगण्याचे सोने करणारा जादूई मंत्र आहे.

पुस्तकं कोणती वाचावीत हा ज्याचा त्याचा विषय, पण डॉ. प्रदिप आवटे सरांचे ‘अडीच अक्षरांची गोष्ट हे पुस्तक सर्वांनीच वाचावे पण तरुणांनी जरुर वाचावे. वाचनाची आवड असो नसो, वाचायला वेळ मिळत असेल नसेल तरीही हे पुस्तक तुमच्या घरी, कामाच्या ठिकाणी आपली नजर सारखी जाते जिथे असावे. म्हणजे आपल्यातील राग, द्वेष, लोभ कमी होईल. प्रेम ही भावना मानवी मनाचा, जगण्याचा गाभा आहे. त्याकडे आपण खूप दुर्लक्ष करतो. जगणं सुंदर करणारी, जगण्याला दिशा देणारी, भांडणतंटे, राग, द्वेष, तिरस्कार, अन्याय, अत्याचार करणारी प्रवृत्ती, बदला घेण्याची, खुनशी वृत्ती यांना समूळ नष्ट करणारी भावना म्हणजे खरी प्रेम भावना. ही भावना जोपासली गेली तरच त्याग, समर्पण कृतज्ञता, निखळता, निर्मळता. निस्पृहता, सहिष्णुता सहानुभूती तडजोड या सारख्या हिताच्या भावना रुजतील. मग मानवी नातेसंबंधातील प्रेम असो, निसर्गप्रेम असो, भूतदया असो वा राष्ट्रप्रेम असो.

कबीराला हवीहवीशी वाटणारी अडीच अक्षर उमजलेली अनेक माणसं डॉक्टर प्रदीप आवटे सरांनी शोधून काढलेली आहेत. या पुस्तकातील अलौकिक प्रेमबहराने आपण वेगळ्याच विश्वात जातो. काहीवेळा प्रेमभाव समजून घेण्यासाठी अजून किती वाट चालावी लागणार आहे याची जाणिव होते.

मोईद्दीनची गोष्ट असो. सौंदर्यांच्या तकलादू, व्यवहारी, बाजारु कल्पनांना छेद देऊन लक्ष्मीवर प्रेम करणारा आलोक असो. समीना प्रशांतची गोष्ट असो, राणी मारियाचा खून केलेल्या समंदरसिंगला आप्त सगळे सोडून जातात पण त्याला माफ करुन, आसरा देऊन मदत करणारे राणीची बहिण आणि आई ही अफलातून माणसं असो.. काळीज हेलावून टाकतात.

आजच्या घडीला अजिबात न पटणारे.. धर्मांध झालेल्या अतिरेकी बापाचा मुलगा, वीस वर्ष वेगवेगळी ठिकाण बदलत फिरणारा झाक इब्राहिम बापाची वाट सोडून मानवतेकडे कसा वळतो याची सुंदर कहाणी अंगावर शहारे आणते.

अरब पॅलेस्टीनी आणि इस्त्राइल यांच्यामधील संघर्षाची भूमी गाजापट्टी. येथील नरसंहार थांबविण्यासाठी गेलेली, मानवी प्रेमाचे, अहिंसात्मक सहजीवनाचे स्वप्न पाहणारी, तेवीस वर्षाची रेचल, गाजापट्टीतील द्वेष आणि हिंसेच्या बुलडोझरने चिरडली जाते हे वाचताना तेवीस वर्षाच्या त्या पोरीचे मानवतेवरील प्रेम आणि बंधूभाव, भगिनीभावाची तिला या वयात असलेली समाज वाचून आपण धन्य होतो. सद्गदित होतो..

माणसांनी प्रेमाला जातीधर्मांच्या क्रुर हिंसक साखळी ने बांधून ठेवलंया. अजूनही ॲॉनरकिलींगच्या घटना संपत नाहीत. ‘एका प्रश्नाचे उत्तर दे’ हे बहिणीने भावाला लिहिलेले पत्र, मुलीला दुय्यम समजणाऱ्या, जातीत अडकून अंधत्व आलेल्या मेंदूला शहाणं करणारा लेख आहे. पण ही कळणाऱ्यांची गोष्ट आहे.

निळ्या आभाळातलं असीम इंद्रधनुष्य आपल्याला या पुस्तकात अनुभवता येईल.. अशी अनेक प्रेमवेडी माणसं या पुस्तकात आपल्याला खऱ्या जगण्याचा अर्थ सांगत आहेत. आवर्जून वाचावे असे हे पुस्तक आहे.

या पुस्तकाला अरविंद जगताप यांची ‘प्रेम_म्हणजे’ या शीर्षकाखाली अतिशय भारी, समर्पक आणि जबरदस्त प्रस्तावना आहे. प्रस्तावना वाचताना काहीवेळा मला खूप हसू आले. काही संदर्भ लिहिल्या वाचून राहवत नाही.

नवरा गाडीवर बायकोच्या मागे बसला तर गाढवावर बसला आहे आणि मिरवणूक काढली आहे असा त्याचा चेहरा असतो आणि बघणारे ही असंच बघतात आज ही बायकोने पर्स काही क्षणभर हातात दिल्यावर नवऱ्याचा चेहरा कसा होतो बघा डॉक्टरने मुतखडा हातात दिल्यासारखे बघतात लोक बायकोच्या पर्स कडे.

धक्कादायक वाटेल पण खूप बायका नवरा वारल्यावर जे त्याच्या छातीवर डोकं आपटून रडतात तोच त्यांचा नवऱ्याला केलेला एकमेव सार्वजनिक स्पर्श असतो.

लोकांना विचारलं बायकोची सगळ्यात आवडणारी गोष्ट कोणती तर खूप लोकांचं उत्तर येईल बायकोच्या हातचा स्वयंपाक. आपल्याकडे हृदयाचा रस्ता पोटातून जातो असं म्हणतात म्हणजे चांगला स्वयंपाक करणारी बायको पाहिजे पण पोट भरल्यावर येणारी सुस्ती त्या प्रेमात आधीच असते त्यामुळे खूपदा आपल्याला प्रेमात आवेश दिसत नाही.

प्रेम खूप वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त करता येतं सगळ्यांनीच बायकांचा हात धरून चालायचं ठरवलं तर प्रभात फेरीसारखं होईल. हे वाचल्यावर हसू फुटल्या शिवाय राहत नाही. गांभीर्यानेच पण थोडा विनोदी अंगाने प्रेमाचा लेखा-जोखा मांडलाय… 

अडीच अक्षरांची गोष्ट ही अनवट वाटेवरची अलौकिक प्रेम कथांचा खऱ्याखुऱ्या माणसांवर आधारित लेख आहेत जरूर वाचा.

(ता. क. माधुरी मॅडम आणि डॉ. प्रदीप आवटे सरांची गोष्टही अशीच आपलातून आहे. कधीतरी ती आम्हाला पुस्तक रुपाने वाचायला मिळाली ही अपेक्षा.)

परिचय : डॉ. सोनिया कस्तुरे

विश्रामबाग, जि. सांगली

भ्रमणध्वनी:- 9326818354

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ “एक असामान्य प्रेमकथा” – लेखिका : सुश्री चित्रा बॅनर्जी दिवाकरूणी – अनुवाद – श्री अनुवाद: सुदर्शन आठवले ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “एक असामान्य प्रेमकथा” – लेखिका : सुश्री चित्रा बॅनर्जी दिवाकरूणी – अनुवाद – श्री अनुवाद: सुदर्शन आठवले ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : “ एक असामान्य प्रेमकथा “.

(सुधा मूर्ती आणि नारायण मूर्ती यांचे पूर्वायुष्य) 

लेखिका : सुश्री चित्रा बॅनर्जी दिवाकरूणी 

अनुवाद: श्री सुदर्शन आठवले

परिचय : श्री हर्षल भानुशाली

पृष्ठे : ३६४

मूल्य : ३५०₹ 

सुधा कुलकर्णी या अत्यंत उत्साही तरुणीने टेल्को या कंपनीत पहिली स्त्री इंजिनियर म्हणून नोकरी पत्करून क्रांती घडवली होती. अतिशय बुद्धिमान; पण गंभीर प्रवृत्तीच्या आणि तत्त्वनिष्ठ अशा नारायण मूर्ती या तरुणाशी सुधा कुलकर्णी यांची भेट झाली. ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. तेथपासून त्यांचा विवाह, दोन मुलांचे पालकत्व ही त्या दोघांच्या कथेची कौटुंबिक बाजू आणि ‘इन्फोसिस’ या कंपनीची स्थापना आणि तिची सुरुवातीची संघर्षमय प्रगती ही व्यावसायिक बाजू अशा दोन्ही बाजूंची अतिशय लक्षवेधक कथा प्रथमच पुस्तकरूपात वाचकांसमोर येते आहे आणि तीही कथाकथनात निपुण अशा चित्रा बॅनर्जी दिवाकरुणी यांनी सांगितलेली !

ही तशी विजोड जोडी एकत्र आली कशी? एकत्रित आयुष्यातील एकटेपणा, अवघड आव्हाने यांना ती दोघे सामोरी गेली कशी ? देशात ‘लायसन्सराज’ सुरू असताना, उद्योगात पडणे हा ‘नसता उद्योग’ मानला जात असताना, नव्या उद्योगांना भांडवल पुरवण्याचा धोका पत्करणाऱ्या कंपन्या अस्तित्वात नसताना त्यांनी नव्या क्षेत्रात नवी कंपनी सुरू केली कशी? एका बाजूला नोकरी, काम, एका बाजूला संसार, मातृत्व आणि एका बाजूला धाडसी उद्योजकाची पत्नी या बहुपेडी भूमिका सुधा मूर्ती यांनी सांभाळल्या कशा? नारायण मूर्ती यांच्या स्वप्नपूर्तीच्या वेडाचे बरे-वाईट परिणाम त्यांनी स्वतः सुधा मूर्ती यांनी आणि त्यांच्या कुटुंबाने सोसले कसे ?

या सर्व प्रश्नांची उत्तरे मूर्ती पती-पत्नी, त्यांचे कुटुंबीय यांच्या मनात शिरून, त्यांच्या हृदयांचा ठाव घेऊन, त्यांच्या भावपूर्ण तसेच तत्त्वनिष्ठ विचारांचा धांडोळा घेऊन चित्रा बॅनर्जी दिवाकरुणी त्यांचे १९७०-८० या काळातील भारतातील कर्नाटक राज्यातील शहरे आणि गावे येथील वास्तव्य हे एक विश्व, त्यांच्या असाधारण कार्याचे एक विश्व आणि त्यांचे प्रत्येकाचे एकेक आणि पतिपत्नींचे एक भावविश्व जिवंत करून आपल्यासमोर ठेवतात.

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ “नंदादीपातील ज्योती” –  लेखिका : वसुधा परांजपे ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “नंदादीपातील ज्योती” –  लेखिका : वसुधा परांजपे ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆ 

पुस्तक : “ नंदादीपातील ज्योती “ 

लेखिका : वसुधा परांजपे 

पृष्ठे :२६०

मूल्य: ४००₹ 

परिचय : हर्षल भानुशाली 

‘नंदादीपातील ज्योती’ या पुस्तकात एकूण १९ संतांचा परिचय करून देण्यात आला आहे. त्यापैकी १६ संत महाराष्ट्रातील आहेत. हे सर्व संत परिचित आहेत. पण यांच्या अर्धांगिनींबाबत फारच कमी माहिती मिळते. या पुस्तकात ती माहिती थोडीफार का होईना, वाचायला मिळते, हेच या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. लेखिका वसुधाताई या सध्या ८८ वर्षांच्या आहेत. हे पुस्तक लिहून त्यांनी फार मोलाची माहिती वाचकांना करून दिली आहे.

त्यांनी ‘अलौकिक विभूती व त्यांच्या अर्धांगिनी’ हे ‘मनोगत’ लिहिताना म्हटलं आहे- सर्वसामान्यांच्या घरातून देशसेवा, राष्ट्रोन्नती यासाठी झटणाऱ्या देशभक्तांच्या धर्मपत्नींचा जीवनसंघर्ष आपण वाचला असेल. याच सामान्य, पण सात्त्विक, भक्तिमार्गी मायबापांच्या पोटी जन्मलेला वंशाचा दिवाच पुढे घराला मंदिराचं रूप देतो; स्वतः नंदादीप होतो. अशा नंदादीपातील भक्तिस्नेहात भिजून चिंब झाल्यानंतर नंदादीपातील ज्योत प्रकाशित होते. नंदादीप म्हटलं की, आठवते मंदिर, त्यातील गाभारा, परमेश्वराची मूर्ती, गंधफुले वाहून त्याची श्रद्धाभावनेने केलेली आकर्षक पूजा. भक्तिभावानं फिरवलेली उदबत्ती, तिच्या सुगंधाने सुप्रसन्न झालेले मन ! अन् स्वास्थ्य टिकावं

नैसर्गिक शक्तीनं अनेक जीव जन्माला येतात, पण वर शब्दांकित केलेलं वर्णन फक्त भाग्यवान माणसालाच अनुभवायला मिळतं. म्हणूनच की काय, श्री. शंकराचार्य म्हणतात,

‘दुर्लभं त्रयमेवैतत देवानुग्रह हेतुकम्।

मनुष्यत्वं, मुमुक्षुत्वं महापुरुष संश्रयः।।’

या विश्वात तीन गोष्टी दुर्मीळ आहेत. एक म्हणजे मनुष्यत्व, मानवता; दुसरी मुमुक्षत्व म्हणजे मुक्ततेची ओढ; अन् तिसरी महापुरुष संश्रयः म्हणजे सत्संग, संतसहवास ! तुम्ही म्हणाल, माणसांना काय तोटा आहे ? लोकसंख्या तर वाढतीय ! शब्द लक्षात घ्या, मनुष्यजन्म दुर्मीळ नाही. मनुष्यत्व दुर्मीळ आहे! म्हणजे आकार, देह, माणसांचे पुष्कळ आहेत हो; पण त्यातलं मन राक्षसाचं, दहशतवाद्याचं, नक्षलवाद्याच किंवा दुसऱ्याचं चांगलं न पाहून त्याला खड्यात घालण्याची खटपट करणाऱ्या दुष्टाचं असतं. असं नकोय ! माणसाच्या मनात, आचार-विचारात दया, दान, प्रेम, जिव्हाळा, कृतज्ञता, परोपकाराची वृत्ती असेल तर, त्यात मनुष्यत्व असतं. असं मनुष्यत्व आजकाल दुर्मीळ झालेलं आहे. दुसरे म्हणजे मुक्ततेची ओढ माणसाला नाही. कारण आपण बांधलो आहोत, जखडले गेलो आहोत हेच त्याला कळत नाही. त्याचा ‘मी’पणा, सगळं मलाच हवं, नाही मिळालं तर मी ओरबाडून घेईन हा हावरेपणा व तो पुरवण्याकरता दुष्टपणा जे हवंय ते कष्ट करून न्याय्य मार्गाने मिळवावं. या कष्टार्जितातलंही थोडंसं दुसऱ्याला आपणहून द्यावं, ही सात्त्विक वृत्तीची माणसं आज दुर्मीळ आहेत.

एकनाथ म्हणतात,

‘धर्माची वाट मोडे। अधर्माची शीग चढे ।

ते आम्हा येणे घडे। संसार स्थिती ।।’

माणसाला स्वार्थीपणातून, अहंकारातून सोडवण्यासाठी, मार्गदर्शनासाठी संताचा सहवास हवा असतो. तो आज दुर्मीळ झालाय. कारण ज्याला त्याला ओढ आहे ती नट-नट्यांच्या, स्वार्थी राजकारण्यांच्या सहवासाची! कारण तिथे स्वार्थ पोसला जातो, लोकेषणा प्राप्त होते! खरं संतत्व प्राप्त होणं हीसुद्धा सोपी गोष्ट नाही. ज्ञानेश्वरादी भावंडांचा धर्ममार्तंडांनी केलेला छळ तुम्हाला माहितीये, एकनाथांची जनार्दनपंतांनी घेतलेली वेगवेगळी परीक्षा आपल्याला आठवत असेल. तुकाराम महाराजांवर निसर्गानं किती आपत्ती कोसळवल्या हेही विदीत असेलच !

अर्वाचीन काळातही जे संत होऊन गेले त्यांच्या जीवनात आपण डोकावणार आहोत. संतांचे जीवन कर्तव्यनिष्ठा, सर्वांविषयी आत्मीयता, धर्मनीतीच्या मयदितील जीवन, मोठ्या आपत्तीतही मनाची शांतता, प्रसन्नता राखणं असं असतं ‘ठेविले अनंते तैसेचि रहावे, चित्ती असो द्यावे समाधान !’ हेच त्यांचे ब्रीद ! हे सद्‌गुण आपल्यातही अंशाने का होईना प्रतिबिंबित व्हावेत, याच हेतूने आपण या नंदादीपांच्या ज्योतीप्रकाशात काही काळ घालवू, यात आपणास चिंचवडच्या मोरया गोसावींची प्रारब्धावर मात करण्याची जिद्द, शुकानंद संस्थानच्या उमाबाईंची भगवंतावरील निष्ठा, गाडगेमहाराजांच्या पत्नीची पतिनिष्ठा, संत तुलसीदासांना सहज प्रासंगिक छोटा दोहा म्हणून उपदेश करणारी त्यांची पत्नी, हरे कृष्ण, हरे कृष्ण जप करणाऱ्या गौरांग प्रभूची विष्णुप्रिया इत्यादींचा परिचय होईल. परिणामी आध्यात्मिक सामर्थ्याचे महत्त्व आपल्या ध्यानी येईल व आपणही थोडा वेळ एकांतात आत्मशोध घेण्याचा विचार व कृती करून प्रसन्नता प्राप्त कराल ! 

जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती उपकारे।

भूतांची दया हे भांडवल संता। आपुली ममता नाही देही। 

तुका म्हणे मुखे पराविया सुखे। अमृत हे मुखे स्तावन मे ।।

गुरुबोधाने ज्यांचे अंतःकरण उजळलेले राहून ज्यांनी त्या ज्ञानाचा चित्प्रकाश जगाला देण्याचे कार्य केले, अशा महान विभूतींची चरित्रे, परकीय विषयविलासी संस्कृतीच्या आक्रमणप्रसंगी महत्त्वाची ठरतात. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारी! कारण त्यांनी सत्तत्त्वाची अनुभूती व्यक्तिगत न ठेवता लोकोद्धारासाठी वापरली. देशाच्या या आध्यात्मिक वैभवाचा पाया वसुधैव कुटुम्बकम् अर्थात आत्मने मोक्षार्थं जगत् हितायच, हा आहे! 

संत मांदियाळी

१) पू. वामनभट शाळीग्राम व सौ. पार्वतीबाई (मोरया गोसावी वंश)

२) पू. कालदीक्षित व सौ. उमादेवी (शुकानंद संस्थान)

३) पू. चैतन्य प्रभु गौरांग व सौ. विष्णुप्रिया

४) पू. गोस्वामी तुलसीदास व सौ. रत्नावली (रामचरितमानसकर्ते)

५) पू. यशवंत देव मामलेदार व सौ. रुक्मिणीबाई

६) श्री. गुंडाजीबुवा देगलूरकर व सौ. राजाई

७) पू. रामकृष्ण परमहंस व सौ. शारदादेवी

८) पू. रामानंद बीडकर महाराज व सौ. जानकीबाई

९) पू. गोंदवलेकर महाराज व सौ. सरस्वती

१०) पू. टेंबे स्वामी (वासुदेवानंदव सरस्वती) व सौ. अन्नपूर्णाबाई

११) पू. गाडगे महाराज व सौ. कुंताबाई

१२) संतकवी पू. दासगणू महाराज व सौ. सरस्वतीबाई

१३) गोजीवन पू. चौंडे महाराज व सौ. लक्ष्मीबाई

१४) प्रज्ञाचक्षू पू. गुलाबराव महाराज व सौ. मनकर्णिकाबाई

१५) पू. बाबामहाराज सहस्रबुद्धे व सौ. दुर्गाबाई (स्वरूपसंप्रदाय)

१६) पू. दादा धर्माधिकारी व सौ. दमयन्तीबाई

१७) पू. अनंतराव आठवले व सौ. इंदिराबाई (वरदानंद भारती)

१८) पू. पांडुरंगशास्त्री आठवले व सौ. निर्मलाताई (स्वाध्याय)

१९) पू. चिंतामणी सिद्धमहाराज व सौ. पद्मावतीबाई (मायबाई)

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकावर बोलू काही ☆ ‘‘अजूनही चांदरात आहे –’ – लेखक : श्री विश्वास देशपांडे ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? पुस्तकांवर बोलू काही ?

☆ ‘अजूनही चांदरात आहे – लेखक : श्री विश्वास देशपांडे ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

 अभिनंदन ! अभिनंदन !! 

‘पुणे मराठी ग्रंथालय ‘ या ११३ वर्षे जुन्या शासनमान्य ‘अ ‘ वर्ग ग्रंथालयाने जुलै २०२४ मध्ये पुस्तक परीक्षण स्पर्धा’ आयोजित केली होती. त्या स्पर्धेत आपल्या समूहातील ज्येष्ठ लेखिका डॉ. मीना श्रीवास्तव यांच्या पुस्तक परीक्षणाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक नुकतेच प्रदान करण्यात आले. प्रसिद्ध साहित्यिक श्री. विश्वास देशपांडे यांनी लिहिलेल्या ‘अजून चांदरात आहे’ या ललित लेखांचा अंतर्भाव असलेल्या सुंदर वाचनीय पुस्तकाचे परीक्षण डॉ. मीना श्रीवास्तव यांनी लिहिले होते. या ग्रंथालयाच्या ११३ व्या वर्धापनदिनाच्या सोहळ्यात त्यांचा गौरवपत्र आणि रोख पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला.

या पुरस्काराबद्दल डॉ. मीनाताईंचे आपल्या सर्वांतर्फे मनःपूर्वक अभिनंदन, आणि पुढील अशाच यशस्वी साहित्यिक वाटचालीसाठी असंख्य हार्दिक शुभेच्छा.

आजच्या अंकात वाचू या हे पुरस्कारप्राप्त पुस्तक परीक्षण……..

संपादक मंडळ,

ई – अभिव्यक्ती (मराठी विभाग)

पुस्तक- अजूनही चांदरात आहे

लेखक- श्री विश्वास देशपांडे

प्रकाशक- सोहम क्रिएशन अँड पब्लिकेशन, पुणे 

पृष्ठसंख्या- १६८ पाने

पुस्तकाचे मूल्य- २०० रुपये 

(पुस्तक खरेदीसाठी लेखक श्री विश्वास देशपांडे यांच्याशी ९४०३७४९९३२ या मोबाईल क्रमांकावर थेट संपर्क साधावा.)

श्री विश्वास देशपांडे

 अजूनही चांदरात आहे’ या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे आकर्षक लक्षवेधी रूप प्रथम पाहताक्षणी नजरेत भरते. चवथीचा चंद्र, गर्द निळेभोर अस्मान, चांदण्यात न्हायलेल्या जलाशयाची शांत निळाई, काळोखात विसावलेली पर्वतराजी अन तेजस्वी धवल रंगांनी कोरलेले शब्द! पुस्तकात ३२ ललित लेख आहेत. त्यासोबतच ८ काव्यसुमने देखील जोडलेली आहेत. विविधरंगी अन विविधगंधी विषयांच्या आडव्या उभ्या धाग्यांनी विणलेले असे हे कोलाज आकर्षक वाटते. एक १४ पानी लेख वगळता (एक लढा असाही), इतर सर्व लेख ३-४ पानी आहेत. मैफिलीत जसे प्रत्येक गायक एक स्वतंत्र गाणे म्हणतो आणि आपण ते गाणे संपल्यावर नवीन गायकाची वाट बघत नव्या कोऱ्या गाण्याची प्रतीक्षा करतो तसेच हे लेख स्वतंत्र, स्वयंसिद्ध आणि स्वयंपूर्ण आहेत. म्हटले तर पुस्तक एका बैठकीत वाचून संपवा, किंवा चवी-चवीने एक-एक लेख निवांतपणे वाचा. दोहोत तितकाच आनंद अनुभवास येतो. लेख प्रमाणबद्ध शरीर सौष्ठव लाभलेल्या सौंदर्यवती नवयौवनेसारखेच आहेत. कुठेही फाफटपसारा नाही, मात्र त्यांच्या अंतरंगात डोकावून बघावे तर लेख पूर्णत्वास पोहचलेले असतात!

वेगवेगळ्या विषयांतून लेखकाचे गहिरे वाचन, चिंतन, कल्पनाशक्ती, शब्दवैभव अन भावनांचे कल्लोळ यांचा सुरेख मिलाप प्रकर्षाने जाणवतो. पुस्तकातील एका लेखाच्या ‘शब्दमाधुर्य, गीतमाधुर्य, नादमाधुर्य’, या शीर्षकास अनुसरून, लेखकाच्या भाषेत शब्दमाधुर्य आहे, तसेच ती साधी, सोपी आणि सहज आहे. ‘To be simple is the most difficult thing in the world’ हे लक्षात घेतल्यास या सरल आणि तरल भाषेचे सौंदर्य खुलून दिसते. अलंकारांचा अतिरेक नसल्याने भाषा बोजड वाटत नाही. या अर्थवाही भाषेमुळेच प्रत्येक लेख वाचनीय झाला आहे, किंबहुना हाच या पुस्तकाच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे.

सामाजिक समस्यांवरील आणि विषमतेवरील भाष्य करणाऱ्या १० लेखांवरून लेखकाच्या सामाजिक जाणीवा किती प्रखर आणि दूरदर्शी आहेत याचा प्रत्यय येतो. मोजकीच उदाहरणे द्यायची तर ‘अजूनही चांदरात आहे’ मधील आजोबा आणि आधुनिकतेचे वेड असलेला नातू यांच्यातील संवादाचा अभाव, माणसा माणसातील विसंवादाचे वर्णन करणारे ‘अंतर’, गुगल स्पेस आणि डेटामधील जटिल माहितीच्या जंगलात अडकलेल्या माणसाविषयी मांडलेला ‘जो हुकूम मेरे आका’ हा यथार्थवादी लेख, ‘ये दिल मांगे (नो) मोअर’ मधील शीतपेयांचा बाजार आणि जाहिरातींच्या घातक अतिरेकी आक्रमणाबद्दल जनजागृती करणारा लेख ‘जागतो रहो’ हे लेख वाचनीय आहेतच, पण त्याचबरोबर ते वाचकास गहन विचारमंथन करण्यास प्रवृत्त करतात.

वाढत्या प्रदूषणाचे आणि हिरवाईच्या ऱ्हासाचे विदारक परिणाम आज दिसत आहेतच, पण पुढील पिढ्यांपुढे हा प्रश्न अधिकच ज्वलंत होत जाणार आहे. त्याच अनुषंगाने स्वच्छ हरित पर्यावरणाचे महत्व अधोरेखित करणाऱ्या ‘एक लढा असाही’ या लेखात चिपको आंदोलनाचा सविस्तर आढावा घेत हरितक्रांतीविषयी सखोल विवेचन करण्यात आले आहे. ‘चला आपण आधुनिक कोलंबस होऊ या’ हा लेख देखील पर्यावरणाचा आणि वृक्षवल्लींचा झालेला ऱ्हास आणि नद्यांचे दूषित जल या समस्यांवर भाष्य करतो. या लेखातील शालेय शिक्षणात पर्यावरण या विषयाचा अंतर्भाव आणि इतर मौलिक सूचना विचारणीय आहेत.

‘कवितांच्या गावा जावे’ या लेखात लेखकाच्या कल्पनेची उत्तुंग भरारी अनुभवास येते. विंदा, दत्ता हलसगीकर आणि विदर्भातील कवी बोबडे यांच्या कवितांचे काव्यमय रसग्रहण अत्युत्तम झाले आहे. भारताच्या ऐश्वर्यसंपन्न संस्कृतीच्या पाऊलखुणा दर्शवणारे ४ लेख मला जरा जास्तच भावले. ‘मनोरथा चल त्या नगरीला’ या लेखाद्वारे कर्नाटकातील हंपी या पुरातन शहराची सफर अतिशय हृद्य आहे. व्यक्तिचित्रे आणि नातेसंबंधांचे विश्लेषण करणारे ३ लेख वाचनात आले. त्यातील काळजाला भिडणाऱ्या ‘गेले द्यायचे राहून’ या लेखात लेखकाने त्यांच्या अन त्यांच्या वडिलांच्या हृदयस्पर्शी नात्याचे अलवार पदर हळुवारपणे उलगडले आहेत.

‘दिगूची मुशाफिरी’ मधील सध्याच्या राजकीय, सामाजिक अव्यवस्थेचे भीषण वास्तव आणि पत्रकारितेची दांभिकता यावरचे लेखकाचे भाष्य मनावर कठोर आघात करून जाते. पूर्वग्रहदूषित माणसे एखाद्या व्यक्तीविषयी कसा गैरसमज करून घेतात याचे चपखल उदाहरणांसहित केलेले परिणामकारक लेखन ‘लेबल्स’ या लेखात आढळते. मला भावलेल्या दोन लक्षवेधी लेखांचा उल्लेख करते, एक आहे ‘होरेगल्लू’, सुधा मूर्ती यांच्या या लेखातील हे शीर्षक म्हणजे गावातील वडाच्या झाडाखालचा ‘बेंच’, म्हणजेच आपली सुखदुःखे हक्काने शेअर करायची जागा! याच विचाराचा आजच्या संदर्भाला अनुलक्षून केला गेलेला उहापोह अनवट विचार दर्शवतो. दुसरा लेख आहे ‘ब्रायटनची ब्राईट कहाणी’ ज्यात इंग्लंड येथील ब्रायटन या गावाजवळील पहिल्या महायुद्धात शौर्य गाजवणाऱ्या भारतीय सैनिकांच्या स्मृती जागवणाऱ्या स्मारकाची कथा रेखाटलेली आहे.

पुस्तकांतील लेख आणि कवितांचे वाचन केले असता लेखकाचा मूळ पिंड गंभीर आणि वास्तववादी साहित्यिक लेखनाचा आहे असे जाणवते. पण या पुस्तकांतील काही लेख वाचल्यावर त्यांची विनोदबुद्धी देखील तितकीच तल्लख आणि प्रखर आहे असे दिसून येते. नर्म विनोदाची पखरण करीत हास्याचे रंगीबेरंगी कारंजे फुलवण्याचे कसब त्यांच्या मोजक्याच ५ लेखांत दृष्टीस पडते. ‘हम बोलेगा तो’ यात बोलघेवडी माणसे आपल्याला भेटतात, उदाहरण द्यायचे तर वैचारिक दारिद्रय प्रकट करणारे राजनीतीज्ञ! मंचावर प्रवेश करताक्षणी यांनी ध्वनिक्षेपकाचा ताबा घेतला की प्रेक्षकांची किती म्हणून गोची होते ते त्या प्रेक्षकांनाच माहित असते. ‘तेच ते’ या उपरोधिक लेखात सरकारी पातळीवर नित्याची बाब असलेल्या कचेऱ्यांमध्ये मौक्याच्या स्थळी विजेत्याप्रमाणे स्थानापन्न असलेल्या ‘विहित नमुन्यांच्या’ गमती जमती वर्णन करतांनाच त्यांच्यापायी लोकांना होणाऱ्या त्रासाचे कष्टप्रद पण रंजक वर्णन पेरले आहे. त्यातून साधलेला अप्रतिम विनोद कोपरखळ्या मारीत आपल्या चेहेऱ्यावर स्मित आणतो.

मात्र या सर्वांवर मात करणारा मला सर्वाधिक आवडलेला लेख म्हणजे ‘महानायक आजारी पडतो तेव्हां’! हा लेख तर कल्पनेच्या भराऱ्या मारीत प्रासंगिक विनोदाचा जणू धमाल धबधबाच! त्याची पार्श्वभूमी अशी की आपला लाडका महानायक अमिताभ कोरोनाने ग्रस्त झाल्यावर दवाखान्यात भर्ती होतो. हे वृत्त कळताच त्याला भेटायला चित्रनगरीतील त्याचे अनेक सहकलाकार त्याला भेटायला येतात, त्यांचे ठेवणीतले डायलॉग हिंदीतच ठेऊन लेखकाने खूप मजा आणली आहे, शेवटी राज्याचे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान येतात तेव्हांची दवाखान्यात उडालेली धांदल आणि गांभीर्याच्या मास्कखाली दडलेल्या चौफेर विनोदाच्या बहारदार लहरींचा आस्वाद घ्यायचा असेल तर संपूर्ण लेखच प्रत्यक्ष वाचावा!

प्रतिभा आणि प्रतिमेचे वरदान लाभलेले मराठी काव्यजगतातील शीर्ष कविजन जेव्हां एकत्रितपणे ‘नक्षत्रांचे देणे’ प्रदान करतात तेव्हां ‘घेता किती घेशील दो कराने’ अशी लेखकाची अवस्था होते. त्याचा परिपाक म्हणजे ‘कधी कधी मला वाटतं’ ही नितांतसुंदर कविता! कवितेची सुरुवातच विंदा मास्तरांच्या वर्गापासून झालीय! सुरेश भटांच्या काव्यातील काटे खुपू न देता त्यांच्या ओल्या जखमा न्याहाळीत, बालकवींच्या आनंदाला हळुवारपणे स्पर्श करीत आणि शांताबाईंच्या हिरव्या अन बरव्या ऋतुसंहाराचे रंग ओळखत आपण भेटतो ताठ कण्याने जगायला शिकवणाऱ्या अन प्रेमाने पाठीवर हात ठेवीत लढायला सज्ज करणाऱ्या कुसुमाग्रजांना! या कवींच्या सुंदर भावस्पर्शी कवितांच्या रम्य आठवणी लेखकाने जाग्या केल्या आहेत. त्याचप्रमाणे मातृभक्त कोमलहृदयी साने गुरुजी, निसर्गकवी बा. भ. बोरकर, तत्वज्ञानी तांबे आणि रोमँटिक पाडगावकर देखील या कवितेत विराजमान झाले आहेत. सदरहू कवींकडून काय काय घ्यावे अन घेता घेता त्यांचे हातच कसे घेऊन टाकावेत हे या कवितेचे गमक आहे. ही कविता म्हणजे या पुस्तकातील अभिजात आणि अनवट साहित्यनिर्मितीचा सर्वोच्च बिंदू आहे असे मला वाटते.

मला एक अजून भावलेली कविता ‘चष्मा’ वाचतांना स्वतःबद्दल राग, निराशा आणि अगतिकता वाटायला लागते. निरनिराळ्या राजकीय पक्षांचा तथाकथित जाहीरनामा, त्यांचे हिरवे, भगवे अन निळे झेंडे ही प्रतीकचिन्हे अतिशय वास्तववादी आणि प्रभावी वाटतात. स्वतःची राजनैतिक विचारसरणी सामान्य जनतेची देखील कशी आहे, हे ठासून सांगण्यातच या पुढाऱ्यांचा वेळ आणि शक्ती खर्ची पडतात. फिल्टर आणि चष्मा या दोन प्रातिनिधिक शब्दांत कवीने हा राजनैतिक खेळखंडोबा अभिनवरित्या चितारला आहे. बेरोजगारी आणि महागाईसारख्या जनतेला पोळत असलेल्या सध्याच्या गंभीर समस्या जिथल्या तिथेच राहणार हे माहित असल्याने अत्यंत दुय्यम अशा गोष्टींकडे जनतेचे लक्ष वळवणे हे राजकीय नेत्यांचे इप्सित इथे प्रकर्षाने मांडलेले आहे. कवितेच्या शेवटी सर्वधर्म समभावाच्या झेंड्याच्या प्रतिमेचा एल्गार ध्यानी-मनी खोलवर रुजतो. हाच या कवितेचा संदेश असावा अशी माझी धारणा आहे. लेखकाची कल्पनाशक्ती, शब्दवैभव आणि भावनांचे कल्लोळ यांचा सुरेख मिलाप त्यांच्या काव्यलेखनात दृष्टीस पडतो दिसून येतो.

एकंदरीतच ‘अजूनही चांदरात आहे’ या श्री विश्वास देशपांडे लिखित पुस्तकाची गोळाबेरीज करतांना जाणवते की, ललित लेखांचे उच्च साहित्यिक मूल्य असलेले लेख आणि कविता, नवीन विषयांची अनवट माहिती, सामाजिक समस्यांचे सखोल चिंतन, तसेच त्यांच्यावर विचारपूर्वक मांडलेले उपाय, विनोद, परिहास आणि उपरोधिक भाष्य यांनी अलंकृत असे हे पुस्तक आहे. वाचकांना लेखकाच्या या ललित लेखनाच्या लालित्याचा लळा लागेल असे मला खात्रीपूर्वक वाटते. शेवटी एकच सांगावेसे वाटते की वाचकांनी हे वाचनीय पुस्तक तर फिरफिरुनि वाचावेच, पण आपला वाचनसंग्रह समृद्ध करायला ते संग्रही ठेवावे, तसेच वाचनसंस्कृतीचा प्रसार होण्याकरता पुस्तकभेट म्हणून या पुस्तकाची निवड करावी.

परिचय : डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print