काव्य संग्रह – प्रकाश पर्व – कविराज विजय यशवंत सातपुते
कविता ही आभाळाऐवढी विस्तीर्ण असते आणि कवी मोठ्या लकबिने वेदना काळजाशी बाळगत आभाळा एवढ्या कवितेलाच आपल्या सहृदयी कवेत घेतो.
हे कविचं की कवितेचं मोठेपण…हे न उलगडणारं कोडं..!! मात्र तरीही शेवटी या कवितेचा जन्मदाता हा कवीच् असल्याने तो थोरचं..!!
अनेक कवींच्या….नेक कविता बऱ्याच वेळेला सामान्य वाचकांच्या काळजाला हात घालतात..नव्हे नव्हे तर, समाजभान जागवून प्रबोधनाच्या क्रांतीची मशाल पेटवतात.आणि त्यातीलच एका जिंदादिल कवीची ही कविता …!!
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात स्पर्धात्मक आयुष्य जगताना पैसा आणि भौतिक सुख याचेच राज्य वाढत चालले आहे. या उपभोगिकरणाच्या मायाजालात आयुष्याचे सार मोजले जात असताना, कवितेत आपलं सर्वस्व ओतणारा आणि या कवितांनाच्, जीवनाचे सार मानून नव्या उमेदीने विचार भावनेतून विश्वात्मक होणारा एक जिंदादिलं कवी.. की ज्याच्या नावातच विजय आहे. या विजयाच्या हर्षात्मक विचार -स्पर्शाने मराठी साहित्याच्या दशदिशा आसमंत उजळवणारा लेखक..कवी…साहित्यिक,नव्हे..नव्हे तर याच्या पलीकडे जाऊन अनेकांच्या हृदयात..समाजात मानवतेचा दीप प्रकाशमय ठेवणारा खराखुरा प्रबोधनाचा प्रकाश आणि त्या प्रकाशाचं अखंड प्रकाशमय राहणार पर्व म्हणजे प्रकाशपर्व – उर्फ – कविराज विजय यशवंत सातपुते…!!!
प्रकाशपर्व हा विजयजींचा तिसरा काव्य संग्रह होय.अक्षरलेणी हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह.
समीक्षक – श्री विक्रम मालन आप्पासो शिंदे
त्याचा दोन आवृत्ती प्रकाशित झाल्या. अजुन देखील काव्य रसिकांच्या मनावर या दोन्ही आवृत्ती राज्य करत आहे. कवितेशीच खऱ्या अर्थाने संसार करणाऱ्या या अवलियाने मराठी साहित्यातील कविता जिवंत ठेवण्यात योगदान दिले आहे, यात शंकाच नाही. प्रकाशपर्व दुसऱ्या काव्यसंग्रहात कविराज विजय सातपुते समाजातील वास्तव टिपणाऱ्या सच्च्या माणसांना म्हणजेच सर्व कवींना व या जगातून निरोप घेवून गेलेल्या आपल्या लहान बहिणीच्या आठवणीत गहीवरताना अंतरात अस्वस्थ करणारी वेदना आणि यातून काळजावर घाव घालणारी कविता म्हणजे फक्त स्वतःच्या आयुष्याचे सार नव्हे तर या कवीचं सर्वस्वच भावार्पण म्हणून अर्पण करतो. . . हे सगळं पाहत असताना कवीच्या विशाल हृदयात स्पंदणारी कविता किती दुःखं झेलत असेल …? किती यातना पचवत असेल…? हे सांगण अवघड आहे. फाटलेल्या आयुष्यात माणसांना जोडत जगणं सांधण्याची विजयजींची भूमिका अचंबित करणारीच आहे. म्हणून प्रकाश पर्व या काव्यसंग्रहातील प्रत्येक कविता मनाला स्पर्शून जाते. कवितेतील व्यथा आपलीच असल्याची ठळकपणे जाणीव होते आणि मग वाचक कवितेच्या प्रेमात पडल्याशिवाय राहत नाही….इतकं काही लपलय त्यांच्या कवितेत.
एक भावार्पण
अंतरीच्या अंधारात
घुसमटणाऱ्या
त्या प्रकाशपर्वा साठी..!
मनाच्या अंतरीच्या अंधारात बहिणीच्या आठवणीमुळे होणारी उलघाल या कविस किती जाळत असावी आणि त्या ममतेच्या वेदना पचविण्याची ही कवीची धडपड..त्यातूनच जन्मास येणार प्रकाशपर्व …सर्व काही अनाकलनीय..!!!
आज खऱ्या अर्थाने समाजात मानवतेच्या आणि सर्जनशील विचारांची देवाण घेवाण करण्याची निर्माण झालेली गरज ओळखून आपल्या अतिशय खास अशा शैलीत कविराज कवितेतून सामाजिक वैचारिक प्रबोधन करत राहतात. याच माध्यमातून आपल्या सर्जनशील विचारांची देवाण घेवाण करताना कवी म्हणतो..
” लेक माझी सासुराला
आज आहे जायची
एक कविता द्यायची
एक कविता घ्यायची”
जाती,धर्म,विद्वेष,अंधश्रद्धा यांना सुरंग लावत कविराजांची लेखणी माणुसकीचा महिमा गाते. माणूस म्हणून जगताना, माणसांबरोबर राहताना ,सुखदुःखाची देवाण घेवाण करताना हा कवी स्वतःचं अस्तित्व शोधत राहिला आणि कवितेनेच यांच्या जगण्याचा यक्षप्रश्न सोडविला आहे. मात्र हे सर्व करत असताना गर्व, प्रसिद्धी, प्रतिभा ,पुरस्कार,सन्मान या मोहमायांचा छेद करत करत हा कवी आणि त्यांची कविता ही फक्त लोकाभिमुख करीत राहिला. साहित्य शारदेची अखंड सेवा करण्यातच ही लेखणी आत्ममग्न झालेली आहे. अस सर्व सदृश्य वास्तव.
ही आपली भावना सांगताना कवी म्हणतो –
“नुरला तो गर्व…आणि उदयास आले प्रकाशपर्व”
“उजेडाच्या गावा जाऊ ..ज्योत क्रांतीची घेवू” या प्रकाशपर्व नावाच्या पहिल्याच कवितेतून व्यक्त होताना राजकीय..धार्मिक..जातीय पक्षांचे झेंडे गाडत समतेची गुढी उभारण्यासाठी आणि ज्ञानाचा प्रकाश दारोदार पोहोचवण्यासाठी कवीची लेखणी सतत तळपत राहते.अशावेळी हा कवी सामाजिक मर्मावर बोट ठेवत स्वतःला यासाठी सर्वप्रथम बदलण्याचं व विवेकी होण्यासाठी आवाहन करतो.अनिष्ट रूढी,प्रथा,कथा,अंधश्रद्धा, अघोरी कृत्ये यांना खोडत व सत्य असत्याची चिकित्सा करत न्यायाची पताका उरी बाळगून क्रांतीला सुरुवात करणारी कविता… हेच कविराज विजय सातपुते यांच्या कवितेचे खास वैशिष्ट आहे.
साऊ,राजर्षी, शंभूराजा या व्यक्ती चारित्रांवरच्या त्यांच्या खऱ्या इतिहासाची .. योगदानाची… परिवर्तनाची साक्ष देणाऱ्या कवितांचा महिमा हा केवळ अगाधच आहे. क्रांतिज्योतीची गौरव गाथा आपल्या कवितेतून गाताना कवी म्हणतो की,
“समाज नारी साक्षर करण्या
झटली माता साऊ रे..
क्रांतिज्योती ची गौरव गाथा
खुल्या दिलाने गाऊ रे..!”
बुद्धाचा मध्यम मार्ग ते भारतीय संविधान याद्वारे समतेचा मार्ग सांगत असतानाच बाबासाहेबांना अभिवादन करताना कवी म्हणतो की –
“हे भिमराया गाऊ किती रे
तुझ्या यशाचे गान
जगण्यासाठी दिले आम्हाला
अभिनव संविधान..!!”
प्रकाशपर्व या कवी विजय यांच्या काव्यसंग्रहात विविध विषयांच्या चौफेर उधळणाऱ्या ,कधी विद्रोह करणाऱ्या ,प्रेमाच्या,नात्याच्या,मातेच्या, क्रांतीच्या, अभिवादनाच्या, स्वातंत्र्याच्या, भुकेच्या, परिवर्तनाच्या, बहुजनांच्या..सत्याच्या सर्वच कविता वाचकाला मंत्रमुग्ध करतात.एकाच शैलीत व्यक्त न होता, विविध प्रकारात कविता मांडण्याची शैली हे यांच्या कवितेचं वेगळेपण आहे.फक्त लिखाणातूनच नव्हे तर वास्तविक तशाच पद्धतीचं जीनं हा माणूस चौफेर जगतो यामुळे फक्त कवितेचीचं नाही तर कवीच्या जगण्याचीच उंची वाढली आहे.असा हा प्रतिभा संपन्न कवी…उत्तरोत्तर अष्टपैलू बनत जातो.
पुरस्कारांच्या पलीकडची मराठी साहित्य शारदेची सेवा कवीला अजुन खुणावत राहो.. त्यांच्याकडून साहित्याची आजन्म सेवा व्हावी आणि वसंत बापट यांनी कवी विजय यांना दिलेली ‘कविराज’ ही पदवी दिवसेंदिवस साहित्य सौंदर्याने झळकत राहो हीच सदिच्छा.
प्रतिभावंतांसाठी बहुत काय लिहणे..!!
समीक्षक – कवी विक्रम मालन आप्पासो शिंदे
मु/पो-वेळू(पाणी फाउंडेशन), तालुका-कोरेगाव, जिल्हा-सातारा 415511
मोबाइल-7743884307 ईमेल – [email protected]
(तळटीप – बुकगंगा. कॉम वर कविराज विजय यशवंत सातपुते यांचा “प्रकाशपर्व” हा काव्यसंग्रह सवलतीच्या दरात विक्रीस उपलब्ध आहे तरी रसिकांनी याचा लाभ घ्यावा. तसेच 7743884307 या नंबर वर संपर्क करून हा “प्रकाशपर्व” काव्यसंग्रह आपण घरपोच मिळवू शकता.)