(प्रतिष्ठित साहित्यकार श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ जी के साप्ताहिक स्तम्भ – “विवेक साहित्य ” में हम श्री विवेक जी की चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाने का प्रयास करते हैं। श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र जी, मुख्यअभियंता सिविल (म प्र पूर्व क्षेत्र विद्युत् वितरण कंपनी , जबलपुर ) से सेवानिवृत्त हैं। तकनीकी पृष्ठभूमि के साथ ही उन्हें साहित्यिक अभिरुचि विरासत में मिली है। आपको वैचारिक व सामाजिक लेखन हेतु अनेक पुरस्कारो से सम्मानित किया जा चुका है।आज प्रस्तुत है आपकी विदेश यात्रा के संस्मरणों पर आधारित एक विचारणीय आलेख – ”न्यू जर्सी से डायरी…”।)
यात्रा संस्मरण ☆ न्यू जर्सी से डायरी… 1 ☆ श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’
सुबह घूमते हुए …
अपने प्यारे पेड़ पौधों को आठ दस दिनों के लिए छोड़ कर जाना पड़े तो उनके लिए सिंचाई की व्यवस्था देखने मिली , सुबह घूमते हुए न्यूजर्सी में , जिप वाले पाली ट्री बैग्स पेड़ के तने को पहना दिए गए हैं, उनमें कोई 50 लीटर पानी भरा जा सकता है। व्यवस्था है की बूंद बूंद रिसाव जब तक पानी है अर्थात अगले लगभग 10 दिनों तक पेड़ की सिंचाई होती रहती है।
दक्षिण भारत में घूमते हुए ऐसी ही व्यवस्था देखी थी, जिसमे एक बड़े घड़े में पानी भरकर उसे पेड़ के तने के पास गाड़ दिया गया था, एक छेद करके उस में रुई भर दी गई थी।
नारियल के पेड़ के पास घड़े में नमक डाल दिया गया था, जिससे उसे समुद्र किनारे होने का अहसास हो।
खाद तथा वांछित रसायन भी इस तरह पेड़ो को धीमी गति से दिए जा सकने की प्रणाली बनाई जा सकती है।
विवेक रंजन श्रीवास्तव, न्यूजर्सी
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈
☆ मी प्रवासिनी क्रमांक २७ – भाग २ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆
आसामी सिल्कचा, पदर भरजरीचा
तेजपूर हे आपल्या सैन्याचे मोठे ठाणे आहे. सैनिकांची ने-आण करणाऱ्या मिलिटरीच्या वाहनांची रस्त्यावर सतत ये- जा होती. लष्कराच्या उपयोगासाठी एक विमानतळही आहे. तेजपूर शहर आखीव-रेखीव,नेटके आहे. तेजपूर ओलांडून भालुकपॉ॑गच्या गर्द अरण्यातून आमची गाडी चालली होती. संध्याकाळचे सात वाजायचे होते तरी काळोख झाला होता. दोन्ही बाजूंच्या उंच, काळसर दिसणाऱ्या वृक्षांमुळे अंधार अधिकच घनदाट झाला होता. अचानक ड्रायव्हरने गाडीचा वेग कमी केला. ‘गणेशबाबा, गणेशबाबा’ असे दबक्या आवाजात म्हणत भक्तिभावाने एक हात कपाळाला लावून, मान झुकवून त्याने नमस्कार केला. आम्ही बाहेर पाहिले तर एक हत्ती रस्त्याच्या कडेला अंधारात झाडांमध्ये उभा होता. त्याला बहुतेक रस्ता ओलांडून पलीकडच्या जंगलात जायचे होते. आमच्या गाडीच्या दिव्यांच्या प्रकाशामुळे तो थांबला होता. जंगली हत्तीचे सहज दर्शन घडले. नंतर ड्रायव्हरने सांगितले की, अशा जंगलात दिसणाऱ्या हत्तींना ते ‘गणेशबाबा’ म्हणतात. त्यांना श्रद्धेने नमस्कार करतात. तो म्हणाला की, ‘आम्ही असे व्यवसायानिमित्त जंगलात फिरतो आणि आमची बायकामुले आसाममधल्या एखाद्या खेड्यात जंगलाजवळच राहत असतात. वाघ, गवे, रानरेडे व इतर जंगली प्राणी यांची आम्हाला कायम भीती असते. पण गणेशबाबा आमचे, आमच्या कुटुंबाचे रक्षण करतो. हत्तीच्या स्वरूपातील गणपती आपले रक्षण करतो ही श्रद्धाच त्यांना जगण्याचे बळ देत असावी.
नामेरीला पोहोचल्यावर आवरून, जेवून आम्ही तिथल्या गच्चीवर गेलो. आजूबाजूचे वृक्ष काळपट हिरवे पांघरूण घेऊन स्तब्ध उभे होते. आकाशाच्या मोकळ्या घुमटात तारकांच्या लक्ष लक्ष ज्योती उजळल्या होत्या. अपार शांतता अनुभवत उभे होतो. थंडी वाढल्याने फार वेळ गच्चीत थांबता आले नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी जियाभरोली नदीने आणि तिच्या परिसराने आम्हाला भारून टाकले होते. नदीच्या पलीकडे अरुणाचल राज्याची हद्द सुरू होते. परदेशी प्रवासीही इथे मुक्कामाला असतात. इथून पुढे बोमदिला, सेला खिंड, तवांग इथे जाता येते.
आजचा मुक्काम काझीरंगाला होता. वनविभागाचे हे विश्रामधाम स्वच्छ, शांत आणि दाट झाडीत लपलेल्या छोट्याशा टेकाडावर आहे. काझीरंगा अभयारण्य म्हणजे दाट जंगल नसून दहा-बारा फूट उंच वाढलेल्या गवताचा विस्तीर्ण प्रदेश आहे. यात मध्ये मध्ये कच्चे- पक्के रस्ते आहेत. संध्याकाळी जीपमधून काझीरंगाचे दर्शन घेतले. लांबवर हरणे, माकडे, सांबर, रानरेडे, हत्ती, गेंडे दिसत होते. एका छोट्या पाणथळीवरील पुलावरून पाण्यातील मगर, छोटी कासवे दिसली. लांबवर उडणारे पांढरे बगळे, गरुड, नीलकंठ व काही इतर पक्षी या सर्वांचे दूरदर्शन झाले.
दुसऱ्या दिवशी पहाटे हत्तीवरून सैर केली तेंव्हा खरे काझीरंगा दिसले. सात आठ हत्ती एकदम निघतात. सर्वांना मिळून एक बंदूकधारी रक्षक त्यातल्या एका हत्तीवर असतो. सर्व हत्तींनी एकत्र राहायचे असते. आमच्या हत्तीणीचे नाव होते ‘जयमाला’. माहूत जरा पोरगेलासा होता. पुरुषभर उंचीच्या गवतातून जात असताना हत्ती मधे मधे सारखे सोंडेने गवत उपटून खातात.पहाटेच्या वेळी गवतावर पडलेले दंव आपल्या अंगावर गुलाबपाण्यासारखे उडत असते. हरणांचा कळप, एक शिंगी गेंडे, रानटी म्हशी, गवे असे काही दिसले की माहूत गवतातून आमच्या हत्तीणीला शक्य तितके त्यांच्याजवळ नेत असे. असाच एक रानटी म्हशींचा कळप होता. त्यात एक पिल्लूसुद्धा होते. आमच्या तरुण रक्ताच्या माहुताने जयमालेला पुढे काढून अगदी त्या रानटी म्हशींच्या जवळ नेले. त्यातल्या आईचा काय गैरसमज झाला कोण जाणे. पण अकस्मात ती आमच्या हत्तीणीवर चाल करून आली. तिने तिच्या फताड्या शिंगांनी जयमालेला जोरदार धडक दिली. बाकीचे हत्ती मागे होते. आमची हत्तीण या रानम्हशीशी झुंज देऊ शकली असती. पण हत्ती हा जात्याच अतिशय बुद्धिमान प्राणी आहे. तो सहसा चूक करीत नाही. आपल्या पाठीवर बसलेल्या चार प्रवाशांची आपल्यावर जबाबदारी आहे या उपजत शहाणपणामुळे तिने गर्कन अबाउट टर्न घेतला. ही युद्ध करण्याची वेळ नाही हे जाणून आम्हाला त्या रागीट म्हशीपासून शक्य तितक्या लांब घेऊन जाऊ लागली. पण ती म्हैस इतकी खवळली होती की तिने मागून येऊन जयमालेला जोरदार ढुशी दिली. उतरल्यावर पाहिले तर त्या हत्तीणीच्या पार्श्वभागावर त्या म्हशीच्या शिंगाचा अर्धचंद्राकृती ओरखडा उठला होता आणि त्यातून रक्त येत होते. माहूत तिला औषधपाणी करायला घेऊन गेला. आम्ही भालूकपाॅ॑गच्या ‘गणेशबाबाला’ मनोमन नमस्कार केला.
शिलाॅ॑ग ही मेघालयाची राजधानी. नागमोडी, वळणावळणाच्या रस्त्याने डोंगर माथ्यावर वसलेले हे शहर ब्रिटिशांना स्कॉटलंडची आठवण करून देत असे. गारो, खासी व जयंती अशा टेकड्यांनी मेघालय बनले आहे. हिरव्यागार डोंगर माथ्यांवरून पांढऱ्या शुभ्र ढगांचे थवे भटकत असतात. वाटेत बांबूची झाडे, जंगली केळींची झाडे, लहान मोठे तलाव दिसत होते. वेगवेगळी रंगीबेरंगी फुले आणि त्यावर स्वच्छंद भिरभिरणारी, रंगवैभव मिरविणारी मोठी फुलपाखरे दिसली. ‘बडा पाणी’ या विस्तीर्ण तलावाकाठी थोडा वेळ थांबलो. हॉटेलवर सामान ठेवून संध्याकाळी तिथल्या बाजारात हिंडलो. तिथल्या ‘दिल्ली मिष्टान्न भांडार’ने सर्वात मोठ्या आकाराची जिलेबी बनवून गिनीज बुक मध्ये नाव नोंदविल्याचे वाचले होते. दुकानात खूप गर्दी होती. एका भल्या मोठ्या पसरट कढईत शिस्तीने सारख्या आकाराच्या जिलब्या तरंगत होत्या. कढईमागील तज्ञ आहात त्या व्यवस्थित उलटून पाकात बुडवून ताटात ठेवीत, की लगेच त्या प्रवाशांच्या ओठात पडत. पंधरा-वीस मिनिटांनी आमचा नंबर लागला. जिलेबी खरंच छान होती.
हॉटेलवर परतल्यावर काउंटरवरील मॅनेजर बाईंशी थोड्या गप्पा मारल्या. माहिती विचारली. तिथल्या भिंतीवर एक वेगळाच फोटो होता. एका झाडाची मुळे लांबवर वाढत जाऊन, खालचा खळाळता, दगड गोट्यांनी भरलेला ओढा पार करून पलीकडल्या झाडांना जाऊन भेटली होती. असा डबल डेकर ब्रिज त्या चित्रात दिसत होता. तिने सांगितले की ही एक प्रकारच्या रबर प्लांटची मुळे( हे एक शोभेचे जंगली रबर प्लांट आहे यापासून रबर मिळत नाही) अशी भक्कम असतात व लांब लांब वाढत जातात. हुशार मानवाने त्या मुळांना वळण देऊन, आधार देऊन दुसऱ्या टोकाला नेले. तिथल्या आजूबाजूच्या खेड्यातल्या माणसांना ओढा ओलांडायला त्याचा उपयोग होतो. आता ते प्रवाशांच्या आकर्षणाचे ठिकाण झाले आहे. या लिव्हिंग रूट ब्रिजचे (living root bridge) आकर्षण परदेशी प्रवाशांना जास्त आहे. कारण जगात फारच क्वचित असे नैसर्गिक जिवंत ब्रिज आहेत. आम्ही अर्थातच फोटो पाहून समाधान मानले कारण तिथपर्यंतचे जंगलातले धाडसी ट्रेकिंग आमच्या आवाक्याबाहेरचे होते.
☆ मी प्रवासिनी क्रमांक २७ – भाग १ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆
आसामी सिल्कचा, पदर भरजरीचा
“आपण जर या नदीपलीकडे जाऊन त्या निळ्या डोंगरावर चढलो आणि थोडेसे पाय उंचावले तर तो पांढऱ्या शुभ्र ढगांचा मऊमऊ कापूस नक्की आपल्या हातात येईल” वंदन म्हणाली. आमच्या सर्वांच्या मनातल्या कल्पनेला तिने शब्दरूप दिले होते. नीरव शांतता, स्वच्छ, ताजी, थंड, मोकळी हवा. पुढ्यात जियाभरोली नदीचे नितळ, निळसर थंडगार पाणी वाहत होते. त्यात निळ्या आकाशात तरंगणाऱ्या पांढऱ्याशुभ्र ढगांचे आणि काठावरच्या हिरव्या वृक्षराजीचे प्रतिबिंब पडले होते नदीच्या मागे पांढरे शुभ्र पिंजलेले ढग माथ्यावर घेऊन निळसर डोंगरांच्या रांगा श्रीकृष्णाच्या मेघःशाम स्वरूपाची आठवण देत उभ्या होत्या.
आसाममधील तेजपूरपासून ३५ किलोमीटरवरील नामेरी इकोकॅ॑पमध्ये आमचा मुक्काम होता. लवकर म्हणून उठलो तरी छान उजाडलेलं होतं. नदीकाठी उंचावर बांधलेल्या लहान मोठ्या बंगल्यांमधून वाट काढीत तिथल्या वॉच टॉवरवर चढलो होतो. समोरच्या या दृश्याने आमची नजर खेळवून ठेवली होती.
ईशान्य भारताला आता पूर्वांचल म्हणून ओळखले जाते. पूर्वांचलची भौगोलिक परिस्थिती वैशिष्ट्यपूर्ण आणि वैविध्यपूर्ण आहे. दुर्गम पर्वतराजी, निबीड अरण्ये, महाबाहो ब्रह्मपुत्रा, तिच्या उपनद्या आणि इतर नद्या यांचे अनुपम सौंदर्य पाहून आपण थक्क होतो. तिथल्या विविध जनजातींच्या विविध भाषा, संस्कृती, आचारविचार सारेच आपले कुतूहल वाढविणारे आहे. हा गूढरम्य प्रदेश पूर्वी आसाम याच नावाने ओळखला जात असे. आसाम आता सात राज्यात वाटला गेला आहे. आसाम, मेघालय, अरुणाचल, त्रिपुरा, मणिपूर, मिझोराम आणि नागालँड. पुराणकथांचा, इतिहासाचा सुंदर गोफ या भूमीभोवती विणला गेला आहे. त्या अदृश्य धागांनी आपले या भूमीशी असलेले नाते घट्ट झाले आहे. असं सांगतात की नागालँडच्या डिमापूर शहराचे मूळ नाव हिडींबापूर असे होते. भीमाने ज्या हिडिंबेशी विवाह केला ती इथलीच. तर मणिपूरच्या राजकन्याशी म्हणजे चित्रांगदेशी अर्जुनाने विवाह केला होता. त्यांच्या पुत्राचे नाव बभ्रुवाहन.
गुवा म्हणजे सुपारी. ही सुपारीची बाजारपेठ गुवाहाटी पूर्वीच्या आसामची राजधानी होती. आताच्या आसामची राजधानी दिसपूर असली तरी गुवाहाटी आणि दिसपूर ही जुळी शहरे आहेत. महाभारतात आसामचा कामरूप असा उल्लेख आहे आणि गुवाहाटीचे नाव होते प्राग्ज्योतिषपूर. नरकासुराने हे शहर वसविले. श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून त्याच्या कैदेतील सोळा सहस्त्र नारींची सुटका केली. त्यांच्याशी विवाह करून त्या पुरुषोत्तमाने त्या स्त्रियांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली ही गोष्ट सुद्धा सर्वांना माहीत असलेली.
आहोम राजांनी १३व्या शतकात आसाममध्ये आपले राज्य स्थापन केले. शिवसागर ही त्यांची राजधानी. जवळजवळ सहा शतके या हिंदुराजांचे राज्य आसाममध्ये होते. या काळात मोंगलांनी केलेली आक्रमणे इथे अयशस्वी ठरली. अजूनही गुवाहाटी शहरातील नवीन बांधकामाच्या वेळी तिथल्या ढिगार्यातून विविध आकारांचे तोफ गोळे सापडतात. १६७१ साली सराई घाट इथे आहोम राजे व मोंगल यांच्यामध्ये जी लढाई झाली त्यातील हे तोफगोळे असावेत असे इतिहास संशोधकांनी सांगितले.
कोलकत्याहून गुवाहाटीला आलो होतो. सकाळी लवकर आवरून निघालो. तेजपूर पासून पुढे ३५ किलोमीटरवरील नामेरी कॅम्प इथे मुक्काम करायचा होता. डोंगरदर्यांचा, वळणावळणांचा रस्ता असल्याने गुवाहाटी ते तेजपूर या १८० किलोमीटरच्या प्रवासाला दहा-बारा तास लागले. डोळ्यांना सुखविणाऱ्या हिरव्या रंगाच्या विविध छटा चारही बाजूंनी सोबत करीत होत्या. लांबवर पसरलेली पोपटी, हिरवी, सोनेरी भातशेती, चहाच्या विस्तीर्ण मळ्यांचा काळपट हिरवा गालिचा, शिडशिडीत उंच सुपारीची झाडं, जाड जाड बांबूंची बनं, नारळ, केळी, आणि डोंगरउतरणीवरचे अननसाचे मळे दिसले. त्याशिवाय साग, साल, देवदार, ओक हे वृक्ष अधून मधून दिसत होते. झाडांमध्ये लपलेली टुमदार कौलारू घरं मधूनच डोकावत होती. शेणाने किंवा मातीने लिंपलेल्या त्या घरांच्या भिंतींवर छान चित्रकला दिसत होती. बांबूच्या कलात्मक कुंपणाने वेढलेल्या या घरांशेजारी छोटेसे तळे असे. त्यातील ताजे, गोड्या पाण्यातले मासे आणि भात हेच इथले प्रमुख अन्न आहे.
☆ मी प्रवासिनी क्रमांक २६ – भाग ३ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆
पूर्व पश्चिमेचा सेतू– इस्तंबूल
हैदरपाशा इथून रात्रीच्या रेल्वेने आम्ही सकाळी डेन्झीले स्टेशनवर उतरलो. इथून पामुक्कले इथे जायचे होते. फॉल सीझन सुरू झाला होता. रस्त्याकडेची झाडं सूर्यप्रकाशात सोनेरी किरमिजी रंगात झळाळून उठली होती तर काही झाडं चांदीच्या छोट्या, नाजूक घंटांचे घोस अंगभर लेवून उभी होती. दसऱ्याचं सीमोल्लंघन काल युरोप खंडातून आशिया खंडात झालं होतं. आज हे चांदी सोनं डोळ्यांनी लुटत चाललो होतो.
तुर्की भाषेमध्ये पामुक्कले म्हणजे कापसाचा किल्ला! हजारो वर्षांपूर्वी झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे तिथल्या डोंगरातून अजूनही गरम पाण्याचे झरे वाहतात. त्यातील कॅल्शियमचे थरांवर थर साठले. त्यामुळे हे डोंगर छोट्या- छोट्या अर्धगोल उतरत्या घड्यांचे, पांढरे शुभ्र कापसाच्या ढिगासारखे वाटतात. तिथल्या गरम पाण्याच्या झऱ्यात पाय बुडवून बसायला मजा वाटली.
जवळच एरोपोलीस नावाचे रोमन लोकांनी वसविलेले शहर आहे. भूकंपामुळे उध्वस्त झालेल्या या शहरातील डोंगरउतारावरचे, दगडी, भक्कम पायऱ्यांचे, एका वेळी बारा हजार माणसं बसू शकतील असे अर्धगोलाकार ॲंफी थिएटर मात्र सुस्थितीत आहे.
इफेसुस या भूमध्य समुद्राकाठच्या प्राचीन शहरात, संगमरवरी फरशांच्या राजरस्त्याच्या कडेला जुनी घरे, चर्च, कारंजी, पुतळे आहेत. निकी देवीचा सुरेख पुतळा सुस्थितीत आहे. दुमजली लायब्ररीच्या प्रवेशद्वाराचे संगमरवरी खांब भक्कम आहेत. खांबांमध्ये संगमरवरी पुतळे कोरले आहेत. त्याकाळी १२००० पुस्तके असलेल्या त्या भव्य लायब्ररीची आणि त्या काळच्या प्रगत, सुसंस्कृत समाजाची आपण कल्पना करू शकतो.
कॅपॅडोकिया इथे जाताना वाटेत कोन्या इथे थांबलो. कोन्या ही सूफी संतांची भूमी! ‘रूमी’ या कलंदर कवीच्या कवितांचा, गूढ तत्त्वज्ञानाचा फार मोठा प्रभाव फारसी, उर्दू व तुर्की साहित्यावर झाला आहे. या रुमी कवीचा मृत्यू साधारण साडेसातशे वर्षांपूर्वी कोन्या इथे झाला. त्याची कबर व म्युझियम पाहिले.या मेवलवी परंपरेचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे उपासक घोळदार पांढराशुभ्र वेश करून स्वतःभोवती गिरक्या घेत, नृत्य करीत सूफी संतांच्या कवनांचे गायन करतात. रात्री हा व्हर्लिंग दरवेशचा नृत्य प्रकार पाहिला. शब्द कळत नव्हते तरी त्या गायन वादनातील लय व आर्तता कळत होती.
आज बलून राईडसाठी जायचे होते.एजिअस आणि हसन या दोन मोठ्या डोंगरांमध्ये पसरलेल्या खडकाळ पठाराला ‘गोरेमी व्हॅली’ असे म्हणतात. तिथल्या मोकळ्या जागेत जमिनीवर आडव्या लोळा- गोळा होऊन पडलेल्या बलूनमध्ये जनरेटर्सच्या सहाय्याने पंखे लावून हवा भरण्याचं काम चाललं होतं. हळूहळू बलूनमध्ये जीव आला. ते पूर्ण फुलल्यावर गॅसच्या गरम ज्वालांनी त्यातली हवा हलकी करण्यात आली. त्याला जोडलेली वेताची लांबट चौकोनी, मजबूत टोपली चार फूट उंचीची होती. कसरत करून चढत आम्ही वीस प्रवासी त्या टोपलीत जाऊन उभे राहीलो. टोपलीच्या मधल्या छोट्या चौकोनात गॅसचे चार सिलेंडर ठेवले होते. त्यामध्ये उभे राहून एक ऑपरेटर त्या गॅसच्या ज्वाला बलूनमध्ये सोडत होता. वॉकीटॉकीवरून त्याचा नियंत्रण केंद्राशी संपर्क चालू होता. बलूनमधली हवा हलकी झाली आणि आमच्यासकट त्या वेताच्या टोपलीने जमीन सोडली. अधून मधून गॅसच्या ज्वाला सोडून ऑपरेटर बलूनमधली हवा गरम व हलकी ठेवत होता. वाऱ्याच्या सहाय्याने बलून आकाशात तरंगत फिरू लागलं. आमच्या आजूबाजूला अशीच दहा-बारा बलून्स तरंगत होती. सूर्य नुकताच वर आला होता. खाली पाहिलं तर पांढरे- गोरे डोंगर वेगवेगळे आकार धारण करून उभे होते. हजारो वर्षांपूर्वी ज्वालामुखीतून बाहेर पडलेल्या राखेच्या थरांच्या या डोंगरांनी वर्षानुवर्ष ऊन पाऊस सहन केले. ते डोंगर वरून बघताना शुभ्र लाटांचे थबकलेले थर असावे असं विलोभनीय दृश्य दिसत होतं. काही ठिकाणी डोंगरांच्या सपाटीवर फळझाडांची शेती दिसत होती. बगळ्यांची रांग, डोंगरात घरटी करून राहणाऱ्या कबुतरांचे भिरभिरणारे थवे खाली वाकून पहावे लागत होते. बलून जवळ-जवळ५०० फूट उंचीवर तरंगत होते. हवेतला थंडावा वाढत होता. मध्येच बलून खाली येई तेंव्हा खालचं दृश्य जवळून बघायला मिळंत होतं. अगदी तासभर हा सदेह तरंगण्याचा अनुभव घेतला. आता वाऱ्याची दिशा बघून आमचं आकाशयान उतरवलं जात होतं. जवळ एक ओपन कॅरिअर असलेली मोटार गाडी येऊन थांबली. तिथल्या मदतनीसांच्या सहाय्याने ती लांबट चौकोनी टोपली गाडीच्या मोकळ्या कॅरिअरवर टेकविण्यात आली. हवा काढलेले बलून लोळा गोळा झाल्यावर कडेला आडवे पाडण्यात आले. पुन्हा कसरत करून उतरण्याचा कार्यक्रम झाला आणि सर्वांनी धाव घेतली ती भोवतालच्या द्राक्षांच्या झुडूपांकडे! काळीभोर रसाळ थंडं द्राक्षं स्वतःच्या हातांनी तोडून अगदी ‘आपला हात जगन्नाथ’ पद्धतीने खाण्यातली मजा औरच होती. काही द्राक्षांच्या उन्हाने सुकून चविष्ट मनुका तयार झाल्या होत्या. त्या तर अप्रतिम होत्या.
☆ मी प्रवासिनी क्रमांक २६ – भाग २ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆
पूर्व पश्चिमेचा सेतू– इस्तंबूल
इस्तंबूल येथील १४५५ मध्ये बांधलेला ‘ग्रँड बाजार’ म्हणजे एक आश्चर्य आहे. ३००० हून अधिक दुकानं असलेला हा ग्रँड बाजार म्हणजे भूलभुलय्या आहे. कापड, क्रोकरी, चपला, पर्सेस, बॅगा, तयार कपड्यांपासून ते सोन्या हिऱ्यापर्यंतची सगळीच दुकानं प्रवाशांना आकर्षित करतात. बाजाराच्या आतल्या साऱ्या वाटा चक्रावून टाकणाऱ्या आहेत. ‘आपण इथे हरवणार तर नाही ना?’ असं सारखं वाटंत होतं. खरेदीही महाग होती. ‘स्पाइस मार्केट’ इथे गेलो. स्पाइस मार्केटमध्ये पोत्यावरी पिस्ते, अक्रोड, अंजीर, खजूर, हेजलनट्स ठेवले होते. ड्रायफ्रूट्सच्या विविध मिठायांनी दुकानं भरली होती. इथली ड्रायफ्रूट्सनी भरलेली बकलावा नावाची मिठाई खूप आवडली.
(गलाटा टॉवर, फनीक्युलर रेल्वे, क्रूज प्रवास)
संध्याकाळी आम्ही सर्वांनी तिथल्या ट्रामने शहराचा फेरफटका मारायचं ठरवलं.त्या ट्रामने एक स्टेशन जा नाहीतर दहा स्टेशनं! तिकीट एकाच रकमेचं होतं. आम्हाला तिकीट म्हणून नाण्यांसारख्या धातूच्या गोल चकत्या दिल्या. प्रत्येकाने तिथल्या मशीनमध्ये ते नाणं टाकलं की तो फिरता दरवाजा उघडे. ट्राम साधारण रेल्वेच्या डब्यासारखी होती. कार्यालये नुकतीच सुटल्यामुळे गर्दीने खचाखच भरलेली होती. धक्के खात, खिसा- पाकीट सांभाळत थोडा प्रवास झाल्यावर गर्दी कमी झाली. दुतर्फा सजलेल्या दुकानांसमोर, रुंद फुटपाथवर टेबल खुर्च्या मांडून निवांतपणे खाण्यापिण्याचा आस्वाद घेणे चालले होते. ट्रेनच्या शेवटच्या स्टेशनला म्हणजे कलाबाश इथे आम्ही उतरलो. तिथून आम्हाला फनीक्युलर रेल्वेने प्रवास करायचा होता. डोंगराच्या पोटातून खोदलेल्या रेल्वेमार्गाने डोंगर चढत जाणारी ही गाडी होती. इलेक्ट्रिक वायरने ही गाडी डोंगरमाथ्यावर खेचली जाते. दोन डब्यांची ती सुबक, सुंदर, छोटी गाडी आतून नीट न्याहाळेपर्यंत डोंगरमाथ्याला आलोसुद्धा! या भागाला ‘इस्तीकलाल’ म्हणतात. आपल्या फोर्ट विभागासारखा हा भाग आहे. दुतर्फा दुकानं, बँका, निरनिराळ्या देशांचे दूतावास, कार्यालये आहेत.. केकपासून कबाबपर्यंत असंख्य गोष्टींनी दुकानं भरलेली होती. तो शनिवार होता आणि रविवारच्या सुट्टीला जोडून सोमवारी २९ ऑक्टोबरला टर्कीच्या ‘रिपब्लिक डे’ ची सुट्टी होती. चंद्रकोर व चांदणी मिरवणारे लाल झेंडे जिकडेतिकडे फडकत होते. जनसागर मजेत खात-पीत, फिरत होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला मधूनच उतरत्या वाटा आणि त्यांच्या कडेने सुंदर, स्वच्छ इमारती आहेत. बास्पोरस खाडीच्या किनाऱ्यावर दीपगृहासारख्या दिसणाऱ्या टॉवरच्या अगदी उंचावर, एक गोल प्रेक्षक गॅलरी आहे. काही हौशी लोक किनाऱ्यावरून खाली खाडीमध्ये गळ टाकून माशांची प्रतीक्षा करीत होते.
बास्पोरस खाडीच्या मुखावर असलेलं ‘गोल्डन हॉर्न’ हे एक नैसर्गिक व सुरक्षित बंदर आहे. प्रवासासाठी, व्यापारासाठी या बंदराचा फार पूर्वीपासून उपयोग केला गेला. गोल्डन हॉर्नच्या साथीने आणि साक्षीने इस्तंबूल विकसित आणि समृद्ध होत गेलं. युरोप व आशिया खंडांना जोडणारा बास्पोरस खाडीवरील जुना पूल वाहतुकीला अपुरा पडू लागल्यावर आता आणखी एक नवा पूल तिथे बांधण्यात आला आहे. गोल्डन हॉर्नमधील लहान मोठ्या बोटींवरील दिवे चमचमत होते. खाडीच्या पाण्यात त्या दिव्यांची असंख्य प्रतिबिंबे हिंदकळत होती. क्रूझमधून जुन्या बास्पोरस ब्रिजपर्यंत जाऊन आलो. बास्पोरस खाडीतच पाय बुडवून उभ्या असलेल्या, गतवैभवाची साक्ष असणाऱ्या, राजेशाही, देखण्या इमारती, काठावरचा डोल्माबाची पॅलेस, त्यामागे डोकावणारं अया सोफिया म्युझियम, दूरवर दिसणारे ब्लू मॉस्कचे मिनार यांनी रात्र उजळून टाकली होती. युरोप- आशियाला जोडणारा बास्पोरस खाडीवरील सेतू, छोट्या- छोट्या लाल निळ्या दिव्यांनी चमचमत होता.
हातांनी विणलेले लोकरीचे व रेशमी गालीचे ही टर्कीची प्राचीन, परंपरागत कला आहे. तिथल्या लालसर गोऱ्या स्त्री कारागीर, त्यांच्या लांबसडक बोटांनी गालीचे विणण्याचे काम कौशल्याने करीत होत्या. एका लेदर फॅक्टरीमध्ये आधुनिक फॅशनचा, पुरुषांच्या व स्त्रियांच्या लेदर कपड्यांचा फॅशन शो बघायला मिळाला. रात्री एका हॉटेलमध्ये गोऱ्यापान, कमनीय, निळ्या परीचा बेली डान्स पाहिला. प्रवाशांसाठी मदिराक्षी बरोबर मदिरेची उपस्थिती हवीच! राकी नावाचं बडीशेपेपासून बनविलेलं मद्य ही टर्कीची खासियत आहे.
मारमारा समुद्र आणि काळा समुद्र यांना जोडणाऱ्या बास्पोरसच्या खाडीवरील पूल ओलांडून आम्ही इस्तंबूलच्या आशिया खंडातील भागात असलेल्या हैदरपाशा रेल्वे स्टेशनला पोहोचलो. आज नेमका दसरा होता आणि दसऱ्याचं सीमोल्लंघन आम्ही युरोपाखंडातून आशिया खंडात आणि ते सुद्धा बसने केलं. रेल्वेगाडीत दोन प्रवाशांची सोय असलेल्या छोट्या केबिन्स सर्व सोयींनी सुसज्ज होत्या. रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजूंनी नेत्रसुखद रंगांच्या सुरेख, शोभिवंत इमारती, हिरव्या बागा, पलीकडे एजिअन समुद्र आणि थंड, स्वच्छ, कोरड्या हवेत रमत गमत चालणारे, युरोपियन पेहरावतले स्त्री-पुरुष, मुलं असं दृश्य काळोख होईपर्यंत दिसंत राहीलं.
☆ मी प्रवासिनी क्रमांक २६ – भाग १ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆
✈️ पूर्व पश्चिमेचा सेतू– इस्तंबूल ✈️
‘अंकारा’ ही आधुनिक टर्कीची (Turkey) राजधानी आहे पण टर्कीची (टर्कीचे आता ‘टर्कीये’ (Turkiye )असे नामकरण झाले आहे.) ऐतिहासिक, औद्योगिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व व्यापारी राजधानी ‘इस्तंबूल’ आहे. इस्तंबूलचं पूर्वीच नाव कॉन्स्टॅन्टिनोपल. जुन्या सिल्क रूटवरील (रेशीम मार्ग) या महत्त्वाच्या शहरात प्राचीन आणि अर्वाचीन संस्कृतीचा सुंदर संगम झाला आहे. जुन्या वैभवाच्या खुणा अभिमानाने जपणाऱ्या इस्तंबूलचं भौगोलिक स्थान वैशिष्ट्यपूर्ण आहे. भूमध्य समुद्र आणि काळा समुद्र यांच्यामध्ये असलेलं टर्की हे मुख्यतः आशिया खंडात येतं. पण इस्तंबूलचा वायव्यकडील थोडासा भाग युरोप खंडात येतो. इस्तंबूलच्या एका बाजूला मारमारा समुद्र तर दुसऱ्या बाजूला बॉस्पोरसची खाडी आहे. बॉस्पोरस खाडीवरील पुलाने युरोप व आशिया हे दोन खंड जोडले जातात.
इस्तंबूलला लाभलेले स्वच्छ, सुंदर समुद्रकिनारे, थंड कोरडी हवा यामुळे मे महिन्यापासून ऑक्टोबर महिन्यापर्यंत जगभरच्या प्रवाशांनी इस्तंबूल फुलून जाते. समुद्रस्नान, सूर्यस्नान करण्याची मजा, ताजी रसरशीत फळं, तरतऱ्हेच्या भाज्या, विपुल प्रमाणात असणारे अंजीर, बदाम, खजूर, अक्रोड, पिस्ते आणि समृद्ध सागरी मेजवानी यामुळे प्रवाशांचं, खवय्यांचं हे आवडतं ठिकाण आहे. ऑलिव्ह फळांचा हा मोठा उत्पादक देश आहे. लज्जतदार जेवणामध्ये, तरतऱ्हेच्या सॅलड्समध्ये मुक्तहस्ताने ऑलिव्ह ऑइल वापरले जाते.
रोमन, ग्रीक, ख्रिश्चन, ऑटोमन साम्राज्याचे सुलतान अशा वेगवेगळ्या संस्कृती इथे हजारो वर्षे नांदल्या. या कालावधीत निर्माण झालेली अनेक वास्तूशिल्पे म्हणजे कलेचा प्राचीन अनमोल वारसा आजही टर्कीने कसोशीने जपला आहे. कालौघात काही वास्तू भग्न झाल्या तर काही नष्ट झाल्या. तरीही असंख्य उर्वरित वास्तु प्रवाशांना आकर्षित करतात.
इस्तंबूलमधील ‘अया सोफिया म्युझियम’ हे एक चर्च होतं. चौदाशे वर्षांपूर्वी सम्राट जस्टिनियन याने ते बांधलं . एका भव्य घुमटाच्या चारही बाजूंना चार अर्ध घुमट आहेत. त्या घुमटांना आतील बाजूनी सोनेरी आणि निळसर रंगाच्या लक्षावधी मोझॅक टाइल्स लावल्या आहेत. वास्तूच्या भिंती आणि खांब यांच्यासाठी गुलबट रंगाच्या संगमरवराचा वापर केला आहे. छताला ख्रिश्चन धर्मातील काही प्रसंग, मेरी व तिचा पुत्र अशा भव्य चित्रांची पॅनल्स आहेत. इस्लामच्या आगमनानंतर यातील काही पॅनेल्स प्लास्टर लावून झाकायचा प्रयत्न झाला.घुमटाच्या खालील भिंतींवर कुराणातील काही अरेबिक अक्षर कोरली आहेत. उंच छतापासून लांब लोखंडी सळ्या लावून त्याला छोटे छोटे दिवे लावले जायचे. पूर्वी या दिव्यांसाठी ऑलिव्ह ऑइल वापरत असंत. ऑलिव्ह ऑइल ठेवण्याचा एक भला मोठा संगमरवरी कोरीव रांजण तिथे एका बाजूला चौथ्यावर ठेवला आहे. आता हे दिवे इलेक्ट्रिकचे आहेत.घुमटांना आधार देणारे खांब भिंतीत लपविलेले आहेत. त्यामुळे प्रथमदर्शनी आधाराशिवाय असलेले हे भव्य घुमट पाहून आश्चर्य वाटतं.
तिथून जवळच सुलतान अहमद याने सोळाव्या शतकात सहा मिनार असलेली भव्य मशीद उभारली आहे. ती आतून निळ्या इझनिक टाइल्सने सजविली आहे. म्हणून या वास्तूला ‘ब्लू मॉस्क’ असं नाव पडलं आहे .उंचावरील रंगीबेरंगी काचेच्या खिडक्या, असंख्य हंड्या- झुंबरं, त्यात लांब सळ्यांवरून सोडलेले छोटे छोटे दिवे त्यामुळे सकाळच्या सूर्यप्रकाशात सर्वत्र सोनेरी निळसर प्रकाश पाझरत होता.
मारमारा समुद्रकिनाऱ्यापासून जवळ असलेला ‘टोपकापी पॅलेस’ म्हणजे ऑटोमन साम्राज्याच्या सुलतानांच्या वैभवाची साक्ष आहे. इसवीसन १४०० ते१८०० ही चारशे वर्षं इथून राज्यकारभार चालला. त्या भव्य महालात वेगवेगळे विभाग आहेत. भल्यामोठ्या स्वयंपाकघरातील महाकाय आकाराची भांडी, चुली, झारे, कालथे, चिनी व जपानी सिरॅमिक्सच्या सुंदर डिझाइन्सच्या लहान मोठ्या डिशेस, नक्षीदार भांडी बघण्यासारखी आहेत. काही विभागात राजेशाही पोशाख, दागिने मांडले होते. तीन मोठे पाचू बसविलेला रत्नजडित टोपकापी खंजीर आणि ८६ कॅरेट वजनाचा सोन्याच्या कोंदणात बसविलेला लखलखीत हिरा, रत्नजडित सिंहासन वगैरे पाहून डोळे दिपतात. सुलतानाच्या स्त्री वर्गाचं राहण्याचं ठिकाण म्हणजे ‘हारेम’ राजेशाही आहे. बाहेरच्या एका मनोऱ्यात मंत्रिमंडळाच्या बैठकीची जागा आहे.
बास्पोरसच्या किनाऱ्यावर ‘अल्बामाची’ हा सुलतानांनी बांधलेला युरोपियन धर्तीचा राजवाडा आहे. उंची फर्निचर, गालीचे, सोन्या चांदीने नटविलेले,मीना वर्कने शोभिवंत केलेले चहाचे सेट्स, डिशेस, वेगवेगळ्या खेळांची साधने सारे चमचमत होते. ‘हारेम’ विभागात माणकांसारखी लाल, बखरा क्रिस्टलची दिव्यांची लाल कमळं, त्याचे लाल लाल लोलक,लाल बुट्टीदार गालीच्यांच्या पार्श्वभूमीवर डोळ्यात भरत होते. फ्रेंच क्रिस्टल ग्लासचे कठडे असलेला, लाल कार्पेटने आच्छादित केलेला रुंद जीना उतरून आम्ही खालच्या भव्य हॉलमध्ये आलो. सगळीकडे सुंदर शिल्पे मांडलेली होती. भिंतीवरील भव्य छायाचित्रे नजर खिळवून ठेवत होती. हॉलमध्ये साडेसातशे दिव्यांचं, चार हजार किलो वजनाचं भव्य झुंबर आहे. हे झुंबर ज्या छताला बसवलं आहे ते छत इटालियन, ग्रीक, फ्रेंच अशा कारागिरांच्या कलाकृतींनी सजलेलं आहे. छत अशा पद्धतीने रंगविलं आहे की ते सरळ, सपाट असे न वाटता, इल्युजन पेंटिंगमुळे घुमटाकार भासत होतं.
‘हिप्पोड्रोम’ हे रोमन काळामध्ये रथांच्या शर्यतीचं ठिकाण होतं. जवळच इजिप्तहून आणलेला ओबेलिक्स म्हणजे ग्रॅनाईटचा खांब उभा केला आहे. त्यावर इजिप्तशियन चित्रलिपी कोरलेली आहे. त्यापासून थोड्या अंतरावर डेल्फीहून म्हणजे ग्रीसमधून आणलेला सर्पस्तंभ आहे. त्याची सोन्याची ३ मुंडकी लुटारुंनी फार पूर्वीच पळविली आहेत. जवळच एका जर्मन सम्राटाने सुलतानाला भेट म्हणून दिलेलं कारंजं आहे.
तिथून थोड्या अंतरावर सम्राट जस्टिनियन याने चौदाशे वर्षांपूर्वी बांधलेला टोरेबातान सरा नावाचा जलमहाल आहे. जमिनीखाली असलेला हा जलमहाल अजूनही चांगल्या स्थितीत आहे. ग्रॅनाईटच्या लाद्यांवर जुन्या महालांचे सुस्थितीतील ३५० खांब उभे करून त्यावर गच्चीसारखं बांधकाम केलं आहे. लांबवर असलेल्या डोंगरातील पाणी पाईपने इथे आणून त्याचा साठा करून ठेवंत असंत. युद्धकाळात या साठ्याचा उपयोग होत असे. या जलमहालाचा एक खांब म्हणजे ‘मेडूसा’ या शापित सौंदर्यवतीचा मुखवटा आहे. मेडूसाचा हा मुखवटा उलटा म्हणजे डोकं खाली टेकलेला असा आहे. तिच्याकडे सरळ, नजरेला नजर देऊन कोणी पाहिलं तर ती व्यक्ती नष्ट होत असे अशी दंतकथा आहे.
☆ मी प्रवासिनी क्रमांक २५- भाग ३ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆
कारीबू केनिया
केनियातील मसाईमारा आणि टांझानियातील गोरोंगोरो,सेरेंगेटी हा सारा सलग, एकत्रित, खूप विस्तीर्ण गवताळ प्रदेश आहे. राजकीय सोयीसाठी त्याचे दोन विभाग कल्पिलेले आहेत. इथले एक आश्चर्य म्हणजे ‘ग्रेट मायग्रेशन’! दरवर्षी ठराविक वेळेला लाखो प्राणी झुंडीने स्थलांतर करतात ते बघायला जगभरचे प्रवासी आवर्जून येतात. साधारण जुलै पर्यंत टांझानियातील गोरोंगोरो, सेरेंगेटी इथले हिरवे गवत संपते, वाळते. अशावेळी फक्त गवत हेच उदरनिर्वाहाचे साधन असलेले लक्षावधी वाइल्ड बीस्ट, झेब्रे, हरणे ग्रुमिटी आणि मारा या नद्या ओलांडून, हजारभर मैलांचे अंतर कापून, केनियाच्या मसाईमारा विभागात येतात. कारण मार्च ते जूनपर्यंत केनियात पडणाऱ्या पावसामुळे तिथे भरपूर ओला चारा असतो. मसाईमारा विभागात जेंव्हा नोव्हेंबर ते फेब्रुवारीमध्ये हिरवे गवत संपते, वाळते तेंव्हा हे प्राणी पुन्हा सेरेंगेटी, गोरोंगोरो इथे स्थलांतर करतात. त्यांच्या स्थलांतराच्या काळात सिंह, चित्ता, बिबळ्या तिथे बरोबर दबा धरून बसलेले असतात. आणि नदीतील मगरी तर त्यांची वाटच पहात असतात.आयते चालून आलेले भक्ष त्यांना मिळते तर काही वेळेला एका वेळी हजारो प्राणी नदी प्रवाह ओलांडून जात असताना त्यांच्या वजनाने सुसरी दबून जातात. नदीच्या आजूबाजूला कोल्हे, तरस, गिधाडे हीसुद्धा उरलेसुरले मिळवायला टपून असतात. शेकडो वर्षांची ही निसर्गसाखळी घट्ट टिकून आहे. नाहीतरी नद्या, वारा, पक्षी, प्राणी यांना सरहद्दीची बंधने नसतातच. लाखो मैलांचे अंतर कापून आपल्याकडे सयबेरियातील फ्लेमिंगो व इतर पक्षी ठराविक काळापुरते येतात व त्यांच्याकडील कडाक्याची थंडी संपल्यावर परत आपल्या ठिकाणी जातात. निसर्गाने पक्ष्यांना, प्राण्यांना बहाल केलेली ही जीवनशक्ती आहे.
आज लवकर नाश्ता करून, चार तासांचा प्रवास करून नैवाशा लेकला पोहोचलो. या विस्तीर्ण जलाशयातून एक तासाची सफर होती. त्या विस्तीर्ण तलावाच्या कडेने झाडे- झुडपे, पाणवनस्पती होत्या. खडकासारखे दिसणारे पाणघोडे डुंबत होते. इथले खंड्या पक्षी ( किंगफिशर ) काळ्या- पांढऱ्या रंगाचे होते. ते पाण्यावर धिरट्या घालून, लांब चोचीत अचूक मासा पकडून, झाडावर घेऊन जात. जलाशयाच्या कडेने पिवळ्या चोचींच्या बदकांचा थवा चालला होता. लांब लाल चोच आणि उंच लाल पाय असलेला पांढराशुभ्र बगळा बकध्यान लावून मासे टिपत होता. आमच्या नावाड्याने पाण्यात भिरकावलेला मासा, लांब झाडावर बसलेल्या गरुडाने भरारी घेऊन अचूक टिपला. एका बेटावरील झाडीत जिराफ, लांब माना आणखी उंच करून झाडपाला ओरबाडीत होते. बेटावर उतरून थोडे पायी फिरलो. गेझल्सचा (हरिणांचा) खूप मोठा कळप कमानदार उड्या मारीत पळाला. हरिणांसारखेच पण चांगले मोठे, काळपट तपकिरी रंगाचे, पाणीदार डोळ्यांचे, उंच शिंगे असलेले ॲ॑टीलोप नावाचे प्राणीही होते.
आज ‘ग्रेट रिफ्ट व्हॅली’ या प्रदेशातून लेक नुकरू नॅशनल पार्क इथे जायचे होते. चहा व कॉफीचे मळे रस्त्याच्या कडेला होते. डोंगर उतारावर शेती होती. खालच्या उंच सखल पोपटी दरीमध्ये निळ्याशार पाण्याची छोटी- मोठी तळी, सूर्यप्रकाशात निळ्या रत्नासारखी चमकत होती. ही ग्रेट रिफ्ट व्हॅली म्हणजे मूळ मानवाचे जन्मस्थान मानले जाते. संध्याकाळी लेक नुकरू या मचुळ पाण्याच्या सरोवरापाशी गेलो. भोवतालच्या दलदलीत असंख्य काळे- पांढरे पक्षी चरत होते. हेरॉन, पेलिकन, शुभ्र मोठे बगळे होते. कातरलेले पंख असलेले स्पर विंगड् गूझ होते.
विषुववृत्ताची कल्पित रेषा केनियामधून जाते. दुसऱ्या दिवशी माउंट केनिया रीजनला जाताना, वाटेत थॉमसन फॉल्स नावाचा धबधबा पाहिला. एका गावामध्ये ‘इक्वेटर’ अशी पाटी होती. तिथे थोडा वेळ थांबलो. तिथून माउंट केनियाकडे जाताना रस्त्यावर अनेक धावपटू स्त्री-पुरुष पळताना दिसले. इथल्या ‘केनिया स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट’मध्ये ऑलम्पिक पदक विजेते धावपटू घडविले जातात. समुद्रसपाटीपासून चार हजार फूट उंचावर असलेल्या या गावात केनियातीलच नाही तर अन्य देशांचे खेळाडू प्रशिक्षणासाठी येतात.
१६०००.फूट उंच असलेल्या माउंट केनियाच्या उतरणीवर ‘सेरेना माउंट लॉज’ हे गर्द जंगलातील हॉटेल ५२०० फूट उंचीवर आहे. संपूर्ण हॉटेल महोगनी आणि सीडार वृक्षांचे लाकूड वापरून बांधलेले आहे. प्रत्येक रूममधील काचांच्या मोठ्या खिडक्यातून पुढ्यातला छोटा, नैसर्गिक मचुळ पाण्याचा तलाव दिसत होता. तलावाच्या आजूबाजूच्या जमिनीत खनिज द्रव्य आहेत. ही खनिज द्रव्य मिळविण्यासाठी, इथली माती चाटण्यासाठी जंगली प्राणी रात्री या पाण्यावर येतात. हॉटेलला मोठे फ्लड लाईट लावून ठेवले होते. वेगवेगळे प्राणी पाण्यावर आले की हॉटेलचा स्टाफ आपल्याला सूचना द्यायला येतो. तसेच एक घंटाही वाजवतात. रानटी म्हशी, हरिणे, रानडुक्कर, हैना असे अनेक प्राणी आम्हाला काचेतून दिसले.
माउंट केनिया हा थंड झालेला ज्वालामुखी पर्वत १६००० फूट उंच आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्या शिखरावरील बर्फ चमकताना दिसत होते. केनियाच्या आग्नेय दिशेला हिंदी महासागर आहे. युगांडा, टांझानिया, सुदान, सोमालिया हे देश सभोवती आहेत. १९६३ मध्ये केनियाला ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळाले. तेंव्हा जोमो केन्याटा हे पहिले पंतप्रधान झाले. शेतीप्रधान असलेल्या या देशातून चहा व कॉफीची निर्यात होते. अलीकडे ताजी गुलाबाची व इतर फुले युरोपमध्ये निर्यात केली जातात. पर्यटन हेही उत्पन्नाचे मोठे साधन आहे.
देवाघरचे हे समृद्ध निसर्ग वैभव एक प्रवासी म्हणून आपल्याला आवडते परंतु तिथल्या सर्वसामान्य माणसाचे जीवन फार कष्टाचे, गरिबीचे आहे.
आक्रमक घुसखोर स्वभावाला अनुसरून चिनी ड्रॅगनने आपला विळखा जवळजवळ सर्व आफ्रिकेला घातला आहे. एअरपोर्ट, बंदरे, रस्ते अशा सोयी उभारून देणे, त्यासाठी प्रचंड कर्ज देणे आणि कर्ज फेड न झाल्याने ते प्रोजेक्ट गिळंकृत करणे अशी ही कार्यशैली आहे.( याबाबतीत नेपाळ व श्रीलंकेचे उदाहरण आहेच). आफ्रिकेतील शेतजमिनी, खाणी यामध्ये चीनने प्रचंड गुंतवणूक केली आहे. केनियामध्येही चिनी गुंतवणुकीचा वाढता ओघ आहे.
नैसर्गिक व खनिज संपत्तीचे वरदान असलेल्या या देशांना ब्रिटनने आधीच लुटले आहे. आता देशातील सर्वसामान्य माणसाच्या प्रगतीसाठी, देशाच्या प्रगतीसाठी केनिया आणि इतर आफ्रिकी देशांनी चिनी कर्जांच्या काटेरी सापळ्यात न अडकता पुढील वाटचाल केली तर ते हितावह होईल. पण…….
☆|| जय गिरनारी – एक यात्रा || ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆
(1) ‘गोरख’शिखर, ‘गुरु’शिखर आणि ‘अंबा माता’ शिखर (घंटा) (उजवीकडून डावीकडे) (2) सोमनाथ मंदिर (समोर सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा दिसत आहे)
गुजरातमधील ‘सोमनाथ’ हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक देवस्थान आणि ‘गिरनार’ हे दत्तात्रेयांचा वास असलेले जागृत गिरीस्थान हयापलीकडे मला दोन्हीबद्दल कणमात्रही माहिती नव्हती. बरेच लोक तिकडे जाऊन आल्यावर त्यांच्याकडून काही माहिती कानी पडायची “खूप भारी आहे…” वगैरे. पण ती तितक्याच त्वरेने एका कानाने ऐकून दुसर्या कानाने विसरून जायची. काही वर्षांपूर्वी माझी आई व आत्या ‘सोमनाथ’ला जाऊन आल्यामुळे तिकडील काही फोटो पहायला मिळाले होते. परंतु मी स्वत: कधी उठून तिकडे जाईन असे कधी वाटले नव्हते… तेही एप्रिलच्या रणरणत्या उन्हाळ्यात आणि तेही सुट्टीच्या सीजनला, रेल्वेची टिकीटे सर्व फुल्ल असताना आयत्या वेळेला बुकिंग करून…
पण म्हणतात ना, योग जर असेल तर सर्व गोष्टी आपोआप जुळून येतात. आमचेही थोडेफार असेच झाले. रेल्वेची प्रतीक्षा यादीत खोलवर असलेली तिकिटे अगदी आदल्या दिवशी RAC / CNF होत गेली आणि पाहतापाहता मित्र गणेश दाबक, धनंजय जोशी हयांसोबत मी बुधवार १३एप्रिल रोजी रात्रौ ८:३० च्या पुणे-अहमदाबाद रेल्वे मधून निघालो सुध्दा…
सकाळी ७:३० ला अहमदाबाद स्टेशन आल्यावर फलाटावरील स्टॉल वर ताजा ढोकळा, त्यावर गोडसर कढी, सामोसे आणि चहा असा चविष्ट नाष्टा झाला. तासाभराने जबलपूरहून आलेल्या ‘सोमनाथ’ च्या ट्रेन मध्ये बसलो. जूनागढ स्टेशन जवळ येत असतानाच आम्हाला गिरनार शिखरांचे “दुरून डोंगर साजरे” असे छान दर्शन झाले. आकाशात उंचचउंच घुसलेली शिखरे बघून खरे तर छाती दडपून गेली होती.
संध्याकाळी ६ वाजता सोमनाथला पोहोचलो. छोट्या टुमदार रेल्वे स्टेशनातून रिक्षाने बाहेर पडल्यावर एक म्हातारा रिक्षावाला सामोरा आला. तो जरा नियम पळून सावकाश रिक्षा चालवेल ह्या विचाराने त्याच्याबरोबर बाहेर आलो. त्याची रिक्षाही जवळपास त्याच्याच वयाची होती. पण गियर टाकून सुरुवातीलाच बुवांनी मेन रोड वर ट्राफिकच्या उलट दिशेने रिक्षा वळवल्यावर आमच्या भुवया वर गेल्या. दहा मिनिटातच सोमनाथ मंदिराच्या मागील ‘कृष्णा’ हॉटेलमध्ये मुक्कामी पोहोचलो.
(1) सोमनाथचा समुद्रकिनारा व डाईक्स (2) १०,००० किमी समुद्र असल्याचे दर्शवणारा बाणस्तंभ
चहा-आंघोळ आवरून मंदिरात पोहोचेपर्यंत ‘सोमनाथा’ची आरती सुरू झाली होती. मोठ्या आवाजात ढोल लयबद्ध वाजत होते, त्यामुळे मंदिरात एक वेगळेच वातावरण निर्माण झाले होते. शेवटीशेवटी द्रुत लयीत गजर होऊन आरती संपली. संध्याकाळाचा छान समुद्री वारा खात आम्ही त्या विस्तीर्ण मंदिराभोवती एक फेरफटका मारला. तिथेच आम्हाला ‘दिशादर्शक बाण’ पहायला मिळाला जो हिन्दी महासागरात १०००० किलोमीटर जमीन नसल्याचे दर्शवितो. गर्दी असूनही सगळीकडे निखालस स्वच्छता आणि चोख व्यवस्था होती.
आरतीनंतर मंदिरामागेच ‘लेजर शो’ झाला ज्याला दमदार commentary दस्तूरखुद्द अमिताभ बच्चन ह्यांची होती. पुराणकाळापासून ते सोन्याचांदी-हिरेमाणकाने मढवलेले सर्वात वैभवशाली मंदीर बनेपर्यंत पासून ते गझनीचा मुहम्मद व इतर मुघल आक्रमकांनी अनेकवेळा लुटलेले, ते आधुनिक काळापर्यंत पुनर्बांधणी करून सरदार पटेलांनी उभारलेले, असा सर्व चित्र-इतिहास जवळजवळ सहा-सात मजले उंच अशा त्या भव्य मंदिरावरच लेझर ने प्रोजेक्ट केलेला पाहणे आणि ऐकणे हा खूपच छान अद्भुत अनुभव होता…कुणीही चुकवू नये असा!
‘लेजर शो’ संपल्यावर आम्ही शंखांच्या दुकानात फिरायला गेलो. चांगल्या शंखांच्या किमती रु. १३००-१५०० च्या पुढेच होत्या. आत्ताच खरेदी केला आणि नंतर घरी रोजच्यारोज वाजवला नाही तर बायको शंख करेल, अशी एक भीतीही मनाला चाटून गेली. कधीकाळी दक्षिणेत ‘रामेश्वर’ला जाऊ तेव्हा सस्त्यात खरेदी करू, असे मनाशी ठरवून विचार रद्द केला.
दुसर्या दिवशी सकाळी उठलो आणि आवरून होटेलच्या मागेच असलेले अहिल्याबाई होळकरांनी बांधलेले मूळ दगडी शिवमंदीर पहायला गेलो. दर्शन घेऊन परत येताना छोट्या गल्लीमधील एका नाश्त्याच्या गाडीवर थांबून जिलेबी, ढोकळा, फाफडा असा फक्कड गुजराती नाश्ता केला.
हॉटेल मालकास एव्हाना सुपरिचित असलेल्या धनंजय जोशींनी (त्यांची ही २८ वी गिरनार भेट होती!) आदल्या दिवशी ठरवल्याप्रमाणे ठीक ११ वाजता ‘बाबू’ रिक्षावाला हॉटेलात हजर झाला. आम्हा तिघांना घेऊन मग त्याने जवळपासच्या मंदिरांचा फेरफटका मारून आणला. त्यामध्ये ‘त्रिवेणी संगम’, ‘गोलकधाम मंदीर’, ‘सूर्य मंदीर, ‘हनुमान मंदीर, ‘श्रीराम मंदीर, ‘शशीमोचन महादेव’, ‘पाटण प्रभास’, ‘भालका तीर्थ’ ह्यांचा समावेश होता.
कपिला, हिरण आणि सरस्वती (लुप्त) ह्या नद्यांच्या त्रिवेणी संगमावर घाट आहे आणि काही sea gull पक्षी उडत होते. ते सूर मारून तुमच्या हातातील खाऊ उचलून नेतात. त्यांना भरवण्यासाठी आम्ही बिस्किटेही घेतली पण उन्हे वाढली असल्याने पक्ष्यांनी आमच्याकडे चोचही न फिरवून सपशेल दुर्लक्ष केले. मग तिथल्याच एका धष्टपुष्ट गीर गाईला आम्ही बिस्किटे खिलवून टाकली.
‘गोलकधाम मंदीर’ इथून हिरण नदीचे छान दर्शन घडते. इथे श्रीकृष्ण मंदिरामध्ये गीतेचे संपूर्ण अठरा अध्याय कोरलेले आहेत. ह्यास्थानी भगवान श्रीकृष्णांनी मृगयेस आलेल्या भिल्लाच्या हातून स्वत:च्या पावलास तीर मारवून घेऊन आपला अवतार समाप्त केला, अशी आख्यायिका आहे. इथे त्यांच्या चरण पादुका आहेत. तसेच बंधू बलरामांनीही इथे आपला अवतार समाप्त केला असे मानतात. मागल्या बाजूस श्रीकृष्ण आणि बलराम यांचे पाळणाघरही बघायला मिळते.
इथून पुढे सूर्यमंदीर पाहून आलो. बर्यापैकी मोडकळीस आलेले दिसले. एकंदरीत सर्व जी मंदिरे होती ती पुराणकाळातील आख्यायिकांशी निगडीत आणि जुनी होती. श्रीराम मंदीर आणि ‘भालका तीर्थ’ फक्त आधुनिक काळातील बांधलेले वाटले. असो.
‘भालका तीर्थ’ इथून रिक्षा पळवली ती थेट सोमनाथ रेल्वे स्टेशन कडे. १२:३० च्या रेल्वे ने निघून अडीच तासांत आम्ही पोहोचलो ते जुनागढला. हॉटेल ‘मंगलम’ इथे छान गुजराती थाळी जेवून थोडा वेळ हॉटेल रूममध्ये विश्रांति घेतली. आमच्या हॉटेल रूममधून ‘उडनखटोला’ (मराठीत ‘रोप वे’) वर-खाली करताना दिसत होते. आम्हाला आता पुढील वेध लागले होते ते म्हणजे ‘गिरनार’चे चढाईचे…
संध्याकाळी साडेचारच्या सुमारास आम्ही हॉटेल लॉबीमध्ये जमलो. बाहेरच ट्रेकिंगसाठी काठ्या भाड्याने मिळाल्या. त्या घेऊन जवळच असलेल्या सुसज्ज अशा उडनखटोलाच्या तळस्थानकाला चालत पोहोचलो. मात्र तिथे सिक्युरिटीने आमच्या ब्यागांमधील पाण्याच्या सर्व बाटल्या काढून फेकून द्यायला लावल्या. अर्थात आतमध्ये पाण्याच्या बाटल्या विकत मिळत होत्या.J लवकरच उडनखटोलाच्या पाळण्यात बसून आम्ही झर्रकन निघालो. चांगल्यापैकी वेगाने खेचत वरवर जात होतो. खालून पायर्यांचा मार्ग दिसत होता अर्थात ह्या वेळेस फारसे कुणी दिसले नाहीत.
साधारण दहा-बारा मिनीटातच आम्ही ‘अंबा माता’ मंदिरापाशी पोहोचलो. फारशी गर्दी नसल्याने छान दर्शन झाले. खाली जाणार्यांसाठी सहा वाजता पाळण्याची शेवटची फेरी असल्याचे स्पीकरवर ओरडून सांगत होते.
प्रथम पंक्ति (1) उडनखटोलेवाले राही (2) गोरख शिखरावरून दिसलेले गुरुशिखर, मागे लक्ष्मी शिखर, तळाशी धुनी आणि आकाशात पौर्णिमेचा चंद्र
द्वितीय पंक्ति (1) गुरुशिखर (2) चंद्र आहे साक्षीला (3) पुणेकर ‘गिरनारी’ कुटुंबीय
वीसपंचवीस मिनीटानी आम्ही पुढील म्हणजे ‘गोरख’ शिखराकडे निघालो. इथे वारा एकदम भन्नाट होता, त्यामुळे उकाडा अजिबात जाणवत नव्हता. साधारण अर्ध्या-पाऊण तासात आम्ही तिथे पोहोचलो. गोरखनाथांचे वास्तव्य असल्याने ह्या स्थानाला विशेष महत्व आहे. इथे एक धुनी कायम प्रज्वलित असते. इथेच आम्हाला घोलप नावाचे चिंचवडला राहणारे एक भक्त भेटले. ते आले की तीन-तीन महीने इथे यात्रिकांच्या सेवेसाठी म्हणून शिखरावर वास्तव्याला असतात. बोलताबोलता त्यांनी ‘गुरुशिखरा’चा उल्लेख ‘हेडक्वार्टर’ असा केला ते विशेष वाटले.
पुढे गुरुशिखराकडे प्रयाण केले. ह्या पायर्या प्रथम खाली उतरून नेतात आणि मग गुरुशिखराकडे चढत नेतात. अर्थात इथेही एखाद्या गडावर बघायला मिळतो त्याप्रमाणे पायर्यांच्या कडेला भक्तमंडळींनी प्लास्टिकच्या बाटल्या आणि पिशव्या टाकून कचरा केलेला दिसत होताच. एव्हाना संध्याकाळ व्हायला लागली आणि पायर्यांच्या बाजूचे दिवे उजळल्याने पुढची मार्गक्रमणा सोपी झाली. शिवाय थोड्या वेळात पौर्णिमेचा चंद्र उगवल्याने शिखरे प्रकाशमान दिसू लागली.
‘गुरुशिखरा’पाशी पोहोचायला साधारण एक तास लागतो. सुदैवाने इथेही फारशी गर्दी नसल्याने ‘चरण पादुकां’चे पाच-एक मिनिटे शांत आणि पवित्र वातावरणात छान दर्शन घडले. हा आमच्या यात्रेचा मिटल्या डोळ्यांनी आपले अस्तित्व विसरायला लावणारा, एक विलक्षण आनंदाची अनुभूती देणारा क्षण होता. मंदिरातील साधूने कपाळाला गंध लावल्यावर आम्ही मंदिरातून बाहेर पडलो व पायर्या उतरायला लागलो. तिथेच जगन्नाथपुरी वरून आलेले एक जटाधारी ‘चिलीम’ साधू भेटले. त्यांच्याशी आध्यात्मिक, राजकीय, रशिया-युक्रेन युध्द, पुरीचे मंदीर, भविष्य अशा विविध विषयांवर काही विलक्षण गप्पा झाल्या.
तिथून मग परतीच्या प्रवासास सुरुवात केली. तत्पूर्वी एक टप्पा पार करायचा होता तो म्हणजे ‘धुनी’. ह्यासाठी मधूनच दुसरीकडे पायर्या उतरून जावे लागते.
उतरायला सुरुवात केली आणि तेवढ्यात आमच्या मागून कुणीतरी धडपडल्याचा आणि पाठोपाठ बायका ओरडल्याचा आवाज आला. वर जाऊन पहिले तर आमच्याबरोबरच्या कुटुंबातील बाई आणि त्यांची आठ-नऊ वर्षांची मुलगी अशा दोघी पाय सटकून चांगल्या दहा-बारा पायर्या गडगडत खाली आल्या होत्या. मुका मार चांगलाच लागला होता पण सुदैवाने कुणाला हाड फ्राक्चर वगैरे काही झाले नव्हते. त्यांना मग ‘धुनी’पर्यन्त उतरवले आणि तिथे थोडा प्रथमोपचार मिळाला. धुनीचे दर्शन घेऊन मग तिथेच जेवण-वजा प्रसाद घेतला. आता अंधारात परंतु दिव्यांच्या प्रकाशात परतीचा प्रवास करायचा होता तो ‘गोरख शिखर’ आणि नंतर ‘अंबा माता’ मंदिरांकडे.
गणेश आणि मी त्या मायलेकींना काठीचा आधार देत सर्वांच्या पुढे निघालो. आणि बोलण्यामध्ये गुंतवत असे उतरवले की त्यांना वेदनेचा विसर पडावा. शक्यतो न थांबता उतरत राहिलो. गोरख शिखरापाशी पोहोचल्यावर एक चहावाला सर्वांना सेवा म्हणून चहा देत होता. आता उतरणार्यान्पेक्षा चढणार्यांची संख्या वाढू लागली होती. परंतु कुठेही गर्दी होत नव्हती की ढकलाढकलीही होत नव्हती. एकमेकांना “जय गिरनारी” असे प्रोत्साहन देत सर्वजण उत्साहात पायर्या चढत किंवा उतरत होते. वाटेत पाण्याचे बाटल्या, लिम्बू सरबत,चहा-कॉफी वगैरेंची दुकाने लागतात त्यामुळे थकावट दूर होत होती. वृद्ध, वयस्कर मंडळींना पायर्या चढणे सोपे नव्हते पण तरीही निर्धाराने सर्वजण चालत होते. यात्रिक मंडळी बरीच मुंबई –पुण्याकडची असल्याने कानावर मराठीच जास्त पडत होते. मुंबईमधील एक दाम्पत्य त्यांच्या तरूण पण आंधळ्या मुलीला घेऊन आले होते. वडिलांच्या पाठीमागून त्यांच्या खांद्यावर हात ठेवून ती पायर्या उतरत होती. मात्र उन्हामुळे व अतिश्रमामुळे कदाचित तिला पित्ताचा त्रास व्हायला लागला. दुकानासमोरच्या एका बाजेवर निजवल्यावर तिला बरे वाटले.
आम्हाला ‘अंबा माता’ मंदीरापासूनच्या ५००० पायर्या उतरायला जवळपास चार तास (रात्रीचे १०:४० ते पहाटे २:४०) लागले. पायाचे आणि पावलांचे अगदी तुकडे पडायची वेळ आली होती. संध्याकाळी हेच अंतर पाळण्यात बसून अगदी आरामात दहा मिनिटात चढून गेलो होतो. होटेलात पोहोचलो तेव्हा कपडे घामाने चिंब ओले झाले होते. मस्तपैकी शॉवर घेऊन असे काही गुडुप्प झोपलो की बस्स! J
दुसर्या दिवशी १२:३० वाजताची वेरावळ-पुणे गाडी पकडायची होती. तत्पूर्वी जुनागढ मध्ये गुजरातची प्रसिद्ध अशी बांधणीची कापडे घेण्यासाठी गावात खरेदीला जायचे ठरवले. अस्खलित गुजराती बोलू शकणारा गणेश बरोबर असल्यामुळेच आम्ही हा बेत ठरवला. ‘कापड खरेदी’ म्हटल्यावर जावा-नणंदांची जोडीही आमच्याबरोबर यायला तयार झाली. गणेशने मग एका रिक्षावाल्याला गाठले आणि त्यासोबत काहीतरी ‘गुज्जु-गोष्टी’ करून त्याला पटवले. जुनागढ गावच्या बाजारातील एका गल्लीत तो आम्हाला घेऊन गेला. तिथे अर्ध्या-पाऊण तासात मनासारखी कापड खरेदी झाली. इथेही गणेशच्या ‘गुज्जु-भाषा’ ज्ञानाचा आम्हाला किमतीत घासाघीस करण्याकामी भरपूर फायदा झाला. मग रिक्षा रेल्वे स्थानकाकडे भरधाव पळवली. रेल्वे गाडी थोडी उशिरानेच आली. पुढील ‘पुणे’ प्रवासात आम्हाला काही ‘उणे’ पडले नाही. J
आयुष्यात “जय गिरनारी” म्हणून एकदा का ह्या पवित्र, निसर्गसुंदर गिरीस्थळी जाऊन आलात की तेच तुम्हाला पुन्हा पुन्हा बोलावत राहते असा अनेकांचा अनुभव आहे. पुढील बोलावणे कधी येतेय ह्याची आम्हीही आतुरतेने वाट पाहतोय!
☆ मी प्रवासिनी क्रमांक २५- भाग २ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆
कारीबू केनिया
मसाई लोकांचे छोटे घर बघायला गेलो. अगदी कोंदट, अंधारी जागा होती. त्यातच गवताचे पार्टिशन घातले होते. एका बाजूला मधोमध पेटती चूल व चुलीच्या दोन्ही बाजूंना झोपण्यासाठी मातीचे कट्टे होते. एका कट्ट्यावर छोटी मुलं व दुसऱ्या कट्ट्यावर आई-बाबा अशी झोपायची व्यवस्था होती. मागच्या भिंतीला छोटासा झरोका होता. जेवणासाठी लाकडी भांडी होती. जरा मोठी झालेली मुलं गवती पार्टिशनच्या पलीकडे अथवा आपल्या दुसऱ्या आयांकडे झोपतात. बाहेर आल्यावर तिथल्या पुरुषाने सिडार वृक्षाच्या लाकडावर सॅ॑डपेपर वूड घासून अग्नी तयार करून दाखविला.
बाजार बघायला गेलो. तिथे मण्यांच्या माळा, बांगड्या, लाकडी कंगवे, टोपल्या, मातीचे प्राणी, रंगविलेली बाउल, त्यांनी गुंडाळली होती तसली कापडं विकायला ठेवली होती. थोडी दूर असणारी नदी म्हणजे खळाळत वाहणारा गढूळ पाण्याचा ओढा होता. इथे अंघोळ, कपडे धुणे वगैरे चालते.
‘मसाई’ हाच मसाई लोकांचा धर्म आहे. प्राचीन परंपरांची जोखडं आपल्या खांद्यावरून उतरवायला ते तयार नाहीत. एका पुरुषाला कितीही लग्ने करण्याचा अधिकार आहे. मसाई स्त्रीचे आयुष्य अत्यंत कष्टप्रद आहे. स्त्री सतत बाळंतपणाच्या चक्रातून जात असते. त्यामुळे स्त्रिया कुपोषित, मुले कुपोषित व बालमृत्यूचे प्रमाणही अधिक आहे. जितकी अधिक मुले तितकी अधिक श्रीमंती अशी समजूत आहे.
पहाटे सुरू होणारा मसाई स्त्रीचा दिवस, मध्यरात्र झाली तरी संपत नाही. एकेका स्त्रीला पंधरा-पंधरा गाईंचे दूध काढावे लागते. दूध हे तिथले मुख्य अन्न आहे. कुटुंबातील सर्वांचे दूध घेऊन झाले की उरलेले दूध स्त्रीच्या वाट्याला येते.तिला लांबवर जाऊन डोक्यावरून पिण्याचे पाणी आणावे लागते. जंगलात जाऊन चुलीसाठी लाकूडफाटा गोळा करणे हे तिचेच काम! त्यावेळी जंगलातील हत्ती, रानटी म्हशी, सिंह, साप यांची भीती असते. एका वेळी ३०-४० किलो सरपण तिला आणावे लागते कारण घर उबदार ठेवणे आणि घरातला अग्नी सतत पेटता ठेवणे ही तिचीच जबाबदारी! राख, चिखल, गवत वापरून घर बांधण्याचे, गळके घर दुरुस्त करण्याचे कामही स्त्रियाच करतात. स्वयंपाक करणे, घर सारवणे, कपडे धुणे, गाई धुणे, गाभण गाईंवर, आजारी गाईंवर लक्ष ठेवणे, परंपरागत झाडपाल्याची औषधे गोळा करणे, कधी लांबच्या बाजारात जाऊन गाय देऊन मका, बीन्स, बटाटे खरेदी करणे अशी तिची खडतर दैनंदिन असते. भरीला नवऱ्याची मारझोडही असतेच.
एवढ्या मालमत्तेची देखभाल केली तरी या मालमत्तेवर मसाई स्त्रीचा कोणताही हक्क नसतो. त्या समाजात घटस्फोट मान्य नाही. स्त्रीचे परत लग्न होत नाही. नवऱ्याच्या अनेक बायकातील एक आणि मुलांना जन्म देणारी असे तिचे स्थान आहे. जेवणात गाई, शेळ्या- मेंढ्या यांचे मांस वापरले जाते. मारलेल्या जनावरांचे मांस, हाडे, कातडी यांची नीट व्यवस्था तिला करावी लागते. या साऱ्यातून वेळ काढून ती हौसेने स्वतःसाठी, मुलांसाठी व नवऱ्यासाठीसुद्धा मण्यांच्या, खड्यांच्या माळा बनविते. ब्रेसलेट, बांगड्या, कानातले दागिने बनविणे हे उद्योगसुद्धा करते. एवढेच नाही तर दर दहा वर्षांनी स्थलांतर केले जाते त्याचीही जबाबदारी तिच्याकडेच असते.
आजही अनेक अघोरी प्रकार तिथे पाहायला मिळतात. आठवड्यातून एकदा एका गायीच्या मानेजवळील शीर कापून तिचे रक्त दुधात घालून सर्वांनी घेण्याची प्रथा आहे. त्या गाईच्या जखमेवर झाडपाल्याचे औषध लावून तिला नंतर रानात सोडून देतात. आणखी एक अघोरी प्रथा म्हणजे मुली ११ ते १३ वर्षांच्या असताना म्हणजेच त्या वयात येताना त्यांचा योनीविच्छेद(Female circumcision ) करण्यात येतो. म्हणजे स्त्रीच्या योनीतील लैंगिक अवयव थोडा अथवा पूर्णपणे काढून टाकण्यात येतो. हे काम इतर स्त्रिया धारदार शस्त्राने, कसलीही भूल वगैरे न देता करतात. त्यावेळी जी मुलगी ओरडेल ती भित्री समजली जाते. स्त्रीची कामेच्छा कमी व्हावी या हेतूने ही पूर्वपार चालत आलेली प्रथा आहे. यात जंतुसंसर्ग होऊन, अतिरक्तस्त्राव होऊन किती स्त्रियांचा बळी जात असेल ते त्या मसाईनाच माहित!
नैरोबीला एका हॉटेलच्या आवारात एक सरळसोट उंच, हिरवा, जाड बुंध्याचा वृक्ष आणि त्याला अगदी लगटून वाढलेले फड्या निवडुंगाचे उंच झाड वेगळे वाटले म्हणून कुतूहलाने बघत मी उभी होते. तेंव्हा तिथल्या वेटरने माहिती दिली की या मोठ्या झाडाने त्या फड्या निवडुंगालाच आपले खाद्य बनविले आहे. परत नीट बघितल्यावर लक्षात आले की त्या निवडुंगाच्या काट्यासकट दोन फांद्या अर्ध्या- अर्ध्या संपल्या आहेत. असं वाटलं की मसाई जमातीतील अमानुष प्रथा, परंपरा, रुढी यांच्या राक्षसी झाडाने मसाई स्त्रीची काटेरी वाटसुद्धा गिळून टाकली आहे. तिचा जीवनरस शोषून घेतला आहे.
सरकारतर्फे मसाईंना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात येतात. त्यांच्या वसाहतीला जवळ पडेल अशी शाळा बांधण्यात येते. मुलींना शाळेत न पाठविल्यास तुरुंगवासाची शिक्षा आहे. प्रत्यक्षात आम्ही पाहिले तेंव्हा मुली लहान भावंडांना सांभाळीत होत्या आणि शाळेतून नुकताच परत आलेला, समुहप्रमुखाचा युनिफॉर्ममधील मुलगा छान, स्वच्छ, चुणचुणीत वागत- बोलत होता. त्यांच्यातील काही धडपड्या महिलांनी अनेक कष्ट, हाल- अपेष्टा, पुरुषांचा मार सोसून शिक्षण घेतले आहे. आपल्या व्यथा, आपल्यातील वाईट प्रथा उघड्या केल्या आहेत. स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने काही काम सुरू केले आहे. मसाई स्त्रियांना भाजीपाला, फळे लावायला शिकविणे, शिवण शिकविणे, लिहा- वाचायला शिकविणे, प्राथमिक आरोग्याचे शिक्षण देणे अशी त्यांची अनेक उद्दिष्टे आहेत. अशा प्रकारच्या शिबिरांमध्ये रेडक्रॉसचे डॉक्टर कुटुंब नियोजनाच्या गोळ्या देतात. आपली बायको असे औषध वापरत आहे हे नवऱ्याच्या लक्षात आल्यास तिला अमानुष मार पडतो.
नुसत्या भाल्याने सिंहाची शिकार करणारे मसाई पुरुष अजून तरी बाह्य जगाच्या दबावाला पुरेसा प्रतिसाद देत नाहीत. सरकारलाही थोडे त्यांच्या कलाने घ्यावे लागते. स्वतःचे आरामशीर, आळशी आयुष्य सोडायला मसाई पुरुष सहजासहजी तयार होणार नाहीतच. जर त्यांच्या मुलांना चांगल्या शिक्षणाच्या संधी मिळाल्या तर कालांतराने मसाई स्त्रीचे जीवन सुसह्य होऊ शकेल.
केनियामधील दुसऱ्या एका लॉजच्या कंपाउंडला षटकोनी लांबट आकाराचा, निवडुंगाचा खूप मोठा जाड बुंधा असलेला वृक्ष बघायला मिळाला. त्याच्या शेंड्यावर पिवळट फुलांचे मोठे गुच्छ आले होते. गाईड म्हणाला की या झाडावर पंचवीस- तीस वर्षांनी अशी फुलं येतात. मसाई स्त्रीच्या काटेरी वाटेवर काही वर्षांनी तरी आनंदाची फुलं फुलतील का? मसाई स्त्रियांच्या वाट्याला आलेले दुर्दैवी जीवन बघून खिन्न मनाने त्यांचा निरोप घेतला.
☆ मी प्रवासिनी क्रमांक २५- भाग १ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆
कारीबू केनिया
मुंबईहून विमानाने केनियाची राजधानी नैरोबी इथे उतरलो तेव्हा ‘कारीबू केनिया’ असे लिहिलेल्या, सुहास्यवदना ललनांच्या जाहिराती दिसल्या. गाईडने सांगितले की ‘कारीबू’ म्हणजे सुस्वागतम!
नैरोबीच्या हॉटेलमध्ये नाश्ता करून खूप लवकर निघालो. पाचशे किलोमीटर्सचा प्रवास करून ‘मसाईमारा’ या जगप्रसिद्ध नॅशनल रिझर्वमध्ये पोहोचायचे होते.आमच्या ‘टोयोटो लॅ॑डक्रुझर’ या दणकट गाडीचा ‘चक्रधर’ डॅनियल हा सुशिक्षित पदवीधर आणि बोलका होता. शेवटचे शंभर किलोमीटर रस्ता असा नव्हताच. उंच- सखल खडबडीत जमीन, गवत, झुडपे, पाण्याचे ओहोळ असे असलेला, प्रवासी गाड्यांच्या वाहतुकीने तयार झालेला, हाडं खिळखिळी करणारा तो जंगल मार्ग होता आणि डॅनियल म्हणत होता ‘हाकुना मटाटा, हाकुना मटाटा’. ‘नो प्रॉब्लेम, डोन्ट वरी. आणखी पुढे तुम्हाला खऱ्या जंगलाचा विलक्षण अनुभव मिळणार आहे त्याची ही पूर्वतयारी आहे!’
घनदाट जंगलातल्या हॉटेलमध्ये जेवण करून थोडी विश्रांती घेतली आणि गेम ड्राईव्हसाठी म्हणजे प्राण्यांच्या भेटीसाठी निघालो.
लँडक्रुझरमधून बाहेर मैलोगणती सोनेरी हिरवा गवताळ प्रदेश दिसत होता. निसर्गाच्या त्या भव्य कॅनव्हासवर काळे- पांढरे पट्टे असलेले झेब्रे, खाली माना घालून अखंड चरणाऱ्या थोराड, काळपट रानटी म्हशी, मोठ्या कानाचे हत्ती कळपांनी दिसत होते.सिंहाचे सहकुटुंब कळप होते. नाकावर दोन शिंगे असलेले गेंडे होते आणि सोनेरी तांबूस रंगाच्या हरिणांचे ( गेझल्स ) कळपच्या कळप दिसत होते. सिंह, हत्ती, रानटी म्हैस, बिबळ्या आणि गेंडा यांना इथे ग्रेट फाईव्ह म्हणतात त्यांचे मनसोक्त दर्शन झाले.
आफ्रिकन आणि आशियाई हत्तीखालोखाल, पांढरा गेंडा हा पृथ्वीवरील अवाढव्य प्राणी आहे. आपल्या कळपाची विशिष्ट हद्द ते स्वतःच्या एक प्रकारच्या उग्र गंधाने आखून घेतात. त्या हद्दीत इतर गेंडे आल्यास जीवघेणी मारामारी होते. लांबवर एक मोठा पक्षी गवतात काही टिपताना दिसला. दुर्बिणीतून पाहिल्यावर त्याची लांबलचक चोच नजरेत भरली. लाल ,काळी आणि पांढरी अशी तिरंगी चोच, पांढरे पोट आणि काळी पाठ असलेल्या या पक्षाला ‘सॅडल बिल्ड स्टॉर्क’ म्हणतात असे गाईडने सांगितले.
संध्याकाळ झाली होती. जोरदार पाऊस सुरु झाला होता. जंगल अनुभवून हॉटेलच्या दाराशी आलो तर इतर प्रवासी समोरच्या डोंगराकडे दुर्बिणी आणि कॅमेरे रोखून पहात होते. डोंगर माथ्यावर काळ्या ढगांचा गच्च पडदा होता. पावसात भिजत नीट निरखून पाहिले तर त्या डोंगराच्या खबदाडीत एक सिंहाचे कुटुंब शिकारीवर ताव मारीत होते. सिंहीणीने शिकार करून आपल्या कुटुंबासाठी इथे ओढून आणली होती आणि ती बाजूलाच पंजे चाटीत बसली होती. ‘जीवो जीवस्य जीवनम्’.
दुसऱ्या दिवशी मसाईंचे एक गाव बघायला गेलो. तीन- चार तासांचा जीपचा खडतर प्रवास होता. या प्रवासात वाटेत खूप ठिकाणी शेकडो गाई- गुरांचे अनेक कळप दिसत होते. त्यांच्याबरोबर होते उंचनिंच, काटक, कणखर मसाई पुरुष! त्यांनी कमरेला अर्ध्या लुंगीसारखे लाल, भगव्या रंगाचे वस्त्र गुंडाळले होते. मोठ्या डिझाईनची निळी, पिवळी चादर दोन्ही खांद्यांवरून गुंडाळून घेतली होती. हातात काठी, भाला आणि कमरेला धारदार सुरा होता. काही तरुणांच्या चेहऱ्यावर पांढऱ्या मातीने रंगविले होते. नुकतीच ‘सुंथा’ झालेले तरुण असे चेहरे रंगवितात अशी माहिती आमच्या ड्रायव्हरने दिली.
मसाई गावात पोचल्यावर तिथल्या एकाने इंग्लिशमधून बोलायला सुरुवात केली. तो व तिथल्या गावप्रमुखांनी जवळच्या मोठ्या गावात जाऊन शालेय शिक्षण घेतल्याचं कळलं. आधीच ठरविलेले डॉलर्स हातात पडल्यानंतर तिथल्या गावप्रमुखांनी डोक्यावर सिंहाच्या आयाळीची टोपी आणि हातात रानटी म्हशीचे लांब, वेडेवाकडे शिंग तोंडाजवळ आडवे धरून आमचे स्वागत केले. आम्ही दिलेले डॉलर्स मुलांच्या शाळेसाठी वापरण्यात येतात असेही त्याने सांगितले. साधारण तीनशे लोकवस्तीचे हे गाव. त्यांचा मूळ पुरुषही मध्येच डोकावून गेला. त्याला १७ बायका व ८७ मुले असल्याचे सांगण्यात आले. म्हणजे हे छोटं गाव एका पुरुषाच्या भल्या मोठ्या कुटुंबाचा विस्तार होता.
गोलाकार मोठ्या कुंपणाच्या कडेने छोट्या चौकोनी झोपड्या होत्या. माती, शेण, गवत यांनी बांधलेल्या त्या झोपड्यांवर घट्ट विणलेल्या गवताचे उतरते छप्पर होते. गाई- गुरांचे शेण सर्वत्र पडलेले होते. माशा घोंगावत होत्या. छोट्या मुली कडेवर भावंड घेऊन आमच्याकडे टुकूटुकू बघत होत्या. काही छोटी मुलं खाली जमिनीवर झोपली होती. मुलांच्या सर्वांगावर माशा बसत होत्या. शेणाचा धूर करून या माशांना हाकलत का नाही असं विचारल्यावर,’ या माशा प्रेमाचे प्रतीक आहेत. जितक्या जास्त माशा अंगावर तितके त्यांचे नशीब चांगले’ असे निरुत्तर करणारे उत्तर मिळाले.
आमच्या स्वागतासाठी आठ-दहा मसाई स्त्रिया अर्धगोलाकार उभ्या राहून नाच करू लागल्या. त्यांचा नाच म्हणजे केवळ उंच उड्या व अधून मधून किंचाळल्यासारखे ओरडणे होते. मग आमच्यातील काहीजणींनी त्यांना फुगड्या घालून दाखविल्या. गरबा खेळून दाखविला. तेव्हा त्यांनीसुद्धा आमच्याबरोबर फुगड्या घातल्या. सर्व स्त्रियांनी एका खांद्यावरून पदर घेऊन, अंगाभोवती वस्त्र गुंडाळले होते. आणि पाठीवरून एक वस्त्र घेऊन त्याची पुढे गाठ बांधली होती. लाल, पिवळ्या, भगव्या, निळ्या रंगांची ती मोठ्या डिझाईनची वस्त्रं होती. सर्वांच्या डोक्याचे गोटे केलेले होते. गळ्यात, हातात रंगीत मण्यांच्या भरपूर माळा होत्या. कानामध्ये मण्यांचे इतके जड अलंकार होते कीत्यांचे कान फाटून मानेपर्यंत लोंबत होते.