सौ. पुष्पा चिंतामण जोशी
मीप्रवासीनी
☆ मी प्रवासिनी क्रमांक- ९ – जगदलपूर ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆
बोरा केव्हज् पाहून आम्ही बसने आरकू व्हॅली इथे मुक्कामासाठी निघालो. खरं म्हणजे विशाखापट्टणम ते छत्तीसगडमधील जगदलपूर हा आमचा प्रवास किरंडूल एक्स्प्रेसने होणार होता. ही किरंडूल एक्सप्रेस पूर्व घाटाच्या श्रीमंत पर्वतराजीतून, घनदाट जंगलातून, ५४ बोगद्यांमधून प्रवास करीत जाते म्हणून त्या प्रवासाचे अप्रूप वाटत होते. पण नुकत्याच पडलेल्या धुवांधार पावसामुळे एका बोगद्याच्या तोंडावर डोंगरातली मोठी शिळा गडगडत येऊन मार्ग अडवून बसली होती. म्हणून हा प्रवास आम्हाला या डोंगर-दर्या शेजारून काढलेल्या रस्त्याने करावा लागला. हा प्रवासही आनंददायी होता. रूळांवरील अडथळे दूर सारून नुकत्याच सुरू झालेल्या मालगाडीचे दर्शन अधूनमधून या बस प्रवासात होत होते. प्रवासी गाडी मात्र अजून सुरू झाली नव्हती. अनंतगिरी पर्वतरांगातील लावण्याच्या रेशमी छटा डोळ्यांना सुखवीत होत्या.भाताची पोपटी, सोनसळी शेते, तिळाच्या पिवळ्याधमक नाजूक फुलांची शेती आणि मोहरीच्या शेतातील हळदी रंगाचा झुलणारा गालिचा, कॉफीच्या काळपट हिरव्या पानांचे मळे आणि डोंगर कपारीतून उड्या घेत धावणारे शुभ्र तुषारांचे जलप्रपात रंगाची उधळण करीत होते.
गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या यांचे कळप चरायला नेणारे आदिवासी पुरुष, लाकूड-फाटा आणि मध, डिंक, चिंचा, आवळे, सीताफळे असा रानमेवा गोळा करून पसरट चौकोनी टोपल्यातून डोक्यावरून घेऊन जाणाऱ्या आदिवासी स्त्रिया मधून मधून दिसत होत्या. या स्त्रिया कानावर एका बाजूला उंच अंबाडा बांधतात. त्यावर रंगीबेरंगी फुलांच्या, मण्यांच्या माळा घालतात. घट्ट साडी नेसलेल्या, पायात वाळे आणि नाकात नथणी घातलेल्या तुकतुकीत काळ्या रंगाच्या या स्त्रिया भोवतालच्या निसर्गचित्राचा भव्य कॅनव्हास जिवंत करीत होत्या. आरकू म्हणजे लाल माती.आरकू व्हॅली व परिसरातील आदिवासींना, वनसंपत्तीला संरक्षण देणारे विशेष कायदे आंध्र प्रदेश सरकारने केले आहेत. व्हॅलीतील सुखद,शीतल वास्तव्य अनुभवून आम्ही छत्तीसगडमधील जगदलपूर इथे जाण्यासाठी निघालो.
जगदलपूर हे बस्तर जिल्ह्याचे मुख्यालय आहे. बस्तरच्या खाणाखुणा पाषाण युगापर्यंत जातात. प्राचीन दंडकारण्याचा हा महत्वपूर्ण भूखंड आहे. हा सर्व भाग घनदाट जंगलसंपत्तीने, खनिजांनी समृद्ध आहे.साग आणि साल वृक्ष, बांबूची दाट बने, पळस यांचे वृक्ष तसेच चिरोंजी, तेंदूपत्ता,सियारी म्हणजे पळस, आंबा, तिखूर सालबीज, फुलझाडूचे गवत, रातांबा आणि कित्येक औषधी वनस्पतींनी श्रीमंत असं हे जंगल आहे. या पूर्व घाटातील बैलाडीला या पर्वतरांगांमध्ये अतिशय उच्च प्रतीच्या लोहखनिजाचे प्रचंड साठे आहेत. ब्रिटिशांनी दुर्गम प्रदेशातील या खनिजसंपत्तीचा शोध लावला. बस्तर संस्थानच्या भंजदेव राजाला फितवून त्यांना हैदराबाद प्रमाणेच हे संस्थान स्वतंत्र ठेवायचे होते. भारताची आणखी मनसोक्त लूट करायची होती. पण पोलादी पुरुष सरदार वल्लभाई यांनी १९४८साली बस्तर संस्थान खालसा केले. विशाखापट्टणम ते जगदलपुर ही पूर्व घाटातून ५४ बोगदे खणून बांधलेली रेल्वे जपानने बांधून दिली. १९६० साली जपानबरोबर ४० वर्षांहूनही अधिक वर्षांचा करार करण्यात आला. बैलाडीलातील समृद्ध लोहखनिज खाणीतून काढून कित्येक किलोमीटर लांबीच्या सरकत्या पट्ट्यांवरून मालगाड्यात भरले जाते. तिथून ते विशाखापट्टणमला येते आणि थेट जपानला रवाना होते. कारणे काहीही असोत पण जपानबरोबरचा हा करार अजूनही चालूच आहे. ब्रिटिशांच्या, जपान्यांच्या बुद्धिमत्तेचे, चिकाटीचे, संशोधक वृत्तीचे कौतुक करावे की वर्षानुवर्षे त्यांनी आपल्या देशाची केलेली लूट पाहून विषाद मानावा अशी संभ्रमित मनस्थिती होते.
भाग-१ समाप्त
© सौ. पुष्पा चिंतामण जोशी
जोगेश्वरी पूर्व, मुंबई
9987151890
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈