डाॅ. निशिकांत श्रोत्री
इंद्रधनुष्य
☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २४ : ऋचा : ६ ते १० ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆
☆
ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २४ (अनेक देवतासूक्त)
ऋषी – शुनःशेप आजीगर्ति : ऋचा ६-१० : देवता वरुण
ऋग्वेदातील पहिल्या मंडलातील चोविसाव्या सूक्तात शुनःशेप आजीगर्ती या ऋषींनी अनेक देवतांना आवाहन केलेले असल्याने हे अनेक देवता सूक्त म्हणून ज्ञात आहे. यातील पहिली ऋचा प्रजापतीला, दुसरी ऋचा अग्नीला, तीन ते पाच या ऋचा सवितृ देवतेला आणि सहा ते पंधरा या ऋचा वरुण देवतेला आवाहन करतात. आज मी आपल्यासाठी वरुण देवतेला उद्देशून रचलेल्या सहा ते दहा या ऋचा आणि त्यांचे मराठी गीत रुपांतर सादर करीत आहे.
मराठी भावानुवाद :
☆
न॒हि ते॑ क्ष॒त्रं न सहो॒ न म॒न्युं वय॑श्च॒नामी प॒तय॑न्त आ॒पुः ।
नेमा आपो॑ अनिमि॒षं चर॑न्ती॒र्न ये वात॑स्य प्रमि॒नन्त्यभ्व॑म् ॥ ६ ॥
☆
अविरत वाहत स्रोत जलाचा पक्षीराज व्योमीचे
देवांनी जे दूर सारले कुदर्प वायूंचे
पासंगा तुमच्या ना कोणी तुम्ही बहुथोर
शौर्य तुमचे सामर्थ्य तसे कोप तुझा अति घोर ||६||
☆
अ॒बु॒ध्ने राजा॒ वरु॑णो॒ वन॑स्यो॒र्ध्वं स्तूपं॑ ददते पू॒तद॑क्षः ।
नी॒चीनाः॑ स्थुरु॒परि॑ बु॒ध्न ए॑षाम॒स्मे अ॒न्तर्निहि॑ताः के॒तवः॑ स्युः ॥ ७ ॥
☆
अमर्याद विस्तीर्ण व्योमा नाही आधार
पराक्रमी वरुणाने दिधला तरुस्तंभ आधार
विचित्र त्याचे रूप आगळे बुंधा त्याचा वर
अंतर्यामी त्याच्या आहे वसले अमुचे घर ||७||
☆
उ॒रुं हि राजा॒ वरु॑णश्च॒कार॒ सूर्या॑य॒ पन्था॒मन्वे॑त॒वा उ॑ ।
अ॒पदे॒ पादा॒ प्रति॑धातवेऽकरु॒ताप॑व॒क्ता हृ॑दया॒विध॑श्चित् ॥ ८ ॥
☆
सूर्याच्या मार्गक्रमणास्तव वरूणे विस्तृत केला
अतिचिंचोळ्या वाटेचा तो राजमार्ग बनविला
क्लेशकारी जे असते अप्रिय दुसऱ्यासी बोला ना
वरुणदेव करी अति आवेगे त्याची निर्भत्सना ||८ ||
☆
श॒तं ते॑ राजन्भि॒षजः॑ स॒हस्र॑मु॒र्वी ग॑भी॒रा सु॑म॒तिष्टे॑ अस्तु ।
बाध॑स्व दू॒रे निर्ऋ॑तिं परा॒चैः कृ॒तं चि॒देन॒ः प्र मु॑मुग्ध्य॒स्मत् ॥ ९ ॥
☆
वरूण राजा तुमच्या जवळी ओखदे अनंत
अखंड दैवी तुझ्या कृपेने व्याधींचा हो अंत
गृहपीडेचे अमुच्या, देवा निर्मूलन हो करा
हातून घडल्या पापांपासून आम्हा मुक्त करा ||९||
☆
अ॒मीय ऋक्षा॒ निहि॑तास उ॒च्चा नक्तं॒ ददृ॑श्रे॒ कुह॑ चि॒द्दिवे॑युः ।
अद॑ब्धानि॒ वरु॑णस्य व्र॒तानि॑ वि॒चाक॑शच्च॒न्द्रमा॒ नक्त॑मेति ॥ १० ॥
☆
उंच नभांगणी ही नक्षत्रे चमचमती रात्री
तारकाधिपती चंद्रही उजळुन झळकतसे रात्री
अहोसमयी ना दर्शन त्यांचे कुठे लुप्त होती
आज्ञा या तर वरुणाच्या ना उल्लंघुन जाती ||१०||
☆
(या ऋचांचा व्हिडीओ गीतरुपात युट्युबवर उपलब्ध आहे. या व्हिडीओची लिंक देखील मी शेवटी देत आहे. हा व्हिडीओ ऐकावा, लाईक करावा आणि सर्वदूर प्रसारित करावा. कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करावे.)
https://youtu.be/j3hYU5Nri74
Attachments area
Preview YouTube video Rugved Mandal 1 Sukta 24 Rucha 6 – 10
Rugved Mandal 1 Sukta 24 Rucha 6 – 10
© डॉ. निशिकान्त श्रोत्री
एम.डी., डी.जी.ओ.
मो ९८९०११७७५४
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈