सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी
वाचताना वेचलेले
☆ गीतांजली भावार्थ …भाग 43 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆
७८.
विश्वाची निर्मिती नुकतीच झाली होती.
प्रथम तेजात तारका चमकत होत्या.
तेव्हा आकाशात देवांची सभा भरली आणि
ते गाऊ लागले-
“वा!पूर्णत्वाचं किती सुरेख चित्र! निर्भेळ आनंद!”
एकजण एकदम ओरडला,
“प्रकाशमालेत कुठंतरी त्रुटी आहे.
एक तारा हरवलाय!”
त्यांच्या वीणेची एक तार तुटली.गीत थांबले.
ते निराशेनं म्हणू लागले,
” हरवलेली ती तारका सर्वात सुंदर होती.
स्वर्गाचं वैभव होती.”
त्या दिवसापासून सतत शोध चालू आहे.
आणि प्रत्येकजण दुसऱ्याला सांगतो,
” जगातला एक आनंद नाहीसा झाला आहे.”
रात्रीच्या खोल शांततेत तारका हसतात
आणि आपापसात कुजबुजतात,
“हा शोध व्यर्थ आहे,
एकसंध पूर्णत्व संपलं आहे.
७९.
या आयुष्यात तुला भेटायचं माझ्या वाट्याला
येणार नसेल तर, तुझ्या नजरेतून
मी उतरलोय असं मला सतत वाटू दे.
मला क्षणभरही विस्मरण होऊ नये.
जागेपणी व स्वप्नातही या दु:खाची टोचणी
सतत मनात राहो.
जगाच्या बाजाराच्या गर्दीत माझे दिवस
जात असताना आणि दोन्ही हातांनी
भरभरून नफा होत असताना
मला सतत असे वाटत राहो की मी
काहीच मिळवत नाही.
या दु:खाची टोचणी मला स्वप्नात व
जागेपणी सतत राहावी.
दमून भागून रस्त्याच्या कडेला मी बसेन.
धुळीत माझा बिछाना पसरेन तेव्हा,
दीर्घ प्रवास अजून करायचा आहे याची जाणीव
मी क्षणभरही विसरू नये
आणि या दु:खाची टोचणी मला जागृतीत व
स्वप्नातही रहावी.
शृंगारलेल्या माझ्या महालात
गाण्याचे मंजूळ स्वर आणि
हास्याचा गडगडाट असावा.
तेव्हा मात्र मी तुला निमंत्रण दिले नाही या दु:खाणी टोचणी मला जागेपणी
व स्वप्नातही असावी.
मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी
मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर
प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी
कोल्हापूर
7387678883
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈