कविराज विजय यशवंत सातपुते
कवितेचा उत्सव # 148 – विजय साहित्य
☆ पाडवा ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆
साडेतीन मुहुर्तात
असे पाडव्याची शान
व्यापाऱ्यांचे नववर्ष
वहिपुजनाचा मान….! १
कार्तिकाची प्रतिपदा
येई घेऊन गोडवा.
दीपावली दिनू खास
होई साजरा पाडवा. . . . ! २
तेल, उटणे लावूनी
पत्नी हस्ते शाही स्नान.
साडेतीन मुहूर्ताचा
आहे पाडव्याला मान. . . . ! ३
सहजीवनाची गाथा
पाडव्याच्या औक्षणात
सुख दुःख वेचलेली
अंतरीच्या अंगणात.. . . . ! ४
भोजनाचा खास बेत
जपू रूढी परंपरा.
व्यापारात शुभारंभ
नवोन्मेष स्नेहभरा.. . . . ! ५
ताळेबंद रोजनिशी
जमा खर्च खतावणी
पाडव्याच्या मुहूर्ताला
होई व्यापार आखणी…! ६
व्यापाऱ्यांचा दीपोत्सव
वही पूजनाचा थाट
येवो बरकत घरा
यश कीर्ती येवो लाट. . . . ! ७
राज्य बळीचे येऊदे
दिला वर वामनाने
दीपोत्सव पाडव्याला
बळीराजा पुजनाने…! ८
संस्कारांचा महामेरू
बलिप्रतिपदा सण
दानशूर बळीराजा
केले गर्वाचे हरण…! ९
तीन पावले जमीन
दान केली वामनाला
क्षमाशील सत्वशील
सत्व लावले पणाला…! १०
पंच महाभुती पुजा
पंचरंगी रांगोळीने
पंच तत्वे नात्यातील
शुभारंभ दिवाळीने…! ११
काकू वहिनी मावशी
आई आज्जचे कोंदण
पती पत्नी औक्षणाने
स्नेह भेटीचे गोंदण…! १२
शुभारंभ खरेदीचा
वास्तू, वस्त्र, अलंकार
गृह उपयोगी वस्तू
सौख्य वाहन साकार…! १३
फटाक्यांची रोषणाई
पंच पक्वांनाचा घाट
नव दांपत्य दिवाळी
कौतुकाचा थाट माट…! १४
जावयाचा मानपान
दिन दिवाळ सणाचा
तन मन सालंकृत
सण मांगल्य क्षणांचा…! १५
घरोघरी उत्साहात
आनंदाची मेजवानी
आला दिवाळी पाडवा
शेती वाडी आबादानी….! १६
© कविराज विजय यशवंत सातपुते
मोबाईल 8530234892/ 9371319798.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈