श्री अशोक श्रीपाद भांबुरे
(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी का अपना एक काव्य संसार है । आप मराठी एवं हिन्दी दोनों भाषाओं की विभिन्न साहित्यिक विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं। आज साप्ताहिक स्तम्भ –अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती शृंखला की अगली कड़ी में प्रस्तुत है एक अत्यंत मार्मिक, ह्रदयस्पर्शी एवं भावप्रवण कविता “पावसाचे थेंब”।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 53 ☆
☆ पावसाचे थेंब☆
असंख्य पावसाचे थेंब
डोकं आपटून घेतात
रस्त्यावर, खडकावर,
ओघळ होऊन वाहतात,
खड्ड्यांची तळी निर्माण करतात,
डोंगरावरून कोसळतात,
नदीत धावतात,
धरणात साटतात,
मातीला सुखावतात,
अन्नाच्या निर्मितीत योगदान देतात,
सजीवांत जगवण्याची उमेद निर्माण करतात,
समुद्रात माशांना जगवतात,
भूतलावर प्राण्यांना वाढवतात,
कधी पानांच्या कुशीत
मोत्यांचं रूप घेऊन विसावतात,
कधी गोठून घेतात स्वतःचंच अस्तित्व
कधी आग झेलतात, बाष्प होतात,
बहुरुप्यासारखी रुपं बदलतात
पावसाचे थेंब
या साऱ्या उपकाराच्या बदल्यात
काय मागतात ते तुमच्याकडे
पाणी वाचवा पाणी जिरवा
इतकच ना ?
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.