(प्रत्येक कवि की कविता के सृजन के पीछे कोई न कोई तथ्य होता है, जो कवि को तब तक विचलित करता है, जब तक वह उस कविता की रचना न कर ले। और शायद यही उस कविता की सृजन प्रक्रिया है। किन्तु, इसके पीछे एक संवेदनशील हृदय भी कार्य करता है। ऐसी ही संवेदनशील कवियित्रि सुश्री प्रभा सोनवणे जी ने मेरे अनुरोध को स्वीकार कर “कवितेच्या प्रदेशात” शीर्षक से साप्ताहिक स्तम्भ प्रारम्भ करने हेतु अपनी सहमति दी है। इसके लिए हम आपके आभारी हैं। अब आप प्रत्येक बुधवार को उनकी रचनाओं को पढ़ सकेंगे।
यह सच है कि- कवि को काव्य सृजन की प्रतिभा ईश्वर की देन है। उनके ही शब्दों में “काव्य प्रतिभा ही आपल्याला मिळालेली ईश्वरी देणगी आहे हे नक्की!” आज प्रस्तुत है काव्य सृजन पर उनका आलेख “निर्मिती प्रक्रिया”)
☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात ☆
☆ निर्मितीप्रक्रिया ☆
मला आठवतंय मी पहिल्यांदा कविता लिहिली ती इयत्ता आठवीत असताना हस्तलिखितासाठी, *माँ पाठशाला* या शीर्षकाची ती हिंदी कविता होती, आठवी ते अकरावी या काळात मी तुरळक हिंदी कविता लिहिल्या, त्या रेडिओ श्रीलंका- रेडिओ लिसनर्स क्लब च्या रेडिओ पत्रिकांमध्ये प्रकाशित ही झाल्या!
१९७० सालापासून कविता सतत माझ्या बरोबर आहे, आयुष्याचा एक अविभाज्य घटक बनली आहे!
चित्र काव्य, विषयावर आधारित काव्य रचताना, कुठली तरी घटना, स्थळ आपल्या मनात येतं आणि आपण कविता रचत जातो,
आपल्याला आवडलेलं, खुपलेलं, खदखदणारं कवितेत उतरत असतं, मी सकाळ नाट्यवाचन स्पर्धेसाठी ग्रामीण भागात परीक्षक म्हणून जात असताना, नुकतीच घडलेली जवळच्या नात्यातल्या तरूण मुलीच्या आत्महत्येची घटना मनाला क्लेश देत होती, भोर च्या शाळेत नाट्यवाचनाचे परिक्षण करत असताना अचानक रडू कोसळले आणि तिथेच पहिला शेर लिहिला—
*तारूण्यातच कसे स्वतःला संपवले पोरी*
*आयुष्याला असे अचानक थांबवले पोरी*
काफिये रदीफ़ काहीच मनात योजले नव्हते, मी एकीकडे नाट्यवाचन ऐकत होते, विद्यार्थ्यांना, नाटकाला गुण देत होते आणि त्याचवेळी मला शेर सुचत होते….
बाईपण हे नसेच सोपे वाटा काटेरी
रक्ताने तन मृदूमुलायम रंगवले पोरी
आले होते मनात तुझिया स्वप्नांचे पक्षी
गोफण फिरवत कठोरतेने पांगवले पोरी
तळहातावर ठळक प्रितीची रेषा असताना
निष्प्रेमाचे दिवस कसे तू घालवले पोरी
सौंदर्याला दिलीस शिक्षा क्लेश जिवालाही
परक्यापरि तू स्वतःस येथे वागवले पोरी
संपवता तू तुझी कहाणी दोष दिला दैवा
अंगण आता पुन्हा नव्याने सारवले पोरी
© प्रभा सोनवणे,
“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पुणे – ४११०११
मोबाईल-9270729503