सौ शालिनी जोशी
स्वपरिचय
शिक्षण- M Sc. (Mathematics)
कार्यक्षेत्र – गृहिणी
परिचय – संत साहित्य-भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध, गाथा, आत्माराम, अमृतानुभव, एकनाथी भागवत इ. अभ्यास सुरू आहे. त्यासंबंधी लिखाण सुरू आहे. स्त्री संतांविषयी लिहिले आहे. काही कविता व ललित लेख लिहिले आहेत.
☆ गीता आणि मोह… ☆ सौ शालिनी जोशी ☆
मोह ही एक मानसिक अवस्था आहे. ते एक आवरण आहे. ज्यामुळे खऱ्या ज्ञानाला माणूस दुरावतो. हा मोह माणसाच्या विकासाच्या आड येतो. त्याचा परिणाम माणसाच्या ज्ञान, विचार आणि आचरणावर होतो. सारासार विवेक दूर होतो. मन भ्रमित होते. योग्य-अयोग्य कळत नाही.
हा मोह तीन प्रकारच्या असू शकतो. १) वस्तूचा २) सत्ता संपत्तीचा किंवा ३) व्यक्तीचा. कारणे कोणतीही असली तरी माणूस कर्तव्यमूठ होतो. आणि परिणाम त्याला स्वतःला व इतरांनाही त्रासदायक होतो. गीतेचा जन्म ही मोहातूनच झाला आहे. मोह निवारण हा गीतेचा हेतू आहे. ते गुरुच करू शकतो.
धृतराष्ट्राला झालेला पुत्र मोह. जो गीतेच्या पहिल्या श्लोकातूनच व्यक्त होतो. ‘मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत सञ्जय।’ माझी मुले आणि पांडूची मुले काय करीत आहेत? माझी मुले आणि पांडव असा भेद त्याच्या ठिकाणी स्पष्ट दिसतो. बाह्यदृष्टीने अंध असणारा धृतराष्ट्र पुत्र प्रेमामुळे अंतःचक्षुनेही अंध झाला आहे. सारासार विचार विसरला आहे. योग्यता नसतानाही आपल्या पुत्राला राज्य मिळावे अशी त्याची इच्छा आहे. या पुत्रमोहाने आपल्या पुत्रांच्या यशासाठी कोणताही भलाबुरा मार्ग आचारण्याला त्याची ना नव्हती. म्हणून पांडवाना त्यांचे हक्काचे राज्य न देण्याच्या निर्णयाला त्यांनी विरोध केला नाही. पण हा पुत्र मोहच पुढे कौरवांच्या नाशाला कारण झाला.
दुर्योधनाला झालेला सत्तेचा मोह. सत्तेसाठी दुर्योधन कायमच पांडवाना पाण्यात पाहत आला. त्याच्या या अहंकाराचे पोषण शकुनी मामा कडून कायमच झाले. पांडवाना वनवास, विजनवास, द्रौपदी वस्त्रहरण अशी संकटांची मालिकाच भोगावी लागली. सत्तेच्या मोहापायी पांडवांना त्यांच्या वाट्याचे राज्य द्यायला दुर्योधनाने नकार दिला. उलट ‘सुईच्या अग्रावर राहील एवढीही जमीन देणार नाही’ असे उर्मटपणे सांगितले. विदूर व श्रीकृष्ण यांच्या सांगण्याचा उपयोग झाला नाही. धर्माधर्माचा त्याला विसर पडला होता. ‘जानामि धर्मं न मे प्रवृत्तिः। जानामि अधर्मं न मे निवृत्तिः।’ असे तो कबूल करतो. असा हा मोहाचा परिणाम माणसाला विचारहीन बनवितो. आपलेच करणे बरोबर असेच त्याला वाटते. कोणाचे ऐकून घेण्याच्या मनस्थितीत माणूस नसतो. दुर्योधनाचा मोह हा अहंकारातून, सत्तालालसेतून, पांडवांच्या द्वेषातून निर्माण झाला होता. म्हणून आपले हक्काचे राज्य मिळवण्यासाठी पांडवाना कौरवांबरोबर युद्ध करावे लागले. ते धर्मयुद्ध होते. अधर्माविरुद्धचे होते.
महापराक्रमी अर्जुन सुद्धा मोहात अडकला. ‘सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापय मेsअच्युत’ असे भगवंतांना सांगणारा अर्जुन समोर युद्धभूमीवर आप्तस्वकियांना व गुरुजनांना पाहून धर्मसंमुढ झाला. त्यांच्या विषयी करुणा निर्माण झाली. ‘ भ्रमतीव च मे मनः’ (१/३०) तो भ्रमित झाला. गांडीव गळून पडले. शरीराला कापरे भरले. क्षत्रिय धर्माचे आचरण कठीण झाले. या मोहाचे सामर्थ्य इतके जबरदस्त होते की, तो संन्यासाच्या गोष्टी करू लागला. स्वजनांना मारण्याचे पाप करण्यापेक्षा युद्ध न करण्याचा पळपुटेपणा त्याला योग्य वाटू लागला. युद्धाचा परिणाम कुलक्षयापर्यंत पोहोचला. ज्ञानेश्वर अर्जुनाच्या या स्वजनासक्तीचे वर्णन महामोह असे करतात. ‘तैसा तो धनुर्धर महामोहे। आकळीला। ।'(ज्ञा१/१९०) अर्जुनाचा पराक्रम, स्वधर्मनिष्ठा, कर्तव्यनिष्ठा सर्व स्वजन मोहाने झाकले गेले. उलट तो श्रीकृष्णाला आपण कसे योग्य आहोत ते ऐकवू लागला. शेवटी धर्मसंमूढ झालेल्या त्याने श्रीकृष्णाचे शिष्यत्व पत्करले. त्याला शरण गेला. ‘शिष्यस्तेsहं शाधि मां त्वां प्रपन्नम्।’ (गी२/७). मोह दूर करण्याचे काम गुरुच करू शकतो. तेव्हा कृष्णाने गीतोपदेश केला. उपदेश करताना ते म्हणतात,
यदा ते मोहकलिलं बुध्दिर्व्यतितरिष्यति।
सदा गन्तासि निर्वेदं श्रोतव्यस्य श्रुतस्य च।
(गी२/५२)
जेव्हा तुझी बुद्धी हे मोहरूपी मालीन्य पार करून जाईल तेव्हाच या सर्व विचारातून तू विरक्त होशील. म्हणून मोह दूर करणे हे गीतेचे प्रयोजन ठरते. सगळी गीता सांगून झाल्यावर अठराव्या अध्यायात भगवंत अर्जुनाला विचारतात, ‘अर्जुना, तुझा मोह गेला की नाही?’ यावर अर्जुनाचे उत्तर फार सुरेख आहे.
नष्टो मोहः स्मृतिर्लब्धा तत्प्रसादान्मयाच्युत।
स्थितोsस्मि गतसन्देहः करिष्ये वचनं तव।।
(गी. १८/७३)
भगवंतांनी अर्जुनाचा मोह दूर केला. तो संशय मुक्त झाला. श्रीकृष्णाच्या बोलण्याप्रमाणे करायला तयार झाल्या. तशी कबुली त्याने दिली. मोहनिरसन हे गीतेचे फलित प्राप्त झाले. नातेवाईकांच्या विषयीच्या ममतेतून, करुणेतून अचानक निर्माण झालेल्या मोहाचे निरसन झाले. तो युद्धाला तयार झाला. अज्ञानाने नाही तर पूर्ण ज्ञान होऊन, स्वतःच्या इच्छेने. येथे कोणतीही बळजबरी नाही. अंधश्रद्धा नाही.
अर्जुनाला मोहाचे दुष्परिणाम सांगणारे पंधरा-वीस श्लोक तरी गीतेत आहेत. वेळोवेळी प्रसंगानुरुप ते सांगून अर्जुनाला मोह किती हानी कारक आहे आणि मोहातून बाहेर पडणे कसे श्रेयस्कर आहे हे भगवंतांनी अर्जुनाला पटवून दिले. आणि शेवटी अर्जुन जेव्हा युद्ध करायला तयार झाला तेव्हा भगवंतांची खात्री झाली की गीतोपदेशाचे सार्थक झाले.
अशाप्रकारे जग हे मोहाने बाधित झालेले आहे. रामायणात अगदी सीतेलाही कांचनमृगाचा मोह आवरला नाही. हा व्यक्तिगत पातळीवरचा आणि शुल्लक गोष्टीसाठी, तरीही तो तिला टाळता आला नाही. म्हणून राम रावण युद्ध झाले. तर अर्जुनाला स्वजनासक्ती रूप मोह झाला पण तो भगवंतांना टाळता आला. दूर करता आला. म्हणून महाभारताचे युद्ध झाले. दोन्हीत दुष्ट शक्तींचा पराभव आहे. पण दोघांच्या मुळाशी मोहच आहे.
आपण तर सामान्य माणसं आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनात स्पर्धा आहे, संघर्ष आहे, हेवेदावे मत्सर आहे. त्यातून अनेक मोहाचे प्रसंग येत असतात. त्यातूनच आपण आपल्याला सांभाळले पाहिजे. अर्जुनाला सावरणारा तो भगवंत आपल्याही हृदयात आहे याची जाण ठेवून त्याचे स्मरण करून विवेकाने अविवेकावर मात करावी. स्वतःचा तोल धळू देऊ नये. नेहमी सावध असावे. हेच अर्जुनाच्या उदाहरणांनी सर्व समाजाला भगवंतांना सांगायचे आहे. शेवटी आपण सारे अर्जुन आहोत.
मोहाविषयी सांगणारे गीतेतील श्लोक क्रमांक
२/६३, ४/३५, ५/२०, ६/३८, ७/१३, ७/२०, ७/२५, १५/५, १५/१९, १६/१६, १७/१३, १८/७, १८/२५, १४/२२……
© सौ. शालिनी जोशी
संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.
मोबाईल नं.—9850909383
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈