श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे
(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे जी का धार्मिक एवं आध्यात्मिक पृष्ठभूमि से संबंध रखने के कारण आपके साहित्य में धार्मिक एवं आध्यात्मिक संस्कारों की झलक देखने को मिलती है। किन्तु, इस आलेख में आप उनके स्वराष्ट्र प्रेम की भी झलक पाएंगे। आज प्रस्तुत है उनकी स्मृति में गांधीजी के चरखे एवं चरखे से जुड़े ऐतिहासिक तथ्यों को वर्तमान से जोड़ता हुआ शोधपूर्ण आलेख “चरखा ”।)
☆ चरखा ☆
दिनांक ५-११-२०१७ च्या सकाळ सप्तरंग मधील प्रा.उत्तम कांबळे यांचा “सेवाग्राम मधील प्रार्थना आणि चरखा” हा लेख वाचला.त्यांचे सर्वच लेख मला खूप आवडतात.कारण लेखनाच्या आधी ते जिथं जिथं फिरस्तीला. जातात आणि तिथं ते जे जे पाहतात त्यावर त्यांचं लगेचंच वास्तववादी व जिवंत प्रतिक्रिया देणारं लेखन असतं, त्यामुळे ते मनाला चटका लावून जातं.
आत्ताचा लेखही म. गांधींच्या चरखा विषयाचा. पवनार येथील पूज्य विनोबांच्या आश्रमातल्या प्रार्थनेचा. मी विचार करु लागले,चरखा हा माझाही अत्यंत जिव्हाळ्याचा. माझ्या लहानपणी मला आठवतं माझे काका – काकू घरी रोज चरख्यावर सूत कातून त्या सुताच्या गुंड्या बनवून पुण्यातल्या खादी ग्रामोद्योग मध्ये देऊन त्यापासून विणलेले सर्व कपडे वापरीत असत.
१९५१ ते १९५८ अखेर माझं प्राथमिक शिक्षण खंडाळा-पारगाव पुणे-सातारा रोडवरचं. येथे झालं.शाळेत त्यावेळी ती बेसिक शाळा होती. तिथं आम्हाला मेंढ्यांची लोकर वर्गवारी करुन, लोकर स्वच्छ करून ती छोट्या धनुकलीने पिंजून त्याचे पेळू तयार करून त्या लोकरीचे सूत चरख्यावर कातून त्यापासून हातमागावर घोंगड्या विणण्याचा मूलमंत्र मिळाला होता.
घरी आणि शाळेत सतत चरखा सोबतीला असल्यानं तो माझ्या जिव्हाळ्याचा.पण गेली कित्येक वर्षात मला त्याचं साधन दर्शनही झालं नाही, आणि कांबळे सरांनी मला ते त्यांच्या लेखातून करविलं त्यामुळं मला अक्षरशः भरुन आलं स्वातंत्र्यपूर्व काळात चरख्यानं अख्ख्या भारताला,भारतातील खेड्यापाड्यातील आबालवृद्धांना, सुशिक्षीत अशिक्षितांना,सामान्यातील सामान्यांना बापूजींच्या चरख्याने गती दिली होती.
खेडोपाडी स्वदेशीची चळवळ उभी राहिली.स्वदेशी चळवळीने देश व्यापला. एवढासा चरखा पण तो देशव्यापी ठरला. मूलोद्योगी शिक्षणाचा मंत्र अख्ख्या भारताला मिळाला तो चरख्यामुळे. समानतेचा संदेश दिला तो चरख्याने !
कित्येकांना रोजगाराची हमी दिली ती चरख्याने. लोकांमध्ये आत्मविश्र्वास निर्माण केला गेलातो चरख्यामुळे.
१५ आगष्ट १९४७ ला इंग्रज भारत देश सोडून गेले पण जाताना देशाचे दोन तुकडे करून त्यांची कोट हॅट पॅन्ट आपल्याला ठेऊन गेले जे आजही आपण आवडीने वापरतोय! पण त्यांनी काही आपलं कोट टोपी धोतर त्यांच्या देशात नेलं नाही.
आमच्या साताऱ्यातील ज्येष्ठ समाजसेविका मा.अंजलीताई महाबळेश्वरकर म्हणाल्या की, आपल्या लोकांना ब्रॅंडेड व इंपोर्टेडच कपडे आवडायला लागले.आपल्या लोकांना स्वदेशी कपडे आवडत नाहीत.आपल्या देशाच्या हवामानाला खरम्हणजे सुती कपडेच योग्य !पण लोकांनी त्याकडे पाठ फिरवल्यानं चरखे व हातमाग आपोआप मागे पडले.
इंग्रजांनी भारतात आल्यावर मुंबईत कापड गिरण्या सुरू केल्या. इथून कच्चा माल तयार करून तो स्वत:च्या देशात नेऊन त्याचा पक्का माल करून ते भारतातल्या लोकांना महागड्या किंमतीला विकून आपल्यालाच लुटत राहिले.
स्वातंत्र्यानंतर आपल्या गिरण्यांच्या मालाला उठाव नसल्याने त्या तोट्यात येवू लागल्या, व एकेकाळी सोन्यासारखं वैभव असलेल्या मुंबईच्या कित्येक गिरण्यांना टाळेबंदी आली व लाखो कुशल कामगार बेकार होऊन अक्षरशः देशोधडीला लागले.
आज हे लिहितानाही माझे डोळे पाणावलेत.तर प्रत्यक्ष ज्यांनी भोगलं त्यांना काय झालं असेल.?
७ आगष्ट रोजी शासनाने हातमागदिन म्हणून साजरा करण्याचे मागीलवर्षी जाहीर केले आहे. तेव्हा देशवासियांना विनंती करावीशी वाटते, की प्रत्येकाने किमान एकदातरी चरखा हातात घेऊन पहावा. त्यावर सूत कातताना आपली होणारी एकाग्रता आपल्याला आयुष्यात किती उपयोगी पडते. मोबाईल व टीव्ही मुळे मंद होत चाललेल्या आपल्या मेंदूला चालना मिळून तो किती कार्यक्षम होतो ते पहा. त्याबरोबरच किमान बंद पडलेले हातमाग व पश्र्चिम महाराष्ट्रातल्या सूतगिरण्या ज्यामध्ये शासनाचे अमूल्य भांडवल वाया जाते आहे त्या पुन्हा सुरू होतील, हजारो बेकार हातांना चांगला रोजगार मिळेल. !
जय हिंद जय महाराष्ट्र!!
©®उर्मिला इंगळे, सातारा
दिनांक :-८-७-१९