सुश्री आरूशी दाते
(प्रस्तुत है सुश्री आरूशी दाते जी के साप्ताहिक स्तम्भ – “मी _माझी “ शृंखला की नौवीं कड़ी पणती । जीवन में कुछ घटनाएँ किसी अन्य घटना का संकेत देती है। हम अक्सर उन्हें समझने की कोशिश नहीं करते और वास्तव में कई बार समझ ही नहीं पाते। 9 जून को गुजरे हुए मात्र कुछ ही दिन हुए हैं किन्तु 14 वर्ष पूर्व की घटना जैसे आँखों के सामने चलचित्र की तरह गुजर गई और नेत्र नम हो गए। बस बोझिल हृदय से एक ही शब्द कह सकता हूँ – “नमन”। सुश्री आरूशी जी के आलेख मानवीय रिश्तों को भावनात्मक रूप से जोड़ते हैं। इस शृंखला की कड़ियाँ आप आगामी प्रत्येक रविवार को पढ़ पाएंगे। )
साप्ताहिक स्तम्भ – मी_माझी – #9
☆ पणती ☆
आली आली दिवाळी आली, पणती लावायची वेळ झाली… खरंच, पणती लावल्याशिवाय दिवाळीची सुरुवात होऊच शकत नाही…
गेली चार पाच वर्षे भरपूर पणत्या रंगवून विकल्या, अनेकांनी त्या दिवाळीत लावल्या असतील, त्यांची घरं उजळून गेली असतील ह्यात शंकाच नाही… अंधारावर मात करणारे हे तेज हवेहवेसे वाटते… उत्साहाची, चैतन्याची उधळण असते… पण…
पण काय?
आज एका वेगळ्याच पणातीची आठवण येत आहे, का ते माहीत नाही… आनंदी वातावरण असताना हा प्रसंग सतत डोळ्यासमोर येतो आहे… सुरुवातीला तो विचार झटकण्याचा बराच प्रयत्न केला, मग म्हटलं असू दे ह्या विचारांची सोबत, कदाचित तेच योग्य असेल… पणातीलाही नशिबात असेल तेच करावं लागतं, ह्याची जाणीव झाली, आणि प्रत्यय आला…
१० जुन २००५… एक दिवा विझला होता, म्हणून एक पणती मिणमिणत होती… आमच्या आयुष्यातील अंधार दूर करू पहात होती…
अजूनही तो कोपरा डोळ्यासमोर येतो… ९ जून २००५ ला रात्री १० वाजता माझ्यासमोर बाप (माझा बाबा बाप माणूसच होता) नावाचा दिवा कायमचा विझला, अचानक… आमच्या आयुष्यातील तेज त्या दिवशी लोपले होते… दादा पुण्याहून बंगलोरला येणार म्हणून बाबांना शीत पेटित ठेवले गेले… हॉस्पिटलमधील सर्व सोपस्कार संपवून आम्ही माझ्या घरी आलो, कारण मी आईच्या घरी जायचं धाडस करू शकले नाही… मग दुसऱ्यादिवशी सकाळी आईच्या घरी गेलो, दादापण 12 वाजेपर्यंत पोचला… शेवटचं दर्शन घेतलं आणि त्यांना उचलण्यात आलं आणि तिथे एक पणती लावली गेली, दोऱ्याची वात शांतपणे जळत होती…
आजही आठवलं तरी अंगावर शहारा येतो… प्रत्येक पणातीच्या ज्योतिमध्ये त्यांना शोधलं जातं, ते जवळपास असल्याचा भास होतो…. अशा प्रसंगी त्या पणातीची भावना नक्की काय असेल, तिच्या मनातील तगमग माझ्या मनासारखीच असेल का? तिला हे प्रसंग असहनीय होत असतील का? कोणी ह्या बाबत विचार करत असेल का? एक ना अनेक प्रश्नांच्या उत्तरांची वाट पहात ती शांत, मंद तेवत राहते, जणू स्वतःच्या जळण्यातून इतरांना थोडा प्रकाश द्यायचा प्रयत्न करते… दुःखावर फुंकर घालता येत नाहीच, पण स्वतः त्या दुःखात जळून घरच्या इतर मंडळींना प्रकाशवाटेवर न्यायचा प्रयत्न करते… अर्थातच ती तिचे कार्य निरपेक्षपणे पार पाडत असते… दिवाळी असो किंवा तेरावा असो… तीसुद्धा तिचं नशीब घेऊन येते, पण ती तिचे कर्तव्य विसरत नाही… असे प्रसंग तिच्यावर येऊ नयेत हीच मागणी त्या विधात्याकडे करू शकते… शेवटी सगळं त्याच्या हातात !
© आरुशी दाते, पुणे