ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ २९ एप्रिल -संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर– ई – अभिव्यक्ती (मराठी)
श्री कृष्ण केशव क्षीरसागर
श्री. के. क्षीरसागर यांचा जन्म ६ नोहेंबर १९०१ मधे झाला. ते लेखक, विचारवंत, समीक्षक आणि टीकाकार म्हणून प्रसिद्ध होते. ज्ञानकोशकार केतकर यांचे ते समविचारी होते.
शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी प्रथम शिक्षक म्हणून आणि नंतर प्राध्यापक म्हणून नोकरी केली. पुण्याच्या एम. इ. एस. किंवा सध्याच्या गरवारे कॉलेजमध्ये ते मराठी विभाग प्रमुख होते.
श्री. के. क्षीरसागर यांचे प्रकाशित साहित्य
१. आधुनिक राष्ट्रवादी रविंद्रनाथ ठाकूर . २. उमरखय्यामची फिर्याद, ३. टीका विवेक, ४. वादे वादे ५. व्यक्ति आणि वाङ्मय, ६. मराठी भाषा वाढ आणि बिघाड, ७. बायकांची सभा ( प्रहसन), ८. श्रीधर व्यंकटेश केवतकर, ९. समाज विकास,
इ. त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.
१९५९ साली मिरजेत भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
महाराष्ट्र सरकार दरवर्षी वाङ्मयीन समीक्षेवरील एका ग्रंथाला श्री. के. क्षीरसागर यांच्या नावाने पुरस्कार देते.
या विचारवंत थोर समीक्षकाचा आज स्मृतीदिन (२९ एप्रील १९८०) . त्या निमित्ताने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
☆ ☆ ☆ ☆ ☆
श्रीमती उज्ज्वला केळकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गूगल विकिपीडिया
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ २७ एप्रिल -संपादकीय – सौ. गौरी गाडेकर -ई – अभिव्यक्ती (मराठी)
वि. वा. पत्की
विश्वनाथ वामन पत्की(12 नोव्हेंबर 1912 – 27 एप्रिल 1992) हे कादंबरीकार, कथालेखक, समीक्षक होते.
मुंबईत एम ए केल्यावर त्यांनी लंडन येथून पत्रकारितेतील पदविका घेतली.
ते सुरुवातीला शिक्षक होते. मग महाराष्ट्र शासनाचे प्रसिद्धी अधिकारी व नंतर जनसंपर्क अधिकारी झाले. ते जनसंपर्क, वृत्तपत्रविद्या, जाहिरातकला या विषयांचे अध्यापनही करत असत.
पत्कींनी विविध प्रकारचे लेखन केले. ओघवते निवेदन, समर्पक शब्दकळा, ललित लेखनाच्या तंत्राची चांगली जाणकारी ही ना. सी. फडकेंची लेखनवैशिष्ट्ये पत्कींच्या लेखनातही जाणवतात.
‘आंधळा न्याय’, ‘साक्षात्कार’, ‘लक्ष्मणरेषा’, ‘शोभेची बाहुली’ या कादंबऱ्या, ‘आराधना’, ‘ तुझं सुख ते माझं सुख’ हे कथासंग्रह, ‘पश्चिमवारे’ हे प्रवासवर्णन, ‘खरं सांगू तुम्हाला?’ व ‘वेळी – अवेळी’ हे दोन लघुनिबंधसंग्रह वगैरे पुस्तके त्यांनी लिहिली. शिवाय ‘युगप्रवर्तक फडके’ हा समीक्षात्मक ग्रंथ फडकेंनी शि. न. केळकर यांच्या सहकार्याने लिहिला.
त्यांनी चरित्रलेखनही केले. ते उत्तम अनुवादक होते. भारताचे माजी उपराष्ट्रपती न्यायमूर्ती एम. सी. छगला यांच्या ‘रोझेस इन डिसेंबर’चा ‘शिशिरातील गुलाब’, भारताचे माजी अर्थमंत्री चिंतामणराव देशमुख यांच्या ‘द कोर्स ऑफ माय लाईफ’चा ‘माझा जीवनप्रवाह’ आणि भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आत्मचरित्राचा ‘स्वप्नसिद्धीची दहा वर्षे’… हे सर्व अनुवाद वाचकांच्या विशेष पसंतीस उतरले.
‘दीपगृह’ हे वि. स. खांडेकरांच्या खासगी पत्रांचे संपादनही त्यांनी केले.
वि. वा. पत्की यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना सादर अभिवादन.
☆☆☆☆☆
सौ. गौरी गाडेकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : साहित्य साधना, कऱ्हाड शताब्दी दैनंदिनी, विकीपीडिया.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ २५ एप्रिल -संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर– ई – अभिव्यक्ती (मराठी)
चिंतामणी त्र्यंबक खानोलकर
गेले द्यायचे राहुनी, नाही कशी म्हणू तुला, ये रे घना ये रे घना इ. लोकप्रिय गीतांचे गीतकार आरती प्रभू म्हणजेच चिंतामणी त्र्यंबक खानोलकर यांचा जन्म ८ मार्च १९३० मध्ये तोंडोली – वेंगुर्ले इथे झाला. त्यांचे शिक्षण सावंतवाडी आणि मुंबई इथे झाले. त्यांनी गद्य लेखन चिं. त्र्यं. खानोलकर या नावाने केले आणि कविता-गीते आरती प्रभू या नावाने लिहिली.
शालेय वार्षिकापासून त्यांच्या लेखनाला सुरुवात झाली. मार्च ५१ मध्ये त्यांची ‘जाणीव’ ही कथा सत्यकथेत प्रसिद्ध झाली. ‘वैनतेय’ साप्ताहिकात त्यांची ‘कुढत का राह्यचं’ ही कविता १९५३ ला प्रकाशित झाली आणि ते कवी म्हणून प्रकाशात आले. ५४ मध्ये त्यांची सत्यकथेत ‘शून्य शृंगारिते’ ही कविता प्रकाशित झाली. १ जानेवारी ५७ ला आकाशवाणी पुणे केंद्राने आयोजित केलेल्या कविसंमेलनात त्यांनी प्रथम कविता वाचली. ४ मे ५८ रोजी मालवण येथे झालेल्या साहित्य संमेलनात त्यांचा ‘पल्लवी’ हा कविता संग्रह प्रकाशित झाला.
२६ जानेवारी ५४ ला त्यांच्या ‘येईन एक दिवस’ या नाटकाचा प्रयोग झाला. ५९ मध्ये आकाशवाणी मुंबई केंद्रावर स्टाफ आर्टिस्ट म्हणून त्यांनी काही दिवस नोकरी केली.
चिं. त्र्यं. खानोलकर यांच्या कविता, कथा, कादंबर्या् यात दु:खाची अनेक रुपे प्रगट झाली आहेत. नशीब आणि माणूस यांच्यात काय संबंध आहे, पाप-पुण्य या संकल्पना या गोष्टी त्यांच्या साहित्यातून दिसतात. दु:खाकडे तटस्थतेने पाहून दु:ख स्वीकारण्याची अपरिहार्यता त्यांच्या साहित्यात दिसते. ‘एक शून्य बाजीराव ‘ हे त्यांचे अतिशय गाजलेले नाटक
चिं. त्र्यं. खानोलकर यांचे निवडक प्रकाशित साहित्य-
कादंबर्या – १. अजगर, २. कोंडूरा, ३. गणुराया आणि चानी (चानीवर पुढे चित्रपटही निघाला होता. ) ४. पाषाण पालवी
नाटके – १. अजब न्याय वर्तुळाचा, २. आभोगी, ३. अवध्य ४. कालाय तस्मै नाम: , ५. हयवदन
त्यांची अनेक अप्रकाशित नाटकेही आहेत.
कविता – १. जोगवा २. नक्षत्रांचे देणे
खानोलकरांनी चित्रपटासाठी गीतेही लिहिली.
चिं. त्र्यं. खानोलकर यांना मिळालेले पुरस्कार
नक्षत्रांचे देणे या कविता संग्रहाला १९७८ साली साहित्य अॅंकॅडमीचा पुरस्कार मिळाला.
त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ दिले जाणारे पुरस्कार खालील लेखक –कलावंतांना मिळालेले आहेत. विष्णू सूर्या वाघ, सतीश आळेकर, शफाअत खान, महेश एलकुंचवार, सई परांजपे, महेश केळुस्कर, सौमित्र, प्रेमानंद गज्वी॰
या अल्पायुषी प्रतिभावंताचा आज स्मृतीदिन. त्या निमित्त त्यांच्या कार्याला शतश: प्रणाम
☆ ☆ ☆ ☆ ☆
श्रीमती उज्ज्वला केळकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गूगल विकिपीडिया
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ २५ एप्रिल -संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित – ई – अभिव्यक्ती (मराठी)
श्री.विष्णू श्रीधर जोशी.
श्री.विष्णू श्रीधर जोशी हे इतिहास संशोधक आणि लेखक होते.भारतीय स्वातंत्र्य लढा हा दोन मार्गांनी लढला गेला.अहिंसा आणि सशस्त्र क्रांती हे दोन मार्ग.यापैकी सशस्त्र क्रांतीकारकांच्या जीवनकार्याचा विशेष अभ्यास करून श्री.जोशी यांनी त्याविषयी लेखन केले आहे.
शोभा ही त्यांची पहिली कादंबरी.1939साली प्रसिद्ध झाली.परंतू त्या काळात राजकीय आक्षेप घेऊन त्यावर बंदी घालण्यात आली.नंतर 1946 मध्ये ही बंदी उठवण्यात आली.शोभा व्यतिरिक्त त्यांनी पहाटेचे चांदणे,मंगला आणि क्रांतिकल्लोळ या कादंब-या लिहील्या.
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ २२ एप्रिल -संपादकीय – सौ. गौरी गाडेकर -ई – अभिव्यक्ती (मराठी)
लक्ष्मण बळवंत भोपटकर
लक्ष्मण बळवंत ऊर्फ आप्पासाहेब भोपटकर (1880 – 24 एप्रिल 1960) हे पत्रकार, हिंदुत्ववादी राजकारणी वं वकील होते. ते केसरी वृत्तपत्राचे संपादक, महाराष्ट्र मंडळ शिक्षण संस्थेचे संस्थापक, हिंदू महासभेचे अध्यक्ष, एवढेच नव्हे, तर व्यायामशास्त्रतज्ज्ञही होते.
ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे वकील होते.गांधी खून खटल्यातील सर्व आरोपींचे खटले त्यांनी एक पैसाही न घेता चालवले.
स्वातंत्र्यलढ्याच्या काळात 6 एप्रिल 1930 रोजी त्यांनी सोलापूर नगरपरिषदेवर राष्ट्रीय झेंडा फडकवला.1937च्या हैद्राबाद सत्याग्रहात ते सहभागी झाले होते. त्यामुळे त्यांना तुरुंगावास भोगावा लागला.
त्यांनी विविध विषयांवर पुस्तके लिहिली आहेत. ‘ऐतिहासिक कथापंचक’, ‘नवरत्नांचा हार’आदी ऐतिहासिक पुस्तके, ‘कुस्ती’, ‘माझी व्यायाम पद्धती’, ‘स्त्रियांचे व्यायाम’ इत्यादी व्यायामविषयक पुस्तके, ‘काँग्रेस व कायदेमंडळ’, ‘स्वराज्याची मीमांसा’, ‘हिंदू समाज दर्शन’ इत्यादी राजकीय व सामाजिक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.
‘केसरी प्रबोध’, ‘केळकर’, ‘पुणे सार्वजनिक सभा ज्युबिली अंक वगैरेचे त्यांनी संपादन केले.
☆☆☆☆☆
रघुनाथ पांडुरंग करंदीकर
रघुनाथ पांडुरंग करंदीकर (21 ऑगस्ट 1857 – 24 एप्रिल 1935) हे पेशाने वकील होते. ते मराठी भाषेतील पत्रांच्या व दैनंदिनींच्या संग्रहासाठी प्रसिद्ध होते. ते मराठी भाषा व संस्कृती यांचे कडवे अभिमानी होते.
ते जेथे जात, तेथून ऐतिहासिक साधने गोळा करून आणीत.1918मध्ये ते इंग्लंडला गेले. तेथून त्यांनी सातारचे छत्रपती प्रतापसिंह यांचा भारताच्या रेसिडेन्टबरोबर झालेला पत्रव्यवहार नकलून आणला. मेणवली येथील नाना फडणवीस यांचे दप्तर त्यांच्या वंशजांकडून मिळवून त्यांनी ते दत्तात्रय बळवंत पारसनीस यांच्याकरवी प्रसिद्ध करविले.
त्यांची पुस्तके :केदारखंड -यात्रा हे 1936मधील पत्ररूपी प्रवासवर्णन. विलायतेहून धाडलेली पत्रे. र. पां. करंदीकर यांची दैनंदिनी.
ते 1905 साली साताऱ्यात भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
☆☆☆☆☆
पुरुषोत्तम नारायण फडके
पुरुषोत्तम नारायण फडके ऊर्फ फडकेशास्त्री (1 मे 1915 – 24 एप्रिल 2015) हे रत्नागिरीतील संस्कृतचे गाढे अभ्यासक होते.
फडकेंनी अत्यंत कठीण अशा परीक्षा उत्तीर्ण करून पुण्याच्या वेदशास्त्रोत्तेजक सभेची व्याकरण चूडामणी व काशीच्या संस्कृत विद्यापीठाची व्याकरणाचार्य अशा दोन पदव्या मिळवल्या. त्याशिवाय बडोदे व म्हैसूर संस्थांनाच्या व्याकरण परीक्षेत त्यांनी उच्च श्रेणी मिळवली.
फडकेशास्त्रींनी संस्कृत व प्राकृत (अर्धमागधी) या भाषांचे अध्यापन केले. पुढे संस्कृतपाठशाळेत प्रधानाध्यापकपदही भूषवले.
निवृत्तीनंतर त्यांनी आचरणास अत्यंत कठीण असे गायत्रीपुरश्चरण केले. रत्नागिरीसह अनेक ठिकाणी त्यांनी स्वाहाकार, वेदांचे घनपाठ, याग व होम पार पाडले.
फडकेशास्त्रींनी विविध विषयांवर दहा हजारांहून अधिक व्याख्याने दिली. सुबोध उपनिषत्सार आणि सुबोध योगवासिष्ठसार या प्रमुख ग्रंथांसह सहा पुस्तके त्यांनी लिहिली.
फडकेशास्त्रींनी शिक्षक कल्याण निधी, रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढी, रत्नागिरी संचय सहकारी सोसायटी अशा संस्था स्थापन करून त्यांना पुढील काळात स्थैर्य प्राप्त करून दिले.
शंभर वर्षे पुरी व्हायला फक्त सात दिवस बाकी असताना त्यांचे देहावसान झाले.
लक्ष्मण बळवंत भोपटकर, रघुनाथ पांडुरंग करंदीकर व पुरुषोत्तम नारायण फडके यांना त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त सादर अभिवादन. 🙏
☆☆☆☆☆
सौ. गौरी गाडेकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : साहित्य साधना, कऱ्हाड शताब्दी दैनंदिनी, विकीपीडिया.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ ई-अभिव्यक्ति: संवाद ☆ स्पंदन – समर्पित साहित्यकारों के संग – भारतीय स्टेट बैंक का गरिमामय आयोजन ☆
प्रिय मित्रो,
सादर अभिवादन,
आज की शाम ई-अभिव्यक्ति परिवार के गौरवमय क्षणों में से एक है जब ई-अभिव्यक्ति से संबद्ध लेखकगण सर्वश्री जय प्रकाश पाण्डेय (जबलपुर), सुरेश पटवा (भोपाल), अरुण दनायक (भोपाल), शांति लाल जैन (उज्जैन), दीपक गिरकर (इंदौर), श्याम खापर्डे (भिलाई)) सम्मानित किए जाएंगे। भारतीय स्टेट बैंक के विशाल परिवार से सम्बद्ध होना अपने आप में सौभाग्यशाली होना है। स्टेट बैंक एक ऐसा संस्थान है जो अपने सेवानिवृत्त सदस्यों को कई सुविधाओं के साथ ही समय समय पर उन्हें उनकी उपलब्धियों के लिए गौरवान्वित होने के अवसर भी प्रदान करता है। भारतीय स्टेट बैंक, केंद्रीय कार्यालय, मुंबई की पत्रिका Second Innings का प्रकाशन एक ऐसा ही सराहनीय कदम है, जिसमें उनकी रचनाएँ, उपलब्धियों एवं महत्वपूर्ण जानकारियाँ प्रकाशित की जाती हैं।
इस कड़ी में भारतीय स्टेट बैंक, स्थानीय प्रधान कार्यालय, भोपाल द्वारा आज 23 अप्रैल 2022 की शाम आयोजित कार्यक्रम स्पंदन – समर्पित साहित्यकारों के संग – भारतीय स्टेट बैंक के सुप्रसिद्ध लेखक एवं कवियों का सम्मान समारोह एक अत्यंत सराहनीय कदम है।
इस आत्मीय आयोजन के लिए साधुवाद एवं सभी सम्माननीय साहित्यकारों एवं बतौर भारतीय स्टेट बैंक से सेवानिवृत्त कर्मी मेरी ओर से काव्यात्मक अनुभूति सादर समर्पित है।
यह नियति का चक्र जहां
ताउम्र बहुत कुछ पाना
अंत में
सब कुछ खोना है।
जीवन के जिस पल में हैं
हम आज
वहाँ कल तुमको होना है।
विशाल वटवृक्ष से
स्टेट बैंक परिवार का सदस्य होना
स्वयं में गौरवान्वित होना है
इस पर
अपनों द्वारा अपनों का सम्मान
वास्तव में स्नेहांकित होना है।
प्रगति पथ पर सदैव
चढ़े नए सोपान
हमारा संस्थान
बस यही एक स्वप्न सलोना है।
💐 ई-अभिव्यक्ति परिवार की ओर से सभी आदरणीयों को हार्दिक बधाई और शुभकामनाएं 💐
हेमन्त बावनकर,
पुणे (महाराष्ट्र)
23 अप्रैल 2022
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ २३ एप्रिल -संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर– ई – अभिव्यक्ती (मराठी)
जयंत श्रीधर टिळक
जयंतराव टिळक हे लो.टिळकांचे नातू. टिळकांनी सुरू केलेल्या ‘केसरी’ वर्तमानपत्राचे ते अनेक वर्षे संपादक होते. १९५० साली त्यांनी ‘केसरी’च्या संपादकपदाची धुरा हाती घेतली. पूर्वी केसरी आठवड्यातून २ वेळा निघायचा. नंतर ३ वेळा निघू लागला. गोवा मुक्तिसंग्राम आणि संयुक्त महाराष्ट्रया दोन्ही लढयांचा ‘केसरी’ने पाठपुरावा केला. त्यामुळे पुढच्या काळात केसरी दैनिक वर्तमानपत्र झाले. ८ ऑक्टोबर १९६२ रोजी विजयादशमीच्या मुहूर्तावर ‘केसरी’ दैनिक झाले.
पुढे ‘केसरीत अनेक बादल झाले. जयंतराव पुढे कॉंग्रेसमध्ये गेले. नंतर राज्यसभेवर गेले. ‘केसरीत इंदिरा गांधींच्या नेतृत्वाचा पुरस्कार झाला. ८० नंतर ‘केसरी’ दलिताभिमुख झाला. जयंतरावांनी ‘‘केसरी’त नाविन्य आणायचा प्रयत्न केला. जयंतराव मंत्री झाल्यानंतर केसरीचे संपादन अनुक्रमे चंद्रकांत घोरपडे, शरच्चंद्र गोखले, अरविन्द गोखले इ.नी सांभाळले.
लो.टिळकांच्या काळात जहाल असलेला ‘केसरी जयंतरावांच्या कारकिर्दीत मवाळ झाला..
जयंतरावाववी ‘वारसा’ हे पुस्तक लिहिले. विविध विषयांवरील आत्मचरित्रात्मक लेखांचा हा संग्रह आहे.
जयंतरावांचा आज स्मृतीदिन. त्या निमित्त त्यांच्या कार्याला प्रणाम
☆ ☆ ☆ ☆ ☆
श्रीमती उज्ज्वला केळकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गूगल विकिपीडिया
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ २२ एप्रिल -संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित – ई – अभिव्यक्ती (मराठी)
श्री.सुनील चिंचोळकर
श्रीसमर्थ रामदास स्वामी यांच्या साहित्याचे अभ्यासक आणि प्रचारक श्री.सुनील चिंचोळकर यांनी आपले आयुष्य समर्थ तसेच अन्य संतांच्या साहित्याच्या अभ्यासासाठी वाहून घेतले होते.त्यांनी प्रा.शिवाजीराव भोसले यांच्या मार्गदर्शनानुसार सज्जनगड येथे वास्तव्य करून वीस वर्षे समर्थांच्या दासबोधाचे अध्ययन केले.दासबोध ग्रंथ तरूणांपर्यंत पोहोचला पाहिजे यासाठी ते विशेष आग्रही होते.अत्यंत अल्प किंमतीत दासबोध ग्रंथ उपलब्ध व्हावा व तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावा अशी त्यांची इच्छा होती. दासबोधातील श्लोकांचा अर्थ सोप्या भाषेत समजावून देण्यासाठी त्यांनी लेखन तर केलेच पण विपुल प्रमाणात व्याख्याने दिली.प्रवचने व कीर्तने यांच्या माध्यमातून समर्थ विचारांचा प्रसार केला.संतविचार व अध्यात्म याविषयी त्यांनी चाळीसहून अधिक पुस्तके लिहिली आहेत.त्यातील काही ग्रंथ याप्रमाणे:
आजच्या संदर्भात दासबोध
दासबोधाचे मानसशास्त्र
दासबोधातील कर्मयोग, भक्तीयोग, ज्ञानयोग
दैनंदिन जीवनात दासबोध
मनाच्या श्लोकातून मनःशांती
समर्थ रामदासांचे व्यवस्थापन
श्री समर्थ चरित्र:आक्षेप आणि खंडन
समर्थ रामदास आणि स्वामी विवेकानंद
शिवाजी आणि रामदास
मानवतेचा महापुजारी:स्वामी विवेकानंद
पारिव्राजक विवेकानंद पत्रे समर्थांची…इत्यादी
समर्थसेवक चिंचोळकर यांचे 22/04/2018 ला आकस्मिक निधन झाले.
आजच्या स्मृतीदिनी त्यांचे पुण्यस्मरण 🙏
☆☆☆☆☆
श्री सुहास रघुनाथ पंडित
ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : विकिपीडिया
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ २० एप्रिल -संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर– ई – अभिव्यक्ती (मराठी)
भारताचार्य चिंतामणी विनायक वैद्य
चिंतामणी विनायक वैद्य यांचा जन्म १८ ऑक्टोबर १८६१ मधे झाला. ते विद्वान होते. संस्कृत भाषेचे चांगले जाणकार होते. थोर ज्ञानोपासक होते. रामायण- महाभारताचे संशोधक, मीमांसक, चतुरस्त्र ग्रंथकार होते. माहितीप्रचुर अशी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली. पौराणिक इतिहासाच्या अनेक अपरिचित भागावर त्यांनी प्रकाश टाकला.
चिं. वि. वैद्य यांनी १८८९ ते १९३४ या काळात मराठी आणि इंग्रजी मिळून एकूण ५०,००० पृष्ठे इतके लेखन केले. त्यांचे स्फुट लेखन केसरी, विविध ज्ञान विस्तार, इंदुप्रकाश इ. नियतकालिकातून प्रकाशित झाले. त्यांनी एकूण २९ ग्रंथ लिहिले. त्यापैकी २० ग्रंथ मराठीत, तर ९ ग्रंथ इंग्रजीत होते.
चिं. वि. वैद्य यांचे प्रकाशित साहित्य
१. संक्षिप्त महाभारत , २. संस्कृत वाङ्मायाचा त्रोटक इतिहास ३. संयोगीता ( नाटक ), ४. श्रीकृष्ण चरित्र , ५. रीडल ऑफ रामायण, ६. मानव धर्मासार, ७. मध्ययुगीन भारत (३ खंड) , ८. दुर्दैवी रंगू ( कादंबरी) ९. अबलोन्नती ( लेखमाला) १०. चिं. वि. वैद्य यांचे ऐतिहासिक निबंध
चिं. वि. वैद्य यांना मिळालेले सन्मान
लो. टिळकांनी त्यांचे तर्कशुद्ध, सखोल लेखन, प्रगाढ अभ्यास करून महाभारताची मीमांसा करणारा आद्य भाष्यकार म्हणून ‘भारताचार्य’ ही पदवी दिली.
१९०८ मध्ये पुणे येथे भरलेल्या ६व्या साहित्य संमेलनाचे (ग्रंथकार संमेलनाचे – त्यावेळी साहित्य संमेलनाला ग्रंथकार संमेलन असा शब्द रूढ होता. ) ते अध्यक्ष होते.
भारतीय इतिहास संशोधन मंडळाचे ते आधी अजीव सभासद होते. नंतर अध्यक्ष झाले.
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे ते पहिले कुलगुरू होते.
☆ ☆ ☆ ☆ ☆
रामनाथ चव्हाण
रामनाथ चव्हाण हे दलित साहित्य आणि सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीतले महत्वाचे कार्यकर्ते आणि लेखक. कथा, कादंबरी, नाटक, एकांकिका, व्यक्तिचित्रे भटक्या, विमुक्तांच्या संदर्भातील संशोधनात्मक लेखन असं विपुल लेखन त्यांनी केलय. पुणे विद्यापीठाच्या आण्णाभाऊ साठे अध्यासनाचे ते प्रमुख होते.
‘भटक्या-विमुक्तांची जातपंचायत हे ५ खंडात प्रकाशित झालेले त्यांचे लेखन महत्वाचा दस्तऐवज मानला जातो. ‘जाती व जमाती’ हेही त्यांचे पुस्तक महत्वाचे मानले जाते.
रामनाथ चव्हाण यांची पुस्तके –
१. भटक्या विमुक्तांचे अंतरंग, २. पारध, ३. बिन चेहर्याची माणसं ४. गवगाडा : काल आणि आज ५. घाणेरीची फुले , ६. नीळी पहाट, ७. पुन्हा साक्षीपुरम ८. वेदनेच्या वाटेवरून ९. दलितांचा राजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
इ. त्यांची महत्वाची पुस्तके आहेत.
☆ ☆ ☆ ☆ ☆
कमलाबाई ओगले
कमलाबाई ओगले यांचा जन्म १६ सप्टेंबर १९१३ रोजी झाला. मराठीतील पाककृती संग्रहाच्या या लेखिका, संपादिका. त्यांनी संकलित केलेल्या पाककृतींचा ‘रुचिरा’ हा संग्रह अतिशय लोकप्रीय झाला. एके काळी नववधूला रुखवताबरोबरच हा संग्रहही दिला जाई. (अजूनही दिला जातो.) हे पुस्तक १९७० साली ‘मेहता’ने प्रकाशित केले. हा संग्रह २ भागात प्रकाशित झालेला आहे. या संग्रहाच्या अनेक आवृत्ती प्रकाशित झाल्यात.
भारताचार्य चिंतामणी विनायक वैद्य , रामनाथ चव्हाण आणि कमलाबाई ओगले या तिघांचाही आज स्मृतीदिन. त्या निमित्त त्यांच्या कार्याला प्रणाम .
☆ ☆ ☆ ☆ ☆
श्रीमती उज्ज्वला केळकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गूगल विकिपीडिया
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ १९ एप्रिल -संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित – ई – अभिव्यक्ती (मराठी)
मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष.
म.वि.राजाध्यक्ष हे मराठीतील नामवंत समीक्षक व ललित लेखक होते.त्यांनी आपले शिक्षण मुंबई येथे पू केले.शिक्षण काळात त्यांनी इंग्रजी साहित्यातिल वर्डस्वर्थ पारितोषिक प्राप्त केले.त्यांनी पुढील काळात अहमदाबाद,मुंबई,कोल्हापूर या ठिकाणी इंग्रजीचे अध्यापन केले.
‘अभिरुची’ या मासिकातून त्यांनी आपल्या लेखनाला सुरुवात केली.या मासिकात निषाद या टोपणनावाने लिहिलेले वाद संवाद हे सदर लोकप्रिय झाले. रत्नाकर, संजीवनी, चित्रा, प्रतिभा,ज्योत्स्ना या मासिकातूनही त्यांनी लेखन केले आहे.
पाच कवी हे त्यांचे पहिले पुस्तक. यात त्यांनी पाच आधुनिक कवींच्या कविता संपादित केल्या आहेत. त्यांचे अन्य साहित्य असे:
इतर : कुसुमावती देशपांडे यांच्यासह लिहीलेले ‘हिस्टरी ऑफ मराठी लिटरेचर’
श्री.राजाध्यक्ष हे पाठ्यपुस्तक व अभ्यासक्रम मंडळाचे काही वर्षे मुख्य संपादक होते. तसेच नॅशनल बुक ट्रस्ट चे विश्वस्तही होते. ज्ञानपीठ पुरस्कार समितीचे सदस्य व साहित्य अकादमीच्या मराठी समितीचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले होते.
दि.19/04/2010 ला म.वि.राजाध्यक्ष यांचे निधन झाले.आज त्यांचा स्मृतीदिन.त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!
☆☆☆☆☆
श्री सुहास रघुनाथ पंडित
ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : विकिपीडिया
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈