श्री सुहास रघुनाथ पंडित
२७ फेब्रुवारी – संपादकीय
कुसुमाग्रज जयंती आणि मराठी भाषा गौरव दिन.
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी कवी कुसुमाग्रज यांचे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान महत्त्वपूर्ण असल्याने त्यांना अभिवादन म्हणून २१ जानेवारी २०१३ रोजी महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार कुसुमाग्रजांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी हा “मराठी भाषा गौरव दिन” म्हणून घोषित करण्यात आले.
१ मे १९६० ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, तेव्हापासून ” १ मे ” दिवस हा मराठी राजभाषा दिन किंवा मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा ही मराठी. हा छोटासा फरक सर्व मराठी प्रेमींना माहिती असावा म्हणून मुद्दाम स्पष्ट करावेसे वाटले.
आपण सर्व मराठी प्रेमी, मराठी भाषेचा विकास,संवर्धन आणि प्रसार होण्यासाठी सतत प्रयत्नशील राहूया.मराठीचा सार्वत्रिक वापर जेव्हा जास्तीत जास्त दिसून येईल तेव्हाच मराठी भाषेचा ख-या गौरव होईल.
आज कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस.त्यांचे काव्य,नाटक,लेखन हे लोकप्रिय तर झालेच पण नव साहित्यिकांना स्फुर्तीदायकही ठरले. देशभक्ती,सामाजिक आशय, प्रेम, निसर्ग प्रतिके, किंवा स्फूर्ती देणा-या शब्दांनी फुललेली त्यांची कविता असो किंवा त्याची कथा,कादंबरी,निबंध,ललित लेख ,नाटक यासारखे गद्य लेखन असो,या सर्वातून मानवतावाद आणि सामाजिक बांधिलकीची जाण अगदी सहजपणे दिसून येते.कविवर्य वसंत बापटांनी कवी कुलगुरू या शब्दात त्यांना गौरवले आहे.नटसम्राट सारख्या अजरामर नाट्यकृतीमुळे त्यांच्या लोकप्रियतेत आणखीनच भर पडली.साहित्य चळवळ जीवंत ठेवण्यासाठी त्यानी दिलेले योगदानही तितकेच महत्त्वाचे आहे.
आज त्यांचा जन्मदिवस.त्या निमित्त त्यांची एक कविता वाचून आपले मराठी भाषेवरील प्रेम व्यक्त करूया.कविता अर्थातच कवितेचा उत्सव या सदरात.
☆☆☆☆☆
ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ: विकिपीडिया.