श्री सुहास रघुनाथ पंडित
१७ फेब्रुवारी – संपादकीय
कै. पुरूषोत्तम शिवराम रेगे: (२ ऑगस्ट १९१० – १७ फेब्रुवारी १९७८)
“जीवन जगले तर साहित्य जगेल असे नसून साहित्य जगले तर जगण्यासारखे काही उरणार आहे” अशी ज्यांची साहित्याविषयी श्रद्धा व धारणा होती त्या पुरुषोत्तम शिवराम रेगे यांचा आज स्मृतीदिन आहे.मराठीतील मागच्या पिढीतील नामवंत कवी,कादंबरीकार व लेखक श्री.रेगे यांनी मुंबई व लंडन विद्यापीठाची अर्थशास्त्रातील पदवी संपादन केली होती.महाराष्ट्र व गोवा राज्यातील अनेक ठिकाणी त्यानी अध्यापनाचे काम केले होते.
रेगे यांची कविता प्रामुख्याने मुक्तछंदातील असली तरी स्वतःचा स्वतंत्र ठसा उमटवणारी होती.
पाश्चात्य काव्याचा प्रभावही त्यांच्या कवितेत दिसून येतो. सृजनशक्ती म्हणजेच स्त्रीशक्ती या मताशी ते ठाम असल्यामुळे त्यांच्या काव्यात,लेखनात याचे प्रत्यंतर येते.
काव्य व कादंबरी तसेच नाट्य निर्मितीशिवाय त्यांनी समीक्षा व शैक्षणिक पुस्तकांचे लेखनही केले होते. 1954 ते 1960 या कालावधीत त्यांनी ‘छंद’ या साहित्यक द्वैमासिकाचे संपादनही केले होते.त्यांनी सुहृदचंपा व रूपकथ्थक या टोपण नावांनीही काही काळ लेखन केले आहे. त्यांच्या काही कथा व कविता गुजराती, जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश, चिनी, रशियन अशा विविध भाषांमध्ये अनुवादित झाल्या आहेत. 1969 साली वर्धा येथे झालेल्या अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. 1965 मध्ये मास्को येथे झालेल्या लघुकथा परिसंवादात त्यानी भारताचे प्रतिनिधित्व केले होते. तसेच त्याच वर्षी केरळ मध्ये भरलेल्या अ.भा.लेखक परिषदेचे ते उद्घाटक होते.
पु.शि.रेगे यांची साहित्य संपदा :
कविता संग्रह:- फुलोरा,गंधरेखा,दुसरा पक्षी,दोला,प्रेमळ,हिमसेक,सुहृदगाथा,पुष्कळा,साधना आणि इतर कविता,पु.शि.रेगे यांची निवडक कविता (संपादित).अनीह हा काव्यसंग्रह मरणोत्तर प्रकाशित झाला .
कादंबरी.:- मातृका, अवलोकिता,रेणू,सावित्री.
नाटक.:- कालयवन,रंगपांचालिक,सावित्री,माधवी–एक देणे.
नाटिका.:- चित्रकामारव्यम्,पालक,मध्यंतर.
कथा :- रूपकथ्थक,मानवा
अन्य साहित्य:- एका पिढीचे आत्मकथन(आत्मचरित्र), छांदसी आणि मर्मभेद(समीक्षा) .
आज त्यांच्या स्मृतीदिनी त्यांना नम्र अभिवादन.
☆☆☆☆☆
ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ: विकीपीडिया ,मराठी विश्वकोश