|| शुभ दीपावली ||

?  || शुभ दीपावली || ?

 

आजपासून दीपावलीला सुरुवात होत आहे. सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा….  !!!!!

 

१ नोव्हेंबर २०२१- वसुबारस !

गाय आणि वासराच्या अंगी असणारी उदारता, प्रसन्नता, शांतता आणि समृद्धी आपणास लाभो !

२ नोव्हेंबर २०२१- धनत्रयोदशी !

धन्वंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत !

निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो ! 

धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो !

४ नोव्हेंबर २०२१- नरकचतुर्दशी !

सत्याचा असत्यावर नेहमीच विजय असावा !

अन्यायाचा प्रतिकार करण्याचे बळ आपल्याला लाभो !! 

आपल्याकडून नेहमी सत्कर्म घडो !

आपणास स्वर्गसुख नित्य लाभो !!

४ नोव्हेंबर २०२१- लक्ष्मीपूजन !

लक्ष्मीचा सहवास आपल्या घरी नित्य रहावा !

नेहमी चांगल्या मार्गाने आपणास लक्ष्मी प्राप्त होवो !

लक्ष्मीपूजनाचे भाग्य आपल्याला नेहमीच लाभो !

घरची लक्ष्मी प्रसन्न तर सारे घर प्रसन्न !

५ नोव्हेंबर २०२१- पाडवा अर्थात बलिप्रतिपदा !

पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात सदैव गोडवा यावा !

सत्याचा असत्यावरचा विजय नेहमीच नव्याने प्रेरणा देत राहो !

थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आपल्याला कायमच मिळत राहोत  !

६ नोव्हेंबर २०२१- भाऊबीज !

सर्वांचे एकमेकांशी असणारे जिव्हाळ्याचे संबंध दर दिवसागणिक उजळत राहू दे !

भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट राहू दे !

? ही दीपावली आपणास आणि आपल्या कुटुंबास आनंदाची आणि भरभराटीची जावो .. ?

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ ३१ ऑक्टोबर – संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? ३१ ऑक्टोबर –  संपादकीय  ?

श्रीकृष्ण अर्जुनवाडकर (31 ऑक्टोबर 1926 ते 30 जुलै 2013 )

*श्रीकृष्ण अर्जुनवाडकर हे व्यासंगी अध्यापक, अभ्यासक, संशोधक होते. संस्कृत आणि अर्धमागधी हे त्यांच्या अभ्यासाचे विषय. त्यांनी मराठी, इंग्रजी आणि सस्कृतमधून लेखन केले.

संस्कृत योग, वेदान्त, उपनिषदे, भगवद्गीता, रससिद्धांत इ. विषयांवर त्यांनी लेखन केले तसेच व्याख्याने दिली. महाराष्ट्र सरकारने पाठ्यपुस्तक निर्मितीची जबाबदारी स्वत:कडे घेतली, त्यापूर्वी त्यांनी, ८वी ,९वी आणि १०वी ची पाठ्यपुस्तके तयार केली. त्यांनी खालील पुस्तके लिहिली. १.मराठी घटना,रचना परंपरा, २. अर्धमागधी घटना आणि रचना ३. अर्धमागधी शालांत प्रदीपिका ४. प्रीत-गौरी-गिरीशम् ( सस्कृत संगीतिका) ५. शास्त्रीय मराठी व्याकरण

संस्कृत भाषा आधुनिक जीवनाच्याजवळ नेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. इंग्रजी अभिवादनांना त्यांनी समर्पक सोपे शब्द सुचवले. उदा. गुड मॉर्निंग- सुप्रभातम् , गुड डे- सुदिनम्,  स्लीप वेल- सुषुप्त, गुड बाय -स्वस्ति इ॰

त्यांच्या जन्म  दिनानिमित्त त्यांचे संस्मरण.

*आनंदीबाई शिर्के

आनंदीबाई शिर्के या जुन्या काळातल्या, म्हणजे पहिल्या पिढीतल्या लेखिका आणि बालसाहित्यिका. ज्या काळात समाजात स्त्रियांचे शिकणेदेखील मान्य नव्हते, त्या काळात त्यांनी कथा लिहिल्या, आत्मचरित्र लिहिले आणि मुलांसाठीही  कथा लिहिल्या. आपल्या कथांमधून आणि ‘सांजवात’ या आत्मचरित्रातून,  जुन्या काळातील स्त्रीजीवनाचे वास्तव चित्रित केले आहे॰  एकत्र कुटुंब पद्धती, मुलींवर आणि स्त्रियांवर असलेली बंधने, समाजातील रूढी.इ.  गोष्टींचा त्यांनी आपल्या लेखनातून वेध घेतला आहे.

निबंध, कथा, बालसाहित्य, स्त्री साहित्य, अनुवादीत साहित्य (गुजरातीतून), आत्मवृत्त  असे त्यांचे त्या काळाच्या मानाने विपुल लेखन आहे.  

त्यांची बहुविध साहित्य निर्मिती स्त्रियांशी निगडीत आशा सामाजिक समस्यांचे चित्रीकरण करणारी आहे. त्या स्वत: पुरोगामी विचारांच्या होत्या. मराठा समाजातील स्त्रियांची स्थिती, गुजरातमधील सामाजिक वातावरण, जुन्या मराठी भाषेतील शब्द, म्हणींचे वैपुल्य इ. त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये सांगता येतील.

कथाकुंज, कुंजविकास, जुईच्या काळ्या, तृणपुष्पे, गुलाबजांब इ. त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. मुलांसाठी त्यांनी वाघाची मावशी, कुरूप राजकन्या व तेरावी कळ, आपली थोर माणसे इ. पुस्तके लिहिली. ‘रूपाळी’ ही त्यांची कादंबरी. त्यांच्या सर्व पुस्तकात ‘सांजवात’ हे पुस्तक विशेष गाजले. यातील निवेदन प्रांजल, हृदयस्पर्शी, वाचकाला अंतर्मुख करणारे आहे. हे पुस्तक १९७२ साली  म्हणजे त्यांच्या वयाच्या ८० व्या वर्षी प्रकाशित झाले.  समकालीन लेखकांमध्ये महत्वाच्या लेखिका म्हणून यांचे नाव घेतले जाते. मराठी साहित्य परिषदेतर्फे दरवर्षी उत्तम कथासंग्रहाला दिला जाणारा पुरस्कार ‘आनंदीबाई शिर्के’ या नावाने दिला जातो.

आज त्यांच्या स्मृतीदिंनंनिमित्त त्यांना विनम्र श्रद्धांजली.  

श्रीमती उज्ज्वला केळकर

ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : – १) कऱ्हाड शिक्षण मंडळ “ साहित्य-साधना दैनंदिनी. २) माहितीस्रोत — इंटरनेट 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ ३० ऑक्टोबर – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? ३० ऑक्टोबर  –  संपादकीय  ?

‘रणांगण’ या गाजलेल्या कादंबरीचे लेखक श्री.विश्वनाथ चिंतामणी उर्फ विश्राम बेडेकर आणि ‘वासूनाका’ कार श्री.प्रभाकर नारायण उर्फ भाऊ पाध्ये यांचा आज स्मृतीदिन.

विश्राम बेडेकर यांचा जन्म 1906 मध्ये अमरावती येथे झाला.त्यांचे शिक्षण अमरावती व पुणे येथे झाले.मराठी साहित्यात कादंबरी बरोबरच त्यांनी पटकथा लेखनही केले. शिवाय सुमारे 15 चित्रपटांचे दिग्दर्शन व सहदिग्दर्शनही त्यांनी केले आहे. 1934 साली त्यांनी कृष्णार्जुन युद्ध या चित्रपटाचे सर्वप्रथम दिग्दर्शन केले. एक झाड दोन पक्षी हे त्यांचे आत्मचरित्र खूप गाजले. टिळक आणि आगरकर, ब्रह्मकुमारी, वाजे पाऊल आपुले, नरो वा कुंजरोsवा इ. नाटके त्यांनी लिहिली. शेजारी, स्वा.सावरकर, काबुलीवाला(हिंदी),

The Immortal सांग (अमर भूपाळी) इ. चित्रपटांचे पटकथा लेखन केले. सिलीसबर्गची पत्रे हे त्यांचे आठवणींवर आधारीत पुस्तक.

एक झाड दोन पक्षी’ या त्यांच्या आत्मचरित्रास 1985 चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. तसेच विष्णूदास भावे पुरस्कार सांगली येथे 1982 ला देण्यात आला. 1986 च्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. मुंबई येथील मराठी साहित्य  संमेलनाचेही ते 1988 ला अध्यक्ष होते.

दि.30/10/1998 ला त्यांचे पुणे येथे निधन झाले.

भाऊ पाध्ये हे अर्थशास्त्रातील पदवीधर! पण त्यांनी साहित्य,कामगार चळवळ, पत्रकारिता अशा  विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले.

अग्रेसर, करंटा, बॅ.अनिरुद्ध धोपेश्वरकर, राडा, वणवा, वासूनाका या त्यांच्या काही कादंब-या. डोंबा-याचा खेळ, पिचकारी, मुरगी, थालीपीठ, थोडी सी जो पी ली हे त्यांचे कथासंग्रह. शिवाय गुरूदत्त चरित्रही व ऑपरेशन छक्का हे नाटक त्यानी लिहिले.

वैतागवाडी या त्यांच्या कादंबरीस 1965 सालचा महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार मिळाला. बॅ. धोपेश्वरकर या कादंबरीला 1968 चा  ‘ललित’ पुरस्कार मिळाला. 1993 साली महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाने त्यांना गौरववृत्ती जाहिर केली.

त्यांच्या साहित्याविषयी जाणकारांनी अनेक मते व्यक्त केली आहेत. मराठी साहित्य विश्वात वादळ निर्माण करणारे  साहित्यिक असे त्यांचे वर्णन केले जाते. त्यांचे लेखन थेट वास्तवाला भिडणारे आहे. त्यांच्या लेखनातून मुंबईतील संक्रमणकाळात झालेले बदल चित्रित झालेले दिसतात. मराठी साहित्यात स्वतःचा ठसा निर्माण करणा-या भाऊ पाध्ये यांचे 30/10/1996 ला निधन झाले.

श्री.बेडेकर व पाध्ये यांना स्मृती वंदन!.

श्री सुहास रघुनाथ पंडित

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ :- विकिपीडिआ साभार.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ २९ ऑक्टोबर – संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? २९ ऑक्टोबर –  संपादकीय  ?

प्रभाकर तामणे (२९ ऑक्टोबर १९३१)

प्रभाकर तामणे हे गरवारे कॉलेजमध्ये प्राध्यापक होते. विनोदी कथाकार म्हणून ते लोकप्रिय होते. त्यांनी अनेक कथा- कादंबर्‍या लिहिल्या.

‘अशीच एक रात्र येते’ हे त्यांनी फ्लॅश बॅक तंत्राने लिहिलेले नाटक खूप गाजले. या नाटकाचे पुढे हिन्दी, गुजराती, पंजाबी, कोकणी इ. भाषात अनुवाद झाले. एक धागा सुखाचा, मधुचंद्र, रात्र वादळाची इ. त्यांनी लिहीलेल्या कथांवरील चित्रपट गाजले. त्यांच्या एका कथेवर , राजकपूरने हिन्दी भाषेत काढलेला ‘बीवी ओ बीवी’ हा चित्रपटही गाजला.

अनामिक नाते, छक्केपंजे, एक काली उमळताना. हिमफुलांच्या देशात इ. त्यांची पुस्तके  प्रसिद्ध आहेत.  

रा.ना. चव्हाण – (१९१३-१९९३ )

रा.ना. चव्हाण हे दलित चळवळ आणि सत्यशोधक चळवळ यातील खंदे कार्यकर्ते. त्यांनी  वैचारिक लेखन केले. त्यांचे ८०० च्या वर वैचारिक लेख आहेत. त्यांचे ८ ग्रंथ आहेत.  प्रत्यक्ष रा. नांवरही, रानांच्या आठवणी . निवडक लेख, त्यांचे धर्मचिंतनपर लेख इ. पुस्तके लिहिली गेली आहेत. अक्षरवेध ( साहित्य समीक्षा) , ग्रामीण भागातील शिक्षण परंपरा, जनजागरण, परिवर्तनाची क्षितिजे, भारतीय संस्कृती व तिची वाटचाल इ. रा. नां॰ची पुस्तके प्रसिद्ध आहेत.

रा.ना. चव्हाण यांना महाराष्ट्र शासनाचा ‘दलित मित्र’ हा पुरस्कार १९८३ साली मिळाला.

 महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाची गौरववृत्ती आणि मानपत्र १९८९ साली मिळाले. सातारा येथे झालेल्या, मराठी साहित्य संमेलनात त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.

वसंत पळशीकर – (१८ फेब्रुवारी १९३६ – २९ ऑक्टोबर २०१६ )

वसंत पळशीकर हे मूलगामी आणि सर्वंकष लेखनासाठी प्रसिद्ध आसलेले विचारवंत होते. सामाजिक आणि राजकीय प्रश्न, चालवली, धर्म, विज्ञान, पर्यावरण इ. क्षेत्रातील विषयांवर त्यांनी लेखन केले. ‘नवभारत’ आणि ‘समाज प्रबोधन पत्रिका’ यांचे ते संपादक होते. ज्ञात महितीचा खजिना म्हणून त्यांच्याकडे बघितले जाई. त्यांनी विविध नियतकालिकातून केलेले लेखन १००० पृष्ठांपेक्षा जास्त आहे. त्यांच्या कार्याची माहिती देणारा लघुपटही आहे. चौकटीबाहेरचे चिंतन , परिवर्तन चिंतन आणि चिकित्सा , परांपरिक आणि आधुनिक शेती इ. त्यांची पुस्तके आहेत.

त्यांना अनंत भालेराव स्मृती पुरस्कार देण्यात आला होता. आज त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.   

मीना वांगीकर (१९५०- २०१५ )

मीना वांगीकर या अनुवादिका म्हणून प्रसिद्ध होत्या. त्यांनी उत्तम कन्नड पुस्तकांचा मराठीत व मराठी पुस्तकांचा कन्नडमध्ये अनुवाद केला आहे.  ‘ययाती’ (वि. स. खांडेकर}) आणि ‘मी जेनी’ (आनंत कुलकर्णी) या पुस्तकांचा मराठीतून कन्नडमध्ये अनुवाद केला आहे तर मुक्क्ज्जी, धूम्रकेतू, प्र प्रवासाचा आणि फ फजितीचा, ब्रम्हांड इ. कन्नड कादंबर्‍यांचा अनुवाद मराठीत केला आहे.

त्यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा स. ह. मोडक पुरस्कार मिळाला आहे. आज त्यांनाही स्मृतिदिनानिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली.

श्रीमती उज्ज्वला केळकर

ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : – १) कऱ्हाड शिक्षण मंडळ “ साहित्य-साधना दैनंदिनी. २) माहितीस्रोत — इंटरनेट 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ २८ ऑक्टोबर – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? २८ ऑक्टोबर  –  संपादकीय  ?

आज २८ ऑक्टोबर — सुप्रसिद्ध कवी गिरीश म्हणजे श्री. शंकर केशव कानेटकर, यांचा जन्मदिन. ( २८/१०/१८९३ – ४/१२/१९७३ ) 

१९२० च्या दशकात पुण्यातील काही समविचारी कवींनी ,कविता लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने स्थापन केलेल्या “ रविकिरण मंडळाचे “ कवी गिरीश हे अगदी स्थापनेपासूनच एक प्रमुख सदस्य होते. मुधोजी हायस्कुल, फलटण इथे प्राचार्य म्हणून कार्यरत असतांना, त्याच काळात त्यांनी अनेक कविता लिहिल्या. बालकवी आणि गोविंदाग्रज या त्यावेळच्या दोन प्रसिद्ध कवींकडून त्यांनी काव्यरचनेची स्फूर्ती घेतली असे जरी म्हटले जात असले, तरी कवी गिरीश यांची काव्यरचना स्वतंत्र होती. कवितेत विविध वृत्तांचा उपयोग, रेखीव काव्यरचना, वळणदार घोटीव अक्षर, ही त्यांच्या कवितेची लक्षणीय वैशिष्ट्ये होती. कांचनगंगा, चंद्रलेखा, फलभार, बालगीत, आणि, सोनेरी चांदणे, असे त्यांचे ५ काव्यसंग्रह प्रसिद्ध झालेले आहेत. याव्यतिरिक्त त्यांची समृद्ध काव्यसंपदा पुढीलप्रमाणे आहे—- चार स्वरचित खंडकाव्ये, प्रसिद्ध पाश्चात्य कवी टेनिसन यांच्या “इनॉक आर्डेन” या दीर्घकाव्याचा “ अनिकेत “ या नावाने काव्यानुवाद, कवी यशवंत आणि कवी गिरीश यांच्या एकत्रित कवितांचे “ वीणा झंकार,” आणि “ यशोगौरी “ हे दोन काव्यसंग्रह.

“मनोरंजन” या तेव्हाच्या प्रसिद्ध मासिकात क्रमशः प्रसिद्ध झालेले “ अभागी कमल “ हे  त्यांचे   सामाजिक विषयावरील खंडकाव्य तेव्हा वाचकांना खूपच आवडले होते. या खंडकाव्यापासूनच  सामाजिक खंडकाव्याची सुरुवात झाली असे यथार्थपणे म्हणता येईल. याबरोबरच त्यांनी “ कला “ हे एक खंडात्मक दीर्घकाव्य, आणि “ आंबराई “ हे ग्रामीण जीवनावरील खंडकाव्यही लिहिले.

“पोर खाटेवर मृत्यूच्याच दारा,

         कुणा गरीबाचा तळमळे बिचारा”

—-अशासारखी त्यांची हृदयाला भिडणारी कविता आम्ही शाळेत असतांना शिकलेली आहे. 

त्यांच्या अनेक स्फुट कविताही  प्रसिद्ध झालेल्या होत्या. 

कवी माधव ज्युलियन यांचे चरित्र, रेव्हरंड ना.वा. टिळक यांच्या “ ख्रिस्तायन ” या गाजलेल्या पुस्तकाचे पुन्हा संपादन, माधव ज्युलियन यांच्या “ स्वप्नलहरी “ पुस्तकाचे संपादन, अशा इतर कामांचे श्रेयही कवी गिरीश यांचेच आहे. 

फलटणप्रमाणेच पुणे आणि सांगली इथेही ते शिक्षक-प्राध्यापक म्हणून कार्यरत होते, आणि शिक्षणक्षेत्रातील त्यांच्या या बहुमोल योगदानाबद्दल १९५९ साली “राष्ट्रपती-पदक”  देऊन त्यांचा गौरव केला गेला होता, हे आवर्जून सांगायला हवे. 

आजचे सुप्रसिद्ध नाटककार श्री. वसंत कानेटकर, आणि गायक मधुसूदन कानेटकर हे कवी गिरीश यांचे सुपुत्रही त्यांच्यासारखेच सुकीर्त झालेले आहेत, हे रसिकांना ज्ञात असेलच. 

कविवर्य गिरीश यांना त्यांच्या जन्मदिनी विनम्र प्रणाम. 

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग.

संदर्भ : – १) कऱ्हाड शिक्षण मंडळ “ साहित्य-साधना दैनंदिनी. २) माहितीस्रोत — इंटरनेट 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ २७ ऑक्टोबर – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? २७ ऑक्टोबर  –  संपादकीय  ?

भा. रा. तांबेमधु मागशी माझ्या सख्यापरी, जन पळभर म्हणतील हाय हाय, नववधू प्रिया मी बावरते, कशी काळ नागिणी,  तिन्ही सांजा सखे मिळाल्या… यासारख्या एकाहून  एक सरस भावकवितांचे जन्मदाते राजकवी भास्कर रामचंद्र तांबे यांचा आज जन्मदिवस. मध्य भारतातील (म.प्र.) ग्वाल्हेर जवळील मुगावली येथे 1873 मध्ये त्यांचा जन्म  झाला. अर्वाचीन मराठी कवींपैकी एक महत्त्वाचे कवी. आपल्या आयुष्यात त्यांनी  युवराजशिक्षक, दिवाण, पोलीस सुपरिंटेंडंट, सरकारी वकील, न्यायाधीश अशा विविध पदांवर काम केले असले तरी त्यांचा पिंड हा कविमनाचा होता. तो त्यांनी आयुष्यभर जपला. हिंदी आणि उर्दू काव्य, गझल यांचा अभ्यास आणि शास्त्रशुद्ध वैदिक शिक्षण  याचा त्यांना मराठी काव्यरचनेत खूप उपयोग झाला. शिवाय टेनिसन, ब्राउनिंग यासारखे पाश्चात्य कवी, जयदेव यांचे संस्कृत काव्य, रवींद्रनाथ टागोर यांचे साहित्य या सर्वांमुळे त्यांची कविता समृद्ध होत गेली. त्यांची कविता ही संदेश देणारी किंवा प्रचारात्मक नव्हे तर ती विशुद्ध आनंद देणारी भावकविता आहे. गेयता लाभलेली त्यांची कविता म्हणूनच गीतात रुपांतरीत झाली आणि मराठी माणसाच्या ओठावर जाऊन बसली. त्यांच्या कवितेतून त्यांच्या तृप्त, समाधानी जीवनाचे दर्शन घडते. सौंदर्यवादी दृष्टीकोनाबरोबरच परमेश्वरावरील श्रद्धा ही त्यांच्या सात्विक काव्य निर्मितीचे मुख्य गमक आहे.

त्यांचा पहिला कविता संग्रह 1920 ला प्रकाशित झाला. नंतर 1935 मध्ये समग्र तांबे कविता प्रसिद्ध झाली. त्यात 225 हून अधिक कवितांचा समावेश आहे. त्यांनी काव्यविषयक गद्य लेखनही विपुल प्रमाणात केले आहे.रविकिरण मंडळातील कवींवर त्यांच्या साहित्याची छाप पडली होती.1926 साली मध्य भारतीय कवी संमेलनाचे ते अध्यक्ष होते. तसेच 1932 मध्ये कोल्हापूर येथे साहित्य संमेलनांतर्गत कवी संमेलनाचे ते अध्यक्ष होते. 1937 साली ग्वाल्हेर संस्थानने त्यांना राजकवी हा सन्मान दिला. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सरकारने त्यांच्या नावाने अनेक पुरस्कार ठेवले आहेत. तसेच त्यांनाही सन्मानित करण्यात आले आहे. या काव्यभास्कराचे ग्वाल्हेर येथे 1941 मध्ये निधन झाले.

भास्कर रामचंद्र भागवत आणि श्रीधर कृष्ण शनवारे या दोन ज्येष्ठ साहित्यिकांचा आज स्मृतीदिन.

भास्कर रामचंद्र भागवत हे प्रामुख्याने बाल साहित्य क्षेत्रातील  प्रसिद्ध साहित्यिक. त्यांनी अर्थ शास्त्रातील पदवी संपादन केली होती.परंतू त्यांना सुरूवातीपासूनच इंग्रजी साहित्य व विज्ञान अभ्यासाची विशेष आवड होती.तसेच त्यांनी काही काळासाठी पत्रकारिताही केली. आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रात मराठी अनुवादक म्हणून काम केले. स्वातंत्र्य चळवळीतीही त्यांचा सहभाग होता. ‘खेळगडी’ या मासिकाचे संपादनही त्यांनी केले होते.

वैतागवनातील वाफाटे हे त्यांचे विनोदी लेखन, फास्टर फेणे या मध्यवर्ती पात्राभोवती गुंफलेले कथानक, साहसकथांचा अनुवाद, किशोरवीन मुलांसाठी अद्भूतरम्य कादंबरी लेखन त्यांनी केले. खजिन्याचा शोध, तुटक्या कानाचे रहस्य,  भुताळी जहाज, साखरसोंड्या, जंगलबुकातील दंगल  यासारखे अनेक बाल कुमार प्रिय साहित्य त्यांनी लिहिले. 1975च्या बाल कमार साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. या शिवाय ते नाट्य अभ्यासक व नाट्य समीक्षक ही होते. त्यानी मराठी नाट्यकोशाचे लेखन संपादनही केले. अशा या थोर साहित्यिकाचे निधन 27 /10/2001 ला झाले.

श्रीधर कृष्ण शनवारे हे विदर्भातील ज्येष्ठ साहित्यिक.त्यांनी धनवटे महाविद्यालयात 35 वर्षे अध्यापन केले. या संपूर्ण कालावधीत व अक्षरशः  शेवटपर्यंत त्यानी लेखन, काव्यलेखन केले.त्यांचे लेखन विविधांगी आहे. नऊ काव्य संग्रह व समीक्षा, अनुवादात्मक सोळा पुस्तके त्यांच्या नावावर आहेत.’अतूट’ हे नाटक त्यांनी मूळ बंगाली साहित्यकृताीवरून लिहिले। उन्ह उतरणी, आतून बंद बेट, थांग अथांग, तळे संध्याकाळचे, तीन ओळींची कविता, सखा हे त्यांचे काही काव्यसंग्रह.राक्षसाचे वाडे हे बालसाहित्य, कथाकार वामन चोरघडे समीक्षाग्रंथ, कोलंबसाची इंडिया व पायावर चक्र ही प्रवास वर्णने, थेंब थेंब चिंतन हे चिंतनात्मक अशी समृद्ध   साहित्य संपदा त्यांनी निर्माण केली आहे.उन्हं उतरणी याला केशवसुत पुरस्कार व थांग अथांग ला कुसुमाग्रज पुरस्कार प्राप्त झाला आहे.तर आतून बंद बेट हा काव्यसंग्रह नागपूर विद्यापीठात अभ्यासक्रमासाठी लावण्यात आला होता. 

‘जातो माघारा’  हा कविता संग्रह प्रकाशनाच्या  वाटेवर असतानाच त्यांचे दि 27/10/2013 ला दुःखद निधन झाले.

अशा या ज्येष्ठ साहित्यिकांना ही शब्दवंदना !

श्री सुहास रघुनाथ पंडित

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ :- विकिपीडिआ साभार.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ २६ ऑक्टोबर – संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? २६ ऑक्टोबर  –  संपादकीय  ?

नोबेल पुरस्कार : आल्फ्रेड बनार्ड नोबेल हे स्वीडिश  रसायन शास्रज्ञ होते. डायनामाईट या जगप्रसिद्ध विस्फोटकाचा शोध त्यांनी लावला. या शोधामुळे त्यांना अमाप संपत्ती मिळाली, परंतु आपल्या शोधाचा उपयोग युद्धातच जास्त प्रमाणात होत असल्याचे त्यांना दिसून आले. त्यामुळे अनेकांच्या मृत्यूला आपण करणीभूत झालो, ही गोष्ट त्यांना सलत होती. म्हणून त्यांनी आपल्या मृत्युपत्रामध्ये, स्वत: मिळवलेल्या या अमाप संपत्तीमधील मोठा वाटा  नोबेल पुरस्कार देण्यासाठी म्हणून वापरला जावा, अशी तरतूद केली. त्यांच्या या इच्छेनुसार आल्फ्रेड बनार्ड नोबेल यांच्या पाचव्या स्मृतिदिनापासून म्हणजेच १०डिसेंबर १९०१ पासून रसायनशास्त्र,  साहित्य, जागतिक शांतता, वैद्यकशास्त्र, किंवा जीवशास्त्र आणि अर्थशास्त्र या क्षेत्रामध्ये, संपूर्ण विश्वात अतुलनीय कामगिरी करणार्‍या संशोधक व शांतीदूताला पारितोषिक म्हणून हा पुरस्कार देण्यास सुरुवात केली.

रवींद्रनाथ टागोर – ( ७ मे १८६१- ७ ऑगस्ट १९४१)   भारतामध्ये हा पुरस्कार साहित्य क्षेत्रासाठी रवींद्रनाथ टागोर यांच्या गीतांजलीला सन १९१३ साली मिळाला. ते कवी, कथाकार, नाटककार, संगीतकार, चित्रकार, शिक्षणतज्ज्ञ, तत्वज्ञ   होते. रवींद्र संगीत म्हणून संगीताची नवी धारा त्यांनी प्रवाहीत केली. त्यांचे वैचारिक आणि ललित लेखनही आहे. घर और बाहर, कबुलीवला, द गार्डनर, स्ट्रे बर्ड्स, द गोल्डन बोट, द पोस्ट ऑफिस इ. त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. कबुलीवला, पोस्ट ऑफिस इ. त्यांच्या पुस्तकांवर चित्रपटही निघाले.

त्यांना १९१५ मध्ये किंग जॉर्ज पंचम यांनी नाईटहूड ही पदवी दिली होती. ती त्यांनी ‘जालियनवाला बाग’ हत्याकांडाच्या निषेधार्थ परत केली. 

सर विद्याधर सूरजप्रसाद नायपॉल –(१७ऑगस्ट – २०१८) व्ही. एस. नायपॉल म्हणून त्यांची विश्वात ओळख आहे. नोबेल परितोषिक मिळवणारे हे भारतीय वंशाचे पण लंडनमध्ये वास्तव्य करणारे साहित्यिक। त्यांना साहित्यासाठी २००१ मधे नोबेल पुरस्कार मिळाला. त्यांनी अनेक कादंबर्‍या लिहिल्या. त्यापैकी ‘ए हाऊस ऑफ मि.विश्वास’ ही कादंबरी विशेष गाजली. याशिवाय त्यांनी, ए बेंड इन द रिव्हर, इन ए फ्री स्ट्रीट, अ वे इन द वर्ल्ड, मॅजिक सीडस इ. कादंबर्‍या लिहिल्या. या व्यतिरिक्त अन्य अनेक विषयांवरची त्यांची पुस्तके आहेत. त्यांनी भारताचा इतिहास, सस्कृती, सभ्यता यावर ‘अ‍ॅन एरिया ऑफ डार्कनेस’ आणि ‘अ वुंडेड सिव्हीलयझेशन’ ही पुस्तके लिहिली.

श्रीमती उज्ज्वला केळकर

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ :- १) कऱ्हाड शिक्षण मंडळ “ साहित्य-साधना दैनंदिनी “.  २) गूगल गुरुजी 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ २५ ऑक्टोबर – संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? २५ ऑक्टोबर  –  संपादकीय  ?

अरुण म्हात्रे ( २५ ऑक्टोबर १९५४ )

 हे उत्तम कवी, गीतकार आणि निवेदक आहेत. ते प्रामुख्याने गेय कविता लिहितात. प्रेमातील आर्तता, विव्हलता, अगतिकता अतिशय प्रभावीपणे त्यांनी आपल्या कवितातून मांडली आहे. ‘उंच माझा झोका’ या दूरचित्रवाणीवरील शीर्षक गीत त्यांचे आहे.

 ‘मानतो कागदाला, मानतो लेखणीला

कळे शब्दात अंतीम असे, नसतेच काही ‘

असे म्हणणारी त्यांची कविता उपजतच छान लय घेऊन येते. कविता लोकांपर्यंत पोचावी. त्यांच्यात आवड निर्माण व्हावी, या हेतूने म्हात्रे यांनी आपल्या सहा कविमित्रांसह ‘कवितांच्या गावा जावे’ या मैफलीचे गावोगावी जाऊन सादरीकरण केले आणि श्रोत्यांना रसिक बनवण्याचा प्रयत्न केला.  त्यांच्या अशा मैफली अतिशय लोकप्रिय झाल्या.

अरुण म्हात्रे यांनी नाटके दिग्दर्शित केली. संगीताचे कार्यक्रम केले. उत्तम कवी होण्यासाठी नुसती पुस्तके वाचून चालत नाही. माणसं वाचावी लागतात, असं ते म्हणतात.

त्यांची १. ऋतु शहरातला, २. कोसो मैल दूर आहे चांदणी ३. ते दिवस आता कुठे इ. पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांना, बहिणाबाई, वसंती गाडगीळ, स्नेह चषक इ. पुरस्कार मिळाले.. वाचक त्यांच्या नवनवीन कवितांच्या प्रतीक्षेत आहेत, या अपेक्षेसह त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

केशव रंगनाथ शिरवाडकर (१९२६ – २०१८)

हे कुसुमाग्रजांचे चुलत भाऊ. ‘तो प्रवास सुंदर होता (कुसुमाग्रज जीवन आणि साहित्य), मर्ढेकरांची कविता (समीक्षा), रंगविश्वातील रसायात्रा , सार गीतरहस्याचे, विचारधारा इ. पुस्तके त्यांनी लिहिली.’आपले विचारविश्व’ हे पुस्तक त्यांनी वयाच्या ८४ व्या वर्षी लिहिले. भारतीय तत्वज्ञानाच्या विचारांच्या संदर्भात जगातील महत्वाच्या तत्वज्ञानाचे यात त्यांनी परिशीलन केले आहे.

रूस्तुम अचलखांब (१९२६ – २०१८)

हे आंबेडकर मराठा विद्यालयात नाट्यशास्त्राचे विभाग प्रमुख होते. लोकनाट्य, तमाशा आणि लोककला यात त्यांनी विद्यावाचस्पती ही पदवी मिळवली. त्यांनी शाहीरी परंपरा अभ्यासून विस्मृतीत गेलेल्या, साहित्याला मोलाचे योगदान देणार्‍या, व्यक्तींविषयी सशोधन केले.  दुर्लक्षित कलाकार शोधून, ते म्हणत असलेले काव्य, त्यांच्या चाली यांच्या नोंदी केल्या. अनेक संगीत नाटके त्यांनी बसवली. ‘शिवरायांचा आठवावा प्रताप’ मधे गोंधळ, भारुड, इ. लोककलांच्या माध्यमातून, शिवाजी महाराजांचा इतिहास समजावून सांगितला. अभिनयशास्त्र, तनाशा लोकरंगभूमी, गावकी ( आत्मकथन) इ. पुस्तके त्यांनी लिहिली.

पिंपरी-चिंचवड इथे झालेल्या भारतीय दलित नाट्यसंमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांना विनम्र श्रद्धांजली.

श्रीमती उज्ज्वला केळकर

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ :- १) कऱ्हाड शिक्षण मंडळ “ साहित्य-साधना दैनंदिनी “.  २) गूगल गुरुजी 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ २४ ऑक्टोबर – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? २४ ऑक्टोबर  –  संपादकीय  ?

प्रसिद्ध मराठी कथालेखक श्री.अरविंद विष्णू गोखले यांचा 24 ऑक्टोबर हा स्मृतीदिन(1992). त्यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे झाला. शिक्षण पुणे, मुंबई येथे झाले. एम्. एस्सी.बाॅटनी, तसेच अमेरिकेतील व्हिस्काॅन्सिन विद्यापीठात तांत्रिक वृत्तपत्र विद्या अभ्यास पूर्ण करून एम.एस् ही पदवी मिळवली. पुण्याच्या शासकीय कृषी महाविद्यालयात संशोधन आणि अध्यापन केले. नंतर त्यानी मुंबईत धरमसी कंपनीत नोकरी केली.

पण हे सर्व करत असताना त्यांचे लेखन व प्रामुख्याने कथा लेखन ही चालू होते. त्यांची पहिली कथा ‘हेअर कटिंग सलून’ वयाच्या सोळाव्या वर्षी प्रसिद्ध झाली. पुढील आयुष्यात त्यांनी 350 हून अधिक कथा लिहील्या. कातरवेळ, मंजुळा, रिक्ता, कॅक्टस, विघ्नहर्ती या त्यांच्या काही गाजलेल्या कथा. त्यांच्या अनेक कथांचे भारतीय व युरोपीय भाषांमध्ये भाषांतर झाले आहे. त्यांनीही वेचक अमेरिकन कथांचे अनुवाद केले आहेत.

त्यांचे काही कथासंग्रह: अक्षता, कथाई,  कथाष्टके, गंधवार्ता, चाहूल, देशांतर, माणूस आणि कळस, अनामिका, मिथिला इ.

कादंबरी: आय.सी. 814, शपथ

आत्मकथन: शुभा

अनुभवकथन: आले पाक

प्रवासवर्णन: अमेरिकेस जाऊन पहावे, असाही पाकिस्तान.

याशिवाय माहितीपर, संपादित कथा, असे विपुल लेखन त्यांनी केले आहे. त्यांच्या कथासंग्रहाना महाराष्ट्र शासनाचे तीन पुरस्कार मिळाले आहेत. तसेच काही कथांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. अशा या चतुरस्त्र लेखकास स्मृतीदिनानामित्त अभिवादन.

 

श्री सुहास रघुनाथ पंडित

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ :- विकिपीडिआ साभार.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ २३ ऑक्टोबर – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? २३ ऑक्टोबर  –  संपादकीय  ?

आज २३ ऑक्टोबर :

मराठीतील प्रसिद्ध कवयित्री आणि कथालेखिका नीरजा यांचा जन्मदिन. प्रसिद्ध समीक्षक श्री. म. सु. पाटील यांची ही कन्या. पण त्यांनी कवितेची सर्जनशील वाट निवडली, ज्यावरचा त्यांचा प्रवास अतिशय दमदारपणे सुरु आहे. ‘ ग्रंथाली ‘ आणि ‘ सानेगुरुजी ट्रस्ट’ च्या अनुवाद सुविधा केंद्राच्या त्या पदाधिकारी आहेत. महाविद्यालयात असतांनाच त्यांनी कविता करायला सुरुवात केली होती. मुंबईत झालेल्या ६० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात नीरजा यांनी नवोदित कवयित्री म्हणून त्यांची ‘ सावित्री ‘ ही कविता वाचून खूप दाद मिळवली, आणि पुढच्याच वर्षी कविसंमेलनात त्यांना ‘ निमंत्रित ‘ म्हणून बोलावले गेले. पुढे २०१३ साली पुण्यात भरलेल्या ‘ सम्यक साहित्य संमेलनाचे ‘ अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. ‘ सकाळ सप्तरंग’ पुरवणीतले त्यांचे ‘ मी कात टाकली ‘ हे सादर खूप लोकप्रिय ठरले. कवितासंग्रह, कथासंग्रह, ललित लेख संग्रह असे त्यांचे विविध साहित्य प्रकाशित झालेले आहे. ‘ वेणा ‘ हा त्यांचा पहिला कवितासंग्रह. नंतर त्यांचे-स्त्रीगणेश, नीरन्वय, निरर्थकाचे पक्षी, असे काव्यसंग्रह, ओल हरवलेली माती, पावसात सूर्य शोधणारी माणसं , असे कथासंग्रह, चिंतनशलाका, बदलत्या चौकटी असे ललितलेख संग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यांच्या एकूणच सगळ्या लेखनातून आधुनिक जीवनाविषयीच्या जाणीवा ठळकपणे व्यक्त होतांना दिसतात. कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक, यांच्यातर्फे ‘ कुसुमाग्रजांच्या कवितेतल्या स्त्री-प्रतिमा ‘ याविषयावर बोलण्यासाठी त्यांना आमंत्रित करण्यात आले होते, हे विशेषत्वाने सांगायला हवे. त्यांना अनेक साहित्य-पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. उदा. केशवराव कोठावळे पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा कवी ह. स. गोखले पुरस्कार, इंदिरा संत, कवी केशवसुत, पु. भा. भावे यांच्या नावाने दिले जाणारे राज्य पुरस्कार, म . रा. साहित्य संस्कृती महामंडळाचा यशवंतराव चव्हाण पुरस्कार, डॉ. अ. वा. वर्टी कथालेखक पुरस्कार इ. — त्यांची साहित्य संपदा अशीच वृद्धिंगत होत राहो, आणि पुरस्कारांची यादी सतत वाढती राहो या सदिच्छांसह कवयित्री नीरजा यांना त्यांच्या आजच्या जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. 

☆ ☆ ☆ ☆ ☆ 

आज सुप्रसिद्ध पाक-कला तज्ज्ञ श्रीमती मंगला बर्वे यांचा स्मृतिदिन. मराठीत पाककृतीवरील अनेक पुस्तके लिहिणाऱ्या लेखिका म्हणून विशेषतः महिला वर्गात त्या अतिशय सुपरिचित आहेत. . पदार्थांच्या वैचित्र्यपूर्ण पण अतिशय चपखल अशा वेगवेगळ्या कॉम्बिनेशन्समधून त्यांनी अनेक नवनवीन पाककृती पुस्तकांच्या माध्यमातून गृहिणींपर्यंत पोहोचवल्या. त्यापैकी ‘ अन्नपूर्णा ‘ या पुस्तकाची आता ७७ वी आवृत्ती निघालेली आहे. हे पुस्तक म्हणजे सासरी निघालेल्या मुलींसाठी जणू पाचवा वेदच, असे या पुस्तकाबद्दल गौरवाने म्हटले जाते. त्यांनी अशा विविध पाककृतींची अगदी सविस्तर माहिती देणारी एकूण २६ पुस्तके लिहिली आहेत. यातील काही पुस्तके इंटरनेटवरही उपलब्ध आहेत. नेहेमीच्या पदार्थांबरोबरच, ओव्हनमध्ये करता येतील असे पदार्थ, चायनीज पदार्थ, लग्नात केले जाणारे रुखवत, मांसाहारी पदार्थ, साग्रसंगीत शाकाहारी २१ मेजवान्या याची साद्यन्त माहिती देणारी पुस्तकेही त्यांनी लिहिली. पाककृतींचा नेमकेपणा, त्यात वापरल्या जाणाऱ्या घटकांचे नेमके प्रमाण  हे त्यांनी सांगितलेल्या सगळ्याच पदार्थांचे वैशिष्ट्य आहे.

‘लोकरीने विणून केलेली खेळणी ‘ हे एक वेगळ्या विषयावरचे त्यांचे पुस्तकही  प्रसिद्ध आहे.   

पती साहित्यिक अच्युत बर्वे यांच्या कामानिमित्ताने त्या बरेचदा त्यांच्याबरोबर वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये जात असत. तिथल्या वैविध्यपूर्ण पाककृती पाहून त्यांची जिज्ञासा वाढली. मग तिथल्या आचाऱ्यांकडून त्यांनी वेगवेगळ्या शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांच्या रेसिपी जाणून घेतल्या, स्वतः करून पाहिल्या, आणि मग मासिकांमधून त्या प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली, ज्याची पुढे पुस्तके झाली. पाककृतींवरच्या पुस्तकांमध्ये सर्वाधिक खपाचा विक्रम त्यांच्या ‘ अन्नपूर्णा ‘ या पुस्तकाने नोंदलेला आहे. आणि विशेष म्हणजे या एका पुस्तकाच्या रॉयल्टीपोटी मंगलाताईंना तीस लाखांपेक्षाही जास्त पैसे मिळाले , हा साहित्य क्षेत्रातही एक विक्रमच ठरला आहे. 

‘ मंगला बर्वे म्हणजेच अन्नपूर्णा ‘ असे समीकरणच आता झाले आहे. अशा, असंख्य गृहिणींसाठी मार्गदर्शक ठरलेल्या मंगला बर्वे यांना आदराने वंदन. 

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग.

संदर्भ :- १) कऱ्हाड शिक्षण मंडळ “ साहित्य-साधना दैनंदिनी “.  २) गूगल गुरुजी 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares
image_print