ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ ३१ ऑगस्ट – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ ३१ ऑगस्ट – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

भारतातील पहिल्या बालशिक्षण तज्ञ श्रीमती ताराबाई मोडक यांचा आज स्मृतीदिन. 

 (१९-४-१८९२ ते ३१-८-१९७३) 

यांचे आईवडील प्रार्थना समाजाचे अनुयायी असल्याने घरात आधुनिक – प्रगत वातावरण होते. पण पुनर्विवाहित आईची मुलगी म्हणून समाजाकडून त्यांना अनेकदा हेटाळणी सहन करावी लागली.  १९०२ साली त्यांनी पुण्याच्या हुजूरपागेत प्रवेश घेतला. पण शाळेच्या वसतीगृहात त्यांना प्रवेश नाकारला गेला. तरीही त्यांना आपल्या कौटुंबिक पार्श्वभूमीचा नेहेमीच अभिमान वाटत असे. १९०६ साली वडील गेल्यावर, त्यांना मुंबईत यावे लागले, आणि त्या इंग्रजी माध्यमाच्या ‘अलेक्झांडर गर्ल्स स्कूल’ मध्ये जायला लागल्या. लवकरच शाळेत रुजल्या. आणि पाश्चात्य समाजाच्या संपर्कात आल्या. वातावरणातला तो बदल त्यांना खूप काही शिकवून गेला. पुढे फिलॉसॉफी विषयात  B.A. केले. 

प्रार्थनासमाजामुळे त्यांचे विचार आणि जीवनमानही प्रगत झाले. अशा अभिरूची संपन्न जीवनशैलीने त्यांना प्रतिकूल परिस्थितीतही जगण्याचे बळ मिळाले. त्यांना विविध छंद होते. त्या टेनिस, बॅडमिंटन उत्तम खेळत. विविध विषयांवर वैचारिक देवाणघेवाण करण्यातही त्यांना विशेष रस होता. लग्नानंतर त्या अमरावतीला रहायला गेल्या. तेव्हा त्या तिथल्या पहिल्या स्त्री पदवीधर होत्या. १९१५ साली अमरावतीला मुलींसाठी सरकारी हायस्कूल सुरू झाले. तिथे त्यांनी काही काळ नोकरी केली. 

संसारातून विभक्त झाल्यानंतर, १९२१ साली राजकोटच्या बार्टन फीमेल ट्रेनिंग कॉलेजमध्ये ‘प्राचार्य’ म्हणून त्यांना बोलावण्यात आले. ही नोकरी उत्तम असली तरी आव्हानात्मक होती. त्यासाठी विशेष शिकवणी लावून त्यांनी गुजराती भाषा शिकून घेतली. त्यांच्या कामात व्यवस्थापनाचाही मोठा भाग होता. त्याचे तंत्रही त्यांनी जिद्दीने आत्मसात केले. पण काही कारणाने दोन वर्षांनी त्यांनी ती नोकरी सोडली. 

याच दरम्यान श्री. गिजुभाई बथेका यांच्या भावनगर येथील शिक्षण प्रयोगांविषयी त्यांना माहिती मिळाली. आणि त्या भावनगरला गेल्या. हे गृहस्थ मॉन्टेसरी शिक्षणपद्धती नुसार बालशिक्षणात प्रयोग करत होते. त्यासाठी  त्यांची  सहकारी म्हणून ताराबाईंनी काम करायला सुरूवात केली. त्या दोघांची ही भेट ‘ऐतिहासिक’ ठरली असेच म्हणायला हवे. कारण भारतातल्या बालशिक्षणाची ती नांदी ठरली; आणि त्यांनी बालशिक्षणाला मूर्तरूप देण्याचा प्रयत्न सुरू केला. त्या काळात शिक्षणालाच फारसे महत्त्व नव्हते. त्यात बालशिक्षण ही कल्पना तर गौणच होती, आणि त्याचे महत्त्व पटवून देणे हा ‘वेडेपणा’ होता. ताराबाईंना समाजाची ही मानसिकता माहिती होती. त्यामुळे त्यांच्या विचारांना शास्त्रीय बैठक असेल तरच लोकांना काहीतरी पटेल, या विचाराने त्या दोघांनी शास्त्राचा आधार असणा-या मॉन्टेसरी शिक्षण पद्धतीचा अभ्यास करून, त्याला भारतीय रूप देण्याचा प्रयत्न सुरू केला… आणि आज बालशिक्षण हे एक शास्त्र म्हणून मान्यता पावले आहे. 

भावनगरच्या वास्तव्यातच त्यांच्यातली लेखिकाही त्यांना सापडली. १९२२ साली नूतन बालशिक्षण संघाची म्हणजे ‘मॉन्टेसरी’ संघाची स्थापना झाली… त्यांच्यातर्फे ‘शिक्षण पत्रिका’ हे मासिक प्रकाशित केले जाऊ लागले. आणि संपादकाचे काम अर्थातच् ताराबाईंकडे आले. हिन्दी आणि मराठी या दोन्ही आवृत्ती ताराबाईंमुळेच नियमित प्रकाशित होऊ लागल्या. तिथे ताराबाईंनी काही पुस्तकांचे लेखन केले. शंभरपेक्षाही जास्त पुस्तकांचे संपादन केले. मॉन्टेसरी संमेलने भरवली. आणि ‘बालशिक्षण’ हे त्यांचे कार्यक्षेत्रच होऊन गेले. 

शिक्षणाला पावित्र्याची किनार हवी हे जाणून त्यांनी बालघरांचे रूपांतर बालमंदिरांमध्ये केले. त्यात भारतीय नृत्ये, कला प्रकार, अभिजात संगीत, लोकगीते यांचा समावेश केला. बालकांच्या विकासाबरोबरच त्यांच्या व्यक्तिस्वातंत्र्याला ही विशेष अर्थ आहे हे जाणून… या सर्व विचारांचा आणि संकल्पनांचा मेळ बालशिक्षणात साधला. एकीकडे शिक्षकांना प्रशिक्षण देण्यास सुरूवात केली. त्या जोडीने पालक आणि शासन या दोन्हींच्या प्रबोधनाचे कामही केले. आता त्यांना खेड्यातील बालशिक्षणाचा ध्यास लागला होता. त्यासाठी अत्यावश्यक असणारी साधने बनवण्याची जबाबदारीही त्यांनी सहजपणे स्वीकारली.

पुढे मुंबईला आल्यावर, त्यांनी या सगळ्या कल्पनांवर आधारित अशी ‘शिशुविहार’ शाळेची १९३६ साली स्थापना केली; आणि भविष्यात जास्त बालशिक्षकांची गरज भासणार हे लक्षात घेऊन तिथेच ‘बाल अध्यापक विद्यालयांची’ स्थापना केली. या दोन्ही संस्थांचे पुढच्या दहा वर्षांचे नियोजनही करून ठेवले. हळूहळू त्यांच्या या प्रयोगांना ग्रामीण संदर्भांचे आणि आदिवासींच्या संदर्भाचे परिमाण मिळाले, कारण मुंबई नंतर बोर्डी, तसेच कोसबाड इथे त्यांनी हे काम सुरू केले. असा हा प्रवास पुढे हरिजनवाड्या, कुरणशाळा, घंटाशाळा, अंगणवाडी असा होत होत शेवटी आदिवासी समाजात शिक्षण प्रसार आणि रोजगारनिर्मिती करण्यापर्यंत झाला. 

ताराबाईंचे हे फार मोठे योगदान लक्षात घेऊन, १९६२ साली केंद्रसरकारने ताराबाईंना ‘पद्मभूषण’ हा प्रतिष्ठेचा नागरी सन्मान प्रदान केला. शिक्षणतज्ञ या नात्याने त्यांनी अनेक पदे भूषविली, अनेक मान-सन्मान त्यांना मिळाले. १९४६ ते १९५१ त्या मुंबई राज्याच्या विधानसभा सदस्या होत्या. प्राथमिक शाळा पाठ्यपुस्तक समितीवर त्यांनी अनेक वर्षे काम केले. अखिल भारतीय बालशिक्षण विभागाच्या त्या दोन वेळा अध्यक्ष होत्या. म.गांधींनी त्यांच्या बुनियादी शिक्षण पद्धतीचा आराखडा तयार करण्याचे कम ताराबाईंना सोपवले होते. या विषयावर इटलीत झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत त्यांनी भाषण केले होते.

विशेष म्हणजे ताराबाईंच्या ‘शिशुविहार’ मध्ये आता दोन नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात – १) मुलांना बचतीची सवय लागावी म्हणून ‘शिशु-बँकेची’ योजना, २) निरक्षर पालकांसाठी साक्षरतेचे वर्ग चालवणे. 

ताराबाई मोडक यांचे प्रकाशित साहित्य : नदीची गोष्ट / बालकांचा हट्ट / बालविकास व शिस्त / बिचारी बालके / सवाई विक्रम . 

सौ. ललितकला शुल्क यांनी ताराबाई मोडक यांचे लिहिलेले चरित्र प्रसिद्ध आहे. 

बालशिक्षणासाठी पुरे आयुष्य झोकून देणा-या श्रीमती ताराबाई मोडक यांना भावपूर्ण श्रद्धांजली.🙏

☆☆☆☆☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ :साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गुगल, विकिपीडिया

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ ३० ऑगस्ट – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? ई-अभिव्यक्ती – संवाद ☆ ३० ऑगस्ट – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

वि. ग. कानिटकर

वि. ग. कानिटकर हे मराठीत इतिहास, चरित्र, कथा, कादंबरी आणि अनुवादित साहित्य निर्मिती करणारे विचारवंत लेखक होते. त्यांचा जागतिक राजकारणाचा चांगला अभ्यास होता. अनेक जागतिक व्यक्तीमत्वांची चरित्रे त्यांनी लिहीली आहेत.

बी. ए. व बी. एस.सी. शिक्षण पूर्ण केल्यावर त्यानी अकौंटंट जनरल च्या ऑफिसमधे नोकरी केली व त्याच वेळी लेखनही चालू ठेवले. त्यांच्या लेखनाची सुरूवात नियतकालिकांमधून झाली. माणूस या साप्ताहिकात मुक्ताफळे या नावाचे सदर व ललित मासिकातून गप्पांगण हे सदर त्यांनी लिहिले होते. अनेक कन्नड, हिंदी, इंग्रजी साहित्याचा त्यांनी मराठी अनुवाद केला आहे. ग्यानबा आणि रा. म. शास्त्री या टोपणनावाने त्यांनी बरेच लेखन केले आहे.

उत्कृष्ट साहित्य निर्मितीसाठी त्यांना राज्य शासनाचा तीन वेळा पुरस्कार मिळाला आहे. शिवाय अनेक खाजगी पुरस्कारही त्यांना मिळाले आहेत.

‘मनातले चांदणे’ हा त्यांचा पहिला कथासंग्रह. त्यांचे अन्य साहित्य असे:

 कथासंग्रह: आणखी पूर्वज, आसमंत, कळावे लोभ असावा, जोगवा, पूर्वज, लाटा, सुखाची लिपी.

कादंबरी: होरपळ, शहरचे दीवे, खोला धावे पाणी, कालखुणा.

अनुवाद: अकथित कहाणी, अयोध्या आणि हिंदु समाजापुढील प्रश्न, एका रात्रीची पाहुणी

अन्य: ॲडाॅल्फ हिटलरची प्रेमकहाणी, अब्राहम लिंकन-फाळणी टाळणारा महापुरूष, इस्रायल-युद्ध युद्ध आणि युद्धच, नाझी भस्मासूरचा उदयास्त, श्री नामदेव चरित्र, फाळणी-युगांतापूर्वीचा काळोख, महाभारत-पहिला इतिहास, माओ क्रांतिचे चित्र आणि चरित्र. . . इत्यादी.

30ऑगस्ट2016 लि श्री. कानिटकर यांचे निधन झाले. त्यांच्या स्मृतीस नम्र अभिवादन!.🙏

☆☆☆☆☆

शंकर गोपाळ तुळपुळे

शं. गो. तुळपुळे हे मराठी भाषा व संत वाड़्मयाचे अभ्यासक व संशोधक होते. सोलापूर येथील दयानंद महविद्यालयात ते मराठी विभाग प्रमुख होते. नंतर ते पुणे विद्यापीठातही मराठी विभाग प्रमुख होते.

साहित्यनिर्मिती:

मराठी ग्रंथ निर्मितीची वाटचाल, गुरू देव रा. द. रानडे चरित्र व तत्वज्ञान

सहलेखन– रमण महर्षि

संपादन व लेखन- 

प्राचीन मराठी कोरीव लेख, मराठी वाड़्मयाचा इतिहास: इ. स. 1350 पर्यंत.

संतवाणीतील पंथराज, श्रीकृष्ण चरित्र, पाच संतकवी, महानुभाव गद्य, दृष्टांत पाठ, प्राचीन मराठी गद्य, यादवकालीन मराठी भाषा, मराठी निबंधाची वाटचाल, स्मृतिस्थळ, 

मराठी भाषेचा तंजावरी कोश.

श्री. तुळपुळे यांचे वयाच्या 80 व्या वर्षी 1994 मध्ये निधन झाले. आज त्यांच्या स्मृती दिनी त्यांना  अभिविदन ! 🙏

☆☆☆☆☆

कवी बी अर्थात नारायण मुरलीधर गुप्ते

संख्यात्मक दृष्ट्या अत्यंत कमी पण दर्जात्मक दृष्ट्या अत्यंत उत्तम कविता लेखन करणारे कवी नारायण मुरलीधर गुप्ते यांनी ‘बी ‘ या टोपणनावाने कविता लेखन केले. प्रेम, कौटुंबिक, सामाजिक आशयाच्या त्यांच्या कविता प्रसिद्ध आहेत. त्यांनी काही भाषांतरेही केली आहेत.

1891 मध्ये ‘प्रणय पत्रिका’ ही त्यांची पहिली कविता ‘करमणूक’ मध्ये प्रसिद्ध झाली. ‘फुलांची ओंजळ’ हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह तर ‘पिकलं पान’ हा दुसरा काव्यसंग्रह त्यांच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध झाला. या दोन्ही संग्रहात मिळून त्यांनी फक्त 49 कविता लिहील्या. पण त्यांच्या काव्यचाफ्याचा  गंध रसिकांच्या मनात अजूनही दरवळत आहे.

माझी कन्या(गायी पाण्यावर काय म्हणूनी आल्या ), चाफा बोलेना, बकुल, दीपज्योती, बंडवाला, कविवंदन, वेडगाणे या त्यांच्या गाजलेल्या कविता.

आज त्यांच्या पंचाहत्तर वा स्मृतीदिन. ! काव्यज्योती निमाली असली तरी चाफा, बकुल मागे सोडून जाणा-या व माझी कन्या मधून बापाच्या भावनांना शब्दरूप देणा -या या कवीस शतशः प्रणाम ! 🙏

☆☆☆☆☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ :विकिपीडिया.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ २९ ऑगस्ट – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सौ. गौरी गाडेकर

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ २९ ऑगस्ट – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर,  ई–अभिव्यक्ती (मराठी) ?

बाबा पदमनजी मुळे

बाबा पदमनजी मुळे ऊर्फ बाबा पदमनजी (1831 – 29 ऑगस्ट 1906) हे मराठीतील ख्रिस्ती साहित्याचे जनक मानले जातात.

बेळगावमध्ये कोकणी – मराठी हिंदू कुटुंबात बाबांचा जन्म झाला.

ख्रिश्चन मिशनरी शाळेत शिकत असताना त्यांना ख्रिश्चन धर्मात रुची निर्माण झाली.

नंतर ते मुंबईत आले.बॉम्बे स्कॉटिश मिशनच्या विल्सन स्कूलमध्ये शिक्षण घेतल्यानंतर मुंबईतीलच फ्री चर्च हायस्कूलमध्ये ख्रिस्ती धर्माशी संलग्न विषय शिकवू लागले.

 मध्यंतरी धर्मांतर करून ते ख्रिस्ती झाले.

ते मराठी ख्रिस्ती धर्मप्रसारक होते.

विक्टोरिया प्रेस हा त्यांचा स्वतःच्या मालकीचा प्रिंटिंग प्रेस होता. त्यांनी विविध ख्रिश्चन जर्नल व मासिके प्रसिद्ध केली.

त्यांनी बायबल (नवा करार) या ग्रंथाचा पहिला अनुवाद व त्यावरील एतद्देशीय ख्रिश्चनांचे भाष्य प्रकाशित केले. त्यामुळे त्यांनाही प्रसिद्धी मिळाली.

त्यांनी शंभराहून अधिक पुस्तके लिहिली.

त्यांची ‘यमुनापर्यटन’ ही कादंबरी मराठीतील पहिली स्वतंत्र सामाजिक कादंबरी असल्याचे मानले जाते.

‘अरुणोदय’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.

याव्यतिरिक्त त्यांची ‘स्त्रीविद्याभ्यास’, ‘व्यभिचारनिषेधक बोध’, ‘कुटुंबसुधारणा’, ‘महाराष्ट्रदेशाचा संक्षिप्त इतिहास’, ‘कृष्ण आणि ख्रिस्त यांची तुलना’, ‘नव्या करारावर टीका’ वगैरे विविध विषयांवरील पुस्तकेही प्रसिद्ध आहेत.

सौ. गौरी गाडेकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : साहित्य साधना, कऱ्हाड शताब्दी दैनंदिनी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ २८ ऑगस्ट – संपादकीय – सौ. उज्ज्वला केळकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? ई-अभिव्यक्ती – संवाद ☆ २८ ऑगस्ट -संपादकीय – सौ. उज्ज्वला केळकर – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

व्यंकटेश दिगंबर माडगूळकर (५ऑगस्ट१९२७ – २७ ऑगस्ट२००१) 

व्यंकटेश  माडगूळकर हे मान्यवर लेखक, उत्तम चित्रकार व लोकप्रिय पटकथाकार होते. त्यांचे औपचारिक शिक्षण फारसे झाले नव्हते. पण मराठी आणि ईंग्रजी वाङ्मयाचा  त्यांचा व्यासंग दांडगा होता. त्यांनी कथा, कादंबर्याई, प्रवास वर्णन, चित्रपट कथा लिहिल्या. त्यांना शिकारीचा छंद होता. जंगल भ्रमंतीच्या अनुभवावरही त्यांची पुस्तके आहेत. त्यांनी आकाशवाणीवर दीर्घकाळ नोकरी केली. १९५०मध्ये ते मुंबईत आले आणि तिथे पटकथा लेखन करू लागले. जशास तसे, पुढचे पाऊल, रंगपंचमी, वशाचा दिवा, सांगत्ये ऐका, हे त्यांच्या पटकथा असलेले चित्रपट खूप गाजले.

व्यंकटेश  माडगूळकरांनी नाटकेही लिहिली. तू वेडा कुंभार, पती गेले ग काठेवाडी, सती ही त्यांची नाटकेही गाजली. याशिवाय ‘कुणाचा कुणाला मेळ न्हाई’, ‘बिनबियांचे झाड ही वागनाटयेही ही लोकप्रिय झाली.

१९४९साली त्यांचा ‘माणदेशी माणसे’ हा कथासंग्रह प्रकाशित झाला. यातील कथातून ग्रामीण माणसांचे अस्सल आणि जीवंत चित्रण त्यांनी केले आहे. तोपर्यंत कथा वाङ्मयात  स्वप्नरंजन आणि कल्पनारम्यतेचा भाग आधीक असे. माडगूळकरांचे लेखन वास्तववादी होते. लेखनाची वेगळी वाट या पुस्तकाद्वारे मराठी वाङ्मयात रुळली. त्यानंतर त्यांचे अनेक कथासंग्रह प्रकाशित झाले. त्यांच्या कथांचे अनुवाद डॅनिश, जर्मनी, जपानी, आणि रशियन भाषेत झाले आहेत.

ग्रामीण कथेप्रमाणे ग्रामीण कादंबरीच्या सदर्भातही त्यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. बनगरवाडी, वावटळ, पुढचं पाऊल, कोवळे दिवस या त्यांच्या कादंबर्यानही लोकप्रिय झाल्या आहेत.

प्रवास एका लेखकाचा हे त्यांचे आत्मवृत्तही प्रसिद्ध आहे॰

व्यंकटेश  माडगूळकरांची अनेक पुस्तके प्रकाशित आहेत. त्यापैकी निवडक पुस्तके-

कथासंग्रह – गावाकडच्या गोष्टी, हस्ताचा पाऊस, काळी आई , जांभळीचे दिवस

कादंबरी – बनगरवाडी, वावटळ, करुणाष्टक, सत्तांतर

ललित – अशी माणसे, अशी साहसे, चित्रे आणि चरित्रे

इतर – जंगलातील दिवस,

व्यंकटेश  माडगूळकर यांच्यावरील पुस्तके

१.    व्यंकटेश  माडगूळकर वाङ्मयीन वेध – लेखक – डॉ. जितेंद्र गिरासे

२.    व्यंकटेश  माडगूळकर लेखक आणि माणूस – संपादिका – ज्ञानदा नाईक

गौरव – आंबेजोगाई येथे १९८३ साली झालेल्या साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

पुरस्कार

१. व्यंकटेश  माडगूळकर यांच्या अनेक पुस्तकांना महाराष्ट्र राज्य सरकारचे पुरस्कार मिळाले आहेत. ‘गावाकडच्या गोष्टी’, ‘काळी आई’ हे कथा संग्रह, ‘बनगरवाडी’ ही कादंबरी , ‘सती’ हे नाटक यांना हे पुरस्कार मिळाले आहेत. अनेक

२.१९८३ मध्ये ‘सत्तांतर’साठी त्यांना साहित्य अकॅडमीचा पुरस्कार मिळाला 

३ जनस्थान पुरस्कारही त्यांना लाभला आहे.

☆ ☆ ☆ ☆ ☆

महादेव विनायक गोखले ( २१ नोहेंबर १९२९ – २८ ऑगस्ट २०१३ ) 

म. वि. गोखले हे मान्यवर मराठी लेखक होते. मराठी घेऊन एम.ए. केल्यावर त्यांनी ‘आरती वाङ्म्याचा अभ्यास’ या विषयावर पीएच. डी. मिळवली. पुण्याच्या वाडिया कॉलेजमधे त्यांनी २९ वर्षे अध्यापनाचे काम केले. पुणे विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभागातही त्यांनी अध्यापनाचे काम केले. अमेरिकेतील पेन्सिल्व्हानिया येथे अभ्यागत प्राध्यापक म्हणून जाण्याची संधी त्यांना १९८८ मधे मिळाली.

सुरूवातीला ते गणेशोत्सवात नकलांचे कार्यक्रम करीत. हौशी आणि व्यावसायिक रंगभूमीवर त्यांनी केलेल्या अनेक भूमिका गाजल्या, चित्रपट क्षेत्रातही काही काळ त्यांनी दिग्दर्शन केले.

१९९२ ते १९९५ या काळात ते महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष होते. साहित्य महामंडळाचेही काही काळ ते कार्यवाह होते. साहित्य संस्कृती मंडळाच्या कोश प्रकल्पात विभागीय संपादकाची जबाबदारी त्यांनी पार पाडली.

म. वि. गोखले यांनी लिहीलेल्या पुस्तकांची संख्या ९२ पेक्षा जास्त आहे. त्यांच्या पुस्तकांना अनेक खाजगी व शासकीय पुरस्कार मिळाले आहेत.

यशोदेला न्याय हवा, महाभागवत, सत्यप्रतिज्ञा, भीष्म यासारख्या कादंबर्याव, छत्रपती शिवराय, लंकाधीश रावण, यासारखी चरित्रे त्यांनी लिहिली. निवडक चरित्रे भाग १ व २ यासारख्या पुस्तकात अॅवनी बेझंट, ईश्वचंद्र विद्यासागर, म.फुले, जगदीशचंद्र बॉस, अरविंद घोष, , जायप्रकाश नारायण, फिरोजशाहा मेहता इ. अनेक ख्यातनाम व्यक्तींची चरित्रे आहेत.

☆ ☆ ☆ ☆ ☆

सुहासिनी इर्लेकर ( 1932 – 28 ऑगस्ट 2010 )

सुहासिनी इर्लेकर यांचा जन्म सोलापूरचा. त्या कवयित्री व लेखिका होत्या. संत साहित्याच्या त्या अभ्यासक होत्या. मराठवाडा विद्यापीठाच्या त्या पहिल्या महिला पीएच. डी. बीडयेथील बालभीम कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात त्या मराठीच्या विभाग प्रमुख होत्या. कॉलेजचे वाङ्मय मंडळ विकसित करण्यात त्यांचं मोठं योगदान होतं

सुहासिनी इर्लेकर यांचे १०पेक्षा जास्त कवितासंग्रह प्रकाशित आहेत. याशिवाय, त्यांचे गद्य लेखनही आहे.

सुहासिनी इर्लेकर यांचे निवडक प्रकाशित साहित्य

१.    अभंगसागरातील दीपस्तंभ – संत साहित्याचा तौलनिक अभ्यास

२.    आकाशाच्या अभिप्रायार्थ – साहित्य आणि समीक्षा

३.    आल्या जुळून तारा –  साहित्य आणि समीक्षा

४.    यादव कालीन मराठी समीक्षा

५.    या मौन जांभळ्या क्षणी – कविता संग्रह

६.    छांदस-  कविता संग्रह

७.    आई! ती माझी आई – कथा संग्रह

८.    महानंदेचे धवले- कादंबरी

९.    चित्रांगण – कथा, लेख, भाषणे

१०.   आजी आणि शेनवॉर्न – बालसाहित्य

 इ. अनेक पुस्तके त्यांच्या नावावर आहेत.

पुरस्कार, सन्मान

१.    बीड नात्यापरिषदेतर्फे सुहासिनी इर्लेकर हा पुरस्कार दिला जातो.

२.    बीडमध्ये २०१३ साली झालेल्या लेखिका साहित्य संमेलनात, संमेलन स्थळाला सुहासिनी इर्लेकरहे नाव देण्यात आले होते.

३.    बीडमध्ये २०१३ साली झालेल्या लेखिका साहित्य संमेलनात त्यांच्या ‘आकाशाच्या अभिप्रायार्थ’ हा वाचन, नृत्य, गायन असा कार्यक्रम झाला.

४.    महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे सुहासिनी इर्लेकर हा पुरस्कार दिला जातो.

५.    वारकरी साहित्य परिषदेतर्फे सुहासिनी इर्लेकर यांना ६ ऑक्टोबर २०१३ रोजी मरणोत्तर पुरस्कार दिला गेला.

आज व्यंकटेश  माडगूळकर,  म. वि. गोखले, सुहासिनी इर्लेकर या तिघा मान्यवर साहित्यिकांचा स्मृतिदीन. त्यानिमित्त त्यांच्या प्रतिभेला प्रणाम. ? 

☆ ☆ ☆ ☆ ☆

सौ. उज्ज्वला केळकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गुगल, विकिपीडिया

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ २७ ऑगस्ट – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ २७ ऑगस्ट – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

महाराष्ट्र भाषाभूषणहा गौरव प्राप्त केलेले श्री.जगन्नाथ रघुनाथ आजगावकर यांचा आज स्मृतिदिन.  (१६-८-१८७९ ते २७-८-१९५५) 

श्री आजगावकर हे संपादक, प्रभावी वक्ते व संशोधक-लेखक म्हणून प्रसिद्ध होते.  लहानपणापासूनच त्यांचा मराठी साहित्याकडे ओढा होता. अखंड वाचन व लेखन करणे हा त्यांचा मनापासून जपलेला छंद होता. त्यांची भाषा अतिशय प्रासादिक, रसाळ, अर्थपूर्ण, आणि मधुर होती. जे लिहायचे ते सुटसुटीत वाक्ये वापरून लिहायचे, ही त्यांची खासियत होती. त्यामुळेच शि.म.परांजपे यांच्या शिफारशीवरून डॉ. कूर्तकोटी शंकराचार्य यांनी त्यांना ‘महाराष्ट्र भाषाभूषण ही सार्थ पदवी दिली होती. 

तसेच ‘ संत कवींचे चरित्रकार ‘ अशीही त्यांची विशेष ओळख होती. त्यांनी २०० पेक्षा अधिक प्राचीन मराठी संत कवींच्या चरित्रांची व काव्यांची ओळख मराठी वाचकांना करून दिली होती … २४ पेक्षाही जास्त ग्रंथ लिहिले होते.

 ‘ महाराष्ट्रातील कवींचे चरित्रकार म्हणजे महाराष्ट्र भाषाभूषण आजगावकर ‘ असे समीकरणच तेव्हा झाले होते. असा कवींच्या चरित्रांचे व काव्यांचे मार्मिक व संकलित रितीने समालोचन करण्याचा पहिला प्रयत्न त्यांनी केला होता.

१९४७ सालाच्या आधी मुंबई नभोवाणीवरून त्यांनी ‘ नाटक आणि नाटक मंडळ्या ’ या विषयावर उद्बोधक व रोचक अशी सहा भाषणे केली होती. वडील लवकर गेल्याने त्यांच्या शिक्षणाची लौकिकार्थाने परवडच झाली होती. तरीही, स्वत: पदवीधर नसतांनाही, नागपूर आणि मुंबई विद्यापिठांच्या बी.ए., एम्.ए. या परिक्षांचे परीक्षक म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती हे आवर्जून सांगायला हवे. स्वतःच्या लेखनाबरोबरच त्यांनी अनेक ग्रंथांना प्रस्तावना लिहिल्या होत्या. ‘इंदुप्रकाश’, ‘संदेश’, ‘रणगर्जना’ या मासिकांचे संपादक म्हणून कार्यरत असतांना त्यांनी  ‘ज्ञानांजन’ हे स्वत:चे मासिकही सुरु केले होते.  

श्री. आजगावकर हे वादकुशल व कठोर टीकाकार होते.  त्यांनी ‘रामशास्त्री’ बाण्याने, आपल्या लिखाणातून कायम सत्याची बाजू मांडली. पुण्याच्या ‘सुधारक’ या पत्रात श्री.भारदे यांनी ‘आळंदीचा ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरीचा कर्ता नव्हे’ अशी लेखमाला लिहून खळबळ उडवून दिली होती. आजगावकरांनी जुन्या कवितांच्या आधारे त्या लेखमालेला लिहिलेले अतिशय समर्पक उत्तर ‘केसरी’ मध्ये अग्रलेखाच्या शेजारी छापले गेले आणि तेव्हापासून लो.टिळकांशी त्यांचा अगदी अकृत्रिम असा स्नेह कायमचा जडला. 

“तुम्हा महाराष्ट्रीयांचे माझ्याविषयी काय मत आहे? “ असे म.गांधींनी त्यांना जेव्हा विचारले होते,  तेव्हा आजगावकरांनी त्यांना तोंडावर असे उत्तर दिले होते की – ‘‘ एक थोर सत्पुरूष या नात्याने आपल्याविषयी आम्हा सर्वांच्या मनात आदरच आहे. पण आपले राजकारण आमच्या लोकांना तितकेसे आवडत नाही… आम्हा महाराष्ट्रीयांना आक्रमक राजकारणाची सवय… त्यामुळे आपले राजकारण आम्हाला थोडे मिळमिळीत वाटते.” – आजगावकरांच्या अंगभूत निर्भिडपणामुळे त्यांनी सहज असे उत्तर दिले होते हे निर्विवाद सत्य आहे. 

‘अतिशय नम्र साहित्यिक ‘ ही त्यांची आणखी एक ठळक ओळख होती. त्यांना यशाचा अहंकार नव्हता. त्यांची रसिकता जिवंत व जातिवंत होती.  तेव्हाच्या कित्येक अप्रसिद्ध आणि उपेक्षित कवींना त्यांनी उजेडात आणले. स्वत:च्या मराठी साहित्याच्या आवडीला त्यांनी संशोधनाची व चर्चेची जोड दिली होती. म्हणूनच त्यांचे लेखन हे  मराठी भाषेच्या अध्यापकांना मार्गदर्शक ठरणारे लेखन आहे, असे गौरवाने म्हटले जात असे. 

त्यांची “ महाराष्ट्र कवी चरित्रमाला “ ची निर्मिती ही त्यांना फार मोठी ओळख मिळवून देणारी गोष्ट. १९०८ साली त्याचा  पहिला खंड प्रकाशित झाला, आणि नंतर असे एकूण अकरा खंड प्रकाशित झाले. त्यांच्या कविचरित्रांच्या पहिल्या भागावर टिळकांनी स्वत: केसरीत एक स्फुट लिहिले होते. १९३९ साली त्यांनी ”‘महाराष्ट्र संत कवयित्री “ हा चरित्रपर ग्रंथ लिहिला. त्यांच्या सगळ्याच  ग्रंथांसाठी त्यांनी अतिशय परिश्रमपूर्वक माहिती गोळा केली, हे ही तेव्हा आवर्जून सांगितले जात असे.

श्री. आजगावकर यांचे प्रकाशित साहित्य 

इसापनीती / कवनकुतूहल — दीर्घकाव्य /  चिमुकल्या गोष्टी – बालसाहित्य / नित्यपाठ भजनमाला 

प्रणयविकसन – नाटक / प्रणयानंद – नाटक / भरतपूरचा वेढा / भूतविद्येचे चमत्कार / महाराष्ट्र संत-कवयित्री 

वीरशैव संगीत भजन / श्री हरिभजनामृत / नेपाळवर्णन . 

४५ संतकवींच्या चरित्रांचे पुनर्लेखन / मराठी आद्यकवी श्री ज्ञानेश्वर / श्री समर्थ चरित्र —- हे महत्वाचे अन्य ग्रंथ. 

महाराष्ट्र कवी चरित्रमाला : पहिला खंड — पुढे ३००० पानांच्या एकूण अकरा खंडात प्रसिद्ध — यात अप्रसिद्ध अशा जवळजवळ १२५ जुन्या मराठी कवींची चरित्रे आणि त्यांच्या काव्यांचे रसग्रहण प्रसिद्ध केले गेले आहे.

अद्ययावत संशोधनाच्या आधारे त्यांनी लिहिलेला “ प्राचीन मराठी संतकवी “ हा ग्रंथ त्यांच्या मृत्यूपश्चात प्रकाशित झालेला आहे. 

असे अतिशय अभ्यासू आणि संशोधक वृत्तीचे, इतरांना मार्गदर्शक ठरलेले,आणि वैविध्यपूर्ण लेखन केलेले व्यासंगी लेखक श्री. जगन्नाथ आजगावकर यांना मनःपूर्वक आदरांजली.🙏

☆☆☆☆☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ :साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गुगल, विकिपीडिया

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ २६ ऑगस्ट – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? ई-अभिव्यक्ती – संवाद ☆ २६ ऑगस्ट – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर

कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर हे मूळचे सांगलीचे. मराठीतील प्रख्यात पत्रकार व नाटककार. त्यांनी तत्वज्ञान या विषयात बी.ए. करून नंतर कायद्याची पदवीही प्राप्त केली. सांगली येथील सांगली हायस्कूल मध्ये त्यांनी शिक्षक म्हणून नोकरी केली. ‘विविधज्ञान विस्तार’ मधून त्यांचे लिखाण प्रसिद्ध होऊ लागले. त्या निमित्ताने त्यांचा लोकमान्य टिळकांशी संबंध आला व ते ‘केसरी’ परिवाराशी जोडले गेले. 1897 मध्ये ते केसरीत दाखल झाले. लोकमान्यांच्या जहाल राजकीय भूमिकेचे ते आपल्या लेखनातून समर्थन करत असत. लोकमान्य तुरुंगात असताना 1908 ते 1910 या काळात ते केसरीचे संपादक होते. त्यानंतर पुन्हा 1918 मध्ये त्यांनी केसरीचे संपादक पद स्विकारले. 1920मध्ये लोकमान्यांच्या निधनानंतर मात्र त्यांचा व केसरी चा संबंध सुटला. 1921मध्ये  ते ‘लोकमान्य’ या दैनिकाचे संपादक झाले. नंतर ‘नवाकाळ’ हे स्वतःचे दैनिक सुरू केले  व पुढे ते साप्ताहिक म्हणून प्रकाशित होऊ लागले. 1929 मध्ये त्यांच्या जहाल लिखाणामुळे त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरण्यात आला व त्यांना एक वर्षाची शिक्षाही झाली. याशिवाय त्यांनी गनिमी काव्याचे युद्ध बाल्कनचे युद्ध, पहिले महायुद्ध यांवर लेखमालाही लिहील्या.

त्यांचे नाट्यलेखन मात्र पत्रकारीतेच्या आधी सुरू झाले होते. 1893 ला त्यांनी सवाई माधवरावांचा मृत्यू हे पहिले नाटक लिहिले.त्यानंतर त्यांनी एकूण पंधरा नाटके लिहिली. यात प्रामुख्याने संगीत नाटके होती. मनोरंजन आणि पारतंत्र्यातमध्ये राजकीय जागृती करणे हा नाट्यलेखनाचा उद्देश होता. लाॅर्ड कर्झन च्या कारकिर्दीत त्यांनी कीचकवध हे पौराणिका नाटक लिहिले. पण त्याचे कथानक, संवाद हे जनजागृती करणारे असल्यामुळे त्यावेळच्या सरकारने त्याच्यावर बंदी घातली.यावरून त्यांच्या लेखनाची कल्पना येऊ शकते.

1907 साली भरलेल्या तिस-या मराठी नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. गांधर्व महाविद्यालयाने आयोजित केलेल्या संगीत परिषदेचेही ते अध्यक्ष होते. तसेच 1933 साली नागपूर येथे भरलेल्या अठराव्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. काही काळ त्यांनी सांगली येथे योगविषयक प्रवचनेही दिली. तसेच अध्यात्म ग्रंथमालेतील पुस्तकांचे लेखनही केले.

खाडीलकर यांची प्रमुख नाटके: सवाई माधवरांवाचा मृत्यू, कांचनगडची मोहना

संगीत नाटके: कीचकवध,मानापमान, विद्याहरण,स्वयंवर,सत्वपरीक्षा,सवतीमत्सर,भाऊबंदकी, बायकांचे बंड,त्रिदंडी संन्यास,द्रौपदी,प्रेमध्वज,मेनका,सावित्री.

अध्यात्मपर लेखन: ऐतरेय आणि ईशावास्योपनिषद,अँ काराची उपासना,याज्ञवल्क्यमैत्रेयी संवाद.इ.

26ऑगस्ट 1948 रोजी कृ.प्र.खाडीलकर यांचे दुःखद निधन झाले.नाट्यपंढरीच्या या वारक-याला विनम्र अभिवादन.! 🙏

☆☆☆☆☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ :विकिपीडिया.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ २५ ऑगस्ट – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सौ. गौरी गाडेकर

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ २५ ऑगस्ट – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर,  ई–अभिव्यक्ती (मराठी) ?

वसंत दिगंबर कुलकर्णी

वसंत दिगंबर कुलकर्णी (23 ऑगस्ट 1923 – 25 ऑगस्ट 2001) हे नामांकित समीक्षक होते.

एस.पी. महाविद्यालयातून ते एम.ए.झाले.

त्यांनी ‘आलोचना’ मासिकातून ‘संगीत सौभद्र’ विषयी लिहिलेल्या लेखमालेचे पुस्तक झाले. त्यावर त्यांनी पीएच.डी. मिळवली.

सुरुवातीला ते माध्यमिक शाळांत अध्यापन करत.पुढे एस.पी.महाविद्यालयात ते मराठी-संस्कृतचे प्राध्यापक होते. नंतर पार्ले महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक झाले. पुढे ते मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागात प्रथम प्रपाठक, नंतर प्राध्यापक व शेवटी विभागप्रमुख झाले.

महानुभाव वाङ्मय, संतसाहित्य, समीक्षा, संशोधन, नाटक व रंगभूमी, नियतकालिकांचा अभ्यास, पाश्चात्य साहित्य सिद्धांत या विविध विषयांत त्यांना रस होता.

त्यांची दृष्टी उदार व मोकळी होती. साहित्यकृतीचे रचनासौंदर्य व त्यातून होणारे जीवनसमस्यांचे सूक्ष्म भान त्यांना अपेक्षित असे. वाचनाने वाचकाच्या जाणिवा विस्तारल्या जाव्यात व त्यामुळे त्यांना मानवी जीवन समजायला मदत व्हावी, अशी त्यांची धारणा होती.

कुलकर्णी अभ्यासू वक्ते होते. विविध संस्थांवर पदाधिकारी म्हणून ते कार्यरत होते. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ, महाराष्ट्र राज्य ग्रंथपुरस्कार समिती वगैरेंवरही त्यांची नेमणूक झाली होती.

मुंबई मराठी साहित्य संघ, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय वगैरेंशीही  त्यांचा निकटचा संबंध होता.

‘गॅलिलिओ’, ‘लीळाचरित्र :एक अभ्यास’, ‘संगीत सौभद्र: घटना आणि स्वरूप’, ‘ज्ञानेश्वर :काव्य आणि काव्यविचार’, ‘ संत सारस्वत: आकलन आणि आस्वाद’, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ इत्यादी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली होती.

‘मराठी कविता :प्राचीन कालखंड’, ‘एकांकिका वाटचाल’, ‘अप्रकाशित तांबे’ वगैरे इतर लेखकाच्या सहकार्याने केलेली संपादनेही त्यांच्या नावावर आहेत.

त्यांनी ‘उत्तम’ या दिवाळी वार्षिकाचे 1969, ’70, ’71मध्ये वा. रा ढवळे यांच्याबरोबर संपादन केले होते.

साहित्य क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या दोन साहित्यिकांना, कुलकर्णींच्या स्मरणार्थ दरवर्षी एक स्मृतिगौरव पुरस्कार देण्यात येतो.

सौ. गौरी गाडेकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : साहित्य साधना, कऱ्हाड शताब्दी दैनंदिनी, विवेक, महाराष्ट्र नायक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ २४ ऑगस्ट – संपादकीय – सौ. उज्ज्वला केळकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? ई-अभिव्यक्ती – संवाद ☆ २४ ऑगस्ट -संपादकीय – सौ. उज्ज्वला केळकर – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

रामकृष्ण गोपाळ भांडारकर (6जुलै 1837 – 24 ऑगस्ट 1925)

रामकृष्ण भांडारकर हे संस्कृत पंडीत, मराठी शिक्षणतज्ज्ञ, समाज सुधारक आणि प्रार्थना समाजाचे कार्यकर्ते होते.

त्यांचा जन्म मालवण इथे झाला. शिक्षण मालवण, रत्नागिरी, मुंबई इथे झाले. नंतर त्यांनी मुंबईतील एल्फिस्टन कॉलेज, पुण्यातील डेक्कन कॉलेज या ठिकाणी संस्कृत भाषेचे प्राध्यापक म्हणून काम केले. 1893 ते 1895,  ते मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू होते.

ते प्राच्य विद्येचे अभ्यासक होते. प्रकृत भाषा, ब्राम्ही, खारोष्टी या लिप्यांचे ज्ञान मिळवून त्यांनी भारताच्या इतिहासाचे संशोधन केले. भारतातील लुप्तप्राय इतिहासाची पुनर्मांडणी करून त्यांनी तो प्रकाशात आणला. भारतातील हस्तलिखित ग्रंथांचा शोध घेऊन ते प्रकाशित केले. पुरातत्वशास्त्राचा इतिहास अभ्यासणारे संशोधक आजही त्यांचे ग्रंथ प्रमाण मानतात.

1883 मधे झालेल्या व्हिएन्नामधील प्राच्यविद्या परिषदेला ते हजर होते. त्यांचा अभ्यासाचा आवाका बघून त्यावेळी तेथील सरकार व जगभरचे विद्वान आचंबीत झाले होते.

पहिल्या प्राच्यविद्या परिषदेत भांडारकर यांनी नाशिकजवळील  लेण्यांमधल्या शिलालेखाचा अर्थ उलगडून सांगितला. यामुळे प्राच्यविद्या विशारद म्हणून त्यांच्या कार्याची महती पसरली. त्यांना डॉक्टर ऑफ लेटर्ससह अनेक मानद सन्मान मिळाले. त्यांनी प्राच्यविद्याविषयक विपुल लेखन केले. त्यांच्या 80 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या नावाने 1917 साली पुण्यात भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था, ही संस्था स्थापन केली. भांडारकर इंस्टिट्यूट म्हणून ही संस्था आजही पुण्यात कार्यरत आहे.

भांडारकरांची ग्रंथसंपदा –

1.भारताचा पुरातत्व इतिहास – पाच खंड

२.मुंबई निर्देशिकेसाठी (गॅझेटियर) दक्षिण भारताचा इतिहास

३.भावाभूतीचा ‘मालती माधव’वर टीका

४. संस्कृत व्याकरण भाग 1 व 2

आज भांडारकर यांचा स्मृतीदिन आहे. त्या निमित्त त्यांच्या विद्वत्तेला शतश: प्रणाम. ? 

☆ ☆ ☆ ☆ ☆

सौ. उज्ज्वला केळकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गुगल, विकिपीडिया

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ २३ ऑगस्ट – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ २३ ऑगस्ट – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

आज प्रा. डॉ. आशा दस्तगीर आपराद यांचा स्मृतिदिन. ( मृत्यू दि. २३/८/२०१९ ) .  

हिन्दी भाषेच्या प्राध्यापक असणाऱ्या डॉ. दस्तगीर यांची ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या धडाडीच्या कार्यकर्त्या आणि लेखिका अशी ठळक ओळख होती. मुस्लिम समाज आणि त्यातही महिलांच्या प्रश्नांवर त्यांनी विपुल लेखन केलेले होते. महिला दक्षता समितीबरोबर त्यांनी केलेले कार्य फार महत्वाचे मानले जाते. त्याचबरोबर विविध सामाजिक चळवळींशीही त्यांचा सक्रिय संबंध होता. 

अत्यंत धाडसाने त्यांनी लिहिलेले त्यांचे आत्मकथन म्हणजे “ भोगले जे दुःख त्याला —” हे त्यांचे आत्मचरित्र, जे खूप गाजले. सर्वसामान्य मुस्लिम कुटुंबातील स्त्रियांच्या वाट्याला येणारे आयुष्य त्यांनी यात अतिशय ओघवत्या भाषेत आणि अत्यंत संवेदनशीलतेने आत्मकहाणीच्या रूपात मांडले आहे. या पुस्तकाला अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहे. त्यातील काही पुरस्कार असे — 

१) उत्कृष्ट साहित्यकृतीबद्दल देण्यात येणारा “ भैरुरतन दमाणी पुरस्कार. 

२) महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड यांच्यातर्फे पुरस्कार. 

३) “ उत्कृष्ट मराठी वाङ्मय “ म्हणून महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा राज्य पुरस्कार. 

या आत्मकहाणीचे “ दर्द जो सहा मैंने —” या नावाने हिंदीतही अनुवाद केला गेला आहे. 

मृत्यूसमयी डॉ. दस्तगीर यांचे वय ६७ वर्षांचे होते. त्यांना आजच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन.🙏

☆☆☆☆☆

मराठी लेखक, ग्रंथकार, आणि संतसाहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. शंकर दामोदर पेंडसे यांचाही आज स्मृतिदिन. ( २८/१२/१८९७ – २३/८/१९७४ ) . 

डॉ. शंकर पेंडसे यांनी अतिशय कठीण प्रसंगांना तोंड देत, एम.ए. ( संस्कृत आणि मराठी –नागपूर विद्यापीठ ) तसेच पंजाब विद्यापीठाची “ शास्त्री “ ही पदवी मिळवली होती. तसेच “ Master of Oriental Learning “ ही पदवीही मिळवली होती. “ ज्ञानेश्वरांचे तत्वज्ञान “ या विषयावर प्रबंध लिहून पी.एच.डी. मिळवली होती. विशेष म्हणजे त्यांचा हा प्रबंध पुढे ग्रंथरूपाने प्रसिद्ध झाला. 

त्यांनी चाळीस वर्षे नागपूर येथील हिस्लॉप महाविद्यालयात मराठीचे अध्यापन केले. लो. टिळक यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या तात्विक लेखनाला सुरुवात झाली. प्राचीन मराठी साहित्य, मराठी संतांचे साहित्य, संस्कृत साहित्य, आणि वेदोपनिषदे हे त्यांच्या अभ्यासाचे खास विषय होते. या विषयांवरील त्यांचे ग्रंथ पुढच्या कित्येक पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरतील असेच आहेत. १९१९ साली ‘गीतेतील कर्मयोग‘ हा प्रदीर्घ निबंध त्यांनी लिहिला. संत रामदास यांचे चरित्र आणि त्यांचे अतिशय मोलाचे कार्य यांची तपशीलवार माहिती देणारा “राजगुरू रामदास“ हा त्यांचा ग्रंथ १९७४ मध्ये प्रसिद्ध झाला. म्हणजे सतत ५५ वर्षे त्यांनी तात्विक विषयांवर मौलिक लेखन केले. संस्कृत ग्रंथांमधील अत्यंत अवघड प्रकरणे त्यांनी कमालीची सुबोध करून मराठी वाचकांना उपलब्ध करून दिली. “ बृहत भाष्य “ हा त्यांचा ग्रंथ म्हणजे मराठी भाषेचे “ अमर भूषण “ आहे असे मानले जाते. 

संत स्वामी स्वरूपानंद त्यांच्याकडे येणाऱ्या आध्यात्मिक साधकांना मार्गदर्शन करतांना आवर्जून असे सांगत असत की, “ डॉ. सोनोपंत दांडेकर, डॉ. शं. दा. पेंडसे, आणि डॉ. प्र. न. जोशी, या फक्त तीन ग्रंथकारांचे लिखाण वाचा, त्याने चित्ताला स्थिरता आणि विचारांना दृढता येईल “ – हा या तिघांचाही खरोखरच मोठा सन्मान मानायला हवा. 

डॉ. पेंडसे यांच्या सर्वच ग्रंथांमधून त्यांची अफाट विद्वत्ता, प्रचंड व्यासंग, आणि त्याचबरोबर त्यांची रसिकता यांचा प्रत्यय येतो. 

त्यांचे प्रकाशित साहित्य :-

१) महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास 

२) ज्ञानदेव आणि नामदेव 

३) वैदिक वाङ्मयातील भागवत धर्माचा विकास 

४) पौराणिक भागवत धर्म 

५) भागवतोत्तम संत श्री एकनाथ 

६) साक्षात्कारी संत तुकाराम 

७) राजगुरू रामदास 

त्यांनी केलेले बरेच स्फुटलेखनही प्रसिद्ध झालेले होते, जसे की —- ‘ कर्मयोग की कर्मसंन्यास ‘, ‘ टिळकांची धर्मविषयक मते ‘, ‘ शिवकालीन संस्कृती व धर्म ‘, मराठी राजकारणाचा आत्मा ‘, ‘ विद्यापीठे व मातृभाषा ‘. 

अनेक परिसंवाद व चर्चासत्रे यातही त्यांच्या भाषणांचा प्रचंड प्रभाव पडत असे. 

१९५३ साली मोझरी येथे झालेल्या साहित्य-संमेलनाचे, आणि १९५५ साली पंढरपूर येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविलेले होते.  

विसाव्या शतकातील ऋषितुल्य साहित्यिक म्हणून गौरविले गेलेले डॉ. शंकर पेंडसे यांना आदरपूर्वक श्रद्धांजली.🙏

☆☆☆☆☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ :साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गुगल, विकिपीडिया

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ २१ ऑगस्ट – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सौ. गौरी गाडेकर

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ २१ ऑगस्ट – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर,  ई–अभिव्यक्ती (मराठी) ?

काका कालेलकर

दत्तात्रेय बाळकृष्ण ऊर्फ काका कालेलकर (1 डिसेंबर 1885 – 21ऑगस्ट 1981) हे पत्रकार, शिक्षणशास्त्रज्ञ व स्वातंत्र्यसैनिक होते.

त्यांचा जन्म साताऱ्यात झाला. ते मूळ कारवारचे. त्यांची मातृभाषा कोंकणी व मराठी. बरीच वर्षे गुजरातमध्ये राहिल्यामुळे त्यांनी गुजराती भाषा शिकून त्यात प्रभुत्व मिळवले.ते गुजरातीतील नामवंत लेखक होते.

गांधीजींच्या प्रभावामुळे काका साबरमती आश्रमाचे सदस्य झाले. सर्वोदय पत्रिकेचे ते संपादक होते. अहमदाबादमध्ये गुजरात विद्यापीठाची स्थापना करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.

काका राष्ट्रभाषा समितीचे सदस्य होते. हिंदीचा प्रचार करण्यासाठी त्यांनी जिवाचे रान केले.

1952 ते 1964 या काळात ते राज्यसभा सदस्य होते.

साहित्य अकॅडमीत काका गुजराती भाषेचे प्रतिनिधी होते.

सोप्या पण ओजस्वी भाषेत विचारपूर्ण निबंध आणि विविध विषयांवरील तर्कशुद्ध भाष्य हे काकांच्या लेखनशैलीचे वैशिष्ट्य होते.

काकांनी गुजराती, मराठी, हिंदी भाषांत अनेक पुस्तके लिहिली. त्यापैकी काही:

‘प्रोफाइल्स इन इन्स्पिरेशन’, ‘महात्मा गांधीज  गॉस्पेल ऑफ स्वदेशी’ इत्यादी इंग्रजी पुस्तके , ‘स्मरणयात्रा’,  ‘उत्तरेकडील भिंती’ व त्याचा इंग्रजी अनुवाद ‘इव्हन बिहाईंड द बार्स’, ‘लाटांचे तांडव’, ‘हिमालयातील प्रवास’ वगैरे मराठी पुस्तके, ‘जीवननो आनंद’, ‘मारा संस्मरणो’ इत्यादी गुजराती पुस्तके.

काकांना 1965 मध्ये त्यांच्या ‘जीवन व्यवस्था’ या गुजराती लेखसंग्रहासाठी साहित्य अकॅडमी अवॉर्ड मिळाले.

1971 मध्ये त्यांना साहित्य अकॅडमीची फेलोशिप मिळाली.

1964मध्ये सरकारने त्यांना ‘पद्मविभूषण’प्रदान केले.

1985 मध्ये काकांच्या गौरवार्थ स्टॅम्प काढण्यात आला.

श्री. पु. भागवत

श्री. पु. भागवत (27 डिसेंबर 1923 – 21 ऑगस्ट 2007) हे साक्षेपी संपादक व प्रकाशक होते.

त्यांचे शिक्षण एम.ए.पर्यंत झाले होते.

‘मौज’ (साप्ताहिक व वार्षिक) व ‘सत्यकथा’ मासिकाच्या माध्यमातून 40-50 वर्षे त्यांनी संपादक व प्रकाशक म्हणून मराठी साहित्यावर आपला प्रभाव गाजवला.त्यातील साहित्याची निवड  तावून सुलाखून केलेली असे.

प्रकाशन क्षेत्रातील तज्ज्ञ  म्हणून मार्गदर्शनपर भाषणे, चर्चासत्रे, मुलाखती वगैरे माध्यमांतून मराठी प्रकाशकांना त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

‘साहित्याची भूमी’, ‘मराठीतील समीक्षालेखांचा संग्रह’, ‘साहित्य :अध्यापन आणि प्रकार’ ही त्यांची गाजलेली पुस्तके.

महाबळेश्वर येथे 31 जानेवारी 1987 रोजी झालेल्या तिसऱ्या मराठी प्रकाशक संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ  महाराष्ट्र सरकार दरवर्षी एका ग्रंथप्रकाशन संस्थेस श्री. पु. भागवत पुरस्कार देते.

काका कालेलकर  व श्री. पु. भागवत यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना आदरांजली.🙏🏻

सौ. गौरी गाडेकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ :साहित्य साधना, कऱ्हाड शताब्दी दैनंदिनी, विकीपीडिया.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares