ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ २८ जून – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ २८ जून – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

लोकप्रिय कवी व गीतकार श्री. भालचंद्र गजानन खांडेकर यांचा आज जन्मदिनही आणि स्मृतिदिनही . 

( २८/६/१९२२ – २८/६/१९९० ) 

पेशाने प्राध्यापक असणाऱ्या श्री खांडेकर यांची प्रेमातल्या विविध भावछटांचे उत्कट प्रकटीकरण करणारी कविता रसिकप्रिय झाली होती हे तर खरेच. पण त्याचवेळी, समाजातील दांभिकता आणि अन्याय, याविरुद्ध बंड पुकारण्याची त्यांची प्रामाणिक प्रवृत्तीही त्यांच्या काव्यामधून अनेकदा दिसून येत असे . 

“ श्लोक केकावली “ , “ संजीवनी : ही काव्ये , तसेच “सं. एकच प्याला “ , “ सं. शारदा “ अशी नाटके यांच्या संहितेच्या संपादनाचे मोलाचे काम श्री. खांडेकर यांनी केले होते.

“ चंद्रप्रकाश “, आणि “ गंधसमीर “ हे त्यांचे कवितासंग्रह प्रसिद्ध झाले होते. 

श्री. भालचंद्र खांडेकर यांना विनम्र अभिवादन. 🙏

☆☆☆☆☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : विकिपीडिया.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ २६ जून – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सौ. गौरी गाडेकर

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ २६ जून – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर -ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

व. पु. काळे

वसंत पुरुषोत्तम काळे (25 मार्च 1932 – 26 जून 2001) हे ख्यातनाम लेखक, कादंबरीकार, कथाकथनकार होते.

ते पेशाने वास्तुविशारद होते व मुंबई महानगरपालिकेत नोकरीला होते.

वपुंनी 60 पेक्षा जास्त पुस्तके लिहिली आहेत.त्यांची ‘पार्टनर’, ‘वपुर्झा’, ‘ही वाट एकटीची’, ‘ठिकरी’,’आपण सारे अर्जुन’, ‘घर हरवलेली माणसं ‘ वगैरे पुस्तके  विशेष लोकप्रिय आहेत.

त्यांचे कथाकथनाचे 1600पेक्षा जास्त कार्यक्रम झाले होते. ध्वनीमुद्रणाच्या माध्यमातून रसिक वाचकांना भेटणारे ते पहिले मराठी लेखक होते.

त्यांच्या कथा- कादंबऱ्यांत जागोजागी जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणारे, प्रेरणादायी विचार आढळून येत.

वपुंवर ओशो रजनीशांचा प्रभाव होता.

वपुंना महाराष्ट्र शासनाचा उत्तम लेखकाचा सन्मान, पु. भा.भावे पुरस्कार, फाय फाउंडेशनचा पुरस्कार मिळाला होता.

अमेरिकेत भरलेल्या साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

आज वपुंचा स्मृतिदिन आहे. त्यानिमित्त त्यांना नम्र अभिवादन. 🙏

☆☆☆☆☆

सौ. गौरी गाडेकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : साहित्य साधना, कऱ्हाड शताब्दी दैनंदिनी, विकिपीडिया 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ २१ जून – संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? ई-अभिव्यक्ती -संवाद ☆ २१ जून -संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

द्वारकानाथ माधव पितळे म्हणजेच नाथमाधव  (एप्रिल १८८२ – २१ जून १९२८)

नाथमाधव  यांना अवघे ४६ वर्षांचे आयुष्य लाभले. यातला बराचसा काळ त्यांनी शिवाजीवरील संशोधनात घालवला. स्त्री शिक्षण आणि पुनर्विवाहाचे ते पुरस्कर्ते होते. 

त्यांचे शिक्षण मुंबईत झाले. कुलाब्याला ते तोफांचे गाडे बनवण्याच्या कारखान्यात नोकरीला लागले।. शिकारीची त्यांना आवड होती. एकदा सिंहगड परिसरात ते शिकारीला गेले होते. त्यावेळी टेहळणी करताना ते कड्यावरून खाली कोसळलले. या अपघातामुळे त्यांचा कमरेखालचा भाग लुळा पडला. रुग्णालयात वैद्यकीय उपचार घेत असताना, त्यांना वाचनाची गोडी लागली. त्यांनी अनेक मराठी, इंग्रजी ग्रंथ या काळात वाचून काढले. यातून पुढे त्यांना लिहिण्याची प्रेरणा मिळाली.

त्यांची पहिली कादंबरी ’प्रेमवेडा’ १९०८ साली प्रकाशित झाली. त्यांच्या ‘डॉक्टर’ या कादंबरीवरून ‘शिकलेली बायको’ हा चित्रपट तयार करण्यात आला. त्याकाळी हा चित्रपट खूप गाजला. या कादंबरीचे ३ भाग आहेत.

नाथमाधव यांच्या २३-२४ कादंबर्‍या आहेत.  त्यापैकी स्वराज्याचा श्रीगणेशा, स्वराज्याची स्थापना, सावळ्या तांडेल, वीरधावल, रॉयक्लब अथवा सोनेरी टोळी, मालती माधव, देशमुखवाडी इ. कादंबर्‍या विशेष गाजल्या.

नाथमाधव यांचा आज स्मृतीदिन. त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ त्यांना आदरांजली. ? 

☆ ☆ ☆ ☆ ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गूगल विकिपीडिया

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ २० जून – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ २० जून – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

आलो तुझ्या दुनियेत, नव्हतो चोर वा डाकू आम्ही , एकही ना चीज इथली, घेऊनी गेलो आम्ही

ते ही असो, आमुच्यासवे आणिला ज्याला इथे , भगवन, अरे तो देहही मी टाकुनी गेलो इथे—

— अशा शब्दात देवालाच सत्याची जाणीव करून देणारे सुप्रसिद्ध गझलकार , शायर व कवी श्री. वासुदेव वामन तथा भाऊसाहेब पाटणकर यांचा आज स्मृतीदिन. ( २९/१२/१९०८ – २०/६/१९९७ )

मराठीतले जिंदादिल शायर अशी ओळख असणारे भाऊसाहेब हे खरे तर  “ मराठी शायरीचे जनक “ . शायरी हा अधिकतर उर्दू – हिन्दी भाषेत रूढ असणारा काव्यप्रकार त्यांनी मराठी भाषेत रुजवला, देशभर पोहोचवला, आणि त्याला जणू “ चिरतरुण “ करून ठेवलं. 

वेद , तत्वज्ञान , आणि इतर शास्त्रांचा अभ्यास असणारे भाऊसाहेब पेशाने वकील होते. यवतमाळ जिल्हा न्यायालयातील फौजदारी खटले कायम जिंकणारे वकील अशी त्यांची ख्याती झाली होती. शिवाय ` सहा पट्टेरी वाघांना लोळवणारे शिकारी `म्हणूनही ते ओळखले जात . शिकारीवर कायद्याने बंदी आल्याने त्यांना तो नाद सोडावा लागला. पुढे दृष्टिदोष झाल्याने त्यांना वकिली सोडावी लागली, पण काव्यरसिकांसाठी ती पर्वणी ठरली असे म्हणावेसे वाटते. कारण त्यानंतर ते कविता या साहित्यप्रकाराकडे वळले, आणि मराठी शायरी या नव्या प्रांताची त्यांनी लोकांना अगदी जवळून ओळख करून दिली. हळूहळू त्यांच्या रचना इतक्या लोकप्रिय झाल्या की महाराष्ट्रभर आणि इतर राज्यांमध्येही त्यांच्या शायरीचे कार्यक्रम होऊ लागले, आणि त्यांना रसिकांची प्रचंड दाद मिळू लागली  . विनोद आणि प्रणय यांची रेलचेल असणारी, इतकी प्रसिद्ध झालेली शायरी लिहायची सुरुवात त्यांनी वयाच्या ५२ व्या वर्षी केली होती, हे सांगितले तर खरे वाटणार नाही. याचवेळी एकीकडे त्यांनी शायरी ह्या काव्यप्रकाराचा खोलात जाऊन अभ्यास केला. आणि मग तत्वज्ञान आणि जीवन या अनुषंगाने विविध विषयांवर त्यांनी शायरी लिहिली. वर सुरुवातीला उद्धृत केलेल्या त्यांच्या दोन ओळींवरून हेच दिसून येते. उर्दू शायरीपेक्षा अगदी वेगळी आणि स्वतंत्र अशी त्यांची मराठी शायरी खूपच लोकप्रिय झाली असली, तरीही ते विनम्रपणे असे व्यक्त व्हायचे की —

सांगेल काही भव्य ऐसी , शायरी माझी नव्हे —

तो कवींचा मान , तितुकी पायरी माझी नव्हे —

“जिंदादिल“ , “ दोस्तहो “ हे  अतिशय गाजलेले काव्यसंग्रह, तसेच “ मराठी मुशायरा “ , “ मराठी शायरी “ ,

“ मैफिल“  असे त्यांचे प्रकाशित साहित्य आहे. भाऊसाहेबांच्या  “ दोस्तहो “ या गजल संग्रहातल्या चारोळ्यांची भाषा तर इतकी सोपी आहे की चारोळी नुसती वाचली की त्यात काय सांगायचे आहे हे वाचकाला पूर्णपणे लक्षात येतं— म्हणजे त्याचे वेगळेपणाने रसग्रहण करायची गरजच उरत नाही – आणि ही त्यांच्या लेखणीची ताकद होती.- याच्या  उदाहरणादाखल या पुढच्या काही ओळी —–  

“आहो असे बेधुंद आमची धुंदही साधी नव्हे….  मेलो तरी वाटेल मेला दुसरा कुणी आम्ही नव्हे .. “ 

किंवा — 

“जातो तिथे उपदेश आम्हा, सांगतो कोणीतरी– कीर्तने सारीकडे, चोहीकडे ज्ञानेश्वरी …

 काळजी आमुच्या हिताची एवढी वाहू नका– जाऊ सुखे नरकात आम्ही , तेथे तरी येऊ नका … 

मराठी कवितेत शायरीची अशी नवी आणि वेगळीच वाट निर्माण करणाऱ्या श्री. भाऊसाहेब पाटणकर यांना भावपूर्ण आदरांजली. 🙏

☆☆☆☆☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : विकिपीडिया.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १९ जून – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ १९ जून – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

रमेश राजाराम मंत्री

रमेश मंत्री हे प्रामुख्याने विनोदी लेखन करणारे लेखक म्हणून प्रसिद्ध असले तरी त्यांनी कादंबरी, प्रवासवर्णन अशा विविध प्रकारचे लेखनही केले आहे. कोल्हापूर येथील राजाराम महाविद्यालयात एम.ए.पूर्ण करत असतानाच त्यांनी स्थानिक वृत्तपत्रांतून लेखन करण्यास सुरूवात केली होती. पुढे काही दिवस त्यांनी दैनिक पुढारीचे सहसंपादक म्हणूनही काम केले होते.

इंग्लंडला जाऊन त्यांनी वृत्तपत्र व्यवसाय शिक्षण पूर्ण केले.1958 ते 1978 या प्रदीर्घ काळात अमेरिकेच्या माहिती खात्यात त्यांनी सेवा केली. त्यानिमीत्ताने त्यांचे जगभर हिंडणे झाले. अनुभव समृद्ध झाले. त्याचा उपयोग त्यांना लेखनासाठी झाला. अनुभव आणि प्रतिभा यांची साथ लाभल्यामुळे अनेक प्रवास वर्णने त्यांच्याकडून लिहून झाली. थंडीचे दिवस, सुखाचे दिवस, नवरंग ही प्रवासवर्णने वैशिष्ट्यपूर्ण ठरली.

मराठी साहित्यात भर घालणारी काही वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी श्री.रमेश मंत्री यांनी केली आहे.मराठीत विनोदी फॅटसी रूढ करण्याचे श्रेय त्यांना जाते.जेम्स बाॅड च्या धर्तीवर जनू बांडे ही विडंबनात्मक व्यक्तिरेखा त्यांनीच जन्माला घातली.मुंबई मराठी साहित्य संघात ‘साहित्यिक गप्पा’ त्यांनीच सुरू केल्या.कोल्हापूर येथील 1992  साली भरलेल्या अ.भा. साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांनी जाहीर केल्याप्रमाणे अनेक ठिकाणी पुस्तक प्रदर्शने भरवली व वाचन चळवळीस हातभार लावला.उत्साह,उत्सवप्रियता, विनोदबुद्धी, कठोर शिस्त व सततची कार्यमग्नता ही त्यांच्या स्वभावाची वैशिष्ट्ये होती. त्यामुळेच तर त्यांनी 130 हून अधिक पुस्तके प्रकाशित केली.एवढेच नव्हे तर 1979 या एका वर्षात त्यांनी 34पुस्तके प्रकाशित केली.

त्यांची काही पुस्तके:

हसण्याचा तास- पहिला, दुसरा, तिसरा, कागदी सिंह, ओठ सलामत तो,मावशी हरवली, हास्यधारा,बोल बोल म्हणता,अति झाले अन् हसू आले.

तरंगणारे शहर, थंडीचे दिवस, सुखाच्या रात्री, सुखाचे दिवस, सूर्यपुत्रांचा देश जपान.

उत्तरकाळ, हुलकावणी इत्यादी.

अशा या विक्रमी लेखकाचा 19/06/1998 ला अंत झाला.

हसण्याचे तास घेऊन जगणं सुसह्य करणा-या रमेश मंत्री यांना  आज स्मृतीदिनी विनम्र अभिवादन! 🙏

☆☆☆☆☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : महाराष्ट्र नायक, मराठी सृष्टी, विकिपीडिया.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १८ जून – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सौ. गौरी गाडेकर

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ १८ जून – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर -ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

श्रीपाद रामकृष्ण काळे

श्रीपाद रामकृष्ण काळे (8जुलै 1928 – 18 जून 1991) हे एक दशग्रंथी ब्राह्मण, कथालेखक, कादंबरीकार, निबंधकार होते.

देवगडमधील वाडा या लहानशा खेड्यात त्यांचा जन्म झाला.  लिहिणं- वाचणं व भिक्षुकीचं शिक्षण त्यांना घरीच वडिलांकडून  मिळालं. तर उच्चशिक्षित समीक्षकापेक्षाही अधिक संवेदनशील ; पण अक्षरओळख नसलेली आई त्यांना लाभली होती. या दोघांचे संस्कार तीव्र बुद्धिमत्ता, प्रचंड निरीक्षणक्षमता व उत्तम आकलनशक्ती असलेल्या श्रीपादवर होऊन ते शब्दप्रभू झाले.

ते भिक्षुकी करत असत. त्यासाठी अनेक गावांची पायी यात्रा करत असताना त्यांची प्रतिभा कोकणातील लोभस निसर्गलेणे टिपत असे.

विविध वृत्तपत्रे, नियतकालिके, दिवाळी अंक यांतून त्यांनी उत्तमोत्तम लेखन केलं.’पिसाट वारा’, ‘ संचित’, ‘समर्पण’, ‘चकवा’,  ‘दाणे आणि खडे’, ‘नवी घडी नवे जीवन’ इत्यादी जवळजवळ 1200 कथा व 50हून अधिक कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. ते अर्थशास्त्रविषयक नियतकालिकाचे संपादक होते.

आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावर त्यांनी अनेक कथांचे वाचन केले.

काळे यांच्या ‘पिसाट वारा’ या कादंबरीला राज्य पुरस्कार मिळाला. कोमसापने पावसमध्ये त्यांचा भव्य सत्कार केला. त्या कादंबरीची गुजराती, कानडी व हिंदीत भाषांतरे झाली. लोकमान्य टिळक साहित्य पुरस्कार, कविता माधव पुरस्कार इत्यादी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले.

विविध साहित्य संमेलनांतून प्रमुख साहित्यिक म्हणून त्यांची उपस्थिती असे.

वाडा लायब्ररीमध्ये अध्यक्ष म्हणून त्यांचे भरीव योगदान होते.

पत्नी इंदिरा काळे यांच्या नावे उत्कृष्ट साहित्यनिर्मितीसाठी त्यांनी ‘कोमसाप’लां आर्थिक देणगी दिली.

आज श्रीपाद काळे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना अभिवादन. 🙏

☆☆☆☆☆

सौ. गौरी गाडेकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : साहित्य साधना, कऱ्हाड शताब्दी दैनंदिनी, विकिपीडिया 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १७ जून – संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? ई-अभिव्यक्ती -संवाद ☆ १७ जून -संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

गोपाळ गणेश आगरकर ( १४ जुलै १८७६ – १७ जून १९९५ )

आगरकर महाराष्ट्रातील थोर विचारवंत, समाज सुधारक, पत्रकार, शिक्षणतज्ज्ञ होते.   

महाराष्ट्रात समाज जागृतीचे मोठेच काम त्यांनी केले. त्यासाठी सनातन्यांचा रोष पत्करला. सामाजिक प्रबोधनासाठी त्यांनी केसरी , सुधारक, मराठा या वर्तमानपत्रांचा आधार घेतला. सामाजिक समता, स्त्री – पुरुष समानता, विज्ञानंनिष्ठा, बुद्धीप्रामाण्य ही त्यांची जीवनमूल्ये होती. 

आगरकरयांचा जन्म सातारा जिल्हयाती टेंभू या खेड्यात झाला. घराची गरीबी असल्याने, अनेक कामे करून त्यांनी मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण घेतले. पुढे महाविद्यायीन शिक्षणासाठी ते पुण्यात आले व डेक्कन कॉलेजमधे प्रवेश घेतला. १८७९ मधे एम. ए. करताना त्यांची टिळकांशी ओळख झाली.

१ जानेवारी १८८० रोजी विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी ‘न्यू इंगलीश स्कूलची’ स्थापना केली. पुढे टिळक आणि आगरकरही त्यांना जाऊन मिळाले. टिळक आणि आगरकर यांनी १८८४मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. संस्थेतर्फे १८८५ मधे फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली. तिथे ते शिकवू लागले. पुढे ते कॉलेजचे प्राचार्यही झाले.  

विष्णुशास्त्री चिपळूणकर, टिळक आणि आगरकर यांनी मिळून केसरी हे वृत्तपत्र १८८१मध्ये सुरू केलं. तसेच मराठा हे वृत्तपत्र इंग्रजीतून चालू केलं. आगरकर हे ‘केसरीचे पहिले संपादक होते. पुढे टिळकांशी झालल्या वैचारिक मतभेदामुळे त्यांनी ‘केसरी’ सोडला व १८८८ मधे ‘सुधारक’  हे वृत्तपत्र सुरू केले. यातून त्यांनी सातत्याने समजा सुधारणेचा आणि परिवर्तनाचा पुरस्कार केला. बालविवाह, अस्पृश्यता, जातीव्यवस्था, चातुर्वर्ण्य, केशवपन, ग्रंथप्रमाण्य, अंधश्रद्धा, यांना त्यांनी विरोध केला. त्यांच्या विचार प्रक्रियेला विवेकाचे, बुद्धिप्रामाण्याचे अधिष्ठान होते.

त्यांचे विचार परंपरावादी सनातनी ब्राम्हणांना पटले नाहीत. त्यांनी कडवा विरोधा केला. विरोध इतका पराकोटीचा काही लोकांनी त्यांची जिवंतपणे प्रेतयात्रा काढली. मुळची नरम प्रकृती आणि सनातन्यांचा विरोध या  सगळ्याचा परिणाम असा झाला की अवघ्या ३९व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

आगरकरांबद्दल टिळकांनी लिहिले आहे, ‘ देशी वर्तमानपत्रास हल्ली जर काही महत्व प्राप्त झाले असेल, तर ते बर्यानच अंशी आगरकरांच्या विद्वत्तेचे आणि मार्मिकतेचे फळ होय, यात शंका नाही.’

आगरकर यांनी लिहिलेले व त्यांच्यावर लिहिलेले साहित्य –

१.    आगरकर दर्शन – ऑडिओ पुस्तक 

२.    आगरकर वाङ्मय  – खंड १ ते३

३.    आगरकर व्यक्ती व विचार – वी.स. खांडेकर

४.    गो. ग. आगरकर – लेखक, संपादक ग. प्र. प्रधान

५.    सुधारकातील निवडक निबंध – गो. ग. आगरकर

इ. अनेक पुस्तके त्यांनी लिहिली व त्यांच्यावरही लिहिली गेली आहेत. 

सन्मान

१.    महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समीतीतर्फे ‘सुधारक’कार गो. ग. आगरकर’ या नावाचा पुरस्कार दिला जातो.

२.    महाराष्ट्र संपादक परिषद ही संस्था आदर्श पत्रकारीतेसाठी गो. ग. आगरकर’ पुरस्कार देते.   

गोपाळ गणेश आगरकर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ प्र.के.आत्रे यांनी पुण्यात आगरकर हायस्कूल ही मुलींची शाळा सुरू केली.

महाराष्ट्रात समाज सुधारणा व्हावी, म्हणून ज्यांनी तळमळीने लेखन व कार्य केले, त्या आगरकरांना त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ शतश: वंदन ? 

☆ ☆ ☆ ☆ ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गूगल विकिपीडिया

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १५ जून – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ १५ जून – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

अच्युत (वामन)बळवंत कोल्हटकर (01/08/1879–15/06/1931)

अच्युत कोल्हटकर हे लोकमान्य टिळकांचे समकालीन नामवंत पत्रकार होते.बी.ए.एल्.एल्.बी.शिक्षण पूर्ण केल्यावर काही काळ शिक्षक म्हणून नोकरी केली व नंतर वकिली करण्यास सुरूवात केली.

‘देशसेवक’ या पत्राचे संपादक पद त्यांनी स्विकारले व जहालवादी राजकारणात प्रवेश केला.लो.टिळक यांचा पुरस्कार केल्याबद्दल आणि पुढे सविनय कायदेभंग चळवळीतील सहभागाबद्द्ल त्यांना कारावासही भोगावा लागला होता.

1915 साली त्यांनी ‘संदेश’ या वृत्तपत्राची स्थापना करून वृत्तपत्र सृष्टीचा चेहरामोहरा बदलून टाकला.संदेश मधील अग्रलेख,चटकदार सदरे,आकर्षक मथळे,चित्तवेधक बातम्या यांमुळे हे वृत्तपत्र लोकप्रियतेच्या शिखरावर पोचले.पण सरकारी अवकृपेमुळे ते बंद करावे लागले.

त्यानंतर त्यांनी संजय,चाबूक,चाबूकस्वार ही पत्रे काढली.तसेच प्रभात वृत्तपत्रात संपादक मंडळात कामही केले.पण ‘संदेशकार’ हीच त्यांची ओळख कायम राहीली.

श्रृतिबोध व उषा या मासिकांत सहसंपादक म्हणूनही त्यांनी काम केले. लो.टिळकांवरील मृत्यूलेख,मराठी काव्याची प्रभात,शेवटची वेल सुकली,दोन तात्या हे त्यांचे काही गाजलेले लेख होते.त्यांनी स्वामी विवेकानंद,नारिंगी निशाण,संगीत मस्तानी ही नाटके त्यांनी लिहिली.कादंबरीलेखनही केले पण पत्रकार म्हणून त्यांची कारकीर्द लक्षात राहणारी होती.त्यांच्या या कर्तृत्वास आजच्या स्मृतीदिनी सादर प्रणाम! 🙏

☆☆☆☆☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : विकिपीडिया.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १४ जून – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सौ. गौरी गाडेकर

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ १४ जून – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर -ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

गोविंद बल्लाळ देवल

गोविंद बल्लाळ देवल (13 नोव्हेंबर 1855 – 14 जून 1916)हे आद्य मराठी नाटककार होते.

कोकणात जन्म, सांगली जिल्ह्यात बालपण व शालेय शिक्षण बेळगाव येथे झाले.

शिक्षण पूर्ण झाल्यावर देवल त्याच शाळेत शिक्षक म्हणून लागले.

बेळगाव येथे देवल प्रख्यात नाटककार व अभिनेते बळवंत पांडुरंग किर्लोस्कर यांच्या संपर्कात आले. त्यांनी किर्लोस्कर नाटक मंडळीत अभिनेता व किर्लोस्करांचे सहाय्यक

दिग्दर्शक म्हणून काम केले. किर्लोस्करांच्या निधनानंतर ते दिग्दर्शक म्हणून काम करू लागले.

काही वर्षांनी ते पुणे येथील शेतकी शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले.

पुढे त्यांनी पुण्यात आर्योद्धारक नाटक मंडळी ही संस्था स्थापन केली.1913साली ते गंधर्व नाटक मंडळीत गेले.

त्यांनी ‘दुर्गा’, ‘मृच्छकटिक’, ‘विक्रमोर्वशीय’, ‘झुंजारराव’, ‘शापसंभ्रम’, ‘संगीत शारदा’ व ‘संशयकल्लोळ’ ही नाटके लिहिली.

त्यापैकी ‘मृच्छकटिक’,’संगीत शारदा’ व ‘संशयकल्लोळ’ ही नाटके अजरामर झाली.

आज देवलांचा स्मृतिदिन आहे. त्यांना अभिवादन.🙏

☆☆☆☆☆

सौ. गौरी गाडेकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : साहित्य साधना, कऱ्हाड शताब्दी दैनंदिनी, विकिपीडिया 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १३ जून – संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? ई-अभिव्यक्ती -संवाद ☆ १३ जून -संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

आचार्य प्रल्हाद केशव अत्रे  (13 ऑगस्ट 1898 – 13 जून 1969)

महाराष्ट्रात, जी बहुगुणी, बहुआयामी व्यक्तिमत्वं होऊन गेली, त्यामधे आचार्य प्र. के. अत्रे हे एक महत्वाचे नाव. ते शिक्षणतज्ज्ञ होते. क्रमिक पुस्तकांचे निर्माते होते.  कवी-लेखक होते. उत्तम वक्ते होते. खंदे पत्रकार होते. राजकारणी होते. लोकप्रीय नाटककार होते. चित्रपट निर्माते होते. ‘हात लावीन तिथे सोनं’ म्हणता येईल, अशी प्रत्येक क्षेत्रातली  त्यांची कारकीर्द होती. त्यांच्याच शब्दात त्यांचं वर्णन करायचं झालं, तर म्हणता येईल, ‘असा महापुरुष गेल्या दहा हजार वर्षात झाला नाही आणि पुढची दहा हजार वर्षे होणार नाही.’

आचार्य अत्रे यांची सुरुवातीची कारकीर्द अध्यापनाची आहे. त्यांनी कॅंप एज्यु. सोसायटी हायस्कूलमधे मुख्याध्यापक म्हणून काम केले. ही तळा-गाळातली शाळा त्यांनी नावा-रूपाला आणली. त्यांनी मुलांसाठी राजा धनराज गिरजी हायस्कूल व मुलींसाठी आगरकर हायस्कूल या शाळा काढल्या. प्राथमिक विभागासाठी ‘नवयुग वाचन माला’ व माध्यमिक विभागासाठी ‘अरुण वाचन माला’ ही क्रमिक पुस्तके तयार केली. त्यापूर्वी असलेल्या पाठ्यपुस्तकातून मुलांच्या वयाचा विचार केलेला नसे. अत्रे यांनी मुलांचे वय, आवडी-नावाडी, अनुभव विश्व विचारात घेऊन पाठ्य पुस्तके तयार केली. त्यामुळे ती सुबोध आणि मनोरंजक झाली. शिक्षण क्षेत्राला त्यांचे हे महत्वाचे योगदान आहे.         

आचार्य अत्रे  यांनी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे नेतृत्व केले. त्यांची वाणी आणि लेखणी दमदार, धारदार होती. त्याला विनोदाचे अस्तर असायचे. त्यामुळे त्यांचे लेखन आणि भाषण दोन्हीही लोकप्रिय झाले. त्यांनी अध्यापन, रत्नाकर, मनोरमा, नवे अध्यापन, इलाखा शिक्षक ही मासिके, नवयुग हे साप्ताहिक, जयहिंद हे सांज दैनिक सुरू केले. १९५६ साली त्यांनी मराठा हे दैनिक सुरू केले. ते खूपच लोकप्रिय झाले.

आचार्य अत्रे  यांच्या  चांगुणा, मोहित्यांचा शाप, या कादंबर्या , अशा गोष्टी अशा गमती, फुले आणि मुले हे कथासंग्रह,  गीतगंगा आणि झेंडूची फुले हे कविता संग्रह प्रकाशित झालेत. झेंडूची फुले हा कविता संग्रह म्हणजे त्या काळी लिहिल्या गेलेल्या काही सुप्रसिद्ध कवितांची विडंबने आहेत. काव्यक्षेत्रात या कविता म्हणजे त्यांनी चोखाळलेली एक वेगळीच वाट आहे. त्यानंतरही अशा प्रकारचे लेखन क्वचितच कुठे दिसले. ‘मी कसा झालो’ आणि कर्हेहचे पाणी ( खंड १ ते ५) ही त्यांची आत्मचरित्रात्मक पुस्तके. याशिवाय अत्रे यांनी, अत्रेटोला, केल्याने देशातन, दुर्वा आणि फुले, मुद्दे आणि गुद्दे अशी आणखी इतरही पुस्तके लिहिली. 

आचार्य अत्रे  यांची नाटकेही गाजली. त्यात भ्रमाचा भोपळा, कवडी चुंबक, मोरूची मावशी, साष्टांग नमस्कार यासारखी विनोदी नाटके होती, तर उद्याचा संसार, घराबाहेर, लग्नाची बेडी, तो मी नव्हेच, प्रीतिसंगम, डॉ. लागू यासारखी गंभीर नाटकेही होती.

आचार्य अत्रे यांच्या प्रतिभेचा आविष्कार चित्रपट सृष्टीतही झालेला दिसून येतो. नारद-नारदी, धर्मवीर, प्रेमवीर, ब्रॅंडीची बाटली, बेगुनाह ( हिन्दी) इ. चित्रपटांच्या कथा त्यांनी लिहिल्या. नयुग पिक्चर्स तर्फे लपंडाव, श्यामची आई हे चित्रपट काढले. त्यांचे दिग्दर्शन त्यांनी केले. यापैकी श्यामची आईला राष्ट्रपतींच्या हस्ते ‘सुवर्ण कमळ मिळाले. ‘सुवर्ण कमळ मिळवणारा हा पहिलाच मराठी चित्रपट. त्यांच्या चित्रपट सृष्टीच्या झगमगत्या कारकिर्दीत आणखी एक मानाचा तुरा खोचला गेला.

पुरस्कार, सन्मान, गौरव

विष्णुदास भावे या सांगलीयेथील नाट्यसंस्थेतर्फे त्यांना १९६० साली भावे गौरव सुवर्ण पदक मिळाले. पण अत्रे यांचे वैशिष्ट्य असे की अनेक संस्था अत्रे यांच्या नावे पुरस्कार देतात.

अशोक हांडे, ‘अत्रे अत्रे सर्वत्रे’ हा अत्रे यांची संगीतमय जीवनकथा सांगणारा कार्यक्रम करत. तर सदानंद जोशी हे ‘मी अत्रे बोलतोय’, हा एकपात्री प्रयोग करत.  

अत्र्यांची लोकप्रियता एवढी होती की त्यांच्या निधंनांनंतर त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ अनेक गावी अनेक वेगवेगळ्या संस्था काढल्या गेल्या. अत्रे कट्टा, अत्रे संस्कृतिक मंडळ, अत्रे नाट्यगृह,  अत्रे कन्याशाळा, अत्रे विकास प्रतिष्ठान, अत्रे सास्कृतिक भवन अशा अनेक संस्था त्यांच्या नावे निघाल्या. वरळी आणि सासवड इथे त्यांचा भाव्य पुतळा उभारलेला आहे. 

अत्रे यांच्यावर अनेक पुस्तकेही लिहिली गेली. दिलीप देशपांडे, सुधाकर वढावकर, शिरीष पै, सुधीर मोर्डेकर, आप्पा परचुरे, श्याम भुर्के इ.नी त्यांच्यावर पुस्तके लिहिली आहेत.

आज अत्रे यांचा स्मृतीदिन. त्या निमित्त या अष्टपैलू प्रतिभावंताला शतश: अभिवादन! ? 

☆ ☆ ☆ ☆ ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गूगल विकिपीडिया

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print