श्रीमती उज्ज्वला केळकर
विविधा
☆ स्थलांतर… भाग १ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
जेव्हा मोठ्या प्रमाणात प्राणी, पक्षी, जलचर, उभयचर एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी जातात, तेव्हा आपण म्हणतो, ते स्थलांतर करतात आणि त्या प्रवासाला स्थलांतर असे म्हणतात. आपली मूळची जागा सोडून ते काही काळापुरते दुसर्या ठिकाणी जातात. काहींच्या बाबतीत स्थलांतर हा खूप लांबचा प्रवास असतो, तर काहींच्या बाबतीत तो जवळचा असतो.
स्थलांतर कशा प्रकारचं?
काही प्राणी एकाच मार्गाने, एकरेशीय स्थलांतर करतात. इतर काही वर्तळाकार प्रवास करतात. म्हणजे ते स्थलांतर करतात आणि काही काळानंतर पुन्हा आपल्या पहिल्या घरी परत येतात. काही प्राणी स्थलांतर करतात. तिथे आपल्या छोट्या बाळांना जन्म देतात आणि मरतात. नंतर त्यांची आपत्य, त्यांच्या मूळ जागी एकटीच परततात.
कोणत्या प्रकारे प्राणी स्थलांतर करतात?
प्राणी विविध प्रकारांनी स्थलांतर करतात. बेडूक अंडी घालायच्या वेळी नद्या, तळी वगैरे पाण्याचे स्त्रोत असलेल्या जागी स्थलांतर करतात. रॉबीन उत्तरेकडून दक्षिणेकडे येतात. सालमन समुद्राच्या पाण्यातून पोहत नदीच्या गोड्या पण्यात येतात. विशिष्ट प्रकारच्या फुलपाखरांचा थवा वर्षातील विशिष्ट काळात ठरावीक ठिकाणी जातो.
प्राणी स्थलांतर का करतात?
एकाच ठिकाणी न राहता प्राणी स्थलांतर करतात. का? प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास करणार्या शास्त्रज्ञांनी त्याची अनेक कारणे शोधून काढली आहेत.
१. थंड हवेपासून दूर जाण्यासाठी
२. काही प्राणी दुसर्या जोडीदाराबरोबर एकत्र येऊन नवीन आपत्यांना जन्म देण्यासाठी
३. काही जण आपल्या अन्नाच्या शोधात
४. काहीजण आपल्या घरात गर्दी होऊ नये म्हणून.
स्थलांतर कसं करायचं हे प्राण्यांना कसं कळतं?
आपण काळ आणि वेळ बघण्यासाठी कॅलेंडर आणि घड्याळाचा उपयोग करतो, पण प्राण्यांना कसं कळतं, की आता स्थलांतराची वेळ झाली आहे. शास्त्रज्ञांना असं वाटतं, की दिवसाचा काळ, हे प्राण्यांचे कॅलेंडर असावे दिवसाचा प्रकाश कमी जास्त होणं, ही त्यांच्यासाठी खूण असावी. काहींसाठी तापमानातला फरकही खूण असावी.
स्थलांतर कसं करायचं, हे प्राण्यांना कसं माहीत होतं?
स्थलांतर करताना पक्षी आपल्या प्रवासात काही परिचित खुणांकडे लक्ष ठेवतात. उदा. नद्या किंवा समुद्र किनारे. सूर्य, तारे यांचाही मार्गदर्शक म्हणून ते उपयोग करतात. पण इतर प्राण्यांचं काय? ती कशाचा उपयोग करतात? आपल्याला माहीत नाही, पण स्थलांतर ही त्यांच्या आयुष्यातली आश्चर्यकारक आणि अद्भुत अशी गोष्ट आहे.
मोनार्क जातीच्या फुलपाखरांचं स्थलांतर
काही प्रकारची स्थलांतरे सहजपणे लक्षात येतात. पानगळीच्या सुरुवातीच्या काळात आपल्याला मोनार्क जातीच्या फुलपाखरांच्या लांबच लांब ओळी दिसतात. दक्षिणेकडे ती उडत जातात. त्यांच्यापैकी काही तर ३२००कि. मी. चा प्रवास करतात. ते त्यांचा हिवाळा कॅलिफोर्निया किंवा मेक्सिकोच्या गल्फच्या भागात व्यतीत करतात. ते विशिष्ट झाडांच्या फांद्यांवर गोळा होतात. फूटभरच्या अंतरात शंभर शंभर फुलपाखरे बसलेली शास्त्रज्ञांना आढळली आहेत. इतक्या मोठ्या संख्येने एकत्र गोळा झालेली फुलपाखरे बघितल्यावर त्या झाडाला जसा फुलपाखरांचाच बहर आल्यासारखे दिसते. वसंत ऋतू आला, की मोनार्क फुलपाखरे आपला उत्तरेकडचा परतीचा प्रवास चालू करतात. वाटेत फुलपाखरांच्या माद्या अंडी घालतात आणि मरून जातात. जेव्हा अंडी फुटतात, तेव्हा नवजात फुलपाखरे आपला उत्तरेकडचा प्रवास चालू करतात. पुढच्या पानगळीच्या काळात आपल्या आई-वडलांप्रमाणे ती पुन्हा दक्षिणेकडे येतात. आई-वडील ज्या झाडावर बसले होते, त्याच झाडावरती ही बसतात.
काही विशिष्ट जातीच्या भुंग्यांचं स्थलांतर
ज्या प्रदेशात अत्यंत थंडी असते, हिमवर्षाव होतो, आणि थंडीत गवताचं पातंसुद्धा कुठे दिसत नाही, अशा युरोपमधील देशात लेडी बग नावाचे भुंगे बागेतून कंपाऊंडवॉलच्या ऊबदार फटीत जातात. ते त्यांचे स्थलांतर असते. काही जण आणखी पुढचा प्रवास करतात. एखाद्या टेकाडाकडे तेउडत जातात. तिथे अनेक लेडी बग एकत्र गोळा होतात. अगदी जवळ जवळचिकटून मोठा गट करून, एकमेकांना ऊब देत ते थंडीचे दिवस घालवतात. वसंत ऋतू आला, की ते पुन्हा आपल्या मुळच्या घरी परत येतात.
या प्रकारच्या आणि इतरही अनेक प्रकारच्या स्थलांतरामुळे शास्त्रज्ञ गोंधळात पडतात. प्राण्यांना, पक्षांना, कीटकांना कसं कळतं, की त्यांना कुठं जायचं आहे? आता हे ठिकाण सोडायची वेळ झाली आहे, याची उत्तरे अद्याप कुणालाच कळलेली नाहीत.
मुंग्यांची फौज
दक्षिण अमेरिकेत अमीझॉन जंगलातील मुंग्या विशिष्ट काळानंतर स्थलांतर करतात. पण त्या तसं का करतात, हे कुणालाच माहीत नाही. त्या काही अन्नाचा शोध घेण्यासाठी स्थलांतर करत नाहीत. कारण खूपसं अन्न त्यांनी मागे ठेवलेलं असतं. त्या विशिष्ट दिशेने जाताहेत, असंही दिसत नाही. कुठल्या तरी अज्ञात कारणाने त्या स्थलांतर करतात. स्थलांतर करताना त्या लष्करी शिस्तीने ओळी करून जाताना दिसतात. जेव्हा त्यांचं लष्कर स्थलांतर करतं, तेव्हा रस्त्यात जर एखादा सजीव दिसला, तर सैनिक मुंग्या त्याच्यावर हल्ला चढवतात आणि त्याला खातात. घनदाट जंगलातून आणि जाळ्यांच्या गुंत्यातून लढाऊ मुंग्या पुढे पुढे जातात. ही फौज जेव्हा नदीच्या अरुंद पात्राजवळ येते, तेव्हा त्या पानाच्या देठावरून किंवा गवताच्या पात्यावरून पलिकडे जातात. किंवा मग त्या पळत पळत येऊन प्रवाहात एकमेकिंना चिकटून राहून पूल तयार करतात. अर्थात् त्यांच्यातील काही काही मुंग्या पाण्यात पडतात. पण त्या लष्करात इतक्या मुंग्या इतक्या मुंग्या असतात. की अखेर त्या सजीव पूल बनवण्यात यशस्वी होतात आणि उरलेली फौज त्या पुलावरून पुढे जाण्यात यशस्वी होते. जर नदी रुंद असेल, तर मुंग्या एकत्र गोळा होऊन मुंग्यांचा बॉलच बनवतात. या बॉलच्या मधे राणी मुंगी आणि अंडी सुरक्षित ठेवली जातात. बॉल पाण्यातून घरंगळतो आणि पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत जातो. तळाकडच्या मुंग्या वर येत राहतात. या सततच्या हालचालीमुळे काही मुंग्या पाण्यात पडतात, पण अखेर बॉल नदीच्या दुसर्या तिरालापोचतो, तेव्हा मुंग्या पुन्हा सुट्या सुट्या होऊन त्यांची पुन्हा फौज बनते व त्यांची आगेकूच पुन्हा सुरू होते. त्यांचं हे स्थलांतर बघायला अनेक लोक जमतात. पुढे एखाद्या पडलेल्या झाडाचा कुजलेला ओंडका किंवा झाडाची पोकळ ढोली असेल, तिथे त्या थांबतात. तिथे राणी मुंगी अंडी घालते. ३०,००० पर्यंत ती अंडी घालते. त्यानंतर ती मरते. बाकीची मुंग्यांची फौज ती अंडी घेऊन पुन्हा कूच करते. त्या सतत कूच का करतात? त्या कुठे जातात? आपल्याला माहीत नाही. कदाचित् ते त्यांनाही माहीत नसेल. हे अद्याप न सोडवलं गेलेलं कोडं आहे.
– क्रमश: भाग १
© सौ उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
मो. 836 925 2454, email-id – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈