मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ माझे गाव कापडणे… ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆

प्रा. सौ. सुमती पवार

? इंद्रधनुष्य ?

☆ माझे गाव कापडणे… ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆

माझे गाव कापडणे…

मंडळी, आपले स्वातंत्र्यवीर कसे जीवावर उदार होऊन फिरत होते ते आपण वाचले. किती किती अभिमान दाटून येतो हो या वीरांविषयी मनात नि मला तर खूप धन्य वाटते की देशासाठी झगडणाऱ्या एका क्रांतिवीराच्या पोटी मी जन्म घेतला व ध्यानी मनी नसतांना त्यांच्या कार्यकर्तृत्वावर “ चला कापडण्याला” नावाचे पुस्तक २०२१ साली लिहून मी त्यांच्या ऋणातून थोडेफार उतराई होण्याचा प्रयत्न केला. 

तसे तर आई वडीलांचे ऋण कधीही न फिटणारेच असतात. आणि शिवाय आता “ आपला महाराष्ट्र”धुळे, कपोले साहेबांच्या आग्रहास्तव “ माझे गाव कापडणे”ही मालिका मी दर रविवारी लिहिते आहे.आणि

महत्वाचे म्हणजे तुमचा तिला भरभरून प्रतिसाद आहे. खरे सांगते तुम्हाला, मोबाईल हातात घेईपर्यंत मी आज काय लिहिणार आहे हे मला मुळीच माहित नसते. पण एकदा का बोट ठेवले की तुम्ही जणू माझ्याकडून लिहवून घेता असेच मला वाटते. कारण त्या आधी मी एकदम ब्लॅंक असते. पण अचानक कोणी तरी सांगितल्या प्रमाणे लिहू लागते.तुम्ही सारे ते गोड मानून घेताच. बायाबापड्या, भाऊ वहिनी साऱ्यांचेच मला फोन येत असतात. भरभरून बोलतात मंडळी. मला ही छान वाटते. आपल्या लिखाणाचे चीज झालेले पाहून. असो..

आता, चला.. चले जाव कडे …

मंडळी .. 

ह्या चिमठाणा प्रकरणाच्या आधी पासूनच म्हणजे १९४२ पासूनच ह्या क्रांतीकारकांनी गावोगावी ब्रिटिशांना सतावणारे नाना उद्योग सुरू ठेवले होते. ब्रिटिशांना भारतात काम करणेच मुश्किल करून टाकायचे.. सहकार्य तर नाहीच पण अडचणीच निर्माण करायच्या या उद्देशाने पूर्ण खानदेश पेटून उठला होता. त्यामुळे सरकारी कचेऱ्या जाळणे .. तारा यंत्राच्या तारा तोडणे.. जेणेकरुन संदेशवाहन यंत्रणाच बंद पडून पोलिस खाते अडचणीत यावे अशा प्रकारची धाडसी व जोखीम पत्करणारी कामे जीवावर उदार होऊन ही देशभक्त मंडळी करत होती. ते स्वत: क्रांतीकार्यात असल्यामुळे पैशांची वानवा होती. बंदी असतांनाही ही मंडळी सरकारी कचेऱ्यांवर झेंडा फडकवत होती.

नामदेव संपत पाटील यांनी साक्री कचेरीवर जाऊन झेंडा फडकवला. सवाई मुक्टी, पाष्टे येथील तरूणांनी शिंदखेडा मामलेदार कचेरीवर झेंडा लावण्याचा प्रयत्न केला.अटक व्हायला हे देशभक्त जरा ही डगमगत नसत .जाळपोळीचे सत्र चालूच होते.

याच वेळी खानदेश मधील काही देशभक्तांनी एकत्र येऊन प.खानदेशमधील सरकारी विश्रांती गृहे जाळण्याचा कार्यक्रम ठरविला. श्री.विष्णू सीताराम पाटील यांनी चिमठाण्याचा(शिंदखेडा),श्री.व्यंकटराव धोबी यांनी बोराडीचा(शिरपूर), श्री.रामचंद्र पाटील यांनी धुळ्याचा,देऊरच्या नेत्यांनी साक्रीचा बंगला जाळायचे ठरवले.या कामी अप्रत्यक्षपणे मदत करणारे अनेक देशभक्त होते.यांचे काम रॅाकेलचे डबे पुरवणे , काळे पोषाख  पुरवणे,पोलिसांवर नजर ठेवणे,पोलिस कारवाईची माहिती देशभक्तांना देणे अशी जोखमीची कामे इतर मंडळी करत असत..

समाजातील दानशूर लोक अशा क्रांतिकार्याला पैसे पुरवत असत. या कार्यक्रमासाठी श्री.रामेश्वर शेठ पोतदार धुळे, यांनी प्रथम ७००/- रूपये श्री. विष्णू सीताराम पाटील,कापडणे यांना दिले.” मुंबईहून अण्णासाहेब सहस्रबुद्धे यांनी २००० रूपये पाठवले. “ या शिवाय अनेक सामान्य लोक देशभक्तांना विविध मार्गांनी मदत करत होते….

पुढे … विष्णूभाऊंनी चिमठाण्याचा बंगला जाळला …कसा ….? ते पाहू या पुढे.

२६ सप्टेंबर १९४२ रोजी तळोदा येथील रेस्टहाऊस पेटविण्यात आले.तेथल्या वॅाचमनला लोकांनी बांधून ठेवले. रेस्टहाऊसच्या मुख्य हॅालमध्ये रॅाकेल शिंपडून ते पेटविण्यात आले. त्या मुळे रेस्टहाऊसचा मुख्य हॅाल पूर्ण जळून गेला. ८००/- रुपयांचे नुकसान झाले.वॅाचमनने लोकांच्या मदतीने स्वत:ची सुटका करून घेतली.त्यानंतर त्याने रेस्ट हाऊसची आग विझवली.

श्री.विष्णू सीताराम पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी १३ ॲाक्टोबरला चिमठाण्याचा सरकारी बंगला जाळला.एका खोलीत बंगल्यातील सारे फर्निचर एकावर एक रचून ठेवले.त्यावर रॅाकेल शिंपडले आणि नंतर बंगला पेटवून दिला. त्यामुळे विश्रांतीगृहाचे छप्पर पूर्णपणे खाली कोसळले.२५०० /- रूपयांचे नुकसान झाले.(१९४४ सालातील) हा बंगला जाळतांना रॅाकेल शिंपडण्यासाठी डांगुर्णे येथील …..श्री.कैलासगीर गोकुळगीर महाराज यांच्याकडील धान्य मोजण्याचे माप अधेली (आदलं) देशभक्तांनी नेले होते. बंगला पेटवून देशभक्त परत येतांना त्यांना एकदम या भांड्याची आठवण झाली.कारण त्या भांड्यावर श्री.कैलासगीर महाराजांचे नाव होते. हे भांडे जर तसेच तेथे राहिले तर पोलिसांना आपला सुगावा लवकर लागेल,आणि आपण पकडले जाऊ हा विचार करून……

मग…

अर्ध्या रस्त्यातून … श्री.विष्णूभाऊ पाटील आणि श्री.गंगाधर पाटील हे मागे फिरले. भडकलेल्या आणि अग्नीज्वाळांनी लपेटलेल्या हॅालमध्ये त्यांनी प्रवेश केलाआणि मोठ्या मुष्किलीने ते भांडे त्यांनी परत आणले.

केवढे हे अग्नीदिव्य… डोळ्यांसमोर प्रसंग आणून पहा .. आणि हे सारे  “ गुलामगिरीत सापडलेल्या आपल्या मातृभूमीला मुक्त करण्यासाठी …. ही मंडळी प्रसंगी आगीशीही खेळत होती.”

चिमठाणा बंगला जाळण्यात ….श्री रामचंद्र गोविंद पाटील,श्री.नरोत्तमभाई पटेल, श्री.यशवंत पाटील, जुनवणे, श्री.बाबुराव गुरव शिंदखेडा, श्री. माणिकलाल छाजेड(धुळे),श्री.नामदेवराव पाटील,पोलिस पाटील डांगुर्णे, गंगाराम पाटील डांगुर्णे,श्री.राजाराम पाटील डांगुर्णे,श्री.रामदास भील,डांगुर्णे,व विष्णूभाऊ पाटील कापडणे अशा १० व्यक्तिंनी  भाग घेतला. मुख्य सहभाग कापडण्याचे विष्णुभाऊ पाटील यांचा होता. नेतृत्वही त्यांचेच होते.

चिमठाणा बंगला जाळल्यामुळे पोलिसखाते हैराण झाले.शेजारच्या गावावर त्यांचा मोठा रोष झाला.त्यांनी दडपशाही सुरू केली.सामान्य जनतेला धमक्या देणे सुरू झाले. तरीही पोलिसांना कोणी माहिती देण्यास तयार झाले नाही.एवढी निष्ठा खानदेशच्या जनतेच्या हृदयात निर्माण झाली होती. डिसेंबरच्या २८

तारखेला नंदुरबारच्या क्रांतिवीरांनी तेथील  हिल बंगल्यास पेटविले.त्यामुळे रेव्हेन्यू खात्याच्या या इमारतीचे बाथरूम आणि छप्पर पूर्ण जळाले.सुमारे ६००/-रुपयांचे नुकसान झाले. बोराडीचे रेस्टहाऊस श्री.व्यंकटराव धोबी यांनी २९ मे १९४३ रोजी जाळण्याचा प्रयत्न केला. त्यात बोराडीच्या बंगल्याचे सुमारे १५००/- रूपयांचे नुकसान झाले. 

मंडळी.. 

आज ह्या रकमा आज आपल्याला किरकोळ वाटत असल्यातरी तो १९४२ चा काळ आहे हे लक्षात घ्या म्हणजे त्याचे मूल्य लक्षात येईल. खानदेश पूर्ण पेटून उठला होता.जिकडे तिकडे जाळपोळ  करून ब्रिटिश सरकारला या ना त्या प्रकारे कोंडीत पकडण्याचे प्रयत्न चालू होते.. व जीवावर उदार होऊन तरूण पिढीने

या धगधगत्या स्वातंत्र्ययज्ञात झोकून दिले होते . देशभर “चले जाव” आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळत होता व ब्रिटिश सरकार चवताळून उठले होते, व  आपले वीर बिलकूल घाबरत नव्हते.

बरंय मंडळी, राम राम . जयहिंद.. जय महाराष्ट्र..

आपलीच,

© प्रा.सौ.सुमती पवार 

 नाशिक

(९७६३६०५६४२)

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ रविवारचा फराळ… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’ ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

🔅 विविधा 🔅

रविवारचा फराळ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

At what cost…. ?

अगदी आदिम काळापासून मनुष्य सुखाच्या शोधात असल्याचे आपल्याला आढळून येते.

प्रत्येक मनुष्याला त्याच्या आयुष्यात कमीअधिक प्रमाणात सुखदुःख भोगायला मिळतात, यात कोणाचेही दुमत असणार नाही.

जगात कोणतीही गोष्ट फुकट मिळत नाही, नाही का ?

प्रत्येक गोष्टीची योग्य ती किंमत आपल्याला चुकवावीच लागते. (एकतर आधी किंवा नंतर…)

सध्याच्या काळाचा विचार केला तर मनुष्य सुख ( वस्तूसापेक्ष, परिस्थिती सापेक्ष आणि व्यक्तिसापेक्ष) मिळवण्यासाठी धडपड करीत असल्याचे आपल्या लक्षात येईल.

हे सर्व करीत असताना तो किती धोका पत्करत आहे, याचे त्याला भान राहिलेले आहे असे दिसत नाही….!

अधिकाधिक वस्तूंच्या संग्रह करण्यात, त्यासाठी संपत्ती कमविण्यात मनुष्याचा जवळजवळ पाऊण दिवस खर्च होत आहे…

मिळवलेले साधने उपभोगायला त्याच्याकडे पुरेसा वेळच नाही…!

सर्व संतांनी आपल्याला हेच सांगितलं आहे की शाश्वत सुख मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत आणि अशाश्वताच्या मागे लागलो आहोत….!

प्रपंच म्हटला म्हणजे सर्व वस्तू लागतात, पण शांत बसून विचार केला तर घरातील ९०% वस्तू आपल्याला अगदी क्वचित लागतात…

मनुष्यदेह दुर्लभ आहे, आपण तो नक्की कशासाठी खर्च करणार आहोत, कशाच्या बदल्यात खर्च करणार आणि कसा खर्च करणार याचा आपण सर्वांनी सावकाशीने विचार करावा.

मध्यंतराच्या वेळी विचार केला तर पुढची दिशा मिळेल आणि आपल्या जीवनाची ‘दशा’ होणार नाही.

पूर्वी वस्तूंचा चलन म्हणून उपयोग करीत असत.

असे असले तरी व्यवहार करताना ‘विवेक’ केला जाई.

हिंगजिऱ्याच्या बदल्यात कोणी कस्तुरी देत नसे….!

आपण ‘विवेक’ करावा….!

© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

थळ, अलिबाग

मो. – ८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आटपाट देश… ☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆

सौ. ज्योती कुळकर्णी 

??

☆ आटपाट देश…  ☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆

एक आटपाट देश होता. त्याचे नाव कधी हिन्दुस्थान होते, कधी इंडिया होते, तर कधी भारत होते. त्याचा एक वेगळाच इतिहास आहे.

तिथे फार पूर्वी नेहेमीच हवे हवेसे वाटणारे रामराज्य होते. राजा राम सदाचारी व सत्यवचनी होता. प्रजेचा चाहता होता.

राजेशाही नंतरही चालू होती. अनेक आक्रमणे झाली, स्वातंत्र्य लढे झाले. देश स्वतंत्र झाला. लोकांनी लोकांसाठी बनवलेली लोकशाही आली.

ह्या आटपाट देशात एक ‘अकोला’ नावाची आटपाट नगरी होती. ह्या नगरीत एक बँक होती. बँकेने त्यांच्या कर्मचार्‍यांना स्वतःचे घर बांधण्याचे स्वप्न दाखवले. लोकशाहीत मालमत्ता बाळगण्याचा मूलभूत हक्क असल्यामुळे कर्मचार्‍यांनीही घर बांधण्याचे स्वप्न बाळगले. बँकेकडून व्याजदर देखील कमी रहाणार होता.

झाले! सगळ्यांनी मिळून जमीन खरेदी केली. सोसायटी स्थापन केली. ’आमची सोसायटी’ नाव दिले. बघता बघता जमीन शेतकी नसल्याचे दाखले, तसेच प्लाॅट पाडणे इ. उपचार पार पाडले. म. न. पा. कर्मचार्‍यांना चारा-पाणी देऊन नकाशे पारीत करून घेतले. सगळ्यांनी हुश्श केले.

सगळ्यांच्या दुसर्‍या गावी बदल्या झाल्याने कंत्राटदाराला घरं बांधायला दिलीत. गाठ पडली ठका ठका! त्याने ठकवून ठकवून का होईना ५/६ वर्षात घर बांधून दिले.

तोपर्यंत म. न. पा च्या अभियंत्याला व एका बिल्डरला सोबत घेऊन नगरसेवकाने ठरविले की इथे अवैध वस्त्या निर्माण करून आपले लोकशाही साम्राज्य निर्माण करावे. कारण त्याच्या लक्षात आले की इथे रहायला एकदोन जणच आलेत व कोपर्‍यावरच्या घरांना आवारभिंतीही नाहीत. नगरसेवक म्हणजे प्रभागांचा राजाच! या लोकशाहीतील राजाला राज्य उभारायला छान संधी चालून आलीय!

मग काय विचारता? कंत्राटदाराने आमची सोसायटीच्या लगतची दहा एकर जमीन खरेदी केली. कागदावर बारा एकराचे प्लाॅट पाडले. बकरे शोधून त्यांना त्यावर घरे बांधून द्यायला सुरवात केली. बारा एकर जागाच अस्तित्वात नसल्याने आमची सोसायटीच्या सँक्शन रोडवर घरे बांधली व सोसायटीतल्याच दोघांच्या प्लाॅटमधून त्यांची परवानगी न घेताच टाऊन प्लानिंग वाल्यांना सहभागी करून घेऊन टेंपररी रोड करून घेतला.

रहायला आल्यानंतर त्या दोघांचा विरोध म्हणजे नक्राश्रूच ठरले. कारण त्यांच्यावरच १०७ कलम लावले व अटकेत टाकण्याच्या धमक्या दिल्या. त्यांना कोण दाद देणार होतं! नगरसेवकांचं तर अवैध वस्त्यांमधल्या मतदारांचं साम्राज्य उभं झालेलं होतं. वसाहतीतल्या १५/१६ घरांच्या मताला काय किंमत होती. कोर्टात केस जिंकूनही कारवाई होतच नसल्याने बिचार्‍यांना चूपचाप बसावं लागत होतं! रस्ते, नाल्या एकही सुविधा मिळत नव्हती. उलट यांच्याच जागेतून अवैध वस्त्यांना सगळ्या सुविधा म. न. पा नी मिळवून दिल्या होत्या. ते बघून सगळ्यांनाच अवैध वस्तीत आपले घर नसल्याचा पश्चाताप होत होता. कारण वैध मार्गाने न्याय मागण्याचे त्यांचे सगळे प्रयत्न संपले होते. म. न. पा चे लोक किती गेंड्यांचं कातडं पांघरून रहातात याचा त्यांना बर्‍याच उशीरा का होईना, अंदाज आला होता. म्हणून त्यांनी म. न. पा ला, आपल्याला सर्वांनाही अवैध वस्तीत घर देऊन सगळ्या सुविधा देण्याबद्दल विनंती करायचे ठरवले…

कोणत्याही गावाची एक गावदेवी असतेच. यांची देवी म्हणजे म. न. पा. मग या देवीची आरती करायलाच हवी नं! तशी त्यांनीही केली…

जय देवी जय देवी जय महापालिके देवी

वससी व्यापक रूपे तू अमुच्या गावीऽऽ

हो तू अमुच्या गावी……जय देवी ।।ध्रु ।।

 

करतांना अमुच्या नगरीत तू वास

अवैध निर्माणाचा एकच ध्यासऽऽ

हो एकच ध्यास…. जय देवी ।।१ ।।

 

अवैध निर्माण करिशी तर करिशी

सर्वच सुविधाही त्यांना पुरविशीऽऽ

हो त्यांना पुरविशी….. जय देवी।।२।।

 

सुविधा त्यांना देतांना सोसायटीमर्दिनी होशी

चोर सोडून संन्याशाला फाशी तू देशीऽऽ

हो फाशी तू देशी.. जय देवी।।३।।

 

ते बघूनी वाटले सोसायटीवासियांना

आम्हालाही अवैध घर मिळावे नाऽऽ

हो घर मिळावे ना…जय देवी॥४॥

 

मागणी अपुली मनपा चरणी अर्पियेली

मनपा देवीच्या वार्‍या करीत बसलीऽऽ

हो वार्‍या करत बसली…जय देवी॥५॥

 

जय देवी जय देवी जय महापालिके देवी

वसशी व्यापक रूपे तू अमुच्या गावीऽऽ

हो तू अमुच्या गावी ।

अशा रितीने त्यांनी आपली मागणी मनपा चरणी रूजू केली व अवैध वस्त्यांची मागणी ज्याप्रमाणे म. न. पा. मान्य करते त्याच प्रमाणे आमचीही मागणी म. न. पा देवीने मान्य करावी व ही’साठा उत्तराची कहाणी सफळ संपूर्ण होवो’ असे साकडे म. न. पा ला घातले.

ही आमच्या काॅलनीची सत्यकथा आहे. आमच्या जागेतून म. न. पा ने जबरदस्तीने रस्ता केला, त्याला मी व आणखी एक अन्यायग्रस्त आहे त्याने मिळून विरोध केल्यावर विरूद्ध पक्षाने पोलीस कम्प्लेंट केली व आमच्यावरच परिसरातली शांतता नष्ट करण्याबाबत गुन्हा दाखल केला. मूळ विषयाचा उल्लेखही केला नाही. नगरसेवकानीच त्यांना प्रवृत्त केले. परिणामी माझ्यावर व ज्याची जागा गेली त्या दुसर्‍यावरही १०७ कलम लावून समन्स जारी केला. आम्हाला ‘तुम्ही दोघंच आहात, बाकीचा सगळा जमाव एक आहे’ असे सांगून पोलीसांनी हवा तसा जबाब लिहून घेतला. काही दिवसांनी आम्हाला तहसील कोर्टाकडून बोलवणे आले. आमच्या काॅलनीने सुविधा नसल्याने टॅक्स भरायचा नाही ठरवले होते. त्यामुळे माझ्या पतीला जमानत पण घेता येत नव्हती. माझा भाऊ व ह्यांचा भाऊ जमानत घ्यायला आले होते, परंतु तिथे मिळालेल्या सल्ल्यानुसार दोनशे रू. लाच देऊन आम्ही केस रफ्फादफ्फा केली.

दरम्यान साठ फूट रस्त्यावरची अतिक्रमणे वाढवून रस्ता, नाल्या पूर्णपणे बंद केल्यात. आमच्या काॅलनीने ‘कंटेम्प्ट आॅफ कोर्टची’ केस दाखल केली आहे. आता कोर्टाची आॅर्डर मनपाला जाऊनही म. न. पा टाळाटाळ करतेय. २६ सप्टे. ला टाऊन प्लानिंग आॅफिसने धो धो पावसात अतिक्रमणाच्या जागेवर रेषा आखल्यात. पुढे काय होणार माहिती नाही. मी वर लिहिलेली आरती काही मनपा पर्यंत पोहोचवू शकले नाही. फक्त माझे मनोगत आपणा सर्वांपुढे मांडले.

© सौ. ज्योती कुळकर्णी

अकोला

मोबा. नं. ९८२२१०९६२४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “काळीज-दगडावरची रेघ !” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

 

? इंद्रधनुष्य ?

काळीज-दगडावरची रेघ ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

त्याचे घर तसे आणखी बरेच दूर होते. दोन डोंगर चढून उतरुन झालेले होते.. पण तेव्हढेच आणखी शिल्लक होते. भारतीय सैन्यातील एक तरुण कनिष्ठ अधिकारी आणि एक जवान त्याच्या पलटणीमधल्या एका सैनिकाच्या घरी निघाले होते. त्यांच्यापाशी असलेल्या पिशवीतला ऐवज तसा हलका होता पण त्यांच्या मनावरचं ओझं प्रचंड मोठं होतं. युद्धात कामी आलेल्या योद्ध्याच्या घरी जाऊन त्याच्या माता-पित्यांना ती अतीव दु:खद वार्ता सांगायला मोठी हिंमत गोळा करावी लागते. तो अधिकारी तसा जड पावलांनीच चढण चढत होता. त्याच्यासोबत असलेल्या जवानाची अवस्थाही काही निराळी नव्हती. लढाईत त्याचाच जवळचा सहकारी गमावला गेला होता. आणि त्याचं घर दाखवायची जबाबदारी अधिका-यांनी त्याच्याच खांद्यावर दिली होती. एरव्ही मृत्यूला वाकुल्या दाखवणारे हे सैनिक अशा प्रसंगी भावुक होणं साहजिकच… किती केलं तरी माणसंच शेवटी. उद्या आपल्याही घरी कुणी असाच निरोप घेऊन जाऊ शकतं… हा विचारही येत असावा त्यांच्या मनात!

त्या पहाडावरून चार दोन माणसं खाली येत होती. सैनिकी गणवेशातील या दोघांना पाहून त्यातील एकाने विचारलेच… ” साब, किसके घर जा रहे हैं?” या साहेबांनी एक नाव सांगितले. प्रश्न विचारणा-या त्या माणसाने एकदा साहेबांकडे नीट पाहिले आणि तो काहीसा विचारात पडला. दिवंगत सेवानिवृत्त सैनिकांच्या घरी कशाला कोण येईल सांत्वन करायला? आणि तेही इतक्या दुरून? यांच्या पलटणीतला हा असा तसा सामान्य आणि सेवानिवृत्त सैनिक वारला, ही बातमी पलटणीपर्यंत कशी पोहोचली?

त्या ग्रामस्थाने शेवटी हिंमत करून विचारलेच… ” साब, आपको कैसे पता चला की यह फौजी बहादूर गुजर गये? ”

… त्यावेळच्या संदेशवहनाच्या व्यवस्थेनुसार ती बातमी तिथपर्यंत पोहोचणे तसे अशक्यच होते. आता विचारणारा आणि उत्तर देणारा असे दोघेही बुचकाळ्यात पडले.

“ हम तो उनके बेटे की शहादत की खबर लेके उसके घर जा रहे हैं !” साहेबांनी कसेबसे सांगितले. ते ऐकून त्या चौघांच्या चेहऱ्यावरची रया गेली. अर्थात त्या भागात अशा बातम्या येण्याची ही काही हजारावी वेळ असावी… पण तरीही धक्का बसतोच.

“वैसे कब गुजरे उनके पिताजी?” सेना अधिका-यांनी विचारले.

“ आज ग्यारह दिन हो गये, साब ! हम उनके घर से उनकी पत्नी को मिलकर वापस जा रहे थे!.. चलिये, साब… हम आपको लिये चलते हैं… ” असे म्हणत ते चारही जण पुन्हा पहाड चढू लागले.

“ म्हणजे ज्या दिवशी बाप गेला त्याच दिवशी लेकाने हे जग सोडले तर ! किती विचित्र योगायोग म्हणावा 

हा !” साहेबांच्या मनात हा एकच प्रश्न घुटमळू लागला होता. लेकाच्या मृत्यूची खबर देताना आई-बापाशी सांत्वनार्थ काय बोलायचे याची त्याने इथपर्यंत येतांना हजारदा उजळणी केलेली होती… आणि आता तर एक नव्हे.. दोन मरणांची गोष्ट होती… त्याच्या डोक्यावर आता दोन दोन पहाड होते ! मनात योजलेली कोणतीही वाक्ये आठवेनात त्यांना. खूप कठीण असतं अशा आई-बापांना सामोरे जाताना.

आधीच जडावलेली पावले… ते घर जवळ आल्यावर आणखीनच मंद झाली.

ती तिच्या घराच्या अंगणात उन्हात उभी होती… तिथे थंडी असतेच नेहमी.. सूर्य दिवसाही त्यांच्या गावावरून जायचा कंटाळा करतो. हे दोघे पुढे झाले. दोघांनीही तिला सल्यूट केला.. वीरमाता होती ती !

“ साब, आपको कैसे पता चला की… मेरे साहब गुजर गये?”.. तिला वाटले… तिच्या नव-याच्या मृत्यूबद्दल सांत्वन करायला ते अधिकारी आले आहेत इतक्या दूर. तिचा नवरा होताच तसा लढवय्या. तीन तीन लढाया गाजवून आला होता परत.. जखमी होऊन… पण अभिमानाने. थोरल्या पोरालाही त्याने त्याच्याच पलटणीत धाडले होते.

क्षणभर एकदम स्मशान शांतता पसरली. स्वत:ला सावरून साहेब म्हणाले, ” माताजी, क्षमा चाहता हूं ! आपके बेटेने देश के लिये अपना बलिदान दिया है ! उनकी युनिफॉर्म ले के आया हूं ! ”

केवळ अकरा दिवसांपूर्वी दु:खाचं वादळ सोसलेलं ते म्हातारं होत चाललेलं काळीज हा तडाखा कसं सहन करेल?

… ती क्षणभर गप्प उभी राहिली आणि मटकन खाली बसली. मोठ-मोठ्याने शोक करण्याची त्यांच्यात पद्धत नव्हती. त्या पहाडांना अशा बातम्या ऐकण्याची सवय होऊन गेली असावी… ते पहाड काही उगाच शांत भासत नाहीत. आजची काही पहिली वेळ नव्हे. पहिल्या आणि दुस-या महायुद्धात परकीय भूमीवर लढायला गेलेले कित्येक तरुण जीव परतलेच नव्हते.. आणि त्यांच्या बातम्याही अशाच उडत उडत समजल्या होत्या. काहींच्या तर बातम्याही आल्या नाहीत. सैन्य, सैन्याला आदेश देणारे अधिकारी बदलले… पण आदेश प्राणापेक्षाही जास्त मोलाचे मानणारे बदलले नव्हते. जगण्यासाठी लढत होते की लढण्यासाठी जगत होते कुणास ठाऊक? आणि ही परंपरा राखण्यात खंड नाही पडला कधी.

“कसं मरण आलं माझ्या लेकराला? वीरमरण आलं ना… माझी खात्रीच आहे ! ” गालावरचे अश्रू तसेच खाली ओघळू देत तिने विचारले !

“जी, माताजी. बहादूर था आपका बेटा. आखिरी सांस तक हार नहीं मानी ! ” असं म्हणत साहेबांनी गणवेश आणि त्याच्या काही वस्तू तिच्या हातात सन्मानाने ठेवल्या. काही चलनी नोटा असलेलं एक कागदी पाकीट ठेवलं. वरिष्ठ अधिकारी ते सर्वांत कनिष्ठ शिपाई अशा सर्वांचे एक दिवसाचे वेतन जमा करून ते पैसे कामी आलेल्या सैनिकाच्या घरी देण्याची त्यावेळी पद्धत होती… पेन्शन आणि इतर भरपाई हातात मिळेपर्यंत या पैशांचा चांगला उपयोग होत असे. त्या अधिका-याने आणि सोबत आलेल्या जवानाने तिला पुन्हा सल्यूट बजावला. तिने तिच्या नव-याच्या फोटोकडे एकदा नजर टाकली…. आसवं टपकत होतीच.

तेवढ्यात तिचा धाकटा लेक डोक्यावर लाकडाची मोळी घेऊन अंगणात पोहोचला. “ साब, हमारे लिये क्या खबर लायें हैं आप?” त्याने विचारले. आणि त्याची नजर त्याच्या आईच्या आसवांकडे गेली.

“ जा.. इनके लिये तू चाय बना के ला दो कप. दूर से चलते हुये आहे हैं… हमारे लिये. ” तो मुलगा बिचारा निमुटपणे आत गेला आणि चार मिनिटांत बाहेर आला… हातात चहाचे कप होते. अधिकारी आणि जवान यांना त्या चहाकडे पाहण्याची हिंमत होईना.

“ बेटा, तेरा भाई भी गया तेरे पिता के साथ. अब उनकी जगह तुझे लेनी है. सेनाही हमारा परिवार है.. उससे रिश्ता बरकरार रहना चाहिये ! ”

त्यावर पोरगा खूप वेळ शांत राहिला… आणि म्हणाला… ” मग आई, तुझं एकटीचं कसं निभावेल, या घरात. कुणीच नाही तुझ्यासोबत !”

त्यावर ती म्हणाली, ” तुझ्या वडिलांविना कित्येक वर्षे काढलीच की मी एकटीनं. तुम्ही तर लहान लहान होतात. जखमी होऊन तुझे वडील घरी आले तेंव्हा कुठे आमचा खरा संसार सुरु झाला… जा. तू… बिनघोर !”

असं म्हणत त्या विधवा आणि आता पुत्रवियोगाने क्षत-विक्षत झालेल्या आईने लेकाचा गणवेश मोठ्या प्रेमाने तिच्या फडताळात ठेवला…. साहेब आणि जवान कितीतरी वेळ दगड झाल्यासारखे तिथेच उभे होते…..

पहाड उतरून जाता जाता त्यांना किती तरी वेळा मागे वळून पाहण्याची इच्छा झाली.. पण हिंमत नाही झाली ! अगदी पायथ्याशी आल्यावर त्या दोघांनीही त्या पहाडाकडे पाहून कडक सल्यूट केला आणि ते पलटणीकडे निघाले.. पलटणमधून एक कमी झाला होता… त्याची जागा लवकरच भरून निघणार होती !… पहाड शांतच होते… नेहमीसारखे !

(जगाचा इतिहास युद्धांचा आहे. या युद्धांत पडणा-या सा-याच आहुती मोजल्या जात नाहीत. पूर्वी सैनिकांचे मृतदेह त्यांच्या घरी पोहोचवण्याची पद्धतही नव्हती ! वरील कहाणी अगदी खरी… अशा माता आणि अशी लेकरं….. रणभूमीला रक्ताची ददात कधी पडू देत नाहीत. आपण त्यांच्याच कृपेने अस्तित्वात आहोत. जय हिंद !)

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ बॅग भरून निघून जाऊ नका… – लेखक – प्रा. विजय पोहनेरकर ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? वाचताना वेचलेले ?

बॅग भरून निघून जाऊ नका… – लेखक – प्रा. विजय पोहनेरकर ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे

(दुर्गुणांकडे डोळेझाक आणि सद्गुणांचा जप)


ज्या झाडांना पाणी मिळत नाही 

ते झाड सुकतं, वाळतं, जळून जातं !

अगदी त्याच प्रमाणे 

ज्या नात्याला प्रेम मिळत नाही 

ते नातं दुरावतं, तुटतं, संपून जातं !

नातं भावा भावाचं आहे, का बहिणी बहिणीचं आहे, का बाप लेकांचं आहे,

का नवरा बायकोचं आहे, हा भाग महत्वाचा नसून, त्या नात्यात प्रेम आहे का नाही हे महत्वाचे आहे !

 

आता प्रेम म्हणजे नेमकं काय ?

प्रेम म्हणजे वारंवार भेटावं वाटणं, बोलावं वाटणं, काहीतरी देणं किंवा काहीतरी घेणं !

प्रेम म्हणजे आदर,

प्रेम म्हणजे काळजी,

प्रेम म्हणजे एकमेकांबद्दल चांगलं चिंतनं !

 

तुझं, माझं, मीच का ? तू का नाही ? या शब्दांच्या पलीकडे जाऊन केलेली स्नेहाची बरसात म्हणजे प्रेम !

हवंहवंसं वाटणं म्हणजे प्रेम आणि नकोसं वाटणं म्हणजे दुरावा !

दुरावा कमी करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे प्रेम आणि दुरावा 

वाढवण्यासाठीचा प्रयत्न म्हणजे वीट येणे म्हणजेच घटस्फोटाची तयारी !

 

सतत एकमेकांच्या दुर्गुणावर बोट ठेऊन टोमणे मारणे हे प्रेम नाही !

 

नेहमी नेहमी तो कसा वाईट आहे आणि मी कसा चांगला आहे याची जाहिरात करणे, आणि सातत्याने एक दुसऱ्याची तक्रार करणे म्हणजे प्रेम नाही !

 

तुम्ही फक्त एकमेकांकडून अपेक्षाच करणार असाल,

काहीच न देता फक्त मिळण्याचीच आशा करत असाल,

सारखं सारखं चुका दाखवून फक्त उनी दुनि काढत असाल,

तर आपल्यातल्या प्रेमाला ओहटी लागली आहे असे समजावे !

 

अशाने नातं नावाचं झाडं सुकू शकतं, जळू शकतं, तुटू शकतं !

 

अंगणातलं झाड जळू नये म्हणून जिवाच्या आकांताने प्रयत्न करणारी माणसं, नातीगोती किती सहजपणे संपवतात याचं आश्चर्य वाटतं !

 

त्यामुळे वेळीच सावध व्हा, लक्षात घ्या घटस्फोट हा एका क्षणात किंवा किंवा एका दिवसात घडणारी गोष्ट नसते !

भांडणातली frauency वाढायला लागली, अबोला धरण्यातला कालावधी जास्त वाढायला लागला की आपलं नातं संपुष्टात येण्याचा दिवस जवळ जवळ येत आहे ही गोष्ट नीट समजून घ्या !

ठिणगीचा वणवा होण्या आधीच ठिणगी विझवता येणं हे केंव्हाही चांगलं !

 

कागदावर पाठवलेल्या नोटीसी वर सह्या करून, दोघांनी विभक्त होऊन वेगवेगळ्या घरात रहाणे हा झाला कायदेशीर घटस्फोट !

परंतु एका छता खाली राहून, न बोलणे, न पटणे, एकमेकांची काळजी न करणे, एकटे-एकटे राहणे, जवळ असून एकमेकां पासून मनाने खूप दूर जाणे हा सुद्धा घटस्फोटच आहे !

 

आपण प्रेम आहे म्हणून एकत्र रहाता का, लोक काय म्हणतील म्हणून एकत्र रहाता ? हा प्रश्न स्वतःला गंभीरपणे विचारा आणि एकमेकांना पटापट माफ करा !

अहंकार कुरवळण्यापेक्षा एकमेकांत विलीन होता आलं पाहिजे !

लक्षात घ्या समुद्र मोठा होईल म्हणून नदी तिचं विलीन होणं कधीही नाकारत नाही किंवा वाहण्याचा मार्गही बदलत नाही !

 

शेवटच्या क्षणी……. म्हणजे मांडीवर डोकं आणि तोंडात तुळशीचं पान ठेवतांना शहाणपणा येऊन, प्रेमाचे उमाळे फुटण्यात आणि माझं चुकलं म्हणून दोन्ही हात जोडण्यात काही अर्थ नसतो ! 

मृत्यू समोर दिसत असताना नात्या गोत्यांचा अर्थ कळून काहीही उपयोग नसतो !

 

म्हणून म्हणतो क्षुल्लक कारणावरून वाद घालू नका

बॅग भरून निघून जाऊ नका

सिंगल रहाणं सोप्प नसतं, एक घरटं मोडून पुन्हा मी सुखी आणि आनंदी घरटं तयार करील, इतकी कठोर शिक्षा स्वतःला व आपल्या पार्टनरला देऊ नका !

म्हणून काय करावं ?

दुर्गुणांकडे डोळेझाक करा,

सद्गुणांचा जप करा,

कोणत्याच नात्याचा तिरस्कार करू नका,

आपलेपणाची आरती करून अहंकाररुपी कापूर जाळा

आणि स्नेहाचा प्रसाद वाटून एकमेकाला ” घालीन लोटांगण म्हणा “……. कदाचित बरेच प्रश्न मिटु शकतील !

लेखक / कवी : प्रा. विजय पोहनेरकर

छत्रपती संभाजीनगर ( औरंगाबाद )

94 20 92 93 89

प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ नवा विषाणू… ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? विविधा ?

नवा विषाणू… ☆ श्री सुनील देशपांडे 

सर्व जगावर अधिराज्य करत हाहाकार माजवत होता. माणसे मरत होती, माणसं जगत होती, माणसं धडपडत होती, माणसांचं जे काही व्हायचं ते होत होतं. पण त्यालाही अंत होताच.  येणार येणार म्हणून येत असलेली आणि टोचणार टोचणार म्हणून टोचणीला सुरुवात झालेली लस आली.   जिच्या आगमनाकडे आपण डोळे लावून बसलो होतो ती, होय तीच आली.  आणखी एखादा विषाणू अजून येईल, झुंडीच्या झुंडी येतील. माणसांना टोचून जातील आणि संपून जाईल तो विषाणू. भविष्यात, उद्या, परवा कधीतरी. नक्कीच जाईल.

पण

असा एक विषाणू आपल्याला लक्षातही येत नाहीये.  तो शिरतोय सगळीकडे.  प्रसार माध्यमातून, प्रचार माध्यमातून, निवडणूक प्रचारातून, शिमग्याच्या बोंबाबोंबीतून. कुणातरी दोघांच्या संभाषणातून, पुढाऱ्यांच्या भाषणातून,  कोणत्याही धर्माच्या धर्म प्रचारातून, उपदेशातून, निवडणुकीतून, राजकारणातून, गुंडगिरीतून आणि तथाकथित सभ्य माणसांच्या अंतर्मनाच्या गाभार्‍यातून. तो पसरतोय माणसा-माणसांच्या गप्पातून, छापील माध्यमातून, व्हाट्सअप मधून, फेसबुक मधून, किंवा जी जी काही समाज माध्यमे आहेत त्या सर्व माध्यमातून. तो फिरतोय, पसरतोय, झिरपतोय आणि माणसाचे जीवन कठिण करतोय. शांततेनं जगण्याच्या सर्व सोयी नष्ट करतोय.

यावर औषध नाही. लस नाही. एवढच नाही तर, यावर संशोधन करणाऱ्या संशोधकांचे खून होतायत. दिवसाढवळ्या खून होतायत.

मग नवीन  महामानव तरी जन्माला यावेत.  परंतु त्यांच्याही भ्रूणहत्या होत आहेत.  महामानव जन्मालाच येऊ नये म्हणून गर्भसंस्कारा पासूनच त्यांचं महात्म्य मारून टाकायचे प्रयत्न चालू असतात.

यावर उपाय शोधायला हवा, संशोधक निर्माण व्हावेत त्यांना संरक्षण मिळावे. अशी इच्छा धरण्याशिवाय आपल्या हातात काय आहे ?  परंतु आशा करूया यासाठी कोणतीही लस आणि औषध नसलं तरी लोकांची नैसर्गिक सहनशक्ती प्रचंड मोठी आहे.  ते वाट पाहतील कितीतरी वाट पाहतील त्यावरील उपायाची

किंवा

एका नव्या प्रेषिताची.

खरंच तो जन्म घेईल ? की या मानवजातीचा अंतच जवळ आला आहे ?  मानवाचं नष्टचर्य हे या नव्या विषाणूतच दडलं आहे का?

© श्री सुनील देशपांडे

पुणे, मो – 9657709640 ईमेल  : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… भाग – १९ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… भाग – १९ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

ब्रेक्स

माझं आणि सायकलचं नातं अतूट आहे. आजही मला काळ्याभोर डांबरी मोकळ्या रस्त्यावरून मस्त “बनके पंछी गाये प्यारका तराना… “असे नूतन फेम गीत गात बेभान सायकल चालवायला आवडेल. मस्त गार हवा, आजुबाजूची हिरवळ, निळे डोंगर… वाह! क्या बात है !!असो ! पण सध्या मी जीम मधेच सायकल चालवण्याचा आनंद घेत असते !

 ठाण्याचा कळवा पूल, पुलाखालून वाहणारी खाडी, जवळचे सेंट्रल मैदान, मैदानाच्या बाजूला प्रतिष्ठित लोकांसाठी असलेला क्लब जिथे टेबल टेनीस, बुद्धीबळ, पत्त्यातले रमी, ब्रिज असे खेळ, शिवाय क्लबची क्रिकेट टीमही होती जे मैदानात प्रोफेशनल क्रिकेट खेळत.. (आमच्यासारखं गल्ली क्रिकेट नव्हतं ते) ठाण्यातला एक उच्चभ्रू वर्ग ज्यात श्रीमान श्रीमती सदस्य असत. त्या क्लबविषयी मला खूपच कुतुहल असायचं. पण आम्ही वाढत असलेल्या बाळबोध संस्कृतीपासून तो वेगळा होता. तरीपण चुकारपणे मनात यायचं आयुष्यात कधीतरी आपण अशा हायफाय क्लबचे सदस्य होऊ.

 क्लबला लागून असलेलं तळं, तळ्याजवळचा सदैव सळसळणारा, गर्द हिरव्या पानांचा, भला मोठा पिंपळवृक्ष आणि बाजूचं शांत मंदिर. ( मंदिर बहुदा हनुमानाचं असावं. आता स्पष्टपणे आठवत नाही) पण ही सारी ठाण्यातली विशेषतः आमच्या घराजवळची ठळक ठिकाणे होती ज्यांच्याशी आमचं बालपण बांधलेलं होतं आणि आताही आहे. आता क्वचित कधी त्या परिसरात जायचा योग आला तरी मी त्या वातावरणातले माझे बालपणीचे क्षण नकळतपणे वेचत राहते. खूप काही तिथे बदललेलं असलं तरी आठवणींच्या खुणा मी शोधत राहते.

 धोबी गल्ली ते सेंट्रल मैदान दरम्यानचा रस्ताही मला चांगला आठवतोय. पहिल्या टप्प्यावर टेंभी नाका, डाव्या हाताला घुले यांचं मोठं चहा भजीचं काहीसं इराणी टाईप हॉटेल. तिथून पुढे चालत गेलं की आमची बारा नंबरची शाळा, पुढे डाव्या बाजूला गुरुद्वार, त्यानंतर जिल्हा न्यायालय आणि नंतरचा खारकर आळीकडे जाणारा चौक आणि मैदानाकडचा रस्ता. कितीतरी वेळा त्या रस्त्यावरून आम्ही सारे हातात हात घालून मजेत एकमेकांची टिंगल टवाळी करत चालत गेलेलो आहोत. थंडीच्या दिवसात वाटेवरच्या बुचाच्या झाडाखाली पडलेली असंख्य लांब देठाची, चार पाच पांढऱ्या पाकळ्यांची सुवासिक फुलं वेचून त्याचे गुच्छ करायचे आणि कुणाचा गुच्छ मोठा, कुणाचा लहान यावरूनही मस्करी चालायची.

 मैदानाच्या बाजूच्या त्या पिंपळवृक्षावर संध्याकाळच्या वेळी शेकडो वटवाघुळे उलटी लटकलेली असत आणि त्यांचे अविरत चिं चिं चित्कारणे चालू असायचे. तो नाद, मंदिरातली शांतता, मधूनच वाजणारी समोरच्या चर्चमधली घंटा आणि तळ्यातलं हिरवट, काळं, संथ पाणी.. या साऱ्यांमुळे एक गूढता त्या वातावरणात दाटलेली असायची. मैदानात भरपूर खेळून दमून गेल्यानंतर आम्ही सारे सवंगडी हळूहळू सरत चाललेल्या त्या संध्यासमयी मस्त पाय पसरून मैदानातल्या खुरट्या गवतावर आरामशीर बसलो की डोक्यावरचं ते मोकळं आभाळ आणि आभाळातल्या हळुहळू काळोखात बुडणाऱ्या निळ्या, जांभळ्या, केशरी, रंगाशी आमचा एक अनामिक संवाद चालायचा. चुकारपणे उगवलेल्या एकुलत्या एक चांदणीकडे पाहताना खूप पॉझिटिव्ह वाटायचं. त्यावेळी wishing star ही संकल्पना अवगत नव्हती पण त्या गूढतेत कसलीतरी शाश्वती वाटायची. खरं म्हणजे बालपणी शरीराच्या अंतःप्रवाहात त्यावेळी डचमळणारा हा भावनांचा डोह काय होता हे कळत नव्हतं पण खुरट्या गवतावर —खेळातली भरपूर मस्ती संपल्यानंतर पाय पसरून बसल्या नंतरची परस्परांमधली ही शांतता मला आठवते. मात्र नक्की या शांततेशी जुळलेलं नातं, त्याचं नाव हे काही कळत नव्हतं. बिनरंगाचं, बिनरेषांचं एक अनामिक चित्र मात्र असावं ते जे अजूनही मनातून पुसलेलं नाही म्हणून पुन्हा जेव्हा त्या आठवणीत मी रमते तेव्हा याच चित्राचे तेव्हा न कळलेले अर्थ आता उलगडत जातात.

 लिहिता लिहिता मी थोडी भरकटले पण खरा मुद्दा होता तो “मे” महिन्याच्या सुट्टीचा आणि सुट्टीतल्या खेळांच्या मुक्त आनंदाचा आणि माझ्या सायकल चालवण्याच्या भन्नाट छंदाचा. या सायकल सफारीशी माझ्या काही गमतीदार आठवणी जुडलेल्या आहेत.

 मे महिन्याची सुट्टी लागली की आम्ही गल्लीतली सगळी मुलं मुली सेंट्रल मैदानात भाड्याची सायकल फिरवत असू. एका तासाचे दोन आणे भाडं! पण तेही सहजासहजी मिळायचे नाहीत, त्यासाठी वडिलांना अडीचक्याचा पाढा तोंडपाठ म्हणून दाखवावा लागायचा… आता मुलांचे तीस पर्यंत तरी पाढे पाठ असतात की नाही कोण जाणे! तेव्हां कुठे होते कॅलक्युलेटर्स.. संगणक.. ?

तर माझ्या सायकल शिकण्याची गोष्ट अशी अडीचक्यापासून सुरु होते.. गल्लीतल्या मुलांनीच मला सायकल शिकवली. एक सवंगडी फार शहाणा होता. मला चिडवत म्हणाला, “तुला कधीही सायकल चालवता येणार नाही… तुला बॅलन्सींगचं तंत्रच कळत नाही. आणि तू भित्री भागुबाई आहेस. ” माझा इगो प्रचंड तुटला. मला भित्री म्हणतो? (आजही मला कुणी “भित्री” म्हटलेलं आवडत नाही. ) मग त्याला दाखवण्यासाठी मी मस्त डाव्या पेडलवर पाय ठेवून, थोडी गती घेऊन, उजवा पाय उचलून, त्याची मदत न घेता सायकलवर बसले आणि सुसाट निघाले. जिथे मैदान संपत होते. तिथे खड्डा होता. तो माझ्या मागून पळत येत होता, ओरडत होता.. ” मूर्ख !! ब्रेक्स लाव.. ब्रेक्स लाव… आपटशील ”.

सायकलसकट मी खड्ड्यात आपटले. भरपूर लागले. गुडघे फुटले. सायकलची चेन तुटली. मात्र माझ्या त्या सो काॅल्ड मित्राने मला काही फिल्म स्टाईल उचलून वगैरे खड्यातून बाहेर आणले नाही बरं का? तो मस्त खिदळतच राहिला. माझ्या डोळ्यातलं पाणी, संताप, अंगावरच्या जखमा या सार्‍यांनी कोलमडून गेलेली मी मित्राशी भांडत घरी आले. सायकल दुकानात परत करण्याचे काम तेव्हढे त्याने केले.

 सायकल आणि ही आठवण सतत हातात हात घालून असतात. मात्र या घटनेनेने मला दोन गोष्टी शिकवल्या. एक, मी सायकल चालवायला शिकले आणि दुसरी महत्वाची जी आयुष्याला उपयोगी पडली. योग्य बॅलन्सींग आणि योग्य वेळी अपघात टाळण्यासाठी ब्रेक्स लावणे. आयुष्य जगत असताना या “ब्रेक्स”चे महत्त्व फार जाणवले. असो.

नंतरच्या आयुष्यात इंजीनवाली दोन चाकी चारचाकी वाहने अनेक वर्षे चालवली. पण त्याहीवेळी जेव्हा, जिथे संधी मिळाली तेव्हा तिथे मनसोक्त सायकल चालवली. आजही मला ही इको फ्रेंडली सायकल रपेट करायला आवडेल.

पण या सगळ्यात महत्त्वाचे काय?… ब्रेक्स… हे विसरले नाही

 – क्रमशः भाग १. 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ – संकटे : अडथळा नाही.. संधी… – ☆ सौ. अलका ओमप्रकाश माळी ☆

सौ. अलका ओमप्रकाश माळी

🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆ – संकटे : अडथळा नाही.. संधी… – ☆ सौ. अलका ओमप्रकाश माळी ☆

 परमेश्वर संकटं अशाच व्यक्तीना देतो ज्यांच्यात त्या संकटांचा सामना करायची ताकत आहे.. त्याला खात्री आहे की कितीही वाईट परिस्थिती आली तरी तुम्ही त्यावर मात करू शकता, कोणत्याही बिकट प्रसंगातून ही स्वतःला सावरून योग्य मार्ग निवडू शकता ह्याची त्या ईश्वराला खात्री असते आणि म्हणूनच तो तुमच्या सोबत संकटांची मालिका सुरु करतो.. कोळशाला पैलू पाडले जात नाहीत तर तावून सुलाखून निघतो तो हिरा.. हिऱ्यावर पैलू पाडले जातात त्यालाच घाव सोसावे लागतात पण तरीही तो चमकतोच…! तसच आपलं ही आहे कितीही वाईट प्रसंग, संकट का येईना आपली नीतिमत्ता, स्वतःवरील विश्वास, परमेश्वरावरील श्रद्धा ह्याच्या जोरावर आपण मात करुच ही खात्री त्या विधात्याला ही असतेच आणि म्हणूनच तो आपली परिक्षा घेत असतो… सभोवती कितीही चिखल असला तरी कमळ निर्लेप, बेदाग राहतं, नाजूक राहतं.. गुलाबाला ही काटे सहन करावे लागतात, मोगरा, जाई, जुई, प्राजक्त ह्याना ही अल्प आयुष्य लाभतं पण त्यातही ते सभोवती सुगंधच पसरवतात.. ईश्वरचरणी अर्पित केली जातात…कागदी फुलं कितीही आकर्षक दिसली तरी ती ईश्वर चरणी नाही अर्पिली जाऊ शकतं.. संकटांचा सामना करणारे, त्यातून योग्य मार्ग काढणारेच ईश्वराचे खास असतात तो भलेही कठीण कठीण प्रसंग आणतं असेल तुमच्यावर पण तुमची साथ कधी सोडत नाही तो कोणत्या ना कोणत्या रुपात आपल्या पाठीशी असतोच असतो.. यश भलेही उशिरा मिळेल पण ते मिळवताना झालेल्या चुकांमधून आपण बरचं काही नकळत शिकत असतो.. होऊ देत चुका पण लढणं थांबवून परिक्षा अर्धवट सोडून देण्यापेक्षा चुका घडून त्यातून धडा घेणं महत्वाचं.. तेंव्हा संकटांची मालिका सुरु झाली की समजून जा आपण कोणी ऐरे गैरे नथु खैरे नाही आहोत तर आपण त्या ईश्वराचे खास आहोत तो आपल्या सदैव सोबत आहे आणि वादळ जरी त्यानेच आणलं असलं तरी आपल्याला पैलतीरी पण तोच नेणार आहे.. जो खुद्द परमेश्वराचा खास आहे त्याला संकटांची तमा बाळगण्याची गरजच काय ना… 

© सौ. अलका ओमप्रकाश माळी

मोब. 8149121976

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ सप्रेम नमस्कार…लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’ ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

? वाचताना वेचलेले ?

☆ सप्रेम नमस्कार…लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

सप्रेम नमस्कार….

मोगऱ्याचं फूल ओंजळीत घेतलं की त्याचा गंध मनाला, शरीराला प्रसन्न करून जातो. सहवासातील माणसाचं देखील असंच असतं. काही माणसं काही क्षणातचं मनाला खूप आवडतात, आपली होऊन जातात.

तर, काही कितीही सहवासात राहिली, तरी त्यांची आतून ओढ नसतेचं.

चेहरा बघण्यापेक्षा नेहमीचं समोरच्याच्या मनात उतरून बघावं. शोधूनही तिथं माणूसपण सापडत नसेल, तर त्याचं सुंदर दिसणंही मग किळसवाणं वाटतं.

शरीराची सुंदरता वयाबरोबर संपते, तर मनाची सुंदरता शेवटपर्यंत टिकून राहाते. शरीराला वय असतं, मनाला ते कधीच नसतं.

शेवटी काय…

आपण व्यक्तीच्या स्वभावाच्या प्रेमात असतो, शरीर तर निमित्त मात्र असतं.

माणसाच्या स्वभावात गोडवा, शालीनता, प्रामाणिकपणा आणि विनयशीलता असेल तर, त्याची काही क्षण जरी सोबत मिळाली तरी ती हवीहवीशी वाटते.

म्हणूनच बाहेर लक्ष दिव्याची सुंदर आरास असूनही, देवघरातील समईच्या तेजापुढं आपण नतमस्तक होतो.

आयुष्यात अशी माणसं कधी भेटली तर त्यांच्यावर जीवापाड प्रेम करावं.

आपल्या आवडत्या माणसाचं आपल्या सोबत असणं, ही आयुष्यातील सगळ्यात मोठी कमाई. ती प्रत्येकाच्या वाट्याला येतेचं असं नाही.

आजकाल अशी माणसं भेटतात तरी कुठे? नशिबानं कधी भेटलीचं तर हळुवार जतन करून ठेवावीत, कदाचित पुन्हा भेटतील न भेटतील?

हे मुद्दाम अशासाठी लिहिलं की अशा जवळच्या माणसांपैकी एक आहात.

आपलाच,

– – –

श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

थळ, अलिबाग

मो. – ८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ कर्णभूल – कवी : ग्रेस ☆ रसग्रहण.. सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? काव्यानंद ?

☆ कर्णभूल – कवी : ग्रेस ☆ रसग्रहण.. सौ राधिका भांडारकर ☆

माणिक सिताराम गोडघाटे म्हणजेच कवी ग्रेस (१० मे, १९३७ – २६ मार्च, २०१२).  साहित्य विश्वात  कवी ग्रेस हीच त्यांची खरी ओळख.  बा.सी. मर्ढेकरांनंतर नवकवींच्या दुसऱ्या पिढीतील प्रमुख कवींमध्ये त्यांची गणना होते.  ग्रेस यांच्या कवितेत एकप्रकारची दुर्बोधता जाणवते.  यावर त्यांचे उत्तर असायचे की,” मी जे काव्य करतो ते माझे स्वगत असते आणि स्वगतात भान नसते, बेभान व्हायचे असते. स्वगताला श्रोता नसतो.  मीच माझा फक्त असतो,”

असा हा एक मुक्त काहीसा कलंदर कवी.  ज्ञानाचे सोंग न करणारा, दुर्बोधतेत संदेश देणारा आणि त्याच वेळी सामाजिक भान ठेवणारा, शब्दकोषांना नवीन शब्द देणारा असा नामांकित कवी.

  संदिग्ध  घरांच्या ओळी

 आकाश ढवळतो वारा

 माझ्याच किनाऱ्यावरती

 *लाटांचा आज पहारा…*किंवा

 

 भय इथले संपत नाही

 मज तुझी आठवण येते अथवा

 

 मी महाकवी दुःखाचा, प्राचीन नदीपरी खोल

दगडाचे माझ्या हाती, वेगाने होते फुल

अशा कितीतरी ग्रेस यांच्या काव्यपंक्ती मनाला चिपकलेल्या आहेत.

नुकतीच मी त्यांची कर्णभूल ही कविता पुन्हा वाचली.  खूप वेळा वाचली. अर्थ शोधत शोधत वाचली आणि या कवितेत मला काहीतरी सापडलं आणि जे मला सापडलं ते तुमच्यापाशी बोलावं असं वाटलं म्हणून या कवितेचं रसग्रहण करण्याचा मी प्रयत्न करत आहे.

 सुरुवातीला आपण त्यांची कर्णभूल ही कविता संपूर्ण वाचूया.

☆ कर्णभूल – कवी : ग्रेस ☆

*

 त्याने दान मांडताना

तिची झोळी तपासली

चंद्र चांदण्याच्या खाली

होत्या वाळवीच्या साली

उभा राजवाडा लख्ख

शोधे जादूची बासरी

पट्टी डोळ्याची बांधून

कुठे पाहे ना गांधारी

*

चंद्र सूर्याची सावली

त्याचे सत्य हले डूले

स्वप्नसंगात सोडतो

कर्ण कवचकुंडले

ग्रेस

ही कविता वाचल्यावर पटकन जाणवते ते या कवितेत महाभारतातील घटनेचा आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या पात्रांचा उल्लेख आहे.  शिवाय कवितेच्या शीर्षकावरूनही प्रारंभी हाच बोध होतो.  कर्ण ही महाभारतातील उपेक्षित व्यक्ती पण तरीही बहुआयामी आणि आदरणीय. उपेक्षित असली तरी दुर्लक्षित नक्कीच नाही. कर्णाच्या मनातल्या भावभावनांचा प्रवाह कवीने या काव्यात एका विशिष्ट वैचारिकतेतून मांडला आहे असे वाटते.

 त्याने दान मांडताना

तिची झोळी तपासली

 चंद्र चांदण्यांच्या खाली

 होत्या वाळवीच्या साली…१

कुरुक्षेत्री  कौरव पांडव यांच्यात घनघोर युद्ध होणार आहे.  या युद्धातले खरे नायक म्हणजे धनुर्विद्यानिपुण अर्जुन आणि राजनीतिज्ञ  युगंधर कृष्ण.  युद्ध अटळ आहे.  कृष्णाची शिष्टाई असफल ठरली आहे.  फक्त एकच हुकुमाचे पान तेवढं बाकी आहे.  कर्णाच्या जन्माचे रहस्य  जे कुंतीने आजपर्यंत लपवून ठेवलंय. कुंती जाणून आहे की कर्ण हा अर्जुना इतकाच तोलामोलाचा योद्धा आहे.  पण तो शत्रुपक्षात असल्यामुळे तिला पांडवांच्या विजयाबद्दल कुठेतरी भय आहे आणि याच क्षणी कर्णाच्या दानशूर वृत्तीची जणू काही परीक्षा घेण्यासाठीच ती स्वतः कर्णाला युद्धापूर्वी भेटते आणि कर्णाच्या जन्माचे रहस्य त्याला सांगते आणि त्याचवेळी अर्जुनाच्या प्राणांचे दान मागते. थोडक्यात ती कर्णाला भावनिक आवाहन देते. (इमोशनल ब्लॅकमेलच करते म्हणाना!)

त्यावेळी कर्णाच्या अंतरात भावनांचं वादळ उठलं असणार.  मागितलेलं दान तर द्यायलाच हवं पण ते देण्याआधी त्याच्या मनात कुंतीविषयी नक्कीच करुणा उत्पन्न झाली असावी.

तिची झोळी तपासली या शब्दरचनेतून कवी ग्रेस जणू काही कर्णाचं मन मांडत आहेत.  कुंतीच्या अस्तित्वाचा विचार कर्णाच्या मनात येतो आणि त्याला जाणवतं की “या माऊलीच्या वाटेवर फक्त वरवरच चंद्र चांदण्यांची पखरण असल्यासारखी भासते पण प्रत्यक्षात मात्र तिच्या जीवनाला जणू काही व्यथांच्या  वाळवीनेच पोखरलेलं आहे. ती एक असहाय, दुःखात्मा आहे याच दृष्टीकोनातून कर्ण या भेटीच्या वेळी तिच्याकडे पहात असावा.  कुठली सुखे होती तिच्या जीवनात?  शापितच आयुष्य तिचे… पती-वियोग,  वनवास सारे सारे भोगले हिने.

या चरणात झोळी, वाळवी, हे कुंतीच्या दुःखासाठी योजलेले  प्रतिकात्मक शब्द आहेत आणि त्यातूनच तिचे करुणामय जीवन उलगडते.

 उभा राजवाडा लख्ख

 शोधे जादूची बासरी

 पट्टी डोळ्यांची बांधून

 कुठे पाहे ना गांधारी॥ २ ॥

या चरणामध्ये वाचकांपुढे येथे ती डोळ्याला पट्टी बांधून वावरणारी गांधारी. जशी कुंती तशीच गांधारी. दोघीही राजवाड्यात राहूनही  दुःखीच.  वास्तविक गांधारी म्हणजे हस्तीनापुरची महाराणी!  उभा राजवाडा लखलखतोय पण गांधारीच्या आयुष्यात साचलाय तो अंधार.. दाट काळोख! पातिव्रत्य सांभाळत अंध पतीसाठी तिनेही जीवनभर डोळ्यावर पट्टी बांधली आणि एका गुढ अंधारातच ती जगली.  आश्वासक असं तिच्याजवळ काय होतं?

शोधे जादूची बासरी  या शब्दरचनेतून कृष्ण दर्शन होते पण गांधारीला कुठे मिळाला कृष्णचरणी विसावा?  कृष्ण प्रेम हेही पांडवांसाठीच नित्य होते.  खरोखरच गांधारीच्या आयुष्याचे सारेच सूर हरवलेले होते.

 चंद्र सूर्याची सावली

 त्याचे सत्य हाले डुले

 स्वप्न संगात सोडतो

 कर्ण कवच कुंडले..॥३॥

हा शेवटचा चरणही  प्रतिकात्मक आहे. चंद्र, सूर्य, सावली ही यश अपयशाच्या अर्थाने वापरलेली रूपके असावीत आणि जेव्हा हा विचार मनात येतो तेव्हा अर्थातच कर्णाचा जीवनपट उभा राहतो.  आयुष्यभर सुतपुत्र म्हणूनच त्याची उपेक्षा झाली.  क्षत्रिय असूनही त्याच्या क्षात्रतेजाला योग्य ती मान्यता मिळाली नाही.  त्याच्या जन्माचे रहस्यही कुणी जाणण्याचा प्रयत्न केला नाही.  त्या वेळेच्या समाजासाठी तो एक परित्यक्त, सुतपुत्र, राधेय होता.  मात्र दुर्योधनाने चाणाक्षपणे त्याला मैत्रीचा हात दिला.  अंगद देशाचे राज्यपद ही दिले. आणि एक प्रकारे त्याच्या जीवनात शीतल सावली आणली.

त्याचे सत्य हाले डुले  यातला हाले  डुले  हा कवीने वापरलेला जोडशब्द फारच चपखल आहे.  सत्य कुणालाच कळले नाही आणि जो काही मानसन्मान मित्र दुर्योधनाकडून कर्णाला मिळाला होता त्यातलाही आनंद परिपूर्ण नव्हता. जीवनात अनेक चढ —उतार, खड्डे, यश अपयश, अवहेलना याचा सामना कर्णाला करावा लागला होता.

दाता, दानशूर  म्हणून त्याचा लौकिक होता.   जगाला दान देण्याचं एक समाधानयुक्त स्वप्न तो पूर्ण करत असतानाच,  कुरुक्षेत्री युद्ध सुरू होण्यापूर्वी साक्षात इंद्र  कर्णापुढे उभा राहतो आणि कर्णाला मिळालेली जन्मजात कवच कुंडले दान म्हणून मागतो.  कर्णाच्या जीवनातला अत्यंत कसोटीचा क्षण पण इंद्राला कवच कुंडले अर्पण करून तिथेही कर्ण दात्याचा धर्म अक्षरशः पाळतो. नियती ही नेहमीच कर्णाच्या विरोधात राहिली. अर्थात यामध्ये स्वप्न, धर्म आणि समाधान यांच्या बदल्यात कर्ण एक प्रकारे युद्धाच्या प्रारंभीच स्वतःचे बलिदान जणू काही मान्य करतो.

हे  तीनही चरण वाचल्यानंतर मनात अनंत प्रश्न उभे राहतात.  कवी ग्रेसच्या काव्याचं वैशिष्ट्य हेच आहे की काव्यातलं अव्यक्त जे आहे ते वाचकाने स्वजाणिवेतून जाणावे.  प्रथम वाचकांचं मन घुटमळतं ते शीर्षकाभवती. 

कर्णभूल

कर्णाची चूक असा अर्थ घेतला तर मनात येते..  काय चूक होती कर्णाची किंवा कोणती चूक कर्णाने केली? दुर्योधनासारख्या अधर्मी पक्षासाठी त्याने का आपले जीवन व्यर्थ घालवले? त्याचवेळी कर्णभूल या शब्दरचनेतले इतर अनेक रंग, अनेक अर्थ आणि अनेक दृष्टिकोन उलगडण्यातच वाचकांचे मन गुंतून राहतं.

कर्णभूल याचा दुसरा अर्थ असाही असू शकतो की कर्णाला समजून घेण्यामध्ये इतरांची झालेली चूक.   कर्णाला कुणीच समजून घेतले नाही का?

कुंती, गांधारी आणि कर्ण हे मग समदु:खी जाणवायला लागतात.  तसेच कवीच्या मनातल्या,  या पात्रांनी केलेल्या चुका वाचकांपुढे सुस्पष्ट होऊ लागतात.

का कुंतीने  कर्णाच्या जन्माचे रहस्य दडवून ठेवले?

का गांधारीने केवळ संकेताच्या मागे जाऊन डोळ्यावर पट्टी बांधली?  कदाचित गांधारी दृष्टी घेऊन वावरली असती तर महाभारत वेगळे झाले असते का?

का कर्णाने मैत्रीच्या वचनाखातर दुर्योधनाची अनिती दुर्लक्षित केली?

या विचारांती  हे संपूर्ण तीनच कडव्यांचं लहानसं वाटणारं काव्य डोंगराएवढा अर्थ घेऊन आपल्यासमोर खळाळतं. या काव्याच्या आणि त्यातल्या ओळखीच्या पात्रांच्या माध्यमातून कवी ग्रेसना वेगळंच काहीतरी सांगायचं आहे का?

कुंती, गांधारी, कर्ण यांची जीवनेही मग प्रतिकात्मक वाटू लागतात.  मानवी जीवनाशी यांचा संदर्भ जुळवताना वाटते, अखेर सत्य एकच… चुकीचा कुठलाही मार्ग यशाच्या दिशेने जात नाही.  चूक छोटी किंवा मोठी नसतेच.  चूक ही चूकच असते आणि त्यांचे अंतिम परिणाम हे नकारात्मक असतात आणि हेच सत्य कदाचित ग्रेस ना महाभारतातील या पात्रांद्वारे जगापुढे मांडायचे असतील…

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print