मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… भाग – ३ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… भाग – ३ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टूडे)

शाळा नंबर १२

रॉबर्ट ब्रेक एकदा म्हणाला होता, 

“I FEEL I WANT TO GO BACK IN TIME,NOT TO CHANGE THINGS BUT TO FEEL A COUPLE OF THINGS TWICE…

I WISH I COULD GO BACK TO SCHOOL NOT TO BECOME A CHILD BUT TO SPEND  MORE TIME WITH THOSE FRIENDS,I NEVER MET AFTER SCHOOL.”

माझं अगदी असंच काहीसं झालेलं आहे.

आम्ही मुलं नगरपालिकेच्या शाळेत शिकलो.  म्हणजे माझं प्राथमिक पहिली ते चौथीपर्यंत शिक्षण नगरपालिकेच्या शाळेत झालं. माझ्या शाळेचे नाव शाळा नंबर १२.  घरापासून अगदी जवळच आमची शाळा होती.  माझ्या काही बालमैत्रिणी शाळा नंबर चार मध्ये जात तर मुलगे दगडी शाळेत जात. आमची शाळा फक्त मुलींची होती. शाळेची अशी नावं आठवली तरी आता गंमत वाटते. लिटिल मिलेनियम स्कूल, ब्लूमिंग पेटल्स, किडझी. स्माईल अशी आकर्षक नावं असलेल्या शाळा तेव्हा नव्हत्याच.  नर्सरी, प्लेग्रुप्स यांची ओळखही नव्हती म्हणजे शिशुविहार, बालक मंदिर वगैरे सारखे काही खासगी शैक्षणिक समूह होते पण आमच्या शिक्षणाची सुरुवात मात्र शाळा नंबर १२ या नगरपालिकेच्या शाळेपासूनच झाली.

त्यावेळी ठाण्यात एक कॉन्व्हेंट स्कूल होतं. सेंट जॉन द बाप्टीस्ट हायस्कूल पण मला वाटतं आमची पालक मंडळी मराठी भाषेचा जाज्वल्य अभिमान बाळगणारी होती.  आपल्या मुलांचं शिक्षण हे मातृभाषेतूनच झालं पाहिजे याच विचारांची होती.  कदाचित आपल्या मुलांना एखाद्या मिशनरी इंग्रजी माध्यमाच्या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये का पाठवू नये असा विचारही त्यांच्या मनाला तेव्हा शिवला नसेल आणि आमच्या बालमनावरही नगरपालिकांच्या शाळांतून मिळणारं  शिक्षण हेच खरं शिक्षण असा काहीतरी विचार पक्का केला असावा आणि त्यावेळी आमचा जो मराठी माणसांचा एक गट होता त्यातली सगळीच मुलं मराठी आणि नगरपालिकांच्या शाळेतून शिकत होती. त्यामुळे याहून काहीतरी उच्च, दर्जेदार असू शकतं हा विचार त्यावेळेच्या मुलांच्या मनात कशाला येईल?  मात्र काही अमराठी मुलं आमच्या परिसरात होती आणि ती मात्र कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिक्षण घेत होती. याचा परिणाम असा झाला की   नकळतच इंग्लिश माध्यमातून शिकणारी मुलं आणि मराठी माध्यमातून शिकणारी  मुलं यांच्यात संस्कृतीच्या  भिंती त्यावेळी निर्माण झाल्या. या भिंती थेट महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत टिकल्या.

टेंभी नाक्यावर टाऊन हॉल समोर बारा नंबर शाळेची इमारत होती. ब्रिटिश कालीन दगडी इमारत होती ती! शाळेला मागचं— पुढचं अशी दोन प्रवेशद्वारे होती. मागच्या बाजूला पटांगण होतं आणि ते रस्त्याला लागून होतं पुढचे प्रवेशद्वार हे मुख्य द्वार होते आणि नऊ दहा लांबलचक अशा दगडी पायऱ्या चढून आमचा शाळेच्या मधल्या आवारात प्रवेश व्हायचा आणि त्याच्या डाव्या उजव्या बाजूला वर्ग होते.

शाळेच्या समोर चाळ वजा घरे होती. अडचणीची, खडबडीत बोळातली आणि अरुंद घरात दाटीवाटीने राहणारी, खालून पाणी भरणारी, भाजीपाला किराणाच्या पिशव्या सांभाळणारी, सायकलवरून कामाच्या ठिकाणी जाणारी, जीवनाची दहा टोकं एकमेकांशी जुळवण्यासाठी अहोरात्र कष्ट करणारी माणसं होती ती. वयाच्या सहाव्या वर्षापासून डोक्यात बसलेलं हे जीवन आज इतकी वर्ष झाली, स्वतःच्याच आयुष्यात इतकी स्थित्यंतरे झाली. एका उजळ वाटेवरून प्रवास होत गेला तरीही ही चित्रं पुसली गेली नाहीत.

बारा नंबर शाळेच्या त्या दगडी पायऱ्यांवर दहा मिनिटाच्या आणि अर्ध्या तासाच्या सुट्टीत बालमैत्रिणींसोबत केलेल्या गप्पा,  गायलेली बडबड गीते आणि चवीने चोखत खाल्लेली आंबट चिंबट चिंचा बोरं, एकमेकांना दिलेली सोनचाफ्याची फुलं आजही आठवतात. 

एक छोटसं दफ्तर… शाळेत जाताना आईच  दफ्तर भरायची.  त्यात एखादं पाठ्यपुस्तक, काळी दगडी पाटी आणि पेन्सिल आणि मधल्या सुट्टीत खायचा डबा एवढेच सामान शाळेसाठी आम्हाला पुरायचं.  आमच्या शालेय जीवनाचं नातं होतं पाटी— पेन्सिल, खडू —फळा आणि बुटके लांबलचक वर्गात बसायचे बाक यांच्याशी.

एकेका वर्गाच्या अ ब क ड अशा तुकड्या असायच्या.”अ तुकडीतली  मुलं हुशार आणि “ड” तुकडीतली मुलं ढ!

 “ढ” हे अक्षर मला तेव्हा फार त्रासदायकच वाटायचं कारण “ढ” या अक्षराला माझ्या मते फारशी चांगली पार्श्वभूमी नसताना माझे आडनाव मात्र ढगे  होतं.

एक दिवस वर्णमाला शिकत असताना बाई सांगत होत्या “क कमळातला …

“ख”  खटार्‍यातला ..

“ग”  गडूतला ..

असं करत करत त्या “ढ”जवळ आल्या आणि माझ्या शेजारी बसलेली रत्ना पेडणेकर नावाची मुलगी मोठ्याने म्हणाली “ढ” ढगेतला.

सगळा बालचमु  हसला.  माझे डोळे पाण्याने भरले.

बाईंनी मात्र रत्नाला हात पुढे करायला सांगितला आणि तिच्या हातावर सपकन छडी मारली.  तिचेही डोळे गळू लागले आणि त्याचेही मला फार वाईट वाटले. पण त्यानंतर  मी आणि रत्ना एकमेकींच्या जीवाभावाच्या मैत्रिणी झालो हे नवल नाही का?  यालाच मी आमचे बालविश्व म्हणेन.

मात्र त्यादिवशी शाळेतून घरी परतल्यावर मी— संध्याकाळी पप्पा ऑफिसमधून घरी आल्यावर त्यांना पहिला प्रश्न विचारला होता,

“ आपण आपलं आडनाव बदलू शकतो का?”

त्यावेळी पपा मिस्कीलपणे म्हणाले होते..

“म्हैसधुणे,धटींगण,झोटींग असे आपले  आडनाव असते तर..”

शेक्सपियर म्हणतो नावात काय आहे? मला आजही असं वाटतं नावात खूप काही असतं. सहज आठवलं म्हणून सांगते वरपरीक्षेच्या त्या अप्रिय काळात माझ्या कन्येने “टकले” नावाच्या सर्वगुणसंपन्र स्थळाला केवळ आडनावापायी नकार दिला होता.असो..

रत्ना  पेडणेकर ही ठाण्यातल्या एका मोठ्या कलाकाराची मुलगी होती. सिव्हील हॉस्पिटलच्या समोर त्यांचा सुंदर बंगला होता.  गणपती उत्सवात तिचे वडील गणेश मूर्ती समोर अतिशय कलात्मक असे पौराणिक  कथांवर आधारित  देखावे  उभे करायचे आणि ठाण्यातली सगळी मंडळी पेडणेकर यांचा गणपती बघण्यासाठी त्यांच्या बंगल्यासमोर प्रचंड गर्दी करायचे.

अशा घरातली ही रत्ना  शाळा नंबर १२ मध्ये टांग्याने यायची. सुरेख इस्त्री केलेले तिचे फ्रॉक्स असायचे. तिच्या वडिलांचा ठाण्यात दबदबा होता.  हे सांगण्याचे कारण इतकंच की असे असतानाही तिने केलेल्या एका किरकोळ चुकीलाही बाईंनी थोडेसे हिंसक शासन केले पण तिच्या वडिलांनी शाळेत येऊन कुठल्याही प्रकारची तक्रार केली नाही. एकदा आपलं मूल शाळेत गेलं की ते शिक्षकांचं. तिथे हस्तक्षेप नसायचा हे महत्त्वाचं. त्यामुळे घर, शाळा, आजुबाजूची वस्ती ही सारीच आमची संस्कार मंदिरे होती. आम्ही सारे असे घडलो. नकळत, विना तक्रार.

१२ ते ५ अशी शाळेची वेळ होती. एक दहा मिनिटांची सुट्टी आणि एक डबा खायची सुट्टी.

सगळे वर्ग एका शेजारी एक. मध्ये भिंत नाही फक्त एक लाकडी दुभाजक असायचा.  वर्ग चालू असताना शेजारच्या वर्गातल्या बाईंचा आवाज आणि शिकवणंही ऐकू यायचं.  कुठे गणितातले पाढे, कुठे कविता पठण, कुठे उत्तर दक्षिण दिशांचा अभ्यास, कुठे बाराखड्या, तोंडी गणितं आणि अशा सगळ्या खिचडी अभ्यासातून आम्ही एकाग्र चित्ताने शिकत होतो.

“आईने आणssले चाssर पेरू.

माधवने दोन चोरून खाल्ले. किती उरलेsss?

आम्ही आमच्या हाताची चार बालबोटं उघडायचो, दोन दुमडायचो आणि एक साथ उत्तर द्यायचचो

दोssन.

मग बाई म्हणायच्या, “शाब्बास!”

आयुष्यातल्या बेरजा, वजाबाक्या, गुणाकार, भागाकार या साऱ्यांची सुरुवात जणू काही अदृश्यपणे या शाळा नंबर १२ पासूनच सुरू झाली.

आज नातीचा अभ्यास घेताना लॅपटॉप,टॅब्लेट(यास मी अधुनिक युगातली पाटी असेच म्हणते.) त्यावरचे अभ्यासक्रम, उत्तरे देण्याची पद्धत, आकर्षक पुस्तके, त्यातील रंगीत चित्रे! एकंदरच दृक् श्राव्य अभ्यासाचं बदलतं, नवं,स्वरूप बघताना मला माझी बारा नंबरची शाळा हमखास आठवते.

पण इथेच आम्ही शिकलो, वाढलो घडलो.

आजही नजरेसमोर ते फुलपाखरू बागडतं,

“फुलपाखरू छान किती दिसते फुलपाखरू ..”

नाही तर 

“देवा तुझे किती सुंदर आकाश

सुंदर प्रकाश सूर्य देतो ।”

ये ग ये ग सरी 

माझे मडके भरी 

सर आली धावून

मडके गेले वाहून 

 

सरसर गोविंदा येतो 

मजवरी गुलाल फेकि.तो…

 

झिम पोरी झिम कपाळाचा भीम

भीम गेला फुटून

पोरी आल्या उठून..

 

अडम तडम तडतड बाजा

उक्का तिक्का लेशमास

करवंद डाळिंब फुल्ला…

 

लहान माझी बाहुली

मोठी तिची सावली…

अशा  सुंदर गाण्यातून खरोखरच आमचं बालपण हसलं, बागडलं.

मला जर आज कोणी प्रश्न विचारला,” मराठी भाषेनं तुला काय दिलं तर मी नक्की सांगेन माझ्या  मराठी भाषेने मला असं सुंदर काव्यमय बालपण दिलं.”

आजही त्या शाळेतल्या दफ्तराची मला आठवण येते.  माझं दफ्तर आणि माझी आई यांच्याशी माझं एक सुंदर, भावनिक अतूट नातं आहे.

आठवणीच्या पेटीत

एक दफ्तर होतं

एक पाटी होती

दफ्तर जागोजागी

ऊसवलं होतं

पाटीही फुटली होती.

पण पाटीवरची अक्षरं

नव्हती पुसली.

कळायला लागेपर्यंत

आईने रोज

पाटी दफ्तर भरलं

वह्या पुस्तकं,खडु पेन्सीली..

आज आई नाही

पण दफ्तर आहे

पाटी फुटली

तरी अक्षरे आहेत

त्या जीर्ण दफ्तरावर आता

माझाच सुरकुतलेला

हात फिरवताना वाटतं,

हेच तर आईनं

दिलेलं संचीत.

वेळोवेळी तिने

हव्या असलेल्या गोष्टी

आत भरल्या.

नको असलेल्या काढल्या.

हळुच….ऊसवलेल्या ,

दफ्तरात डोकावून पाह्यलं,

त्यात नव्हते मानअपमान,

दु:खं ,निराशा, राग,

होतं फक्त समाधान,

आनंद….तृप्ती!!

एकेका अक्षरात ,

जपून ठेवलेला…

मानवतेचा ओलावा….

 

खरंच या साऱ्या आठवणींच्या लाटेवर मी तरंगतच राहिले की… आता थोडा ब्रेक घेऊया.

 

शाळेची घंटा घणघण वाजली

दहा मिनिटांची सुट्टी झाली…

–  क्रमशः भाग ३. 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ गुरुपौर्णिमेनिमित्त… ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? मनमंजुषेतून ?

☆ गुरुपौर्णिमेनिमित्त… ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

गुरुपौर्णिमेनिमित्त अनेकांचे संदेश आले – काही वैयक्तिक तर काही समूहांमधून. खूप बरे वाटले. व्हॅलेंटाइन दिवस, १ जानेवारीला नव वर्ष मानणे, Thanksgiving day, अशा पाश्चिमात्य रुढीत नव्या पिढीला आपल्या येथील पवित्र दिवसांची आठवण राहिली याचे निश्चितच कौतुक वाटले.
तरीही …

हो, तरीही एका गोष्टीचे निश्चितच वैषम्य वाटले.

गुरुपौर्णिमा हा पवित्र दिवस गुरूला नमस्कार करून त्याच्याकडे आशीर्वादाची याचना करण्याचा! तथापि, आलेल्या बऱ्याच संदेशांवर अजूनही पाश्चिमात्य पगडा दिसत होता. काही संदेश Happy Gurupornima असे होते तर काही गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देणारे होते; गुरूला नमस्कार किंवा वंदन करणारे संदेश तुरळकच होते.
हेच इतरही सणांच्या आणि पवित्र दिवसांच्या वेळी घडते. ज्या त्या दिवसाचे महत्त्व लक्षात घेऊन त्यानुसार उचित संदेश पाठवायला पुढच्या पिढीला शिकविणे हे आधीच्या पिढीचे कर्तव्य आहे. आपला धर्म आणि संस्कृती टिकविण्यासाठी हे अभियान अंगीकारलेच पाहिजे ना!

© डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ इतिहास पंढरपूर वारीचा – लेखक :अज्ञात  ☆ प्रस्तुती – सौ.अस्मिता इनामदार ☆

सौ.अस्मिता इनामदार

? इंद्रधनुष्य ?

☆  इतिहास पंढरपूर वारीचा – लेखक :अज्ञात ☆ प्रस्तुती  – सौ.अस्मिता इनामदार ☆

“…आणि म्हणून पंढरीची वारी पंढरीत !” गडबडू नका, बरोबर वाचलंत !

वर्षानुवर्षे, पिढ्यानपिढ्या चालत आलेली पंढरीची वारी कधीच चुकू नये हि वारकऱ्यांची भावना असते. अगदी जीवाचा आटापिटा करून तिथपर्यंत जाण्याची ओढ , तळमळ ! कधी एकदा पंढरीला जातो आणि पांडुरंगाचं दर्शन घेतो हि भावना मानस साद घालत असते.

वारकरी संप्रदायाच्या म्हणजे ओघानेच महाराष्ट्राच्या इतिहासात एक अभूतपूर्व घटना घडली आणि त्यामुळे वारी अर्धवट होण्याचा प्रसंग वारकऱ्यांवर ओढवला. घटना होती इसवीसन १५०८ ते १५११ दरम्यानची. विजयनगर साम्राज्याच्या राजाने पंढरपूरच्या पांडुरंगाची मूर्ती त्याच्या राज्यात अनागोंदी (सध्याचे नाव हंपी) येथे नेली. आषाढी वारीसाठी वारकरी पंढरीत दाखल झाले परंतु ज्याच्या दर्शनासाठी आपण इथवर आलो आहोत तोच पांडुरंग जागेवर नाही हे पाहून सारेजण आलाप करू लागले. परंतु राजाच्या शक्तीसमोर कोणाचे काय चालणार ? सर्व भाविकांनी पांडुरंगाचे निस्सीम भक्त श्रीसंत भानुदास महाराजांना हे कार्य पूर्ण करण्याची विनंती केली. भानुदासांच्या घराण्यात पंढरीची वारी पिढ्यानपिढ्या चालत आलेली होती. पांडुरंगाच्या दर्शनाचा ध्यास त्यांनाही होताच. त्यांनी पुढाकार घेतला आणि दर कोस दर मुक्काम करीत ते हंपीस पोचले. एके रात्री पांडुरंगाच्या मंदिराजवळ गेल्यावर सैनिकांच्या कड्या बंदोबस्तात कुलूपबंद गाभाऱ्यात पांडुरंगाची मनोहर मूर्ती विराजमान होती. दरवाजास स्पर्श करताच कुलुपे गळाली व सैनिकांना झोप लागली. भानुदास महाराज मूर्तीसमोर जाऊन उभे राहिले. म्हटले देवा, ” अरे सगळे भक्त तुझी पंढरीत वाट पाहत आहेत आणि तू येथे आलास ? तुला येथे सर्व राजोपचार प्राप्त होतील परंतु पंढरीत प्राप्त होणाऱ्या भक्तांच्या भक्ति प्रेमास तू मुकशील. चल माझ्या समवेत !” दोघांचा काही संवाद झाल्यानंतर भगवंताने आपल्या गळ्यातील तुळशीचा हार भानुदास महाराजांच्या गळ्यात घातला. बरोबरीने नवरत्नांचा एक हारही त्यांच्या गळ्यात घातला. महाराज बाहेर पडले. परिस्थिती पूर्ववत झाली. सकाळी राजा काकडआरतीस आल्यानंतर त्याच्या लक्षात आले कि देवाच्या गळ्यातील नवरत्नांचा हार गायब झाला आहे. शोधाशोध सुरु झाली. राजाने फर्मान सोडले कि, जो कोणी चोर असेल त्याला सुळावर चढवा. पहाटे तुंगभद्रा नदीच्या तीरावर भानुदास महाराज स्नान-संध्या करीत असताना त्यांच्या गळ्यात असलेला नवरत्नांचा हार चमकला. चोर सापडला या भावनेने राजाज्ञेप्रमाणे भानुदास महाराजांना सुळावर देण्याचे नियोजन झाले. परंतु चमत्कार झाला.

कोरडीये काष्ठी अंकुर फुटले ! येणे येथे झाले विठोबाचे !!

सुळाला पालवी फुटली. बातमी राजापर्यंत गेली. पांडुरंगाच्या नियोजनानुसार त्याच्या भक्ताचा छळ झाल्यास तेथे क्षणभरही राहायचे नाही याप्रमाणे पांडुरंगाने अंगुष्ठ एवढे रूप धारण केले व संत भानुदास महाराजांच्या पडशीत बसले. दोघेही पंढरीच्या दिशेने निघाले. पंढरीच्या वेशीजवळ आल्यानंतर वारकर्यांना संत भानुदास महाराजांनी पांडुरंगास आणल्याची शुभवार्ता कळली. दोघांच्याही स्वागतासाठी रथ सज्ज झाला. वारकऱ्यांचा आनंद गगनात मावेना, ” पुंडलिक वरदा हरिविठ्ठल ” च्या गजराने पंढरी दुमदुमली. वारकरी दिंडी घेऊन दोघांना घेण्यासाठी तिथपर्यंत आले. पुष्पवृष्टी झाली. स्थानिकांनी सडासारवण केले. सुवासिनींनी पायघड्या घातल्या, ओवाळले. वेशीजवळ आल्यानंतर पांडुरंगाने आपले मूळ रूप धारण केले. पांडुरंग पंढरीत आले तो दिवस होता कार्तिकी एकादशीचा ! पांडुरंगाने पुन्हा येथून बाहेर जाऊ नये यासाठी भाविकांच्या विनंतीवरून संत भानुदास महाराजांच्या हस्ते प्रदक्षिणा मार्गावरील काळ्या मारुतीची स्थापना करण्यात आली. मंदिरात गेल्यानंतर सोबत भानुदास महाराजांच्या हस्तेच पांडुरंगाची पुनर्स्थापना करण्यात आली. पांडुरंगाने भानुदास महाराजांना आशीर्वादरूपी दोन वर दिले कि, ” तुझ्या वंशात मी जन्म घेईन व तू अखंड माझ्याजवळच असशील.”  त्याप्रमाणे संत भानुदास महाराजांचे पुत्र चक्रपाणि त्यांचे पुत्र सूर्यनारायण व त्यांचे पुत्र म्हणजेच शांतिब्रम्ह संत एकनाथ महाराज होय. अर्थात संत एकनाथ महाराज हे संत भानुदास महाराजांचे पणतू होय. दुसऱ्या वरा प्रमाणे आजही संत भानुदास महाराज हे पांडुरंगाच्या जवळच आहेत. गाभाऱ्यातून बाहेर पडले कि चार खांबी मंडप लागतो. त्याच्या बाहेर पडले कि सोळा खांबांचा मंडप लागतो त्यास सोळखांबी मंडप असे संबोधण्यात येते. त्याच्या डाव्या हातास पहिली ती संत भानुदास महाराजांची समाधी होय. संत भानुदास महाराजांनी आषाढ शुद्ध १४ या तिथीस समाधी घेतली. आजही त्या ठिकाणी परंपरेने त्यांच्या वंशजांच्या हस्ते पूजाअर्चा आदींद्वारे त्यांचा समाधी सोहळा साजरा करण्यात येतो. तसेच या तिथीचे स्मरण म्हणून कार्तिकी एकादशीस रथोत्सव साजरा करण्यात येतो.

संत भानुदास महाराजांच्या भक्ती आणि कर्तृत्त्वाचे फळ म्हणजे आज पांडुरंगाचे दर्शन आपणांस पंढरीत होत आहे. म्हणूनंच आजही पंढरपूरला जाऊन आपण वारी करतो. नसता ‘हंपीची वारी’ करावी लागली असती. संत ज्ञानेश्वरादिक संतांनी पंढरीचा जो महिमा लिहिला आहे तो गाता आला नसता. संत एकनाथ व संत तुकारामांना पंढरीपर अभंग लिहिता आले नसते. धन्य ते संत भानुदास आणि धन्य त्यांची भक्ती कि ज्यांच्यामुळे आज आपण पंढरपुरात पांडुरंगाचे दर्शन घेत आहोत. आजही ज्याठिकाणी हंपीच्या विठ्ठल मंदिरात पांडुरंगास स्थापित केले होते त्या ठिकाणी गाभाऱ्यात पांडुरंग नाहीये. तेथे एक खाच दिसते कि ज्यात पांडुरंगाची मूर्ती विराजमान करण्यात आली होती.

हा इतिहास ८०% भाविकांना माहित नाहीये. 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : अस्मिता इनामदार 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ आजी आणि व्हाट्सअप : सुखांतिका की शोकांतिका ? – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) ☆

सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ आजी आणि व्हाट्सअप : सुखांतिका की शोकांतिका ? – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) 

आजीला गाव सोडून कुठेही जाण्याची इच्छा होत नसे. शेतीवाडीत तिचे मन रमत असे. मुलगा शहरात एका कंपनीत मोठ्या हुद्द्यावर होता. त्याचा अनेक दिवसांपासून आग्रह होता, “आई, इकडे येऊन रहा. सध्या शाळेला सुट्टी आहे. मुलं पण विचारत असतात आजी कधी येणार आहे.” तिलाही नातवंडांना भेटण्याची इच्छा होती. आठ दिवसांसाठी येईन असे मुलाला कळवले. रविवार असल्यामुळे सर्वजण एकत्र भेटीला म्हणून शनिवारी रात्री उशीरा आजी मुलाकडे आली.

रविवारी सकाळी उठल्यावर आजीला प्रत्येकजण वेगवेगळ्या रूममध्ये असल्याचे दिसले. मोबाईलवर स्क्रोलिंग करत लोळत पडलेली 10 वर्षांची पिंकी आजीला बघताच ‘हाय आजी’ चित्कारली. मोबाईलमध्ये डोके घालून बसलेल्या 7 वर्षाच्या पिंटूने आजीला हाय केले. आजीने दोघांनाही जवळ घेतले व नाश्त्याला काय करू असे विचारले. पिंकीने चौघांच्या व्हाट्सऍप ग्रुपवर आजीचे म्हणणे सेंड केले. झोमॅटोने मागवून घेऊया असा आईचा मेसेज आला. ‘मला सिझलर पाहिजे’ पिंट्याने मेसेज पाठवला. पिंकीने मेसेजवर बर्गरची ऑर्डर दिली. आईने सिझलर, बर्गर व त्यांच्यासाठी पोहे व शिरा यांची ऑर्डर प्लेस केली. पंधरा मिनिटांनी नाश्ता आला. सगळं कसं सुरळीत व शांतपणे पार पडल्याचं बघून आजी आश्चर्यचकित झाली.

मुलाने अमॅझॉनवरून नवीन मोबाईल मागवला. पिंकीने नवीन सिम कार्ड मोबाईलमध्ये टाकले व आजीला ग्रुपमध्ये ऍड केले. तिने आजीला मेसेज वाचणे, त्याला रिप्लाय देणे, ई.फंक्शनस समजून सांगितली. एका दिवसात आजी सर्व फंक्शन शिकली व प्ले स्टोअरमधून आवश्यक असलेली ऍप्स डाउनलोड केली. मुलाने आईची भेट घेऊन म्हटले, “आई तुला काही हवे असल्यास ग्रुपवर मेसेज टाकत जा. आम्ही सर्वजण तूझ्या सेवेला हजर आहोत.”

अशा प्रकारची पुनरावृत्ती रोजच होऊ लागली. दिवसभरात सर्वांच्या गाठीभेटी क्वचितच होत असे. खरे तर तिला मुलांच्या सहवासात राहायचे होते. परंतु सर्वजण मोबाईलवर बोलत असत म्हणून तिनेही ही सवय लावून घेतली. फारसे बोलणे नाही म्हणून वाद विवाद नाहीत, त्यामुळे आजी मनोमन सुखावली. वर्क फ्रॉम होम असल्यामुळे मुलगा व सून दिवसभर लॅपटॉपवर काम करत असत. रोज नातवंडांचे गुड मॉर्निंग, गुड नाईटचे मेसेज बघून आजी भांबावून जात असे. जसे काही नियतीने ठरवून दिल्याप्रमाणे सर्व काही यंत्रवत चाललं होतं. आठ दिवसात आजी या यांत्रिक जीवनाला कंटाळली व परत गावी जाण्याचे ठरवले.

आजीने ग्रुपवर ‘मी उद्या जाणार आहे’ असा मेसेज टाकला. सर्वांनी आजीला मोबाईलवर प्रवासाच्या शुभेच्छा दिल्या.  सुनेने आईला पुढील वेळेस आल्यावर महिनाभर रहा असा मेसेज पाठवला. मुलाने मोबाईलवर ई-तिकीट पाठवले. पिंकीने आजी सकाळी लवकर जाणार म्हणून उबेर टॅक्सी बुक केली. निघताना मुलांनी आजीच्या मोबाईलवर मेसेज पाठवला, “बाय आजी, तु गेल्यावर आम्हाला करमणार नाही. लवकर परत ये.” तत्पूर्वी पिंकीने आजीचा मोबाईल घेऊन तिचे लाईव्ह लोकेशन स्वतःच्या मोबाईलवर सेंड केले. तेच लोकेशन तिने बाबांना फॉरवर्ड केले. आजीचे मन कृतककोपाने भरून आले.

आजी निघाली म्हटल्यावर प्रथमच मुले आजीला येऊन बिलगली. आजीने आपले अश्रू आवरले. टॅक्सीत बसल्यानंतर आजीने मुलाला व सुनेला आशीर्वादाचा ईमोजी पाठवला. पिंकी आणि पिंटूला 501 रुपयांचा गुगल पे केला. टॅक्सी ड्रायव्हरला प्लॅटफॉर्म क्र. दोनच्या गेटवर सोड असा मेसेज पाठवला. मागच्या सीटवर आजीने हताशपणे डोळे मिटले. काही वेळाने ड्रायव्हरचा मेसेज टोन ऐकून आजी जागी झाली. ड्रायव्हरचा स्टेशन आल्याचा मेसेज वाचून आजी टॅक्सीच्या बाहेर आली. रेल्वे अधिकाऱ्याचा नंबर घेऊन आजीने त्याला ट्रेन नं. 2301 कधी येणार असा मेसेज पाठवला. काही वेळाने गाडी प्लॅटफॉर्म क्र दोनवर आल्याचा आजीला मेसेज आला. संध्याकाळी आजी स्टेशन बाहेर आल्यानंतर सुखरूपपणे पोहोचल्याचा मेसेज ग्रुपवर पाठवला.

घरी आल्यावर आजीने ctrl चे बटण दाबून स्वतःवर कंट्रोल केला. नंतर व्हाट्सऍप सर्चमध्ये जाऊन ‘My Life My Family’ हा ग्रुप ओपन करून डीपीवरील दोन्ही नातवंडांना डोळे भरून बघितले. सर्वांना बायचा मेसेज टाकून आजी ग्रुपमधून एक्झिट झाली. हे कसलं मोबाइलग्रस्त जीवन. कौटुंबिक गप्पा नाहीत, सुख-दुःखाच्या गोष्टी नाहीत, मुलांचा धांगडधिंगा नाही. आजीला हुंदका अनावर झाला. पतीच्या निधनानंतर आजी पहिल्यांदाच इतकं मुसमुसून रडली. ज्यांनी लिहिले त्यांनी खूप छान लिहिले. 

 या मध्ये चुकीचे कोणी आहे असे वाटते का????

लेखक : अज्ञात  

प्रस्तुती :  शुभदा भा.कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड-पुणे

मो.९५९५५५७९०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आठवणीने विसरा… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

? विविधा ?

आठवणीने विसरा…  ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

परवाच माझी मैत्रिण सांगत होती कि तिच्या कोणालातरी अल्झायमर झालाय. आता त्यांना कोणी आठवत नाही.त्यामुळे त्या कोणाला अोळखत नाहित.•••• वगैरे वगैरे•••• आणि मग विसरणे हे एवढ्या भयंकर थराला जाऊ शकते असे कळल्यावर अंगावर सर्रऽऽऽकन काटा आला.

मग विचार आला का हा असा आजार निर्माण झाला असेल? मग त्यावर उपाय म्हणून स्मरणशक्ती वाढवण्याचे उपाय सांगितले जातात. बदाम खा•••• अक्रोड खा•••• वगैरे उपचार सांगितले जातात;आणि शेवटपर्यंत प्रयत्न केले जातात.पण शक्यतो अशा व्यक्तींना परत फारसे काहिच आठवत नाही.

आता डॉक्टर तज्ञ यावर अनेक उपाय सांगतात पण मला उगीचच एक विचार डोक्यात आला•••• मनुष्य केव्हा एखादी गोष्ट विसरतो? तर एखाद्या गोष्टीला खूप दिवस झाले असतील; त्या गोष्टींशी पुन्हा पुन्हा संपर्क येत नसेल तर मनुष्य ती गोष्ट विसरून जातो. जसे लहानपणी घोकून घोकून पाठ केलेली स्तोत्रे गाणी आपल्याला आता आठवत नाहित पण कोणी म्हणायला सुरुवात केली तर अधून मधून ते आपल्याला आठवू लागते. याच्या उलट जर आपण कधी कोणाशी भांडले असू एखाद्याने आपला अपमान केला असेल किंवा एखादी चांगली घटना घडली असेल तरी ती गोष्ट आपल्याला काही केले तरी विसरता येत नाही. कोणाचा प्रेमभंग झाला असेल तर ते प्रेम त्याला विसरणे शक्य नसते; आणि मग असे वाटले ज्या गोष्टी अापण अगदी मनावर घेतो ज्या गोष्टींमुळे आपल्या हृदयाला काळजाला थरार जाणवला असेल अशा गोष्टी आपण कधीच विसरत नाही.

मग ज्यांना विसरण्याचा आजार झालाय त्यांचे काय? तर ते लोक फार भावूक असावेत.प्रत्येक गोष्ट ते मनावर घेत असावेत. म्हणूनच सगळ्याच गोष्टी ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतात. मग हे लक्षात ठेवण्याचे पोते ताणून ताणून भरले की मग काही गोष्टी अगदी तळाशी जाऊन बसतात.काही गोष्टी  इतर गोष्टिंच्या मधे जाऊन बसतात.मग त्या गोष्टी कितीही महत्वाच्या असल्या तरी वेळेवर त्या आठवत नाहित. मग ही एक प्रकारची सवय लागून जाते; आणि त्याचे रुपांतर अशा भयंकर रोगात होत असावे.

त्यामुळे मला यातून मार्ग काढताना जाणवले जर आपण अगदी महत्वाचे आहे तेच लक्षात ठेवले आणि जे अनावश्यक आहे,ज्याने आपल्याला त्रास होईल अशा गोष्टी जाणिवपूर्वक विसरल्या तर? म्हणजे कोणी आपल्याशी भांडले असेल कोणी आपल्याला त्रास दिला असेल तर असे प्रसंग आपण विसरायला शिकले पाहिजे. म्हणजेच जाणिवपूर्वक किंवा आठवणीने विसरणे हा रोग नसून ती एक कला आहे. आणि हिच कला प्रत्येकाने अंगिकारायला पाहिजे असे वाटते.

म्हणजे बघा हं•••• जर आपण ज्या गोष्टी महत्वाच्या नाहित त्रासदायक आहेत अशा गोष्टी पुढच्या क्षणी विसरायचे ठरवले तर मनामड्ये चांगल्या गोष्टी लक्षात ठेवायला जागा शिल्लक राहिल. एक वाईट गोष्ट विसरली कि पुढच्या दहा चांगल्या गोष्टिंसाठी जागा होईल. मग चांगल्या गोष्टी आठवत राहिल्या तर मन प्रसन्न राहिल. अर्थातच त्यामुळे आरोग्य चांगले राहिल••••

आपण आपल्या घरातूनही जुने फाटके कपडे काढून फेकून देतो तेव्हा नवे चांगले कपडे ठेवण्यासाठी कपाटात जागा होते. घरातील जुन्या वस्तू जेव्हा बाहेर काढतो तेव्हा नव्या वस्तूंचा उपभोग आपल्याला घेता येतो•••• तसेच आपण आठवणीने काही गोष्टी विसरू या.म्हणजे चांगल्या गोष्टी आपोआपच लक्षात राहतील.मग म्हणूया खरच विसरणं ही एक कला आहे•••• ती आत्मसात करू या•••••

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ “बाजीगर…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “बाजीगर…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

टूट गया.. दिलका सपना हाये टूट गया.. वो इंडिया वाले ने हमे लूट लिया.. नही नही कंबख्त सालोने छिन लिया… दस साल से उनके साथ हमने भाईचारा करते आ रहे थे… आय.पी.एल.के रूप में… हर एक खिलाडी का अंदाज को बडी ध्यान से पढ चुके थे… कमजोरी कहा है पता चुके थे… बल्लेबाजी, गेंदबाजी का हर एक पैलू के कोने को गौर से समझाकर हमने ये फायनल मुकाबले मे मास्टर प्लान बनाकर खेल कर रहे थे… सबकुछ तो वैसैही चल रहा था..तीस गेंद पर तीस रन्स… याने जीत हाथ में चुकी थी… बस्स उसपर  पहलेसे जो चोकर्स का निशाना मिटाकर    & the winner of T20 of 2024 is South Africa. लिखना शुरु कर रहे थे….बार बार कोशीश चालू थी वो बदनाम चोकर्स का निशाना मिटाने के लिए…एकेक करके हमारे जी तोड करने वाले बल्लेबाज बंदे  परास्त होते गये… आखिरी  चार गेंद में नऊ रन्स कि बाकी थी… पर मिले दो… और सात रन्स  से हमे शर्मनाक हारगये… वो इंडिया वाले ने हमे गुमराह कर दिया… ये इनकी चालाकी इसे पहले कभी आय. पी. एल में नही देखी थी… सालोने हमारा गेम हमी पर बुमरॅंग कर दिया… और और फिर हम चोकर्स के चोकर्स ही रह गये… हम से क्या भुल हो गई जिसकी हमे ये सज़ा मिली.. हम ढूंढते रह गये…आसू के घुट पिते पिते…एक अचरज बात ये है कि.. हारे थे हम.. टुटा था दिल हमारा… पर वो साले इंडिया वाले फुट फुट कर रो रहे थे… बाजीगर थे ना….. आज हमे पहलीबार पता चला कि जब कोई जीत के नजदीक आकर भी हारता है तो तभी दु:ख कितना गहरा होता है इसका अहसास हुआ…   Cricket is game of chance का अर्थ हम जिंदगी भर नही भुलेगें…  एक बडी खुशी बात और है कि अगली बार रोहीत शर्मा और विराट कोहली तो विश्वकप नही खेलेंगे… और हम इंतजार करेंगे कि बुमराह कभी रिटायर्ड हो रहा है… उसके बाद जो विश्वकप कि मॅच होगी तो जीत हमारी ही पक्की होगी…

वो कुल कॅप्टन ने हमारे मुह से जीत छिन ली… हम बहुत ही इस पर शरमिंदा है… जाते जाते हम सभी खिलाडीयोंने आज के दिन अपनी दाहिने हाथोपर हम चोकर्स है करके गुदवा लिया है… जब कभी विश्वकप जीत कि बारी आयेगी तभी ये निशाना हमेशा हमेशा के लिए मिटा देंगे… कहने वाले तो यही कहेंगे कि खेल में हार जीत तो होती है… पर जो हार के भी जीतते है उसे बाजीगर कहते है… और उसका नाम इंडिया है…

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ प्रिय माउली – – ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

??

☆ माऊलींचा हरिपाठ १.… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

प्रिय माउली – – 

बा विठ्ठला, 

देवा, तू असा आहेस ना ? मनाने तू माउली आहेस आणि दिसतोस मात्र लेकरासाठी, कुटुंबासाठी उन्हांत राबलेल्या, उन्हानं रापलेल्या बापासारखा…..

आमच्या सारख्या सामान्य जीवांना तुला नक्की कोणत्या नावाने हाक मारावी असा संभ्रम पडतो……

मी तुला माउलीच म्हणेन इथून पुढे…..

खरं सांगू का ?

प्रपंचातील कटकटींनी आम्ही पार वैतागून जातो, आम्हाला माहीत असते या सर्वांस आम्हीच किमान ५०% तरी जबाबदार आहोत. (खरेतर आम्ही १००% जबाबदार असतो, पण ती जबाबदारी घेण्या इतपत शहाणपण आणि सामर्थ्य आमच्या अंगी नाही रे…..) पण सर्व दोष आम्ही तुला देतो, तुला माहित असते की लेकरू कावले आहे…, राग व्यक्त करायला त्याला माझ्या शिवाय कोणी नाही, म्हणून तू सर्व शांतपणे ऐकून घेतोस…, देवा, अगदी मनातलं सांगतो, तुझ्यासारखे शांतपणे, एकाग्र चित्ताने ऐकून घेणारे कोणीही नाही रे या जगात…, तू आमचे गाऱ्हाणे ऐकून घेतोस ना, तिथेच आमचे ५०% दुःख निवळते…. आणि बाकी राहिलेले दुःख वागविण्याची ताकद तुझ्या दर्शनाने मिळते….

तुला वाटेल, आज एकादशी आहे म्हणून हा बोलत असेल….

तसे नाही देवा, वरील विचार कायम आमच्या मनात असतो, पण आज तुझ्या घरी तुझे लाडके भक्त आले आहेत, साक्षात ज्ञानेश्वर माउली, तुकोबा, जनी, चोखोबा, नामदेव,…. कित्ती जणांची नावे घेऊ…? खरी माहेर वाशीण घरी आली की घराच्या गड्याला ही गोडधोड खायला मिळते, एखादं वस्त्र मिळत, अगदीच काही मिळालं नाही तर मालकाचे चार प्रेमाचे शब्द मिळतात, आमच्या सारख्या सामान्य भक्ताला ते अमृता सारखे नाहीत काय ?

देवा तुझ्या डोळ्यांत पाणी आले न ? अरे या दोन गोड अमृत असलेल्या शब्दांसाठीच आम्ही वर्षभर आसुसलेले असतो…..

देवा, अपार काळजी मागे सोडून तुझ्या दर्शनासाठी येतो, जे पायाने वारी करू शकत नाहीत, ते मनाने वारी करतात…..

विठू माउली,

तुला सगळंच ठावे….., तरीपण तुझे कौतुक तुला आपल्या लेकरांकडून ऐकायचे असते, म्हणून माझ्या लेखणीतून तू ते लिहून घेतलेस ना….

तूच खरा खेळिया, आणि आम्ही तुझ्या हातातले खेळणे…..

अरे हो, हिने तुझ्याकडे मागण्यासाठी मोठी यादी दिली होती…. पण  चंद्रभागेत स्नान करताना वाहून गेली….. आता, घरी गेल्यावर मी तिला काय सांगू….? अरे मी काही सुदामा नाही की तू मला सोन्याची नगरी भेट द्यावी…. एकच कर, माझी आणि माझ्या पत्नीची मागण्याची इच्छाच नष्ट कर…. हे तुला करायला आवडेल….

तुझ्या मनातलं बोललो ना….?

मी तुझेच लेकरू आहे, तुझ्या मनातलं थोडेसे मला कळणारच…..

बरं, आता परतीला निघतो…

जाताना रुक्मिणी मातेचे दर्शन घेऊन जातो….

देवा, आणखी एक गोष्ट मागाविशी वाटते…, मागू का ?

तू नाही म्हणायच्या आधीच मागतो…..

.. तुझ्या नामाचे प्रेम दे……!

देशील ना ?

तुझाच

एक वारकरी…..!

शब्दांकन:- संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य ) 

मो।  ८३८००१९६७६

*********

 वारकऱ्यांच्या पत्राला माउलीचे उत्तर ..

लेकरा,

अनेक आशीर्वाद.

तुझं कौतुक व्हावं म्हणून मी तुझ्याकडुन पत्र लिहून घेतलं असे तू लिहिलेस….

बाप से बेटा सवाई हेच खरे….

तुम्हीच मला सगुण रूप दिलेत, त्यामुळे सगुणाचे गुण मला येऊन चिकटणार यात नवल ते काय ?

निर्गुण निराकार असलेल्या मला आपण विविध आकार देऊन साकार केलेत. रंग रुपाप्रमाणे मला विविध नावे दिलीत आणि माझे माहात्म्य विविध प्रकारे असे काही वर्णन केलेत की मला तसेच प्रगट व्हावे लागले, आणि पुढेही…….

असो….

लेकरा, यावर्षी तू पायी वारीला न येता मानसिक वारी केलीस…. तुझी नवीन कल्पना मला अधिक भावली…. शेवटी तुझ्या अंतरात असलेलं मन मीच आहे आणि त्यानेच तू वारी केलीस…..

व्वा!! खूप छान!!

मी आपल्या सर्वांसाठी विठू माउली नक्कीच आहे, पण माझे खरे रूप ओळखून तुम्ही माझ्या ज्ञाना, तुका, जनी, चोखामेळा, सखू सारखे संत व्हावे असे मला वाटते…

पिंडी ते ब्रम्हांडी या उक्तीची अनुभूती तुम्ही घ्यावी असे मला वाटते…..

माझ्या लेकीने (गडबडू नकोस, तुझ्या बायकोने) दिलेली यादी चंद्रभागेमध्ये मीच वाहू दिली…. कारण तुला ती यादी पुढे करताना खूप अवघड झाले असते….., प्रेमात कोण, कुठे आणि कसली मागणी करणार….सगळा त्यागाचा मामला……

– अरे साऱ्या सृष्टीची काळजी मी घेतो, तुला वाऱ्यावर सोडेन….? घरी गेलास की बघ, सारे घर माझ्या सान्निध्याने भारलेले असेल……

एक वचन देतो तुला बाळा,

तू यत्न कसून कर, शर्थीने प्रयत्न कर. मग, यश तुझेच आहे…., पडायला लागलास तर सावरायला मी आहेच….. निर्धास्तपणे जा, जपून रहा. मी तुझ्या सोबत आहे की नाही याची काळजी करू नकोस…

एक मात्र कर. तू सतत नाम घेत रहा म्हणजे तुझ्या सोबत रहायला मला अडचण वाटणार नाही…..

मी तुझी लाज नक्कीच राखेन……

आशीर्वाद !!!!!

तुझी 

माउली

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “बूट पॉलिशची डबी” – लेखक : श्री पराग गोडबोले  ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

??

☆ “बूट पॉलिशची डबी” – लेखक : श्री पराग गोडबोले  ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

नेहमीचीच व्यस्त संध्याकाळ, डोंबिवली स्थानकातली, बिन चेहऱ्याची. स्त्री पुरुषांची घरी लवकरात लवकर पोहोचण्यासाठी आटापिटा करणारी गर्दी. दिवसभराच्या श्रमाने थकलेले, घामेजलेले चेहेरे. मी ही  त्यांच्यातलाच एक. कल्याण दिशेकडल्या पुलावरून घरी जायच्या ओढीने, पाय ओढत निघालेला, पाठीवर लॅपटॉपची गोण घेतलेला पांढऱ्या सदऱ्यातला श्रमजीवी. असे असंख्य जीव सोबत चालत असलेले, माझ्यासारखेच श्रांत. आता लवकर रिक्षा मिळेल, का परत मोठ्या लांबलचक रांगेत जीव घुसमटत राहील या विवंचनेत. माझं एक बरं असतं. मी आपला चालत चालत थोडीफार खरेदी करत घरी जातो. रिक्षाच्या भानगडीत पडतच नाही कधी. तो नकार ही नको आणि ती अरेरावीही नको पैसे देऊन. विकतचं दुखणं नुसतं!!!

आज पण तसाच विचार करत जात असताना पुलाच्या कडेशी एक अंध विक्रेता दिसला. बूट पॉलिशच्या डब्या आणि ब्रश विकत असलेला. बऱ्याच दिवसांपासून एक पॉलिश ची डबी घेऊन घरच्या घरी बूट चमकवायचा मी विचार करत होतो. मागे पण असा प्रयत्न केला होता पण डबी आणायचो, एकदोनदा उत्साहात पॉलिश करायचो आणि मग मावळायचा उत्साह. डबी अडगळीत पडायची आणि मग नंतर कधीतरी परत वापर करावा म्हंटलं तर आतलं मलम  वाळून कडकोळ झालेलं असायचं. या वेळी मात्र खूप जाज्वल्य वगैरे निश्चय केला आणि त्या विक्रेत्यापाशी रेंगाळलो. 

या लोकांना कसं कळतं कोणास ठाऊक, पण मी उभा आहे समोर हे कळलं त्याला आणि काय हवंय विचारलं मला त्यानं . मी थोडा वाकलो त्याच्या समोर आणि म्हणालो काळं पॉलिश हवंय. त्याने हात लांब करून तपकिरी झाकणाची एक डबी उचलली आणि म्हणाला घ्या. मी म्हणालो, अहो ही तर तपकिरी आहे.  मला काळं हवंय पॉलिश. म्हणाला आत काळं पॉलिशच आहे. मी चक्रावलो. घरी तांदुळ लिहिलेल्या  डब्यात डाळ आणि डाळीच्या डब्यात पोहे हे ठाऊक होतं  पण इथेही तेच बघून जाम आश्चर्य वाटलं मला. मी म्हणालो नक्की ना? बेलाशक घेऊन जा म्हणाला. नसेल काळं तर नाव बदलेन!!

उघडून बघू का ? विश्वास नसेल तर बघा !! काय तो आत्मविश्वास !!! मी न उघडता डबी खिशात ठेवली. 

किती द्यायचे? ५० रुपये. मी नाही घासाघीस करत अशा विक्रेत्यांशी. सांगितलेली रक्कम देतो त्यांना आढेवेढे न घेता. QR code दिसतोय का बघितलं त्याच्या शेजारी. नव्हता दिसत. मी पाकीट काढलं आणि जांभळी, नवी १०० ची नोट दिली त्यांच्या हातात. चाचपली त्यानं आणि म्हणाला  साहेब आज अजून बोहनी नाही झाली. ५० नाहीयेत माझ्याकडे परत द्यायला. पंचाईत झाली आता. मी माझ्या पाकिटात ५० ची नोट किंवा सुट्ट्या नोटा आहेत का ते शोधलं, पण नव्हते. थांबलो दोन मिनिटं, पण कोणीच गिऱ्हाईक येत नव्हतं त्याच्याकडे. मी म्हणालो, जाऊद्या ठेवा तुम्ही ५० रुपये तुमच्याकडे, मी उद्या संध्याकाळी घेईन परत. 

अचानक तो म्हणाला उद्याचा काय भरोसा साहेब? मी असेन नसेन. कोणी पाह्यलंय ? तुमच्या पन्नास रुपयांचं ओझं नको मला डोक्यावर.  मी परत बघितलं त्याच्याकडे, गळ्यात तुळशीमाळ वगैरे नव्हती पण तत्व आणि स्वत्व तेच जाणवत होतं. डोळ्यातले नव्हे पण मनातले भाव वाचता येत होते त्याच्या, स्पष्ट. तिढा पडला होता. मी उपाय काढला. त्याला म्हणालो, तुम्ही शंभर ठेवा, मी दोन डब्या घेतो. उद्या संध्याकाळी एक परत करेन आणि उरलेले पन्नास घेऊन जाईन. 

हे ऐकल्यावर चेहरा खुलला त्याचा. चालेल म्हणाला. फक्त डबी उघडू नका. मी हो म्हणालो. एक संपवायची मारामार असताना दोन डब्या घेतल्या. त्याला विचारलं एक फोटो काढू का ? खुशाल काढा म्हणाला. मी कसा दिसतो ते मलातरी कुठे ठाऊक आहे…. मी भांबावून बघतच राहिलो त्याच्याकडे. गर्दीत कसाबसा त्याचा फोटो काढला आणि निघालो घराकडे. 

आज आठवडा झाला. मी रोज जातो त्याच्यासमोरून, त्याच्याकडे बघत आणि संभाषण आठवत. बूट पॉलिश विकणाऱ्या, डोळ्यांनी अंध पण मनाने डोळस असणाऱ्या त्याच्यातल्या प्रामाणिकपणाला प्रणाम करत, मनोमन.  ती डबी अजून तशीच आहे माझ्याकडे. नाही परत केली मी. वापरली जाणार नाही ती कदाचित माझ्याकडून, पण ठेऊन देईन एका आंधळ्याच्या डोळसपणाची आठवण म्हणून… 

आणि हो, सांगायचं राहिलंच, तपकिरी झाकणाच्या डबीत काळंच पॉलिश होतं !!! 

लेखक : श्री पराग गोडबोले.

प्रस्तुती : मोहन निमोणकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘देवाचे लक्ष आहे बरं का !’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ ‘देवाचे लक्ष आहे बरं का !’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर 

एके दिवशी सकाळी दारावरची बेल वाजली. मी दरवाजा उघडला तेव्हा पाहिले, एक आकर्षक बांद्याची व्यक्ती सस्मित समोर उभी होती. मी म्हटले, “बोला! काय काम आहे?”

ते म्हणाला, “भाऊ, तुम्ही रोज माझ्यासमोर प्रार्थना करत होता, म्हणून म्हटले आज भेटूनच घेऊ.” मी म्हटले, “माफ करा, मी तुम्हाला ओळखले नाही.”

तेव्हा ते म्हणाले, “बंधू! मी भगवान आहे. तू रोज प्रार्थना करत होतास, म्हणून मी आज पूर्ण दिवस तुझ्याबरोबर राहणार आहे.”

मी चिडत म्हटलं, “ही काय मस्करी आहे?”

“अहो, ही मस्करी नाही सत्य आहे. फक्त तूच मला पाहू शकतोस. तुझ्याशिवाय मला कुणीही पाहू किंवा ऐकू शकणार नाही!”

काही बोलणार इतक्यात मागून आई आली…

“एकटा काय उभा आहेस? इथं काय करतोस? चल आत, चहा तयार आहे, आत येऊन चहा पी. “ आईला काही तो दिसला नाही.

आईच्या या बोलण्यामुळे आता या आगंतुकच्या बोलण्यावर थोडा विश्वास होऊ लागला. माझ्या मनात थोडी भीती होती. चहाचा पहिला घोट घेतल्याबरोबर मी रागाने ओरडलो, “अग आई, चहामध्ये इतकी साखर रोज रोज का घालतेस?”

एवढे बोलल्यानंतर मनात विचार आला, जर आगंतुक खरोखर भगवान असेल तर त्याला आईवर रागावलेलं आवडणार नाही. मी मनाला शांत केले आणि समजावले, “अरे बाबा, आज तू नजरेत आहेस. थोडे लक्ष दे.”

“बस् मी जिथं असेन, प्रत्येक ठिकाणी ते माझ्यासोबत आले. थोड्या वेळाने मी आंघोळीसाठी निघालो, तर ते सुद्धा माझ्यापुढे… मी म्हटले, ” प्रभू, इथे तरी एकट्याला जाऊ दे.”

आंघोळ करून, तयार होऊन मी देव पूजेला बसलो. पहिल्यांदा मी परमेश्वराची मनापासून प्रार्थना केली. कारण आज मला, माझा प्रामाणिकपणा सिद्ध करायचा होता.

ऑफसला जाण्यास निघालो. प्रवासात एक फोन आला. फोन उचलणार इतक्यात आठवले, आज माझ्यावर प्रभूची नजर आहे. गाडी बाजूला थांबवली. फोनवर बोललो, आणि बोलत असताना म्हणणार होतो की या कामाचे पैसे लागतील. पण का कोण जाणे, तसे न बोलता म्हटले तू ये! तुझे काम होईल आज.

ऑफिसमध्ये पोचल्यावर मी माझे काम करत राहिलो. स्टाफवर रागावलो नाही किंवा कुठल्याही कर्मचऱ्याबरोबर वादविवाद केला नाही. रोज माझ्याकडून विनाकारण अपशब्द बोलले जायचे. पण त्यादिवशी तसे काही न बोलता, “काही हरकत नाही, ठीक आहे, होऊन जाईल काम” असे म्हणत सहजपणे सर्व कामे केली.

आयुष्यातील हा पहिला दिवस होता, ज्या दिवशी माझ्या दिनचर्येत राग, लोभ,अभिमान, दृष्टता, अपशब्द, अप्रामाणिकपणा, खोटेपणा कुठेही नव्हता. संध्याकाळी ऑफिसमधून निघून घरी जायला निघालो. कारमध्ये बसलो आणि बाजूला बसलेल्या प्रभूंना म्हणालो, “भगवान, सीटबेल्ट बांधा. तुम्ही पण नियमांचे पालन करा.” प्रभू हसले. माझ्या आणि त्यांच्या चेऱ्यावर समाधान होते.

घरी पोहोचलो. रात्रीच्या भोजनाची तयारी झाली. मी जेवायला बसलो आणि, “प्रभू! प्रथम तुम्ही घास घ्या.” मी असे बोलून गेलो. त्यांनीही हसून घास घेतला.

जेवण झाल्यानंतर आई म्हणाली, “आज पहिल्यांदा तू जेवणाला नावे न ठेवता, काही दोष न काढता जेवलास! काय झाले? आज सूर्य पश्चिमेला उगवला की काय?”

मी म्हटले, “आई, आज माझ्या मनात सूर्योदय झाला आहे. रोज मी फक्त अन्नच खात होतो. आज प्रसाद घेतला. माता आणि प्रसादात कधी काही उणीव नसते!”

थोडा वेळ शतपावली केल्यानंतर मी माझ्या खोलीत गेलो आणि निश्चिंत व शांत मनाने उशीवर डोके टेकवले. झोपी जाण्यासाठी.

प्रभूनी माझ्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. म्हणाले, “आज तुला झोप येण्यासाठी, संगीत, औषध किंवा पुस्तकाची गरज भासणार नाही.” खरोखर, मला गाढ झोप लागली.

ज्या दिवशी आपणास कळेल की, “तो पहात आहे”, त्या दिवशीपासून आपल्या हातून सर्व काही चांगले घडेल.

लेखक : अज्ञात 

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग १७ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग १७ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- भावाचं पत्र वाचून पुन्हा उलटसुलट विचार मनात गर्दी करू लागले.आईने लिहिलेला मजकूर वाचून तर मी हळवाच होऊन गेलो.बाबांच्या आठवणीने मी व्याकुळ झालो. अखेर भावनेच्या आहारी जाऊन का होईना पण मी मन घट्ट केलं आणि आता ‘स्टेट बँक’ हेच आपलं नशीब हे स्वीकारलं. युनियन बँक सोडायचा निर्णय पक्का झाला. पण तरीही मनाला स्वस्थता नव्हतीच.मी हातातल्या इनलॅंडलेटरची घडी घालू लागलो आणि लक्षात आलं, त्याला आत दुमडायचा जो फोल्ड असतो तो उलटा धरून त्यावर गिजबीट अक्षरात काही मजकूर दिलेला आहे. हे बाबांनी तर लिहिलं नसेल? हो नक्कीच. थरथरत्या हाताने लिहिल्याचं स्पष्ट जाणवत होतं. प्रयत्नपूर्वक एक एक अक्षर जुळवायचा आटापिटा करून ते वाचलं.त्यातून जे हाती लागलं ते मात्र खरंच लाखमोलाचं होतं!)

घाईघाईने कशीबशी लिहिलेली फक्त दोन वाक्यं होती ती.प्रयत्नपूर्वक अक्षरं जुळवत मी ती वाचली आणि अंतर्बाह्य शहारलो!

‘दत्तकृपेचा प्रसाद म्हणून मिळालेली सध्याची नोकरी काही झालं तरी सोडू नकोस. तिथेच तुझा उत्कर्ष होईल. ‘

या आधीच्या अस्वस्थ मनस्थितीत ‘बाबा हिंडते-फिरते असते तर त्यांच्याशी बोलता तरी आलं असतं.त्यांनी योग्य तो मार्ग नक्कीच दाखवला असता’ असं उत्कटतेनं वाटत राहिलं होतं. ते शक्य नाहीय हे माहित असल्याने मन अधिकच सैरभैर झालं होतं. आणि माझी ही अस्वस्थता नेमकी जाणवल्यासारखं बाबांनी मी न विचारताच माझ्या मनातल्या प्रश्नाचं नेमकं उत्तर मला दिलं होतं. मी निश्चिंत झालो. युनियन बँक न सोडण्याचा निर्णय घेतला. खूप दिवसानंतर प्रथमच चार दिवस रजा घेऊ घरी गेलो. मी घेतलेल्या निर्णयाने आई आणि भाऊ दोघांचा खूप विरस झाला होता. आई कांही बोलली नाही पण भाऊ मात्र म्हणाला,

“ही नशिबाने मिळालेली सोन्यासारखी संधी तू सोडायला नको होतीस. तू प्रोबेशन पिरिएडला घाबरून हा निर्णय घेतलायस.हो ना?”

“तसं नाही…पण..”

“मग कसं?”

मी काही न बोलता बाबांकडे पाहिलं. ते शांत झोपले होते. मी बॅग उघडली. बॅगेतलं इन्लॅंडलेटर काढून त्यातला बाबांनी लिहिलेला मजकूर भावाला दाखवला. त्याने तो वाचला आणि अविश्वासाने आईकडे पहात ते पत्र तिच्या हातात दिलं. आईनेही ते वाचलं. काय समजायचं ते समजली. एकवार अंथरुणावर शांतपणे झोपलेल्या बाबांकडे पाहिलं आणि ते पत्र मला परत दिलं.

“माझं लिहून झाल्यावर मी ते चिकटवणार तेवढ्यात यांनी मला थांबवलं होतं. ‘मी वाचून देतो मग टाक’असं म्हणाले होते.

आम्ही खरंतर त्यांना विनाकारण त्रास नको म्हणून त्याबद्दल काही बोललोही नव्हतो. तरीही आमच्या गप्पातून ते त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं असणार नक्कीच. म्हणून तर जागा मिळाली तेवढ्यात घाईघाईने लिहिलंय हे सगळं जमेल तसं. होतं ते बऱ्यासाठी म्हणायचं दुसरं काय?”

आई असं म्हणाली खरी पण घडलं होतं ते फक्त बऱ्यासाठीच नव्हे तर खूप चांगल्यासाठी होतं याची प्रचिती आम्हा सर्वांना लवकरच आली.

स्टेट बॅंकेतली नोकरी युनियन बॅंकेच्या तुलनेत पगार,इतर सवलती, प्रमोशन्सच्या संधी,मुंबईतून बदली मिळायची अधिक शक्यता अशा सर्वच दृष्टीने निश्चितच आकर्षक होती.तरीही ”दत्तकृपेच्या प्रसाद म्हणून मिळालेली सध्याची नोकरी काही झालं तरी सोडू नकोस. तिथेच तुझा उत्कर्ष होईल ‘ या अंत:प्रेरणेने लिहिलेल्या बाबांच्या शब्दांत लपलेलं गूढ मला योग्य मार्ग दाखवून गेलं होतं.कालांतराने यथावकाश ते गूढही आपसूक उकललं.

माझ्या कन्फर्मेशननंतर लगेचच झालेल्या वेज रिव्हिजनच्या एग्रीमेंटमधे आमच्या बँकेची प्रमोशन पॉलिसी पूर्णतः बदलली. नोकरीची तीन वर्षे पूर्ण होताच प्रमोशनसाठी लेखी परीक्षा आणि इंटरव्यू देण्याचा मार्ग आमच्यासाठी खुला झाला होता. त्यामुळे ती माझ्यासाठी सुवर्णसंधीच ठरली. तीन वर्षे पूर्ण होताच मीही प्रमोशन टेस्ट दिली आणि लगेचच मला पहिलं प्रमोशनही मिळालं.एवढंच नव्हे तर पुढची वेगवेगळ्या

रॅंकची सगळी प्रमोशन्सही मला प्रत्येकवेळी फर्स्ट अटेम्प्टलाच मिळत गेली. त्याही आधी बेळगाव बँक, मिरज स्टेट बँक यासारख्या बँका युनियन बँकेत मर्ज झाल्याने आमच्या बँकेचे ब्रॅच नेटवर्कही सांगली कोल्हापूर भागात अनपेक्षितपणे प्रचंड विस्तारलेलं होतं. त्यामुळे मला लगेचण या भागात बदली तर मिळालीच शिवाय प्रमोशन्सनंतरही प्रत्येक वेळी सोईची पोस्टिंग्जही जवळपासच मिळत गेली. स्टेट बँकेत राहिलो असतो तर हे इतकं सगळं इतक्या सहजपणे नक्कीच मिळालं नसतं.

हे सगळं ज्यांच्या प्रेरणेने शक्य झालं ते माझे बाबा मात्र हा सगळा उत्कर्ष पहायला होतेच कुठे?

बाबांनी इनलॅंडलेटरमधे लिहिलेला तो दोन वाक्यांचा मजकूर हाच आमचा अखेरचा संवाद ठरला होता. कारण त्यानंतर लगेचच सप्टेंबर १९७३ मधे ते गेलेच. जाताना त्यांची सगळी पूर्वपुण्याई आणि आजही मला दिशा दाखवणाऱ्या त्यांच्या मोलाच्या आठवणी हे सगळं ते जाण्याआधी जणू माझ्या नावे करून गेले होते!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares