मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ भेट वाढदिवसाची –  लेखिका : सुश्री नीला महाबळ गोडबोले ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

? मनमंजुषेतून ?

☆ भेट वाढदिवसाची –  लेखिका : सुश्री नीला महाबळ गोडबोले ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

चाळीस-पन्नास  वर्षांपूर्वीचा काळ….. शाळकरी  वय…

वाढदिवसाचं  एवढं स्तोम वाढलेलं नव्हतं  तेंव्हा…पण वाढदिवसाची वाट मात्रं पाहिली जायची..

एकाच कारणासाठी… भेटवस्तुंसाठी…

 

शाळेत  एखादी मुलगी गणवेश न घालता  रंगीत कपडे ( तो नवीनच असेल असे नाही ) घालून आली की तिचा वाढदिवस आहे, हे कळायचं..शाळेत स्टेजवरून तिचं नाव पुकारलं जायचं.तिला शुभेच्छा दिल्या जायच्या नि आम्ही  पोरी ” एक दोन तीन…एक दोन तीन..एक — दोन — तीन  ”  अशा  शिस्तबद्ध टाळ्या वाजवायचो…

” आपणही  टाळ्या  वाजवाव्यात की तसच उभं रहावं ”  या संभ्रमात ती वाढदिवसाळु  उत्सवमूर्ती  तोंडावर कसनुसे भाव घेऊन  कानकोंड्या अवस्थेत उभी राहिलेली  असायची!!

घरची जरा बरी  परिस्थिती असली तर शाळेत लिमलेटच्या गोळ्या नाहीतर रावळगाव चॉकलेट  वाटलंं  जाई…. अन् त्यादिवशी  “ती वाटणारी मुलगी” राणीच्या थाटात वावरत असे आणि  तिला मदत करणारी तिची मैत्रीण तिच्या दासीच्या..कारण तिला एक गोळी जास्तीची मिळायची!!

 

ती गोळी किंवा चॉकलेट खिशातून जपून घरी नेलं जाई  नि आम्ही  तीन भावंडे  त्याचे चिमणीच्या दाताने तुकडे करून  पुढचा तासभर ते चघळून चघळून खात असू..

आयुष्यातील आनंद नि त्याचा कालावधी वाढवण्याची सोपी युक्ती आम्हाला त्या गोळीनं 

आम्हाला शिकवली..!!

 

एके दिवशी  एका मैत्रिणीने  साधारण बटाटेवड्याच्या आकाराचा  बसाप्पाचा शिक्का असलेला  पेढा  वर्गातल्या प्रत्येकाला वाढदिवसानिमित्त दिला…आम्हाला  आश्चर्याने चक्कर यायचीच राहिली होती..!!

जेमतेम एखादी गोळी वाटणं सुद्धा परवडणं -नं-  परवडण्याच्या उंबरठ्यावर असणाऱ्या आम्हा पोरींना  प्रत्येकी एक एवढा मोठा  पेढा हा फार मोठा सांस्कृतिक धक्काच होता..

 

” तिचे वडील मोठे डॉक्टर आहेत..तिला न परवडायला काय झालं ?”  या घरातल्या शेरेबाजीनं…

” आपण एकतर डॉक्टर व्हायचं आणि अगदीच नाही जमलं तर किमानपक्षी डॉक्टरशी लग्न तरी करायचं ..आणि होणा-या  पोरांच्या  वाढदिवसाला  शाळेत पेढे वाटायचे ”  हा निश्चय मात्रं त्या नकळत्या वयात मनानं  केला!

 

वाढदिवस जवळ आला की दोन विषय मनात पिंगा घालू लागायचे….. नवीन कपडा मिळणं  नि मैत्रिणींना वाढदिवसासाठी  घरी बोलावणं…

 

तीन  मुलांची जबाबदारी असलेल्या  आमच्या माऊलीनं  घरखर्चातून  थोडे थोडे पैसे बाजूला काढून ठेवलेले असायचे..त्यातून  पुढची किमान तीन वर्षे अंगाला येईल एवढा घळघळीत कपडा शिवला जायचा..नि वर्षभरातील सा-या सणवारांना, लग्नकार्यांना तो  पुरवून पुरवून वापरला जायचा..!!

 

एखादे वर्षी  घरात कुणाचं तरी आजारपण निघायचं नि साठवलेले  सारे पैसे घरच्या डब्यातून डॉक्टरच्या गल्ल्यात जमा व्हायचे… त्यावर्षी  आईची  त्यातल्या त्यात नवी साडी  फ्रॉक नाहीतर  मॅक्सीचं रूप घेऊन वाढदिवसाला  आम्हाला सजवायची…!!

 

” आई, वाढदिवसाला मैत्रिणींना बोलवूया नं गं ”  ही  आईच्या मागची भुणभुण  काही मैत्रिणींच्या प्रेमापोटी नसायची..  तर असायची मैत्रिणींकडून  भेटवस्तू  मिळाव्यात म्हणून…!!

 

बरं त्यावेळच्या भेटवस्तू  तरी काय असायच्या..

एखादी  एक  रुपयाची  वही, पंचवीस पैशाची पेन्सिल, दहा पैशाचं खोडरबर, पंचवीस पैशाचं  ” सोनेरी केसांची राजकन्या ”  वगैरे  पातळ  कागदाचं गोष्टीचं पुस्तक, पन्नास पैशांचं  कानातलं..देणा-याची आर्थिक परिस्थिती  बरी  असेल तर  दीड-दोन रुपयांचं फाऊंटन पेन…

यातल्या ब-याच वस्तू  स्वस्त पडतात म्हणून  वर्षाच्या सुरुवातीलाच  घाऊक आणून ठेवलेल्या..

कानातलं  असंच कुणीतरी  दिलेलं पण न आवडलेलं…

गोष्टीचं पुस्तक घरातल्या सगळ्या मुलांनी  वाचलेलं…त्याचा आता नाहीतरी काय उपयोग म्हणून  त्याचं रुपांतर  भेटवस्तुत झालेलं…

 

बरं ..या वस्तू  देताना  त्याला  गिफ्ट पॅकिंग  वगैरे प्रकार  नाही… त्यांच्या  नैसर्गिक स्वरुपातच अवतरलेल्या… पण तरीही  त्यांचं खूप आकर्षण असायचं… तेवढंही  न मिळण्याचा  तो काळ होता…

म्हणून तर  पावडरचा डबा, टी-कोस्टर्स, कंपासपेटी  असल्या  महागड्या गिफ्ट्स देणाऱ्या  एका मैत्रिणीला  वर्गातल्या  प्रत्येकाच्या  वाढदिवसाला  बोलावलं जायचं…!!

 

भडंग, पातळ पोह्याचा चिवडा, कांदेपोहे , उप्पीट, एखादा लाडू  नाहीतर  डालड्यातला  शिरा…यातल्या दोन पदार्थांवर  वाढदिवस साजरा व्हायचा..!

 

मैत्रिणींकडून  मिळालेली वह्या, पुस्तकं, पेन्सिली, कानातली  वगैरे  अख्ख्या दुनियेतल्या खजिन्याचा आनंद देऊन जायची…. हा खजिना कुशीत घेऊन  निद्रादेवीच्या  सोबत घडणारी   स्वप्नांची  सैर  अद्भुत  आनंद  बहाल  करायची…!!

…. ते  दिवस  कसे भुर्रकन्  उडून  गेले  ते कळलच  नाही…फुलपाखरीच  होते ते..!!

 

आई -वडिलांचेही  दिवस पालटले  होते..केल्या कष्टांचं चीज झालं होतं..चार पैसे गाठीशी  जमले होते..

भाऊ , बहीण  मोठे  झाले..कमावते  झाले..

 

” तुला वाढदिवसाला  फक्त काय पाहिजे ते सांग…”  

जे  पाहिजे  ते  मिळू  लागलं  होतं…पैसा  आड  येतच  नव्हता…

 

पण  लहानपणाची  भेटवस्तूंची  ओढ  मात्र  कुठेतरी  आटली  होती…. वाढदिवसाचं  महत्त्व, लहानपणी  वाटणारं कौतुक  तारुण्याच्या  रेट्यात कुठंतरी  हरवून गेलं होतं..

 

लग्न  झालं  नि  चित्रपटातल्या  नायक-नायिकांच्या  वाढदिवसाच्या  भुताने  झपाटलं..

 वाढदिवसाला ” अलगदपणे  गळ्यात हि-याचा नाजुकसा नेकलेस घालणारा ”  किंवा  ” वाढदिवसाला  अचानक  विमानात बसवून  स्वित्झर्लंडला  नेणारा ”  किंवा  ” शे-दोनशे  लोकांना  भव्य घराच्या  भव्य हॉलमधे  बोलावून  पत्नीच्या वाढदिवसाची  सरप्राईज  पार्टी  करणारा ”  नायक  आणि  त्याने  पत्नीला  दिलेल्या  भेटवस्तू   प्रमाण  होऊ  लागल्या…

…… नि  ”  अगं  हे  सगळं  तुझच  आहे..तुला  पाहिजे  ते  घेऊन  ये  ”  असं  म्हणून  कर्तव्याला  प्राधान्य  देत  कामाला  निघून जाणारा   नवरा …त्या  नायकापुढे  अगदीच फिका  पडू  लागला..

प्रत्यक्षातलं  आयुष्य हे  चित्रपटापेक्षा फार वेगळं असल्याचा  धडा  या वाढदिवसाच्या भेटवस्तुंनी  शिकवला …नि  स्वत:च्या  वाढदिवसाची  खरेदी  स्वत:च  करायची  सवय  लागली…

 

लेकीच्या बालपणाबरोबर  मात्र  बालपणाने  पुन्हा आयुष्यात प्रवेश केला…

तिचा  थाटाने  साजरा केलेला पहिला वाढदिवस…

ती  छान दिसावी  म्हणून  तिला टोचत असतानाही   तिला  घातलेले  महागडे  ड्रेस,

स्वत:च्या  लेकरांच्या  वाढदिवसांना  फारशी हौस न पुरवू  शकलेल्या  आजी-आजोबांनी  दिलेल्या  सोन्या-चांदीच्या  भेटवस्तू , काका, मामा, मावशी, आत्यांनी  दिलेल्या गिफ्ट्स, निमंत्रितांकडून  आलेले  आहेराचे  ढीग….

” सगळं तुझं तर आहे, तुला हवं ते तू जाऊन आण ” असं म्हणणा-या  नव-याने  स्वत: जाऊन  लेकीसाठी  आणलेल्या  भेटवस्तू….. या  सा-यांनी  आयुष्यातल्या  रिकाम्या  जागा  भरून  काढल्या…

 

तिच्या  वाढदिवसाला  शाळेत  वाटलेल्या  भेटवस्तू, अगदी  पेढेसुद्धा…

तिला  पाहिजे तसे घेतलेले कपडे, दागिने, वस्तू..

तिच्या  मित्र-मैत्रिणींना बोलावून  साजरे  केलेले  वाढदिवस…

आणि  दोस्त कंपनीकडून  मिळालेल्या  गिफ्ट्सनी  सुखावलेली  नि  त्यांना  कुशीत घेऊन  स्वप्नांच्या  राज्यात  माझ्यासारखीच सैर  करणारी  माझी  छकुली…!!

 

शिंप्याकडच्या  कपड्यांची जागा  ब्रॅंडेड वस्तुंनी  घेतली…  चिवडा-लाडुच्या जागी इडली, पावभाजी, पिझ्झा-बर्गर  आला.

वही, पेन्सिल, पेनाऐवजी  चकचकीत  कागदात  गुंडाळलेल्या  महागड्या  भेटवस्तू  आल्या…

…. पण  वाढदिवस  नि  भेटवस्तुंच्या  बाबतीतल्या  भावना  मात्रं  तिच्या  नि  माझ्या  अगदी  तशाच  होत्या…तरल..हळव्या..!!

 

दरम्यानच्या  काळात  आई-वडील, सासुसासरे यांचे  साठावे, पंच्याहत्तरावे वाढदिवस  साजरे करून  त्यांच्या  अख्ख्या आयुष्यात  कधीही  साज-या  न केलेल्या  वाढदिवसांचं उट्टं काढण्याचा  नि  त्यांना  मोठाल्या  भेटवस्तू  देऊन  त्यांच्या  ऋणातून मुक्त  होण्याचा  केविलवाणा  प्रयत्न  केला…

पण  त्यांनी  दिलेल्या  “रिटर्न गिफ्टने ”  अक्षरश:  चपराक मिळाली  नि  आमच्याऐवजी त्यांनीच  आमच्या  सा-या वाढदिवसांचं  उट्टं  भरून काढलं!!

 

काळ  फार  वेगाने  सरला..

वाढदिवसाला  भरभरून  आशीर्वाद  देणारे  अनेक  हात  काळाचं बोट  पकडून  दूरवर  निघून  गेले…

” हॅं…वाढदिवस   घरी  कसला  साजरा  करायचा  !! ”   या  वयाला  लेक  पोचलीय…

आता  बहीण -भाऊ, दीर -नणंद  यांच्या  मुलांच्या  मुलांचे म्हणजे नातवंडांचे   वाढदिवस  साजरे होतायत..

मी  आजी  म्हणून  त्यांना  उदंड  आशीर्वाद  देतेय…

 

” थीम  पार्टीज,  डेकोरेशन, चकाकणारे  भव्य हॉल,  “खाता किती खाशील  एका तोंडाने  ”  अशी  अवस्था  करून टाकणारी  विविध  क्युझिन्स… 

मुलांचा आनंद नव्हे तर  स्वत:ची प्रतिष्ठा  दाखवण्यासाठी  दिलेल्या  नि  घेतलेल्या  भेटवस्तू…. 

मुलाचे नि आईचे  वाढदिवसासाठी  घेतलेले  हजारोंच्या किंमतीतील ब्रॅंडेड  कपडे..

 

या  झगमगाटात  मला  मात्रं  दिसते  ती  माझी  माऊली..वर्षभर पैसे साठवून  लेकरांचा वाढदिवस  साजरा  करणारी….. रात्रभर  जागून  मुलांच्या वाढदिवसासाठी  बेसन भाजणारी…

नि  आपल्या  लेकराच्या  आनंदासाठी  भेटवस्तू  म्हणून  स्वत:कडच्या  चारच साड्यातील  एक  साडी  फाडून  कपडे  शिवणारी.. त्यागाची  मूर्ती…!!

 

आता  माझीही  पन्नाशी  सरलीय…

वाढदिवस  येतात  नि  जातात..

भेटवस्तुंचं  आकर्षण  कधीचच  विरलय … आहेत त्याच  वस्तू  अंगावर  येतात..

पण  तरीही   वाढदिवसाची  ओढ  मात्रं  आजही  वाटते…

…. कारण  त्यानिमित्तांने  कितीतरी  जीवलगांचे , सुहृदांचे  फोन  येतात.. शुभेच्छा  मिळतात..

आणि  आपण  आयुष्यात   केवढी माणसं   कमावली  याची  सुखद  जाणीव  होते…!!

 आपण  अंबांनींपेक्षाही  श्रीमंत  असल्याची  भावना  मनाला  शेवरीपेक्षा  तरल  करून  टाकते…

 

दिवसाच्या  शेवटाला  या  शुभेच्छारूपी  भेटवस्तुंना  कुशीत  घेऊन  मी  समाधानाने  पुढच्या  वाढदिवसाची  वाट पहात  झोपी  जाते…!!

 

लेखिका : सुश्री नीला महाबळ गोडबोले    

सोलापूर

प्रस्तुती : अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ व्याकरणाच्या रुक्षतेतील काव्य :: यास्मिन शेख – लेखक : श्री मुकुंद संगोराम ☆ प्रस्तुती – सौ. श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ व्याकरणाच्या रुक्षतेतील काव्य :: यास्मिन शेख – लेखक : श्री मुकुंद संगोराम ☆ प्रस्तुती – सौ. श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

यास्मिन शेख: 

व्याकरण तज्ज्ञ यास्मिन शेख वयाच्या शंभरीत पदार्पण करीत आहेत. त्यानिमित्त त्यांच्या सुहृदांचा एक मेळावा येत्या २१ जून रोजी पुण्यात आयोजित केला आहे.

भाषेवर प्रेम असणारे कुणीही व्याकरण या शब्दाभोवती असलेले नियमांचे जंजाळ सोडवण्याच्या फंदात पडत नाही. वयाच्या शंभीरत पदार्पण करत असलेल्या यास्मिन शेख यांच्यासाठी मात्र व्याकरण एखाद्या कवितेइतकं तरल असतं. गेली ७५ वर्षे व्याकरण हाच ध्यास असलेल्या यास्मिनबाईंना अजूनही या कवितेचा सोस आहे आणि तो त्या अगदी मनापासून लुटत असतात. नावामुळे झालेल्या घोटाळ्यांवर मात करत मातृभाषेवरील आपलं प्रेम अध्यापनाच्या क्षेत्रात राहून आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यातच धन्यता मानणाऱ्या यास्मिन शेख यांची कहाणी म्हणूनच इतरांहून वेगळी. मूळ नाव जेरुशा. वडील जॉन रोबेन. आई कोकणातली पेणची – पेणकर. म्हणजे जन्माने यहुदी (ज्यू). जन्मगाव नाशिक. वडील पशुवैद्या. सार्वजनिक बांधकाम खात्यात नोकरी; त्यामुळे सतत बदली. घरात पुस्तकांचा पेटारा भरलेला असायचा. सरकारी नोकरीत असल्यानं बदलीच्या प्रत्येक ठिकाणी प्रशस्त घरं. तिथं पुस्तक वाचनाचा लागलेला छंद, आजतागायत टिकून राहिला, याचं खरं कारण त्यांचं भाषेवरलं प्रेम.

वडिलांकडे हट्ट करून पुण्याच्या स. प. महाविद्यालयात बहिणीबरोबर प्रवेश मिळणं हा यास्मिनबाईंसाठी मैलाचा दगड होता. श्री. म. माटे यांच्यासारख्या प्राध्यापकाने त्यांच्यासाठी व्याकरणाचा मार्ग इतका सुकर केला की, व्याकरणाशीच त्यांची गट्टी जमली. इतकी की, बी.ए. ला संपूर्ण महाविद्यालयात सर्वाधिक गुण मिळवण्याचा मान मिळाला. के. ना. वाटवे यांच्यासारख्या गुरूनं भाषाशास्त्राचे धडे दिले आणि आपल्या मातृभाषेच्या व्याकरणाच्या त्या प्रेमात पडल्या. पुढे मुंबईत अध्यापनाला सुरुवात झाल्यावर खरा गोंधळ सुरू झाला, तो नावावरून. दरम्यान नाशिकलाच अझीझ अहमद इब्राहीम शेख यांच्याशी विवाह झाला आणि यास्मिन शेख हे नाव धारण केलं. ज्यू आणि मुस्लीम असा हा आंतरधर्मीय विवाह. पण यास्मिनबाईंशी गप्पा मारताना, या धार्मिकतेचा लवलेशही जाणवत नाही. लहानपणापासून ह. ना. आपटे वाचतच मोठे झाल्याने भाषेचे सगळे संस्कार अस्सल मऱ्हाटी. मुंबईत दरवर्षी महाविद्यालयाच्या पहिल्या दिवशी वर्गाच्या दिशेने येताना दिसताच दोन-तीन विद्यार्थी वर्गाबाहेर यायचे आणि म्हणायचे… धिस इज नॉट अॅन इंग्लिश क्लास, धिस इज लॉट अ फ्रेंच क्लास… हा मराठीचाच वर्ग आहे ना? असं विचारत जेव्हा त्या वर्गात शिरत, तेव्हा विद्यार्थी चकित होत. मुसलमान बाई शिकवायला येणार म्हणून साशंक झालेले विद्यार्थी शिकवायला सुरुवात करताच एकमेकांकडे आश्चर्यानं बघायचे. यास्मिनबाईंना त्यांचा राग यायचा नाही, पण दु:ख वाटायचं. भाषेला धर्म नसतो. तुम्ही ज्या राष्ट्रात जन्माला येता, वाढता, त्या राष्ट्राची भाषा तुमचीही मातृभाषा असते. त्या म्हणतात : मी एकच धर्म मानते – मानवता… सर्वधर्मसमभाव.

यास्मिनबाई म्हणतात की, कोणतीही भाषा मुळात ध्वनिरूप असते. त्याहीपूर्वी हातवाऱ्यांच्या साह्याने एकमेकांशी संवाद साधला जात असे. ध्वनिरूपातूनच बोली तयार होते आणि बोली तर विरून जाणारी. ती टिकवण्यासाठी लिपीचा जन्म. शब्द, त्यांची रूपं, त्यातून तयार होणारी वाक्यं, त्यांची रचना, यातून एक नियमबद्धता येत गेली. मराठी भाषेत तर ब्रिटिश येईपर्यंत व्याकरणाचा सुस्पष्ट विचार झालेलाच नव्हता. त्या काळातील संस्कृतज्ज्ञ दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना ब्रिटिशांनी मराठी व्याकरणाचं सुसूत्रीकरण करण्याची सूचना केली खरी, पण त्यांचा आदर्श होता, संस्कृत वैय्याकरणी पाणिनी. तर्खडकरांनी संस्कृत वर्णमाला जशीच्या तशी स्वीकारली. त्यामुळे मराठीत ज्याचे उच्चारही होऊ शकत नाहीत, असे वर्ण लिपीत आले. ती केवळ चिन्हंच राहिली. प्रमाण भाषा ही एक संकल्पना आहे. प्रमाण भाषेबद्दल विनाकारण उलटसुलट मतप्रवाह तयार झालेले दिसतात. यास्मिन शेख यांच्या मते औपचारिक, वैज्ञानिक, वैचारिक लेखनासाठी प्रमाण भाषा उपयोगात आणणं आवश्यक आहे. हे लेखन पुढील पिढ्यांसाठी टिकवून ठेवायचे असेल, तर त्यासाठी प्रमाण भाषेचा आग्रह सर्वांनीच धरायला हवा. पण मी जसं बोलतो, तसंच लिहिणार, असा हट्ट चुकीचाच आहे. कथा, कादंबरी यांसारख्या ललित लेखनासाठी प्रमाण भाषेचा आग्रह धरता कामा नये. बोली भाषेचे लिखित स्वरूप धारण करून असे लेखन केले जाते. त्यात त्या भाषेच्या, त्या भाषक समूहाच्या, तेथील व्यक्तींच्या भावभावनांचा उद्गार असतो. त्यामुळे प्रमाण भाषेमध्ये केवळ मराठी शब्दांचाच आग्रह धरायला हवा. इंग्रजी शब्दांचा सोस सोडून आपल्या भाषेतील शब्दांचा उपयोग करण्यावर भर दिला, तरच ती भाषा अधिकाधिक समृद्ध होत जाईल.

१९६० साली महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर मराठी भाषा आणि साहित्य यांच्या संदर्भात कार्य करणाऱ्या तज्ज्ञांची एक समिती स्थापन करण्यात आली. ती समिती म्हणजेच मराठी साहित्य महामंडळ. मराठी लेखनात एकसूत्रीपणा यावा, शासकीय लेखन व्यवहारात मराठीचा अचूक वापर व्हावा, यासाठी या समितीला मराठी लेखनविषयक नियम नव्याने निश्चित करण्याचं काम सोपवण्यात आलं. अशा १४ नियमांची यादी १९६२ मध्ये शासनाने स्वीकारली. १९७२ मध्ये त्यात आणखी चार नियमांची भर घालून नवे नियम सिद्ध केले. या नियमांचे स्पष्टीकरण देणारे पुस्तक यास्मिन शेख यांनी सरोजिनी वैद्या यांच्या सांगण्यावरून तयार केले. त्याबरोबरच ‘मराठी शब्दलेखनकोश’ सिद्ध केला. मुद्दा प्रमाण भाषेचा आणि त्याच्या वापराचा आहे. आणि सध्याची भाषेची अवस्था भयानक म्हणावी अशी असल्याचं यास्मिनबाईंचं स्पष्ट मत आहे. इंग्रजी शाळांच्या स्पर्धेत मराठी शाळा ओस पडू लागल्याची खंत व्यक्त करतानाच यास्मिन शेख यांना या परिस्थितीला आपण सारे कारणीभूत आहोत, असं वाटतं. मराठी माणसंच मराठी भाषेची, लिहिताना आणि बोलतानाही दुर्दशा करतात. माहात्म्य ऐवजी ‘महात्म्य’, दुरवस्था ऐवजी ‘दुरावस्था’, घेऊन ऐवजी ‘घेवून’ असं लिहितात. ‘माझी मदत कर’, असं म्हणतात. दूरचित्रवाणीवरील मराठी वाहिन्यांवरचा मराठीचा वापर तर अगणित चुकांनी भरलेला असतो. इंग्रजी भाषेतून जे शब्द मराठीनं स्वीकारले आहेत, त्याला विरोध असण्याचं कारण नाही. मात्र मराठी शब्द उपलब्ध असतानाही इंग्रजीचा अतिरिक्त वापर करणं योग्य नाही… आज जे कुणी ‘मराठी असे आमुची मायबोली’, असा घोष करत असतील, त्यांच्यापर्यंत ही कळकळ पोहोचणं अधिक महत्त्वाचं आणि उपयुक्त आहे.

वयाच्या शंभरीत प्रवेश करतानाही स्मरणशक्ती टवटवीत असलेल्या आणि अजूनही नवं काही करण्याच्या उत्साहात असलेल्या यास्मिन शेख यांनी अनेक विद्यार्थ्यांना मराठी व्याकरणाची गोडी लावली. ‘बाई, तुम्ही व्याकरण, भाषाशास्त्र आमच्या तळहातावर आणून ठेवलंत’… असं म्हणत यास्मिन शेख यांचे आभार मानणारा विद्यार्थीवर्ग हे त्यांच्या जगण्याचं फलित आणि संचित. शंभराव्या वर्षातही स्वत:च्या हातानं कागदावर लेखन करण्यात त्यांना कमालीचा आनंद मिळतो, जगण्याचं नवं बळ मिळतं. व्याकरणाची कविता करत करत शतायुषी होणाऱ्या यास्मिनबाईंना मनापासून शुभेच्छा ! 

लेखक : मुकुंद संगोराम 

प्रस्तुती – सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 9403310170, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ BE PRACTICAL! – लेखक – अज्ञात ☆ संग्राहक – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

सौ.शशी.नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

☆ BE PRACTICAL! – लेखक – अज्ञात ☆ संग्राहक – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

“चिटी  चावल  ले  चली,

बीच  में  मिल  गई  दाल।

कहे  कबीर  दो  ना  मिले,

इक ले , इक डाल॥”

अर्थात :

मुंगी तांदळाचा दाणा घेऊन आनंदाने निघाली. पण तितक्यात वाटेत तिला डाळीचाही दाणा दिसला. मुंगी मनात म्हणाली, ‘क्या बात है  देवा! तू भाताची सोय केलीच होतीस , आता वरणाचीही सोय झाली.’ पण एकावेळी दोन्ही दाणे उचलणे मु़ंगीला शक्य नसल्यामुळे ती खिन्न झाली.

तेव्हा कबीर म्हणाले, ‘वेडाबाई! तुला दोन्ही गोष्टी नाही मिळणार. तुला भात हवा असेल, तर वरणाचा त्याग करावा लागणार आणि वरण हवे असेल, तर भाताचा त्याग करावा लागणार.’

तांदळाचा दाणा गवसल्यावर अतिशय आनंदाने, समाधानाने व लगबगीने आपल्या वारुळाच्या दिशेने निघालेल्या मुंगीचा आनंद व समाधान डाळीने हिरावून घेतलं.

माणसाचंही तसंच आहे. जोवर समोर विकल्प उपलब्ध नसतो, तोवर माणूस आहे त्या गोष्टीत समाधानी असतो. पण विकल्प निर्माण झाले, की ते त्याचा आनंद आणि समाधान क्षणात हिरावून घेतात.

साधं मोबाईलचं उदाहरण घ्या ना! एखादी व्यक्ती बचत करुन कसाबसा आवडीचा मोबाईल घेते, नि आठवडाभरातच त्याचं लेटेस्ट मॉडेल बाजारात येतं आणि त्याने घेतलेल्या मोबाईलचा आनंद, एका आठवड्यातच संपुष्टात येतो. तो मनाशी म्हणतो, ‘इतके दिवस थांबलो होतोच, आणखी आठवडाभर थांबलो असतो, तर काय बिघडलं असतं!’

विकल्प माणसाच्या डोक्यात बिघाड निर्माण करतात. हे मर्म लक्षात घेऊन शोषण,शासन व्यवस्था विकल्पांची लयलूट करतात.

ती बघून, ‘घेशील किती दोन करांनी’  अशी माणसाची अवस्था होते. त्याचं डोकं काम करेनासं होतं. अशी माणसं शोषण,शासन व्यवस्थांसाठी हाकायला खूप सोपी पडतात.

पूर्वी आजोबा-पणजोबांच्या काळातल्या वस्तूही, पुढील पिढ्या आनंदाने वापरत. त्यांना त्या जुन्या वाटत नसत. कारण तेव्हा इतके विकल्प नव्हते. (आणि ऐपतही नव्हती.)

आज असंख्य विकल्पांनी, वस्तूंचा जुन्या होण्याचा कालावधीच क्षणिक करुन टाकला आहे. परिणामी लोक चांगल्या वस्तूही भंगारात टाकू लागले आहेत.

भौतिक वस्तूंचा हा नियम मानवी नातेसंबंधांनाही लागू झाला आहे, कारण माणूसही भौतिकच आहे. नातं, मैत्री यांची नाळही, कधी नव्हे इतकी कमजोर झाली आहे.

देवाने माणसाला दोन हात दिलेत, ते दोन्ही हातांनी गोळा करावे म्हणून नाहीत, तर एका हाताने घ्यावं आणि दुस-या हाताने द्यावं, यासाठी आहेत. नुसतंच घेत राहिल्याने एकूणच असमतोल निर्माण होतो. मानवी जीवनातील अरिष्टास तो कारणीभूत ठरतो.

म्हणून देवघेव सुरु राहिली पाहिजे. देवघेवीमुळे समतोल तर टिकून राहतोच, माणसाचं समाधान आणि आनंदही त्यामुळे टिकाऊ बनतो.

कबीरांच्या या दोह्यात असा मोठा अर्थ दडला आहे.

चला तर मग आनंदी जगूया.  

लेखक :अज्ञात

प्रस्तुती :सौ. शशी नाडकर्णी- नाईक   

फोन  नं. 8425933533

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ असाही एक वड… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? विविधा ?

असाही एक वड ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

(आणि त्या निमित्ताने वटपौर्णिमे संबंधित विचार..)

वटपौर्णिमेला वडाची पूजा करताना स्त्रिया नवऱ्यासाठी आयुष्याचे आणि स्वतःच्या सौभाग्याचे दान मागत असतात.मी जिथे रहात असे तिथे जवळपास वडाचे झाड नव्हते.म्हणून प्रथम आम्ही वडाची फांदी आणून पूजा करत असू, पण ती गोष्ट मनाला अजिबातच पटत नव्हती!  ज्या झाडाची पूजा करायची त्याचीच फांदी तोडून आणायची! म्हणून ते करणं बंद केलं.. त्यानंतर समोरच्या देवळात एक भटजी  कुंडीमध्ये फांदी घेऊन बसत असे तिथे जाऊन आम्ही पूजा करू लागलो.कुणाकडे तरी बोन्साय वड ही होता.त्या घरची बाई त्याची पूजा कौतुकाने करत असे.आणि आपण कसं घराबाहेर सुध्दा पडत नाही याचंच तिला भारी वाटत असे.ते लोकांना सांगण्यात तिला आनंद मिळे!

नंतर काही दिवसांनी कोपऱ्यावरच्या पानपट्टी जवळ एक वडाचे रोप उगवले होते .पानपट्टी वाल्याने त्याची जोपासना करून ते रोप वाढवले.कारण त्याच्या टपरीवर सावली यावी म्हणून!ते बऱ्यापैकी मोठे झाल्यावर बायका वडाच्या पूजेसाठी तिथे येऊ लागल्या.कारण ते ठिकाण सोयीचे होतं! पानपट्टी वाल्याने स्वतःच्या दुकानात वडाच्या पूजेला लागणारे साहित्य पण ठेवले. त्यात त्याचाही फायदा होता. पहिला जो भटजी होता तो आता तिथे येऊन बसू लागला आणि बायका जे काही वडाजवळ ठेवत ते सगळं तो स्वतःला घेत असे.ते उत्पन्न बऱ्यापैकी वाढल्यावर पानपट्टी वाल्याला थोडा लोभ सुटला. त्यालाही वाटले, हे झाड मी लावले, सावलीसाठी वाढवले आणि आता या झाडाच्या वटपौर्णिमेच्या उत्पन्नात  मला ही  वाटा पाहिजे. दोघांमध्ये छोटंसं भांडण ही झालं! शेवटी काही मोठ्या लोकांनी त्या दोघात कॉम्प्रमाईज केलं आणि त्या दिवशी येणारं सगळं उत्पन्न दोघांनी वाटून घ्यावे असे ठरले. दुसऱ्या वर्षी भटजी आणि पानपट्टी वाला दोघेही त्या वडाजवळ तासन् तास थांबत असत .येणाऱ्या बायका भटजीचे पायावर डोकं ठेवत आणि त्याला फळे,दक्षिणा देत. आणि झाडाजवळ ठेवलेले विडे आणि फळं ,पैसे हे सगळं पानपट्टी वाला घेत असे. दोघांचं भांडण तर मिटलं! पण पुढील विचार मनात आले!

वटपौर्णिमेचा हेतू काय? त्यामुळे मिळणाऱे उत्पन्न असे कितीसे असणार? सत्यवान -सावित्री ची कथा किती जणी वाचतात.त्यातील मूलभूत अर्थ काय! आम्हाला इंग्रजी विषयात SAVITRI हे epic अभ्यासाला होते.तेव्हा योगी अरविंद ह्यांना त्यांत अभिप्रेत असलेला जीवनासाठी चा अर्थ  समजून घेण्याचा प्रयत्न केला.पूर्वीच्या काळी स्त्रियांना घराबाहेर पडायला मिळत नसे, त्यामुळे वटपौर्णिमेची पूजा करण्यासाठी स्त्रिया निसर्गात जात असत. बरेच वेळा वड- पिंपळासारखे वृक्ष गावाबाहेर, रानामध्ये असत. तिथे जाऊन पूजा करून येण्यात मोठा आनंद मिळे. आपल्या हिंदू धर्मामध्ये बऱ्याचशा गोष्टी या धार्मिकतेशी  जोडल्या असल्यामुळे त्या सातत्याने केल्या जात असत. त्यामध्ये धार्मिक, सामाजिक असा सर्व प्रकारचा आनंद घेता येत असे.  आत्ताच्या काळात त्याकडे एक इव्हेंट म्हणून पाहिले जाते. काही का होईना, त्यानिमित्ताने तरुण पिढीला आनंदही मिळतो आणि परंपरा राखण्याचे समाधानही मिळते! स्त्रियांना नटून थटून वडाला जाण्यात तसेच डाएट म्हणून उपवास करण्यातही  वेगळा feel घेता येतो!

शेवटी काय, जीवन आनंदात जगणे हेच सगळ्याचे मूलभूत तत्व आहे. ते सांभाळून आपण आपले सांसारिक जीवन, समाजामधील स्थान या सगळ्या गोष्टी टिकवू शकतो. अलीकडे स्त्रियांना नोकरी, व्यवसाय यामुळे स्वतःच्या आनंदाला बरेच वेळा मुरड घालावी लागते, पण अशा काही परंपरा जोपासताना नकळत हा आनंद त्यांना घेता येतो. मग उगीचच आपल्याला उपास आणि वडपोर्णिमा या अंधश्रद्धा वाटतात असं म्हणण्यात काय बरं अर्थ आहे!

आणि तसेही हे व्रत आपल्या आवडत्या माणसासाठी, नवऱ्यासाठी असेल तर स्त्रियांनी ते जरूर  करावे.

म्हणजे नवराही -सत्यवान ही वडाजवळ चपला सांभाळायला आणि नटलेल्या, सजलेल्या बायकोला पूजा करताना बघायला कौतुकाने येतोच ना!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “बोललं पाहिजे…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

? मनमंजुषेतून ?

☆ “बोललं पाहिजे” ☆ श्री मंगेश मधुकर 

घड्याळात रात्रीचे साडे आठ वाजलेले पाहून आशानं ताबडतोब फोन केला पण अंजूनं उचलला नाही.इतक्यात दारावरची बेल वाजली. 

“सकाळी सातला गेलेली आत्ता उगवतेस.”

“आई,रोजचाच प्रश्न विचारून डोकं पिकवू नकोस.महत्वाचं काम होतं म्हणून उशीर झाला.”

“चकाट्या पिटणं हे महत्वाचं काम नाहीये.”सुरेश कडाडल्यावर बापलेकीत जुंपली.

कॉलेजला जायला लागल्यापासून अंजूचं घराबाहेर राहण्याचं प्रमाण वाढलं. सकाळीच जाणारी अंजू रात्री आठ पर्यंत यायची.आल्यावर सुद्धा फोनवर बोलणं चालूच. मैत्रिणी, मित्र आणि मोबाईल यातच गुंग.घरात अजिबात लक्ष नाही.सगळी कामं आशाच करायची.अंजूच्या बेफिकीर वागण्याची आशाला काळजी वाटत होती.खूपदा समजावलं पण काहीही उपयोग नाही.एकीकडे लेकीचं असं वागणं तर नवऱ्याची दुसरीच तऱ्हा. .घरात पैसे देण्याव्यतिरिक्त कोणतीच जबाबदारी घेत नव्हता, मात्र जरा काही मनाविरुद्ध झालं की वाट्टेल ते बोलायचा.चिडचिड करायचा.अंजूच्या वागण्याविषयी दोष द्यायचा.आशा सगळं निमूट सहन करत होती.

सुरेश आणि अंजूमध्ये वाद तर रोजचेच. त्यासाठी कशाचंही निमित्त पुरायचं.घरातल्या कटकटी वाढल्या. दोघंही आपला राग आशावरच काढायचे.नवरा आणि मुलीच्या एककल्ली वागण्याचा प्रचंड ताण आशावर होता.सहन होईना अन सांगता येईना अशी अवस्था. सगळे अपमान,अवहेलना ती आतल्याआत साठवत होती. मनमोकळं बोलावं असं तिच्या आयुष्यात कोणीच नव्हतं. शेजारी राहणाऱ्या मंगलबरोबर आशाची छान गट्टी जमायची, पण सहा महिन्यापूर्वी मंगल दुसरीकडं रहायला गेली अन आशा पुन्हा एकाकी झाली.हळूहळू तिनं बोलणं कमी केलं.फक्त विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं द्यायची.घरात भांडणं सुरु झाली की कोरड्या नजरेनं पाहत बसायची. मनावरच्या ताणाचे परिणाम दिसायला लागले.तब्येतीच्या तक्रारी सुरू झाल्या.निस्तेज चेहरा,डोळ्याखाली काळी वर्तुळ जमा झाली. खाण्या-पिण्यातलं लक्ष उडालं.वजन कमी झालं.खूप दिवसांची आजारी असल्यासारखी दिसायला लागली.आशामधला बदल आपल्याच धुंदीत जगणाऱ्या सुरेश आणि अंजूच्या  लक्षात आला नाही.आशानं सूड म्हणूनच स्वतःकडे दुर्लक्ष केलं.

एके दिवशी नेहमीसारखी बापलेकीत वादावादी चालू असताना किचनमधून ‘धाडकन’ पडल्याचा आवाज आला.अंजून पाहिलं तर जमिनीवर पडलेली आशा अर्धवट शुद्धित अस्पष्ट बोलत होती.लगेच हॉस्पिटलमध्ये नेलं. सगळ्या तपासण्यांचे रिपोर्ट नॉर्मल आले.तीन दिवसांनी घरी सोडलं पण तब्येतीत फारसा फरक नव्हता.डॉक्टरांनी औषधं बदलली पण उपयोग नाही.खरंतर आशाला वैफल्य आलेलं.हताश,निराश मनस्थितीमुळे तब्येत सुधारत नव्हती.नाईलाजाने का होईना सुरेश,अंजू काळजी घेत होते, तरी आपसातली धुसफूस चालूच होती.आशाची ही अवस्था आपल्यामुळेच झालीय याची जाणीव दोघांना नव्हती. मन मारून जगणाऱ्या आशाचा त्रास समजून घेणारं कोणीच नव्हतं.वेदना बाहेर पडायला जागा नसल्यानं दिवसेंदिवस आशाची तब्येत खालावत होती. 

वरील घटनेतील ‘आशा’ हे एक प्रातिनिधिक उदाहरण. तिच्यासारखंच  मानसिक ओझं घेऊन जगणारे अनेकजण आहेत. 

नुकताच पावसाळा सुरू झालाय.धो धो कोसळणारं पाणी वाट मिळेल तिथून पुढे सरकते पण तेच पाणी नुसतंच साठत राहिलं तर ??? अनर्थ होईल –. तोच निकष मनाला लागू पडतो.

रोज अनेक गोष्टींना सामोरं जाताना अनेकदा मनाविरुद्ध वागावं लागतं.अपमान सहन करावे लागतात.राग,संताप गिळून गप्प बसावं लागतं.नोकरदारांना तर हा अनुभव रोजचाच.या सगळ्या तीव्र भावना मनात साठल्या जातात.अशा नकारात्मक भावनांचा साठा वाढत जातो.वेळच्या वेळी निचरा होत नाही.ताणामुळे शारीरिक त्रास सुरू होतात.

पूर्वी मन मोकळं करण्यासाठी नातेवाईक,शेजारी,मित्र-मैत्रिणी अशी जिवाभावाची माणसं होती.एकमेकांवर विश्वास होता.त्यांच्याबरोबर बोलल्यानं मन हलकं व्हायचं.एकमेकांची अनेक गुपितं बोलली जायची.सल्ला दिला घेतला जायचा.थोडक्यात मनातला कचरा वेळच्या वेळी काढला जायचा.आता सगळं काही आहे– फक्त मनातलं बोलायला हक्काचं माणूस नाहीये.सुख-सोयी असूनही मन अस्थिर.आजच्या मॉडर्न लाईफची हीच मोठी शोकांतिका. बदललेली कुटुंबपद्धती,फ्लॅट संस्कृती आणि मी,मला,माझं याला आलेलं महत्त्व .. .यामुळे कोणावर पूर्णपणे  विश्वास ठेवणं अवघड झालंय.मनातलं बिनधास्त बोलावं अशा जागा आता नाहीत.खाजगी गोष्टी सांगितल्यावर त्याचा गैरफायदा तर घेतला जाणार नाही ना?या शंकेनं मनातलं बोललंच जात नाही.मनाची दारं  फ्लॅटप्रमाणे बंद करून मग तकलादू आधार घेऊन जो तो आभासी जगासोबत एकट्यानं राहतोय.खूप काही बोलायचंय पण विश्वासाचा कान मिळत नाही.

— 

रोजचा दिवस हा नवीन,ताजा असतो.आपण मात्र जुनी भांडणं,टेन्शन्स,चिंता,मतभेद यांना सोबत घेऊन दिवसाला सामोरे जातो.शिळं,फ्रीजमधलं दोन-तीन दिवस ठेवलेलं अन्न खात नाही परंतु वर्षानुवर्षे मनात अपमान,राग,वाद जपून ठेवतो.संबधित व्यक्ती अनेक वर्षानंतर जरी भेटली तरी साऱ्या कटू आठवणी लख्खपणे डोळ्यासमोर येतात.भावना तीव्र होतात.राग उफाळून येतो आणि स्वतःलाच त्रास होतो.विचारात लवचिकता आणली तर कोणत्या गोष्टीला महत्व द्यायचं आणि काय सोडून द्यायचं हे ठरवता येतं.

इतरांच्या वागण्याचा स्वतःला त्रास करून घेणं…. सोडून द्या 

क्षुल्लक गोष्टींचे ताण घेणं…. सोडून द्या 

ऑफिसचं टेंशन घरच्यांवर काढणं….  सोडून द्या 

विनाकारण राग,द्वेष करणं ….  सोडून द्या 

इतरांचं वागणं नियंत्रित करू शकत नाही.तेव्हा….  सोडून द्या 

सगळंच नेहमी मनासारखं होणार नाही तेव्हा….  सोडून द्या. 

सर्वात महत्वाचे,

आजचं जग फार प्रॅक्टिकल आहे.वारंवार इमोशनल होणं… सोडून द्या 

आयुष्यात असं कोणीतरी असलं पाहिजे,ज्याच्याशी मनातलं सगळं बिनधास्त बोलता येतं 

हे वाचताना ज्याची आठवण झाली तोच तुमचा जिवलग.हे नक्की… त्याच्याशी बोला.वेळच्या वेळी भावनांना वाट करून द्या . .साठवण्यापेक्षा बोलून मोकळं व्हा.

पाणी आणि मनभावना वाहत्या असल्या तरच उपयोगी नाहीतर..

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ तीन हजार बाहुल्यांशी खेळणारी मोठी मुलगी ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ तीन हजार बाहुल्यांशी खेळणारी मोठी मुलगी ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

ती इंदूर मध्यप्रदेशात एका सामान्य कुटुंबात जन्मली आहे… आता एकतीस वर्षांची आहे…दीड वर्षापूर्वी लग्न झालेय….आणि अजून ती आई झालेली नाही. घरात अजून तसं एवढं लहान मूल नाहीये की जे बाहुलीशी किंवा तत्सम खेळण्यासाठी अडून बसेल. पण तरीही ती कुणाकडून न कुणाकडून अगदी नियमितपणे आणि हट्टाने एक तरी बाहुली मागते! राखी बांधल्याबद्दल भावाकडून घसघशीत ओवाळणीही वसूल करते!  

तिचा आवाज मुळातच अगदी गोड आहे. लहानपणापासून तिने हा आवाज सांभाळला आहे. आणि योग्य ठिकाणी वापरलाही आहे. अवघी चार वर्षांची असताना कल्याणजी आनंदजी यांच्या लिटल स्टार कार्यक्रमाची ती एक महत्वाचा भाग झाली होती.  आणि हो, ती गाणीही लिहिते शाळकरी वयात असल्यापासून. १९९९ मध्ये कारगिल युद्ध झाले तेंव्हा ती केवळ सात वर्षांची होती. तिला कुठूनतरी समजले की भारतीय सैन्यदलास आर्थिक हातभार लावला पाहिजे. तिनेही आपला खारीचा वाटा उचलायाचा ठरवला. आणि मग ती सैनिक निधीसाठी  तिच्या शहरातील तिच्या गल्लीतील प्रत्येक दुकानापुढे जाऊन गाणी म्हणू लागली…यात देशभक्तीपर गीते अधिक होती. हा गाण्याचा सिलसिला एक आठवडाभर चालला.  लोकांनी कौतुकाने तिची इवलीशी झोळी भरली…तब्बल पंचवीस हजार रुपये जमले! १९९९ मध्येच ओडीशा राज्यात भयावह चक्रीवादळ आले होते…या वादळग्रस्त लोकांना हिने गाणी म्हणूनच निधी जमा करून दिला. बालवयात बाहुलीशी खेळण्याचे सोडून ही मुलगी आणि तिचा धाकटा भाऊ समाजासाठी काम करू लागले होते.  २००१ मध्ये गुजरातेत आलेल्या भूकंपातील पिडीत लोकांसाठीही तिने पैसे जमवले. एका पाकिस्तानी मुलीच्या उपचारांसाठीही तिने अशीच मदत मिळवून दिली. 

ती शाळेत गायची,पुढे कॉलेजात गेल्यावर तर तिचा गळा जास्तीच बहरला. तिच्या भावालाही गाण्याची आवड होती. दोघांनी मिळून कॉलेज गाजवले. 

एका रेल्वेप्रवासात काही मुले त्यांच्या अंगावरील कपड्यांनी रेल्वेत साफसफाई करून भीक मागताना तिने पाहिले…या मुलांसाठी काहीतरी केले पाहिजे…असे तिला वाटून गेले. ती ज्या शाळेत शिकली होती त्या शाळेतील एका गरीब मुलाला ह्रदयरोग झाला. उपचारांसाठी प्रचंड खर्च येणार होता आणि चपलांचे दुकान चालवणारे पालक हा खर्च करू शकणार नव्हते. शाळेने हा खर्च देणगी स्वरूपात जमा करण्यासाठी हिला गाशील का? असे विचारले. शहरातील एका चौकात साध्या हातगाडीवर उभे राहून ही पोर आणि तिचा भाऊ बेफाम गायले आणि फार नाही पण चतकोर रक्कम जमा झाली. पण या कार्यक्रमाबद्दल एका हृदयरोग तज्ज्ञाने ऐकले आणि त्यांनी ही शस्त्रक्रिया मोफत करून दिली. गाता गळा आणि श्वास घेणारं हृदय यांची एकमेकांशी गाठ पडली होती…! हिच्या शहरात अशी आणखी ३३ बालके असल्याचे लक्षात आले. आणि यांच्यासाठीही काही करावे लागेल…असा तिने निश्चय केला.  तिने सलग कार्यक्रम करून तब्बल सव्वा दोन लाखाचा निधी जमा केला आणि दान केला! पलक मुछाल नावाची ही मुलगी. तिचा भाऊ पलश तिच्यासोबत गातो. हे दोघे मिळून हृदयरोगी आणि किडनी संबंधी आजार असलेल्या मुलांसाठी आपली बरीचशी कमाई दान करतात…पलक मुछाल हार्ट फाउन्डेशनच्या माध्यमातून हा कारभार पाहिला जातो.  नाममात्र शुल्कात शस्त्रक्रिया करणारे अनेक डॉक्टर्स, अगदी जरुरीपुरतीच फी आकारणारी रुग्णालये तिच्या मदतीला धावून येतात…समाजात कणव असते…ती जागी करण्याचे काम पलक च्या स्वरांनी केले…ही कलेची खरी ताकद. पलक निधी गोळा करण्यासाठी देशात परदेशातही कार्यक्रम करते…दिल से दिल तक….सेव दी लिटल हार्ट नावाचा तिचा उपक्रम आहे.  

पलकचा  गाता गळा पुढे मुंबई हिंदी चित्रपट सृष्टीतही ऐकू येऊ लागला आणि प्रसिद्धही झाला. महेंद्रसिंग धोनीच्या जीवनावर आधारीत चित्रपटातील हिचे गाणे खूप वाहवा मिळवून गेले. आणि मग हिने मागे वळून पाहिले नाही. पैसा आणि प्रसिद्धी यांचा ओघ सुरू झाला.  ही पोरगी थोड्या थोडक्या नव्हे तर सतरा भाषांत गाऊ 

शकते….हिंदी,संस्कृत,गुजराथी,ओडिया,आसामी,राजस्थानी,बंगाली,भोजपुरी,पंजाबी,मराठी,कन्नड,तेलगु,तमिळ,सिंधी आणि मल्याळम!

हृदयशस्त्रक्रिया सुरु असताना पलक ऑपरेशन थिएटर मध्ये सर्जिकल गाऊन घालून उभी राहते…तिने तशी खास परवानगी मिळालेली आहे…आणि ती शस्त्रक्रिया पूर्ण होईपर्यंत तिथे प्रार्थना म्हणत उभी राहते….शुद्ध मन, गोड आवाज आणि ईश्वराचे नाव…असा त्रिवेणी संगम होतो! आजपर्यंत ह्या बहीण-भावाने मिळून सुमारे तीन हजार पेक्षा जास्त बालरुग्णांना साहाय्य केले आहे…..हे सर्व केल्यावर पलक फक्त एकच बक्षीस मागते…एक छानशी बाहुली! लहानपणी तिने खेळातल्या बाहुलीचा हात  सोडून जिवंत लेकरांचा हात हाती घेतला होता…त्याची ही छोटीशी भरपाई ती करत असावी….आणखी थोडी मोठी झाल्यावर पलक या तीन हजार बाहुल्यांचा जाहीर लिलाव केला आणि त्यातून आलेली रक्कम मुलांसाठी वापरली!  कुठल्याही मुलीने बाहुलीचा असा उपयोग केल्याचे हे बहुदा पहिलेच उदाहरण असावे! 

सकारात्मक काही वाचले की ते तुमच्यापर्यंत पोहोचवावेसे वाटते..म्हणून हा उद्योग. आपल्या आसपासही अशी माणसं असतील की जी इतरांसाठी काही करतात…त्यांच्या पाठीशी शुभेच्छा,आशीर्वाद आणि पाठिंब्यानिशी उभे राहणे आपले कर्तव्यच ठरते. भले पैसा नाही देता आला तरी चालेल! पण चांगल्या गोष्टी किमान लोकांना सांगण्याचे काम करीत गेले पाहिजे..असे वाटते. कारण…जगात अशी खूप सुंदर माणसे आहेत…पलक सारखी…जी जीवन गाणे गात असतात! 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ भाऊसाहेबांची शायरी… ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ भाऊसाहेबांची शायरी… ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

प्रत्येक गावाची कलाक्षेत्राशी निगडीत एक विशीष्ट ओळखं असते. किंबहुना काही बहुआयामी प्रसिद्ध व्यक्तीमत्वाच्या व्यक्तींमुळे त्या गावाला एक वलय प्राप्त होतं. ते गाव जणू त्या कलाकारांमुळं प्रसिध्दीस येत. गावाचं नाव डोळ्यासमोर येताच आधी त्या कलाबाज व्यक्ती डोळ्यापुढं येऊन उभ्या ठाकतात.

माझे माहेर यवतमाळचे.यवतमाळच्या सुप्रसिद्ध व्यक्तींमधील एक मोती म्हणजे शायरीकार भाऊसाहेब पाटणकर. खरतरं “पिकतं तिथं विकत नाही”ही म्हण एकदम आठवली कारण यवतमाळात राहून सुध्दा भाऊसाहेब इतके कमालीचे शायरीकार होते हे उमगायलाच मुळी खूप कालावधी लागला. काही वेळेस आपल्याला त्यांच्या साहित्याची पूर्ण माहिती होईपर्यंत खरच खूप कालावधी निघून जातो.

श्री. वासुदेव वामन पाटणकर उर्फ भाऊसाहेब पाटणकर हे व्यवसायाने वकील, छंद शिकारीचा आणि अफलातून निर्मिती मराठी गझल व शायरींची. खरचं असा गुणांचा त्रिवेणी संगम त्यांच्यात एकवटला होता. भाऊसाहेबांचा जन्म 29 डिसेंबर 1908 चा व मृत्यू  20 जून 1997. वीस जून हा  त्यांचा स्मृतीदिन. त्यांना विनम्र अभिवादन. त्यांच्या गझल,शायरी बद्दल कितीही लिहीलं तरी कमीच. प्रामुख्याने त्यांची शायरी शुंगार,इष्क,जीवन,विनोद, मृत्यू ह्या संकल्पनांवर आधारित असायची.

सगळ्यात पहिले तर त्यांची शायरी समजून घ्यायची म्हणजे वाचक हा जिंदादिल हवाच ही त्यांची आंतरिक ईच्छा. त्यासाठी ते लिहीतात,

“उन्मेष ज्यांच्या यौवनाचा काहीच ना झाला कमी,

प्यायले जे खूप ज्यांना वाटे परी झाली कमी,

निर्मिली मी फक्त माझी त्यांच्याच साठी शायरी,

सांगतो इतरास “बाबा” वाचा सुखे “ज्ञानेश्वरी”.।।

प्रेम अनुभवतांना मान्य आहे एक वाट ही सौंदर्याचा विचार करते पण फक्त सौंदर्य म्हणजेच प्रेम नव्हे हे ही खरेच. प्रेम दुतर्फा असले,दोन्हीबाजुंनी जर ती तळमळ असली तरच तीच्यात खरा आनंद असतो हे त्यांच्याच शब्दांत पुढीलप्रमाणे,

“हसतील ना कुसूमे जरी,ना जरी म्हणतील ये,

पाऊल ना टाकू तिथे,बाग ती आमुची नव्हे,

भ्रमरा परी सौंदर्य वेडे,आहो जरी ऐसे अम्ही,

इष्कातही नाही कुठे, भिक्षुकी केली अम्ही.।।।

प्रेमात नेहमीच सदानकदा हिरवं असतं असं नव्हे, प्रेमात उन्हाळे पावसाळे हे असणारच. त्याबद्दल भाऊसाहेब म्हणतात,

“आसूविना इष्कात आम्ही काय दुसरे मिळविले,  

दोस्तहो माझे असो तेही तुम्ही ना मिळविले,

आता कुठे नयनात माझ्या चमकली ही आसवे,  

आजवरी यांच्याचसाठी गाळीत होतो आसवे.।।।

प्रेमात,जिव्हाळ्यात एक  महत्वपूर्ण अंक हा लज्जेचा पण असतो हे विसरून चालणार नाही.ह्या गोडबंधनाच्या सुरवातीला हा अंक असतो. ते हासून लाजणे अन् लाजून हासणे हे भाऊसाहेबांच्याच शब्दात पुढीलप्रमाणे

“लाजायचे नव्हतेस आम्ही नुसतेच तुजला बघितले,  

वाटते की व्यर्थ आम्ही नुसतेच तुजला बघितले,

उपमा तुझ्या वदनास त्याची मीही दिली असती सखे, 

थोडे जरी चंद्रास येते लाजता तुजसारखे.।।।

आंतरिक मानसिक प्रेम हे आपल्या जवळच्या व्यक्तीला सुखं देण्यातच असतं ना की तिला काही त्रास,तोशिस पोहोचवण्यात. आपल्या व्यक्तीला सर्वार्थानं जपणं हेच खर प्रेम. ते भाऊसाहेबांच्या शब्दांत पुढीलप्रमाणे,

“पाऊलही दारी तुझ्या जाणून मी नाही दिले,

जपलो तुझ्या नावास नाही बदनाम तुज होऊ दिले,

स्वप्नातही माझ्या जरी का येतीस तू आधी मधी,

स्वप्नही आम्ही कुणाला सांगितले नसते कधी.।।।

भाऊसाहेब म्हणतात प्रेम हे फक्त प्रणयातच असतं असं कुणी सांगितलं ,ते तर एकमेकांना जपण्यात,सांभाळण्यात,सावरण्यात पण असतं हे त्यांच्याच शब्दांत पुढीलप्रमाणे,

“चंद्रमा हासे नभी शांत शीतल चांदणे,

आमुच्या आहे कपाळी अमृतांजन लावणे,

लावण्या हे ही कपाळी नसतो तसा नाराज मी,  

आहे परि नशिबात हे ही अपुल्याच हाती लावणे.।।।

तरीही शेवटी मृत्यू हेच अंतीम सत्य असतं हे ही नाकारुन चालणार नाही हे ही भाऊसाहेबांनी जिवंतपणीच ओळखलं. मृत्यू नंतर ची सर्वसामान्य अवस्था त्यांच्याच शब्दांत पुढीलप्रमाणे,

“जन्मातही नव्हते कधी मी तोंड माझे लपविले, 

मेल्यावरी संपूर्ण त्यांनी वस्त्रात मजला झाकले,

आला असा संताप मजला काहीच पण करता न ये,

होती अम्हा जाणीव की मेलो आता बोलू नये.”।।।

सगळ्याचं विषयावरील भाऊसाहेबांची शायरी अप्रतिम असली तरी लिखाणात त्यांचा हातखंडा होता तो “इष्क,प्रणय आणि शुंगार ह्या प्रकारात. इष्क म्हणजेच प्रेम करणे ह्याला नजर हवी, हिंमत हवी हे भाऊसाहेबांचे म्हणणे त्यांच्याच शब्दांत पुढीलप्रमाणे,

“केव्हातरी बघुन जराशी हास बस इतुके पुरे,  

वाळलेल्या हिरवळीला चार शिंतोडे पुरे ।।  

“दोस्तहो हा इष्क काही ऐसा करावा लागतो,

ऐसे नव्हे नुसताच येथे जीव द्यावा लागतो,

वाटते नागीण ज्याला खेळण्या साक्षात हवी,

त्याने करावा इष्क येथे छाती हवी,मस्ती हवी.

प्रेमाची ओळख,त्याची जाण होणं हे त्यांच्याच शब्दांत पुढीलप्रमाणे,

“अपुल्यांच दाती ओठ अपुला चावणे नाही बरे,

हक्क अमुचा अमुच्यासमोरी मारणे नाही बरे, ।।। 

आणि ते ओळखायची खूण म्हणजे,

“धस्स ना जर होतसे काळीज तू येता क्षणी ,

अपुल्या मधे,कोणात काही नक्की जरा आहे कमी.।।

ह्या अशा शायरीत गुंतता गुंतता वार्धक्य कधी उंब-यावर येतं ते कळतचं नाही. अर्थात जिंदादिलीवर ह्याचा काहीच परीणाम होत नाही. ह्याच्याच विचाराने त्यांना जीवनाविषयी सुचलेली शायरी पुढीलप्रमाणे,

“दोस्तहो,वार्धक्य हे सह्य होऊ लागते,

थोडी जरा निर्लज्जतेची साथ घ्यावी लागते,

मूल्य ह्या निर्लज्जते ला नक्कीच आहे जीवनी,

आज ह्या वृध्दापकाळी ही खरी संजीवनी”।।

अर्थात भाऊसाहेबांच्या मते हा प्रेमाचा,ईष्काचा अनुभव हा स्वतःच्या मनाने घेतल्याने एक होतं आपल्याला ह्मात कुठल्याही प्रकारचा पश्चाताप मनात साचत नाही. ही जबाबदारी स्वतः घ्यायलाही खूप हिम्मत लागते ती पुढीलप्रमाणे,

“बर्बादीचा या आज आम्हा, ना खेद ना खंतही,

झाले उगा बर्बाद येथे सत्शील तैसे संतही,

इतुका तरी संतोष आहे,आज हा आमच्या मनी,

झालो स्वये बर्बाद आम्हा बर्बाद ना केले कुणी.।।।

कुठलही प्रेम हे प्रेमच असतं. ते अलवार प्रेम अनेक ठिकाणी वसू शकतं हे खरोखर इतक्या सहज वृत्तीने स्विकारलेल्या भाऊसाहेबांच्या शब्दांत पुढीलप्रमाणे  

“ऐसे नव्हे इष्कात अम्हां काही कमी होते घरी,

हाय मी गेलो तरीही दीनापरी दुस-या घरी,

अर्थ का ह्याचा कुणा पाहिले सांगितला,

आम्ही अरे गमतीत थोडा जोगवा मागितला.।।।

प्रेम हे प्रेमच असत ते शेवटास गेले तरी वा मध्येच अधांतरी राहिले जरी. त्याच्या गोड स्मृती ह्या शेवटच्या श्वासापर्यंत तशाच ताज्या राहतात जसे,  

दोस्तहो, ते पत्र आम्ही आजही सांभाळतो,

रुक्मिणीचे पत्र जैसा,श्रीहरी सांभाळतो,

येतो भरुनी ऊर आणि कंठही दाटतो,

एकही ना शब्द तिथला,आज खोटा वाटतो.।।।

अगदी शेवटी भाऊसाहेब म्हणतात, हा जिन्दादिल रसीक असेल तरच आमच्या शब्दांना अर्थ आहे.पोस्ट ची सांगता त्यांच्याच शब्दात त्यांच्या खास रसिकांसाठी पुढीलप्रमाणे,

“वाहवा ऐकून सारी आहात जी तुम्ही दिली,

मानू अम्ही आहे पुरेशी तुमच्यातही जिन्दादिली,

समजू नका वाटेल त्याला आहे दिली जिन्दादिली,

आहे प्रभूने फक्त काही भाग्यवंतांना दिली.।।।

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ होडी ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

सुश्री तृप्ती कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ होडी ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी 

तसं पावसाशी फार जीवाभावाचं नातं नसलं तरी काही गोष्टींसाठी पाऊस हवासा वाटतो. त्यातली एक गोष्ट म्हणजे पावसाच्या पाण्यात होड्या सोडणे. लहानपणी पावसाळ्यातल्या सुरुवातीच्या दिवसांची आतुरतेने वाट पाहायचे ते यासाठीच. 

आम्ही चाळीत राहत होतो तेव्हा पहिल्या काही दिवसांत इतकं पाणी साचायचं की घराच्या मागे आणि पुढे अक्षरशः दुथडी भरून व्हायचं. आमचं घर मध्यावर होतं चढणीवरून पाणी हळूहळू उताराकडे वहायचं. तेव्हा त्या पाण्याला खूप जोर असायचा. मग घरात पावसामुळे अडकलेली आम्ही मुलं, कागदाच्या होड्या करून सोडण्यात दंग राहायचो.

राजा राणीची होडी, शिडाची होडी असे होडीचे वेगवेगळे प्रकार असायचे. एकमेकांशी स्पर्धा असायची. कोणाची होडी जास्त लांबपर्यंत जाते हा एक चर्चेचा विषय असायचा. 

काही मुलं तर उत्साहाने छत्री घेऊन पळत पळत होडी कुठपर्यंत जाते ते बघायला जायची. 

रस्त्यावर खड्डे असल्याने कुठे गोल खळगा तयार व्हायचा आणि त्यातलं पाणी असं गोल गोल फिरत राहायचं ते बघायला मजा यायची. पण एखादी होडी चुकून त्या खळग्यात अडकली किती तिथल्या तिथे गोल गोल फिरत राहायची. ज्याची तशी होडी अडकेल त्याला फार वाईट वाटायचं. 

याशिवाय गंमत वाटायची ती कॉलनीमधल्या रस्त्यावरच्या दिव्याची. उंच उंच केशरपिवळ्या रंगाचा झोत टाकणारे ते दिवे… पावसाच्या पाण्यात थरथरतायत आहेत असा भास व्हायचा. त्यांच्या प्रकाशात खाली पडणार पाणी त्या रंगाचं वाटायचं. तेव्हा शॉवर हा प्रकार आम्हा मुलांना नुकताच माहीत झाला होता. अशा दिव्याखालून पडणाऱ्या पाण्यात रंगीत शॉवर खाली भिजण्यात मुलांना वेगळीच मौज वाटायची. मला खरंतर पावसात भिजणं हा प्रकार कधीच आवडला नाही. पण पाण्यामध्ये पडणारी लाईटची प्रतिबिंब किती वेगवेगळी दिसतात. ते बघण्यात मला कुतूहल वाटायचं. क्वचित कुणाची तरी दुचाकी असायची पण त्यातलं पेट्रोल पाण्यात पडलं की जे वेगवेगळे रंग उमटायचे ते बघण्यासाठी आमची गर्दी व्हायची. 

पाण्यामध्ये उठणारे तरंग, त्यात कोणी खडा टाकेल… कोणी पाय आपटेल… त्यानंतर होणारे वेगवेगळे आकार… आपापलं प्रतिबिंब पाण्यात बघण्याची हौस… वेडे वाकडे चेहरे करून पाण्यात बघणं. एकमेकांना दाखवणं. एक फार वेगळी मौज असायची. या सगळ्यांमध्ये नेहमीचे मैदानी खेळ खेळता येत नाही याचं शल्य नसायचं. 

चाळ असल्यामुळे आजूबाजूला झाडं नव्हती. पण घरांची, कौलांची प्रतिबिंब पाण्यात दिसायची. कौलातून निथळणारं पाणी झेलायला देखील मजा यायची. अगदी साधी राहणी आणि साध्या सुद्धा गोष्टी आणि त्यातून आनंद शोधणं असा साधाकाळ होता. 

अलीकडे पाऊस पडल्यावर काय करायचं हा प्रश्न मुलांना पडतच नसेल कारण त्यांच्याकडे मोबाईल, टीव्ही असे भरपूर ऑप्शन्स आहेत. पण आमच्या वेळी हे काहीही नव्हतं आणि तेच बरं होतं असं आम्हाला वाटतं. 

तर दोन दिवसांपासून पडणारा पाऊस बघून बालपणीच्या या अशा होडीच्या आठवणीं ओल्या झाल्या. मला एक छोटीशी साधीसुधी बालकविता सुचली..‌. 

तिकडून आला मोठा ढगुला

मला म्हणाला चल भिजूया

दोघे मिळून खेळ खेळूया

पाण्यामध्ये होड्या सोडूया 

 

होड्या सोडल्या पाण्यात

वाहू लागल्या वेगात

आली लाट जोरात

मासोळी पडली होडीत 

 

मी होडी उपडी केली 

मासोळी‌ चट सुटून गेली

ढगुल्याच्या डोळां पाणी 

माझ्या ओठी पाऊसगाणी

©  सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ डार्क वेब : भाग – 2 ☆ श्री मिलिंद जोशी ☆

श्री मिलिंद जोशी

? इंद्रधनुष्य ?

 ☆ डार्क वेब : भाग – 2 ☆ श्री मिलिंद जोशी ☆ 

(ही अतिशय महत्वपूर्ण माहिती देणारी लेखमाला दर सोमवारी आणि मंगळवारी प्रकाशित होईल) 

इंटरनेटची दुनिया खूप मोठी आहे. ज्यावेळी आपण टेलिफोन प्रोव्हायडर किंवा सॅटेलाईटच्या माध्यमातून आपल्या कॉम्प्युटर / मोबाईल / किंवा अन्य कोणत्या गोष्टींना इतर कॉम्प्युटरसोबत कनेक्ट करतो त्यावेळी आपणही इंटरनेटचा एक भाग बनतो. हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण ज्यावेळी आपण त्यात अजून थोडी माहिती मिळवतो त्यावेळी त्यातही प्रकार आहेत हे आपल्याला समजते. ते प्रकार म्हणजे सर्फेस वेब, डीप वेब आणि डार्क वेब. 

असे म्हणतात की सर्फेस वेब हे १०% वापरले जाते तर इतर दोन प्रकार मिळून ९०% वापर होतो. सर्फेस वेब तसेच डीप वेब वरील साईट आपण आपल्या रेग्युलर ब्राउजर मध्ये बघू शकतो. पण डार्क वेब वरील साईट बघण्यासाठी आपल्याला एका खास ब्राउजरची गरज लागते. ज्याला टोर ( TOR ) ब्राउजर असे म्हणतात. डार्क वेबच्या साईट आपल्याला नॉर्मल ब्राउजरमध्ये बघता येत नसल्याने ते काहीतरी वेगळे आहे असे वाटू लागते आणि उरलेली कसर युट्युबवरील अनेक युट्युबर भरून काढतात. 

युट्युबवर तुम्ही फक्त ‘डार्क वेब’ हा शब्द शोधला तर आपल्या समोर जे चित्र विचित्र पोस्टर येतात ते बघून आपली उत्सुकता चाळवते. आपण तो व्हिडिओ बघायला लागतो आणि त्याबद्दल माहिती देणारी व्यक्ती सांगते, “डार्कवेबपर बहोत भयंकर कांड होते है | आप भूल से भी उसे देखने की कोशिश ना करे |” आणि आपल्या मनात भीती तयार होते. पण खरच का हे असेच आहे?

एक गोष्ट लक्षात घ्या. इंटरनेटचा प्रकार कोणताही असो. त्याचे कार्य सारखेच असते. एका कॉम्प्युटरवरील माहिती दुसऱ्या कॉम्प्युटरवर दाखवणे. मग ती टेक्स्ट / पिक्चर / ऑडिओ किंवा व्हिडिओ यापैकी कोणत्याही स्वरूपात असो. मग यात वेगळेपण काय आहे? 

वेगळेपण आहे फक्त आपल्याला हवी ती माहिती तत्काळ मिळू शकेल किंवा नाही यात. यातील वेगळेपण एका वाक्यात सांगायचे तर ते खालील प्रमाणे सांगता येईल.

सर्फेस वेब : जे वेबपेज गुगल किंवा कोणतेही सर्चइंजिन शोधू शकते त्याला सर्फेस वेब म्हणतात.

डीप वेब : जे वेबपेज गुगल किंवा कोणतेही सर्चइंजिन शोधू शकत नाही. तसेच जे वेबपेज इंडेक्स नसते. पण आपले रेग्युलर ब्राऊजरमध्ये दिसू शकते. ( उदा. एखाद्या कंपनीचे / बँकेचे वेबबेस अप्लिकेशन किंवा  ERP Software ) त्याला डीप वेब म्हणतात.

डार्क वेब : जे वेबपेज इंडेक्स नसल्याने गुगल किंवा इतर कोणतेही सर्चइंजिन शोधू शकत नाही. त्याच सोबत ते रेग्युलर ब्राउजर मध्येही दिसू शकत नाही. त्यासाठी वेगळ्या ब्राउजरची गरज असते, त्याला डार्क वेब म्हणतात. 

एखाद्या ठिकाणी जाणे अवघड असेल तर त्याबद्दल अनेक अफवा उठतात. लोकांना त्या खऱ्याही वाटतात. पण ज्याचे स्वरूप जितके वाढवून सांगितले जाते तितके ते खचितच नसते. डार्क वेबच्या बाबतीतही ही गोष्ट प्रामुख्याने दिसून येते. डार्क वेबचा वापर मुख्यतः आपली ओळख लपवून कोणत्याही माहितीचे आदानप्रदान करण्यासाठी केला जातो. 

डार्कवेबला कोणती गोष्ट घातक बनवते? ते आपल्याला वापरता येऊ शकते का? ते वापरणे गुन्हा आहे का? त्याचा वापर करणारा माणूस तिथून बाहेर पडू शकत नाही यात कितपत तथ्य आहे? कोणतेही सरकार यावर नियंत्रण का ठेऊ शकत नाही? या आणि अशा काही प्रश्नांची उत्तरे मात्र पुढील भागात.

— क्रमशः भाग दुसरा 

©  श्री मिलिंद जोशी

वेब डेव्हलपर

नाशिक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ इंग्रजांना नोकर म्हणून ठेवणारा सांगलीचा पठ्ठ्या… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? इंद्रधनुष्य ? 

इंग्रजांना नोकर म्हणून ठेवणारा सांगलीचा पठ्ठ्या… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

श्री. आबासाहेब गरवारे 

इंग्रजांच्या घरात घुसून त्यांचेच घर विकत घेऊन, त्यांनाच नोकर म्हणून ठेवणारा सांगलीचा पठ्ठ्या जेव्हा संपूर्ण भारत ब्रिटिशांच्या गुलामगिरीत खितपत पडला होता. भारतीयांना आपल्या भविष्याची खात्री नव्हती, गोऱ्यांची क्रूरता निष्पाप भारतीयांचं जगणं मुश्किल करून टाकत होती होती, अशा काळात सांगलीच्या एका चुणचुणीत तरुणाने थेट ब्रिटिश राजकुमाराचीच गाडी विकत घेऊन अख्ख्या इंग्लंडमध्ये ती दिमाखात फिरवली. आपल्या या कृतीने त्यांनी गोऱ्यांच्या मनात खदखद निर्माण केली. त्यांच्याच घरात घुसून भारताचा झेंडा फडकविला. त्याचे हे कार्य त्याकाळात कोणत्याही क्रांतिकारी घटनेपेक्षा कमी नव्हते.

कोण होता कोण हा तरुण? तो कोणी क्रांतिकारक नव्हता, की स्वातंत्र्यसेनानी नव्हता. तो होता सांगलीतील तासगावातला भालचंद्र गरवारे अर्थातच आबासाहेब गरवारे.

गरवारे म्हटलं की आठवतं ते पुण्यातलं गरवारे कॉलेज आणि गरवारे चौक. यापलीकडे आपल्याला काय माहितीये? मित्रांनो पुण्यातल्या या कॉलेजला गरवारे नाव का दिलं गेलं? ते कॉलेज आबासाहेबांनी उभं केलं का? तर नाही. त्या कॉलेजचे संस्थापक आबासाहेब गरवारे नव्हते, मग का बरं गरवारे नाव दिलं गेलं असेल? जे जाणून घेण्यासाठी आपल्याला शंभर वर्ष मागं जावं लागेल.

तासगाव मध्ये 21 डिसेंबर 1903 रोजी एका शेतकरी कुटुंबात भालचंद्रचा जन्म झाला. घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे कसेबसे 6वी पर्यंतचे शिक्षण त्याने पूर्ण केले. पूर्ण कसले सहावीच्या मार्कलिस्टवर नापासचा शेरा मिळाला. भालचंद्रच्या वडिलांचं नाव दिगंबर गरवारे. वडिलांनी भालचंद्रला मुंबईला पाठवले. या सहावी नापास भालचंद्राने 1918 साली म्हणजे वयाच्या जेमतेम 15 व्या वर्षी मुंबईच्या झगमगाटात पहिलं पाऊल टाकलं.

ब्रिटिशांचं वर्चस्व असणाऱ्या मुंबईत वावरणं थोडं कठीणच होतं. मुंबईत ब्रिटिशांनी लोकांचं जगणं नकोस करून टाकलं होतं. रस्त्यावरुन एखादा गोरा अधिकारी जात असेल, तर लोक जिथे जागा मिळेल तिथे लपून बसायचे, कारण गोरे कधी काय करतील याचा काही नेम नव्हता. अशा परिस्थितीत भालचंद्र एका गॅरेजमध्ये काम करू लागला. गॅरेजमध्ये राहून तो गाड्या रिपेअरिंगची कामे शिकू लागला. मनापासून काम करून तो चारचाकी आणि दुचाकी गाड्या रिपेयरची कामे शिकला. गॅरेजमध्ये असताना भारतीयांचे होणारे हाल त्याने उघड्या डोळ्यांनी पहिले होते. पण बिचारा एकटा भालचंद्र ब्रिटिशांविरुद्ध कसा आवाज उठवणार होता, त्यामुळे आपण आणि आपलं काम इतक्यापुरताच तो मर्यादित राहायचा. ब्रिटिशांचं प्रगत तंत्रज्ञान आणि आधुनिकीकरणामुळे पुढच्या काही वर्षात ही वाहनं भारतीयांची गरज बनणार हे त्याने तेव्हाच हेरलं होतं. गॅरेजमध्ये काम करून भालचंद्रच्या ओळखी वाढल्या. 

वयाच्या 17 व्या वर्षी  गिरगावमध्ये डेक्कन मोटार एजन्सीची स्थापना करून तो जुन्या गाड्या खरेदी-विक्री करणारा एजंट बनला. सोबतच तो स्पेअर पार्ट, टायरची वगैरे विक्री करू लागला. थोड्याच दिवसात या व्यवसायात त्याचा चांगलाच जम बसला. त्याच्या गोडाऊनमध्ये आता गाड्यांना जागा नव्हती. सर्वसामान्य माणसापासून ते मुंबईतल्या राजे-रजवाड्यांपर्यंत सगळेजण डेक्कन मोटार एजन्सीमधून गाड्या घेऊ लागले. मुंबईत गाडी घ्यायचं म्हटलं की, प्रत्येकाच्या ओठांवर फक्त एकच नाव डेक्कन मोटार एजन्सी. एजन्सीचा नावलौकिक वाढला होता. त्यासोबतच भालचंद्र गरवारे मुंबईचे आबासाहेब म्हणून ओळखले जाऊ लागले. आबासाहेबांना पत, प्रतिष्ठा मिळू लागली. खिशात एक रुपयाही नसताना मुंबईत आलेला भालचंद्र आता आबासाहेब झाला होता. ब्रिटिशदेखील आबासाहेबांकडूनच गाड्या विकत घेऊ लागले. 

एकदा एक ब्रिटिश अधिकारी आबासाहेबांकडे गाडी खरेदी करण्यासाठी आला, गाड्यांची किंमत पाहून तो ब्रिटिश म्हणाला, ‘We get cheaper cars in England than here and now prices have fallen considerably due to the recession there.’ हे ऐकताच आबासाहेबांनी त्याच्याकडून अजून माहिती काढून घेतली, इंग्लंडमध्ये कमी किमतीतल्या गाड्या मिळतात हे ऐकल्यावर त्यांना वेध लागले ते इंग्लंड दौऱ्याचे. व्यवसायातून आलेल्या पैशांतून त्यांनी तडक इंग्लंड गाठले. इंग्लंडमधील पहिली सेकंड हँड गाडी त्यांनी 40 पौंडला विकत घेतली. हळूहळू त्यांनी एकापेक्षा एक चांगल्या दर्जाच्या सेकंड हँड गाड्या विकत घेतल्या. सेकंड हँड गाड्यांच्या दुनियेत आबासाहेबांनी लंडनमध्ये चांगलाच जम बसविला आणि तिथूनच ते नवनवीन बनावटीच्या जुन्या गाड्या भारतात पाठवू लागले.

आबासाहेबांनी केवळ गाड्यांचाच व्यवसाय केला नाही, तर त्यांनी प्लॅस्टिक बनविणारे कारखाने देखील विकत घेतले. ज्याकाळात भारतीयांना प्लॅस्टिक म्हणजे काय? हे देखील माहीत नव्हतं, अशा काळात आबासाहेबांनी भारतात प्लॅस्टिक बटणं, नायलॉन यार्न, प्लॅस्टिक इंजेक्‍शन मोल्डिंग, ब्लो मोल्डिंग, नायलॉन ब्रिस्टल्स, फिशिंग नेट अशी प्लॅस्टिकची अनेक उत्पादने घेऊन गरवारे मोटर्स, गरवारे प्लॅस्टिक, गरवारे वॉल रोप्स, गरवारे  नायलॉन्स, गरवारे पेंट्स, गरवारे फिलामेंट कॉर्पोरेशन अशा अनेक कंपन्यांची उभारणी केली. या व्यापारात त्यांनी भरपूर पैसा कमविला. ज्या गोऱ्यांनी भारतीयांचे जिणे हराम करून सोडले होते. त्या गोऱ्यांची नाचक्की करायचं हे आबासाहेबांनी आधीच ठरवलं होतं. लंडनमध्ये असताना बकिंगहॅम पॅलेसमध्ये जाऊन प्रिन्स ऑफ वेल्सची,  इंग्लंडच्या राजपुत्राचीच गाडी विकत घेतली. ती गाडी आणि त्यावर एक गोरा शोफर ठेऊन ते ताठ मानेने लंडनमध्ये फिरू लागले.

इतकंच नाही तर १९३४ साली त्यांनी लंडनमध्ये ३ एकर जमीन आणि काही अन्य मालमत्ता २२०० पौंडाला खरेदी करून त्या मालकालाच आपल्याकडे नोकरीस ठेवले. जेव्हा भारतात गुजराती, मारवाडी उद्योगपतींचा जन्म होऊ लागला होता, महाराष्ट्रात परप्रांतीय आपल्या उद्योगाचे बस्तान बसवत होते. त्याकाळात सांगलीच्या या तरुणाने चक्क इंग्लंडमध्ये आपल्या व्यवसायाचे बस्तान बसवलं. त्यांनी केलेला प्रत्येक उद्योग हा भारतीयांची अस्मिता जपण्यासाठीचा एक प्रयत्न होता.

जे ब्रिटिश भारतीयांना गुलाम म्हणून वागवत होते, त्याच ब्रिटीशांना आबासाहेबांनी त्यांच्यात घरात घुसून त्यांचेच घर विकत घेऊन, त्यांनाच नोकर म्हणून आपल्या पदरी ठेवून एक स्वाभिमानी, यशस्वी, देशप्रेमी मराठी उद्योजक बनण्याचा मान मिळविला होता. आबासाहेबांनी केवळ उद्योगच केला नाही, तर आपल्या कर्तुत्वाने ब्रिटीशांना तोंडात बोटं घालायला लावली. आबासाहेबांनी केवळ व्यापारच नाही केला तर शैक्षणिक, सामाजिक संस्थांना देखील सढळ हाताने मदत केली. भारत स्वतंत्र झाल्यावर 1959 साली त्यांची मुंबईचे शेरीफ म्हणून नियुक्ती करण्यात आली. शेरीफ म्हणजे नगरपाल. आबासाहेबांनी पुणे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीला चांगलीच आर्थिक मदत केली आणि त्यामुळेच संस्थेने कॉलेज आणि हायस्कूलला 1945 साली आबासाहेब गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स आणि सौ. विमलाबाई गरवारे हायस्कूल अशी नावे दिली. मुंबई university च्या अंतर्गत त्यांनी सांगलीत मुलींसाठी महाविद्यालय सुरू केले,

त्यांच्या याच कार्यकर्तुत्वामुळे त्यांना आर्थिक अभ्यास संस्थेतर्फे उद्योगरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. यासोबतच 1971 मध्ये त्यांना भारत सरकारच्या पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सांगलीतील एका खेड्यातल्या मुलाचा गॅरेजमध्ये काम करण्यापासून ते पद्मभूषण पुरस्कार मिळवण्यापर्यंतचा  प्रवास खरच विस्मयकारक होता. हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला असं आपण यशवंतराव चव्हाणांच्या अतुलनीय कामाबद्दल अनेकदा म्हणतो, पण मित्रांनो हा भालचंद्र नामक सह्याद्री देखील हिमालयाच्या प्रत्येक अडीअडचणीत धावून गेला होता हे देखील विसरून चालणार नाही. त्यांच्या विचारांची ज्योत आज प्रत्येकाने आपल्या मनात निरंतर तेवत ठेवली पाहिजे….

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares