मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “सर, एक अवघड काम आहे…” ☆ श्री संजय जगन्नाथ पाटील ☆

श्री संजय जगन्नाथ पाटील 

??

“सर, एक अवघड काम आहे… ☆ श्री संजय जगन्नाथ पाटील 

“सर, एक अवघड काम आहे.. “

तरुण भारत चे ज्येष्ठ पत्रकार शिवराज काटकर यांचा फोन..

म्हटलं.. ” काय झालं ? “

” कृष्णाकाठ दिवाळी अंकासाठी तारा भवाळकर यांचा लेख हवाय.. त्यांच्यापुढं जायची भीती वाटते.. दडपण येतं.. जरा मिळवून द्या की तेवढा लेख.. “

शिवराजचा स्वतःचा दिवाळी अंक आहे कृष्णाकाठ नावाचा..

ही घटना सहा सात वर्षांपूर्वीची..

(हा फोटो.. सह्याद्री वाहिनीवरून प्रसारित झालेल्या मायवाटेचा मागोवा.. या सिरीयलच्या रेकॉर्डिंग वेळचा.)

वयोमानानुसार ताराबाईंना लिहीताना त्रास होतो. त्यामुळं त्या लिहिण्याचं काही अंगावर घेत नाहीत हे ठाऊक होतं.. त्या काळात लिहिणं आणि प्रकृती मुळं बाहेरचे कार्यक्रम घेणं त्यांनी बऱ्यापैकी कमी केलेलं..

मग हे लेखाचं जमावं तरी कसं.. ?

प्रयत्न करून बघतो म्हणालो..

पण फारशी आशा नव्हती..

ताराबाईंशी बोललो.. अशानअसं म्हणून सांगितलं..

” सगळं तुझं ठीक रे.. पण मला आता सलग लिहिणं जमत नाही.. हात भरून येतात.. “

बाईंचं खरंच होतं..

लोकसाहित्यावर निगुतीनं काम करणाऱ्या सरोजिनीआक्का बाबर आणि तारा भवाळकर यांच्या विषयी मला आदरयुक्त गुढ आकर्षण होतंच.. सरोजिनी आक्कांचं लोक वाङ्मयाचं प्रचंड संकलन, त्यावरचं कृष्णामाईच्या तीरावरच्या तोंड भरून बोलल्या जाणाऱ्या साजीवंत शैलीतलं स्मरण रंजनात्मक लेखन.. याची भुरळ पहिल्यापासून..

तर याबरोबरच लोकसाहित्याची सूत्रबद्धपणे मांडणी करून लोक संस्कृतीचे अंतर्गत अदृश्य ताणेबाणे दागिन्यांच्या घडणावळीप्रमाणे उलगडून वस्तूनिष्ठपणे समोर मांडणाऱ्या लखलखीत ताराबाई..

या ना त्या अर्थानं दोघीही सांगलीच्याच..

इथल्या मातीचा गुण त्यांच्या अंगी भिनलेला.. अगदी ऐसपैस.. दोघीही लोक साहित्याच्या प्रांतातल्या जुळ्या बहिणीच…

कोणत्याही निमित्तानं त्यांच्याशी बोलणं हा साक्षात्काराचाच योग…

बोलणं म्हणण्यापेक्षा त्यांचं ऐकणं हेच अचंबित करणारं… ओघंवतं आणि रसाळ.. विषयाचे पापुद्रे अलगद उलगडत आतल्या गाभ्या पर्यंत कसे पोहोचलो ते ऐकणाऱ्याला समजणार सुद्धा नाही..

मी आकाशवाणीतून स्वेच्छा निवृत्ती घेऊन बाहेर पडल्यावर एक छोटा रेकॉर्डर विकत घेतलेला.. त्याला माईक जोडून थोडंसं जुगाड करून आवडीचं काही दिसलं की रेकॉर्डिंग करायचो.. तशी ही जुळणी होतीच.. मी ताराबाईंना सुचवलं.. “तुम्ही बोलत रहा.. विषयानुरूप.. मी त्याचं ध्वनिमुद्रण करून घेतो.. ते ऐकून नंतर लिहून काढू..”

हा उपाय त्यांना आवडला..

सीतेसंबंधीच्या निरनिराळ्या प्रांतातल्या काही पारंपारिक रचनांचा मागोवा घेत सजग नितळ तर्काधिष्टित सम्यक नजरेने सितेकडं पाहूया असं त्यांचं म्हणणं पडलं..

ही आमच्या रेकॉर्डिंग ची पहिली सुरुवात..

ताराबाई, मी आणि शिवराज..

हा लेख दिवाळी अंकात छापून आला.. पुढं ताराबाईंना वाटू लागलं की या लेखातून व्यक्त झालंय त्याहूनही बरंच काही सांगता येण्यासारखं शिल्लक आहे.. तत्पूर्वी त्यांनी या विषयावर थोडं फार कुठंकुठं लिहिलंही होतं..

म्हटलं आहे डोकीत तर जसं जमेल तसं ध्वनिमुद्रण करत राहू..

मग पुढचं ध्वनिमुद्रण ठरलं.. पुढच्या एक दोन रेकॉर्डिंग ला आम्ही दोघंच.. त्या बोलायच्या आणि मी ऐकत बसायचो..

अधिकाधिक सहजता येण्यासाठी ताराबाईंच्या साहित्यावर प्रेम करणाऱ्या काही मंडळींना बोलावून त्यांच्यासमोर सीता अख्यान लावलं तर आणखी मजा येईल असं वाटत होतं.. कारण समोर श्रोते असले की बाई अधिक खुलतात हे ठाऊक होतं..

मंडळी जमत गेली.. सगळ्यांचीच विषयातली गोडी वाढत गेली.. प्रा. अविनाश सप्रे, प्रतिमा सप्रे, नीलम माणगावे, आशा कराडकर, उज्वला परांजपे, प्रतिभा जगदाळे, सुनीता बोर्डे असा दरबारच भरू लागला, सीता समजून घेण्यासाठी…. एक वेगळाच भारून जाण्यासारखा माहोल तयार झालेला.. ध्वनिमुद्रण झालं की नंतर या विषयावर सगळ्यांच्या चर्चा रंगायच्या.. शंका निघायच्या आणि बाई उत्तरं द्यायच्या.. पुण्याच्या प्रतिभा गुडी यांनी संपूर्ण ध्वनिमुद्रण ऐकून त्याची संहिता तयार केली..

आज ते पुस्तक ‘सीतायन ; वेदना विद्रोहाचे रसायन.. ‘ या नावानं प्रकाशित झालंय.. सध्या हे बहुचर्चित पुस्तक जाणकारांच्या नजरेत आहे..

ताराबाईंनी मनोगतात लिहिलंय…

” कोरोना महासाथीच्या जागतिक आणि अनेकांच्या आयुष्यातील वैयक्तिक पडझडीच्या काळानंतर लगेच सीतायनातील प्रमुख कथाकथन मी सर्वांसमोर केलं होतं.. या सर्जक कामामुळे आम्ही सगळे सावरलो.. विशेषतः मला आयुष्याच्या उत्तरायणात या सीतायनाने खूप आधार दिला… “

या ध्वनीमुद्रणाच्या निमित्तानं सगळे एका प्रचंड ताणातून मोकळे झाले.. सीतेच्या वेदनांच्या कहाण्या ऐकताना आमची दुःखं छोटी वाटू लागली..

हे ध्वनिमुद्रण झालं आणि पुन्हा पूर्ववत पोकळी जाणवू लागली.. ताराबाई सतत अभ्यासात मग्न असल्या आणि त्यांच्या मेंदूत सतत काही उलथापालथ चालू असेल तर त्या ठणठणीत असतात हे आम्हाला जाणवलेलं.. त्यातूनच त्यांना रिकामं ठेवायचं नाही हे ठरवून वेगवेगळे विषय त्यांच्यासमोर काढत गेलो.. त्यातून बरीच ध्वनीमुद्रणं झाली..

जुन्या तरी नव्या कथा’ या नावानं त्यांनी काही कथा कथन केल्या.. जुन्यापुराण्या सांगीवांगीच्या कथांना नव्या आशयानं अभिव्यक्त करण्याचा एक वेगळा प्रयत्न त्यांनी केला.. त्याचंही पुस्तक झालं.. नंतर, “एक ओवी, एक कथा, एक प्रथा “ या नावानं बरंच ध्वनिमुद्रण केलं.. पारंपरिक ओवीच्या अनुषंगानं त्याच्या मागचं कथासूत्र शोधणं आणि इथल्या परंपरेचे त्यांचे अंत:संबंध उलगडणं असा एक वेगळाच आकृतीबंध ताराबाईंनी शोधला.. हा एक वेगळाच प्रयोग होता.. यात गीत होतं, कथा होती आणि सजगपणे सर्जकतेनं बुद्धीनिष्ठपणे या गोष्टीकडं पाहण्याची एक दृष्टी होती..

आकाशवाणी सांगलीनं ताराबाईंची पूर्वी एक प्रदीर्घ मुलाखत घेतली होती.. त्यांचा लोकसाहित्याचं संशोधन, त्यांनी लिहिलेल्या कथा, अनुवाद, एकांकिका आणि नाटक याचं लेखन, नाट्यविषयक लेखन असे बाईंचे अनेक अभ्यासाचे विषय आहेत.. त्याच धर्तीवर या सर्व अभ्यासाची एक सारभूत मुलाखत ध्वनिमुद्रित करायची तयारी केली.. अविनाश सप्रे यांनी त्यांची मुलाखत घेतली.. जवळजवळ सात ते आठ तासाचं अभ्यासपूर्ण ध्वनिमुद्रण हाताला लागलं.. यावेळी सदानंद कदम या प्रक्रियेत सामील झाला.. त्याने याची व्हिडिओ केली.. या अभ्यासपूर्ण मुलाखतीचं पुस्तक लवकरच आता भेटीला येईल..

नंतरच्या काळातील ताराबाईंचे वेगवेगळ्या विषयांवरचे लेख, त्यांनी इतरांच्या पुस्तकांना दिलेल्या प्रस्तावना, परिसंवाद, विविध विषयांवरचं त्यांचं लेखन, भाषणं, मनोगतं असं अनेक प्रकारचं मौलिक ध्वनिमुद्रण जमत गेलं.. सोयीसाठी ते सदानंदकडं एकत्रित ठेवलं आहे…

साधारण तीन साडेतीन वर्षांपूर्वी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीच्या कल्पक कार्यक्रम अधिकारी उमा दीक्षित यांची आकाशवाणीकडून दूरदर्शनकडे बदली झाली.. उमा दिक्षित यांनी त्याआधी आकाशवाणी मुंबईसाठी ताराबाईंची तीन भागात मुलाखत घेतलेली.. त्यावेळी त्यांचा माझा परिचय गडद झालेला..

दूरदर्शन आणि आकाशवाणीचं खातं एक असलं तरी माध्यम नवं..

दूरदर्शनला आल्याआल्या एखादा मोठा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरुवातीलाच हाती घ्यावा असं उमा ताईंच्या संवादातून ठरलं.. पाऊल धाडसाचं होतं.. त्याचाच एक भाग म्हणून तेरा भागात लोक साहित्य संबंधातली ताराबाईंची समग्र मुलाखत घ्यायचं ठरलं.. अडीच तीन महिने या विषयावर चर्चा झाल्या.. विषय ठरले.. मुकुंद कुळे यांनी मुलाखत घ्यावी असा विचार केलेला.. माय वाटेचा मागोवा’ ही अभ्यासपूर्ण मालिका दूरदर्शन साठी रेकॉर्ड झाली.. बाई अखंडपणे रोज पाच पाच सहा सहा तास हातात कागदाचा चिटोराही न घेता बोलत राहिल्या.. हे विस्मयकारक होतं.. ताराबाईंच्या जीवनभरातल्या अभ्यासाचा प्रदीर्घ अनुभव चित्रीत झाला.. एक महत्त्वाचा दस्तऐवजच दूरदर्शनच्या प्रयत्नानं आकाराला आला.. लोकसहित्याचं सगळं संचित दृकश्राव्य माध्यमात जपलं गेलं.. त्यासाठी उमा दिक्षित यांची संपूर्ण टीम सांगली जवळच्या बुरुंगवाडी या गावात पाच दिवसाच्या मुक्कामाला आली.. तिथल्या निसर्गरम्य परिसरात रमली. बुरुंगवाडी चे विजय जाधव आणि ग्रामस्थांचं लाख मोलाचं सहकार्य लाभलं.. अगदी कमी वेळात अथक प्रयत्न करत मोलाचं काम केलं गेलं.. लोक संस्कृतीच्या अभ्यासातलं सार लोकांसाठी, पुढच्या पिढींसाठी टिपून ठेवलं गेलं..

बघता बघता, आज जवळजवळ 40 ते 50 जीबी इतका डाटा तोही mp3 ऑडिओ फॉर्मेट मध्ये आमच्याकडे संकलित झाला आहे.. बाकी इतर माध्यमांकडं असलेला संग्रह वेगळाच..

कृष्णाकाठ मधल्या एका लेखासाठी हा छोटा प्रवाह उगम पावला.. हळूहळू या कामाचं स्वरूप इतकं वाढत जाईल असं वाटलं ही नव्हतं..

ताराबाईंच्या या प्रचंड अभ्यासानं त्यांच्या कार्यानं दिपून जायला होतं.. 85 वय होऊन गेलं तरी अजूनही त्या नव्या उमेदीनं कार्यमग्न असतात.. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निमित्तानं चक्रधर ज्ञानेश्वर तुकाराम, सगन, होनाजी, पठ्ठे बापूराव, ते वाडीवस्तीतल्या, तुमच्या माझ्या घराघरातल्या माय माऊलींच्या तोंडची लोकभाषा त्यांनी मराठी सरस्वताच्या मखरात मानानं मिरवली आहे.. असंच काहीसं वाटतं आहे.

आपणाला त्या सोबत घेत आहेत यानंच हुरळून जायला होतं…

****

© श्री संजय जगन्नाथ पाटील
9422374848

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ स्नेह ताराबाईंचा… ☆ सुश्री उमा वि. कुलकर्णी ☆

सुश्री उमा वि. कुलकर्णी

??

स्नेह ताराबाईंचा… ☆ सुश्री उमा वि. कुलकर्णी 

बर्‍याच वर्षापूर्वीची गोष्ट आहे. सुमारे तीसपेक्षा जास्त वर्षं झाली असतील. त्या वेळी नियमीतपणे रेडिओ ऐकला जायचा. तसा रेडीओ ऐकत असताना वेगळ्या विषयावरचं ते व्याख्यान ऐकलं. लोकसाहित्यातून दिसणार्‍या स्त्री-मनाचा आढावा घेणारं ते व्याख्यान होतं. त्यावेळी व्याख्यानातून काही लोकगीतांचेही संदर्भ सांगितले गेले होते. संपूर्ण भाषण लक्ष देऊन ऐकल्यावर व्याख्यातीचं नावही समजलं, सांगलीच्या प्रा. तारा भवाळकर. त्या संपूर्ण संदर्भानिशी ते नाव तेव्हा डोक्यात पक्कं कोरलं गेलं. कायमचं.

याच सुमारास कमल देसाई यांच्याशी ओळख झाली आणि बघता बघता स्नेह वाढला. कधीतरी त्यांच्या तोंडून ताराबाईंचा `तारी.. ‘ असा उल्लेख ऐकला होता, पण तेव्हाही त्यांच्याशी कधीकाळी मैत्री होईल असं वाटलं नव्हतं.

पुढे एका व्याख्यानाच्या निमित्तानं सांगलीला जायचा प्रसंग आला. कदाचित तेव्हा माझं नाव ताराबाईंनी सुचवलं असावं. तेव्हा ताराबाईंची प्रत्यक्ष भेट झाली. त्यांच्या घरी गेले. तिथे उषाताईही भेटल्या. ताराबाई काही वेळासाठी कॉलेजमध्ये गेल्या होत्या. तेव्हा उषाताईंची सैपाकघरात काम करायची पद्धत आणि त्यांचा कामाचा उरकही पाहिला. कमलताईंकडून नावं ऐकल्यामुळे मला तरी काहीही अवघडल्यासारखं वाटलं नाही. ही लक्षात राहाण्यासारखी पहिली भेट होती.

अतिशय तरतरीत आणि भरपूर उंचीचं हे व्यक्तीमत्व तेव्हा कायमचं नजरेत आणि मनात भरलं. त्यांचं रंगभूमीशी असलेलं नातं त्या वेळी तरी मला माहीत नव्हतं. पण त्यांचं व्यक्तीमत्व मात्र ठसठशीत असल्याचं त्याच वेळी जाणवलं होतं.

तेव्हा ताराबाई अजूनही नोकरीत होत्या. बहुधा तेव्हा त्या प्रिन्सिपॉलही होत्या. नोकरीतली शेवटची काही वर्षं राहिल्याचं त्यांनी सांगितल्याचंही आठवतं. त्यामुळे त्यांचा तिथला तरी वेळ अतिशय महत्वाचा होता. पण तरीही वेळ काढून मी पुण्याला निघायच्या वेळी त्या घरी आल्या, स्टँडपर्यंत पोचवायला आल्या आणि, अजूनही आठवतं, त्यांनी खास सांगलीचे पेढेही आणून दिले होते (हे त्यांचं आतिथ्य अजूनही कायम आहे). त्याच वेळी त्यांनी अतितच्या बसस्टँडवर मिळणार्‍या खास भजी आणि बटाटेवड्यांविषयीही सांगितलं होतं. त्या क्षणी मला त्यांच्या त्या जिंदादिलाचं अपरुप वाटलं होतं. त्यांची आज्ञा पाळून परतीच्या प्रवासात मीही ते विकत घेऊन चवीनं खाल्ले होते.

कमल देसाईशी आमचं नातं आणि स्नेहही जुळला होता. दत्ता देसाई हा तर विरूपाक्षांचा सख्खा आतेभाऊ. त्याच्याकडूनही ताराबाईंचं नाव ऐकलं होतं. कमलताईंची भावंडं मिरज-सांगलीत असल्यामुळे त्या दोघींचा खूप पूर्वीपासून स्नेह होता. एकमेकीला `तारी.. ‘- `कमळी.. ‘ म्हणण्याइतकी जवळीक होती. कमलताई जेव्हा पुण्यात असत तेव्हा सांगलीच्या आठवणी निघाल्या की त्यात ताराबाईंची आठवण निश्चितच असे. त्यामुळे ताराबाईंच्या भेटी वरचेवर होत नसल्या तरी नाव सतत परिचयाचं होऊन राहिलं होतं.

नंतरच्या एकदोन भेटी कमलताईंमुळे झालेल्या आठवतात. त्याहीवेळी ताराबाईंकडून पेढे न चुकता मिळायचेच. कमलताईंचा पंचाहत्तराव्वा वाढदिवस सांगलीकरांनी मोठ्या थाटात साजरा केला होता. मुंबई-पुणे-बेळगाव आणि इतर गावांमधून कमलताईंचे चाहते आले होते. विद्या बाळ, सुमित्रा भावे, पुष्पा भावे, अशोक शहाणे असे मोठमोठे लेखक-विचारवंत त्यासाठी हजर होते. त्या सगळ्यांशी आस्थेनं वावरणार्‍या ताराबाई मला आजही आठवतात.

त्या नंतरही कुठल्याही निमित्तानं सांगलीला गेले तरी ताराबाईंची भेटही ठरलेलीच. एक मात्र मला आठवतंय तसं कमलताईंच्या वाढदिवसांनंतर आमच्यामधला औपचारिकतेचा बुरखा गळून पडला आणि नात्यात मोकळेपणा आला.

कमलताई वारल्या, आणि मी आणि ताराबाई जास्त जवळ आलो. त्याच सुमारास फोन करणंही सुकर होत चाललं. बोलायला मुबलक विषयही मिळत गेले. लोकसाहित्य हा माझ्याही आस्थेचा विषय होता आणि आहे. तसंच कर्नाटक आणि कन्नड संस्कृतीविषयी ताराबाईंनाही आस्था असल्यामुळे विषयांना अजिबात वानवा नव्हती. त्यांनी लोकसाहित्याच्या निमित्तानं संबंधित कर्नाटक पालथा घातलेला असल्यामुळे आमच्या गप्पा कधीच एका बाजूनं राहिल्या नाहीत. माझं कुतुहल, त्यातून निघालेले प्रश्न आणि ताराबाईंचा व्यासंग यामुळे गप्पांना रंगत जायला वेळ लागााायचा नाही. मला काही कन्नड लोककथा आढळल्या की मी त्यांना हमखास फोन करे. त्याही तशाच प्रकारची मराठीत एखादी कथा माहीत असेल तर सांगत. ऐकताना मात्र एखाद्या लहान मुलीचं कुतुहल त्यांच्यामध्ये असे.

अनेकदा गिरीश कार्नाडांच्या नाटकांमागील लोककथेवरून विषय सुरू होई आणि भारतभरच्या तशा प्रकारचा धांडोळा घेण्यात अक्षरश: तासच्या तास निघून जात. तसंच चंद्रशेखर कंबारांच्या जोकुमारस्वामी सारख्या नाटकाचा विषय निघाला तर त्या ती प्रथा मानणार्‍या काहीजणींना भेटून, त्याचा आणखी तपशिल गोळा करून मला सुपूर्द करत. त्यातूनच त्यांची `जोकुमारस्वामी’ या नाटकाची प्रस्तावना तयार झाली.

डॉ तारा बाई व सुश्री उमा कुलकर्णी

ताराबाईंचा सांगलीकरांनी केलेला वाढदिवस मला आजही आठवतो. ज्या स्नेहभावानं सगळ्यानी कार्यक्रम योजला होता, साजरा केला होता त्यातून त्यांचं ममत्व स्पष्ट दिसत होतं. पुण्यासारख्या गावात माझं साहित्यजीवन गेल्यामुळे मला तेव्हा त्याचं खूपच अपरूप वाटलं होतं. त्याच बरोबर ताराबाईंनी संपूर्ण गावातल्या जीवनाशी कसं स्वत:ला आत्मियतेनं जोडून घेतलंय हेही जाणवलं होतं. ते मी सार्वजनिकरित्या त्या वेळी बोलूनही दाखवलं होतं.

आता ताराबाईंची अखिल भारतीय मराठी साहित्य संम्मेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यावर या परिसरात जो आनंदाचा जल्लोष उसळला, त्याचं मला अजिबात नवल वाटत नाही.

या कार्यक्रमात सहभागी करून घेताना त्यांनी माझ्याविषयी जो विश्वास आणि स्नेह दाखवला, त्याला मी लायक होते की नाही, या विषयी मी तेव्हाही साशंक होते, आताही आहे.

असाच संकोच वाटण्यासारखा आणखी एक प्रसंग ताराबाईंनी आमच्यावर आणला. एका कार्यक्रमासाठी आम्ही दोघेही सांगलीला गेलो असताना तिथल्या आकाशवाणीवर `आर्काईज’साठी त्यांनी आम्हा दोघांची, म्हणजे मी आणि विरुपाक्ष, मुलाखत घेतली. मुलाखत खूपच मोठी होती. विरूपाक्षांचा पंचाहत्तरावा वाढदिवस होता तेव्हा त्यांनी `साधना’च्या विनोद शिरसाटांशी बोलून त्या आठवड्याच्या अंकात प्रकाशित केली आणि आम्हाला आनंदाचा धक्काच दिला. पुढे तीच मुलाखत एका ग्रंथात रा. चिं. ढेरें, कमलताई आणि त्या स्वत: यांच्या मुलाखतीच्या सोबत प्रकाशितही केली! एवढ्या मोठ्या संशोधकांच्या मांदियाळीत समाविष्ट व्हायची आमची खरोखरच लायकी आहे काय, हा प्रश्न मला तेव्हाही पडला होता आणि आजही पडतो.

०००

कोरोना आला आणि आम्हा दोघींच्याही जीवनात उलथापालथ करून गेला. सुपारे पन्नास वर्षांच्या सहवासानंतर उषाताईं कोरोनामध्ये वारल्या. त्यांच्या जाण्यानं ताराबाईंच्या जीवनातही एक मोठी पोकळी निर्माण झाली होती. सांगलीतला त्यांचा मित्रपरिवार त्यांची मोठ्या प्रमाणात काळजी घेत असला तरी काही व्याकूळ क्षण पेलण्यासाठी आम्हा दोघींनाही एकमेकीची गरज लागत होती. त्यामुळे निरुद्देश आणि काहीही कारण नसताना केवळ भावनिक विसाव्यासाठी अक्षरश: केव्हाही एकमेकींना फोन करणं सुरू झालं. त्या वेळी तर रात्री अकरा-बारा वाजताही आम्ही एकमेकीना फोन करत एकमेकीना आधार देत-घेत होतो. या वेळी सामोर्‍या येणार्‍या विविध व्यावहारीक आणि मानसिक अडचणींविषयी आम्ही सतत बोलत होतो. त्या नाशिकला गेल्या तरी आमच्या बोलण्यात खंड पडत नव्हता. अशाच मनस्थितीत एकदा आमची सांगलीला त्यांच्या घरीही भेट झाली. तेव्हाची गळाभेट दोघींनाही शांतवणारी होती.  

ताराबाईंच्या पुण्यातल्या कार्यक्रमांना न चुकता हजेरी लावणे ही माझ्या दृष्टीनं पर्वणीच होती. मग पुणे विद्यापिठाचा असो, साहित्य अकादमीचा असो किंवा महाराष्ट्र फौंडेशनचा मोठा पुरस्कार-समारंभ असो. आधी किंवा नंतर त्यांना भेटून विशेष गप्पा मारणं ही दोघींच्या दृष्टीनंही पर्वणीच! अशाच गप्पांमधून त्यांच्या हरीवंशराय बच्चन यांच्या `मधुशाला’च्या अनुवादाची माहिती कळाली. पाठोपाठ त्यांनी अनेक अनुवाद म्हणूनही दाखवले.

करोनाच्या काळात त्या काही कथांचं रेकॉर्डिंग करून पाठवायच्या. त्यातल्या काही कथा इतक्या उत्तम होत्या की मी त्यांना लिहिलं, `तुम्ही उत्तम कथाकार आहात. तुम्हाला केवळ लोककथाच्या अभ्यासक या सदरात का टाकलं जातं? मला तर काही कथा अनंतमूर्तींच्या तोडीच्या वाटतात.. ‘

त्यांचं `सीतायन’ आलं. त्या सुमारास त्या पुण्यात माझ्याकडे होत्या. पुस्तकाचा झालेला आनंद व्यक्त करण्यासाठी आम्ही एक छोटा कार्यक्रम केला. माझ्या घरासमोर राहाणार्‍या रवी परांजपे यांच्या घरासमोरच्या जागेत कार्यक्रम घ्यायला स्मिताताई परांजपेंनी परवानगी दिली आणि मुकुंद कुळे यांनी ताराबाईंची मुलाखत घेतली. अत्यल्प वेळात केलेल्या पब्लिसिटीला प्रतिसाद देत बरीच माणसे जमली आणि सगळ्यांनीच त्या मुलाखतीचा आनंद घेतला. मुलाखत आवडल्याचे नंतरही कितीतरी दिवस फोन येत होते.

इथे माझं एक निरिक्षण मला नोंदवलंच पाहिजे. साहित्य-जीवनात आम्हाला बर्‍याच जणांचा स्नेह मिळाला. त्यातल्या प्रत्येकाची विचारधारा वेगवेगळी होती. सगळेच एकमेकाच्या विचारधारेचा सन्मान करत असल्यामुळे, कुणाचाही कल कुठेही असला तरी आम्ही कडवे बनलो नाही. विविध विचारप्रवाह समजून घेऊन समृद्ध होत जायचं, या आमच्या मानसिकतेला कुणीच अटकाव केला नाही. उलट ती ती विचारधारा सामावून घेत आम्हाला अधिकाधिक श्रीमंत करत गेले.

त्यातलंच एक महत्वाचं नाव तारा भवाळकर हे आहे. मग त्यांचं ऋण नको का मानायला?

००००० 

© सुश्री उमा वि. कुलकर्णी 

मो. ९४२३५७२५५०

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ नवी ओळख…. ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

? इंद्रधनुष्य ?

☆ नवी ओळख…. ☆ श्री अरविंद लिमये 

कार्य’ आणि कर्तृत्त्व या दोन्ही शब्दांचा अतिशय सार्थ मिलाफ असलेलं एक उत्साही आणि प्रसन्न व्यक्तिमत्त्व’ ही आमच्या पहिल्या भेटीतच माझ्या मनात निर्माण झालेली ज्यांची प्रतिमा पुढे त्यांच्याच या कार्यकर्तृत्त्वाची प्रत्येकवेळी नव्याने ओळख होत गेली तसतशी अधिकच ठळक होत गेली त्या डाॅ. तारा भवाळकर म्हणजे माझ्यासारख्या साहित्यप्रेमींसाठी एक आदर्श व्यक्तिमत्त्व आहेत!

आज त्यांच्याबद्दल लिहिताना त्यांना मिळालेल्या विविध पुरस्कार आणि मानसन्मानांचा उल्लेख मला आवर्जून करावासा वाटला तरीही त्यांना मिळालेले हे यश, ही प्रतिष्ठा, हा अधिकार हे कोणत्याही फलाची अपेक्षा न करता एका आंतरिक ओढीने त्यांनी केलेल्या शोध वाटेवरील अथक प्रवासाची परिणती आहे हे आवर्जून सांगावेसे वाटते. मला उत्सुकता असायची ती त्यांना हे कां करावेसे वाटले असेल, त्यांनी ते कसे केले असेल याची. माझ्या मनातली ही उत्सुकता कांही प्रमाणात शमलीय ती त्यांच्याच मुलाखती आणि विविध व्यासपीठावरील त्यांची भाषणे व प्रासंगिक लेखन यातून ऐकायवाचायल्या मिळालेल्या त्या संदर्भातल्या अनेक घटना प्रसंगांच्या उल्लेखांमुळे! हे सगळे उल्लेख त्यांनी सहज बोलण्याच्या ओघात केलेले असले तरी तेच माझ्या मनातल्या प्रश्नांना परस्पर उत्तरे देऊन जायचे आणि तीच प्रत्येकवेळी मला होत गेलेली त्यांची ‘नवी ओळख’ असायची!

दिल्ली येथे फेब्रुवारी-२०२५ मधे संपन्न होणाऱ्या ‘९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची झालेली निवड आणि अलिकडेच त्यांना मिळालेला ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कार’ या दोन घटनांमुळे त्यांचे कार्य आणि कर्तृत्त्व नव्याने प्रकाशझोतात आलेले आहे. हा खऱ्या अर्थाने त्यांच्या कार्यकर्तृत्वाचाच सन्मान आहे! याबद्दलची त्यांच्या मनातली भावना समजून घेतली कीं त्यांच्याबद्दलचा आदर अधिकच दृढ होतो !

‘माझे अध्यापन क्षेत्र, मी केलेले संशोधन यात माझ्या आधी आणि नंतरही अनेकजणांनी भरीव कार्य केलेले आहे. कांही अजूनही करीत आहेत. मला मिळालेला आजचा हा सन्मान माझ्या एकटीचा, वैयक्तिक सन्मान नसून तो या सर्वांचाच सन्मान आहे असेच मला वाटते ‘ त्यांनी व्यक्त केलेली ही भावना त्यांच्या नम्रतेइतकीच या कामाबद्दल त्यांच्या मनात असणारी आदराची भावना व्यक्त करते तसेच या संशोधनाच्या कामांमधील व्याप्तीची त्यांना असणारी जाणिवही!

डॉ. तारा भवाळकर

डाॅ. तारा भवाळकर यांचा जन्म १ एप्रिल १९३९ चा. जन्म आणि बालपण पुणे येथे. त्यानंतर वडिलांच्या नोकरीमुळे नाशिक येथे पुढील वास्तव्य. इ. स. १९५८ मधे त्या मात्र नोकरीनिमित्ताने सांगलीस आल्या. तेव्हापासून सांगलीकर झाल्या.

‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कार’ स्वीकारल्यानंतर आपलं मनोगत व्यक्त करताना त्यांनी स्वतः सांगितलं होतं की.. ‘लेखन आणि संशोधन’ क्षेत्रातील कामाबद्दल हा सन्मान मला दिला जात असला तरी माझ्या कामाची सुरुवात नाटकापासून झालेली आहे हे मला आवर्जून सांगावेसे वाटते. ‘

‘नाटकापासून झालेली सुरुवात’ नेमकी कशी हे आजच्या तरुण नाट्यकर्मींनी आवर्जून समजून घ्यावे असेच आहे.

सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध अशा नाशिकमधील वातावरणामुळे कलेची आवड त्यांच्या संस्कारक्षम मनात लहानपणापासूनच रुजलेली होती. माध्यमिक शाळेतील अध्यापनाच्या निमित्ताने सांगलीत आल्यानंतर नृत्य नाट्य गीत विषयक अविष्कार शालेय विद्यार्थिनींकडून करून घेणे, त्यांच्यासाठी छोट्या नाटिका स्वतः लिहून, त्या बसवून, त्यांचे प्रयोग सादर करणे यात त्यांचा पुढाकार असे. त्याच दरम्यान शिक्षणविषयक अभ्यासक्रमासाठी ‘मराठी रंगभूमीची/नाटकाची वाटचाल’ या विषयावर त्यांनी केलेले लघुप्रबंधात्मक लेखन हे त्यांच्या नंतरच्या नाट्यविषयक लेखन व संशोधनाच्या वाटेवरचं पहिलं पाऊल ठरणार आहे याची तेव्हा मात्र त्यांना कल्पनाही नव्हती!

इतर हौशी रंगकर्मींना एकत्र करुन या नाट्यपंढरीत त्यांनी उभे केलेले हौशी मराठी रंगभूमीसाठीचे काम आज जवळजवळ पन्नास वर्षांनंतरही आदर्शवत ठरेल असेच आहे. सर्वांना सोबत घेऊन केलेली ‘अमॅच्युअर ड्रॅमॅटीक असोसिएशन’ची स्थापना, त्या

संस्थेतर्फे सांगली व परिसरातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी एकांकिका स्पर्धांचे सलग १५ वर्षे यशस्वी आयोजन, नाटक व एकांकिका लेखनास विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना उत्तेजनार्थ बक्षिसे देण्याची योजना, विद्यार्थी व हौशी रंगकर्मींसाठी नाट्य विषयक शिबिरांचे आयोजन, नाटक व एकांकिकांच्या स्पर्धापरीक्षकांसाठी खास चर्चासत्रांचे आयोजन यांसारख्या उपक्रमांमधील कल्पकता, वैविध्य आणि सातत्य विशेष कौतुकास्पद आहे असे मला वाटते. हे करीत असतानाच संस्थेतील कलाकारांसाठीचा राज्य नाट्य स्पर्धेतील सातत्यपूर्ण सहभाग व यश हेही संस्थेचा नावलौकिक वाढवणारे ठरले होते.

या सर्व उपक्रमांमधे डाॅ. तारा भवाळकरांचा लेखन, दिग्दर्शन व अभिनय याद्वारे असणारा सक्रिय सहभागही महत्त्वाचा ठरला. त्यांच्या ‘माझे घरटे माझी पिले’, ‘एक होती राणी’, ‘रातराणी’ या नाटकांतील प्रमुख भूमिका अतिशय गाजल्या. आणि या भूमिकांसाठी त्यांना अभिनयाची बक्षिसेही मिळाली. ‘शांतता कोर्ट चालू आहे’ या नाटकातील ‘लिला बेणारे’च्या भूमिकेसाठी त्यांना राज्य नाट्य स्पर्धेत अभिनयाचे रौप्यपदकही मिळाले होते. १९६७ ते १९८० या दरम्यान राज्य नाट्य स्पर्धा व कामगार कल्याण मंडळाच्या नाट्यस्पर्धांसाठी त्यांनी परीक्षक म्हणूनही काम केलेले आहे. त्यांच्या लोककला व नाटक या क्षेत्रातील संशोधनात्मक कामाची सुरुवात झाली ती यानंतर! त्यांचे हौशी आणि प्रायोगिक रंगभूमीसाठीचे हे योगदान ही आजच्या पिढीतील रंगकर्मींसाठी त्यांची एक वेगळी, नवी ओळखच असेल!

लोककला, संतसाहित्य, लोकसंस्कृती यांचा अतिशय सखोल, व्यापक अभ्यास आणि संशोधन आणि त्यातून आकाराला आलेले विपुल लेखन यामुळे त्यांचे नाव प्रसिद्धीच्या झोतात आले. या संशोधनातील निष्कर्षांची अतिशय समर्पक शब्दांत स्त्रीवादी दृष्टिकोनातून केलेली मांडणी हे त्यांच्या संशोधनात्मक लेखनाचे वैशिष्ट्य ठरले. अलीकडेच प्रसिद्ध झालेले त्यांचे ‘सीतायन-वेदना आणि विद्रोहाचे रसायन’ ही साहित्यकृती या दृष्टीने आवर्जून वाचावी अशी आहे. ‘प्रियतमा’, ‘महामाया’, ‘लोकसाहित्यातील स्त्री’, ‘ स्त्रीमुक्तीचा आत्मस्वर’, ‘लोकसंचिताचे देणे’, ‘मातीची रूपे’, ‘महाक्रांतीकारक विष्णुदास भावे’, ‘संस्कृतीची शोधयात्रा’, ‘स्नेहरंग’, माझिया जातीच्या’, ‘मनातले जनात’ ही त्यांच्या साहित्यकृतींची शीर्षकेच त्यांच्या संशोधनाचे आणि लेखनाचे वेगळेपण ठळकपणे अधोरेखित करणारी आहेत.

स्वतःची अध्यापन क्षेत्रातील नोकरी सांभाळून हौशी आणि प्रायोगिक रंगभूमीवर सक्रिय असतानाच त्यांनी रंगभूमीविषयक अधिक अभ्यासाची पूर्वतयारीही सुरू केलेली होती. त्यासाठी विविध ठिकाणी स्वतः जाऊन कोकण, (दशावतार, नमन खेळ), गोवा (दशावतार व अन्य लोकाविष्कार), कर्नाटक(यक्ष गान), केरळ(कथकली) अशा त्या त्या प्रांतातील लोककलांचा त्यांनी सखोल अभ्यास केला. तंजावरच्या सरकोजी राजे यांच्या सरस्वती महाल ग्रंथालयात तंजावरी नाटकांच्या मूळ हस्तलिखितांचा तिथे महिनाभर मुक्काम करून बारकाईने अभ्यास केला आणि त्या सर्व नाटकांची अधिकृत सूची प्रथमच सिद्ध केली. विशेष म्हणजे ती सूची पुढे डाॅ. म. वा. धोंड संपादित मराठी ग्रंथकोशामधे प्रथम प्रसिद्ध झाली आणि नंतर त्यांनी तंजावरी नाटकांवर एक विस्तृत लेखही लिहून प्रसिद्ध केला.

हे नाट्य संशोधन व लेखन सुरू असतानाच मराठी रंगभूमीच्या आद्य स्त्रोतांचा संशोधनात्मक अभ्यास करीत त्या पीएचडीच्या प्रबंधाची तयारीही करीत होत्याच. त्यातून आकाराला आलेल्या ‘मराठी पौराणिक नाटकांची जडणघडण (प्रारंभ ते इ. स. १९२०) या त्यांच्या शोधनिबंधाला पुणे विद्यापीठाचा सर्वोत्कृष्ट प्रबंधासाठीचा पुरस्कारही मिळाला.

यानंतरही त्यांनी नाट्यविषयक संशोधन व समीक्षापर अनेक ग्रंथ लिहिले. त्यांना विविध पुरस्कारही मिळाले. त्या सगळ्याचा विस्तृत आढावा एका वेगळ्या स्वतंत्र प्रदीर्घ लेखाचाच विषय आहे!

त्यांनी केलेले हे सर्व संशोधनात्मक कार्य कोणत्याही सरकारी अनुदानासाठी स्वत:चा मौल्यवान वेळ व शक्ती वाया न घालवता स्वत:ची पदरमोड करुन केलेले आहे हे मला आवर्जून नमूद करावेसे वाटते. आजच्या काळात तरी नि:स्पृहतेचे असे उदाहरण दुर्मिळच म्हणायला हवे. डाॅ. तारा भवाळकरांच्या व्यक्तिमत्त्वाचा हा अनोखा पैलू ही त्यांची एक वेगळी ओळख ठरावी!

अगदी बालवयातही साध्या साध्या गोष्टीसुध्दा सहजपणे न स्वीकारता मनात आलेले ‘का?, कशासाठी?’ असे प्रश्न सातत्याने विचारीत त्या घरातील मोठ्या माणसांना भंडावून सोडत असत. त्यांच्या पुढच्या वाटचालीतही प्रत्येक बाबतीतले त्यांच्या मनातले ‘कां?आणि कशासाठी?’ हे प्रश्न सतत स्वत:लाच विचारत स्वतःच त्यांची उत्तरेही शोधत राहिल्या. या शोधातूनच आकाराला येत गेलेलं त्याचं प्रचंड कार्य आणि त्यातून सिध्द झालेलं त्यांचं कर्तृत्त्व हीच त्यांची नवी ओळख विविध सन्मानांनी आज अलंकृत होत त्यांचा सक्रिय वानप्रस्थ खऱ्या अर्थाने कृतार्थ करीत आहे!!

© श्री अरविंद लिमये

सांगली

मो ९८२३७३८२८८

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ नवं वर्ष -नवी स्वप्नं ☆ सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) ☆

सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

?  विविधा ?

☆ नवं वर्ष -नवी स्वप्नं ☆ सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) 

— वा-यानं फडफडणार कॅलेंडर वार शांत होताच जरा स्थिरावल.डिसेबर २०२४

नजरेला पडल.मनांत आलं.. बघतां बघतां वर्ष सरलं कि.!

कुणा जवळच्याला निरोप द्यावा तसं मनं खंतावलं.

डोळेही ओलावले.

खरं तर कॅलेंडरच शेवटचं पानं म्हणजे नेहमीच नवीन वर्षाच्या चाहुलीचं.!

तसा नववर्षाच्या स्वागतासाठी तरुणाईचा जल्लोष सुरू झाला आहे.त्यादिवसाचे बेत उत्साहाने ठरवून झाले आहेत.

आता नवं वर्षाचे नविन कॅलेंडर भिंतीवर लागेल.तसंही

जुन्याच्या जागी नवीन येत असतंच. !. एका कॅलेंडरच जाणं आणि नव्या कॅलेंडरच येणं एवढाच,याचा सहज सोपा अन् मर्यादित अर्थ आहे का? या कॅलेंडरच्या पानांवर असलेल्या प्रत्येक तारखेसोबत,आपली गती, कार्यक्रमाच्या नोंदी जोडलेल्या आहेत.मागील वर्षाला निरोप देतांना हेही लक्षांत येत अगदीं ठरवलेल्या काही गोष्टी करायच्याच राहून गेल्यात. प्रगतीचे-समाधानाचे ,आनंदाचे जे हवेसे क्षणं मिळाले त्या बरोबरच मनं अस्वस्थ, उद्विग्न करणारे ,डोळ्यांत पाणी येणारे नकोसे क्षणंही आज आपल्या बरोबर आहेत.यातील नकोशा क्षणांच जगतांना झालेलं ओझं मागे ठेवून, आपल्याला हवं ते शुभंकर असं बरोबर घेऊयात. २४ सालचं कॅलेंडर पुन्हा एकदा चाळतांना प्रत्येक तारीख, दिवस यातून स्वतःच स्वतःला वाचूयात.रोजचं जगणं , स्पर्धा, परीक्षा यातून प्रत्येक पानाबरोबर वाटचाल करतांना,धांवतांना मुठीतली कांही स्वप्नं घरंगळून गेली असतील.तर ती, या नवीन वर्षात एक एक गोळा करुयात.काहीवेळा अगदी अनपेक्षितपणे आपलं स्वत:च असं जग,जगणं नव्या वळणावर येऊं लागलंय याचा अनुभव येतो.अशावेळी मनं असंख्य प्रश्नांत भिरभिरत असेल तर प्रश्नांचा पसारा आवरुन सकारात्मकतेने त्याकडे पाहूयात.तसेच आपल्या व समोरच्या कडून कळत न कळत झालेल्या चुका ‘ साॅरी ‘ या शब्दाने दुरावा नाहिसा करतात,याचा
प्रत्यय घेऊयात.जुन्या बरोबर नवी नाती निर्माण करुयात.

ज्यांच्यामुळे आपलं जगणं आत्तापर्यंत वळणदार, समाधानी,सुखावह झालं, त्यांच्या बद्दल वयाचा विचार नकरता कृतज्ञता व्यक्त करुयात. मनांत येत.. आता नवीन कॅलेंडर भिंतीवर लागेल अन् पहिल्या पानावरचा पहिला दिवस हा नुसता उगवणार नाही तर प्रत्येकाच्या मनांतील नव्या स्वप्नांना जागवेल. नव्या संकल्पांसाठी, नव्या उर्मीला साद देईल.!

नव्या वर्षातल पहिलं पाऊलं नव्याचा आरंभ करतांना पहिल्या दिवसालाच चिकटून राहणार नाही याची काळजी घेऊयात.मागील वर्षातील ताणे-बाणे, कडवटपणा, सारं विसरून आनंद, समाधान देत-घेत नवीन वर्षाच स्वागत करुयात. मानसिक, शारीरिक आरोग्यपूर्ण जीवन, समाधान.

यासाठी सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!💐

©  शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड-पुणे.३८.

   मो.९५९५५५७९०८ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ व्रतोपासना – ५. तळपत्या सूर्याची निंदा करु नये ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

व्रतोपासना – ५. तळपत्या सूर्याची निंदा करु नये ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

उन्हाळा सुरु झाला की मला काही मंडळी आवर्जून आठवतात. त्यांना जणू सूर्य म्हणजे आपला शत्रू वाटतो. आणि कोणत्याही वेळी बाहेर पडले तरी ही मंडळी काय हा सूर्य,किती ते उन अशी सतत तक्रार करत असतात. याला बऱ्याच प्रमाणात मीडिया पण जबाबदार आहे. त्यांच्या प्रॉडक्टच्या जाहिराती मनावर फार परिणाम करतात.

त्या विरुद्ध काही मंडळी सूर्योपासना करतात. त्या विषयी फार आदर वाटतो.

उन्हाळा सुरु झाला की, आपण सहज म्हणतो, ‘ काय हा उन्हाळा. केव्हा संपणार? ‘ पण हा सूर्य तळपलाच नाही तर पुढे पावसाळा कसा येणार? आणि धनधान्य कसे पिकणार? आणि हा सूर्य प्रकाश सगळ्याच जीवसृष्टी साठी आवश्यक असतो. कित्येक कामे सूर्यावर अवलंबून असतात. आपली दिनचर्या जरी घड्याळावर अवलंबून असेल तरी इतर सृष्टी साठी मात्र सूर्य आवश्यक असतो. आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा सूर्य आवश्यक आहे. त्याच्या शिवाय आपण दिवसाची कल्पना सुद्धा करू शकत नाही. आपल्याला आवश्यक आणि महत्वाचे व्हिटॅमिन डी आपल्याला सूर्य प्रकाशात सहज व मोफत मिळते. पृथ्वीवर ज्या भागात काही महिने सूर्य उगवत नाही त्यांना सूर्याचे दर्शन,त्याची उब खूप महत्वाची वाटते.

सूर्याचे अनन्य साधारण महत्व आहे आणि ते सर्वांना माहिती आहे.  ज्या वेळी सूर्य जास्त प्रखर असेल त्यावेळी आपण आपले विविध उपयांनी संरक्षण करु शकतो. त्या साठी सूर्याला नावे ठेवणे योग्य नाही. आपण मोठी माणसे जसे वागतो,बोलतो त्याचेच अनुकरण लहान मुले करतात. आपण जर त्यांना सूर्याचे महत्व सांगितले तर त्यांना आपण चांगली दृष्टी, चांगले विचार देऊ शकतो. आपण ज्या निसर्ग देवता मानतो त्यांचे पूजन करतो त्यात सूर्याचे स्थान खूप महत्वाचे आहे. म्हणून  सूर्याची कधीही निंदा करू नये.

हे व्रत म्हणून आपण नक्कीच आचरणात आणू शकतो.

© सुश्री विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक, संगितोपचारक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… भाग – २४ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… भाग – २४ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

मृणाल

मृणाल म्हणजे माझी आतेबहीण. माझ्यात आणि तिच्यात  फार फार तर एखाद्या वर्षाचं अंतर असेल म्हणजे आम्ही तशा बरोबरीच्याच. एकत्रच वाढलो,  एकत्र खेळलो,  बागडलो, मोठ्या झालो आणि आयुष्याला जशी वळणं  मिळत गेली तसं तसे आपापल्या विश्वात रमलो.

पण आज मागे वळून बघताना, मृणाल एक व्यक्ती म्हणून तिचा विचार करताना माझ्या मनात अनेकविध अनेक रंगी भावना जागृत होतात.  कळत नकळत आपण या व्यक्तीमधल्या कोणत्या आदर्श मूल्यांकडे आकर्षित होत गेलो किंवा आजही आकर्षित होतो याचा विचार माझ्या मनात येतो आणि एकाच वयाच्या जरी असलो तरी त्या त्या वयातल्या वैयक्तिक गुणांचे मापन करताना मृणाल माझ्यापेक्षा अनेक बाबतीत सरस्, सर्वश्रेष्ठ होती—आहे  आणि तिच्या या श्रेष्ठत्वाचा पगडा अथवा सरसतेचं  प्रभुत्व माझ्या मनावर लहानपणापासूनच होतं असं वाटतं. 

गोष्टी अगदी किरकोळही असतील. म्हणजे ज्या वयात मला साधी कणिक भिजवता येत नव्हती त्या वयात मृणाल अगदी सफाईदारपणे सुंदर मऊ गोलाकार पोळ्या करत असे.  कुमुद आत्या कधी आजारी असली तर क्षणात ती साऱ्या घर कामाची जबाबदारी लीलया उचलत असे.  अगदी तिच्या आईप्रमाणे घरातलं स्वयंपाक पाणी व इतर सारी कामे, शिवाय आईच्या औषधपाण्याचं वेळापत्रक सांभाळून, सर्व काही आवरून शाळेत वेळेवर पोहोचायची.  शाळेतही अत्यंत हुशार विद्यार्थिनी म्हणून तिची ख्याती होती. एकही दिवस गृहपाठ केला नाही म्हणून तिला शिक्षा झाली नसेल.  सुंदर हस्ताक्षरातल्या तिच्या वह्यांची आठवण आजही माझ्या मनात आहे.  शिवाय ती नुसतीच अभ्यासू किंवा पुस्तकी किडाही नव्हती.  लहान वयातही तिचं वाचन दांडगं होतं.  तिला कोणतंही पुस्तक द्या ते ती एका बैठकीत वाचून काढायची. वाचनाचा वेग आणि आकलन या दोन्हीचा समतोल ती कसा काय साधायची याचं मला आजही नवल वाटतं.  जे पुस्तक वाचायला मला एक दोन दिवस तरी लागायचे ते ती काही तासातच कशी काय संपवू शकते याचं मला नेहमी आश्चर्य वाटायचं आणि अशा अनेक कारणांमुळे असेल पण ही समवयस्क  आतेबहीण  मनातल्या मनात माझी गुरुच बनायची.  नकळत मी ही माझ्या मनाला सांगून पहायची,” मृणाल सारखं आपल्यालाही हे आलं पाहिजे…जमलं पाहिजे.”

एक मात्र होतं तिचं लहानपण आणि माझं बालपण -काळ एकच असला तरी आमच्या भोवतालचं वातावरण वेगळं होतं. मृणाल भावंडात मोठी होती म्हणून तिला जन्मत:च मोठेपण लाभलेलं होतं. आई-वडिलांची, भावंडांची ती अतिशय लाडकी होती हे नि:संशय.  तिचे पप्पा ज्यांना आम्ही “बाळासाहेब” म्हणत असू- ते  एक चतुरस्त्र  व्यक्तीमत्त्व नक्कीच होतं. शिक्षण क्षेत्रामधील एक नामांकित व्यक्ती म्हणून त्यांचा लौकिक होता. शिक्षणाचे महत्त्व त्यांना फार होतं. शिक्षण याचा अर्थ केवळ पाठ्यपुस्तकीय किंवा केवळ जगण्यासाठी उपयुक्त साधन एवढंच नव्हे तर ते कसं चौफेर आणि अवधानयुक्त असावं याबद्दल ते खूप आग्रही होते.  आपल्या तिन्ही मुलांनी नेहमीच उच्च स्थानावर असायला हवं म्हणून ते जागरूकही होते.  त्याबाबतीत ते काहीसे कडक  आणि शिस्तप्रिय मात्र होते.  काहीसं छडी लागे छम छम विद्या येई घमघम  या काव्यपंक्तीचा लाक्षणिक अर्थ त्यांच्या कृतीत जाणवायचा. त्यामुळे त्यांचा धाक वाटायचा.   आदराबरोबर भीती वाटायची आणि मला असंही तेव्हा वाटायचं की मृणालभोवती एक धाक आहे,  काहीसं दडपण आहे.  ज्या मुक्त वातावरणात मी वाढत होते त्यापेक्षा मृणालभोवतीचं वातावरण नक्कीच वेगळं होतं. बाळासाहेबांची आणि माझ्या वडिलांची वैचारिक बैठक,  दोघांच्याही व्यक्तिमत्त्वातील भव्यता जरी समान असली तरी कुठेतरी विचारांच्या प्रतिपादनात नक्कीच साम्य नव्हतं आणि याच फरकाचा परिणाम आमच्या जडणघडणीत होत असावा पण असे जरी असले तरी माझ्या आणि मृणालच्या अनेक आघाडीवरच्या प्रगतीत महत्  अंतर होतं.  हे अंतर पार करण्याची जिद्द माझ्यात नव्हती  पण मी विलक्षण प्रभावित मात्र व्हायची. 

सुट्टीत आम्ही नेहमी एकत्र खेळायचो. विशेषतः आमचे  बैठे खेळ खूपच रंगायचे. त्यातले ठळक खेळ  म्हणजे कॅरम,  पत्ते आणि बुद्धीबळ.  कॅरम आणि पत्ते खेळताना  माझ्या मनात नेहमीच छुपा विचार असायचा की, “मृणालच आपली पार्टनर असावी.  तिच्या विरोधात नको बाई खेळायला.” कारण त्यातही ती अग्रेसरच होती पण त्यात मला जाणवायचा तो तिचा समजूतदारपणा.  खेळताना “कुठे चुकले” हे मात्र ती सांगायची  पण ते सांगताना तिचा सूर अगदी विलंबित लईत असायचा.

तिच्यात आणि माझ्यात खेळताना एक फरक जाणवायचा तो म्हणजे मला खेळायला खूप आवडायचे,  माझी वृत्ती खेळकर होती पण “खेळाडू” हा किताब मला मिळू शकला नाही.  याउलट मृणाल मैदानी खेळात, बैठ्या खेळात,  बॅडमिंटन, टेबल टेनिस सारख्या खेळातही प्रवीण  होती. आमच्या शाळेच्या टीमची तर ती कॅप्टनच होती. अंतर शालेय जिल्हास्तरीय क्रीडा क्षेत्रात तिची उल्लेखनीय कामगिरी होती आणि खेळातलं हे प्राविण्य तिने महाविद्यालयीन स्तरावरही  गाजवलं.  तिला मिळणाऱ्या ट्रॉफीज  पाहून त्या बालवयात, उमलत्या वयात तिच्याविषयी वाटणाऱ्या कौतुकानेच नव्हे तर “मी का नाही तिच्यासारखी होऊ शकत?” या वैष्यम्यानेसुद्धा  मी भारावून जायचे. 

खरं म्हणजे आमच्या परिवारामध्ये वेगवेगळी गुणसंपदा तशी प्रत्येकात होती पण मृणाल मला नेहमीच सर्वगुणसंपन्न वाटायची.  दिवाळीत  तिने काढलेल्या मोठमोठ्या सुबक रांगोळ्या, तिचे भरत काम,  तिचे शिवणकाम,  तिने बनवलेला फराळ या सगळ्यातला तिचा जो उत्कृष्टपणा असायचा त्याने मात्र मी थक्क व्हायचे.  केवळ तिच्या गुणांची यादी देणे हा मात्र माझा या लेखनाविषयीचा उद्देश नक्कीच नाही.

तिच्या आयुष्याचा आलेख मांडताना म्हणजे अगदी शाळेत सतत पहिला नंबर मिळवणाऱ्या शाळकरी मुलीपासून ते इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या गव्हर्नमेंट कॉलेजच्या  डीन पदी पोहोचणारी,  पीएचडीचे अनेक विद्यार्थी घडवणारी, विद्यार्थीप्रिय  एक बुद्धिमान स्त्री म्हणून तिच्याकडे  पाहताना टप्प्याटप्प्यावर माझ्या मनात अनेक प्रश्न आहेत.  अनेकविध गुणांची शिदोरी बांधून देताना त्या अज्ञात परमेश्वराने तिच्या भविष्यातल्या नियतीविषयीचा विचार आणि तरतूद करून ठेवली  होती का?

कुमुदआत्या  गेली तेव्हा मला वाटते मृणाल कॉलेजच्या पदवी क्रमाच्या शेवटच्या वर्षाला असेल.  विनू, अनिल (तिचे  धाकटे भाऊ) तर लहानच होते. खरं म्हणजे अर्धवट वयात ज्यांचं मातृत्व हरवतंं  तेव्हा  त्यांचं  बिथरलेपण काय असू शकतं याची मी नक्कीच साक्षीदार आहे आणि त्याहीपेक्षा जास्त एका क्षणात  प्रौढत्वात विरघळणारी  बाल्याची रेषा मला अधिक कंपित करून गेली.  क्षणात तिने डोळ्यातले अश्रू पुसले होते आणि लहान भावांचे भविष्य आणि वडिलांचं पोरकेपण,  एकाकीपण अत्यंत प्रेमाने आणि जबाबदारीने स्वतःच्या झोळीत पेललं.  एका क्षणात तिने एक वेगळं मातृत्वच  स्वीकारलं जणू आणि आनंदाने नसलं तरी  विनातक्रार तिनं  ते सांभाळलं.  सामान्यातलं असामान्यत्व म्हणजे काय,  साधुत्व म्हणजे काय,  संतपण  कशाला म्हणायचं याविषयीचे अदृश्य सूक्ष्म सूत्र मला मृणालच्या व्यक्तिमत्त्वात नक्कीच शोधता आलं.

कुमुदआत्या गेल्यानंतरचं तिचं आयुष्य म्हणजे खरोखरच एक यज्ञ होता,  एक तपस्या होती.  जगण्याची तिची भूमिकाच पार बदलून गेली होती. भावंडांना आईची उणीव तिने कधीच भासू दिली नाही आणि पहाडासारख्या  शिस्तप्रिय, कडक व्यक्तिमत्त्वांच्या वडिलांसाठीही ती सावली बनून राहिली. स्वतःच्या साऱ्या कायिक, ऐहिक सुखाच्या तिनं जणू काही समिधा केल्या पण आईविना जगताना परिवारातला आनंद टिकवण्यासाठी ती धडपडत राहिली.  विनू  आणि अनिल मार्गी लागल्यानंतर तिने स्वतःच्या आयुष्याचा विचार करायला सुरुवात केली. तोपर्यंत ती चाळीशीत पोहचली होती.  अर्थात  तिने स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर,  करिअरचे उच्चतम टप्पे पार केलेलेच होते. अपार जिद्दीने आणि चिकाटीने शिष्यवृत्ती मिळवल्या, परदेशी सेमिनार गाजवले. विद्यार्थ्यांचे प्रेम मिळवले.  शैक्षणिक क्षेत्रात अत्यंत गरजेचा घटक म्हणजे गुणांकनातला प्रामाणिपणा. तिने तो कायम जपला. स्पर्धात्मक परीक्षेसाठीच्या परीक्षकांच्या पॅनलवर असताना तिला करोडपती बनण्याची अनेक प्रलोभने दाखवली गेली पण तिने ती अत्यंत तात्विकपणे झुगारून लावली आणि त्यासाठी तिला ते पदही सोडावे लागले पण त्यामुळे ती यत्किंचितही  विचलित झाली नाही. 

खरं सांगू जेव्हा मी आणि मीच नव्हे तर तिच्या आजूबाजूचे सारे समवयस्क एका ठराविक चाकोरीतलं सुखी आयुष्य जगत होते तेव्हा मृणाल मात्र जीवनातली अडथळ्यांची शर्यत अथकपणे नेटाने खेळत होती. सर्वगुणसंपन्नतेची  शिदोरी तिला कोणा अज्ञात शक्तीने बांधून दिली होती त्या बळावर ती खंबीरपणे स्वाभिमानाने तिचं जीवन जगत होती.

अनेकवेळा मला ती काहीशी घट्ट विचारांची वाटते. तिच्यात एक क्रिटीक आहे असंही जाणवतं. ती पटकन् किंवा उगीचच समोरच्याला बरं वाटावं म्हणून कौतुक करण्याच्या भानगडीत पडत नाही.हा गुण समजायचा की तिच्या व्यक्तीमत्त्वातला अभाव मानायचा हे मला माहीत नाही. पण ती एक आवडती प्राध्यापिका, प्राचार्य होती. तिने अनेकांना घडवलं याचा अर्थ तिने कुणाही गुणवंताचं मानसिक खच्चीकरण न करता किंवा अवास्तव कौतुकही न करता त्याचा यशाचा मार्ग त्याला दाखवून दिला हे सत्य आहे. शिक्षक कसा असावा याचा ती वस्तुपाठच आहे.

एका अपघातात तिला कायमस्वरूपी अपंगत्व प्राप्त झालं तरी पण कधी असहाय्यतेचं अथवा अधूपणाचं भांडवल करून जगणं तिने मान्य केलं नाही. अशाही परिस्थितीत आजही  कौटुंबिक सुखदुःखाच्या प्रसंगी,  सामाजिक वा  इतर अनेक ठिकाणी तिची मनापासून उपस्थिती असते. 

इतक्या मोठ्या पदावर विराजमान असतानाही निवृत्तीनंतर मिळणाऱ्या वेतनासाठी केवळ सामाजिक करंटेपणाशी,  संकुचित जळाऊ वृत्तीशी तिला विनाकारण लढा द्यावा लागला होता.  स्वतःच्या शारीरिक व्याधींचाही बाऊ न करता केवळ “भागधेय” असं समजून ती कणखरपणे लढत राहिली.  ती शरण कधीच गेली नाही.

आजही आजारी नवऱ्याची मनापासून सेवा करताना तिचा तोल ती कधीही  ढळू देत नाही.  आम्हीच तिच्यावरच्या प्रेमामुळे तिला काहीबाही सूचना देत असतो पण ती एकच सांगते,” ठीक चाललंय्  माझं.  करू शकते मी.  इतका काही त्रास नाहीये.”

अमेरिकेवरून येणाऱ्या धाकट्या भावासाठी आजही त्याच वात्सल्याने ती त्याच्या आवडीचे खाद्यपदार्थ स्वतःच्या हाताने बनवते.  माझ्या मनात नेहमी येतं इतक्या गुणसंपन्न बुद्धिमान व्यक्तीचं आयुष्य कसं असायला हवं होतं..? निवांत आरामदायी…  असं नक्कीच नाही जे आज तिचं आहे.  जगत असताना कदाचित तिच्या हातून फार मोठ्या भावानिक  चुका झाल्या का? कुठेतरी व्यवहारात ती कमी पडली का? की तिच्या आयुष्यातल्या सुखाच्या वेळाच चुकल्या?

ती मला एकदा म्हणाली होती, “ सुख म्हणजे  नक्की  काय असतं ते मला माहीत नाही पण मी माझ्या दुःखाला, वेदनांना शंभर टक्के देऊन  त्यांना मात्र माझ्या ताब्यात ठेवलेलं आहे.”  अशावेळी मला तिच्या स्त्रीत्वात एक कणखर पौरुष दिसतं. 

पुन्हा पुन्हा मी मृणालचा विचार करते तेव्हा मला वाटतं मृणालसारख्या व्यक्ती इतरांनाच उदाहरणादाखल असतात, आधारभूत असतात आणि मुख्य म्हणजे अशा व्यक्ती कधी निराधार नसतातच.  त्यांच्या अंतरातलं बळ हाच त्यांचा आधार असतो.  बाह्य जगाच्या आधाराची त्यांना गरज नसते का? एक मात्र नक्की की स्थितप्रज्ञतेचे प्रवाह  मला तिच्या जगण्यात नेहमी जाणवतात.  खिंड लढवणाऱ्या योध्याचे दर्शन  मला तिच्यात होते.  मी असं म्हणणं म्हणजे अतिशयोक्ती आहे किंवा अवास्तव केलेलं ग्लोरीफिकेशन आहे असं मला या क्षणीही अजिबात वाटत नाही. 

मृणाल या शब्दाचाही मला खरा अर्थ तिच्यात सापडतो… ..  कमळाचा देठ .. ..  तो कुठे दिसतो का?   चिखलात  घट्ट रुतलेला असतो.  आपल्याला दिसतात ती फक्त पाण्यावरची गोजिरवाणी सुरेख उमललेली कमळं… … मृणालही अशीच आहे.  जीवनरूपी दलदलीत  पाय घट्ट रोवून रुतलेली. चेहऱ्यावर मात्र सदैव हास्याचं कमळ फुललेलं. 

 क्रमशः…

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अशोकसुंदरी… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये 

? इंद्रधनुष्य ?

☆ अशोकसुंदरी… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

साक्षात शंकर महादेवाची पत्नी गणपती आणि कार्तिकेयाची माता असलेल्या पार्वतीला सुद्धा कधीतरी खूप एकाकी वाटे. भगवान शंकर ध्यानात मग्न आणि पुत्र आपापल्या उद्योगात. त्यामुळे तिला वाटले आपल्याला समजून घेणारी आपल्या भावनांची कदर करणारी अशी एक कन्या आपल्याला हवी. एकदा भगवान शंकर तिला इंद्राची राजधानी अमरावती येथे घेऊन गेले. तेथे सुंदर वृक्षवल्ली पाहून पार्वतीला खूप आनंद झाला. तेथे कल्पवृक्ष पाहून तिला खूप आनंद झाला .  तिने आपल्याला एक मुलगी हवी अशी इच्छा बोलून दाखवली. कल्पवृक्षाने तिला एक सुंदर बालिका दिली. पार्वती खुश झाली. तिने तिचे नाव ठेवले अशोक सुंदरी. दुःख दूर करणारी एक सुंदर स्त्री म्हणजे अशोकसुंदरी. अशोकसुंदरी हळूहळू मोठी झाली. तारुण्याने मुसमुसली .तेव्हा पार्वतीने तिच्या लग्नाविषयी विचार सुरू केला. चंद्रकुलात उत्पन्न झालेला राजपुत्र नहुुश हा आपला जावई व्हावा असे तिला वाटले. तिने अशोक सुंदरीला सांगताच तिला सुद्धा ते पटले .एक दिवस हुंड राक्षसाचे लक्ष तिच्याकडे गेले. त्याने तिला लग्नाविषयी विचारले. तिने नकार देताच त्याने तिचे कपटाने अपहरण केले. अशोक सुंदरीने त्याला शाप दिला, मी साक्षात पार्वती देवीची कन्या आहे .तुझा मृत्यू नहुशाच्या हातून घडेल असा मी तुला शाप देते. मग  ती तिथून निसटली. व कैलास पर्वतावर पार्वतीकडे गेली. इकडे घाबरलेल्या हुंडा राक्षसाने नहुशाचे पण अपहरण केले.  तेथील एका दासीने त्याला गुपचूप पळवले आणि वशिष्ठ ऋषींच्याकडे सुपूर्द केले. वशिष्ठ- अरुंधती यांनी त्याचे चांगले पालनपोषण केले. त्याला खूप शिकवले . त्याने हुंड राक्षसाशी युद्ध करून त्याला ठार केले आणि अशोक सुंदरीशी विवाह केला. अशी ही पार्वतीची पर्यायाने शंकर- पार्वती यांची कन्या अशोक सुंदरी.

लेखिका : सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ १६ डिसेंबर… विजय दिवस ! ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

१६ डिसेंबर… विजय दिवस ! ☆ सौ कल्याणी केळकर बापट

काही सण, समारंभ, उत्सव, सोहळे असे असतात की जे आपण कधीही विसरू शकत नाही. त्या दिवसांच आपल्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व असतं. त्या दिवसांमध्ये आपल्या स्वतःच्या वैयक्तिक घटनांचा समावेश असतो आणि ज्या आपल्या मातृभूमीवर आपण मनापासून प्रेम करतो तिच्यासंदर्भातील महत्वाच्या घटनांच्या दिवसाचा पण त्यात समावेश असतो.

आपल्या भारताच्या इतिहासात काही दिवस असे आहेत की जे प्रत्येक भारतीयाने समजून घेतले पाहिजे किंवा त्या बद्दल माहिती ठेवली पाहिजे. कारण त्या दिवसांचा आत्ताच्या पिढीवर तसेच आजच्या वर्तमानावर प्रभाव जाणवून येतो. त्यातलाच एक हा “विजय दिवस’. 16 डिसेंबर ! भारत आणि पाकीस्तान देशांमध्ये ज्या ज्या लढाया झाल्या त्या मध्ये एक महत्वपूर्ण लढाई म्हणजे १९७१ ची. त्या युद्धा नंतरच भारताने पाकीस्तानला हरवून बांगलादेश या नव्या देशाला जन्माला घातलं. सर्वात कमी झालेली मनुष्य हानी हे १९७१ च्या युद्धाचं एक वैशिष्ट्यं. अर्थात त्या मागे असलेले सैन्याचे अप्रतिम नियोजन व तो निर्णय घेण्याची तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हिम्मत.

इंदिरा गांधी किवा पंडित नेहरू, महात्मा गांधी यांच्याकडे बहुतांश लोक खूप एका बाजूने बघतात असे मला वाटते.

कोणताही मनुष्य असो तो त्याच्या आयुष्यात काही निर्णय बरोबर घेतो तर काही चूक. पण खास गोष्ट अशी चूक निर्णय घेतांना ते चूक निर्णय आहे हे तेव्हा कोणाच्याच लक्षात येत नाही. तसचं या महान लोकांच्या बाबतीत झालं.

पण राजकीय विचार जरा बाजूला ठेवले आणि १९७१ च्या युद्धाचा नीट अभ्यास केला तर या मागे इंदिरा गांधी याची निर्णय क्षमता आणि नियोजन करण्याची पद्धत या बद्दल कौतुक नक्की वाटेल. या युद्धाच्या यशामागे तत्कालीन सैन्यप्रमुख जनरल सँम मानेकशॉ यांचा प्रंचड मोठा हात व इंदिरा गांधीची साथ होती. तेव्हाच्या पश्चिम पाकीस्तानने पूर्व पाकीस्तानवर केलेले प्रचंड अत्याचार व त्यातून हजारो बंगाली लोकांचे भारतात स्थलांतर यामुळे भारत पण या युद्धात ओढल्या गेला.

पण घाई घाई मध्ये चुकीचे निर्णय न घेता, थोडा काळ थांबून व शांत नियोजन करून अवघ्या १६ दिवसात पाकीस्तानला आपण आत्मसमर्पण करायला भाग पाडलं. दुसऱ्या जागतिक महायुद्धानंतर हे सर्वात मोठे आत्मसमर्पण ठरले. आज सुद्धा तो फोटो एक मोठ्या इतिहासाची साक्ष व ख-या अर्थाने आयकाँनिक समजल्या जातो. ज्या मध्ये भारताकडून ले. ज. जगजीत सिंग अरोडा व पाकीस्तान कडून ज. नियाझी यांनी आत्मसमर्पणाच्या करारावर स्वाक्ष-या केल्या व तो दिवस होतां १६ डिसेंबर.

म्हणून हा दिवस आपण” विजय दिवस” म्हणून साजरा करतो. आजच्या पिढीला त्या दिवसाचे महत्व जेवढं कळायला हवं तेवढं कदाचित कळतं नसेलही. पण अभ्यासाने कळलं की त्या दिवसानंतर खूप गोष्टी बदलल्या हे पण खरं. जसं एक नवा कोरा देश जन्माला आला, पाकीस्तान ची ताकद कमी झाली. भारत सुध्दा आंतरराष्ट्रीय राजकारणात सक्रीय भाग घेऊन निर्णय तडीस नेऊ शकतो हे संपूर्ण जगाने पाहिले. तेव्हा भारत एवढा श्रीमंत नसतांनाही स्थलांतरीत लोकांना काही काळ ठेऊन घेऊन, स्विकारुन दयाळू मानवतेचं दर्शन संपूर्ण जगासमोर चित्रीत झालं. युद्धाच्या आधी रशिया सोबत मैत्री करार करून आपला आंतरराष्ट्रीय दबदबा भारताने वाढवला. १९७१ च्या युद्धात जे युद्ध कैदी होते त्यांना काही काळानंतर सुखरूप पाकीस्तानात सोडून देण्यात आले. त्यात सुध्दा भारताचा मानवतावादी दृष्टीकोन संपूर्ण जगाला दिसला. त्या युध्याच्या विजयानंतर मा. इंदिरा गांधीच्या प्रसिद्धीला मात्र सीमाच नव्हती. एक स्त्री पंतप्रधान असा अचंबित करणारा निर्णय घेऊ शकते हेच मुळात भारतीय पुरुषप्रधान संस्कृतीला पचणारी गोष्ट नव्हती. पण इंदिरा गांधीनी हे करून दाखवलं.

आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताला नेहमी पिछाडीचा किंवा एक गरीब देश असंच हिणवल्या जायचं. ह्या घटनेनंतर मात्र हे चित्र हळू हळू बदललं व त्या नंतर झालेल्या अणुस्फोट चाचणीने तर संपूर्ण जगाचे डोळे उघडल्या गेले.

मी जसे आधी बोलले की एक व्यक्ती आपल्या आयुष्यात काही चुकीचे निर्णय घेते तर काही बरोबर, पण आपण एक समंजस नागरिक म्हणून नेहमी चुकीच्या निर्णयाबद्दल बोलण्या पेक्षा कधी आपलं मन मोठ करून चांगल्या गोष्टी केल्याबद्दल त्यांचे आभार मानले पाहिजेत. म्हणून इंदिरा गांधी व तत्कालीन सैन्याला “विजय दिवस” हा अभूतपूर्ण दिवस आमच्या सारख्या सामान्य जनतेला दाखवल्यामुळे मनापासून सलाम आणि धन्यवाद.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “आकाशातला ‘नीत’ळ स्वर…” ☆ सुश्री वैशाली पंडित ☆

☆ “आकाशातला ‘नीत’ळ स्वर…” ☆ सुश्री वैशाली पंडित ☆

कधीकधी आपल्याला लाभलेलं मैत्र फारच अकल्पित असतं. माझ्या मैत्रीच्या वर्तुळात अशीच एक सहेली माझ्या हातात हात गुंफून गेली चाळीस वर्षे उभी आहे.

तिची माझी ओळख रत्नागिरी आकाशवाणीच्या केंद्रात झाली. तेव्हा मी खारेपाटणला वास्तव्याला होते. माझे पती श्रीनिवास तिथल्या शेठ म. ग. हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षक होते. त्या शाळेचे मुख्याध्यापक श्री. शरद काळे हे सत्यकथा या गाजलेल्या मासिकाचे लेखक होते. त्यांचे अनेक कार्यक्रम रत्नागिरी आकाशवाणीवर होते. त्यांनी माझ्यातला होतकरू लेखक ओळखला होता. अशाच एका आकाशवाणी फेरीत त्यांनी माझं नाव तिथे सुचवलं.

“पंडितबाई, तुम्हाला आकाशवाणीवरून कार्यक्रमासाठी आमंत्रण येईल हं. कवितेचे विषय तेच देतील. “असा निरोप त्यांनी आणला आणि मी उत्कंठतेने त्या निमंत्रणाची वाट पाहू लागले.

खरंच एक दिवस तो लिफाफा आला. माझा आनंद गगनात मावेनासा झाला. कवितेचा विषय होता, ‘कुटुंबनियोजन’. तेव्हा तर मी नवखीच होते. दे दणादण सुचवल्या घरी सुखी राहण्यासाठी कविता ‘बनवल्या’. काव्यवाचनाची जोरदार प्रॕक्टीस वगैरे करत नवऱ्याला जेरीस आणलं. आणि अखेर तो दिवस आला.

रत्नागिरी आकाशवाणीच्या त्या इमारतीत पाऊल टाकलं. पहिल्यांदाच आकाशवाणीची इमारत बघत होते. गेटवर व्हिजिटर्स रजिस्टर भरणं वगेरे नवीनच होतं. आत गेले. कार्यक्रम विभागात माझं पत्र दाखवलं.

“वैशाली पंडित ना ? ये ये. मीच रेकाॕर्डिंग करणार आहे. घरकुल कार्यक्रम मीच घेते. “असं म्हणत एक प्रसन्न व्यक्तिमत्वाच्या स्त्रीने माझं स्वागत केलं.

‘…याच त्या ‘नीता गद्रे. ‘

प्रथमदर्शनीच मला त्या खूप आवडल्या. त्यांचा आवाज किंचित बसका तरीही आत्मविश्वास दाखवणारा होता. व्यक्तिमत्वात ठामपणा आणि आपलेपणा यांचं मजेदार रसायन होतं. कुरळ्या केसांची महिरप गोऱ्यापान चेह-यावर खुलत होती. वेषभूषेतली रंगसंगती त्यांची अभिरूची दाखवत होती.

माझ्या हातातलं स्क्रीप्ट घेऊन त्यांनी वाचलं.

“छान समजून घेतलायस विषय. मस्त झाल्यात कविता. सरकारी विषय तू सोपेपणाने कवितेत मांडलायस. “अशी दाद त्यांनी दिल्यावर मला जो काय आनंद झालाय तो झालाय.

त्या सफाईनं रेकाॕर्डींग रूमकडे निघाल्या. त्या चालण्यात डौल होता. त्यांच्या हालचाली फार सहज पण पाॕलिश्ड होत्या. मला रेकाॕर्डींग रूम, तिथलं टेबल, तिथला माईक सगळं नवीन होतं. आधी स्वतः त्या माझ्याबरोबर आत आल्या. कागद कसे धरायचे, कागदांचा उलटताना आवाज कसा होऊ द्यायचा नाही याचं मला ट्रेनिंग दिलं.

“आता वाचायचं बरं का बिनधास्त. काळजी करू नकोस. छानच होईल रेकाॕर्डींग. “असा धीर त्यांनी दिला.

जाड काचेच्या पलिकडून उभ्या राहून नीता गद्रेंनी मला सुरू कर अशी खूण केली.

एक दोन रिटेक झाले तरी न चिडता मला प्रोत्साहन देत त्यांनी रेकाॕर्डींग संपवलं.

… ती नीता गद्रेंशी माझी पहिली भेट.

नंतर मी आकाशवाणीच्या निमंत्रणाची वाट बघायला लागले ती फक्त नीता गद्रेंशी भेट व्हावी म्हणून.

नंतरच्या सगळ्या भेटीत नीताताईंमधलं साहित्यरसिकत्व मला खूप समजत गेलं. या बाई केवळ आकाशवाणीच्या औपचारिक अधिकारी नाहीत. स्वतःला साहित्याची उत्तम जाण आहे. श्रोत्यांना सकस कार्यक्रम ऐकवण्याचं भान आहे. ती आपली जबाबदारी आहे, तीही सरकारी चौकटीत राहून पूर्ण करायचं आव्हान आहे हे त्या जाणून होत्या. करियरवर मनापासून प्रेम करणा-या नीताताईंनी माझ्या मनात खास जागा निर्माण केली.

त्यांचा ‘तांनापिहि’ हा कथासंग्रह माझ्या वाचनात आला आणि मी त्यांची फॕनच झाले. विशेषतः त्यातली ‘ओझं’ही कथा तर मला बेहद्द आवडली होती. गृहिणीला मध्यवर्ती व्यक्तिरेखा करून लिहिलेली ही कथा मला स्पर्श करून गेली. मी लगेचच त्या पुस्तकावर अभिप्राय लिहिणारं पत्र त्यांना पाठवलं.

लगोलग त्याचं उत्तरही नीताताईंकडून आलं. त्यात त्यांनी, ‘तुला मी माझ्या आणखीही काही पुस्तकांची नावं देते तीही वाच. (भोग आपल्या कर्माची फळं )’ असं मिश्किलपणे लिहिलं होतं. ते मला जामच आवडलं होतं. नंतर खरोखरच ती फळं मी चाखली.

त्यांचं ‘एका श्वासाचं अंतर’ हे पुस्तक तर एका जीवघेण्या आजारावर मात केलेल्या जिद्दीची कहाणी आहे. ते पुस्तक मी माझ्या परिचयातील काही डाॕक्टर्सनाही वाचायला दिलं होतं. एका प्रसिद्ध रूग्णालयात पेशंटला किती हिडीसफिडीस केलं जातं, अक्षम्य अशी बेफिकीरी दाखवली जाते याचा पर्दाफाश त्यांनी निर्भीडपणे केला होता. नंतर त्या रूग्णालयाच्या व्यवस्थापनाने झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरीही व्यक्त केली होती, आणि यापुढे असे प्रकार घडणार नाहीत याची जाहीर हमी दिली होती असं ही समजलं.

नीताताई रत्नागिरी केंद्रावर तेरा वर्षे होत्या. नंतर सांगली, कोल्हापूर आणि मुंबई अशा सेवा करत त्या निवृत्त झाल्या. मध्यंतरी आमची गाठभेट बरीच वर्ष नव्हती. पुन्हा एकदा मुंबई आकाशवाणीवर त्या असताना त्यांनी मला माझ्या एका कवितेसाठी खास संधी दिली. परत आम्ही जुन्या उमाळ्याने भेटलो.

आता त्या निवृत्त जीवनात स्वतःचे दिवस अनुभवत आहेत. नभोनाट्य, ब्लाॕग्ज, लेखन, वाचन, प्रवास यांत सुरूवातीची वर्षे आनंदात गेली. आता शारीरिक थकव्याने मर्यादा आल्यात. आमचा फोनसंपर्क वाढला आहे. निवृत्तपणाच्या इयत्तेत मी त्यांच्याहून आठदहा वर्ष मागेच असले तरी आम्ही अगं तुगं करू लागलो आहोत. एकमेकींची हालहवाल जाणून घेत आहोत. चॕनेलवरच्या मालिकांवर यथेच्छ टीका टीप्पणी करून खिदळतो आहोत, राजकारणातल्या सद्य स्थितीवर फुकटच्या चिंता वहातो आहोत, जीव कासावीस करून घेत आहोत. मतदान केल्याच्या काळ्या शाईच्या मोबदल्यात इतकं तरी करतोच आहोत.

… एक मैत्रकमळ असं पाकळी पाकळीने फुलत गेल्याचा आनंद दोघीही अनुभवतो आहोत ! 

© सुश्री वैशाली पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “सुख म्हणजे काय ?” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “सुख म्हणजे काय ?” ☆ श्री जगदीश काबरे ☆

एक अत्यंत यशस्वी, परंतु कामाच्या ताणाने वैतागलेला एक अधिकारी होता. एकदा सुट्टी घेऊन तो एका निवांत गावी गेला. एके दुपारी त्याला एक कोळी आपली बोट किनाऱ्याला लावताना दिसला. त्याने सकाळी जे काही मासे पकडले होते. ते व्यवस्थित एका टोपलीत ठेवलेले होते. कुतूहलानं तो अधिकारी त्या कोळ्याजवळ गेला.

‘‘आज तुझी भरपूर कमाई झालेली दिसतेय. ’’ कोळ्यानं पकडलेल्या माशांकडे पाहत तो उद्गारला! ‘‘इतके मासे पकडायला किती वेळ लागला तुला?’’ त्यानं विचारलं.

‘‘फक्त काही तास!’’ दुपारच्या उन्हात अंगाला आळोखेपिळोखे देत कोळी उत्तरला. ‘‘माझं आजचं काम संपलं. ’’ 

हे ऐकून तो अधिकारी चक्रावला. ‘‘मग उरलेल्या दिवसाचं तू काय करणार?’’ त्यानं विचारलं.

कोळी हसून म्हणाला, ‘‘घरी जाईन, कुटुंबाबरोबर एकत्र जेवण करेन, एक डुलकी काढेन, माझ्या मुलांबरोबर खेळेन. संध्याकाळी गावात जाऊन मित्रांबरोबर संगीताचा आनंद घेईन. एवढं पुरेसं आहे. ’’ 

अधिकाऱ्याच्या भुवया उंचावल्या. तो काहीसा गोंधळला. त्याने विचारलं, ‘‘पण जर तू अधिक वेळ मासेमारी केली असतीस तर तुला आणखी पैसे मिळाले असते. त्यातून तू आणखी मोठी बोट विकत घेऊ शकला असतास, हाताखाली चार माणसं ठेवू शकला असतास आणि आणखी जास्त मासे पकडू शकला असतास. त्यात बस्तान बसल्यावर तुला बोटींचा ताफा विकत घेता आला असता, माशांची निर्यात करता आली असती, खूप पैसा मिळवून तू श्रीमंत झाला असतास. ’’ 

कोळ्यानं हसत विचारलं, ‘‘आणि इतक्या पैशांचं मी काय केलं असतं?’’ 

अधिकारी म्हणाला, ‘‘श्रीमंत होऊन तुला व्यवसायातून निवृत्ती घेता आली असती, हातात आरामासाठी भरपूर मोकळा वेळ असला असता, कुटुंबाबरोबर निवांत वेळ घालवता आला असता आणि तुला जे आवडेल ते करता आलं असतं. ’’ 

मंद स्मित करत कोळ्यानं त्या अधिकाऱ्याकडे पाहिलं आणि म्हणाला, ‘‘पण… हेच सगळं तर मी आत्ताही करतो आहे ना!’’

साथींनो, या घटनेवरून आपल्या लक्षात यायला हरकत नाही की, ज्या सुखासाठी पैशाच्या मागे आपण धावत असतो ते सुख आपल्याला मिळतच नाही, उलट आपल्यापासून दूर गेलेले दिसते. परिणामी आपलीच दमछाक मात्र होते. एक प्रसिद्ध म्हण आहे, “ पैशाने गादी विकत घेता येईल, पण झोप नाही. ” अपेक्षा किती होती, आणि किती मिळालं यावर खरं सुख अवलंबून असते का? 

सुख हे आयुष्यात बरेचदा निरनिराळ्या वेषात येते. तुम्ही आपली एखाद्या खास वेषात ते येईल म्हणून वाट पहात असता, पण ते सुख तुमच्या पुढे कधी कुठल्या वेषात येईल ते सांगता येत नाही. तुम्हाला फक्त त्या सुखाला ओळखता आलं पाहिजे, नाही तर ते तुमच्या दारात कुठल्यातरी वेषात येईल आणि तुम्ही त्याला न ओळखता दार बंद करून घ्याल. कदाचित ते दुःखाचा झगा पण घालून येईल, तुम्हाला त्याला फक्त ओळखता आलं पाहिजे. थोडक्यात काय तर, सुख ही एक मानसिक सवय आहे, ती लावून घेणं आपल्याच हातात आहे. तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल, तितकंच सुखी तुम्ही रहाल. तुमच्या सुखी रहाण्यावर केवळ तुमचाच अधिकार असतो. इतर लोकं तुम्हाला दुःख देऊच शकत नाहीत. ही गोष्ट एकदा लक्षात आली की जगणं फार सोपं होऊन जाईल, असं वाटत नाही का?

© श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares