मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ जागतिक आनंद दिवस आणि बालकवींची पुण्यतिथी… – लेखक : श्री श्रीकांत उमरीकर ☆ सौ. मंजिरी येडूरकर ☆

सुश्री मंजिरी येडूरकर

? इंद्रधनुष्य ?

जागतिक आनंद दिवस आणि बालकवींची पुण्यतिथी… – लेखक : श्री श्रीकांत उमरीकर ☆ सौ. मंजिरी येडूरकर ☆

५ मे १९१८ ची गोष्ट आहे. अठ्ठावीस वर्षे वयाचा एक तरूण आपल्या धुंदीत चालला होता. जवळची वाट पकडायची म्हणून तो रेल्वेचे रूळ ओलांडून जाणार्‍या छोट्या पायवाटेने निघाला. दोन रूळ एकत्र येवून पुढे जाणार्‍या ठिकाणी तो उभा होता. तेवढ्यात त्याला मालगाडीची शिट्टी एैकू आली. ही गाडी दुसर्‍या रूळावरून जाईन असा अंदाज होता पण ती नेमकी तो चालला होता त्याच रूळावर आली. घाईघाईत रूळ ओलांडताना त्याची चप्पल तारेत अडकली. ती सोडवण्यासाठी तो खाली झुकला. तोपर्यंत मालगाडी त्याच्या देहाचे तुकडे तुकडे करून निघून गेली. 

एरव्ही ही घटना पोलीसांच्या नोंदीत अपघात म्हणून जमा झाली असती. पण हा तरूण म्हणजे कोणी सामान्य इसम नव्हता. मराठी कवितेत ‘बालकवी’ म्हणून अजरामर ठरलेल्या त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांची ही गोष्ट आहे. जळगांव जिल्ह्यातील भादली या रेल्वेस्टेशनवर हा अपघात घडला. किती जणांना आठवण आहे या कवीची?

जागतिक हास्य दिवस मे महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो. या वर्षी हा दिवस आजच म्हणजे ५ मे रोजी आहे. 

आनंदी आनंद गडे

इकडे तिकडे चोहिकडे

वरती खाली मोद भरे

वायूसंगे मोद फिरे

नभांत भरला

दिशांत फिरला

जगांत उरला

मोद विहरतो चोहिकडे

आनंदी आनंद गडे !

अशी सुंदर आनंदावरची कविता लिहीली त्यांची आठवण हा जागतिक हास्य दिवस साजरा करणार्‍यांना होणार नाही. आनंदाचे तत्त्वज्ञान अतिशय साध्या सोप्या भाषेत लिहीणारा हा कवी ज्यानं आनंदाची केलेली व्याख्या किती साधी सोपी आणि मार्मिक आहे

स्वार्थाच्या बाजारात

किती पामरे रडतात

त्यांना मोद कसा मिळतो

सोडुनी तो स्वार्था जातो

द्वेष संपला  

मत्सर गेला  

आता उरला

इकडे तिकडे चोहिकडे

आनंदी आनंद गडे

बालकवींचा जन्म १३ ऑगस्ट १८९०  रोजी धरणगाव (जि. जळगांव) इथे झाला. केवळ २८ वर्षांचे आयुष्य लाभलेल्या या कवीने अतिशय मोजक्या पण नितांत सुंदर आणि नितळ भावना व्यक्त करणार्‍या कविता लिहून मराठी वाचकांवर मोठे गारूड करून ठेवले आहे.

श्रावणमासी हर्ष मानसी 

हिरवळ दाटे चोहीकडे, 

क्षणात येती सरसर शिरवे 

क्षणात फिरूनी उन पडे 

किंवा 

हिरवे हिरवे गार गालीचे 

हरित तृणाच्या मखमालीचे 

त्या सुंदर मखमालीवरती 

फुलराणीही खेळत होती

या सारखी गोड रचना असो. आपल्या साध्या सुंदर शब्दकळेने बालकवी वाचकाच्या मनात घर करून राहतात. अशा सुंदर साध्या गोड कविता लिहीणार्‍याला आपण विसरून जातो. त्यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या आमच्या लक्षातही राहत नाहीत. गावोगावच्या साहित्य संस्था कित्येक उपक्रम सतत करत असतात. तेंव्हा ज्यांची जन्मशताब्दि होवून गेली आहे अशा मराठी कविंवर काहीतरी कार्यक्रम करावे असे का बरे कोणाच्या डोक्यात येत नाही? एक साहित्य संमेलन केवळ शताब्दि साहित्य संमेलन म्हणून नाही का साजरे करता येणार? केशवसुत, बालकवी पासून ते कुसूमाग्रज, मर्ढेकर, अनिल, इंदिरा संत, ना.घ.देशपांडे, बा.भ.बोरकर, वा.रा.कांत, ग.ल.ठोकळ, ग.ह.पाटील अशी कितीतरी नावे आहेत. शंभरी पार केल्यावरही टिकून राहणार्‍यांची आठवण न काढणे हा आपलाच करंटेपणा आहे.

या जून्या कविंची आठवण का काढायची? कोणाला वाटेल कशाला हे सगळे उकरून काढायचे. पण जर जूनी कविता आपण विसरलो तर पुढच्या कवितेची वाटचाल सोपी रहात नाही. बा.भ.बोरकर लिहून जातात

तू नसताना या जागेवर 

चिमणी देखील नच फिरके

कसे अचानक झाले मजला 

जग सगळे परके परके

आणि पन्नास साठ वर्षे उलटल्यावर संदिप खरे सारखा आजचा कवी लिहीतो

नसतेच घरी तू जेंव्हा 

जीव तुटका तुटका होतो

जगण्याचे तुटती धागे 

संसार फाटका होतो

आजचा कवी काळाच्या किती मागे किंवा पुढे आहे हे समजण्यासाठी जूने कवी वाचावे लागतात. त्यांची कविता समजून घ्यावी लागते. जी कविता काळावर टिकली आहे निदान तेवढी तरी कविता आपण वाचणार की नाही? आणि ती नाही वाचली तर मराठी कवितेचेच नुकसान होते.

आजकाला सर्वच गोष्टींना जातीचा रंग चढवला जातो. मग बालकवी म्हणजे त्यांची जात कोणती? त्याचा काय फायदा आहे? त्याप्रमाणे त्यांची जयंती पुण्यतिथी साजरी करायची की नाही ते ठरते. कुठलाही खरा प्रतिभावंत नेहमीच जातीपाती, देश, काळ याच्या सीमा ओलांडून आपली निर्मिती करत असतो. 

बालकवींच्याच आयुष्यातील एक काळीज हेलावून टाकणारा प्रसंग आहे. त्यांच्या शरिराचे तुकडे तुकडे  त्यांचे स्नेही आप्पा सोनाळकर पोत्यात भरत होते. त्यांच्या डोळ्यातून अश्रू खळाखळा वहात होते. बालकवींच्या सदर्‍याकडे हात जाताच आप्पांच्या लक्षात आले की आत घड्याळ आहे आणि ते अजूनही चालूच आहे. बालकवींची एक अप्रकाशित कविता आहे

घड्याळांतला चिमणा काटा

टिक_ टिक् बोलत गोल फिरे

हे धडपडते काळिज उडते

विचित्र चंचल चक्र खरे!

घड्याळातला चिमणा काटा

त्याच घरावर पुन्हा पुन्हा

किति हौसेने उडत चालला

स्वल्प खिन्नता नसे मना!

काळावर इतकी सुंदर कविता लिहीणारा हा कवी आपण कशासाठी जातीपातीच्या चौकटीत, नफा नुकसानीच्या हिशोबात मोजायचा?

शंभर वर्षांपूर्वी होवून गेलेला हा कवि आनंदाचे उत्साहाचे कारंजे आपल्यापुढे कवितेत ठेवून गेला आहे. त्याच्या डोळ्यापुढचे त्याच्या स्वप्नातले जग कसे होते?

सूर्यकिरण सोनेरी हे 

कौमुदि ही हंसते आहे

खुलली संध्या प्रेमाने

आनंदे गाते गाणे

मेघ रंगले

चित्त दंगले

गान स्फुरले

इकडे तिकडे चोहिंकडे 

आनंदी आनंद गडे !

बालकवींना १०६ व्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन !

लेखक : श्रीकांत उमरीकर

जनशक्ती वाचक चळवळ, छत्रपती संभाजीनगर

प्रस्तुती – सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ कोणती साडी नेसू ???? – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

? वाचताना वेचलेले ?

☆ कोणती साडी नेसू ????  – – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले

बायकांना पडणारा सर्वात मोठ्ठा गहन प्रश्न…

.. .. ..  कोणती साडी नेसू.. प्रत्येक बाईच्या आयुष्यात, ‘संध्याकाळी भाजी काय करू’? प्रमाणेच, ‘कोणती साडी नेसू’ हा प्रश्न पण फार ज्वलंत प्रश्न असतो. पुरूषांना जसं मयताला आणि लग्नाला एकच ड्रेस चालतो तसं बायकांचं मुळीच नसतं बरं…  बाहेर पडताना साडी चॉईस करणं बाईसाठी मोठंच  चॅलेंज असतं.  प्रत्येक प्रसंगाची साडी वेगळी असते. त्यातही बऱ्याच साड्या, ब्लाऊज अभावी बाद झालेल्या असतात. साड्या चांगल्या असतात. पण ब्लाऊज पुन्हा शिवावं इतक्या पण नसतात. 

तुमच्याकडे भले शंभर साड्या असल्या तरी त्यातली प्रत्येक साडी तुम्ही कुठेही नेसू शकत नाही. म्हणजे भाजी बिजी आणायला साधीशी वॉश अँड वेअर साडी नेसावी लागते. इथे साधी म्हणजे कॉटन नाही बरं. कॉटनची साडी मुलांच्या शाळेत वगैरे जायचं असेल, लायब्ररीत वगैरे, एखादी कामकाजी मिटींग असेल तेव्हा. वाढदिवस, डोहाळेजेवन वगैरेला जाताना अगदी लाईट जरी बॉर्डर असलेली. लग्नाला जाताना प्युअर सिल्क, कांजिवरम, वगैरे साड्या नेसाव्या लागतात. दहाव्याला, तेराव्याला वेगळ्या लाईट कलरच्या, बारीकशी किनार असलेल्या. त्यात पण समारंभ किती जवळच्या संबंधात आहे, त्याप्रमाणे साडीचा भारीपणा..  हलकेपणा ठरतो. गेलेली व्यक्ती म्हातारी होती की तरूण ह्यावरून पण बायका जरीची /  बिनजरीची असे प्रकार ठरवतात. म्हणजे म्हातारी व्यक्ती गेली की जरा साधीशी पण जरीबॉर्डरची नेसली तरी चालते. तरूण व्यक्ती गेली असेल तर मात्र दु:ख जास्त दाखवावं लागतं. मग जरा जास्त साधी साडी. 

साडी ठरवताना जिच्याघरी लग्न आहे तिला तुम्ही किती किंमत देता त्यावर पण साडी बदलते.काही जणी चांगल्या श्रीमंत साडी सम्राज्ञी असतात… साडी खरेदी हे ह्यांचं आद्य कर्तव्य. म्हणजे ह्यांचं जन्माला येण्याचं प्रयोजनच साड्यांची खरेदी हेच असावं असं वाटावं इतक्या साड्या घेतात.  

साडी नेसताना स्मरण शक्तीचा पण खूप कस लागतो. म्हणजे ही साडी आपण कोणाच्या घरच्या कार्यक्रमाला नेसलो होतो. तिथे तेव्हा कोण कोण होतं. कोणी कोणी ही साडी पाहिली आहे. आता ज्या कार्यक्रमाला चाललोय तिथे त्या आधीच्या कार्यक्रमाच्या कोण कोण येतील. ही सगळी व्हिडीओ फिल्म मनातल्या मनात प्ले करावी लागते. मग त्याप्रमाणे साडी ठरते. 

बरं एखाद्या कार्यक्रमाला जाताना आपण चांगल्यातली साडी नेसून जावं तर बाकीच्या अगदी साध्या साड्यांमधे आलेल्या असतात. मग ‘बेगानी शादीमे अब्दुल्ला दिवाना’ अशी आपली गत होते. आणि ते  पाहून आपण दुस-या तशाच कार्यक्रमाला साधीशी साडी नेसावी तर बाकीच्या झकपक साड्या नेसून आलेल्या असतात. पुन्हा पचका!! हे गणित तर मला कधीच जमलेलं नाही. अगदी क्वचित एखाद्या वेळेस आपण चुकून परफेक्ट साडी नेसली की मला धन्य धन्य होऊन जातं. 

बरं साडी कितीही सुंदर असली तरी बायका एकमेकींच्या साडीला कधी मोकळेपणी ‘छान आहे साडी’ असं म्हणत नाहीत. त्या नुसत्या डोळ्याच्या कोप-यातून तुमच्या साडीकडे बघत असतात. आणि अगदीच असह्य झालं तर अशी दखल घेतात.

“माझ्याकडेपण होती अशातली, खूप पिदडली मी. मग मागच्या वर्षी बहिणीला देऊन टाकली.” अशा शब्दांमधून आपण ठरवायचं हे साडीचं कौतुक होतं की पोस्टमार्टेम. 

खूप छान साडी बघून एखादी म्हणते, “हिच्यापेक्षा परवाच्या डोहाळे जेवणातली तुुझी साडी चांगली होती”.पुन्हा आपण कोड्यात. म्हणजे ही साडी चांगली नाही असं हिला म्हणायचं आहे, *पण मग ती साडी चांगली होती तर तेव्हा का नाही बोलली तसं?*असा विचारही मनात येतो.

त्यामुळे साड्यांनी कपाट ओसंडून वहात असलं तरी ‘कोणती साडी नेसू’ ह्या प्रश्नाचं उत्तर काही ते कपाट देऊ शकत नाही. म्हणजे साडया ठेवायला जागा नाही आणि नेसायला साडी नाही अशातली गत. त्यात आता ड्रेसेसची पण भर. ड्रेसेसमधे पण गावात वापरायचे वेगळे, पुण्या-मुंबईत वापरायचे वेगळे, फॉरिन टूरचे वेगळे. ट्रीपचे वेगळे. म्हणजे साड्यांचा जेवढा स्टॉक तेवढाच ड्रेसेसचा…  किती ते डोकं लावायचं बाईने. 

पुरूषांना दोन ड्रेस दिले तरी ते त्याच्यावर दोन वर्ष आनंदाने काढून टाकतील.उलट काही ऑप्शनच न ठेवल्याबद्दल आभार मानतील. त्यामुळे त्यांना ह्या गहन प्रश्नाला तोंड द्यावं लागत नाही परिणामी अनेक महत्वाची कामं त्यांच्या हातून पार पडतात.   

पण *बायका* बिचा-या .. ..  कोणती भाजी करू?.. कोणती साडी नेसू?.. ह्या दोन प्रश्नांपायीच केवळ आयुष्यात मागे पडतात….

लेखिका : अज्ञात 

संग्रहिका – सौ अंजली दिलीप गोखले 

मो 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ देवपूजा… ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

??

☆ देवपूजा… ☆ श्री सुनील शिरवाडकर

आमचे एक शेजारी होते. मला आठवतं ते रोज सकाळी दहा वाजता पुजेला बसायचे.अगदी साग्रसंगीत पुजा चालायची त्यांची.दोन अडीच तास.नंतर मग नैवेद्य वगैरे.त्यांची ही पूजा इतक्या वर्षांनंतरही.. म्हणजे जवळपास चाळीस वर्षांनंतरही मला आठवते यांचं कारण म्हणजे टीव्ही.त्यांचं देवघर  एक मोठ्ठा कोनाडा होता.इतका मोठा कि त्या कोनाड्यात ते स्वतः सुद्धा बसत.तर त्या मोठ्ठ्या कोनाड्यात त्यांनी एक छोटासा टीव्ही बसवुन घेतला होता.अगदी छोटा.. ब्लॅक अँड व्हाईट.एकीकडे पूजा.. मंत्र.. अभिषेक आणि दुसरीकडे टीव्ही बघणं.आरतीच्या वेळी मात्र तो टीव्ही बंद होई.

त्यांना या बद्दल बरेच जणांनी टोकलं.. टीकाही केली.पण त्यांच्यावर काही परीणाम झाला नाही.त्यांचं म्हणणं मी मनापासुन पूजा करतो.. माझ्या मनातला भाव महत्त्वाचा.. आणि माझा देव तो भाव जाणतो.त्यांची देवाला एकच प्रार्थना असायची.

‘तु पारोसा राहु नकोस..मला पारोसा ठेवु नको.’

याचाच अर्थ रोज स्नान करून तुझी पुजा करण्या इतपत मला फिट ठेव. आणि खरंच.. आयुष्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत ते पुजा करत होते.स्नान करुन पूजा करण्याएवढी त्यांची शारीरिक क्षमता अखेरपर्यंत टिकून होती. देवानं त्यांची प्रार्थना ऐकली होती.

रोज पूजा करण्याचा नियम अनेकांचा असतोच.प्रत्येकाची पूजा करण्याची पद्धत वेगळी.. कालावधी वेगळा.कोणाची पुजा पंधरा मिनिटांत होते..तर कुणाला दोन तासही लागतात.कुणाला पुजा करताना मदतीसाठी बायको लागते.तिनं मागे बसुन गंध उगाळून द्यायचं..फुलं हातात द्यायचे..तीन पर्ण असलेली बेलाची पानं नीट निवडून द्यायची .काही जण पूजा झाली की तिथुन लगेच उठुन जातात ‌मग बायकोने बाकीचा पसारा आवरायचा.

एकाची पुजेची पध्दत काही औरच होती.तो ताम्हणात देव काढायचा.. आणि सरळ वॉश बेसिनखाली धरायचा अगदी भांडे विसळल्या सारखं.मग ते देव कोरडे करून हळदी कुंकु लावायचा..शिंपडल्या सारखं.फुलं वाहिली की झाली पुजा.

अलीकडे काहीजण खुर्चीत बसूनही पुजा करतात. गुडघ्यांच्या प्रॉब्लेम मुळे मांडी घालून बसता येत नाही. मग खुर्चीत बसायचं..आणि पुढे टी पॉय  ठेवायचा..त्यावर ताम्हाण..

मंदिरांमध्ये पूजा करण्याची पद्धत वेगळी असते. तिथे देवाच्या मुर्तीला रोज मंगलस्नान..म्हणजे पूर्ण अभिषेक घातला जात नाही. केली जाते फक्त पाद्यपुजा.फक्त एकादशी आणि सणांच्या दिवशी पुर्ण मूर्तीला अभिषेक केला जातो.

गुरुचरित्रात एका अध्यायात पुजे बद्दल विस्ताराने मार्गदर्शन केलं आहे.पुजेला बसण्यासाठी कोणतं आसन घ्यावं इथपासून त्यात सांगितलं आहे.पळी पंचपात्र कुठे ठेवावं.. निर्माल्य कसं काढावं..शंखपुजा,कलश पुजा, निरांजनाची पुजा करावी‌‌‌‌.. ही पूर्वतयारी झाल्यावर मग चारी दिशांचं पूजन करावं.पुरुष सूक्तामधील वेगवेगळ्या ऋचा म्हणत अभिषेक करावा.त्यातही कोणत्या क्रिया करताना ऋचा म्हणाव्या हेही सांगितलंय.

अभिषेक झाल्यानंतर फुलं कशी वहावी.. कोणत्या देवाला कोणती पुष्पें अर्पण करावी..कोणती वर्ज्य करावी हे सांगितलंय..काही फुलं ही दुसर्या दिवशी पण शिळी समजली जात नाही हे पण सांगितलंय.निरांजन ओवाळताना कोणता मंत्र म्हणावा ..सगळं सगळं विस्ताराने सांगितलंय.

इतकी शास्त्रशुद्ध पूजा आजच्या जमान्यात तशी कठीणच..पण जशी जमेल तशी पूजा आजही घरोघर होतेच.व्यंकटेश स्त्रोत्रात तर अगदी थोडक्यात पूजेचे सुंदर वर्णन केलंय.

करुनी पंचामृत स्नान.. शुद्धोदक वरी घालुन

तुज करु मंगलस्नान.. पुरुषसूक्ते करुनिया

वस्त्रे आणि यज्ञोपवीत.. तुज लागी  करु प्रित्यर्थ

गंधाक्षता पुष्पें बहुत.. तुजलागी समर्पूं

धूप दीप नैवेद्य.. फल तांबुल दक्षिणा शुद्ध

वस्त्रे भूषणे गोमेद.. पद्मरागादी करुनी

ऐसा षोडशोपचारे भगवंत.. यथाविधी पुजिला ह्रदयात

मग प्रार्थना आरंभिली बहुत.. वर प्रसाद मागावया.

पूजेचे असं वेगवेगळं वर्णन.. मार्गदर्शन बऱ्याच ग्रंथात आहे.अगदी तश्याच पध्दतीने पूजा झाली पाहिजे असं नाही.खरंतर कोणताच देव  पूजा करा म्हणत नाही.पूजा ही देवासाठी नसतेच मुळी.ती असते आपल्यासाठी.आपलं मन प्रसन्न करण्यासाठी.आपण या कारणाने देवापुढे तासभर बसतो.कधी अथर्वशीर्ष..कधी रुद्रातील मंत्र म्हणतो..देवाला स्नान घालतो.छान लाल सुती रुमालाने देवाचं अंग पुसतो.अष्टगंधाचा टिळा लावतो.. हळदीकुंकू लावतो..मग फुले वहातो..त्यानंतर धुपदिप.. नैवेद्य..आरती.

असं सगळं झाल्यावर मग देवघरातील देवाचं ते रुप..नजर हटत नाही त्यावरुन.कानात अजुनही ‘घालीन लोटांगण..’ मधील शब्द निनादत असतात..

अष्टगंध..अत्तर..उदबत्ती..रंगीबेरंगी सुवासिक फुले या सर्वांचा संमिश्र दरवळ.. देवाच्या कपाळावरचं ते ओलसर ताजं  गंध.. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे‌‌ देवाच्या चेहर्यावरंच मंद स्मित..ते प्रसन्न सुहास्य.जणु देव सांगत असतो..आता नि:शंक मनाने कामाला जा..मी आहे तुझ्यासोबत..

आणि साक्षात देव आपल्या सोबत असणं.. यापेक्षा अधिक आपल्याला काय हवंय? मानसिक बळ म्हणजे हेच तर असतं….. पूजा करायची ती यासाठी.

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ तपत्या झळा उन्हाच्या… ☆ श्री प्रसाद जोग ☆

श्री प्रसाद जोग

? मनमंजुषेतून ?

☆ तपत्या झळा उन्हाच्या… ☆ श्री प्रसाद जोग

सध्या  सकाळ उजाडली की कालचा दिवस बरा होता म्हणायची वेळ आलीय.दिवसेंदिवस  उन्हाळ्याचा रखरखाट वाढायला लागला. त्यामुळे तापमान नाही तर तापमान अंगाची काहिली करायला लागलंय.

उन्हाळ्याचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला आहे.काही भागामध्ये तपमान ४४/४५  डिग्री पर्यंत वाढले आहे. तशातच लोकसभेच्या निवडणुकांचे प्रचार जोरावर आहेत.  

अश्या रखरखाटामध्ये कवींना  वेगवेगळी गाणी सुचली हे विशेष.

कवी अनिल यांना केळीचे सुकले बाग आणि वेळ झाली भर माध्यान्ह ही गाणी सुचली असावीत.सुधीर मोघ्यांना तपत्या झळा उन्हाच्या हे  लिहावे वाटले असेल.

आज ही  गाणी ऐकली की तपमानात एखाद्या डिग्रीची वाढच  झाल्यासारखे वाटेल.

सगळं असह्य व्हायला लागल्यावर अचानक एक दिवशी आकाशात काळे ढग गर्दी करतील, सोसाट्याचा वारा सुटेल,विजांचा कडकडाट होऊन वळिवाच्या कोसळधारा तप्त झालेल्या जमिनीला गारे गार करतील. मातीचा सुगंध दरवळेल.हे अनुभवत असताना शान्ता शेळके यांना आला पाऊस मातीच्या वासात ग गाण्याचे शब्द सुचले असतील..

मग एन्जॉय करा उन्हाळा सुद्धा

©  श्री प्रसाद जोग

सांगली

मो ९४२२०४११५०   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “वेताळ विक्रम…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

 

? इंद्रधनुष्य ?

☆ “वेताळ विक्रम…” ☆ श्री मंगेश मधुकर

गावाबाहेरच्या टेकडीवर भेटल्यावर विक्रम वेताळाकडं पाहून नेहमीसारखा हसला नाही.असं पहिल्यांदाच घडल्यानं वेताळाला आश्चर्य वाटलं.“काय झालं.असे अस्वस्थ का दिसताय.”

“तुझ्यामुळेच”विक्रम ताडकन म्हणाला.

“मी काय केलं”

“गेले काही दिवस एकदम विचित्र वागतोयेस.अंगावर ओरडणारा,बारीकसारीक गोष्टींवर संतापणारा अचानक गोड,नीट बोलायला,चांगला वागायला लागलास.बरायेस ना.”

“अहो,हा तुमच्या पाहण्यातला फरक आहे.मी तोच आहे.फक्त परिस्थिती वेगळी आहे”

“कुणी अचानक चांगलं वागायला लागलं की शंका येते.नेतेमंडळी कशी निवडणूक आली की एकदम बदलतात त्याची सवय आहे पण तुझं काय?”

“मी पण यंदा निवडणुक लढविण्याचा विचार करतोय म्हणून तर…”

“काय?कशासाठी?”विक्रम आश्चर्यानं ओरडला.

“जनतेच्या सेवेकरता.तुमचं शिफारस पत्र मिळालं तर फायदा होईल.एवढी मदत करा.”

“पण गरज काय?ही नस्ती उठाठेव कशाला?”

“पद,सत्ता आल्यावर समाजासाठी जे काम करायचं ते अधिक चांगल्याप्रकारे करता येईल त्यात तुमचा पाठिंबा मिळाला तर सहज निवडून येईल.” 

“पाठिंब्याविषयी विचार करावा लागेल.”विक्रम 

“त्यात विचार काय करायचा.माझ्याविषयी चार कौतुकाचे शब्द लिहिणं अवघड नाही.”

“तुला चांगलाच ओळखतो म्हणून तर…..नेहमी तू विचारतो आता माझ्या 

प्रश्नांची उत्तरं दे.”

“जशी आज्ञा”वेताळ 

“चल,गाडी काढ”विक्रमच्या बोलण्यावर वेताळानं डोळे विस्फारले.इच्छा नसताना बाईक घेऊन निघाला.पाठीमागे विक्रम होताच.गावात रस्त्याच्या कडेला पाण्याच्या टँकरभोवती तोबा गर्दी होती.दोघं ट्राफिक जाममध्ये अडकले.तापलेलं ऊन त्यात रस्त्यावर निरनिराळ्या ठिकाणी खोदलेलं.जिकडं तिकडं माणसांची,गाड्यांची गर्दी, खड्डे,रस्त्यावरची दुकानं यातून वाट काढताना वेताळाच्या नाकी नऊ आले.सिग्नलची पर्वा न करता जीव धोक्यात घालून गाड्या चालवणाऱ्यांपासून एकदोनदा तर वेताळानं कशीबशी धडक चुकवली. असल्या प्रकारांची सवय नसल्यानं प्रचंड वैतागला. 

“वेताळा,पाहिलेस किती वाईट परिस्थिती आहे.इथं येऊन थोडाच वेळ झाला तरीही नको नको झालंय अन सामान्य माणसं हा त्रास वर्षानुवर्षे निमूटपणे सहन करतात.यावर तुझ्याकडं काही उपाय आहे का?”वेताळानं नकारार्थी मान डोलावली. 

“लोकांच्या महत्वाच्या गरजा, समस्यांवर मार्ग काढण्याऐवजी मोफत आरोग्य शिबिरे,यात्रा,भेट असले दिखाऊ प्रकार सुरू आहेत. त्याचीच फ्लेक्स लावून जाहिरातबाजी करतायेत.”

“माझी तळमळ खरी आहे.इतरांपेक्षा वेगळाय.” वेताळ.

“सगळे असंच म्हणतात.तुझ्यातलं वेगळपण काय.” 

“निवडणूक म्हणजे लोकशाहीची सेवा करण्याची संधी,समाजाचे देणं फेडण्यासाठी गरजू,गरीबांची सेवा करायची आहे.आतापर्यंत स्वार्थासाठीच जगलो,बोललो,वागलो पण आता जे काही करेल ते जनतेच्या कल्याणासाठीच……”.

“अरे वा,ऐकायला भारी वाटतं.हे भाषणात बोलायला चांगलयं.आता जे खरं खरं सांग.”बराच वेळ वेताळ काहीच बोलला नाही.विक्रम बाईकवरून उतरून चालायला लागला तेव्हा वेताळ म्हणाला 

“तुम्हांला सगळं माहिती आहेच तरी कशाला?”

“चांगलंच माहितीये.मला सांग,एवढं करून काय मिळणार”

“जिंकलो तर पद मिळेल.प्रतिष्ठा वाढेल,मान मिळेल,कायम मागेपुढे असणारे लोक,इतरांना वाटणारा धाक,शब्दच काय थुंकीसुद्धा झेलायला तयार असणारे चमचे याची नशा,धुंदी,कैफ काही औरच.. त्यासाठीच हा आटापिटा.”वेताळ एकदम बोलायचं थांबला.

“खरं बोललास त्याबद्दल अभिनंदन,”विक्रम. 

“धन्यवाद,म्हणजे शिफारस पत्राचं नक्की”

“देणार नाही.तुझे विचार लोकांच्या भल्यासाठी नाहीत.” 

“लोकशाहीत असंच चालतं.प्रेमात,युद्धात आणि निवडणुकीत सर्वकाही माफ असतं.”वेताळ ओशाळवाणं हसत म्हणाला. 

“चूकतोयेस.एका दिवसासाठी राजा असणाऱ्या जनतेला गृहीत धरू नकोस.काळ बदलतोय.भावनेपेक्षा बुद्धीचा वापर करून मतदान करणाऱ्यांची संख्या आता वाढत आहे.निवडून आल्यानंतर राहणीमानातली श्रीमंती,वागण्या-बोलण्यातला बदल जनता विसरत नाही.मतदानातून सर्व गोष्टींचा हिशोब चुकता करते.आश्वासनांचा पाऊस  धो धो कोसळला तरी आपण किती भिजायचं हे ज्यानं त्यानं ठरवायचं .  पब्लिक सब जानती है.”

“तुमचं बरोबरयं पण अनेक सोकॉल्ड सुजाण,सुशिक्षित मंडळी राजकारणाविषयी फक्त बोलतात,टीका करतात पण मतदान मात्र करत नाही याउलट गरीब,गरजू प्रलोभनाला भुलून का होईना पण आवर्जून मतदान करतात.हीच गोष्ट फार फार महत्वाची आहे.” वेताळ 

“भूलथापांना,पैशाच्या लोभाला बळी पडून मतदान करणारे आणि जाणीवपूर्वक मतदान करणारे एकाच माळेचे मणी..प्रत्येकानं मतदान केलंच पाहिजे . असा कायदाच पाहिजे आणि मित्रा,एक सांगू.. ”

“बोला”

“तुझी खरोखर समाजासाठी काम करायची इच्छा असेल तर लोकांच्या अडचणी समजून घ्यायला आतापासून सुरवात कर.त्यांच्यामध्ये जाऊन काम कर.अडचणी सोडविण्याचे प्रामाणिक प्रयत्न कर.यात सातत्य ठेव.मगच निवडणुकीचा विचार कर.असं वागलास तर पुढच्या वेळी फक्त शिफारस नाही तर मी स्वतः तुझा प्रचार करेल.”

‘विचार करून सांगतो” म्हणत वेताळानं गाडी फिरवली.परतीच्या प्रवासात वेताळचा चेहरा पडलेला तर मागे बसलेला विक्रम मात्र गालातल्या गालात हसत होता. 

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ १, चैत्र – – –  लेखिका : सुश्री दीपा झानपुरे ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? वाचताना वेचलेले ?

, चैत्र – – –  लेखिका : सुश्री दीपा झानपुरे ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे

कित्येक लक्ष योजनं दाटून आलेला गच्च अंध:कार, जिकडे पाहावं तिकडे निर्वात पोकळी आणि त्यात स्वतःच्या गतीनं परिवलन आणि परिभ्रमण करणारे कोट्यवधी ग्रह, तारे, धूमकेतू, उपग्रह…. प्रत्येकाची गती वेगळी, प्रत्येकाचा मार्ग वेगळा… अफाट विश्वाच्या या निबिड साम्राज्यात साक्षीभावानं बसलेला तो निराकार कालपुरुष… +

असंख्य ग्रहताऱ्यांची गती, स्थिती, उत्पत्ती,लय यांचा हिशोब करता करता किती काळ लोटून गेला, याची गणना करणं अवघडच… या विश्वाच्या अफाट पसाऱ्यात फिरत असलेल्या प्रत्येक वस्तुमात्राच्या कालगणनेचा हिशोब ठेवण्याचं काम या कालपुरुषाचं. 

निराकार, निर्गुण, निर्विकार, निर्विकल्प अवस्थेत हे काम युगानुयुगं करणाऱ्या त्या कालपुरुषाच्या समोर अचानक एक नीलमणी चमकून गेला… 

किंचित् उत्सुकतेनं त्यानं नजर उचलून चित्त एकाग्र केलं. 

“विश्वकर्म्याची नवीन निर्मिती दिसते आहे!” 

त्याचं कुतूहल किंचित् चाळवलं. तो निळसर हिरवट गोलाकार ग्रह आपल्याच गतीनं डौलदारपणे तिरक्या चालीनं स्वतःभोवती आणि त्याच्या कर्त्याभोवती आपल्याच तंद्रीत गिरक्या घेत होता. एरवी निर्विकार असलेला कालपुरुष या लोभस दर्शनानं किंचित् सुखावला. कितीही साक्षीभावानं काम करायचं म्हटलं, तरी काही गोष्टी मनाला कुठेतरी स्पर्शून जायच्याच!

आपोआप त्याच्या तोंडी शब्द आले, “वसुंधरा… मी वसुंधरा म्हणेन हिला..”

आणि ब्रह्मांडात तो शब्द रेंगाळला… “वसुंधरा”!

विश्वकर्म्याच्या या नव्या निर्मितीला नाव मिळालं, ओळख मिळाली… “वसुंधरा”!

तिच्या या जन्मदिवसाची कालपुरुषानं  नोंद करून ठेवली: ‘, चैत्र !

आपल्या गतीनं भ्रमण करत करत कालपुरुषाच्या नजरेसमोरून वसुंधरा पुढे निघून गेली. 

अनंतकोटि ब्रम्हांडामधल्या असंख्य ग्रहताऱ्यांचा हिशोब ठेवता-ठेवता, या नीलहरित वसुंधरेची आठवण त्याला अधूनमधून किंचित गारवा देत असे. 

या गतिमान विश्वाच्या आवर्तात पुन्हा कधी येईल बरं ती माझ्या डोळ्यांसमोर? 

तिच्या भ्रमणाची एक फेरी पूर्ण झाल्यानंतर त्याच्या डोळ्यांसमोर पुन्हा एकदा तोच नीलमणी लख्खकन् चमकला… तिच्या  सूर्यसख्याच्या तेजामुळे तिचा मूळचा निळसर हिरवा रंग अधिकच झळाळून उठत होता. कालपुरुषाचं कुतूहल चाळवलं.

त्यानं नजर आणि अंत:चक्षु अधिक एकाग्र करून वसुंधरेच्या सान्निध्यात काय चालू आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. 

असंख्य प्राणिमात्र, वनस्पती, मनुष्यमात्र यांना अंगा-खांद्यावर खेळवणारी ही वसुंधरा बघून, त्या विश्वकर्म्याच्या कर्तृत्वाचं कालपुरुषाला फारच कौतुक वाटलं. शिवाय या प्रत्येक जीवमात्राचं आयुष्य,नशीब, भविष्य यांचीही ठराविक योजना त्या जगन्नियंत्याने आधीच करून ठेवली होती. 

अधिकाधिक एकाग्रतेनं तिथल्या घडामोडींकडे बघत असताना अचानक त्याचे डोळे दिपले.

वसुंधरेवर ‘सत्ययुग’ चालू होतं. कुणी ‘श्रीराम’नामक राजा महायुद्धात विजय मिळवून स्वगृही येत असताना त्याला दिसला. त्याचे प्रजाजन त्याचा जयजयकार करीत होते.. घडून गेलेल्या अशुभाची आणि अतर्क्य घटनांची उजळणी करत होते. परंतु दुष्टावर सुष्ट प्रवृत्तींनी मिळवलेला विजय, म्हणून सगळीकडे विजयपताका, ब्रह्मध्वजा लावून रामराजाचं स्वागत करत होते. 

कालपुरुषानं पुन्हा एकदा नोंद केली: १, चैत्र ! 

बघता बघता आपल्या परिभ्रमणाच्या गतीनं वसुंधरा कालपुरुषाच्या डोळ्यांसमोरून पुन्हा एकदा विश्वाच्या अफाट पसारात निघून गेली. 

आणखी काही युगं लोटली… कालगणनेतल्या ठराविक वेळी कालपुरुष या वसुंधरेच्या आगमनाची वाट पाहत असे : १, चैत्र…

तीही त्या ठराविक काळात दर्शन देऊन पुढे जात असे. दरवेळी आपल्या अंत:चक्षूंनी तिचं अंतरंग जाणून घेण्याचा कालपुरुषाला छंदच जडला होता. 

या छंदापोटी मग महाभारतकालीन युद्ध, जय-पराजय, आणखीही अनेक साम्राज्यांचे उदयास्त आणि प्रत्येक वेळी विजयाच्या वेळी उभारलेले ब्रह्मध्वज यांचा तो साक्षीदार होत गेला. 

प्रत्येक वेळी ती समोर आली, की काहीतरी नवीन घडामोडी त्याला बघायला मिळत. 

वसुंधरेची सर्व अपत्यं तिचा जन्मदिवस अतिशय जल्लोषात साजरा करीत‌ असत. सूर्यसख्याची किरणं, वनस्पतींची कोवळी पालवी आणि वृक्षांनी भरभरून दिलेलं फळांफुलांचं दान, यांमुळे मनुष्यांच्या चित्तवृत्ती अधिकच उल्हसित होत असत. 

युगांमागून युगं गेली. वसुंधरेवरचे प्राणिमात्र बदलले, वनस्पती संक्रमित झाल्या. त्यांच्या अधिकाधिक प्रगत पिढ्या निर्माण झाल्या. विश्वाच्या पसा-यात एका कोपऱ्यात बसलेल्या कालपुरुषाचं सर्व घडामोडींवर ठराविक काळानं लक्ष जात असे. 

अलिकडे मात्र तो जरा चक्रावून जाऊ लागला होता. त्याच्या डोळ्यांसमोर वसुंधरेचं नवीन रूप आल्यानंतर, जुन्या खुणा त्याला कुठेच दिसेनाशा झाल्या होत्या. .. त्याला न समजणाऱ्या अनेक गोष्टी तिथे घडत होत्या. 

वसुंधरेचा जन्मदिवस हा ठिकठिकाणी व्यापाऱ्यांचे मेळे, प्रचंड धनाची उलाढाल, खरेदी-विक्रीचे अफाट आणि अचाट व्यवहार यांच्या योगानंच साजरा करण्याची प्रथा आजकाल पडली होती. आकाशी उंच लहरणाऱ्या ब्रम्हध्वजांना खुजं स्वरूप देऊन त्यांचं आधुनिकीकरण करण्यात आलं होतं. वृक्ष-वेली, लता-पल्लव यांच्या सहवासात साजरा करण्याचा हा जन्मदिवस! पण मूळ गाभा भलतीकडेच जाऊन कडुलिंबाची पानं आणि आंब्याचे डहाळेदेखील विकत घेऊन तोंडदेखलं ‘शास्त्र’ करण्याची मनुष्यमात्रांची प्रवृत्ती झाली होती. ‘दुष्टांवर सुष्ट प्रवृत्तीनं मिळवलेला विजय’ ही कल्पना पारच मोडीत निघाली होती. त्याऐवजी भरभरून खरेदी करा, मुहूर्तावर गाड्या घ्या, कोट्यवधींची घरं विकत घ्या, अशांसारख्या धनदा़ंडग्या उन्मादानं धुमाकूळ घातला होता…

कर्कश गोंगाटात निघणाऱ्या शोभायात्रा, आणि धर्मांधर्मांमधला कट्टरतावाद जोपासण्यासाठी सुरू झालेली चढाओढ ह्याच जन्मदिनाच्या साक्षीनं सुरू होत होती.

‘अधिक, अजून अधिक, अजून अधिक’, या हव्यासापोटी मनुष्यांनी निर्माण केलेल्या कचऱ्याच्या महाप्रचंड दबावाखाली वसुंधरा दिवसेंदिवस दबून चालली होती. 

कालपुरुषाला उमज पडेनासा झाला. ‘विश्वकर्म्यानं मेहनत घेऊन घडवलेली कलाकृती’ असलेली वसुंधरा आज कुठे नेऊन ठेवली होती तिच्याच लेकरा-बाळांनी? 

कालाय तस्मै नमः!

विचार करता करता पुन्हा ती त्याच्या नजरेसमोरून दिसेनाशी झाली- तिच्या पुढच्या भ्रमणकक्षेत. 

केवळ साक्षीभावाचा धनी असलेला कालपुरुष मात्र उद्विग्न मनानं तिच्याकरिता मनोमन प्रार्थना करत राहिला…

हे वसुंधरे, भविष्यकाळात तुझ्या अंगा-खांद्यावर तीच ती प्राचीन पिंपळाची कोवळीलूस पालवी दिसू दे…त्या पिंपळपानावर विसावलेल्या, पायाचा अंगठा चोखत पडलेल्या गोजिरवाण्या बालकापासून एक नवं हिरवंगार आणि निरागस विश्व पुन्हा निर्माण होऊ दे… 

आणि हे वसुंधरे, त्या जुन्या नवतरुण नीलहरित स्वरूपातल्या तुला शुभेच्छा देण्याची संधी मला पुन्हा पुन्हा येऊ दे.   प्राचीन काळापासून, तुझ्या कक्षेत भ्रमण करत असताना ज्या वेळेस तू माझ्यासमोर येत गेलीस, त्या तुझ्या जन्मदिवसाची नोंद  मी कायमस्वरूपी करून ठेवली आहे: १, चैत्र !!

.. .. .. शुभास्ते पंथान: सन्तु !!

लेखिका : सुश्री दीपा झानपुरे

संग्रहिका : प्रभा हर्षे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “अखेरची आस…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

☆ “अखेरची आस” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

आयुष्याची संध्याकाळ झालेली आहे. वय उताराकडे चाललेले आहे. अशावेळी आपलं पुढच आयुष्य कसं जगायचं?…

याचा विचार करता करता आपल्या मृत्यूनंतर चा विचारही मनात यायला लागलेला आहे. मृत्यू अटळ आहे… आजारी पडलो तर.. बोलणेच बंद झाले तर…

मग ठरवलं..

यावर आपल्या मनात जे विचार आहेत ते लिहून ठेवायचे. म्हणजे मुलांना सोपं होईल.

व्हेंटिलेटर वर ठेवायची वेळ आली तर तो किती दिवस ठेवायचा?

कारण व्हेंटिलेटर” काढा “असं कोणी कसं म्हणायचं…. हा मोठा प्रश्न असतो…

एकदम आठवण आली भाचे सुनेच्या वडिलांची. वय वर्ष 85…

दवाखान्यात ठेवल्यानंतर त्यांना व्हेंटिलेटर लावायची वेळ आली. ते बोलू शकत होते. त्यांनी दोन दिवसांनी व्हेंटिलेटर काढायला स्वतःच सांगितले. त्यानंतर ते अनेक जणांशी बोलले त्यांना लोक भेटायला आले.

चार दिवसांनी शांतपणे त्यांची जीवन यात्रा संपली.

हे खरं तर अवघड आहे पण करायचं म्हटलं तर शक्य पण आहे.

देहदान… नेत्रदान करायचं मनात आहे अस आपण म्हणतो. पण त्यासाठी आधी तयारी करावी लागते.

नलू ताई म्हणजे माझी नणंद. यांनी देहदानाचा फॉर्म भरला होता. त्यांचा मृत्यू मध्यरात्री झाला. पुढे काय करायचे ?हे आम्हाला कोणालाच माहिती नव्हते. फारच गोंधळ सुरू झाला.

बहिणीचा मुलगा डॉक्टर श्रीपाद पुजारी हा दीनानाथ हॉस्पिटलमध्ये आहे. त्यांनी सर्व मदत केली म्हणून नलू ताईंची अंतिम देहदानआणि नेत्रदानाची इच्छा पूर्ण करता आली.

काही लोक यासाठी काम करत आहेत. त्यांचे फोन नंबर आपण घेऊन ठेवले पाहिजेत.

पुण्यात श्रीयुत खाडीलकर हे यासाठी काम करत आहेत. कोणाला त्यांचा फोन नंबर हवा असेल तर मी जरूर देईन.

माझी मैत्रीण हेमा. तिच्या वडिलांनी तीस वर्षांपूर्वी सांगितले होते की मी गेल्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवसापासून तुमच्या उद्योगाला लागा. असेही आदर्श आपल्यासमोर आहेत.

घरात कोणाचा मृत्यू झाला की मन भावुक, हळवे आणि कातर झालेले असते.

त्यात लोक काय म्हणतील ही ही भीती असते. त्यामुळे काही लोक कर्ज काढून दहावा बारावा करतात. मोठ्या जेवणावळी घालतात.

प्रसादाला आलेले लोक टॉवेल, टोपी, शर्टपीस असा आहेर घेऊन येतात.

पाठीवर टॉवेल घालण्यापेक्षा मी तुझ्या पाठीशी आहे. काही लागलं तर मला सांग.. मी मदत करीन अस पाठीवर हात ठेवून म्हटलं आणि तसं वागलं तर ते योग्य ठरेल.

एखाद्या सवाष्ण स्त्रीचे निधन झालं तर लोक पाच जणींना साडी, चोळी सौभाग्य अलंकार देतात. भरमसाठ खर्च करतात. ऐपत नसेल तर कर्ज काढतात. आधीच घरातली स्त्री गेली असेल तर घराची घडी विस्कटलेली असते. त्यात हा अमाप खर्च…

घरातले दुःखी कष्टी असतात. त्यावेळेस एखादी बाई किंवा पुरुष ही सूत्र हातात घेतात. हे केल पाहिजे, ते आणलं पाहिजे… अस म्हणतात. त्यावेळेस त्यांना विरोध करता येत नाही.

हे कितपत योग्य आहे ?

याचाही विचार करा. काहीजणांना मनात नसतानाही हा खर्च करावा लागतो.

शिवाय आपण हे केल नाही तर काय होईल ही भीती असतेच….

मृत्यूनंतर भाषण देण्यापेक्षा ती व्यक्ती जिवंत असताना बोलून घ्या. भेटून घ्या. तिचं कौतुक करा.

काळानुरूप आपण आपले विचार, रूढी, परंपरा यात बदल करायला हवा आहे. आणि तो आपणच करायचा आहे.

अर्थातच हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे ज्याला जे वाटेल ते त्यांनी करावे.

आता शांतपणे लिहायला बसले की असे काही काही विषय सुचतात. खरंतर अशा विषयांवर कोणी स्पष्टपणे बोलत नाही.

पण ठरवलं…

लेखणीतून तुमच्याशी बोलावं.

त्यातून तुम्ही काही सांगता.. सूचना करता…. मलाच नाही तर इतरांनाही त्याची मदत होते. माहिती समजते.

वाचता वाचता आज फार गंभीर झालात का ?

असू दे एखादा दिवस असा…

पण खरंच…

अंध माणसांकडे एकदा बघा..

तुम्ही नेत्रदान केले तर दोन जणांना दृष्टी येणार आहे याचाही विचार करा.

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ 05… जागतिक हास्य-दिन !!! ☆  श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

??

05… जागतिक हास्य-दिन !!! ☆  श्री संदीप रामचंद्र सुंकले 

या जगात दुसऱ्याला सहज देता येणारी एकच गोष्ट असेल, ती म्हणजे हास्य!! 

बाळाचे निरागस हास्य सर्वात आनंददायी असते.

‘हास्या’ला तसे ‘मूल्य’ नाही कारण ते ‘अमूल्य’ आहे.

या जगात प्रवेश करताना ‘रडणारा’ मनुष्य जर ‘हसतमुखाने’ मेला तर तो ‘खरा’ जगला असे म्हणता येईल.

रडायला कोणीतरी मायेचे लागते, पण हसायला मात्र अनोळखी मनुष्यही चालतो

रडण्यासाठी मनुष्याला ‘कारण’ लागते पण हसण्यासाठी कारण लागतेच असे नाही.

 रडण्याच्या बदल्यात काय मिळेल ते सांगता येईलच असे नाही, परंतु हास्याच्या बदल्यात हास्य मिळण्याची शक्यता जास्त असते.

चेहऱ्यावरील ‘स्मितहास्य’ तुमच्या चेहऱ्याचे ‘मूल्य’ वाढविते.

म्हणून हसा आणि लठ्ठ व्हा !!

ती हसली, मनापासून हसली आणि भोवताली दाटत असलेल्या छाया क्षणार्धात अदृश्य झाल्या.

पूर्वी लिहिलेली एक कविता इथे देत आहे…

*

हास्यातूनी पाझरे तुझ्या टिपुराचे चांदणे

मनास मुग्ध करी तुझे रूप हे लोभसवाणे

*

हास्यातुनी तुझ्या प्रगटती आरस्पानी दवबिंदू

श्रावणात जशा बरसती जलधार, जलसिंधू

*

हास्यातुनी तुझ्या गवसे मातृहृदयी निर्मळ मन

तव हास्यधारांच्या संगे सांत होई व्याकुळ मन

*

सदैव मुखी स्मितहास्य विलसावे कान्ह्यासारखे

विहरत राहावे गगनी परी तटस्थ कृष्णासारखे

*

दिवसभरात किमान एक तरी व्यक्तीच्या चेहऱ्यावर ‘हास्य’ आणायचा संकल्प आजच्या शुभदिनी करावा.

जागतिक हास्य दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा !!!

© श्री संदीप रामचंद्र सुंकले

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “प्रेमाचं वय” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

? मनमंजुषेतून ?

☆ “प्रेमाचं वय” ☆ श्री मंगेश मधुकर 

रविवारची संध्याकाळ मला नेहमीच अस्वस्थ करते. उगीचच उदास वाटतं. आजसुद्धा परिस्थिती वेगळी नव्हती. टीव्हीत मन रमलं नाही. मोबईलचा कंटाळा आला. काय करावं सुचत नव्हतं. एकदम ब्लॅंक झालो. टेरेसवर जाण्याची लहर आली. सौंना आश्चर्य वाटलं. तसंही बऱ्याच महिन्यात गेलो नव्हतो. दोन मजले चढून टेरेसवर आलो. आजूबाजूला नव्या-जुन्या बिल्डिंग्जची गर्दीच गर्दी वायरचं पसरलेलं जाळं त्यावर बसलेले कावळे, कबुतरं नेहमीपेक्षा वेगळ्या गोष्टी पाहून जरा बरं वाटलं. टेरेसवर शांतता होती. कोणी डिस्टर्ब करायला नको म्हणून सहज दिसणार नाही अशी जागा पाहून बसलो. बेचैनी कमी झाली तरी मनात वेगवेगळे विचार सुरूच होते. इतक्यात बारीक आवाजात बोलण्याचा आवाज आला.

“ए, काल संध्याकाळी काय झालं.”

“काही नाही”

“बोल की, येस की नो”

“अजून मी फायनल सांगितलं नाही.”

“लवकर सांग. आधीच उशीर झालाय.”

“तुलाच जास्त घाई झालेली दिसतेय”.

“उगाच भाव खाऊ नकोस. मी मधे नसते तर काहीच झालं नसतं”

“फुकट केलं नाहीस. दोघांकडून गिफ्ट घेतलय. तेव्हा जास्त उडू नकोस.”

“ओ हो!!बॉयफ्रेंड काय मिळाला लगेच बेस्ट फ्रेंड उडायला लागली.”

“मार खाशील. गप बस. ममीचा मोबाईल आणलाय. तिला कळायच्या आत त्याच्याशी बोलू दे”

“लवकर फोन लाव. स्पीकरवर टाक”

“गावजेवण नाहीये. कुणी ऐकलं तर.. कान इकडं कर. दोघी मिळून ऐकू”नंतर फक्त दबक्या आवाजात बोलण्याचा आणि हसण्याचा आवाज येत होता. फोन बंद झाल्यावर पुन्हा नॉर्मल बोलणं सुरू झालं.

“आता पार्टी पाहिजे”

“कशाबद्दल”

“बॉयफ्रेंड मिळाला”

“तो तर मिळणारच होता. बघितलं ना कसला पागल झालाय. नुसता बघत रहायचा.”

“हा तू तर ब्युटी क्वीनच ना”

“जळतेस का?”

“माझा ही आहेच की.. ”

“तोंड पाहिलं का?ज्याच्यावर मरतेस तो तर बघत पण नाही आणि तू उगाच…”

“माझं मी बघेन. जास्त शायनिंग मारू नकोस. बॉयफ्रेंड टेंपररी पण मैत्री परमनंट आहे. लक्षात ठेव.”

“ए गपयं. सेंटी मारू नको.”

“अजून काय म्हणाला सांग ना”

“तुला कशाला सांगू. आमचं सिक्रेट आहे”

“ते फोडायला एक मिनिट लागणार नाही. आता सांगतेस की…”

“तो फार अडव्हान्स आहे”

“असं काय केलं”

“करायला अजून नीट भेटलोय कुठं?”

“मग नुसती पोपटपंची”

“ती सुद्धा जाम एक्सयटिंग आणि अंगावर काटा आणणारी”

“मामला अंगापर्यंत पोचला. लकी आहेस”

“सालं, माझ्याकडे मोबाईल नाही त्यामुळे सगळा लोचा होतो. आमचं नीट बोलणं होत नाही.”

“त्यालाच सांग की घेऊन द्यायला”

“त्याच्याकडे आईचा जुना फोन आहे. मागितला तर आधी किस दे म्हणाला”

“अय्यो.. ”खी खी हसण्याचा आवाज आला. तितक्यात खालच्या मजल्यावरून जोरजोरात हाका सुरू झाल्या तेव्हा घाबरून ताडकन उभ्या राहीलेल्या दोघी स्पष्ट दिसल्या पण त्यांना मी दिसलो नाही. दोघी धावत खाली गेल्या. टेरेसवर मी एकटाच होतो. खरं सांगायचं तर मुलींचं इतकं ‘बोल्ड’ बोलणं माझ्यासारख्या मध्यमवर्गीयाला पचनी पडलं नाही. नवीन पिढी खूप फास्ट आहे याची कल्पना होती तरीही एवढी फास्ट असेल असं वाटलं नाही. जे ऐकलं त्यावर विश्वास बसत नव्हता कारण एक सहावीत शिकणारी अन दुसरी सातवीत.

 नकळत नव्वदच्या दशकातले शाळेतले दिवस आठवले अन हसायला आलं. ते लहानपण म्हणजे मित्र, मित्र आणि मित्र यापलीकडे काही नव्हतं. भरपूर खेळायचं अन अधे-मधे अभ्यास असं चालायचं. ‘प्रेम’ वगैरे गोष्टींची जाणीव नववीत गेल्यावर व्हायची. एखादी आवडायची मग स्वप्नं गुलाबी व्हायची. तिच्यावरून चिडवणं, त्यावर मित्रांमध्ये नुसत्याच चर्चा. कृती काही नाही. लपून छ्पून बघणं चालायचं. खूप इच्छा असूनही बोलायची हिंमत नव्हती. मुलींशी बोलताना भीती वाटायची. तिथं प्रेम व्यक्त करणं तर फार लांबची गोष्ट. त्यावेळची परिस्थितीच वेगळी होती. वडीलधारे, शिक्षकांचा धाक, दरारा होता. मार पडेल याची भीती वाटायची. आता मात्र सगळंच खूप सोपं आणि सहज झालंय.” अशा विचारांची लागलेली तंद्री सौंच्या आवाजानं तुटली.

“काय झालं”तिनं विचारलं. तेव्हा नुकताच घडलेला प्रसंग सांगितला.

“मग यात विशेष काही नाही हा वणवा सगळीकडेच पेटलाय. घर घर की कहानी. थॅंक्स टू मोबाईल आणि इंटरनेट.”

“मुलं अकाली प्रौढ होतायेत हे चांगलं नाही.” 

“कारट्यांना, अजून धड नाक पुसता येत नाही अन प्रेम करतायेत”सौं हसत म्हणाली.

“हे सगळं उथळ, वरवरचं आहे. काळजी वाटते.”

“कसली”

“हे सगळं कुठं जाईल??आणि बालपणीचा निरागसपणा कुठंयं ?

“तो तर केव्हाच संपला. आता मुलांचं भावविश्व बदललयं. बॉयफ्रेंड/गर्ल फ्रेंड असणं हे प्रेस्टीज मानलं जातं. त्यासाठी वयाची अट नाही. याविषयी प्राउड फील करणारेही आजूबाजूला आहेत. आता बालपण लवकर संपतं कारण…”

“ प्रेमाचं वय् अलिकडं आलंय” 

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “शांतीनिकेतन” ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

? इंद्रधनुष्य ? 

☆ “शांतीनिकेतन” ☆ श्री सुनील शिरवाडकर

शिक्षण क्षेत्रात आपण काहीतरी करावे असे रविंद्रनाथ टागोरांना नेमके केव्हा वाटु लागले? का वाटु लागले?तो काळ इंग्रजीच्या शिक्षणाला अवास्तव महत्त्व देणारा होता. अगदी आजच्या सारखाच. इंग्रजी भाषा आली की आपल्याला सर्व काही आलेच..असे मानणार्या बुध्दिजीवी वर्गाचा.

बंगालमधील शहरी समाजात बंगाली भाषेविषयी एक प्रकारची तिरस्काराची भावना निर्माण झाली होती. दुरगावी गेलेल्या मुलांना पत्र लिहायचे म्हटले तरी वडील ते मात्रुभाषेतुन न लिहीता इंग्रजीत लिहीत.

त्या काळात कॉंग्रेसचे अखिल भारतीय अधिवेशन बंगालमध्ये झाले होते. त्यावेळी रविंद्रनाथांनी भाषण केले ते बंगालीत.तत्कालीन राष्ट्रप्रेमींनी त्यांच्यावर त्याबद्दल टीकाही केली होती.. चेष्टाहि केली. साधारण त्याच काळात रविंद्रनाथांनी ठरवले की, या भाषेच्या गुलामगिरीतून सुटण्यासाठी आपण काहीतरी करावयास हवे. आपली सगळी बुद्धी, प्रतिभा या कामासाठीच वापरण्याचा त्यांनी निर्णय घेतला.

सर्व शहरी सुखसोयींचा,सुविधांचा त्याग करून आपल्या कुटुंबासह ते बाहेर पडले. फार पूर्वी म्हणजे जेव्हा रविंद्रनाथ ११-१२ वर्षाचे होते.. तेव्हा त्यांच्या वडिलांसह ते वीरभुम मध्ये आले होते. या जागेपासून जवळच एका दरोडेखोरांची वस्ती होती. तेथील निवांतपणा.. निसर्गाचे वैभव मनात साठवत त्यांचे वडील देवेंद्रनाथ तेथे ध्यान लावून बसत.तेथील दरोडेखोरांच्या मनात त्यांच्याबद्दल कुतूहल निर्माण झाले. ते पण जवळ येऊन बसत.त्यातील कित्येकांनी वाटमारीचा व्यवसाय सोडला. देवेंद्रनाथांना आपल्या व्यथा, अडचणी सांगत. 

आणि आता रविंद्रनाथ पुन्हा त्या माळावर आले .त्यांना जाणीव झाली.. हिच..होय हिच जागा योग्य आहे. आत्मचिंतन करण्यासाठी.. ध्यान करण्यासाठी. त्यांनी तो माळ विकत घेतला.त्यावेळी एक लहान टुमदार बंगली बांधली. त्या सुंदर बंगल्याचेच नाव…’शांती निकेतन’.

१९०१ साली रविंद्रनाथांनी शांतीनिकेतनमध्ये प्रथमच शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा त्यांच्या सोबतीला होती त्यांची पत्नी आणि दोन मुले. तेच त्यांचे पहिले विद्यार्थी. येथे मुलांना शिकवण्यासाठी पाठवणे म्हणजे सर्वसाधारण बंगाल्यांच्या द्रुष्टीने धाडसाचेच होते.

खुद्द इंग्रज या शाळेकडे संशयाने पाहत होते. भारतीयांमध्ये आपली भाषा..आपली संस्कृती याबद्दल अभिमान निर्माण करणे म्हणजे राजद्रोह होता. त्यामुळे रविंद्रनाथांनांकडे शिकवण्यासाठी मुले पाठवणे तर जाऊ द्या.. त्यांच्याशी संपर्क ठेवणे सुध्दा लोक टाळत होते. सरकारी नोकरीत असलेल्या उच्चवर्गीय बंगाल्यांनी आपली मुले शांतीनिकेतनमध्ये पाठवु नये असा गुप्त आदेशच इंग्रज सरकारने काढला होता. अशा प्रतिकूल परिस्थितीत सुध्दा काहींनी आपली मुले रविंद्रनाथांनांच्या स्वाधीन केली होती.

कशी होती ही शांतिनिकेतन शाळा? ऋतुमानानुसार बदलणारी.. निसर्गाचे रुप..सौंदर्य मुलांना समजले पाहिजे म्हणून त्यांनी जाणीवपूर्वक आश्रमपध्दती स्वीकारली होती. जीवनातील आनंदाची नानाविध क्षेत्रे मुलांना मोकळी करून द्यायला हवी. त्यासाठी त्यांनी त्या विस्तीर्ण माळरानावर तपोवनाची उभारणी केली. त्या मुक्त छत्राखाली नांदणारे ते छात्र..आणि त्यांना गौरवाची दिशा देणारे हे गुरु. गुरु शिष्यांनी एकत्र येऊन केलेली ती आनंद साधना होती. 

तत्कालीन ब्रिटीशांच्या शिक्षण पध्दतीपेक्षा सर्वार्थाने वेगळी ही शाळा होती.

रविंद्रनाथ म्हणतात.. मी स्वतः शाळेतून पळून आलेला मुलगा. शिकवावं कसं हे मला ठाऊक नव्हतं.मला मुलांनी जसं शिकावं असं वाटत होतं ,त्याला योग्य अशी पाठ्यपुस्तके देखील नव्हती. अभ्यासक्रमही नव्हता. शहरातल्या सुखसोयींपासुन दुर अशा शाळेत तर सुरुवातीला कोणी येतही नव्हते.

मग रविंद्रनाथ या मुलांना काय शिकवायचे? नृत्य.. गायन..कविता.. निसर्गाशी एकरूप होऊन रहावे.. मुसळधार पावसात त्या पर्जन्यधारांखाली चिंब भिजायला मुलांना उत्तेजन मिळत होते. आश्रमाजवळुन वाहणारी नदी पावसाळ्यात फुगुन वाहु लागली की गुरु आणि शिष्य बरोबरीनेच त्यात उड्या मारुन पोहोण्याचा आनंद लुटत.भूगोलाच्या पुस्तकातील ही हवा.. ते वारे..याचा आनंद वार्याबरोबर गात गात गाणी म्हणत लुटत.तो वारा पुस्तकाच्या पानापानातुन नव्हे तर मनामनातुन गुंजत राही.मुलांनी मुक्तपणे हे सर्व शिकावे हीच त्यांची खरी धडपड होती.

त्यांच्या मते दडपण आणि विकास या दोन गोष्टी एकत्र राहुच शकत नाही. त्यामुळे मुलांनी मुक्तपणे शिकावे यासाठी त्यांनी संगीताचा मार्ग निवडला. सर्व काही.. म्हणजेच कामे.. शिक्षण गात गात झाले तर त्यात असलेला रस टिकून राहील हे त्यांना जाणवले. निरनिराळे सण..उत्सव.. जत्रा यातून भारतीय संस्कृती टिकून आहे हे त्यांना माहित होते. त्यांनी शांतीनिकेतनमध्ये पौष जत्रा भरवण्यास सुरुवात केली. निसर्गाशी नाते जोडण्यासाठी मग छोटी छोटी रोपे पालखीत घालून त्यांची मिरवणूक काढण्यास सुरुवात केली. आणि त्यांच्या जोडीला सुंदर सुंदर गाणी. झाडांशी.. वेलींशी मुलांचे नाते जडण्यास सुरुवात झाली.

इथल्या वातावरणात साधेपणा होता. पण त्यात रुक्षपणा त्यांनी कधीही येऊ दिला नाही. प्रसन्नता.. सौंदर्य.. आनंद यापासुन विद्यार्थ्यांची ताटातूट कधी होऊ दिली नाही. शिक्षकांना पोटापुरते मिळत होते, पण मानसिक श्रीमंती खुपच मोठी होती. बाजारात मिळणाऱ्या छानशौकिच्या गोष्टींची, ऐश्वर्याची विद्यार्थ्यांनांच काय, पण शिक्षकांनाही कधी आठवण होत नव्हती. बंगाली विणकरांकडुन विणुन घेतलेली सुती वस्त्र रविंद्रनाथांपासुन सर्व जण वापरत.पण त्यात कलात्मकता कशी येईल याकडे लक्ष दिले जाई.

बाराखडींची,शब्दांची ओळख होण्यासाठी ‘सहजपाठ’ या नावाने त्यांनी इतक्या सुबोध शब्दात सुंदर सुंदर कविता रचल्या की गाता गाता मुलांना अक्षर ओळख होऊन जात असे. हे ‘सहजपाठ’ अजूनही बंगालमधील पाठ्यपुस्तकांत आजही आपले स्थान टिकवून आहे. बंगाली लोकांमध्ये असलेले कलेचे.. संगीताचे प्रेम वाढीस लागण्याचे खरे कारण म्हणजे हे ‘सहजपाठ’.

७ मे…. रविंद्रनाथांची  जयंती….  त्यानिमित्ताने त्यांना वाहिलेली ही एक आदरांजली !

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares