मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘स्पर्श’… लेखिका : सुश्री ज्योती रानडे ☆ प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘स्पर्श’… लेखिका : सुश्री ज्योती रानडे ☆ प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर ☆

अमेरिकेतील एका मोठ्या शहरातील एका हॅास्पिटल मधे जेन नवीन नर्स म्हणून कामाला लागली होती. त्या रात्री तिथे एक बाळ जन्माला आले पण त्या बाळाला severe congenital disorder होती. बाळाच्या मेंदूवर परिणाम झाला होता व ते बाळ जगणार नाही हे डॉक्टरांना दिसत होते. जेनला वाटले की नेमके आपल्या नोकरीच्या पहिल्या आठवड्यात अगदी असे बाळ का जन्माला यावे? माणसाचे मन तरी किती विचित्र असतं..कायम फक्त स्वतःचा विचार करतं.. 

जेनने यापूर्वी अशा प्रकारचे बाळ जन्माला आले तर काय होते बघितले होते. अशा बाळांना  ॲडमिट करून ती जाण्याची वाट बघितली जाते. कारण उपचाराचा काही उपयोग नसतो. 

त्या रात्री मॅटर्निटी वॉर्डची प्रमुख नॅन्सी कामाला आली. जेनने नॅन्सीला या बाळाची माहिती दिली. नॅन्सीने बाळाजवळ जाऊन सर्व रिपोर्ट वाचले. त्यानंतर नॅन्सीने जे केले ते बघून जेनला जी शिकवण मिळाली ती जेन आयुष्यभर विसरली नाही.  

नॅन्सी त्या बाळाजवळ गेली. तिने तिचा चेहरा बाळाच्या अगदी शेजारी आणला आणि ती बाळाशी बोलू लागली. “कसं आहे आमचे बाळ? तू किती सुंदर आहेस हे तुला माहिती आहे का? किती गोड आहेस तू” असे बोलत नॅन्सीने त्या अत्यंत आजारी बाळाला हळुवारपणे उचलून घेतले. त्याला जवळ घेऊन ती थोडावेळ बसून राहिली. तिने गाणे गुणगुणत त्याला दुधाच्या बाटलीने दूध पाजले. परत त्याच्याशी गोड आवाजात बरच काही  बोलली. बाळाला झोपवून तिने त्याला अलगद पाळण्यात ठेवले. हे तिने एकदाच नाही पण त्या रात्री अनेकवेळा केले. जणू काही ते तिचे स्वतःचे बाळ होते.. 

जेन अंतर्बाह्य हलून गेली. तिच्या नर्सिंग कॉलेजमध्ये असे काही शिकवले नव्हते. नॅन्सी म्हणाली,”जिथे मेडीकल उपचार संपतात त्यानंतर सगळं संपलं असं कधीच नसते. प्रत्येक जीवाला प्रेमाचा स्पर्श कळतो. आवाजातलं प्रेम कळतं. कुठल्याही नर्सचं हे कर्तव्य आहे की जोवर एखाद्या जीवाचा श्वासोच्छवास सुरू आहे तोवर त्याची काळजी घ्यायची! सर्व प्रकारे जपायचं! प्रेम द्यायचं!”

स्पर्श ही मानवी जीवाला समजणारी सर्व भाषांपलीकडील भाषा आहे. इतर कोणत्याही औषधांचा उपयोग नसताना नॅन्सीने त्या चिमुकल्या जीवाला प्रेमळ स्पर्शाचे औषध देऊन त्याचा कठीण काळ थोडा का होईना सुलभ केला होता. जिथे डॉक्टरांनी हात टेकले होते तिथे नॅन्सीने एक नवा उपचार शोधून काढला होता.  

जेनला ही महान शिकवण त्या रात्री मिळाली. पुढची ५० वर्षे जेन ने वेगवेगळ्या मॅटर्निटी वॉर्डमध्ये काम केले. तिला उत्तम नर्स म्हणून अनेक बक्षिसे मिळाली. मान- सन्मान मिळाले. तिने कित्येक जाणारी बाळे पण बघितली आणि नॅन्सीची शिकवण डोळ्यापुढे ठेऊन त्या प्रत्येक आजारी बाळाला प्रेमाचा स्पर्श दिला. बाळाच्या शेजारी आपला चेहरा आणून त्या बाळाचे कौतुक केले. त्याला जवळ घेऊन बाटलीतून दूध पाजून ती बसून राहिली आणि त्या पलीकडे जाऊन त्या बाळाच्या आईचे सांत्वन केले. 

स्पर्श ही आपण एखाद्या व्यक्तीला दिलेली अमूल्य भेट आहे. दोन हाताच्या उबेतून एक शब्द न बोलता आपले प्रेम दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोचवणारी! आपल्यातले तेज दुसऱ्याला देऊन त्या व्यक्तीचे जग उजळवून टाकणारी!  एक पाठीवरची प्रेमळ थाप सर्व ताणातून मुक्त करण्यास पुरेशी असते. 

जगात अनेक प्रकारची कनेक्टीव्हीटी आली आहे पण माणसाचा एकटेपणा काही कमी होत नाही..म्हणून एखाद्या व्यक्तीला भेट द्यायची असेल प्रेमळ स्पर्शाची भेट द्यावी. शेजारी श्रोता होऊन बसावे आणि त्या व्यक्तीचा एकटेपणा दूर करावा.

बुद्धिबळपटू बॉबी फिशर ने म्हटले आहे, “Nothing is so healing as the human touch.”

लेखिका : सुश्री ज्योती रानडे

प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ढिली है डोरी… ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर

सुश्री अरुणा मुल्हेरकर

📖 वाचताना वेचलेले 📖

ढिली है डोरी… ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

कुठलीही गोष्ट फार काळ ताणून धरली की ती तुटतेच! मग ती पतंग असो,श्वास असो,नात्यातील वादविवाद असो, हट्ट असो काही ताणले की गोष्ट तुटतेच! म्हणूनच “योग्य वेळी योग्य गोष्टींना ढिल देता आलाच पाहिजे.”असे बाराव्या वर्षांपासून शैव पंथीतील काश्मीरमधील संत लल्लादेवी सारख्या म्हणायच्या!

कधीकधी माणसातील अहंकारच काही गोष्टींना ढिल देऊ देत नाही.पण ताणल्यामुळे जर काही तुटले तर दोष मात्र माणूस लगेच देवाला देतो.माणसं कित्येक वेळा वाईट गोष्टींचे खापर देवावर फोडतात.तेव्हा शंकराच्या असीम भक्त लल्लादेवी म्हणतात तुम्ही कितीही देवाचे करा देव तुम्हाला मृत्यू दिल्याशिवाय रहाणार नाही.मृत्यू अटळ आहे. तुम्हाला मोक्ष हवा असेल तर तुम्ही श्रध्दा ठेवा देवावर!

हेच तत्वज्ञान संत लल्लादेवी ढिल हा एक शब्द घेऊन आपल्या  अभंगातून सांगतात. ताणून धरणं हा माणसाचा स्वभाव आहे.आणि आपण ताणून धरल्यावर ढिली डोरी छोडना हा देवाचा स्वभाव आहे.कारण वो शंकर  भोळा आहे.तो कधीच  रागवत नाही. 

हे रब्बा

ढिली है डोरी 

कैसे संभालू गठडी 

मैं ये मिठाई

एक ढिल दिल्यावर सगळ्या गोष्टी  सुरळीत होऊ शकतात.हा ढिल इतर माणसं आचरणात का आणत नाही ह्याचे लल्लादेवींना दुःख होते.

लोंग ढिले है 

ढिल नहीं जानते 

असं म्हणत आपलं दुःख कधीही दुसऱ्याला न सांगता, समाधानी आयुष्य जगण्याचा प्रयत्न करणाऱ्या संत लल्लादेवी ह्या आजच्या काळाला नक्कीच प्रेरणादायी ठरतील! संत लल्लनदेवी प्रज्ञावंत होत्या.परंतु शक्ती पेक्षा सहनशक्ती श्रेष्ठ हे तत्व उराशी बाळगून मनाच्या आणि शरिराच्या जखमा कधीच त्यांनी इतरांना दाखवल्या नाहीत.उलट ८० टक्के जखमा ह्या केवळ नामस्मरणाने भरतात हे त्यांनी आपल्या दिवसरात्र नामस्मरणाने दाखवून दिले.तुम्ही जितकं देवा जवळ जाता तितक दुःख कमी होत.कोणत्याही अंधाराला आपण सामोरी जाऊ शकतो.एक अलौकिक उजेड लल्लनदेवींना मिळाला होता.म्हणूच लहान वयात लग्न होऊन काश्मीरला सासरी आल्यावर सासरकरांच्या प्रचंड त्रासाचा त्यांच्यावर काहीच परिणाम झाला नाही.

रस्सी कच्चे धागे की

खिच रही है नाव

जाने कब सुन मेरी पुकार

करे दे भवसागर पार

आपल्या श्वासांना रस्सीची उपमा देत संपूर्ण काश्मीरी लोकांवर, काश्मिरी पंडितांवर भावनिक शब्दांचे गारूड घातले लल्लनदेवींनी!

जर गुराखी नसेल तर गुरं इकडे तिकडे जाणारच.म्हणून आपल्या इंद्रियांचे आपण गुराखी बनलं पाहिजे म्हणजे वासना इकडे तिकडे जाणार नाहीत.मोह उरणार नाही.असे म्हणत  हजारांहून अधिक अभंग त्यांनी लिहिले.

सासू त्रास देऊन थकली परंतु लल्लनदेवी त्रास सोसून थकल्या नाहीत.लल्लादेवींशा जेवायला वाढायच्या आधी सासू कंकर ( छोटे दगड ) आधी ताटात वाढून त्यावर चावल ( भात ) वाढायची.लल्लन सगळी शीत कंकर मधुन वेचून वेचून खायची.जेवण झालं की लल्लनदेवी ते कंकर टाकून न देता, प्रामाणिकपणे ते सगळे कंकर स्वच्छ धुऊन पुन्हा सासूला नेऊन द्यायची.म्हणजे सासूला तेच कंकर पुढच्या जेवणामध्ये सासूबाईंना सहज टाकता येतील. लल्लादेवींना वाटायचं ज्या गोष्टीने सासुबाईंना आनंद मिळत असेल ,तर तो त्यांचा आनंद आपण का हिरावून घ्यायचा.इतकी साधीभोळी विचारसरणी  लल्लनदेवींची होती.

स्वतःला शिवतत्त्व मानणाऱ्या लल्लादेवींना साक्षात शिवाने ज्ञानबोध दिल्याने त्यांच्या हृदयातही शिवा सारखा भोळा भाव नांदत होता.केवल इश्वरके साथ ही मनुष्य का असली रिश्ता है…वही असली परमसुख है| बाकी तो माया है|….पती मुलं संपत्ती ह्या सगळ्यांवर भरभरून प्रेम करतात स्त्रिया कारण त्यांना ते आपले समजत असतात.पण आपल्याच आत असणाऱ्या आत्म्यावर त्या प्रेम करत नाही.       शिवशंकराचा शोध घेणं हाच त्यांचा ध्यास होता.त्यासाठीच रानावनात भटकंती व्हायची.तासंनतास शिवाच्या नामस्मरणात गुंग असणाऱ्या लल्लादेवींना लोक नंतर वेडी समजायला लागले.एकदा लल्लनदेवींच्या अंगावर फाटकी वस्त्रे पाहून एका व्यापाराने एक चुनरी त्यांना दिली. लल्लनदेवी खांद्यावर चुनरी टाकून निघाल्या! निघताना लल्लनदेवीनीं त्या चुनरीचे वजन केले.दिवसभर त्या इकडे तिकडे ती चुनरी घेऊन फिरत होत्या.कोणी त्यांची निंदा केली की त्या डाव्या खांद्यावरच्या चुनरीला गाठ मारायच्या… आणि कोणी त्यांच्याशी प्रेमाने वागवले की उजव्या खांद्यावरच्या चुनरीला गाठ मारायच्या! दिवसभर त्या कधी डाव्या कधी उजव्या बाजूला गाठी मारत होत्या…. संध्याकाळी लल्लनदेवी पुन्हा त्या व्यापाऱ्याकडे आल्या…..गाठीच्या चुनरीचे त्यांनी व्यापाऱ्याला वजन करायला सांगितले.व्यापारी म्हणाला वजनात काहीच फरक नाही.सकाळी होत तितकेच वजन आहे.

तेव्हा लल्लनदेवी व्यापाऱ्याला म्हणाल्या… वजनात फरक पडणारही नाही.पण ह्या गाठींच वजन किती मोठं तत्वज्ञान सांगतात आपल्याला की लोकांनी केलेली स्तुती आणि निंदा ह्य दोघांमुळे मुळ वस्तूत काहीच फरक पडत नाही.म्हणून ज्ञानी माणसांनी सुख आणि दुःख ह्या दोघांचा शांतपणे स्विकार केला पाहिजे.

इतक्या सहज तत्वज्ञानाला हात लावणाऱ्या लल्लादेवींचे अभंग लोकांना मौखिक पाठ होते.लल्लालेवीनीं मुद्दाम हे अभंग संस्कृतमध्ये न लिहिता ते काश्मिरी भाषेत लिहिले.आज सातशे वर्षा नंतरही त्यांचे २६५ वर अभंग काश्मीरमध्ये लोकप्रिय आहेत.

काळाचा संघर्ष असला तरी जुम्मा मशिदी समोर आपला देह सोडणाऱ्या लल्लनदेवींनी सुध्दा मुक्ताबाई,जनाबाई सारखीच देवाची आराधना केली.शिवशंकरात समरस होण्याच्या प्रयत्नातच सामान्यांना तत्वज्ञान सांगितले. म्हणूनच सर रिचर्ड टेंपल यांनी द वल्ड ऑफ लल्ला ह्या ग्रंथात आपण भारतीय तत्वज्ञानाकडे केवळ लल्लादेवीमुळे वळलो असे स्पष्ट लिहिले आहे.

सर ग्रीअरसन यांच्या लाल वाखीयनी ह्या ग्रंथरुपी पुस्तका मध्ये म्हंटलेच आहे की जातपात न मानणाऱ्या लल्लादेवींच्या अभंगना प्रत्येक भाषेत प्रसिद्धी मिळाली आहे.ग्रीक,फ्रेंच, जर्मन, उर्दू,सिंधी,कन्नड अशा अनेक भाषांमधून आजही लल्लनदेवी लोकांच्या हृदयात बसल्या आहेत. आजही लल्लनदेवींच्या सिंधी अभंगात योग , देव, धर्म ह्या गोष्टी आढळतात.  

मन का आइना

साफ करोगे

तो अपनीही रूह

शैव धर्मातील अद्वैत तत्त्वज्ञान तसेच मुस्लिम सुफी तत्वांचा लल्लादेवींनी सुरेख संगम साधला आहे.

 

लेखिका : प्राची गडकरी

प्रस्तुती : अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “मेघ…” ☆ श्री वैभव चौगुले ☆

श्री वैभव चौगुले

? विविधा ?

☆ “मेघ…” ☆ श्री वैभव चौगुले ☆

मनाच्या उंबरठ्यावर खूप गर्दी होती. मेघ दाटल्यासारखे मनातले आभाळ भरून आले होते. फक्त डोळ्यातून अश्रू वाहणे राहिले होते. नजर कोणत्याच नजरेला मिळालेली नव्हती. वीज जेव्हा क्षणार्धात धरणीचे चुंबन घेते. आणि क्षणातच तिच्या कवेतून पसार होते. अशी भेट बहुदा झाल्यानंतरच असवांची वाट मोकळी होणार होती.

मनातल्या दाटलेल्या आभाळाच्या मनात खूप काही लपून होतं. गरज होती आभाळ रितं होण्याची आणि मेघ अश्रू वाहण्याची. काळेभोर ढग का साटतात? कसे तरंगतात? हवे तिथे बरसतात का? की नको तेथे कोसळतात आणि कोसळेलच तर का ?  असे प्रश्न माझ्या मनात का उपस्थित होतात. मला कळत नाही.

कुणाला काय घेणे, देणे त्या दाटलेल्या ढगांचे आणि वाहणा-या आसवांचे! तहानलेल्या भावनांची तहान आसवांनी मिटेल का ? की तहान भागवण्यासाठी किती वेदनांची दारे ठोठावयाची यालाही काही मर्यादा आहे की नाही? डोक्याला फेटा जितका वेळ राहतो, तेवढेच सुख वाटेला येते. फेटा उतरला की दु:ख पुन्हा सिंहासनावर येऊन बसते. सुख दु:खाच्या या लपंडावात किती बुध्दीबळाचे प्यादे, हत्ती, घोडे, उंट, वजीर मारले जातात. अखेर राजा ही चुकत नाही. कारण या डावात एक हारल्याशिवाय दुसरा जिंकणार कसा? एकाला हारावेच लागते हा नियमच आहे. किती नियमात राहू…की बरसून जाऊ  मेघ होऊन एकदा त्या मुक्ततेने कोसळणा-या सरींसारखा! की वादळ होऊ आणि साठलेली काळजावरची धूळ उडवून टाकू! म्हणजे काळीज कसे आहे, हे तरी समजेल!

बरसल्यावर निदान मृदगंधातून तरी हृदयापर्यत पोहचता येईल. बाहेरून कसं ओळखायचं मन, की कोणत्या फोटोमध्ये किंवा कोणत्या सेल्फीमध्ये दिसेल हे मन! श्वासातून क्षणभर मनाला स्पर्श करून  मृदगंधाला सोबत घेऊन, मनापर्यत पोहचून मनाशी हितगूज करून पुन्हा  श्वासातून बाहेर येता तरी येईल. क्षणभर का होईना निखळ मनामनांची भेट होईल. शेवटी हा आभासचं!

आभाळ भरलेले असताना कबूतरांची जोडी खिडकीच्या आस-याखाली येवून बसताना दिसली. गुटरगुटर आवाज करत चोची जवळ चोच आणत जणू येणा-या संकटावर मात कसे करायचे? याचा विचार करत होते की काय? की सुटलेला गार वारा, मौसमातला थंडावा, ऋतूहळवा, प्रितीचा बहर, कुठेतरी पाऊस चालू असताना वा-या सोबत वाहणारा मृृदगंधचा स्वाद घेत प्रेमाचे संवाद करत असतील. याचा विचार माझ्या मनात येत होता. कोण आपल्याला पाहतं का? तसेतर वेळ्ला किती महत्व आहे आपल्याला माहीत आहे. मिळालेला वेळ ते हितगूज करण्यात घालवतात. एकमेकांना काय हवं काय को याची विचारपूस करतात हे काय कमी आहे का?  या जिवंत उदाहरणाकडे मी एकटक पाहत बसलो होतो.

चहा मला करायला येतो. या वेळी घरात कोणीच नव्हतं. मी चहा बनवायला घेतला. मला चहा जास्त लागत नाही. मी अर्धा कपच चहा घेत असतो. तो माझ्या मनाप्रमाणे व्हावा हे अपेक्षित असतं. दूध थोडसं, चहा पावडर, चिमूटभर साखर सोबत आल्ह किसून टाकलं आणि उकळी येऊन दिली. चहा गाळून घेतला, चहाचा कप हातात घेऊन खिडकीतून त्या कबूतराच्या जोडीकडे बघत गालातल्या गालात हसत ऋतुराजाच्या या प्रेमळ देखाव्याच्या स्वागतासाठीच जणू मी सज्ज झालो होतो.

आता हा मेघराजा कसं बरसणार, हे दाटलेले आभाळ मोकळे होताना वीज कितीदा धरणीला चुंबनार, आणि कितीदा मखमली जखमा करून सोडून जाणार, या कबूतराची जोडी माझ्या खिडकीच्या आस-याला थांबणार, की अजून कोणता आसरा शोधणार, हा वादळवारा गारवा देणार की डोक्यावरचे छप्पर घेऊन जाणार हे शेवटी प्रश्न ते प्रश्नचं……..चहा संपला आणि शेवटी माझ्याकामाकडे मी वळालो….

© श्री वैभव चौगुले

सांगली

मो 9923102664

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “सहजतेचा आनंद विरळा…” – लेखक : अज्ञात ☆ श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

??

☆ “सहजतेचा आनंद विरळा…” – लेखक : अज्ञात ☆ श्री मोहन निमोणकर

काल, परवाची गोष्ट असावी, मी सकाळी सकाळी आपला भाजी मंडईत भाजी घेत होतो, एवढ्यात अचानक बालपणीचा मित्र भेटला. तीस पस्तीस वर्ष जरी झाले असले तरी चेहेरपट्टीच्या खाणा खुणा तश्याच होत्या.पुढे गळा भेट झाली, समोरच्या टपरीवर चहा पीत पीत, आठवणींच्या हिंदोळ्यावर तास दीड तास कसा गेला ? ते कळलंच नाही पण मोठा आनंद देऊन गेला हे मात्र नक्की 

पुढं मित्र त्याच्या वाटेनं गेला, मी माझ्या वाटेला..

मनी विचार करू लागलो, की खरंच ही अचानक भेट किती आनंद दायी घडून आली…

खरंच आपण बऱ्याच गोष्टी ठरवून करू पाहतो, पण त्या एवढया आनंद देत नाही, जेवढ्या सहज घडून येतात. 

होय आयुष्यातल्या या सहजतेचा आनंदच विरळा..

आता हेच घ्याना, आपल्या ला गाणं ऐकायचा मूड असतो 

मग आपण लगेच मोबाइल मध्ये गाणी शोधतो, अवघ्या जगातील संगीत तिथं उपलब्ध असतांना, आपण मग हे लाऊ की, ते असं करता करता दहा, पंधरा मिनिटं अशी निघून जातात, गाण्याचा मूड ही जातो, मग कुठलं तरी नेहेमीच एकून कानाची  तृषार्तता भागवतो….

आता जरा, आपलं बालपण आठवा, एकच रेडिओ घरी दिवसभर चालू असायचा, कधी कुठलं गाणं लागेल त्याचा ठाव नाही, पण जे लागेल ते आनंदाने ऐकायचो, हा झाला सहजतेचा आनंद…..

आता टीव्ही चं ही घ्या, आपल्या लहानपणी आठवड्यातुन शनिवारी रविवारी एखादा दुसरा सिनेमा लागायचा, पण त्या साठी आठवडा भर उत्सुकता असायची, कारण सहजता असायची, केवढा  मोठा आनंद…..

आज आपल्या टी व्ही वर शेकडो सिनेमा ची चॅनेल आहेत, पण एक सिनेमा आपण धड पाहत नाही, किंवा जाहिराती त्या पाहू देत नाही, प्रचंड उपलब्धतेमुळे त्याचा आनंदच गेला….

तुमच्या आमच्या नाते संबंधाचही तेच, पूर्वी माणसं एक मेकांकडे यायची जायची, सहज एखादा पाहुणा यायचा.. चहा पाणी गप्पा टप्पा व्ह्यायच्या  मनं मोकळी व्हायची 

आता तशी होत नाही, मग आम्ही  कृत्रिम तेचे मित्र सोशल मीडियावर शोधतो, हे असं झालं आमची   भूक तिचं आहे, पण आता त्यासाठी आम्ही  खरं खूर अन्न पाणी न खाता त्याची

चित्र  पाहून भूक भागवण्याचा  प्रयत्न करत आहोत..

लग्न समारंभात आम्ही अचानक पणे भेटतो, गाठी भेटी घेतो, याय जायचं आमंत्रण ही देतो….

अन शेवटी एक वाक्य म्हणतो……

मी तसा रिकामाच आहे…

पण येतांना, एक फोन करून या..

अन तिथंच सहजतेचा आनंद हिरावून बसतो…

 

आता हे झालं बाहेरचं, अगदी आपल्या घरातलं च घ्या 

कुटुंबामध्ये पूर्वी संवाद साधतांना नर्म विनोदी पणा असायचं 

हास्य विलाप व्हायचा, भांडणा तली कटुता त्याने दूर व्हायची. आता अहंकारापायी, मोबाईल मुळे एकमेकांशी बोलनासो झालो, मग खास हसण्यासाठी, पैसे भरून सकाळी सकाळी, हास्य क्लब ला जातो, आणि नैसर्गिक हास्य सोडून, कृत्रिम हास्य विकत घेतो, ते कितपत आनंद देणार, तास दीड तास……..

आता आपल्या खाण्या पिण्याच्या सवयी बघा केवढ्या सहज होत्या, सकाळी न्याहारीला आम्ही  कधी शिळा परतलेला भात, तर कधी  पोळीचा भाकरीचा तिखट चुरमा खायचो  त्यानं आम्हाला कधी ‘ ऍसिडिटी ‘ झाली नाही क्वचित कधी तरी पोहे, उपमा  आम्ही खायचो..असा हलका फुलका नाष्टा घ्यायचो, आता त्याचा ब्रेकफास्ट झाला.. ब्रेड बटर, आम्लेट, पिझ्झा  बर्गर खातो, त्यानं वजन वाढतं.  आता पुढं गम्मत पहा..

 

मग खास पैसे खर्चून जिम लावतो, पायी न जाता महागडी गाडी घेऊन जातो, अन मग तिथं ट्रेंड मिल वर चालू लागतो 

पुढं डाएटसाठी खास कन्सल्टंट चा सल्ला हजार, दोन हजार रुपये देऊन घेतो, अन तो काय सांगतो…

सकाळी हलकं, फुलकं खा….

ही कृत्रिमता आम्ही विकत घेतो, आणि सहजता हरवून बसतो 

 

…… म्हणून म्हणतो मित्रांनो आयुष्यातली सहजता टिकवण्याचा प्रयत्न करा, नैसर्गिकता जपा, कारण   

ठरवून केलेल्या गोष्टी फारसा  आनंद देणार नाहीत…

 

लेखक : श्री सुमंत खराडे

प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ जंगल फार्म आणि स्मार्ट सॉफ्टवेअर ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

🌈 इंद्रधनुष्य 🌈

जंगल फार्म आणि स्मार्ट सॉफ्टवेअर ☆  श्री मकरंद पिंपुटकर

गोष्ट खूप जुनी. २००८ सालापूर्वीची. साल नमूद करायचं कारण म्हणजे २००८ साली भारतात गूगल मॅप पहिल्यांदा अवतरलं, त्याच्या आधीचा हा प्रसंग.

तेव्हाच्या ठाणे जिल्ह्यातील (आताच्या पालघर जिल्ह्यातील) बोर्डी/डहाणूजवळील असवाली येथील सूर्यहास चौधरींच्या “जंगल फार्म” येथील हा प्रसंग thejunglefarm.in

निसर्गाच्या सान्निध्यात, जैवविविधता, पर्यावरण, adventure आणि unlimited धमाल याचं अफलातून मिश्रण म्हणजे “जंगल फार्म”. पैसा फेकून AC खोल्यांमध्ये निव्वळ ऐदीपणे लोळणे याच्यापलीकडे ज्यांची बुद्धी चालते अशांसाठी अप्रतिम पर्वणी.

बार्डाचा डोंगर, असवाली धरण, कोसबाड हिल, बोर्डी – घोलवड – डहाणूचे समुद्रकिनारे आणि खुद्द जंगल फार्मवरील अनेकविध उपक्रम या सगळ्याचा आस्वाद घेण्यासाठी दोन तीन दिवससुद्धा कमी पडतात आणि यासाठी वेगवेगळ्या शाळा कॉलेजांतून, मित्रमंडळासोबत अथवा IT/ अन्य कंपन्यांमधून अनेकजण इथे येत असतात, पुन्हा पुन्हा येत असतात.

या वेळी, एका IT कंपनीतून बस भरून ४०-४५ जण मुंबईहून “जंगल फार्म”ला येत होते. पश्चिम द्रुतगती मार्गाने चारोटी टोल नाक्यानंतर त्यांनी डावीकडे डहाणूसाठी वळण घेतले, पुढे सागर नाक्यापर्यंत आले आणि मग त्यांच्यातल्या एकाने सूर्यहास दादांना फोन लावला. 

“सूर्यादादा, आम्ही सागर नाक्यापर्यंत आलो आहोत, आता डावीकडे वळून “पार नाक्या”ला येतो आणि मग बोर्डीच्या रस्त्याला लागतो,” तो फोन करणारा सांगत होता. 

सूर्यादादाने ते कितीजण आहेत, कसे येत आहेत, बसने येत आहेत म्हटल्यावर बसचा नंबर काय वगैरे माहिती विचारून घेतली आणि मग तो बोलू लागला.

“तुम्ही मला वाटत पहिल्यांदाच येत आहात ना जंगल फार्मला ?” दादाने खात्री करून घेतली, “डहाणू ते बोर्डी साधारण २० किलोमीटर अंतर आहे आणि तिथून आपलं जंगल फार्म आणखी १० किलोमीटर. खरं सांगायचं तर रस्ता थोडा confusing आहे. पण माझ्या एका मित्राने मला एक नवीन सॉफ्टवेअर पाठवले आहे. तुम्ही जर फोन चालू ठेवलात आणि तुमचा मोबाईल डाटा चालू ठेवलात, तर तुम्ही कुठे आहात, आजूबाजूला काय आहे, ते मला इथे माझ्या फोनवर समजू शकतं.”

मुंबईहून येणाऱ्या ITवाल्याचे कान टवकारले. असं काही सॉफ्टवेअर ठाणे जिल्ह्यातल्या आदिवासी दुर्गम भागात राहणाऱ्या माणसाकडे असावं आणि मुंबईत राहणाऱ्या आपल्याला त्याचा थांगपत्ताही नसावा, याचं त्याला अप्रूपही वाटलं आणि वैषम्यही.

“तुम्ही फोन चालू ठेवा,” सूर्यादादा पुढे बोलत होता, “मी जरा ते सॉफ्टवेअर चालतं आहे ना खात्री करून घेतो, म्हणजे कसं यायचं ते मला तुम्हाला सांगता येईल.”

पुढच्या पाच मिनिटात पुढे कसं यायचं ते सूर्यादादा मुंबईच्या ग्रुपला सांगत होता. बस कितीही वेगात धावली किंवा तिची गती कमी झाली, तरी सूर्यादादांच्या सांगण्यातले landmarks चुकत नव्हते. 

पुढे सहज सांगताना जेव्हा दादाने “जरा म्हशींचा घोळका येत आहे, सांभाळून हां” किंवा “तुमच्या मागून स्कूल बस येत आहे” अशा बारीक सारीक खाणाखुणाही सांगितल्या, तेव्हा बसमधल्या समस्त मुंबईकरांसी अचंबा जाहला.

पाऊण एक तासानंतर बस असवाली धरणाजवळील कच्च्या रस्त्यावरून “जंगल फार्म”च्या रस्त्याला लागली, आणि गेटमधून आत वळली. सूर्यादादाचा फोन चालूच होता, त्यामुळे हा सगळा प्रवास निर्धोक निर्वेध पार पडला. 

सगळे जण उतरले, बसमधून सामान काढायला लागत होते, तेवढ्यात सूर्यादादा एका गाडीतून बसपाठोपाठ “जंगल फार्म”मध्ये शिरला. 

बसमधल्या माणसाने त्याचा कॉल कट केला आणि तो सूर्यादादांना भेटायला धावला. त्याला ते सॉफ्टवेअर बघायचे होते, समजावून घ्यायचे होते. 

सूर्यादादा त्याला भेटले आणि म्हणाले, “तुम्ही एवढ्या दुरून मुंबईहून आले आहात, दमला असाल, हात पाय तोंड धुवून घ्या, फ्रेश व्हा, चहा पिताना निवांत बोलू.”

हातात चहाचा कप घेतल्याघेतल्या तो फोनवरचा माणूस दादाच्या खनपटीला बसला, “दादा, हे कसं काय तुम्ही केलंत ते सांगा ना. म्हणजे बस कुठे आहे, कुठे वळायचं, एवढंच नाही तर मागेपुढे म्हशी आहेत, शाळेची बस आहे हे सगळं सगळं तुम्हाला कळत होतं. कोणतं सॉफ्टवेअर आहे ते सांगा तरी आम्हाला. तुम्ही आम्हाला ते विकू शकाल का ?” वगैरे वगैरे. 

चहा पित, मिश्किल हसत सूर्यादादा म्हणाला, “माझं secret मी तुम्हाला सांगतो, पण त्याआधी मी तुमची सगळ्यांची माफी मागतो. 

असलं कुठलं सॉफ्टवेअर माझ्याकडे नाही. अहो, तुमची बस डहाणूला सागर नाक्याला होती, तेव्हा तुमच्या मागोमाग माझी गाडी होती. त्यामुळे कुठे वळण आहे, मागेपुढे कोण आहे हे मला प्रत्यक्ष दिसत होतं आणि मी तुम्हाला तसं सांगत होतो. बाकी ते मोबाईल डाटा चालू ठेवा – सगळं उगाच बनवाबनवी होतं.”

बसमधल्या IT तज्ञांनी कपाळावर हात मारला. सूर्यादादांनी त्यांना सहजी गंडवलं होतं. 

“अर्थात, हे असं नकाशा दाखवणारं सॉफ्टवेअर पुढेमागे येईलही कदाचित,” दादा गंभीरपणे सांगत होते.

“गूगल मॅपच्या रूपाने आता तसं ॲप आलं आहे खरं, पण मागच्यापुढच्या म्हशी ओळखता येण्याची सोय अजूनही गुगलचे सर्वेसर्वा सुंदर पिचाई करू शकले नाहीयेत,” जंगल फार्मची धुरा आता समर्थपणे पेलणाऱ्या आपल्या मुलाला – तपन (8830262319) ला ही जुनी आठवण सांगताना, डोळे मिचकावत सूर्यादादा सांगत होते.

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ क्रांतिकारक दामोदर हरी चापेकर — लेखक : श्री संतोष भोसेकर ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? इंद्रधनुष्य ?

☆ क्रांतिकारक दामोदर हरी चापेकर — लेखक : श्री संतोष भोसेकर ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे

(प्रखर राष्ट्रभक्ती आणि शौर्याचा मूर्तिमंत अवतार असलेले क्रांतिकारक दामोदर हरी चापेकर) 

भारताच्या स्वातंत्र्यासाठी एकाच घरातील तीन भावंडांनी आपली शिर कमले भारतमातेच्या चरणी अर्पण केली.  जुलमी इंग्रज अधिकारी  रँडचा वध करणारे मोठे बंधू दामोदर हरी चापेकर यांना १८ एप्रिल १८९८ रोजी फाशी देण्यात आले.

हरिकीर्तनकारांच्या घराण्यात जन्मलेले दामोदरपंत, बाळकृष्ण आणि वासुदेव हे तिघे बंधू . बालपणापासूनच त्यांना व्यायामाची आवड होती .त्यांच्यावर लोकमान्य टिळकांचा प्रचंड प्रभाव होता. तिघेही बंधू हरिकीर्तनात वडिलांना मदत करीत असत. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे गाऊन लोकांमध्ये क्रांतीसाठी स्फूर्ती घडवीत. मुलांना कवायत शिकवीत. व्यायामाचे महत्त्व पटवून देत असत.

१८९७ मध्ये प्लेगची साथ सुरू झाली. त्यावेळी इंग्रजांनी पुण्यात प्रचंड अत्याचाराचा हैदोस मांडला होता. पुण्याचा कलेक्टर रँड हा अत्यंत क्रूर होता. पुण्यातील नागरिकांवर प्रचंड अत्याचार करू लागला. अत्याचारी रँड विषयी चापेकर बंधूंच्या मनात प्रचंड चीड निर्माण झाली. त्या अत्याचाराचा सूड घेण्यासाठी दामोदरपंतांनी रँडच्या वधाची योजना आखली.

२२ जून १८९७ या दिवशी पुण्यातील गणेश खिंडीत एका कार्यक्रमाहून परतत असताना उन्मत रँड आणि आयस्टर या दोघांना गोळ्या झाडून वध केला. द्रविड बंधूंच्या फितुरीमुळे दामोदर पंतांना पकडले आणि त्यांना पुण्याच्या येरवडा तुरुंगात आजच्या दिवशी फाशी देण्यात आले. तीनही बंधू अत्यंत धैर्याने फासावर चढले. या सशस्त्र क्रांतिकारकांचा इतिहास अजरामर आणि प्रेरक आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांच्यावर जहाल असा पोवाडा रचला.

स्वार्थ मारुनी लाथ; ठोकिला रँड जनछळ शमनाला l

परार्थसाधू श्री चाफेकर योग्य का न  ते नमनाला ll

पराक्रमाच्या तेजा तुमच्या त्रासुनि निंदिती जरि घुबडे l

वीर कथा तुमची ही गाईल पिढीपिढी नव पुढे पुढे ll

दामोदर चाफेकर फासावर गेले त्यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलेले वर्णन..

न्यायाधीश हा जोशी उत्तम उदय मुहूर्ता योग्य गणी l

सत्य देशहित वऱ्हाड जमले कीर्ती नीति ह्या वऱ्हाडणि l

टिळक गजानन नमस्कारिला फास बोहले मग पुरले l

स्मरले गीतमंत्र दामूने मुक्ती- नवरीला हो वरिले l

परी अहाहा! मायावी ही नवरी वर पळवील कुठे l

कुठे हरपले वऱ्हाड सारे अंगाला  बहु कंप सुटे !

भारतमातेला सुद्धा या शूर अशा तीन बंधूंचा अभिमान वाटला असावा. जगाच्या इतिहासातील हे एकमेव उदाहरण आहे.        

क्रांतिकारक दामोदर हरी चाफेकर यांच्या पराक्रमाला वंदन.

लेखक : संतोष भोसेकर

प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ कोण गोंदवलेकर? … – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

कोण गोंदवलेकर? – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर 

माझा एक वाहनचालक मित्र एकदा मोटार बिघडल्याने ती दुरुस्त करण्यासाठी एका गॅरेजमध्ये गेला. ती वस्ती तशी टपऱ्याटपऱ्यांचीच होती.

गाडी दुरुस्त व्हायला वेळ होता म्हणून तो दुकानासमोरच्या चहाच्या टपरीत गेला. कळकट लाकडी बाकं, तीच रया गेलेली टेबलं. चहा पिता-पिता त्याचं लक्ष गल्ल्यावर बसलेल्या मालकाकडे गेलं. काळासावळा असा तो तिशीतला तरुण होता.

मग सहज गल्ल्यामागे भिंतीवर लक्ष गेलं आणि माझ्या मित्राला सुखद आश्चर्याचा धक्काच बसला.

भिंतीवर श्रीगोंदवलेकर महाराजांची तसबीर होती.

 

चहा पिऊन झाल्यावर तो गल्ल्याशी आला आणि पैसे देता देता त्यानं विचारलं,

‘‘तुम्ही गोंदवल्याला जाता काय?’’

त्या मालकानं रूक्षपणे विचारलं, ‘‘ये गोंदवले क्या है?’’

 

आता माझ्या मित्राला अधिकच आश्चर्य वाटलं.

त्यानं तसबिरीकडे बोट दाखवत विचारलं,

‘‘यांचं नाव तुम्हाला माहीत नाही?’’

तो म्हणाला,

‘‘नाही.’’

 

मित्राला वाटलं, आधीच्या मालकानं ही तसबीर ठेवली असावी आणि ती यानं काढली नसावी.

म्हणून त्यानं विचारलं, ‘‘मग ही तसबीर इथं कोणी लावली?’’

तो मालक थोडं हळूवारपणे म्हणाला,

‘‘मीच!’’

 

‘ज्या माणसाला गोंदवले माहीत नाही,

गोंदवलेकर महाराज माहीत नाहीत,

त्यानं त्यांची तसबीर आपल्या दुकानात गल्ल्याच्या मागे पूजास्थानी का लावावी?’

हा प्रश्न माझ्या मित्राला पडला आणि त्यानं आश्चर्यभरल्या स्वरात विचारलं,

‘‘मग ही तसबीर तुम्ही इथे का लावलीत?’’

 

त्याचं जे उत्तर आहे ते सर्वच साधकांनी हृदयात साठवून ठेवावं, असं आहे!

 

त्यानं आपली जीवनकहाणीच माझ्या मित्राला सांगितली. जन्मापासून त्याला आपल्या आईबापाचा पत्ता माहीत नव्हता.

कळू लागलं तेव्हापासून तो रस्त्यावरच वाढत होता. खरंच त्या बालपणाची आपण कल्पनाही करू शकत नाही. कुणी दिले तर कपडे होते, कुणी दिलं तर खाणं होतं.. राहणं, झोपणं सारं रस्त्यावरच.

लहान पोराची दया येते, वय वाढू लागलं तसा तो अवचित दयेचा ओघही आटला.

मग चोऱ्यामाऱ्या सुरू झाल्या.

वाढत्या वयानं व्यसनंही शिकवली. त्या व्यसनांच्या धुंदीचीच काय ती जवळीक होती. चोरी करावी, मारामाऱ्या कराव्यात, व्यसनं करावीत, असं आयुष्य सरत होतं. आयुष्य दिशाहीन होतं आणि आयुष्याला काही दिशा असावी, याची जाणीव परिस्थितीही होऊ देत नव्हती.

 

एकदा रात्री दारूच्या नशेत तो रस्त्याच्या कडेला कोसळला होता. सकाळी वाहनांच्या आणि पादचाऱ्यांच्या पावलांच्या आवाजानं जाग आली.

 

सहज त्याचं लक्ष पदपथावरच्या झाडाच्या तळाशी गेलं. तिथं कोणीतरी श्रीगोंदवलेकर महाराजांची त्याच्या शब्दांत सांगायचं तर ‘या बाबाची’ ही तसबीर ठेवली होती.

 

डोळे चोळत त्यानं काहीशा कुतूहलानं ती तसबीर हाती घेतली आणि तसबिरीतल्या ‘बाबा’ कडे नजर टाकली.

 

त्याच्याच शब्दांत पुढची कहाणी सांगण्यासारखी आहे.

तो म्हणाला, ‘‘मी तसबीर उचलली आणि या बाबाकडे पाहिलं.

या बाबानं माझ्याकडे इतक्या करुणेनं आणि दयामय दृष्टीनं पाहिलं की तसं कोणीही कधी पाहिलं नव्हतं.

 

या जगात माझं कोणीतरी आहे, या जाणिवेनं मी हेलावलो.

ती तसबीर छातीशी धरून खूप रडलो.

माझं कुणीतरी या जगात मला भेटलं होतं!

 

मग मी पदपथावर जिथं पथारी टाकत असे तिथं ही तसबीर लावली.

 

त्यानंतर दिवसागणिक आश्चर्यच घडू लागलं.

 

रात्री निजण्याआधी तसबिरीकडे पाहिलं की मला वाटे, आज मी चोरी केलेली या बाबाला आवडलेली नाही.

 

मी फार अस्वस्थ होई. मग हळूहळू मी चोऱ्या करणं सोडलं. मग कधी तसबिरीकडे पाही, तेव्हा जाणवे, मी दारू पितो हे या बाबाला आवडत नाही.. मग दारू सुटली.

असं करता करता सारी व्यसनं सुटली. मारामाऱ्या थांबल्या. शिवीगाळ थांबली.

मग मी छोटीमोठी कामं करू लागलो. कष्टाचे पैसे जमवू लागलो.

या बाबाच्या चेहऱ्यावर रोज वाढता आनंद दिसत होता. असं करत करत या टपरीपर्यंत मी आलोय.”

 

माझ्या मित्राचाही ऊर भरून आला.

तो म्हणाला, ‘‘अरे हे सारं खरं, पण ही यांची जागा नाही. त्यांना अधिक चांगल्या जागी ठेव.’’

 

तो पटकन म्हणाला, ‘‘ते मला माहीत नाही. जिथं मी आहे, तिथं हे असणारच आणि जिथं ते आहेत, तिथं मी असणारच!’’

 

मला सांगा. आपल्याला गोंदवलेकर महाराज कोण, श्री स्वामी समर्थ कोण, साईबाबा कोण, गजानन महाराज कोण हे माहीत आहे.

त्यांचे चमत्कार, त्यांचा बोध सारं माहीत आहे.

तरी आपल्यात पालट होत नाही.

 

आणि त्यांचं नाव-गाव काही माहीत नसताना केवळ त्यांच्यावरच्या निस्सीम प्रेमामुळेही अंतरंगातून बोध होत जातो,

आणि त्यानं जीवनाला कलाटणी मिळते, ते पूर्ण पालटू शकतं!

याचं याइतकं दुसरं उदाहरण माझ्या तरी पाहण्यात नाही.

 

त्या टपरीला भेट दिली तेव्हा त्या टपरीत आणि त्या चहावाल्याच्या डोळ्यांत मला गोंदवल्याच्या दर्शनाचंच समाधान मिळालं.

 

तेव्हा सद्गुरू सगुण देहात नसले तरी ते बोध करतात.

 

आणि त्या बोधाचं पालन हीच खरी नीती.

 

कारण जीवनातली सर्व अनीतीच ती थोपवते!

लेखिका : अज्ञात 

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ माती सांगे कुंभाराला… कवी मधुकर जोशी ☆ रसग्रहण.. श्री प्रसाद जोग ☆

श्री प्रसाद जोग

? काव्यानंद ?

☆माती सांगे कुंभाराला… कवी मधुकर जोशी ☆  रसग्रहण.. श्री प्रसाद जोग ☆

जीवनाचे अंतिम सत्य सांगणाऱ्या  माती सांगे कुंभाराला या मधुकर  जोशी यांच्या गीताविषयी :

संत कबीरांच्या “माटी कहे कुम्हार को” या भजनावरून. मधुकर जोशी  यांना जे गाणे सुचले. त्याला श्री. गोविंद पोवळे यांनी सुंदर  चाल लावून म्हटले आहे.

माती सांगे कुंभाराला पायी मज तुडविसी

तुझाच आहे शेवट वेड्या माझ्या पायाशी !

जेव्हा एखादा कुंभार मातीची भांडी बनवत असतो त्यावेळेस त्याआधी तो त्या मातीला तुडवून घडण्या योग्य बनवत असतो. त्यानंतर तिला फिरत्या चाकावर ठेवून आपल्या हातांनी आकार देण्यास सुरुवात करतो. कालांतराने ती माती एका सुंदर वास्तूच्या रुपात सगळ्यां समोर येते. सगळे तिच कौतुक करू लागतात आणि  त्याच वेळेस त्या मातीला आकार देणाऱ्या कुंभाराचा अहं देखील हळूहळू वाढू लागतो. या सगळ्याचा कर्ता “मी” आहे ही भावना दिवसेंदिवस त्याच्या मनात रुजू लागते आणि त्याच वेळेस त्याच्या अहंकाराच्या फुग्याला वेळीच फोडण्यासाठी कवी त्याला .वरील ओळींच्या माध्यमातून  सावध करण्याचा प्रयत्न करतो आहे. थोडक्यात तो परमेश्वर / निसर्ग माणसाला वेळोवेळी अप्रत्यक्षपणे सूचित करीत असतो की तू कितीही फुशारक्या मारल्यास, कितीही यश मिळवलेस, तरी तुला या सगळ्याचा त्याग करून माझ्यातच समाविष्ट व्हायचे आहे.

मला फिरविशी तू चाकावर

घट मातीचे घडवी सुंदर

लग्‍नमंडपी कधी असे मी, कधी शवापाशी !

या ओळींमध्ये मातीच्या माध्यमातून कवी सुचवतो की, कित्येक वेळेस ज्ञानाच्या जोरावर आपल्या इच्छाशक्तीने तू काही काळापुरता जय मिळवतोस आणि समजतोस की हेच अंतिम सत्य आहे.पण प्रत्यक्षात मी अनादी अनंत आहे.  एखादवेळेस तुझ्या लग्न मंडपात असणारा मी उद्या तुझ्या शवापाशी देखील असणार आहे.

वीर धुरंधर आले, गेले

पायी माझ्याइथे झोपले

कुब्जा अथवा मोहक युवती, अंती मजपाशी !

या ओळींमधून कवी  माणसाला आठवण करून देतो कि, जसा आज तू स्वतःला कर्ता समजत आहेस तसेच यापूर्वीही अनेक जण होऊन गेले आहेत. अनेकांनी अनेक राज्ये स्थापिली, अनेक मान सन्मान मिळवले, अनेक पराक्रम गाजवले पण शेवटी त्यांना देखील माझ्यातच विलीन व्हावे लागले. माझ्या दृष्टीने सगळेच समान आहेत. मी कुणातही भेदाभेद करत नाही. माझा न्याय हा सगळ्यांसाठी सारखाच आहे. ज्यावेळेस तुमची माझ्यात विलीन होण्याची वेळ येते त्यावेळेस मग ती व्यक्ती कुरूप असो वा रुपगर्विता, राजा असो वा पराक्रमी सरदार… या गोष्टींचा माझ्यावर काहीही परिणाम होत नाही.

गर्वाने का ताठ राहसी ?

भाग्य कशाला उगा नासशी ?

तुझ्या ललाटी अखेर लिहिले मीलन माझ्याशी !

या कडव्यात कवी माणसाला सांगतो, उगाच वृथा अभिमान बाळगून का राहतोस? या गर्वाचा काहीही उपयोग होत नाही. झाला तर फक्त तोटाच होईल. एक लक्षात ठेव शेवटी  तुला माझ्यातच विलीन व्हायचे आहे. त्यांमुळे गर्व सोड

मनुष्य स्वभावर भाष्य करणारे मधुकर जोशी यांचं हे गाणं ऐकून सारेच अंतर्मुख झाले असतील .

मधुकर जोशी यांना विनम्र अभिवादन.

©  श्री प्रसाद जोग

सांगली

मो ९४२२०४११५०   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “चला आजोळी जाऊया!…” ☆ सौ. रेणुका धनंजय मार्डीकर ☆

सौ. रेणुका धनंजय मार्डीकर

🌸 विविधा  🌸

☆ चला आजोळी जाऊया!सौ. रेणुका धनंजय मार्डीकर 

☆ चला आजोळी जाऊया! ☆

“माझ्या मामाची रंगीत गाडी हो

त्याला खिल्लाऱ्या बैलाची जोडी हो

कशी दौडत दौडत येई हो

मला आजोळी घेऊन जाई हो

    नाही बिकट घाट

    सारी सपाट वाट

मऊ गालीचे ठायी ठायी हो”

आजोळ!!

किती प्रेम, किती जिव्हाळा आहे ना या शब्दामध्ये. ग. ह. पाटलांची ही कविता ऐकली की परत एकदा फिरून आजोळी जावसं वाटतं. आजोळ म्हणजे प्रत्येकाच्या आईचं माहेर. मुलं जेव्हा लहान असतात तेव्हा शाळेला कधी एकदा सुट्टी लागते आणि आपण आजोळी जातो अशी ओढ या बाल मनाला लागलेली असते. ही ओढ अजोळामध्ये मिळणाऱ्या प्रेमामुळे, लाडामुळे, आपुलकीमुळे असते.

माझी मुले छोटी होती तेव्हाची एक गोष्ट आठवते. दोन्ही मुलं रोज शाळेला स्कूल बसने जायची. स्कूल बसमध्ये एक शाळेतलाच माणूस मुलांना सोडायला यायचा. शेवटच्या दिवशी त्याने माझ्या मुलांना विचारले,

“अरे बच्चों, इस बार कहॉं जानेवाले हो छुट्टीयोंमे?”

त्यावर माझ्या छोट्या मुलाने क्षणभरही विचार न करता पटकन उत्तर दिले होते,

“मायके”

सगळेजण त्याच्या उत्तराने हसू लागली आणि त्याला विचारू लागली,

“अरे, किसके मायके जाने वाले हो?”तेव्हा देखील तो धीटपणे म्हणाला.

“मम्मी के मायके जानेवाले हैं।”

तेव्हा तो अगदी छोटा होता. दुसरीच्या वर्गात. पण तेव्हा मुलांना माझ्यापेक्षाही आधी आजोळी जायची ओढ असायची.नातवाला आजोळ विषयी वाटणारी ओढ किती छान काव्यरूप केली आहे बघा ग. ह. पाटलांनी.

“कोण कानोसा घेऊन पाही हो

कोण लगबग धावून येई हो

गहिवरून धरून पोटी हो

माझे आजोबा चुंबन घेती हो

    लेक एकुलती

    नातू एकुलता

किती कौतुक कौतुक होई हो”

आजोळी इसाई देवीच्या यात्रेला जाताना,महानंदीने छान शाकारलेल्या, त्यावर ताडपत्रीचे छत घातलेल्या बैलगाडीला चंगाळ्या(पितळी घुंगरांच्या गळ्यात घातलेल्या माळा) गळ्यात घालून जेव्हा लाल्या- झुब्या जुंपले जायचे, तेव्हा त्यांच्या दुडक्या चालीने चालताना बैलगाडीमध्ये बसणाऱ्या माणसांना आणि मुलांना जी मजा यायची ती दुसऱ्या कुठल्याही गाडीमध्ये येणार नाही. यात्रेत जाऊन आजोबांच्या मागे लागून लागून प्रत्येक रहाट पाळण्यात बसायचे. आजोबांनी मात्र ‘जावयाचं पोरं’ म्हणून काळजीने आणि ‘लेकीचे लेकरू’ म्हणून दुधावरच्या साईच्या प्रेमाने त्याचे सगळे लाड पुरवायचे.

चिंचेच्या दिवसात अंगणात पन्नास पोते चिंच येऊन पडायची. ती फोडण्यासाठी अंगणभर छत केलं जायचं आणि सगळी गल्लीतील मुलं, मुली, बायका येऊन चिंचा फोडायला बसायचे. नातवांसाठी तर हे औषधचं. आजीच्या मागे लागून हळूच चिंचेचे चोकणे करून घ्यायचे. आईला नकळत गुपचूप ते गट्टम देखील करायचे.

आंब्याच्या दिवसातली मजा तर काही औरचं. आढीतले पिकलेले आंबे टोपलं भरून आजोबांनी काढून आणायचे. नातवांना अंगातले बनियन सुद्धा काढून टोपल्या भोवती बसवायचे आणि मग बाळकृष्ण जसा लोणी खाताना सगळ्या अंगावर लोणी सांडायचा तसे हे दोन नातू आंबे खाताना सगळ्या अंगावर आंब्याचा रस सांडायचे. काय गोड चित्र असायचं ते.

आमच्या आजोळची दिवाळी अजूनही आठवते. दिवाळीत जवळजवळ पन्नास माणसं आजोबांच्या घरात असायची. घरामध्ये सगळ्या आज्ज्या, माम्या, मावश्या, आई सर्वजण मिळून कामं करायची. पाहुणे आलेत म्हटलं की कुठे ऑर्डर द्यायला जायची वेळ यायची नाही. सगळ्याजणी मिळून साग्रसंगीत स्वयंपाक बनवायच्या. गोड पदार्थ करताना तर आजोबा स्वतः होऊन हातभार लावायचे.पन्नास माणसांसाठी फ्रुटसलाड केलेलं मला आठवतं एक मोठा पाण्याचा बंब भरून सर्व फळे, ड्रायफ्रूट्स एकत्र करून, दूध घालून हलवत असलेले आजोबा अजूनही आठवतात. चुलत, मावस, सख्खे असा काहीही भेदभाव तेव्हा नसायचा. सर्वजण एकत्र येऊन अगदी गुण्यागोविंदाने रहायचे. कारण घराची सत्ता ही एका कर्त्या पुरुषाकडेच असायची त्यामुळे घरे एकसंध होती. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहणाऱ्यांना आजोळचा आनंद माहिती असणार.

माझ्या आईच्या आजोळच्या आठवणी ती मला सांगते. तिच्या सगळ्या मावश्यांची मुलं, मामांची मुलं, आणि माझ्या आईची भावंड सगळी उन्हाळ्यात एकत्र आजोळी जायची. ती सर्व मिळून पंधरा वीस जण व्हायची. एवढ्यांना मेजवानी खाऊ घालण्यासाठी माझ्या आईचं आजोळ काही श्रीमंत नव्हतं पण प्रेमळ होतं. तिची आजी रोज सकाळी सकाळी गरम गरम वरण, भाकरी सगळ्या नातवंडांना खाऊ घालायची आणि आई सांगते, “आजीच्या हातची गरम गरम वरण भाकरी त्यासोबत एक लिंबाच्या लोणच्याची फोड आणि त्यानंतर वाचायला मिळणारा गावकरी हा पेपर म्हणजे आमच्यासाठी (आईसाठी) स्वर्गसुख होतं.” आजच्या काळातल्या मुलांना रूचेल का हो ही सुखाची कल्पना?

आम्ही आजोळी गेलो की सर्वांना मदत करू लागायचो. पडतील ती कामे करायचो. आताच्या पिढीच्या सुखाच्या कल्पनाच बदलल्या आहेत. फोरव्हिलर मध्ये सुद्धा आताच्या सुखासीन झालेल्या मुलांना थोडीशी अडचण झाली तर सहन होत नाही. मग ती बैलगाडी मध्ये कशी काय बसणार त्यामुळे आपोआपच बैलगाडी संपुष्टात येऊन तिची जागा ट्रॅक्टरने घेतली आहे. काळाचा महिमा अजून काय…

मी लहान असताना आमच्या घरी तर उन्हाळ्यात असंख्य नातलग

यायचे. शेतात आमराई त्यामुळे घरात आंबेचं आंबे. माझ्या बाबांचे सख्खे, चुलत, सावत्र, आते, मामे, मावस, सगळी भावंडे यायची आणि भाच्चे,भाच्च्या देखील यायच्या. सर्वजण मिळून रहायची, खायची, धमाल करून जायची. सर्वांसाठी खुलं असलेलं माझ्या आई बाबांचं घर. माझ्या आत्याची मुलं तर माझ्या आई बाबांनी स्वतःच्या मुलांसारखी सांभाळली. प्रेम होते म्हणून आपुलकी होती. आपुलकी होती म्हणून आजोळ होतं आणि आहे.

आज जरी विभक्त कुटुंब पद्धती झाली असेल तरी देखील खूप ठिकाणी अजूनही आजोळचं प्रेम पाहायला मिळतं. माझ्याच घरी माझ्या सासूबाई वारल्या, सासरे आता थकले आहेत. पण सर्व नातवंडांसाठी,भाचऱ्यांसाठी आणि नातलगांसाठी माझं घर स्वागताला नेहमी आतुर असतं. सर्वजण येऊन राहतात भरभरून आनंद घेतात.

“आनंदाचा गोड ठेवा

आजोळच्या आठवणी

चला आजोळला जाऊ

भेटे सुखाची पर्वणी

*

आजी आजोबाची माया

भेटे तिथे गेल्यावर

आशीर्वाद खूप सारे

आणि प्रेम निरंतर”

 © सौ.रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ।माझी मी। — ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? मनमंजुषेतून ?

माझी मी। — ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

माझ्याकडे पोळ्या करणाऱ्या सुरेखा बाई चार दिवस आल्याच नाहीत. निरोप नाही काहीच नाही.मी अगदी वैतागून गेले.आता जर आल्या नाहीत तर मात्र घरी जाऊन बघून यायचे असं ठरवत होते मी. सकाळीच गेट वरची बेल वाजली. खिडकीतून बघितलं तर दोन मुली उभ्या होत्या.” बाई , सुरेखाबाई पडल्या,त्यांना

लागलंय. त्या येनार नाहीत कामाला !”  “ हो का?मग तू कोण आहेस? “ “ मी सून आहे त्यांची  कांता माझं नाव. “  .” वर या ग दोघी जरा!” .. मी त्यांना घरी बोलावलं. कांता अगदी साधी,जरा खेडवळच वाटली मला.

“ कांता,मग तू का नाही येत माझ्याकडे ग? कर की पोळ्या. त्या येत नाहीत तर तू ये ना! “ ती घाबरून म्हणाली, “ बया! मी नाही यायची ! “ “ अग पण का?मी तुला पगार देईन ना ! “ “ बाई, मिष्टर दारू  पितो माझा आणि संशोव घेतो वो.  मागं मागं येतो. मला लै भीति वाटती त्याची.” मी म्हटले “ असं नको करू

कांता. तुलाही नाही का  वाटत गं,आपल्याला चार पैसे मिळावेत? “ “  वाटतं ना बाई.  पण काय करू?चांगली दहावी पर्यंत शिकलेली आहे मी बाई. हाही बारावी झालाय पण दारूने सगळं बिघडत

गेलं. लग्नात नव्हता हो असा. पण वाईट मित्र भेटले आणि हा गेला वाहवत !  आता तर घरीच बसतो आणि काहीच काम करत नाही हो बाई . मी काम लावून दिलं तर चार दिवस पण नाही धड गेला.”  

कांताच्या डोळ्यात अश्रू होते. तिने थोडा विचार केला आणि म्हणाली,” बाई,मी लवकर सकाळी तो उठायच्या आत येऊन जाऊ का?  म्हणजे सातला ? चालेल का? करून बघते काय होतं ते.”  मी म्हटलं “ चालेल की अग. कशाला अवलंबून राहतेस ग त्या नवऱ्यावर? रहा की पायावर उभी. येतात ना पोळ्या भाकरी करता?” ती हसली.. म्हणाली “ तर वो. न यायला काय झालंय? येते उद्या.”  मला अगदी हायसं झालं.

दुसऱ्याच दिवशी सकाळी सातच्या आतच कांता आली. मी तिला सगळं दाखवलं. कांताने छान केल्या पोळ्या.पटापट आवरून ती गेली सुद्धा. एकही दिवस खाडा न करता  कांता येऊ लागली. आधी न बोलणारी कांता आता खुशाल गप्पा मारू लागली.कित्ती बडबडी होती ती. माझ्या नवऱ्याला म्हणायची  

 “ दादा,मधेमधे येऊ नका. मी देते आणून चहा तुमच्या खोलीत. बसा पेपर वाचत.” 

त्यांनाही प्रेम लागलं तिचं.  म्हणाले “ ससूनला नोकरी करतेस का कांता.?देतो लावून आया म्हणून.” 

तर म्हणाली “ या बया नको. लै घाणीचं काम ते . मला घाण वाटती.आणि रोज कोण जाणार ससूनला?मला लै भीती वाटती बया! मला नको रे बाबा.” आम्ही सगळे हसलो मग.

धाकट्या मुलीला म्हणायची”,ताई,पोळ्या शिका बरं का माझ्याकडून. बाईच्या जातीला सुटका नाही.तुम्ही किती पगार मिळवला तरी लग्न  झाल्यावर कुठे होतेय सुटका स्वयंपाकातून.  त्यातून तुम्ही  लै शिकलेल्या मुली. मिळाला नवरा अमेरिकेचा की सगळं करावं लागेल स्वतः . तिकडे बाया मिळत नाहीत ना म्हणे? ” कांताकडून माझी मुलगी पोळ्या भाजी सगळं शिकली. तिच्या कलाकलाने घेत कांताने तिला छान तयार केली  .माझ्याकडून मी हजार वेळा सांगून सुद्धा “ तू ओरडतेस मला ! नको जा शिकवू मला तू “ असं मला म्हणणारी माझी मुलगी निमूट शिकली सगळं कांताकडूनच !  अगदी तिच्या पद्धतीचं गावरान चिकन सुद्धा.  कांता माझी अत्यंत लाडकी झाली. मी तिला पगार वाढवला आणि सगळा आपल्या पद्धतीचा स्वयंपाक शिकवला .कांताला आणखीही कामं आमच्याच सोसायटीत लागली. 

एक दिवस म्हटलं ” काय ग कांता,आता नाही का  मिष्टर संशय घेत आणि मागं मागं येत?” 

ती म्हणाली “ हॅट! तो काय येतोय? असा झाडला त्याला एक दिवस बाई मी ! म्हटलं दारू पितोस

आणि वर रुबाब करतोयस होय रे? पैसा मिळवून आण आणि मगच बोल.”  गप बसला मग. हुशार आहे

हो ,पण या दारूने घात केलाय बघा.” 

आता कांता मस्तच रहायला लागली. आधीचं खेडवळ ध्यान आता पूर्ण बदललं. आम्ही दिलेल्या साड्या मस्त पिन अप करून ऐटीत येऊ लागली ती.  मला अतिशय कौतुक कांताचं.   तिचंही माझ्यावर खूप प्रेम. इतर  मालकिणी हेव्याने म्हणतात .. हो! त्या डॉक्टर बाईंकडे जायचं असेल आधी.आमच्याकडे उशीर करतेस कांता हल्ली!’ ती म्हणते ‘ हो मग.माझं पहिलं काम आहे ते. किती प्रेम करतात माझ्यावर

त्या. करणारच मी त्यांचं काम आधी .नसेल पटत तर बघा दुसरी बाई!’  बिचाऱ्या गप्प बसतात कारण हिच्यासारखी बाई मिळणार नाही हे पक्के माहीत आहे त्यांना.  

मध्यंतरी  कांताच्या नवऱ्याला खूप बरे नव्हते. हिने त्याला ऍडमिट केलं,त्या डॉक्टरला सगळी कथा

सांगितली. त्याने हिच्या नवऱ्याला चांगला दम भरला आणि म्हणाला दारू सोडली नाहीत तर दोन वर्षात मरालच तुम्ही.’ पुन्हा मी तुम्हाला ऍडमिट करणार नाही.हे शेवटचं!” 

काय आश्चर्य.त्या दिवसापासून त्याची दारू सुटली हे कांताचं भाग्यच म्हणायचं. त्याला शिपायाची नोकरी पण लागली एका शाळेत. खूप छान झालं मग कांताचं. हळूहळू त्यांनी होत्या त्या जागेत छानसं तीन

खोल्यांचं घर बांधलं.  हौसेने छान भांडी घेतली ,बसायला सोफा घेतला. एका मालकीणबाईकडून त्यांचा जुना पण छान अवस्थेतला फ्रीज घेतला. आम्हाला सगळ्याना  कांताचं अतिशय कौतुक आहे. माझ्या मुली परदेशातून आल्या की आठवणीने कांतासाठी मुद्दाम खूप छान उपयोगी वस्तू घेऊन येतातच. माझ्या बहिणींची पण  कांतावर माया आहे.त्या आल्या की कांता मस्त चहा करते ,त्यांच्याशी गप्पा मारते. बहिणीने तिच्या मुलाच्या लग्नात  कांताला आवर्जून बोलावलं होतं. तीही ऐटीत सुंदर साडी नेसून आली होती. 

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी लेकीच्या बाळंतपणासाठी अमेरिकेला  सहा महिने गेले होते. घर बंद होतं म्हणून काय अवस्था झाली असेल ही चिंता होतीच मनात. मी येण्याच्या आधी एक आठवडा कांताला फोन केला. ‘ मी अशी अशी या तारखेला येतेय.’  मुंबई एअरपोर्टला पोचल्यावर परत तिला फोन केला .मी पुण्याला सकाळी 6 ला पोचले. लॅच उघडून बघते तर काय… कांताने आमच्या कामवाल्या मावशीकडून सगळं घर सुंदर आवरून चकाचक करून घेतलं होतं.  बेडशीट्स बदललेली, बाथरूम्स स्वच्छ  केलेल्या,  फर्निचर झकास पुसलेलं ,फ्रीज मध्ये दूध,टोस्ट ब्रेड दही बिस्किटे आणून ठेवलेली. गॅसखाली चिट्ठी… ‘ मी बारा वाजता येतेय.’ माझ्या डोळ्यात पाणीच आलं बघा. 

बारा वाजता कांता मला पोळी मटकीची उसळ भात असा घरून डबा घेऊन आली. किती कौतुक वाटलं मला तिचं. गहिवरून आलं मला. कोण करतं हो इतकं ? पण ही मुलगी वेगळीच आहे. 

मध्ये माझ्या मैत्रिणींना मी घरीच पार्टी दिली. कांताला मदत करायला चारला बोलावलं. सगळ्या जणी आल्या, हिने सगळ्या डिशेस भरल्या, सगळ्यांशी हसून खेळून बोलली. मैत्रिणींना माझा चक्क हेवाच वाटला. एक म्हणाली ‘ अशी पाहिजे बाबा कांता आम्हालाही.’

कांता हसत म्हणाली, ”आमच्या बाई पण किती माया लावतात मला. आज पंधरा वर्षे झाली की मला इथं येऊन. मला हे घर माझंच वाटतं.”  तिने पटापट सगळं  मागचं आवरलं आणि घर ओटा स्वच्छ

करून गेली सुद्धा. मध्येच लाजत लाजत येऊन मला पायातले पैंजण दाखवले. म्हणाली, “देव

पावला बघा.एवढ्या वर्षात पहिल्यांदाच  केले नवऱ्याने पैंजण आणि हे सोन्याचे कानातले.”  मला वर

म्हणाली, “ बाई,तुमची कृपा.” 

“ अग मी काय केलं कांता? “ तर म्हणाली, “ बया ! नाही कसं?तुम्हीच की मला पायावर उभं केलं नाही का?बसले होते घरी भिऊन. आता बघा. नाही म्हटलं तरी आठ हजाराची काम आहेत मला.पुन्हा एक ला

घरी असते मी.आता स्वतः कमावतेय म्हणून नवरा पण आदर करतोय आणि सासूबाई पण दबून

असतात. हे सगळं माझं चांगलं तुम्हीच केलं नाही का? “ मला कांताने खाली वाकून नमस्कार केला. माझ्या आणि तिच्याही  डोळ्यात पाणी आलं. डोळे पुसून हसून म्हणाली, “ आता दिवाळीला स्कूटी घेतो तुला म्हणालाय आमचा नवरा ! बघते काय करतो.“ 

“ येते का पण तुला चालवता स्कूटी ग’? “ 

 “हो मग ! कवाच शिकली मी  .भुंगाट जाते की मैत्रिणीच्या स्कूटीवरून.. आता हा बाबा घेतोय तर घेऊ दे की. देव पावला म्हणायचा.” 

दोघीही हसलो आणि  कांता हसत हसत जिना उतरली.

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares