मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “दृष्टिकोन” शिकायचा मात्र राहूनच गेला… ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ दृष्टिकोन” शिकायचा मात्र राहूनच गेला… ☆ डॉ अभिजीत सोनवणे

बघता बघता अख्खा मार्च महिना सुद्धा संपला की राव … ! 

मला आठवतं… लहानपणी मार्च महिना म्हणजे एकतर परीक्षा किंवा पुढील महिन्यातील परीक्षेचे टेन्शन….! 

डॉक्टर झाल्यानंतर असं वाटलं…. चला परीक्षांचे टेन्शन कायमचं संपलं…. 

पण खऱ्या परीक्षा तिथूनच पुढे सुरू झाल्या… त्या आजपर्यंत सुरूच आहेत…. ! 

एकूण काय ? आयुष्यातल्या परीक्षा कधीच संपत नाहीत…! 

पूर्वी मला वाटायचं, परीक्षेत जास्त “मार्क” पाडले म्हणजे मी जिंकलो…. 

खरंतर दर दिवशी… दरवर्षी तुमच्यातले “गुण” किती वाढले हे जास्त महत्त्वाचं असतं, मार्क हा फक्त आकडा असतो…. पण दुर्दैवाने चार भिंतीतली शाळा आम्हाला ते शिकवू शकली नाही… !

मला आठवून सांगा, आज पर्यंत तुम्हाला आठवी, नववी, दहावी, अकरावी, बारावीचे मार्क कोणी विचारलेत… ? मी छातीठोकपणे सांगतो; तुम्हाला आजपर्यंत ते कोणीही विचारलेले नाहीत…!

आपण काटकोन -त्रिकोण -लघुकोन -चौकोन सर्व कोन शिकलो …. एक “दृष्टिकोन” शिकायचा मात्र राहूनच गेला…!!! खरं आहे ना ??? 

माकडापासून आपण माणूस झालो…..! .. खरंच झालो का …. ??? हा वादाचा विषय आहे…! 

साइन कॉस थिटा बीटा…. अल्फा गॅमा लॉगरिदम…  यात मला कधीही रस नव्हता… जन्मल्यापासून ते आत्तापर्यंत मला या गोष्टीचा काहीही उपयोग झाला नाही…! इंजिनीयरिंगला या बाबी कदाचित उपयोगी असतील…! 

मला मात्र लहानपणापासून कायम हृदयाची धप धप आवडायची…. आमच्या मेडिकलच्या भाषेत याला Lub Dub असं म्हणतात…. ! .. नाव काहीही द्या हो…. शेवटी जगवते ती हृदयातली धडधड …! 

यानिमित्तानं एक प्रसंग आठवला…

लहानपणी शाळेत त्यावेळी, डब्यात वयानुसार एक पोळी आणि भाजी सोबत लोणचं असणं, हि आमची श्रीमंती होती… दिवसा शाळा आणि रात्री एसटी स्टँडवर हमाली काम करणारा आमच्यासोबत त्यावेळी शाळेत एक मुलगा होता… खिशात तो त्यावेळी एक गुळाचा खडा आणायचा… आम्ही मिटक्या मारत; पोळी भाजी लोणचं खात असताना तो आमच्याकडे बघत, हसत गुळाचा खडा चघळायचा आणि शाळेतल्या नळाशी, ओंजळ धरून घुटुक  घुटुक पाणी प्यायचा… वरून मस्त हसायचा…! 

… पण ते हसू कारुण्यपूर्ण होतं हे आज कळतंय…आम्ही वॉटर बॅग मधून पाणी प्यायचो….उपाशी राहून तो तृप्त होता…. पोटभर खाऊन आम्ही मात्र अतृप्त होतो…. ! 

का नाही मी कधीच बोलावलं त्याला माझी भाजी पोळी खायला… ? 

का नाही काढून घेतला मी तेव्हा त्याच्याकडून गुळाचा तो खडा…. ? 

माझा डबा त्यावेळी त्याला खायला देऊन, माझी वॉटर बॅग त्याच्यापुढे धरून, त्याच्या खिशातला गुळाचा खडा काढून, चघळत चघळत शाळेतल्या नळाला ओंजळ धरून मी सुद्धा घुटुक  घुटुक पाणी प्यायलो असतो एखाद वेळी तर ??? … तर… मी सुद्धा माणूस झालो असतो…!!

पोटार्थी मी…. एक चपाती, थोडी भाजी आणि नखभर लोणचं माझ्याकडून सोडवलं गेलं नाही तेव्हा…. 

मात्र गुळाचा तो खडा मी हरवून बसलो कायमचा … !!! 

कारण…. कारण , “गाढवाला गुळाची चव काय”… ? 

मराठीत हा वाक्प्रचार सुद्धा माझ्याच मुळे रूढ झाला असावा…. आता कुठेही गुळ बघितला, की मला त्याचं ते कारूण्यपूर्ण हसू डोळ्यासमोर येतं… आणि मग गुळ पाहून सुद्धा माझा चेहरा कडवट होतो…! 

आज तो कुठे असेल … ? असेल तरी का ???

तो नक्कीच असेल; आणि कुठेतरी चमकतच असेल, कारण आयुष्यामध्ये असे संघर्ष करणारेच नेहमी यशस्वी होतात…!  तो जिंकला नसेलही कदाचित, परंतु यशस्वी मात्र नक्की असेल…

जिंकणं आणि यशस्वी असणं यात फरक आहे… ! जिंकलेला प्रत्येक जण यशस्वी असतो असं नाही….  परंतु यशस्वी असलेला प्रत्येक जण जिंकलेला असतो….! 

जिंकणं म्हणजे शर्यतीत दरवेळी पहिलं येणं नव्हे ….  शर्यतीत धावताना, वाटेत आलेल्या काट्याकुट्या दगड धोंड्यांना तुडवत त्यांना पार करणं… धावताना छाती फुटायची वेळ येते, त्यावेळी स्वतःला सावरत, आपल्या सोबत पळणाऱ्याला धीर देणं म्हणजे शर्यत जिंकणं….!  यावेळी तो जिंकेल न जिंकेल…. परंतु तो यशस्वी असतो…. हे कोणत्याही शाळा कॉलेजात शिकवत नाहीत….!!! 

आपल्या सोबत धावणारा एखादा प्रतिस्पर्धी पायात पाय अडकून पडला, तर त्याला उठवून पुन्हा धावायला प्रवृत्त करणं,  म्हणजे शर्यत जिंकणं…. यावेळीही तो जिंकेल न जिंकेल…. परंतु तो यशस्वी असतो…. हे पण कोणत्याही शाळा कॉलेजात शिकवत नाहीत….!!! 

नाती जोडता जोडता नेमकं कुठं हरायचं ते कळणं, म्हणजे शर्यत जिंकणं…

यावेळी तो जिंकेल न जिंकेल…. परंतु तो यशस्वी असतो…. हे सुद्धा कोणत्याही शाळा कॉलेजात शिकवत नाहीत….!!! 

पडणं म्हणजे हरणं नव्हे…. पडल्यानंतर उठून उभंच न राहणं म्हणजे हरणं, हे समजणं….म्हणजे शर्यत जिंकणं….! … दुर्दैवानं…. हे सुद्धा कोणत्याही शाळा कॉलेजात शिकवत नाहीत….!!! 

असो, विषय लांबत जाईल… मुळ मुद्द्यावर येतो…. 

तर, अशाच पडणाऱ्या आणि पडून उठणाऱ्या अनेक लोकांना कोणत्या ना कोणत्या माध्यमातून, आपण सर्वांनी मदत केली आहे…. आणि म्हणूनच, मार्च महिन्यातील हा गोषवारा …. आपणासमोर सविनय सादर… ! 

*(आमच्या कामाचा मूळ गाभा फक्त वैद्यकीय सेवा देणे नसून, वैद्यकीय सेवा देता देता, त्यांचा विश्वास संपादन करणे, त्यांच्याशी चांगले नाते निर्माण करणे, भिक मागण्याची कारणे शोधणे, त्यांच्यामधील गुणदोष शोधून त्यांना व्यवसाय करण्यास प्रवृत्त करणे आणि त्यांना झेपेल तो व्यवसाय टाकून देणे…. जेणेकरून ते भिक्षेकरी म्हणून नाही, तर कष्ट करायला लागून, गावकरी होऊन ते सन्मानाने जगतील… कुणीही कुणापुढे हात पसरून लाचार होऊ नये, जगात कोणीही भिकारी असू नये, हा आमच्या कामाचा मूळ गाभा आहे, वैद्यकीय सेवा देणे हा त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही फक्त मार्ग म्हणून निवडला आहे)*

भिक्षेकरी ते कष्टकरी आणि कष्टकरी ते गावकरी

– श्री बाकले सर यांनी शेकडो नवीन शर्ट (पॅकिंग आणि प्राईस टॅग सुद्धा न काढलेले) आम्हाला दिले. 

हे सर्व शर्ट आम्ही 6 अपंग लोकांना विक्रीसाठी दिले.       “आयुष्यात अंधार असेलही; परंतु मनातला प्रकाश विझलेला नाही, आम्हाला भीक नको, आमच्याकडून वस्तू विकत घ्या” अशा आशयाची पाटी, व्यवसाय करताना त्यांच्या जवळ दिसेल अशा पद्धतीने ठेवली आहे…. एक रुपया …. दोन रुपये भिक द्या हो…. म्हणून लाचार होणारे हे लोक, आज दर दिवशी कमीत कमी 800 ते 1000 रुपयांचा व्यवसाय करत आहेत…! आज ते भिक्षेकरी नाहीत, कष्टकरी झाले आहेत…! 

एका महिन्यात 6 दिव्यांग लोक स्वतःच्या पायावर उभे राहिले याचे सर्व श्रेय मी समाजाला देतो. 

मला जर कोणी पाच मूठ गहू दिले, तर मी ते तसेच कोणाला वाटणार नाही … 

मी गहु जमिनीत रुजवेन, खत पाणी घालेन आणि मग जेव्हा पाच पोती धान्य होईल, तेव्हा ते माझ्या लोकांना मी विकायला लावून व्यवसाय करायला लावेन… यातल्या पाच मुठी पुन्हा बाजूला काढून त्यांनाही त्या जमिनीत पेरायला लावेन…! 

आपण अशा पाच मुठी नाही…. हजारो मुठी आम्हाला दिल्या आहेत आणि म्हणूनच आम्ही आपल्यासमोर नतमस्तक आहोत… ! 

वैद्यकीय सेवा, अन्नपूर्णा प्रकल्प, खराटा पलटण  हे सर्व इतर उपक्रमही नियमितपणे सुरु आहेत. 

शैक्षणिक

भीक मागणाऱ्या पालकांच्या अनेक मुलांना आपण दत्तक घेतलं आहे. हे सर्व खर्च आता माझ्या अंगावर साधारण मे महिना अखेर किंवा जून महिन्याच्या सुरुवातीला पडतील. 

माझ्या वैयक्तिक आयुष्यावर आणि आलेल्या अनुभवांवर आधारित जे पुस्तक लिहिले आहे, त्याच्या विक्रीच्या पैशातून या सर्व मुलांचा खर्च भागवण्याचा प्रयत्न करत आहे. 

माझं पुस्तक आपण विकत घेत आहात… पुस्तक आवडो न आवडो माझं कौतुक करत आहात… मुलगा म्हणून स्वीकारून; आई बापाच्या प्रेमळ नजरेने पाठीवर हात ठेवत आहात… आपण माझ्या सोबत आहात याचा काही वेळा मलाच माझा हेवा वाटतो…!

आपल्या एका मुलीला कलेक्टर व्हायचे आहे, तिची स्वप्नं खूप मोठी आहेत…. काही वेळा बाप म्हणून मी हतबल होऊन जातो… पण तुम्ही सोबत आहात; याची आठवण झाली की मी पुन्हा निर्धास्त होतो…! 

मनातलं काही …

  1. Zee Yuva TV यांनी”सामाजिक” या कॅटेगरीमध्ये मला आणि मनीषाला एक मोठा पुरस्कार दिला.

अगदी खरं सांगायचं तर या पुरस्कारावर आमचा हक्क नाही, तुम्हा सर्वांचा हक्क आहे….! 

अगदी मनापासून बोलतोय मी हे…. कारण तुम्ही सर्वजण काहीतरी देत आहात;  आम्ही फक्त ते तळागाळात पोचवत आहोत… 

रेल्वे स्टेशनवर एखादी बॅग हमालाने डोक्यावर घेतली म्हणून तो त्याचा मालक होत नाही…. मालक कुणीतरी वेगळा असतो….! आमच्याही बाबतीत तेच आहे…. आपण दिलेली जबाबदारी; आम्ही फक्त आमच्या डोक्यावर घेतली आहे, आम्ही मालक नाही…. आम्ही फक्त भारवाहक आहोत…. मालक आपण सर्वजण आहात….!!! 

  1. माझे आजोबा कै. नामदेवराव व्हटकर ! (माझ्या आईचे वडील)… कवी, लेखक, गीतकार, संगीतकार, अभिनेता असं चतुरस्त्र व्यक्तिमत्व….!ते आदरणीय बाबासाहेब आंबेडकर यांचे निस्सीम भक्त होते. 

आदरणीय बाबासाहेब अनंतात विलीन झाल्यानंतर, आजोबांनी स्वतःचे घर आणि छापखाना विकून बाबासाहेबांची अंतिम यात्रा चित्रबद्ध करून ठेवली आहे…. या एका चित्रफिती शिवाय, बाबासाहेबांची अंतिम यात्रेची चित्रफीत जगामध्ये इतरत्र कुठेही नाही… 

जवळची व्यक्ती गेल्यानंतर प्रत्येकाची धडपड असते, आपल्या त्या प्रिय व्यक्तीचे शेवटचे दर्शन घ्यावे. 

आदरणीय बाबासाहेबांना आई किंवा वडीलच मानणाऱ्या करोडो कुटुंबीयांना मात्र या अंतिम दर्शनाचे भाग्य मिळाले नाही… 

माझ्या आजोबांनी तयार केलेल्या, जगात एकमेव असणाऱ्या, या चित्रफितीमुळे आदरणीय बाबासाहेबांच्या समस्त भारतीय कुटुंबीयांना आता आदरणीय बाबासाहेबांचे शेवटचे दर्शन घेता येईल. 

आदरणीय बाबासाहेबांच्या चरित्रावर आधारित महापरिनिर्वाण या नावाने एक सिनेमा नुकताच येऊ घातला आहे. या चित्रपटामध्ये आदरणीय बाबासाहेबांच्या अंतिम यात्रेचे दर्शन सर्वांना नक्की घडेल…! 

या चित्रपटामध्ये माझ्या आजोबांचाही जीवनपट ओघाओघाने आला आहे…. 

माझ्या आजोबांची भूमिका करत आहेत, सुप्रसिद्ध अभिनेता श्री प्रसाद ओक..! 

हि चित्रफीत बनवून माझ्या आजोबांनी समस्त भारतीयांवर उपकार केले आहेत…. असं माझं प्रांजळ मत आहे….!

असो, भाषेची गरज फक्त बोलण्यासाठी असते, समजून घेण्यासाठी भावना पुरेशा असतात….! 

मनातील सर्व भावना आज आपल्या पायाशी ठेवत आहे…. !!! 

प्रणाम  !!!

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ जातांनाचे शब्द — लेखक : जीवन आनंदगावकर ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? इंद्रधनुष्य ?

☆ जातांनाचे शब्द — लेखक : जीवन आनंदगावकर ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

“मी असा काय गुन्हा केला ?” 

हे शब्द प्रमोद महाजन यांनी, गोपीनाथ मुंडे यांच्याजवळ, अंतसमयी उच्चारले होते. आपल्या सख्या भावानेच गोळ्या घातल्यावर विचारांच्या कल्लोळातून त्यांना असे व्यक्त व्हावेसे वाटले होते. “अरे, हे काय करताय ?” 

असे इंदिराजींनी अतिशय अविश्वासाने आपल्या मारेक-यांना विचारले होते. महात्मा गांधीजींचे जातानाचे शब्द होते, “हे राम” तर चाफेकर बंधू ,भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी “वंदे मातरम” म्हणत मृत्यूचे स्वागत केले होते. तर मी या स्वार्थी जगात आता राहू शकत नाही असे म्हणून साने गुरुजींनी जीवनयात्रा संपवली आणि सात भाऊ असते तरी मातृभूमीसाठी दिले असते. 

आता माझे काम संपले असे ठामपणे सांगून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी प्रायोपवेशन केले. 

एखाद्याचे जातानाचे शब्द नेमके काय असतात याची आपल्याला अतिशय उत्सुकता असते. एखादे वयोवृद्ध गेल्यावर जेव्हा नातेवाईक भेटायला येतात तेव्हा “काय म्हणाले हो ते जाताना ?” असे हमखास विचारले जाते. 

अगदी बोलायला यायला लागल्यापासून आपण अगणित वाक्ये बोलतो पण आयुष्याच्या अंतकाळी जे बोलतो ते खरेखुरे असते. त्यात खोटेपणाचा, दांभिकपणाचा, मीपणाचा लवलेश सुद्धा नसतो. ब-याचवेळा आयुष्यातल्या चुकांची किंवा पापांची कबुलीही असू शकते. 

शेवटच्या आजारपणात माझ्या पत्नीला ॲटॅक आला तेव्हा कार पळवित मी हॅास्पिटलला गेलो. 

तिला उचलून स्ट्रेचरवर ठेवताना ती एवढेच म्हणाली की,”उशीर झाला”. तेचं तिचे शेवटचे शब्द ठरले.

जगणे आणि मरणे यात फार मोठा वैचारिक खंदक असतो. तो पार करण्याची इच्छा फार कमी जणांची असते. आपल्यापैकी जवळजवळ प्रत्येकाला त्या खंदकापर्यंत जाऊच नये असे वाटत असते. कारण जगण्याची आसक्ती प्रत्येकालाच, तिथे मृत्यूचे स्वागत कोण आणि कसे करणार ? 

सगळी कल्पना असते आयुष्यात मी आणि माझे करत इतकी संपत्ती आणि इतक्या वस्तू गोळा केल्यात. 

पण यातली एकही वस्तू मृत्यूबरोबर घेऊन जाता येणार नाही. वेगवेगळ्या फ़ॅशनचे कितीही महागडे कपडे घातले तरी जन्माला येताना नागवे आलोय आणि मरतांनाही तसेच जायचंय. येताना दोघांमुळे आलोय आणि मेल्यावर चौघांच्या खांद्यांवरून जायचंय. आपण एकटे काहीच करू शकत नाही पण तरीही प्रत्येक हाव काही सुटत नाही. हे माझे, ते माझे, माझेही माझे आणि त्याचेही माझेच अशी आपली नेहमी भावना असते. मृत्यू समोर दिसायला लागतो तेंव्हा ही भावना बोथट होते. 

प्रत्येक चर्चमध्ये जशी कन्फेशन बॉक्स असते तशी काल्पनिक बॉक्स मृत्यूच्या जाणिवेने तयार होते. आयुष्यात जे बेफामपणे वागलो, बोललो ते आठवू लागते. आयुष्यावर चढलेली खोटेपणाची आणि दांभिकतेची पुटे ढासळू लागतात. लहान बाळाची निरागसता मनात येऊ लागते. रागलोभाच्या आहारी जाऊन विस्कटून टाकलेली नाती पुन्हा गोळा करून आणाविशी वाटतात. खरे तर तोपर्यंत फार उशीर झालेला असतो. जेंव्हा जगायचे असते तेंव्हा आपण जगलेलोच नसतो. आणि जगावेसे वाटू लागते तेंव्हा मृत्यू समोर येऊन उभा ठाकलेला असतो. 

भाऊसाहेब पाटणकर यांचा सुरेख शेर आहे …. 

दोस्तहो, दुनियेस धोका, मेलो तरी आम्ही दिला ।

जाऊनी नरकात, पत्ता स्वर्गाचा आम्ही दिला ।।

हाय रे दुर्दैव माझे, सर्वास कळले शेवटी ।

सारे सन्मित्र माझे, तेथेच आले शेवटी ।।

आपल्यासारख्या सर्व पापी माणसांचा सर्वात शेवटचा मुक्काम नरक आहे हे त्यांनी नर्मविनोदाने मोजक्या शब्दात पटवून दिले आहे. 

पण काहीकाही माणसे खरोखरच वेगळी असतात. त्यांना जगण्याचीही आसक्ती नसते आणि मरण्याचीही भीती वाटत नाही. ही माणसे ख-या अर्थाने जीवन जगतात आणि हस-या चेह-याने मृत्यूला सामोरे जातात. 

सामाजिक कार्यकर्ते ग प्र प्रधान यांनी मृत्यू हसत हसत स्वीकारला. आपला काळ जवळ आला आहे हे कळल्यावर त्यांनी आपला पुण्यातील राहता वाडा साधना ट्रस्ट या संस्थेला फुकट देऊन टाकला. आपल्या एका डॉक्टर विद्यार्थ्याच्या हॉस्पिटलच्या सर्वात वरच्या मजल्यावरच्या खोली भाड्याने घेतली आणि स्वतः डाळभात बनवून मृत्यू येईपर्यंत जगत राहिले. खरे तर तो वाडा विकला असता तर त्यांना करोडो रुपये मिळाले असते. पण आयुष्यभर एक तत्वज्ञान उराशी बाळगून जगलेल्या प्रधान मास्तरांनी निस्वार्थीपणे त्यावर पाणी सोडले. 

पु लं नी तर आयुष्यात मिळालेल्या सर्व संपत्तीचा ट्रस्ट केला आणि समाजाकडून मिळालेली सर्व संपत्ती समाजाला परत देऊन टाकली. एक आदर्श जगणे यापेक्षा वेगळे काय असते ? 

सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहून एकविसाव्या वर्षी जिवंत समाधी घेणारे ज्ञानेश्वर माऊली म्हणजे विरक्तीचे टोक ! त्यांच्या जीवनाचाही सोहळा होता आणि अजीवन समाधीचाही ! जीवनमृत्यूची व्याख्या त्यापलीकडे ती काय करायची ? 

सुप्रसिद्ध अभिनेते बलराज सहानी यांना स्ट्रेचरवरुन ऑपरेशन थिएटरमध्ये नेत असताना त्यांनी नर्सकडून एक कागद मागून घेतला आणि त्यावर लिहिले,”आयुष्यात सगळं मिळालं, कोणतीही इच्छा शिल्लक नाही”. तोच त्यांचा शेवटचा संदेश होता.

“आनंद” चित्रपटात राजेश खन्नाला कॅन्सर दाखवला आहे. प्रत्यक्ष जीवनात तो कॅन्सरनेच गेला. त्याचे मरतानाचे शब्द होते,”पॅक अप”.

शेवटच्या आजारपणात मी वडिलांना भेटायला गावी गेलो. मी परत निघताना फक्त एवढंच म्हणाले, “लवकरच माझ्यासाठी तुला दीर्घ रजा घ्यावी लागेल”. पुढे  पंधरा दिवसांनी ते गेले.मी त्यांचे ऐकलेले तेच दोन शब्द!

माझा मुलगा अभिजित अलिकडेच पणजी येथे विषारी जेली फिशचा दंश होऊन गेला. मेडिकल हॅास्पिटलमध्ये त्याला ऑपरेशनसाठी नेताना मी त्याच्यासोबत होतो. तो मला म्हणाला,”सगळं संपलय”! तेचं त्यांचे शेवटचे शब्द ठरले. तो पुन्हा शुद्धीवर आला नाही.

अर्थात काही सामान्य माणसेसुद्धा असामान्य पद्धतीने जगतात आणि मृत्यूने आदर्श निर्माण करतात. मुंबईत राहणा-या वसंत त्र्यंबक निकुंभ यांनी पंधरा वर्षांपूर्वी दोन्ही हात पसरून मृत्यूचे स्वागत केले होते. आयुर्वेदाचा गाढा अभ्यास असलेले निकुंभ एखाद्या योग्यासारखे ८३ वर्षे जगले. आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे त्यांची रोजची दिनचर्या होती. त्यामुळे त्यांच्या नखात रोग नव्हता. पण एके दिवशी त्यांनी विचार केला की आयुष्यातल्या सर्व जबाबदा-या पूर्ण झाल्या आहेत, लेकी, सुना नातवंडे सारे सुखी आहेत. मग आता जगून काय करायचे ? त्यांनी इच्छामरण घ्यायचे ठरवले. पत्नी जिवंत असताना हा असा निर्णय घेणे म्हणजे आक्रीतच ! 

व्यवस्थित नियोजन करून एप्रिल महिन्यापासून हळूहळू एकेक खाद्यपदार्थाचा त्याग करत करत चार महिन्यांनी मृत्यूला त्यांनी बोलावून घेतले. या त्यांच्या निर्णयापासून परावृत्त करण्याचा सर्व नातेवाईकांनी खूप प्रयत्न केला पण ते आपल्या विचारांपासून ढळले नाहीत. तोंडी सांगून ऐकत नाहीत हे लक्षात आल्यावर सर्वांनी त्यांना पत्रे लिहिली आणि तुम्ही आम्हाला हवे अहात असे सांगितले तर त्या प्रत्येकाला स्वहस्ताक्षरात त्यांनी लिहिलेली उत्तरे तत्वज्ञानाने भरलेली होती. ती आजही वाचायला मिळतात. 

ज्याने आयुष्य आणि मृत्यू यांच्यातली सीमारेषाच पूर्णपणे पुसून टाकली आहे त्या माणसाचे तत्वज्ञान वाचत राहावेसे वाटते. जग हे मिथ्या आहे हे संतांनीच सांगितले पाहिजे असे नव्हे तर आपले आपल्यालाही ते कळू शकते हे वसंत त्र्यंबक निकुंभ यांच्या पत्रावरून आपल्याला कळते. 

माझ्या आवडत्या शिक्षकांना व त्यांच्या पत्नीला दोघांनाही कर्करोगाचे निदान झाले आणि त्या दिवसापासून  दोघांनीही औषधोपचार थांबवला. दीक्षितसर सेवानिवृत्त शिक्षक होते. त्यांनी आपल्या मुलांना सांगितले की कर्करोगावर औषध नाही हे मी मुलांना शिकवायचो. मग मीच औषधोपचारावर तुम्हाला खर्च करायला का लावू ? ते पैसे तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी वापरा. आम्ही तृप्त आहोत, आम्हाला जाऊ द्या ! आणि खरोखरच त्या दाम्पत्याने कर्करोगाच्या वेदना शांतपणे सहन करत धीरोदात्तपणे जगाचा निरोप घेतला. 

ज्याला जन्म आहे त्याला मृत्यूसुद्धा आहेच ! जेवढ्या आनंदाने आपण जगण्याचा आनंद घेतो तेवढ्याच आनंदात मृत्यूचेसुद्धा स्वागत करायला हवे. आणि आयुष्यभर असे जगायला हवे की मृत्यूसमयी अपराधीपणाची भावना फिरकता कामा नये.

लेखक : जीवन आनंदगावकर, सेवानिवृत्त न्यायाधीश

प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ समजूतदार आग्रह… – लेखक : श्री प्रवीण दवणे ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

?  वाचताना वेचलेले  ? 

☆ समजूतदार आग्रह… – लेखक : श्री प्रवीण दवणे ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

आपण जेवत असतानाच कुणी पाहुणा आला की, हातात ताट घेऊन आत पळत जायची पद्धत तेव्हा आली नव्हती. जे आपल्या पानात, ती चटणी-भाकरी चटकन वाढली जायची आणि भूक असो वा नसो, दोन घास मायेचे स्वीकारून अतिथी तृप्त व्हायचा. आता मनात असूनही बदलत्या जीवनशैलीनं आपले आग्रहही समजूतदार झाले; पण आता समजून घ्यायचं म्हणजे नेमकं किती समजून घ्यायचं, हेच समजण्याची पंचाईत झालेय. अशीच पंचाईत माझी अलीकडं झाली.

अनेक दिवसांचा आग्रह आता दूर लोटणं अवघड झाल्यानं शेवटी श्रीकांत अन्‌ मृदुलाला मी कळवलंच ः “येतो येत्या शनिवारी जेवायला.’

त्यांना झालेला आनंद मला फोनवरही जाणवत होता. केवळ आपण एखाद्याकडं “जेवायला येतोय’ म्हटल्यावर समोरच्या माणसाला एवढा आनंद होतो, ही गोष्टच केवढी सुखद आहे.

तासभर आधीच गेलो. थोड्या गप्पा होतील; मग सावकाशीनं जेवण. खरं तर जेवण हे केवळ गप्पांसाठीचं निमित्त. एकमेकांचा मैत्रभाव साधणारा एक रुचकर दुवा! पाच-दहा मिनिटं गप्पा झाल्यावर उत्साहानं श्रीकांत म्हणाला, “तुम्हीच सांगा, कुठलं हॉटेल “प्रीफर’ कराल? “स्वीकार’ गार्डन रेस्टॉरंट आहे, “अतिथी’तलं फूड मस्तच!, “सुरभि’मध्ये कॉंटिनेंटल डिशेस..! चॉईस इज युवर्स! अगदी न संकोचता सांगा…’ 

संकोचायलाही पुरेसा वेळ नव्हता. जे मला कळत होतं, ते खरं होतं की जे खरं होतं ते मला समजत नव्हतं, कुणास ठाऊक! बागेत फिरायला निघालेला माणूस पाय घसरून तलावात पडावा, तसं काहीसं.

“हे बघा श्रीकांत, तुम्हीच ठरवा.’

“अस्सं कस्सं? तुम्हा आमच्या घरी आलायत नं जेवायला?’

तोच धागा शिताफीनं पकडून मी म्हटलं, “अहो, मग घरीच जेवू या नं. अगदी साधी मुगाच्या डाळीची खिचडीही चालेल; पण घरी जेवू या. घरात जेवायची गंमत वेगळी आहे.’

श्रीकांत-मृदुलाची बोलकी दृष्टभेट टिपायला वेगळ्या कॅमेऱ्याची गरज नव्हती. एकदम स्मार्ट टिचकी वाजवून मृदुला म्हणाली, “वॉव! ही तर बेस्ट आयडिया! घरीच जेवू या. खूप गप्पा होतील. तुम्ही बोलत बसलात की ऐकावंसं वाटतं. बाहेर काय, लगेच उठावं लागतं!’

चला! मी सुटकेचा निःश्‍वास सोडला. खूप आग्रह करून घरी जेवायला बोलावणाऱ्या चाहत्यांच्या घरात मला चक्क “घरचं’ जेवायला मिळणार होतं. वेगळ्या हातचं – मनापासूनचं!

ड्रॉवर उघडून मेनूकार्ड काढून तेवढ्यात दोघंही ठरवू लागले : “हे बघ श्री, सुरवातीला हराभरा कबाब असू दे. व्हेज मखनी, रुमाली रोटी, मग पनीर फ्राईड राईस…’

फोनवर ऑर्डर दिली गेली. माझी मुगाची खिचडी मूग गिळून बसली! 

श्रीकांत म्हणाला, “”आत्ता अर्ध्या तासात पार्सल येईल. हां, इथल्या “सागर’मधलं फूड बाकी…’ 

दोघांच्या आतिथ्यात कमतरता नव्हती; पण लिफ्टनं पायउतार होताना मन समाधानानं भरलं नव्हतं. वेळ, प्रवास न्‌ खर्च करून गेलेला माणूस एखाद्याच्या घरी फक्त “पार्सल’चं खाद्य खायला जात नसतो; अगदी साधं; पण ज्यात गृहिणीचं मन मिसळलंय, अशा गोष्टीनं आतिथ्य होतं. अशा मनपरंपरेत वाढलेल्या मला पार्सलपरंपरेशी जुळवून घेताना थकायला होत होतं. एवढा कंटाळा, एवढा औपचारिकपणा असेल तर केवळ पैसे मोजून आतिथ्याचा हव्यास तरी ओढवून घ्यायचा कशाला, या प्रश्‍नाचं उत्तर सापडत नव्हतं. आता कशालाही “व्वा!’ म्हणावं तर लगोलग उत्तर येतं – “हे श्रेय माझं नाही. “अन्नपूर्णा’तून आणलंय!’

दिवस “पार्सल’नं सुरू होतो; “पार्सल’नं संपतो. ऑफिसला जाताना निघण्याची तारांबळ म्हणून “चार पोळ्या, 200 ग्रॅम भाजी’ पार्सल, तर रात्री घरी जाताना “आता कुठं स्वयंपाकाचा कुटाणा; जातानाच नेऊ या पाव-भाजी पार्सल!’ 

आजारपण, वार्धक्‍य, एकाकीपण, अचानक, अनपेक्षित आलेले खूप पाहुणे आणि आणखीही काही असे क्षण असतील की जिथं “रेडीमेड पार्सल’ आणणं गरजेचं आहे. तिथं ती गोष्ट सुविधा ठरते; पण रग्गड पैसा, भरपूर आळस, लाडावलेलं सुखवस्तूपण, फक्त कंटाळा, चट्टू खाण्याची चटक अशा ठिय्या मारून रुतलेल्या असंख्य घरांतल्या वृत्ती-प्रवृत्तीनं आता नव्या समस्यांची पाळणाघरे सुरू केली आहेत!

घरातलं स्वयंपाकघर म्हणजे फक्त पार्सलचं गोडाऊन झालं तर तिथल्या मुलांचं पालन सुखरूप होईल; पण पोषण मात्र होणार नाही. पालन पदार्थांनी होतं; पोषण भावनांनी! आई-बाबा दोघांचाही ध्यास जेव्हा मिसळतो; तेव्हा ताटातल्या पदार्थांना येणारा सुवास कुठल्याही बिलानं चुकता होणारा नसतो. अगदी घरातलं साधं खिमट लोणचं असेल, फोडणीचा भात असेल, गूळ-चपातीचा लाडू असेल…पदार्थ अगदी साधे! पाच मिनिटांहून वेळ लागणार नाही; पण त्यात एक घर मिसळलेलं असतं. चव त्या घराची असते!

कुणी म्हणेल; सांगायला काय जातं? हल्लीची मुलं खातात का हे असलं? हल्ली चायनीज हक्का नूडल्सवर हक्कानं ताव मारणारी मुलं आहेत. तुमचं सांगणं कालबाह्य आहे! मजा म्हणून खाण्याचे पदार्थ हेच जर रोजचे खाण्याचे झाले तर घर न्‌ हॉटेल यात वेगळेपण काय उरलं? आणि अन्नपदार्थांतलं सत्त्व फक्त चवीत असतं? की त्याच्या पोषणमूल्यांत? एकत्र मायेनं गुंफून साधं-सात्त्विक जेवण्यात? आता गंमत म्हणून, फॉर अ चेंज म्हणून “घरी’ जेवू या, असं म्हणणारी घरं वाढत आहेत. सगळेच काही इतके गर्क नाहीत; पण बटण दाबल्यावर सुख दारात हजर, हा आभास नको त्या दिशेनं घेऊन चालला आहे. अनेक लोक हे ऐकण्याच्याही मनःस्थितीत नाहीत; इतकी रेडीमेड सुखाची सवय पटकन्‌ बेफाम वेगानं वाढत आहे. या सर्व सोईंनी वेळ वाचतो, हे खरंच आहे; पण त्या वाचलेल्या वेळेचं काय करायचं, हे स्वतःपुरतं ठरवायला हवं.

जाहिरातीतले स्टार्च इस्त्रीतले पप्पा-मम्मा न्‌ घरातले आई-बाबा यातला फरक अधोरेखित होतो, छोट्या छोट्या गोष्टींतील आपल्या गुंतवणुकीतून. एखाद्‌ वेळची “सोय’ जर “कायमची व्यवस्था’ होत असेल तर नातीही पार्सलचीच ठरतील! त्याला फक्त लेबल्स असतील; पण त्यात तिन्हीसांजेच्या आठवणींची ऊर्मी नसेल.

आज जी आळशी, सुखवस्तू घरं पार्सलसंस्कृतीच्या पायावर उभी आहेत, त्यांच्या हाती पार्सलनंच पुष्पगुच्छ येणार! पार्सलनंच केक येणार आणि हॅप्पी बर्थ डेचं एक स्वतःची सहीसुद्धा नसलेलं ग्रीटिंग! त्या वेळी जरा वळून पाहताना, आपण आपलं वात्सल्यही पार्सलनंच पाठवलं होतं, या वस्तुस्थितीची जाणीव असायला हरकत नाही. कृती स्वीकारायची ती परिणामासकट!

आधुनिकता, व्यग्रता कितीही असो; नाती एकमेकांशी वा समाजाशी जोडताना थोडी तोशीस पडतेच. प्रसंगी अडचण, चिडचीड, वैतागही उद्भवतोच. तारांबळ-गोंधळ-श्रमही होतात; पण घर नावाच्या समाजात न्‌ समाज नावाच्या घरात एकमेकांना गुंफताना अनेकदा इतकी सावध अलिप्तता नाही चालत. सिमेंटची अलिप्तता घराच्या पायरीसाठी ठीक; पण सिमेंटमध्ये बीज रुजणार नाही. पहिल्या पावसानं टणक ढेकूळ विरल्यावर त्याची मऊ माती होते. पुढं तेच मातीचं मऊपण बीजांकुरांनी हिरवळून येतं. अनेकदा आयुष्यातही रुक्ष अलिप्तता सोडावीच लागते; नाती एकमेकांत दरवळताना एकमेकांसाठी राबायची तयारी लागते.

आजच्या यंत्रयुगाला विसाव्याचे क्षण परवडणारे नाहीत; हे सगळ्यांनाच कळतं; पण तरीही ओढीनं जमवलेले विसाव्याचे क्षण पुन्हा यंत्राच्या स्वाधीन करणं हे केव्हाही समर्थनीय नाही. एकमेकांतील निरपेक्ष सहजता ओसरली तर “शब्द’सुद्धा “पार्सल’मधून आल्यासारखे उमटतील; पण प्रकटणार नाहीत. 

श्रीकांत न्‌ मृदुलानं ओढीनं जे अगत्य केलं, ते त्यांच्या माहिती व तंत्रयुगाच्या संदर्भांना धरून अगदी योग्यच आहे; पण त्या हद्दीपलीकडं भावनांचाही एक सुकोमल प्रदेश असतो. जिथं “मन’ व्यक्त करताना मनाचाच आधार घेतला की, एक अपार आनंद असतो, हेही त्यांना समजायला हवं!

दोघांनी खूप सारे पैसे खर्च करून “पार्सल’ने घरचं अगत्य केलं; पण त्याहीपेक्षा घरातला साधा “माझ्यासाठी’ केलेला चहा मला अधिक उबदार वाटला असता!

लेखक : श्री प्रवीण दवणे.

संग्राहक  : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ संधीप्रकाश… कवी: डाॅ.निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण.. सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

सौ. ज्योत्स्ना तानवडे

? काव्यानंद ?

☆ संधीप्रकाश… – कवी: डाॅ.निशिकांत श्रोत्री  ☆ रसग्रहण.. सौ.ज्योत्स्ना तानवडे  ☆ 

 डाॅ. निशिकांत श्रोत्री

निवृत्ती हा आयुष्यातील अवघड कालखंड असतो. शरीराने ज्येष्ठत्वाकडे झुकलेला पण मनाने अजूनही कार्यक्षम अशा अवस्थेत मनाची कुतरओढ होते. डॉ. निशिकांत श्रोत्री यांनी त्यांच्या “संधीप्रकाश” या कवितेत याच अवस्थेतील मनस्थिती मांडली आहे. आपण या कवितेचा आता रसास्वाद घेणार आहोत.

☆ संधीप्रकाश ☆

घेरून टाकलं अचानक मला

मनाला मरगळ आणणाऱ्या

त्या अंधूक संधीप्रकाशांनं 

अन् बावरून गेलो मी एकदम

*

ना त्यावेळी पुरेसा सूर्यप्रकाश

तर विजेच्या दिव्यांचा पिवळा उजेड कुचकामाचा

सारी दृष्टीच होऊ लागली होती

भेसूरपणे धूसर

*

गर्क झालो होतो इतका

माझ्या यशोमार्गक्रमणात

उमगलंच नाही मला

त्या संधीप्रकाशाचं स्वरूप …..

पहाटेचा की कातरवेळेचा ….. ?

*

ते काही नाही !

टाळलाच पाहिजे

हा मळभ वाढविणारा

धूसर संधीप्रकाश

धावलंच पाहिजे प्रकाशाकडे;

अन्  मग काय …..

सुटलो धावत

जीवाच्या आकांताने

मागे टाकायला

त्या अशुभ संधीप्रकाशाला

*

धावतोय धावतोय केव्हाचा

लाज वाटली असती सुवर्णकन्येला

इतका धावलो ….. इतका धावलो

पण संधीप्रकाश काही मागे पडेच ना

*

 मनावरचं मळभ दाटतच होतं

भेसूरता वाढवतच होतं

कसं टाकावं मागे

सिंदबादच्या मानगुटीवर बसलेल्या म्हाताऱ्यासारख्या

लोचट संधीप्रकाशाला

काहीच उमगत नव्हतं

किती जोरात धावू अजून ?

छातीचा भाता फुटेल ना !

*

अन् अचानक लख्ख विजेसारखा

प्रकाश चमकला

माझ्या धूसर मनात …..

भेदरवणाऱ्या शंकेच्या स्वरूपात …..

धावत तर नाही मी

या संधीप्रकाशाबरोबरच …..

नेमकं उलट्या दिशेने ?

©️ डॉ‌. निशिकांत श्रोत्री

९८९०११७७५४

घेरून टाकलं अचानक मला

मनाला मरगळ आणणाऱ्या

त्या अंधूक संधीप्रकाशानं

अन् बावरून गेलो मी एकदम

पूर्ण रूपकात्मक असणारी ही कविता मुक्तछंदातील प्रथम पुरुषी एकवचनातील आहे. आयुष्यातील एका महत्त्वाच्या वळणावर पोहोचल्यावर प्राप्त परिस्थितीने गांगरलेला कवी आपली मनोव्यथा सांगतो आहे. अखंड कार्यरत असणारा कवी कालपरत्वे निवृत्तीच्या वयावर येऊन ठेपला. वय विसरून काम करताना अचानक सामोऱ्या आलेल्या निवृत्तीने तो कावराबावरा होतो. मनाला एक प्रकारची मरगळ आल्याने गोंधळून जातो.

इथे संधीप्रकाश हे निवृत्तीसाठी योजलेले रूपक आहे. त्यावेळी उजेड मंदावतो. एक विचित्र उदासी मनाला घेरून टाकते. इथे तशीच अवस्था निवृत्त होण्याच्या विचाराने कवीची झालेली आहे.

ना त्यावेळी पुरेसा सूर्यप्रकाश

तर विजेच्या दिव्यांचा पिवळा उजेड कुचकामाचा

सारी दृष्टी होऊ लागली होती

भेसूरपणे धूसर

इथे कवीने सूर्यप्रकाश, दिव्यांचा पिवळा उजेड ही रूपके वापरली आहेत ती उमेद म्हणजे जोम असणे आणि क्षमता कमी होणे यासाठी. तरुणपणात अंगात जोम असतो, मनात उमेद असते. आता वाढत्या वयाबरोबर तेवढी क्षमता राहिलेली नाही. आता आपली ताकद कमी पडेल अशी जाणीव व्हायला लागल्याने कवी बावचळून जातो आणि आता कसे होणार ही भीती त्याला सतावू लागते.

गर्क झालो होतो इतका

माझ्या यशोमार्गक्रमणात

उमगलंच नाही मला

त्या संधीप्रकाशाचं स्वरूप…..

पहाटेचा की कातरवेळचा…….?

कवी आपल्या कामकाजात इतका गढून गेलेला होता, यशोमार्गावर चालण्यासाठी अगदी झोकून देऊन कार्यरत होता की त्याला संधीप्रकाश दाटून आलेला कळलेच नाही आणि म्हणूनच क्षणभर त्याला हे लक्षातच येईना की हा संधीप्रकाश पहाटेचा आहे का संध्याकाळचा ?

पहाटे आणि संध्याकाळी दोन्ही वेळेला संधीप्रकाश पसरतो. पहाटेच्या संधीप्रकाशा नंतर लख्ख सूर्यप्रकाश पसरतो आणि आपण मोठ्या उमेदीने कामाला लागतो. तेच संध्याकाळच्या संधीप्रकाशाने हळूहळू उजेड कमी होत जाऊन अंधार वेढून येतो आणि आपोआप काम थंडावते. नेमकी अशीच अवस्था वाढत्या वयाच्या निवृत्तीमुळे होते. पण कामाच्या तंद्रीत ही गोष्ट कवीला वेळेवर लक्षात येत नाही.

ते काही नाही !

टाळलाच पाहिजे

हा मळभ वाढविणारा

धूसर संधीप्रकाश

धावलंच पाहिजे प्रकाशाकडे ;

अन् मग काय…..

सुटलो धावत

जीवाच्या आकांताने

मागे टाकायला

त्या अशुभ संधीप्रकाशाला

 

धावतोय धावतोय केव्हाचा

लाज वाटली असती सुवर्णकन्येला

इतका धावलो….. इतका धावलो

पण संधीप्रकाश काही मागे पडेच ना

अजून सकाळ आहे, अजून खूप काम करायचं आहे असं मनात असतानाच संध्याकाळ झालेली जाणवल्यामुळे कवीची दोलायमान अवस्था होते. मग तो ही निवृत्ती, हा संधीप्रकाश पुढे ढकलण्यासाठी जीवतोड मेहनत करायच्या मागे लागतो. जिद्दीने काम करून निवृत्ती टाळायचा प्रयत्न करू लागतो. पण त्यामुळे आणखीन आणखीनच थकू लागतो. इथे सुवर्णकन्या हे मेहनती तरुणांचे रूपक आहे.

कवी सुध्दा तरूणांना लाजवेल इतकी मेहनत घेतो. पण त्यामुळे त्याची ताकद आणखी कमी होऊ लागते. वयाचा आणि कामाचा मेळच बसत नाही. कारण मनाची उभारी अजून शाबूत आहे पण शरीरच त्याला साथ देत नाही ही अवस्था म्हणजेच संधीप्रकाश. त्यामुळे कितीही जरी प्रयत्न केले तरी ही निवृत्ती कवीला किंवा कुणालाच टाळता येत नाही हेच सत्य आहे.

मनावरचं मळभ दाटतच होतं

भेसूरता वाढवतच होतं

कसं टाकावं मागे

सिंदबादच्या मानगुटीवर बसलेल्या म्हाताऱ्यासारख्या

लोचट संधीप्रकाशाला

काहीच उमगत नव्हतं

किती जोरात धावू अजून

छातीचा भाता फुटेल ना !

कवीने कितीही प्रयत्न केला तरी तो पूर्वीच्या जोमाने काम करू शकत नव्हता‌. निवृत्तिचा संधीप्रकाश टाळू शकत नव्हता. त्यामुळे आता नेमके काय करावे हा त्याला प्रश्न पडला होता. सिंदबादच्या मानगुटीवरचा म्हातारा जसा खाली उतरत नाही, चिकटूनच बसतो. तशीच ही निवृत्ती पण आता लोचटासारखी कवीच्या मानगुटीवरच बसली आहे. कितीही झटकली तरी ती खाली उतरत नाही, दूर होत नाही. त्यामुळे कवी भांबावून गेला आहे. अती धावाधाव केल्याने त्याची पूरती दमछाक झाली आहे. या नादात काही विपरीत घडू नये अशी त्याला आशा आहे.

सिंदबादच्या मानगुटीवरचा म्हातारा ही उपमा या निवृत्तीला चपखल लागू पडते आहे.  कितीही प्रयत्न केला तरी कवीची त्यापासून सुटका होत नाही.

अन् अचानक लख्ख विजेसारखा

प्रकाश चमकला

माझ्या धूसर मनात

भेदरवणाऱ्या शंकेच्या स्वरूपात

धावत तर नाही मी

या संधीप्रकाशा बरोबरच…..

नेमकं उलट्या दिशेने ?

बेसावध कवीला निवृत्तीने गाठले. त्याचे मन ते स्वीकारायला तयार नाही. मग तो जास्ती जोमाने राहिलेली कामे करायला लागतो आणि जास्तच थकून जातो. हे पाहिल्यावर तो सावध होतो आणि त्याला आपली चूक लक्षात येते. ‘आपल्या या आततायी वागण्याने निवृत्ती पासून दूर जायच्या ऐवजी आपण जास्त कमजोर बनत निवृत्तीच्या बाजूला धावतो आहोत ‘ हे पाहून मनाने ठरविलेल्या मार्गाच्या उलट आपण धावतोय हे त्याच्या लक्षात येते.

सर्वसामान्यपणे आपण योग्य वयात आपल्या कामधंद्याला लागतो. संसार सुरू होतो. असंख्य जबाबदाऱ्या, योजना, ध्येयं, उद्दिष्टे साध्य करण्यात आपण पूर्णपणे गढून जातो. पण पुढे जाणारा काळ त्याचे काम करीत असतो. यथावकाश आपले वय वाढत जाते. कार्यक्षमता कमी होत जाते आणि एक दिवस या कामातून आता निवृत्त व्हायला हवे असा क्षण येऊन ठेपतो. कामाच्या नादात आपल्या कार्यकाळाची संध्याकाळ समोर दाटून आली आहे हे आपल्या लक्षातच येत नाही.

अजून कितीतरी गोष्टी करायचे बेत आखलेले असतात. काही कामे अर्धवट असतात. मनातली उभारी अजून तशीच असते पण शरीर पूर्वीसारखे आता नीट साथ देत नाही ही वस्तुस्थिती असते. कामे अजून व्हायचीत अन हाताशी वेळ कमी आहे या परिस्थितीत मनाची ओढाताण होते आणि अट्टाहासाने मन पुन्हा नेटाने काम करायला लागते. पण त्यामुळे निवृत्ती पुढे जायच्या ऐवजी आपली आणखी दमछाक होते. शरीर आणखीनच थकल्याने उलट निवृत्तीला आपणच जवळ ओढल्यासारखे होते. आयुष्यभर उत्तम रीतीने कार्यरत असणाऱ्यांची ही सर्व घालमेल कवीने इथे अतिशय समर्पक शब्दात मांडली आहे.

कवितेची सौंदर्यस्थळे :– ही कविता पूर्ण रूपकात्मक आहे. आयुष्याच्या संध्याकाळी येणारी निवृत्ती म्हणजे मळभ दाटवणारा संधीप्रकाश हे रूपक त्या वेळची परिस्थिती अचूकपणे स्पष्ट करते. ‘सूर्यप्रकाश ‘हे रूपक तरुणवयातला जोम, उमेद तर ‘दिव्यांचा पिवळा प्रकाश’ हे क्षमता कमी होण्याची स्थिती उलगडतात.

‘सुवर्णकन्या’ हे अव्याहतपणे ध्येयासाठी कार्यरत तरुणांचे रूपक आहे. कितीही प्रयत्न केला तरी लोचटासारखी चिकटलेली निवृत्ती कितीही झटकली तरी दूर होत नाही. यासाठी ‘सिंदबादच्या मानगुटीवरचा म्हातारा’ ही उपमा अगदी अचूक ठरते. ‘धूसर मन’ म्हणजे नीट दिसत नाही अशी बावचळलेली मनाची अवस्था.

ही सर्व रूपके, उपमा प्रत्येकाच्या आयुष्यातील या महत्त्वाच्या टप्प्याचे अचूक वर्णन करत त्या अनुभवाचा पुन:प्रत्यय देतात.

प्रत्येकाच्या आयुष्यातील निवृत्तीचा काळ म्हणजे जेव्हा मनाची उभारी अजून पूर्वीसारखीच आहे पण त्याला वाढत्या वयातील शरीर तेवढी साथ देत नाही‌ तो कालखंड. अशावेळी अजून बरीच स्वप्नं खुणावत असतात पण ती पूर्ण होतील की नाही या शंकेने उलघाल होते. वाढत्या वयाचा आणि कामाचा ताळमेळ न बसण्याची ही कातरवेळेची अवस्था कवी डॉ. निशिकांत श्रोत्री यांनी त्यांच्या ‘संधीप्रकाश’ या कवितेत अतिशय सुंदर समर्पक शब्दांत सांगितलेली आहे.

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

१०/०८/२०२३

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ नाती अपडेट व्हायला हवीत… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर ☆

? विविधा ?

☆ नाती अपडेट व्हायला हवीत… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

नेहमीप्रमाणे आठवड्यातून मी घरी जात असतो तसाच कालही गेलो. घरी आलो की सगळी दुनिया विसरून मी माझ्या दोन वाघांशी म्हणजे माझ्या निर्भय आणि शार्दुल सोबत मस्त रमून जातो. गेल्या गेल्या असाच रमून गेलो. बायकोने चहा दिला. चहा घेत असताना आमची दिदी आली, दिदी म्हणजे माझ्या मोठ्या भावाची मुलगी. तसा तो चुलत भाऊ पण मला सख्खा भाऊ नसल्यामुळे माझी सगळी चुलत भावंडे मी सख्ख्यासारखी ठेवली आहेत. भावांची बहिणींची सगळी लेकरं मला तात्या म्हणूनच बोलतात.

दिदी तसच मला पाहून जोरात आनंदाने ओरडली.”अय्या तात्या कधी आलायस, बरा आहेस का? असं म्हणत जवळ येऊन बसली आणि म्हणली, ”तात्या अरे पुढच्या महिन्यात लग्नाची तारीख काढायची म्हणतायत पप्पा. ”मी या दोन वाघांना मिठीत घेऊन रमून गेलो होतो तिच्या या वाक्याने मी थोडासा गडबडलो. मी म्हणलं दिदी कुणाचं गं लग्न? दिदीने सांगितलं तिचंच लग्न म्हणून आणि फलटण चे पाहुणे आहेत. सगळं ठरवून झालं आहे तात्या फक्त तारीख काढायची बाकी आहे. आणि तू हवा आहेस इथं, सुट्टी घे. बाकीचे कोणते कार्यक्रम घेऊ नकोस. दिदी हे बोलत होती आणि मी आतून  घायाळ होत चाललो होतो. कारण यातलं एक टक्कासुद्धा माझ्या कानावर आलेलं नव्हतं. मी बायकोला जोरात आवाज देऊन बाहेर बोलावलं आणि रागाने विचारलं, की घरातली एवढी महत्वाची गोष्ट तू मला का सांगितली नाहीस. तर तिलाही यातलं काही माहीत नव्हतं. मला प्रचंड आतून वेदना होत होत्या. मी यांचा कुणीच नाहीय का? म्हणून आतून हुंदकत होतो. त्याच तंद्रीत पायात चप्पल घातली आणि थेट त्याच्या घरी. जेमतेम दहा मिनिटांचं पावली अंतर आमच्या दोन घरांमध्ये.

आमचं गाव असल्यामुळे घराची दारे बंद नसतात, की दारावर बेल वैगेरे नसते. थेट घरात घुसलो तर हा मोठा भाऊ आमचा नुकताच जेवायला बसला होता. मी कसलाही विचार न करता त्याला एवढंच म्हणलं. ”का रे दादा आपल्या दीदीला पाहुणे येऊन पसंत करून गेले. सगळी बोलणीसुद्धा झाली. फक्त तारीख काढायची राहिलीय आणि यातलं आम्हाला कुणालाच माहीत नाही असं का.? तर मला म्हणाला,”तुम्हाला कुणाला आमची काळजी आहे का.? तुम्हाला कुणाला आमचं चांगलं झाल्याचं बघवतच नाही. त्याच्या या बोलण्याने मी कोसळून गेलो. ”मी म्हणलं अरे आम्हाला कळलं तर आम्ही येणार ना. तर तो रागाने एकटक माझ्याकडे पाहत म्हणाला, नितीनराव आठ दिवसांपूर्वी मी तुला व्हाट्सअप्प ला मॅसेज करून ठेवलाय की दिदीला फलटणचे पाहुणे बघायला येणार आहेत म्हणून आणि तू अजूनही तो मॅसेज साधा वाचला सुद्धा नाहींयस. मी रोज पाहतोय तू ऑनलाईन असतोस पण माझा मॅसेज तू वाचत नाहींयस.

तातडीने मी माझा मोबाईल खिशातून बाहेर काढला, प्रिय दादा म्हणून त्याच्यासमोर नाव सर्च केलं आणि व्हाट्सअप्प ला पाहिलं तर खरोखर त्याने मला आठ दिवसापूर्वी तसा मॅसेज पाठवला होता. मी त्याच्याकडे नजर उचलून पाहिलं. तर, आता तुझ्यात आणि माझ्यात कसलेच नाते उरले नाही असा काही त्याच्या चेहऱ्यावरचा अनोळखी भाव पाहून मला त्याची अक्षरशः किव आली.

मग मी बोलायला सुरवता केली, की, ”दादा कामाच्या घाईत व्हाट्सअप्प वर येणारे प्रत्येक मॅसेज प्रत्येकजण आवर्जून वाचतोच असे नाही. मोबाईल काय माझ्या शरीराचा अवयव नाहीय दादा. त्यावर काही आलं की लगेच माझ्या मेंदूशी कनेक्ट होत नसते. आपलं घर लांब नव्हतं. तुझ्या बायकोने येऊन सांगायला हवं होतं किंवा साधा एखादा फोन तरी करायचा ना निदान, तुझा आवाज कानातून मेंदूत तरी गेला असता. तू व्हाट्सअप्प वरून मला कळवलं म्हणजे तू तुझं नात्यातील कर्तव्य पार पाडलं असं वाटलं का तुला? आणि तो माझ्याकडून मॅसेज वाचायचं राहून गेलं म्हणून तू इतक्या टोकाचे बोलतोय की बस्स आपल्यात आता काहीच नातं नाही राहिलं. मग तस असेल तर आम्हीही व्हाट्सअप वरूनच अक्षता पाठवतो, त्या दिवशी हवं तर दिदीचा फोटो dp ला ठेवतो. तू तिकडून आम्हाला जेवणाचं ताट पाठव चालेल ना दादा हे, ’यावर जरा तो गार पडला. मी प्रचंड अस्वस्थ होतो. ”माझ्या भावाच्या मुलीच्या लग्नात वरातीत मित्रांना घेऊन तंगड्या वर करून नाचायचं स्वप्न पाहणारा मी. नसेल माझी परिस्थिती सध्या तुझं ओझं उचलण्याची पण कुठूनतरी हप्त्यावर का होईना निदान एक गोदरेजचं कपाट तरी मी घेतलंच असतं की रे माझ्या दीदीसाठी. लग्नाच्या मांडवात पंगतीला भात वाढण्याची स्वप्न पाहणारा हा तुझा भाऊ केवळ तुझा व्हाट्सअप्प चा मॅसेज मी वाचला नाही म्हणून तुला इतका परका वाटायला लागला का रे? हे व्हाट्सअप्प इतकं महत्वाचं झालं का? “ हे व्हाट्सअप कधी आलं? तुझा माझा संवाद साधण्यासाठी आपल्याला याची गरज पडावी? ”एखादी साधी गोष्ट असती तर मी समजून घेतलं असतं पण, आयुष्यातली इतकी महत्वाची गोष्ट तू समोरासमोर माझ्याशी न बोलता या माध्यमातून सांगू पाहत होतास.?

दादा वयाने मोठा आहे. माझ्या बोलण्यावर तो मान खाली घालून उभा होता. त्याची चूक त्याला कळली होती. पण खरंतर तो चुकीचा नव्हताच. तो डिजिटल होता होता इतका गुंतून गेला की नातीसुद्धा त्यावरच टिकवू पाहायला लागला. दोघांच्याही डोळ्यात गच्च पाणी भरून आलं होतं. तसाच त्याला जोरात आवळून मिठीत घेतला. मिठीत येत फक्त एवढंच म्हणाला, नितीन सॉरी भावा, चुकलं, आज कळलं आयुष्यात की तू कवी का आहेस ते.

घट्ट झालेली मिठी मी डोळे पुसत पुसत सैल केली. हातात मोबाईल घेतला. नेट सुरू केलं. व्हाट्सअप्प उघडलं आणि नाव पुन्हा सर्च केलं प्रिय दादा. तो हे पाहतच होता. दोघांचेही डोळे ओसंडून वाहत होते आणि मी त्याच्यासमोर त्याला तिथून कायमचं ब्लॉक केलं आणि एवढंच म्हणलं, आयुष्यातली सगळी सुख दुःखे समोरासमोर भेटून बोलत जाऊया, हात हातात धरून संवाद साधत राहूया, आपल्या नात्यात संवाद साधण्यासाठी असल्या कुठल्याच माध्यमाची आपल्याला गरज पडता कामा नये, असं म्हणत दोघेही एका ताटात जेवलो. इथं सेल्फी काढावा वाटला मला पण तो मोह आवरला. तसाच मी माझ्या घरी आलो आणि तो त्याच्या घरी राहिला.

आज कायमचं अंतर वाढत जाणार होतं. मी अंतर वाढवणाऱ्या गोष्टीच संपवून टाकल्या.

मित्रांनो संवाद साधणारी माध्यमे आज प्रत्येक घरात आहेत. आपण याच्याशी कनेक्ट झालोय. जग जवळ आल्याची फिलिंग आपण अनुभवत असताना आपली नाती दुरावत तर चालली नाहीत ना? याचे भान आपल्या प्रत्येकाला असायला हवे म्हणूनच हे लिहावं वाटलं मला.

खालील कवितेच्या ओळी माझ्या मनाचा अंतरंग अक्षरशः ढवळून काढत आहेत त्या ओळी ………

एकविसाव्या विज्ञान युगात

ही केवढी मोठी घोडचूक

रक्ताच्या नात्यालाही आज

लागते व्हाट्सअप आणि फेसबुक….

आणि खरं सांगू तुम्हाला,

खरच आपली जेवढी रक्ताची, जवळची, जी आपली असणारी माणसं, जिथं खरंच या लोकांशी समोरासमोर हातात हात घेऊन संवाद व्हायला हवा असं वाटणारी माणसं जी आहेत ना, त्यांना व्हाट्सअप वरून कायमचं ब्लॉक करा. काळजाचा डेटा कायम चालू ठेवा. तिथून ही नाती कधीच ब्लॉक होऊ देऊ नका. एकमेकांशी संवाद साधत, डिजिटल होता होता नाती जपता जपता आनंदाने जगता येईल आपण तसे जगुया.

लेखक – अनामिक

संग्रहिका: सौ.बिल्वा शुभम् अकोलकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “पसायदान…” ☆ सौ. अंजोर चाफेकर ☆

सौ. अंजोर चाफेकर

??

☆ “पसायदान…” ☆ सौ. अंजोर चाफेकर

मी जेव्हा जेव्हा माझ्या मिस्टरांना घेऊन अंबानी हाॅस्पिटलला जाते तेव्हा माझे मन नैराश्यानी ग्रासून जाते.

जातानाच मन उदास असते. माझ्याच नशीबी या वा-रा 

का?

पण तिथे पोचल्यावर जेव्हा आजूबाजूचे पेशन्टस् बघते 

तेव्हा वाटतं माझा नवरा या कॅन्सरवर मात करून 

नाॅर्मल आयूष्य जगतोय तरी. 

किती तरुण मुले, किती लहान मुले, अजून त्यांनी जगही पाहिले नाही.त्यांच्या आई वडिलांच्या डोळ्यात तरळणारे दुःख मन पिळवटून टाकते.

कितीतरी वयस्क, त्यांची हतबलता, त्यांना सावरणारी अर्धांगिनी, ती ही कापणा-रा हातानी, मनातली भीती 

न दाखवणारी. 

त्यांच्याबरोबर आलेला त्यांचा मुलगा, तोही पन्नाशीजवळ 

आलेला, ऑफीसला रजा टाकून. मधे मधे तो ऑफीसचे फोन अटेन्ड करतोय. तो ही या युगातला श्रावणच. 

कुणाच्या हाताला सलाईनच्या नळ्या,कुणी यूरीनची बॅग 

सांभाळत,कुणी व्हीलचेअर वर 

प्रत्येकाचे दुःख वेगळे पण डोळ्यात तेच केविलवाणे भाव. 

अशावेळी मलाही पसायदान आठवते. 

देवा तू सर्वांना सुखी का नाही ठेवत.?

या शारीरिक वेदना कशासाठी?

आणि गरीबांनी काय करायचे  ?

त्यांना तर या महागड्या ट्रीटमेन्टस् कशा परवडणार?

या खेळात तुला कसली गंमत वाटते.?

©  सौ.अंजोर चाफेकर, मुंबई.

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ फुलराणी.. ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

? इंद्रधनुष्य ? 

☆ फुलराणी … ☆ श्री सुनील शिरवाडकर

खूप खूप वर्षांनी काल बालकवींचा “फुलराणी” हातात घेतला. एक एक कविता वाचत गेलो. किती मोठ्या आनंदास आपण मुकलो होतो. शाळेत असताना ‘आनंदी आनंद गडे..’, श्रावणमासी हर्ष मानसी..’ या कविता अभ्यासाला होत्या. पण त्याच्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठीच केवळ त्या वाचल्या होत्या.

लहान मुल ज्या उत्कटतेने.. आनंदाने चहुकडे पाहत असते.. अगदी त्याचप्रमाणे बालकवी निसर्गाकडे बघत.म्हणून तर ते ‘आनंदी आनंद गडे..’ सारखी नादावुन टाकणारी कविता लिहू शकले. या कवितेत वारा वाहतो..चांदणे फुलते..पक्षी गातात. साध्याच गोष्टी.. पण किती नादमाधुर्य.

कल्पना विलास करणे हे बालकवींचे अजून एक वैशिष्ट्य. निसर्गातील द्रुष्ये पाहून कल्पनेने ते त्यावर शब्दांचा साज चढवतात.

इवलाच अधर हलवून

जल मंद सोडीते श्वास..

इवलाच वेल लववुन

ये नीज पुन्हा पवनास..

किती सुंदर कल्पना. पण असे जरी असले तरी कधी कधी ते कल्पनाविलासाच्या बाहेर येऊन निसर्गाचे चित्रण करतात. यातली मला सर्वाधिक भावलेली कविता म्हणजे “औदुंबर”. फक्त आठ ओळीतून बालकवी आपल्या एखादे  डोळ्यासमोर एक लँडस्केप उभे करतात.

ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन

निळासावळा झरा वाहतो बेटांबेटांतुन.

चार घरांचे गाव चिमुकले पैल टेकडीकडे

शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गर्दी पुढे

*

पायवाट पांढरी तयांतून अडवीतिडवी पडे

हिरव्या कुरणांमधुन चालली काळ्या डोहाकडे.

झाकळुनी जळ गोड काळिमा पसरी लाटांवर

पाय टाकुनी जळांत बसला असला औदुंबर.

रंगांची किती मुक्त उधळण आहे या कवितेत.बालकवींना रंगाची विलक्षण आसक्ती.एका कवितेत ते म्हणतात..

पुर्वसमुद्री छटा पसरली रम्य सुवर्णाची

कुणी उधळली मुठ नभी ही लाल गुलालाची.

“फुलराणी” ही तर अजरामर कविता….

हिरवे हिरवे गार गालिचे

हरीत तृणांच्या मखमालींचे.

त्या सुंदर मखमालीवरती

फुलराणी ही खेळत होती.

अशीच एक कविता. ” तू तर चाफेकळी “ नावाची.त्यातील कल्पनाविलास पहा..

क्रीडांगण जणू चंचल सुंदर भाल तुझे हे गडे

भुरुभुरु त्यावर नाचत सुंदर कुंतल कुरळे उडे.

श्रावणातील वातावरणाचे वर्णन करताना बालकवी म्हणतात..

क्षणात येते सरसर शिरवे

क्षणात फिरुनी ऊन पडे.

पहाटेच्या दाट धुक्याचे वर्णन करताना कवी म्हणतो..

 शुभ्र धुक्याचे वस्त्र लेवुनी

हर्षनिर्भरा नटली अवनी.

 लाल सुवर्णी झगे घालुनी

हासत हासत आले कोणी.

पानापानातुन.. ओळीओळीतुन शब्दांची श्रीमंती उधळणारा हा निसर्गकवी.”आनंदी आनंद गडे..इकडे तिकडे चोहीकडे” असे म्हणणारा..पण त्याला आयुष्य लाभले जेमतेम अठ्ठावीस वर्षांचे.१९०७ साली पहिले मराठी कवी संमेलन जळगाव येथे झाले. त्या संमेलनात त्यांना “बालकवी” ही पदवी देण्यात आली.आणि त्यानंतर अकरा वर्षांनी रेल्वे अपघातात त्यांचा करुण अंत झाला. शेवटच्या काळात त्यांच्या मनात उदासिनतेची छाया पसरली होती का? कारण एका कवितेत ते म्हणतात..

सुंदर सगळे, मोहक सगळे

खिन्नपणा परि मनिचा न गळे,

नुसती हुरहूर होय जिवाला

कां न कळे काही.

आणि मग..

कोठुनी येते मला कळेना

उदासीनता ही हृदयाला

काय बोचते ते समजेना

ह्रदयाच्या अंतरह्रदयाला.

बालकवींनी या जगाचा निरोप घेतला त्याला मागच्या वर्षी शंभर वर्षे पुर्ण झाली.आणि “फुलराणी” च्या प्रकाशनाला यावर्षी पन्नास वर्षे पूर्ण झाली. विस्मरणात गेलेल्या या प्रतिभावंत कवीच्या स्मृतींना वाहिलेली ही एक आदरांजली.

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “तरच मी लग्नाला तयार होईन…” लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? वाचताना वेचलेले ?

☆ “तरच मी लग्नाला तयार होईन…” लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆

तरच मी लग्नाला तयार होईनअशी मागणी  ऐकून थक्क झाले

दोन दिवसांपूर्वी एक विवाह  जमवण्यासाठी उपस्थित होतो.

मी मुलाकडील बाजूने होतो.

मुलगा माझ्या मित्राचा होता.

मुलाचा माझा फारसा परिचय नव्हता.

पण मित्र नेहमीच्या परिचयातील होता.

मुलाने मुलगी पसंती कळवलेली होती.

बैठकीच्या सुरुवातीला मुलाने खालील मागण्या केल्या.

त्या ऐकल्याबरोबर वधुकडील मंडळी आश्चर्यचकीत झाली आणि मागण्या मान्य करण्यासाठी वेळ मागून घेतला.

✅ संपूर्ण विवाह वैदिक पद्धतीनुसार होईल. ✅

  1. ✅ कोणत्याही प्रकारचे विवाहपूर्व चित्रफीत अथवा छायाचित्रण होणार नाही. ✅
  2. ✅ वधु विवाहप्रसंगी घागरा न घालता महाराष्ट्रीय पद्धतीची साडी नेसेल. ✅
  3. ✅ विवाहस्थळी कसलेही कानठळ्या बसवणारे संगीत न वाजवता शांत संगीत वाजवण्यात येईल.✅
  4. ✅ विवाहप्रसंगी म्हणजे हार घालतेवेळी केवळ वधु आणि वर मंचावर असतील✅
  5. हार घालतेवेळी वधु किंवा वरास उचलणार्‍यास विवाहमंडपातून बाहेर घालवण्यात येईल. ✅
  6. ✅ गुरुजींनी विवाहविधी सुरु केल्यानंतर कोणीही त्यांना थांबवणार अथवा अडथळा आणणार नाही.✅
  7. ✅ छायाचित्रकार अथवा चित्रफीत तयार करताना गुरुजींना दिशादर्शन करणार नाही. तो लांबूनच चित्रीकरण करेल. ✅
  8. छायाचित्रकार वधुवरांना चित्रविचित्र पोजेस देण्यास सांगणार नाही. ✅
  9. वधुवरांना सर्व आमंत्रितासमोर आलिंगन देण्यास सांगणार्‍यास विवाहमंडपाचे बाहेर काढण्यात येईल.✅
  10. वधु अथवा वराकडील कोणताही पाहुणा दारु अथवा इतर विचित्र भोजन पदार्थ मागणार नाही.
  11. कानठळ्या बसवणारे संगीत बिलकुलच लावण्यात येणार नाही.
  12. भोजनामध्ये अथवा नाश्त्यामध्ये कोणतेही विचित्र पदार्थ असणार नाहीत. भोजन व नाश्ता पूर्णपणे महाराष्ट्रीयन पद्धतीचे व साधे असेल.
  13. विवाहप्रसंगी कोणतेही अचकट विचकट नाच होणार नाहीत.
  14. विवाहप्रसंगी अथवा आदल्या दिवशी संगीत रजनीच्या नावाखाली चित्रविचित्र नृत्ये होणार नाहीत.
  15. लग्नाच्या आधी प्री वेडिंग गाणे,व भेटणे फोटो काढणे  मला आवडणार नाही..
  16. कमीत कमी खर्च व धर्म व शास्त्रीयपद्धतीने विवाहअसेल तर मी   तयार होईल…
  17. आई वडील खूप कष्ट करून लहानस मोठे करतात,जीवापाड जपतातलग्न साठी कर्जबाजारी  होतात, हा  वायफळ खर्च  टाळा

 

हा संदेश,,,

आश्चर्य म्हणजे वधुकडील मंडळींनी काही वेळानंतर चर्चा करुन उपरोक्त मागण्या मान्य केल्या आणि विवाह साध्या पद्धतीने करण्य‍ाचे मान्य केले.

आजच्या काळात असा विवाह प्रस्तावित करणार्‍या या मुलाचे मी ताबडतोब अभिनंदन केले.

बघा जमतय का ?

ही काळाची  व  संस्कृती जपण्याची गरज आहे … 🚩

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640

email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सेवाग्राम… ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

सेवाग्राम☆ सौ कल्याणी केळकर बापट

मागे येऊन गेलेल्या कोरोनाच्या लाटेने आपली सगळ्यांमध्ये भ्रमंती, पर्यटन ह्या बाबतीत विचार  करायची असलेली खरतरं शक्तीच काढून घेतलीय. एरवी आपल्याला सवय असते अगदी दोनचार दिवस जरी मोकळे,सवडीचे मिळाले की आपण लगेच कुठेतरी जवळपास का होईना पण सहपरीवार वा मित्रमंडळींसोबत सहलीस जाण्याचे ईमले बांधायला लागतो. ह्या फिरस्तीच्या आवडीच्या नादापायी खूपदा लांबवरचा,दूरवरचा प्रदेश आपण आवर्जून बघतो मात्र आपल्या जवळचा आसपासचा प्रदेश मात्र पाहू पाहू करीत बघायचा राहूनच जातो.भलेही हा जवळील सुप्रसिद्ध प्रदेश आपल्या डोळ्याखालून जात नाही मात्र दूरदूरचे लोक ह्याला भेट देण्यासाठी, त्याचा अभ्यास करण्यासाठी दूरवरून येतात.

आमचा विदर्भ हा चांगल्या गोष्टींसाठी प्रसिद्ध असणे ही बाब आम्हां सगळ्यांसाठीच अभिमानाची आहे.विदर्भ सुद्धा संतमहात्मे, थोर पुरुष ह्यामुळे ओळखला जाऊ लागला तर ही बाब आपणांसाठी जरा जास्तच गौरवाची ठरते.

विदर्भातील वर्धा जिल्हा हा सेवाग्राम व पवनार ह्या पवित्र भूमींसाठी सुप्रसिद्ध.  ८ एप्रिल. हा दिवस आचार्य विनोबा भावे ह्यांच्या पवनार आश्रमाच्या स्थापनेचा दिवस. खरोखरच अशी ठिकाणं बघितली की नतमस्तक व्हायला होतं.आता थोडसं आचार्य विनोबाजी आणि पवनार आश्रमाबद्दल जाणून घेऊया.

आपली आई ही बहुतेक प्रत्येक व्यक्तीचं दैवत,गुरु असते. लहानपणी तर आई हेच बाळाचे सबकुछ असते असही म्हणायला हरकत नाही. त्यामुळे आपल्या आईसाठी आपल्याला काही करता आलं तर त्याचं आत्मिक समाधान काही ओरचं लाभतं बघा. अशाच एका असामान्य व्यक्तीने आपल्या आईसाठी संस्कृत मध्ये असलेली भगवद्गीता ही समजण्यास सोप्प्या मराठी भाषेत लिहीली  तीच ही “गीताई” होय. ती व्यक्ती म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून आपले आचार्य विनोबाजी भावे होतं.

11 सप्टेंबर 1895 रोजी कोकणात विनोबाजींचा जन्म झाला. आज त्यांची जयंती.त्यांना विनम्र अभिवादन.भारतीय संस्कृती व जीवनशैलीबद्दल त्यांचा विशेष अभ्यास होता. राष्ट्रभाषा हिंदी असावी व लिपी देवनागरी असावी, असा त्यांचा आग्रह होता.

वेगवेगळ्या भाषांच ज्ञान अवगतं असणं हा खरोखरीच कौतुकाचा विषय. साधारण तीन चार भाषांच्या वर जर कोणाला जास्ती भाषा अवगतं असतील तर मला त्या व्यक्तींच खूप कौतुक वाटतं.ह्या अवलीयांना तर तब्बल  १४ भारतीय भाषा येत होत्या. वेद आणि आश्रम व्यवस्थेवर त्यांचा गाढा विश्वास आणि अभ्यास होता.

मा. विनोबाजींनी भरपूर प्रमाणात जमीनीचा मालकी हक्क असलेले जमीनदार व भूमिहीन जनता ह्यामधील प्रचंड तफावत व  त्यापासून निर्माण झालेली दरी जाणली आणि मग त्यांनी सुरू केली स्वातंत्र्योत्तर काळातील महत्त्वाची कामगिरी म्हणजे भूदान चळवळ. देशातील जमीनदारांनी त्यांच्या जमिनीचा सहावा हिस्सा भूमिहीनांसाठी दान करावा, असे त्यांचे आवाहन होते. १९५१ साली काही लोकांनी तेलंगण भागात जमीनदारां  विरुद्ध संघर्ष केला. तेव्हा जमिनीची योग्य वाटणी केली तरच खरी सामाजिक क्रांती होऊ शकेल, अशी भूमिका विनोबांनी घेतली. केवळ समाज प्रबोधनातून ७० दिवसांत त्यांना सुमारे १२ हजार एकर जमीन मिळाली.

त्यांचा कोणताही विचार वा दृष्टिकोन हा वैश्विक असायचा.महात्मा गांधींचे ते एकनिष्ठ अनुयायी होते.१९४८ साली महात्मा गांधींच्या निधनानंतर निर्माण झालेल्या हिंसेच्या पार्श्वभूमीवर विनोबांनी सत्य-अहिंसा व सर्वधर्मसमभावावर आधारलेला सर्वोदयाचा मार्ग सांगितला. म्हणूनच जणू ह्या गांधीजींच्या तत्त्वावरील ‘श्रद्धा’ परत मजबूत करण्याचे काम त्यांनी केले, असे मानले जाते. आचार्य दादा धर्माधिकारी यांचे या कामी त्यांना बहुमोल सल्ला व सहकार्य लाभले.

आपला सर्वांगीण व्यासंग वाढवितांना त्यांनी कुराणाच्या मराठी भाषांतरापासून ते गीताई पर्यंत अनेक ग्रंथ लिहिले. ‘साम्ययोग’ नावाचे मासिक ते पवनार आश्रमातून काढत होते. विनोबाच्या इतर ग्रंथात ऋग्वेदसार, ईशावास्य वृत्ती, वेदान्ससुधा, गुरुबोधसार, भागवतधर्म प्रसार यांचा समावेश आहे. त्यांचे ‘मधुकर’ नावाचे पुस्तक आबालवृद्धात परिचित होते.

विदर्भाचा गौरव म्हणून आपल्याला त्यांच्या पवनारच्या आश्रमाचा उल्लेख करता येईल.त्या आश्रमात त्यांनी बाजार गाठावा लागणारं नाही हे तत्व बाळगून शेतीमध्ये भाजीपाला व धान्य पिकवायला सुरवात केली. त्यांनी ऋषीशेती चा प्रघात सुरू केला.धाम  नदीचे तीरावर आचार्य विनोबा भावे यांचा आश्रम आहे. हा आश्रम १५ एकर जागेवर् विस्तारलेला आहे. ह्यात खुप् जैविक विविधता आहे. अनैसर्गिक गोष्टींपासून खुप दुर आणि निसर्गाच्या सान्निध्यात वसलेला असा हा आश्रम ईथे येणा-या लोकांना आकर्षित करतो.  विनोबांनी हा आश्रम खास करून् महिलांसाठी चालु केला. येथे येणा-या महीला साध्वी किंवा  उपासक होत्या. विनोबाजींनी वय वर्षे पन्नास ते सत्तर च्या दरम्यान अख्खा भारत पालथा घातला.त्या द्वारे जनजागृती पण त्यांनी केली.अशा या गौरवशाली व्यक्तीचा सन्मान भारतसरकारने 1983 मध्ये त्यांना मरणोत्तर भारतरत्न हा पदवी देऊन केला.

दिवाळीच्या सुमारे सात दिवस आधी विनोबांनी ‘प्रायोपवेशन’ सुरू केले. प्रशासनातील मोठे अधिकारी जिल्हाधिकारी, शल्यचिकित्सक, पोलिस अधीक्षक यांच्या उपस्थितीत व असंख्य कार्यकर्त्याच्या गराड्यात विनोबांनी १५ नोव्हेंबर १९८२ रोजी म्हणजे दिवाळीच्या अमावस्येच्या दिवशी सकाळी देहत्याग केला. पंतप्रधान इंदिरा गांधींपासून सर्व राज्याचे राज्यपाल व मुख्यमंत्री त्यांच्या अंत्यसंस्कारास्तव आश्रमात उपस्थित होते.

आज पवनार आश्रमाच्या स्थापनेच्या दिवसामुळे विनोबाजींचे थोर कार्याची परत एकदा उजळणी झाली.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ घर… ☆ सौ. प्रांजली लाळे ☆

सौ. प्रांजली लाळे

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ घर… ☆ सौ. प्रांजली लाळे

रस्त्यावरुन जाताना एखादे बंद घर दिसलं की बऱ्याचदा माझ्या मनात रेंगाळणारा भावनिक प्रश्न..हे घर कोणाचे असेल..कोण रहात असेल ह्या घरात या आधी.. आता ते बंद का आहे..काय कारण असेल बंद राहण्याचे?बरेचदा उत्तर मिळतच नाही खरं तर..पुर्वी गल्लीतील एखादे जरी घर रिकामे राहिले तर भुताखेतांच्या गोष्टी रंगायच्या.. कोणी फिरकायचे नाही.. आता दिवसागणिक बंगलेच्या बंगले रिकामे पडलेत..आजुबाजुला गवतं,झाडेझुडपे वाढलेले..असे बंगले,घरं दिसली की मन सुन्न होते..घराचे सौंदर्य काय असते हो..ज्या घरात माणसं असतात तीच घराची शोभा.. नाही तर नुसत्या भिंती काय कामाच्या !!अर्थात त्या भिंतीही बोलक्या असतील जेव्हा त्या घरातील माणसं तिथे रहात असतील..माणूस घर बांधताना स्वप्न पुर्तीचे किती मनोरे चढत असेल नाही.. शुन्यातून निर्माण केलेले क्षण घट्ट मुठीत ठेवत असेल बांधून..परंतु येणारा प्रत्येक क्षण त्याचाच असतो असे नाही ना..

कोरोनाने बरीच कुटुंब बरबाद केलीत..क्षणात घरं रिकामी झाली.. होत्याचे नव्हते झाले.. काहींची मुलं बाहेर परदेशात.. त्यामुळे आईबापही तिकडे नाही तर इहलोकी !!  ह्या घरांची गरज नसते त्या मुलांना.. पैसा वारेमाप.. एखाद्या बिल्डरला ती भावनिक गुंतवणूक न ठेवता विकायची न् मोकळं व्हायचं..जो घर बांधतो.. तो ते सर्व इथंच सोडून जातो.. चार भिंतींबरोबर आपली आठवण कायमची तिथं ठेवून जातो..

© सुश्री प्रांजली लाळे  

मो न. ९७६२६२९७३१

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares