1985,86 चा काळ खुप भन्नाट काळ कारणं ह्या वर्षात यवतमाळात आमच्या घरी टिव्ही चे आगमन झाले. ह्या टिव्ही ने सगळ्यांना खिळवून ठेवले होते बघा. जरी वडीलधारी मंडळी ह्या टिव्ही ला इडियट बॉक्स म्हणत असले तरीही ते सुद्धा ह्याच्या समोर ठाण मांडून बसत असत. अर्थात त्या वेळेचे कार्यक्रम पण एकत्रितपणे बघायच्या लायकीचे असायचे म्हणा.
त्यावेळी माझ्या आवडत्या मलिकांपैकी एक मालिका म्हणजे “मालगुडी डेज”.म्हणजेच मालगुडी डेज ही एक भारतीय दूरचित्रवाणी मालिका आहे. ह्या मालिकेचे सगळंच अफलातून होत, त्याचे कथानक, मालिकेचे शिर्षक गीत,त्या त्याचे चित्रणआणि त्यात काम करणारे कलाकार. असं वाटायचं ह्यातील एक जरी डावें पडले असते तरी ही मलिका परिपूर्ण न वाटता कुठेतरी काहीतरी मिसिंग वाटले असते.
ही मालिका आर.के. नारायण यांच्या मालगुडी डेज नावाच्या इ.स. १९४३ च्या लघुकथा संग्रहावर आधारित आहे. या मालिकेचे दिग्दर्शन कन्नड अभिनेता आणि दिग्दर्शक शंकर नाग यांनी केले होते. कर्नाटक संगीतकार एल. वैद्यनाथन यांनी स्कोअर तयार केला, तर आरके नारायण यांचा धाकटा भाऊ आणि प्रसिद्ध व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण हे रेखाटन कलाकार होते. ही मालिका चित्रपट निर्माते टीएस नरसिंहन यांनी बनवली होती. ही मलिका बघुन कित्येकांना मालगुडी हे गाव, स्थान काल्पनिक आहे ह्यावर विश्वासच बसत नव्हता. भारतीय रेल्वेने मालगुडी डेज मालिकेच्या स्थानाला आदरांजली म्हणून भारतातील शिमोगा, कर्नाटक मधील अरसालू रेल्वे स्थानकाचे नाव बदलून मालगुडी रेल्वे स्थानक ठेवण्याचा निर्णय घेतला होता.
ह्या मालिकेतील कथांचे लेखन आर. के. लक्ष्मण.
हे एक भारतीय इंग्रजी साहित्याचे कसदार लेखन करणारे प्रतिभावान लेखक तर होतेच शिवाय अतिशय मानाचे समजण्यात येणारे साहित्य अकादमी पुरस्कार, पद्मभूषण आणि पद्मविभूषण ह्याचे मानकरी होते. आज त्यांचा स्मृतिदिन.
आर. के. नारायण आणि मालगुडी हे दोन्ही शब्द समानार्थी म्हणून वापरता येतील. १९३५ साली नारायण यांनी मालगुडी नावाच्या एका काल्पनिक गावाला केंद्रस्थानी असल्याची कल्पना करून स्वामी ॲन्ड फ्रेन्ड्स या नावाची आपली पहिली कथामालिका लिहिली. नारायण यांनी एका पाठोपाठ एक सरस गोष्टी लिहून काढल्या. त्यांच्या बऱ्याच कथा मालगुडी नावाच्या गावाभोवती घडतात. या गोष्टी वाचतांना वाचक त्यात हरवून जातात. हे गाव पूर्णपणे काल्पनिक आहे यावर अनेकांचा विश्वास बसत नाही, इतके वास्तववादी चित्रण नारायण यांनी आपल्या कथांमधून उभे केले आहे. या गावातीलच एक गोष्ट ‘दि गाईड’ यावर गाईड नावाचा हिंदी चित्रपट निघाला.
आर के नारायण यांचा स्मृतिदिन १३ मे रोजी झाला. मालगुडी डेज सारख्या मालिकेच्या आठवणी जाग्या झाल्यात.
☆ परि तुझ्यावाचुनि करमेना… भाग – २ ☆ प्रस्तुती – सौ उज्ज्वला केळकर ☆
(त्यावेळी जरी मी घराबाहेर पडण्याची संधी एवढ्याच दृष्टीने बी.एड्. कडे पाहिलं असलं, तरी पुढच्या आयुष्यात मला त्याचा खूप फायदा झाला आणि ते करायला सुचवलं होतं माझ्या सहचराने.) – इथून पुढे
मला पुढे १९७० साली, सांगलीला डी.एड्. कॉलेजमध्ये नोकरी लागली. त्यानंतर मी एम.ए. झाले. याच सुमाराला आम्ही आमचं स्वतंत्र छोटंसं घरकुल माधवनगरलाच मांडलं होतं. आमच्या लग्नाला दहा वर्षं झाली. आणि प्रकृतीने ‘अमोल’ ठेवा आमच्या पदरात टाकला. आता प्रश्न होता, नोकरी सोडायची की काय? पाळणाघर, किंवा मुलाला सांभाळायला बाई, ही मानसिकता घरात, समाजात तितकीशी रुजलेली नव्हती. प्रश्न होता, त्यावेळी नोकरी सोडली, तर चारसहा वर्षांनी, मुलाची सातत्याने देखभालीची गरज संपल्यावर, पुन्हा खात्रीपूर्वक नोकरी मिळेलच याचा काय भरवसा? माझ्या शेजारणीने माझ्या नोकरीच्या वेळात मुलाला सांभाळायचे कबूल केले, आणि माझ्या सासुबाईंनी आणि यांनी दोघांनीही मुलाकडे लक्ष देण्याची जबाबदारी स्वीकारली आणि माझी नोकरी अखंडितपणे चालू राहिली. नोकरीच्या वेळा बांधील असतात. धंद्याचं तसं नसतं. यांचा यंत्रमागावर कापड काढून देण्याचा व्यवसाय होता. तो माधवनगरातच होता. त्यामुळे गरजेप्रमाणे ते वेळ काढू शकत होते आणि तसा त्यांनी काढलाही. मुलाला वाढवताना आम्ही दोघांनी बरोबरीने जबाबदारी उचलली. यांनी कांकणभर जास्तच उचलली.
नोकरी, घरकाम, छोट्याचं संगोपन या सा-यात दिवस कधीच संपत असे. माधवनगरात तेव्हा पाण्याची खूप टंचाई होती. आजही आहेच. त्या वेळी चार-पाच दिवसातून एकदा पाणी यायचं. ते थोडंच असायचं. पिण्यापुरतं यायचं. बाकी वापराला विहिरीचं पाणी असे. पाणी ओढण्याचं काम यांनी स्वखुषीने स्वीकारलं होतं. बाजारहाटही ते करत. त्यामुळेच स्वयंपाक-पाणी, धुणं-बिणं सगळं उरकून मला नोकरीसाठी वेळेवर जाणं शक्य होत होतं. नोकरी म्हटली की तिथल्या जबाबदा-या, कर्तव्यं आलीच. अमोल दहा महिन्याचा असताना त्याला घरी ठेवून मला प्रशिक्षणासाठी दहा दिवस सातारला जावं लागलं होतं. पण यांनी सासूबाईंच्या मदतीने कोणताही गाजावाजा, गवगवा न करता मुलाला सांभाळलं. जाऊबाई, पुतणे-पुतण्या ही मंडळी पण होतीच!
मुलगा चार वर्षाचा झाला आणि आम्ही त्याच्या शिक्षणासाठी म्हणून सांगलीला बि-हाड केलं. तिथे त्याच्याबरोबर माझंही अनुभवक्षेत्र वाढत – विस्तारत गेलं. आवडी-निवडी जपायला, जोपासायला संधी मिळाली. कार्यक्रमातला सहभाग वाढला. श्रोता-प्रेक्षक म्हणून जाताना मुलाला बरोबर घेऊन जाणं, निदान पहिली काही वर्षं तरी अपरिहार्य होतं. जमेल तेवढं ऐकायचं. पाह्यचं. कविसंमेलन, व्याख्यानं, कथाकथन इ. मध्ये माझा प्रत्यक्ष सहभाग असे, तेव्हा मुलगा लहान असताना यांनी बघितलं. एक बरं होतं. या सा-या कार्यक्रमांत माझा सहभाग असावा, याबद्दल आमचं एकमत झालं. दुमत असतं तर… जाऊ दे. तो विचारच नको.
सांगलीला आल्यावर मला मिळणारा अवकाश वाढला असला तरी मला सुचतंय म्हणून आज बाकीची कामं बाजूला राहू देत. मी लिहीत बसते. एवढा आवाका मला कधीच लाभला नाही. घर, स्वयंपाक-पाणी, नोकरी-चाकरी संभाळून जमेल तसं आणि तेवढंच माझं लेखन झालं. मी वलयांकित लेखिका नव्हते, हेही त्यामागचं कारण असू शकेल. माझ्या घरकामात नाही, तरी मुलाच्या संगोपनात यांचं सहाय्य नक्कीच होतं.
आता घरकामात नाही असं म्हणतानाही बाजारहाट तेच करायचे हे मला कबूल करायलाच हवं. सगळ्यांत महत्त्वाचं काम म्हणजे सकाळी उठल्यावरचा पहिला चहा हेच करायचे आणि आल्या-गेल्यांना अगदी आवर्जून सांगायचे सुध्दा! मग मी म्हणायची, ‘सकाळी गाडीत एकदा पेट्रोल भरलं की गाडी दिवसभर न कुरकुरता चालू राहते…’
नोकरीच्या काळातही एक आठवण आवर्जून नोंदवाविशी वाटते. मिरज तालुक्यातील प्रौढ साक्षरांचं मूल्यमापन करण्यासाठी एक समिती नेमली होती. तिच्यात माझा समावेश होता. हे काम रात्री प्रौढ शिक्षण वर्ग सुरू झाल्यावर तालुक्याच्या वेगवेगळ्या गावी जाऊन करायचं असे. सुमारे महिना-दीडमहिना हे काम चाललं. मलाच कानकोंडं होई. पण या मुद्यावरून यांनी कधी खळखळ केली नाही.
आता हे सगळं वाचताना कुणालाही वाटेल तुम्ही तुमच्याबद्दल खूप लिहिलंत. त्यांच्याबद्दल काय? तर ते त्यांच्या आवडी-निवडीप्रमाणे, त्यांना हवं तसं जगत होतेच! हवं ते करत होते. पुरुष असल्यामुळे त्यांना त्यांचा अवकाश जन्मत: प्राप्त झाला होता. मलाही त्यांनी काही प्रमाणात तो प्राप्त करून दिला. ही आवर्जून सांगण्यासारखी गोष्ट.
सांगली आकाशवाणीवरून ‘प्रतिबिंब’ ही श्रुतिकामाला सुमारे दहा-बारा वर्षं प्रसारित होत होती. त्यातील शंभर तरी श्रुतिका मी लिहिल्या असतील. श्रोत्यांनाही त्या पसंत पडत असल्याचं कळत होतं. ते संवाद, त्यातील वाद-विवाद आमच्या घरातल्या संवाद-विवादातून लिहिलेले असत. त्याला थोडी झिलई, चकचकीतपणा मी माझ्या लेखनातून दिलेला असे, एवढंच!
माझ्या लेखनाचा महत्त्वाचा स्त्रोत यांच्या वाणीतूनही अनेकदा उगम पावलेला आहे, तो असा! श्रुतिका ऐकल्यावर माझी एक मैत्रीण मुग्धा आपटे मला म्हणाली होती, ‘आमच्या घरात आम्ही जे बोलतो, ते तुला कसं कळतं?’ मी म्हटलं, ‘घरोघरी गॅसच्या शेगड्या… दुसरं काय?’
याचा अर्थ माझी वाटचाल अगदी मऊ मखमलीवरून झाली, असं मुळीच नाही. रेशमी काटे अनेकदा टोचले. अधून मधून बाभळीच्या काट्यांनीही रक्तबंबाळ केलं. भांड्याला भांडं अनेकदा लागलं. नुसता नाद नव्हे, खणखणाटही झाला.
लोकगीतातील ग्रामीण स्त्री आपल्या नवऱ्याच्या रागाला इंगळ्या इस्तुवाची उपमा द्यायची आणि आपण गोड बोलून चतुराईनं कसं ‘विसावण’ घालतो, याचं वर्णन करायची. मला असं विसावण घालणं कधी जमलं नाही. पण यांना जितक्या लवकर राग यायचा, तितक्याच लवकर तो निवायचाही. मग उगीचच काही तरी बोलून, हसवून ते वातावरणातला ताण दूर करतात. इच्छा नसतानाही मग मला फस्सकन हसू येतं. ‘तुझं नि माझं जमेना…’ असं अनेकदा म्हणता म्हणताच, ‘परि तुझ्यावाचूनि करमेना…’ याही सार्वकालिक सत्याचा प्रत्यय येतो.
☆ मदतीचा हात… लेखक : श्री रियाज तांबोळी ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆
नाव : सातप्पा लक्ष्मण पाटील. राहणार : मु. पो. जित्ती, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर… हे शेतकरी आहेत. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत ते आपल्या संसाराचा गाडा हाकत आहेत… त्यांना पंतप्रधान आवास योजनेतून घर मंजूर झालं…. घर मंजूर झाल्यानंतर स्वतःच्या घरात आनंदाने राहण्याचं स्वप्न हे कुटुंब बघू लागलं…. पण कशाचं काय!!! नियतीने काही वेगळाच डाव मांडला होता…
जसं प्रत्येक शेतकरी उद्याच्या आशेवर त्याच्या आजच्या गरजा तेवत ठेवतो तसंच उद्या स्वतःच्या घरात आपल्याला राहायला मिळणार या दृढ विश्वासावर हे आज बांधकाम करत होते….. बांधकामासाठी त्यांनी सिमेंट मागवलं होतं… सिमेंट उतरवून चालक गाडी मागे घेत असताना रात्रीच्या अंधारात लक्षात न आल्यामुळे त्या गाडीचे चाक सातप्पा यांच्या पायावरून गेले…. सिमेंटची ट्रॉली किती जड असते हे आपल्याला मी सांगण्याची गरज नाही.. या अपघातात त्यांचा पाय तुटला आहे…
हातावर पोट असलेल्या या कुटुंबाकडे जमापुंजी असण्याचा विषयच नाही… त्यांचे काही हितचिंतक मित्र एकत्र येऊन त्यांनी सातप्पांचे ऑपरेशन करून घेतले आहे…. ऑपरेशनचाच खर्च दीड लाखांच्या घरात गेला असून पुढील 6 ते 8 आठवडे यांचा पाय सडू नये किंवा अन्य कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम होऊ नयेत म्हणून त्यांना रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखेखाली अति दक्षता विभागात ठेवावे लागणार आहे. त्यासाठी व अन्य काही उपचारांसाठी अजूनही बराच खर्च येण्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली असून त्याबद्दलचा तपशील मी आपल्यासमोर सादर करेनच…. तर घराचे सुखासीन स्वप्न बघणारे सातप्पा आज रुग्णालयात दुखण्याशी झुंज देत आहेत…. आपण त्यांचं दुखणं वाटून घेऊ शकत नाही पण दुःख मात्र नक्की वाटून घेऊ शकतो. चला तर मग या शेतकरी कुटुंबाचे दुःख वाटून घेऊयात… प्रत्येक जण आपापल्या परीने मदतीचा हात देऊयात. त्यांचे स्वतःच्या घरात राहण्याचे स्वप्न न मावळता त्यांना पुन्हा नव्याने उभं राहण्यासाठी सहकार्य करून त्यांच्यात नवी उमेद भरूयात…
जर कोणाला रुग्णालयात प्रत्यक्ष जाऊन त्यांची भेट घ्यायची असेल तर पुढील पत्त्यावर आपण भेट देऊ शकता… ते सोलापूर येथील मार्केट यार्ड जवळच्या यशोधरा रुग्णालयात दाखल आहेत… ज्या दात्यांना संपर्क साधून चौकशी व सहकार्य करायचे आहे त्यांच्यासाठी संपर्क क्रमांक आणि गुगल पे, फोन पे क्रमांक पुढे देतो आहे…. फोन पे क्रमांक सातप्पा पाटील यांचे चिरंजीव समर्थ सातप्पा पाटील. 9325306202
गुगल पे क्रमांक सातप्पा पाटील यांच्या सुविद्य पत्नी वैशाली सातप्पा पाटील. 8446183318 यापैकी आपण कोणाशीही संपर्क साधून माहिती मिळवू शकता व सहकार्य करू शकता….
थोडं मनातलं…. ही घटना घडल्यानंतर माझ्या बऱ्याच मार्गदर्शक स्नेहींनी त्यांना भेट दिली. ते जेव्हा तिथली परिस्थिती कथन करत होते तेव्हा प्रचंड वाईट आणि हळहळ वाटत होती…. आम्ही सगळे मित्र मिळून आपण सहकार्य करायचं तर कसं आणि किती याबाबतीत विचार करत होतो. तेव्हा मनात एक कल्पना आली… आपल्यातले अनेक जण बाहेर चहा पितो किंवा नाश्ता करतो. एखाद्या दिवसाचा चहा नाष्टा वगळून, वगळून म्हणण्यापेक्षा त्यागून जर ती रक्कम मदत म्हणून यांना पाठवली तर थेंबे थेंबे तळे साचे ही उक्ती सार्थ ठरेल व पाटील कुटुंबीयांवर ओढवलेले हे संकट दूर होईल… आम्ही मित्रमंडळी तर असे करतो आहोत, जर ही कल्पना आपल्याला आवडली असेल तर आपणही असं करू शकता…. किंवा आपल्या परीने वेगळी पद्धत अवलंबून खारीचा वाटा उचलू शकता…. हा लेखन प्रपंच करण्यामागचा एकमेव हेतू हाच आहे….
सातप्पा पाटील यांना आपल्या मदतीने रुग्णालयातून बाहेर काढूयात आणि त्यांच्या स्वप्नातल्या हक्काच्या घरात आनंदाने राहायला सहकार्य करूयात…
बदल फक्त चेहऱ्यावरील एका छटेचा आहे… आज ही संकटग्रस्त परिस्थिती आ वासून उभी असताना उमटलेली दुःखद छटा व उद्या आपल्या सर्वांच्या मदतीने पाटील कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर उमटणारी प्रसन्नतेची छटा.
मी शेवटी सर्वांना अगदी कळकळीची नम्र विनंती करतो की, आपण प्रत्येक जण शक्य तितका हातभार लावून आपल्यातील माणुसकीचे दर्शन घडवूयात. वाचक हो हा संदेश शक्य तितक्या लोकांपर्यंत पोचवूयात आणि यांना योग्य तितकी मदत मिळवून देऊयात….
लेखक – श्री रियाज तांबोळी
सोलापूर मो 7775084363
प्रस्तुती : मेघ:श्याम सोनावणे .
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
एखादी प्रसिद्ध व्यक्ती गेल्यानंतर तिचे स्मारक होते. अगदी स्मारक झाले नाही तरी त्याविषयी चर्चा तर होतातच.ते व्हावे की नाही.. व्हावे तर कुठे व्हावे.. कसे व्हावे यावर बरेच वादविवाद होतात.अलिकडे तर ‘स्मारक’ हा विषयच टिकेचा,कुचेष्टेचा झालेला आहे.
नाशिकला मात्र तात्यासाहेब शिरवाडकरांचे घर हेच स्मारक म्हणुन जपुन ठेवलेले आहे. तात्यांची ती खोली.. बसण्याची खुर्ची.. लेखनाचे टेबल..त्यावर असलेल्या तसबिरी.. चार्ली चैप्लीन आणि गडकर्यांच्या. तेथे गेल्यानंतर क्षणभर भास होतो..आत्ता तात्या आतल्या खोलीतुन बाहेर येतील..श्रीराम श्रीराम म्हणत.
असंच अजुन एक स्मारक माझ्या बघण्यात आलं होतं.गणपती पुळ्याजवळच्या मालगुंड गावी. कवी केशवसुतांचं.त्यांचंही रहातं घर असंच जपुन ठेवलंय. दाट माडांच्या बनातलं ते कौलारू घर.लाल चिर्यांपासुन बनवलेलं.बाहेर पडवीत असलेला झोपाळा.. आतील माजघर..स्वयंपाकघर.. त्यातीलच ती शंभर वर्षापुर्वीची भांडी. कुसुमाग्रज तर म्हणालेही होते एकदा.. हे केवळ घर नाही तर ही मराठी काव्याची राजधानी आहे.
ग.दि.माडगूळकरांचं पण एक असंच स्मारक होणार होतं.माडगुळ या त्यांच्या गावी.तेथे त्यांचं घर होतं.आणि एक मळा. मळ्यात होती एक छोटीशी झोपडी. तीन बाजुंनी भिंती. दार वगैरे काही नाही. गावातील इतर घरे धाब्याची.फक्त या झोपडीवर लोखंडी पत्रे. म्हणून याचे नाव.. बामणाचा पत्रा.
गदिमा.. म्हणजे अण्णा तसे रहात पुण्यात. पण कधी शहरातील धकाधकीच्या आयुष्याचा त्यांना कंटाळा येई.कागदावर नवीन काही उतरणं मुष्किल होई.अश्यावेळी त्यांना साद घाली तो हाच ..बामणाचा पत्रा.
इतर वेळी याचा वापर गोठ्यासारखाच.पण अण्णा आले की त्याचे रुपडे बदलुन जाई.सारवलेल्या जमीनीवर पांढरीशुभ्र गादी..लोड..तक्के.त्या कच्च्या भिंतीवर असलेल्या खुंटीवर अण्णांचे कडक इस्त्रीचे जाकीट.. सदरे..खाली बैठकीवर निरनिराळे संदर्भ ग्रंथांचे ढीग.हे अण्णांचे स्फुर्तीस्थान होते.
पुर्वाभिमुख असलेल्या या झोपडीत अण्णा मग मुक्काम ठोकत.इथली सकाळ त्यांना मोहवुन टाके.ते म्हणतात..
“गावात चाललेल्या जात्यावरीर ओव्या झोपलेल्या कवित्व शक्तीला जागे करतात. पहाटे वार्यावर येणारा पिकांचा वास हिरव्या चाफ्याच्या वासासारखा उत्तेजक वाटतो.सारे वातावरणाच असे की पुन्हा झोप नको वाटते. अशा वेळी मी एकटाच उठुन उभ्या पिकांमधुन हिंडुन येतो. दवात भिजलेली जोंधळ्यांची पाने पायाला लाडीक स्पर्श करतात. ओला हरभरा गमतीदार चावे काढतो,तर करडईची काटेरी झाडे पायावर पांढर्या आणि बोचर्या रेघोट्या मारतात.”
हिंडुन आलं की सुस्नात होऊन लेखनाच्या बैठकीवर ते येत.या मातीचाच गुण..झरझर शब्द कागदावर उतरत जात.मधुन घरचा डबा येई.बाजरीची भाकरी, लसणीची खमंग चटणी, आणि सायीचे दही. कधी जेवणासाठी घरी चक्कर असे. अण्णा म्हणतात..
जगातल्या कुठल्याही पक्वानाने होणार नाही एवढी त्रुप्ती त्या जेवणाने होते. मग पाटाच्या कडेला उभ्या असलेल्या गुलमोहराच्या गार सावलीचे मला बोलावणे येते. उजव्या हाताची उशी करुन मी मातीतच आडवा होतो. त्या भूमीतील ढेकळे मला रुतत नाही, खडे टोचत नाही. झोप अगदी गाढ लागते.”
तर असा हा ‘बामणाचा पत्रा’.अनेक अजरामर कवितांचा, कथा, पटकथांचा जन्म इथेच झाला.तो गाव..बामणाचा पत्रा,आणि गदिमा..हे अगदी एकरुप झाले होते. गदिमा गेले त्या वर्षी गावातली खंडोबाची यात्रा भरली नाही की कुस्त्यांचा फड भरला नाही.
गदिमा गेल्यानंतर व्यंकटेश माडगूळकर प्रथमच गावी आले होते.गदिमांचे वर्गमित्र आणि तालुक्यातील एक ज्येष्ठ नेते श्री बाबासाहेब देशमुख यांनी गावकर्यांची इच्छा बोलुन दाखवली. ते म्हणाले…
तुम्ही तिकडे मुंबई, पुण्यात आण्णांचे काय स्मारक करायचे ते करा.पण आमची एक इच्छा आहे.या गावी.. या वावरात अण्णांचं एक स्मारक हवं.
व्यंकटेश माडगूळकरांना पण पटलं ते.त्या रात्री ते ‘बामणाच्या पत्र्या’तच झोपले.सकाळी उठले. समोर पूर्व दिशा उजळत होती. आणि त्यांच्या डोळ्यासमोर त्यांच्या अण्णांचे स्मारक आकार घेत होतं.
ही सभोवार हिरवी शेते..हवेत भरुन राहिलेला ओल्या जमीनीचा, उभ्या पिकांचा गंध..मधे हा ‘बामणाचा पत्रा’..हाच तो दगड,ज्यावर बसुन अण्णा आंघोळ करत..बापु रामोशी भल्या पहाटेच तात्पुरत्या चुलवणावर मोठा हंडाभर पाणी तापवुन ठेवी.आंघोळ करतानाचे त्यांचे ते शब्द कानात घुमताहेत..
‘हर गंगे भागीरथी’.
विहीरीचं पाणी त्यांच्या डोक्यावर पडलं की खरंच त्याची गंगा भागीरथी होऊन जाई.
त्यांना वाटलं..
शिल्पकार भाऊ साठ्यांना बोलावुन घ्यावं.या आंघोळीच्या दगडाच्या जागी एखादं शिल्प त्यांच्या कल्पनेतुन घडवावं.वास्तुशिल्पी माधव आचवल यांनाही बोलवावं.त्यांच्या कल्पनेतुन इथे बरंच काही करावं.आजुबाजुला कायम फुललेली बकुळ, पलाशची झाडे लावावी. त्याखाली बाके.इथेच ती अण्णांची आरामखुर्ची ठेवावी. जानेवारीच्या थंडीत अण्णा इथे येत.त्यावेळी त्यांच्या अंगावर असणारा तो कोट..इथेच खुंटीवर टांगलेला असावा. त्यांची ती लोखंडी कॉट..ती पण इथेच कोपर्यात राहील. अण्णांची पुस्तके, हस्तलिखितं..सगळं इथं आणु.
हे गाव..इथली झाडंझुडं..पाखरं..पिकं..माणसं..हे सगळं मिळुनच इथे एका लेखकाचं स्मारक बनवु या.
व्यंकटेश माडगूळकरांच्या कल्पनेतलं हे स्मारक व्हायला हवं होतं..पण नाही झालं..त्याचं दुःख आहेच.पण अखेर स्मारक म्हणजे काय?कशासाठी असतं ते?
तर ती व्यक्ती कायम स्मरणात रहावी यासाठीच ना!
आणि गदिमांचा उर्फ अण्णांचा विसर कधी पडेल हे संभवतच नाही. चैत्राची चाहुल लागली की ‘राम जन्मला गं सखे..’ हे आठवणारच आहे. आणि आभाळात ढग दाटून आले की ‘नाच रे मोरा..’ ओठांवर येणारच आहे. त्यासाठी आणखी वेगळ्या स्मारकाची जरुरच काय?
☆ “पिंपळ आणि आंबा…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆
☆
आपले दु:ख, तेवढ्या मोठ्या मात्रेचे नसतांना अचानक कुणीतरी मोठ्या मात्रेने सांत्वन करायला पुढे आले की, थोडे गोंधळायला होते. हे सांत्वन झिडकारावे की त्यामागचा आपलेपणा पाहून नम्रपणे स्वीकारावे ? अशा संभ्रमात पडायला होते खरे..
बागेतल्या पिंपळाला असेच काहीसे त्यादिवशी झाले बागेतले आंब्याचे झाड त्याला सांगत होते, “बघवत नाही रे तुला पिंपळा.. शिशिर ऋतूने तुला अगदीच पर्णहीन, निस्तेज करून टाकलंय. पण धीर धर. काही दिवसातच वसंत सुरू होईल आणि येईल पुन्हा पालवी…. होईल पुन्हा पूर्वीसारखे रूप … होशील माझ्यासारखा…”
शिशिरात पर्णहीन अवस्थेत निरव शांततेतली आनंददायी ध्यानावस्था अनुभवणाऱ्या पिंपळाला यावर काय बोलावे, हे क्षणभर समजेना..
अनेकदा दुसऱ्याचे सांत्वन करतांना त्याचा दुःखभार हलका करण्याच्या हेतूपेक्षा, आपण खूप सुखात आहोत याचा काकणभर का होईना अभिमान दाखविण्याचा हेतू सांत्वन करणाऱ्याच्या मुखावर झळकत असतो. पण हा हेतू दिसला तरी त्यावेळी तसे बोलता येत नाही, याची समज आणि उमज पिंपळाला होती..
मंद स्मित करून पिंपळ आब्यांला म्हणाला, “तुझ्या प्रेमळ शब्दांसाठी खूप आभार. पण एक सांगू.. मी अजिबात दु:खात नाही. सृष्टीने सहाही ऋतूत आपले प्रारब्ध आधीच लिहून ठेवले आहे. कोणत्या झाडाने केव्हा फुलावे, बहरावे, कोमेजावे सगळे सगळे. आपल्या हातात फक्त मुळं आहेत आणि त्यांच्याव्दारे जमिनीतून जीवनरस घेणे आहे,.हे एकदा,उमगले की दुःखाचा लवलेश नाही “
“आपली मुळं आत सारखीच आहेत. फरक दिसतो, तो फक्त बाहेर.. जमिनीवर… पाने, फळे, फुले, खोड, उंची यात फक्त फरक. विविधता आणि सौंदर्यासाठी केलेला… हे एकदा कळलं की, आहे त्यात आनंद.
सुख-दुःखापलीकडील समाधानाचा, आनंदाचा अनुभव. आपल्या बाह्य रूपातल्या बदलांकडे पहाण्याची एक वेगळीच दृष्टी येते. एक समाधानी अवस्था येते. जिथे कुणाशीही तुलना नाही, तक्रार नाही. ठेविले अनंते तैसेचि रहावे। चित्ती असो द्यावे समाधान।”
पिंपळाच्या या बोलण्याने आंब्याचे समाधान झाले नाही. त्याने पिंपळाला विचारले, “खरे खरे सांग ! पर्णहीन झाल्याने तुझं रूप कुरूप झालय, पक्षी येईनासे झालेत, पानांची सळसळ नाही… याचे खरेच तुला दुःख नाही?”
धीरगंभीर आवाजात पिंपळ उत्तरला, ” नाही. अजिबात नाही. बाहेरच्या बदलणाऱ्या गोष्टींशी आपल्या सुखाला जोडून घ्यायचं आणि त्या गोष्टी बदलल्या की दुःखी व्हायचं, ही माणसं करीत असलेली चूक आपण का करायची? माझं सद्भाग्य की, तथागताचा सहवास मला लाभला आणि पानं, फुलं, फळं यापलीकडे जाऊन कायम मुळाकडेच पाहण्याची खोड मला लागली. ‘घट्ट मूळ’ आणि ही ‘खोड’ असली की आनंदाला बाधा नाही. बाह्य बदलांकडे पाहण्याची दृष्टीच बदलून जाते ”
“ तू म्हणतोस पाने नाहीत त्याचं दुःख. पण खरं सांगू .. शिशिर ऋतू माझा ५-६ हजार पानांचा भार हलका करतो. ते २-३ महिने खूप हलकं हलकं वाटतं ! तू हे सुख नाही अनुभवू शकत.. पानांचा भार नाही.
सळसळ नाही, पक्षांचे आवाज नाही. त्यामुळे ध्यान समाधीही दीर्घकाळ लावता येते. अधिक मुळाकडे जाऊन चैतन्याचा स्रोत देहभर भरून घेता येतो. वसंताला सामोरे जाण्याची ही पूर्वतयारी असते. म्हणूनच वसंत आला रे आला की अवघ्या सात दिवसात माझ्या देहभर पालवी फुललेली दिसते “
आंब्याला हळूहळू पिंपळाचे विचार पटत होते. पिंपळ पुढे बोलू लागला.” कुणाला आपण किती प्रिय आहोत, यावर आपण आपली प्रियता ठरवू नये. तुझाही मोहोर कधी जळतो.. कधी गळतो.. फळं नाही येत तेवढी… लोकं नाराज होतात.. फळांच्या अपेक्षेने प्रियता, जवळीकता असली की ती कधीतरी लोप पावते. पण फळाची अपेक्षा न ठेवता निरपेक्ष प्रेम केलं की प्रियता कायम रहाते. अशा निरपेक्ष प्रेम करणाऱ्या व्यक्ती त्यांच्या प्रेमाची आठवण म्हणून त्यांच्या वहीत, पुस्तकात पिंपळपान कायमचं ठेवतात. शिशिरात देहावरची पाने गळाली तरी ती वह्या-पुस्तकातील पाने तशीच असतात. त्यांना बघून मी धन्य होत असतो.”
आपल्या फळाला बाजारात मोठा भाव / प्रसिध्दी आहे, अशा समजुतीत असणाऱ्या आंब्याला पिंपळ आपल्याहून जाणीवेने, विचाराने खूप मोठा आहे, हे एव्हाना जाणवले होते. पिंपळाप्रती आदरभाव, कौतुक व्यक्त करावं म्हणून आंबा पिंपळाकडे वळला तर काय? पिंपळ डोळे मिटून ध्यानस्थ झाला होता. पर्णहीन पिंपळाचं झाड आंब्याला स्वतःहून सुंदर दिसलं..समाधानी जाणवलं…आणि मुळाकडे जायची खोड लावून घेण्याचा निश्चय त्याने मनोमन केला.
☆
लेखक : अज्ञात
संग्राहिका: सौ. मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
काल दुपारी मी टॅक्सीने माहीमहून सिटीलाईटला चालले होते. शोभा हॉटेलच्या सिग्नलला माझी टॅक्सी थांबली.. तेव्हा माझे लक्ष साडीच्या दुकानाच्या बाहेर बसलेल्या रफफू वाल्याकडे गेले. तो बऱ्याच कलरचे कापडाचे कापलेले छोटे छोटे तुकडे एकत्र बांधलेल्या गठ्ठ्यातून उलट सुलट करून शोधत होता. तो बहुदा रफू करायला मॅचिंग कापड शोधत असावा. आत्तापर्यंत मी रस्त्यावर रफू करताना पाहिले होते पण का कोणास ठाऊक आज माझ्या डोक्यात एक विचार येऊन गेला की खरंच एखादी साडी ड्रेस पॅन्ट किंवा कोणत्याही चांगल्या कपड्याला हा रफूवाला किती सफाईने पडलेले छिद्र अशाप्रकारे दुरुस्त करतो की आपल्याला कळत पण नाही की अगोदर इथे फाटले होते आणि आपण ते वस्त्र वापरू शकतो.
एखाद्या नवीन कपड्याला छोटेसे भोक पडले तर आपला जीव चुटपुटतो, आपल्याला ते वस्त्र वापरतायेणार नाही याचे वाईट वाटते.. रफू वाल्याच्या हातातल्या कलेने आपण ते वस्त्र वापरू शकतो मग मनात विचार आला की कधीकधी आपल्या एवढ्या मौल्यवान आयुष्यात एखादे नाते खराब झाले तर आपण दुखावतो ,कधी कधी ते नाते संपुष्टात येते. एखादा बॅड पॅच आला तर निराश होतो. मग अशावेळी आपण रफूवाला का होत नाही? तेवढाच पॅच रफू करून परत नव्याने जीवनाकडे पहात तो पॅच विसरून जात नाही . अशावेळी रफूवालयाचे तंत्र आपणआत्मसात केले पाहिजे, अशावेळी कोणती सुई कोणत्या रंगाचे धागे मिक्स करून वापरायचे व पॅच भरून काढायचा व नव्याने सुरुवात करायची हे पाहायला हवे. थोडासा पॅच दिसेल पण परत नव्याने ते वस्त्र वापरू शकतो यासाठी फक्त हवे असते छोट्या छोट्या रंगीत आठवणींचे गाठोडे आणि प्रेमाची सुई. कोणास ठाऊक कोणत्या वेळी कोणते चांगले क्षण दुखावलेले नाते रफू करायला उपयोगी पडेल व आपण आनंदी होऊ.
चला तर मग या नवीन वर्षात छोट्या छोट्या जुन्या चांगल्या आठवणी मनाच्या कप्प्यात जपून ठेवूया आणि वेळ पडेल तेव्हा रफू वाला होऊया.
लेखक – अज्ञात.
प्रस्तुती – सौ. अर्चना सुरेश देशपांडे
पुणे
मो. ९९६०२१९८३६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈
☆ परि तुझ्यावाचुनि करमेना… भाग – १ ☆ प्रस्तुती – सौ उज्ज्वला केळकर ☆
माझी एक सख्खी मैत्रीण म्हणजे शुभदा साने. तशा आमच्या प्रत्यक्ष गाठीभेटी कमी होतात. पण आठवड्यातून एकदोनदा तरी फोन होतोच. दिलखुलास गप्पागोष्टी होतात. जून-जुलै च्या दरम्यान फोनमधून हमखास विचारणा असते, ‘कुठली कुठली बोलावणी आली…? काय काय झालं?’… बोलावणी म्हणजे दिवाळी अंकांची बोलावणी… साहित्य पाठवण्याविषयीचं पत्र आणि काय काय झालं, म्हणजे, काय काय लिहून झालं वगैरे… वगैरे… आम्हा मैत्रिणीत सगळ्यांत जास्त आणि सगळ्यात आधी बोलावणी तिला येतात. त्यामुळे हा काळ तिच्या दृष्टीने खुशीचा तसाच व्यस्ततेचाही असतो.
यंदा मात्र थोडंसं वेगळं घडलं. वेगळं म्हणजे काय? तर जूनअखेर अखेरच मला ‘मेहता ग्रंथजगत’ कडून पत्र आलं. फोनवर तसं तिला सांगितलं. ती म्हणाली, ‘हो का? कशावर लिहायचंय?’ मी म्हटलं, ‘माझा सहचर’… पत्र वाचल्यावर एकदम शाळेच्या दिवसांची आठवण झाली. म्हणजे शाळेत नाही का आपण निबंध लिहीत होतो? ‘माझी आई’, ‘माझी मैत्रीण, दादा, ताई, आजी-आजोबा इ.इ.’ माझं वाक्य पुरं होण्यापूर्वीच ती म्हणाली, ‘माझा मोत्या…’ आणि खिदळायला लागली. मग लगेच म्हणाली, ‘गंमत केली ग! पण त्याचा एक गुण आहेच तुझ्या मिस्टरांमध्ये…’ मी जरा विचारात पडले. म्हणजे माझ्यावरचं त्यांचं वसा वसा ओरडणं तिच्यापर्यंत पोचलं की काय? तशी मी सूज्ञपणे आणि संयमाने मैत्रिणीसमोर युध्दाचे प्रसंग टाळण्याचा प्रयत्न करत असते. तरी पण संगोवांगी तिच्यापर्यंत पोचलं की काय? पण ती गुण म्हणाली… की बदलत्या काळात अनेक बदलांप्रमाणे ‘गुण’ या शब्दाचाही अर्थ बदललाय? क्षणभरात एवढं सगळं माझ्या डोक्यात भिरभरून गेलं. एवढ्यात ती पुढे म्हणाली, ‘आज्ञाधारकपणा… तुमचे मिस्टर खूपच ऐकतात बाई तुमचं… आमच्याकडे नाही बाई असं…’ मला वाटतं, प्रत्येक नव-याला शेजा-याची बायको जास्त देखणी वाटते, तसं प्रत्येक बाईला दुसरीचा नवरा जास्त शहाणा, समंजस, समतोल विचारांचा, मुख्य म्हणजे तिच्या मुठीत रहाणारा वाटतो. निदान माझा सहचर असा आहे, याबद्दल माझ्या सगळ्या मैत्रिणींची शंभर टक्के खात्री आहे आणि तसं काही नसलं, तरी तसंच आहे, हे इतरांना पटवून देणं माझ्या सहचराला छानच जमतं. म्हणजे, तुलना केलीच तर सृजनाची प्रतिभा माझ्यापेक्षा त्याच्याकडे जास्त आहे. आता ते फक्त लिखाणातून नाही, तर बोलण्यातून, वाणीतून जास्त प्रसवतं एवढंच!
त्यानंतर एकदा आम्ही सगळ्या मैत्रिणी एकत्र जमलो होतो. साहित्यकलेपासून राजकारण… क्रीडेपर्यंत सगळ्या विषयांना पालाण घालून झाल्यावर गप्पांना खरा रंग भरला, तो आमच्या यांना.. आमच्या घरात… आमची मुलं… असं नि तसं सुरू झाल्यावर, आता माझ्या सगळ्याच मैत्रिणींना वाटतं, आमचे हे म्हणजे सद्गुणांचा पुतळा… मग मी म्हणून टाकलं,
‘आमच्या सुखी आणि समृध्द सहजीवनाचं मधुर पक्व फळ
चाखत माखत खातोय आम्ही गेली कित्येक वर्षं….’
‘याचं रहस्य?’ एकीने लगेच टोकलं. म्हटलं,
‘रहस्य कसलं त्यात? आमच्या घरात नेहमीच घडतं माझ्या इच्छेप्रमाणे…’
‘तेच तर आम्ही म्हणतो…’
सगळ्यांनी एकदमच गिल्ला केला.
‘थांबा… थांबा… पुरतं ऐकून घ्या…’
मी त्यांना थांबवत म्हणते.
‘आमच्या घरात नेहमीच घडतं माझ्या इच्छेप्रमाणे
जेव्हा एकमत असेल तेव्हा
आणि घडतं त्यांच्या इच्छेप्रमाणे
दुमत असेल तेव्हा…’
क्षणभर त्या गोंधळल्याच. ‘बंडल मारू नका’ त्या एकदमच म्हणाल्या. ‘शप्पथ!’ मी म्हटलं. हे हे आत्ता म्हटलं ना, ते सुध्दा त्यांचंच म्हणणं आहे. मी आपली कवितेच्या फॉर्ममध्ये त्याची मांडणी केली, एवढंच!
विद्येचे माहेरघर असलेल्या आणि साहित्यिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचं केंद्रबिंदू असलेल्या पुण्यनगरीतून १९६५ साली, लग्न होऊन मी माधवनगरला आले. गाव सांगलीपासून तीन-चार मैलावर, पण वहातूक व्यवस्था फारशी नव्हती. अधूनमधून येणा-या महामंडळाच्या बसेस किंवा मग टांगे. टू व्हिलर म्हणजे सायकलीच प्रामुख्याने. घराघरात स्कूटर्स दिसायचा काळ अद्याप खूपच दूर होता. त्यामुळे सांगलीला होत असलेल्या कार्यक्रमांचा मला फारसा उपयोग नसे.
घर मोठं होतं. बारा पंधरा माणसं नित्याचीच. येणं जाणंही खूप असे. घरात माणसांचा तसाच कामाचाही खूपच धबडगा असे. गृहस्थाश्रमाच्या रहाटगाडग्यात उठल्यापासून झोपेपर्यंत फक्त काम आणि कामच असे. मन-बुध्दीला, विचार, कल्पनाशक्तीला तसा विश्रामच असे. माय स्पेस किंवा माझा अवकाश याबद्दल आज जे सातत्यानं बोललं जातं, तो मला त्यावेळी बिंदूतसुध्दा मिळत नव्हता. नाही म्हणायला, गावात ब-यापैकी असलेले वाचनालय आणि महिला मंडळ हे हिरवळीचे तुकडे होते. ‘वंदना’ हे वार्षिक हस्तलिखित मंडळातर्फे निघत असे. त्याचं संपादन, महिला मंडळासाठी बसवायचे कार्यक्रम यातून थोडीफार कल्पनाशक्तीला चालना मिळायची.
मला आठवतंय, मी माझी पहिली कथा ‘वंदना’ हस्तलिखितासाठी लिहिली होती. पण ते सारं कधीमधी. रोजच्या जीवनात माझ्या शिक्षणाशी संबंधित असं काहीच नव्हतं. यामुळे होणारी माझी घुसमट यांच्या लक्षात आली. (आमचा काळ हा, हे अहो… जाहोचा! इकडून तिकडून पुढे एक पाऊल पडलेलं. सर्रास ‘अरे तुरे… चा काळ यायला अजून वीस-पंचवीस तरी वर्षं लागणार होती.) लग्नानंतर दुस-या वर्षी मला बी.एड्. ला जाणार का? म्हणून विचारलं. त्या वेळी शिक्षकी पेशाविषयी आस्था वा आकर्षण म्हणून नव्हे, तर स्वयंपाकघर-माजघर, उंबरठा-अंगण या परिघाबाहेर पाऊल टाकायची संधी मिळणार, म्हणून मी ‘होय’ म्हणून टाकलं. सकाळी कॉलेज, दुपारी पाठ, एवढं सोडून जागं असलेल्या वेळात घरकाम, त्यामुळे खूप फरफट झाली. पण मजाही खूप वाटली. शारीरिक ओढाताण झाली, तरी मन प्रसन्न, टवटवित राहिलं. कॉलेजमधील विविध कार्यक्रम, पाठाची तयारी यात कल्पकतेला खूप वाव मिळायचा. त्यावेळी जरी मी घराबाहेर पडण्याची संधी एवढ्याच दृष्टीने बी.एड्. कडे पाहिलं असलं, तरी पुढच्या आयुष्यात मला त्याचा खूप फायदा झाला आणि ते करायला सुचवलं होतं माझ्या सहचराने.
☆ देव देव्हा-यात नाही, देव नाही देवालयी… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆
सुधीर ना तू ?
अरे तुझ्या नावातच धीर धरणे आहे.
काळजी करु नकोस,
आम्ही सगळे तुझ्यासोबत आहेत.
सर संघ चालकांचे हे प्रेरणादायी शब्द सुधीर फडके यांना अडचणीच्या वेळी उभारी देऊन गेले.
काही दिवसांपूर्वी जागतिक पुस्तक दिनानिमित्य एका शाळेत माझ्या पुस्तकातील ‘उत्प्रेरक’ या प्रकरणावर बोलताना मी म्हणालो होतो की आयुष्यात अशा काही व्यक्ती / घटना- प्रसंग / गोष्टी येतात की ते तुमच्यासाठी ‘कॅटॅलिस्ट’ बनतात.
आज ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ सिनेमा पाहिल्यावर माझ्यासाठी हा सिनेमा नक्कीच ‘उत्प्रेरक ‘ ठरेल. स्वातंत्र्यवीर सावरकरांवरचा सिनेमा पहायचा राहिला हे शल्य हा सिनेमा पाहून थोडे का होईना कमी झाले.
स्वत: निर्माण केलेल्या वीर सावकर सिनेमाची ४ तिकीटे विकत घेऊन फडके सिनेमा बघायला येतात ही सिनेमाची सुरवात. दूरदर्शन वरील प्रतिभा आणि प्रतिमा या कार्यक्रमातील मुलाखतीतून बाबूजींचा जीवनपट फ्लॅशबॅक स्वरूपात उलगडू लागतो.
अत्यंत संघर्षमय तारुण्याचा काळ, आत्महत्या करावी इतका टोकाचा विचार पण सुदैवाने संघ स्वयंसेवक म्हणून मिळत जाणारी मदत आणि एका टप्यावर आयुष्याला मिळालेली कलाटणी. थक्क करणारा बाबूजींचा हा प्रवास
मुंबई – नाशिक- मालेगाव – पंजाब-कोलकत्ता- कोल्हापूर – पुणे या त्यांच्या प्रवासाबरोबर प्रत्येक घटनेला अनुसरून त्यांचीच गाणी,यांची छान गुंफण झाली आहे
हा माझा मार्ग एकला – ते – फिटे अंधाराचे जाळे व्हाया गीत रामायण ऐकता ऐकता ३ तास कसे संपतात कळत नाही
गदिमा – बाबूजींची जुगलबंदी छान रंगलीय
काही टवाळखोर निरीक्षणे
१) दूरदर्शन च्या आवारात बाहेर फिरताना काही क्षण सुनील बर्वें मधे अजीत पवार यांचा भास झाला. तर सिनेमातील आशा भोसलेंच्या केसांचा रंग जरा पांढरा असता तर अगदी सुप्रिया ताई…😬
२) गीत रामायण रौप्य महोत्सवी कार्यक्रमात पुण्याला अटलजी त्यांच्या भाषणात म्हणतात ‘सुधीर फडके और मेरा पुराना रिश्ता है’😳 ( इथे आमचाच घोळ झाला)
३) अंकित काणे हे आमचे फेसबुक मित्र. त्यांनी आधीच एक पोस्ट टाकून या सिनेमात त्यांनी पु.लं.ची भूमिका केली हे सांगितले होते म्हणून बरं. नाहीतर हे पु.लं आहेत हे कळलेच नसते 😷
४) किशोर कुमार हे विनोदी नट होते पण त्यांचं फारच विनोदी पात्र इथे सादर केले गेले आहे . 😄
बाबूजींनी संगीतबद्ध केलेले आणि त्यांनी म्हणलेले गाणे
‘ दिन है सुहाना आज पहिली तारीख है ‘
तर योगायोगाने आज १ ल्या तारखेलाच
गुरु ग्रह मेषेतून, वृषभ या रसिक राशीत गेला असताना आमच्यासाठी
(पण आज जेव्हा मी विचार करते तेव्हा ‘आपण काहीतरी चुकीचे केले’ याची मला खूप रुखरुख वाटते.आपण आजोबांपासून हे लपवायला नको होतं.) – इथून पुढे —
इतके सगळे जरी असले ना तरी भाई आमचे खूप लाड करायचे. शनिवारी— रविवारी दुपारी ते आमच्याबरोबर पत्ते खेळायचे. ‘झब्बु’ नावाचा खेळ आम्ही खेळायचो. त्यावेळी भाई आम्हाला खूप विनोदी किस्से सांगायचे. आम्हाला चिडवायचे, आमच्याबरोबर मोठमोठ्याने हसायचे. संध्याकाळी आम्हाला चौपाटीवर फिरायला घेऊन जायचे. बिर्ला क्रीडा केंद्रापासून थेट नरिमन पॉईंट पर्यंत आम्ही त्यांच्याबरोबर पायी चालत जायचो. त्या वेळच्या मुंबईच्या समुद्राचे सौंदर्य काय वर्णू? त्या फेसाळत्या लाटा, तो थंडगार वारा, समोर धनवानांच्या सुंदर इमारती, रोषणाई असलेली दुकाने आणि अतिशय वेगात चालणारी दिमाखदार वाहनं. आजोबां बरोबरचा हा समुद्रावरचा पायी फिरण्याचा अनुभव अविस्मरणीय असायचा. या पायी फिरण्याचा काळातही भाई आम्हाला अनेक गोष्टी सांगायचे. वेळेचे महत्व, बचतीचे महत्त्व, शिस्त स्वच्छता यांचं महत्त्व वगैरे अनेक विषयावर ते बोलायचे. त्यांची मुख्य तीन तत्त्वे होती. पहिलं तत्व डी टी ए. म्हणजे डोंट ट्रस्ट एनीबडी.
दुसरं— टाईम इज मनी.
आणि तिसरं— इफ यू सेव्ह पेनी पाऊंड विल सेव्ह यु.
समुद्रावरून फिरून आल्यानंतर आम्हाला ते कधी जयहिंदचा आईस्क्रीम नाहीतर शेट्टीची भेळपुरी खायला न्यायचे. आम्ही साऱ्या नातवंडांनी सुट्टीत त्यांच्याबरोबर काश्मीर ते कन्याकुमारी असा भरपूर प्रवास केलाय. अनेक नाटकं, चित्रपट आम्ही सुट्टीमध्ये भाईंबरोबर पाहायचो. रात्री रेडिओ जवळ बसून एकत्र, आकाशवाणीवरून सादर होणारी नाटके, श्रुतिका ऐकायचो. फक्त एकच होतं या सगळ्या गंमतीच होत्या. तरीही यात भाईंची शिस्त आणि त्यांच्या आराखड्याप्रमाणे घडायला हवं असायचं. माझ्या बंडखोर मनाला ते जरा खटकायचं. मला वेगळंच आईस्क्रीम हवं असायचं. भाईंनी भेळपुरी मागवलेली असायची तर मला शेवपुरी खायची असायची. आता या आठवणी गंमतीच्या वाटतात.
मी कधी कधी आजोळी आले असताना पाठीमागच्या आवारात आऊट हाऊस मध्ये राहणाऱ्या नंदा नावाच्या मुलीशी खेळायला जायची. तिचं घर अंधारलेलं कोंदट होतं. घराच्या पुढच्या भागात तिच्या वडिलांचं पानबिडीचं दुकान होतं. विड्या त्यांच्या घरातच वळल्या जात. त्यामुळे तिच्या घरात एक तंबाखूचा उग्र वास असायचा. पण तरीही मला तिच्याकडे खूप आवडायचं. तिथे मी आणि नंदा मुक्तपणे खेळायचो. कधीकधी तर मी तिच्याकडे जेवायची सुद्धा. आम्ही दोघी गवालिया टॅंक वर फिरायला जायचो. मी परवानगीशिवाय जायची. नंदाला मात्र परवानगीची गरज वाटायची नाही. तिच्या घरात कसं मुक्त वाटायचं मला आणि हो तिच्याबरोबर मी, ती मडक्यातल्या पाण्यात बुडवून दिलेली चटकदार पाणीपुरीही खायची. माझ्यासाठी मात्र हा सारा चोरीचा मामला असायचा पण माझ्या आजोळच्या वास्तव्यातला तो माझा खरा आनंदही असायचा. तिथेच दुसऱ्या आऊट हाऊस मध्ये गुरखा राहायचा. त्याची घुंगट घातलेली बायको मला फार आवडायची. ती, माझे आणि नंदाचे खूप लाड करायची. तिच्या हातचे पराठे आणि लिंबाचं लोणचं! आठवून आताही माझ्या तोंडाला पाणी सुटतं.
पाठीमागच्या आवारात अनेक कामं चालायची. पापड वाळवणे, उखळीत लाल मिरच्यांचे तिखट कुटणे, धान्य वाळवणे, निवडणे वगैरे. ही सारी कामं सदनिकेतल्या लोकांचीच असायची पण ती करून देणारी आदिवासी माणसं असायची आणि त्यातही बायाच असायच्या. त्यांचं वागणं, बोलणं,काम करताना गाणं, त्यांनी घातलेले दागिने, कपडे यांचं मला फार अप्रूप वाटायचं. माझी त्यांच्याशी मैत्री व्हायची.अद्ययावत संस्कृतीतून बाहेर येऊन या लोकांच्यात मी रमायची.माझी भावंडं मला चिडवायची.पण माझ्यावर त्याचा काहीच परिणाम व्हायचा नाही.
निकालाच्या दोन दिवस आधी आम्ही भाईंना निरोप देऊन ठाण्याला परतायचचो. तेव्हा कळत नव्हतं आईच्या डोळ्यातल्या अश्रूंचं नातं. भाईही पाणावायचे. एवढा पहाडासारखा माणूस हळवा व्हायचा. अजूनही सांगते, तेव्हा माझ्या मनात फक्त ठाण्याला, आपल्या घरी परतण्याच्या विचाराचा आनंद मनात असायचा. या वाहणाऱ्या पाण्याचा अर्थ तेव्हा नाही कळायचा पण आता कळतो. आता त्या आठवणीनेही माझे डोळे गळू लागतात. लहानपण आणि मोठेपण यात हेच अंतर असतं.
ठाण्याच्या घरी आजी उंबरठ्यावर वाट पाहत असायची, तिने आमच्यासाठी माळ्यावर आंब्याच्या अढ्या पसरवलेल्या असायच्या. मी घरात शिरल्याबरोबर आजीला मिठी मारायची आणि म्हणायची,
“जीजी मला तुझ्या हातचा आक्खा आंबा खायचा आहे.”
‘आक्खा आंबा’ ही कल्पना खूप मजेदार आहे बरं का?
भाईंकडे असतानाही आम्ही खूप आंबे खाल्लेले असायचेच. पण खूप आणि मनमुराद यात फरक आहे ना? तिथे आंबे व्यवस्थित कापून एकेकाला वाटले जायचे. म्हणून हे आक्खा आंबा खाण्याचे सुख काय होतं हे कसं सांगू तुम्हाला?
आणखी एक —घरी आल्यावर जाणवायचं!
”अरे! इथे तर कायम आजी आपल्या सोबतच असते.” म्हणजे खरंतर आपलं हेच कायमचं आजोळ नाही का? पण एका आजोळा कडून दुसऱ्या भिन्न आजोळाकडे जाणाऱ्या प्रवासात मी जीवनातले विविध धडे शिकले. एक आजोळ मायेचं, उबदार. दुसरं शिस्तीचं, नियमांचं. या दोन भिन्न प्रकृतींनी माझं जीवन नेटकेपणानेच घडवलं. त्या आजोळाकडचे भाई खूप उशिरा कळले, उशिरा जाणवले.
आज पोस्टाच्या पाकिटावर व्यवस्थित पत्ता लिहितानाही भाईंची आठवण येते. कपड्यांच्या घड्या घालताना भाईंची शिकवण आठवते. मी माणसांना चाचपडत असते तेव्हा आठवतं, भाई म्हणायचे,” कुणाला घरात घेण्याच्या आधी त्याची परीक्षा घ्या. संपूर्ण विश्वास कुणावरही ठेवू नका.”
“वस्तूंच्या जागा बदलू नका” ही त्या आजोळची शिकवण आयुष्यभर निरनिराळ्या अर्थाने उपयोगी पडली. किती आणि काय काय लिहू? थांबते आता.
पण माझ्या आजोळी ज्यांनी माझी झोळी कधीच फाटू दिली नाही त्या सर्वांच्या स्मृतींना कृतज्ञतापूर्वक प्रणाम !
☆ एक पेला दुधाची कहाणी… – संग्राहक : श्री सुनिल शिराळकर ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆
तोन्से माधव अनंत पै.
एक पेला दुधामुळे सुरू झाली चक्क एक बँक आणि एक विद्यापीठ!!!
खुलभर दुधाची कहाणी तुम्ही सगळ्यांनीच वाचली असेल…
पाऊस पडावा म्हणून राजा प्रजेला घरात असलेलं सर्व दूध देवळाच्या गाभार्यात ओतायला सांगतो. गाभारा भरला की पाऊस येणार हे नक्की असतं. घरातली मुलंबाळं उपाशी ठेवून गावकरी गाभार्यात दूध टाकत राहतात. पण गाभारा भरत नाही…
संध्याकाळी एक आज्जी घरातल्या लेकरांना आणि गाईच्या वासरांना दूध पाजून नंतर खुलभर दूध घेऊन गाभार्यात अर्पण करते आणि काय आश्चर्य!! गाभारा दुधाने भरून वहायला लागतो.
या कथेचे पौराणिक तात्पर्य काही असो, आजच्या काळातले तात्पर्य असं आहे की विकासाच्या गाभार्यात प्रत्येकाने खुलभर दूध टाकले तर समृध्दीचा लोट वाहायला वेळ लागत नाही. फक्त त्या आज्जीबाईसारखं कोणीतरी मार्गदर्शन करायला हवं!
अशीच एक पेला दुधाची कहाणी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत…
ही कथा आहे तोन्से माधव अनंत पै यांची.
कर्नाटकातल्या एका छोट्या गावात यांचा जन्म झाला. १९२० साली हा तरूण बंगळूरला डॉक्टर व्हायला गेला. मुळात अत्यंत हुशार असलेल्या तोन्से माधव अनंत पै यांचं शिक्षण लवकरच आटपलं. त्यांच्या मालपे या गावातच त्यांनी दवाखाना सुरु केला.
खरं सांगायचं तर या छोट्या गावातल्या डॉक्टरकीत त्यांना रस नव्हता. त्यांना जपानला जाऊन उच्च शिक्षण घ्यायचं होतं पण त्याला आईवडीलांनी मोडता घातला होता. नाईलाजाने मन मारून तोन्से माधव अनंत पै यांनी आपला दवाखाना त्या छोट्या गावात चालू ठेवला होता.
मालपे हे छोटंसं मच्छीमारांचं गाव होतं… सर्दी, खोकला, हगवण, उलट्या हे वर्षभर छळणारे रोग त्या गावातही होते. पण डॉक्टर पै यांना मात्र व्यवसायात काही केल्या आर्थिक यश मिळत नव्हतं. तुटपुंज्या कमाईवर दवाखाना कसाबसा चालत होता.
एकीकडे उच्च शिक्षण घेण्याची संधी हुकली होती आणि दुसरीकडे पुरेशी कमाईपण नव्हती. अशावेळी इतर तरुणांचे होते तेच झाले! त्यांना अत्यंत नैराश्याने ग्रासले.
अशाच चिंतेत असताना एक दिवस त्यांच्या लक्षात आले की त्यांचे उत्पन्न न वाढण्याचं कारण त्यांच्याकडे येणारे गरीब पेशंट आहेत. मग साहजिकच गरीबांचा डॉक्टर गरीबच राहणार!
थोडं निरीक्षण केल्यावर त्यांच्या हे लक्षात आलं की गावात पुरुष फक्त मच्छीमारी करायचे. मासे विकणे आणि पैसे मिळवणे हे काम बायका करायच्या. बायकांच्या हातात पैसे आले की खर्च वगळता राहिलेली जमा पुरुष दारुत खर्च करायचे.
डॉक्टरांनी त्यांच्याकडे येणार्या बायकांना त्याची बचत किती हे विचारल्यावर त्या हातात असलेली चिल्लर दाखवायच्या. त्या चिल्लरीतून डॉक्टरांनी चार आणे स्वत:कडे जमा करायला सुरुवात केली.
दोन चोपड्यांवर हा बचतीचा कारभार सुरु झाला. एक चोपडी डॉक्टरांकडे, तर दुसरी खातेधारकाकडे!
सुरुवातीला येणारे नकार, नकाराची कारणं मोडून डॉक्टरांनी गावातल्या बायकांना बचतीची सवय लावली. काही दिवसांतच काही हजार रुपये जमा झाले. आजच्या काळात हजार म्हणजे फार मोठी रक्कम नाही, पण १९२० साली ही रक्कम फारच मोठी होती.
असा जन्म झाला एका बचतीच्या सवयीचा, ज्याला नंतरच्या वर्षांमध्ये नाव मिळालं- ‘पिग्मी डिपॉझीट स्कीम’.
इथे या कथेचा पहिला भाग संपला.
बायकांना बचतीची सवय लागली.
पैसे जमा झाले.
पण पुढे काय???
इथे सुरु झाला या कथेचा दुसरा अध्याय…!
त्यांच्या दवाखान्यात येणार्या बायकांना त्यांनी त्यांची मुलं वारंवार आजारी का पडतात याचं कारण समजावलं… त्यांच्या आहारात रोज एक ग्लास दूध मुलांना द्यायला सांगितलं.
पुन्हा एकदा बायकांनी तक्रार केली,
“पैसे खायला पुरत नाहीत, दूध आणायचे कुठून?”
यावेळी डॉक्टरांचे उत्तर तयार होते.
“घरी गाय पाळा!”
हा उपाय तर बायकांनी हसण्यावारीच नेला. “एक पेला दुधाचे पैसे जवळ नाहीत, तर गाय कुठून आणणार?”
डॉक्टरांनी त्यांना सांगितलं,
“मी कर्ज देतो. त्यातून गाय घ्या.”
पुढचा प्रश्न होता- ‘कर्ज परत करायचे कसे?’
यावर डॉक्टरांनी त्यांना एक योजना समजावून सांगितली…
“बघा तुमच्या जमा पैशांतूनच मी कर्ज देतो. तुम्ही घरापुरते दूध ठेवून बाकीचे मला विका. त्यातून जे पैसे येतील त्यातून कर्ज फेडता येईल.”
लक्षात घ्या, हा १९२०-३० चा काळ होता. बायकाच काय, पण पुरुषही निरक्षर-अडाणी होते. ही योजना त्यांचा गळी उतरायला वेळ लागला. पण एका बाईंनी हे कर्ज घेतले, दूध विकायला सुरुवात केली. त्यानंतर ‘मी पण – मी पण’ असं म्हणत सगळ्या बायकांनी गायी घेऊन दूध विकायला सुरुवात केली.
हळूहळू कर्ज फिटायला लागले, घरातल्या पोराबाळांना दूध मिळायला लागले, बचत वाढायला लागली. काही वर्षांतच ही योजना इतकी यशस्वी झाली की या योजनेतून सहकारी दूधसंस्था उभी राहिली!
दुसरीकडे डॉक्टरांच्या बचत योजनेत इतके पैसे जमा व्हायला लागले की त्यांनी चक्क एक बँक सुरू केली. तिचं नाव होतं…
‘कॅनरा इंडस्ट्रीअल अँड बॅकींग सिंडीकेट लिमिटेड’.
१९२५ साली या बँकेची पहिली शाखा कर्नाटकात ऊडुपी इथे सुरु झाली. १९३७ साली मुंबईच्या चेक क्लिअरींगमध्ये या बँकेची नोंदणी झाली.
याच दरम्यान मणिपाल येथे डॉक्टरांनी महाविद्यालयांची सुरुवात केली. काही वर्षांतच मेडिकल -इंजीनिअरींगची कॉलेजेस पण सुरु झाली. आज जगातल्या काही उत्कृष्ट विद्यापीठांमध्ये गणल्या जाणाऱ्या यादीत असलेल्या ‘मणिपाल विद्यापीठा’ची स्थापना अशी झाली. डॉक्टरांनी सुरु केलेल्या बँकेला आज आपण ‘सिंडीकेट बँक’ म्हणून ओळखतो!
एका छोट्या प्रयत्नातून अस्तित्वात आलेल्या सिंडीकेट बँकेची ही कथा आहे…
डॉक्टर टी.एम.ए. पै यांची ही प्रेरणादायक कथा आहे!
डॉक्टर टी.एम.ए. पै यांच्या आयुष्यातल्या आणखी एक घटना सांगितल्याशिवाय हा लेख अपूर्णच राहील…
डॉक्टर टी.एम.ए. पै हे नेहेमी व्यवसाय वाढवायच्या प्रयत्नात असायचे. अशाच एका कामासाठी जात असताना त्यांची ओळख एका गुजराती व्यापार्याशी झाली.
त्या व्यापार्याला यार्नचे लायसन्स हवे होते. पण त्याची ओळख कमी पडत होती. डॉक्टर टी.एम.ए. पै यांनी त्यांच्या ओळखीचा वापर करून ते लायसन्स मिळवून दिले.
त्या घटनेनंतर भारतीय उद्योगात एका नव्या कंपनीचा जन्म झाला. तिचं नाव आहे- रिलायन्स इंडस्ट्रीज आणि तो व्यापारी म्हणजे धीरुभाई अंबानी!
डॉ. पै यांनी केलेली मदत धीरुभाई अंबानी कधीच विसरले नाहीत. डॉ. पै असेपर्यंत रिलायन्सच्या बोर्डावर त्यांच्या कुटुंबापैकी एक सदस्य कायम असायचा!
आजही रिलायन्सचा मुख्य बँकर ‘सिंडीकेट बँक’च आहे.
काही महिन्यांपूर्वीच ‘सिंडीकेट बँके’चे ‘कॅनरा बॅंके’त विलीनीकरण झाले… पण दुधाच्या एका ग्लासमधून निर्माण झालेली ही बँक कधीच विस्मरणात जाणार नाही!
संग्राहक : श्री सुनिल शिराळकर
प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈