मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “मनाची पिशवी…” — ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

??

☆ “मनाची पिशवी…” — ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

परवा बाजारात गेले होते••• आणि घरच्या उपयोगासाठी, किंवा नित्योपयोगी, काही वस्तू मिळत आहेत का ते पहात होते••• एका छोट्याशा दुकानासमोर, आपोआप पावले थबकलीच••• दुकान होते वेगवेगळ्या पिशव्यांचे••• मग त्यात अगदी पारंपारिक असलेला आजीबाईचा बटवा••• फॅशन म्हणून आलेला •••ते अगदी छोटी अशी मोबाईल बॅग म्हणून खांद्याला अडकवायची मोठा बंद असलेली साधीच पण मोहक अशी पिशवी•••

मग भाजी आणण्याकरता वेगळ्या पिशव्या••• किराणा आणण्यासाठीच्या वेगळ्या पिशव्या••• प्रवासाला जाण्यासाठीच्या वेगळ्या पिशव्या••• शाळेत न्यायच्या••• डब्बा ठेवायच्या •••कॉलेज कुमारांसाठी •••लॅपटॉप साठी••• सामान ने-आण करण्यासाठी•••टिकल्या ठेवण्यासाठी••• हातातच पर्स म्हणून वापरण्यासाठी••• महिलांचे दागिने ठेवण्यासाठी••• साड्या ठेवण्यासाठी••• रुमाल, ब्लाउज ठेवण्यासाठी••• उगीचच शो म्हणून वापरण्यासाठी••• लॉन्ड्रीचे कपडे देण्यासाठी •••अरे बापरे!•••

अजून खूप मोठी यादी••• लांबतच जाईल••• इतक्या तऱ्हेच्या पिशव्या त्या दुकानात होत्या••• दुकानाचे नाव पण कलात्मक ठेवलेले होते••• “BAG THE BAG”••• आणि सेक्शनला त्या त्या पिशव्यांची नावे दिली होती•••

दुकानात जाऊन हरखून जायला जायला झाले••• दुकानात गेल्यावर पिशव्यांचे एवढे प्रकार पाहून लक्षात आले ••• व्यवसाय करायचा म्हटल्यावर कोणताही करता येतो •••फक्त थोडा अभ्यास आणि लोकांची मानसिकता लक्षात घ्यायला हवी••• बघा साधी पिशवी, पण त्याचे एवढे प्रकार •••एवढी रुपे••• एकदम समोर आल्यावर••• गरज नसतानाही, एखादी तरी पिशवी घेतल्याशिवाय बाहेर पडतच नव्हते कोणी •••

पिशवीची व्याख्या काय हो? पिशवी म्हणजे कोणतेही सामान, वस्तू, सहजपणे ने-आण करता येण्यासाठी, त्याला धरायला बंद असलेली, पण बंद नसलेली, किंवा बंद करता येण्याजोगी, वस्तू••• पूर्वी या सगळ्या पिशव्या जुन्या कापडापासून, कपड्या पासून, बनवल्या जायच्या••• पण आता फक्त कापडाच्या नाहीत तर कागदाच्या, प्लास्टिकच्या, ऍक्रॅलिक पदार्थांपासून, नवीनच बनवलेल्या पिशव्या मिळतात••• म्हणूनच खूप आकर्षक दिसून त्या घेण्याचा मोह कोणालाच आवरता येत नाही•••

यावरुनच आठवली ती स्पंजची पिशवी••• सध्या ती पाहायला मिळत नाही ••• पण काही वर्षांपूर्वी अशा बऱ्याच पिशव्या लोक वापरत होते •••दिसायला अगदी छोटी पिशवी••• पण त्यात सामान भरायला सुरुवात केल्यावर, कधी पोत्यासारखे रूप घ्यायची••• कळायचे पण नाही••• आपण अशा वस्तू त्यात भरू लागतो••• तसतसा स्पंज ताणून ती पिशवी मोठी मोठी होत जायची ••• त्यामुळे कुठेही सहज ने-आण करता येण्यासाठी ही पिशवी सगळ्याकडे असायची•••

 मग लक्षात आले •••आपल्या शरीरात सुद्धा किती पिशव्या आहेत ना ? पोट, किडन्या, हृदय, जठर, मेंदू, स्त्रियांना गर्भाशय, अगदी शरीरातील शिरा धमन्या या पेप्सी मिळणाऱ्या पिशव्या सारख्याच नाहीत का?

म्हणजे काहीही असो••• कुठेही असो •••कसेही असो••• पिशव्यांची गरज ही पदोपदी लागते ••• आणि ती आपण वापरतच असतो••• पण पिशवी ही अशी वस्तू आहे, जी वापरायची •••पण परत रिकामी पण करायची असते •••जर रिकाम्या न करता पिशव्यांचा फक्त वापर केला तर काय होईल हो? घरातली जागा निष्कारण व्यापली जाणार •••कितीही मोठे घर असले तरी; एक दिवस जागा कमी पडू लागणार ••• हो ना? म्हणूनच आपण त्या त्या पिशवीचा उपयोग तेवढ्यापुरता करत असतो •••पुन्हा पुन्हा वापरली तरी ती काढ घाल करून त्या पिशवीचा वापर करत असतो•••

पिशवी ची व्याख्या, पिशवीचा उपयोग, पिशव्यांचे प्रकार पाहून वाटले••• आपले मन हे पण एक पिशवी आहे ना? नक्कीच आहे••• आणि तिचे रूप •••त्या स्पंजच्या पिशवी सारखे आहे••• काहीही••• कितीही •••कसे पण कोंबा••• ती पिशवी सगळे धारण करते•••

मग लक्षात आले •••पण पिशवीतून काढ घाल ही नेहमी होत राहिली पाहिजे •••नाहीतर एक दिवस जागा कमी पडणार••• पण मग त्याचा वापर तसा करायला हवा••• पण कोणी तसा करत नाहीये••• या मनामध्ये मिळेल ते••• दिसेल ते •••फक्त कोंबत आलो आहोत••• विशेषत: नको त्या वस्तूच •••पहिल्यापासून जास्त प्रमाणात भरल्या गेल्याने, त्यात हव्या त्या वस्तू ठेवायला जागा कमी पडत आहे•••

कोण केव्हा रागवले•••कोण केव्हा   भांडले••• कोण कोणाला काय बोलले••• हे सगळं बारकाव्यानिशी आपण आपल्या मनात ठेवत असतो••• म्हणून तेवढेच लक्षात राहते••• मग चांगल्या घटना, चांगले बोलणे, चांगले वागणे, याला मनात साठवायला जागा कमी पडते••• म्हणून आपण त्या वस्तू वापरून टाकून देतो•••

यामुळे प्रत्येकाचे मन हे नकारात्मक  गोष्टींनी भरले गेले आहे •••एक दिवस सुट्टीच्या दिवशी •••किंवा निवांत वेळी •••ही सगळी नकारात्मकता काढून फेकून दिली पाहिजे •••षड्रिपूंचे  जाळे काढून टाकले पाहिजे••• म्हणजे सकारात्मकतेला ठेवायला मनाच्या पिशवीत जागा होईल••• आत्मविश्वास त्यामध्ये भरता येईल ••• सगळ्यांचे चांगले गुण पाहण्याची दृष्टी त्यात जपता येईल••• या मनाच्या पिशवीला, अंतर्मनाचा बंद लावला की, किती छान या पिशवीचा वापर होईल ना?•••

कोणत्याही दुकानात न मिळणारी, पिशवी तुमची तुम्ही कलात्मकतेने सजवू शकता••• कधी त्याला चांगल्या वर्तणुकीची झालर  किंवा  लेस लावू शकता••• तर कधी चांगल्या विचारांच्या टिकल्या, आरसे लावून, आकर्षक करू शकता••• मग नकारात्मकता काढून, सकारात्मकतेला थारा दिलेली ही मनाची पिशवी, आजीबाईंच्या बटव्याची सारखी कधीच आऊटडेटेड न होणारी •••अशी असेल••• त्यातूनच कोणत्याही प्रसंगी••• कोणतीही ••• आवश्यक वस्तू तुम्हाला तुमच्या यशाच्या मार्गातील अडथळा दूर करायला मदत करेल••• बघा प्रत्येकाने आपली मनाची पिशवी साफ करून ठेवा•••

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ जागतिक कविता दिवस… २१ मार्च ☆ श्री प्रसाद जोग ☆

श्री प्रसाद जोग

🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆ जागतिक कविता दिवस… २१ मार्च… ☆ श्री प्रसाद जोग

 

जे न देखे रवी ते देखे कवी असे म्हटले जाते.

शीघ्र काव्य रचायची प्रतिभा असणाऱ्या  कवी साधुदासांच्या कवितेची गंमत वाचा …

त्यांच्या शिघ्र कवित्वाबद्दल कै.कवी रेंदाळकर यांना शंका होती.म्हणून एके दिवशी अचानक ते साधुदासांच्या घरी पोचले ,आणि त्यांना म्हणाले तुमचं शिघ्र कवित्व म्हणजे ढोंग आहे, जर खरेच आपण शिघ्र कवी असाल तर मला अत्ताच्या अत्ता कविता करून दाखवा.या वर साधुदास त्यांना म्हणाले मला विषय तरी सांगा, कशावर कविता करू ते.तर रेंदाळकर म्हणाले, कवितेवर कविता करून दाखवा बघू.

क्षणभर हाताची हालचाल करून ते म्हणले,”हं घ्या लिहून आणि त्यांनी ही कविता  सांगितली … 

*

कवीने कविता मज मागितली

करण्या बसल्या समयी कथिली

*

कविता मज पाहुनिया रुसली

तरि आज करू कविता कसली

*

कविता स्वच काय विण्यामधले

म्हणून मज छेडूनी दावू भले

*

कविता गुज बोल मनापुरता

प्रिय तू बन मी करितो कविता

*

कविता मधुराकृती का रमणी

म्हणुनी तिज पाहू तुझ्या नयनी

*

कविता करपाश जिवाभवता

मृदू तू बन मी करितो कविता

*

कविता वद काय वसंत-रमा

म्हणुनी तुज दावू तिची सुषमा

*

कविता द्युती-लेख मतीपुरता

पटू तू बन मी करितो कविता

*

कविता वद काय कारंजी-पुरी

म्हणुनी करुनी तुज देऊ करी

*

कविता मकरंद फुलपुरता

अली तू बन मी करितो कविता

*

कविता सखया न गुलाब कळी

तुज की मृदू गंध तिचा कवळी

*

कविता कवी -चंदन- धूप- बली

बन मारुत तू कविता उकली

….. 

आणि आता ही दुसरी कविता केली आहे कवियत्री संजीवनी मराठे यांनी. कविता स्फुरते कशी  म्हणून सुंदर कविता त्यांनी केली आहे.

*

कशी अचानक जनी प्रकटते मनांतली उर्वशी

मी न कुणाला सांगायची कविता स्फुरते कशी

*

कुंभ रसांचे शिरी घेऊनी शब्दांच्या गौळणी

नजरेपुढतीं ठुमकत येती रुपवती कामिनी

*

हंसती रुसती विसावती कधी तरंगती अंबरी

स्वप्नसख्या त्या निजाकृतीचा वेध लाविती उरी

*

त्याच्या नादे करु पाहते पदन्यास मी कशी

मी न कुणाला सांगायची कविता स्फुरते कशी

*

हे स्वरसुंदर जीवनमंदिर कुणी कसे उभविले

मी न कुणाला दावायची शिलालेख आंतले

*

समयीमधली ज्योत अहर्निश भावभरे तेवते

तिच्या प्रकाशी कुणापुढे मी हितगुज आलापिते

*

कशी नाचते कीर्तनरंगी हरपुन जाते कशी

मी न कुणाला सांगायची कविता स्फुरते कशी.

तेंव्हा आनंद घ्या या दोन्ही कवितांचा आजच्या कविता दिनी …… 

© श्री प्रसाद जोग

सांगली

मो ९४२२०४११५०   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ सुख बघण्याची दृष्टी… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

सुख बघण्याची दृष्टी… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम

एका स्त्रीची एक सवय होती. ती रोज झोपण्याअगोदर आपला दिवसभराचा आनंद एका वहीत लिहीत असे. एका रात्री तिने लिहिले….

मी फार सुखी समाधानी आहे.

माझा नवरा रात्रभर फार मोठयाने घोरतो. ही ईश्वराची कृपा आहे. कारण त्याला गाढ म्हणजेच सुखाची झोप लागते.

मी फार सुखी समाधानी आहे. माझा मुलगा सकाळी माझ्याशी भांडतो की त्याला रोज रात्रभर डास झोपून देत नाहीत. म्हणजेच तो रात्री घरी असतो, आवारागर्दीत नसतो, वाईट वागत नाही. ही ईश्वराची कृपा आहे.

मी फार सुखी समाधानी आहे. दर महिन्याला लाईट बिल, गॅस, पेट्रोल, पाणी वगैरेची बिले भरताना दमछाक होते खरी. म्हणजेच सर्व गोष्टी माझ्याकडे आहेत, त्या वस्तू वापरात आहेत. जर ह्या वस्तू माझ्याकडे नसत्या तर तर हे जगणे किती अवघड झाले असतं! ही माझ्यावर ईश्वराची कृपा आहे.

मी फार सुखी समाधानी आहे.

दिवस संपेपर्यत माझे थकून फार हाल होतात. पण माझ्याकडे दिवसभर कष्ट करण्याची ताकद आणि बळ आहे. आणि ज्यांच्यासाठी मेहनत करावी अशी माणसे आहेत. हीच माझ्यावर ईश्वराची कृपा आहे.

मी फार सुखी समाधानी आहे.

रोज मला घरातील केर कचरा काढून घर स्वच्छ करावे लागते. आणि दरवाजा खिडक्या स्वच्छ कराव्या लागतात. खरंच देवाची माझ्यावर खूप कृपा आहे. माझ्याकडे स्वतःचे मोठे घर आहे. ज्याच्याकडे घर, छत नाही, त्याचे काय हाल होत असतील?

मी फार सुखी समाधानी आहे.

कधीतरी लहान मोठा आजार होतो. पण लगेच बरी होते. माझे आरोग्य चांगले आहे, ही माझ्यावर ईश्वराची कृपा आहे.

मी फार सुखी समाधानी आहे.

प्रत्येक सणाला भेटी देताना माझी पर्स रिकामी होते. म्हणजेच माझ्याजवळ माझ्यावर प्रेम करणारे लोक आहेत – माझे नातेवाईक, मित्र, ज्यांना मी भेटी देऊ शकते. जर हे लोक नसते, तर जीवन किती वैराण झाले असते. ही ईश्वराची कृपा आहे.

मी फार सुखी समाधानी आहे.

रोज पहाटे अलार्म वाजला की मी उठते. म्हणजे मला रोज नवी सकाळ बघायला मिळते. ही ईश्वराचीच कृपा आहे.

जगण्याच्या या फॉर्मुल्यावर अंमल करत आपले आणि आपल्या लोकांचे जीवन आनंदमयी बनवले पाहिजे, छोटया व मोठया दुःखात, संकटात, त्रासातून सुखाचा शोध घ्यावा, आनंद शोधावा. अशा या माझ्या ईश्वराचे मी आभार मानते.

ब्रह्मांडात जी ऊर्जा ठासून भरलेली आहे (Cosmic energy), तिचा एक नियम आहे की आपण आनंदी राहून जितक्या प्रमाणात ऋण व्यक्त कराल, त्यापेक्षा जास्त प्रमाणात, आपल्यावर ऋण व्यक्त करण्याचे प्रसंग येतच राहतील.

सुख शोधून सापडत नसते. त्याला प्रत्येक गोष्टीत बघण्याची दृष्टी असावी लागते.

लेखक :अज्ञात

संग्राहिका : सौ. दीप्ती गौतम

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ वसंतोत्सव…सृजनाचा उत्सव… ☆ सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆

सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर

🌸 विविधा 🌸

☆ वसंतोत्सव…सृजनाचा उत्सव… ☆ सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆

वसंत ऋतू म्हणजे सौंदर्य

वसंत म्हणजे आनंद. वसंत म्हणजे सृजन, वसंत म्हणजेचैतन्य. फाल्गुनातच वसंतऋतूच्या पाऊल खुणा दिसू लागतात. वसंत ऋतू,साऱ्या ऋतूंचा राजा.तो येतो ते हातात जादूची छडी घेऊनच.

शहरी वातावरणात राहणारे आपण निसर्गा च्या या सौंदर्याच्या जादूला नक्कीच भुलतो. शिशिरातील पानगळीने, तलखीने सृष्टीचे निस्तेज उदालसेपण आता संपणार असते. कारण ही सृष्टी वासंतिक लावण्य लेऊन आता नववधू सारखी सजते. वसंत राजाच्या स्वागतात दंगहोते.कोकिळ आलापां वरआलाप घेतअसतो.

लालचुटुक पालवी साऱ्या वृक्षवेलींवर डुलत असते.उन्हात चमकताना जणू फुलांचे लाललाल मणी झळकत असल्याचा भाह होतो.चाफ्याच्या झाडांमधून शुभ्रधवल सौंदर्य उमलत असते.

आजून जरा वेळ असतो, पण कळ्यांचे गुच्छ तर हळुहळू दिसायला लागतात.फुलझाडांची तर गंधवेडी स्पर्धाच सुरु असते.केशरी देठांची प्राजक्त फुले, जाई, जुई चमेली, मोगरा, मदनबाण, नेवाळी, सोनचाफा अगदी अहमहमिकेने गंधाची उधळण करत असतात.

* वसंतोत्सव *

सृष्टी लावण्यवती झाली

वसंतोत्सवात अशी रंगली 

घालते जणू सुगंधाचे उखाणे. ‌

या सुगंधी सौंदर्याला रंगांच्या सुरेख छटांनी बहार येते.फार कशाला घाणेरीचीझुडपं.लाललाल आणि पिवळ्या,केशरी पांढऱ्या, जांभळ्याआणि गुलाबी अशा विरुद्ध रंगांच्याछटांच्या फुलांनी लक्षवेधी ठरतात.पळस पांगारा फुललेले असतात. बहावातर सोनपिवळी कळ्याफुले लेवून अंगो पांगी डोलतअसतो. वसंत ऋतूचेहक्का चे महिने चैत्र, वैशाख. पण खरा तो रंगगंधानी नहातो चैत्रात. कारणफुलांच्या,मोहोरा च्यागोड सुगंधा बरोबर फळातील मधुरसही असतो.म्हणूनच हाखऱ्या अर्थाने मधुमास.  वसंतऋतू चैतन्याचा. कुणासाठी काहीतरी करण्याचा. नर पक्षी मादीला आकर्षित करण्याच्या खटपटीत. सुगरण पक्षी आपली कलाघरटी बांधून प्रदर्शित करतात आणि मादीला आकर्षित करतात. काही नर पक्षी गातात, काही नाचतात.  इकडंझाडं, वेली फुलोऱ्यात रंगून ऋतूराजा चे स्वागत करण्यात मश्गु लअसतात.साऱ्या सृष्टी तच हालचाली, लगबग.

वसंत ऋतूचे हक्काचे महिने चैत्र, वैशाख. पण खरा तो रंगगंधानी न्हातो चैत्रात.  कारण फुलांच्या, मोहोराच्या गोड सुगंधा बरोबर फळातील मधुरस ही असतो.म्हणूनच हा मधुमास. निसर्गाचा मधुर आविष्कार.म्हणून तर चैत्र मास “मधुमास” होतो.

त्यातच कालपर्यंत शुकशुकाट असलेल्या झाडांवरलहान, मोठी, सुबक, बेढब, लांबोडकी, गोल घरटी दिसू लागतात.नव्या सृजनाची तयारी. साधारण पणे वसंतोत्सव हा वसंत पंचमी पासून साजरा केला जातो.

… वसंतोत्सव हा सृजनाचा उत्सव. वसंतो त्सव अमर वादाचेही प्रतीक आहे. वसंताची पूजा करणारा जीवनात कधीही निराश होत नाही. वसंतोत्सव म्हणजे निसर्गाचा उत्सव आहे. निसर्ग एरवीही सुंदर असतोच, पण वसंतात त्याचे रूप काही औरच असते. आपल्या जीवनातही तारूण्य हा वसंत ऋतूच असतो. त्याचप्रमाणे वसंत ही निसर्गाची युवावस्था आहे.

आपण निसर्गाच्या जवळ गेले पाहिजे. त्यातून ताणतणाव विसरून निर्भेळ सुखाची प्राप्ती होईल.निसर्ग निर्व्याज असतो.त्याला षड्रिपुंचा  वारा लागलेला नसतो. तो आपल्याला नवचैतन्य देतो.

© वृंदा (चित्रा) करमरकर

सांगली

मो. 9405555728

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ प्राक्तन…. ☆ सौ. जस्मिन रमजान शेख ☆

??

☆ प्राक्तन…. ☆ सौ. जस्मिन रमजान शेख ☆

प्राक्तनाच्या हातमागावर अनुभवाचा धोटा उजवं अन् डावं करत एकसारखा धावत होता. कधी हा रंग कधी तो…., दोरा कधी वर कधी खाली, कधी मागून पुढे कधी पुढून मागं, अनेक रंगांचे, अनेक प्रकारचे धागे एकमेकांत गुंफून   आयुष्याचं एक वस्त्र तो विणत होता.ते सुंदर बनेल की कुरुप हे त्याचं त्यालाच माहीत नाही. फक्त विणत रहायचं, धावत रहायचं येवढंच त्याला माहीत ! बाकी सगळ रहस्यच! 

आवडता रंग हाती आला की गडी जाम खूश! मग हव तसं, हव तिथं तो रंगवून घ्यायचा, अनेक दोऱ्यात माळून सुंदर नक्षीकाम करून घ्यायचा. त्याला आवडेल तसं दोरा वर खाली हलवायचाआणि त्यातून निर्माण झालेल्या चित्राकडे,  आपल्याच निर्मिती कडे गौरवाने पहात रहायचा. वाटायचं हे क्षण असेच  रहावेत. हा आनंदाचा रंग कायम आपल्याच हातात रहावा. दुःखं,संकटं, विघ्न अशी छिद्रे आपल्या वस्त्राला नकोच. सौंदर्य नष्टच होईल  ना मग! इतरांनी आपलं वस्त्र बघितलं की नेहमी वाह वाहच केली पाहिजे असंच त्याला वाटायचं! 

पण शेवटी नियतीच ती! उचललेला चहाचा पेला ओठांपर्यंत पोहोचायच्या आधी कोणती अन् किती वादळ उठवेल सांगण कठीण! आयुष्य नावाचा खेळ असाच असतो ना! खेळ अगदी रंगात येतं अन् अचानक एका छोट्याशा चुकीनं सर्वस्व उद्धवस्त होतं. जणू काही त्या धोट्याच्या हातात नासका, कुजका, तुटका धागा येतो अन् सुंदर विणलेल्या कापडाला भली मोठी भोकं पडत जातात. कधी एकमेकांत गुंतलेले धागे निसटू लागतात, कधी घट्ट बसलेली वीण उसवू लागते, तर कधी धागेच एकमेकांना तोडू लागतात. 

किती विचित्र! वेळ बदलली की धाग्यांचे रंग सुद्धा बदलत जातात. जवळचे कोण, लांबचे कोण हे लक्षात यायला लागतं. काल पर्यंत अगदी मिठी मारुन बसलेले धागे झटक्यात लांब पळतात. जवळ कोण नसतच अशावेळी . सहाजिकच मोठं छिद्र निर्माण होणारच की तिथं!  वेळच तशी येते ना. आणि मग हा आयुष्याचा खेळ नकोसा होऊन जातो. कारण अगदी जवळच्या धाग्यांनी सुद्धा साथ सोडलेली असते. स्वतः होऊन असेल किंवा नियतीचा घाला असेल तो. पण छिद्र पडलेलं असतं हे मात्र नक्की! अशा वेळी काय करावं सुचत नाही. पुन्हा तोच तुटलेला दोरा बांधून घ्यावा म्हटलं तर धोट्याला माग कुठं जाता येतं. तो पुढेच पळणार. 

मागचं बदलता येत नाही अन् पुढचं रहस्य उलगडत नाही. एकच पर्याय हाती असतो. फक्त धावत राहणं, पळत राहणं,आलेला प्रत्येक क्षण अनुभवत राहणं..बस्स..! 

अशा वेळी कधी कधी कोणाचा आधाराचा धागा आपल्या वस्त्रातील छिद्राला सांधण्याचा प्रयत्न करत असतं. पहिल्या सारखं साफाईदारपणा नसतो त्याच्यात, ओबडधोबड का होईना, पण छिद्र झाकलं गेलं याचंच समाधान!

काहीतर खूप मोठं गमावल्याची सल कायम सलत राहते पण खूप काही चांगल अजून शिल्लक आहे याची आस सुद्धा लागून राहते. हीच तर खरी मेख आहे या प्राक्तन नावाच्या रहस्याची! हे रहस्य उलगडण्यासाठी, आयुष्याचं एक सुंदर वस्त्र विनण्यासाठी हा अनुभवाचा धोटा कायम धावत राहणंच योग्य आहे.  आपण फक्त त्रयस्तासारखं त्या आयुष्यरुपी वस्त्राकडे पहात रहायचं, संकटाच्या वेळीपण मन शांत ठेवून आलेल्या प्रत्येक क्षणाचा स्वीकार करायचा, कारण त्यामुळेच मार्ग सापडत जातं, हवं ते गवसतं आणि महत्त्वाचं म्हणजे भविष्य बदलत जातं.

म्हणूनच या प्राक्तनाच्या हातमागावर अनुभवाचा धोटा उजवं अन् डावं करत एकसारखा धावत असतो. कधी हा रंग कधी तो………नेहमी सारखंच………

© सौ. जस्मिन रमजान शेख

मिरज जि. सांगली

9881584475

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ दुःखद सुख… लेखक – श्री जयंत विद्वांस ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

? इंद्रधनुष्य ?

☆ दुःखद सुख… लेखक – श्री जयंत विद्वांस ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

तंत्रज्ञान, बदलत्या प्रथा यामुळे बरच  बदलून जातं आणि अनेक गोष्टी, धंदे, माणसं हरवून जातात कालौघात. परवा काही कारणाने आळंदीला गेलो होतो तेंव्हा तिथे वासुदेव दिसला घाटावर. तसंही शहरात तो पूर्वी फार दिसायचा असं नाही पण धूमकेतूसारखा अधून मधून दिसायचा. पोलिसाचा किंवा इतर कुठला वेष घेऊन येणारे बहुरूपी तर आता दुर्मिळ झाले. सगळं खोटं आहे हे माहीत असलं तरी त्यांच्या मागून हिंडायला मजा यायची. वासुदेवाच्या टोपीत ती धूळ खालेल्ली मोरपिसं तो बदलतो कधी की तो मुगुट तो तसाच धुतो असा मला प्रश्न पडायचा. श्रावणात ‘आsssघाडा, दुर्वा, फुलं’ अशी हाक भल्या पहाटे यायची. ‘सुया घ्ये, पोत घ्ये, मनी घ्ये, फनी घ्ये’ अशी -हिदम असलेली हाळी तर किती वर्षात ऐकलेली नाही. आपल्या अंगणात फतकल मारून बसून गोधडी शिवून देणा-या बायका गायब झाल्या. 

अप्पा बळवंतला एका लाकडी फळीवर रेमिंग्टन, गोदरेजचे टाईपरायटर ठेवून वन प्लस फोर अशा कॉप्या काढणारे कधीच अस्तंगत झाले. त्यांची कडकट्ट चालणारी बोटं आणि कागद वर सरकवून परत पहिल्या जागी मशीन घेऊन यायचा स्पीड मी बघत बसायचो. स्टुलावर बसून मान पाठ एक करून कडेच्या कागदात डोकावत किंवा आधी मॅटर काय ते समजून घेऊन टाईप करून द्यायचे ते. कुठे गेले असतील, काय काम केलं असेल नंतर त्यांनी. लहानपणी मला कंडक्टर झालो तर खूप पैसे मिळतील असं वाटायचं. असतात एकेकाच्या विक्षिप्त कल्पना, मला कुठलाही धंदा बघितला लहानपणी की वाटायचं, हे काम जमेल का आपल्याला, यात साधारण श्रीमंत होण्याएवढे पैसे मिळत असतील का? जाकीट घालून रस्त्यात मिळेल त्या जागी बसून आपल्या कळकट्ट भांड्यांना ब्युटी पार्लरमधे नेऊन आणल्यासारखे कल्हई करणारे कल्हईवाले गायब झाले. लहानपणी चाळीत तो फकीर यायचा रात्री, हातातल्या धुपाटण्यावर ती उद आणि धुपाची पावडर फिसकारली त्याने की जो पांढरा धूर आणि वास येतो तो अजून विसरलेलो नाही.

रात्री दहाच्या सुमारास एकजण पान विकायला यायचा. मस्स्स्साला पान दहा पैसे, स्पेशल मस्स्साला पंधरा पैसे. जेमतेम अर्ध पान, चुना, काताचा, सुपारीचा तुकडा, बडीशेप, स्पेशल मधे गुलकंद अत्तर लावल्यासारखं असायचा. एकजण तळलेले पापड विकायचा. सणसणीत मोठे पापड असायचे, दहा पैशाला एक, पाच पैसे दिले तर अर्धा पापड. चोपटण्याने अंगण करण्यात मजा होती. एसटी स्टँडवर तांब्याची कानकोरणी घेऊन फिरणारे दिसत नाहीत आता. काय तन्मयतेने ते काम करायचे. भुयारातून काहीतरी नक्की निघणार अशा आशेवर असलेल्या इतिहास संशोधकासारखे ते कानात डोकवायचे. रस्त्यात कुठल्या तरी झाडाखाली मोठी पेटी घेऊन सायकल दुरूस्तीवाले बसायचे. दोन्ही बाजूला एकेक दगड ठेऊन तो हवा भरायचा पंप उभा ठेवलेला असायचा. एकेकाळी पीसीओच्या त्या चौकोनी ठोकळ्याबाहेर लोक रांग लावून उभी रहायचे. आतल्याचं बोलणं लवकर संपावं आणि माझ्यानंतर बाहेर कुणाचाही नंबर असू नये हे प्रत्येकाला वाटायचं.  

शाळेच्या बाहेर एक म्हातारी बसायची वाटे लावून, चिंचा, चन्यामन्या, बोरं, काळी मैना, भाजके चिंचोके, पेरू, बाहुलीच्या गोळ्या असायच्या. एक काला खट्टा, रिमझिम, ऑरेंज, लेमन, वाळा अशी सरबताची गाडी असायची. बर्फाचे गोळे विकणारे क्वचित दिसतात अजून. छत्री दुरुस्त करणारे कुठे गेले काय माहीत. एखादी टेकस मारली चपलेला तर पैसे न घेणारे पूर्ण पिकलेले चप्पल दुरुस्तीवाले आजोबा तर कधीच गेले. चार आणे तास मिळणारी सायकलची दुकानं गायब झाली. आपल्याला नको असलेले कपडे घेऊन चकचकीत भांडी देणा-या बार्टर सिस्टीम फॉलो करणा-या बोहारणी कुठे गेल्या असतील? सीताहरणाला कारण ठरलं म्हणून अंगात चोळी न घालता आपल्या पाटा, वरवंटा, जात्याला टाकी लावून द्यायच्या त्या वडारणी दिसणं शक्य नाही. कडेवर एक पोर आणि डोक्यावर विक्रीसाठी पाटा वरवंटा असायचा. त्या वरुटा म्हणायच्या त्याची मजा वाटायची. काही शब्द पण गायब झाले याची खंत वाटते. मायंदाळ, वळचण, हाळी, बैजवार, औंदा, बक्कळ असे अनेक शब्द असतील. मूळ विषय तो नाही, त्यावर परत कधी. 

‘बाई, तुझं मन चांगलं आहे, तू देवभोळी आहेस, मनात पाप नाही, दानी आहेस पण तुला यश नाही’ अशी पाठ केलेली कॅसेट लावणारे कुडमुडे ज्योतिषी कंटाळवाणी दुपार हसरी करायचे. चाळीत तुम्हांला सांगतो, वल्ली असायच्या एकेक. एका ज्योतिषाला ‘लग्न कधी होईल सांगा’ म्हणत दोघींनी हात दाखवला, त्याने पण सहा महिन्याच्या आत पांढ-या घोड्यावर बसून राजकुमार येईल एवढं सोडून सगळा सोनसळी भविष्यकाळ रंगवला. घसघशीत दक्षिणा मिळणार म्हणजे अजून घरं फिरायची गरज नाही हे त्याच्या चेह-यावर दिसत होतं. ‘तुझा मुडदा बशीवला भाड्या’ म्हणत त्यांनी आजूबाजूला खेळणारी आपापली पोरं दाखवली आणि त्याला हुसकवून लावलं. दक्षिणा बुडली त्यापेक्षा आपलं ढोंग उघडकीला आलं याचा राग त्याने मार बसणार नाही इतपत शिव्या देऊन काढता पाय घेतला. बाबाजी का बायोस्कोप मधे ‘मेरा नाम जोकर’मधे दिसला तेंव्हा आठवला. क्षणिक खेळ असायचा पण डोळ्यांभोवती दोन्ही हात धरून त्या नळकांड्यात डोकावण्यात अप्रूप होतं.   

फक्त दिवाळीला पोस्त मागणारे गुरखे नाहीसे झाले. रात्री फिरताना क्वचित दिसायचे. क्वचित येणारं कार्ड देणारे आमचे पोस्टमन इंदोंस अशी हाक मारायचे. आमचा पत्त्यातला चाळ नंबर कितीही चुकीचा टाकलात तरी पत्र यायचंच आमच्याकडे. त्यांनी कधीही आमच्याकडे पोस्त मागितली नव्हती. सायकलच्या मधल्या दांड्याला ग्राईंडिंग व्हील लावून मागच्या कॅरिअरवर बसून पेडल मारत चाकू, सुरे, कात्र्यांना धार लावणारे गायब झाले. आता भंगार कच-यात टाकतो पण आधी भंगारवाले यायचे, द्याल ते घायचे. प्लास्टिक बाटल्या, बरण्या, पत्र्याचे डबे, ते देतील ती किंमत. स्टोव्ह रिपेअरवाले एक वेगळीच गंमत असायची. दुरुस्तीत फार रॉकेल संपू नये ही काळजी असायची बाईला आणि हा बाब्या फारफार पंप मारून बर्नर तापवून लालबुंद करायचा. आतली काजळी काढून बर्नर फिट करून हवा भरून पिन मारली की बोर्नव्हिटा प्यायल्यासारखा स्टोव्ह झळाळता पेटायचा पण त्याचा आनंद अल्पकाळ साजरा व्हायचा आणि महिनाभर रॉकेल पुरवायला हवं या काळजीने ती बाई किल्ली सोडून पहिल्यांदा स्टोव्ह बंद करायची.       

या सगळ्यात रात्री दारोदार फिरून ‘अन्न वाढा हो माय’ म्हणणारे भिकारी नाहीसे झाले याचा मला आनंद आहे खूप. सगळे काही उपाशी मेले नसतील, जगण्यासाठी, पोटाची आग भागवण्यासाठी त्यांनी काहीतरी तजवीज केली असेलच. पण ती हाक बंद झाली ते बरं झालं. आम्ही चाळीत रहायचो तिथे रात्री साधारण नऊनंतर एक बाई यायची. तुम्ही द्याल ते ती घ्यायची. ती कुणाच्या दरवाज्यासमोर उभी रहायची नाही, सर्वसमावेशक अशी ती हाळी द्यायची, मग ज्याच्याकडे उरलं असेल तो तिला हाक मारून ते द्यायचा. पोळी, भाकरी, भातासाठी एकच पिशवी असायची. भाजी, आमटी जे काही असेल ते सगळं ती एकाच वाडग्यात घ्यायची. संतमहात्म्यांचे किस्से आपण ऐकतो की ते सगळं अन्न एकत्र करून खायचे पण इथे चव काय आहे यापेक्षा भुकेची आग मोठी होती. कालौघात काही गोष्टी नष्ट होतात ते बरच आहे. चांगल्या गोष्टी नाहीशा होतात या दुःखापेक्षा वाईट गोष्टी संपतात त्याचा आनंद जास्त असतो. 

ही किंवा आत्ता लगेच न आठवलेली माणसं हरवली म्हणून अडून काहीच राहिलं नाही पण गतायुष्याचा ती एक भाग होती. मागे वळून पहाताना काही नेमकं आठवतं तसंच भारंभार संदर्भ नसलेलं ही आठवत राहतं. त्या प्रत्येक गोष्टीशी काही ना काही तरी चांगली वाईट आठवण जोडलेली असते. माणसाला अमरत्व नाही हे वरदान आहे. किती गर्दी झाली असती नाहीतर. आयुष्याच्या प्रवासात अशा अनेक गोष्टी हरवतात. माणसं हरवतात ते वाईट. 

प्रत्येकजण या प्रवासात उतरून जाणार मधेच कधीतरी हे माहित असतं, काहीजण काही न सांगता घाईने उतरून जातात, काही लपून बसतात, काही दिसतात पण आपण त्यांना हाक मारू शकत नाही. न सांगता उतरून गेलेल्या, सोडून गेलेल्या, दुरावलेल्या, हरवलेल्या माणसांच्या आठवणींनी मन सैरभैर होतं. डोळ्यात नकळत पाणी दाटतं. अशावेळी काय करायचं? प्रवासात करतो तेच करायचं. खिडकीतून बाहेर बघायचं, हलकेच डोळे पुसायचे आणि दिसतंय त्यात हरवून जायचं. आपणही कुणाच्या तरी विश्वात त्यांच्या दृष्टीने हरवलेले असू शकतो या वाटण्यात पण एक दुःखद सुख आहे. 

आपल्यासारखंच कुणाच्या डोळ्यात पाणी असतंच की, माणसं काही फक्त आपलीच हरवत नाहीत.  

लेखक –  श्री जयंत विद्वांस

संग्रहिका : अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘भाकरी कधी कुणी विकतं का?’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘भाकरी कधी कुणी विकतं का?’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर ☆

संध्याकाळची वेळ होती,

मी माझ्या एका मित्राबरोबर सिंहगड रोडने जात होतो.

हिंगण्याच्या स्टॉपच्या अलीकडे एक किलोमीटर असताना पुढे वाहतुकीच्या कोंडीमुळे गाडी थांबवावी लागली.इतक्यात आमची नजर रस्त्यावर खडी फोडणाऱ्या कुटुंबाच्या पालाकडे गेली

(पाल म्हणजे तात्पुरती ताडपत्रीची झोपडी).

तिथे तीन दगडाच्या मांडलेल्या चुलीसमोर त्या झोपडीची मालकीण भाकरी भाजत होती.

नवरा शेजारच्या बाजेवर जुन्या वर्तमानपत्राचा चुरगळलेला कागद वाचत बसला होता.

त्या बाजेखाली त्याचा छोटा मुलगा एका तुटलेल्या खेळण्याबरोबर खेळण्यात दंग होता.

वाहतूक अजून काही सुरळीत होत नव्हती.

 

माझा मित्र, जो एका मोठ्या कंपनीचा मालक होता, अगदी टक लावून त्या टम्म फुगणाऱ्या बाजरीच्या भाकरीकडे बघत होता. त्या भाकरीचा खमंग दरवळ आमच्या कारच्या खिडकीतून आत येत होता.

 

माझ्या मित्राने कधीतरी लहानपणी आपल्या खेड्यातील मित्राकडे अशी खरपूस भाकरी खाल्ली होती व त्या भाकरीची चव तो अजूनही विसरला नव्हता.

त्यानंतर मात्र त्याला परत तशी भाकरी खायला मिळाली नव्हती.

अचानक तो मित्र म्हणाला,

‘अरे संजू, आपण जर पैसे दिले तर ती बाई त्या भाकरी आपल्याला विकत देईल का?’

 

मी त्याला म्हटलं, ‘अरे, काहीतरीच काय वेड्यासारखं बोलतोयस ! तिची झोपडी म्हणजे काय हॉटेल आहे का आणि आपण अशी कशी भाकरी मागायची तिला?’

 

क्षणभर त्याने विचार केला व गाडीचा दरवाजा उघडत मला म्हणाला, ‘चल उतर खाली.’

मीही त्याच्या मागोमाग उतरलो.

 

झोपडीसमोर उभं राहत त्याने त्या बाजेवर बसलेल्या त्या बाईच्या नवऱ्याला नमस्कार केला.

क्षणभर तो गोंधळून गेला.

पण लगेच म्हणाला,

‘साहेब, काही काम होतं का?’

सरळ विषयाला हात घालत माझा मित्र म्हणाला, ‘मला तुमच्या या चुलीवरच्या भाकरी खायच्या आहेत. तुम्ही मला त्या विकत द्याल का?’

 

ती दोघं नवरा-बायको आम्हा दोघांच्या तोंडाकडे बघतच राहिली.

काय उत्तर द्यावं तेही त्यांना सुचेना, ‘काय साहेब गरीबांची चेष्टा करता?’

एवढंच तो म्हणाला.

‘अरे बाबा, मी सिरियसलीच बोलतोय. अशा भाकरी आमच्या घरात कुणाला बनविता येत नाहीत व घरात चूलही नाही.लहानपणी एकदा मी अशी भाकरी खाल्ली होती व आता यांना भाकरी करताना बघून मला त्या चवीची आठवण झाली.’

 

आता त्या नवरा-बायकोला पटलं की, खरंच यांना भाकरी हव्या आहेत.

बाजेवरून गडबडीत उठत तो म्हणाला,

‘बसा दोघे या बाजेवर.

(बोलताना समजलं की, गावाकडे दुष्काळ पडल्यामुळे हे शेतकरी कुटुंब गुर-ंढोरं, पडीक शेत म्हातारा-म्हातारीवर सोपवून रोजी-रोटीसाठी शहरात आले होते.)

 

आमचं बोलणं चालू असतानाच तो बायकोला म्हणाला, ‘सुंदे! साहेबांना दे त्या चार भाकरी.’

 

वाचत असलेला जुना पेपर त्याने बायकोच्या हातात दिला.

तिने छानपैकी त्याच्यावर त्या ताज्या खमंग भाकरीची चवड ठेवली. वर अजून तव्यातील चौथी गरमागरम भाकरीही त्याच्यावर ठेवली.

मस्तपैकी मिरचीच्या खरड्याचा गोळा वर ठेवला व ते पार्सल मित्राच्या हातात दिलं.

 

मोठा खजिना मिळाल्याचा भाव मित्राच्या चेहऱ्यावर दिसत होता.

 

त्याने आभार मानत खिशात हात घातला व पाचशेची नोट तिच्या नवऱ्याच्या हातात ठेवली.

 

‘आवो सायेब, हे काय करता? भाकरी कधी कोण इकतं का?’

 

बायकोही त्याला दुजोरा देत म्हणाली, ‘सायेब भाकरीच पैसं  घेतलं तर नरकात बी जागा मिळणार नाय आमाला.’

 

आम्ही दोघं त्यांचं बोलणं ऐकून दिग्मूढ झालो. मित्रालाही काय करावं सुचेना.अचानक त्याने माझ्या हातात पार्सल देत गाडीचा दरवाजा उघडला व घरी मुलांसाठी घेतलेल्या खाऊची भली मोठी कॅरीबॅग काढली व पुन्हा झोपडीत शिरत ती पिशवी त्यांच्या  हातात देत म्हणाला, ‘तुमच्या भाकरीची बरोबरी या खाऊशी होणार नाही. पण तरीही तुमच्या बाळासाठी ठेवा हे.’

 

मी गाडी स्टार्ट केली,

मित्र शेजारी बसून त्या गरमागरम भाकरीचा आस्वाद घेत होता.

एक अख्खी भाकरी हडप करून राहिलेल्या भाकरी पुन्हा कागदात बांधत म्हणाला,’आता या राहिलेल्या उद्या खाणार.’

 

गाडी चालवताना एकच विचार मनात रुंजी घालत होता, ‘गरिबीतही किती औदार्य असतं या लोकांमध्ये! भाकरी ही विकायची वस्तू नाही’, हे तत्वज्ञान त्यांना कुठल्या शाळा-कॉलेजात जाऊन शिकावं लागलं नाही.

आणि हो! अख्ख्या जगाला भाकरी खाऊ घालणारा हा पोशिंदा तुमच्या चार भाकरीचे पैसे घेईल का?

 

दुसरीकडे आपण बघतो एखाद्या मोठ्या हॉटेलमध्ये आपण जेवायला जातो, तेव्हा जर एखाद्या छोट्या बाळासाठी अर्धी वाटी दूध मागविले, तरी त्याचं दहापट बिल लावलं जातं.

 

माझं शेजारी लक्ष गेलं,

मित्र तृप्तीचा ढेकर देऊन घोरत होता.

ब्रम्हानंदी टाळी लागली होती त्याची.

त्याच्या चेहऱ्याकडे बघितल्यावर समजले,

‘सुख म्हणजे नक्की काय असतं?’

 

लेखक  :अज्ञात

प्रस्तुती : सौ. शामला पालेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ असं आहे… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? विविधा ?

☆ असं आहे… ☆ श्री विश्वास देशपांडे

मधुकर तोरडमल यांचे ‘ तरुण तुर्क म्हातारे अर्क ‘ हे नाटक बहुतेकांनी पाहिले असेल. पाहिले नसले तरी वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी त्या नाटकात प्रा बारटक्के यांच्या तोंडी घातलेली ‘ ह हा हि ही… ‘ ची बाराखडी बहुधा सर्वांच्या परिचयाची असेल. व्यवहारात अशी अनेक माणसे पाहतो की ज्यांना बोलण्यासाठी पटकन शब्द सापडत नाहीत. अशी माणसे मग ‘ ह हा हि ही ‘ चा आधार घेतात. समोरच्या व्यक्तीला संदर्भाने त्यांचे म्हणणे समजून घ्यावे लागते. पण कधी कधी अशा बोलण्यातून भयंकर विनोद वा क्वचित गैरसमजही होऊ शकतो. पु ल देशपांडे, मधुकर तोरडमल, लक्ष्मण देशपांडे यांच्यासारखी निरीक्षण चतुर मंडळी लोकांच्या अशा लकबी बरोबर हेरतात आणि खुबीने त्यांचा आपल्या लेखनात वापर करून घेतात. ‘ वऱ्हाड निघालं लंडनला ‘ या लक्ष्मण देशपांडे यांच्या एकपात्री प्रयोगात तर प्रत्येक पात्रागणिक त्यांनी अशा लकबींचा सुरेख वापर केला आहे. त्यातून त्या पात्रांचे स्वभाववैशिष्ट्य तर दिसतेच पण त्यातून निर्माण होणारा विनोद श्रोत्यांना पोट धरून हसायला लावतो.

माझ्या संपर्कात अशी काही माणसे आली आहेत की बोलताना त्यांच्या लकबी किंवा विशिष्ट शब्दांची त्यांनी केलेली पुनरावृत्ती माझी नेहमीच करमणूक करून जाते. अर्थात तुमच्याही संपर्कात अशी माणसं आली असतीलच.

माझे एक सहकारी कोणतीही गोष्ट बोलताना नेहमी ‘ नाही ‘ ने सुरुवात करीत असत. ‘ नाही, ते असं नाही. नाही, माझं ऐकून घ्या. नाही ते असं करायचं असतं… ‘ वगैरे. त्यांचीच भाऊबंद असलेली ( नात्याने नाही बरं का, तर बोलण्याच्या लकबीमुळे ) एक ताई आपल्या बोलण्याची सुरुवात ‘ नव्हे ‘ ने करीत असत. कधी कधी बिचाऱ्यांना आपले म्हणणे अधिक स्पष्ट करण्यासाठी ‘ नव्हे नव्हे ‘ चा दोन वेळा वापर करावा लागायचा. खरं म्हणजे दोन नकारांचा एक होकार होतो असं म्हणतात. म्हणजे ‘ ते खरं नाही असं नाही ‘ या वाक्यात दोन नकार आले आहेत. त्यांचा अर्थ होकारार्थी होतो. म्हणजे ‘ ते खरं आहे. ‘ पण आमचे हे ‘ नाही नाही ‘ किंवा ‘ नव्हे नव्हे ‘ म्हणणारी मंडळी त्यांच्या मतावर इतकी ठाम असतात की त्यांच्या दोन्ही नकारांचा अर्थ ‘ नाहीच ‘ असा होतो.

हे ‘नाही नाही’ किंवा ‘नव्हे नव्हे’ कसं येत असावं ? प्रत्येक गोष्टीची सुरुवात नकारार्थीच का व्हावी ? एकदा मी कुठेतरी वाचलं होतं की लहानपणी नुकत्याच जन्मलेल्या रडणाऱ्या बाळाला हॉस्पिटलमधली नर्स जेव्हा शांत करण्याचा प्रयत्न करते, तेव्हा ती त्याला हातात घेऊन ‘ नाही नाही ‘ असं म्हणते. मग पुढे आई आणि त्या बाळाला घेणाऱ्या आयाबाया तिचाच कित्ता गिरवतात. त्या रडणाऱ्या बाळाला हातात घेऊन ‘ नाही नाही, असं रडू नाही. ‘ वगैरे चा भडीमार त्या करतात. लहानपणापासून असं ‘ नाही नाही ‘ ऐकण्याची सवय झालेलं ते बाळ आपल्या पुढील आयुष्यात ‘ नन्ना ‘ चा पाढा लावील त्यात नवल ते काय ?

आमचे आणखी एक सहकारी होते. ते वयाने आमच्यापेक्षा ज्येष्ठ होते. ते ‘ नाही नाही ‘ जरी म्हणत नसले तरी त्यांना दुसऱ्याचे बोलणे कसे चुकीचे आहे हे नेहमी सांगण्याची सवय होती. आपण त्यांना एखादी गोष्ट सांगितली की ‘ प्रश्न तो नाही रे बुवा… ‘ अशी त्यांची सुरुवात असायची. मग तेच म्हणणे ते जरा वेगळ्या शब्दात सांगायचे. चार लोक एकत्र बोलत असले की ते अचानक यायचे आणि एखाद्याला ‘ अरे इकडे ये, तुझ्याशी महत्वाचं काम आहे ‘ असं म्हणून बाजूला घेऊन जायचे. पण खरं तर महत्वाचं काम वगैरे काही नसायचं पण मी कसा वेगळा आहे हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा.

आमच्या नात्यातले एक गृहस्थ चार दोन वाक्ये बोलून झाली की ‘ असं आहे ‘ असं म्हणतात. त्यांच्या बोलण्याचं सार इंग्रजीत सांगायचे झाले तर ‘ Thus far and no further. ‘ म्हणजे हे ‘ असं आहे. मी सांगतो ते फायनल. यापुढे अधिक काही नाही. ( आणि काही असले तरी ते सांगणार नाहीत. हा हा )

आमचे एक प्राध्यापक होते. ते वर्गात शिकवताना दोन चार वाक्ये बोलून झाली की ‘ असो ‘ असं म्हणायचे. मुलांना ते सवयीचे झाले होते. कधी कधी एक दोन वाक्यानंतर त्यांच्या तोडून ‘ असो ‘ बाहेर पडले नाही तर मागील बाकावरून एखादा खोडकर विद्यार्थी हळूच ‘ असो ‘ म्हणायचा. मग सगळा वर्ग हास्याच्या लाटेत बुडून जायचा. ते प्राध्यापकही हे गमतीने घ्यायचे आणि हसण्यात सामील व्हायचे. आणि पुन्हा ‘ असो ‘ म्हणून शिकवायला सुरुवात करायचे.

माझ्या परिचयातील एक गृहस्थ आपण काहीही सांगितलं की ‘ हो का ‘ किंवा ‘ खरं का ‘ असे विचारायचे. मग त्यांना पुन्हा ‘ हो ‘ म्हणून सांगावे लागायचे. जसं वर ‘ नाही ‘ ने सुरुवात करण्याचा किस्सा सांगितला आणि त्यामागे नर्सपासून सगळे जबाबदार होते ( खरं तर अशा लोकांना पकडून जाब विचारायला हवा की तुम्ही ‘ नाही नाही ‘ असे का शिकवले ? कोण विचारणार त्यांना ? जाऊ द्या.

हे म्हणणं म्हणजे लग्नानंतर पती पत्नीत वादविवाद झाले तर मध्यस्थ कोण होता किंवा लग्न लावून देणारे गुरुजी कोण होते त्यांना बोलवा असं म्हणण्यासारखं आहे. ) तसंच ‘ हो का ‘ किंवा ‘ खरं का ‘ असं विचारण्यामागे त्या व्यक्तीचा संशयी स्वभाव किंवा समोरच्या व्यक्तीवर विश्वास नसणे या मानसिकतेतून आलं असावं. असे सारखे ‘ हो का ‘ विचारणाऱ्यांचे नाव आम्ही खाजगीत ‘ होकायंत्र ‘ ठेवले होते.

अशीच काही व्यक्तींना आपण काही सांगितले तर ‘ अच्छा ‘ किंवा ‘ अरे वा, छान ‘ अशी म्हणायची सवय असते. त्यांना जरी सांगितले की ‘ अहो, तो अमुक अमुक आजारी होता बरं का ‘ यावर ते आपल्या सवयीने पटकन बोलून जातील, ‘ अच्छा ‘ किंवा ‘ अरे वा, छान… ‘ आता काय म्हणावे अशा लोकांना ? कोल्हापूर, साताऱ्याकडची मंडळी प्रत्येक वाक्यानंतर समोरच्याला बहुधा ‘ होय ‘ अशी छान तोंडभरून प्रतिक्रिया देतात. सोलापूर, पंढरपूरकडील मंडळी त्याहीपुढे जाऊन ‘ होय की ‘ असं गोड प्रत्युत्तर देतात. हे ‘ होय की ‘ त्यांच्या तोंडून ऐकायलाच मजा वाटते.

काही मंडळींना चार दोन वाक्ये झाली की समोरच्याला, ‘ काय कळले का ? ‘ किंवा ‘ लक्षात आलं का ? ‘ असं विचारण्याची सवय असते. अशी मंडळी या जन्मात नसली तरी पूर्व जन्मात शिक्षक असावी असे माझे पक्के मत आहे. त्यांचेच काही भाऊबंद ‘ माझा मुद्दा लक्षात आला का ? ‘ असे विचारणारी आहेत. कधी कधी तर दोन मित्र फिरायला निघाले असतील तर एखाद्या मित्राला अशी सवय असते की तो आपली बडबड तर करत असतोच पण समोरच्याचे लक्ष आपल्या बोलण्याकडे आहे की नाही यासाठी त्याचा हात किंवा खांदा दाबत असतो. माझ्या एका मित्राला अशीच खांदा दाबण्याची सवय आहे. आम्ही फिरायला निघालो की तो बोलत असतो. माझे त्याच्या बोलण्याकडे लक्ष असले तरी खात्री करून घेण्यासाठी तो माझा खांदा वारंवार दाबत असतो. मग एका बाजूचा खांदा पुरेसा दाबून झाला की मी चालताना बाजू बदलून घेतो मग आपोआपच माझा दुसरा खांदाही दाबला जातो.

काही माणसांना फोनवर बोलताना पाहणे किंवा ऐकणे हाही एक मोठा गमतीदार अनुभव कधी कधी असतो. हास्यसम्राट प्रा दीपक देशपांडे यांनी आपल्या एका कार्यक्रमात अशा बोलण्याचा एक नमुना सादर केला होता. एक व्यक्ती फोनवर बोलत असते. समोरच्या बाजूला कोणी तरी भगिनी असते. हा आपला प्रत्येक वाक्याला, ‘ हा ताई, हो ताई, हो ना ताई ‘ अशी ‘ ताईची ‘ मालिका सुरु ठेवत असतो. काही माणसे फोनवर बोलताना सारखं ‘ बरोबर, खरं आहे ‘ यासारखे शब्द वारंवार उच्चारताना दिसतात तर काही ‘ तेच ना ‘ याची पुनरावृत्ती करतात.

अजून काही मंडळी बोलताना जणू समोरच्या व्यक्तीची परीक्षा पाहतात. त्यांच्या सांगण्याची सुरुवातच अशी असते. ‘ काल काय झालं माहितीये का ? ‘ किंवा ‘ मी आज केलं असेल माहिती आहे का ? ‘ आता समोरच्या व्यक्तीला कसं माहिती असणार की काल काय झालं किंवा तुम्ही आज काय केलं ? मग पुढे अजून ‘ ऐका ना.. ‘ ची पुस्ती असते. आता आपण ऐकतच असतो ( दुसरा पर्याय असतो का ) तर कधी कधी समोरची व्यक्ती आपल्याला मी फार महत्वाचं सांगतो आहे किंवा सांगते आहे असा आव आणून ‘ हे पहा मी सांगतो. तुम्ही एक काम करा… ‘ अशी सुरुवात करतात. असो मंडळी. तर असे अनेक किस्से आहेत. ‘असो. ‘, ‘ असं आहे बुवा सगळं. ‘ आता तुम्ही एक काम करा. लेख संपत आलाय. तेव्हा वाचणं थांबवा किंवा दुसरं काही वाचा. आणि हसताय ना ? हसत राहा.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ जातं…  ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆

प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

??

☆ जातं… ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

मी जातं…… जातीपातीतील नव्हे ! खूपच अनादी कालीन ! माझ्याशिवाय ह्या मानव जातीची भूक भागत नाही ! तसा माझा ह्या पृथ्वीवर जन्म केव्हा झाला ते सांगता येत नाही. गरज ही शोधाची जननीच ! त्यामुळेच माझा शोध कोणत्या अवलीयाने लावला ते ही अज्ञात ! 

कदाचित रामायण, महाभारत असेल किंवा त्यापुढेही माझा जन्म झाला असेल, नक्की सांगता येत नाही एवढं खर ! मानवी भूक निर्माण झाली व गहू बाजरी ज्वारी निर्माण झाली तेंव्हा पासूनच मी आहे ! पण माझं अस्तित्व अजुनी टिकून आहे, व पुढेही टिकून राहील ! 

मी मुळातच दणकट व खंबीर ! कारण मी दगडातून निर्माण झाले. माझं व स्त्रीच सख्य हे कायमच, स्त्री माझी बाल मैत्रीण ! तिच्या वाटेला आलेलं सुख दुःख मी स्वतः पाहिलंय ! तिच्या वेदना मी जाणल्या !

माझी घरघर व तिच्या प्रपंच्याची घरघर ही भल्या पहाटेच होत असे ! तीन मला ब्राम्ह्य मुहूर्तावर जाग करण्याची सवय लावली ! तिच्या खड्या आवाजातील ओव्या व माझी घरघर एकदमच एकावेळी चालू होतं असत. व आमच्या आवाजाने मग इतर लोक उठत असत.

माझी सुख दुःखाची दोन पाती (पाळ ) मी स्त्रीच्या गळ्यात बांधली ! हे कमी पडू नये म्हणून माझ्या वरच्या पाळीच्या कडेला गोलसर खळीत वेदनेचा दांडा बसवला गेला ! (कदाचित तो त्रिगुणात्मक असावा ) जेणेकरून तो दांडा हातात धरून मला गोलगोल फिरवता येईल अशी सोय पण केली ! खळी ही जणू माझ्या गालावरचीच खळी ! कायमची ! माझा दांडा व तिच्या वेदना ह्या केव्हा एकरूप झाल्या ते कळलेच नाही ! पाळ बाजूला केल तरी, तो वेदनेचा दांडा तसाच ठेवला जातो.

माझ्या खालच्या पाळ्याला मात्र मधोमध एक सुख दुःखाना एकत्र ठेवणारा, प्रेमाचा मजबूत खिळा आहे ! जेणेकरून दोन्ही सुख दुःखाची पाळी एकत्र नांदतील ! 

मी म्हटलं तर वर्तुळाकार ! म्हटलं तर शून्य ! 360 अंशातून कायम फिरते ! व माझ्या भोवती तो वेदनेचा दांडा पण फिरतोच ! माझ्यात व सृष्टीत काय फरक आहे ! ती पण गोल फिरत असतेच की सूर्यभोवती ! काहीवेळा वापर नसल्यास शून्या सारखी हरवते ! शून्यात टक लावून बसते ! 

माझ्या वरच्या पाळीत माझं ऊर्ध्वमुखी तोंड ! जे मुखात पडेल ते गोड मानून घेते ! कधी गहू, कधी ज्वारी, कधी कडवट बाजरी, कधी शुभ्र तांदुळ ! येणाऱ्या घासाला पवित्र मानून, त्याचे चर्वण करायचे व त्याचे कठीण अस्तित्व घालून त्याला सुता सारखे मऊ करायचे ! व बाहेर त्याला धुतल्या तांदळासारखा शुद्ध करून पाठवायचे ! 

जो पर्यंत संसार आहे, प्रपंच आहे, तोपर्यंत माझं हे काम असच अव्याहत पणे चालू असणार ! संसार म्हटलं की भूक आलीच ! ह्या संसारात मोक्ष मिळे पर्यंत हेच माझं अखंड व्रत ! व्वा काय जन्म दिलास देवा ! माझ्या ह्या भाळी दोन सुख दुःखाच्या पाळी, ऊर्ध्वमुख वर वेदनेचा दांडा ! तो ही शून्यात फिरणारा ! 

कित्येक दाणे मुखात येतात, कित्येक सुपात आहेत, कित्येक शुभ्र होऊन बाहेर पडले ! मी मात्र तशीच फिरत आहे. वरच्या पाळीत मात्र तू विविध नक्षी कोरलीस पण खालच्या पाळीच काय ? तिला मात्र छन्निचे घाव सोसावे लागतात ! 

माझं कालपरत्वे रूप बदललं ! यांत्रिकी झालं ! कोणी मिक्सर केलं म्हणून काय झालं ? माझ्या पाळ्या बदलाव्या लागल्या तरी, मी अजुनी वर्तुळातच फिरते ! ती कायमची येणार दळण दळत !! 

© प्रा डॉ. जी आर (प्रवीण) जोशी

ज्येष्ठ कवी लेखक

नसलापुर  बेळगाव

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सयाजीराव गायकवाड :: ☆ श्री प्रसाद जोग ☆

श्री प्रसाद जोग

🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆ सयाजीराव गायकवाड :: ☆ श्री प्रसाद जोग

जन्म: ११ मार्च, १८६३.

(महाराज श्रीमंत सयाजीराव खंडेराव गायकवाड (तिसरे), जन्मनाव गोपाळराव काशीराव गायकवाड.) 

१८७५ ते १९३९ सालांदरम्यान बडोदा संस्थानाचे अधिपती होते. बडोदे संस्थानाचे अत्यंत पुरोगामी वृत्तीचे, कर्तृत्ववान संस्थानिक (कारकीर्द – १८८१-१९३९) होते. बडोदा संस्थानातील प्रजेच्या कल्याणासाठी केलेल्या कार्याकरता ते विशेषत्वाने ओळखले जातात.

बडोद्याचे लोकप्रिय महाराज खंडेराव यांचे निधन झाल्यावर त्यांचे बंधू मल्हारराव गादी सांभाळू शकले नाहीत, कारण त्यांच्यावर बंधूंच्या हत्येचा कट केल्याचा आरोप होता आणि त्या साठी त्यांना अटक देखील झाली होती. खंडेराव महाराजांची मुले लहान वयात निवर्तली असल्याने त्यांच्या विधवा पत्नी महाराणी जमानाबाईसाहेब यांनी कुटुंबातील अन्य मुलांचा दत्तक घेण्यासाठी शोध सुरु केला. नाशिक जवळील कौळाणे येथील काशीराव त्यांच्या तीन मुलांना १)आनंदराव २)गोपाळराव ३) संपतराव याना घेऊन बडोद्याला आले. तिथे तिघांचीही परीक्षा घेण्यात आली, त्यांना विचारले की ‘तुम्हाला इथे का आणले आहे माहीत आहे का?गोपाळराव म्हणाले मला इथे राज्य करण्यासाठी आणले आहे त्या उत्तराने संतुष्ट होऊन त्यांचा राज्याभिषेक करण्यात आला.

दिवाण, सर टी. माधवराव यांनी सयाजीरावांना राज्यकारभाराचे शिक्षण दिले. २८ डिसेंबर १८८१ रोजी गादीवर आल्याबरोबर सयाजी रावांनी राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उपाय योजना केल्या. प्रशासकीय जबाबदारीची विभागणी हे तत्व राज्यकारभारात लागू करून राज्ययंत्रणा सुरळीत केली, सल्लागार नेमून कल्याणकारी योजना अंमलात आणल्या (१८८३), न्याय व्यवस्थेत सुधारणा केल्या, . ग्रामपंचायतींचे पुनरुज्जीवन केले (१९०४); सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची योजना सुरू करून (१८९३) अल्पावधीतच ती सर्व राज्यभर लागू केली (१९०६). गरीब, गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या देऊन उच्च शिक्षणाची सोय केली. औद्योगिक कलाशिक्षणाकरिता  ‘कलाभुवन’ ही संस्था स्थापन केली. त्यांनी ‘प्राच्य विद्यामंदिर’ या संस्थेच्या वतीने प्राचीन संस्कृत ग्रंथांचे संशोधन व प्रकाशन करण्यास उत्तेजन दिले. सयाजीरावांनी ‘श्रीसयाजी साहित्यमाला’ व ‘श्रीसयाजी बाल ज्ञानमाला’ या दोन मालांमधून उत्तम ग्रंथांची भाषांतरे प्रसिद्ध केली. त्यांनी संस्थानात गावोगावी वाचनालये स्थापन केली;. फिरत्या वाचनालयांचीही सोय केली. भारतामध्ये सर्वप्रथम आपल्या राज्यामध्ये अनेक ग्रंथालये स्थापन केली. त्यांनी स्वतः ग्रंथालय शात्राचे शिक्षण घेतले. खऱ्या अर्थाने ते भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक आहेत.

सामाजिक क्षेत्रात त्यांनी केलेली कामगिरीही मोठी आहे. पडदा पद्धती बंदी, बालविवाह बंदी, कन्या विक्रय बंदी, मिश्र विवाहाचा पुरस्कार, स्त्रियांना वारसा हक्क मिळवून देणे, अस्पृश्यता निवारण, विधवा विवाह इ. सुधारणा प्रत्यक्ष अंमलात आणल्या. घटस्फोटासंबंधीचा कायदा हा सर्व भारतात पहिल्यांदाच त्यांनी जारी केला. हरिजनांसाठी अठरा शाळा काढल्या (१८८२). डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली आणि त्यांची संस्थानात उच्च पदावर नेमणूकही केली. सुधारणांच्या प्रत्यक्ष पुरस्कारामुळे त्यांना ‘राष्ट्रीय सामाजिक परिषदे’च्या अध्यक्षपदाचा मान मिळाला (१९०४).

बडोदे ही कलापूर्ण प्रेक्षणीय नगरी ठरली, याचे कारण त्यांनी बांधलेल्या सुंदर वास्तू. लक्ष्मीविलास राजवाडा, वस्तुसंग्रहालय, श्री सयाजी रुग्णालय, नजरबाग राजवाडा, महाविद्यालयाची इमारत, (कमाठी बाग) सयाजी उद्यान., सुरसागर तलाव, खंडेराव मार्केट, वगैरे वास्तूंनी बडोद्याची शोभा वाढविली आहे.

प्रजेची पाण्याची गरज भागवण्यासाठी त्यांनी अजवा या ६२ दरवाज्यांच्या धरणाची निर्मिती केली. त्या वेळी बडोद्याची लोकसंख्या एक लाख होती तरी पुढचा अंदाज घेऊन तीन लाख लोकांना पुरेल एवढा पाणीसाठा करण्याची दूरदृष्टी त्यांनी दाखवली.

त्यांना प्रवासाची अत्यंत आवड होती व त्यांनी जगभर प्रवास केला. जेथे जेथे जे जे चांगले असेल, ते ते चोखंदळपणे स्वीकारून आपल्या संस्थानाची सर्वांगीण भरभराट करण्याचा त्यांनी सतत प्रयत्न केला. लंडनला भरलेल्या पहिल्या दोन गोलमेज परिषदांनाही ते हजर होते. लो. टिळक, बाबू अरविंद घोष या थोर नेत्यांशी त्यांचा घनिष्ठ संबंध होता. राष्ट्रीय आंदोलनाला त्यांचा अप्रत्यक्ष पाठिंबा होता, असे म्हटले जाते. ज्ञानवृद्धी, समाजसुधारणा व शिस्तबद्ध प्रशासन या सर्वच बाबतींत ते यशस्वी ठरले.

‘हिंदुस्थानातील शेवटचा आदर्श राजा’ या शब्दांत त्यांचे यथोचित वर्णन पंडित मदनमोहन मालवीय यांनी केले आहे. मुंबई येथे त्यांचे निधन झाले.

प्रजाहितदक्ष राजा हा शब्द सार्थ ठरवणाऱ्या महाराजा सयाजीराव (तिसरे) याना मानाचा मुजरा.

© श्री प्रसाद जोग

सांगली

मो ९४२२०४११५०   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares