मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सायकलवाली आई … लेखिका : सुश्री यशश्री रहाळकर ☆ सुश्री सुनीला वैशंपायन ☆

सुश्री सुनीला वैशंपायन 

? मनमंजुषेतून ?

☆ सायकलवाली आई … लेखिका : सुश्री यशश्री रहाळकर ☆ सुश्री सुनीला वैशंपायन ☆

तिला मी गेली चार वर्षे रोजच पहातेय … ओळख अशी खास नाही पण ‘ ती ‘ साऱ्यांच्या उत्सुकतेचा केंद्रबिंदू! आम्ही सगळ्या आपापल्या मुलांना शाळेत सोडायला- आणायला जाणाऱ्या आई गॅंग मध्ये ‘ ती ‘ एकदम वेगळी … एकमेव सायकलवर येणारी आई.     

आजकाल status symbol म्हणून भारीचे ब्रॅंडेड कपडे घालून सायकल चालविण्याचे फॅड बोकाळले आहे … ही त्यापैकी नव्हे. ‘सायकल चालविणे,’ हा  कदाचित तिचा नाईलाज असावा .  आमच्या स्कूटी किंवा कार मधून येणाऱ्या पोरांना हे अनपेक्षित होत . कुणाकडे गाडी नसते किंवा TV / Fridge नसतो , हे त्यांना पटतच नाही. 

ती सावळी आरस्पानी … आनंद, समाधान ,आत्मविश्वासाने अक्षरशः ओथंबलेली…. साधीशी सिंथेटिक फुलांची साडी असायची .

गळ्यात चार मणी, हातात दोनच  काचेच्या बांगड्या. 

माझ्या गाडीच्या शेजारीच तिची सायकल पार्क करायची. मागच्या सीटवर तिचा मुलगा …. 

त्याला सायकलचे कॅरीयर टोचू नये, म्हणून, मस्त मऊ ब्लॅंकेटची घडी घातलेली…. लहान असतांना ती त्याला पाठीशी बांधून आणत असे. 

लेक नीटनेटका … स्वच्छ कपडे … बूटांना पॉलिश. 

तो पार वर्गात पोचेपर्यंत ती अनिमिष नेत्रांनी पहात असायची …. 

जणू त्याचं शाळेत जाणं ती अनुभवतेय … जगतेय.

हळूहळू काहीबाही कळायचं तिच्या बद्दल….! 

ती पोळ्या करायची लोकांकडे… फारतर दहावी शिकलेली असावी. नवरा हयात होता, की नव्हता  ,कोण जाणे…? पण,ती तिच्या आईसोबत राहायची असे कळले . RTE (right to education) कोट्यातून तिच्या मुलाची admission झालीये एव्हढीच काय ती माहिती मिळाली. 

एकदा माझ्या लेकीचा कुठल्याश्या स्पर्धेत दुसरा क्रमांक आला. तिला मी यथेच्छ झापत असतांना , पार्किंग मध्ये सायकलवालीचा लेक दिसताच माझी कन्यका किंचाळली …

” अग तो बघ तो!

तो first आला ना, 

so मी  second आले …” 

आणि मोठ्यांदा भोकाड पसरलं. 

मी त्याची paper sheet पाहिली … 

मोत्यासारखं सुंदर अक्षर …! 

अभावितपणे माझ्या लेकीला दाखवत म्हणाले ,

” बघ बघ … याला म्हणतात अक्षर ! किती मेहनत घेते मी तुझ्यासाठी .. आणि तू ??? “

माझे डोळे संताप ओकत होते. 

त्याची आई शांतपणे म्हणाली ,

” कुणीतरी दुसरं पहिलं आलंय म्हणून, तुमची लेक दुसरी आल्याचा आनंद तुम्ही गमवताय ना! ”  

….. सणसणीत चपराक. 

मी निरुत्तर. 

मी खोचकपणे विचारलं, 

“कोणत्या क्लासला पाठवता याला?”

 ती म्हणाली,

” मी घरीच घेते करून मला जमेल तसं… ..! मुलांना नेमकं काय शिकवतात, ते कळायला हवे ना, आपल्याला. ” तेव्हाच कळलं ‘हे रसायन काहीतरी वेगळंच आहे!’

हळूहळू ,तिच्याबद्दल माहिती कधी मिळू लागली, तर कधी मीच मिळवू लागले. 

ती पाथर्डी गावातून यायची…. सकाळी सात तर संध्याकाळी आठ अश्या एकूण पंधरा घरी पोळ्या करायची. तिने स्वतः एका teacher कडे क्लास लावला होता ..बदल्यात ती त्यांच्या पोळ्यांचे पैसे घेत नसे. मी नतमस्तक झाले. मनोमन तिच्या जिद्दीला आणि मातृत्वाला सलाम केला .

पहिल्या वर्गाचा result होता. ती खूपच आनंदात दिसली. चेहऱ्यावर भाव जणू पाच तोळ्याच्या पाटल्या केल्या असाव्यात .. मी अभिनंदन केले … तेव्हा भरभरून म्हणाली. ….

” टिचरने खूप कौतुक केले  त्याचं ! फार सुंदर पेपर लिहिलेत, म्हणाल्या..फक्त थोडे बोलता येत नाहीत म्हणाल्या . त्याच्याशी घरी इंग्रजीत बोल म्हणाल्या. ” मी तिचं बोलणं मनापासून ऐकू लागले … 

” छोट्या गावात वाढले ताई.. वडील लहानपणी गेले … अकरावीत असताना मामाने लग्न लावले… शिकायचं राहूनच गेलं .. फार इच्छा होती हो ! “… डोळ्यात पाणी प्रयासाने रोखून म्हणाली… ” आता याची आई म्हणून कुठेच कमी पडणार नाही मी… एका teacher शी बोलणं झालंय ,त्या मला इंग्रजी बोलायला शिकवणार म्हणाल्यात …. बारावीचा फॉर्म भरलाय … उद्या याला मोठा झाल्यावर कमी शिकलेली आई म्हणून लाज वाटायला नको .” म्हणत खळखळून हसलीं. त्याला आज पोटभर पाणीपुरी खाऊ घालणार असल्याचे सांगून, ती निघाली.

मुलांना रेसचा घोडा समजणारी “रेस कोर्स मम्मा”,  सकाळी सातच्या शाळेलाही मुलांना सोडताना  नुकतीच पार्लर मधून आलेली वाटणारी “मेकअप मम्मा”, दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर केवळ बारीक होण्यावर बोलणारी, “फिटनेस मम्मा ” स्वतः पोस्ट ग्रॅज्युएट असूनही, नर्सरीतच मुलांना हजारो रुपयांचे क्लासेस लावून मला कसा याचा अभ्यास घ्यायला वेळ नाही हे सांगणारी “बिझी मम्मा” किंवा मुले allrounder होण्यासाठी त्यांना मी कशी हिरा बनवून तासते हे सांगणारी  ” जोहरी मम्मा ” … ह्या आणि अश्याच अनेक मम्मी रोज भेटतात मला………या मम्मी आणि मॉमच्या जंगलात आज खूप दिवसांनी मला एक ” आई ” भेटली. अशी आई ,जी एक स्त्री म्हणून,…. माणूस म्हणून… आणि एक आई म्हणून खूप खंबीर आहे… कणखर आहे. *फारच थोड्या नशीबवान स्त्रिया असतात ,ज्यांना जिजाऊ आणि सावित्रीबाई खऱ्या अर्थाने कळतात…! सायकलवाली आई त्यातलीच एक..  

लेखिका : सुश्री यशश्री रहाळकर

प्रस्तुती : सुनीला वैशंपायन

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ आंतरराष्ट्रीय बुद्धिबळाचा पट आणि भारत… ☆ अनुवादक – श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ आंतरराष्ट्रीय बुद्धिबळाचा पट आणि भारत… ☆ अनुवादक – श्री सुनील देशपांडे

सुमारे 63 वर्षांपूर्वीची घटना आज सगळ्यांच्या विस्मृतीत गेली आहे. अर्थात विस्मृतीत गेली असे म्हणणे सुद्धा अवघड आहे. कारण किती जणांना ती सविस्तर माहिती होती?

ॲडमिरल एन कृष्णन हे त्यावेळी भारतीय नौदलाच्या पूर्व विभागाचे प्रमुख होते. त्यांनी जर पुस्तक लिहिले नसते तर ही घटना नक्कीच विस्मृतीत गेली असती. 

१९७१ मध्ये त्यावेळी अमेरिकेने भारताला, पूर्व पाकिस्तान (म्हणजे आत्ताचे बांगलादेश) बरोबर सुरू केलेले युद्ध थांबवा नाहीतर याचे गंभीर परिणाम होतील अशी इशारा वजा धमकीच दिली होती. या इशाऱ्याची दखल घेऊन भारताने रशियाकडे सहकार्याची मागणी केली होती. त्यावेळचा हा प्रसंग जवळपास इतिहासातून नामशेष झाला होता. परंतु वरील पुस्तकाने तो कायमचा करून ठेवला आहे.

डिसेंबर १९७१ मध्ये जगातील दोन बलाढ्य लोकशाहीवादी देशांनी जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाला धमकी दिलेली होती.

जेव्हा पाकिस्तानचा पराभव समोर दिसत होता त्यावेळी श्री हेनरी किसिंजर यांनी हे युद्ध संपविण्यासाठी आणि भारताला रोखण्यासाठी अमेरिकेचे सातवे आरमार पाठवण्याची शिफारस केली होती. 

हे सातवे आरमार म्हणजे काय होते?

जगातील सगळ्यात मोठे ७५ हजार टनाचे आणि अणुऊर्जेवर चालणारे, ७० युद्ध सज्ज विमानांना घेऊन जाऊ शकणारे त्या काळातील जगातील सर्वात मोठे आणि सर्वश्रेष्ठ असे आरमार होते. 

त्या मानाने भारताकडील सगळ्यात मोठे आयएनएस विक्रांत हे जहाज वीस हजार टनाचे आणि वीस हलकी युद्धविमाने घेऊन जाऊ शकणारे जहाज होते.

बांगलादेश मधील अमेरिकन नागरिकांच्या सुरक्षित सुटकेसाठी हे आरमार पाठवले जात असल्याचे अमेरिकेकडून जरी वरकरणी सांगण्यात आले असले तरी प्रत्यक्षात बांगलादेशच्या स्वातंत्र्य युद्धाचा नायनाट करण्याच्या दृष्टीने आणि पाकिस्तान सरकारला मदत करण्याच्या दृष्टीने त्याचा उपयोग करण्याचा विचार होता.

तेवढ्यात आणखी एक भय वाढवणारी बातमी रशियन गुप्तचरांमार्फत भारत सरकारला मिळाली.

ब्रिटिश सरकारच्या नौदलातील काही जहाजांचा समूह अरबी समुद्राकडे येण्यास निघाला आहे. त्यामध्ये एच एम एस ईगल या विमानवाहू युद्धनौकेचा आणि एचएमएस अलबियन या खतरनाक युद्ध कमांडोज सह येणाऱ्या जहाजांसह आणखी काही प्रचंड संहारक अशा युद्ध नौकांचा  समावेश होता.

भारताला सगळ्या बाजूने कोंडीत पकडून भारतावर दबाव आणून पाकिस्तानला मदत करून बांगलादेशचे स्वातंत्र्य युद्ध दडपून टाकण्याची योजना अमेरिका आणि ब्रिटन या दोन्ही देशांनी आखली होती.

खरोखरच हा प्रसंग आंतरराष्ट्रीय दडपणाखाली दडपून जाऊन  आपल्या मनाविरुद्ध निर्णय घ्यावा लागण्याचा आणीबाणीचा प्रसंग होता. 

डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात अमेरिकेचे सातवे आरमार हिंदी महासागरात येऊन ठेपले सुद्धा.

दुसऱ्या बाजूने ब्रिटनचे आरमार वेगाने अरबी समुद्राकडे कूच करीत होते. 

अत्यंत कसोटीचा क्षण आणि सगळे जग श्वास रोखून परिस्थिती पाहत होते. आणि त्या निर्णायक क्षणाला सुरुवात झाली. अमेरिकेचे सातवे आरमार पूर्व पाकिस्तान कडे सरकू लागले आणि एवढ्यात अमेरिकन आरमाराला प्रचंड मोठा धक्का बसला.

रशियन पाणबुड्या तत्पूर्वीच पाण्याखालून भारताच्या किनाऱ्याच्या जवळपास पोहोचल्या होत्या. त्या एकदम समुद्रातून वर आल्या आणि अमेरिकन सातवे आरमार आणि भारताचा समुद्रकिनारा यामध्ये या पाणबुड्यांची साखळी उभी राहिली. याबाबत अनभिज्ञ असलेले अमेरिकन आरमार गोंधळून गेले. 

सातव्या आरमाराचा ॲडमिरल गोर्डन याने संदेश पाठवला “सर आपल्याला खूपच उशीर झाला आहे. सोविएत आपल्या आधीच येथे पोहोचले आहेत”

तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली होती आणि अशावेळी नाईलाजाने अमेरिकेच्या सातव्या आरमाराला व ब्रिटिश आरमाराला सुद्धा मागे फिरावे लागले. 

पूर्व पाकिस्तानातील पाकिस्तानी सरकारला पाठिंबा देण्यासाठी तिसरे महायुद्ध ओढवून घ्यायचे का? त्यापेक्षा अमेरिकन आरमाराने माघार स्वीकारली. 

भारतीय नौदल व लष्कर आणि त्याचे प्रमुख व सर्वात मुख्य म्हणजे निर्णय घेणाऱ्या भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी, यांच्या धैर्याला आणि आंतरराष्ट्रीय डावपेचांना खरोखरच तोड नाही. 

 यानंतरचा भारताचा विजय आणि बांगलादेशी स्वातंत्र्य हे तर सगळ्यांनाच माहित आहे. परंतु त्यामागे केवढे जगड्व्याळ घटना क्रमांचे, चतुराईचे राजकारणाचे बुद्धिबळ खेळावे लागले हे समजल्यानंतर खरोखरच त्या सर्व घटना क्रमातील सर्वांचाच अभिमान वाटतो. 

— एका इंग्रजी लेखाचा केलेला स्वैर अनुवाद. 

अनुवादक – श्री सुनील देशपांडे

पुणे

मो – 9657709640 Email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ समाधानाची व्याख्या… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ समाधानाची व्याख्या… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर 

बंद पडलेली कार रस्त्यावर लावून, मी बसमध्ये चढलो तर खरं.. पण आतली गर्दी बघून जीव घाबरला.

बसायला जागा नव्हती. तेवढ्यात एक सीट रिकामी झाली. पुढचा एक जण  सहज तेथे बसू शकत होता… पण त्याने ती सीट मला दिली.  

पुढच्या स्टाॕप वर पुन्हा तेच घडले. पुन्हा आपली सीट त्याने दुसऱ्याला दिली.

आमच्या पूर्ण बस प्रवासात हा प्रकार चारदा घडला.

बरं हा माणूस अगदी सामान्य दिसत होता. म्हणजे कुठेतरी मजुरी करून घरी परत जात असावा.

 

आता शेवटच्या स्टाॕपवर आम्ही सर्वच उतरलो. 

तेव्हा उत्सुकता म्हणून मी त्याच्याशी बोललो…  विचारले, 

“ प्रत्येक वेळी तुम्ही  तुमची सीट दुसऱ्याला का देत होता?? “

 

तेव्हा त्याने दिलेले उत्तर…. 

“ मी शिकलेला नाही हो. अशिक्षित आहे मी. एके ठिकाणी कमी पैशावर काम करतो, आणि माझ्याजवळ कोणाला द्यायला काहीच नाही… ज्ञान नाही, पैसा नाही. तेव्हा मी हे असे रोज करतो. हे मी सहज‌ करू शकतो ना..!  दिवसभर काम केल्यानंतर अजून थोडा वेळ उभं राहणं मला जमते. मी तुम्हाला माझी जागा दिली, तुम्ही धन्यवाद म्हणालात, यातच मला खूप समाधान मिळाले. मी कोणाच्या तरी कामी आलो ना? 

…. असं मी रोज करतो. माझा नियमच झाला आहे हा.. आणि रोज मी आनंदाने घरी जातो.” 

 

त्याचे उत्तर ऐकून मी थक्कच झालो. 

त्याचे विचार व समज बघून, याला अशिक्षित म्हणायचे का? हा विचार आला. 

 

कोणासाठी, काहीतरी करायची इच्छा, ती पण स्वतः ची परिस्थिती अशी असताना !

मी कशा रीतीने मदत  करू शकतो, यावर शोधलेला हा उपाय बघून देव सुध्दा आपल्या या निर्मितीवर खूष झाला असेल ! माझ्या सर्वोत्तम कलाकृतीपैकी ही एक कलाकृती, असं दिमाखात सांगत असेल !

        

त्याने मला खूप गोष्टी शिकवल्या….. 

स्वतः ला हुषार, शिक्षित समजणारा मी, त्याच्यासमोर  खाली मान घालून स्वतःचे परिक्षण करू लागलो.

किती सहज, त्याने त्याच्या समाधानाची व्याख्या सांगितली. 

देव त्याला नक्कीच पावला असणार..

 

मदत ही खूप महाग गोष्ट आहे. कारण मनाने श्रीमंत असणारे खूप कमी लोक असतात..! 

सुंदर कपडे, हातात पर्स, मोबाईल, डोळ्यांवर गॉगल, चार इंग्लिश चे शब्द येणे म्हणजेच सुशिक्षित का ? हीच माणसाची खरी ओळख का ? मोठं घर, मोठी कार, म्हणजेच श्रीमंती का ??

 

कोण तुम्हाला केव्हा काय शिकवून जाईल, आणि तुमची धुंदी उतरवेल सांगता येत नाही !

या माणसाच्या संगतीने माझे विचार स्वच्छ झाले..!

   

म्हणतात ना…… 

    “कर्म से पहचान होती है इंसानों की।

      वरना महंगे कपड़े तो पुतले भी पहनते हैं दुकानों में”। 

लेखक : अज्ञात 

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सुरक्षा सप्ताह ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ सुरक्षा सप्ताह ☆ सौ कल्याणी केळकर बापट

नुकताच 4 मार्च हा दिवस सुरक्षा दिन म्हणून साजरा केला गेला. ह्या दिवसापासून एक सप्ताह हा  राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह असतो. ह्या निमित्ताने सुरक्षेचे नियम,ते पाळतांना आपण घ्यायची काळजी,ती काळजी घेतल्यामुळे आपल्याला मिळालेले फायदे ह्या बाबतचे वेगवेगळे फलक चौकाचौकात बघायला मिळतात.

खरतरं सुरक्षा पाळणे ही बाब सप्ताहाशी निगडीत नकोच.हा खरतरं वर्षभर राबविण्याचा उपक्रम. पण आपल्या कडील ही शोकांतिकाच आहे ज्या बाबी दररोज,चोवीस तास पाळल्या गेल्या पाहिजेत त्या महत्त्वाच्या गोष्टींचे सप्ताह किंवा दिवस पाळून औटघटकेचे महत्त्व आणून त्याची बोळवण केली जाते. असो.

मानवी जीवन अनमोल आहे तसेच ते क्षणभंगुर सुध्दा आहे.म्हणून आपणच आपल्या जिवीताची काळजी घेणे हे प्रत्येक सुजाण नागरिकाचे कर्तव्यच आहे.आपण स्वतः नियमांचे पालन करीत नसू,त्यांचा बेछूट पणे भंग करीत असू तर आपल्याला त्याच्या पायी आलेल्या नुकसानीस दुस-याला जबाबदार धरण्याचा काहीच हक्क नसावा आणि नुकसानभरपाई मागण्याचा पण.

वाहनाचा अनियंत्रित भन्नाट वेग, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करणे हे आपण आणि आपणच टाळायला हवे. आपल्या कडील शोकांतिका म्हणजे चुका आधी आपण करायच्या, खापर दुसऱ्याच्या माथी मारायचे आणि मग सरकारला मदतीस वेठीस धरायचे. तेव्हां ह्या गोष्टीची खबरदारी आपणच सुजाण नागरिक म्हणून घ्यायलाच हवी.

जेव्हा राष्ट्रीय सुरक्षा ही काही कालावधीसाठी न राहता ती कायमस्वरूपी पाळण्याची आपली प्रत्येकाची आपणहून मानसिकता बनेल तो दिवस खरा आपल्यासाठी आणि देशासाठी सुध्दा सुदिन ठरेल.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ “काहूर मनी दाटले…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

“काहूर मनी दाटले…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

या निर्जन निवांत स्थळी, आणि अश्याच रोजच्या कातर वेळी, वाट पहात बसते तुझी प्रेमात बुडालेली वेडी खुळी. तू हवा हवासा  असतोस जवळी..दिनवासर दिनकर निरोपाचे काळवंडलेले अस्तराचे पालाण घालून आसंमाताला जातो अस्ताला डोंगरराजीच्या पलिकडे दूर दूर. ते पाहून  हूरहूर मनातील उमटते  तरंग लहरी  लहरी ने तडागाच्या जलाशयावर. आता क्षणात येशील तू अवचित जवळी अशी मनास माझ्या समजूत घालते  आभासमय आशेवर. निराशेच्या काळ्या मळभाने गिळून टाकतात डोंगर, तलावाचे काठ, नि पाते पाते तरूलताचे, तृणपातीचे माझ्या मनासहीत..चाहूल पदरवांची येईल का , आतुर झालेले कान नि दाटून गेलेल्या  चोहिकडेच्या अंधकाराने भयकंपिताचे आलेले भान. आजची आशा निराशेत नेहमीप्रमाणे  लुप्त झाली, तसे उठून निघाले पाय ओढीत तनाचे मण मण ओझे घराकडे.चुचकारीले कितीतरी परी हटवादी मनास जोजवेना ते आढेवेढे..

.. अशी रोजच संध्याकाळी कातर वेळी, वाट पहात बसते तुझी प्रेमात बुडालेली वेडी खुळी. काहूर मनी दाटले नेत्रातून पाझरले.

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सहल पहावी करून ! ☆ श्री मनोज मेहता ☆

श्री मनोज मेहता

? मनमंजुषेतून ?

सहल पहावी करून ! ☆ श्री मनोज मेहता 

मी खरंतर एकट्याने फिरणारा फिरस्ता. माझ्या लग्नाच्या अगोदर मी एकट्याने ६०% भारत भ्रमंती केली होती.

वपण लग्न झाल्यावर अनेकदा आम्ही म्हणजे, सौ.मधुरा व दोन्ही कन्यांसह स्वतः प्लॅन करून फिरायला जायचो. माझ्या गप्पा मारण्याच्या सवयीने अनेक लहान- मोठ्यांच्या ओळखी डोंबिवलीत होऊ लागल्या होत्या. त्यातील एक म्हणजे श्री.व सौ.दुनाखे दांपत्य. त्यांचा स्वतःचा ‘मधुचंदा ‘ नावाचा पर्यटन व्यवसाय. ते एकदा सहज गप्पांच्या ओघात म्हणाले ,’चला मनोजभै तुम्हीपण आमच्या बरोबर, सिमला-कुलू-मनालीला ! म्हटलं किती खर्च येईल? आम्ही दोघं व दोन लहान मुली. ही गोष्ट १९९७ सालची हं. तेव्हा चंद्रकांत दुनाखे म्हणाले २१००० रूपये. मी विचार केला आणि म्हणालो, ‘मी आत्ता अर्धे देईन, बाकीचे आल्यावर महिन्याभरात देईन, चालेल का ? त्यावर लगेच सौ.निलिमा दुनाखेंनी होकार दर्शवला. आणि दिल्ली-सिमला-कुलू-मनाली, असा  खऱ्या अर्थाने समूह सहलीचा आमचा प्रवास सुरु झाला. राजधानीने सकाळी दिल्लीत पोचल्यावर, श्री.दुनाखे यांनी दिल्ली स्थानकावरच आमचे स्वागत केले आणि  मग छान आरामशीर बसप्रवास सुरु झाला.

बसमध्ये मी इतका वेळ शांत कसा बसणार ? माझ्यासाठी मोठाच प्रश्न होता. म्हटलं चला आता अन् सुरू झालो. मी स्वतःची व माझ्या कुटुंबाची ओळख सांगितल्यावर प्रत्येक जण आपली ओळख सांगू लागला. ही ओळखपरेड संपली नि लगेचच जेवणाचा थांबा आला. मस्त सरसोका साग, मक्के की रोटी अन् लय भारी जम्बो लस्सी, क्या बात है! तिथल्या सरदारजी मालकाने सर्वांचे अगत्याने स्वागत करून, आग्रहाने खाऊ घातले. पाजी, की लाऊ जी? लगेच मैं बोल्या, ‘सरदार, अब मेरा पेट फाडेगा क्या? ‘,असं म्हणताच सरदारजी आणि नुकतीच ओळख झालेली मंडळी व त्यांची लहान मुलं खळखळून हसायला लागली.

आपला मित्र सर्वांच्या मनांत भरला ना राव!

असो, सुमारे नऊ तासांच्या प्रवासानंतर आम्ही  सारे, रात्री सिमल्याला पोचलो. बसमधून उतरताच प्रचंड थंडीने आमचे स्वागत केले अन् मग लगोलग मोठ्या मोठ्या खोल्या असलेल्या हॉटेलात जाऊन जेवण करून, सगळे गुडुप! सकाळी नाष्टा करून निघालो की बसने ! चक्क दोन दिवस सिमला दर्शन ! मॉल रोड, कुफरी, चाडविक फॉल्स,जाखू हिल, सिमला राज्य संग्रहालय, समर हिल अशी सर्वांग सुंदर स्थळं  पाहून पुन्हा त्याच अप्रतिम हॉटेलात रात्री मुक्काम ! तिसऱ्या दिवशी सकाळी चहा, नाष्टा करून कुलूचा प्रवास सुरु झाला. चौफेर निसर्गाचं विलोभनीय दर्शन करत करत गाने तो बनता है ना ! मध्येच सुसु ,जेवण -चहा पॉईंट इत्यादि करत-करत संध्याकाळी कुलूला पोचलो.

अप्रतिम बंगलेवजा हॉटेल, क्या बात है ! आणि हिमाचल प्रदेशातील जेवण म्हणजे लाजवाब हो !  दुनाखेंनी कुलूला पोचल्यावर दुसऱ्या दिवसांपासून ते मनाली सोडेस्तोवर मात्र आपलं बुवा हं,  म्हणजे मराठी स्वादिष्ट भोजनाची उत्तम सोय केली होती .

तर मंडळी, बियास नदीच्या खोऱ्याच्या भागाला कुलू  म्हणतात. ताज्या भाज्या, मसाले, औषधी वनस्पती, गहू, मका, तुती, देवदार, बार्लीची शेती हा इथल्या लोकांचा प्रमुख व्यवसाय ! इथली गरीब घरातली मुलं सुद्धा कसली गोड दिसतात हो ! आरोग्यकारक उष्मोदकाचे झरे असल्याने, विहार व विश्राम यांसाठी कुलूला प्रवासी पुष्कळ येतात. येथील प्राचीन हिंदू मंदिरांवरील शिल्प प्रेक्षणीय आहे. त्यामुळे छोटेखानी स्वर्ग असलेल्या कुलूला वेगळेच महत्व आले आहे. दोन दिवस कुलू व्हॅली भटकंती करून, पाचव्या दिवशी आम्ही सकाळी ८ वाजता मनालीकडे निघालो.

कुलू ते मनाली माझ्या अंदाजाने बसने प्रवास ५६ किमी.चा. घाटाघाटातून प्रवास करत अखेर मनालीच्या टुमदार हॉटेलात पोचलो, अन् जेवण करून मनालीतील छोटेखानी मॉलरोडवर फिरायला गेलो. मधुचंदाच्या स्वादिष्ट भोजनावर ताव मारला. श्री.व सौ.दुनाखे यांचं व्यवस्थापन एकदम चोख, मानलं राव ! सहाव्या दिवशी हिडिंबा मंदिर पहात असताना तर मला काय फोटो मिळाला! मी जाम खूष. जुन्या मनालीतील मनु मंदिर पाहून परत भोजन व आराम करून नागरगढी हे ऐतिहासिक स्थळ पाहण्यासाठी गेलो, त्याचं किती वर्णन करू तितकं कमीच.

सातव्या दिवशी नेहरू कुंड व विविध पारंपरिक वस्तू आणि इमारतींच्या प्रतिकृती असलेले, हिमाचलचा वारसा प्रदर्शित करणारे, लहानसे संग्रहालय पाहिले आणि संध्याकाळी मस्त आराम केला. आठव्या दिवशी सकाळी – सकाळी सुप्रसिद्ध रोहतांगपास या बर्फाच्छादित रुपडं असलेल्या, प्रसिद्ध ठिकाणी पोचलो. गमबूट, कोट, हातमोजे, टोपी प्रत्येकाच्या आकाराप्रमाणे परिधान करत, चालतोय चालतोय!आलटून -पालटून दोन्ही मुलींना कडेवर घेत, कसेबसे पोचलो अन् समोर जणू काही सिनेमातील दृश्य  अवतरलेलं! आपण आपल्या डोळ्यांनी हे प्रत्यक्ष पाहतोय, यावर विश्वासच बसेना, असा कोसो-दूर पसरलेला बर्फ !आहाहा! आमच्या पैकी बरेच जण  चक्क बर्फावर आडवे झालो. नंतर अर्थातच एकमेकांवर हो हो, तीच फेका-फेकी आम्हीही केली बरं.  पण -पण काहींच्या विकेट जायला सुरवात ना, कारण गमबुटात बर्फ गेल्यामुळे बधिर पणा यायला लागला आणि मोठ्यांपासून लहानग्यांपर्यंत नुसती धमाल व रडारड की! अन् तिथून सर्वांचे पाय बसकडे वळायला लागले. किती लांब ती बस? त्याला इकडे बोलवा ना ! अखेर हुश्श हुश्श करत सगळेच एकदा भाड्याचे सामान परत देऊन कसे-बसे बसपर्यंत पोचलो. आत जाऊन कधी एकदा बसतोय असं झालं ना ! हु §हु§हु§ बसमध्ये कोणी कोणाशी बोलायला तयार नाही, चिडीचूप! 🤗

दुपारी दोनच्या सुमारास हॉटेल मध्ये पोचलो बुआ. त्यादिवशी सगळ्यांनी साडेतिनला गरम -गरम जेवणावर ताव मारला अन गुडुप! संध्याकाळी हळूहळू खोलीच्या बाहेर येऊन, चहाचे घोट घेत, कसली फाटली ना! याचीच चर्चा. पुन्हा गमती-जमती व जेवण करून गप्पांचा फड रंगला आणि हळूहळू आपल्या खोलीत रवाना. इकडे मी आमच्या खोलीत आलो आणि मधुराला कापरं भरलं. मी जाम टरकलो. लगेच सौ.दुनाखे वहिनींना बोलावलं. त्यांनी स्थानिक डॉ.ना फोनाफोनी सुरू केली, पण कोणी फोन उचलेना. कारण मनालीत त्यावेळी संध्याकाळी ७ नंतर सगळे डॉ.भेटणार नाही हं, असं म्हणायचे. मग हॉटेलची मालकीण आली, तिनं बघितलं आणि पांच मिनिटांत आख्खी ब्रँडीची बाटली आणून मधुराच्या पूर्ण शरीराला, तिने ब्रँडीने मसाज केला. एका तासानं ती शुद्धीवर आली अन् आम्ही सारे हुश्श! त्या पंजाबी मालकीणीने सांगितलं,’ ऐसा किसी किसीको होता है, जादा थंड में जाके आने के बाद ऐसा होता है! त्या पंजाबन बाईने एक पैसा घेतला नाही हा तिचा दिलदारपणा हो. ‘ये तो मेरी महमान है जी!’ सलाम त्या माउलीला.

या संपूर्ण प्रवासात सौ.मधुराला मी दम दिला होता, मी छायाचित्रकार आहे हे कोणालाही सांगायचं नाही, नाहीतर मला सहलीचा आनंदच घेता आला नसता. आणि तिने ही गुप्तता पाळली चक्क. 🤗

नवव्या दिवशी आम्ही नाष्टा करून बाप्पा मोरया करत, बसमधून परतीच्या प्रवासाला, म्हणजेच दिल्लीला निघालो. मनालीहून निघालेली बस अडीच तासात कुलू-मनालीच्या मध्येच बंद पडली. आम्ही वाट बघून खाली उतरलो, ड्रायव्हर आणि क्लीनर काय नक्की झालं ते बघत होते. कारण गेले दहा दिवस बसने कुठेही कुरकुर केली नव्हती. नेमकी बंद पडली आणि तीही रस्त्याच्या मधोमध  ना! त्यावेळेस घाटाच्या खाली कुठेही काहीही नव्हतं, फक्त रस्ता, सुंदर निसर्ग व बियास नदीच्या पाण्याचा खळाळता गोड आवाज! एका तासाने समजलं पाटा तुटला अन् बस दुरुस्त व्हायला

किमान ८/९ तास तरी लागतील, होईल हेही नक्की नाही. झालं, नुसता गोंधळ, आमचं विमान / रेल्वेचं आरक्षण आहे ते चुकणार, आता काय होणार, मुलांचं कसं होणार वगैरे वगैरे. हो, आणि ९७ साली मोबाईल नव्हते व आजूबाजूला कुठंही फोन नव्हते. नाही म्हटलं तरी सहल आयोजक पण गोंधळून गेले ना! आम्ही रस्त्यावरच कडेला उभे होतो, तितक्यात श्री.दुनाखे म्हणाले, कोणाचंही नुकसान झाल्यास मी भरपाई देईन हे नक्की! त्यांची काहीच चूक नसताना हे  सांगणं, ही खरंच हिम्मत लागते! ती त्यांनी दाखवली. मला धरमशालाला जाऊन दुसऱ्या बसची सोय करावी लागेल, आणि मगच सर्वांना घेऊन निघावं लागेल. पण यासाठी संध्याकाळ होईल. मी म्हटलं तुम्ही ट्रक वगैरे जी दिसेल त्या गाडीने निघा, मी सांभाळतो सगळ्यांना अन् ते रवाना झाले.

गोंधळ  नुसता वाढतच चाललेला! मी सर्वांना शांत करत परिस्थितीची कल्पना दिली, आता कृपया शांत रहा अन्यथा काहीही होणार नाही.

मी दोघांना घेऊन रस्त्यावर पुढे चालत निघालो. अर्ध्या तासानं छोटं मंदिर दिसलं अन् माझ्या जीवात जीव आला. तिथं पोचल्यावर आत एक माणूस होता, त्याला विचारलं, स्टो वगैरे काही आहे का? सर्व कल्पना दिल्यावर त्याने होकार दिला अन आम्ही खूष झालो. बिचारा सामान घेऊन बस थांबली तिथं आला, त्यानं आडोसा पाहून स्टो पेटवला. मग दुनाखेंचे आचारी होते त्यांनी चहा बनवला. नंतर भात व डाळ शिजायला ठेवली.

इकडे मंडळींना चहा दिल्यामुळे, सगळे शांत झाले होते. आता मी वहिनींची परवानगी घेऊन, बसचा ताबा घेतला. मी फर्मान सोडलं की प्रत्येकाने आपल्या आयुष्यातील गमतीदार प्रसंग सांगा, असे म्हणताच एक एक करत बोलू लागले. कोणी म्हणालं लग्न झालं, मुलगा /मुलगी जन्मले / आई बाबांची पुण्याई / माझी कॉलेज मधली मैत्रीण, नेमकी माझ्याच गळ्यात पडली / लॉटरी५० रु. ची लागली / एकजण म्हणाले तुम्हीच भेटला / आमच्या दोघांचा लग्नानंतरचा हा पहिलाच हनिमून वगैरे करता -करता चक्क ३ तास हशा-टाळ्यात कसे गेले ते समजलंच नाही. मी लगेच खाली उतरून जेवण तयार झालं ना ते बघितलं आणि सर्वांना खाली उतरवलं व सांगितलं थोडं रस्त्याखाली या, इथं थोडी बसायला जागा आहे . सर्व मंडळींचं भोजन उरकेपर्यंत दुपारचे ३ वाजले. मी हुश्श झालो, दुनाखे वहिनी तर मनोमन माझे आभार मानत होत्या. मी म्हटलं लोकं ओरडणार हो साहजिक आहे, पण किती वेळ ओरडतील? 😂

नंतर ज्यांना डुलकी घ्यायची ते बसमध्ये गुडूप, आणि मी चहा बनवण्याच्या तयारीला. संध्याकाळी तिकडे अंधार लवकर पडतो.५ वाजता चहा दिला मंडळी एकदम खूष. केव्हा येणार दुनाखे, कसे येणार, असं करता -करता, रात्री ९ ला श्री.दुनाखे दुसरी बस घेऊन आले आणि सर्व सामान भरून, आपली आपली पार्सलं बसमध्ये बसली अन् गाडी बुला रही है करत, सकाळी दिल्लीत पोचलो.

मंडळी मधुचंदा ट्रॅव्हल्स, उत्तम सोयी, भोजन आणि भरभरून देणारे दुनाखे दांपत्य, काय आणि किती  सांगू ?

आज मधुचंदा खूप मोठी झाली आहे. मुलगा चेतन व सून सौ.अनुजा दोघेही तितकीच काळजी घेतात व देशविदेशात आनंदाने व सुखरूप फिरायला घेऊन जातात.

© श्री मनोज मेहता

डोंबिवली  मो ९२२३४९५०४४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ – बापाचं काळीज… – लेखक – श्री अक्षय भिंगारदिवे ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ – बापाचं काळीज… – लेखक – श्री अक्षय भिंगारदिवे ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

मुलगी : गुड मॉर्निंग पप्पा.

वडील : एवढ्या लवकर उठलीस?

मुलगी : हो.

वडील : सासूने कंबरेत लाथ घालून उठवलं की काय?

मुलगी : पप्पा..

वडील : अशीच लवकर उठत जा बेटा. कारण आता तू काय तूझ्या पप्पाच्या घरी नाही.

मुलगी : मारला टोमणा.

वडील : आमचे जावई उठले?

मुलगी : हो. तो सकाळीच उठून जिमला गेलाय.

वडील : लगेच अरे तुरे?

मुलगी : तुमच्याशीच तर बोलतेय.

वडील : अगं पण आजूबाजूला सासरचे लोक असतील. कुणी ऐकलं तर आमचे संस्कार निघायचे.

मुलगी : तसं काही नाही होणार.

वडील : तूझ्या बापाला मान झुकवावी लागेल, असं काही..

मुलगी : हो पप्पा..

वडील : आवडतंय ना तिकडे?

मुलगी : नाही.

वडील : का?

मुलगी : रोपटं उपटून थेट दुसऱ्याच्या अंगणात लावायचं आणि त्यालाच विचारायचं?

वडील : म्हणून तर तूझ्या सावलीवर आता फक्त त्यांचाच अधिकार.

मुलगी : नकोशी झालेली ना पप्पा मी?

वडील : बापाचं कर्तव्य असतं बेटा.

मुलगी : ज्या हाताचा पाळणा केला, त्याच हाताने पाठ थोपटून पाठवणी केली ना? 

वडील : नाईलाज होता बाळा.

मुलगी : कळतंय.

वडील : समजूतदार झालंय माझं लेकरू.

मुलगी : पप्पा, थँक यू..

वडील : का बरं?

मुलगी : जेव्हा सगळे लोक माझ्या लग्नासाठी तुमच्यावर दबाव टाकत होते आणि सतत सगळे चौकश्या करत होते, तेव्हा तुम्ही माझ्या पाठीशी खंबीर उभे होतात.

वडील : तुला शिकून स्वावलंबी बनायचं होतं. म्हणून मग समाजाचा विरोध सोसायची तयारी ठेवली.

मुलगी : मागची ४ वर्षे, तुम्ही माझ्यासाठी खूप काही सहन केलं.

वडील : तूझ्या आनंदात माझा आनंद.

मुलगी : खरं ना?

वडील : म्हणजे?

मुलगी : माझ्या आनंदात तुमचा आनंद?

वडील : हो.

मुलगी : कुठे आहात?

वडील : बेडरूममध्ये बसलोय.

मुलगी : समोर हिशोबाची डायरी आहे ना?

वडील : आईने सांगितलं?

मुलगी : पप्पा जन्मल्यापासून ओळखते तुम्हाला.

वडील : हो.

मुलगी : हिशोब करताय?

वडील : हो. थोडेफार पैसे देणे बाकी आहे. त्याचीच जुळवाजुळव..

मुलगी : थोडे की फार?

वडील : म्हणजे?

मुलगी : मंगल कार्यालयाचे २ लाख, केटरिंगचे दीड लाख, दागिन्यांचे सव्वा २ लाख, कपडे दीड लाख आणि..  

वडील : तुला कसं माहीत?

मुलगी : तुमच्या हातातील हिशोबाचे डायरी बघतच तर लहानाची मोठी झाले.

वडील : काहीही..

मुलगी : आठवतंय?

वडील : काय?

मुलगी : माझ्या दहावीच्या क्लासची अर्जंट फी भरायची होती.

वडील : हो.

मुलगी : तेव्हा तुम्ही सर्वांकडे पैसे मागितलेले.

वडील : हो. मात्र मार्च एंडमुळे कुणाकडेच पैसे नव्हते.

मुलगी : त्यादिवशी दुपारी तुम्ही घराबाहेर पडलात आणि मग रात्री उशिरा पैसे घेऊन घरी आलात.

वडील : मित्राने मदत केलेली.

मुलगी : खोटं बोललं होतात ना?

वडील : म्हणजे?

मुलगी : त्या दिवसानंतर तुमच्या हातात पुन्हा कधीच तुमची ती आवडती अंगठी दिसली नाही.

वडील : करावं लागतं.

मुलगी : बारावीला फी भरण्यासाठी गळ्यातली सोन्याची चेन?

वडील : तूच माझा दागिना आहे ना पोरी.

मुलगी : कॉलेजला ॲडमिशन झाल्यावर मला कॉम्प्युटर हवा होता.

वडील : तुला प्रॅक्टिस करायला.

मुलगी : तेव्हा गाडी विकून टाकलीत. 

वडील : जुनीच झाली होती.

मुलगी : पप्पा तुम्ही दरवेळी स्वतःचं मन मारून, माझ्या इच्छा पूर्ण केल्या.

वडील : यासाठी फोन केलाय का?

मुलगी : का तुम्ही एवढे समजूतदारपणाने वागलात?

वडील : माझ्या परीला खूप मोठं करून, तिचं धूमधडाक्यात लग्न लावून देण्यासाठी.

मुलगी : पलंगावर बसलेले आहात ना?

वडील : हो.

मुलगी : डाव्या हाताच्या बाजूचा ड्रॉवर उघडा.

वडील : का बरं?

मुलगी : उघडा तर..

वडील : काय आहे या एन्वलपमध्ये?

मुलगी : साखरपुड्यानंतर तुमच्या जावयाने नवा फ्लॅट बुक केलेला.

वडील : मग?

मुलगी : तेव्हा मी त्यांना माझ्या सेव्हींगबद्दल सांगितलं.

वडील : काय?

मुलगी : मागील ३ वर्षांपासून मी माझा पगार बँक अकाऊंटमधून काढलेला नाही.

वडील : आपलं तेच ठरलं होतं.

मुलगी : हो. मात्र तुमच्या जावयाला ते मान्य नव्हतं.

वडील : म्हणजे?

मुलगी : त्यांनी लग्नाआधीचे दागिने, पैसे अनाई बाईक माहेरीच सोडून, सासरी यायला सांगितलं. 

वडील : पण..

मुलगी : मी त्याला मनवण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याने नाही ऐकलं.

वडील : मग?

मुलगी : तोच सेव्हींगच्या जमा रकमेचा १२ लाखाचा चेक आहे.

वडील : तुझी सिक्युरिटी आहे बेटा.

मुलगी : माझा नवरा म्हणतोय की..

वडील : काय?

मुलगी : तू सोबत असशील तर शून्यातून विश्व निर्माण करू.

वडील : अगं पण..

मुलगी : पप्पा आयुष्यभर एवढा समजूतदारपणा दाखवलात ना.. 

वडील : मग?

मुलगी : माझ्या शरीरातही तुमचचं रक्त धावतंय. म्हणून तर समजूतदारपणा आणि स्वाभिमान मला वारसा हक्काने मिळालाय.

वडील : मुलगी म्हणून जन्माला आलीस, मात्र..

मुलगी : मात्र काय?

वडील : कायम आई बनून जीव लावलास.

मुलगी : पप्पा..

वडील : बाळा मी माझ्या काळजावरचं ओझं हलकं करायला गेलो आणि..

मुलगी : काही ओझं वगैरे नाही. तुम्ही तुमचं कर्तव्य केलं आणि मी माझं.

वडील : खूप मोठी झालीस पोरे.

मुलगी : उधारी चुकवण्यासाठी घर गहाण ठेवणार होतात ना?

वडील : नाही.

मुलगी : पुन्हा खोटं.

वडील : मी केलं असतं कसंही मॅनेज.

मुलगी : पप्पा नका करू मॅनेज.

वडील : का?

मुलगी : कारण आता तुमची लेक तुम्हाला त्रास द्यायला नाही तिथे.

वडील : गप मूर्ख.

मुलगी : रिटायरमेंटनंतर आईसोबत मस्त परदेशात फिरायला जा. खुप एन्जॉय करा आणि तब्बेतीची काळजी घ्या.

वडील : हो.

मुलगी : आणि एक लक्षात ठेवा.

वडील : काय?

मुलगी : लेक बापाच्या काळजावरचं ओझं नसतं.

वडील : मग?

मुलगी : लेक बापाचं काळीज असतं.

लेखक :  श्री अक्षय भिंगारदिवे

संग्राहक : सुहास रघुनाथ पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ आलेख # 186 ☆ मधुर वचन कहि कहि परितोषी… ☆ श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’ ☆

श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’

(ई-अभिव्यक्ति में संस्कारधानी की सुप्रसिद्ध साहित्यकार श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’ जी द्वारा “व्यंग्य से सीखें और सिखाएं” शीर्षक से साप्ताहिक स्तम्भ प्रारम्भ करने के लिए हार्दिक आभार। आप अविचल प्रभा मासिक ई पत्रिका की  प्रधान सम्पादक हैं। कई साहित्यिक संस्थाओं के महत्वपूर्ण पदों पर सुशोभित हैं तथा कई पुरस्कारों/अलंकरणों से पुरस्कृत/अलंकृत हैं। आपके साप्ताहिक स्तम्भ – व्यंग्य से सीखें और सिखाएं  में आज प्रस्तुत है एक विचारणीय रचना मधुर वचन कहि कहि परितोषी। इस सार्थक रचना के लिए श्रीमती छाया सक्सेना जी की लेखनी को सादर नमन। आप प्रत्येक गुरुवार को श्रीमती छाया सक्सेना जी की रचना को आत्मसात कर सकेंगे।)

☆ साप्ताहिक स्तम्भ  – आलेख  # 186 ☆ मधुर वचन कहि कहि परितोषी

किसी ने कुछ कह दिया और आप उस बात को पकड़ कर बैठ गए। ऐसे तो जीवन वहीं रुक जाएगा। जो होता है अच्छे के लिए होता है, सकारात्मक चिंतन करते हुए स्वयं पर कार्य करें। अपने आप को यथार्थ के  साथ आगे बढ़ाइए, जो मेहनत करेगा वो  विजेता बनकर शिखर पर स्थापित होगा। ये बात अलग है कि कुछ भी स्थायी नहीं होता सो लगातार मेहनत करते रहें।

भारतीय संस्कृति में श्रद्धा और विश्वास का महत्वपूर्ण योगदान है। धरती को माँ के समान पूजते हैं तो वहीं जीवन दायनी  नदियों को  अमृततुल्य माँ सम आदर देते हैं।यहाँ तक कि अपने देश को भी हम भारत माता कह कर संबोधित करते हैं। हिंदी को भारत माँ के माथे की बिंदी, ऊर्दू को हिंदी की बहन  ये सब भावनात्मक रूप से सुसंस्कृत होने का परिचायक है।

एकमेव परमब्रह्म द्वितीयम नास्ति

ये हमारी श्रद्धा और विश्वास का ही परिणाम है कि हम प्रकृति के कण- कण में भगवान के दर्शन करते हैं।

जितने भी  असंभव कार्य हुए हैं वे सब  विश्वास के बल पर संभव हुए हैं स्वयं पर विजय पाना कोई आसान नहीं होता आप दृढ़ इच्छाशक्ति रखकर सब कुछ बड़ी सहजता से पा सकते हैं।

 श्रद्धा अरु विश्वास का,  सदा  सुखद संयोग।

शरण गुरू की  आइये, करें ध्यानमय योग।।

©  श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’

माँ नर्मदे नगर, म.न. -12, फेज- 1, बिलहरी, जबलपुर ( म. प्र.) 482020

मो. 7024285788, [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सावधान ! शांतता कोर्टात गेली आहे. ..! ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे ☆

श्री विश्वास विष्णु देशपांडे

? विविधा ?

☆ सावधान ! शांतता कोर्टात गेली आहे. ..! ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे  

‘पहाटेच्या रम्य आणि शांत वेळी…’ अशा प्रकारची वाक्ये आता बहुधा कथा कादंबऱ्यातूनच वाचायला मिळतील की काय अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली दिसते. पहाट किंवा सकाळ ही शांत आणि रम्य राहिल्याचे चित्र आता अभावानेच आढळते. निरनिराळ्या आवाजांनी पहाटेची ही रम्य आणि शांत वेळ प्रदूषित केली आहे. सकाळी पाच वाजल्यापासून वाहनांचे आवाज सुरु होतात. काही वाहने लवकर सुरु न झाल्याने त्यांचे मालक अक्सिलेटर वाढवून ती बराच वेळ सुरु ठेवतात. जवळपास असलेल्या काही मंदिर आणि मशिदीवरील भोंगे आरती, प्रार्थना आणि अजान आदी सुरु होतात. तुम्हाला ते  ऐकण्याशिवाय काही चॉईस नसतो. पहाटेची शांत वेळ ध्यान करण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी उत्तम असते असे म्हणतात. आता अशा या गोंगाटात ध्यान आणि अभ्यास कसा करणार ? सहा साडेसहा वाजेनंतर शाळेत जाणाऱ्या मुलांच्या रिक्षा आणि बसचे कर्कश हॉर्न सुरु होतात. मुलांनी तयार राहावे म्हणून ते लांबूनच हॉर्न वाजवत येतात. बऱ्याच वेळा मुलं शाळेसाठी तयार होऊन उभीच असतात, पण यांची हॉर्न वाजवण्याची सवय जात नाही. त्यावर काही टॅक्स नाही आणि त्यांना बोलणारं कोणी नाही. कोणी बोललंच तर तो वाईट ठरतो. मुलं शाळेत गेल्यावर कुठं हुश्श करत बसावं तोवर भाजीवाले, फळवाले, भंगारवाले तयार होऊन येतात. त्यांचेही आवाज तुम्हाला ऐकावेच लागतात. आता तर त्यांनी आपल्या गाड्यांवर आवाज रेकॉर्ड केलेले स्पिकर्स लावले आहेत. त्यामुळे त्यांचा ओरडण्याचा ताण कमी झाला पण जनतेला मात्र ते स्पीकर्सचे आवाज सहन करण्यापलीकडे पर्याय नाही. त्यानंतर नगरपालिकेची घंटा/कचरा गाडी येते. तिच्यावर लावलेल्या स्पीकर्समधून विविध प्रकारच्या गाणीवजा सूचना तुम्हाला ऐकाव्याच लागतात. हे सगळे कमी की काय म्हणून कुणीतरी शेजारी जोरात टीव्ही किंवा रेडिओ लावलेला असतो. काही मंडळी मोबाईलवर गाणी वाजवीत जात असतात. त्याशिवाय रात्रीची झोप आणि पहाटेची शांतता भंग करणारे बेवारशी कुत्र्यांचे आवाज आहेतच. आपण म्हणतो सकाळची रम्य आणि शांत वेळ ! पूर्वी कधी तरी नक्कीच पहाट रम्य आणि शांत असावी त्याशिवाय आमच्या ऋषीमुनींना आणि साहित्यिकांना इतक्या सुंदर सुंदर साहित्यरचना कशा सुचल्या असत्या !

परवाच्या दिवशी एका स्वागतसमारंभाला जाण्याचा योग आला. बरेचसे  नातेवाईक त्या दिवशी एकमेकांना बऱ्याच दिवसांनी भेटत होते. खूप दिवसांनी भेटी होत असल्याने बोलण्यासारख्या बऱ्याच गोष्टी होत्या. पण ज्यांनी तो कार्यक्रम आयोजित केला होता, त्यांनी त्याच वेळेला एक गाण्यांचा कार्यक्रमही ठेवला होता. एकाच हॉलमध्ये स्टेजवर वधुवर, त्याच ठिकाणी जेवणाची व्यवस्था आणि  तिथेच गाणी. गाण्यांचा ऑर्केस्ट्रा ठेवण्याचा आयोजकांचा उद्देश चांगला असेलही, पण तिथे खूप दिवसांनी भेटलेल्या आप्तेष्टाना एकमेकांशी संवाद साधणे देखील कठीण होत होते एवढा गाण्यांचा आवाज मोठा होता. गाणी ऐकण्याच्या मनस्थितीत फारसं कोणी दिसत नव्हतंच. कोणाशी बोलायचं झाल्यास अगदी दुसऱ्याच्या कानाजवळ तोंड नेऊन बोलावं लागत होतं. उपस्थितांनी तशाच वातावरणात जेवणाचा आस्वाद घेतला. वधूवरांना शुभाशीर्वाद दिले. त्या कर्कश आवाजातील गाण्यांऐवजी जर मंजुळ आणि हळू आवाजातील सनईचे सूर असते, तर सगळ्यांनाच किती छान वाटलं असतं !

माझ्या घराशेजारीच एक लग्न होते. लग्नाच्या आधीच्या दिवशी संध्याकाळी हळदीचा कार्यक्रम होता. घरापुढेच मंडप टाकण्यात आला होता. सायंकाळी पाच वाजेपासून कार्यक्रमस्थळी डीजेला सुरुवात झाली. हळदीचा कार्यक्रम पार पडेपर्यंत डीजे सुरु होता. हळदीचा कार्यक्रम पार पडल्यावर डीजे थांबला. मला हायसे वाटले. पण माझा तो आनंद थोडाच वेळ टिकला. जेवणानंतर पुन्हा डीजे सुरु झाला. रात्री वाजेपर्यंत डीजेच्या आवाजात सगळ्यांचे नाचणे झाले. सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर मंडप, डीजे. आजूबाजूच्या कोणाला त्रास होत असेल याचा कोणताही विचार नाही. त्याऐवजी असे कार्यक्रम इतरांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने आयोजित करता येणार नाहीत का ? पण आमचे सामाजिक भान सुटत चालले आहे. ‘ इतरांचा काय संबंध ? माझ्याकडे कार्यक्रम आहे ? कोणाला त्रास होत असेल तर मला काय त्याचे ? इतरांकडे कार्यक्रम असतो, तेव्हा ते करतात का असला विचार ? ‘ प्रत्येकजण असा सोयीस्कर स्वतःपुरता विचार करताना दिसतो.

पूर्वी फक्त दिवाळीतच फटाके फोडत असत. हल्ली प्रसंग कोणताही असो, फटाके फोडायचे हे ठरलेले असते. लग्न, मिरवणूक, वाढदिवस, पार्टी, क्रिकेटची मॅच, एखादा विजय किंवा यश साजरे करणे हे फटाके आणि डीजे लावल्याशिवाय होताना दिसत नाही. त्यातूनही बरेचसे बहाद्दर रात्री बारानंतर फटाके फोडून लोकांना त्रास देण्यात आनंद मानणारे आहेत. फक्त कोणी गेल्यानंतर अजून फटाके वाजवण्याची पद्धत सुरु झाली हे नशीब ! ( उगवतीचे रंग- विश्वास देशपांडे )

एक गमतीदार प्रसंग सांगतो. काही दिवसांपूर्वी एका सुप्रसिद्ध अशा धार्मिक स्थळी गेलो होतो. तिथे दर्शनासाठी निरनिराळ्या राज्यातून लोक आले होते. मंदिरात दर्शनाला जाताना रस्त्यातून एक मिरवणूक जात होती. कोणीतरी एक जवान सैन्यातून निवृत्त झालेला होता. त्याच्या स्वागताचे आणि अभिनंदनाचे पोस्टर्सही सगळीकडे लावले होते. एका उघड्या जीपमधून त्यांची मिरवणूक सुरु होती. त्या गाडीच्या पुढे कर्कश आवाजात डीजे लावलेला होता. त्यापुढे त्या मिरवणुकीत सामील झालेले बरेचसे स्त्रीपुरुष बेभान होऊन नाचत होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे जो जवान सैन्यातून निवृत्त झाला होता, तो आणि त्याची पत्नी त्या जीपवर त्या गाण्यांच्या तालावर वेडेवाकडे नाचत होते. कदाचित त्या सगळ्यांसाठी तो आनंदाचा आणि अभिमानाचा प्रसंग असेलही पण मंदिरासमोर असलेल्या छोटया रस्त्यावरून ही मिरवणूक जात असल्याने भाविकांची प्रचंड गैरसोय होत होती. त्याचे कोणालाच सोयरसुतक नव्हते. कोण बोलणार ? देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या सैनिकांबद्दल मला प्रचंड आदर आणि अभिमान आहे. देशात शांतता राहावी म्हणून सीमेवर हे सैनिक जीवाची बाजू लावून लढत असतात. पण  हे दृश्य पाहून मला खरोखरच वाईट वाटले.

प्रश्न असा पडतो की आपल्याला खरोखरच शांतता नकोशी झालीय का ? आम्ही गोंगाटप्रिय झालो आहोत का ? इंग्रजीत एक सुंदर वाक्य आहे ‘ Speech is silver, silence is gold. ‘ या वाक्याचा अर्थ असा की  व्यर्थ बोलण्यापेक्षा मौन श्रेष्ठ आहे. शांततेचे मोल करता येणार नाही. मानवासहित सर्वच सजीवांच्या निकोप आणि आरोग्यदायी जीवनासाठी शांतता अतिशय महत्वाची आहे. आम्ही आज शाळांमध्ये पर्यावरण हा विषय शिकवतो. त्यामध्ये हवा, ध्वनी, जल इ. प्रकारच्या प्रदूषणांबद्दल शिकतो, बोलतो. पण प्रत्यक्ष आचरणात ते किती आणतो ? ती नुसतीच पोपटपंची राहते. रात्री उशिरापर्यंत डीजे, फटाके वाजवू नयेत असे कायदे आहेत. पण जोपर्यंत त्यांची कडक अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत त्यांचा काही उपयोग नाही. अर्थात नुसते कायदे करूनही उपयोग होत नाही. त्यासाठी समाजजागृती व्हावी लागते. आपल्या अशा वागण्याने इतरांना त्रास होऊ शकतो, ही भावना ज्या दिवशी आमच्या मनात निर्माण होईल, तो सुदीन म्हणायचा. विजय तेंडुलकरांचे ‘ शांतता कोर्ट चालू आहे ‘ हे नाटक प्रचंड लोकप्रिय झाले होते. कोर्टात हवी असणारी शांतता आम्हाला प्रत्यक्ष जीवनातही हवी आहे. ती जर मिळणार नसेल तर एक दिवस शांतता सुद्धा रुसून कोर्टात गेल्याशिवाय राहणार नाही.

©️ श्री विश्वास विष्णु देशपांडे

चाळीसगाव.

 प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ नात्यांचा श्वास …. विश्वास ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ नात्यांचा श्वास …. विश्वास ☆ डॉ अभिजीत सोनवणे

“विश्वास” हा शब्द वाचायला एक सेकंद, विचार करायला एक तास आणि समजायला एक वर्ष लागतं….मात्र तो सिद्ध करायला संपूर्ण आयुष्य द्यावं लागतं…! 

नात्यांचा “श्वास” हा विश्वासावर चालतो…!!! 

जेव्हा विश्वास उडून जातो, तेव्हा हि नाती खळ्ळकन् फुटून जातात… फुटलेले तुकडे पुन्हा जोडायचं म्हटलं तरी ते पुन्हा नव्या सारखे होत नाहीत…. 

फाटलेल्या कपड्याला शिवण घातली तरी शिवण दिसायचीच….! 

असेच फुटलेले तुकडे आणि फाटलेल्या चिंध्या रस्त्यावर पडून आहेत वर्षानुवर्षे… ! 

असेच गोळा केलेले तुकडे एकत्र करून त्यांना जोडण्याचा प्रयत्न करत आहे…. 

आणि फाटलेल्या चिंध्याना शिवण घालण्याचा प्रयत्न करत आहे…

आमच्या खेड्यात याला “वाकळ” म्हणतात…! 

मला ही वाकळ खूप आवडते, कारण या वाकळी मध्ये साडी पासून सफारी पर्यंत आणि सफारी पासून लेंग्यापर्यंत सर्व चिंध्या एकमेकांचे हात धरून सोबत राहतात…. मला रस्त्यावर भेटणाऱ्या भिक्षेकर्यांचही असंच आहे…  रावा पासून रंकापर्यंत आणि रंकापासून रावापर्यंत येथे सर्वजण सापडतात…. 

आयुष्यभर या चींध्यांनी अपमानाचे चटके सहन केलेले असतात…. कदाचित म्हणूनच वाकळ जास्त उबदार असते….!

अशा या दिसायला बेढब …चित्र विचित्र….  मळखाऊ…. चींध्यांनी बनलेल्या, तरीही उबदार वाकळीचा फेब्रुवारी महिन्यातील “शिवणप्रवास” आपणास सविनय सादर !!! 

*(आमच्या कामाचा मूळ गाभा फक्त वैद्यकीय सेवा देणे नसून, वैद्यकीय सेवा देता देता, त्यांचा विश्वास संपादन करणे, त्यांच्याशी चांगले नाते निर्माण करणे, भिक मागण्याची कारणे शोधणे, त्यांच्यामधील गुणदोष शोधून त्यांना व्यवसाय करण्यास प्रवृत्त करणे आणि त्यांना झेपेल तो व्यवसाय टाकून देणे…. जेणेकरून ते भिक्षेकरी म्हणून नाही, तर कष्ट करायला लागून, गावकरी होऊन ते सन्मानाने जगतील… कुणीही कुणापुढे हात पसरून लाचार होऊ नये, जगात कोणीही भिकारी असू नये, हा आमच्या कामाचा मूळ गाभा आहे, वैद्यकीय सेवा देणे हा त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही फक्त मार्ग म्हणून निवडला आहे)*

भिक्षेकरी ते कष्टकरी आणि कष्टकरी ते गावकरी

  1. या महिन्यात वेगवेगळ्या ठिकाणच्या तीन प्रौढ महिला भेटल्या. तिघींचीही मुलं मोठी आहेत. धुणं भांडी करून, कुणाचीही साथ नसताना; खस्ता खाऊन, मुलांना मोठं केलं, मुलांनी संसार मांडले. पुढे मुलांना आईचं ओझं झेपेना… मुलांनी तीनही आईंना घराच्या बाहेर काढले….

या आईंनी पोरांची हाता पाया पडून गयावया केली….

मुलं म्हणाली, ‘आई आजपर्यंत काय केलंस तू आमच्यासाठी… ?’  पण … या आईला ऐनवेळी काहीच आठवेना…

मुलं म्हणाली, ‘आजपर्यंत काय राखून ठेवलंस आई तू आमच्यासाठी… ? ‘.. यावर या आईला काहीच बोलवेना… 

मुलं म्हणाली, ‘तू आमच्या भविष्याची काय तजवीज करून ठेवलीस, म्हणून मी आता तुला सांभाळू ?  सांग ना … ? आताही या आईला काहीच सांगता येईना… 

आई नेहमीच स्वतःच्या दुःखाची “वजाबाकी” करून जन्माला घातलेल्या पोरांच्या सुखाची “बेरीज” करत जाते… 

स्वतःच्या ताटातल्या भाकरीचा “भागाकार” करून, पोराच्या ताटात चतकोर चतकोर भाकरीचा “गुणाकार” करत जाते…. 

उपाशी राहूनही आईच्या चेहऱ्यावर इतकं समाधान कसं ? याचं “गणित” पोराला शेवटपर्यंत सुटत नाही…! 

आणि इतकं सारं करूनही, आयुष्याच्या शेवटी आईच्या पदरात, “बाकी” म्हणुन एक भला मोठ्ठा “शून्य” येतो…

पोरांसाठी आयुष्यभर गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी करून जगातली ती सगळ्यात मोठी गणितज्ञ होते…

‘ आई, मग हे तुझ्या आयुष्याचं गणित असं का ?’

असं एखाद्या आईला विचारलं, तर तेव्हा सुद्धा आईकडे उत्तर नसतंच… 

कारण…. कारण…. आईला कुठं हिशोब येतो…??? 

जमा खर्चाची नोंद तिनं कधी केलेलीच नसते…. 

कारण आईला कुठे हिशोब येतो ??? 

यातील दोन आईंना स्थिर हातगाडी घेऊन दिली आहे. विक्री योग्य साहित्य घेऊन दिले आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात त्यांनी व्यवसाय सुरू केले आहेत. 

एका आईला वजन काटा घेऊन दिला आहे.  

पोरांना आईचा “भार” झेपला नाही म्हणून, स्वतःच्या म्हातारपणाचं “ओझं” स्वतःच्याच डोक्यावर घेऊन, या तिन्ही आई स्वतःचं “वजन” सावरत निघाल्या आहेत, आता पैलतीराच्या प्रवासाला…!!!

मी फक्त साक्षीदार….

  1. मराठीत”अंध पंगु न्याय” असा एक वाक्प्रचार आहे…

तो असा: अंध व्यक्तीने पंगू (अपंग /दिव्यांग) व्यक्तीला खांद्यावर घ्यावे…. अंध व्यक्ती चालत राहील आणि पंगू व्यक्ती, अंध व्यक्तीला खांद्यावर बसून दिशा दाखवत राहील… इथे एकमेकांना साथ देऊन दोघांचेही काम भागते…! 

याचाच उपयोग करून, अपंग महिला…. ज्यांना शिवणकाम येते; अशांना यापूर्वी आपण नवीन शिलाई मशीन घेऊन दिले आहे, त्यांना कापडी पिशव्या शिवण्यासाठी आपण कापड देत आहोत, यानंतर शिवलेल्या पिशव्या भीक मागणाऱ्या अंध व्यक्तींना विकायला देत आहोत… 

येणारा नफा दोघांमध्ये समसमान वाटत आहोत…

“अंध पंगु न्याय”… दुसरं काय… ? 

वैद्यकीय

  1.   रस्त्यावरच भिक्षेकर्‍यांना वैद्यकीय सेवा देऊन त्यांच्या विविध तपासण्या करत आहोत, वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये गंभीर रुग्णांना ऍडमिट करून त्यांच्यावर उपचार करत आहोत. पूर्ण बरे झाल्यानंतर त्यांना व्यवसाय करण्यासंबंधी सुचवत आहोत आणि त्यांना व्यवसाय सुद्धा टाकून देत आहोत.
  2. अनेक आज्यांच्या कानाच्या तपासण्या केल्या आणि ऐकायचे मशीन त्यांना मांडके हियरिंग सर्व्हिसेस पुणे येथून घेऊन दिले आहे.
  1. अनेक भिक्षेकर्‍यांच्या डोळ्यांच्या तपासण्या करवून घेऊन डोळ्यांची ऑपरेशन्स केली तथा त्यांना चष्मे घेऊन दिले आहेत.

लहानपणी पोराला “नजर” लागू नये म्हणून “दृष्ट” काढणारी आई… 

तीच पोरं मोठी झाल्यावर आईला “दृष्टीआड” करतात… 

कालांतराने रस्त्यावर आलेली हि आई गुपचूप देवाघरी निघून जाते… 

तरीही पोरांचे “डोळे” उघडत नाहीत…! 

आई बाप जिवंत असताना त्यांना दोन घास जेऊ घालत नाहीत आणि मेल्यावर मात्र पिंडाला कावळा शिवावा म्हणून तासन् तास बसून राहतात… 

मला नेहमी असं वाटतं, माणसांच्या डोळ्यांचे ऑपरेशन करण्याआधी, “दृष्टिकोनाची” शस्त्रक्रिया करायला हवी…!!! 

अन्नपूर्णा

जगात सगळ्यात जवळचं कोण ??? 

कोणाचं काहीही उत्तर असेल…. 

माझ्या मते, प्रत्येकाच्या आयुष्यात सगळ्यात जवळची असते ती भूक…

जगातला सर्वात सुंदर सुवास कोणता….? 

भूक लागलेली असताना, भाकरी किंवा चपाती भाजतानाचा घमघमाट, हा जगातला सर्वात सुंदर सुवास आहे …

प्रत्येकाच्या आयुष्यातले भूक आणि भाकरी हेच दोन मुख्य गुरुजी ….

आपण झोपल्यावर सुद्धा जी जागी असते…. ती भुक….

न मरताही आयुष्यभर चितेवर जळायला लावते…. ती भुक…

आयुष्यात काहीही करायला लावते…. ती भुक…

घुंगरू न घालताही अक्षरशः नाचायला लावते…. ती भुक…. 

या भुकेसाठी, अन्नपूर्णा प्रकल्पाच्या माध्यमातून अनेक दुर्बल कुटुंबांकडून आपण डबे विकत घेऊन त्यांना उपजीविकेचे साधन देत आहोत.

हे डबे घेऊन आम्ही रस्त्यांवर नाईलाजाने जगत असलेल्या आई बाबा, भाऊ बहिण यांना किंवा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असणाऱ्या किमान २०० गरजु गोरगरीबांना, दररोज जेवणाचे डबे हातात देत आहोत. (रस्त्यात दिसेल त्याला सरसकट डबे आम्ही वाटत नाही)

It’s our win-win situation

इकडे एका कुटुंबाला उत्पन्न मिळाले, जगण्यासाठी सहाय्य मिळाले आणि तिकडे भुकेने तडफडणाऱ्या लोकांना अन्न मिळाले.

भाकरीचा सुगंध वाटण्याचे काम आम्हाला मिळालं…. निसर्गाचे आम्ही ऋणी आहोत….! 

खराटा पलटण

खराटा पलटण म्हणजेच Community Cleanliness Team ! 

अंगात व्यवसाय किंवा नोकरीचे कोणतेही कौशल्य नसणाऱ्या प्रौढ / वृध्द महिलांची एक मोळी बांधून, त्यांच्याकडून पुण्यातील अस्वच्छ भाग स्वच्छ करून घेत आहोत, त्या बदल्यात त्यांना पगार किंवा किराणा माल देत आहोत. 

या महिन्यातही खराटा पलटणाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी स्वच्छता केली आहे आणि त्या बदल्यात टीममधील प्रत्येकाला पंधरा दिवस पुरेल इतका कोरडा शिधा दिला आहे. 

मनातलं काही …. 

  1. माझ्या आयुष्याच्या चढउतारांवर आणि कामात आलेल्या अनुभवांवर एक पुस्तक छापलं आहे…. एकाच वर्षात या पुस्तकाच्या 3000 प्रती खपल्या. हे सुद्धा श्रेय समाजाचं….

या पुस्तकाच्या विक्रीतून भीक मागणाऱ्या ५२ मुलांचे आपण शिक्षण करत आहोत 

आता एप्रिल महिन्यामध्ये शिक्षणाचा हा अवाढव्य खर्च माझ्या अंगावर पडेल…. कोणाला जर माझं पुस्तक हवं असेल तर मला नक्की कळवावे …. पुस्तकाचे देणगी मूल्य पाचशे रुपये आहे…. ! 

हाच पैसा भीक मागणाऱ्या मुलांच्या शिक्षणाकरता वापरला जाईल. (आमचा एक मुलगा यावर्षी इन्स्पेक्टर होऊ इच्छितो, दुसरी मुलगी बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन करत आहे, तिसरा मुलगा कॉम्प्युटर्स सायन्स करत आहे आणि चौथी मुलगी कलेक्टर व्हायचे स्वप्न बघत आहे)

या सर्वांचे शिक्षण माझ्या पुस्तकावर अवलंबून आहे…

  1. येणाऱ्या जागतिक महिला दिनानिमित्त, या वर्षात ज्या महिलांनी भीक मागणे सोडले आहे, अशा ताईंना आपण भावाच्या भूमिकेतून साडीचोळी करणार आहोत….

ज्या मुलींनी भिक मागणे सोडून शिक्षणाची वाट धरली आहे , अशा माझ्या मुलींना, बापाच्या भूमिकेतून ड्रेस घेऊन देणार आहोत. 

इथे ड्रेस आणि साडी महत्त्वाची नाही …. 

आई म्हणून, मुलगी म्हणून, बहीण म्हणून मिळणारा सन्मान महत्त्वाचा… 

जागतिक महिला दिनाच्या या, एकाच दिवशी, मी मुलगा होईन….बाप होईन आणि भाऊ सुद्धा… ! 

या परते अजून मोठे भाग्य कोणते…??? 

निसर्गाने मला पितृत्व आणि मातृत्व दोन्ही दिलं…! 

बघता बघता, दिवस न जाताही , “आई” झालो की राव मी….!!!! 

बस्स, जीने को और क्या चाहिये…. ??? 

प्रणाम  !!!

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares