मराठी साहित्य – विविधा ☆ “भाजी खरेदी शास्त्र !” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? विविधा ?

☆ भाजी खरेदी शास्त्र ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

काहीतरी कुरबुर झाल्याने नवरोबा रागाच्या भरात घरातून बाहेर निघाले… सौ. म्हणाल्या. “कुठे निघालात?” आधीच वैतागलेले श्री. म्हणाले, “मसणात!”

सौ. म्हणाल्या, “येताना कोथिंबीर घेऊन या!”

(नवऱ्याला) ‘एक मेलं काम धड येत नाही’ या कामांच्या यादीत भाजी आणणं हे काम बरेचसे वरच्या क्रमांकावर आहे!

खरं तर या नवरोबांनी बायको समवेत भाजी खरेदीस गेल्यावर नीट निरीक्षण करायला पाहिजे. साडी खरेदी करायला गेल्यावर दुकानाच्या बाहेर किंवा दुकानातल्या गादीवर एका कोपऱ्यात बसून केवळ पैसे देण्यापुरते अस्तित्व ठेवून कसे भागेल?

भाजी खरेदी करणे हे एक परिपूर्ण शास्त्र आहे. यात पारंगत नसलेला मनुष्य ऐहिक जीवनात कितीही शिक्षित असला तरी बायकोच्या लेखी बिनडोक!

एकतर पुरुषांच्या लक्षात राहत नाही कोणती भाजी आणायला सांगितली आहे ते! शिवाय अनेकांना चवळी आणि तांदुळजा, माठ या भाज्या दिसायला थोड्याशा सारख्या असल्यातरी ‘मुळा’त निरनिराळ्या असतात, हेच ठाऊक नसते. हे लोक संत्रे आणायला सांगितलेले असेल तर हटकून मोसंबी घेऊन घरी जातील. आणि, संत्री नव्हती त्याच्याकडे असे उत्तर देऊन टाकतील बायकोने विचारल्यास!

काही पुरुष ज्या भाजीवल्याकडे जास्त गर्दी असेल त्याच्याकडून भाजी घेण्याचा सुरक्षित मार्ग निवडतात.. आणि फसतात! कारण गर्दीने उत्तम माल आधीच उचललेला असतो… आले कचरा घेऊन! असे वाक्य या लोकांना ऐकून घ्यावेच लागते आणि जी काही भाजी आणली असेल ती आणि अपमान गप्प गिळावा लागतो!

भाजी तीस रुपयांत विकत घेऊन घरी बायकोला मात्र वीसच रुपयांत आणली असे खोटे सांगणारी एक स्वतंत्र प्रजाती पुरुषांत आढळून येते! यांना बायको नंतर तीच भाजी तेवढ्याच रुपयांत आणायला सांगते!

काही लोक इतर लोक जी भाजी खरेदी करत आहेत तीच खरेदी करून घरी येतात. ती भाजी नेमकी घरी कुणाला नको असते.

कढीपत्ता, कोथिंबीर ह्या गोष्टी फ्री मध्ये न मिळवू शकणाऱ्या पुरुषांना महिला कच्चे खेळाडू समजतात.

चांगले कलिंगड खरेदी करणे म्हणजे एखादा गड जिंकल्यासारखी स्थिती असते. यात दगा फटका झाल्यास गृहमंत्री अक्षरशः आणणाऱ्या इसमाची शाब्दिक कत्तल करू शकतात! पुढच्या वेळी मी सोबत असल्याशिवाय काहीही खरेदी करायची नाही अशी बायको कडून प्रेमळ सूचना मिळू शकते!

एक किलो सांगितली आणि तीन किलो (चुकून) आणली असेल भाजी तर काही धडगत नसते. ‘ स्वस्त होती म्हणून घेतली ‘ असे उत्तर देऊन वेळ मारून नेताना नक्की कशी किलो होती? या प्रश्नाचे उत्तर देताना भंबेरी उडू शकते. कारण काही मुखदुर्बल माणसे विक्रेत्याला भाव विचारण्याच्या भानगडीत पडत नाहीत किंवा तशी हिंमत दाखवत नाहीत!

काही खरेदीदार विक्रेत्याच्या सद्सदविवेक बुद्धीवर विश्वास टाकतात.. तुमच्या हाताने घाला… चांगली असेल ती ‘ असे म्हणून फक्त पिशवी पुढे करतात. विक्रेत्याला त्याची सगळीच भाजी, फळे लाडकी असतात! 

कॅरी बॅग जमान्यात प्रत्येक भाजी किंवा फळासाठी स्वतंत्र बॅग मागू न शकणारा नवरा निष्काळजी समजणाऱ्या पत्नी असू शकतात!

तोंडली लालेलाल निघाली की बायकोच्या तोंडाचा दांडपट्टा आडदांड नवरा असला तरीही आवरू शकत नाही. जाड, राठ भेंडी, जाडसर काकडी, मध्ये सडलेली मेथी, कडू दोडका, आत मध्ये काळा, किडका असलेला भोपळा, फुले असलेली मेथी, भलत्याच आकाराचे आणि निळे डाग असलेले बटाटे, नवे कांदे, किडका लसूण, सुकलेलं आलं, बिन रसाचे लिंबू, शेवग्याच्या सुकलेल्या शेंगा, मोठ मोठ्या बिया असलेली वांगी, इत्यादी घरी घेऊन येणाऱ्या पुरुषांना बायकोची बोलणी खावी लागतातच… पानावर बसलेलं असताना धड उठूनही जाता येत नाही… आपणच आणलेली भाजी पानात असते!

आणि एवढ्या चुका करूनही भाजी आणायचं काम गळ्यात पडलेलं असतं ते काही रद्द होत नाही! शिकाल हळूहळू असा दिलासा देताना आपल्या हातात पिशवी देताना बायकोचा चेहरा पाणी मारलेल्या लाल भडक टोमॅटो सारखा ताजा तरतरीत दिसत असतो आणि आपला शिल्लक राहिलेल्या वांग्या सारखा!

हे टाळायचे असेल म्हणजे बोलणे ऐकून घेणे टाळायचे असेल तर या लेखासोबत असलेला फोटो zoom करून पाहावा. शक्य झाल्यास प्रिंट काढून enlarge करून जवळ बाळगावा!

काही नाही.. एका उच्च पदस्थ अधिकारी नवऱ्याला त्यांच्या बायकोने भाजी कोणती आणि कशा दर्जाची आणावी याची सचित्र, लेखी work order काढलेली आहे… त्या कागदाचा फोटो आहे साधा. पण बडे काम की चीज है!. खरोखर ही ऑर्डर एकदा वाचायलाच हवी…… ( फक्त जरा enlarge करून.. ) 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… भाग – १८ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… भाग – १८ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

 

माझे आजोळ

का. रा. केदारी.

ईश्वरदास मॅन्शन, बी ब्लॉक, पहिला मजला, नाना चौक, ग्रँट रोड, मुंबई.

हे माझे आजोळ.

वास्तविक आजोळ हा शब्द उच्चारला की नजरेसमोर येतं एक लहानसं, टुमदार. गाव. झुळझुळणारी नदी, दूरवर पसरलेले डोंगर, हिरवे माळरान, कौलारू, चौसोपी, ओसरी असलेलं घर. ओटीवरचा पितळी कड्यांचा, शिसवी पाटाचा झोपाळा, अंगणातलं पार असलेलं बकुळीचं किंवा छान सावली देणार झाड. सुट्टीत आजोळी जमलेली सारी नातवंडं. प्रचंड दंगामस्ती, सूर पारंब्यासारखे खेळ आणि स्वयंपाक घरात शिजणारा. सुगंधी पारंपारिक स्वयंपाक.

हो की नाही?

पण माझे आजोळ असे नव्हते. ते मुंबई सारख्या महानगरीत, धनवान लोकांच्या वस्तीत, अद्ययावत पारसी पद्धतीच्या सदनिका असलेल्या देखण्या प्रशस्त सहा मजली इमारतीत होतं. गुळगुळीत डांबरी रस्त्यांवर बसेस, काळ्या—पिवळ्या टॅक्स्या, ट्राम्स अविरत धावत असत. अंगण नव्हतं. सदनिकेच्या मागच्या बाजूला फरशी लावलेली मोकळी जागा होती. तिथेच काही आऊट हाऊसेस, आणि सदनिकेत राहणाऱ्या धनवान लोकांच्या गाड्या ठेवण्यासाठी गॅरेजेस होती.

त्या मोकळ्या जागेत ईश्वरदास मॅन्शन मधली मुलं मात्र थप्पा, आंधळी कोशिंबीर, डबा ऐसपैस, लगोरी, लंगडी, खो खो असे दमदार खेळ खेळत. यात काही मराठी मुलं होती पण बरीचशी मारवाडी आणि गुजराथी होती. ही सारी मुलं मुंबईसारख्या महानगरीत शहरी वातावरणात वाढत होती. विचार करा. त्यावेळी ही मुलं सेंट. कोलंबस अथवा डॉन बॉस्को सारख्या इंग्रजी माध्यम असलेल्या नामांकित शाळेत शिकत होती. फाडफाड इंग्लिशमध्ये. बोलायचे सारे.

मी ठाण्याची. माझा घरचा. पत्ता – – धोबी आळी, शा. मा. रोड, टेंभी नाका ठाणे.

पत्त्यावरूनच कुटुंब ओळखावे. साधे, बाळबोध पण साहित्यिक वातावरणात वाढत असलेली, नगरपालिकेच्या बारा नंबर शाळेत, मराठी माध्यमातून शिक्षण घेत असलेली मी. सुट्टीत आईबरोबर आईच्या वडिलांकडे म्हणजे आजोबांकडे त्यांच्या पाश्चिमात्य थाटाच्या घरी जायला आम्ही उत्सुक असायचो.

माझ्या आजोळीच्या आठवणी वयाच्या पाच सहा वर्षापासूनच्या अजून पक्क्या आहेत. आजोळ. म्हणजे आजी आजोबांचं घर. आजीचा सहवास फार लाभला नाही. तरीही कपाळी ठसठशीत कुंकू लावणारी, कानात हिऱ्याच्या कुड्या आणि गळ्यात हिऱ्याचं मंगळसूत्र मिरवणारी, इंदुरी काठ पदराची साडी नेसणारी, प्रसन्नमुखी. मम्मी अंधुक आठवते. ती मला “बाबुराव” म्हणायची तेही आठवतं. पण ती लवकर गेली.

वयाच्या पस्तीस—चाळीस. वर्षांपर्यंत म्हणजे आजोबा असेपर्यंत मी आजोळी जात होते. खूप आठवणी आहेत. माझ्या आठवणीतलं आजोळ, खरं सांगू का? दोन भागात विभागलेलं. आहे. बाळपणीचं आजोळ आणि नंतर मोठी झाल्यावरचं, जाणतेपणातलं आजोळ.

वार्षिक परीक्षा संपली की निकाल लागेपर्यंत आई आम्हाला आजोबांकडे घेऊन जायची. मी, माझ्या बहिणी आणि आई. वडील आम्हाला व्हिक्टोरिया टर्मिनसला सोडायचे. आताचे छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानक. तेव्हा व्हीटी म्हणून प्रसिद्ध होतं. ठाणा स्टेशन ते व्हीटी हा प्रवासही मजेदार असायचा. व्हीटीला उतरलं. की सारा भव्यपणा सुरू व्हायचा. समोर महानगरपालिकेची इमारत. तिथे आम्हाला घ्यायला आलेली आजोबांची मरून कलरची, रुबाबदार रोव्हर गाडी उभी असायची. पण त्यापूर्वीचा, व्हीटीला उतरल्यावर पप्पांच्या आग्रहास्तव प्राशन केलेल्या थंडगार नीराप्राशनाचा अनुभवही. फारच आनंददायी असायचा.

आजोबांकडे मावशी आणि माझी मावस भावंडंही आलेली असायची, रंजन, अशोक, अतुल आणि संध्या. संध्या मात्र जन्मल्यापासून आजी-आजोबांजवळच राहायची. सेंट कोलंबस मधली विद्यार्थिनी म्हणून तिच्याबद्दल मला खूपच आकर्षण होतं. आम्ही सुट्टीत तिथे गेलो की तिलाही खूप आनंद व्हायचा. महिनाभर एकत्र राहायचं, खेळायचं, उंडरायचं, खायचं, मज्जा करायची. धम्माल!

धमाल तर होतीच. पण?. हा पण जरा मोठा होता बरं का. माझे आजोबा गोरेपान, उंचताड, सडसडीत बांध्याचे. अतिशय शिस्तप्रिय. बँक ऑफ इंडियात. ते मोठ्या हुद्द्यावर होते. त्यावेळी बँकांचे राष्ट्रीयीकरण झाले नव्हते. ब्रिटिशकालीन शिस्तीत त्यावेळी कार्यालयीन कामं चालत. आणि त्या संस्कृतीत माझ्या आजोबांची कर्मचारी म्हणून जडणघडण झाली होती. त्यांची राहणी, आचार विचार सारेच पाश्चिमात्य पद्धतीचे. होते. त्यावेळी आजोबांकडे वेस्टर्न टॉयलेट्स, बॉम्बे पाईप गॅस, टेलिफोन, फ्रिज वगैरे होते. घर म्हणाल तर अत्यंत टापटीप, स्वच्छ. फर्निचरवर धुळीचा कण दिसणार नाही. दिवाणखान्यात सुंदर काश्मिरी गालिचा अंथरलेला, वॉशबेसीनवरचा. पांढरा स्वच्छ नॅपकिन टोकाला टोक जुळवून टांगलेला. निरनिराळ्या खोलीत असलेल्या काचेच्या कपाटात. सुरेख रचून ठेवलेल्या जगभरातल्या अनेक वस्तू. खिडक्यादारांना सुंदर पडदे, शयनगृहात गादीवर अंथरलेल्या विनासुरकुतीच्या स्वच्छ चादरी आणि असं बरंच काही. असं माझं आजोळ. सुंदरच होतं.

आता आठवत नाही पण आम्ही इतके सगळे जमल्यावरही आजोबांचं घर विस्कटायचं नाही का?

आम्ही कुणीच नसताना आणि आजी गेल्यानंतर त्या घरात आजोबा आणि त्यांची. निराधार बहीण म्हणजे आईची आत्या असे दोघेच राहायचे.. आत्याही तशीच शिस्तकठोर आणि टापटीपीची पण अतिशय चविष्ट स्वयंपाक करायची. आम्ही सारी भावंडं जमलो की तिलाही आनंद व्हायचा. सखाराम नावाचा एक रामागडी होता. दिवसभर तो आजोबा— आत्या साठी त्यांच्या शिस्तीत राबायचा. आमच्या येण्याने. त्यालाही खूप आनंद व्हायचा. तो आम्हा बहिणींसाठी गुलाबाची आणि चाफ्याची फुले आणायचा.

आजोबा सकाळी दहा वाजता बँकेत जायचे. रामजी नावाचा ड्रायव्हर होता तो त्यांची बॅग घ्यायला वर यायचा. आजोबा संध्याकाळी सात वाजता समुद्रावर फेरफटका मारून. घरी परतायचे. म्हणजे दहा ते सात हा संपूर्ण वेळ आम्हा मुलांचा. पत्ते, कॅरम! सागर गोटे आणि असे अनेक खेळ आम्ही खेळायचो. एकमेकांशी भांडणं, मारामाऱ्या एकी-बेकी सगळं असायचं. आत्या रागवायची पण आजोबांना.. ज्यांना आम्ही. भाई म्हणायचो, त्यांना जितके आम्ही घाबरायचो तितके तिला नव्हतो घाबरत. सात वाजेपर्यंत. विस्कटलेलं घर आम्ही अगदी युद्ध पातळीवर पुन्हा तसंच नीटनेटकं करून ठेवायचो.

एकदा एका. सुट्टीत मला आठवतंय, भाईंची शिवण्याची सुई माझ्या हातून तुटली. तुम्हाला खोटं वाटेल पण तीस वर्षं भाई ती सुई वापरत होते. पेन्सिल, सुई यासारख्या किरकोळ वस्तू सुद्धा त्यांना इकडच्या तिकडे झालेल्या, हरवलेल्या, मोडलेल्या चालत नसत. या पार्श्वभूमीवर सुई तुटण्याची ही बाब फार गंभीर होती. पण रंजनने खाली वाण्याकडे जाऊन एक तशीच सुई आणली आणि त्याच जागी ठेवून दिली. सात वाजता भाईंची दारावर बेल वाजली आणि माझ्याच काय सगळ्या भावंडांच्या छातीत धडधड सुरू झाली. जो तो एकेका कोपऱ्यात जाऊन वाचन नाही तर काही करण्याचं नाटक करत होता. सुदैवाने भाईंच्या लक्षात न आल्यामुळे ते सुई प्रकरण तसंच मिटलं पण आज जेव्हा मी विचार करते तेव्हा ‘आपण काहीतरी चुकीचे केले’ याची मला खूप रुखरुख वाटते. आपण आजोबांपासून हे लपवायला नको होतं.

इतके सगळे जरी असले ना तरी भाई आमचे. खूप लाड करायचे. शनिवारी— रविवारी दुपारी ते आमच्याबरोबर पत्ते खेळायचे. ‘झब्बु’ नावाचा खेळ आम्ही खेळायचो. त्यावेळी. भाई आम्हाला खूप विनोदी किस्से सांगायचे. आम्हाला चिडवायचे, आमच्याबरोबर मोठमोठ्याने हसायचे. संध्याकाळी आम्हाला चौपाटीवर फिरायला. घेऊन जायचे. बिर्ला क्रीडा केंद्रापासून थेट नरीमन पॉईंट पर्यंत आम्ही त्यांच्याबरोबर पायी चालत जायचो. त्या वेळच्या मुंबईच्या समुद्राचे सौंदर्य काय वर्णू? त्या फेसाळत्या. लाटा, तो थंडगार वारा, समोर. धनवानांच्या सुंदर इमारती, रोषणाई असलेली दुकाने आणि अतिशय वेगात चालणारी दिमाखदार वाहनं. आजोबां बरोबरचा हा समुद्रावरचा पायी फिरण्याचा अनुभव अविस्मरणीय असायचा. या पायी फिरण्याचा काळातही भाई आम्हाला अनेक गोष्टी सांगायचे. वेळेचे महत्व, बचतीचे महत्त्व, शिस्त स्वच्छता यांचं महत्त्व वगैरे अनेक विषयावर ते बोलायचे. त्यांची मुख्य तीन तत्त्वे होती. पहिलं तत्व डी टी ए. म्हणजे डोंट ट्रस्ट एनीबडी.

दुसरं— टाईम इज मनी.

आणि तिसरं— इफ यू सेव्ह अ पेनी पाऊंड विल सेव्ह यु.

समुद्रावरून फिरून आल्यानंतर आम्हाला ते कधी जयहिंदचा आईस्क्रीम नाहीतर शेट्टीची भेळपुरी खायला न्यायचे. आम्ही साऱ्या नातवंडांनी सुट्टीत त्यांच्याबरोबर काश्मीर ते कन्याकुमारी असा भरपूर प्रवास केलाय. अनेक नाटकं, चित्रपट आम्ही सुट्टीमध्ये भाईंबरोबर पाहायचो. रात्री रेडिओ जवळ बसून एकत्र, आकाशवाणीवरून सादर होणारी नाटके, श्रुतिका ऐकायचो. फक्त एकच होतं या सगळ्या गंमतीच होत्या. तरीही यात भाईंची शिस्त आणि त्यांच्या आराखड्याप्रमाणे घडायला हवं असायचं. माझ्या बंडखोर मनाला ते जरा खटकायचं. मला वेगळंच आईस्क्रीम हवं असायचं. भाईंनी भेळपुरी मागवलेली असायची तर मला शेवपुरी खायची असायची. आता या आठवणी गंमतीच्या वाटतात.

मी कधी कधी आजोळी आले असताना पाठीमागच्या आवारात आऊट हाऊस मध्ये राहणाऱ्या नंदा नावाच्या मुलीशी खेळायला जायची. तिचं घर अंधारलेलं कोंदट होतं. घराच्या पुढच्या भागात तिच्या वडिलांचं पानबिडीचं दुकान होतं. विड्या त्यांच्या घरातच वळल्या. जात. त्यामुळे तिच्या घरात एक तंबाखूचा उग्र वास असायचा. पण तरीही मला तिच्याकडे खूप आवडायचं. तिथे मी आणि नंदा मुक्तपणे खेळायचो. कधीकधी तर मी तिच्याकडे जेवायची सुद्धा. आम्ही दोघी गवालिया टॅंक वर फिरायला जायचो. मी परवानगीशिवाय जायची. नंदाला मात्र परवानगीची गरज वाटायची नाही. तिच्या घरात कसं मुक्त वाटायचं मला आणि हो तिच्याबरोबर मी, ती मडक्यातल्या पाण्यात बुडवून दिलेली चटकदार पाणीपुरीही. खायची. माझ्यासाठी मात्र हा सारा चोरीचा मामला असायचा पण माझ्या आजोळच्या वास्तव्यातला तो माझा खरा आनंदही असायचा. तिथेच दुसऱ्या आऊट हाऊस मध्ये. गुरखा राहायचा. त्याची घुंगट घातलेली बायको मला फार आवडायची. ती, माझे आणि नंदाचे खूप लाड करायची. तिच्या हातचे पराठे आणि लिंबाचं लोणचं! आठवून आताही माझ्या तोंडाला पाणी सुटतं.

पाठीमागच्या आवारात अनेक कामं चालायची. पापड वाळवणे, उखळीत लाल मिरच्यांचे तिखट कुटणे, धान्य वाळवणे, निवडणे वगैरे. ही सारी कामं.. सदनिकेतल्या लोकांचीच असायची पण ती करून देणारी. . आदिवासी माणसं. असायची आणि त्यातही बायाच. असायच्या. त्यांचं. वागणं, बोलणं, काम करताना गाणं, त्यांनी घातलेले दागिने, कपडे यांचं. मला फार अप्रूप वाटायचं. माझी त्यांच्याशी मैत्री व्हायची. अद्ययावत संस्कृतीतून बाहेर येऊन या लोकांच्यात मी. रमायची. माझी भावंडं मला चिडवायची. पण माझ्यावर त्याचा काहीच परिणाम व्हायचा नाही.

शाळेच्या अंतीम परिक्षेच्या निकालाच्या दोन दिवस आधी आम्ही भाईंना निरोप देऊन ठाण्याला परतायचचो. तेव्हा कळत नव्हतं आईच्या डोळ्यातल्या अश्रूंचं नातं. भाईही पाणावायचे. एवढा पहाडासारखा माणूस हळवा व्हायचा. अजूनही सांगते, तेव्हा माझ्या मनात फक्त ठाण्याला, आपल्या घरी परतण्याच्या विचाराचा आनंद मनात असायचा. या वाहणाऱ्या पाण्याचा अर्थ तेव्हा नाही कळायचा पण आता कळतो. आता त्या आठवणीनेही. माझे डोळे गळू लागतात. लहानपण आणि मोठेपण यात हेच अंतर असतं.

ठाण्याच्या घरी आजी उंबरठ्यावर वाट पाहत असायची, तिने आमच्यासाठी माळ्यावर आंब्याच्या अढ्या पसरवलेल्या असायच्या. मी घरात शिरल्याबरोबर आजीला मिठी मारायची आणि म्हणायची,

“ जीजी मला तुझ्या हातचा आक्खा आंबा खायचा आहे. ”

‘आक्खा आंबा’ ही. कल्पना खूप मजेदार आहे बरं का?

भाईंकडे असतानाही आम्ही खूप आंबे खाल्लेले असायचेच. पण खूप आणि मनमुराद. यात फरक आहे ना? तिथे आंबे व्यवस्थित कापून एकेकाला वाटले जायचे. म्हणून हे आक्खा आंबा खाण्याचे सुख काय होतं हे कसं सांगू तुम्हाला?

आणखी एक —घरी आल्यावर जाणवायचं!

”अरे! इथे तर कायम आजी आपल्या सोबतच असते. ” म्हणजे खरंतर आपलं हेच कायमचं आजोळ नाही का? पण एका आजोळा कडून दुसऱ्या भिन्न आजोळाकडे जाणाऱ्या प्रवासात मी जीवनातले विविध धडे शिकले. एक आजोळ मायेचं, उबदार. दुसरं शिस्तीचं, नियमांचं. या दोन भिन्न प्रकृतींनी माझं जीवन नेटकेपणानेच घडवलं. त्या आजोळाकडचे भाई खूप उशिरा कळले, उशिरा जाणवले.

आज पोस्टाच्या पाकिटावर व्यवस्थित पत्ता. लिहितानाही भाईंची आठवण येते. कपड्यांच्या घड्या घालताना भाईंची शिकवण आठवते. मी माणसांना चाचपडत असते तेव्हा आठवतं, भाई म्हणायचे, ” कुणाला घरात घेण्याच्या आधी त्याची परीक्षा घ्या. संपूर्ण विश्वास कुणावरही ठेवू नका. ”

“वस्तूंच्या जागा बदलू नका” ही त्या आजोळची. शिकवण आयुष्यभर निरनिराळ्या. अर्थाने उपयोगी पडली. किती आणि काय काय लिहू? थांबते आता.

पण माझ्या आजोळी ज्यांनी माझी झोळी कधीच फाटू दिली नाही त्या सर्वांच्या स्मृतींना कृतज्ञतापूर्वक प्रणाम!

— क्रमश:भाग १८ 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ महत्व मतदानाचं… आवाहन याचकांचं…!!! ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ महत्व मतदानाचं… आवाहन याचकांचं…!!! ☆ डॉ अभिजीत सोनवणे

दावणीला बांधलेला बैल, जवा दावं तोडून, वारं भरल्यागत, गावातनं मोकाट पळत सुटतो, त्यावेळी शंभर जणांना धडका देत तो विध्वंसच घडवतो…! 

या बैलाला वेळीच आवर घातला… चुचकारत योग्य दिशा दाखवली… चारापाणी घातला… याच्याशी प्रेमाने वागलं… की आपण म्हणू ते काम तो चुटकीसरशी करतो…!

मग ती शेतातली नांगरणी असो, पाणी शेंदणं असो, बैलगाडीला जुंपून घेणं असो किंवा आणखी काही…!

पाण्याचंही तसंच…

कशाही वाहणाऱ्या पाण्याला प्रेमानं थोपवून धरलं; की ह्येच पाणी भिंती आड गप गुमान धरण म्हणून हुबं ऱ्हातंय… प्रेमानं चुचकारून पायपात घातलं की घरात नळ म्हणून वाहतंय… पात्यावर गरागरा फिरून वीज बी तयार करतंय…

अय बाळा… आरं हिकडं बग… आरं तकडं न्हवं ल्येकरा… हिकडं बग… हिकडं रं… हांग आशी… फलीकडल्या गल्लीत आपली साळू आजी ऱ्हाती… तिला कोनच. न्हाय रं… आत्ताच मका पेरलाय तिनं… अर्ध्या गुंट्याचं वावार हाय तिचं…. एक चक्कर मारून जरा मक्याची तहान भागवून यी की…

… इतक्या प्रेमाने पाण्याला सांगितल्यावर, हेच पाणी झुळू झुळू वाहत, शिट्टी वाजवत, मंग त्या मक्याला भेटायला जातंय… बोळक्या तोंडाची साळु आजी तोंडाला पदर लावून मंग आशीं हासती… अन डोळ्यात आस्तंय पाणी… हो पुन्हा पाणीच…!

…अस्ताव्यस्त वाहणाऱ्या या पाण्याला मात्र दिशा दाखवून, त्याचा योग्य वापर करून घेतला नाही; तर पूर ठरलेला… विध्वंस हा ठरलेलाच आहे…!

सांगायचा मुद्दा हा की मस्तावलेला बैल असो किंवा अस्ताव्यस्त वाहणारं पाणी…!

त्यांना आवरून – सावरून योग्य दिशा दाखवून, त्यांच्यातल्या जबरदस्त ताकदीचा उपयोग करून घेता यायला हवा…!

आमचा भिक्षेकरी – याचक समाज…. याचीही ताकद खूप जबरदस्त आहे…!

या सर्वांनी जर एकत्र येऊन ठरवलं… तर उभा डोंगर, ते आडवा करतील…!

बुलडोझर ला सुध्दा जे काम दोन दिवसांत जमणार नाही, ते काम हे लोक एकत्र आले तर दोन तासात करतील…!

गेल्या दहा वर्षापासून मी आणि मनीषा यांच्या या जबरदस्त ताकतीचा उपयोग विधायक कामांसाठी करुन घेत आहोत…! यांच्या ताकदीचा उपयोग;आम्ही यांच्याच विकासासाठी किंवा समाजाच्या भल्यासाठी करण्याचा प्रयत्न करत आहोत…! पुण्यातील सार्वजनिक भाग, भीक मागणाऱ्या आज्या / मावश्या यांच्या टीममार्फत (खराटा पलटण – Community Cleanliness Team). स्वच्छ करून घेणे असो की,

वैद्यकीय दृष्टीने फिट असणाऱ्या भिक्षेकऱ्यांकडून रक्तदान करून घेणे असो….

… जे काही करतो आहोत; ते समाजानं यांना दिलेलं “दान” काही अंशी फेडण्यासाठी…

अर्थात् याचं श्रेय माझं किंवा डॉ मनीषाचं नाही… एकट्या दुकट्याचं कामच नव्हे हे… आपण सर्व साथीला आहात म्हणून हे शक्य होत आहे.

‘It’s not “Me”… It’s “We”… !!!’

तर, दान या शब्दावरून आठवलं, सध्या मतदानाचं वारं वाहत आहे…!

ज्यांना मतदानाचे अधिकार आहेत, असे अनेक सुजाण नागरिक मतदान करतच आहेत, मात्र काही लोक; मतदानादिवशी ऑफिसला / कामावर दिलेली सुट्टी हि vacation समजून, मतदान न करता फिरायला जातात.

काही लोक जरा गर्दी कमी हुदे… थोडं ऊन कमी होऊ दे… म्हणत म्हणत मतदान करायचंच विसरून जातात…!

अशा लोकांचं प्रबोधन कसे करता येईल ? असा विचार मनात आला आणि मला माझ्या मागे उभ्या असलेल्या ताकदीची आठवण झाली…!

तर, आज शुक्रवार दिनांक 15 नोव्हेंबर 2024 रोजी आम्ही पुण्यातील वर्दळीच्या ठिकाणी आमच्या किमान 100 याचकांना एकत्र केलं आणि “चला आपण सर्वजण मतदान करूया” अशा अर्थाचे. हातात बोर्ड दिले…!

… भिक्षेकर्‍यांना आम्ही रस्त्यात आणि चौका – चौकात हे बोर्ड घेऊन उभं केलं…

आम्हाला जमेल त्या पद्धतीने आम्ही मतदानाचं महत्त्व आणि मतदान करण्याची विनंती समाजाला केली…!

सांगतंय कोण…? अडाणी भिक्षेकरी…!

ऐकणार का…? सुशिक्षित गावकरी…?? 

असो; आम्ही प्रयत्न करतोय… बैलाला आवरण्याचा आणि पाण्याला सावरण्याचा…!

यात अंध अपंग वृद्ध याचक या सर्वांनी सहभाग घेतला… मी या सर्वांचा ऋणी आहे !!!

मला माहित आहे, आमच्या या उपक्रमामुळे एका रात्रीत फार काही दिवे पेटणार नाहीत… पण एखादी पणती लावायला काय हरकत आहे ? 

बघू… जे सुचेल ते आपल्या सर्वांच्या साथीने प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करतोय…

शेवटी एक माहीत आहे…

कोशिश करने वालों की हार नही होती…!!! “

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “अभ्यास कसा करावा, ह्याचाच अभ्यास” ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

श्री मयुरेश उमाकांत डंके

? विविधा  ?

☆ “अभ्यास कसा करावा, ह्याचाच अभ्यास” ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

“त्याचं नेमकं काय चुकतं, हेच कळत नाही. “

“ही घरी सगळं व्यवस्थित करते, पण ऐन परीक्षेत त्याच त्या चुका. ” 

“हजारदा सांगितलं तरी अजूनही वेळापत्रक करणं जमतच नाहीय. “

“शाळेत आणि क्लास मध्ये सगळं समजतं, पण घरी आल्यावर लक्षातच राहत नाही असं म्हणतो. “

“नुसत्या वह्या पूर्ण केल्या की अभ्यास होतो का? तुम्हीच सांगा. पण हिला ते पटतच नाही. “

“दिवसभर नुसती लिहीतच असते. पण तरीही मार्कांमध्ये फरक नाहीच. ” 

“लिखाणात असंख्य चुका.. ” 

“अर्धा ताससुद्धा एका जागी बसत नाही, आणि लगेच अभ्यास झाला म्हणतो. आता दहावीच्या वर्षात असं चालतं का?” 

“प्रॅक्टिस करायला नाहीच म्हणतो. मी तुम्हाला मार्क मिळवून दाखवीन असं म्हणतो. पण अभ्यास करताना तर दिसत नाही. ” 

” परीक्षेत वेळच पुरत नाही असं म्हणते. निम्मा पेपर सोडूनच येते. ” 

” नियमितपणाच नाही, शिस्त नाही. उद्या परीक्षा आहे म्हटलं की आज रात्र रात्र बसायचं. आणि वरुन पुन्हा आम्हालाच म्हणायचं की, बघा मी कसं मॅनेज केलं. ” 

“अभ्यासाचं महत्वच वाटत नाही हिला. सारखा मोबाईल हातात. ” 

“दहावीत चांगले मार्क मिळाले. पण अकरावी आणि बारावीत गाडी घसरली. गेल्या दहा बारा टेस्ट मध्ये फक्त एक आकडी मार्क्स मिळालेत. कुठून मिळणार मेडिकल ला ॲडमिशन?” 

“इंस्टाग्राम वर दिवस दिवस वेळ घालवल्यावर मार्क कुठून मिळणार?”

“हिच्या आळशीपणाचा, न ऐकण्याचा आणि अभ्यास न करण्याचा आम्हाला इतका कंटाळा आला आहे की, आता आम्ही तिच्याशी बोलणंच सोडून दिलं आहे. “

“हाच म्हणाला म्हणून सायन्स ला ॲडमिशन घेतली, आता ते जमतच नाही असं म्हणतो. तीन लाख रुपये फी भरली आहे हो आम्ही. आता काय करायचं?”

“सर, मागे तुमच्याकडे ॲप्टिट्यूड टेस्ट केली होती, तेव्हां तुम्ही स्पष्ट सांगितलं होतं की, त्याला सायन्स झेपणार नाही. पण माझ्याच मित्राचं ऐकून मी त्याला सायन्स ला पाठवलं. आता बारावीत तीनही विषयात नापास झालाय. कॉलेज नको म्हणतो, क्लास नको म्हणतो. अभ्यासच नको म्हणतो. आता कसं करावं?”

आणखी लिहीत राहिलो तर यादी आणखी खूप मोठी होईल. आपली मुलं आणि त्यांचा अभ्यास हा पालकांसमोरचा यक्षप्रश्न झाला आहे. मार्कांची स्पर्धा एवढी वाढली आहे की, त्यात मुलांचा टिकाव लागावा यासाठी पालकांची सर्वतोपरी धडपड सुरू असते.

“मार्क म्हणजे सर्वस्व नाही” हे म्हणणं सोपं असलं तरीही मार्कांशिवाय काही होत नाही हेही तितकंच खरं आहे. पुढचे प्रवेश मिळवताना मार्कलिस्ट भक्कम नसेल तर खिशाला कशी भोकं पडतात, हे अनेकांच्या उदाहरणातून आपण पाहिलंसुद्धा असेल.

प्रवेश परीक्षा आणि त्यासाठी आवश्यक असणारं मेरिट हा प्रश्न सुटणार कसा? आपल्या मुलांची शैक्षणिक प्रगती अपेक्षेनुसार झाली नाही तर पुढं कसं होणार? आणि करिअर कसं होणार? ही चिंता पालकांना आहेच. म्हणूनच, बहुतांश पालक “आपण पालक म्हणून कुठंही कमी पडता कामा नये” या प्रयत्नात असतात. ते मुलांना अभ्यासासाठी स्वतंत्र खोली देतील, लॅपटॉप देतील, मुलांच्या खोलीला एसी बसवतील, सगळी स्टेशनरी आणि स्टडी मटेरियल उत्तम दर्जाचं आणून देतील, त्यांच्या खाण्यापिण्याची काळजी घेतील, ब्रँडेड क्लासेस लावतील, पर्सनल कोचिंग लावतील, परीक्षेच्या वेळी तयारीसाठी महिनाभर रजा काढून घरी थांबतील. पण मूळ समस्या वेगळीच आहे, हेच त्यांच्या लक्षात येत नाही..

जसजशा वरच्या इयत्तेत आपलं मूल जाईल तसतसा अभ्यास अधिकाधिक व्यापक आणि वाढत जाणार. अभ्यासासाठी जास्त वेळ द्यावा लागणार आणि अभ्यासाचं आकलन सुद्धा चांगलं व्हावं यासाठी प्रयत्न करावे लागणार, हे समजून घेणं गरजेचं असतं. पण प्राथमिक शाळेत असताना आपलं मूल जसा आणि जेवढा अभ्यास करत होतं, तेवढाच अभ्यास आता दहावी-बारावीच्या वर्षातही करत असेल तर ते कसं चालेल? शैक्षणिकदृष्ट्या महत्वाच्या वर्षांच्या काळात अभ्यासाचा अतिरेक नको, पण अभ्यासाविषयी गांभीर्य तर गरजेचंच आहे.

आपली मुलं अभ्यास करतात, म्हणजे नेमकं काय करतात? हे जरा लक्ष देऊन पाहिलं की, अनेक धक्कादायक गोष्टी समोर येतात. पुष्कळ मुलामुलींना अभ्यास कसा करायचा असतो, हेच ठाऊक नसतं. एखाद्या प्रश्नाचं नेमकं मुद्देसूद आणि अचूक उत्तर कसं लिहावं, हे त्यांना माहितीच नसतं. आता जे त्यांना ठाऊकच नाही, ते परीक्षेत कसं जमेल? कितीतरी मुलांना प्रश्नपत्रिकेत नेमका कसा प्रश्न विचारला आहे आणि त्याचं उत्तर कसं लिहावं लागेल, हेही जमत नाही. “मी कितीही लिहिलं तरीही मार्क्स मिळत नाहीत” अशी तक्रार करणाऱ्या मुलांच्या उत्तरपत्रिका पहा. मोठं उत्तर लिहिण्याच्या नादात अनावश्यक लिखाण केल्याचं आपल्याला दिसेल.

“सराव केल्याशिवाय आपल्याला अचूकता साधणार नाही” हे न पटणारी अनेक मुलं आहेत. अतिआत्मविश्वास आणि आळस या दोन दोषांमुळे त्यांचं वारंवार नुकसान होतच असतं. पण तरीही त्यांना सुधारणा करणं जमत नाही.

एकूणच, आपल्या मुलांना अभ्यासाची आणि परीक्षेची कौशल्यं शिकणं, ती आत्मसात करणं हे नितांत आवश्यक आहे. उत्तम अभ्यास कसा करावा, याची कौशल्ये वेगळी असतात आणि उत्तम परीक्षार्थी कसं व्हावं यासाठी वेगळी कौशल्ये आत्मसात करावी लागतात. हा फरक आपण सर्वांनीच समजून घेतला पाहिजे.

“जेव्हां अभ्यास करायचा असतो तेव्हां विद्यार्थी आणि जेव्हां परीक्षा असते तेव्हां परीक्षार्थी” हा तोल प्रत्येकाला साधता यायला हवा. हा समन्वय जी मुलं साधू शकतात, त्यांना यश मिळवणं सहज शक्य होतं.

याच महत्वाच्या मुद्द्याला समोर ठेवून “साधना” या कार्यक्रमाची रचना करण्यात आली आहे. हे या कार्यक्रमाचं १९ वं वर्ष आहे. शहरापासून दूर, खऱ्या अर्थानं समृद्ध निसर्गाच्या सानिध्यात चार दिवसांचं हे निवासी प्रशिक्षण असतं. सातवी ते बारावीपर्यंतच्या वयोगटासाठी “साधना” आहे.

“अभ्यास कसा करावा, ? ह्याचाच अभ्यास” हेच “साधना” चे ब्रीद आहे. विद्यार्थ्यांमध्ये प्रभावी अभ्यासाची योग्य पद्धत विकसित व्हावी आणि त्यांना उत्तम शैक्षणिक यश मिळावं, ह्या उद्दिष्टानेच ‘साधना’ ची आखणी करण्यात आली आहे. आजवर या कार्यशाळेत देशभरातून तसेच परदेशातूनही अनेक विद्यार्थी सहभागी झाले आहेत.

आपल्याला अनेकदा असं वाटत असतं की, अभ्यास करणं ही एक वैयक्तिक गोष्ट आहे आणि त्याच्या पद्धती व्यक्तीनुसार बदलत असतात. ज्याची त्याची सवय वेगळी, पद्धत वेगळी. ती प्रत्येकालाच जशीच्या तशी लागू होणं कठीण असतं. आपलं वाटणं अगदी बरोबर आहे. त्याच्याही पुढे जाऊन सांगायचं झालं तर, प्रत्येक विषयाचा अभ्यास करण्याची पद्धतही वेगवेगळी असते. सगळ्याच विषयांसाठी एकाच पद्धतीनं अभ्यास करणं प्रभावी ठरत नाही.

पालकमित्रांनो, उत्तम अभ्यास करणं हे प्रत्येक विद्यार्थ्याचं कर्तव्यच असतं असं आपल्याला वाटत असतं. पण तुम्हाला अपेक्षित असणारा उत्तम अभ्यास ही एक कला आहे. आपली मुलं कोणत्याही इयत्तेत शिकत असोत, त्यांना ही उत्तम अभ्यासाची कला अवगत होणं अतिशय आवश्यक आहे.

अभ्यासातलं यश हे केवळ मुलांची बुद्धिमत्ता आणि त्यांचे कष्ट यांच्यावरच अवलंबून नसतं. तर, अभ्यासाच्या तंत्रशुद्घ पद्धतींवर सुध्दा अवलंबून असतं. मुलांना अभ्यासाची योग्य पद्धत अवगत झाली तर त्यांच्या अभ्यासात लक्षणीय बदल होतो, अभ्यास अधिक प्रभावी होतो, तो अधिक काळ स्मरणात राहतो आणि त्याची गुणवत्ता पूर्वीपेक्षा कितीतरी पटींनी अधिक सुधारते.

कित्येक बुद्धिमान मुलांना अभ्यासात म्हणावं तितकं यश मिळत नाही, परिक्षेत गुण मिळत नाहीत, अशा विद्यार्थ्यांची स्थिती खरोखरच फार कठीण असते. सगळेच त्यांना हुशार म्हणत असतात, पण अभ्यासात मात्र त्यांची हुशारी दिसून येत नाही, हीच मोठी समस्या असते. पण त्यांच्या तुलनेत सामान्य विद्यार्थी सुध्दा अभ्यासाच्या बाबतीत चांगलं यश मिळवून पुढं जातात. असं का होत असेल? याचं मूळ अभ्यासाच्या तंत्रांमध्ये दडलेलं आहे.

“अभ्यास कर”, “अभ्यास कर” असा आग्रह सगळेच धरतात, पण “नेमका अभ्यास कसा करावा?” याचं शिक्षण मात्र मिळत नाही.

“साधना” ही कार्यशाळा ह्याच समस्येला डोळ्यांसमोर ठेवून सुरु करण्यात आली. गेली अठरा वर्षे ही कार्यशाळा दरवर्षी होते. ही चार दिवसांची कार्यशाळा निवासी असून केवळ ३० विद्यार्थ्यांसाठीच असते.

“साधना” कार्यशाळेत विद्यार्थ्यांना प्रभावी अभ्यास करण्याची २३ तंत्रे शिकवली जातात. ही तंत्रे परदेशांतील अनेक संशोधकांनी विकसित केलेली असून अनेक परदेशी विद्यापीठांमध्ये शिकवली जातात. हीच आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रमाणित तंत्रे विद्यार्थ्यांना शिकवली जातात. “साधना” मध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी देखील एक स्वतंत्र सेशन असते, जे अतिशय उपयुक्त आणि महत्वाचे असते.

इयत्ता सातवी पासून पुढचे विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभागी होऊ शकतात. महाविद्यालयीन विद्यार्थी देखील सहभागी होऊ शकतात. तसेच सीए, सीएस, स्पर्धा परीक्षा, इंजिनिअरिंग व मेडिकल प्रवेश परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी देखील सहभागी होऊ शकतात.

(आपली नोंदणी लवकरात लवकर करणे आवश्यक आहे. ३० जागा भरल्यावर नोंदणी थांबवण्यात येते. नोंदणी करण्याकरिता 8905199711 किंवा 8769733771 (सकाळी नऊ ते दुपारी एक या वेळेत) या क्रमांकावर संपर्क साधावा.) 

© श्री मयुरेश उमाकांत डंके

मानसतज्ज्ञ, संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.

 8905199711, 87697 33771

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “कोणावाचून काही अडत नाही…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

📚 वाचताना वेचलेले 📖

☆ “कोणावाचून काही अडत नाही…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

… रात्री २ वाजता अचानक फोन वाजला. थोड्या काळजीनेचं उचलला. तर समोरून वरूण बोलत होता. “काका, ताबडतोब हॉस्पिटलमध्ये या.. मधूला ऍडमिट केलेय आणि डॉ. म्हणतात घरातील मोठ्या माणसांना बोलवा. ” मी येतो बोलून फोन ठेवला आणि बायकोला घेऊन निघालो.

जाता जाता नकळत मन भूतकाळात गेले….

… वरूण एक I. T. इंजिनियर. MBA अतिशय हुशार मुलगा. माझा दूरचा नातेवाईक पण जवळचं राहणारा…. आईवडील गावी. तसा तो स्वभावानी हेकट. माझे कोणावाचून काही अडत नाही या वृत्तीचा. माझा मोबाइल आणि इंटरनेट हेच माझे विश्व असे मानणारा.

दोन वर्षांपूर्वी अचानक घरी पेढे घेऊन उभा राहिला. “काका…. लग्न ठरलंय. ” मी ताबडतोब मोठेपणाचा आव आणून विचारले, “अरे वा!!! कधी ?? कुठे पाहिलीस मुलगी ?? कोणी ठरविले??”

तो फक्त हसला, “काका काय गरज आहे कोणाची ??एका साईट वर तिला पाहिले, आवडली. व्हिडिओ पाहिला तिचा. तिचा आणि माझा प्रोफाइल जुळला आणि आम्ही ठरविले. इथून जात होतो म्हणून तुम्हाला सांगायला आलो. “

“अभिनंदन,… मग आता पत्रिका कधी छापूया, खरेदी वगैरे. “

.. माझा मोठेपणा चालू झाला. तर तो जोरात हसला.. “काहीही गरज नाही. मी व्हॉट्सअप वरून सगळ्यांना आमंत्रणे पाठवली आहेत, आणि खरेदीही ऑनलाइन केली आहे. इथे वेळ कोणाला आहे ?खूप कामे असतात. ” माझा थोडा हिरमोड झाला म्हटले, “अरे बायकोला तरी वेळ देतोस का ??? ” 

… “नाही हो, तीही माझ्यासारखी बिझीचं.. मग वेळ मिळेल तेव्हा व्हॉट्सअप वर चाट करतो सेल्फी काढतो, व्हिडिओ पाठवतो. ” मी न राहवून हात जोडले.

काही दिवसांनी आम्ही त्याच्या लग्नाला गेलो, फक्त ५० माणसे हजर पाहून धक्काचं बसला…

स्टेजवरही आहेर द्यायला गर्दी नव्हती. अरे ह्याने आहेर आणू नये असे लिहिले होते कि काय ? ह्या विचाराने थोडा सुखावलो. भेटायला गेलो तेव्हा विचारलं, “इतकी कमी माणसे कशी आली ???” तेव्हा परत तो हसला आणि म्हणाला, “सगळ्यांनी व्हॉट्सअपवर अभिनंदन केले शुभेच्छा दिल्या आहेत. तो बघा एक माणूसचं खास रिप्लाय द्यायला ठेवलाय. “

मी उडालोच….

“बरे आहेराचे काय ???” माझा बालसुलभ प्रश्न? त्यानेही लहान मुलाला समजवावे तसे मला सांगितले, “अहो काका, प्रत्येकाच्या घरी मिठाई आणि गिफ्ट्स पाठवले आहे curriar ने अगदी घरपोच डिलिव्हरी. “

धन्य आहेस बाबा तू…. मी हाथ जोडले आणि पोटभर जेवून निघालो.

दुस-या दिवशी पूजेला गेलो पण यावेळी घरात ६ माणसे बघून मुळीच आश्चर्य वाटले नाही. सर्व कसे आरामात बसले होते. म्हटले अजून भटजी आले नाही वाटते??तेव्हा उत्तर आले, “अहो काका… रेकॉर्ड लावून पूजा केली अगदी पूर्णपणे कुठेही शॉर्टकट नाही. कशाला हवाय भटजी?? प्रसादाची ऑर्डर दिलीय आता येईल, शिवाय १५ माणसांच जेवण सांगितले आहे. ” चला म्हणजे माझे जेवण होईल इथे. मी सुखावलो. परत एकदा पोटभर जेवून समाधानाने घरी आलो.

काही दिवसांनी तो रस्त्यात भेटला, एकटाचं होता म्हणून विचारले, “अरे कुठे गेलास कि नाही हनिमूनला?” तर नेहमीसारखे हसून बोलला, “कुठे वेळ आहे काका ?? तीही नवीन प्रोजेक्टमध्ये बिझी अणि मीही. “

मी अचंबित झालो. मग मित्रत्वाच्या नात्याने त्याच्या खांदयावर हाथ ठेवून विचारले, “कधीतरी सेल्फी आणि व्हिडिओ”, कप्पाळ!! मग नाटक सिनेमा तरी ???” “अहो, नवीन चित्रपट आला कि downoad करतो आणि पाहिजे तेव्हा बघतो. वेळही वाचतो. “

मी दरवेळी नवीन नवीन धक्के खात घरी येत होतो.

आता काही महिन्यापूर्वी त्याचा messege आला बायकोला दिवस गेले आहेत. पटकन मनात आले…. “हेही ऑनलाईन नाही ना??” फोन करून त्याचे अभिनंदन केले आणि काही मदत पाहिजे का असे विचारले. पुन्हा त्याचे परिचित हास्य ऐकून नवीन काय ऐकायला मिळेल याची उत्सुकता लागली. त्याने सांगितले, “काही गरज नाही काका. हिचे सर्व काही करण्यासाठी एका कंपनीला ऑनलाइन पॅकेज दिले आहे. आता ते लोकं हिची व्यवस्थित काळजी घेतील मला फक्त बाळाला हातात घ्यायचे आहे..!!”

हे मात्र अतीचं झाले, मी थोडा चिडलोच आणि तणतणतच घरी आलो…..

हॉस्पिटलमध्ये शिरत असताना हे सर्व आठवले आणि समोरचं हा उभा राहिला. रडवेला चेहरा, खांदे झुकलेले, आम्हाला बघून त्याचा बांध फुटला. माझ्या कुशीत शिरून हमसाहमशी रडू लागला. मी विचारले, “अरे काय झाले.. ?तू तर पॅकेज दिले होतेस ना ?? मग अचानक काय झाले ??”

तर म्हणाला, “त्यांनी मधूची क्रिटिकल कंडिशन पाहून हात वर केले, डॉक्टरांनीही सांगितले तुमचे कोणीतरी नातेवाईक बोलवा परिस्थिती गंभीर होत चालली आहे. इथे मला सगळ्यांनी एकटेचं सोडले. सगळेजण भावनाशून्य चेहऱ्यानी. वावरत होते. त्यांना फक्त त्यांच्या पॅकेजशी मतलब आहे. आज मला जाणवले आपलेपणाची भावना असलेले पॅकेज कितीही किंमत दिली तरी विकत मिळत नाही. ” 

“म्हणूनच मला तुमच्यासारखी माणसे नेहमी हवी आहेत.. “

अजून ही वेळ गेली नाही….

… आपली माणसे सांभाळा माणूस गेला की परत येत नाही, मग फक्त आठवणी राहतात. लॅपटॉप, टीव्ही, मोबाईल बाजूला ठेवा आणि आपल्या स्वतःच्या माणसांशी प्रेमाचेन शब्द बोला, तेच तुम्हांला प्रेम देतील.

 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : श्री सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ वेळ झाली भर माध्यान्ही… ☆ सुश्री सुलभा तेरणीकर ☆

सुश्री सुलभा तेरणीकर

🔅 विविधा 🔅

☆ वेळ झाली भर माध्यान्ही… ☆ सुश्री सुलभा तेरणीकर 

माघातल्या एका प्रसन्न सकाळी जाग येई ती उतू गेलेल्या दुधाच्या खरपूस वासाने. उठून पाहिले, तर गच्चीवर सुरेख रांगोळीच्या चौकटीत शेणाची गोवरी तापून लाल झालेली असे आणि त्यावर बोळक्यातले दूध फेसाळत बाहेर पडताना दिसे. आईची अशी व्रतवैकल्ये, कुलाचार, सण वर्षभर चालत असत. त्यासाठी मात्र घरातल्यांचे दिनक्रम मोडत नसत, की बुडत नसत. बरेवाईट प्रसंग येऊन गेले; पै-पाहुणे, आजारपण येत गेले तरी घरातला दिनक्रमाचा रोजचा परिपाठ सुरळीत राहिला, तशी तिची नेमनियमांची मालिकाही राहिली. शाळा, कॉलेज, ऑफीस, अभ्यास हुकवून चालायचा नाही, हा दंडक पाळतच ती सुरु राहिली.

आजदेखील कसोशीने ती सर्व पाळत असते, कोणतेही अवडंबर न माजवता, अगदी सहजपणे.

श्री विष्णूंसाठी नैवेद्य म्हणून अधिक महिन्यातले तेहतीस दिवस रोज ताजा अनरसा होई खरा; पण त्या वेळी हजर असणाऱ्याच्या वाट्याला अचूक जाई. कृष्णजन्माच्या वेळी मध्यरात्री उठून ती हरी विजयातला कृष्णजन्माचा अध्याय वाचत असे. आम्हाला सकाळी सुंठवडा व पेढ्यांचा प्रसाद मिळत असे. रात्रीच्या नि गूढ शांततेत सारी झोपलेली असता, स्वतः मात्र हळूच आवाज न करता ती कृष्णजन्माची साक्षी होत असे. आता मात्र आम्ही त्यात सहभागी होतो. पण, पूर्वी क्वचित चेष्टाही करीत असू, जोरदार चर्चादेखील; पण छानसे हसून ती आमची धार बोथट करीत असे.

पुढे व्रतवैकल्यांसंबंधीची बरीच माहिती मी जमवली. जाणकारांकडून, पुस्तकांतून घेतली. व्रतरत्नाकर, हेमाद्रि व्रतखंड, व्रतोत्सव, पृथ्वी चंद्रोदय, उत्सवसिंधू इत्यादी ग्रंथसंभारातून दिलेल्या माहितीचे भांडार जमा झाले. आपल्या अभ्युदयासाठी, सुखसमृध्दीसाठी; वंशविस्तार, दीर्घायुष्य, धन, मान्यता, कीर्ती, आरोग्य यांसाठी आपल्या पूर्वजांनी व्रत नियमांमध्ये जीवनाला असे काही बांधून घेतले आहे;जसा वाहत्या नदीतीरावरचा रेखीव घाट असावा. व्रत निवडायचे स्वातंत्र्य. हेतू काम्य अथवा निष्काम. प्रसन्न करायच्या देवदेवता वेगवेगळ्या, व्रताचा दिवसही खास. त्यांची सामग्रीही आगळीवेगळी.

व्रतांची नामाभिधाने अगदी वैशिष्ट्यपूर्ण… पक्षसंधिव्रत, फलत्याग व्रत, नदी व्रत, लक्षपद्म व्रत, वरुणव्रत, भानुव्रत, बिल्वत्रिरात्री व्रत, नक्षत्रव्रत, व्योमव्रत, सप्तसागरव्रत, समुद्रव्रत, मुखव्रत , प्रतिमाव्रत पाताळव्रत अशी कितीतरी व्रतांची नावे- ज्यात निसर्गाला सहभागी करून घेतलेले आहे.

व्रताची तिथीही निश्चित केलेली आणि त्यांनाही सुंदर चेहरा, ओळख आणि नावे बहाल केलेली दिसतात. मनोरथ पौर्णिमा, पुष्प द्वादशी, नील ज्येष्ठा, फळ तृतीया, रोहिणी अष्टमी, भद्रा सप्तमी, श्री पंचमी, नाम नवमी, मंदार षष्ठी, यम चतुर्थी… प्रत्येक महिन्यातील, ऋतूंमधला एकेक दिवस स्वतंत्र अस्तित्वाचा! प्रत्येकाचे विधान आगळेवेगळे सांगितलेले.

उपवास, पूजा-अर्चना, दान ही प्रमुख अंगे तर आहेत; शिवाय निसर्गदेवतेला प्रसन्न करण्याच्या तऱ्हादेखील निरनिराळ्या असत. ऐश्वर्य हवे, तर त्याग आला. काही हवे, तर काही द्यावे; ही भावना सूचित केलेली असे. फुलांनी, धान्यांनी, मधतूपाने, धूपदीपांनी पूजा करायची. घरादारासाठी समृद्धीची कामना करणाऱ्यांनी एकभुक्त राहायचे. भोजनादी दानधर्म, बांधवांना सहभागी करून घ्यायचे, अशा बहुविध संकल्पना गुंफून आपल्या पूर्वजांनी योजलेल्या व्रतांची अखंड साखळी सर्व वर्षभर अखंडपणे माझ्यासमोर निनादत राहिली. प्रदीर्घ आयुष्य, बहरलेला वंशवृक्ष, समृद्धी, कुटुंब आणि समाजहित, निसर्गाशी जवळीक असे विविध रंग साधलेले पाहताना मन विस्मयाने भरले. … नक्षत्रे, आकाश, पाणी, सूर्य, चंद्र, पशू, पक्षी, धनधान्य, यांच्याशी खेळ करीत पूर्वजांनी व्रतोत्सवाची लयलूट केलेली आहे.

आश्विनातल्या गडद अंधाऱ्या रात्री गोठ्यात, पाणवठ्यावर, गच्चीवर, निर्मनुष्य रस्त्यावर, ओसाड जागेत दिवा लावावा, असे सांगणाऱ्या पूर्वजांच्या दीपोत्सवाच्या कल्पनेमागची उदात्तता मनाला स्पर्शून जाते.

व्रतवैकल्यांची कालबाह्यता ठरवणे, त्यांचा नवा अन्वय लावणे, हा विचार तर व्हायला हवा, असे वाटत असताना काळाच्या मागे जाऊन मानवी मनाच्या खुणा शोधाव्यात, असे वाटते, नव्या -जुन्या विचारांच्या हिंदोळ्यावर एके ठिकाणी मन थांबते. पुन्हा एकदा आपल्या पूर्वजांनी दिलेल्या अर्थपूर्ण नावाचे कौतुक वाटून धक्कायला होते. ‘अक्षय्य तृतीया’ वैशाखातल्या तृतीयेचा दिवस एक अपूर्व नाव घेऊन येतो. ‘अक्षय्य तृतीया. ‘ — वैशाखातील उग्र निसर्गवणव्यात सारे चराचर जळतेय्. अंगाची काहिली होतीय्. पाणीदेखील डोळ्यांदेखत वाफ होऊन उडून चालले आहे. अशामध्ये ‘अक्षय्य’ टिकणारे आहे तरी काय? क्षणभंगुर, अशाश्वत जीवनाला झोडपणाऱ्या निसर्गाच्या अग्निप्रलयात अक्षय्य राहणार तरी काय? प्राण कासावीस होत आहेत. अशा वेळी ही तृतीया काय सांगतीय्?

– – अशा वेळी हजारो वर्षे ऋतुचक्र न्याहाळणारी आमची भारतीयांची अनुभवकथा सांगतीय् – पाणपोई उघडा. माणसांना, जनावरांना, पक्ष्यांना पाणी द्या. या वणव्यात फुलणारी झाडे पाहा. त्यांची हिरवी पालवी तीव्र जीवनेच्छेचे प्रतीक आहे. सावली धरणारे वृक्ष लावा. जलकुंभ द्या. पंखा द्या. सावली द्या. अक्षय्य टिकणारा हा मानवधर्माचा विचार अक्षय्य तृतीयेचे लेणे लेवून येतो…

… पक्ष्यांना, जनावरांना, कृमी -कीटकांना आणि श्रांत पांथस्थाला आधार देणाऱ्या वृक्षांचे वैशाख वणव्यातले फुलणे मनाला दिलासा देऊन जाते. ज्याने कुणी या दिवसाला अक्षय्य हे नाव दिले, त्याच्या विशाल दृष्टीला वृक्षराजीच दिसली असेल. पाणथळाच्या जागा दिसल्या असतील.

निसर्गाचे अद्भुत देणे थेंबाथेंबाने जपायचे-… तहानलेल्याला द्यायचे- हा विचार असणार.

… अशाश्वत जीविताचा हा तहानलेला ऋतू अखंड सौख्याने भरून काढायचा…

संकटमुक्त व्हावे, ईप्सित साध्य व्हावे, मनोकामना पूर्ण व्हाव्यात, उत्तम आरोग्य लाभावे- अशा मागण्यांची यादी संपतच नाही. इवल्याशा जीवनात त्या साध्य तरी कशा व्हाव्यात? शिवाय, चिरकाल लाभावे असे नेमके काय मागावे? प्रश्नांचा गुंता वाढत जातो.

… खूप उन्हाळे पाहिलेली आई म्हणते- “चांगली दगडाची परात आण. पारवे, चिमण्या, कावळ्यांना दुपारी पाणी लागतं ना! परातीत पाणी भरूयात… प्लॅस्टिकचं तसराळं सांडून टाकतात ते… ” 

… भर दुपारी चाललेली त्या पाखरांची पाण्यासाठीची भांडणे पाहताना मौज वाटते… नव्हे, अतीव सुख दाटते.

©  सुश्री सुलभा तेरणीकर

मो. 8007853288 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ असा डोसा नेहमी मिळो…  ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

श्री मयुरेश उमाकांत डंके

? मनमंजुषेतून ?

☆ असा डोसा नेहमी मिळो… ☆  श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

“मयुरेश, तू जिंकलास. आम्हीं हरलो. त्यामुळं, म्हणशील तेव्हा आणि म्हणशील तिथं डोसा खायला जाऊया. ”

आज सकाळी आठ वाजता फोन आला अन् मी मनापासून हसलो. बायकोनं चेहऱ्यावर नुसतंच प्रश्नचिन्ह आणलं. “तोच ठरलेला फोन. पण आज मी जिंकलो. ते हरले. ” मी हसत हसत म्हटलं.

“अन् ते कसं काय? ”

“देवाची कृपा.. ” असं म्हणून सकाळी मी त्या विषयाला पूर्णविराम दिला.

त्याचं असं आहे की, रोज सकाळी मी चालायला जातो. तेव्हां अनेक परिचित माणसं भेटत असतात. मौन व्रतात चालायचं असल्यामुळं तेव्हां बोलणं होत नाही, पण नंतर चहा घेताना थोड्या गप्पा होतात. जवळपास सगळेच माझ्या वयाच्या दुप्पट किंवा त्याहूनही ज्येष्ठ असतील. रोज “बिनसाखरेचा चहा दे रे” असं ठासून सांगून त्या चहावाल्याकडून दीड चमचा साखर एकस्ट्रा घेणारी महामिश्कील मंडळी सगळी.. तो सकाळचा पहिला चहा फार भारी असतो.

अशीच ती १४ ऑगस्टची सकाळ.. एक काका त्या दिवशी जरा गरम होते. ‘घरातली नातवंडं किंवा मोठी माणसं सुद्धा हातातला स्मार्टफोन सोडतच नाहीत. त्या फोन पुढं त्यांना कुणाचीच किंमत नाही. घरी आल्या-गेल्यांशी चार गोड शब्द सुद्धा ते बोलत नाहीत. ‘ अशी त्यांची तक्रार… “अरे, घरातल्या घरात सुद्धा मेसेज पाठवतात. ” ते रागावून म्हणाले. अशा वेळी आपण काहीही न बोलता नुसतं शांत बसायचं असतं, हे मला चांगलं ठाऊक आहे.

“काल मला माझ्या नातीनं तिच्या खोलीतून मेसेज पाठवला. जेवायला कधी बसायचं म्हणून.. ही कुठली पद्धत? ” ते म्हणाले.

“अरे, मला तर आज सकाळी घरातून बाहेर पडतानाच मेसेज आलाय – फिरून झाल्यावर घरी येताना बूट बाहेरच काढा. पावसामुळं भरपूर चिखल असतो. दारातून आत आणू नका. ” दुसरे एकजण म्हणाले.

“मग बरोबरच आहे ते. ” मी म्हटलं.

“अरे, निरोप बरोबरच आहे. पण तो प्रत्यक्ष द्यायला काय होतं? मुलगा डायनिंग टेबलाशी चहा घेत बसला होता. त्यानंच पाठवला मेसेज. ” ते काका खरोखर चिडलेले होते.

आजकाल हे सगळं नित्याचंच झालंय. साधनं इतकी उदंड झाली की, त्यात संवादच आटला. आता बऱ्यापैकी उरलीय ती औपचारिकता. ‘तुमच्या वेळेला तुम्ही वागलात. आता आमची वेळ आहे. ‘ असं जाणवून देण्याकडे तरुणाईचा कल वाढतो आहे. त्यामुळं, घराच्या उंबरठ्याच्या आत निराळेच प्रश्न उभे राहतायत आणि त्याची रामबाण उत्तरं सध्यातरी उपलब्ध नाहीयत. ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न वाढतायत, त्याचं एक कारण हेच आहे की, ‘त्यांची उपयुक्तता संपली आहे’ असं इतरांना वाटतं आणि त्यांना स्वतःलाही वाटतं.

पन्नास-साठ वर्षं आयुष्य जगलेली माणसं खरोखरच अशी निरुपयोगी होऊ शकतात का? हा खूप विचार करण्यासारखा मुद्दा आहे. कदाचित नव्याने पैसे कमावण्यासाठीची त्यांची क्षमता उतरणीला लागलेली असेलही, पण तेवढ्या एकाच गोष्टीवर माणसांच्या आयुष्याची उपयुक्तता ठरवता येत नाही. अर्थार्जन करण्याची क्षमता कमी झाली असली तरीही ते निर्धन झालेले नसतात, हेही पक्कं लक्षात घेतलं पाहिजे. पण त्यांचा अनुभव, त्यांची जीवनशैली, त्यांचं ज्ञान सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या नक्कीच मौल्यवान ठरु शकेल आणि हे मुळीच नाकारता येणार नाही. म्हणूनच, “आता आम्ही अडगळ झालो, जुनं फर्निचर झालो, डस्टबिन झालो” असा समज करून घेण्याचं काहीच कारण नाही आणि गरजही नाही.

“काका, तुमच्या कुटुंबात मुलांनी, नातवंडांनी तुमच्याशी चांगलं वागावं, तुमच्याशी बोलावं असं तुम्हाला मनापासून वाटतं ना? ते शक्य आहे. पण थोडा प्रॉब्लेम आहे. ” मी हळूच माझं प्यादं पुढं सरकवलं.

“मला खरंच वाटतं की, घरातल्यांनी थोडा तरी वेळ आम्हाला दिला पाहिजे. पण कुणाकडेच आमच्यासाठी वेळ नसतो. उलट सगळेच म्हणतात, ‘आम्हीं खूप बिझी आहोत. ‘ आता काय करायचं? ”

“तुमची कष्ट घ्यायची तयारी असेल तर प्लॅन सांगतो. रिझल्ट १००% मिळेल. पण तुम्हाला वेळ द्यावा लागेल. आणि जर हा प्लॅन सक्सेसफुल झाला तर मी सांगेन तिथं पार्टी द्यावी लागेल. मान्य आहे का? ” मी म्हटलं.

सगळे तयार झाले आणि आम्ही प्लॅन ठरवला. १५ ऑगस्ट पासून सुरुवात झाली. प्रत्येकानं एकेक काम वाटून घेतलेलं होतं. फुलवाती तुपात भिजवून त्याचे मोल्ड्स तयार करणं, ‘संपूर्ण चातुर्मास’ मधून निवडक सात आरत्या काढून त्या टाईप करुन घेणं, माळावस्त्रं कशी तयार करतात हे शिकणं, फुलांची तोरणं आणि गजरे करायचा सराव करणं अशा छोट्या छोट्या कृती घरी सुरु झाल्या.

तीन चार दिवसांतच घरात हे सगळं शांतपणे, एकाग्रचित्तानं सुरु असलेलं बघून नातवंडांचे प्रश्न सुरु झाले. “ह्याला काय म्हणतात? हे कसं करायचं? का करायचं? त्याचा उपयोग काय? हे विकत मिळत असताना आपण घरी का करायचं? ” अशी प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली. पण कसलीही लेक्चरबाजी न करता, ‘आमच्यावेळी अमुक होतं – तमुक होतं’ असा सूर कटाक्षानं न लावता, त्यांना समजावून सांगायचं आणि त्यांना दररोज थोडावेळ तरी सहभागी करुन घ्यायचं असं आमचं ठरलं होतं. मग आमच्या योजनेत काही आज्या सुद्धा सामील झाल्या. खोबरं किसायला शिकवणं, तांदळाची पारी करायला शिकवणं, पंचखाद्याची तयारी, रांगोळीत काढायची शुभचिन्हं शिकवणं असा एक आणखी नवा योग जुळला.

आजी-आजोबा आणि नातवंडं अशी हळूहळू एक टीम झाली. रोज शाळा-कॉलेज मधून आलं की, एखादा तासभर गणपतीची तयारी सुरू झाली. शिकताना मजा यायला लागली. शिकता शिकता भरपूर गप्पा सुरु झाल्या. कुठलाही प्रश्न आला आणि त्याचं मुलांना पटेल असं उत्तर आपल्याला ठाऊक नसेल तर प्रश्न टाळायचा नाही. “उद्या सांगतो” असं म्हणायचं आणि तो प्रश्न मला पाठवायचा असं ठरलं होतं. त्यानुसार रोज प्रश्न यायचे. मी उत्तरं पाठवायचो. मग दुसऱ्या दिवशी मुलांचं शंकानिरसन..!

कासवगतीनं का होईना पण एक बदल घडत होता. मुलं घरी आल्यावर त्यांच्या त्यांच्या खोल्यांमध्ये जाऊन बसायची, ते कमी झालं होतं. बाहेर हॉलमध्ये बसल्यावर किंवा जेवताना सुद्धा त्यांच्या हातांना चिकटलेले मोबाईल फोन आता थोडावेळ तरी सुटत होते. घरी आल्यावर ” काहीतरी खायला दे” असं म्हणून तडक आपल्या खोलीत निघून जाणारी मुलं आता “चला, आज काय करायचंय? ” असं विचारत होती. त्यांच्या खोल्यांची दारं पूर्वी सगळ्यांसाठी बंद असायची, ती आता उघडी राहायला लागली. आरास कशी करायची याचे प्लॅन्स नातवंडांच्या खोल्यांमध्ये बसून सुरु झाले. हे सगळं घडत होतं, ते नक्की सुखदच होतं. पण ते आळवावरचं पाणी ठरु नये, याचं मला टेन्शन होतं. त्यामुळं, रोज रात्री मी सगळ्यांच्या मेसेजेसची वाट बघत बसायचो.

बघता बघता गणपती आले. घरोघरी उत्सव साजरे व्हायला सुरुवात झाली. कुणाच्या घरी दीड दिवसांचा गणपती होता, तर कुणाकडं पाच दिवसांचा.. पण यावर्षी एक मोठ्ठा चमत्कार झाला, तो आरतीच्या वेळी.. घरातल्या नातवंडांच्या पाच आरत्या तोंडपाठ..! कुणीही हातात पुस्तक घेतलं नाही किंवा नुसत्याच टाळ्या वाजवत “जयदेव जयदेव” असं मोठमोठ्यानं म्हटलं नाही. मुलांनी नैवेद्याची पानं वाढली. अगदीं उजव्या-डाव्या बाजू परफेक्ट वाढल्या. बिल्डिंग मधल्या इतरांना घरी जाऊन दर्शनाला येण्याची निमंत्रणं दिली, तीही व्हॉट्स ॲप न वापरता.. ही मोठी गोष्ट होती. पंधरा दिवसांच्या एका पुढाकारानं घरातलं वातावरण बदललं, नाती घट्ट झाली.

मी आमच्या घरच्या गणपती उत्सवाच्या निमित्तानं सोलापूरला होतो. त्यामुळं, या आनंदी उत्सवाचा प्रत्यक्ष अनुभव मला घेता आला नाही. पण एक चांगला बदल या निमित्तानं घडल्याचा मला फार अभिमान वाटला.

लावलेली पैज मी जिंकलो होतो. पैज जिंकल्याचा आनंद तर आहेच. पण त्याहीपेक्षा जास्त समाधान आहे ते दोन टोकं जुळवल्याचं. एक टोक “आम्ही आता निरुपयोगी” या मनस्थितीतलं, अन् दुसरं टोक “आमच्या हातात फोन, इंटरनेट आणि पैसा असला की आम्हाला कुणाची गरज नाही” या मनस्थितीतलं.. फार अवघड गोष्ट होती, देवाच्या कृपेनं ती साधली. “सत्यसंकल्पाचा दाता नारायण” असं म्हणतात, ते १००% खरं असल्याचा अनुभव मला आला.

आज रविवारी सकाळी फोन आला. उद्या डोसा खायला जायचंय..! उद्याचा डोसा माझ्या आयुष्यातला ‘द बेश्ट डोसा’ असेल…!

© श्री मयुरेश उमाकांत डंके, मानसतज्ज्ञ,

 संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.

 8905199711, 87697 33771

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “काय बदललंय?” — ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

??

☆ “काय बदललंय?” — ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

ए••• तुला आठवतं? आपण ३५ वर्षापूर्वी कसे चोरून एकमेकांना भेटायचो ते?

कसा विसरेन मी? आणि तुला आठवतं का गं असेच चोरून एका बागेत असताना आपल्याला आपल्याच बॉसने, आपल्या एका कलीगने बघितले ते?

होऽऽऽ आठवतय की. अगदी काल परवाच घडलेय असं वाटावं इतक्या ठळकपणे•••

आता हसू येतय सगळ्याचे. पण मग असे चोरून भेटायलाही नको आणि कोणी पाहिले म्हणून ओशाळायलाही नको म्हणून आपण आपल्या घरच्यांच्या संमतीनेच लग्न केले ना•••

घर दोघांचे आहे समजून त्यासाठी म्हणून तू नोकरी निमित्ताने बाहेर•••

मी पण तुला हातभार म्हणून घरी बसून तरी काय करायचे वाटून नोकरीसाठी बाहेर•••

संध्याकाळी कामाहून आले की दोघांचा मूड एकदम फ्रेश••• 

मग संध्याकाळचा स्नॅक्स बाहेर कुठेतरी फिरताना•••

पण रात्रीचं जेवण तुला माझ्याहातचेच पाहिजे असायचे.

मग घरी येऊन त्या एका वातीच्या स्टोव्हवर संध्याकाळी दमून आलेले असतानाही हसत खेळत वेळेत होत असे.

कधी थोडी कुरबूर कधी रुसवा फुगवा तरी सगळे हवे हवेसे वाटणारे•••

आता संसार वेलीवरचे फूलही चांगले उमलले आहे बहरले आहे•••

पण••••

मी तीच आहे. तू तोच आहे••• मग आपल्यामधे तणाव का?

का छोट्या छोट्या गोष्टींमधूनही चिडचिड होते?

का आपण जरा फिरून येऊ म्हणताच त्यावेळी दोघांपैकी एकाला जमत नाही?

का काही चांगले करावे म्हटले तर नकार घंटा वाजते?

का मनासारखे काहीच घडत नाही वाटून मन मारून उगीच सहन करत रहायचे?

तरीही स्पष्टपणे बोलले तर उगाच राग येईल वाटून एकट्यानेच कुढत रहायचे?

काय बदललय? का बदललय? विचार केलायस कधी?

विचार करायला वेळच कुठे? या प्रश्नातूनही इतके वर्ष मला काहीच करायला वेळ मिळाला नाही हे दाखवून देणारा स्पष्टपणे जाणवणारा एक नापसंतीचा सूर•••

खरय••• एकाच घरासाठी काडीकाडी जमवताना आपण आत्मकेंद्रित कधी झालो हे कळलच नाही गं••• 

मला त्रास नको म्हणून तू तर तुला त्रास नको म्हणून मी काही गोष्टी एकेकट्यानेच सहन केल्या ना?

तेथेच खरे तर आपण चुकलो. त्या सगळ्या क्षणातून आपल्यामधली आपलेपणाची विण सैल होऊन मी पणाची वीण घट्ट कधी झाली कळलेच नाही•••

मग तू तू मै मै आले आणि हळू हळू हे अंतर आपल्याही नकळत वाढले गं.

दोघांच्या आवडी निवडी एकत्र जपण्याऐवजी एकमेकांना सपोर्ट करण्यासाठीच कोणतीही आडकाठी न आणता वेगवेगळ्या जपल्या गेल्या ना••• तेव्हाच एकमेकांचा खोटा आधार आहे वाटून आपापले विश्व वेगळे निर्माण झाले गं•••

आता या दोन विश्वांना कसे एकत्र आणणार? संसाराचा रथ चांगला उभा राहिलेला लोकांना दिसतोय गं••• पण त्याचे दोन घोडे दोन विरुद्ध दिशेने धावू पहाताहेत म्हणून स्थीरच आहे ••• हे कोणाच्या लक्षातही येणार नाही इतके चांगले नाटक करणारे आपण अभिनेते पण झालो आहोत गं•••

खरचं काय बदललय? कसं बदललय हे सगळं?

आता तू रिटायर्ड झालास••• मग पुन्हा तुला ते दिवस खुणावू लागले••• मग थोडा कमीपणा घ्यायचा मोठेपणा सुचला••• मग पुन्हा एकमेकांची स्तुती आणि विरुद्ध दिशेने धावणारे घोडे एक होऊन मुलाच्या संसार रथासाठी सज्ज झाले.

खरचं काय बदललय ग?

छे ऽऽऽ कुठे बदललय रे••••

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “सोळा सहस्त्र एक शतक वरमाला!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

 

? इंद्रधनुष्य ?

“सोळा सहस्त्र एक शतक वरमाला! ☆ श्री संभाजी बबन गायके 

ही तर मोठी दिवाळी!

जन्मदात्री धरित्री आपल्याला कधीही मृत्युशय्येवर निजवणार नाही, याची त्याला पुरेपूर खात्रीच होती. मरेन तर तिच्याच हातून… अन्यथा नाही असा त्याचा प्रण होता. आणि ब्रम्हदेवांकडून तसा वर पदरात पडताच तो स्वर्गातील देवांनाही वरचढ ठरला आणि पृथ्वीवर साक्षात ‘नरक’ अवतरला!

त्याचे अपराध शंभरात नव्हे तर सहस्र संख्येने गणले जाऊ लागले होते… सोळा सहस्र आणि वर एक शतक अधिकचे! त्याचा ‘शिशुपाल’ करण्याची घटिका समीप आली होती. मुरा नावाच्या अधमाला लीलया मातीत घालून तो ‘मुरारी’ झाला! पण नरक अजूनही नांदताच होता… ब्रम्हदेवाच्या वरदानाची कवचकुंडले परिधान करून रणात वावरत होता… चिरंजीव असल्याच्या आविर्भावात. इकडे ही सत्याचे भाम म्हणजे प्रकाश अंगी मिरवणारी रणात निघाली होती आपल्या सुदर्शनचक्रधारी भ्रतारासोबत.. तिला रण अनुभवयाचे होते… आपल्या स्वामींना शत्रूशी झटताना आणि विजयश्री प्राप्त करताना याचि देही.. याचि डोळा तिला पहावयाचे होते! ती फक्त दर्शक म्हणून आली होती… पण प्रत्यक्ष युद्धभूमीत तिच्या स्वामींनी चिरपरिचित नीतीने, ‘माये’च्या रीतीने तिला हाती आयुध घ्यायला उद्युक्त केले! तो पृथ्वीचा पुत्र… रावणाची चिता विझून गेल्यावर जणू त्याचाच कुमार्ग अनुसरण्यासाठी मातेला भार म्हणून जन्मास आलेला. पण ही तर स्वत:च पृथ्वीचा अवतार… म्हणजे त्याची आई…. आणि त्याचे अपराध उदंड झालेले… त्याला दंड दिलाच पाहिजे. तसा तिने तो दिलाही! त्यामुळे तिच्यावरचाच भार गेला.

खेळ तो येणेचि खेळावा.. सारे खेळ त्याचेच.. खेळाडूही तोच.. आपण फक्त दर्शक. स्वामींनी सत्यभामेकडून खेळ खेळवून घेतला!

सोळा हजार शंभर अभागी जीव आता स्वतंत्र झाले होते… नव्हे त्यांना प्रत्यक्ष देवाने सोडवले होते त्या नरकातून. पण मानवी जीवनात मानवाला अतर्क्य घटनांना सामोरे जावे लागते… देव असले म्हणून काय… मानव अवतारात अवतारी देवही अपवाद नव्हते! भगवान श्रीरामांनी संसाराचे भोग भोगले होतेच की. कुणा एकाचे बोल ऐकून प्राणप्रिय पत्नी वनात धाडली होती… रामायणानंतर आणखी एक रामायण घडले होते.

नरक तर आईच्या मृत्यू पावून तसा मुक्त झाला होता… पण त्याच्या बंदिवासातील सोळा हजार शंभर स्त्रिया आता विनापाश झालेल्या होत्या. ज्याने स्त्री संकटातून मुक्त केली त्याचे त्या स्त्रीने दास्य पत्करावे असा संकेतच होता तेंव्हा. त्या म्हणाल्या… देवा… आता आम्ही सर्वजणी तुमच्या आश्रित झालेल्या आहोत… जगाचे आणि आमचे आजवर एकच नाते होते… शरीराचे. आणि आम्ही स्त्री जातीत जन्मलो एवढेच काय ते आमचे पातक. जन्मदात्यांनी आम्ही विटाळलो म्हणून आमचे नाव टाकले… आम्ही कुणाच्याही बहिणी उरलो नव्हतो, कुणाच्या पत्नी होऊ शकत नव्हतो… निसर्गनियमाने आई झालोच तरी कुणाचे नाव सांगायचे बाळाचा पिता म्हणून? तो असुर असला तरी त्याचे नाव तरी होते आमच्या नावात… आमच्या इच्छेविरुद्ध. पण आता आम्ही कुणाच्या नावाने जगावे.. पती म्हणून कुणाला कपाळी रेखावे?

धर्माच्या पुनरुत्थानार्थ संभवलेल्या भगवंतापुढे असे धर्मसंकट यावे? या जीवांना आश्रय देणे तर कर्तव्याच. पण त्यांचा प्रश्न? त्याला व्यवहाराने उत्तर देणे अपरिहार्य होते. स्वत: देव यशोदासूत होते तसे देवकीनंदनही होतेच. वासुदेव होते तसेच नंदलालही होतेच!

“तुम्ही आता या क्षणापासून आमच्या, अर्थात द्वारकाधीश श्रीकृष्ण यांच्या धर्मपत्नी आहात! आणि अखिल जगत या नात्याचा सन्मान करेल.. अशी आमची आज्ञा राहील!

 राजयाची कांता काय भीक मागे.. मनाचिये योगे सिद्धी पावे.. अशी त्या सा-या आत्म्यांची गत झाली. एवढी वर्षे नरक भोगला… पण भगवत्कृपा झाली आणि पावित्र्य अंगा आले. आता प्रत्यक्ष देवाच्या नावाचे कुंकू लेवून जगायचे आणि अहेव जायचे! राजाची मुद्रा उमटवलेले साधे कातडे जरी असले तरी ते व्यवहारात सुवर्णमुद्रेसारखे चालून जाते.. मग आम्ही तर जिवंत देह आहोत.. आमचा धनी, आमचा स्वामी एकच… श्रीकृष्ण! जगताच्या दृष्टीने हे विवाह असतील… या संस्कारातून कामवासनेचा गंध येईलही एखाद्या घ्राणेन्द्रीयास! सर्व भोगांच्यामध्ये राहूनही नामानिराळा राहणारा हा… लांच्छन बरे लावून घेईल? रुक्मणि, जाम्बवन्ती, सत्यभामा, कालिन्दी, मित्रबिन्दा, सत्या, भद्रा और लक्ष्मणा अशा आठ सर्वगुणसंपन्न भार्या असणारा राजस सुकुमार मदनाचा पुतळा आमच्या सारख्या चुरगळलेल्या फुलांची माला का परिधान करेल? देवाच्या चरणावर वाहिलेली फुले कायमची सुगंधी होऊन राहतात.. त्यांचे निर्माल्य नाही होत!

आम्हा सर्वजणींचा पत्नी म्हणून स्वीकार करण्याची त्याची हे कृती न भूतो न भविष्यती! मानव्याच्या दृष्टीने ही अलौकिक कृती म्हणजे विश्वाने उदरात सामावून घेतलेल्या सहस्र आकाशगंगाच म्हणाव्यात.

भोगी म्हणून अज्ञानी जीव उपहास करु शकतील हे काय त्यांना ज्ञात नसेल? पण कर्मसिद्धांत सांगणारे हृद्य फलाची चिंता का वाहील? देवाने ज्याला आपले मानले त्याचे इह आणि परलोकीही कल्याणच होते! त्याची “मी स्वामी पतितांचा” ही उक्ती सिद्ध करणारी ही कृती म्हणूनच वंदनीय आणि अनुकरणीय!

मानव की परमेश्वर? या प्रश्नाने त्या युगातही काही शंकासूर ग्रस्त होते आणि या युगातही आहेतच! पण ज्याला कीर्तीचा मोहच मुळी नाही… आम्हा पतितांचे रुदन तो केवळ ऐकत स्वस्थ बसू शकणा-यांपैकी खचितच नव्हता. कर्तव्यासाठी कलंक साहण्याचे सामर्थ्य अंगी असणारा तो एक समर्थ होता. आम्हां पतितांना संजीवन देण्यासाठी त्याने कलंक आदराने ल्याला… हलाहल प्राशन करून देवेश्वर झाला… ज्याने बाल्यावस्थेत धेनू राखल्या… त्याचे हृदय वत्सल धेनूसम असावे, यात नवल ते काय?

कौरवांच्या सभेत याच द्वारकाधीशाने एका द्रौपदीला वस्त्रे पुरवली यात म्हणूनच आश्चर्य वाटत नाही!

(दीपावली दरम्यान येणारी चतुर्दशी लहान दिवाळी म्हणून उल्लेखिली जाते. खरे तर हाच दिवस ख-या दिवाळीचा मानला जावा, असे वाटून जाते. अशी अलौकिक घटना या दिवशी श्रीकृष्णावतारात घडली… समाजबहिष्कृत थोड्याथोडक्या नव्हे, तब्बल सोळा हजार शंभर स्त्रियांना एका सर्वशक्तीमान दैवी अवतारीपुरुषाने पत्नी म्हणून स्विकारणे ही घटना सर्वार्थाने असामान्य! देवाचा माणूस झाला किंवा माणसाचा देव झाला या चर्चेपेक्षा माणसातले देवत्व कर्मातून सिद्ध करणारा मनुष्य देवच! भगवान श्रीरामांचे चरित्र व्यवहारात अनुसरण्यायोग्य आहे, पण भगवान श्रीकृष्ण चरित्र प्रत्यक्षात अनुसरणे केवळ अशक्य आहे, असा मतप्रवाह आहे. पण श्रीकृष्ण परमात्याची पतितोद्धाराची कृती अनुकरणीय नाही का? असो. अधिकाराविना बरेच लिहिले आहे. महान गीतगोविंदकार कवी मनोहर कवीश्वर यांनी ‘माना मानव वा परमेश्वर’ हे खरोखर अप्रतिम रचनेतून प्रत्यक्ष श्रीकृष्ण चारित्र्य नजरेसमोर उभे केले आहे. हे विचार लिहिताना त्यांच्याच शब्दांचा आधार घेतला आहे, हे लक्षात येईलच. यात इदं न मम अशी भावना आहे. जय श्रीकृष्ण.)

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ “आपलं होताना…” – लेखिका : सुश्री विदुला जोगळेकर ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆

सुश्री सुनीला वैशंपायन 

? वाचतांना वेचलेले ?

☆ “आपलं होताना…” – लेखिका : सुश्री विदुला जोगळेकर ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆

नक्षत्रासारखं लेकीचं लखलखतं रूप काकू खुर्चीतून न्याहाळत होत्या. नवरात्रात पाचव्या माळेला जन्मलेली, ललित पंचमीची… म्हणून तिचं नावही त्यांनी ललिताच ठेवलं होतं.

रूप, शिक्षणानं चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आत्मविश्वास… त्यात सासरही टोलेजंग मिळालेलं. सगळं तिला शोभून दिसत होतं आणि स्वतःजवळ असलेलं मिरवायची कला देखील तिला छान अवगत होती… कौतुक करून घेणं तिला फार आवडायचं. कुणाचं करण्याच्या बाबतीत मात्र‌ हात आखडता असायचा तिचा!

स्वतःभोवतीच फिरणारं तिचं व्यक्तीमत्व हल्ली काकूंना कर्कश वाटू लागलं होतं… आपलीच मुलगी होती, तरीही…!

तिच्या येण्यानं, अखंड ‘मी’ गोवत बोलण्यानं घरातली शांतता ढवळून निघते, असं कधीकधी त्यांना वाटायचं. आपलंच लेकरू… पण तरीही ती बऱ्याच वेळा, सर्वच बाबतीत ‘लाऊड’ आहे, असे न सांगता येण्यासारखे कढ त्यांना दाटून येत.

आजकाल थकल्यामुळं त्या घरातून थोड्या अलिप्त झाल्या होत्या. तिचं मोठेपण तिच्याच तोंडून ऐकायला त्या हल्ली फारशा राजी नसायच्या. कधीकाळी त्यांना तिच्या त्या मोठेपणाचं कोण कौतुक वाटतं होतं पण आजकाल नकोसं व्हायचं.

तिचा वाढदिवस, नवरात्रातलं सवाष्ण, माहेरवाशीण असं सगळं औचित्य साधत काकू तिला ललित पंचमीला जेवायला बोलवायच्याच. ती प्रथाच पडून गेली होती घराची.

काकूंच्या अखत्यारीत असलेला संसार सुनेच्या हातात जाऊनही आता काही काळ लोटला होता… पण सूनबाईंनी या प्रथेत खंड पडू दिला नव्हता. शांत, समंजस… तरीही काहीशी अबोल सून, काकूंना लेकीपेक्षाही कित्येकदा आपलीशी वाटायची. जन्माला घातलेल्या मुलींपेक्षाही ही परक्या घरातून आलेली पोर त्यांच्याही नकळत त्यांच्या जवळची होऊन गेली होती. फारसा संवाद नसायचा दोघींचा, एक तर तिची दिवसभर बॅंकेतली नोकरी आणि उपजतच गोष्टींची तिची समज… न बोलता कुटुंब एकसंध शांततेत नांदत होतं.

अनायसे रविवारच होता, त्यामुळं सूनबाईंनी नणंदेच्या आवडीचा ‘सुरळीच्या वडी’पासून ‘शाही रबडी’पर्यंत सगळा साग्रसंगीत स्वयंपाक केला होता. छानशा मोत्यांच्या महिरपींनी चांदीची ताटवाटी सजली होती. सवाष्ण, त्यात पुन्हा वाढदिवसाची उत्सवमूर्ती… सगळं कसं नेमकं, नेटकं टेबलावर मांडलेलं होतं.

काकांनी देखील आज सगळ्यांसोबत टेबलावर जेवायला बसायचा हट्ट धरला होता. काकू शक्यतो त्यांचं जेवणखाण लवकर आटोपून घेत. एकतर वेळ सांभाळावी लागे आणि दुसरं म्हणजे, थकलेल्या शरीरामुळं हात थरथरत कापत. जेवता जेवता सांड-लवंड होई. त्यामुळं काकू चारचौघात त्यांना जेवायला वाढायचं टाळतच असत.

पण आज मात्र काकांनी लेक, जावई यांच्यासोबतच जेवायचा हट्ट धरला… आणि सूनबाईंनी काकूंना थोपवत त्यांचा हट्ट मान्य केला.

“असू दे आई, जेवू दे त्यांना सगळ्यांसोबत… त्यांचीच तर लेक आहे ना! काही होत नाही… त्यांनाही कधीतरी वाटत असेलच ना, सगळ्यांसोबत जेवावं…! ”

गरम गरम आंबेमोहोराच्या भातमुदीवर पिवळं धम्मक दाटसर वरण येऊन विराजमान झालं… आणि त्याच्या वासानं सगळ्यांची भूक एकदम चाळवली.

लोणकढं तूप आणि लिंबाची फोड… त्या पूर्णान्नानं भरलेल्या ताटाकडे बघताना लेकीच्या चेहऱ्यावर तृप्तीचा भाव ओसंडून वाहिला.

काकू मनापासून आनंदल्या. असं सगळं कुटुंब टेबलाभोवती होतं हे बघून, “सावकाश जेवा…” त्यांनी लेक-जावयाला अगदी प्रेमानं सांगितलं.

थरथरत्या बोटांनी भातावर लिंबू पिळताना काकांच्या हातातून चतकोर लिंबाची फोड उडून टेबलाखाली पडली. सूनबाईंच्या लगेचच लक्षात आलं. तिनं पटकन बाऊलमधली दुसरी फोड घेत त्यांच्या ताटातल्या भाताच्या मुदीवर दोन थेंबात शिंपडली.

“सावकाश जेवा बाबा…” ती त्यांच्या खुर्चीच्या पाठीवर हात ठेवत म्हणाली.

जेमतेम दोन घास तोंडांत गेले न गेले तोच… एक जोरात खोकल्याची उबळ काकांना आली आणि तोंडातल्या भाताचे कण चौफेर उडाले… काटकोनात बसलेल्या लेकीच्या अंगावर ही उडाले. ती एकदम चिडली,

“कशाला बसता बाबा सगळ्यांबरोबर जेवायला? तुम्हाला जेवताना नेहमी ठसका लागतो माहितीये ना…! ”

तिचं भरजरी नक्षत्र रुपडं एकदम चिडचिडलं. अंगावर उडवलेली भातशितं झटकत ती बेसीनपाशी‌ गेली.

“अगं सवाष्ण ना तू… उठू नकोस…”

काकूंचे शब्द तोंडातच विरले…

हातात पुऱ्यांची धरलेली चाळणी पटकन खाली ठेवत, सूनबाई धावत काकांच्या जवळ आली. आपली एका तळहाताची ओंजळ त्यांच्या तोंडाशी धरत, ती त्यांच्या पाठीवर हात फिरवत त्यांना म्हणाली,

“गिळू नकात बाबा तो घास. माझ्या ओंजळीत टाका… घशात अडकेल भाताचं शीत! ”

निमिषमात्र अडकलेल्या श्वासामुळं नाका-डोळ्यांतून वाहणारं पाणी मुक्तपणे वाहू लागलं. वाढताना ओढणी मध्ये येऊ नये म्हणून तिनं एका खांद्यावरुन घेऊन तिची गाठ कमरेशी बांधली होती. घाबराघुबरा झालेला त्यांचा चेहरा तिनं तीच ओढणी मोकळी करत पुसला.

सुनेचा आपलेपणानं पाठीवर फिरणारा हात त्यांना दिलासा देऊन गेला. ते हळूहळू शांत होत गेले.

लेकीच्या रिकाम्या खुर्चीकडे बघताना काकूंना त्या क्षणी उलगडलं… लेकीपेक्षा सून आपल्याला का आपली वाटते ते!

रक्ताचं नातं परकेपणाकडे झुकत होतं आणि परकं नातं आपलेपणा जपत होतं…!

परक्या घरी गेलेल्या लेकीचा ओसरत चाललेला आपलेपणा आणि परक्या घरातून आलेल्या सुनेच्या सहवासातून पाझरता ओलावा…!

नाती बदलत जातात… बघता-बघता…!

‘माझं’ असणं आणि ‘आपलं’ होणं…

यात कितीही नाही म्हटलं तरी फरक आहेच.

‘माझं’पण हे जन्मानं येतं, मात्र ‘आपले’पण आपुलकीतूनच निर्माण होत राहतं.

‘माझे’पणाला हक्काच्या मर्यादा आहेत,

तर ‘आपले’पण व्यापक आहे…

आणि व्यापक हे नेहमीच अमर्याद असतं…! ! !

लेखिका : सौ विदुला जोगळेकर

संग्रहिका : सुश्री सुनीला वैशंपायन

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print