मराठी साहित्य – मनमंजुषेतून  ☆ लाखमोलाची पुडी ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

??

☆ लाखमोलाची पुडी… ☆ श्री सुनील शिरवाडकर

माझा एक मित्र आहे. अवि नावाचा.आयुर्वेदाचा डॉक्टर आहे तो.आता डॉक्टरच म्हटल्यावर काही ना काही कारणाने त्याच्याकडे जाणे होतेच.

त्याच्याकडे गेले की नेहमीचे दृश्य. पितळी खलबत्त्यात तो औषधे कुटत असतो.बाजुच्या टेबलवर कागदाचे चौकोनी तुकडे मांडून ठेवलेले असतात.साधारण पंचवीस तीस तुकडे.तीन बाय तीन इंचाचे.औषध कुटुन झाल्यावर तो त्या प्रत्येक कागदावर ती पुड टाकत जातो. अगदीच समप्रमाणात. बरोबर शेवटच्या कागदापर्यंत पुरतं ते औषध. समोरच एक लाकडी मांडणी. त्यात छोट्या छोट्या डब्या. औषधांच्याच. एखादी डबी घ्यायची. त्यातील एक एक गोळी प्रत्येक कागदावर ठेवायची. मधुनच पेशंट अजुन काही तरी एखादी तब्येतीची तक्रार सांगतो.

“ठिकेय..देतो औषध त्याच्यातच टाकून”

मग अजुन एखाद्या डबी उघडतो.बारीक चमचाच्या टोकाने कुठली तरी पुड त्या कागदांवर टाकतो.काळी पुड..तपकिरी पुड..लाल गोळी.. पांढरी गोळी.. प्रत्येक कागदावर आहे ना हे बघतो.सगळी औषध योजना मनासारखी झाली याची खात्री पटली की एक एक पुडी बांधायला घेतो.

अगदी कुशलतेने तीन चार घड्या घातल्या की इंचभर लांबीची अगदी घट्ट पुडी तयार होते. एवढ्या पुड्या बांधायला वेळ लागतोच.एकदा मी त्याच्या मदतीला धावलो.माझा व्यवसाय सोनाराचा.सोन्याच्या दागिन्यांच्या पुड्या बांधायची सवय असतेच.तसं अवीला..म्हणजे डॉक्टरांना सांगितलं.

तो म्हणाला..

“अरे बाबा..तुमच्या पुड्या म्हणजे लाखमोलाच्या पुड्या..”

छोटी असते ती पुडी.. मोठा असतो तो पुडा. पण ते बांधणे म्हणजे कौशल्याचेच काम.किराणा दुकानात आता सगळं वाणसामान पैक केलेलं असतं,पण पुर्वी गिर्हाईकाच्या ऑर्डर नुसार बांधुन द्यायचे.राजाभाऊ जोशींचं किराणा दुकान होतं आमच्या गल्लीत. काही आणायला गेलं की ते ,पेपर घेऊन त्याच्या बाजुची पट्टी टर्रकन फाडायचे.ती त्या पेपरवर ठेऊन काट्यामध्ये ठेवायचे.मग रवा,साखर काय असेल ते काट्यामध्ये टाकुन वजन झाले की तो कागद अगदी कुशलतेने उचलुन दोन्ही हात उंचावून त्याच्या घट्ट पुडा बांधायचे.त्यावर एकावर एक दोर्याचे फेरे लपेटायचे..दोर्याचा बंडल दिसायचा नाही.प्रश्न पडायचा की हा दोरा येतोय कुठुन.पण असा छान आणि घट्ट पुडा बांधायचे ना ते..कुठुन कागदाच्या फटीतून रवा साखर बाहेर येण्याची शक्यताच नाही.

कधी चिवडा आणायला जावे.त्याचाही पुडा असाच बांधायचे.फक्त दोऱ्याचे चार पाच वेढे झाले की लाल रंगाचा चतकोर कागदी तुकडा त्यावर ठेवायचे.’कोंडाजी यांचा उत्तम चिवडा’..फेटा घातलेल्या कोंडाजी पहिलवानाचा फोटो.. त्या कागदावरुन पुन्हा दोरा गुंडाळायचे.नाशिक चिवड्याचा हा पुडा अखिल भारतात तेव्हापासून प्रसिद्ध होता.

कितीतरी पुडे आठवतात.कधी संध्याकाळी येताना गजरा आणावा. वेडावून टाकणारा मोगऱ्याचा गंध.हिरव्या मोठ्या पानात ठेऊन त्याची हलक्या हाताने बांधलेली पुडी. आतल्या नाजुक कळ्या कोमेजून जाऊ नाही म्हणून. हळुवारपणे तो खिशात ठेऊन आणायचो.

गुरुवारी एकमुखी दत्ताच्या दर्शनाचा नेम.जाताना रामसेतुजवळच्या पांडे मिठाई कडून पळसाच्या पानात बांधलेले चार पेढे. दत्तापुढे उघडून ठेवलेली ती पुडी. छोटासा गाभारा..धुपाच्या सुगंधाने भरलेला.. आणि भारलेला.सगळी मुर्ती फुलांना झाकुन गेलेली. त्यातून दिसणारा दत्ताचा तो तेजस्वी चेहरा.पाठीमागून येणारा ‘दिगंबरा..दिगंबरा..’ चा गजर..

दोरा न वापरता पुडी बांधणे ही एक कलाच आहे. आमचा व्यवसाय सोनारकामाचा. पुर्वी धर्मकाट्यावर वजन करण्यासाठी जावे लागायचे. म्हटलं तर खुप अवघड काम. तिथे गर्दीत उभं रहायचं..आपला नंबर आला की हळुच पुडी उघडायची..त्यातले सोन्याचे मणी तिथल्या लहान वाटीत टाकायचे..वजन झालं की पुन्हा त्याची पुडी बांधायची.हे सगळं गर्दीत.. उभ्यानेच. एखादा मणी सुध्दा खाली पडता कामा नये.

पण एक गोष्ट नक्की. सोन्याच्या दागिन्यांची पुडी बांधावी तर आमच्या दादांनीच..म्हणजे वडिलांनी.

पेपरचा साधासाच चौकोनी कागद.. त्यावर त्याच आकाराचा गुलाबी कागद. या गुलाबी कागदाची रंगछटा खुपच आगळी. त्यावर सोन्याचा दागिना जेवढा खुलुन दिसतो ना..तेवढा कशावरच नाही. तर त्या गुलाबी कागदावर ठेवलेलं ते गंठण.सोन्याच्या तारेत गुंफलेलं..खाली ठसठशीत मंगळसूत्राच्या दोन वाट्या.अतिशय सुबकपणे एक उजवी घडी..एक डावी घडी घालत दादा त्याची पुडी बांधत. त्यातही एक नजाकत होती.आजकालच्या शेकडो रुपयांच्या ज्वेलरी बॉक्सला मागे सारणारी ती मंगळसूत्राची पुडी.. अवी म्हणतो तश्शीच…. अगदी ‘लाखमोलाची पुडी’

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ दास नवमी… — ☆ माहिती संकलक : श्री प्रसाद जोग ☆

श्री प्रसाद जोग

🌈 इंद्रधनुष्य 🌈

दास नवमी… ☆ माहिती संकलक : श्री प्रसाद जोग ☆

श्री समर्थ रामदास स्वामी महानिर्वाणदिन माघ कृष्ण ९, शके १६०३ चैत्र शुक्ल ९ शके १५३० – रामनवमी या शुभमुहूर्तावर त्यांचा जन्म झाला त्याचे नांव नारायण ठेवले.हे नारायण सूर्याजीपंत ठोसर म्हणजेच श्री समर्थ रामदास स्वामी.

वयाच्या पाचव्या वर्षी नारायणाची मुंज झाली. बुद्धी तीव्र असल्यामुळे त्याचे प्राथमिक अध्ययन संस्कृतासह लवकर झाले. अध्ययनाबरोबरच सूर्यनमस्कार मल्लविद्या यांचा अभ्यास करून नारायणाने अचाट शरीरसामर्थ्य मिळविले. बालपणी नारायण फार हूड व खोडकर होता. त्याला मुलांबरोबर खेळणे, रानावनात हिंडणे, झाडावर चढणे, पाण्यात डुंबणे आणि एकांतात जाऊन बसणे असे छंद होते.

सर्वकाळ सवंगड्यांबरोबर नारायणाचे हिंडणे राणूबाईंना आवडत नसे. एकदा त्या रागावून नारायणाला म्हणाल्या, “नारोबा, पुरुषांना काहीतरी संसाराची काळजी पाहिजे.” हे शब्द ऐकून सर्वांच्या नकळत नारायण अडगळीच्या खोलीत जाऊन बसला व आसनात बसून चिंतनात मग्न झाला. सगळीकडे शोधाशोध झाली. राणूबाईंना फार काळजी वाटली. काही कामानिमित्त राणूबाई त्या अडगळीच्या खोलीत गेल्या, तेव्हा नारायणाचा पाय लागून दचकल्या. नारायण आहे असे समजतांच त्या म्हणाल्या, “नारोबा, येथे अंधारात काय करतोस ?” त्यावर नारायणाने उत्तर दिले, “आई, चिंता करीतो विश्वाची”

नारायणाने मारुती मंदिरात जाऊन अनुष्ठान केले. मारुतीकृपेने नारायणाला श्रीराम दर्शन झाले व प्रभू रामचंद्राने प्रत्यक्ष अनुग्रह करून श्रीराम जयराम जयजय राम या त्रयोदशाक्षरी मंत्राचा उपदेश केला. अनुग्रह झाल्यावर नारायण मौनव्रत धारण करून एकांतात राहू लागला.

वयाची १२ वर्षे पूर्ण होतांना नारायणाला एका श्रीरामावाचून अन्य कोणी जिवलग उरले नव्हते. नाशिक पंचवटीतील श्रीराम मंदिरात नारायणाने प्रवेश केला तेव्हा रामनवमीचा उत्सव सुरु होता. मंदिरात मानसपूजा व प्रार्थना केली. सामर्थ्य मिळवल्याशिवाय समाजोद्धाराचे कार्य तडीस नेणे अशक्य आहे हे जाणून खडतर तप:श्चर्येचा संकल्प केला आणि रामाची आज्ञा घेऊन आपल्या तप:श्चर्येस योग्य असे स्थान निवडले.

नाशिकपासून जवळच पूर्वेस टाकळी हे गांव आहे. तेथे गोदावरी व नंदिनी या दोन नद्यांचा संगम आहे. तप:श्चर्येस हे स्थान अनुकूल आहे असे पाहून तेथेच एका गुहेत नारायणाने वास्तव्य केले.

श्रीराम जयराम जयजय राम या त्रयोदशाक्षरी मंत्राचा जप करणे. दुपारी पंचवटीत जाऊन माधुकरी मागून टाकळी येथे येऊन भोजन करणे. थोडा वेळ विश्रांती घेऊन ग्रंथावलोकन करणे. नंतर पंचवटीत कीर्तन व पुराण श्रवणास जाणे. संध्याकाळी टाकळीत येऊन आन्हिक आटोपून विश्रांती घेणे. एकच वेळ भोजन व उरला वेळ अनेक ग्रंथांचे अध्ययन आणि वाल्मिकी रामायणाचे लेखन व नामस्मरण याप्रमाणे अव्याहत १२ वर्षे नेम चालू होता. इतक्या लहान वयात अशी खडतर तप:श्चर्या करीत असताना तत्कालीन समाजाकडून त्यांना बराच त्रास सहन करावा लागला. यातूनच “अनुदिनी अनुतापे तापलो रामराया” अशी करुणाष्टके प्रगटली.

ऐन तारुण्याचा काळ, त्यात १२ वर्षाच्या तप:श्चर्येने बाणलेल्या प्रखर ज्ञान वैराग्याचे तेज, सूर्योपासनेने सुदृढ झालेली देहयष्टी आणि अनन्य भक्तिने अंत:करणात वसलेली कृपादृष्टी असे हे समर्थांचे व्यक्तिमत्व पाहून अनेक जण प्रभावित झाले. त्यापैकी काही निवडक लोकांना अनुग्रह देऊन उपासनेस लावले.

श्री समर्थ रामदास स्वामींनी महाराष्ट्रातील कृष्णाकाठ आपल्या कार्यास निवडला कारण इतर स्थळांपेक्षा येथे थोडी शांतता होती. कार्यास सुरुवात करताना परिस्थितीचा आढावा घेणे, चांगले कार्यकर्ते शोधणे, कोणते कार्य कोणाकडून व कोठे करायचे, कसे करायचे याचा आराखडा तयार करणे व ते अंमलात आणणे याचा पूर्ण विचार करून समर्थ प्रथम महाबळेश्वर येथे आले. तेथे चार महिने राहिले. तेथे मारुतीची स्थापना करून दिवाकर भट व अनंत भट यांना अनुग्रह दिला. वाई येथे मारुतीस्थापना करून पिटके, थिटे, चित्राव यांना अनुग्रह दिला नंतर माहुली व जरंडेश्वर येथे काही दिवस राहीले. शहापूर येथे सतीबाई शहापूरकर यांना अनुग्रह देऊन त्यांच्यासाठी चुन्याचा मारुती स्थापन केला. समर्थ स्थापित ११ मारुतीतील शहापूरचा हा पहिला मारुती. यानंतर क-हाड, मिरज, कोल्हापूर या भागात अक्का, वेण्णा, कल्याण व दत्तात्रेय हे शिष्य समर्थांना मिळाले.

उंब्रज येथे मारुती स्थापना करून समर्थ पंढरपूर येथे गेले. तेथे तुकाराम महाराजांची भेट झाली. परत येताना मेथवडेकर यांना अनुग्रह दिला. चाफळ येथील मठाचे कार्य दिवाकर गोसावींकडे सोपवले. माजगांव येथे मारुतीस्थापना करून समर्थ दासबोध लिखाणास शिवथरघळ येथे गेले.

१६७६ साली समर्थ सज्जनगड येथे कायमस्वरुपी वास्तव्यास आले. शिवाजी महाराजांनी समर्थांसाठी मठ बांधून दिला व हवालदार जिजोजी काटकर यांस उत्तम व्यवस्था ठेवण्यास सांगितले.

प्रतापगड येथील बालेकिल्ल्याच्या दाराजवळ मारुतीची स्थापना केली. हा समर्थ स्थापित शेवटचा मारुती.

त्यावेळी दासबोधाचा विसावा दशक पूर्ण केला. माघ वद्य पंचमी १६८२ या दिवशी तंजावरहून व्यंकोजीराजांनी पाठविलेल्या राममूर्ती सज्जनगडावर आल्या. समर्थांनी त्यांची स्वहस्ते पूजा केली. समर्थांनी शेवटची निरवानिरव करण्यास सुरुवात केली. समर्थांचा अंतकाळ जवळ आला असे जाणून शिष्य व्याकुळ झाले. आम्ही यापुढे काय व कसे करावे असे त्यांनी विचारले असता समर्थ म्हणाले

माझी काया आणि वाणी ।

गेली म्हणाल अंत:करणी ।

परी मी आहे जगज्जीवनी । निरंतर ॥

 

आत्माराम दासबोध ।

माझे स्वरुप स्वत:सिद्ध ।

असता न करावा हो खेद । भक्त जनीं ॥

माघ कृष्ण ९ , शके १६०३, (२२ जानेवारी, १६८२ ) वार शनिवार दुपारी दोन प्रहरी सज्जनगडावर रामनामाचा घोष करून समर्थ रामरुपात विलीन झाले.

ज्याठिकाणी श्रीसमर्थांवर अग्निसंस्कार केला त्या ठिकाणी संभाजी महाराजांनी राममंदिर व तळघरात समाधीमंदिर बांधले.

त्यानंतर अक्कास्वामी व दिवाकर गोसावी यांनी सज्जनगड व चाफळ मठाचा कारभार अनेक वर्षे सांभाळला.

समर्थानी दासबोध आत्माराम ग्रंथ, मनाचे श्र्लोक (मनोबोध), करुणाष्टके, सवाया, अभंग, पदे-चौपदी,काही स्‍फूटरचना, भीमरूपी- मारुतीस्तोत्र, अनेक आरत्या रचल्या.

सोबत करुणाष्टकांची पी.डी.एफ. ची लिंक देतो आहे .

http://www.samarthramdas400.in/literature/karunashtake.pdf

शेवट करताना एवढेच म्हणावेसे वाटते

समर्थाचिया सेवका वक्र पाहे।

असा सर्व भूमंडळीं कोण आहे।।

जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही।

नुपेक्षी कदा रामदासाभिमानी।।

जय जय रघुवीर समर्थ.

(संदर्भ :श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड यांची वेबसाईट) 

माहिती संकलन : श्री प्रसाद जोग

सांगली

मो ९४२२०४११५०   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “आनंद — रन आऊट होण्याचा…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “आनंद — रन आऊट होण्याचा…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे

क्रिकेट समजणाऱ्यांना रन आऊट म्हणजे काय हे सांगायला नको. खरंतर खेळतांना आऊट होण्यात आनंद नसतोच.  या पध्दतीने आऊट होण्याचं दु:ख वेगळच असतं.

पण तरीसुद्धा काहीजण आपल्यापेक्षा समोरच्याला महत्व देत केवळ समोरच्याला चांगली संधी मिळावी, त्या संधीचा त्याने उपयोग करावा, मी पुढच्या वेळी प्रयत्न करेन, पण आज तु मिळालेली संधी सोडू नकोस हां आणि असाच विचार करत काहीवेळा स्वतः असं रन आऊट होण्याचा धोका पत्करतात.

असा स्वतः आऊट होण्याचा धोका परत्करणारे आपले असतात. आणि हे आपले आपल्या रोजच्या खेळात, सतत असतात. मग ते आजी, आजोबा, आई, वडील, भाऊ, बहिण, काका, मामा, मावशी, आत्या इ…… थोडक्यात सगळे नातेवाईक आणि मित्र असतात.

थोडक्यात आपलं मोठं होण्यासाठी, आनंदासाठी, भविष्यासाठी, चांगल्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी असे स्वत:हून रन आऊट होण्याचा धोका परत्करणारे जे कोणी असतात त्यांच्यामुळे आपण काही प्रमाणात आपला डाव सावरत आणि साकारत असतो. तो डाव चांगला झाल्यावर ……..

कोणीतरी रन आऊट होण्याचा धोका पत्करून आपला डाव सावरला आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे.

असं आऊट होतांना त्यांनी त्यांचा वेळ, आनंद, आवडणाऱ्या गोष्टी, छंद, काही प्रमाणात सुख, आराम हे स्वत:हून सोडलेलं तर असतंच. पण हे सोडण्यात त्यांना आनंद आणि समाधान असतं. या गोष्टी सोडण्याच्या त्रासात सुध्दा ते एक वेगळा आनंद शोधण्याचा प्रयत्न करतात. आणि वेळोवळी तो आनंद व्यक्त करतात.

आणि याचा उल्लेख ते करत नाहीत. केला तर क्वचित करतात. आणि त्यातही यातून समोरच्याने मिळवलेल्या यशाचा, केलेल्या प्रगतीचा, दाखवलेल्या हिमतीचा, आणि प्रेमाचा आदर या ऊल्लेखात असतो.

अशा पध्दतीने रन आऊट होण्याची संधी जवळपास प्रत्येकाला मिळते. फक्त त्या वेळी आपण रन आऊट व्हायचं का करायचं हे ठरवाव लागतं.

ज्याला हे समजलं आणि उमजलं तो रन आऊट झाल्यानंतर सुध्दा जिंकत असतो………..

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘धर्म…’ ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ ‘धर्म…’ ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

धर्म म्हणजे काय ?

तर माझ्या मते धर्म म्हणजे एक आदर्श जीवन पद्धती आहे.

नियम आणि चौकटी धर्माने आखून दिलेल्या आहेत.

त्यांचे योग्य तऱ्हेने पालन करून जीवन जगावे .असे जीवन आनंददायी आहे .

 

अगदी सकाळी ऊठल्यानंतर  अंथरुणावरून खाली उतरण्याच्या आधीच गादीवर बसून  …

प्रार्थना केली जाते…

“कराग्रे वसते लक्ष्मी 

करमुले सरस्वती

करमध्ये तु गोविंदा

प्रभाते कर दर्शनम्

समुद्र वसने देवी

पर्वत स्तन मंडले विष्णुपत्नी नमोस्तुभ्यमं 

पादस्पर्श क्षमस्व मे…”

हे पृथ्वी माते माझ्या पायांचा तुला स्पर्श होणार म्हणून क्षमा याचना करून दिवसाची सुरुवात करायची.

 

हे म्हणताना शब्दातून आपोआप लीनता येते. आपली कृतज्ञता दाखवली जाते.

हात जोडले जातात..

नंतर नित्यकर्म सुरू….

आंघोळ करून देव पूजा …

तेव्हा मग स्तोत्र – मंत्र आरती……..

 

मात्र हे नुसतं म्हणायचे नसतात ..

त्यात शिकवण असते …मनाची समजूत असते… 

तसे देवाचे प्रेम आणि माया पण असते .

त्याचा अर्थ आणि मुख्य म्हणजे भावार्थ समजून घेऊन ती म्हणायची असतात.

 

संकटात दुःखात मनाला त्यांचा फार मोठा आधार असतो.

फुलांनी सजलेल देवघर,मंद तेवणारी समई,उजळलेली निरांजन बघताना मनात  सदभावना दाटून येते.

 

सकाळ अशी सात्विकतेने सुरू झाली की दिवस आपोआप निरामय आनंदात जातो.

हे नुसतं म्हणणं नाही तर याचे पाठांतर पण हवे ….

यासाठी अभ्यास हवा..

त्यासाठी आवर्जून वेळ काढायला हवा …

 

आणि मग ते स्तोत्र – मंत्र शांतपणे डोळे मिटून एकांतात म्हटले की मिळणारा आनंद हा शब्दात सांगता येत नाही .

त्याचा अनुभव घ्यायला हवा.

 

जेवताना…

“वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे….”.म्हणावे..

मग ते साधे जेवण होत नाही तो  यज्ञ कर्म  होतो हे …  मार्मिकपणे सांगून ठेवले आहे .

याला आयुर्वेदाचा आधार आहे….

“सीताकांत स्मरण जय जय राम…”

 म्हटल्यानंतर त्या अन्नाकडे बघायची आपली दृष्टी बदलते .

अन्न उत्तम रीतीने पचते .घरच्या गृहिणीने कष्ट घेऊन ते बनवलेले असते. त्याचा आपोआप मान राखला जातो .पवित्रता जपली जाते .

 

म्हणूनच त्याला पूर्णब्रह्म म्हटलेले आहे …..

 

हे रोज म्हणायला जमणार नाही पण सणावारी …रविवारी म्हणून तर बघा आपला आपल्यालाच आनंद वाटतो.

 

शाळेत आजही सरस्वती मातेला प्रथम वंदन केले जाते .

“या कुंदेंदु तुषारहार धवला

या शुभ्र वस्त्रावृता…”

असे म्हणून सरस्वतीची प्रार्थना केली जाते .तिच्याकडे आमची जडता (अज्ञान) दूर कर अशी विनवणी करायची. मात्र त्यासाठी प्रयत्न आपण करायचे आहेत.  आपल्याला अभ्यास करायचा आहे हे लक्षात ठेवायचे आहे.

 

मनाचे श्लोक ,अथर्वशीर्ष ,पसायदान हे शाळेत म्हणून घेतले जाते.पाठ करून घेतले जाते.

 कदाचित त्या वयात अर्थ लक्षात येत नाही .पण मोठे झाल्यानंतर तो आपोआप बरोबर कळतो… समजतो..

हेच ते संस्कार….

हुरहुर  लावणारी संध्याकाळ… दिवेलावणीची वेळ  झालेली असते… तेव्हा देवासमोरचा दिवा लावला जातो … तेवढ्या मंद प्रकाशाचाही आधार वाटतो…क्षणभर हात जोडले जातात.

“शुभंकरोती कल्याणम्…” म्हणायचं ..आरोग्यम् धनसंपदा हे किती वर्षांपूर्वीच आपल्याला सांगून ठेवलं आहे .सवयीने आपण ते म्हणतो पण ते कृतीतही यायला हवं आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.

निरामय आरोग्यासाठी आपला आहार विहार योग्य असायला हवा. जाताजाता केवढी शिकवण दिलेली आहे. आपण सहजपणे नेहमी  म्हणतो म्हणून आपल्याला त्याची किंमत कळत नाही…

 

रात्री झोपायच्या वेळी शरण आलेल्या लोकांचे क्लेश दु:ख दूर करणाऱ्या गोविंदाला नमस्कार करायचा .

“कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः”

 

असा संपूर्ण दिवस प्रार्थनेने संस्काराने आपोआप बांधला गेला आहे.

त्याचे एक संरक्षित आवरण आपल्या भोवती असते. त्यात आपल्याला सुरक्षित वाटते.

एक अदृश्य शक्ती आहे ती मला सांभाळते आहे… हा मनात विश्वास असतो .

संकट येत नाही तोपर्यंत काही वाटत नाही .मात्र ते आले की आपण आपोआपच परमेश्वराला शरण जातो. मस्तक टेकवले जाते. हात जोडले जातात.. त्या क्षणी त्या एकाचाच आधार आहे  हे आपल्या अंतरंगातून आपल्याला जाणवते.

.. आणि मग त्याची प्रार्थना अजूनच आर्ततेनी  केली जाते. 

मनापासून जेव्हा आपण शरण जातो तेव्हा ती प्रार्थना सफल होते..

 

 आत्ताच्या या धकाधकीच्या जीवनात इतकं सगळं म्हटलं जात नाही.

 हेही तितकच अगदी खरं आहे .

नाही म्हटलं गेलं तरी चालेल …

पण दिवसातून एकदा अगदी मनापासून त्याला हाक दिली त्याची आळवणी केली तरी ती त्याच्या पर्यंत पोहोचते….

 किती वेळा काय काय म्हणतो… हेही महत्त्वाचे नाही .

आतूनच जाणीव होऊन खरं खरं  त्याच्याशी बोलायचे…

 त्याला सांगायचे….

अभ्यास वाढला की सांगणे पण कमी होते…

तो सर्वज्ञच आहे….

याची जाणीव होते..

 

इतके सारे ज्ञान भांडार आपल्या हाताशी आहे. पूर्वजांनी हा ठेवा  देऊन ठेवलेला आहे.

 

 शब्दांचा फार मोठा आधार असतो. त्या जगनियंत्त्याला शरण जाऊ…

आपली विनवणी त्याच्यापर्यंत पोहोचेलच….. तो विश्वास मात्र मनात हवा.

तो असला की पुढचे सगळे सोपे होते.

“सर्वेपि सुखिनः:सन्तु सर्वे संन्तु निरामया:

सर्वे भद्राणी  पश्यन्तु मा कश्चित दुःखमाप्नुयात…”

.. .. रात्री झोपताना सर्वांचे कल्याण व्हावे कोणी दुःखी असू नये अशी प्रार्थना करायची.

आपल्याही नकळत आपला दिवस असा जातो…..

 

हाच तो धर्म…… प्रत्येकाचा आपला आपला धर्म असतो.आणि तो त्याप्रमाणे वागत असतो.

सर्व धर्मात हीच शिकवण असते .. शब्द फक्त बदलतात…..

 

यासाठी  दिवसाच्या चोवीस  तासांतील फक्त काही मिनिट आपल्याला  द्यावी लागतील.

 प्रत्येकाला सुखी शांत आणि आनंदी जीवनाची आस असते, तसंच प्रत्येकाचा ही एक स्वतःचा असा

” धर्म.”…….असतो.

मला काय म्हणायचे आहे तुम्हाला समजले असेलच…. 

त्याप्रमाणे आचरण करून निश्चिंत  जीवन जगूयात. 

शुभं भवतु…..

श्री कृष्णार्पणमस्तु…. 

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “सिंहाचलम”… भक्त प्रल्हाद व प्रभु नृसिंह..!… लेखक : श्री श्रीकांत पवनीकर ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ “सिंहाचलम”… भक्त प्रल्हाद व प्रभु नृसिंह..!… लेखक : श्री श्रीकांत पवनीकर ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

आंध्रप्रदेशातल्या विशाखापट्टणमजवळ समुद्र सपाटीपासून आठशे फूट  उंच असलेल्या सुरेख व अप्रतिम  डोंगराचे नाव आहे  सिंहाचलम…!  सिंह आणि अचलम( पर्वत) म्हणजे सिंहाचलम..! सिंहाचा पर्वत ..!  समुद्रातीरावरच्या आंध्र प्रदेशातल्या  उत्तर विशाखापट्टणम पासून केवळ सोळा किलोमीटरवर  जवळ एक अप्रतिम असा पर्वत आहे आणि या पहाडावर एक सुरेख अनेक वृक्षांनी बहरलेले लहानसे स्वच्छ सुंदर शहरच आहे.पहाडा वरच्या रम्य वनश्रीत वसलेली जणूकाही देवभूमीच..! या उंच मार्गावर अननस,आंबे व अनेक फळांची व फुलांच्या झाडांची नुसती बहार आहे. या अनेक वृक्षांखाली मोठमोठ्या दगडी शिला स्थापित आहे आणि अनेक भाविक पर्यटक येथे दर्शना अगोदर नंतर  या सिंहाचलम पर्वतावर विश्रांती घेत असतात. हा पर्वत म्हणजे प्रभु नृसिंहाचे निवासस्थान मानले जाते.भक्त प्रल्हादाच्या रक्षणाकरिता प्रभू नृसिंह प्रगट झाले अशी अनादि काळापासून पारंपारिक मान्यता आहे आणि आपले बालपण अशा गोष्टीत रमून गेले होते.

लुनार वंशाचे ऋषि पुरुरवा हे आपली पत्नी उर्वशी सोबत वायु भ्रमण करत असताना एका विशिष्ट नैसर्गिक शक्तीने प्रभावित होऊन या सिंहाचलम पर्वतावर पोहोचले व त्यांना  एक विष्णूची प्रतिमा/मूर्ती  डोंगरात पुरलेली दिसली. ती मूर्ति काढून धुळ साफ करताना  भगवंताची आकाशवाणी झाली .मूर्तीला चंदनाचा लेप लाऊन वर्षातून फक्त  एकदा भक्तांना मुळ मूर्तीचे दर्शन घडवावे व भक्तांचे कल्याण करावे.ऋषि पुरुरवा यांनी ही भगवंताची  आज्ञा मानून या शोधलेल्या ठिकाणी प्रतिमा /मूर्तीची प्रतिष्ठापना करून मंदिराचे पुनर्निर्माण केले आणि भक्तांचा ओघ सुरू झाला. आज येथे भव्यदिव्य  श्री वराह लक्ष्मी नरसिंह मंदिरात संपूर्ण चंदनाचा लेप असलेली  नरसिंहाची मूर्ती बघायला मिळते.या मंदिराची विशेषता अशी की येथे भगवान विष्णु हे वराह आणि नृसिंहच्या संयुक्त अवतारात लक्ष्मीसोबत स्थापित झालेले आहे आणि याची स्थापना भक्त प्रल्हादाने केली आहे असे मानल्या जाते.हिरण्यकश्यपूला मारल्यानंतर भक्त प्रल्हादाने हे मंदिर बांधले आणि ते काळाच्या ओघात या पहाडात गडप झाले आणि ऋषि पुरुरवा यांच्या दृष्टीस पडले.आतले मंदिर अतिशय भव्य असून बघितल्या बरोबर प्राचीनत्व जाणवते . मंदिरातले वातावरण अत्यंत भारावलेले असून मंद दिव्यांच्या आराशीची एक दिव्य झळाळी चन्दन मूर्ती समोर व मंदिरात दिसते.मूर्ती जवळ प्रवेश मिळतो. अकराव्या शताब्दीत मुळ मंदिराचे  गर्भगृह बांधल्या गेले असे समजते. विष्णूच्या  “वराह नरसिंह” रूपातले हे मंदिर आहे व इथल्या अनेक मंदिरात प्रत्येक खांबावर मूर्तीकलेचा प्राचीन  कलात्मक आविष्कार  बघायला मिळतो आणि त्या कलावंतांना दाद द्यावीशी वाटते. . वर्षभर मूर्ती चन्दन लेपाने झाकलेली असते आणि पुजारी पाटा वरवंट्यावर चंदनाचा लेप तयार करताना मंदिर परिसरात दिसतात. येथील मुख्य उत्सव चैत्र शुद्ध एकादशीला होणारा  “वार्षिक कल्याणम” आणि वैशाखातल्या तिसर्‍या दिवशीची “चन्दन” यात्रा असते  .याला “ चंदनोत्सव ” म्हणतात. मंदिरात कपाळावर चन्दन लाऊन चंदनाचा प्रसाद वाटला जातो. वैशाखातल्या अक्षयतृतीयेला संपूर्ण सिंहाचलमचे महोत्सवाचे  दृश्य बघण्यासारखे असते आणि देश विदेशातून असंख्य भाविक दर्शनाला येतात. अक्षयतृतीयेच्या  दिवशी भगवान लक्ष्मीनृसिंहाचा ओल्या चन्दनाने अत्यंत आकर्षक शृंगार केल्या जातो. भगवंताचे वास्तविक स्वरूप केवळ याच एका दिवशी बघायला मिळते.

असुर शक्तिची संस्कृती  शक्तिशाली होत असताना असुर राज हिरण्यकश्यपू व कयाधुच्या पोटी विष्णुभक्त  प्रल्हादाचा जन्म झाला. ब्रह्मदेवाचे  वरदान असल्याने उत्तरप्रदेशातल्या हरदोईचा हा राजा हिरण्यकशपु  निरंकुश झाला होता.या राजाच्या  आदेशानुसार कुणीही राज्यात  विष्णुची भक्ति करू शकत नव्हते. पण पुत्र  भक्त प्रल्हादाची भगवान विष्णुवर  अतूट श्रद्धा असल्याने क्रोधित होऊन राजाने त्याला मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली आणि बहीण होलीकाने या कपटात त्याला  मदत केले. होलिकेला आगीपासून संरक्षण असल्याने ती प्रल्हादाला घेऊन आगीत बसली परतू भगवंताच्या कृपेने प्रल्हादाला काहीच न होता होलीका भस्म  झाली आणि दुसर्‍याच  दिवशी भगवान नरसिंहाने विष्णुचे रूप घेऊन हिरण्यकशपुला मारले आणि प्रजेला अत्याचारा पासून मुक्त केले.ही घटना मात्र हरदोई येथे घडली असे समजते तर काही अभ्यासकांच्या मते ही घटना सिंहाचलमच्या पहाडावर  घडल्याचे सांगितल्या जाते.याची आठवण म्हणून होलिका दहन उत्सत्वाला हरदोइ पासून सुरवात झाली.  हिरण्यकश्यपुचा जन्म उत्तर प्रदेशातल्या हरदोई जिल्ह्याचा आणि तो तेथला राजा सुद्धा होता ..!   पण अत्यंत कठोर  तपस्येने व  भक्तीने त्याने ब्रंहादेवाकडून विचित्र वर मागून जवळपास अमरत्व प्राप्त केले. त्याला असे वरदान होते की कुठलाच मनुष्य,पशु, दैत्य, देवता, नाग, प्राणी, यांच्या कडून आकाश आणि जमिनीवर  मृत्यु येऊ नये. तसेच घरात व बाहेर , दिवसा व रात्री सुद्धा मृत्यु येऊ नये .पण भगवान विष्णुने नृसिंहाचे(ना स्त्री ना पुरुष)  असे रूप घेऊन त्याचा  अंत हरदोईच्या पहाडा वरील उंचीवरच्या  महालाच्या दरवाज्यात ऐन सायंकाळी केला आणि हिरण्यकशपुचे वरदान सुद्धा कायम राहिले.हिरण्यकश्यपूला मारल्यावर अनेक दिवसपर्यंत नृसिंहाचा क्रोध कायम होता व भक्त प्रल्हादाने हा क्रोध शांत करण्याचा प्रयत्न केला. हाच क्रोधाग्नी शांत करण्याकरिता ते या  डोंगरावर  आले व “सिंहाचलम” हे त्यांचे कायमचे निवासस्थान बनले . हरदोईला हिरण्यकशपुच्या किल्ल्यांचे काही अवशेष अजूनही बघायला मिळतात असे समजते. “हरिद्रोह” म्हणजे हरीचा द्रोह करणारा हे नाव हिरण्यकशपुने  ठेवले कारण तो हरी सोबत नेहमी द्रोह करायचा व पुढे त्याचे  हरदोई झाले.तर काही  अभ्यासकांच्या निष्कर्षानुसार येथे हरीचे दोन अवतार झाले आणि ते  म्हणजे नृसिंह आणि वामन..! हरीने दोन वेळा येथे अवतार घेतले म्हणून याला “हरिद्वय”म्हणतात ..पुढे त्याचे हरदोई झाले अशीही मान्यता आहे . .हरदोईला हिरण्यकश्यपुची नगरी मानल्या जाते.प्रल्हाद कुंड व प्रल्हाद किल्ला व  नृसिंह मंदिर आजही हरदोईला बघायला मिळतात. याच्या वरून सिंहाचलम व हरदोई ही दोन्ही स्थळे प्रभु नृसिंहाच्या अस्तित्वाची साक्ष देतात.भारतामध्ये नृसिंहाची अनेक मंदिरे आहेत पण सिंहाचलमला नृसिंहाचे घर म्हटल्या जाते.         

पद्म पुराणानुसार प्राचीन काळात वैशाख महिन्यातल्या शुक्लपक्षाच्या चतुर्दशीला नरसिंह प्रकट झाल्याने हा त्यांचा जन्मदिवस मानला  जातो. 

असे हे भक्त प्रल्हाद व प्रभू नृसिंहाचे निवासस्थान   “नृसिंहाचलम” ..! पण काळाच्या ओघात शब्दाचा अपभ्रंश होऊन नृसिंहाचलम चे आज “सिंहाचलम” झाले ..!

लेखक :श्री श्रीकांत पवनीकर

पर्यटन लेखक, नागपूर.  

मो -9423683250

प्रस्तुती : मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ – बदललेली नाती…– ☆ सौ. अलका ओमप्रकाश माळी ☆

सौ. अलका ओमप्रकाश माळी

?  विविधा ?

☆ – बदललेली नाती…– ☆ सौ. अलका ओमप्रकाश माळी ☆

बदललेली नाती…नात्यांचं नवं स्वरूप

खरं तर मानवाची जसजशी प्रगती होत गेली तशी मनुष्य प्राणी समाजप्रिय प्राणी म्हणून ओळखला जाऊ लागला.. समाजव्यवस्था, कुटुंबव्यवस्था, नाती गोती हे मनुष्य जीवनाचे अविभाज्य घटक बनले.. रानावनात भटकणारा माणूस वस्ती करून राहू लागला.. वाड्या, वस्त्या, मग गावं, शहरं बनत गेली.. आई वडील, बहिण भाऊ, नवरा , बायको अशी कित्येक नाती जोडली गेली.. पण पूर्वी असलेली नाती प्रगती बरोबरच बदलत गेली.. पितृसत्ताक पद्धती मध्ये स्त्रियांना दुय्यम स्थान मिळत होत पण आज स्त्रियांनी स्वतःला अस सिद्ध केलंय की नात्यांच्या परिभाषा ही आपोआप बदलल्या..पूर्वी घरी वडिलधारी माणसं किंवा बाबा, काका ह्यांना घरात एक वेगळाच दर्जा होता.. त्यांचा धाक कुटुंबावर होता..घरात बाबांचे पाऊल पडताच अख्खं घर शांत होत होत.. अर्थात ती आदरयुक्त भिती होती अस म्हणू शकतो आपण.. हळुहळू कुटुंब व्यवस्था विभक्त होत गेली आणि हे चित्र बदललं..स्त्रिया ही बाहेर पडू लागल्या..मोकळा श्वास घेऊ लागल्या.. जीवनशैली बदलली..डोक्यावरचा पदर खांद्यावर आला,.. आणि पुन्हा एकदा नात्यांची परिभाषा बदलली.. नवऱ्याला हाक मारताना अहो.. जाऊन अरे आलं.. नावाने हाक मारण्याची पद्धत सुरू झाली..अहो बाबा चा अरे बाबा झाला.. नात्यांमधील भिती जाऊन ती जागा मोकळीक आणि स्वतंत्र विचारांनी घेतली.. जिथे तिथे मैत्री चा मुलामा लावून नवीन नाती बहरू लागली.. सासू सुनेचे नातं बदललं.. सुना लेकी झाल्या,.. नणंद भावजय मैत्रिणी.. दिर भाऊ.. जाऊ -बहिण.. अशी नाती जरी तीच असली तरी बघण्याचा दृष्टिकोन बदलला… अर्थात प्रत्येक नात्याचा आधार असतो तो म्हणजे विश्वास.. हा विश्वास डळमळीत झाला की नाती विद्रूप रूप घेतात.. विकृत बनतात..नात कसं असावं तर धरणी च आणि अवकाशाचे आहे तस.. मातीचं पावसाशी आहे तस.. निसर्ग आणि जीव सृष्टीच नात.. ज्यात फक्त देणं आहे.. त्याग आहे समर्पण आहे.. नात कसं असावं तर राधेचं कृष्णाचं होत तसं.. प्रेम, त्याग, समर्पण आणि दृढ विश्वास असलेलं.. नात मिरा माधव सारखं.. ज्यात फक्त त्याग आहे तरी ही प्रेमाने जोडलेलं बंध आहेत.. नातं राम लक्ष्मण सारखं असावं.. एकाने रडलं तर दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी आणणारं.. नात भरत आणि रामा सारखं असावं जिथे बंधुप्रेम तर आहेच पण त्याग आणि समर्पण जास्त आहे..कुंती पुत्र कर्णा सारखं असावं..ज्यात फक्त हाल अपेष्टा, उपेक्षा असूनही निस्सीम प्रेम आणि त्यागाच प्रतीक असणारं.. नात्यांमध्ये प्रेम, विश्वास, मायेचा ओलावा, एकमेकांची काळजी घेण्याची वृत्ती, त्याग, समर्पण, निस्वार्थ असेल तर अशी नाती अजरामर बनतात.. हल्ली मात्र हे चित्र बदलत चाललं आहे.. सोशल मीडियाचा अती वापर.. प्रगतीच्या नावाखाली चाललेले अनेक घोटाळे.. ह्या सगळ्यात बाजी लागते आहे ती नात्यांची.. एकमेकांमध्ये स्पर्धा येणं.. आदर कमी होणं आणि जे नात आहे त्यापेक्षा दुसऱ्याची अपेक्षा लोभ मनात ठेवणं ह्याने नात्यांचं स्वरूपच बदलत  चाललं आहे .. सोशल मीडिया, इंटरनेट ह्या गोष्टींचा अती वापर आणि नात्यांमध्ये येणारा दुरावा  काळजी करण्यासरखा झाला आहे.. काही नाती फक्त समाजासाठी असतात.. फोटो पुरते किंवा असं म्हणू की व्हॉटसअप स्टेटस पुरती मर्यादित राहिलेली असतात.. त्या नात्यांमधल प्रेम विश्वास ह्याला कधीच सुरुंग लागलेला असतो… आणि ही परिस्थिती खरच विचार करायला लावणारी आहे.. शेवटी एवढच म्हणावंस वाटतं की कुठलं ही नातं असुदे ते नात समोरच्या व्यक्तीवर लादलेलं नसावं.. त्याच ओझ नसावं..नात्यांमध्ये स्वतंत्र विचार.. एकमेकांबद्दल आदर.. मायेचा ओलावा.. प्रेम.. आणि समोरच्याच्या चेहऱ्यावर सतत आनंद ठेवण्यासाठी चाललेली धडपड असेल तर कुठलेच नातं संपुष्टात येणार नाही.. कुठल्याच नात्याला तडा जाणार नाही… विश्वास हा नात्यांमधला मुख्य दुवा आहे.. आणि जिथे विश्वास, त्याग, समर्पणाची भावना आहे तिथे प्रत्येक नातं म्हणजे शरदाच चांदणं.. मोग-याचा बहर.. आणि मृद्गंधाचा सुगंधा सारखं निर्मळ आणि मोहक आहे ह्यात शंका नाही.. 

नात्यांचे रेशीम बंध असावेत..

बंधन, ओझ नसावं..

गुंतलीच कधी गाठ तर पटकन सैल होणारी असावी..

नात्यांचा बहर हा सिझनल नको..

तर बारमाही फुलणारा असावा…

नुसतच घेण्यात काय मिळवावं..

थोड कधी द्यायला ही शिकावं..

विश्वास आणि त्याग समर्पण

प्रत्येक नात्याच एक सुंदर दर्पण..

एकमेकांना दिलेला वेळ ही अमूल्य भेट आहे..

आदर आणि मायेने फुलणारं नात ग्रेट आहे..

नात्यात बसल्या जरी गाठी..

त्या सोडवण्याची कला ही असावी..

कधी नमत घेऊन तर कधी नमवण्याची ताकत ही असावी..

नातं जपणं एक फॉर्म्यालिटी नसावी..

हृदयातून हृदयापर्यंत पोचणारी मायेची हाक असावी..

नातं नको स्टेटस पुरतं जपलेलं..

नातं असुदे मनातून मनापर्यंत पोहचलेले…

© सौ. अलका ओमप्रकाश माळी

मोब. 8149121976

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ll अथांगाचे गमभन…ll ☆ श्री मनोज मेहता ☆

श्री मनोज मेहता

? मनमंजुषेतून ?

ll अथांगाचे गमभन…ll ☆ श्री मनोज मेहता 

मला पक्कं आठवतंय मी ५वीत होतो आणि आमच्या बंगल्यात भावाने हौसेने गुलाबाची रोपे आणून कुंडीत लावली होती, कुंड्या  मी माझा मोठा भाऊ क्रांती व सख्खा शेजारी जिवलग मित्र पूनम दुर्वे त्यावेळेस धारावी कुंभारवाड्यातून येथून टेक्सिने दादर तिथून लोकलने आणल्याचे स्मरणात आहे, सुमारे ५०/६० कुंड्यात वेगवेगळी गुलाबाची रोपे लावली होती त्याला रोज पाणी घालणे, खत घालणे, पाने खुरडणे, कीड असल्यास ती टूथब्रशच्या साहाय्याने घासून काढून रोगोर नावाचे औषध फवारायचे,  ह्यात मी बघून बघून तरबेज होत नंतर मी हेच काम करायला लागलो अन डोळ्यावर फांदी कापायची. या सगळ्याची फळे मिळण्यास सुमारे ६ महिने गेले की, मग काय एकेदिवशी सकाळी बघतो तर आख्खी गच्ची गुलाबाच्या फुलांनी डवरून गेलेली, 🤗झपकन वाटावे आपण काश्मिरात तर नाही ना ! इतका आनंद आमच्या घरातील प्रत्येकाला झाला होता. बरं तोडायची नाहीत पाकळ्या गळून गेल्या की व्यवस्थित पाहून तो भाग कापायचा. ते पाहायला डोंबिवलीकर सेलिब्रेटी यायचे. असं एक महिना सुरू राहीलं की. आणि एके दिवशी चक्क लहानशा मुलीने भल्या पहाटे डेरिंग करून ती गच्चीतील फुले हातात येतील तेव्हडी तोडली व पळाली ना शेजारच्या प्रतिभा दुर्वे काकीने सांगितले म्हणून कळले तरी.

मग मी दोन दिवसांनी घरातील कोणालाही न सांगता पहाटे उठून ती फुले व्यवस्थित कापून पिशवीत भरली आणि सकाळी बरोब्बर ७ वाजता डोंबिवली पूर्वेला रेल्वे तिकीट घराजवळ उभा राहून ती अंदाजे दोनशे गुलाबाची फुल दोन तासात विकून अभिमानाने घरी आलो.

अर्थातच समाचार झालाच कुठे गेला होतास वगैरे वगैरे…  माझे ऐकल्यावर मोठ्या भावाचा तिळपापड झाला खूप आरडाओरडा तुला अक्कल नाही दीडशहाणा आहेस ढुंगण घुवायची अक्कल नाही असो…..

त्यादिवशीच संध्याकाळी वडिलांपर्यंत बातमी आली आणि पुन्हा घरातच न्यायालय ना. त्यातून माझे वडील म्हणजे कै. कैलासचंद्र मेहता नामवंत कामगार कायदा तज्ज्ञ.

खरं म्हणजे त्यावेळेस परमपूज्य पिताश्रींसमोर बोलायचे म्हणजे चड्डीतच सुसू व्हायची ना! पण धीर एकवटून मी का ही फुलं विकली हे सांगावे लागले आणि काय सांगू तुम्हाला न्यायालयाचा निकाल चक्क माझ्या बाजूने लागला. वडिलांनी सांगितले त्याने कोणताही गुन्हा केला नाही उलट स्वावलंबाने व धाडसाने ही फुल विकली एरव्ही रोज फुकट जाण्यापेक्षा ती कोणाला कामाला आली मनोजच्या या कामाला माझ्याकडून पूर्ण परवानगी आहे. अशा प्रकारे मी गुलाबाची फुलं अभिमानाने विकू लागलो अगदी २५ पैसे, ५०पैसे, ते चक्क १ रूपायालाही विकायचो. ही गोष्ट १९७० ची हं. म्हणजे माझ्या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली गेली म्हणा ना. इतक्या लहानवयात लोकांशी आणि मुख्य म्हणजे बायकांशी कसे बोलावे याची रीतसर शिक्षणाची गुरुकिल्ली या मुक्तविद्यापीठातून शिकायला मिळाली. कोणतीही लज्जा न बाळगता ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे काम करू द्यावे / करावे या मताशी आजही मी पक्का ठाम आहे. माझ्या दोन्ही मुली आज त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात नाव कमवतात हे पाहून मन नक्कीच प्रफुल्लीत होते.

जसा गुलाबाचा मौसम तसे माझे मुक्त दुकान जोरात असायचे, नंतर माझ्या भावाला कळून चुकले की त्याने जे त्यावेळेस ५ हजार रुपये या गुलाबाच्या वेडापायी घातले होते ते मी मिळवून तर दिलेच पुन्हा व्याजही मिळू लागले. जितके मिळत होते ते सर्व सुपूर्द करून पुन्हा शाळा – अभ्यास – खेळ यात रमून जायचो. पण मला मात्र पैशाचा व्यवहार कधीच कळला नाही त्यामुळेच कदाचित मी आजही खूप सुखी आहे. थोडक्यात काय कोणतीही लाज न बाळगता आपल्या आवडीचे काम करा ते छोटे मोठे मी कसं करू लोकं काय म्हणतील याचा कधीही विचार करू नका. आपल्या मुलांना त्यांची आवड ओळखून मोकळीक द्यावी हे नक्की. आपल्या इच्छा मुलांवर लादू नये हे कळकळीचे सांगणे. मला कडक शिस्तीचे व माझ्यावर प्रेम करत नकळत संस्कार करणाऱ्या माझ्या वडिलांना भावाला माझा विनम्र प्रणाम व नमस्कार.💓🙏💓

(ही कथा आवडल्यास लेखकाच्या नावासह आणि कथेत कोणताही बदल न करता शेअर करण्यास हरकत नाही.)

© श्री मनोज मेहता

डोंबिवली  मो ९२२३४९५०४४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘परीक्षा…’ ☆ सुश्री शांभवी मंगेश जोशी ☆

सुश्री शांभवी मंगेश जोशी

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘‘परीक्षा…’ ☆ सुश्री शांभवी मंगेश जोशी 

दहाएक वर्षांपूर्वी सुप्रसिध्द सिनेदिग्दर्शक शेखर कपूर यांनी लिहिलेला एक ब्लॉग मला आठवतो. 

शेखर कपूर यांनी एक भारीतला ब्लॅकबेरी फोन अमेरिकेतून खरेदी केला होता आणि काही दिवसातच त्या ब्लॅकबेरी फोनचा काही तरी टेक्निकल लोच्या झाला. आता आली पंचाईत. त्या काळात ब्लॅकबेरीची सर्व्हिस सेंटर नव्हती. अनेक मोठया दुकानात शेखर कपूरने आपला फोन दाखवला पण सगळयांनी हात वर केले. हा फोन आता अमेरिकेला कुरियरने पाठवावा लागेल आणि दुरुस्ती करता कदाचित तीसेक हजार खर्च येईल, असा सल्ला काही हायफाय एसी मोबाईल सर्विस सेंटरने दिला. डायरेक्टर साहेब तर हादरुनच गेले. ब्लॅकबेरी घेण्याचा गाढवपणा केलाच आहे तर आणखी एक गाढवपणा करुया म्हणून एकेदिवशी त्यांनी आपली कार जुहू मार्केटच्या रस्त्यावरल्या एका टपरीवजा दुकानासमोर थांबवली.

दुकानावर अस्खलित इंग्रजीत “Cellphoon reapars” अशी पाटी लिहिली होती. तरीही धाडसाने शेखर कपूर दुकानाकडे आले. त्या कळकट दुकानात हाडकुळासा ११-१२ वर्षाचा पोर मळकट, फाटकी जीन्स आणि टीशर्ट घालून उभा होता. “ ब्लॅकबेरी ठीक कर पावोगे?,” कपूर साहेबांनी त्या पोराला अविश्वासाने विचारले. 

“ बिलकुल.. क्यों नहीं,” तो फाटका पोरगा आत्मविश्वासाने म्हणाला. तो ११-१२ वर्षाचा पोर आणि त्याचा १८-१९ वर्षाचा मोठा भाऊ या दोघांनी मिळून ब्लॅकबेरीचा खराब झालेला पार्ट बदलला आणि अवघ्या पाच सहा मिनिटात फोन ठीक करुन दिला. 

“ कितना देना है ?”

“पाचसो.”

आठवडाभर वाट पाहणे आणि तीस हजाराच्या तुलनेत ही फारच छोटी रक्कम होती. त्यांनी पटदिशी पाचशेची नोट त्या पोराच्या हातात ठेवली. शेखर कपूर आपला फोन घेऊन निघत असताना आपल्या विस्कटलेल्या केसांवर हात फिरवत तो पोरगा म्हणाला, “सरजी, ब्लॅकबेरी इस्तेमाल करना है तो हाथ साफसुथरे होने चाहिये. गंदे हाथसे इस्तेमाल करोगे तो ये प्रॉब्लेम आ सकता है.” ज्यानं कदाचित मागच्या पूर्ण आठवडाभर आंघोळ केली असावी की नसावी, असा संशय यावा, असा तो फाटका पोर कपूर साहेबांना सांगत होता.

शेखर कपूर लिहितात, “ही एवढीशी फाटकी पोरं जगातील कोणतंही आधुनिक तंत्रज्ञान अवगत कसं करतात ? मला त्यांच्या डोळयांत माझ्या देशाचं भविष्य दिसत होतं. या पोरांची ही क्षमता विकसित केली पाहिजे, मला जाणवलं. ‘साहेब फोन वापरण्यापूर्वी हात स्वच्छ धुत चला’, तो पोरगा पुन्हा एकदा म्हणाला. आणि मला माझे हात खरोखरच खूप अस्वच्छ वाटू लागले.” 

तुमच्या बरबटलेल्या हातांनी तुम्ही कसं नापास करणार या पोरांना?

 जगण्याच्या भरधाव रस्त्यावरली प्रत्येक परीक्षा ही पोरं लिलया पार करताहेत. या पोरांची कोणती परीक्षा घेणार तुम्ही? कोणत्या परीक्षेच्या तराजूत त्यांना तोलणार? 

मुळात बुध्दिमत्ता म्हणजे काय, हे आपल्याला तरी कुठं नीटसं कळलंय. 

दोन प्रकारच्या बुध्दिमत्तेपासून एकशे ऐंशी प्रकारच्या बुध्दिमत्तेपर्यंत मानसशास्त्रज्ञ चकरा मारताहेत. आता तर तुमच्या निव्वळ बुध्दयांकापेक्षा भावनिक बुध्दिमत्ता अधिक महत्वाचा आहे, हे सर्व मानसशास्त्रज्ञ सांगू लागले आहेत. म्हणजे तुमच्या कोणत्याही परीक्षेतील मार्कांपेक्षा तुमचं स्वतःवरील नियंत्रण, तुमची विश्वासार्हता, कर्तव्यनिष्ठा, लवचिकता आणि कल्पकता ही अधिक महत्वाची असते कारण या साऱ्यांची गोळाबेरीज म्हणजे तुमची भावनिक बुध्दिमत्ता आहे. मानवी बुध्दिमत्ता स्वतःला कोंडून घेत नाही,खडक फोडून वाहणाऱ्या झऱ्यासारखी ती स्वतःसाठी असंख्य रस्ते तयार करते, मल्टिपल ऑप्शन्स! आणि आपण लाखो रुपये खर्च करुन पोरांना महागडया शाळेत घालतोय, वर त्यांना तेवढ्याच महागडया टयुशन्स लावतोय. पण आपण त्यांचे हात मळू देत नाही, त्यांना या अनवट रस्त्यावरुन ऊन, वारा, पावसात बेडर होऊन चालू द्यायला नाही. आपल्याला पहिल्या प्रयत्नात सारं काही हवंय, आपण त्यांना चुकू देखील द्यायला तयार नाही म्हणून तर आपली पोरं चांगलं पॅकेज मिळवताहेत पण ती एडीसनच्या चुका करत नाहीत, त्यांच्या कुंडलीत ‘युरेका योग’ नाही. आपण त्यांचा नारायण नागबळी विधी केव्हाच उरकलाय.

मन, मनगट आणि मेंदूचं नातं आपण विसरुन गेलोय. ज्ञानाचा प्रत्येक क्षण, प्रत्येक कण हा साक्षात्कार असतो पण तो आपण पोरांना इस्टंट देऊ पाहतोय, आयता, शिजवलेला. पोरांना तो पचत नाही कारण तो त्यांनी शोधलेला नाही. लालासारखी पोरं, डाव्या हातचा मळ असावा तसं ब्लॅकबेरी काय आणि आणखी कोणता फोन काय, त्याचं मर्म आत्मसात करणारी पोरं, जगणं ‘ एक्सप्लोअर’ करताहेत, जगण्याला प्रत्यक्ष भिडताहेत म्हणून *त्यांच्यात भवतालाबद्दलची आंतरिक समज निर्माण होतेय. आम्हाला ती कळत नाही, हा या पोरांचा दोष नाही. त्यांना मोजायला आपल्याकडं माप नाही, आपली फूटपट्टी मोडून पडलीय आणि नापासाचे शिक्के आपण त्यांच्यावर मारतोय. त्यांना पुन्हा पुन्हा ‘ दहावी फ’ च्या वर्गात बसवतोय कारण आपली सगळी सो कॉल्ड मेरिटोरियस पोरं ‘अ’ तुकडीत बसलीत. हातात नापासाची मार्कलिस्ट घेऊन नाऊमेद झालेली ही सारी पोरं, हे सारे लाला, भीमा, जब्या, नौशाद, जॉर्ज सारे भांबावून गेलेत. परवा दहावीचा निकाल लागला तेव्हा या साऱ्यांसाठी मी फेसबुकवर लिहलं होतं –

“ कोणतंही बोर्ड, कोणतीही परीक्षा तुम्हाला तोपर्यंत नापास करु शकत नाही जोवर तुम्ही स्वतःला नापास करत नाही. परीक्षेच्या फुटपट्टीने मोजावे, एवढे तुम्ही किरकोळ नाही आहात 

दोस्तहो …तेव्हा सर्व सो कॉल्ड नापास लोक हो, चिल …एकदम चिल! खरी परीक्षा वेगळीच आहे, तिथले विषय पण एकदम हटके आहेत… खोटं वाटत असेल तर दहावी बारावीला गटांगळया खाणाऱ्या नागराज मंजुळे, सचिन तेंडुलकर वगैरे मंडळींना विचारा …तुम्हांला ही लै मोठी नावं वाटतील पण अशी मंडळी तुम्हांला प्रत्येक गल्लीबोळात भेटतील जी बोर्डाची परीक्षा नापास झाले पण खऱ्याखुऱ्या परीक्षेत बोर्डात आले …

तेव्हा त्या परीक्षेची तयारी करा …!”

© सौ. शांभवी मंगेश जोशी

संपर्क – सुमन फेज 4, धर्माधिकारी मळा, एस्सार पेट्रोल पंपामागे, सावेडी, अहमदनगर 414003

फोन नं. 9673268040, [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ऐका गोष्ट बाराची… लेखक : अज्ञात ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆

?  वाचताना वेचलेले  ? 

ऐका गोष्ट बाराची — लेखक : अज्ञात ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆

12/12/12/12/12

बारा हा प्रिय अंक…

मोजण्यासाठी द्वादशमान

पध्दती…१२ची

फूट म्हणजे १२ इंच

एक डझन म्हणजे १२ नग.

वर्षाचे महिने १२,

नवग्रहांच्या राशी १२

गुरू,शनी, मंगळ हानिकारक समजले जातात….१२ वे

तप….१२ वर्षाचे,

गुरुगृही अध्ययन….१२ वर्षे

घड्याळात आकडे…..१२,

दिवसाचे तास …..१२,

रात्रीचे तास …..१२ ,

मध्यरात्र म्हणजे रात्रीचे..१२

मध्यान्ह म्हणजे दुपारचे..१२

एखादी गोष्ट तुटली फुटली म्हणजे तिचे वाजले….१२

सकाळच्या बाजारात उरला सुरला माल १२ च्या भावात काढतात..

पूर्वी मुलीचा विवाह १२ व्या वर्षी करत..

इंग्लंडमध्ये १२ पेन्सचा १ शिलिंग

बाळाचे नामकरण १२ व्या दिवशी केले जाते

मृत व्यक्तीचे धार्मिक विधीही १२ दिवसांचे..

बलुतेदार,बारभाई,बारावाटा…सगळे १२,

बेरकी माणूस म्हणजे

१२ गावचं पाणी प्यायलेला

तसेच कोणाचेही न ऐकणारी रगेल व रंगेल व्यक्तीला १२ चा आहे असे म्हणतात.

ज्योतिर्लिंग…..१२ आहेत,

कृष्ण जन्म….रात्री १२

राम जन्म दुपारी…१२ ,

मराठी भाषेत स्वर…१२

त्याला म्हणतात…बाराखडी

१२ गावचा मुखीया,

जमिनीचा उतारा ७/१२चा

इंजिनिअरींग, मेडीकल, किंवा ईतर कोर्सेससाठी १२ वी नंतर प्रवेश

खायापिया कुछ नही , गिलास फोडा बाराना

बारडोलीचा सत्याग्रह

पळून गेला ——पो’बारा’

पुन्हा पुन्हा ——-दो’बारा’

एक गाव, १२ भानगडी

लग्न वऱ्हाडी ——— ‘बारा’ती

१२ जुलै १९६१ ला पानशेत धरण फुटले होते

आणि एक राहिलेच … १२ म्हणजे ” आता जाऊ द्या ना घरी ” असे म्हणण्याची वेळ.

अशी आहे ही १२ चीं किमया….

सर्वात महत्त्वाचे…

*MH12 अर्थात ……पुणे………….

संग्राहक : श्री माधव केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ युगंधरा–स्त्री शक्ती… ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆

प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

🌸 विविधा 🌸

☆ युगंधरा–स्त्री शक्ती ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

युगंधरा स्त्री शक्ती अनादी, अनंत !

किती युगे, किती वर्षे लोटली !  तरी मी आजतागायत आहे, तशीच आहे. कीती उन्हाळे, कीती पावसाळे, कीती ऋतु किती वर्षे, माझ्या पद स्पर्शाने तुडवली गेली, ते  मलाच माहीत ! पण मी आहे  तशीच आहे, तिथंच आहे !

परिवर्तने  बरीच झाली, किती तरी युगे, काळ रात्री शृंगारात  गप्प झाली, पण माझ मूळ रूप  हा स्थायी भाव झाला, आहे आणी तो तसाच राहणार ही काळ्या दगडावरची रेघ !

मी कुठे नाही ? जगात कुठल्याही प्रांतात जा मी असणारच. तिन्ही काळ अष्टौप्रहर माझं अस्तित्व आहेच की. माझ्या शिवाय ह्या जगाचे सुद्धा पान इकडचे तिकडे होणार नाही !

देवादिकांच्या काळापासून माझं अस्तित्व मी पुढे पुढे नेत आहे. संख्याच्या प्रकृती सिद्धांता पासूनच ! त्यांच पण सदैव साकडं माझ्या पुढेच! मी त्यांचा बऱ्याच वेळा उद्धार केला. आज पण मी च सर्व मानवाचच नाहीतर, सर्व सृष्टीतील

सर्व प्राणी पशु पक्षी जीवजंतु यांचं पण पोषण करतेय ! किंबहुना मीच सृष्टी आहे. जगातील  सर्व घटकावर माझीच नजर असते  !

मला कोण आदिमाता म्हणतात, तर कोणी मोहमाया, तर कोणी आदिशक्ती, तर कोणी प्रकृती  ! माझं कार्य हे मी कधीच बदलेल नाही, बदलणार नाही, हे त्रिवार सत्य.

मी च ती “त्रिगुणात्मक” सृजनशील शक्ती. मी सृष्टी ! मी धरा, मी मेदिनी मी च पृथा !  “मी माता, ”  मी अनेक प्रकारची “माती”  मी स्त्री !, मी प्रजनन करणारी !. पालन, पोषण संगोपन, करणारी ! मी जीवसृष्टीची  निर्माती, मी  

“माता ते मी माती”  पुर्णस्वरूप जगत्रय जननी ! विश्व दर्शन ! देणारी. तमोगुणी असलेतरी, दीप, पणती उजळणारी ज्ञानाची ज्योत !

हो पण माझ्या काही सवयी आहेत, त्या मी पुर्ण करून घेण्यासाठी सर्व काही क्लुप्त्या वापरते. मी च हट्ट पुरवून घेणार ना ?

कोण नाही हो मी ? ऋतुनुसार माझे रूप पालटले जातात. मी प्रत्येक ऋतूत निराळीच असते. माझं सौंदर्य हेच माझं अस्त्र, माझ्या शिवाय तुमच्या जगण्यात पूर्णत्व येत नाही !

मी साज शृंगारा शिवाय राहू शकत नाही. मी च तर करणार ना  साज शृंगार तो माझा निसर्गदत्त अधिकार !  मी अवखळ  कन्या, तरुणी, कल्याणी, प्रेमिका, अभिसरीका, मी भार्या, मी च ती, सर्व हट्ट पुरवुन घेणारी तो ही अगदी सहज पणे ! 

मी साज, मी दागिना, नटणे, लाजणे, मुरडणे, नखरा करणे. मनमुरादपणे हौस करून घेणारी.  स्वर्गातील अप्सरा रंभा मेनका  उर्वशी हे माझेच पूर्वज ना ! माझेच रूप ना?

मी च “सांख्य तत्वाची” प्रकृती !   जड, अचेतन त्रिगुणात्मक, मोहमयी, गुढ, आगम्य, सर्वव्यापी, बीजस्वरूप कारण, मी सर्वत्र एकच आहे ! स्वतंत्र स्वयंभु पण निष्क्रिय !

मी कोण ! अस का वाटत तुम्हाला  ?   मी फुलात, पानात, फळात आहेच की. सुगंधच माझी ओळख.

विविध  रंगाच्या  आकाराची, फुले त्यांचं विविध गंध, वर्ण त्यांची झळाळी, हिरव्यागार झाडात वेलीत, त्यांचं मनमोहक रूप, तरीपण निष्क्रिय !   माझे अस्तीत्व मृदुमुलायम स्पर्शात, कोकिळेच्या कंठात, पौर्णिमेच्या शीतल चांदण्यात, गायीच्या हंबरण्यात, मयुर केकात ! 

आजचे माझे अस्तित्व, काळानुसार  जरी सुधारले असले तरी, मी सगळीकडे आहेच की, माझा पोशाख माझं राहणीमान माझ्यातल परिवर्तनाचाच भाग आहे.

मुळात माझ्याकडे निसर्गाने जी दैवी शक्ती दिली आहे, तीच आदिशक्तीचे अधिष्ठान आहे. अधिक जबाबदारी निसर्गाने घालून दिली.

म्हणूनच देवादिकांच्या पासुन ते आजच्या मानवापर्यंत माझी स्तुती चालत आली आहे.

।।  दुर्गे दुर्घटभरी तुझं वीण संसारी

 अनाथ नाथे आंबे करुणा विस्तारी ।।

।। वारी वारी जन्म मरणा ते वारी

हरी पडलो आता संकट निवारी ।।

अशी आरती करून तुम्ही माझ्या स्त्रीत्वाचा सत्कार आक्ख जग अजुनी करतच की !

अनादी अनंत चार युगे उलटली !  महिला आहे, म्हणुनच जग आहे, हे खरं  !  जगाला आजच का सजगता आली, स्त्री केव्हा पासुन पूजनीय वाटु लागली  ? पुर्वी ती पूजनीय नव्हती का ? चाली रूढी परंपरा ही तर भारतीय संस्कृती. विसरलात का !  मग आजच नारीचा नारीशक्तीचा डांगोरा पिटण्यात, कुठला पुरुषार्थ  आला बुवा ?

पाश्चात्य संस्कृतीचे अंध अनुकरण का ? पूर्वी इतकी स्त्री पुज्यनिय आता आहे असं वाटत नाही का ? बिलकुल नाही, पूर्वी जेवढी स्त्री पुजनिय होती, तेवढी आता नाही ! होय मी ह्या विधानाचा समर्थन करतोय.

“यात्र  नार्यस्तु पुज्यन्नते रमंते ”   ह्या विधानात सर्व काही आले, व ते खरे केले. पुरुष प्रधान संस्कृतीच आत्ता ज्यास्त फोफावली आहे हे लक्ष्यात ठेवा. बस म्हटले की बसणारी उठ म्हटले की उठणारी स्त्री म्हणजे  हातातील खेळणं आहे असं वाटत काय ?

हल्ली काळा नुसार सोई सुविधांचा वापर करणे इष्टच, कारण ती गरज आहे, गरज शोधाची जननी ! काळ बदलला नारी घरा बाहेर पडली कारण परिस्थितीच तशी चालुन आली. एकाच्या कमाई वर भागात नाही म्हणुन, प्रत्येक क्षेत्रात ती उतरली. व ते साध्य साधन करून दाखवत, ती सामोरा गेली व उभी राहिली. ती साक्षर झाली, मिळवती झाली, अर्थ कारण हा पुरुषर्थ तिने सहज साध्य केला. अस जरी असलं तरी तिच्या मागच  चुल मुलं बाळंतपण पाळणा ह्या गोष्टी परत आल्याच ! त्या पण साध्य केल्या, हे त्रिवार सत्य !

पुर्वीच्या काळात ही परिस्थितीला अनुसरून महिलांनी घर खर्चाला आधार कैक पटीने ज्यास्त दिला ! आठवा त्या गोष्टी, पिठाची  गिरणी नव्हती हाताने दळणकांडणच काय घरातील जनावरांचा पालन पोषण, गाय म्हैस बकरी इत्यादीच धारा, चारा पाणी, इत्यादी करून दुध दुभत त्या विकुन घरार्थ चालवीत होत्या अजुनी खेड्यात ही प्रथा चालु आहेच. जोडीला शेती कामात पण स्त्रिया मागे नव्हत्याच ! आता ही नाहीत.

मथुरा असो की द्वारका तिथं पण हे वरील सर्व व्यवहार सुरळीत चालु होतेच की, नुसतं गौळण श्रीकृष्ण राधा, रासक्रीडा काव्यात जे मांडतो ते, तिथं अस्तित्वात होतच ना ? कपोलकल्पित गोष्टी नाहीतच ह्या. स्त्रीया पुरुषा बरोबरीने अंग मेहनत करत त्या अर्थार्जन करत होत्या !!!

लग्न झालेली नवं वधु तिचे आगमन, तिच्या हाताचे पायाचे कुंकवाचे ठसे, जोडीने केलेली पुजा, असो वा कुलदैवत दर्शन, असो  मंगळागौर असो किंवा डोहाळ  जेवण इत्यादि गोष्टी ह्या, स्त्री जन्माला आलेला मानपानच होता. गौरवच  सत्कार  होता ना !  प्रत्येक गोष्टीत तिचा पुढाकार हा महिला दिनच होता ना !

सावित्री, रमा, जिजाऊ, कित्तूर राणी चांनाम्मा, झाशीची राणी ह्या सर्व लढाऊ बाण्याची प्रतीक च होती ना ?

काळ बदलला आस्थापना कार्यशैली बदलली. युग नवं परीवर्तन घेऊन आलं. नवं कार्याचा भाग पण बदलला तरी स्त्री आजुनी खम्बीर आहे. कामाचा व्याप क्षेत्र बदलले. पूर्वीपेक्षा अत्याचार बलात्कार गर्भपात मात्र दिवसा गणिक वाढते आहे !  पूर्वी पेक्ष्या नारी सुरक्षित आहे का ?

कारण स्पष्टच, चित्रपट टेली व्हिजन येणाऱ्या मालिका, चंगळवाद यांनी मनोवृत्ती बिघडली आहे.

महिला दिनाच्या निमित्ताने नारी संघटित होऊ पाहत आहे, पूर्वीही संघटीत होत्या, नाही असे नाही तरीपण आज मात्र ही काळाची गरज आहे ! 

तिच्या अस्मितेची लढाई अजून चालू आहे. प्रत्येक क्षेत्रांत स्त्री आहे, घर कुटुंबा पासून ते सैन्य भरती पर्यंत ! मजल दरमजल करत ती पुढे पुढे जात आहे

अलिकडेच खेडे गावात राहणारी राहीबाई पोपोरे पासून ते कल्पना चावला पर्यंत  !  अशी कित्येक उदाहरणे देता येतील. प्रत्येक क्षेत्रात स्वतःच्याअस्मितेवर तिने आघाडी घेतली आहेच. कोणतंही क्षेत्र तिने सोडलं नाही ! तरीपण कैक पटीने ती तीच अस्तिव सिद्ध करत आहे. स्त्री जीन पॅन्ट घालो अगर नऊ वारी सहा वारी साडीत असो, मातृत्वाची जबाबदारी खांद्यावर घेतलीच ना ? गरीब असो वा श्रीमंत, घरात असो वा कार्यालयात तिला मुलाप्रति जिव्हाळा हा तसूभरही कमी झाला आहे का ?

साक्षात भगवान शंकरांनीही पर्वतीकडे भिक्षा मागितलीच ना.

।। अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर   प्राण वल्लभे ।।

ज्ञान वैराग्य सिद्धर्थम भिक्ष्यां देही च पार्वती ।।

बघा हं गम्मत साक्षात भगवान शंकर, पार्वती कडे भिक्षा मागतात !

काय म्हणतात हो ?

अन्नपूर्णे मला ज्ञान आणि वैराग्यासाठी भिक्षा घाल ! भुकेसाठी ? हो भूक ही नुसती पोटाची नसते बर का ! खर  ज्ञान मिळण्यासाठी ! भूक पण अनेक प्रकारची असतेच की! वैराग्य प्राप्तीसाठी पण !  वैराग्य केव्हा प्राप्त होत ?  तर विश्व दर्शन झाल्यावर. ही झाली देवादिकांची कथा त्यापुढे मानवाचे काय ? स्त्री शक्ती ही कालातीत आहे. असे असूनही तिच्यावरचे बलात्कार, स्त्रिभुण हत्या का थांबत नाहीत ?

© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी

ज्येष्ठ कवी लेखक

नसलापुर  बेळगाव

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares