मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “मास्टरपीस” -लेखिका : सुश्री ज्योती रानडे ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलू साबणे जोशी

??

☆ “मास्टरपीस” -लेखिका : सुश्री ज्योती रानडे ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

मी काही कामानिमित्त बॅास्टनला गेले होते. काम झाल्यावर जवळच्या एका मॅालमधे जेवायला गेले. तिथे दहा पंधरा प्रकारची वेगवेगळी रेस्टॅारंटस् होती. सगळे प्रकार बघून मी शाकाहारी असल्याने भारतीय जेवणच घ्यायचं ठरवलं. भात व पालक-दाल घेऊन तिथल्या टेबलावर बसले. आजूबाजूला अनेक भाषा, अनेक रंग, अनेक पेहराव, अनेक मूड असलेले सर्व वयाचे लोक होते. 

माझ्या टेबलाच्या अगदी शेजारच्या टेबलवर एक आई व दोन मुली बसल्या होत्या. आईने डोक्याला हिजाब गुंडाळला होता पण बारा आणि दहा वर्षाच्या मुलींनी हिजाब न घालता काळ्या केसांची एक वेणी घातली होती. त्या वेणीला वर आणि खाली चकचकीत फुलाचे रबरबॅंडस लावले होते. आईच्या कपड्यांवरून व भाषेवरून ते कुटुंब इराकचे असावे असे वाटत होते. त्या दोन मुलींनी काय पुण्य केले म्हणून त्यांची इराक मधून सुटका झाली असे वाटले. तिथे या मुली अन्यायाखाली दबून गेल्या असत्या. बायकांना अत्यंत कनिष्ठ दर्जा देणाऱ्या इराकमधे १८ व्या वर्षी त्यांचे लग्न उरकून त्यांच्यावर अत्याचार पण झाले असते. पिंजऱ्यातून सुटलेल्या पक्षासारख्या त्या तिथे बागडत होत्या. त्या आईच्या चेहऱ्यावर मात्र अत्याचार सहन केलेल्या अनेक रेषा दिसत होत्या. Nike कंपनीनं हल्ली हिजाब बनवून विकायला सुरूवात केली आहे म्हणून त्या आईने Nike चा हिजाब घातला होता. “आम्ही तुझ्याबरोबर आहोत” हे Nike सारख्या मोठ्या कंपनीनं सांगितल्या सारखे होतं ते! मला Nike कंपनीचे हिजाब बनवण्यासाठी मनापासून कौतुक वाटले.  

त्या पुढच्या टेबलावर एक भारतीय कुटुंब बसले होते.  त्यांचा १२ वर्षाच्या मुलगा कसाबसा चालत होता. त्याच्या डोळ्याला अत्यंत जाड चष्मा होता. वडील जेवण घेऊन आले पण ते मुलाशी फारसे बोलत नव्हते. आई मात्र कौतुकाने तिच्या लेकराशी गप्पा मारत त्याला भरवत होती. त्या मातृत्वापुढे माझी मान आदराने झुकली. काय काय सहन केलं असेल त्या माऊलीने! आपल्या बाळानं जगातलं सर्व यश मिळवावं हे चिंतणाऱ्या आईला आपला मुलगा आपल्या हाताने जेऊ शकत नाही..चालू शकत नाही हे पाहतांना काय यातना झाल्या असतील? ते दु:ख गिळून कोणाचीही पर्वा न करता ती आई लेकराला भरवताना बघून देवानं आई का निर्माण केली हे परत एकदा कळलं. 

त्याच्या शेजारच्या टेबलावर एक अमेरिकन कुटूंब बसलं होतं. त्यांनाही १३-१४ वर्षांचा मुलगा व ८-१० वर्षांची मुलगी होती. दोघं उंच व बाळसेदार होते. भरपूर खरेदी केल्याने बरोबर अनेक बॅगा होत्या. अत्यंत सुबत्तेत वाढणाऱ्या या मुलांना कसं कळेल की जगात लहानशी गोष्ट मिळावी म्हणून काहींना भगीरथ प्रयत्न करावे लागतात ते! पण तो त्यांचा दोष नाही. ते त्यांचं नशीब होतं. गदिमा नाही का म्हणाले..

घटाघटांचे रूप आगळे। प्रत्येकाचे दैव वेगळे..॥

मुखी कुणाच्या पडते लोणी कुणा मुखी अंगार ॥

चौथं टेबल होतं माझं ! भारतातल्या मिरजेसारख्या लहान गावातून अमेरिकेत आलेली मी भारतातच रहात असते तर कशी घडले असते? परक्या देशात येऊन इथले रितीरिवाज शिकून या देशांतल्या चांगल्या गोष्टी व भारतातल्या चांगल्या गोष्टी याची सांगड मला व माझ्या नवऱ्याला घालता आली का? मुलं आमच्या परीने आम्ही उत्तम वाढवली. त्यांचं कॅालेज, नोकरी, लग्न होऊन सेटल झालेलं बघताना खूप समाधान आहे पण काही करायचं राहिलं का हा प्रश्न मान वर करतोच! 

या विचारांच्या भोवऱ्यात मी खोलात जात असताना समोर एक गोष्ट घडली. इराकी मुलीचा बॅाल त्या भारतीय मुलाकडे गेला. त्याने तो पायाने ढकलला. पुढच्या वेळी तो बॅाल त्या अमेरिकन मुलाकडे गेला. त्याने तो झेलला व परत तिच्याकडे टाकला. धाकटीला तो झेलता आला नाही. त्याने तिला कसा झेलायचा दाखवले. “To me..” तो भारतीय मुलगा म्हणाला. त्याच्या पायातून तो बॅाल घरंगळत पलिकडे बसलेल्या कृष्णवर्णीय मुलीकडे गेला. तिने तो परत त्या मुलीकडे टाकला व त्यांचा खेळ सुरू झाला. ती मुलं एकमेकांकडे बॅाल टाकून खेळत असताना हळूहळू तुझं नाव, गाव, इयत्ता काय वगैरे देवाण घेवाण झाली. एका लहानशा बॅालने जात, धर्म, भाषा, देशाच्या सीमा ओलांडून मैत्री घडवून आणली जे भल्या भल्या राजकारण्यांना हजार वेळा भेटून जमत नाही. 

तेवढ्यात तिथे एक विदूषक आलेला बघून ही मुलं घाईने त्याच्याभोवती गोळा  होऊ लागली. इराकी मुलीनं भारतीय मुलाचा हात धरला व त्याच्या आईला विचारलं,” Can I take him to see the show?” आईने कौतुकाने हो म्हटलं. मुलाच्या डोळ्यात उत्साह मावत नव्हता. त्याने तिचा हात धरला व तो तिरकी पावलं कष्टाने पण उत्साहाने टाकत त्या विदूषकाजवळ गेला. त्याचे बाबा घाईने त्याला आधार द्यायला उठले पण आई म्हणाली, “Let him go!” तिचा मुलाला सुटा करण्याचा प्रयत्न बघून मी मनात टाळ्या वाजवल्या. 

विदूषक त्यांना डोळ्यात पाणी येईपर्यंत हसवत होता आणि ते वेगवेगळ्या संस्कृतीचं, रंगांचं, भाषांचं, देशांचे सुंदर चित्र निरोगी व अपंग या मर्यादा ओलांडून एक मास्टरपीस बनून माझ्यासमोर उभं होतं. माझ्या हातात जवळच्या Museum of Fine Arts ची तिकीटं होती पण तिथे काय दिसेल असं चित्र इथे बघताना अंगावर काटा आला.  

ते सुंदर चित्र माझ्या कॅमेऱ्यात पकडताना वाटलं..

पंछी, नदिया, पवन के झोंके, कोई सरहद ना इन्हें रोके

बदलून 

पंछी, नदिया, बच्चे, और पवन के झोंके…

असं करावं. 

मुलांकडून मोठ्यांनी हे शिकायला हवं. सतत बॅार्डरवर युध्द करणाऱ्यांनी तर नक्कीच शिकलं पाहिजे ! मग ते भारत-पाकिस्तान असो, रशिया-युक्रेन असो नाहीतर इस्त्राईल-हमास असो..माणूसकी, दया आणि प्रेम यांनी बनवलेला बॅाल मोठे एकमेकांकडे का नाही टाकू शकत? त्यांना एकमेकांकडे बॅाम्बच का टाकावेसे वाटतात? 

जग मुलांकडे बघून मैत्रीचा हात पुढे करायला कधी शिकेल का?

लेखिका : ©® ज्योती रानडे

(खरी घडलेली घटना आहे. काल्पनिक नाही.) 

प्रस्तुती : सुश्री सुलू साबणे जोशी. 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मधुराधिपती !!! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

मधुराधिपती !!! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

मधमाशांनी फुलांच्या हृदयातून जणू अमृतच शोषलं आणि त्यांच्या जगण्यासाठी एकत्रित करून ठेवलं. मानवाला हा पदार्थ चाखायला मिळाला आणि त्याची चव त्याला क्षुधेच्या कल्लोळातही परमोच्च सुखाची अनुभूती देऊन गेली. या पदार्थाची गोडी शब्दाने वर्णन करणं खूप कठीण होतं. पण त्याला नाव तर दिलंच पाहिजे…मध !  हा मध म्हणजेच मधु…मूळच्या मेलिट शब्दापासून सुरूवात करून नंतर मेलिस आणि मेल आणि नंतर संस्कृतात मधु नाव प्राप्त झालेला पदार्थ. यापासून मधुर आणि माधुर्य शब्द ओघळले…मधाच्या पोळ्यातून गोडवा पाझरावा तसे ……  

गोडी केवळ जिभेलाच कळते असं नाही….गोडवा सबंध देहालाही तृप्तीचा अनुभव देऊ शकतो ! पण गोडवा, माधुर्य देणारा हा पदार्थ सर्वांगानं गोड असावा मात्र लागतो ! असं मधासारखं सर्वांगानं मधुर असणारं सबंध जगात कोण आहे? ……  

…. श्री वल्लभाचार्यांना श्रीकृष्ण तसे दिसले… मधासारखे …. नव्हे त्यांच्या आत्म्याच्या जिव्हेने श्रीकृष्ण भगवंताच्या सगुण साकार रुपाची गोडी अगदी सर्वांगानं भोगली…आणि त्यांचे शब्दही मधुर झाले !!!! 

आणि लेखणीतून उतरले एक सुंदर मधुराष्टकम् ……

अधरं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरम् ।

हृदयं मधुरं गमनं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥१॥

*

वचनं मधुरं चरितं मधुरं वसनं मधुरं वलितं मधुरम् ।

चलितं मधुरं भ्रमितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥२॥

*

वेणुर्मधुरो रेणुर्मधुर: पाणिर्मधुर: पादौ मधुरौ ।

नृत्यं मधुरं सख्यं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥३॥

*

गीतं मधुरं पीतं मधुरं भुक्तं मधुरं सुप्तं मधुरम् ।

रुपं मधुरं तिलकं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥४॥

*

रणं मधुरं तरणं मधुरं हरणं मधुरं रमणं मधुरम् ।

वमितं मधुरं शमितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥५॥

*

गुञ्जा मधुरा माला मधुरा यमुना मधुरा वीची मधुरा ।

सलिलं मधुरं कमलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥६॥

*

गोपी मधुरा लीला मधुरा युक्तं मधुरं मुक्तं मधुरम् ।

दृष्टं मधुरं शिष्टं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥७॥

*

गोपा मधुरा गावो मधुरा यष्टिर्मधुरा सृष्टिर्मधुरा ।

दलितं मधुरं फलितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥८॥

*

इति श्रीमद्वल्लभाचार्यकृतं मधुराष्टकं सम्पूर्णम् ।

…… सगुण भक्तीचा गोडवा हाच की आपल्याला देह देणा-या देवाचा देह त्याला गोड भासतो…देवाच्या प्रत्येक कृतीत असणारा  माधुर्याचा दरवळ त्याला भावविभोर करतो. 

ज्याचं वर्णन करू पाहतो आहे ते स्वत:च माधुर्याचे जन्मदाते…निर्माते…स्वामी अर्थात अधिपती आहेत…मधुराधिपती ! 

ओठ ! .. कमळाच्या दोन पाकळ्या एकमेकींपासून विलग होण्यापूर्वी जशा एकमेकींवर अलगद स्थिरावलेल्या असतात ना अगदी तसेच ओठ…मधुर ! हे ओठ जेंव्हा त्या बासरीवर विसावतात ना तेंव्हा त्यातून निघणारा उच्छवासाचा हुंकार अतिगोड…कानांना पुरतं तृप्त करून पुढे शरीरभर पसरत जाणारा. .. …. आणि हे ओठ ज्या मुखकमलावर विराजमान आहेत ते मुख तर मधुर आहेच….किती गोडवा आहे त्या सबंध मुखावर ! …. आणि या मुखावरचे ते दोन नेत्रद्वय….मधुर आहेत…अपार माया स्रवणारे…पाहणा-याच्या डोळ्यांत नवी सृष्टी जागवणारे. सगळंच मधुरच आहे की माझ्या या देवाचं ! 

आणि ओठ,डोळे एकमेकांच्या हातात हात घालून त्या मुखावर ज्याची गोड पखरण करतात ते हास्य तर माधुर्याची परिसीमाच ! 

मग हृदय ते कसं असेल….मधुरच असणार ना? देवकीच्या गर्भात आकाराला आलेल्या आणि यशोदा नावाच्या प्रेमाच्या झाडाखाली वयाचा उंबरठा ओलांडून वाढत असलेल्या या कृष्णदेहातलं हृदय तर जणू मधाचं पोळं..गाभाच मधुर !   

या माधवाचं ..  या मधुसूदनाचं चालणं आणि त्या चालण्याची गती किती गोड आहे…या गतीमध्ये एक मार्दव भरून उरलं आहे…त्याच्या चरणांखालची माती कस्तुरीचं लेणं लेऊन मंद घमघमत असावी….भक्त हीच माती कपाळी रेखातात ती काय विनाकारण? 

मधुर ओठांतून शब्दांच्या मोगरकळ्या वातावरणात अवतरतात त्या अर्थातच गोडव्याची शाल पांघरून.. . देवाचं चरित्र तर काय वर्णावं…भगवंतांच्या जगण्यातला एकेक क्षण मधुर चरित्र आणि चारित्र्याचं मुर्तिमंत दर्शन… त्यांनी देहावर पांघरलेल्या वस्त्रातील धागे किती दैववान असतील. त्या धाग्यांनी त्या पीतरंगी वस्त्राला..पीतांबराला जणू गोडव्यात न्हाऊ घातलं आहे. 

भगवंतांनी कोणतीही हालचाल केली तरी ती गोडच भासते, त्यांचं चालणं आणि पावलं उमटवीत विहार करणं मधुर आहे. स्वरांच्या आवर्तनात स्वत:च गुरफटून जाणारी बांसुरी मधुर असण्यात आश्चर्य ते काय? 

…. देवाचे पाय पाहिलेत? त्यांवर कपाळ टेकवताना जवळून पहा…गोड आहेत. आणि हात? हा गोड हात आपल्या मस्तकावर असावा असं स्वप्न असतं साधकांचं…गोड आशीर्वाद देण्यासाठी उभारलेले ते हात…मधुर आहेत. 

श्रीकृष्ण नर्तन करतात तेंव्हा धरा मोहरून जाते …  त्या नर्तनातील तालावर गोडपणा डोलत असतो. या देवाशी जन्मजन्मांतरीचं नातं जोडलं तर…तो आपला सखा झाला तर….ते सख्य अतिमधुर ठरतं.

देवकीनंदनाच्या गळ्यातून उमटणारे सूर अतिशय तृप्त करणारे आहेत..मधुर आहेत….त्यांचं पेय प्राशन करणं, खाद्य ग्रहण करणं मधुर…जगाच्या दृष्टीनं निद्रेच्या मांडीवर मस्तक ठेवून डोळे अलगद मिटून घेणं गोड आहे…म्हणूनच त्याचं रूप असलेली आणि गाढ झोपी गेलेली बालकं गोड दिसतात…देवाची निद्रा मधुरच भासते. 

कान्होबाचं रूप अलौकिक गोड, त्यांच्या कपाळी असलेला तिलकही गोड दिसतो. देवानं काहीही करू देत ते मधुरच असते…त्यांचा जलविहार,त्यांचं तुमचं चित्त हरण करणं, त्याचं भक्ताचं दु:ख,दोष,पाप दूर करणं याला तर मधुरतेची सीमा म्हणावं. 

हरीचं स्मरण करावं म्हणतात…एकदा का या स्मरणाची गोडी लागली की ती सुटत नाही. त्यांच्या बोलण्यात माधुर्य आहेच पण ते जेंव्हा मौन धारण करतात ते मौन कोरडं नसतं वाळवंटासारखं…मधुबनासारखं गोड असतं….ही मौनातील मधुर शांतता आत्म्याला लाभते.

ज्याने हे जग सुंदर केलं त्याच्या गळ्यात शोभायला अनेक अलंकार आतुरलेलं असतात…पण गोपगड्यांनी आणून दिलेल्या गुंजाच्या बियांची माला आणि अर्थातच त्या गुंजा गोड दिसतात नजरेला. 

जिच्या काठावर मुकुंद बागडतात…जिच्या अंतरंगात शिरून जलक्रीडा करतात ती यमुना तरी माधुर्यात कशी मागे राहील? तिच्यात उठणारे तरंग, तिचं जल मधुरच ! गोकुळातल्या सरोवरांमध्ये फुलणारी कमळं मधुर आहेत…श्रोते हो ! बालकृष्णाच्या सावलीसारखं वावरणा-या गोपी त्याच्यासारख्याच की. 

या कृष्णसखयाचं सारं आयुष्य अगाध लीलांनी भरलेलं आणि भारलेलं आहे…गोड आहे. त्याच्याशी झालेला आत्मिक संयोग,सात्विक भोग हे भौतिक, शारीर चवीचे कसे बरे असतील?….या सर्वाला माधुर्याचा स्पर्श असतोच. या देवाचं जगाकडे बारकाईनं पाहणं आणि त्याचा शिष्टाचार अतिशय संयत आणि गोड !  

कृष्णाला ‘ क्लिशना ‘ अशी बोबडी पण गोड हाक मारणारा पेंद्या आणि त्याच्यासोबतचे सारे गोपगण म्हणजे गोडव्याच्या झाडाला लगडलेली गोड फळंच जणू. ज्यांना प्रत्यक्ष कृष्णपरमात्म्याच्या पाव्यातून त्याच्या 

‘चला, परत फिरा गोकुळकडे ’ या हाका ऐकू आल्या त्या कपिला सुद्धा गोडच आहेत. देवाला गायींना सांभाळण्यासाठी कधी काठीचा आधार नाही घ्यावा लागला…पण ही छडी गोड आहे…अगदी हिचा प्रसाद घ्यावा एवढी ! 

यानं निर्माण केलेली एकूण सृष्टीच मधुर आहे. देव आणि आपण वेगळे आहोत ही भावना म्हणजे प्रथमदर्शनी द्वैतसुद्धा मधुर आणि भगवंत भक्तांच्या हाती सोपवतात ती प्रेमफलं मधुर आहेत. एखाद्या अनुचित कर्माचं फल म्हणून दिलेला दंडही मधुरच असतो अंती. या देवाचं आपल्यासारख्या पामरांना लाभणं तर माधुर्याचा गाभाच…हे लाभणं केवळ गोड नसतं…आपण अंतर्बाह्य मधुर होऊन जातो ! सर्वांगसुंदर….तसं सर्वांगमधुर ! जय श्रीकृष्ण ! 

वल्लभाचार्यांचं मन किती गोड असेल नाही ! शब्द इतके गोड असू शकतात ! मूळ संस्कृतात असलेले हे शब्द सर्वांना समजण्यासारखे आहेत. पण अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं हे मधुराष्टक कान देऊन ऐकलं ना की श्रवणेंद्रियांचं श्रवण मधुर होऊन जातं…गाण्यातील बासरी खूप अर्थपूर्ण भासते…आणि आपण गाऊ लागतो…. ‘ मधुराधिपतेरखिलं मधुरं..’  हे माधुर्याच्या जन्मदात्या….तुझं सारंच किती मधुर आहे रे ! 

…. .. या शब्दांतील गोडवा तुम्हांलाही भावला तर किती गोड होईल ! शब्द वल्लभाचार्यांचे आहेत…त्यांचा अर्थ लावण्याचं धारिष्ट्य करावं असं वाटलं…गोड मानून घ्यावे. 

© संभाजी बबन गायके

पुणे

मो 9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ क्षण प्रेमाचा…… – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? वाचताना वेचलेले ?

क्षण प्रेमाचा लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे

एक क्षण पुरेसा आहे,कोणाचं आयुष्य बदलून टाकायला. एखाद्या रस्त्यावरच्या भुभू च्या अंगावरून प्रेमाने,मायेने हात फिरवा…त्याचं प्रेम ते भुभु नक्की व्यक्त करेल.

झाडं,पानं,फुलं सगळ्यांना प्रेमाची भाषा व्यवस्थित समजते. मोकळ्या वातावरणात,मुक्तपणे वाढणारी झाडं आणि फुलं अधिक सुंदर, तेजस्वी भासतात…त्यांना वाढायला पूर्ण मोकळेपणा असतो.कोणाचं बंधन नसतं..निसर्गाचं चक्र त्यांना अधिक तेजस्वी,अधिक बलवान बनवतं.निसर्गाचं प्रेमचं आहे तसं…हे ऋतुचक्र तसचं तर ठरवल गेलं आहे की.

खायला अन्न,प्यायला पाणी, सूर्यप्रकाश,सुखावणारा वारा, पक्षांचं गोड कुजन,फुलांचे वेगवेगळे आकार आणि सुगंध, गवताची…पानांची…वेलींची घनदाट सुखद अशी हिरवाई, पाण्याचं फेसळण…कड्या वरून झेप घेणं..किनाऱ्यावर नक्षी काढणं…एखाद्या लहानग्याप्रमाणे खिदळत, अवखळपणाने पुढचं मार्गक्रमण करणं…

…असं आणि किती अगणित रुपात निसर्ग आपल प्रेम व्यक्त करत असतो.

सगळ्या संतांनी पण सांगून ठेवलं आहे…भगवंत प्रेमाचा भुकेला आहे…त्याला मोठे समारंभ नकोत,फुलांची आरास नको, उदबत्यांचा गुच्छ नको,अवडंबर नकोच…एक क्षण त्याला द्यावा, ज्यात फक्त त्याची आठवण…त्याचेच विचार असतील. खूप मिळतंय आपल्याला…एक क्षण पुरे आहे ते सगळ अनुभवण्याचा आणि व्यक्त होऊन देण्याचा.

तुमचा पैसा,शिक्षण,बुद्धिमत्ता प्रदर्शन कोणाला नको असतो…एक क्षण द्या तुमच्या प्रेमाचा…एक हसू, एखादा संदेश, एखादी मदतीची कृती…व्यक्त होण्याची पद्धत वेगवेगळी…पण माझ्या पद्धतीने झालं नाही तर ते कसल व्यक्त होणं…अस नसत हो.ही निसर्गाची, भगवंताची ….प्रेमाची हाक त्यांच्याच पद्धतीने होत असते…ती ऐकून घेण्याची संवेदनशीलता आपल्यात शोधून वाढवायला हवी.

आपल्यातील हे प्रेम वाढवायला हवं…भगवंताची देणगी आहे ही.!

हे आपल्यातलं प्रेम वाढलं ना…भगवंताबद्दल, निसर्गाबद्दल…जी प्रत्येक आत्म्याची गरज आहे…की आपण नक्की बदलायला लागू…स्वतःबरोबर इतरांना समजून घ्यायला सुरुवात करू, अहंकार मुक्त होऊ,स्वच्छ सात्विक होऊ,प्रेम मय,आनंदमय होऊ…या जगाला त्याची खूप गरज आहे

आपल्याबरोबर…

फक्त रोज एक क्षण हवा.

लेखक : अज्ञात

संग्रहिका : प्रभा हर्षे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? विविधा ?

मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

ज्ञानदेवांनी रुजवली ती भाषा मराठी!

शिवरायांनी टिकविली ती संस्कृती मराठी!

संतांनी वाढविला तो वाण मराठी! आमची मायबोली, आमचा अभिमान मराठी!

अशी ही मराठी, आपली मायबोली! महाराष्ट्राची राजमान्य भाषा! गेल्या हजार वर्षात त्यात होणारी स्थित्यंतरं आपण पाहत आहोत. ज्ञानदेवांच्या काळात जी मराठी भाषा वापरली जाई, ती आज वाचताना बऱ्याच शब्दांपाशी आपल्याला अडखळायला होते. अशी ही आपली मराठी  देवनागरी भाषा बाराव्या तेराव्या शतकात समृद्ध होत होती.

एकनाथांनी एकनाथी भागवत, भारुडे लिहिली, त्यामध्ये मराठी भाषेचा उपयोग झाला होता. त्यापूर्वी 1290 मध्ये ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेत ज्ञानेश्वरी लिहिली. शिवाजी महाराजांनी मराठी साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि मराठी भाषा राजमान्य झाली. 1947 नंतर स्वतंत्र भारतात मराठी भाषेला राजभाषा म्हणून मान्यता मिळाली.

कुसुमाग्रजांचा जन्मदिन हा “मराठी भाषा गौरव दिन” म्हणून साजरा केला जातो. 1987 मध्ये कुसुमाग्रजांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला.

महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा जी प्रमाणित भाषा म्हणून पुस्तकात आपण वाचतो, वापरतो ती असते.. पण दर पाच मैलागणिक भाषा बदलते असं म्हटलं जातं. आपल्या महाराष्ट्रात सुद्धा देश, कोकण, खानदेश, वर्हाड या सर्व भागात बोलली जाणारी मराठी किती विविधता दाखवते ते आपण पाहतो.

महाराष्ट्रातील विविध भागात म्हणजे रत्नागिरी, सांगली, पुणे, धुळे, नागपूर या सर्व ठिकाणी थोडाफार काळ राहिले आहे, त्यामुळे तेथील मराठी भाषा अनुभवली आहे. मिरज- सांगलीच्या मराठी भाषेवर थोडा कर्नाटकातील कानडी भाषेचा टोन येतो. प्रत्येक वाक्यात ‘होय की’ ‘काय की’ या शब्दाचा उपयोग जास्त होतो.

तर कोकण पुणेरी भाषेत’ ‘होय ना, खरे ना’ असा “ना” या शब्दाचा उपयोग दिसतो. खानदेश जवळ असणाऱ्या गुजरात प्रदेशामुळे तेथील मराठी भाषेत गुजराती शब्दांचा उपयोग होतो तर नागपूरच्या वऱ्हाडी भाषेत मध्य प्रदेशातील हिंदी भाषा मिसळली जाते.. भाषेचा प्रवास हा असा चालतो. व्यवहारात बोली भाषेत मराठी जशी बोलतो तशीच लिहितो. भाषा हे माध्यम असते मानवी भावना व्यक्त करण्याचे!

ज्ञानेश्वराने भगवद्गीता संस्कृत मध्ये होती, ती सर्वसामान्यांना कळावी म्हणून त्याकाळी ती प्राकृत मराठीत लिहिली. पण आता जेव्हा ज्ञानेश्वरी वाचायचा प्रयत्न करतो, तेव्हा पुष्कळ वेळा त्यातील कित्येक शब्दांचे अर्थ कळत नाहीत .त्यातील सौंदर्य समजून घेण्यासाठी पुन्हा शब्दार्थ बघावे लागतात.

काळानुरूप देश, भाषा बदलत असते. भाषा आपल्याला ज्ञानामृत देते. लहान बालकाला बोलायला शिकताना अनुकरण हेच मुख्य माध्यम असल्याने, आई प्रथम जे शब्द उच्चारते  तोच त्याच्या भाषेचा मुख्य स्त्रोत असतो. त्यामुळे आपण मातृभाषेला महत्त्व देतो.

मोठे झाल्यावर आपण कितीही भाषा शिकलो, इंग्रजी शिकलो, परदेशातील भाषा शिकलो तरी आपली मातृभाषा आपल्यात इतकी आत पर्यंत रुजलेली असते की, कोणतीही तीव्र भावना प्रकट करताना ओठावर मातृभाषेचे शब्द येतात. सुदैवाने  आपली मराठी इतकी समृद्ध आहे की तिची अभिव्यक्ती करताना कुठेच अडखळायला होत नाही. आपोआपच शब्द ओठावर येतात.

ओष्ठव्य, दंतव्य ,तालव्य,कंठस्थ अक्षरांचे उच्चार आहेत ते आपल्या शरीर मनाशी जणू एकरूप होऊनच येतात.. म्हणूनच मराठी मातेसमान आहे. कुसुमाग्रजांनी मराठी भाषेच्या अलंकारांचे सुंदर वर्णन केलेले आहे. मराठी भाषा ही लवचिक आहे. तिचा उच्चार जसा करू तसा तिचा अर्थ बदलतो. वाक्य बोलताना त्यातील ज्या शब्दांवर आपण जोर देऊ त्याप्रमाणे त्याचा अर्थ बदलतो .मराठी भाषेचे अलंकार तिची शोभा वाढवतात.शार्दुलविक्रिडीत, अनुप्रास,यमक,रूपक यासारखी वृत्तं भाषेचे अलंकार आहेत. त्यांचा उपयोग भाषेचे सौंदर्य वाढवण्यासाठी होतो. अशी ही मराठी आपल्याला मातेसमान आहे, त्या मराठीला आपण जतन करू या, हीच आजच्या मराठी दिनासाठी शुभेच्छा!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सांगून ठेवते… भाग-३ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? जीवनरंग ❤️

☆ सांगून ठेवते… भाग-३ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(कारण आम्हा सर्वांवर तिचं अपरंपार प्रेम आहे आणि या प्रेमापोटीच ती सारं काही समजून घेईल, निराश होणार नाही.) आता पुढे — 

आज ना उद्या तिला सांगावच लागेल आता उशीर नको. परवाच बायको म्हणाली, दादींना कसं सांगावं समजत नाही. त्या स्वयंपाक घरात येतातच. म्हणतात इतकी काही मी आजारी नाही. एवढे जपू नका मला. आण ती कणीक.मळून  देते.”

“आम्ही काही बोललो तर दादींना वाईट वाटेल. दुःख तर सर्वांनाच होतं आहे. हे असं नकोच  होतं व्हायला. पण आता लवकरच तुम्ही…”

मला बायकोचं बोलणं फारसं आवडलं नाही.  तीव्र वेदना जाणवली पण मग वाटलं तिचं तरी काय चुकलं?

मी खिडकीतून बाहेर पाहिलं. दादी गंगीच्या गोठ्यात होती. गंगीला  हिरवा चारा भरवत होती, गंगीच्या फुगलेल्या पोटावर ती हात फिरवत होती, तिला गोंजारत होती. दादी गोठ्यातून बाहेर येऊन निंबोणीच्या पारावर बसली. आणि मी तिच्याजवळ गेलो. संध्याकाळची शांत वेळ होती. कोण कुठे कोण कुठे होतं. आजूबाजूला सारीच शांतता. हालचाल नव्हती. कसली वर्दळ नव्हती. आसपास कोणीच नव्हतं. इतके दिवस मी तिला जे सांगायचं ठरवत होतो ते आताच सांगूया. हीच योग्य वेळ आहे असं मनाशी ठरवून मी तिच्या जवळ गेलो.

“ दादी..”

पण आताही दादीच म्हणाली,” बाबू! या गंगीची मला काळजी वाटते रे! या खेपेस तिला फार जड जाईल असं वाटतेय्.  एखादा चांगला डॉक्टर बोलाव. हातीपायी  नीट सुटका झाली पाहिजे रे तिची. जनावरांनाही दुखतं  बरं..

सांगून ठेवते.”

दादीला सगळ्यांची काळजी.घरातल्या प्रत्येक व्यक्तीपासून ते गाई गुरांपर्यँत ती अशी प्रेमाने बांधलेली आहे.ती आमचा खांब आहे.

मी उठलो, घरात आलो आणि मला तीव्रतेने जाणवलं की मला जे दादीला सांगायचं ते मी कधीही सांगू शकणार नाही. ते धाडस माझ्यात नाही. ती शक्ती माझ्यात नाही. पण असं काही होईल का की दादीचं दादीलाच समजेल. तिची तीच माझ्याजवळ येईल आणि म्हणेल,” एवढी काय काळजी करतोस बाबू ?चल ही बघ मी तयार आहे. केव्हा निघायचं ?आणि बरी झाल्यावर परत येणारच आहे की मी. असं समज  मी इतके दिवस कुठेतरी तीर्थयात्रेला गेले आहे त्यात काय एवढं ?”

असं झालं तर किती बरं होईल? साराच प्रश्न चुटकीसरशी सुटेल. सारं काही हसत खेळत सामंजस्यांनी होईल. कुठेही किल्मिष उरणार नाही. गढूळपणा असणार नाही.

धाकट्या भावाचा बाळ आज फार रडतोय. तसा संध्याकाळी तो किरकिर करतोच पण आज जरा जास्तच रडतोय, कळवळतोय. दूध घेत नाही, पाणी पीत नाही. काहीतरी दुखत असेल त्याचं. जोरजोरात हमसून हमसून रडतोय. त्याचं ते रडणं आणि आकाशात पसरणारे गडद नारंगी लाल रंग! विशाल आकाशात चमकणारा एकच तारा कसा भकास एकाकी वाटतोय! असा एकुलता एकतारा दिसला की मनातली इच्छा बोलून दाखवावी ती पुरी होते म्हणे.पण आज मनातल्या साऱ्या इच्छा अशा कोळपूनच गेल्या आहेत. मन निमूट बंद झाले आहे. सारे प्रवाह थंड झालेत, गोठलेत.

दादी घरात आली आणि तिने पटकन रडणाऱ्या बाळाला जवळ घेतलं, कुरवाळलं, त्याच्या हाता, पायावरून पोटावरून, गोंजारलं, त्याच्या गालाचे खारट पापे घेतले, त्याला छातीशी धरलं मग एक पाय दुमडून तिनं  त्याला मांडीवर उपडं ठेवलं,थोपटलं .बाळ हळूहळू शांत झाला. झोपी गेला.

दादीची आणि बाळाची ती जवळीक पाहून माझ्या छातीत चर्र झालं! एक भीती दाटून आली. तीच भीती.. त्याच आकाराची, त्याच रंगाची.

थोड्या वेळाने मला माझ्या डोळ्यासमोर काही दिसेना. पांढऱ्या पांढऱ्या लाटा, काळे काळे ठिपके, त्यावर हळूहळू पसरत जाणारा अष्टवक्री एक जीव भयाण, भेसूर.

दादी नसेल तर या घराचे या परिवाराचे काय होईल?दादी आमच्या कणाकणात सामावलेली आहे.

सकाळ झाली. हळूहळू घर जागं झालं. व्यवहार सुरू झाले, नेहमीचेच. अण्णाही उठले होते, आज बंब अण्णांनीच तापवला. दादी अजून उठली नव्हती. हल्ली तिला सकाळी झोप लागते. आम्हीही तिला उठवत नाही. परवाच म्हणाली,” अरे या गोळ्यांनी मला कशी गुंगी येते रे! बधिर वाटतं, जीव घाबरतो माझा, झोपावसं वाटतं.”

आज गंगीही खूप हंबरत होती. तिचेही दिवस भरलेत. कालच दादी म्हणाली त्याप्रमाणे एखाद्या डॉक्टरला आणावं लागेल.

माझ्या टेबलवर श्री देशपांडे यांचं पत्र पडलेलं होतं. जिथे दादीला पाठवायचं होतं त्या संस्थेच्या संचालकाच पत्र होतं ते. मी ते पत्र हातात घेतलं, उलट सुलट केलं आणि मला काय वाटलं कोण जाणे मी ते फाडून टाकलं. तुकडे तुकडे केले आणि कचऱ्याच्या टोपलीत फेकून दिले. दादी  कुठेही जाणार नव्हती. दादी कुठेही जाऊन चालणार नव्हतं. दादी शिवाय आम्ही जगूच शकणार नाही.

हा आवाज माझ्या मुलीचाच होता. आजी शिवाय तिला करमतच नाही. जोरजोरात ती आजीला उठवत होती. “आजी उठ ना ग! त्या बदामाच्या झाडावर बघ एक वेगळाच पक्षी आलाय. तुर्रेवाला. आणि त्याचे पंख तरी बघ किती रंगाचे.. पिवळे निळे लाल ,.इतका छान गातोय.. आजी उठ ना, चल ना तो पक्षी बघायला. लवकर उठ ना आजी. नाहीतर तो उडून जाईल. आजीss आजीss “

मग आम्ही सारेच आजीच्या खोलीत गेलो.ँंंं

‘दादी’.

तिची गोरी पान तांबूस चर्या. ठसठशीत बांधा. त्यावर उठून दिसणारे तिचे गोठ, पाटल्या, एकदाणी.

शांत  झोपली होती ती. तिचे ओठ किंचित काळसर होऊन विलग झाले होते. तिच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून मला पुन्हा एकदा वाटले जगातील साऱ्या भावभावनांना छेदून जाणारी तिची ही शांत मुखचर्या!  जणू बंद ओठातून ती म्हणतेय् “ अरे बाबू! केव्हांच ओळखलं होतं रे मी सारं. मिटवली ना मी तुझी काळजी? सोडवला ना मी तुझा प्रश्न? सुखी राहा रे बाबांनो! सांगून ठेवते..”

माझ्या डोळ्यातून घळघळ पाणी आले. भोवती साराच कल्लोळ! दादीss दादीss दादीss

दादी आमच्यातून निघून गेली. अशी सहज, शांतपणे. तिचं प्रेम, वात्सल्य, अपरंपार अजोड, उपमा नसलेलं. तिच्या सामंजस्याला कुठे तोडच नाही. मी तिचे ताठरलेले पाय धरले,

“नाही ग दादी! तू आम्हाला हवी होतीस. सगळ्यांना खूप खूप हवी होतीस,सतत, सदैव आमच्याच सोबत. तू तर आमच्या जीवनाचा कणा होतीस.”

गोठ्यात गंगी हंबरत होती. बदामाच्या झाडावर पक्षी अजून गात होता…

— समाप्त — 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बाबा… लेखिका : सुश्री फुलवा खामकर ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

? मनमंजुषेतून ?

☆ बाबा… लेखिका : सुश्री फुलवा खामकर ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

बाबा…

आज तुम्हाला जाऊन ३९ वर्ष झाली. मी पाचवी मधे होते.सकाळपासून खूप धडधडत होतं.आई हॉस्पिटल मधून आली आणि तिने सांगितलं.बाबा गेले.मला फक्त आजोबांचा आक्रोश आठवतोय.आजी आणि आई खूप शांत होत्या ! 

दारूमुळे माणूस इतका असहाय्य होऊ शकतो?एक अत्यंत प्रतिभावान,हुशार आणि जगाच्या पुढे असणारा माणूस दारू मुळे वयाच्या अवघ्या३६ व्या वर्षी जातो हे भयानक आहे! मग बाबा हा कप्पा मी पूर्णपणे बंद करुन ठेवला! 

मात्र तुमच्या लिखाणामुळे आजच्या पिढीला सुद्धा लेखक अनिल बर्वे माहीत आहेत याचा खूप आनंद आम्हाला होतो. अनिल बर्वेची आम्ही मुलं आहोत हा अभिमान सुद्धा आम्हाला आहे ! 

ज्यूलिएटचे डोळे,रोखलेल्या बंदुका आणि उठलेली जनता, कोलंबस वाट चुकला, अकरा कोटी गॅलन पाणी, थँक यू मिस्टर ग्लाड, हमीदा बाईची कोठी, स्टड फार्म, डोंगर म्हातारा झाला, पुत्र कामेष्टी, मी स्वामी या देहाचा, आकाश पेलताना… .. किती किती वेगळं आणि काळाच्या पुढचं लिखाण होतं तुमचं बाबा !! 

तुमच्या उमेदीच्या काळात तुम्ही केलेल्या अनेक गोष्टींपैकी एक म्हणजे तुम्ही चालवलेलं एक फिल्मी मासिक, ज्याचं नाव होतं फुलवा. नेहमीप्रमाणे ते सगळं व्यवस्थित बुडलं, कुण्या एका मित्राने तुम्हाला सांगितलं की फुलवा हे नाव लाभदायक नव्हे. झालं ..  भविष्य, देव, धर्म यावर विश्वास नसलेल्या तुम्हाला याचा राग आला आणि तुम्ही  म्हणालात मला जर मुलगी झाली तर तिचं नाव मी फुलवाच ठेवणार, ती नाव काढेल ! हा किस्सा मला हल्लीच समजला आणि आम्ही खूप हसलो. आणीबाणीच्या काळात तुमच्यावर नजर ठेवणाऱ्या गुप्त पोलिसाला, त्याला उगाच त्रास नको म्हणून तुम्ही बरोबरच घेऊन फिरत होता.

बाबा तुम्ही ‘ सामान्य माणूस ‘ या कक्षेत बसणारे नव्हता. पण एक मुलगी म्हणून मात्र माझ्याकडे तुमच्या खूप वेगळ्या आणि काहीशा कटू आठवणी आहेत, कारण मला आठवणारे बाबा दारूच्या खूप आहारी गेले होते. इतक्या गोड माणसाला ती दारू संपवीत होती. आम्ही खूप लहान होतो ! मी ९ वर्षांची,राही ४ आणि आमच्या हातात काहीच नव्हतं ! असहाय्य होतो आम्ही… 

बाबा, इतकी वर्ष तुमच्या बद्दल मनात एक किंतू होता,  पण आता तो नाहीये ! कदाचित आता तुमच्याकडे एक माणूस म्हणूनसुद्धा मी पाहू शकतेय इतका समजूतदारपणा वयामुळे माझ्यात आला असावा. आज मला खरंच खूप  वाटतंय की तुमच्या दोन्ही मुलांचं पुढे काय झालं हे पहायला तुम्ही हवे होतात. आज तुमच्या मुलीचं नाव फुलवा ठेवल्याचा तुम्हाला आनंद झाला असता आणि राहीला पाहून, त्याचं काम पाहून त्याला डोक्यावर घेऊन तुम्ही नाचला असतात. तुमच्या लिखाणाचा वारसा त्याने घेतला आहे. आज तुम्हाला आमचा अभिमान वाटावा असं काम करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय बाबा !

तुमची फुलवा… 

(प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शिका फुलवा खामकर ही प्रतिभावंत लेखक अनिल बर्वे यांची मुलगी हे माहीत नव्हतं .पण फुलवाच्या या पत्रामुळे कळलं. .हे पत्र जरूर वाचा ! एका दारू व्यसनाच्यापायी केवढा मोठा लेखक आयुष्य संपवतो हे लक्षात येईल ! ) 

संग्राहिका – सुश्री मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘बलस्य मूलं विज्ञानं’ …युवा प्रताप ☆ माहिती संग्राहक – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘बलस्य मूलं विज्ञानं’ …युवा प्रताप ☆ माहिती संग्राहक – श्री अमोल अनंत केळकर ☆ 

महिन्यातून अठ्ठावीस दिवस विदेशांचा प्रवास करणारा हा अवघे २१ वर्षांचे वय असलेला युवा आहे प्रताप.

फ्रान्सने त्याला त्यांच्याकडे नोकरी करण्याचे निमंत्रण दिले आहे.

मासिक सोळा लाखांचा गलेलठ्ठ पगार, पाच शयनकक्षांचे घर, अडीच कोटींची दिमाखदार कार, अशा प्रलोभनपूर्ण प्रस्तावांनी अनेक संस्थांनी त्याला बोलावले. ह्या पठ्ठ्याने या सर्वांना सरळ नकार दिला.

आपले पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदींनी त्याला बोलावून घेतले, उचित पारितोषकाने त्याचा सत्कार केला आणि ‘डी आर डी ओ’ मध्ये त्याला सामावून घेण्यास सांगितले.

या कर्नाटकातील मुलाने काय नेमके पटकाविले आहे ते पाहूयात.

पहिला भाग :-

कर्नाटकातील मैसूर जवळ कोडाईकुडी नावाच्या एका दुर्गम खेड्यात याचा जन्म झाला. त्याचे शेतकरी वडिल सुमारे दोन हजार रुपये कमवू शकत. 

याला बालपणापासूनच ‘इलेक्ट्रॉनिक्स’ मध्ये विशेष रस. हा प्रताप बारावीत शिकत असताना आसपासच्या सायबर कॕफेंच्या माध्यमातून त्याचा बोईंग ७७७, रोल्स रॉईस कार, अवकाश, हवाई प्रवास, अशा गोष्टींशी परिचय झाला. याने जगभरातील अनेक शास्त्रज्ञांना याच्या मोडक्या तोडक्या इंग्रजीत शेकडो इमेल लिहिले आणि कळविले की त्याला काम करायचे आहे पण कसचे काय अन् कसचे काय कुणीच दखल घेतली नाही.

प्रतापला खरेतर इंजिनियरिंग कॉलेज मध्ये शिकावे वाटत होते परंतु हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्याने बी एससी (फिजिक्स)ला प्रवेश घेतला. हे ही त्याला सोडून द्यावे लागले. त्याला वसतीगृहाचे शुल्क भरता आले नाही म्हणून हाकलून देण्यात आले. तो मैसूर बसस्टँडवर झोपायचा आणि सार्वजनिक स्वच्छतागृहात कपडे धुवायचा. त्याने एकलव्याप्रमाणे सी प्लस प्लस, जावा कोअर, पायथॉन या संगणक भाषा स्वतःच शिकल्या. अशातच त्याला ई वेस्टपासून ड्रोन बनविण्याबद्दल कळले. सुमारे ऐंशीवेळच्या  खटपटींनंतर त्याला असा ड्रोन बनविण्यात यश आले.

दुसरा भाग :-

आय आय टी दिल्ली मध्ये ड्रोन स्पर्धा आयोजित केली होती. प्रताप तिथे भाग घेण्यासाठी विना आरक्षित डब्यातून प्रवास करीत, त्याच्या गावरान कपड्यात, पोहोचला. त्याने दुसरे पारितोषक पटकावले.

त्याला सांगितलं गेलं की जपान मध्ये एक स्पर्धा आहे व त्याने त्या स्पर्धेत भाग घ्यावा.

जपानच्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी चेन्नईच्या एका महाविद्यालयातील प्राध्यापकाने त्याच्या शोध निबंधाला मान्यता देणे आवश्यक होते.

हा चेन्नईला प्रथमच जात होता. महत्प्रयासाने प्राध्यापक महाशयांनी त्याच्या निबंधाला काही शेरे देऊन मान्यता दिली. शेऱ्यात त्यांनी लिहिले कि शोध निबंध लिहिण्याची अर्हता याच्यापाशी नाहीय. प्रतापला जपानला जाण्यासाठी साठ हजार रुपयांची गरज होती. मैसूर मधील एका भल्या माणसाने त्याच्या तिकिटाची व्यवस्था केली. बाकीचे पैसे शेवटी प्रतापच्या आईच्या मंगळसूत्राच्या विक्रीतून उभे केले. त्याच्या पहिल्यावहिल्या विमान प्रवासाने प्रताप एकटाच टोकियोला पोहोचला. उतरला तेव्हा तिथल्या खर्चासाठी त्याच्यापाशी उरले होते केवळ चौदाशे रुपये. महाग असल्यामुळे त्याने बुलेट ट्रेनचे तिकिट काढले नाही आणि नियोजित गावापर्यंत पोचण्यासाठी सोबतच्या सामानासह त्याने सोळा ठिकाणी ट्रेन बदलत साध्या ट्रेनने प्रवास केला. स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी प्रताप आणखी आठ किलोमिटर सर्व सामान घेऊन पायी चालत गेला. एकशे सत्तावीस देशांचे स्पर्धक असलेल्या त्या महाप्रदर्शनात शेवटी त्याने भाग घेतला. निकाल गटागटाने आणि वरचे दहा क्रमांक राखून जाहीर होत होते.

प्रताप हळुहळू हताश होत मागे सरकत होता.  निकाल जाहीर करणारे हळुहळू पहिल्या दहातील निकाल सांगत होते. सरकत सरकत तिसरा क्रमांक घोषित झाला. मग दुसरा… आणि घोषणा झाली ‘ आता स्वागत करूयात भारतातून आलेल्या सुवर्णपदक विजेत्या श्री. प्रताप यांचे ‘ … त्याच्या डोळ्यात आनंदाश्रूंनी गर्दी केली. तो डोळ्यांनी पहात होता अमेरिकेचा ध्वज खाली खाली सरकत आहे आणि भारताचा तिरंगा डौलाने वर वर सरकत आहे. प्रताप दहा हजार डॉलर्सनी सन्मानित केला गेला. सर्वत्र सत्कार समारंभ होऊ लागले. 

त्याला मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदींचा फोन आला. सर्व आमदार खासदारांनी सन्मान केला. फ्रान्सने त्याला मोठी नोकरी आणि मानपानाची साधने प्रस्तावित केली. प्रतापने फ्रान्सला सरळ नकार दिला. 

आणि आता मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदींनी त्याला बोलावून घेतले आहे आणि (डी आर डी ओ)  “रक्षा अनुसंधान एवं विकास संगठन”  मध्ये त्याला सामावून घेतले आहे

…भारतीय ‘बलस्य मूलं विज्ञानं’ चे व्रत घेऊन भारतमातेची सेवा करण्यासाठी…

माहिती प्रस्तुती : श्री अमोल केळकर 

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ असाही व्हॅलेंटाईन… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

?  वाचताना वेचलेले  ? 

☆ असाही व्हॅलेंटाईन… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

मित्राची घट्ट मिठी

तोंडातून कच्चकन शिवी

आणि पाठीवर बुक्की

गच्च दोस्ती, घट्ट प्रेम.

व्हॅलेंटाईन … ‍❤️

बाबांची घट्ट मिठी

ऐकायचे त्यांचे काळीज ठोके

न बोलताही ऐकू येते ते प्रेम.

व्हॅलेंटाईन … ‍❤️

संध्याकाळी दिवेलागणीला

ओसरीवर आज्जीसोबत

करुणाष्टके म्हणून झाल्यावर

तिला नमस्कार करताना

तिचा खरबरीत सुरुकुतलेला हात

माझ्या डोक्यावर विसावतो

केसांमधून फिरतो

दाट मऊसर ते कापूसप्रेम.

व्हॅलेंटाईन … ‍❤️

आईची साद येते

मी कुठे तरी आपल्याच तंद्रीत

लक्षातच येत नाही आईची साद

घरी पोहोचायला उशीर होतो

पेंगुळल्या डोळ्यांची

आई असते उंबरठ्यावर बसलेली

पेंगुळल्या आवाजातच म्हणते,

आलास तू. किती वाट बघायला लावतोस रे, काळजी वाटते बघ

पेंगुळल्या डोळ्यातले प्रेम

उंबरठ्यावर सडा पसरलेले.

व्हॅलेंटाईन … ‍❤️

बहिणीचा फोन

दादा, कुठे आहेस ? अरे गाढवा काल येतो म्हणालायस आणि अजून येतोयस ? बावळट आहेस तू. झरझरुन फोनवर तिचे हसणे. मी मारलेल्या थापा ओळखणे. आणि दुसऱ्या दिवशी भेटल्यावर घट्ट मिठीत घेऊन, दाद्या, तू आहेस म्हणून मी आहे रे … पाणावलेले डोळे हळूच पुसत हसताना माझ्या अंगभर पसरणारे तिचे प्रेम.

व्हॅलेंटाईन … ‍❤️

मुलाशी भांडण

मग न बोलता जेवण पान लावून सुम्म बसणं बातम्या संपल्या की झोपायला जाणं झोपल्यावर रात्री कधीतरी जाग येते. अंगावर शाल पसरलेली असते. पायावर कुणाचा तरी हात असतो. उठून बघतो तर मुलगा तसाच बसून माझ्या अंगावर हात ठेवून गाढ झोपलेला असतो. डोळ्यातले पाणी गालावर सुकलेले. मी त्याच्या केसांत हात फिरवून त्याला जागं करतो. तो जागा होतो. आणि घट्ट मला मिठी मारतो. हुंदक्यांना आवरत तो म्हणतो,” बाबा, आय ॲम सॉरी. माझ्याकडून परत असं होणार नाही. पण बोल रे माझ्याशी ” मी ही त्याला म्हणतो, “आय ॲम सॉरी मित्रा. माझंही जरा चुकलंच रे ” घट्ट मिठीत आश्वासक प्रेम.

व्हॅलेंटाईन … ‍❤️

मुलीचा कॉलेजमधे कसला तरी सत्कार असतो.  बाबा, तू यायलाच हवायस हं ” मी आणि बायको जातो. मुलगी तिच्या तिच्या मित्र मैत्रिणींच्या गोतावळ्यात असते. आमच्याकडे बघते आणि तिच्या नजरेत हसरी चमक उठते. कार्यक्रम सुरु होतो. ती स्टेजवर असते. बक्षिस मिळते. ती माईक हातात घेते. “माझ्या या बक्षिसाचे खरे मानकरी आहेत माझे आई-बाबा.” आमच्याकडे खूण करते. सगळे अॉडिटोरियम आम्हां दोघांकडे बघायला लागते. टाळ्यांचा आवाज वाढत असतो. स्टेजवर असलेली ती आमच्याकडे बघत आपले डोळे पुसत असते. आमचेही डोळे भरलेले. भरुन भरुन ओसंडणारे प्रेम.

व्हॅलेंटाईन … ‍❤️

सिग्नलला गाडी थांबलेली… सोनचाफ्याची फुले विकणारी ती झिप्र्या केसांनी विस्कटलेली गाडीच्या काचेजवळ. मी गाडी बाजूला घेऊन थांबवतो. बाहेर येऊन तिच्याकडून दोन पाकिटे फुले घेतो. पन्नासच्या ऐवजी शंभर देतो. आणि फुलांची पाकिटे उघडून ती सगळी फुले तिच्याच ओंजळीत ओततो. ती श्वास भरुन गंधाळली होते. सोनचाफी गंधाळ हसत हसत निघून जाते. ती गेलेल्या वाटेवर पसरलेले असते ते सोनचाफी गंधाचे निर्व्याज अनामिक प्रेम.

व्हॅलेंटाईन … ‍❤️

वृध्द ओणव्या झालेल्या वडाच्या पारावर संध्याकाळी ती काळपट म्हातारी बसून असते. काळ्याशार अंधारात मिसळलेली. डोळ्यांतले दिवे मंदावलेले. गार वाऱ्यात थरथरणारी. रात्री तिच्यासाठी पारावर जेवणाचे ताट येते. ताट विस्कटत ती कशीबशी चार घास खाते आणि तशीच लवंडते. कुणीतरी तिच्या अंगावर धाबळी ठेवतंय. ती झोपेतच गालातल्या गालात हसते. सकाळी पारावरुनच ती अनंताच्या प्रवासाला निघून गेलेली असते. रात्रीचे हसू तिथेच पारावर त्या वृध्द ओणव्या झालेल्या वडाला भेट देऊन व्हॅलेंटाईन डे ची. 

व्हॅलेंटाईन असा ही….

लेखक : अज्ञात 

संग्राहक  : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ माझी मराठी भाषा ☆ डॉ. जयंत गुजराती ☆

डॉ. जयंत गुजराती

🔅 विविधा 🔅

माझी मराठी भाषा ☆ डॉ. जयंत गुजराती ☆

आपण राहात असलेल्या महाराष्ट्र प्रांतातील आपली मराठी ही प्राचीन प्राकृत भाषा आहे. ती केव्हापासून बोलली जाऊ लागली हे माहित नसले तरी सहाव्या शतकातील राष्ट्रकूटांच्या राजवटीपासून ती बोलली जाऊ लागली असा अंदाज आहे.

श्रवणबेळगोळ येथील नवव्या शतकातील बाहुबलीच्या शिल्पाच्या  पायावर “ चाविंडराये करवियले ” हे  कोरलेले वाक्य सर्वात  जुने व पहिले मराठी लेखन असावे. तेव्हापासून ते बाराव्या शतकापर्यंत अपभ्रंश मराठी बोलली जात होती.

अकराव्या शतकातील महानुभाव पंथातील चक्रधरस्वामींवर मुकुंदराजाने लिहिलेला लीळाचरित्र हा मराठीतील आद्य ग्रंथ होय.

मित्रांनो, महाराष्ट्राची ओळख ही राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा अशी आहे. अशा या आपल्या प्रांतातील आपली भाषा ही तितकीच रोखठोक, रांगडी तरीही मृदु मुलायम आहे. तलवारीच्या पात्याच्या तेजाची धार असलेली तरीही माणुसकीचा पाझर दगडा दगडांतून स्त्रवणारी ही मराठी माझी माय जणू दुधावरची साय.

शतकानुशतके शेतात घाम गाळणाऱ्या शेतकऱ्याने, अटकेपार झेंडा रोवणाऱ्या मराठा योध्यांचे पोवाडे गाणाऱ्या शाहिरांनी, ढोलकीच्या तालावर थिरकणाऱ्या लावणीने, गावगाडा हाकणाऱ्या बारा बलूतेदारांनी ही आपली मायबोली समृद्ध केली आहे.

महाराष्ट्र ही संतांची भूमी असल्याने मराठी भाषा विठ्ठलाच्या भक्तिरसाने समृद्ध होत गेली आहे. ज्ञानेश्वरांच्या ओवी  , तुकारामांचे अभंग जनमनाच्या ओठी बसले. एकनाथी भागवत, मोरोपंतांची केकावली, केशवसुतांची तुतारी, पठ्ठेबापूरावांपासून ते आजपर्यंतची जगदीश खेबुडकरांची लावणी परंपरा, राम गणेश गडकरीपासूनची नाट्य परंपरा, त्या अगोदरची संगीत नाटके, प्रल्हाद केशव अत्रेंचे कऱ्हेचे पाणी, साने गुरूजींची श्यामची आई, कुसुमाग्रजांची विशाखा, मराठीचे सौंदर्य खुलतच गेले.

खान्देशातील अहिराणी, कोकणातील कोकणी, विदर्भातील वऱ्हाडी प्रांता प्रांतातील वेगवेगळा बाज असलेली मराठी, ई लर्निंगच्या जमान्यातही तितकीच सुंदर, ताजी व टवटवीत आहे. इंग्रजीतही सांगितले की My Marathi तरीही ती माय मराठीच उरते. ज्ञानेश्वरांनी सांगितल्याप्रमाणे,

  माझिया मराठीचे बोलू कवतिके।

  अमृताते पैजा जिंके.।

                         अशीच आहे.

© डॉ. जयंत गुजराती

नासिक

मो. -९८२२८५८९७५ , ईमेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ खेळ आवरायला हवा… — ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? मनमंजुषेतून ?

☆ खेळ आवरायला हवा… — ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

आद्या आणि डॉली भातुकली खेळत होत्या. खेळून झाल्यावर त्यांनी सगळा खेळ आवरून नीट खोक्यात भरून ठेवला, नीट सगळं आवरलं, प्लेरूम स्वच्छ केली आणि मग अभ्यासाला बसल्या. मी लांबूनच त्यांचा खेळ बघत होते. मनात विचार आला, ‘ किती रंगून जाऊन या मुली खेळत होत्या आणि कंटाळा आल्या बरोबर त्यांनी सगळा खेळ आवरून टाकला.’ 

मग माझ्या मनात असा विचार आला, की ‘ आपण कधी शिकणार असा खेळ आवरायला? चार बुडकुली आणि तीन छोट्या खोल्यात सुरू केलेला संसार आता मोठ्या बंगल्यात आला. तरी आपले अजून भातुकली खेळणे सुरूच आहे की. भातुकलीची भांडी बदलली, खेळाचा पसारा वाढला. खेळगडीही बदलले. तरीही आपण अजूनही त्यातच रंगलो आहोत. वयाची साठी केव्हाच ओलांडून गेली. आता नव्या दमाचे  खेळाडू हा खेळ खेळायला सज्ज झालेत आणि उत्सुकही आहेत. हा खेळ आता देऊया ना त्यांच्या हातात. खेळत असताना आद्याने कुठे मला विचारले, “ आजी मी आता कशी खेळू?”  तिला हवा तसा ती खेळ मांडत होती, मोडत होती, पुन्हा नवीन रचना करून बघत होती.  तिला माझी मदत नको होती. आपणही आता हा डाव आपल्या मुलांच्या हाती देऊया. त्यांना हवी तशी ती त्यांच्या मनाप्रमाणे खेळतील. नव्या रचना करतील, नवे डाव  मांडतील. आपण नको त्यात हस्तक्षेप करायला.  चुकतील, धडपडतील पण कधीतरी बरोबर जागा मिळेलच की त्यांना. आपण आता नको त्यात पडायला. अनुभवाने होतीलच की तीही शहाणी. तो वर बसलेला परमेश्वर आपला हा भातुकलीचा डाव अर्धवट सोडायला लावून कधी आपल्याला हाक मारेल, सांगता येतंय का? आपण आपले आधीच आपलीही खोकी भरून तयारीत असलेले बरे.  कोणी गरजवंताने जर नवा खेळ मांडला असेल तर त्यालाही देऊया ना आपली चार भांडी, नको असलेले पण उत्तम स्थितीतले कपडे, पुस्तके, फर्निचर. नको आता हा ‘अती’चा हव्यास.त्यांनाही मिळू दे खेळ खेळण्यातला आनंद. जुनी ओझी आता नकोत कवटाळायला.’ 

कितीतरी घरातले पक्षी दूरदेशी उडून गेलेत, त्यांना तुमच्या जुन्यापुराण्या वस्तू आणि भांड्याकुंड्याची, अवजड फर्निचरची आणि कशाचीच अजिबात गरज नाहीये. तर मंडळी, आवरता घ्या हा पसारा  खेळ आवरा आणि त्या वरच्या नवीन घराचे कधी बोलावणे येईल तेव्हा हसतमुखाने त्याच्या घरी जायला सज्ज व्हा….. रिकाम्या हाताने .. आणि मनानेही.

खरंच हा खेळ वेळेवर आवरायला हवा …. बघा पटतेय का ? 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares