मराठी साहित्य – विविधा ☆ सारे जहाँ से अच्छा… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? विविधा ?

☆ सारे जहाँ से अच्छा… ☆ श्री विश्वास देशपांडे

आपल्या साऱ्यांचे हे भाग्य आहे की, या भारतभूमीत आपला जन्म झाला. गंगा, यमुना, नर्मदा, गोदावरी आदी नद्यांच्या जलाने पावन झालेला हा प्रदेश हिमालयाचा रुपेरी मुकुट या भारतमातेने परिधान केला आहे. सागर तिच्या पायाला स्पर्श करतो आहे. कन्याकुमारी येथे तिन्ही सागरांचं जल एकमेकांत मिसळलेले आपणास दिसतं. त्या समुद्रात जो खडक आहे. ज्यावर स्वामी विवेकानंद बसले होते, त्या खडकावर सागराच्या लाटा सतत येऊन अभिषेक करीत असतात. जणू सागराचीही देशभक्ती उचंबळून येते आणि लाटांच्या रूपात तो भारतमातेला जलाभिषेक करतो. तिथूनच स्वामी विवेकानंदांना प्रेरणा मिळाली. आपलं जीवनध्येय गवसलं. सागराची हाक आणि रामकृष्ण परमहंसांचे आशीर्वाद यांचा संगम झाला आणि नरेंद्राचं रूपांतर स्वामी विवेकानंदांत झालं. भारतीय संस्कृती जगाला कळली, ती स्वामी विवेकानंदांच्या रूपाने. याच विवेकानंदांनी ‘देश हाच आपला देव आहे. त्याचीच पूजा करा असा प्रेरणादायी संदेश तरुणांना दिला.

इंग्लंडमध्ये असताना स्वातंत्र्यवीर सावरकरांचं हृदय मातृभूमीच्या आठवणीनं उचंबळून आलं. सागराच्या सान्निध्यात बसले असताना त्यांच्या ओठी शब्द आले, ‘ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला… हे देशप्रेम! जन्मठेपेची शिक्षा झाली, तेव्हा देशासाठी तुरुंगात अपार कष्ट, यातना सहन केल्या. कोलू चालवला. चाफेकरांना जेव्हा इंग्रजांनी फाशीची शिक्षा दिली, तेव्हा सावरकर म्हणाले, “स्वदेशाच्या छळाचा सूड घेऊन चाफेकर फासावर चढले. त्यांच्या प्राणज्योतीने जाता-जाता चेतविलेली शत्रुजयवृत्ती, महाकुंडात समिधेमागून समिधा टाकून अशीच भडकावीत नेणं असेल, तर त्याचं दायित्व आपल्यावर आहे. देशाचं स्वातंत्र्य परत मिळवण्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मी मारता मारता मरेतो झुंजेन.” चाफेकरांनी जेव्हा देशासाठी बलिदान दिलं, तेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी एक पोवाडा लिहिला. त्याने तरुणांना त्या काळात अतिशय स्फूर्ती दिली.

स्वजनछळाते ऐकुनी होती तप्त तरुण जे अरुण जणो देशासाठी प्राण देती धन्य धन्य त्या का न म्हणो

शतावधी ते जन्मा येती मरोनी जाती ना गणती देशासाठी मरती त्यासी देशपिते की बुध म्हणती.’

अशा अनेक क्रांतिवीरांचं, देशभक्तांचं देशाच्या स्वातंत्र्ययज्ञात बलिदान पडलं. म्हणून तर सिद्धहस्त कवी ग. दि. माडगूळकर लिहून गेले, ‘वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदेमातरम् अनेक क्रांतिकारक ‘वंदे मातरम् म्हणत हसत-हसत फासावर चढले. कुसुमाग्रजांचं ‘गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार हे गीत अनेकांना प्रेरणा देणारं ठरलं. देशभक्तीचा सुगंध आसमंतात दरवळत होता. हा सुगंध देता देता स्वातंत्र्ययज्ञरूपी कुंडात अनेकांच्या प्राणांची आहुती पडली, या आहुतीने यज्ञदेवता प्रसन्न झाली. या देवतेने प्रकट होऊन ‘स्वातंत्र्याचा मंगल कलश आपल्या हाती दिला. दीर्घकाळाच्या परकीय सत्तेनंतर भारत स्वतंत्र झाला. हे स्वातंत्र्य आम्हाला सुखासुखी मिळालं नाही, याचं भान आम्ही ठेवणं आवश्यक आहे.

३ एप्रिल १९८४. भारताचा अंतराळवीर राकेश शर्मा अवकाशात होता. त्याच्याशी संपर्क साधण्यात आला. इंदिरा गांधी तेव्हा भारताच्या पंतप्रधान होत्या. त्यांनी राकेश शर्माला विचारलं, ‘आपको अंतराल से हमारा भारत देश कैसा दिखाई दे रहा है? राकेश शर्माने तत्काळ फार सुंदर उत्तर दिलं. ‘सारे जहां से अच्छा हिंदोस्तां हमारा. किती सुंदर आणि मन भरून यावं असं हे उत्तर!

असा हा ‘सारे जहाँ से अच्छा असलेला आमचा देश आज प्रजासत्ताक दिन साजरा करतो आहे. स्वातंत्र्यासाठी सारे देशभक्त, क्रांतिकारक एक होऊन लढले. जातिधर्माची पर्वा न करता. ‘अवघा रंग एक झाला. पण आज त्याच देशाला जातिपातीने, धर्मभेदाने, भाषाभेदाने विभागलं गेलं आहे. संतांची, महापुरुषांची, नेत्यांची जातीपातींत वाटणी झाली आहे. क्षुल्लक कारणांवरून दंगली पेटत आहेत. लोक एकमेकांच्या जीवावर उठले आहेत. जाळपोळ, लुटालूट, अन्याय, अत्याचार होत आहेत. आपल्या सगळ्या देशभक्तांनी, क्रांतिकारकांनी याचसाठी अट्टाहास केला होता का? ‘हेचि फळ काय मम तपाला’ असं तर त्यांचे आत्मे म्हणत नसतील? म्हणूनच देशभक्ती म्हणजे फक्त १५ ऑगस्टला किंवा २६ जानेवारीला ध्वजवंदन करणं नव्हे. वर्षभर असं वागलं पाहिजे की, आपण जी जी कृती करू, ती देशहिताच्या दृष्टीने महत्त्वाची असली पाहिजे. कोणतीही कृती करताना, निर्णय घेताना ही कृती माझ्या देशाच्या दृष्टीने हिताची आहे ना, याचा विचार केला पाहिजे. या देशाचा धर्म एकच. तो म्हणजे राष्ट्रधर्म! आणि तोच आपल्या सगळ्यांचा धर्म असला पाहिजे.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लाल किल्ल्यावर लता मंगेशकर यांनी कवी प्रदीप यांचं गीत गायलं. ते गीत ऐकून पं नेहरूंच्या डोळ्यांतही अश्रू आले. आज त्याच गीताची आठवण करून लेखाचा शेवट करू या.

 ऐ मेरे वतन के लोगो, जरा आँख मे भरलो पानी जो शहीद हुऐ है उनकी जरा याद करो कुर्बानी.’ जयहिंद.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “घरभरणी !” भाग -२ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? जीवनरंग ?

☆ “घरभरणी !” भाग -२ श्री संभाजी बबन गायके 

(रीतसर पाणी वगैरे दिल्यानंतर तिने विचारले,”लवकर उरकला का उद्योग? कुणी सोबतीला नेलं होतं का?” यावर झाल्या प्रकाराची अगदी साग्रसंगीत पुनरावृत्ती झाली. याही वेळी गोविंदभटांचा आवेश तोच होता.) — इथून पुढे — 

आवाज ऐकून शेजारच्या घरातून नारायणपंत गोविंदभटांच्या ओसरीवर आले. नारायणभट गेली कित्येक वर्षे मुंबईला लेकाकडे असत. खरं तर गोविंदभटांना त्यांनीच तर भिक्षुकीचे धडे दिले होते. नारायणभटांचा धाकटा भाऊ म्हणून पंचक्रोशीतली गावकरी मंडळी गोविंदभटांचा रागीट स्वभाव चालवून घेत. शिवाय बामनकाका म्हणजे देव अशी भावना अजूनही गावांमध्ये आहेच. आणि नारायणपंतांच्या लाघवी स्वभावामुळे, यजमानांना अवाजवी खर्चात न पाडता पण तरीही धार्मिक कृत्यांत कुठेही तडजोड न करता सर्व कार्य पार पाडण्यात हातखंडा असण्याच्या कीर्तीमुळे हा आदर टिकून होता. नारायणपंतांची दोन्ही मुले नोकरीनिमित्त शहरांत स्थिरावली आणि वाढत्या वयाचा भार, सुरू झालेली आजारपणं यांमुळे आपले वडील आपल्या नजरेसमोर असावेत या हेतूने मुलांनी नारायणपंतांना बळेच शहरात ठेवून घेतले होते. पण त्यांना गावकीची आंतरीक ओढ होतीच. संधी मिळेल तेंव्हा ते गावी परतत. आजही ते सकाळी सकाळीच गावी परतले होते.

नारायणपंतांनी झाला प्रकार समजून घेतला. आपण सुदामला वंशखंड होईल असा शाप दिल्याचा मात्र गोविंदभटांनी उल्लेख केला नव्हता. कदाचित आपण रागाच्या भरात असं बोलून जायला नको होतं, असंही त्यांना वाटलं होतं. आपल्या पोटी मूलबाळ नाही हे गोविंदभट कधी कधी विसरून जात. आणि मग त्यांच्या तोंडी असे शब्द येत असत. वास्तविक भिक्षुकीवाचून त्यांचं काही अडत नव्हतं. पण वाडवडिलांनी सांभाळलेली परंपरा ते पाळत असत. भिक्षुकीत फार काही पारंगत होते अशातलाही भाग नव्हता. मात्र थोरल्या भावाच्या, नारायणपंतांच्या हाताखाली काम करून करून गरजेपुरते विधी ते खूप मन लावून आणि छान करायचे. त्यामुळे लोक त्यांना सोडत नव्हते आणि ते लोकांना.

“गोविंद,चल कपडे घाल. सर्व सामान घे. आपण सुदामकडे जाणार आहोत!” नारायणपंतांनी आज्ञा केली. हे ऐकून गोविंदभट चपापले. नारायणपंतांनी गावातल्या वसंत जीपवाल्याला निरोप दिला. लगेच निघायचंय म्हणाले. तो ही लगबगीने हजर झाला. नारायणपंतांनी आपली ठेवणीतली टोपी डोईवर चढवली. स्वच्छ धोतर नेसले,अंगरखा चढवला,नवं कोरं उपरणं खांद्यावर टाकले आणि निघाले.

आपल्या घरासमोर जीप थांबलेली पाहून सुदामच्या घरातल्यांना आश्चर्य वाटले. सकाळी सकाळी गोविंदभटांनी उच्चारलेल्या शापवाणीने ते भोळे भाबडे लोक भांबावून गेले होते. आता उत्तरपूजेचे काय करायचं या विचारात होते. घरातले पाहुणे-रावळे अजूनही तसेच बसून होते.

“सुदामा,आहेस का रे घरात?” नारायणपंतांनी त्यांच्या नेहमीच्या प्रेमळ आवाजात हाक दिली आणि ओळखीचा आवाज ऐकून सुदाम धावतच बाहेर आला. समोर नारायणपंतांना पाहून त्याने पटकन खाली वाकून त्यांच्या पायांवर डोके ठेवले. सुदामचं नामकरणही नारायणपंतांनीच केलं होतं आणि त्याच्या लग्नातही भटजी म्हणून तेच हजर होते. “काका,तुम्ही?” तुम्ही तर मुंबईला होता ना?”

“अरे,चल आत चल. मग बोलू. तू आंघोळ केलीयेस का? नसली तर करून घे चटकन. आणि तुझ्या बायकोलाही तयार व्हायला सांग. आपण आधी उत्तरपूजा करून घेऊ!” नारायणपंत म्हणाले तसे सुदामच्या चेह-यावर आनंदाचे शिवार फुलले. हौसाबाई तरातरा बाहेरच्या खोलीत आल्या आणि खुर्चीवर बसलेल्या नारायणपंतांच्या पायांवर डोई ठेवली. “लई दिवसांनी दर्शन झालं,काका!”

“तुझा संधीवात कसा आहे,हौसाबाई!” “मी मागच्या वेळी सांगितलेलं औषध घेतीयेस ना अजूनही?”नारायणपंतांनी विचारले. तसे हौसाबाई म्हणाल्या,”तुमच्या औषधांचा गुण येतोय बघा,काका!” नारायणपंत म्हणजे पंचक्रोशीतलं चालतं-बोलतं सेवाकेंद्र. आयुर्वेदी औषधं,गावठी उपचार यांचा त्यांचा बराच अभ्यास होता.

तोवर सुदाम आणि त्याची बायको तयार होऊन आले. नारायणपंतांनी आपल्या खड्या,स्वच्छ,तयार वाणीने सुदामचे घर भरून टाकले. अगदी मुख्य पूजेच्या थाटात उत्तरपूजा बांधली. पाच आरत्या म्हटल्या आपल्या गोड आवाजात. गोविंदभट त्यांच्या सोबतच होते. पण सुदामच्या नजरेला नजर देत नव्हते फारशी. नारायणपंत आल्याचे पाहून शेजारच्या घरातले ज्येष्ठ लोकही सुदामकडे आले. नारायणपंतांनी त्यांची डोळ्यांनीच दखल घेतली आणि गोड हसले. म्हाता-या शिरपतनं “काय काका, बरं आहे ना?’ अशा अर्थानं आपले दोन्ही हात उंचावले आणि काकांनीही त्याला मान लववून प्रतियुत्तर दिले. घरात धुपाचा,उदबत्तीचा सुवास दरवळत होता.

सुदाम आणि त्याची बायको,नारायणपंतांच्या पायावर डोके ठेवते झाले. पंतांनी त्यांना तोंडभरून आशीर्वाद दिला. ती जोडी गोविंदभटांच्याही पायाशी वाकली…भटांनी त्यांच्याकडे पाहिले आणि त्यांच्या तोंडून उदगार बाहेर पडले,”पुत्रवती भव!” आणि हे ऐकून सुदामच्या मनातलं मळभ दूर पळालं!

दोन्ही काकांसाठी दूध दिले गेले, ते त्यांनी स्विकारले. बोलता बोलता, सकाळी गोविंदभट नेमके काय म्हणाले होते हे सुदामने नारायणपंतांच्या कानांवर घातले होतेच. गोविंदभटांनी ‘पुत्रवती भव, कल्याणम अस्तू!” असा आशीर्वाद दिल्याचे ऐकून त्यांनाही बरे वाटले.

“सुदाम,अरे गोविंदचं काही मनावर घेऊ नकोस. रागाच्या भरात बोलला असेल तो. तसं त्याच्या मनात काही नव्हतं. आणि त्याने शाप दिला असला तरी आता आशीर्वादही त्यानेच दिलाय ना?” नारायणपंत सुदामला जवळ घेऊन म्हणाले. सुदामच्या डोळ्यांत ओलसरपणा दिसला. त्याची आईही पदराने डोळे पुसू लागली. “अरे,हे शाप बिप काही खरं नसतं. खरे असतात ते आशीर्वाद! मनापासून दिलेले! आणि सर्व आपल्या मानण्यावर असतं. तुम्ही अजूनही आम्हांला मान देता, पाया पडता हे काय कमी आहे?

सुदामने शिधा नारायणपंतांच्या पुढे ठेवला. त्यांनी तो गोविंदभटांना स्विकारायला सांगितला. सुदामने दक्षिणेचे पैसे असलेलं पाकीट नारायणपंतांच्या हाती ठेवले. त्यांनी मोजली रक्कम. पाचशे अकरा रुपये होते. नारायणपंतांनी त्यातील एक रुपया घेतला आणि बाकी रक्कम पाकीटात पुन्हा ठेवली. आणि ते पाकीट सुदामच्या हाती दिलं. “तुझी दक्षिणा पोहोचली मला…तुझा आधीच एवढा खर्च झालाय…ठेव तुला हे पैसे.! आणि पुजेवरची जमा झालेली चिल्लर,नोटा गावातल्या भैरोबाच्या दानपेटीत घाल”

एवढे बोलून नारायणपंत उठले. गोविंदभटांनीही पिशवी सावरत उंब-याच्या बाहेर पाऊल ठेवले. सुदामच्या घरातली झाडून सारी मंडळी त्यांना निरोप देण्यासाठी अगदी रस्त्यापर्यंत आली होती. नुकतंच घरभरणी झालेलं सुदामचं नवं कोरं घर उन्हातही हसत उभं होतं!

– समाप्त –

(कथाबीज अस्सल. नावे, संदर्भ, स्थळ, प्रसंगांचा क्रम बदल करणे अपरिहार्य.)

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ चित्रकारांच्या व्यथा… भाग-२ ☆ श्री सुनील काळे ☆

श्री सुनील काळे

? मनमंजुषेतून ?

☆ चित्रकारांच्या व्यथा… भाग-२ ☆ श्री सुनील काळे 

पाचगणी फेस्टिवल निमित्त तीन दिवस आलेल्या गणेश कोकरे व सिद्धांत पिसाळ यांचे अनुभव  — पाचगणी या ठिकाणी लाईव्ह पेन्सिल स्केच करण्यासाठी आम्हाला आमंत्रित केले गेले होते. फेस्टिवल तीन तारखेला संपला व चार तारखेला सकाळी आम्ही महाबळेश्वर फिरण्याचे ठरविले. नऊच्या सुमारास आम्ही आमचे निसर्ग चित्रणाचे साहित्य बरोबर घेऊन मोटरसायकल वरून निघालो निसर्गाचा आनंद घेत घेत श्री क्षेत्र महाबळेश्वर या ठिकाणी पोहोचलो. गाडी पार्क केली व पायी चालत चालत कृष्णामाई मंदिर या ठिकाणी पोहोचलो. समोरचे निसर्ग सौंदर्य पाहून भारावून गेलो.  माझा विषय ‘वारसा’ असल्यामुळे कृष्णामाई मंदिर मला खूपच आवडले.  त्यामुळे लगेचच मी माझे निसर्गाचित्रणाचे साहित्य काढून एका कोपऱ्यामध्ये मंदिराचे स्केच करायला सुरुवात केली. कोणत्याही पर्यटकांना त्रास होणार नाही याचीही काळजी घेऊन मंदिर पूर्ण दिसेल अशा ठिकाणी बसलो. चित्र काढण्यात मग्न झालो सुंदर असा ठेवा समोर असल्यामुळे त्याचे चित्र रेखाटण्यात खूप आनंद होत होता माझ्याबरोबर सिद्धांत  होता तो ही एका कोपऱ्यात बसून चित्र काढत बसला होता जवळजवळ वीस मिनिटे आम्हा दोघांनीही मंदिराचे पेन्सिल स्केच केले माझे स्केच पूर्ण झाल्यामुळे मी जलरंगात रंगविण्यासाठी माझी पॅलेट व रंग बाहेर काढले रंगाला सुरुवात करणार तेवढ्यात लोंढे मॅडम आल्या व म्हणाल्या तुम्हाला या ठिकाणी चित्र काढता येणार नाही त्यांनी बंद करण्यास सांगितले काढलेले स्केच पुसून टाका असी तंबी दिली. मी छान चित्र झाल्यामुळे त्यांना विनंती केली चित्र काढायला कुठेही बंदी नसते पर्यटक सुद्धा फोटो काढत आहेत चित्र काढणे हा गुन्हा नाही. त्या खूपच भडकल्या चित्र पुसता येत नाही बहुतेक तुम्हाला म्हणून त्यांनी स्वतः खोडरबर हातात घेतला व चित्र खोडून काढले .मग चित्र पुसल्यावर तुम्ही इथे थांबू नका नाहीतर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे धमकावले व आम्हाला हाकलून दिले आम्ही त्यांना विनंती करत होतो तुम्ही आम्हाला स्थानिक पातळीवर परवानगी मिळवून द्या त्यांना आमचे कार्डही दिले मी कास पठार परिसरातील रहिवासी आहे ओळखपत्रही दाखवले फोन मधील मंदिरांची चित्रही दाखविली त्यांनी काहीही ऐकून घेतले नाही. चित्र काढू नका असा बोर्डही नाही म्हणाल्यावर त्यांनी आम्हाला तिथे थांबूच नका असे सांगितले मुंबईवरून परवानगी आणा असे सांगितले आम्ही त्यांच्याकडून लोंढे सरांचा नंबर घेतला त्यांनाही फोन केला परंतु त्यांनीही उलट सुलट उत्तरे देऊन फोन बंद केला आम्ही आमचे साहित्य गोळा केले पुसलेले स्केच घेऊन त्या ठिकाणाहून निघून गेलो.

. . . . 

क्षेत्र महाबळेश्वर (कृष्णामाई मंदिर) या ठिकाणी चित्र काढत असताना आलेला एक अनुभव 

— गणेश तुकाराम कोकरे 

शिक्षण : G.D.Art 

व्यवसाय : चित्रकार (सातारा)

(प्रदर्शनाचे उद्‌घाटन करण्यासाठी मुख्य अतिथी शोधायचे त्या कार्यक्रमांची तयारी करायची.) 

– इथून पुढे.  

मग वाई ते मुंबई ट्रान्सपोर्टसाठी ट्रक शोधायचा . त्याला मुंबईची माहीती नसते म्हणून ट्रकमध्येच बसून जायचे .हमाली आपणच करायची कारण सोबत माणूस नेले तर त्याची व आपली राहण्याची सोय नसते . आठ दहा दिवस लॉज किंवा हॉटेल बुकिंग करायचे . प्रतिदिवशी चार पाच हजार रुपये  त्याचा खर्च + GST चार्ज भरायचा . लॉजच्या ठिकाणापासून प्रवास , जेवण , खाणे ह्या रोजच्या त्रासाविषयी मुंबईत तर बोलायचेच नाही , निमूटपणे ते सगळे सहन करायचे .

त्यानंतर चित्र भिंतीवर टांगणे त्यासाठी सहा सात हजार रुपये ठरवून द्यायचे ते दिले नाहीतर तुमचा डिस्पेला लावलाच जात नाही . एकदा 2002 साली जहाँगीर आर्ट गॅलरीत प्रदर्शन होते . माझी खूपच वाईट परिस्थिती होती , त्यावेळी माझा शाळेचा कलाशिक्षकाचा पगार चारहजार सहाशे रुपये होता . सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत शाळेत वेळ द्यावा लागायचा . प्रदर्शनाची चित्रे लावण्यासाठी दाजी व मोरे नावाचे शिपाई होते . त्यांनी चित्र गॅलरीत लावायचे सात हजार रुपये मागितले . मी घासाघीस करून पैसे कमी करत होतो . सगळेच चित्रकार पैसेवाले नसतात हे समजून सांगण्याचा प्रयत्न करत होतो . ते म्हणाले ठिक आहे तुमची चित्रे तुम्हीच लावा . मी चित्र लावण्यासाठी स्टूल किंवा उंच  ॲल्यूनियमचा घोडा मागितला तर म्हणाले तो तुमचा तुम्ही आणायचा . आम्ही देणार नाही .आता मोठा प्रश्न पडला . माघार घेतली , नाईलाज होता . शेवटी पैसे द्यायला तयार झालो . प्रदर्शनाच्या सात दिवसात चित्रांच्या विक्रीनंतर देतो म्हणालो . दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता उद्‌घाटन होते , बाकीची तयारी करून प्रवास करून जहाँगीर आर्ट  गॅलरीत हॉलमध्ये पोहचलो तर चित्र जमीनीवर होती तशीच पडलेली . शेवटी मी , माझी पत्नी स्वाती आलेले मुख्य पाहुणे त्यांचे सुटाबुटातील सगळे मित्र व पाहुणे आमची पेंटींग्ज भिंतीवर लावत बसलो .नंतर उद्‌घाटन झाले . त्या दिवशी घामाने थबथबलो होतो ,चित्रकाराचा सारा संघर्ष सर्वांनी पाहीला .जीव नकोसा झाला त्यादिवशी . पण तरीही सहा हजार रुपये त्यांनी घेतले ते कायमचे डोक्यात लक्षात राहीले .

[मला मात्र गॅलरीत चित्र टांगायचा जॉब करावे असे वाटू लागले तो जॉब आवडला . कलाशिक्षक म्हणून पाचगणीच्या प्रसिद्ध इंग्रजी शाळेत आर्ट टिचरचा जॉब करून साडेचार हजार रुपये पगार मिळविण्यापेक्षा जहाँगीरमध्ये वॉचमनचा पगार तर मिळतोच शिवाय एका रात्रीत एका हॉलचे चित्र टांगायचे  पाच सहा हजार मिळाले तर उत्तमच आणि आता तर प्रत्येक आठवडयाला जहाँगीरमध्येच सहा गॅलरी आहेत . एका महिन्यात चार आठवडे येतात]

कलाकार कलानिर्मिती करतो तोच तेवढा आनंदाचा क्षण असतो . कारण तो वेडा असतो . त्याला कलानिर्मितीच्यानंतरची व्यावसायिक गणिते जमत नाहीत. प्रदर्शनाच्या उत्सवाची तयारी करणे इतके सोपे काम नसते . त्यामूळे इच्छा असूनही चित्रांच्या किंमती कमी लावता येत नाहीत . कारण या चित्रांची चांगल्या किमंतीत विक्री होईल अशी त्याला आशा असते . त्यानंतर त्याला त्याचे कुटूंब , दैनंदीन घरखर्च ,  दुखणी , आजारपणे , वीजबील ,पाणीबील टॅक्सेस भरायचे असतात . शिवाय राजकीय नेत्यांसारखे , नोकरदारांसारखा नियमित पगार नसतो . राजकीय नेते पाच वर्षांनंतर निवृत्त झाले की त्यानां कायमस्वरूपी कुटूंबाला मोठ्या रकमेचे उतारवयात पेन्शन मिळते. याउलट आयुष्यभर कलाकार टेन्शनमध्येच जगत असतो . कारण या देशात कलाकार म्हणून जगणे मोठा शाप आहे . कलाकारांची आठवण राजकीय पुढाऱ्यानां, आयोजकानां त्यांचे कार्यक्रम पार पाडताना ॲक्टीव्हॅटीची शोभा वाढविण्यापुरती दाखवण्यापुरते असते . चित्रकलेला प्रोत्साहन देण्यासाठी एखादे प्रदर्शन भरवायचे  त्यानंतर कलाकारांची आठवणही येत नाही . ती आठवण जेव्हा पुढच्या वर्षाचा कार्यक्रम असेल त्यावेळीच येतो . 

प्रत्येक चित्र काढण्याची कथा , त्या चित्राची अनुभूती जशी वेगळी असते तसाच प्रत्येक प्रदर्शनाचा एक मोठा अनुभव असतो . प्रत्येक वेळी नवी माणसे भेटतात एक नवा अनुभव देऊन जातात . या अशा अनुभवातून थोडे थोडे शहाणपण येते त्या सुधारणा करत परत नवा अनुभव घेत जीवनचा प्रवास करत राहायचे.

पूर्वी माधव इमारते , श्रीराम खाडीलकर यांच्यासारखे कलासमीक्षक नियमित प्रदर्शन पाहायला यायचे , गप्पा मारायचे व माहीती घेऊन सुंदर लेख वृत्तपत्रांमध्ये छापून यायचे . ते वाचून अनेक कलारसिक गॅलरीत प्रदर्शन बघायला यायचे . एकदा तर दूरदर्शनच्या रत्ना चटर्जी यांनी चांगली मोठी मुलाखत घेऊन चित्रप्रदर्शनाला मोठी प्रसिद्धी दिली याशिवाय सर्वात महत्वाचे म्हणजे कसलीही पैशांची दक्षिणा मागितली नाही . पण आता प्रिंट मिडीया व टिव्ही मिडीया कलाकारांवर नाराज झाला आहे . या कलांकारांचे लेख लिहून आम्हाला काय फायदा ? मग अर्थकारण , राजकारण सगळे आले . भरपूर पैसे दिले तर मोठी बातमी येते .कलाकार सक्षम असला की तो सगळे करतो . पण छोट्या कलाकारांच्या प्रदर्शनाची दखल कोणी घेत नसते . करीना कपूरचे बाळ (तैमूर )आता रांगत चालतो . काल त्याला दोनदा शी झाली अमक्या तमक्या नटाचा नटीचा ब्रेकअप झाला . कोणाचा डिवोर्स झाला या बातम्यांसाठी त्यांच्याकडे जागा असते पण चित्रकलेचे किंवा इतर कलाकारांच्या इव्हेन्टसची दोन ओळीची साधी बातमी छापण्यासाठी त्यांच्या वृत्तपत्रात जागा नसते .

आमच्या सातारा जिल्हयात तर एकही कलादालन नसल्याने कलाकार जिवंत आहेत का नाहीत हेच माहीती पडत नाही . आम्ही फक्त औंधच्या राजांचे कौतूक करून भवानी संग्रहालय साताऱ्यात आहेत याचा अभिमान बाळगणार . पण देशाच्या पच्च्यांहत्तर वर्षाच्या स्वातंत्र्यानंतरही जिल्ह्यात एकही आर्ट गॅलरी निर्माण न करणाऱ्या राजे व नेत्यांविषयी काय बोलावे व कोण बोलणार ? सगळं अवघड प्रकरण आहे .मग कलाकारच निर्माण होत नाहीत .कलाप्रदर्शने होत नाहीत व कलारसिकही निर्माण होत नाहीत . सगळे कलाकार मग पुण्यामुंबईत प्रदर्शन करायला धावतात त्यानां पर्यायच नसतो दुसरा .

त्यामूळे प्रदर्शन करणे हे एक दिव्यसंकट असते . ते पार पाडताना अनंत अडचणी येत असतात . प्रदर्शनाच्या काळात मोर्चे , आंदोलने , दंगली , बॉम्बस्फोट , रास्तारोकोसारखे प्रकार आले की प्रदर्शन संपूर्ण आर्थिकदृष्टया झोपते व कलाकारही कायमचा संपतो . म्हणून मी नेहमी म्हणतो हे माझे शेवटचे प्रदर्शन आहे .

पण सच्चे खरे कलाकार कधी संपत नसतात . कलानिर्मितीची आस त्यानां संपून देत नाही . ते सतत नव्या विषयांचा , नव्या प्रदर्शनाचा ध्यास घेऊन नव्या दिवसाची सुरवात करतात . कारण कला हेच त्यांचे जीवन असते . एक चित्रप्रदर्शन पाहणे म्हणजे त्या चित्रकाराचा विचार , त्याचा दृष्टीकोन , त्याचा ध्यास, त्याचे संपूर्ण जीवन , त्याचे व्यक्तिमत्व त्याची कलासाधना समजून घेणे असते .

– समाप्त – 

(स्वाती व सुनील काळे यांच्या पाचगणी , वाई व महाबळेश्वर परिसरांतील ” व्हॅलीज अँन्ड फ्लॉवर्स ” या शीर्षकाखाली भरणाऱ्या चित्र प्रदर्शनाला सर्व कलाकार व कलारसिकानां सप्रेम निमंत्रण !) 

© श्री सुनील काळे

संपर्क – 32, निसर्ग बंगला, मेणवली रोड, स्वप्नपूर्ती मंगल कार्यालयाजवळ, मु .पो. भोगाव, ता. वाई, जि.सातारा – ४१२८०३. 

मेल : [email protected]

मोब. 9423966486, 9518527566

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्री रामजन्मभूमी प्रकरणातील काही महत्वाच्या बाबी. – लेखक : श्री नितीन पालकर ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ श्री रामजन्मभूमी प्रकरणातील काही महत्वाच्या बाबी. – लेखक : श्री नितीन पालकर ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

श्री रामजन्मभूमी प्रकरणातील काही महत्वाच्या बाबी.

  • एक दगडी खांब (एडवर्ड पिलर).
  • एक अपूर्ण नकाशा.
  • एक प्राचीन ग्रंथ (स्कंद पुराण).
  • आणि एक दैवी योगायोग.

१९०२, अयोध्या

फक्त ‘एडवर्ड’ नावाचा ब्रिटीश अधिकारी स्कंद पुराणावर आधारित अयोध्येतील सर्व १४८ तीर्थस्थानांचे सर्वेक्षण करतो. प्रत्येक तीर्थ स्थानामध्ये क्रमांकासह दगडी पाट्या (स्तंभ) उभारून तो त्याच्या संरक्षणाची सूचना देतो.

“हे खांब कोणी हटवल्यास 3000 रुपये दंड आणि 3 वर्षांचा तुरुंगवास अशी शिक्षा दिली जाईल.”

११७ वर्षांनंतर हे स्तंभ भारताच्या इतिहासात महत्त्वाची भूमिका बजावतील याची कोणाला कल्पनाही नव्हती.

२००५, लखनौ

वकील पी.एन.मिश्रा हे स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्यासोबत लखनौहून कलकत्त्याला कारने जात होते. ते  रस्ता चुकतात आणि अयोध्येला पोहोचतात.

अयोध्येत, त्यांना एका साधू भेटतो आणि संभाषणाच्या दरम्यान, ते अयोध्येत किती तीर्थस्थळे आहेत हे विचारतात.

साधू उत्तर देतात – अयोध्येत १४८  तीर्थस्थळे आहेत.

पी.एन.मिश्रा साधूला विचारतात की त्यांना अचूक संख्या कशी माहित आहे. साधू त्यांना सांगतो की १९०२ मध्ये एडवर्ड नावाच्या एका ब्रिटिशाने या सर्व १४८ ठिकाणी खांब उभारले होते. मग साधू पुढे सांगतात की १९८० मध्ये हंस बकर नावाचा इतिहासकार अयोध्येत कसा आला, त्याने सर्वेक्षण केले, शहराबद्दल एक पुस्तक लिहिले आणि अयोध्येचे ५ नकाशे तयार केले.

आश्चर्यचकित झालेले पी.एन.मिश्रा त्यांना एडवर्डने उभारलेले ते दगडी पाट्या (स्तंभ) दाखवायला सांगतात. तिथे त्यांना एक मनोरंजक ‘स्टोनबोर्ड’ दिसला –

Pillar #100.

Pillar #100 हा गणपतीच्या मूर्तीसह ८ फूट खोल विहिरीत होता .

स्तंभ पाहिल्यानंतर पी.एन.मिश्रा कलकत्त्याला रवाना झाले.

२०१९, भारताचे सर्वोच्च न्यायालय

रामजन्मभूमी खटल्याची कार्यवाही सुरू आहे. भगवान रामाच्या जन्माचे नेमके स्थान सिद्ध करण्यासाठी हिंदूंना अडचण येत आहे.

बाबरी मशिदीच्या खाली १२व्या शतकातील मंदिर असल्याचे  The Archaeological Survey of India (ASI) भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) च्या अहवालात सिद्ध झाले, परंतु ते भगवान राम यांचे नेमके जन्मस्थान असल्याचे सिद्ध करण्यात अहवाल अपयशी ठरला.

भारताच्या सरन्यायाधीशांनी  विचारले,  “रामाच्या जन्माचे नेमके स्थान सिद्ध करण्यासाठी तुमच्याकडे काही पुरावे आहेत का?”. 

पी.एन.मिश्रा, जे ‘संत समाजा’चे वकील आहेत त्यांनी उत्तर दिले “होय, स्कंद पुराणात तसे पुरावे उपलब्ध आहेत.”

स्कंद पुराण हा प्राचीन हिंदू धर्मग्रंथ आहे. हा प्राचीन दस्तऐवज आहे ज्यामध्ये हिंदू तीर्थक्षेत्रांच्या सर्व महत्त्वाच्या ठिकाणांची माहिती आहे. येथे सर्व हिंदू तीर्थ स्थानांची भौगोलिक स्थाने आहेत.

भगवान रामाच्या जन्मस्थानाचे नेमके स्थान वैष्णव खंड / अयोध्या महात्म्यामध्ये नमूद केले आहे.

त्यात म्हटले आहे “सरयू नदीच्या पश्चिमेस विघ्नेश्वर आहे, या स्थानाच्या ईशान्येस भगवान रामाचे जन्मस्थान आहे – ते विघ्नेश्वराच्या पूर्वेस, वसिष्ठाच्या उत्तरेस व लौमासाच्या पश्चिमेस आहे”

सरन्यायाधीश म्हणाले,   “स्कंद पुराणात वापरलेली भाषा आम्हाला समजू शकत नाही. आम्हाला समजू शकेल असा काही नकाशा तुमच्याकडे आहे का?

पी.एन.मिश्रा:  “होय. इतिहासकार हंस बकर यांचे एक पुस्तक आहे ज्यामध्ये नकाशे आहेत जे एडवर्ड स्टोनबोर्ड्स (स्तंभ) च्या आधारे तयार केले गेले होते, जे स्कंद पुराणाच्या आधारावर बन ले गेले होते.

सरन्यायाधीशांनी पी.एन.मिश्रा यांना ताबडतोब नकाशासह पुस्तक जमा करण्यास सांगितले.

या नव्या पुराव्यामुळे कोर्टात खळबळ उडाली. 

  • स्कंद पुराणममध्ये जन्मस्थानाच्या अचूक स्थानाचा उल्लेख आहे.
  • एडवर्डने स्कंद पुराणाच्या आधारे १४८ दगडी पाट्या उभारल्या.
  • हंस बेकरने त्या १४८Stone Bords (दगडी पाट्यां)च्या आधारे नकाशा तयार केला.

त्यामुळे हे दोन्ही पूर्ण परस्परसंबंधी  होते… पण एक अडचण होती…

स्कंद पुराणात भगवान रामाचे नेमके जन्मस्थान विघ्नेशच्या ईशान्येला आहे हे लिहिले आहे, परंतु हंस बेकरने जो नकाशा तयार केला होता त्यावर फार स्पष्टपणे चिन्हांकित केलेले नाही. त्यामुळे त्या नकाशावरून भगवान रामाच्या जन्मस्थानाचे स्थान तंतोतंत जुळत नव्हते.

आणि मग या खटल्यातील स्टार साक्षीदार – शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांसाग प्रवेश झाला.

पी.एन.मिश्रा यांनी शंकराचार्यांना बोलावून हे गूढ उकलण्यास सांगितले.

शंकराचार्यांनी अयोध्येला भेट देऊन  हे गूढ उकलले.

शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद हे  साक्षीदार  क्रमांक वादीचा साक्षीदार २०/०२ (Defense Witness 20/02) होते. स्कंदपुराणममध्ये नमूद केलेले ‘विघ्नेश’ हे हंस बकर यांच्या नकाशात दाखवलेले विघ्नेश्‍वर मंदिर नाही, अशी माहिती त्यांनी सर्वोच्च न्यायालयाला दिली.

त्याऐवजी, विघ्नेश हा स्तंभ क्रमांक १०० आहे जेथे विहिरीच्या आत गणेशाची मूर्ती (ज्याला विघ्नेश असेही म्हणतात) आहे.

जेव्हा आपण स्तंभ #१०० विघ्नेश म्हणून घेतो तेव्हा गूढ उकलले जाते.

स्तंभ #१०० ची ईशान्य तीच जागा आहे जिथे हिंदूंचा दावा आहे की भगवान राम यांचा जन्म झाला; आणि ते स्थान इतर सर्व ओळख निकषांना/खुणांना  देखील पूर्ण करते.

न्यायमूर्ती चंद्रचूड हसले आणि म्हणाले, “या लोकांनी राम जन्माचे अचूक स्थान सिद्ध केले आहे.”

अविमुक्तेश्वरानंद यांच्या साक्षीने केस बदलली आणि मुस्लिमांना लक्षात आले ते केस हरले आहेत.  त्यांची केस वाचवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे शंकराचार्यांची साक्ष चुकीची असल्याचे सिद्ध करणे.

मुस्लिमांच्या वकिलांनी  शंकराचार्यांची उलटतपासणी घेण्याची परवानगी मागितली.

मुस्लिमांचे १५  वकील पुढील १०  दिवस अविमुक्तेश्वरानंद यांची उलटतपासणी घेत होते.  शंकराचार्यांनी त्यांच्या सर्व प्रश्नांची अचूक आणि चोख उत्तरे दिली. पाचही न्यायाधीश त्यांचे म्हणणे लक्षपूर्वक  ऐकत होते.

१०  दिवसांनंतर, मुस्लिमांच्या वकिलांनी  प्रतिवाद संपवला. 

अशा प्रकारे, स्कंद पुराण, एडवर्डचे स्टोनबोर्ड (पिलर्स), हंस बेकर नकाशा आणि स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्या साक्षीच्या आधारे सर्वोच्च न्यायालयाने हिंदूंच्या बाजूने निकाल दिला!

के.के. मुहम्मद यांच्या ASI अहवालामुळेच आपल्याला राम मंदिर मिळाले असे बहुसंख्य हिंदूंना वाटते. The Archaeological Survey of India (एएसआय) च्या अहवालाने महत्त्वाची भूमिका बजावली असली तरी या प्रकरणातील निर्णायक टप्पा, प्राचीन ग्रंथ – स्कंद पुराण आणि आपले  धार्मिक गुरु, ज्यांनी या ग्रंथांचा अभ्यास केला आणि त्यातील सत्याची उकल केली. 

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात ‘स्कंद पुराण’ हे नाव ७७ वेळा आले आहे.

२००९ पर्यंत हिंदू न्यायालयात खटला हरत होते. त्यानंतर शंकराचार्यांनी २००९  मध्ये वकील पी.एन.मिश्रा यांची नियुक्ती केली.

पी.एन.मिश्रा म्हणाले की, जर ते २००५ मध्ये रस्ता चुकले नसते  आणि जर तो साधू भेटला नसता, तर ते कोर्टात भगवान रामाचे जन्मस्थान कदाचित  सिद्ध करू शकले नसते.

मला खात्री आहे की हा एक  दैवी योगायोग होता.

जय श्री राम !!! 

आधार :

https://en.wikipedia.org/wiki/Hans_T._Bakker#:~:text=Bakker%20(born%201948)%20is%20a,%2C%20Language%20and%20the%20State%22  

हंस बेकर (जन्म 1948) हे एक सांस्कृतिक इतिहासकार आणि भारतशास्त्रज्ञ आहेत, ज्यांनी ग्रोनिंगेन विद्यापीठात हिंदू धर्माच्या इतिहासाचे प्राध्यापक म्हणून काम केले आहे. त्यांनी ब्रिटिश म्युझियममध्ये “Beyond Boundries: Religion, Region, Language and the State” या प्रकल्पात संशोधक म्हणूनही  काम केले आहे.

लेखक : श्री नितीन पालकर

प्रस्तुती : श्री सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ सुख म्हणजे नक्की काय असतं! – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्रीमती प्रफुल्ला शेणॉय ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ सुख म्हणजे नक्की काय असतं! – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्रीमती प्रफुल्ला शेणॉय ☆

सोलापूर इथल्या एका संस्थेने माझं दोन दिवसांचं मोटिवेशनल शिबिर आयोजित केलं होतं.

विविध वयोगटांतले आणि विविध व्यवसायातले शिबिरार्थी उत्साहाने सामील झाले होते.

शिबिराच्या पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्राचा विषय होता,’आनंदाने कसं जगावं?’

मी साऱ्या शिबिरार्थींना एक कॉमन प्रश्न विचारला आणि नोटपॅडमधल्या कागदावर आपापलं उत्तर लिहून द्यायला सांगितलं.

प्रश्न अगदी साधा होता,

‘सुख म्हणजे काय?’

उत्तरं अगदी भन्नाट होती.

एकाने लिहीलं, निरोगी दीर्घायुष्य म्हणजे सुख.

एकाने लिहिलं, घरात पत्नीने तोंड बंद ठेवणं म्हणजे सुख.

एक उत्तर होतं, सकाळी उठल्यावर संडासला साफ होणं म्हणजे सुख.

एकाचं उत्तर होतं, म्हातारपणी मुलं आधाराला जवळपास असणं म्हणजे सुख.

कुणाचं उत्तर होतं, भरपूर पैसा गाठीशी असणं म्हणजे सुख.

तर कुणी लिहीलं होतं की शरीर धडधाकट असणं म्हणजे सुख.

सुखाच्या प्रत्येकाच्या कल्पना वेगवेगळ्या होत्या.

साऱ्या शंभर शिबिरार्थींच्या सुखाच्या कल्पना जेव्हा मी एकत्र केल्या तेव्हा लक्षात आलं,

प्रत्येकजण कोणत्या तरी एका बाबतीत दु:खी आहे.

म्हणजे कुणाची बायको भांडखोर आहे, कुणाला बद्धकोष्ठाचा त्रास आहे, कुणाची मुलं त्यांच्यापासून दूर आहेत.आणि ती उणीव त्या प्रत्येकाला टोचते आहे.

म्हणजे उरलेल्या नव्व्याणव टक्के बाबतीत तो सुखी आहे.

म्हणजेच काय तर प्रत्येकजण नव्व्याणव टक्के सुखी आहे आणि फक्त एक टक्का दु:खी आहे.

हे केवळ एक टक्का दु:ख आपण चघळत बसतोय आणि उरलेल्या ९९% सुखाकडे दुर्लक्ष करतोय.

आहे की नाही गंमत?

मी जेव्हा त्या साऱ्यांच्या लक्षात ही गोष्ट आणून दिली तेव्हा सारेच चकित झाले.

हीच तर सुखाची गंमत आहे.

आपण सुखात असतो. पण आपण सुखात आहोत हेच आपल्याला माहित नसतं.

जेव्हा काही कारणामुळे त्या गोष्टीची आपल्या आयुष्यात उणीव निर्माण होते तेव्हा आपल्याला कळतं, अरे… एवढा वेळ आपण सुखात होतो.

लहान असताना वाटतं, लहानपण म्हणजे परावलम्बित्व.

केव्हा एकदा मोठे होतोय आणि स्वत:च्या पायावर उभे रहातोय!

मोठं झाल्यावर वाटतं, किती टेन्शन रे बाबा.

प्रत्येक गोष्टीत टेन्शन.

जागा शोधायचं टेन्शन.

कर्जाचे हप्ते भरायचं टेन्शन.

ऑफिसमध्ये साहेबांना तोंड द्यायचं टेन्शन.

त्यापेक्षा बालपण किती सुखाचं होतं.

गृहस्थाश्रमात प्रवेश केल्यावर वाटतं,

‘संसारसंगे बहु कष्टलो मी!’

केव्हा एकदा मुलं मोठी होतायत आणि या जबाबदाऱ्यांतून मोकळा होतोय.

मुलं मोठी  होतात तेव्हा आपण वृद्ध झालेलॊ असतो.आणि गात्रं कुरकुर करू लागतात.

तेव्हा वाटतं, अरे तो बहराचा काळ किती सुखाचा होता!

माझे एक ज्येष्ठ मित्र रवीन्द्र परळकर अलीकडे बऱ्याच दिवसांनी मला भेटले.

शिळोप्याच्या गप्पा झाल्या. म्हटलं,“थोडे वाळलेले दिसताय. बरं नव्हतं की काय?”

तर ते म्हणाले, “प्रोस्टेट्च्या त्रासाने आजारी होतो.काय झालं,  एक दिवस रात्री लघवी कोंडली.प्रोस्टेट ग्लॅंड वाढल्यामुळे त्याचा भार ब्लॅडरवर आला होता आणि लघवीलाच होईना.ओटीपोटावर भार असह्य झाला.मी वेदनांनी गडाबडा लोळू लागलो.अख्खी रात्र पेनकीलर घेऊन काढली.

दुसऱ्या दिवशी फॅमिली डॉक्टरना घरी बोलवलं, तर ते म्हणाले- युरॉलॉजिस्टकडे घेऊन जा.युरॉलॉजिस्टकडे जाऊन ॲडमिट व्हायला दुपारचे अकरा वाजत आलेले.म्हणजे गेले पंधरा सोळा तास मला लघवीला झालं नव्हतं.वेदना असह्य होत होत्या.

ब्लॅडर फुगून पोटातच फुटायची भीती निर्माण झाली होती.शेवटी एकदाचं मला ॲडमिट करुन घेण्यात आलं.आणि ब्लॅडर पंक्चर करुन सर्व युरीन बाहेर काढण्यात आली.त्या क्षणी माझ्या मनात विचार आला,

‘आपल्याला दिवसातून वेळेवर लघवीला होणं ही सुद्धा किती सुखाची गोष्ट आहे.’ “

परळकरांचं उदाहरण हे सुखाच्या शोधात दु:खी असलेल्या प्रत्येकाचं प्रातिनिधिक उदाहरण आहे.

हातपाय धडधाकट आहेत.

दोन घास पोटात जातायत हे सुख नव्हे काय?

 रामराय कृपाळु होऊन पावसा- पाण्यापासून रक्षण करतोय हे सुख नव्हे काय?

घराबाहेर पडल्यावर मागे एक वाट पहाणारं दार आहे, हे सुख नव्हे काय?

’एका लग्नाची गोष्ट’ या प्रशांत दामलेंच्या नाटकातलं गाणं मला आठवतंय,

‘मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं?

काय पुण्य असलं की ते, घरबसल्या मिळतं?’

मित्र हो, जाणिवांच्या खिडक्या सताड उघड्या ठेऊन विचार कराल, तर तुमच्या लक्षात येईल की तुम्ही खूप सुखी आहात.

चला तर मग, सगळ्या तक्रारी उडवून लावा.सारी निराशा झटकून टाका आणि आनंदाने जगू लागा.

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : श्रीमती प्रफुल्ला शेणॉय

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सुमनशैली… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

☆ सुमनशैली… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुमन कल्याणपूर

 (जन्म (२८ जानेवारी १९३७))

पद्मभूषण सुमन कल्याणपूर असं आज लिहिताना सुद्धा खूप छान वाटतंय. मागच्या वर्षी भारत सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली.त्यात सुमनताईंचं नाव बघून खूपच आनंद झाला. खरं म्हणजे खूप आधीच हा पुरस्कार त्यांना द्यायला पाहिजे होता. पण ठीक आहे, “देरसे आये दुरुस्त आये” अशी माझी भावना आहे.

सुमन कल्याणपुर नुसते नाव जरी उच्चारले तरी निर्मळ, शांत, सोज्वळ, सात्विक चेहरा आणि तेवढाच मधुर आवाज आठवतो.

केशवराव भोळे यांच्याकडून त्यांनी हौस म्हणून संगीताचे शिक्षण घ्यायला सुरवात केली.पण त्यात त्यांची वाढणारी आवड बघून त्यांनी उस्ताद खान अब्दुल रहमान आणि गुरुजी नवरंग यांच्या कडून व्यावसायिक शिक्षण घ्यायला सुरवात केली.

त्यांना चित्रकलेचे उत्तम ज्ञान होते म्हणून मुंबईतील अत्यंत प्रतिष्ठित जे.जे.स्कुल ऑफ आर्ट्स मध्ये प्रवेश घेतला व पुढे चित्रकलेचे शिक्षण घेतले.

त्यांचे लग्न रामानंद कल्याणपूर यांच्याशी झाले व सुमन हेमाडीच्या त्या सुमन कल्याणपूर झाल्या.

भारतीय चित्रपटसृष्टी पार्श्वगायनाच्या क्षेत्रात त्यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते आपल्या सुमधुर गायिकेने रसिकांच्या मनांवर त्यांनी अधिराज्य गाजविले. चित्रपट संगीताच्या सुवर्ण काळातील आघाडीच्या संगीतकारांकडे त्यांनी गायलेली एकाहून एक दर्जेदार गीते अजरामर आहेत. हिंदीप्रमाणेच मराठी, आसामी,गुजराथी,कन्नड,भोजपुरी, राजस्थानी, बंगाली, उरीया, तसेच पंजाबी भाषेत गाणी गायली आहेत.

त्यांनी गायिलेल्या मराठी भावगीतांची मोहिनी आजही  मनांवर कायम आहे. सहज तुला गुपित एक व

रात्र आहे पौर्णिमेची

अशी गाणी ऐकली की

अशी भावगीते ऐकली की आपण त्या काळात जाऊन एखादी तरुणी बघू लागतो.

हले हा नंदाघरी पाळणा

अशी गाणी ऐकली की पाळणा म्हणणारी आई समोर येते.

पिवळी पिवळी हळद लागली ऐकले की लग्नातील नववधू समोर येते.

प्रत्येक गाण्यातील शब्दांचे भाव ओळखून गायिलेली गाणी फारच मनात खोलवर घर करतात.असे वाटते आपल्याच भावना व्यक्त होत आहेत.त्यांची सुमन गाणी ऐकतच आमची पिढी त्या गाण्यांबरोबर वाढली आहे.

कृष्ण गाथा एक गाणे हे मीरेचे व क्षणी या दुभंगुनिया घेई कुशीत हे सीतेचे गाणे ऐकताना मीरा व सीता यांचे आर्तभाव जाणवतात.

हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये ठराविक गायिकांची मक्तेदारी असलेल्या काळात स्वतःची ओळख पटवून देण्याचे अत्यंत अवघड काम त्यांच्या स्वरांनी केले.चाकोरीबाहेर जाऊन त्यांच्या स्वरांवर विश्वास ठेऊन संगीतकारांनी त्याच्या कडून गाणी गाऊन घेतली व ती यशस्वी करून दाखवली आहेत.

लता मंगेशकरांच्या व सुमन कल्याणपूर यांच्या आवाजामध्ये विलक्षण साम्य असल्यामुळे ऐकणाऱ्या लोकांची गफलत होत असे.आणि आजही होत आहे. पण त्यांचे नाव देखील मोठेच आहे.

संगीतकार शंकर जयकिशन, रोशन, मदन मोहन, एस.डी. बर्मन, हेमंत कुमार, चित्रगुप्त, नौशाद, एस एन त्रिपाठी, गुलाम मोहम्मद, कल्याणजी आनंदजी आणि लक्ष्मीकांत-प्यारेलाल अशा मोठ्या संगीतकारांबरोबर काम करून त्यांनी स्वतःला सिद्ध करून दाखवले आहे.त्यांची हिंदी चित्रपटातल्या गाण्यांची यादी बरीच मोठी म्हणजे ८०० हुन जास्त गाणी आहेत.

१९५४ पासून तीन दशक सुमन कल्याणपूर यांनी पार्श्वगायन केले आहे. आपल्या स्निग्ध,नितळ गळ्यानं व शांत,मधुर शैलीने गायिलेले कोणतेही गाणे ऐकताना आपण ट्रान्स मध्ये जातो.व ते गाणे जगू लागतो.आवाजातील तरलपणा व माधुर्य तार सप्तकात सुद्धा तीक्ष्ण किंवा कर्कश वाटत नाही.

मराठी मध्ये तर एकाहून एक अप्रतिम गाणी त्यांनी गायली आहेत. त्या मध्ये भक्ती गीत,भाव गीत, सिने गीत या सर्व प्रकारांचा समावेश आहे.

त्यांचा ८१ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पुण्यातील गणेश कलाक्रीडा येथे मुलाखतीचा कार्यक्रम झाला होता.मुलाखत घेणाऱ्या मंगला खाडिलकर यांनी त्यांचा प्रवास अलगद उलगडून दाखवत त्या त्या काळातील गाणी गाऊन घेतली.त्यात एक जाणवले त्यांच्या चेहेऱ्या वरील समाधान व गोडवा पूर्वी पेक्षा अधिकच गहिरा झाला आहे. तोच तसाच मधूर शांत आवाज, त्यांची हसरी मुद्रा आणि मनावर कायम जादू करणारी तिच सुमनशैली !

त्यांना असेच शांत,समाधानी आयुष्य लाभो.

© सुश्री विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ चित्रकारांच्या व्यथा… भाग-१ ☆ श्री सुनील काळे ☆

श्री सुनील काळे

? मनमंजुषेतून ?

☆ चित्रकारांच्या व्यथा… भाग-१ ☆ श्री सुनील काळे 

पाचगणी फेस्टिवल निमित्त तीन दिवस आलेल्या गणेश कोकरे व सिद्धांत पिसाळ यांचे अनुभव  — पाचगणी या ठिकाणी लाईव्ह पेन्सिल स्केच करण्यासाठी आम्हाला आमंत्रित केले गेले होते. फेस्टिवल तीन तारखेला संपला व चार तारखेला सकाळी आम्ही महाबळेश्वर फिरण्याचे ठरविले. नऊच्या सुमारास आम्ही आमचे निसर्ग चित्रणाचे साहित्य बरोबर घेऊन मोटरसायकल वरून निघालो निसर्गाचा आनंद घेत घेत श्री क्षेत्र महाबळेश्वर या ठिकाणी पोहोचलो. गाडी पार्क केली व पायी चालत चालत कृष्णामाई मंदिर या ठिकाणी पोहोचलो. समोरचे निसर्ग सौंदर्य पाहून भारावून गेलो.  माझा विषय ‘वारसा’ असल्यामुळे कृष्णामाई मंदिर मला खूपच आवडले.  त्यामुळे लगेचच मी माझे निसर्गाचित्रणाचे साहित्य काढून एका कोपऱ्यामध्ये मंदिराचे स्केच करायला सुरुवात केली. कोणत्याही पर्यटकांना त्रास होणार नाही याचीही काळजी घेऊन मंदिर पूर्ण दिसेल अशा ठिकाणी बसलो. चित्र काढण्यात मग्न झालो सुंदर असा ठेवा समोर असल्यामुळे त्याचे चित्र रेखाटण्यात खूप आनंद होत होता माझ्याबरोबर सिद्धांत  होता तो ही एका कोपऱ्यात बसून चित्र काढत बसला होता जवळजवळ वीस मिनिटे आम्हा दोघांनीही मंदिराचे पेन्सिल स्केच केले माझे स्केच पूर्ण झाल्यामुळे मी जलरंगात रंगविण्यासाठी माझी पॅलेट व रंग बाहेर काढले रंगाला सुरुवात करणार तेवढ्यात लोंढे मॅडम आल्या व म्हणाल्या तुम्हाला या ठिकाणी चित्र काढता येणार नाही त्यांनी बंद करण्यास सांगितले काढलेले स्केच पुसून टाका असी तंबी दिली. मी छान चित्र झाल्यामुळे त्यांना विनंती केली चित्र काढायला कुठेही बंदी नसते पर्यटक सुद्धा फोटो काढत आहेत चित्र काढणे हा गुन्हा नाही. त्या खूपच भडकल्या चित्र पुसता येत नाही बहुतेक तुम्हाला म्हणून त्यांनी स्वतः खोडरबर हातात घेतला व चित्र खोडून काढले .मग चित्र पुसल्यावर तुम्ही इथे थांबू नका नाहीतर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे धमकावले व आम्हाला हाकलून दिले आम्ही त्यांना विनंती करत होतो तुम्ही आम्हाला स्थानिक पातळीवर परवानगी मिळवून द्या त्यांना आमचे कार्डही दिले मी कास पठार परिसरातील रहिवासी आहे ओळखपत्रही दाखवले फोन मधील मंदिरांची चित्रही दाखविली त्यांनी काहीही ऐकून घेतले नाही. चित्र काढू नका असा बोर्डही नाही म्हणाल्यावर त्यांनी आम्हाला तिथे थांबूच नका असे सांगितले मुंबईवरून परवानगी आणा असे सांगितले आम्ही त्यांच्याकडून लोंढे सरांचा नंबर घेतला त्यांनाही फोन केला परंतु त्यांनीही उलट सुलट उत्तरे देऊन फोन बंद केला आम्ही आमचे साहित्य गोळा केले पुसलेले स्केच घेऊन त्या ठिकाणाहून निघून गेलो.

. . . . 

क्षेत्र महाबळेश्वर (कृष्णामाई मंदिर) या ठिकाणी चित्र काढत असताना आलेला एक अनुभव 

— गणेश तुकाराम कोकरे 

शिक्षण : G.D.Art 

व्यवसाय : चित्रकार (सातारा)  

काही दिवसांपूर्वी मला व्हॉटसॲपवर माझ्या सातारा येथील या चित्रकार मित्राने हा मेसेज पाठवला . खूप वाईट वाटले . शासकीय व्यवस्थेविषयी खूप राग , संताप आला . हतबलता आली .मग जेष्ठ चित्रकार वासुदेव कामत , गायत्री मेहता यांच्याशी फोनवर बोललो . पण सर्वांना आलेले अनुभव सारखेच होते . सत्तेपुढे शहाणपण चालत नाही . मला सांगा या मंदिराचे प्रोफेशनल कॅमेऱ्याने फोटो काढले तर चालतात , व्हिडीओ शुटींग केले तरी चालते मग चित्रकाराने चित्र काढले तर काय त्रास होतो? एखादया चित्रकाराची दोन चार तासाची मेहनत खोडून टाकणारे हात किती अरसिक , असंस्कृत , क्रूर असतील .

एकदा सकाळी फिरत असताना मेणवलीच्या वाड्याजवळ 4 “x 6 ” इंच इतक्या छोट्या आकाराचे पेनमध्ये स्केच करत होतो . इतक्यात केअरटेकर बाई आली.  तिने चित्रकाम अर्ध्यातच आडवले . अशोक फडणीसांची परवानगी घ्यावी लागेल म्हणाली म्हणून फोन केला तर फडणीस म्हणाले चित्रकार येतात , चित्र काढतात, प्रदर्शनात मांडतात, लाखो रुपये कमवतात मग आम्हाला काय मिळणार ? मी म्हणालो तुम्हाला शुटींगचे दिवसाला एक लाख रुपये मिळतात , वाडा पाहण्यास येणाऱ्या पर्यटकांकडून तीस रुपये गाडी पार्किंगचे व पन्नास रुपये प्रवेशमूल्य घेता मग चित्रकारांकडून पैसे का घेता ? तर म्हणाले आता प्रथम अर्ज करा नंतर चित्राची साईज , कोणत्या माध्यमात चित्र काढले आहे ते तपासून विक्रीची किंमत पाहून आमचे कमीतकमी पाचहजार तरी द्या व लेखी परवानगी घेऊन अर्ज देवूनच नंतर चित्र काढायला या. मग तेथे लगेच चित्रकाम थांबवले .परत वाड्यात व मेणवली घाटावर खास चित्र काढायला गेलोच नाही . 4 ” x 6″ इंचाच्या छोट्या पेनने रेखाटलेल्या चित्राची किंमत किती असते ? मी मलाच प्रश्न विचारला ? खरंच चित्रकाराला रोज पाच हजार रुपये मिळाले असते तर तो किती श्रीमंत झाला असता ? अशी रोज चित्रे घेणारा कोणी मिळाला तर मी रोज घाटावरच चित्र काढत बसलो असतो . किती चित्रकार करोडपती झाले याचे अशोक फडणीसांनी संशोधन ,सर्वे  केला पाहिजे तरच खरी  चित्रकार मंडळी कोणत्या परिस्थितीत जगतात हे त्यांनां कळेल .

खरं तर तो चित्रकार त्या रेखाटनातून आनंद मिळवतो . त्याच्या रियाजाचा अभ्यासाचा तो एक भाग असतो . शिवाय आपल्या चित्रातून तो स्पॉट ते ठिकाण अजरामर करतो. तो ऐतिहासिक ठेवा होतो . नंतर कितीतरी वर्षांनी ते स्केच , चित्र एक महत्वाचे डॉक्यूमेंटच ठरते .

पण पैसा महत्वाचा ठरतो . लालफितीच्या सरकारी नियमांविषयी तर काय बोलावे ? आता घाटावर वॉचमन असतो . मोबाईलने फोटो काढले तर चालतात पण मोठा कॅमेरा दिसला की तो अडवतो , प्रथम पाचशे रुपये द्यावे लागतात मग कितीही फोटो काढले व्हिडीओ शुटींग केले तरी चालते. हा मेणवलीचा एक अनुभव सांगतोय असे कितीतरी त्रासदायक अनुभव माझ्या मनात साचलेले आहेत .अनेक कलाकारानां असे अनुभव येत असतात .

एक चित्रकार प्रथम स्पॉटवर जाणार , त्याचे निरिक्षण व अभ्यास करणार , नंतर चित्रांचे सामान आणून संपूर्ण दिवसभर भटकत वेगवेगळ्या अँगलने रेखाटन करणार व नंतर एक फायनल रंगीतचित्र तयार करणार . या कष्टांचे मोल समजणारी माणसे संपली की काय असे वाटते . 

प्रदर्शन करणे म्हणजे एक लग्नकार्य करण्यासारखे असते . मुंबईत प्रथम दोनचार वर्ष बुकींग करून अगोदरच पैसे भरून मिळेल ती तारीख स्विकारावी लागते कारण आपल्याला सोयीच्या मुहूर्तावर हव्या त्या तारखा तर कधी मिळत नाहीत . ते देतील ती तारीख घ्यावी लागते . मग तो भर पावसाळा असो की ऑफ सिझन असो . प्रथम चित्र तयार करायची . त्यासाठी हार्डबोर्ड , ग्लास , माऊंटींग करून फ्रेमिंग करून घ्यायचे . फ्रेमर्सकडे तेवढी जागा नसते म्हणून चित्रे परत घरी आणायची .प्रवासात नुकसान होऊ नये म्हणून बबलशीटमध्ये परत पॅकींग करायची . मग प्रदर्शनाची निमंत्रणपत्रिका किंवा रंगीत ब्रोशर्स छापायचे नंतर बायर्स लिस्ट मिळवून सर्वानां पोस्टाने किंवा कुरीअरने पाठवायचे . प्रदर्शनाचे उद्‌घाटन करण्यासाठी मुख्य अतिथी शोधायचे..  त्या कार्यक्रमांची तयारी करायची . 

– क्रमशः भाग पहिला 

© श्री सुनील काळे

संपर्क – 32, निसर्ग बंगला, मेणवली रोड, स्वप्नपूर्ती मंगल कार्यालयाजवळ, मु .पो. भोगाव, ता. वाई, जि.सातारा – ४१२८०३. 

मेल : [email protected]

मोब. 9423966486, 9518527566

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ जो लौट के घर ना आए… – लेखक : कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ☆ अनुवाद – श्री मेघःशाम सोनवणे ☆

श्री मेघःशाम सोनवणे

? इंद्रधनुष्य ?

जो लौट के घर ना आए… – लेखक : कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ☆ अनुवाद – श्री मेघःशाम सोनवणे ☆

गेल्या महिन्यात आम्ही दीव-सोमनाथ-द्वारका अशी सहल करून आलो. कोणत्याही सहलीपूर्वी त्या-त्या ठिकाणांची थोडीफार माहिती वाचूनच आम्ही निघतो. त्यामुळे, दीवमध्ये भारतीय नौदलाच्या आय.एन.एस. खुकरी या जहाजाचे स्मारक असल्याची माहिती मला नव्यानेच समजली. 

डिसेंबर १९७१ च्या भारत-पाक युद्धात ‘आय.एन.एस. खुकरी’ हे जहाज बुडाले होते. त्या वेळी मी सातारा सैनिक शाळेत शिकत होतो. एके दिवशी, सकाळच्या असेंब्लीमध्ये आमचे प्राचार्य, लेफ्टनंट कर्नल पुरी यांनी आमच्या शाळेचा माजी विद्यार्थी, सबलेफ्टनंट अशोक पाटील याला श्रद्धांजली वाहिली होती. ‘आय. एन.एस. खुकरी’ सोबतच जलसमाधी मिळून तो हुतात्मा झाल्याची कथा आमच्या एका सरांनी नंतर आम्हाला सांगितली होती. यंदाच्या सहलीनिमित्ताने या दुःखद घटनांची उजळणी तर झालीच, पण त्याबद्दलची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवावी असेही मला वाटले. 

१९५९ साली, भारतीय नौदलाने इंग्लंडकडून तीन पाणबुडीप्रतिरोधक ‘फ्रिगेट’ जहाजे विकत घेतली होती. खुकरी, कृपाण, आणि कुठार अशी नावे त्या जहाजांना देण्यात आली. शत्रूच्या पाणबुडीचा माग काढण्यासाठी वापरली जाणारी ‘सोनार’ यंत्रणा त्या जहाजांमध्ये बसवलेली होती. त्यामुळे, अडीच किलोमीटर परिघाच्या आत असलेल्या शत्रूच्या एखाद्या पाणबुडीचे नेमके ठिकाण निश्चित करून तिला उडवणे शक्य होते. पण त्या ‘सोनार’ यंत्रणेची २५०० मीटर ही क्षमता खूपच कमी होती. त्या काळी त्याहून अधिक पल्ल्याच्या ‘सोनार’ यंत्रणा उपलब्ध होत्या. भारताने इंग्लंडला विनंती केलीही होती की किमान मध्यम पल्ल्याची ‘सोनार’ यंत्रणा तरी आम्हाला दिली जावी. परंतु, इंग्लंडने साफ नकार दिला. त्यांचे म्हणणे होते की फक्त नाटो करार केलेल्या देशांनाच ती यंत्रणा ते देऊ शकत होते. भारत तटस्थ राष्ट्र असल्याने भारताला ती मिळू शकणार नव्हती. संरक्षण साधनांच्या बाबतीत आत्मनिर्भर असण्याचे महत्व तत्कालीन राज्यकर्त्यांना समजले असेल, किंवा नसेलही. परंतु, पुढे डिसेंबर १९७१ मध्ये घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने ते ठळकपणे अधोरेखित झाले.  

२३ नोव्हेंबर १९७१ रोजी पाकिस्तानने आणीबाणीची घोषणा केल्यानंतर भारत-पाक सीमेवर युद्धाचे ढग गोळा होऊ लागले. भारताची सशस्त्र दले तेंव्हापासूनच संपूर्णपणे सज्ज होती. पाकिस्तानी नौदलाचे मुख्यालय आणि पुष्कळशा युद्धनौका कराची बंदरामध्ये होत्या. त्यामुळे तिथे पाकिस्तानने कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. दीवजवळच्या ओखा बंदरापासून कराची बंदर खूप जवळ होते. तेथूनच कराची बंदरात होणाऱ्या सर्व हालचालींवर भारतीय नौदलाची बारीक नजर होती.  

३ डिसेंबर १९७१ च्या संध्याकाळी पाकिस्तानने भारताविरुद्ध युद्ध पुकारले. भारतीय नौदलानेही तातडीने ‘ऑपरेशन ट्रायडंट’ ही पूर्वनियोजित मोहीम हाती घेतली. ‘निःपात’, ‘निर्घात’ आणि ‘वीर’ नावाच्या तीन मिसाईल बोटी, सोबत ‘किलतान’ व ‘कच्छल’ नावाच्या दोन पाणबुडीप्रतिरोधक ‘कॉर्वेट’ बोटी, आणि ‘पोषाक’ नावाचे एक तेलवाहू जहाज, अशा सहा जहाजांच्या गटाने ४ डिसेंबरच्या रात्री कराची बंदरावर जबरदस्त हल्ला चढवला. पाकिस्तानी नौदलाची तीन मोठी जहाजे, व एक मालवाहू जहाज बुडाले आणि कराची बंदरात असलेला संपूर्ण तेलसाठा नष्ट झाला. 

‘ऑपरेशन ट्रायडंट’ राबवणाऱ्या सहा बोटींच्या पाठीशी भारतीय नौदलाच्या पश्चिमी कमांडचे संपूर्ण आरमार समुद्रात सज्ज होते. परंतु, पाकिस्तानी नौदलाची ‘हंगोर’ नावाची एक पाणबुडी अरबी समुद्रात गुपचूप संचार करत होती. खरे पाहता, भारतीय जहाजांच्या हालचालींचा सुगावा लागताच ‘हंगोर’ ने पाकिस्तानी नौदलाला रेडिओवरून त्याची माहिती दिली होती. परंतु, त्या माहितीचा काहीही उपयोग होण्याच्या आतच भारतीय नौदलाने ‘ऑपरेशन ट्रायडंट’ यशस्वीपणे राबवले होते. 

पाकिस्तानी नौदलाच्या ‘हंगोर’ पाणबुडीने घाईघाईत पाठवलेला तो रेडिओ संदेश भारतीय नौदलानेही टिपला होता. त्यामुळे हे समजले होते की भारतीय किनाऱ्याजवळ शत्रूची एक पाणबुडी कार्यरत आहे. त्या पाणबुडीला शोधून नष्ट करण्यासाठी आय.एन.एस. ‘खुकरी’ व आय.एन.एस. ‘कृपाण’ ही जहाजे अरबी समुद्रात फिरत होती. 

पाकिस्तानी नौदलाने १९६९ च्या सुमारास फ्रेंचांकडून तीन पाणबुड्या विकत घेतल्या होत्या. ‘हंगोर’ ही त्यापैकीच एक. ‘डॅफने’ क्लासच्या त्या अत्याधुनिक पाणबुड्यांमधील ‘सोनार’ यंत्रणेचा पल्ला होता २५००० मीटर, म्हणजेच ‘खुकरी’ आणि ‘कृपाण’ जहाजांमधल्या सोनार यंत्रणेच्या दहा पट! त्यामुळे, ‘खुकरी’ आणि ‘कृपाण’ जेंव्हा ‘हंगोर’च्या मागावर निघाल्या तेंव्हाच दैवाचे फासे उलटे पडायला सुरुवात झाली होती. ‘हंगोर’ ची शिकार करायला आलेली आपली दोन जहाजे नकळतपणे स्वतःच ‘हंगोर’ चे सावज बनलेली होती. 

९ डिसेंबर १९७१च्या त्या काळरात्री, दोन्ही जहाजांच्या हालचाली शांतपणे टिपत ‘हंगोर’ पाण्याखाली दबा धरून बसलेली होती! 

आपल्या दिशेने येत असलेली दोन्ही जहाजे भारतीय नौदलाच्या युद्धनौकाच असल्याची खात्री पटताच, ‘हंगोर’ने त्यांच्या दिशेने एकापाठोपाठ एक असे तीन टॉर्पेडो (पाण्याखालून मारा करणारे बॉम्ब) सोडले. पहिला टॉर्पेडो  ‘कृपाण’च्या खालून निघून गेला, पण तो फुटलाच नाही. 

आपल्या दिशेने कुठूनतरी टॉर्पेडो मारला गेल्याचे ‘खुकरी’ आणि ‘कृपाण’ च्या कप्तानांना समजले. परंतु, तो हल्ला करणाऱ्या पाणबुडीचे नेमके ठिकाण त्यांना कळायच्या आतच दुसऱ्या टॉर्पेडोने ‘खुकरी’च्या दारुगोळ्याच्या कोठाराचा वेध घेतला. एक जबरदस्त स्फोट होऊन ‘खुकरी’ दुभंगली. तिसरा टॉर्पेडो ‘कृपाण’ च्या दिशेने येत होता. परंतु, ‘कृपाण’ ने अचानक दिशा बदलून वेग वाढवल्यामुळे तिचे फारसे नुकसान झाले नाही. 

‘खुकरी’ फुटताच, तिच्यासोबत आपल्या अनेक शूर सैनिकांना जलसमाधी मिळणार याचा अंदाज, ‘खुकरी’ चे सर्वेसर्वा, कॅप्टन महेंद्रनाथ मुल्ला यांना आला. अवघ्या काही मिनिटांचाच अवधी हातात होता. बोटीच्या आत कार्यरत असलेल्या अधिकारी व नौसैनिकांना आपला जीव वाचवण्यासाठी तो अवधी अत्यंत अपुरा होता. कॅप्टन मुल्ला जहाजाच्या सर्वात वरच्या भागात, म्हणजे ‘ब्रिज’वर होते. त्या कठीण परिस्थितीत धीरानेच, परंतु अतिशय तत्परतेने, जहाज सोडण्याचा आदेश ते रेडिओद्वारे सर्वांना देत होते. “जाओ, जाओ” हे त्यांचे रेडिओवरचे शब्द ‘हंगोर’च्या पाकिस्तानी रेडिओ ऑपरेटरने टिपले होते, असे पाकिस्तानी युद्ध अहवालातसुद्धा नमूद केलेले आहे. 

जहाजाच्या ब्रिजवर असलेले दोन अधिकारी, लेफ्टनंट कुंदन मल आणि लेफ्टनंट मनू शर्मा यांच्या हाती स्वतः लाईफ जॅकेट कोंबून, कॅप्टन मुल्लांनी त्यांना अक्षरशः बाहेर ढकलले. कॅप्टन मुल्लांनीही त्यांच्यासोबत पाण्यात उडी घ्यावी असे लेफ्टनंट मनू शर्मा वारंवार सुचवत होते, परंतु कॅप्टन मुल्लांनी स्पष्ट नकार दिला. 

काही वर्षांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत, तत्कालीन लेफ्टनंट मनू शर्मा यांनी ‘खुकरी’ च्या अखेरच्या दृश्याचे वर्णन केले आहे. आपण ते दृश्य जर आज डोळ्यासमोर आणले तर निश्चित आपल्या डोळ्यात पाणी उभे राहील, पण त्याचबरोबर आपली छाती अभिमानाने भरूनही येईल !

हळूहळू पाण्याखाली जात चाललेल्या ‘खुकरी’ च्या ब्रिजवर कॅप्टन महेंद्रनाथ मुल्ला शांतपणे उभे होते! 

‘हाताखालचा शेवटचा नौसैनिक जोवर सुखरूप बाहेर पडत नाही तोवर कप्तानाने जहाज सोडायचे नाही’ हे नौदलाचे ब्रीद, कॅप्टन महेंद्रनाथ मुल्ला शब्दशः ‘जगले’ होते!

भारत सरकारने मरणोपरांत महावीर चक्र देऊन, कॅप्टन महेंद्रनाथ मुल्ला यांचा यथोचित सन्मान केला. आपल्या कप्तानाचा शेवटचा आदेश ऐकून ज्यांनी समुद्रात उडी घेतली असे ६७ जीव वाचले. कित्येकांना तो आदेश पाळण्याइतकीही सवड मिळाली नाही. 

‘आय.एन.एस. खुकरी’ आणि कॅप्टन मुल्लांसोबत जलसमाधी घेतलेल्या १८ अधिकारी व १७६  नौसैनिकांची नावे दीव येथील ‘खुकरी  स्मारका’वर सुवर्णाक्षरात लिहिलेली आहेत. त्यातच आमच्या शाळेचा सुपुत्र, सबलेफ्टनंट अशोक गुलाबराव पाटील याचेही नाव आहे. त्या सर्व वीरांना सलामी देऊनच मी धन्य झालो. 

तुम्हीही कधी दीवला गेलात तर त्या वीरांपुढे नतमस्तक व्हायला विसरू नका !

लेखक : कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)

मो  9422870294

प्रस्तुती – मेघःशाम सोनवणे

मो 9325927222

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ देण्याचा व घेण्याचा दिवस… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

देण्याचा व घेण्याचा दिवस… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

देण्याचा व घेण्याचा दिवस (Day of GIVING & RECEIVING)

निसर्गा कडे सगळ्या गोष्टी भरपूर आहेत. निसर्ग आपल्याला द्यायला पण तयार असतो.पण निसर्गाचा एक नियम असतो.जो पर्यंत तुम्ही काही देत नाही तो पर्यंत निसर्ग पण काही देत नाही. निसर्गाची मागणी खूप कमी असते.तुम्ही एक धान्याचा दाणा द्या.निसर्ग हजारो दाणे देतो.एक बी लावा.निसर्ग जंगल देतो.हाच नियम सगळीकडे असतो.थोडक्यात आपल्याला जे हवे असते त्याचे दान करावे.उदाहरण म्हणजे पूर्वीची दानाची पद्धत आठवून बघू.पूर्वी कोणकोणत्या वस्तू दान दिल्या जात असत ?

समजा एखाद्याला डोळ्यांचा प्रॉब्लेम असेल तर त्याने चष्मे द्यावेत.डोळ्यांच्या हॉस्पिटल साठी दान द्यावे.ज्यांना पायाचा त्रास असेल त्यांनी काठी किंवा पायाचे बेल्ट दान करावेत.

दाना साठी हेतू महत्वाचा असतो.

सवय लागे पर्यंत ती गोष्ट लक्ष पूर्वक करावे लागते. पोहणे शिकताना जसे सुरुवातीला प्रत्येक कृतिकडे लक्ष द्यावे लागते नंतर ती कृती आपोआप होते.तसेच दानाचे पण आहे.एकदा दानाची सवय लागली की ते निर्व्याज होते.

दान हे फक्त पैशाचेच नसते. दान कशाचे करता येईल ते बघू.

▪️फुल,चॉकलेट,पेन, पेन्सिल,रुमाल कोणतीही छोटी वस्तू

▪️ आनंद,कौतुक, सहानुभूती,सदिच्छा.

▪️ जमेल तशी मदत करणे

▪️ सोबत करणे.

▪️ शिकवणे

▪️ रस्त्यात मदत करणे

काही जण एक नियम पाळतात.आपल्या कमाईचा एक दशांश भाग गरजू व गरिबांना दान करतात.त्यातून जी सकारात्मक ऊर्जा व आशीर्वाद मिळतात त्यामुळे पैशाचा ओघ वाढतो.

दानाचे प्रकार पुढील प्रमाणे आहेत.

हे प्रकार कनिष्ठ दाना पासून उच्च दाना पर्यंत आहेत.

१) मनात नसताना ( नाईलाजाने ) दान करणे. – सर्वात कनिष्ठ.

२) आनंदाने दान करु शकतो त्या पेक्षा अगदी कमी दान करणे.

३) मागितल्यावर दान करणे.

४) याचना करण्या पूर्वी किंवा मागण्या पूर्वी देणे

५) कोणाला देत आहोत त्याचे नाव माहिती नसणे.

६) घेणाऱ्याला कोण देतो हे माहिती नसणे.

७) देणारा व घेणारा दोघांचेही नाव एकमेकांना माहिती नसणे.

८) असे दान की ज्या मुळे एखादी व्यक्ती स्वावलंबी होणे. हे सर्वोत्तम दान आहे.

एक उदाहरण बघू.आठवड्यातून एक दिवस असे करु शकतो.५०/१०० रुपयाचे ५ किंवा १० रुपयात रूपांतर करायचे.व एकेक नोट कुठेही ठेवायची.थोडक्यात आपण पैसे ठेवले आहेत हे विसरुन जायचे.आणि नोटा ठेवताना मनात एकच भावना ठेवायची ती म्हणजे ही नोट ज्याला मिळणार आहे, त्याचे कल्याण व्हावे व त्याला आनंद मिळावा.

यात देणारा व घेणारा दोघेही एकमेकांना ओळखत नसतात.यातून काय साध्य होईल?तर आनंद आपल्याकडे येईल.कारण त्या प्रत्येक नोटे बरोबर आपण आनंदाचे दान केले आहे. आणि निसर्ग नियमा नुसार एकाचे अनेक पण आपल्याकडे येतात.त्यामुळे अनेक पटीने आनंद आपल्याकडे येणार आहे.अनुभव घेऊन तर बघू या.

जी गोष्ट देण्याची तिच गोष्ट घेण्याची.आपण शक्यतो काही घ्यायला नको म्हणतो.अगदी कोणी नमस्कार करु लागले तरी नाकारतो.तसे करु नये.छान नमस्कार घ्यावा व तोंड भरून सदिच्छांचा आशीर्वाद द्यावा.कोणी काहीही दिले तरी ते तितक्याच चांगल्या मनाने स्वीकारावे.व चांगल्या शुभेच्छा द्याव्यात,धन्यवाद द्यावेत.आपल्याला जर रस्त्यात बेवारस काही वस्तू,पैसे सापडले तर आपण आधी कोणाचे आहे याचा शोध घेतो.जर कोणी आसपास नसेल तर लगेच असा विचार करतो की हे कोणाला तरी देऊन टाकू,पैसे असतील तर दानपेटीत टाकण्याचा विचार येतो.त्या पेक्षा त्या वस्तू/पैसे जवळ ठेवावेत आणि ज्याचे असेल त्याला सुखी व आनंदी ठेवा असे म्हणावे.

हेच ते देण्याचे व घेण्याचे नियम!

हे अमलात कसे आणायचे याची कृती बघू.

▪️ आज भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला काहीतरी भेट देईन.

▪️ जे मिळेल त्याचा मनापासून व आनंदाने स्वीकार करेन.

▪️ आज कोणाच्या विषयी किंतू ठेवणार नाही.

▪️ आज भेटणाऱ्या प्रत्येका विषयी काळजी,सहानुभूती,सहृदयता बाळगेन व तसेच वर्तन करेन.

▪️ आज सगळ्यांशी हसून,मार्दवतेने वागेन.

▪️ आज सगळ्यांशी प्रेमाने वागेन.

असा आठवड्यातून एक दिवस ठेवायचा.आणि येणाऱ्या आनंदाला व भरभराटीला समोरे जाऊन स्वीकार करायचा.

तुम्ही हे नक्की आनंदाने करणार!

धन्यवाद!

© सुश्री विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ विश्रांतीचा पार जुना – कवी : सुहास  रघुनाथ  पंडित ☆ रसग्रहण.. सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? काव्यानंद ?

☆ विश्रांतीचा पार जुना – कवी : सुहास  रघुनाथ  पंडित ☆ रसग्रहण.. सौ राधिका भांडारकर ☆

☆ – विश्रांतीचा पार जुना – कवी : सुहास  रघुनाथ  पंडित ☆

पाशही सगळे सोडू मोकळे चल जाऊया दूर तिथे

तुझे माझे, देणे घेणे, नसतील असले शब्द जिथे

नसेल खुरटे घरटे अपुले बंद ही नसतील कधी दारे

 स्वच्छ मोकळ्या माळावरुनी वाहत येतील शीतल वारे

आशंकेला नसेल जागा नसेल कल्लोळ कुशंकांचे

परस्परांच्या विश्वासावर परस्परांना जिंकायाचे

चिऊकाऊच्या गोष्टी सांगत पिल्ले येतील चिऊ काऊची

मनात तेव्हा फडफड करतील सोनपाखरे आठवणींची

धकाधकीच्या जीवनातले कण शांतीचे वेचून घेऊ

तुडुंब भरले कुंभ सुखाचे हासत पुढच्या हाती देऊ

 खूप जाहले खपणे आता जपणे आता परस्परांना

खूप जाहला प्रवास आता गाठू विश्रांतीचा पार जुना

 – श्री सुहास रघुनाथ पंडित

(प्रेम रंगे, ऋतुसंगे या काव्यसंग्रहातून)

पती-पत्नीच्या नात्यात संध्या पर्व हे जीवनाच्या किनाऱ्यावरचे साक्षी पर्वच असते. आयुष्याकडे मागे वळून पाहताना खूप काही मिळवलं आणि खूप काही गमावलं असं वाटू लागतं.  हरवलेल्या अनेक क्षणांना गवसण्याची हूरहुरही लागते.  “पुरे आता, उरलेलं आयुष्य आपण आपल्या पद्धतीने जगूया की..” असे काहीसे भाव मनात उमटतात.

याच आशयाची सुप्रसिद्ध कवी श्री सुहास पंडित यांची ही कविता. शीर्षक आहे विश्रांतीचा पार जुना*

ही कविता म्हणजे आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यावर पती-पत्नींचे  एक मनोगत आहे. मनातलं काहीतरी मोकळेपणाने आता तरी परस्परांना सांगावं या भावनेतून आलेले हे विचार आहेत.

पाश ही सगळे सोडू मोकळे चल जाऊया दूर तिथे

तुझे माझे देणे घेणे नसतील असले शब्द जिथे

बंधनात, नियमांच्या चौकटीतल्या आयुष्याला आता वेगळ्या वाटेवर नेऊया. आता कसलेही माया— पाश नकोत, कसलीही गुंतवणूक नको. तुझं माझं दिल्या घेतल्याच्या अपेक्षांचं ओझंही नको, अशा मुक्त ठिकाणी आता दूर जाऊया.

नसेल खुरटे घरटे अपुले बंदही नसतील कधी दारे

स्वच्छ मोकळ्या माळावरती वाहत येतील शीँँतल वारे

आज पर्यंत आपल्या भोवतीचं वातावरण खूप संकुचित होतं. कदाचित जबाबदार्‍यांच्या ओझ्यामुळे, मर्यादित आर्थिक परिस्थितीमुळे असेल आपल्याला काटकसरीने राहावं लागलं, आपल्याकडे कोण येणार कोण नाही याचे तारतम्यही ठेवावे लागले, आपल्याच मनाची दारे आपणच बंद ठेवली, मनाला खूप मारलं पण आता मात्र आपण आपल्या मनाची कवाडे मुक्तपणे उघडूया, आपल्या जगण्याचे वावर आता मोकळं आणि अधिक रुंद करूया जेणेकरून तेथे फक्त आनंदाचेच स्वच्छ आणि शीतल वारे वाहत राहतील.  मनावरची सारी जळमटं, राग —रुसवे, मतभेद, अढ्या दूर करूया.

आशंकेला नसेल जागा नसेल कल्लोळ कुशंकाचे   

परस्परांच्या विश्वासावर परस्परांना जिंकायाचे

एकमेकांविषयी आता कसल्या ही शंका कुशंकांचा गोंधळ नको.  इथून पुढे विश्वासानेच परस्परांच्या नात्याला उजळवूया.  झालं गेलं विसरून एकमेकांची मने पुन्हा जिंकूया,जुळवूया.सगळी भांडणे, मतभेद विसरुन जाऊया.

चिऊकाऊच्या गोष्टी सांगत पिल्ले येतील चिऊकाऊची

मनात तेव्हा फडफड करतील सोन पाखरे आठवणींची

काळ किती सरला!  आपल्या घरट्यातली आपली चिमणी पाखरं आता मोठी झाली उडून गेली पण त्यांच्या पिल्लांनी आता आपल्या घराचं गोकुळ होईल.. पुन्हा,” एक होती चिमणी एक होता कावळा” या बालकथा आपल्या घरट्यात रंगतील आणि पुन्हा एकदा बालसंगोपनाचा आपण भोगलेला तो गोजिरवाणा काळ आपल्यासाठी मनात उतरेल.  या दोन ओळीत उतार वयातील नातवंडांची ओढ कवीने अतिशय हळुवारपणे उलगडलेली आहे आणि आयुष्य कसं नकळत टप्प्याटप्प्याने पुढे सरकत जातं याची जाणीवही दिलेली आहे.

धकाधकीच्या जीवनातले कण शांतीचे वेचून घेऊ

तुडुंब भरले कुंभ सुखाचे हासत पुढच्या हाती देऊ

जीवनातले अत्यंत अवघड खाचखळगे पार केले, दगड धोंड्या च्या वाटेवर ठेचकाळलो  पण त्याही धकाधकीत आनंदाचे क्षण होतेच की!   आता या उतार वयात आपण फक्त तेच आनंदाचे, शांतीचे क्षण वेचूया  आणि सुखानंदांनी भरलेले  हे मधुघट पुढच्या पिढीच्या हातात सोपवूया.

कवीने या इतक्या सोप्या, सहज आणि अल्प शब्दांतून केवढा विशाल विचार मांडलाय! दुःख विसरू या आणि आनंद आठवूया.  भूतकाळात कुढत बसण्यापेक्षा सुखाच्या आठवणींनी मन भरुया आणि हाच आनंदाचा, सुसंस्कारांचा वारसा पुढच्या पिढीला देताना हलकेच जीवनातून निवृत्तही होऊया.  पुढच्या पिढीच्या आयुष्यात आपली कशाला हवी लुडबुड? त्यांचं त्यांना त्यांच्या पद्धतीने जगू दे. आपल्या विचारांचं, मतांचं दडपण आपण त्यांना कां बरं द्यावं ?

पुरे जाहले खपणे आता जपणे आता परस्परांना

खूप जाहला प्रवास आता गाठू विश्रांतीचा फार जुना

किती सुंदर आणि आशय घन आहेत या काव्यपंक्ती! सगळ्यांचं सगळं निस्तरलं, सतत दुसऱ्यांचा विचार केला, त्यांच्यासाठीच राब राब राबलो, कित्येक वेळा याकरिता आपण आपल्या स्वतःच्या सुखालाही पारखे झालो पण आता पुरे झालं! आता फक्त तू मला आणि मी तुला. नको कसली धावाधाव. जरा थांबूया, निवांतपणे  आपल्याच जीवनवृक्षाच्या  पारावर विश्रांती घेऊया. विश्रांतीचा तो पार आपल्याला बोलावतो आहे.

विश्रांतीचा  पार जुना या शब्दरचनेचा मी असा अर्थ लावते की आता निवांतपणे या पारावर बसून विश्रांती घेऊ आणि भूतकाळातल्या जुन्या, सुखद आठवणींना उजाळा देऊ.

संपूर्ण कवितेतील एक एक ओळ आणि शब्द वाचकाच्या मनावर कशी शीतल फुंकर घालते..  शिवाय वृद्धत्व कसं निभवावं, कसं ते हलकं, सुसह्य आणि आनंदाचा करावं हे अगदी सहजपणे साध्या सरळ शब्दात सांगते.

प्रतिभा, उत्पत्ती, अलंकार या काव्य कारणांना काव्यशास्त्रात महत्त्व आहेच. कवी सुहास पंडितांच्या काव्यात या काव्य कारणांची सहजता नेहमीच जाणवते. मनातील संवेदना स्पंदने ते जाता जाता लीलया मांडतात त्यामुळे वाचक, कवी मनाशी सहज जोडला जातो, कुठलाही अवजडपणा,बोजडपणा,क्लीष्टता, काठिण्य त्यांच्या काव्यात नसते.

विश्रांतीचा पार जुना या काव्यातही याचा अनुभव येतो. जिथे —तिथे, दारे —वारे,घेऊ —देऊ यासारखी स्वरयमके या कवितेला लय देतात.

खुरटे— घरटे, कल्लोळ कुशंकांचा, खपणे— जपणे या मधला अनुप्रासही फारच सुंदर रित्या साधलेला आहे.

कुंभ सुखाचे, सोनपाखरे आठवणींची, कण शांतीचे, विश्रांतीचा पार या सुरेख उपमा काव्यार्थाचा धागा पटकन जुळवतात.

मनात तेव्हा फडफड करतील सोन पाखरे आठवणींची या ओळीतील चेतनागुणोक्ती  अलंकार खरोखरच बहारदार भासतो.

खुरटे घरटे ही शब्द रचनाही मला फार आवडली. यातला खुरटे हा शब्द अनेकार्थी आणि अतिशय बोलका आहे. चौकटीत जीवन जगणाऱ्या सामान्य माणसाची मानसिकताच या खुरटे शब्दात तंतोतंत साठवलेली आहे. आणि याच खुरटेपणातून, खुजेपणातून मुक्त होऊन मोकळ्या आभाळाखाली मोकळा श्वास घेण्याचं हे स्वप्न फक्त काव्यातील त्या दोघांचं न राहता ते सर्वांचं होऊन जातं.

या कवितेतला आणखी एक दडलेला भाव मला अतिशय आवडला. तो भाव कृतज्ञतेचा. पतीने पत्नीविषयी दाखवलेला कृतज्ञ भाव. “आयुष्यभर तू या संसारासाठी खूप खपलीस, खूप त्याग केलास, कामाच्या धबगड्यात मीही तुझ्या भावनांकडे दुर्लक्ष केले, तुला गृहीत धरले,पण आता एकमेकांची मने जपूया”संसारात ही कबुली म्हणजे एक पावतीच,श्रमांची सार्थकता,धन्यता!

खरोखरच आयुष्याच्या या सांजवेळी काय हवं असतं हो? हवा असतो एक निवांतपणा, शांती, विनापाश जगणं. दडपण नको ,भार नको हवा फक्त एक विश्रांतीचा पार आणि जुन्या सुखद आठवणींचा शीतल वारा. दोघां मधल्या विश्वासाच्या सुंदर नात्यांची जपणूक..

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares