मराठी साहित्य – विविधा ☆ ‘माझी सुट्टी…’ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

?  विविधा ?

☆ ‘माझी सुट्टी’ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

खूप दिवसांपूर्वीची गोष्ट. दिवस कुठले, वर्षे लोटली. म्हणजे वीस – पंचवीस वर्षे सहज.  आणि गोष्ट म्हणजे काय, तर हकीकत म्हणा, किंवा अनुभव म्हणा.  त्यावेळी मी डी.एड.कॉलेज सांगलीमधे अध्यापन करत होते. मला शिकवायला आवडायचं आणि मुलींमध्ये रामायलाही. तेवढंच तरुण झाल्यासारखं वाटायचं. म्हणजे जॉब सटिस्फॅक्शन वगैरे म्हणतात नं, ते होतं, पण तरीही दिवाळी आणि मे महिन्याच्या सुट्टीचे वेध लागायचेच. तेव्हा सुट्टी लागली, की मी यंव करीन अन् त्यव करीन असे मांडे मनात भाजत आणि खात रहायची. त्यातले काही मांडे असे —

पहाटे लवकर उठून व्यायाम आणि प्राणायाम करणे. सकाळी फिरायला जाणे. हे अगदी मस्टच, मी ठरवलं. सुट्टी असल्यामुळे सगळं आही आरामात आवरायचं, दुपारी पंख्याखाली अडवारायचं आणि मनसोक्त दिवाळी अंक किंवा पुस्तकं वाचायची. संध्याकाळी शेजारणी, सख्या- मैत्रिणी यांच्याकडे जाऊन गप्पांचे फड उठवणे , हाही आखलेला बेत असे. एरवी कॉलेजमधून घरी येताना नजरेच्या टप्प्यात जेवढ्या येतील, त्यांना ‘काय कसं काय?’ विचारणं आणि ‘ठीकय.’ ऐकणं, या पलीकडे संवादाची मजल जात नसे.

पहाटे उठण्यासाठी गजर लागे. आधी घड्याळाचा, नंतरच्या काळात मोबाईलचा. गजर झाला की मनात येई, लवकर उठणं नि नंतरची लगबग नेहमीचीच आहे मेली. आज आरामात पांघरूणात गुरफटून पडून राहण्याचं सुख अनुभवू या. उद्यापासून सुरुवात करू. पण तो उद्या कधी उजाडत नसे. तो ‘आज’ होऊनच उगवे. व्यायाम, प्राणायाम, पक्ष्यांची किलबिल हे सगळं राहूनच जायचं. नाही तरी किलबिल ऐकायला आता शहरात पक्षी राहिलेतच कुठे, मी मनाशी म्हणे. मला आणि मुलांना सुट्टी असे, पण यांना ऑफीस असल्यामुळे यांचा डबा साडे नऊला तयार असणं गरजेचं असे. त्यामुळे सकाळची कामाची धांदल नेहमीसाराखीच करावी लागे, सुट्टी असूनसुद्धा. माझ्याप्रमाणे मुलांनीही सुट्टीचे कार्यक्रम ठरवलेले असायचे. पोर्चमध्ये उभे राहून गप्पा, किंवा मोबाईलवर चॅटिंग, यू ट्यूबवरचे सिनेमे बघणे, घरात पसारे करणे, त्यांच्या सवडीने जेवायला येणे, आई घरात आहे, म्हंटल्यावर आईनेच जेवायला वाढणे, अपेक्षित. त्यातून बाहेर पडले की माझे लक्ष, कपड्यांनी, भांड्यांनी, पुस्तकांनी ओसंडून वहाणार्‍या कपाटांकडे जाई॰ दिवाळीसारखा महत्वाचा सण. घर स्वच्छ, नीटनेटकं नको, असं मला आणि मलाच फक्त वाटे. घरातल्या इतर कुणाला नाही. ही आवारा-सावर होईपर्यंत दिवाळीचे पदार्थ करायचीचे वेळ येई. पणत्या, वाती, उटणं, नवा साबण किती म्हणून तयारी करावी लागायची. दिवाळीच्या दिवसात रोज एक नवीन पक्वान्न हवंच. ‘तुझं गोड नको बाई, काही तरी चमचमीत कर’, अशी मुलांची मागणी. मागणी तसा पुरवठा करायलाच हवा ना, शेवटी आपलीच मुलं. जेवणं- मागचं आवरणं. दुपारचे सहज तीन वाजून जात.  मग एखादा दिवाळी अंक घेऊन फॅनखाली पडावं, तर डोळे मिटू मिटू होत. मासिकातील अक्षरे पुसट होत जात आणि मासिक हातातून कधी गळून पडे, कळतच नसे. नाही म्हणायला, संध्याकाळी शेजारणी, सख्या- मैत्रिणी यांच्याकडे जाऊन गप्पांचे फड उठवणे, हा आखलेला बेत बराचसा तडीला जाई.

दिवाळी येई-जाई. कॉलेज पुन्हा सुरू होई. दिवस- महिने संपत. मार्च उगवे. पोर्शन शिकवून संपलेला असे आणि आता पुन्हा मोठ्या सुट्टीचे वेध लागत. आता मांडे मनात नाही, ताटात घेऊन खायचे, मी नक्की ठरवते. वाटतं, सुट्टीत कुठे तरी फिरून यावं. नवा प्रदेश पहावा. निसर्गाच्या सहवासात काही काळ घालवावा. ताजंतवान होऊन, नवी ऊर्जा घेऊन परत यावं आणि नव्या दमाने, नव्या उत्साहाने नेहमीच्या दिनचर्येला सुरुवात करावी. पण या महिन्यातल्या क्लासचे, परीक्षांचे मुलांचे वेळापत्रक, कधी कुणाचे आजारपण, घरातली, जवळच्या नात्यातील लग्ने या गोष्टी अ‍ॅडजेस्ट करता करता ट्रीपचं वेळापत्रक कोलमडून जाई. दिवाळी काय किंवा उन्हाळी सुट्टी काय, दरवर्षी थोड्या-फार फरकाने असंच काही-बाही होत राहिलं.

दिवस- महिने- वर्षे सरत आली. माझ्यासाठी कॉलेजची शेवटची घंटा वाजण्याची वेळ आली. एकीकडे कासावीस होत असतानाच मी मनाला समजावू लागले,

आता मला सुट्टी मिळणार मिळणार

खूप खूप मज्जा मी करणार करणार.

आता मला खरंच सुट्टी मिळाली आहे. आता आरामात उठायला हरकत नाही. आता साडे नऊच्या डब्याची घाई नाही. मुलांची जबाबदारी पण आता उरलेली नाही. ती आपापल्या नोकरीच्या गावी, आपआपल्या संसारात, मुलाबाळात रमली आहेत. सकाळी आता उशिरा, आरामात उठायचं. मी निश्चय करते. पण काय करू? जागच लवकार येते आणि एकदा जाग आल्यावार नुसतच आंथरूणावर पडून रहावत नाही. पूर्वी पाहिलेली स्वप्ने आता आळोखे- पिळोखे देत जागी होऊ लागली.

आता सकाळी जाग आल्यावर उहून फिरायला जायचं मी ठरवलं.  उत्साहाने जिना उतरू लागले, तर गुढगे आणि कंबर म्हणाली, ‘बाई ग, आता आमचा छळ थांबव!’ कमरेला चुचकारत नवा महागडा कंबरपट्टा आणून तिला नटवलं. गुढग्यांवरही छान उबदार वेष्टण चढवलं. पण त्यांचं तोंड वाकडंच. ते काही बेटे सहकार्य करेनात. शेवटी डॉक्टरांशी बोलले. डॉक्टरांनी क्ष-किरण फोटो काढला. फोटो बघत ते म्हणाले, ‘ आता या गुढग्यांना निरोप द्या काकू! आता नवे गुढगे आणा!’ तसे केले. नवे गुढगे घेऊन आले पण चालताना, इतकंच काय, बसताना, झोपतानाही पायाला वेदना होऊ लागल्या. पुन्हा डॉक्टर. पुन्हा क्ष-किरण फोटो. डॉक्टर म्हणाले, ‘ पाठीच्या कण्याच्या चौथ्या – पाचव्या मणक्यांनी गळामिठी घातलीय, ती सोडवायला हवी. ती सोडवली. मग मात्र माझे पाय वेदनारहित झाले. हळू हळू फिरणं वगैरे जमू लागलं. पण डॉक्टरांनी बजावलं, ‘आता चालताना हातात काठी घ्या.’ आणि एक लोढणं गळ्यात नव्हे हातात आलं.

आता टी.व्ही. बाघायला वेळच वेळ होता. पण हळू हळू लक्षात येत गेलं, आपल्याला सिरियल्समधले संवाद नीट ऐकू येत नाहीयेत. टी.व्ही.च्या जरी जवळ बसलं, तरी फारसा उपयोग होत नाहीये. कानांकडे तशी तक्रार केली, तर ते म्हणाले, ‘आम्हाला गळामिठी घालायला एक सखा आण. त्याचे लाड-कोड पुरवले. पण त्यांचा हा सखा इतका नाठाळ निघाला, सगळा गलकाच ऐकवू लागला. नको ते आवाज मोठ्या प्रमाणात घुमवू लागला. हवे ते दडवून ठेवू लागला. थोडक्यात, हा कांनांचा सखा, असून अडचण अन नसून खोळंबा झाला.   शेवटी मूकपट पाहून नाही का आपण आनंद घेत, तसाच टी.व्ही. बाघायचा, असं ठरवून टाकलं.

आता वाचायला खूप वेळ होता. चांगली पुस्तकेही हाताशी होती. पण—-

इथेही पण आलाच. निवृत्तीपूर्वीच डोळ्यांवर डोळे चढवून झाले होते. ते साथही चांगली देत होते. पण बालहट्टाप्रमाणे त्याचे काही हट्ट पुरवावे लागायचे. बसून वाचायाचं. झोपून वाचायाचं नाही. तसं वाचलंच तर उताणं झोपायचं कुशीवर नाही. हे हट्ट पुरवल्यावर त्याची काही तक्रार नसायची. पण तो डोळयांवरचा डोळा जरी चांगलं काम करत असला, तरी मूळ डोळा अधून मधून म्हणायला लागला, ‘आता मी शिणलो. आता पुरे कर तुझं वाचन!’  मी नाहीच ऐकलं, तर तो सारखी उघड –मीट करत स्वत:ला मीटूनच घ्यायचा.

तर असं हे माझं सुट्टीपुराण. जेव्हा दात होते, तेव्हा चणे नव्हते. आता भरपूर चणे आहेत, तर खायला दातच नाहीत.

© सौ उज्ज्वला केळकर 

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170 ईमेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ जेव्हा शेतात नागीण सळसळली… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ जेव्हा शेतात नागीण सळसळली… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

डांबरी रस्त्याची सडक  जेव्हा गावत नवी नवी आली.. वाटलं काळी नागीणच सळसळ करत चालली…जसा बळीराजाच्या गळ्यात बांधलेला काळा गोफाचा गंडा…तसा गावाच्या गळसरीला चकचकीत काळ्या नागिणीचा कंडा..दोन्ही कडेच्या उभ्या पिकांनी थरथर भीतीने आपली अंग आकसून घेतली.. आणि जी पिकं, तृणपाती नागीणीला मधेच आडवी आली त्यांना आपला फणा उभारून क्षणात आडवे करून गेली… उरलेली लव्हाळी जरळी माना मोडून शरणागती पत्करून भुईसपाट झाली…आडमार्गाचा गाव आला हमरस्ताशी हातमिळवणी करायला… कधीतरी दिवसभरातून एकदा येणारी एस. टी.च्या लागल्या ना चकरा वाढायला… फटफट ती पोलीस पाटलाची नि तलाठ्याची मिजाशीत पळायची तेव्हा.. आता  घराघरातली डौलाने दुडदूडू धावत असते हिरोहोंडावरची नवयौवना…बाजारहाट आठवड्याचा तालुका भरायचा तोच आता ऑनलाईन ऑर्डर करा   माल येईल तुमच्या घरा असं सांगू लागला… शाळा कालेज शिक्षणाची वणवण संपली…घराघरात पदव्यांची प्रमाणपत्रांची तसबिरी लटकली…निशाणी डावा अंगठा निळ्या शाईत साक्षर झाला.. गावाचा विकासाचा सूर्य आता अस्ताला जाण्याचा विसरला…जग आले जवळ किती मुठीत सामावले प्रत्येक हाती… विज्ञानाने साधली प्रगती. .. गावा गावाने आता कात टाकली…आधुनिक वैचारिकतेचे उदंड वारे चोहोबाजूंनी वाहू लागले… सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे…एकदा येणारी संधी आता दारातच ठाण मांडून बसली…यशाच्या पहिल्याच पायरीने अपयशाच्या पायरीला पायतळीच गाडली… यशा सारखे यशच त्याला नाही क्षिती कुणाची… माध्यान्हीचा सूर्य तळपता तळपता पश्चिम दिशेला झुकू लागला…

हळूहळू हळूहळू यशाची धुंदी मनामनावर गारूड करत गेली… अधिक प्रगतीचा सूर्य दुसऱ्या देशात दिसू लागला… आणि आपल्या कतृत्वाचा हिथला वावच संपला…  विमानं डोई  भरभरून उडून गेली परदेशात… ओस पडत गेले गाव आणि डोळ्यातले  दु:खाश्रु माईना  घरा घरात.. विकासाची रोपं पिवळी पडत सुकत गेली कोळपून भुईवर पडली…कधीतरी येतो आंब्याचा मोहर घेऊन वसंताचा ऋतु…अन सारा गाव लोटतो त्याला समजून घालण्यास अरं बाबा ईथं  थांबशील तरी तू… विकास झालाय पोरका तुमच्या शिवाय त्याला कोण विचारणारं तरी आहे का…आता सुखाला चटावलेली मन माघारी फिरणारी असतात का… आणि गावातलं जुनं हाडं गावाची नाळ कापून घ्यायला तयार नसते… अखेरची कुडी या मातीत मिसळून जावी हिच एक इच्छा मनात तिची असते… मागचं सारं सारं एकेक आठवतयं.. पाऊलवाटा, माळरान, मारूतीचं देऊळ, शेताचा बांध, पांदणं…नि आपुलकीची घट्ट माती… जोवर हे सगळं अबाधित होतं  तेव्हा तेव्हा   अन आता डांबरी रस्त्याची सडक  जेव्हा गावत नवी नवी आली तर तर… एखादा चुकार अश्रूचा टिपूस ओघळून जातो…

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मातृवंदना… ☆ सौ. उज्ज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्ज्वला सुहास सहस्रबुद्धे

 ☆ मनमंजुषेतून ☆ मातृ वंदना☆ सौ. उज्ज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

तारखेने 14 जानेवारी, संक्रांत हा माझ्या आईचा जन्मदिन! यावर्षी संक्रांत 15 जानेवारीला आहे म्हणून आज तिचे स्मरण करून वंदन करत आहे…

माझी आई 92 वर्षापर्यंत छान जगली. तिला कोणताही मोठा आजार नव्हता. दोन वर्षांपूर्वी वृद्धापकाळाने तिचे निधन झाले- जसे झाडावरून पिकलेले पान गळून पडावे तसे- आत्ता होती, म्हणेपर्यंत ती शांतपणाने गेली… नाही औषध, नाही हॉस्पिटल, काही नाही… ज्या घरात ती 40 वर्षे राहत होती, ज्या कॉटवर झोपत होती, तिथेच तिने शेवटचा श्वास घेतला.. त्याही गोष्टीला आता दोन वर्षे होऊन गेली!

संक्रांत आणि आईचा वाढदिवस! या दोन्ही गोष्टी लहानपणापासूनच अपूर्वाईच्या वाटायच्या! मध्यमवर्गीय स्तरातील कुटुंब होते आमचे.. वडील सरकारी नोकरीत शिक्षण खात्यात होते. आई शिवणकाम करायची, शिवण क्लास घ्यायची आणि त्यातून मिळणाऱ्या पैशातून आमच्या हौशीमौजी  करायची! त्यामुळे कष्टाचे, वेळेचे महत्व आमच्यावर बालपणापासूनच बिंबवले गेले होते तिच्या कर्तृत्वाने! ती कधी वायफळ गप्पा मारत वेळ घालवत नसे. तिच्या हातात सतत काही ना काही काम असे. संक्रांतीच्या दरम्यान तिच्याकडे खूप शिवणकाम असे, पण त्यातूनच वेळ काढून ती हलवा बनवणे, गुळपोळी करणे, तिळगुळ वड्या करणे, हळदीकुंकू करणे हे सगळं साग्रसंगीत करत असे. वाणासाठी वस्तू घेताना सुध्दा त्याची उपयोगिता आणि किंमत बघून  वस्तू घेतली जाई. तिच्याबरोबर बाजार करायला जाणे म्हणजे एक प्रकारचे शिक्षणच असे. वस्तूचा दर कमी करून घेणे, भाजीपाला घेताना तोही पारखून घेणे, आहे त्या परिस्थितीत कालमानानुसार आमच्यासाठी फळे, भाज्या घेणे, आणि त्यांचे महत्त्व सांगून खायला लावणे हे ती करत असे.रोज दूध देणे जरी परवडणारे नव्हते तरी आम्हाला ती चहा देत नसे. त्या ऐवजी वेगवेगळ्या प्रकारची खीर बनवत असे. गव्हाच्या चिकाची, रव्याची,सातूच्या पिठाची ,

तर कधी तरी खारकेची! ज्यामुळे मुलांना पौष्टिक मिळेल याकडे तिचे लक्ष असे. काजू खायला मिळत नसे, पण शेंगदाणे, हरभरा डाळ रात्री भिजत घालणे आणि सकाळी ते खायला देणे, व्यायाम करायला लावणे यासाठी आई आणि वडिलांचे  लक्ष असे.

ती पूर्वीचे मॅट्रिक होती. तिचे इंग्लिश, अल्जेब्रा- जॉमेट्री, फिजिओलॉजी हायजिन हे विषय चांगले होते.  ती आमचा  अभ्यासही करून घेत असे. वडील एज्युकेशन डिपार्टमेंटला असल्याने महिन्यातील वीस दिवस फिरतीवर असत, त्यामुळे आईच आमच्याकडे सर्वांगीण लक्ष देत असे. अर्थातच वडिलांना घराची काळजी नसे.ती नऊवारी नेसत असे. तिच्याकडे मोजक्याच साड्या असत पण तिचे नेसणे, वापरणे अगदी व्यवस्थित असे.धुतलेल्या साडीची घडी सुद्धा इस्त्री केल्यासारखी नीट करत असे.

माझे लग्न झाल्यावरही ती मला वेळोवेळी मदत करत असे. माझ्यासमोर तिचा चांगला आदर्श असल्यामुळे मी मुलीचे, सुनेचे करताना तिच्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न केला… तिचे बोलणे सुविचारांनी युक्त असे .म्हणींचा वापर सहजगत्या होत असे. चांगला विचार करायला तिने आम्हा भावंडांना शिकवले .आता मी वयाची सत्तरी गाठली तरी अजूनही तिची मला नेहमीच सोबत वाटते. काही संकट, अडचण आली की आत्ता आई असती तर तिने काय केले असते असा विचार आपोआपच मनात येतो. आई हा घरातील नंदादीप असतो, तो आपल्या मनात नेहमीच तेवत राहतो!  ती कायमच आपल्या सोबत असते..संक्रांतीला तिचा वाढदिवस आम्ही  आनंदात साजरा करत असू..

तिळगुळातील तिळाची उष्णता(ऊब), गुळाचा गोडवा आणि तुपाची स्निग्धता तिच्या स्वभावामध्ये उतरली होती. आईचा हा जन्मदिवस संक्रांत सणाला येत असल्याने माझ्या कायमच स्मरणात राहतो!

प्रत्येकालाच आपली आई ही प्रिय असते… तिचे स्मरण व्यक्त करावे म्हणून हा छोटासा लेख लिहिला आहे ! धन्यवाद !

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मानवांना आलेले एक पत्र… – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

⭐ मानवांना आलेले एक पत्र… – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ⭐

प्रिय पृथ्वीनिवासी मानवांनो ,

तुम्ही एकही झाड लावू नका. ती आपोआप उगवतात.तुम्ही फक्त ती तोडू नका.

तुम्ही कुठलीही नदी स्वच्छ करू नका. ती प्रवाही आहे. स्वतः स्वच्छच असते.तुम्ही फक्त तिच्यात घाण टाकू नका.

तुम्ही शांतता प्रस्थापित करण्याच्या नादी लागू नका. सर्वत्र शांतताच आहे. तुम्ही फक्त द्वेष पसरवू नका.

तुम्ही प्राणी वाचवण्याचा प्रयत्न करण्याची गरज नाही. ती क्षमता निर्सगात आहे. फक्त त्यांना मारू नका आणि जंगले जाळू नका.

तुम्ही माणसं काहीही व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करू नका. सर्व व्यवस्थितच आहे. फक्त तुम्ही स्वतःच व्यवस्थित राहा.

तुमचा निसर्ग.

लेखक : अज्ञात 

संग्राहिका :सौ. प्रज्ञा गाडेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ उगवतीचे रंग – तुम्ही युनिक आहात… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? विविधा ?

☆ उगवतीचे रंग – तुम्ही युनिक आहात… ☆ श्री विश्वास देशपांडे

उगवतीचे रंग – तुम्ही युनिक आहात…

मागे एका शाळेत गेलो होतो. ती शाळा खूप प्रसिद्ध म्हणून पाहायला. त्या शाळेच्या ऑफिसमध्ये एक वाक्य वाचायला मिळालं. ‘ एव्हरी चाईल्ड इज  युनिक. ‘ आणि अगदी खरं आहे. प्रत्येक मूल दुसऱ्या मुलापासून वेगळं आहे. बुद्धीनं, रूपानं , विचारानं, भावनेनं. प्रत्येकाची प्रत्येक गोष्ट करण्याची क्षमता वेगवेगळी. जे एकाला खूप चांगलं जमतं , तसं दुसऱ्याला येईलच असे नाही सांगता येत. आपण पालक मात्र ही गोष्ट समजूनच घ्यायला तयार नसतो. एखादा मुलगा अभ्यासात हुशार असला तर आपण आपल्या मुलाला त्याचे उदाहरण देतो. तो अमुक अमुक बघ. कसा हुशार आहे. गणितात किती गुण मिळाले त्याला ! नाहीतर तू .. असे म्हणून आपण त्याला हिणवतो. आणि त्याचं फुलू पाहणारं व्यक्तिमत्व कोमेजण्यासाठी हातभार लावतो. अरे, निसर्गातही बघा ना. प्रत्येक फुल वेगवेगळं आहे. गुलाब फुलांचा राजा झाला म्हणून काय इतर फुलांचं सौंदर्य, सुगंध कमी आहे का ? प्रत्येक फुल आपापल्या ठिकाणी श्रेष्ठ आहे. सगळेच गुलाब झाले तर कसे चालेल ? फुलांच्या हारामध्ये जेव्हा वेगवेगळ्या रंगांची फुलं असतात, तेव्हा तो हार शोभून दिसतो.

पण आज मला लहान मुलांबद्दल आणि त्यांच्या शिक्षणाबद्दल नाही बोलायचं. पण त्यानिमित्ताने एक विचार मात्र मनात आला. प्रत्येक लहान मूल युनिक असतं तसं आपण मोठी माणसं पण असतो का ? नक्कीच असतो. पण हे आपण समजून नाही घेत. कदाचित समजतं पण उमजत नाही. कळतं पण वळत नाही. अशी आपली अवस्था असते. आणि बऱ्याच वेळा हेच आपल्या दुःखाचं मूळ असतं . मी काय करतो, तर माझी तुलना सतत दुसऱ्याशी करत असतो. एखादा माणूस तब्येतीने चांगला दिसला, दिसायला त्याचे व्यक्तिमत्व छाप पडणारे असले की मी नकळत माझी तुलना त्याच्याशी करतो आणि दुखी होतो. मला वाटतं मी एवढा बारीक आणि अशक्त का ? जे माझ्या बाबतीत तेच एखाद्या लठ्ठ माणसाला सुडौल असणाऱ्या माणसाबद्दल वाटू शकेल. त्या लठ्ठ माणसाला वाटते की मी का नाही असा सडपातळ ? लोक हसतात माझ्याकडे पाहून. एखाद्या बुटक्या माणसाला उंच माणसाबद्दल हेवा वाटू शकतो. एखाद्या आखूड केस असणाऱ्या तरुणीला लांब आणि दाट केस असलेल्या स्त्रीबद्दल असूया वाटू शकते.

अशा अनेक गोष्टींमुळे आपण स्वतःला दु:खी करून घेतो. इथे आपले चुकते ते हे की आपण स्वतःला आहे तसे स्वीकारायला तयार नसतो. पण निसर्ग तुमच्यात जेव्हा तुम्हाला वाटणारी एखादी उणीव ठेवतो, तेव्हा तुम्हाला तो अशी काही गोष्ट देऊन ठेवतो, की जी दुसऱ्याजवळ नसते. एखाद्या धनिकाला सगळ्या गोष्टी उपलब्ध असून शांत झोप लागत नाही. तेच झोपेचे वरदान देव मात्र एखाद्या सर्वसामान्य माणसाला सहज देऊन ठेवतो. तो श्रीमंत माणूस सगळे विकत घेऊ शकतो. पण झोप नाही विकत घेऊ शकत. मनःशांती नाही मिळत पैशाच्या जोरावर. अशा खूप गोष्टी असतात आपल्याजवळ. या अर्थाने आपण गिफ्टेड असतो. पण आपण नेमके आपल्याजवळ असलेल्या गोष्टींचा विचार न करता आपल्याजवळ नसलेल्या गोष्टीचा विचार करतो.

या अर्थाने खरं तर प्रत्येक व्यक्ती युनिक आहे. वेगळी आहे. मी मुद्दामच या लेखाचं नाव तुम्ही युनिक आहात असं दिलंय . खरं म्हणजे बरेचदा मी इंग्रजी शब्द वापरायचे टाळतो. पण काही वेळा आपल्याला अपेक्षित असणारा अर्थ एखादा शब्द चटकन स्पष्ट करत असेल तेव्हा मी तो बिनदिक्कतपणे वापरतो. इंग्रजीतला युनिक हा शब्दही असाच. युनिक म्हणजे एकमेवाद्वितीय. इतरांपासून एकदम वेगळा. आपण सगळे या अर्थाने युनिक असतो. इतरांपासून वेगळे असतो. मला गाणी आवडतात, प्रवास आवडतो, वाचायला आवडते, लिहायला आवडते. दुसरा माझा एक मित्र उत्तम चित्रं काढतो आणि लिहितोही. तो फिरत मात्र फारसा नाही. कोणी उत्तम गातो. कोणाला उत्तम स्वयंपाक करता येतो. कोणीतरी उत्तम खेळाडू आहे. किती हे वेगळेपण ! किती या प्रत्येकाच्या तऱ्हा ! म्हणून तर प्रत्येक जण युनिक. हे जेव्हा आम्ही समजून घेऊ ना, तेव्हा आम्ही स्वतःवर प्रेम करायला लागू. (उगवतीचे रंग- विश्वास देशपांडे )

आणि जो स्वतःवर प्रेम करू शकतो, तोच इतरांवरही प्रेम करू शकतो. पण आपल्याकडे ही गोष्ट लहानपणापासून सांगितलीच जात नाही. उलट सांगितलं जातं . की स्वतःचा विचार करू नका. स्वतःवर प्रेम करू नका. दुसऱ्यावर प्रेम करा. पण स्वतःवर प्रेम नाही करता आलं, स्वतःला आहे तसं नाही स्वीकारता आलं , तर तुम्ही दुसऱ्याला काय स्वीकारणार आणि मग प्रेम करणं तर लांबची गोष्ट !

तेव्हा आजपासून स्वतःला सांगू या की मी इतरांपेक्षा अगदी वेगळा आहे, युनिक आहे आणि त्यातच माझे सौंदर्य आहे, सामर्थ्य आहे. इतरांना दिल्या त्यापेक्षा परमेश्वराने मला काही गोष्टी नक्कीच वेगळ्या दिल्या आहेत. त्यांचा मी विचार करीन . त्यांचा वापर करून माझे जीवन आनंदी बनवेन. आणि त्याच बरोबर इतरांचेही. आणि मग बघा. तुमच्याही ओठांवर आनंदाचे गाणे आल्याशिवाय राहणार नाही.

लिये सपने निगाहो में, चला हूँ ‘तेरी राहों मे

जिंदगी, आ रहा हूँ मैं ….

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ कैकयी… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये 

? इंद्रधनुष्य ?

☆ कैकयी… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

रामायणातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती म्हणजे कैकयी. तिच्यामुळेच रामायण घडले. वनवासात जाण्यापूर्वी राम हा इतर राजांप्रमाणे फक्त रामराजा होता. पण रावणाचा वध करून, 14 वर्षांचा वनवास संपवून जेव्हा तो अयोध्येस परत आला तेव्हा तो” प्रभू रामचंद्र” झाला. शुद्ध परात्पर राजाराम वगैरे  सर्व विशेषणे त्याला त्यावेळेला लागली. आणि यासाठी कैकयीच  कारणीभूत आहे.

ती केकय देशाच्या अश्वपती राजाची कन्या होती. दशरथा पासून तिला भरत नावाचा पुत्र झाला. आपल्या मुलाला अयोध्येचे राज्य मिळावे म्हणून तिने सावत्र मुलगा राम याला वनवासास धाडण्याची गळ दशरथाला घातली. परंतु पुत्र विरहाच्या शोकामुळे दशरथाचा मृत्यू झाला.

रामाचा वनवास व दशरथाचा मृत्यू या घटनांना कारणीभूत ठरल्यामुळे  तिला खलनायिका ठरवतात.”माता न तू, वैरिणी “या प्रसिद्धगाण्यामुळे तर ती जास्तच दुष्ट वाटू लागते. पण प्रत्यक्षात तसे नाही.

कैकयी अत्यंत सुंदर, धाडसी ,युद्धकलानिपुण, ज्योतिषतज्ञ होती .त्यामुळे दशरथाची सर्वात लाडकी राणी होती. एकदा देवराज इंद्र संब्रासुर नावाच्या राक्षसाशी लढत होता. पण तो राक्षस खूप शक्तिशाली होता म्हणून इंद्राने दशरथाकडे मदत मागितली. दशरथ युद्धाला सज्ज झाला. कैकयीदेखील त्याच्याबरोबर गेली. युद्धामध्ये दशरथाच्या सारथ्याला बाण लागला.  दशरथ हादरला. पण कैकयीने स्वतः उत्तम सारथ्य केले. दुर्दैवाने रथाचे एक चाक खड्डयात अडकले. कैकयी पटकन रथातून खाली उतरली. रथाचे चाक खड्डयातून बाहेर काढले. ते पाहून राक्षस घाबरला आणि पळून गेला. दशरथाचे प्राण वाचले. त्याने तिला दोन वर दिले.

रामाचा राज्याभिषेक ठरला. कैकयीने वराप्रमाणे दशरथाला रामाला 14 वर्षे वनवास आणि भरताला राज्याभिषेक असे दोन वर मागितले. त्याची खरी कारणे खालील प्रमाणे आहेत…

१) कैकयी ज्योतिष जाणत होती. तिने रामाच्या राज्याभिषेकावेळी कुंडली मांडली. त्यावेळी तिच्या लक्षात आले की सध्या चौदा वर्ष जो कोणी सिंहासनावर बसेल तो स्वतःचा आणि रघुवंशाचा नाश करेल. ते टाळण्यासाठी तिने रामाला वनवासाला पाठवले.

२) ती युद्ध कला निपुण होती. त्यावेळी वाली नावाचा एक राजा होता. त्याला वरदान मिळाले होते की जो कोणी त्याच्याशी युद्ध करेल त्याची निम्मी शक्ती त्याला मिळत असे. त्याच्याशी युद्ध करायला दशरथ आणि कैकयी गेले. पण दशरथ हरला. तेव्हा वालीने त्याला दोन अटी घातल्या. तुला सोडतो पण मला कैकयी  देऊन टाक किंवा तुझा राजमुकुट दे. अर्थात् दशरथाने आपला राजमुकुट त्याला दिला. ही गोष्ट फक्त या दोघांनाच माहीत होती. राजमुकुटाशिवाय राज्याभिषेक करता येत नाही . म्हणून तिने राज्याभिषेकाच्या आदल्या  रात्री रामाला बोलावले. विश्वासात घेऊन हे सांगितले .” तू वनवासाच्या निमित्ताने वालीचा वध कर आणि तो  राजमुकुट घेऊन ये.”  राम तयार झाला. आणि म्हणूनच राम जेव्हा रावणाचा, वालीचा , वध करून अयोध्येस परत आला तेव्हा त्याने सर्वात प्रथम कैकयीला नमस्कार केला नंतर कौसल्येला.

३) श्रावणबाळाच्या मातापित्यांनी दशरथाला शाप दिला होता की तूदेखील आमच्यासारखाच पुत्रशोकाने प्राण सोडशील. राज्याभिषेकाच्या वेळी दशरथ तसा वृद्धच झाला होता. रामाच्या मृत्यूपेक्षा विरहाच्या पुत्रशोकाने दशरथाचा मृत्यू झालेला बरा. असा सूज्ञ विचार करून , रामाचा मृत्यूयोग टाळण्यासाठी तिने रामाला वनवासात पाठवले.

४) रामाचा जन्मच मुळी रावण किंवा सर्व राक्षसांचा वध करणे यासाठी होता.  राज्याभिषेकाच्या वेळी सर्व देवांना चिंता पडली की हा जर इतर राजांप्रमाणे राज्यकारभार करू लागला तर राक्षसांचा वध कोण करणार? ते सगळे सरस्वतीला शरण गेले. सरस्वती मंथरा दासीच्या जिभेवर आरूढ झाली. तिने कैकयीला गोड बोलून भुलवले आणि रामाला वनवासात पाठवण्यास भाग पाडले.

५) खरे तर तिचे भरतापेक्षा रामावर जास्त प्रेम होते. ती भरताबरोबर रामाला भेटण्यासाठी चित्रकूट पर्वतावर गेली. व म्हणाली, “ मी कुमाता आहे. तू मला क्षमा कर.” तेव्हा रामाने तिची समजूत घातली. ” तू सुमाता आहेस. ज्या मातेने भरतासारखा भाऊ मला दिला ती सुमाताच आहे .”

…. मग आपण पण तिला कुमाता न म्हणता सुमाताच म्हणूया ना?

लेखिका : सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ तुम्हाला कोण आनंदात ठेवतं?… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ तुम्हाला कोण आनंदात ठेवतं?… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

एकदा एका वक्त्याने श्रोत्यांमधील एका महिलेला विचारले,”तुमचा नवरा तुम्हाला आनंदात ठेवतो का?”

तिच्या शेजारी बसलेल्या पतीच्या चेहऱ्यावर हसू उमटले. तो आत्मविश्वासाने पत्नीकडे बघू लागला. त्याला पूर्ण खात्री होती, की ती ‘हो’ असंच म्हणेल. कारण तिने लग्न झाल्यापासून कधीच काहीही तक्रार केलेली नव्हती.

पण त्याच्या बायकोने स्पष्ट आवाजात उत्तर दिलं,”नाही.” ती म्हणाली, “माझा नवरा नाही ठेवत मला आनंदात!”

तिच्या पतीला हे अनपेक्षित होतं. तेवढ्यात ती पुढे म्हणाली, “मला माझ्या नवऱ्याने आनंदात ठेवले नाही, मी स्वत:च आनंदात राहते.

मी आनंदी असावं की नाही याच्याशी त्याचा काहीच संबंध नाही. माझा आनंद पूर्णपणे माझ्यावरच अवलंबून आहे.

कुठल्याही परिस्थितीत, आयुष्यातल्या प्रत्येक क्षणी मी आनंदीच राहते. जर माझा आनंद कुणा दुसऱ्यावर, एखाद्या वस्तूवर किंवा विशिष्ट परिस्थितीवर अवलंबून राहिला तर ते माझ्यासाठीच कठीण होऊन बसेल.

आयुष्यातली प्रत्येक गोष्ट सतत बदलत असते. माणसं, संबंध, आपलं शरीर, हवामान, आपले ऑफिसातले बॉस, सहकारी, मित्र, आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य… ही यादी न संपणारी आहे.

त्यामुळे काहीही झालं तरी आपण आनंदी राहायचं, हे मीच ठरवायला हवं ना! माझ्याकडे खूप काही असलं काय किंवा काहीच नसलं काय, मी आनंदीच असते!

मला कुठे बाहेर जायला मिळालं काय किंवा घरात बसून राहावं लागलं काय, मी आनंदीच राहीन. मी श्रीमंत असले काय किंवा गरीब राहिले काय, मी आनंदीच असेन.

माझं लग्न झालेलं असलं तरी लग्ना आधीही मी आनंदीच होते. कारण मी आनंदी आहे ती माझ्या स्वत:मुळे!

माझं जगणं दुसऱ्या कुणापेक्षा जास्त चांगलं आहे म्हणून मी आयुष्यावर प्रेम करते असं नाही, तर आनंदात राहायचं हे मी स्वत:च ठरवलं असल्यामुळे मी आनंदी आहे. माझ्या आनंदाची संपूर्ण जबाबदारी मीच घेतली असल्यामुळे माझ्याबरोबर जगणाऱ्या कुणालाही मला आनंदी ठेवण्याचं ओझं बाळगावं लागत नाही. त्यामुळे माझ्याशी बोलता- वागताना त्यांना अतिशय मोकळेपणा जाणवतो.

आणि यामुळेच मी इतकी वर्ष आनंदात संसार करू शकले. तुमचा आनंद कधीही दुसऱ्या कुणाच्या हाती जाऊ देऊ नका.

बोध : वातावरण चांगलं नसलं तरी आनंदी राहा. आजारी असलात तरी आनंदी राहा. कठीण परिस्थितीत, पैसे नसले तरी आनंदी राहा. कुणी तुम्हाला दुखावलं, कुणी तुमच्यावर प्रेम करत नसलं, अगदी तुम्ही किती मौल्यवान आहात हे ठरवू शकत नसलात, तरी आनंदी राहा. तुम्ही स्त्री, पुरुष कुणीही, कितीही वयाचे असा. असाच विचार करायला हवा; नाही का?

लेखक : अज्ञात 

संग्राहिका: सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ भक्तिसेतू साधणारा एक असाही अनुबंध ! ☆ श्री दर्शन रमेश वडेर ☆

? विविधा ?

☆ भक्तिसेतू साधणारा एक असाही अनुबंध ! ☆ श्री दर्शन रमेश वडेर 

नृसिंहवाडी ते अयोध्या..

भक्तिसेतू साधणारा एक असाही अनुबंध !

– दर्शन रमेश वडेर, नृसिंहवाडी

प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना अयोध्येच्या दरबारी होत आहे. अवघा शरयूतीर या हर्षोल्हासाने पुलकित झालाय. रामनामाचा ब्रह्मनाद अवघ्या आसमंताला व्यापून उरतो आहे. संतजनांच्या स्वस्तिपद्मांमुळे अयोध्येच्या पवित्र भूमीत मांगल्याचा उमाळा दाटून आला आहे. “मेरे झोपडीके द्वार आज खुल जायेंगे, राम आयेंगे” असं म्हणणारी माता शबरी असो किंवा रामचंद्रांना हृदयस्थ मित्र मानून गंगेचे पात्र ओलांडून देणारा केवट.. अयोध्येच्या कुठल्याशा कोपऱ्यात बसून ते आज आनंदाने अश्रू ढाळत असतील. वानरराज सुग्रीवाची अवघी वानरसेना अदृश्यरूपाने हा मंदिररुपी सेतू उभारत असेल तो हृदयात ‘जय श्रीराम’चा महामंत्र घेऊनच! कारण ५०० वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर श्रीराम प्रभूंच्या मंदिराचे स्वप्न साकार होतंय. क्षीरसागरातले अवघे वैकुंठच अयोध्यानगरीत उतरलंय की काय? असा भास व्हावा, अशी ही दिव्यता हृद्यचक्षूंना कृतार्थ करते आहे. स्वयंवरातल्या सीतामैय्याच्या शृंगारासारखी अयोध्या रुपांकित झाली आहे. भारतवर्षातल्या अनेक सुपुत्रांच्या त्यागानंतर आज अवधनगरीला हे साजिरं रूप मिळालंय. हजारो कारसेवकांच्या प्रयत्नांनी अन् रामजन्मभूमी न्यासाच्या अविरत संघर्षानंतर आजचा हा सोनियाचा दिवस उजाडला आहे. यात आपल्या पुण्यभूमी नृसिंहवाडीचाही एक जिव्हाळ्याचा अनुबंध आहे. गुरुकृपेचा अन्योन्य हृद्य अनुभव देणारा असा हा नृसिंहवाडी ते अयोध्या भक्तीसेतू !

दत्तप्रभूंच्या पद्मयुगुलांनी कृपांकित झालेली पुण्यभूमी नृसिंहवाडी म्हणजे सत्पुरूषांची जननीच! अनेक थोर महात्मे व संतजनांनी या भूमीत भक्तीरसाची उधळण केली अन् कृष्णेचा निळाशार डोह शहारून गेला. “आम्ही दत्ताचे नौकर, खातसो त्याची भाकर” असे म्हणत तिन्ही त्रिकाळ पूजाअर्चा करणारे वाडीचे समस्त पुजारीजन म्हणजे प्रत्यक्ष दत्तगुरुंचीच लेकरे! याच पवित्र पुजारीकुळात सूर्याचे तेजोवलय मानव देहावर घेऊन जन्माला आलेली एक थोर विभूती म्हणजे ब्रह्मर्षी पं. आत्मारामशास्त्री जेरे! वाडीच्या ज्ञानासनावर विलक्षण गारूड निर्माण करतील अशा मोजक्या मांदियाळीत जेरेशास्त्रींचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. त्यांच्या विद्वत्तेचा सूर्य जितका प्रखर अन् तेजस्वी तितकाच शारदीय चांदण्यात नाहल्याची अनुभूती देणारा. वेद, उपनिषद, न्याय, वेदांत, मीमांसा अशा धर्मशास्त्राचे त्यांचे ज्ञान अफाट होते. संस्कृत आणि तत्वज्ञानावरील त्यांच्या अभ्यासाचा अधिकार प्रचंड होता. मात्र शिक्षणाचा अन् योग्यतेचा दर्जा असूनही नोकरीसाठी उपेक्षा होत होती. त्यामुळे त्यांनी प.पू. टेंबे स्वामींच्या स्त्रोत्रांचे अखंड अनुष्ठान सुरू केले होते. तेव्हा प.प. शांतानंद स्वामींनी दृष्टांत देत ‘अमळनेरच्या प्रताप तत्वज्ञान मंदिरात प्राध्यापक म्हणून तुझ्यासाठी जागा आहे.’ असे सांगितले. तेव्हा शास्त्रीबुवांनी तिथे जाऊन अर्ज केला. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी मुलाखत घेतली अन् त्यांची प्राध्यापक म्हणून नियुक्त केली. सर्वपल्ली राधाकृष्णन, साने गुरुजी, गुरुदेव रानडे अशा ज्ञानी महंतांच्या सानिध्यात शास्त्रीजी संस्कृतचे अध्यापन करू लागले. पुढे कोणत्यातरी कारणाने ते तत्वज्ञान मंदिर बंद पडले अन् शास्त्रीजींना अमळनेर सोडावे लागले. तद्नंतर भागवतावर प्रवचने देत त्यांनी महाराष्ट्रभूमी पाहिली. काही काळ वाईत त्यांचा मुक्काम झाला. मात्र पुढे स्वाध्याय परिवाराचे पांडुरंगशास्त्री आठवले यांनी ठाण्यात तत्वज्ञान विद्यापीठ सुरू केले होते. जेरे शास्त्रीजी तिथे अध्यापनासाठी गेले. अन् विद्यार्थ्यांना तत्वज्ञान व संस्कृतसारखे अबोध विषय सुसंबोधित करू लागले. त्यावेळी एक पंचविशीतला तरुण ठाण्यात एम.ए. तत्वज्ञान शिकण्यासाठी आला होता. गोरेपान, उंचपुऱ्या आणि जणू तेजोनिधीचेच रूप घेतलेल्या जेरे शास्त्रींकडे पाहून त्या तरुण विद्यार्थ्याच्या मनात आदर उत्पन्न होई. शास्त्रीबुवांच्या अमोघ वाणीने त्याचे मन प्रफुल्लित होऊन जाई. मात्र हा एम.ए. शिकणारा तरुण विचारांनी अगदी बंडखोर वृत्तीचा. देवाच्या अस्तित्वावरच प्रश्न करणारा कट्टर नास्तिकच! देव आहे की नाही? असेल तर तो दिसत का नाही? अशा एक ना अनेक द्विधांनी त्याची मन:वस्था अस्थायी झाली होती. या प्रश्नांची उत्तरं त्याला शोधायची होती. देवाच्या खऱ्या अस्तित्वाला जाणायचे होते. मात्र आजपर्यंत त्याला कुणी काही सांगितलच नव्हतं. याच काळात जेरेशास्त्रींच्या संपर्कात आल्याने त्याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. हे सत्पुरुषच आपल्याला खरा मार्ग दाखवू शकतील, असा दृढ विश्वास त्याच्या मनात उत्पन्न झाला. अन् शास्त्रीबुवां सोबत त्याची वेदांतचर्चा घडू लागली. परमेश्वराला अनुभवायचे खरे निधान कोणते? याचे निरूपणच शास्त्रीबुवा त्याच्यासमोर करत. मात्र तरीही त्या तरुणाला समाधानाची अवस्था काही मिळत नव्हती. शेवटी शास्त्रीजींनी त्याला उपदेश करत दत्तमहात्म्य या ग्रंथाची पोथी दिली आणि तीन वेळा या पोथीची पारायणे कर, असे सांगितले. अन् त्या तरुणाने तसे केले. दत्तमहात्म्य वाचल्यानंतर परमेश्वरापर्यंत पोहोचण्याची त्याची अभिलाषा तृप्त झाली. पूर्णत: नास्तिक असणारा हा तरुण जणू भक्तीप्रवाही न्हावू लागला. शास्त्रीबुवांनी दिलेला उपदेश फळाला आला. किशोर व्यास हे या तरुणाचे नाव. अहमदनगर जिल्ह्यातल्या बेलापूरसारख्या छोट्या खेड्यात राहणारा. पुढे या तरुणाची ईश्वराचे ब्रह्मसत्य जाणून घेण्याची इच्छा इतकी तीव्र झाली की, काशीला जाऊन त्याने संन्यस्तधर्म धारण केला. अन् त्यांचे नामाभिधान झाले स्वामी श्री गोविंददेव गिरी महाराज! गेल्या डिसेंबर महिन्यात दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या दत्त मंदिरात प्रवचनासाठी गोविंददेव गिरी महाराज आले होते. त्यावेळी जेरेशास्त्रींचा आवर्जून त्यांनी उल्लेख केला. “शास्त्रीजींचे व्यक्तिमत्त्व बहिस्थ जितके तेजस्वी तितकेच अंत:स्थ तेजस्वी होते. ‘झाला महार पंढरीनाथ..’ हे गीत ऐकताना शास्त्रीजी ढसाढसा रडल्याचे मी प्रत्यक्ष पाहिले आहे.” असे ते म्हणाले. हेच गोविन्ददेवजी गिरी महाराज म्हणजे अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमि न्यासाचे कोषाध्यक्ष! देशभरात श्रीराम समर्पणाच्या माध्यमातून सुमारे ४००० कोटी रुपये इतके निधीसंकलन त्यांनी आजपर्यंत केले आहे. हिंदूंच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या राम जन्मभूमीवर इतके भव्य मंदिर उभे राहतेय, यामागे कोषाध्यक्ष म्हणून स्वामी गोविंददेव गिरींचा वाटा मोठा आहे. ब्रह्मर्षी आत्मारामशास्त्री जेरेंच्या अनुग्रहाने गिरी महाराजांना परतत्त्वाची दिशा मिळाली. एकाप्रकारे जेरेशास्त्रींनी राम मंदिराच्या उभारणीत शिष्यदान दिले, असे म्हटले तर वावगे ठरू नये. दत्तभूमी नृसिंहवाडी ते रामभूमी अयोध्या असा भक्तीसेतू पं. आत्मारामशास्त्री जेरे आणि स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या रूपाने आज फलद्रूप झाला आहे. जेव्हा प्रभू श्रीरामचंद्रांची प्राणप्रतिष्ठापना होताना स्वामी गोविंददेव गिरी तिथे उपस्थित असतील तेव्हा अदृश्य रूपाने तिथे ब्रह्मर्षी पं. आत्मारामशास्त्री जेरेसुद्धा असतील! ईश्वरीय संकेतांचे पूर्वसंदर्भ हे नियतीने आधीच ठरवलेले असतात. ‘दत्तमहात्म्य तीनवेळा वाचा’ हे शास्त्रीजींचे‌ बोल गोविंददेव गिरी महाराजांच्या जीवनात बदल करणारे ठरले. मग माझ्यासारख्या १८ वर्षांच्या मुमुक्षाला ग्रेसांच्या ओळींचा अर्थ इथे उलगडला…

तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शूनी गेला..

सीतेच्या वनवासातील जणू अंगी राघवशेला!

© श्री दर्शन रमेश वडेर

नृसिंहवाडी

मो. नं. 8459166409

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मी प्रवासिनी ☆ मनोवेधक मेघालय…भाग -६ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? मी प्रवासिनी ?

☆ मनोवेधक  मेघालय…भाग -६ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

(मावफ्लांगचे पवित्र जंगल)

प्रिय वाचकांनो,

आपल्याला दर वेळी प्रमाणे आजही कुमनो! (मेघालयच्या खासी या खास भाषेत नमस्कार, हॅलो!)

फी लॉन्ग कुमनो! (कसे आहात आपण?)

मागील भागात मी वायदा केला होता की, आपल्याला मावफ्लांग (Mawphlang) च्या सेक्रेड ग्रोव्हज/ सेक्रेड वूड्स/ सेक्रेड फॉरेस्ट्स मध्ये जायचंय! चला तर मग तयार व्हा एका रोमांचक आणि अद्भुत प्रवासाकरता! सेक्रेड ग्रोव्हज/ सेक्रेड वूड्स/ सेक्रेड फॉरेस्ट्स अर्थात पवित्र जंगले किंवा उपवने यांना कांही विशिष्ट संस्कृतीत विशेष धार्मिक महत्व आहे. जगभरातील विविध संस्कृतींमध्ये ही पवित्र उपवने त्यांच्या वैशिष्ट्यांसह अस्तित्वात आहेत. ती जरी आपल्याला सुंदर लॅण्डस्केप्स (नुसती बघण्यापुरती किंवा चित्रे किंवा फोटो काढण्यापुरती प्रेक्षणीय स्थळे) म्हणून दिसत असलीत तरी कांही पंथी किंवा धर्मियांसाठीं ती त्यापलीकडे जाऊन अत्यंत महत्वाची पवित्र स्थळे आहेत. त्यातल्या त्यात काही विशिष्ट वृक्ष तर अत्यंत पवित्र मानले जातात. या समुदायाचे लोक ही वनराजी प्राणापलीकडे जपतात. याच जपणुकीमुळे येथील वृक्षवल्ली हजारो वर्षे जुनी असूनही सुरक्षित आहेत.

या पर्वतीय राज्याच्या वनराजीतच काही महत्वाच्या सांस्कृतिक परंपरांचा उगम आहे. खासी समाजाला अतिप्रिय अश्या या मावफ्लांगच्या पवित्र जंगलाने प्राचीन गुह्य इतिहास, गूढरम्य दंतकथा आणि विद्या आपल्या विस्तीर्ण हिरवाईत दडवून ठेवल्या आहेत. इथल्या उंचनिंच नैसर्गिक पायऱ्या अन पायवाटा, लहान थोर वृक्षसमूह, त्यांना लगडलेल्या लता, चित्रविचित्र पुष्पभार, झाडांवर आणि त्याखाली पसरलेली फळे, विस्तीर्ण पर्णराशी, जागोजागी विखुरलेले पाषाण (एकाश्म/ मोनोलिथ), मध्येच विविध सप्तकातील कूजनाने वनाची शांतता भंग करणारे पक्षी, बागडणारी रंगीबेरंगी फुलपाखरे,  यत्र तत्र अन सर्वत्र  प्रवाही जलाचे ओहोळ, सारे कसे गूढ रम्य कादंबरीतील पात्रांसारखे, जणू प्रत्येकाला “मला काही सांगायचंय!” हेच वाटत असावं! येथील जमातींचे सकळ आयुष्यच मुळी या वनराजींशी जुळलेले, त्यांचे रक्षणकर्ते आणि त्यांना भयभीत करणारे जंगल एकच! 

शिलॉंग शहरापासून केवळ २६ किलोमीटर दूर असलेले हे मावफ्लांगचं सॅक्रेड ग्रूव्ह! आपली उपवनाची/जंगलाची कल्पना म्हणजे चांगल्या दगडी, काँक्रीट, संगमरवरी पायऱ्या, रस्ते, बसायला बेंच, कृत्रिम कारंजी, तरणतलाव, उपहारगृह, इत्यादी इत्यादी! मंडळी, इथं यातलं कांही कांही नाही. जंगल जसंच्या तसं! खालचा पालापाचोळा सुद्धा अस्पर्श, इथल्या कुठल्याही गोष्टीला माणसाचा स्पर्श वर्जित! अर्थात आपण रान तुडवतांना नाइलाजाने होतो तितकाच! मैत्रांनो, हेच ते अनामिक, अभूतपूर्व, अप्रतिम, अलौकिक, अनुपम, अनाहत, अनवट अन अस्पर्शित सौंदर्य! आम्हाला आमच्या गाईडने (वय वर्षे २१) या जंगलाचा हृदयाला भिडणारा विलक्षण असा संदेश सांगितला, “इथे या, डोळे भरून इथली निसर्गाची लयलूट बघा (कांहीही लुटून मात्र नेऊ नका), इथून नेणार असाल तर इथल्या सौंदर्याच्या स्मृती न्या अन जतन करा, हृदयात किंवा फार तर फार कॅमेऱ्यात! इथून एक वाळलेले पान तर सोडाच, काडी देखील उचलून नेऊ नका! मित्रांनो, ही अशी सक्ती असल्यावर जंगलतोड हा शब्द आपण स्वप्नांत देखील आठवणार नाही! अशी झाडांची जपणूक आपण करतो का? जमेल तिथे अन जमेल तशी पाने-फुले ओरबाडून घेणे आणि झाडांना इजा पोचवणे, हा उद्योग इतका कॉमन आहे की काय बोलावे! (आपल्याकरता प्रत्येक महिना श्रावणच असतो, पूजेकरिता पाने अन फुले नकोत का!!!)

सेक्रेड ग्रोव्हस मध्ये याला वाव नाही, उलट “असे कराल तर मृत्यू होतो, पासून तर कांही बाही होते”, हीच शिकवण या जमातीच्या दर पिढीला दिली गेलीय. इथं स्थानिक एक साधा नियम पाळतात (आपणही पाळायचा) “या जंगलातून कांहीही बाहेर जात नाही.” जर तुम्ही मृत लाकूड किंवा मृत पान चोरले तर काय होईल असा तुम्हाला प्रश्न पडेल. दंतकथा सांगतात “जो कोणी या जंगलातून काहीही घेऊन जाण्याचे धाडस करतो, तो गूढपणे आजारी पडतो. कधी कधी तर हे प्राणांवर देखील बेतते”. म्हणूनच तर इथे काही झाडे १००० वर्षांच्यावर जगताहेत, नैसर्गिक ऊर्जा, पाणी, खत, सर्व काही आहे त्यांच्याजवळ, सुदैवाने एकच गोष्ट नाही, माणसाची बुभुक्षित अन क्रूर नजर!!! ही वनसंपदा धार्मिक कारणांनी का होईना, राखली आहे इथल्या तिन्ही जमातींनी! इथे जैवविविधता उत्तमरित्या जतन केलेली आहे. वनस्पती आणि झाडांच्या प्रजातींच्या विस्तृत श्रेणी (यात दुर्मिळ प्रजाती सुद्धा आल्या बरं का!) फोफावल्या आहेत, निर्भय होऊन जगताहेत. मंत्रमुग्ध करणारी ही हिरवीकंच पर्जन्यवनराई इतकी कशी बहरते? याला कारण हिचे उष्णकटिबंधीय उगमस्थान! इथे वारा अन पाऊस फोफावतो, आनंदाचं उधाण येऊन! सोसाट्याचा वारा अन “घन घन माला नभी दाटल्या, कोसळती धारा!” हे होणारच. (गाणं टाकलय शेवटी!)

प्रिय मैत्रांनो, इथला टाइम पाळणे अत्यावश्यक (सकाळी ९ ते संध्याकाळी ४.३०). उशीरा जंगलात जाणाऱ्यास आणि जंगलातून उशीरा बाहेर येणाऱ्यास माफी नाही! आपण या जंगलाला सरावलेलो नाही, त्यामुळे भटकणे टाळा. बघण्यासारखे बरेच काही असूनही तुमच्या डोळ्यांना ते दिसणारच नाही याची खात्री बाळगा. इथल्याच प्रशिक्षित स्थानिक वाटाड्या/ गाईडला पर्याय नाही. तुमचा हा गाईड इथली समृद्ध वनसंपदाच दाखवणार नाही तर तो इथला वनरक्षक आणि सांस्कृतिक वारसदार आहे, हे लक्ष्यात असू द्या! हा पथप्रदर्शक रोमहर्षक तऱ्हेनं या जंगलातले गूढ उलगडून दाखवेल, तसेच खासी जमातींच्या धार्मिक आणि सांस्कृतिक श्रद्धेचा अन या जंगलाचा संबंध तपशीलासह सांगेल! मंडळी, तो इथले पानंपान बघता बघताच मोठा झालाय! इथल्या दंतकथा त्याच्याच प्रभावी निवेदनातून ऐकाव्या मित्रांनो. गंमत म्हणजे सर्व गाईड्सची जबानी सारखीच (समान प्रशिक्षण!), आमचा तरुण गाईड तर अस्खलित इंग्रजी बोलत होता. त्यानंच आम्हाला खासी भाषेची जुजबी माहिती दिली.    

आता या वनसंपदेतील नेत्रदीपक व विस्मयकारक गोष्टी बघू या:

नयनरम्य जंगलातील पायवाट (फॉरेस्ट ट्रेल)

इथल्या या वेड्यावाकड्या वाटा पर्यटकांना अगम्य वाटाव्यात अशाच आहेत! इथे फिरतांना वृक्ष वल्लींच्या आपसूक सजलेल्या मंडपातून किंवा छताखालून जातच जावं. हे सदाहरित घनतिमिर बन आपल्यावर मायेची पाखर घालत सूर्यकिरणांचा स्पर्श सुद्धा घडू देत नाही! इथली पानगळीची विलक्षण नक्षी हिरव्या अन हळदी रंगांनी सजलेली! हे निबिड वनवैभव कायम वाऱ्याच्या संगीतावर दोलायमान होऊन सळसळत असतं! या पायवाटा आपल्याला घेऊन जातात इथल्या सांस्कृतिक परंपरेच्या जगात!  

वर्षा ऋतूतील मुसळधार पाऊस असेल तर हा प्रवास कैकपटीने दुस्तर! याच सुगम्य वाटा आता निसरड्या अन शेवाळल्या होतात! (आमचे अनुभवाचे बोल!) आम्ही निम्म्याहून अधिक वन पाहिले, पण नंतर पायवाट सुद्धा चालणे कठीण झाले. एक नदी ओलांडून मगच पुढे जावे लागेल, शिवाय परतीची वाट नाही, अशी माहिती गाईडने दिली अन आम्ही माघारी फिरलो. प्रिय वाचकांनो, सप्टेंबर-ऑक्टोबर हे महिने या परिसराला भेट द्यायला उत्तम!

एकाश्म/ मोनोलिथ्स

या वनाचे गूढ वर्धित करणाऱ्या अनाकलनीय स्थानांवर एकाश्म/मोनोलिथ्स (monoliths) आहेत. मोनोलिथ म्हणजे एक उभा विशाल पाषाण किंवा एकाश्म/ एकल शिळा! गाईडने सांगितले की, एकाश्म ही खासी लोकांच्या पूजेची ठिकाणे आहेत. यांचा वापर प्राण्यांचा बळी देण्यासाठी करतात. आपण ज्या सहजतेने मंदिरात जाऊन घंटा वाजवतो, त्याच प्रकारे हे लोक प्राण्यांचा बळी देतात. इथे एक मोनोलिथ फेस्टिव्हल (उत्सव) देखील असते, आदिवासींचा सांस्कृतिक वारसा आणि वैभव बघायची ही उत्तम संधी! या वेळी हे संपूर्ण जंगल जिवंत होऊन स्वतःची कथाच जणू विशद करत असावे!

खासी हेरिटेज गाव

गावकऱ्यांच्या हस्तकलेचे दर्शन आणि आदिवासी झोपड्या असलेले हे गाव प्रदर्शनासाठी तयार केले जात आहे! याचे काम विविध स्तरावर सुरु आहे असे स्थानिकांनी सांगितले.

लबासा, जंगलाची देवता

लबासा, ही आहे शक्तिशाली देवता, याच जंगलात संचार करणारी, या प्रदेशातील सर्व लोकांची तारणहार अन श्रद्धास्थान! म्हणूनच बघा ना, तिच्या कृपेने गावकऱ्यांची संपूर्ण उपजीविका जंगलाभोवतीच फिरत आहे. रोग असो, नशिबाचे फेरे असो किंवा दैनंदिन समस्या असोत, ही देवता त्यांच्या विश्वासाचा प्रमुख आधारवड आहे. आदिवासी लोकांचे रक्षण करण्यासाठी ही देवता वाघ किंवा बिबट्याचे रूप धारण करू शकते अशी आख्यायिका आहे. देवतेला प्रसन्न करण्यासाठी कोंबडा किंवा बकऱ्यांचा बळी दिल्या जातो. गावकरी त्यांच्या मृतांना या वनातच जाळतात.

पुढील भागात सफर करू या एका अत्यंत दुष्कर ट्रेलची!

तर आतापुरते खुबलेई! (khublei) म्हणजेच खास खासी भाषेत धन्यवाद!)

टीप – लेखात दिलेली माहिती लेखिकेचे अनुभव आणि इंटरनेट वर उपलब्ध माहिती यांच्यावर आधारित आहे. इथले फोटो आणि वीडियो (काही अपवाद वगळून) व्यक्तिगत आहेत!

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे 

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ संक्रांत असते कुणावर?… लेखक : श्री आनंद देशपांडे ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

??

संक्रांत असते कुणावर?… लेखक : श्री आनंद देशपांडे ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

संक्रांत ते रथसप्तमी हा कालावधी आमच्या नागरी भागात “ महिला चैतन्य पंधरवडा ” असतो. महानगरातील लोकांच्या नशिबी हे सुख (?) नाही. गावभर साड्यांचे चालते बोलते प्रदर्शन असते. आमची माता भगिनी भर दुपारी अंदाजे अडीच तीन वाजता कामाला लागते. अत्यंत उत्साहात भगिनीवर्गाच्या झुंडीच्या झुंडी दुपारी तीन वाजल्यापासून  भन भन,भन भन गावभर फिरत असतात. दररोज नवी साडी, हातात पर्स आणि पायात चपला घातल्या की माउली जे निघते ते पार रात्री आठ वाजता खिचडी टाकायलाच घरी पोहोचते. बरे दुपारी निघतानाचा आविर्भाव ramp (म्हणजे तो नाही का फ्याशन शो मध्ये असतो) वर चालण्याचा असतो. संध्याकाळी घरी परतेपर्यंत कपाळ जगदंबेसारखे कुंकवाने  माखलेले असते. साडी जमिनीला टेकून खराब होवू नये म्हणून उचलून धरताना हात दुखतात तिचे पण वेदना जाणवत नाहीत घरी पोहोंचेपर्यंत. हे साड्या तयार करणारे लोक उंचीप्रमाणे साड्या का तयार करीत नाहीत हे एक आम्हाला पडलेले जुनेच कोडे आहे. साड्यांची जाहिरात करणाऱ्या बहुत्येक सर्व मॉडेल उंचच्या उंच आणि चवळीच्या शेंगेसारख्या आकाराच्या असतात.(लिखाणाला दर्जा प्राप्त होण्यासाठी लेखकाला किती सूक्ष्म निरीक्षण ठेवावे लागते याची नोंद घ्या). तर मग प्रश्न असा उभा राहतो की चवळीला आणि बरणीला एकच वस्त्र कसे चालेल ? असो. तर दरम्यानच्या काळात कुंकवाचा धनी आणि लेकरेबाळे हवालदिल झालेली असतात. ते बिचारे काल परवाच्या आईच्या वाणात काही खायचे आले आहे का याचा निष्फळ शोध घेतात. त्या दिवशीचे हळदी-कुंकू संपवून घरी परत आल्यानंतर बोलून बोलून, बोलून बोलून तिच्या घशाला कोरड पडलेली असते. आपण शांतपणे पिण्यासाठी पाणी आणून द्यावे. हाश-हुश्य झाले की संपूर्ण वृत्तांत ऐकून घ्यावा लागतो. म्हणजे “अमुक एक बाई, किती श्रीमंत पण वाणात लुटले (वाटले) काय तर रुपड्याच्या शाम्पूच्या पुड्या….” किंवा ,”तमुक बाईकडे दिलेले दुध इतके पांचट होते की मला तर  तिथेच कसेतरी होवू लागले…..संपूर्ण पिवूच शकले नाही मी…”  पुढचा डायलॉग संपूर्ण कुटुंबाला सुखावणारा असतो, “कधी एकदा रथसप्तमी येते असे झाले आहे.” त्यामुळे कधी एकदाची रथ-सप्तमी येते असे घरातील मुलांना आणि पुरुषवर्गालापण  झालेले  असते. हे थकव्याचे वैराग्य जेमतेम बारा तास टिकते. नवा दिवस, नवी साडी आणि तोच उत्साह दुसऱ्या दिवशी  असतोच असतो.

त्यात पुन्हा दूर अंतरावरील प्रतिष्ठित घरी हळदी कुंकू असेल तर होयबाला……माफ करा,,,,, नवरोबाला तिला गाडीवर बसवून न्यावे लागते. “तू पटकन हळदी-कुंकू घेवून ये तोवर मी इथे कोपर्यावर उभा राहतो”….यावर “आलेच पाच मिनटात” असे म्हणून ती अदृश्य होते. दहा, पंधरा, वीस मिनिटे होतात. याचे बिचार्याचे व्हाटसअप, फेसबुक पाहून होते तरी हिचा पत्ता नाही.  ‘त्या’ घरात गेलेली आपली माउली कधी बाहेर येते याची वाट पहात तो निरागस जीव  इतका कंटाळतो की इतक्या प्रतीक्षेने तर  विठूमाउलीचे दर्शन सुद्धा झाले असते असे त्याला वाटायला लागते. बरे कोपर्यावर असे आगंतुक उभे राहणाऱ्या पुरुषाला जाणाऱ्या येणाऱ्या महिला विचित्र नजरेने पाहतात त्यामुळे त्याला मेल्याहून मेल्यासारखे होते. आम्हाला साहित्यिक म्हणून ओळखणाऱ्या तर एकमेकीना,”बघ तेच ते…..कसे बेशरम सारखे उभे आहेत, बायका पहात “ असे म्हणत असाव्यात असा आम्हालाच संशय आहे. मग तब्बल चाळीस पंचेचाळीस मिनिटे झाल्यावर आपले ‘मॉडेल’ येतांना दिसते. बायकोच्या भन भन,भन भन फिरण्याला कंटाळलेला पती मग फन फन,फन फन करतो. (किती लयबद्ध वाक्यरचना आहे नाही? यातील संगीत कळण्यासाठी मराठवाड्यातच  जन्म घ्यावा लागतो महाराजा..). “उद्यापासून तुला वाटले तर तू जा , मी अज्जिबात येणार नाही”, अशी युती तोड्ल्यासारखी गर्जना तो करतो यावर ती गालातल्या गालात हसते, कारण तिला माहित असते की आज नाहीतर उद्या पुन्हा युती होणारच आहे.

या दिवसात एखादा मध्यमवयीन (म्हणजे हिंदीमध्ये याला अधेड उम्रका असे म्हणातात, म्हणजे ‘कुणी बाळा म्हणले तरी याला राग येतो आणि कुणी काका’ म्हणले तरी राग येतो.) पुरुष सायंकाळच्या वेळी विमनस्कपणे रस्त्यावर फिरताना दिसला तर हमखास समजावे की,”आज याच्या घरी हळदी-कुंकू आहे” म्हणून. म्हणजे ज्याच्या नावाने कुंकू लावले जाते त्यालाच घराबाहेर काढणारा सण म्हणजे संक्रांत होय. आता कळाले का आपली संस्कृती महान का आहे ते ? आपल्याच घरी जाण्याची सोय नसलेला हा कुटुंब-प्रमुख (?) मग  नियंत्रण सुटलेल्या उपग्रहासारखा भरकटत राहतो. या दिवसात थेटरात संध्याकाळी सहाच्या शो ला आलेले एकटे पुरुष हे असेच “हळदी-कुंकू के मारे” असतात.

अर्थात सगळेच विवाहित पुरुष काही इतके पापभिरू नसतात. चाणाक्ष मंडळी आपल्या घरी हळदी-कुंकू कधी आहे याची अधाश्यासारखी वाट पहात असतात.दिवसभर घरी सहकार्य करणारी  अशी मंडळी  साधारण चार-साडेचार च्या सुमारास जे फरार होतात ते थेट रात्री बारा वाजता, “उगवला चंद्र पुनवेचा”अशा परिपूर्ण अवतारात घरी अवतीर्ण होतात. आपण इकडे हळदी-कुंकू साजरे करीत होतो तेंव्हा आपल्या भाळावरील कुंकवाच्या धन्याने काय रंग उधळले असतील याची माउलीला लगेच कल्पना येते.   पण ती आज नेहमीप्रमाणे सौदामिनीचा अवतार धारण न करता ‘अलका कुबल’ होण्यात धन्यता मानते कारण आज ती तृप्त असते. आज तिच्या नव्या साडीचे, म्याचींग ब्लाउजचे. टिकलीचे, अंगावरील दागीन्यांचे, बैठीकीतील नव्या गालिच्याचे,  फ्लॉवरपॉटमधील फुलांचे, गजर्यातील वेणीचे, केलेल्या पदार्थांचे, लग्न होवून पुण्यात आयटी मधील नोकरी सांभाळून संसार करणाऱ्या आणि  आज संक्रांतीसाठी आलेल्या तिच्या लाडक्या लेकीचे  आणि तिचा जीव की प्राण असणाऱ्या तिच्या घराचे कौतुक झालेले असते. या सगळ्या कौतुकाचा एक ‘ग्लो’ तिच्या चेहऱ्यावर झळकत असतो. एकदाची रथसप्तमी होते आणि ती नव्या उमेदीने पुढच्या संक्रांतीची वाट पहाटते. असो. महानगरातील लोकांच्या नशिबी हे सुख (?) नाही.सुखाचा शोध लागलाच तर इकडेच कुठे तरी लागेल, ग्रामीण नागरी भागात.

लेखक : श्री आनंद देशपांडे, परभणी

संग्राहक : श्री श्यामसुंदर धोपटे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares